Thursday, August 27, 2026

निवृत्तीचा काळ सुखाचा

आमच्या घराच्या मागे चतुःश्रृंगीची टेकडी आहे.आम्ही नवीन रहायला आलो तेंव्हा पावसाचे पाणी टेकडीवरुन वाहून जायचे, त्या पाण्याने आमच्या सोसायटीची भिंत पडून पाणी आमच्या बिल्डींगच्या लिफ्ट मधे शिरले होते.पुढे ग्रिन हिल्स ग्रुप या सेवाभावी संस्थेने टेकडीवर झाडे लावली, रमेश ग्रिन हिल्सचे सक्रिय सभासद आहेत. त्यांनी टाकळकर या निवृत्त वन आधिकाऱ्यांशी संपर्क साधुन त्यांना टेकडीवर आणले. टाकळकर सरांनी टेकडीवर CCT (continuous contour trenching) करायचा सल्ला दिला ,टेकडीवर ठराविक अंतरावर चर खणावे असे त्यांनी सांगितले . त्या चरांमधे झाडे लावा म्हणजे पावसाचे पाणी वाहुन न जाता ते मुरेल व झाडे वाढली कि ती पण पाणी धरुन ठेवतील. सगळ्या ग्रिन हिल्स ग्रुप ने ते काम हाती घेऊन तडीस नेले.वनस्पती तज्ञ डॉ.महाजन सरांनाही रमेशने आमच्या घरी बोलावुन टेकडीवर कोणती झाडे लावावी याचा सल्ला विचारला.त्यांनी देशी झाडे लावायला सांगितली .कडुलिंब,बिट्टी,जांभुळ,बहावा अशी अनेक झाडेही ग्रीन हिल्स ग्रुप ने लावली. गेल्या दहा बारा वर्षात त्याची फळे दिसू लागली. टेकडी पावसात हिरवीगार होते. तिच्यावरील झाडांवर असंख्य प्रकारचे पक्षी आपापले संसार मांडतात. सध्याच्या पुण्याच्या कॉंक्रिटीकरणाच्या त्रासावर हि हिरवाई व पक्षांचा सहवास हा उतारा आहे.

नोकरी चालू असताना पक्षी येतच होते. सकाळी पोपट आमच्या खालच्या फ्लॅटच्या गॅलरीत येत.त्यांची आपापसातील भांड्णे, प्रियाराधन चाले पण चहा पिताना क्वचित बघितले जाई. रिटायर्ड झाल्यावर मी माझ्या डायनिंगच्या खिडकीत एक मोठा कट्टा करुन घेतला. सकाळी व्यायाम झाल्यावर रोजचा चहा मी कट्ट्यावर बसुन घेते.कडुलिंब आणि इतर झाडांवर साळुंक्या,चिमण्यांचा चिवचिवाट चालु असतो.  विणीच्या मोसमात घरटी बांधणे चालू असते.गुलमोहराचे झाड उन्हाळ्यात बहरते पण त्याच्यावर पक्षी घरटी करत नाहीत.  पोपट गॅलरीत येतात त्यांच्याशी साळुंक्या चक्क भांडतात. एकटा दुकटा पोपट असेल तर बिचारा समोरच्या जोशींच्या गॅलरीत जातो.जोशींच्या गॅलरीला पत्र्य़ाचे छप्पर आहे, त्याच्य़ा टोकाला गंजुन भोक पडले आहे,  रोज पोपट त्या टोकात चोच घालुन शिर्षासनात असतो.त्या भोकात त्याला किडे खायला मिळत असावे. त्याच्या कडे बघण्यात किती वेळ जातो त्याचा पत्ता लागत नाही. पोपटांचे थवे उडत टेकडीवरच्या झाडांवर उतरतात.क्वचित धनेश सुध्दा झाडावर दिसतो. भारद्वाज, बुलबुल पण येतात आमच्या गॅलरीत. पोपट,साळुंक्याचा मुख्य वावर असल्याने त्यांना प्रवेश नसावा.उन्हाळ्यात सावलीला चिमण्या ,साळुंक्या गॅलरीशी येतात. आम्ही खापरात पाणी घालुन ठेवतो, ते प्यायला बुलबुल,चिमण्या येतात.चिमधार पावसाच्या वेळी भिजुन गारठलेले पक्षीही वळचणीला येतात.

