Showing posts with label अनुभव. Show all posts
Showing posts with label अनुभव. Show all posts

Friday, May 10, 2019

माझे टेकडी प्रेम

     सहकारनगर मध्ये आम्ही रहायला गेलो तेंव्हा मी तिसरीत होते.हे घर गावापासून खूप दूर वाटायचं, फारशी वस्ती नव्हतीच तेथे. घरातुन दूरवर टेकडी दिसे. दादा टेकडीवर घेऊन जायचे,तळजाई टेकडीवर वनविभागातर्फे तर कधी उत्साही पुणेकरांच्या तर्फे वृक्षारोपणे होत ,  तळजाई परीसरातल्या टेकड्या उघड्या बोडक्याच होत्या. आम्ही उत्साहात टेकडीवर जायचो तिथे एक जुना ठुबे बंगला होता ,तो भूतबंगला म्हणून ओळखला जायचा ,दिवसा त्या बंगल्यात हिंडून, तळजाई देवीचे दर्शन घेऊन परत यायचो. पुढे,पुढे मैत्रीणींबरोबर मैदानावर खेळण्यात वेळ जायला लागला तसे टेकडीवर जाणे कमी झाले. दहावीनंतर अभ्यास वाढायला लागला, नंतर दादांच्या अकस्मिक निधनानंतर अभ्यासाबरोबर घरातल्या जबाबदाऱ्या वाढल्या आणि घराजवळ टेकडी असल्याचाही विसर पडला.

लग्नानंतर तर संसार,नोकरी या चक्रात दिवस कसे जात समजत नव्हते, व्यायाम करायला पाहिजे असे सतत वाटायचे पण वेळ काढायला जमत नसे.बस मधुन,रीक्षातुन कधी गाडीतून जाताना टेकडी खुणावत असे पण जाणे शक्य नसल्यामुळे तोंड दुसरीकडे फिरवले जाई.अपराधी भावनेने मन भरुन जाई. बराच काळ निघुन गेला होता,टेकड्यांवर लावलेली झाडे मोठी झाली होती.पावसाळ्यात टेकडी हिरवीगार दिसे.उन्हाळ्यात देखील पानगळ झालेल्या झाडांतुन फुललेले बहावा,गुलमोहर सुरेख दिसत.

  मुली थोड्या मोठ्या झाल्यावर सुट्टीच्या दिवशी त्यांना घेऊन आम्ही टेकडीवर जायचो.कधी धारवाडहुन भाच्या आल्या कि त्यांना घेऊन भेळेचे सामान,पाणी ,सरबत असा सगळा जामानिमा घेऊन संध्याकाळी टेकडीवर जायचे. हिंडुन झाल्यावर सावली बघुन बसायचे,सुसाट वाऱ्याला तोंड देत ,वर्तमानपत्रे पसरायची त्यावर दगड ठेवायचे ,भेळ बनवायची आणि खायची, त्या भेळेची चव काही औरच ! त्या दिवशी टेकडी पण माझ्यासारखीच खुश असल्याचे जाणवे.

         माझी मोठी बहिण तळजाई टेकडीच्या पायथ्याला राहते.माझ्यापेक्षा अनेक अघाड्या लढवुनही ती रोज टेकडीवर जायची.तिच्याजवळ मी मला जायला न जमण्याबद्दल कुरकुर करताच ती म्हणाली," दररोज नाही तुला जमत,पण रविवारी सुट्टी असते ना, तू पहाटे साडेपाचला माझ्याकडे ये, तुझ्या मुली झोपलेल्याच असतात, आपण टेकडीवर जाऊ आणि सात वाजता मुली उठायच्या आत तू घरी जाशील " मग तिच्याघरी जायला लागले .तिच्याकडून पर्वतीच्या मागील बाजुने चढून,वाघजाई वरुन तळजाईला जायचे व तेथुन उतरुन दोघी आपापल्या घरी जायचे असा परिपाठ सुरु केला.माझा भाचा त्यावेळी इंजिनियरींगला होता.त्या वयातल्या मुलांचा सुट्टीचा दिवस सकाळी नऊच्या आत सुरुच होत नसतो. त्याला एकदा माझी बहिण म्हणाली,"बघ आम्ही बहिणी सुट्टीच्या दिवशी सुध्दा पहाटे उठून टेकडीवर फिरायला जातो,व्यायाम चुकवत नाही " त्यावर तो पठ्ठ्या म्हणाला ," अरे वा ,आई केवढा व्यायाम , जिभेला " .खरच आम्ही बहीणी गप्पा मारतच हिंडायचो,रस्ता कधी संपला समजायचेच नाही. आमचा उपक्रम पाच सहा महिने टिकला असेल.  पावसाळा सुरु झाला आणि टेकडीवरुन वाहणाऱ्या  पाण्याबरोबर आमचे फिरणे वाहुन गेले !

