Thursday, October 29, 2009

ते श्रीमंत दिवस

पुण्याविषयी आणि पुणेकरांविषयी इतकं लिहिलं गेलयं कि काही बोलायची सोय नाही. आता पुण्याचा चेहरा मोहरा बदलत चाललाय शिवाय वाढत्या आय.टी सेक्टर आणि नवनव्या शिक्षण संस्था तसेच नवनवे शैक्षणिक अभ्यासक्रम यामुळे अमराठी लोकांच्या पुण्यावरील अतिक्रमणामुळेही पुण्याच्या हवेइतकच पुण्य़ाचं पुणेरीपण जात चाललयं(पूर्वीचं पुणं राहिल नाही हे म्हणणारी ,पुण्याचा अभिमान बाळगणारी मी मात्र अस्सल पुणेकरच) बदल हे होतच राहणार.नोकरीच्या, व्यवसायांच्या संधींसाठी नाना ठिकाणांहून लोक ही येणार.पुण्यात राहून पुण्याला आणि पुणेकरांना नावे ठेवणारी मराठी आणि अमराठी माणसं पुणं काही सोडत नाहीत, एक दोन वर्षात पुण्यात घर घेतात.
पुण्यात राहण्याचा मला मिळालेला फायदा म्हणजे लहानपणी बघायला मिळालेले अनेक उत्तमोत्तम कार्यक्रम आणि मोठमोठ्या व्यक्तिंची दर्शन! त्यावेळी वसंत व्याख्यानमालेत होणारी व्याख्यान असोत, की न्यू इंग्लिश स्कूलच्या पटांगणावरील गीत रामायण असो, बाबासाहेब पुरंदऱ्या्चं शिवचरीत्र,शिवाजीराव भोसल्यांची व्याख्यानं, पु.ल देशपांड्यांची भाषणं तसेच व्यंकटेश माडगूळकर,द.मा.मिरासदार आणि शंकर पाटील या त्रयीचं कथाकथन असे किती प्रसंग सांगावेत?
मुक्तांगण बालविकास केन्द्र नवाची इमारत सहकारनगर मध्ये झाली त्याच्या साठी पु.ल.देशपांड्यांनी देणगी दिली होती.त्याच्या उद्घाट्न सोहळ्य़ाला पु.ल. येणार हि बातमी आमच्या येथे बरेच दिवस गाजत होती. सकाळी लवकर उठून आम्ही त्या कार्यक्रमाला आठ पासून जागा धरुन बसलो होतो.पु.लं.च ते पहिलं दर्शन आजही माझ्या लक्षात आहे.मी त्यावेळी तिसरी-चौथीत असेन ,त्यांचे भाषण काही सगळे समजले असेल असे नाही.पण 'इथे मुलांना कुणी गप्प बसा असे म्हणु नका, त्यांना नाचू दे,गाणं शिकू दे,चित्र काढू दे ,आपल्याकडे मुलांसाठी म्हणून काही केले जात नाही गोकुळाष्ट्मी हा वास्तविक मुलांचा सण, पण दहिहंडी फॊडायला चाळीस-चाळीस वर्षांचे बाप्ये असतात मला म्हणायचयं तुम्ही कराना धृतराष्ट्र जयंती मुलांच्या खेळात का येता?' असं ते बोललेले अजून आठवणीत आहे.माझ्या मनाला ते भाषण जे भिडलं कि त्या नंतर पु.ल माझं दैवतच बनले! दूरदर्शन चा जमाना त्यावेळी आलेला नव्हता, रेडीओवर ऎकलेली व्यक्ती प्रत्यक्ष बघायला मिळणं म्हणजे पर्वणीच वाटे.