मध्यंतरी आमच्या ड्राय बाल्कनीत अर्धवट वाळलेल्या काड्यांचा कचरा दिसला. सातव्या मजल्याच्या गॅलरीत असा कचरा कोण टाकणार? असा विचार करत होते तेवढ्यात एक मुठीएवढा पक्षी माझ्या डोक्यावरुन गॅलरीतील पाईपच्या वरच्या टोकाच्या मागे जाताना दिसला. त्याच्या चोचीत लांब गवताचे पाते होते. पंधरा वीस मिनिटात त्याच्या पन्नास एक खेपा झाल्या असतील, त्यातल्या निम्म्या वेळा गवताची काडी खाली पडायची.पण पडलेली काडी गॅलरीच्या फरशीवरुन त्याने एकदाही उचलली नाही, गॅलरीतल्या कचऱ्याचा उलगडा मला झाला, मात्र त्याने खाली पडलेली काडी न उचलायचं रहस्य नाही उलगडलं. कदाचित फरशीवर उतरताना कोणी इजा करण्याची भिती असेल,किंवा जमिनीवर पडुन खराब झालेली काडी त्याला अवडत नसेल !  घरटे बांधण्यासाठी तो घेत असलेल्या कष्टांना मी मनोमन वंदन केले. पुढे त्या घरट्यात अंडी घालणे,उबवणे हे सोपस्कार झालेच असतील. पण उंचावरील त्या अडचणीच्या जागेमुळे त्याचा पत्ता लागला नाही. त्या इवल्याशा जीवानं येणाऱ्या जीवाच्या सुरक्षेची कोण काळजी घेतली होती !. हळुहळू घरट्यांतुन चिवचिवाट ऐकु येऊ लागला. कितीही ऊंच बघण्याचा प्रयत्न केला तरी दिसत नव्हतं. अखेर शेवटी माझी प्रतिक्षा संपली आणि त्या इवल्याशा पक्षाचं चिमुकलं बाळ उडायला सज्ज झालं. घरट्यातुन त्यानं गॅलरीच्या कठड्यावर झेप घेतली, ती घेण्यापूर्वीचे धडे मला दिसले नाहीत. पण तो जीव अतिशय भेदरलेला होता.त्याची आई( आईच असावी ती) कठड्यावरुन उडून समोरच्या फांदीवर बसे, पुन्हा कठड्यावर येऊन पिल्लाला सूचना देई. पिल्लू आपला मुठभर जीव (मुठीत कसं म्हणणार?) पंखात घेऊन कठड्यावरुन उठुन उडायचा प्रयत्न करी हातभर उडून परत कठड्यावर बसे, तोवर आई फांदीवर पोचलेली असे. तिकडून तिला बाळ अजुन कठड्यावरच दिसे, ती पुन्हा कठड्यावर येऊन बाळाला समजावी. दोघांची ती चिवचिवच पण त्या आवाजांच्या पट्टीवरुन त्यांच्यातील संवाद मला ऐकु येत होते.सुरुवातीला आई बाळाला चुचकारत होती, कौतुक करत होती.काही वेळानं ती रागावत आहे असा मला भास झाला.बाळाचं ओरड्णं रडण्याच्या बेतात आलं की आई पुन्हा लाड करी त्याला म्हणे ’अरे, बघ इतक्या उंच घरातुन तू आलास कि या कठड्यावर,  आता असचं उडायचं समोरचं आहे बघ फांदी , माझ्या मागे यायचं . फक्त समोरच्या फांदीकडे बघायचं ,इकडे तिकडे बघु नको.’ हा प्रशिक्षण वर्ग सोडून जाणं शक्यच नव्हतं. बऱ्याच वेळानं आईच्या प्रयत्नाला यश आलं, पिल्लू उडून फांदीवर बसलं ! हे मी फार थोडक्यात सांगतीय,प्रत्यक्षात हे घडायला बराच वेळ गेला, कठड्य़ावरुन उठुन पिल्लु थोडेसे वर जाई, घाबरुन पुन्हा कठड्याला धरी. एकदा तर ते गॅलरीच्या फरशीवर आलं,मग पुन्हा कठड्यावर जाण्याची धडपडं ! पण एकदा त्याने ती फांदी गाठली आणि त्याला अवघे आसमंत मोकळे झाले आणि आता तेवढ्या शिक्षणाने  उडण्याचा आत्मविश्वास त्या पक्षीणीने त्याला दिला. खर तरं उडणं किती कठीण ! माणसाचं मुल चालताना धडपडतच असतं, पडायला लागलं तर कुणीतरी त्याला सावरतं, धरतं आणि त्यातुन पडलं तरी जमिनीवर पडतं,त्याला थोड्याफार जखमा होतात.पण या पक्षाची उडताना जराशी चूक झाली तरी बिचारं किती उंचावरुन पडणार , कुठे पडेल याचा नेम नाही, पडताना त्याला कोणी आधार देऊ शकत नाही आणि पडलं तर त्याचा कपाळमोक्ष ठरलेला ! पण  असं घडत नाही, हि त्या सृष्टीकर्त्याची कृपाच नाही का? ’चोच देई पाखराला तोच चारा देत असे’ हा तोच  उडताना त्याला सांभाळत असणार यात शंकाच नाही. 

     

       एकंदरीत टेकडीवरील झाडे व पक्षी माझे निवृत्त जीवन समृध्द करीत आहेत