  पुढे माझ्या नवऱ्याने टेकडीवर जायचे ठरवले आणि मी त्याच्याबरोबर जाऊ लागले, त्यांच्या वेगाशी स्पर्धा करत चालताना माझी दमछाक होई. बरोबर चालायचे तर् चालताना मी बोलते म्हणून भरभर चालता येत नाही या त्यांच्या वक्तव्याने तोंड बंद करुन चालावे लागे आणि दमायचे नसेल तर् एकटीने चालायचे तरी तोंड बंदच मग मला चालण्यात मजा नाही यायची. आपण खूप चालतोय, दमून जातोय असं वाटत राही.शिवाय गप्प बसुन चालताना घरी पोचल्यावर काय काय कामे आहेत याचे विचार थैमान घालत आणि मग आपण घरातली एवढी कामे टाकुन भटकतोय या विचाराने मन बेचैन होई व टेकडीवर फिरायचा आनंद कमी कमी होई.

मुली मोठ्या झाल्या आणि आम्ही सेनापती बापट रोडवर रहायला आलो. वेताळ टेकडी घरापासुन जवळच आहे.रोज संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर घरी जाऊन चहा पिऊन टेकडीवर जायला सुरुवात केली. टेकडीवर गेले कि शहराशी संबंधच संपल्यासारखे वाटते.सगळे ऋतु वेगळेपणाने जाणवतात. रोजच्या सूर्यास्ताच्या वेळेतील बदल टेकडीवर ठळकपणे जाणवायचा. थंडीत दिवस लहान असल्याने अंधार लवकर पडायचा. घरुन निघायला जरासा उशीर झाला तरी टेकडीवर पोचेपर्यंत काळोख होऊन जाई. हळुहळू टेकडीवर जाण्याची सवय झाली,तिथली झाडे,पक्षी यांची ओढ वाटु लागली. न बोलता आजुबाजुला बघत निसर्गाचा आस्वाद घ्यायची सवय लागली.थोडक्यात टेकडीवर फिरणे आवडायला लागले.

      वेताळ टेकडीवर झाडी आहेच आता तेथे बरेच मोर आहेत, ससे दिसतात. पहिल्यांदा मोर बघितला तेंव्हा झालेला आनंद आणि आज मोर बघताना होणारा आनंद यात थोडाही फरक नाही. कधी झाडांवर बसलेले असतात, कधी खांबावर बसतात,कधी जमिनिवरुन चालताना दिसतात तर क्वचित आपल्यासमोर उडून ही जातात. उन्हाळ्यात झाडांचे खराटे झाल्यामुळे मोर पटकन दिसतो, शिवाय तो त्यांचा विणीचा मोसम असल्यामुळे मोराचा पिसारा झगमगत असतो, त्याच्या कंठाला निलकंठ हेच नाव शोभतं .