वसंत व्याख्यान मालेमध्ये दरवर्षी मोठ्मोठ्या वक्त्यांची विविध विषयावर व्याख्याने होतं , अजूनही ती परंपरा चालू आहेच.मे महिन्याची सुट्टी असे, मग रोज 'सकाळ' आला कि आधी आज कोणाचे व्याख्यान आहे ते बघायचं आणि विषय किंवा वक्ता ओळखीचा असला की जायचं ऎकायला.'शिवाजी राव भोसल्यांची व्याख्यान'तिथेच प्रथम ऎकली.त्यांची शिवाजी, बाजीराव, रामदास ,विवेकानंद, योगी अरविंद अशा नाना विषयांवरची व्याख्यान ऎकताना भान हरपायचचं, पण त्यांची ओघवती वाणी,त्यांचा प्रत्येक व्यक्तिरेखेचा सखॊल अभ्यास,त्यांची स्मरणशक्ती या सगळ्याचं अतोनात कौतुक वाटायचं आणि व्याख्यान संपल्यावर एका अद्भुत जगतात जाऊन आल्यासारखं वाटायच, नंतरचे २-३ दिवस त्याच धुंदीत जायचे.रवींद्र नाथांवरील पु.लंची तीन व्याख्याने अशीच टिळक स्मारक मंदिरात अकस्मिक पणे ऎकायला मिळाली.अकरावीत एस.पी.कॉलेजमध्ये होते मी त्या वेळी ,कुणीतरी बोलताना ऎकलं आज पासून तीन दिवस टिळक स्मारक मंदिरात पु.लंची व्याख्याने आहेत.कॉलेज सुटल्यावर परस्पर तिकडेच धावलो आम्ही दोन -तीन मैत्रिणी साडेसात पावणेआठला भाषण संपल्यावर घरी गेलो,घरी काहीच महिती नसल्याने जरा रागवा रागवी झालीच असेल पण उशीर होण्याचे कारण समजल्यावर आईचा राग गेला, आणि त्या एवढ्या सुंदर व्याख्यानाच्या आनंदात बाकी सगळे कःपदार्थ होते.
मी नववीत असताना शिक्षकांचा प्रदीर्घ संप झाला होता,बेमुदतच होता तो, थोडे थोडके नाही तब्बल बावन्न दिवस चालला.हि सुट्टी मात्र तशी कंटाळवाणी ठरली असती कारण कुठल्या दिवशी शाळा सुरु होईल ह्याचा नेम नसल्याने घर सोडणे शक्य नव्हते,दिवाळीच्या सुट्टी नंतर संप झाल्याने गॅदरींग, ट्रीप सगळे बुडले,आणि माझ्या बाबतीत तर आमचे दादा ही राज्य शासनाचे कर्मचारी असल्याने ते ही संपावर! त्यामुळे घरात अभ्यास करत बसावे लागे, त्यांना हि इतका रिकामा वेळ बहुदा पहिल्यांदाच मिळाला असावा , एरवी ते घरी यायचे तेंव्हा रात्र झालेली असे.दादांनी बीजगणित ,भूमिती सगळे पुस्तक शिकवून एकूण एक गणिते सोड्वून घेतली(नववीच्या पुस्तकातले २ धडे दहावीला होते हे नंतर कळले)पण तरीही सुट्टी कंटाळवाणी न होण्याचे कारण त्याच वर्षी पुण्यात मराठी साहित्य संमेलन झाले होते आणि शाळेला सुट्टी असल्याने मी ३ दिवस सकाळ संध्याकाळ गरवारे कॉलेजच्या पटांगणावर पडीक होते.भाषणे, परीसंवाद, कवी-संमेलन कसली धमाल! पु.भा.भावे अध्यक्ष होते , ग.दि.माडगूळकर,मंगेश पाडगावकर, कवी अनिल,शांता शेळके अशा कित्ती कित्ती लोकांना जवळून बघायला मिळालं! एका लहानश्या डायरीत बऱ्याच जणांच्या सह्या देखील मिळवल्या, 'नावं काय तुझं? काय शिकतेस?' एवढे प्रश्ण त्यांच्या पैकी काहींनी विचारले तरी लेखक आपल्याशी बोलले या आनंदाते अस्मान ठेंगणं होवुन जायचं! ना.धॊं.महानोरांनी गाऊन दाखवलेल्या कवितांनी ,पाडगावकरांच्या सलाम कवितेच्या वाचनाने अंगावर उठलेले रोमांच आजही आठ्वतात.एकही पैसा न खर्चता मिळालेले हे लाखमोलाचे क्षण! त्या अनुभवांनी माझं चिमुकलं विश्व उजळून गेलं. त्यातूनच मला वाचनाची गोडी लागली.ह्या दिवसांच्या आठ्वणी माझ्य़ा आयुष्यातील सगळ्य़ात आनंदाच्या आहेत.