पावसाळ्यात टेकडी हिरवीगार असते. हिरव्या रंगाच्या अनेक छटा पानांमध्ये दिसतात.वेताळटेकडीवर प्रामुख्याने ग्लॅरिसिडीया नावाची विलायती झाडे आहेत.पावसाळा संपला कि लगेच हि झाडे वाळुन जातात ,नुसत्या काड्या राहतात पण  एका लहानशा पावसानंतर खराट्यासारखी दिसणारी हि झाडे पोपटी पानांनी मढुन जातात. पाऊस पडायला लागला कि टेकडीवर जागोजागी लाल वेलवेटसारखे दिसणारे मृगाचे किडे फिरु लागतात, माती मऊशार हिरवळीने झाकुन जाते . ज्ञानदेवांच्या ’मातीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव ’ या उक्तिचा प्र्त्यय ती मऊ हिरवळ देते. सगळी मोठ्मोठी झाडे देखील सुस्नात झालेली असतात अतिशय तृप्त वाटातात. पण जसजसा पाऊस वाढायला लागतो तसे टेकडीवर जाणे  अवघड होते .पावसाळ्यात खूप पाऊस असेल त्या आठवड्यात टेकडीवर जाणे झाले तरी वर हिंडणे कठीण होते, चिखलातुन फार काळजीने चालावे लागते,खड्ड्यांमधे पाणी साचुन डबकी झालेली असतात आणि बऱ्याच ठिकाणी  काळ्या मातीत पाय रुततात,दगडांवरही शेवाळ्याने पाय घसरायची भिती वाटते. अशा  गर्द हिरव्या झाडीत मोर दिसणे अवघड असते, क्वचित त्यांचे ओले पिसारे वाळवायला ते झाडांच्या टोकावर् बसलेले दिसतात पण ते ओले पिसारे तेवढे छान दिसत नाहीत शिवाय झाडांच्या रंगात ते लपुन जातात. अगदी धो धो पावसाचे दिवस सोडले तर बाकीचे दिवस टेकडीवर जाणे होतेच. पावसाच्या दिवसांत, घरात बसून टेकडीवरचे धबधबे बघण्यात समाधान मानावे लागते.

पाऊस संपुन थंडी सुरु होते, टेकडी आता गर्द हिरवी झालेली असते.तिच्यावरचे गवत कमरे एवढे वाढते,त्यातुन चालताना क्वचित सापकिरडुचं भय वाटतं. दिवस हळूहळू लहान होऊ लागतो, पहाटे धुक्याची शाल पांघरलेली टेकडी गूढरम्य दिसु लागते. पूर्वेकडून सूर्याची किरणे ती धुक्याची शाल हळुहळू दूर करू लागतात. पायथ्याला थंडी वाजते म्हणुन घातलेला स्वेटर,मफलर वर येईपर्यंत नकोसा वाटायला लागतो. नवरात्राच्या सुमारास झेंडुसारख्या गर्द केशरी फुलांची झाडे सगळ्य़ा टेकडीवर  वाढतात, केशरी फुलांच्या ताटव्यांनी नटलेली टेकडी फारच सुरेख दिसते. मात्र या थंडीत  मोरांची पिसे गळू लागतात( हे ज्ञान देखील टेकडीवर नियमित जायला लागल्यावर झाले. ) हे  पिसे गळलेले मोर,तिरुपतीहुन मुंडन् करुन आलेल्या दाक्षिणात्य  स्त्रियांसारखे दिसू लागतात. आम्हाला खुपदा थंडीच्या दिवसात दोन तीन लांडोरी आणि त्यांची दहाबारा पिले ओळीने गवतातुन जाताना दिसतात. मोराची पिल्ले बदकाच्या पिलांसारखीच ,तेवढीच फारसे रंगरुप नसलेली पण केवळ लहान वयामुळे गोंडस वाटणारी ! नवरात्रातल्या हस्ताच्या पावसापर्य़ंत गवत,झाडे हिरवी असतात,  आक्टोबर हिट मध्ये टेकडीवरील गवत पिवळे होऊ लागते,आठवडाभरात सगळे गवत वाळुन जाते, थंडी वाढायला लागली कि झाडांची पाने ही रंग बदलू लागतात. पानगळ सुरु होते.

     कधी कधी टेकडीवरचे गवत संध्याकाळच्या वेळी पेट घेते,हा वणवा नसून, ही आग मुद्दाम लावली जाते असे मला वाटते. रात्री खिडकीतून ही आग पाहिली की माझे मन तिथल्या पक्षांच्या,सशांच्या काळजीने कासाविस होते.अंधारात कुठे जातील बिचारी ? मलाही रात्रीच्या अंधारात टेकडीवर जाऊन आग विझवणे शक्य नसते . सकाळी टेकडीवर जळलेल्या गवताचा वास भरुन राहिलेला असतो.  संक्रांतीनंतर दिवस मोठा होत जातो, उन वाढु लागते,  वसंतात झाडांना पालवी फुटू लागते,कडुलिंब हिरवेगार होतात.

      ऋतुंमधले हे सगळे बदल टेकडीवर जाणवतात. निसर्गाचं चक्र जवळुन बघायला मिळतं.हल्ली तर टेकडीवर जाण्यामागे व्यायाम वगैरे विचार केंव्हाच मागे पडलेत. मोर बघायच्या वेडापायी वेगवेगळ्या आडवाटा शोधल्या आहेत आम्ही. काही वाटा तुलनेने अवघड आहेत त्यावरुन जाताना,कुठून आलो इकडे, आता परत नाही यायचं या रस्त्याने असं मनात येतं तोच रत्नजडीत पिसाऱ्याचा तोल सावरत एखादा मोर  आपल्याच मस्तीत डौलात समोरुन जाताना दिसतो ,डोळ्याचे पारणे फिटते . अवघड वाट तितकी कठीण वाटत नाही. परवा एकदा अशाच आडवाटेने आम्ही उतरत होतो, टेकडीच्या एका उतारावरील बेचकीत दोन तीन लांडोरी दिसल्या, आणि जरा पुढे आलो तर काय , मोराने आपला पिसारा फुलवलेला होता ! त्याचे प्रियाराधन चालले होते . जरा वेळाने त्या फुलवलेल्या पिसाऱ्याचे दर्शन आम्हालाही घडले, आम्ही मोराच्या मागे,लांडोरीकडे तोंड करुन होतो. त्या अनुभवाचे शब्दात वर्णन करणे अशक्य. त्या पिसाऱ्यावर लक्ष लक्ष पाचु जडवलेत असे वाटत होते,त्या हिरव्यागार पिसाऱ्यावर त्याचा लखलखित निळा गळा असा काही चमकत होता कि बस्स ! निसर्गाच्या अद्भुत कलाकॄतीकडे बघताना भान हरपुन गेले ! एकदा असाच दोन मोर आणि अनेक लांडोरीचा घोळका चालला होता आणि अचानक एका मोराने आकाशात झेप घेतली आणि लांबवर उडत गेला. मोराचा पिसारा बराच मोठा असल्याने  जास्त लांबवर उडायला त्याला अवघड जात असेल अशी माझी समजुत त्यादिवशीच्या मोराच्या भरारीने चूक ठरवली. एखाद दिवशी एकही मोर दिसला नाही अशी रुखरुख वाटत असतानाच टेकडीच्या पायथ्याकडे येताना अचानक डावीकडच्या झाडीत अगदी हाताच्या अंतरावर एखादा मोर आमचीच वाट बघत उभा असतो ! कधी अगदी पायथ्याच्या  झाडावर एखादा मोर आपला लांबलचक पिसारा सोडून ऐटीत बसलेला दिसतो.

व्यायामाचे असंख्य फायदे आपल्या सगळ्यांनाच माहित आहेत. चालणे,पळणे,जिम, योगा ,पोहणे असे असंख्य प्रकार लोक करत असतात.   टेकडीवर गेल्याने माझा व्यायाम किती होतो ते माहित नाही, त्या चालण्याने व्यायाम होतो का ? असाही प्रश्ण काही तज्ञांना पडू शकेल ,कारण माझ्या शरीरयष्टीत गेले अनेक वर्ष टेकडी चढून फारसा फरक पडलेला नाही.  मात्र माझे संसारातले ताप टेकडीवर गेले की मला संपल्यासारखे वाटतात. माझ्या ऑफिसमधील कामाचे ताण,तेथील राजकारण  यांचा तिकडे मला पूर्णतः विसर पडतो ! भूतकाळातील कटू आठवणी टेकडीवर फिरकत नाहीत कि भविष्यातील संध्याछाया तेथे भिती घालायला येत नाहीत .टेकडीवरची झाडे,ती माती, वेगवेगळ्या पक्षांचा किलबिलाट आणि त्या सगळ्यांवर कडी करणारे मोरांचे दर्शन मला दररोज नवा अनुभव देते,  ताजेतवाने करते. माझ्या वजनदार व्यक्तिमत्त्वाचं रहस्य ही त्यातच दडलेलं असाव कारण संस्कृत मध्ये श्लोक आहे ना
      सर्पा: पिम्बन्ति पवनं न च दुर्बलाः ते
      शुष्कै: तृणै: वनगजाः बलिनो भवन्ति
      कन्दै:फलैः मुनिवराः क्षपयन्ति कालम्
      संतोष एव पुरुषस्य परम् निधानं
म्हणजे साप वारा पिऊन जगतात पण ते दुर्बल नसतात,जंगलात वाळलेले गवत खाऊनही हत्ती धष्ट्पुष्ट असतात, कंदमुळे खाणारे मुनिवर दिर्घायु असतात ,संतोष हेच माणसाच्या निरोगी पणाचे कारण आहे.