शिक्षण संपून नोकरी लागली ,लग्न झालं .पूर्वी सहसा बघायला न मिळणारा पैसा हातात सहज खेळू लागला आता आपण कुठलेही नाटक बघू शकतॊ, कुठल्याही समारंभाला तिकीट काढुन जाऊ शकतो असा विश्वास आला.पण..... आता पुण्यात कुठे काय चाललयं ते बघायलाच वेळ नव्हता. एखाद चांगलं नाटक आहे असं कळलं आणि जायचा विचार करायचा अवकाश !, नेमकं कुणीतरी घरी टपकायचं, कधी कुणाची आजारपणं,पाहुण्याची सरबराइ, रात्रीच्या कार्यक्रमाला बरोबर यायला कुणी नाही, दिवसाच्या वेळी ऑफीसच्या कामात रजा नाही एक ना दोन हजारो कारणं आणि सबबी ! सुरुवातीला असे चांगले काही बघायला जायचे हुकले कि जीवाची तगमग व्हायची, चिडचिड व्हायची मग नवरा म्हणायचा,"एवढं काय झालं चिडायला? कुठल्याही कार्यक्रमाच्या ऑडिओ /व्ही.डि ओ सी.डी/कॅसेट्स , मिळत असताना त्या कार्यक्रमाला जायची गरजच काय? घरी बसून आपल्याला पाहिजे तेंव्हा निवांत बघू " लहान मुलाची पटते तशी माझी समजूत पटली होती सुरुवातीला,"खरचं हे आपल्या लक्षातच नाही आलं!" मग कुठल्याशा सुमुहूर्तावर एखादी व्ही.डि ओ कॅसेट्स आणली जायची ती लावे पर्य़ंत रात्रीचे नऊ वाजून जायचे,सुरुवात होवून जरा कुठे बघण्यात मजा येतीय तोच फोन वाजायचा, बेल वाजायची. नाहीतर कुणाला पाणी दे, कुणाला खायला दे,
विरजण लावलं का?
उद्याच्या नाश्त्यासाठी तांदूळ भिजत टाकले का?
सकाळच्या डब्य़ाला भाजी काय करणार ? बसल्या बसल्या निवडून टाक.
आमच्या घरी त्याकाळी रात्री अपरात्री पाणी येत असे ,मग पाणी भरणे, बागेला पाणी घालणे हे सगळे उद्योग करताना त्या कार्यक्रमाचा पूर्ण विसर पडे आणि संपलेल्या कार्यक्रमानंतर टि.व्ही. बंद करण्यापुरता त्याच्याशी संबंध उरे.त्यातून मग घरी काही आणून बघण्यातला फोलपणा कळून चुकला.
आता सतत २४ तास वेगवेगळ्या रुपातून करमणूकीची बरसात करणाऱ्या वाहिन्यांचा जमाना आला.त्यातून जाहिराती गाळुन अर्ध्या तासांत होणाऱ्या कार्यक्रमातून करमणुक होते का हा संशोधनाचा विषय होईल.त्यांचे विषय,दर्जा यातील कशाबद्द्लच न बोलणेच शहाणपणचे ठरेल.तंत्रज्ञान आणि कलाकृती (मग ते गाणं असो, कविता , नाट्क किंवा सिनेमा)हे एकमेकांच्या व्यस्त प्रमाणात असावेत असे वाटते.टि.व्ही.चं स्थान घरातला एक प्रतिष्ठेचा सिम्बॉल एवढचं राहतं.घरात एकटं असताना देखील मला कधी तो लावावा असं वाटतच नाही.
अजूनही पुण्यात चांगले कार्यक्रम होतात, आता मुली मोठ्या झाल्याने त्यांना घेवून जायचा आटापिटा मी करते, मध्यंतरी माझी मोठी मुलगी नववीत असताना अविनाश धर्माधिकारी यांची वेगवेगळ्या विषयांवर सात दिवस व्याख्याने होती,मुलींना घेवून मी पहिल्या दिवशी गेले, त्यांना कितपत समजेल हि शंका होतीच. धाकटीला नाही समजले सगळे पण तनु मात्र फारच प्रभावित झाली,नंतरचे सगळे दिवस रोज जाणे मला जमणारे नव्हते (संसाराचे व्याप ताप ई...(ध्रृ.))मात्र उरलेले सगळे दिवस ती कुणाना कुणला बरोबर घेवून गेली आणि तिने त्याचा पूर्ण आस्वाद घेतला. आणि मीच तो कार्यक्रम बघीतल्याचे समाधान मला मिळाले.माझ्या वडिलांनी मला दिलेला वारसा मी माझ्या मुलीपर्यंत पोहचवू शकल्याचं ते समाधान होत!