      निसर्गाच्या एक तासाच्या सहवासात मला एवढा आनंद मिळतो तर त्याच्याच सानिध्यात कायम राहणाऱ्या आपल्या पूर्वजांचे किंवा ॠषीमुनींचे आयुष्य समाधानी असेल तर त्यात काय नवल !

Sunday, July 20, 2014

पासपोर्ट ऑफिस : एक दाहक अनुभव

               पासपोर्ट ऑफिस मधे जायची वेळ आजकाल बहुतेकांवर येते. माझा पासपोर्ट मी पहिल्यांदा हौसेने काढला, पण त्याची मुदत संपेपर्यंत देशाची सीमा ओलांडायचे योग काही आले नाहीत. नंतर तो पुन्हा एकदा उत्साहाने री-न्य़ू करुन आणला. तरी परदेशात जायला जमले नाहीच. परत त्याची मुदत संपली.   पासपोर्ट री-न्यू करायला हवा असे नवरा म्हणू लागला ,आता मात्र मी वैतागले होते. उगीचच दर पाच दहा वर्षांनी पासपोर्ट ऑफिसला चकरा मारुन त्याचे नूतनीकरण करायचे आणि जायचे तर कुठेच नाही.मला नकोच तो पासपोर्ट असे मी जाहिर करुन टाकले.पण नेमके माझ्या पत्रिकेतले परदेशगमन घडवणारे ग्रह फिरले आणि युरोप अमेरीका नाही पण गेला बाजार साउथ -इस्ट अशियातले देश मला दाखवून आणण्याची नवऱ्याला इच्छा झाली. मी पासपोर्ट ऑफिसला जाणार नाही म्हटल्यावर त्यांनी एजंटकरवी माझा पासपोर्ट री-इश्यु करुन घेतला.

मुंबईच्या विमानतळावर फॉर्म भरताना नव्या पासपोर्ट वरील माझ्या नावाचे स्पेलींग चुकल्याचे माझ्या लक्षात आले. पासपोर्ट्वरील चुकी्च्या स्पेलींगप्रमाणेच फॉर्म भरुन मी थायलंड,मलेशिया,सिंगापुर असा सगळा प्रवास केला.मी पासपोर्ट उघडून बघितलेलाच नसल्याने सगळ्या प्रवासात चुकीच्या स्पेलींगची  टोचणी मला होती. इकडे आल्यावर हि दुरुस्ती लगेचच करुन घ्यायचे ठरविले.

पुण्याला आल्यावर मी जुना पासपोर्ट बघितला त्यावर माझ्या नावाचे स्पेलींग बरोबर होते. मग नव्या पासपोर्ट वर चुकीचे स्पेलिंग कसे? एजंटने फोर्म भरताना माझ्या नावाच्या स्पेलिंगमधले एक अक्षर खाऊन टाकले होते. नावात दहा अक्षरे असल्याने फॉर्म सही करताना माझ्या लक्षात आले नाही त्यामुळे अंतिमतः चूक माझीच होती. चूक खूपच किरकोळ होती काम सहज होऊन जाईल असे मला वाटले. इथे माझी दुसरी चूक झाली.