©

Tuesday, October 20, 2009

नादचित्रेमाझ्या लहानपणी टि.व्ही. नव्हता.पुण्यात तो कधी आला ते माहित नाही.आमच्या ओळखीच्या लोकांकडे मी ७वी-८वीत असताना आला आणि आमच्या घरी मी नोकरीला लागल्यावरच.मात्र माझ्या लहानपणापासून घरात रेडीओ होता आणि तो अखंड चालू असायचा. विद्याताई लहान असताना म्हणे तो आणला होता.त्यावेळी रविवारी सकाळाचे बालोद्यान ती रेडीओला कान लावून ऎकत असे.एक तर आमच्या लहान जागेत भरपूर माणसे, काका, मामा, दादा सगळ्यांचेच आवाज भक्कम. सकाळच्या कामाच्या वेळी आईचा तारस्वर.आणि आम्ही लहान म्हणून आमचा दंगा यात तिला बिचारीला तो कार्यक्रम ऎकायचा म्हणजे दिव्यच करावे लागे. आधी रेडीओचा ताबा मिळवणे,त्यावेळी काका किंवा मामाला इतर काही गाणी वगैरे ऎकायची बुध्दी झाली की हिच्या कार्यक्रमाची काय मिजास, त्याच वेळी दादांना विद्याच्या अभ्यासाची आठवण झाली तर कुणालाच रेडीओ ऎकणे शक्य नाही. तिच्या लांब सडक केसांना आईने तेल लावलेले असे,आणि नहायला चल असा अधूनमधून पुकारा असे, मात्र आईच्या हाकेला दाद न देता ती स्टूलावर उभी राहून रेडीओ लावी(घरातील एकमेव करमणुकीची वस्तू सर्वात ऊंच फळीवर होती)आणि मग त्याला कान लावून ती बालोद्यान ऎकायची. मग सगळ्या बाजूंनी तिच्या नावाचा पुकारा झाला तरी तिला त्याची शुध्द् नसे. माझ्या डॊळ्यासमोर आजही तिची स्टूलवर उभी राहून एकचित्ताने ऎकणारी मूर्ती डॊळ्यासमोर आहे.
मी फारसे बालोद्यानसारखे लहान मुलांचे कार्यक्रम ऎकले नाहीत, कारण मी त्या वयाची झाले आणि विद्याताई कॉलेजला जायला लागली, ती अखंड विविध भारती नाहीतर सिलॊन लावून गाणी ऎकायची.मधल्या वेळात आई मराठी गाणी लावायची, रेडीओ बॅक-ग्राऊंडला नसेल तर अभ्यास व्हायचाच नाही.आता आपण मुलांना एकसारखे टि.व्ही.पुढे असतात म्हणून ओरडतो, पण आमचे देखील रेडीओशिवाय पान हालत नसे. मात्र रेडीओमुळे आभ्यासात व्यत्यय येत नसे ऊलट मूड बनत असे. कारण कानाने ऎकताना लिहिणे, वाचणे सहज जमते.गणिते देखील गाणी ऎकताना सोडवता येत. अगदीच किचकट डेरिव्हेशन असेल , डोक्यात शिरत नसेल तरच रेडीओ बंद करावा लागे, पण अशी वेळ नाही यायची कारण रेडीओवर प्रोग्रॅम नसतील त्या वेळात असा अभ्यास करायचा.
सकाळी उजाडताना पुणे केन्द्रच लावायचे,(सकाळी सकाळी कसली ती सिनेमातली चटोर् गाणी ऎकता इति आई) मग 'उत्तम शेती ' पासून सुरुवात होई, रामदास स्वामींचे मनाचे श्लोक किंवा तत्सम मारुतीबुवा रामदासी आणि मोहन बुवा रामदासींच्या स्वरात . ऎकताना डोळ्यापुढे भगवी वस्त्रे घातलेली, पायात खडावा आणि हातात झोळी, दुसऱ्या हातात भोपळ्याचा तुंबा घेवून उभ्य़ा असलेली मारुतीबुवा रामदासी आणि मोहन बुवा रामदासींची जोडी उभी राही.त्यानंतर भक्ती संगीत.या तालावर काम चाले. संस्कृत बातम्या सुरु झाल्या कि सात वाजले.सकाळची शाळा असेल तर या आधीच घर सोडलेले असे, एरवी संस्कृत बातम्या झाल्या तरी गाद्या काढलेल्या नसल्या तर आईच्या तोंडाचा पट्टा सुरु होई.संस्कृत बातम्यांच्या निवेदकाचा आवाज अजूनही आठ्वणीत आहे.'इयं आकाशवाणि संप्रति वार्ता: श्रुयंतां प्रवाचकः बलदेवानंद्सागरः' हे वाक्य पाठ होते, मला हा बलदेवानंद सागर नावाप्रमाणॆ बलवान आणि धोतर नेसून उपरणं अंगावर घेवुन, गंध-बिंध लावून बातम्या वाचतोय असचं चित्र डोळ्यापुढे यायचं ,कधी कधी प्रवाचिका 'विजयश्रीः' असायची, ती मात्र रागीट चष्मेवाली, मोठा अंबाडा असलेली बाई असणार असे वाटे,त्या बातम्यांमधलॆ एक अक्षरही कळत नसे , अगदी शाळेत संस्कृत शिकायला लागले तरीही . प्रधानमंत्री,राष्ट्र्पती असे ओळखीचे शब्द कानी पडत, तेवढेच कळत , कळून घ्यायची इच्छा नसे हेच खरे.नंतर प्रादेशिक बातम्या लागत, त्या संपल्या कि हळुच विविधभारती लावायचे.साडेसातला संगीत सरीता मग भुलेबिसरे गीत. यामध्ये जुनी गाणी लावित काही वेळा ती बोअर असत पण बरेचदा छानच असत. चित्रलोक मध्ये त्यावेळच्या नव्या सिनेमांतली गाणी लागत नऊ नंतर अनुरोध गीत असे,आवडीची गाणी लागली की रेडीओचा आवाज मॊठा करायचा,इतका कि अंघोळीला गेले तरी गाणं ऎकू आलं पाहिजे.त्यात आईने सांगितलेल्या कामांकडे कानाडोळा करण्याचा सुप्त हेतूही साध्य होत असे. दहा नंतर अकरा पेर्य़ंत रेडिओ बंद असे. अकरा वाजता मधुमालती कार्यक्रम ऎकत उरलेला गृहपाठ, दप्तर भरणे, जेवण करुन साडेअकरा पावणेबाराला सायकलवरुन शाळेत जायला निघायचे. जाताना मैत्रीणींबरोबर ही आज कुठली गाणी होती, आशा भोसलेची 'ये है रेशमी जुल्फोंका अंधेरा' किंवा 'जाईये आप कहा जाएंगे' अशी गाणी ऎकली असतील तर त्याचीच चर्चा.संध्याकाळी सात वाजता 'फौजी भाईयोंकी फर्माईश' अर्थात 'जयमाला'.बुधवारची सिलोनवरची बिनाका गीतमाला आणि त्यातला तो अमीन सयानीचा अफलातुन आवाज आजही आठवतॊ. त्यांचं हिंदी फारसं समजत नसे पण ऎकत रहावं असं वाटे. विविध भारतीवर असणाऱ्या विविध गाण्यांच्या कार्यक्रमांची नावे देखील किती कल्पकतेने दिलेली असत. संगीत सरीता,भुलेबिसरे गीत काय किंवा जयमाला रात्री ११ वाजता 'बेला के फूल'.विनोदी श्रुतिका 'हवा महल'. ,'गागर में सागर'.अशी सगळीच नावे अर्थपूर्ण होती. मराठी कार्यक्रम ही दर्जेदार होते.मराठी श्रुतिका तर सुंदरच असत.व्यंकटेश माडगूळकरांची वाटसरू नावाची श्रुतिका अंगावर काटा आणायची.व.पु.काळ्य़ांचे टेकाडे भाऊजी अजून आठवतात.पु.लं.च्या मुलाखती, त्यांची भाषणे केवळ अप्रतिम.दिवाळीत नरकचतुर्दशीला पहाटे किर्तन असे.दुपारी संगीत नाटके असत.मोठमोठ्या लेखकांचे, कवींची भाषणे , त्यांचे विचार रेडीओमुळे परीचित झाले.
आजकाल 'एफ.एम.बॅंड ' मुळे पुन्हा तरुण पिढी रेडीओ ऎकु लागलीय.शिवाय हल्ली रेडीओ हा आमच्या वेळच्या रेडीओसारखा कोपऱ्यात राहणारा नाही, ट्रांझिस्टर हे त्याचं नाजुक रुपही बोजड वाटेल अशी लहान मॉडेल्स आहेत.गाडीमधील रेडीओ वर एफ.एम.बॅंड असतो,मोबाईल मध्येही एफ.एम.बॅंड असतो, त्यामुळे जळी स्थळी काष्ठीपाषाणी त्याची सोबत असते.शिवाय तो सतत २४ तास चालत असावा. मी मात्र त्याचा आनंद नाही घेऊ शकत. माझे वय हे कारण असू शकेल, मी एक वेळ आजकालची नवी गाणी एन्जॉय करु शकते, पण एफ.एम.बॅंडच्या रेडीओ जॉकी नामक व्यक्तिची अखंड चालणारी निरर्थक टकळी काव आणते. त्या बडबडीतून डोके दुखण्या खेरीज दुसरे काहीच होऊ शकत नाही.त्यामध्ये नविन माहिती मिळत नाही, कि काही मनोरंजन होत नाही.उगीचच हिन्दी, मराठी , इंग्रजी तिन्ही भाषांची खिचडी करत मधूनच आपणच केलेल्या पाचकळ विनोदाला फिदीफिदी हसत असतात.अधूनमधून मदर्स डे, फादर्स डे, व्हॅलेंटाईन डे अशा दिवसांची आठवणही करतात आपण भारतात राहतो, आणि आपल्याकडेही साजरे करावयाचे दिवस असतात असे मला कधी कधी त्यांना सांगावेसे वाटते. गाणे चालू असताना त्यांची बडबड थांबते म्हणूनही कदाचित गाणी आवडत असावित. अर्थात हे तितकेसे बरोबर नाही. ए.आर.रहमानचे संगीत असलेली , किंवा गुलझारची नवीन गाणी खरोखरीच आवडतात.रेडीओ जॉकी मात्र अशक्य आहेत.
वास्तविक रेडीओ हे माध्यम खरचचं चांगलं आहे. मनोरंजन, माहिती सर्व त्यातुन मिळाते, कुठेही नेता येते.आजकाल हेडफोन्स आल्यामुळे त्याच्या वापराने इतरांना त्रास होत नाही.कामे करता करता रेडीओ लावला कि करमणूक होते, त्याच्या पाशी बसून राहण्याची गरज नसते. शिवाय असं म्हणतात दृक माध्यमापेक्षा श्राव्य माध्यम अधिक चांगले, त्यात आपली कल्पनाशक्ती वापरली जाते. एक राजा होता हे एकताना मूल राजा कसा असेल याचं चित्र मनाशी रंगवतॊ, तेच राजा पडद्यावर दिसला तर कल्पना करायची वेळ येतच नाही.त्यामुळे कल्पनाशक्ती कमी होवू लागते.
आजारी व्यक्तींनाही रेडीओची सोबत चांगली.माहितीच्या नावाखाली फालतू बडबड करण्यापेक्षा काहीतरी दर्जेदार मनोरंजन करणे अवघड असले तरी अशक्य नाही. कलाकारांची तर सध्या अजिबात कमतरता नाही. तेंव्हा अनेक नवनवे बॅंड काढण्याऎवजी मोजकेच पण चांगले बॅंड ठेवून त्यावर मनोरंजक,उद्बोधक कार्यक्रम ठेवावेत. त्यामुळे अबालवृध्द पुन्हा एकदा रेडीओ ऎकून त्यातला आनंद घेवू शकतील.


©

Monday, October 12, 2009

सल

पटवर्धन बागेतल्या गजबजलेल्या रस्त्यांतून जाताना, तीस पस्तिस वर्षांपूर्वी मी तिकडे येत होते, असे मुळीच वाटत नाही. दर दोन वर्षांनी बदलणऱ्या पुण्यात जन्मापासून राहून देखील कित्येक भागात बऱ्याच काळाने गेल्यावर भंजाळायला होतं. बंगले पाडून मोठमोठ्या इमारती उभ्या राहतात, गल्ल्या जावून रुंद रस्ते बनतात.ओळखीच्या खुणा नष्ट होतात.
पटवर्धन बागेत रामकाकांच घर होतं, रामकाका माझ्या वडीलांचे, दादांचे बालमित्र. त्यांचे वडील दादांचे शाळेतले गणिताचे सर.त्यामुळे दर दोन -तीन महिन्यात त्यांच्याकडे दादांची चक्कर असायची. त्यावेळी फोन नसल्याने एकमेकांकडे भेटायला जाणे चालायचे. रामकाकाही अधूनमधून आमच्याकडे येत. त्यावेळी सहकारनगरमधून दादांबरोबर मी कधी चालत तर कधी सायकलवरुन जात असे.म्हात्रे पूल त्यावेळी नव्हता, आम्ही गरवारे कॉलेजच्या कॉज-वे वरुन गेल्याचे मला आठवते.शेतजमीनीवर अधूनमधून पटावर सोंगट्या पडाव्यात तशी घरे विखुरलेली होती.रस्तेही मातीचेच.काकांचा रवी माझ्य़ापुढे आणि प्रसाद हे मुलगे आणि सीमाच्या पुढे एक वर्ष असल्याने त्या दोघांची पुस्तके आम्ही वपरायचो. ती आणायला मला दादांबरोबर जावे लागे.एरवी त्यांच्याकडे जाणे मी टाळायची , एकतर तिथे बोलायला कुणी नसायचे.दादांच्या सरांबरोबरच्या गप्पात मला रस नसे.पण येता जाता दादा भोरच्या आठवणी, सरांच्या आठवणी त्यांच्या शाळेतल्या गमती सांगत, म्हणून जायला काही वाटत नसे.दहावी नंतर पुस्तकांसाठी जाण्याचा प्रश्ण संपला , अर्थात दादा जायचेच.
मी एफ.वाय ला असताना दादांचे अकस्मिक निधन झाले.रामकाकांना कुठुन समजले कोण जाणे? पण ते लगेचच घरी आले.बालमित्राच्या आठवणी सांगून घळाघळा रडले.नंतर अधूनमधून येत राहिले.आम्हाला दादांच्या ऑफीस प्रोसिजर्स काहीच माहित नव्हत्या.कुठे अर्ज करायचे, कुणाला भेटायचे यासगळ्या बद्द्ल काका मार्गदर्शन करीत. माझ्या बहिणीला दादांच्या जागी नोकरी लावण्यासाठी सुध्दा त्यांनी बरेच प्रयत्न केले. मंत्रालयात सतत जावुन पाठपुरावा करणॆ हि किती जिकिरीची गोष्ट आहे, हे त्यातून जाणाऱ्यालाच कळेल. हे सारे काकांनी केवळ मित्रप्रेमापोटी केले.घरी आले तरी चहाशिवाय ते काही घेतही नसत. आमच्या लग्नांना ते आले. नंतर ते ही सेवानिवृत्त झाले.अधूनमधून आईकडे येत, पण फार क्वचित. त्यांच्य़ा आई,वडीलांचे निधन झाले, त्यांची बायकॊ आजारी असे, ती हि गेली. आईकडे गेल्यावर बातम्या समजत. आईकडे फोन नव्हता, त्यामुळे या बातम्या आईलाही उशीरा समजत. आई देखील आजारी असल्याने पत्र पाठवण्या शिवाय काही करु शकत नव्हती. आम्हाला ती काकांकडे जा, असे सांगायची पण आमची नोकरी, संसार ,घरातल्या रोजच्या अडचणी यात राहून जायचे. मधल्या काळात आईच्या घराची दुरुस्ती केली त्यात जुनी कागदपत्रे,वह्या ,रद्दी फेकताना काकांचा पत्ताही गहाळ झाला.
गेल्या वर्षी पटवर्धन बागेतल्या बंगल्यांच्या सोसायटीत कुणाकडे तरी जायचा प्रसंग आला, तिथे मी करमरकर कुठे राहतात , माहित आहे का? असे विचारले. माझ्याजवळ पत्ता, खुणा काहिच नसल्याने जास्त विचारता येईना,आणि त्यांनाहि सांगता येइना. पण मला सारखे जवळच ते राहत असावे असे वाटत होते. त्यानंतर एक महिना उलटून गेला असावा. मी काही कामासाठी रजा घेतली होती, आणि मुलीला घेवून बाहेर गेले होते. अचानक मला वाटले चला, आज आपण काकांचे घर शोधायचेच. पुन्हा पटवर्धन बागेतल्या बंगल्यांच्या सोसायटीतल्या लहान लहान गल्ल्यांमधून मी फिरु लागले. दिसेल त्या माणासाला विचारु लागले. माझी मुलगी मला वेड्यात काढीत होती.तिच्याकडे दुर्लक्ष करीत माझा शोध चालू होता.पाऊण तास होवून गेला होता, लेक वैतागली होती
"आई , आता बास, उगीच प्रत्येक घरात जावून विचारत बसू नको, एक तर धड पत्ता नाही जवळ, आणि त्या काकांना किती वर्षात बघितलेलं नाहीस , समोर आले तरी ओळखू शकशील का? घरी जायचं का मी जाऊ एकटी? तू बस फिरत"
" अगं, थांब, हि शेवटची गल्ली बघू आणि निघुया" असं म्हणून एका सायकलवरुन जाणाऱ्या शाळ्करी मुलाला थांबवत मी विचारले ,"अरे करमरकर कुठे राहतात माहित आहे कारे?"
"मला दोन करमरकर माहित आहेत, तुम्हाला कोणते हवेत?"
" दोन्ही घरे दाखवतोस?, प्लीज"
" हो, चला ना " असे म्हणत त्याने सायकलवर टांग टाकली.त्याच्या मागे आम्ही गेलो. एका दुमजली घरापाशी तो थांबला. मी त्याला म्हटले इथेच थांब , मी आत जावुन येते.दारात तुळशी वृंदावन होते.पुढच्या दाराला कुलूप होते, पण आशा चिवट होती घराभोवती हिंड्ताना मागचे दार उघडे दिसले जिन्यात वरच्या मजल्यावरून बोलण्याचा आवाज ऎकू आला, कामवाली बाई जिना उतरत होती.तिला विचारले,"राम करमरकरांचे हेच घर का?"
"व्हयं, वैनी कोन आलयं बघा" असं म्हणत ती बाई बाहेर पडली.मुलीने त्या मुलाला हेच घर अशी खूण केली तो मुलगा गेला.
एक नाजूक चेहऱ्याची बाई बाहेर आली.तिच्या चेहऱ्यावर प्रश्णचिन्ह.काकांची सून असावी.
"रामकाका इथेच राहतात ना? मी त्यांच्या मित्राची मुलगी, भेटायला आलीयं त्यांना" एका दमात मी सांगितले.
" हो, याना आत. बसा, पण तुम्हाला समजलेलं दिसत नाही, ते वारले नुकतेच"
" केंव्हा? काय झालं होतं?" काहीतरी विचारायचं म्हणून तोंडतून गेलं, खरतरं मनं एका मोठ्या अपराधी भावनेनं मिटून गेलं होतं. तिनं मला नाव विचारलं. पाणी दिलं.
मी तुम्हाला कधीच पाहिल नाही, पण बाबांच्या तोंडून तुमचं, तुमच्या वडिलांच वर्णन ऎकलयं... ती बोलत होती, मी पण जमेल तसं बोलत राहीले.मनातल्या मनात स्वतःलाच लाख शिव्या मोजल्या.
आज जसा वेळ घालवला तसा काही महिन्यांपूर्वी का घालवला नाही? असा स्वतःला बोल लावत राहीले. काकांना भेटले असते तर त्यांना किती बरे वाटले असते.ज्या माणसाने निरपेक्ष भावनेने आम्हाला एवढी मदत केली त्यांना उतारवयात भेटून आनंद देणे माझ्य़ा हातात होते, ते मी नाही करू शकले.मनात काकांबद्दल कृतज्ञतेची भावना कायम होती, त्यांची आठवणही येत असे. पण त्याला कृतीची जोड नाही देता आली.आज समजतयं दादांचे त्यांच्या सरांना भेटायला जाणं किती मोलाचं होतं, सायकलवरून दादा जात होते, मी मात्र गाडी असूनही गेले नाही.दरवेळी काही ना काही कारणांनी जायचे राहत गेले.
माणसाच्या असण्याला किती गृहित धरतो आपण!, त्यामुळेच भेटण्यासारख्या गोष्टी पुढे ढकलत जातॊ. न संपणाऱ्या कामांच्या फेऱ्यात अडकुन महत्त्वाची कर्तव्ये चुकतात.मागे राहते एक अखंड सलणारी, ठसठसणारी जखम!


©