पासपोर्टच्या साईट्वर यासंदर्भात काय करावे याबद्दल वाचले तेंव्हा माझ्या लक्षात आले कि नव्याने पासपोर्ट काढण्याकरीत करावी लागणारी सगळी उठाठेव या क्षुल्लक वाटणाऱ्या दुरुस्तीसाठी करावी लागणार होती.  पूर्वी पुण्यात असलेले पासपोर्ट ऑफिस पुण्याबाहेर घोरपडीला नव्या जागेत हलवले आहे. जाण्यापुर्वी वेळ ठरवून घ्यावी लागते आणि दिलेल्या वेळेला हजर रहावेच लागते. पासपोर्ट ऑफिसचे संगणकीकरण एका खाजगी कंपनीने केल्याने काम अगदी वेळेत ,सहज होते अशा अनेक गोष्टी मला साईट वरुन ,काही लोकांकडून समजल्या.
मी  वेळ घेतली. दुपारी पावणेदोन ची वेळ मला मिळाली होती.मी वेळेवर सर्व कागदपत्रांसह पोचले.ऑफिसच्या बाहेर शंभर एक लोक उभे होते.आत गेल्यावर सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून तपासणी होऊन आत गेले तर सात आठ काऊंटरवर मारुतीच्या शेपटासारख्या रांगा होत्या. एका रांगेत उभी राहिले. माझा नंबर आल्यावर माझी कागदपत्रे पलिकडच्या मुलीने माझ्या हातातुन हिसकावुन घेतली.ती मुलगी तिच्या खास कमावलेल्या आवाजात समोरच्या प्रत्येक व्यक्तीवर नुसती ओरडत होती. ज्यांची कागदपत्रे अपूर्ण असतील तर त्यांना झापत होती, काहींना झेरॉक्स काढायला पिटाळत होती. कागदपत्रे तिच्या ताब्यात दिलेल्या लोकांना वेगळ्या रांगेत उभे केले , मग साधारण अर्ध्या पाऊण तासांनंतर माझे नाव पुकारण्यात आले, मला माझ्या कागदपत्रांबरोबर एक कागद दिला तो माझा टोकन नंबर होता. ते सगळे घेवुन मी आतल्या हॉल मधे गेले.तेथील टि.व्ही.सारख्या पडद्यांवर टोकन नंबर आणि A1 ते A30 पर्यंत अक्षरे दिसत होती.आपल्या टोकन समोरील जो नंबर येईल त्या व्यक्तीकडे जायचे. मला A5 कडे जावे लागले.तिथे माझा फोटो काढला.सगळ्या कागदपत्रांची छाननी झाली.मला पुढे पाठवले.इथवरचा प्रवास तसा सरळ झाला. पुढच्या हॉल मधे पुन्हा तोच प्रकार आता A ऐवजी B ऑफिसर कडे जायचे.मी माझ्या टोकन समोर आलेल्या ऑफिसरच्या समोर गेले. माझ्या नावात झालेल्या छोट्या चुकीबाबत मी त्यांना सांगितले. माझ्या ऑफिसकडून पासपोर्ट् मिळण्याकरीता ’ना हरकत प्रमाण पत्र’  मी आणले होते पण त्या पत्राच्या दोन ओरीजनल प्रती आणणे अपेक्षित होते. माझ्याजवळ् एक  ओरीजनल  व एक झेरॉक्सप्रत होती, ती चालेल कि नाही याबाबतचा निर्णय ते घेवु शकत नव्हते. त्यांनी मला त्यांच्या वरीष्ठ् आधिकारी मॅडम कडे जाण्यास सांगितले. त्या मॅडम जागेवर नव्हत्या. त्यांना भेटायलाही शंभरएक लोक उभे होतेच. सुमारे एक तासाच्या प्रतिक्षेनंतर् मॅडम जाग्यावर आल्या.त्यांनीही टोकन नंबर प्रमाणॆ एकेकाला बोलवायला सुरुवात केली. माझा नंबर आल्यावर् मी गेले. मला नवा पासपोर्ट् का हवा आहे, म्हणजे माझ्या पासपोर्ट् वरील नावात कशी दुरुस्ती हवी आहे हे त्यांना समजावले.माझ्या जुन्या पासपोर्ट्वर नाव बरोबर असताना , तोच डेटा का घेतला जात नाही हि मला शंका होती त्याचेनिवारण त्या करु शकल्या नाहितच शिवाय तुमचे रेकॉर्ड मी मागवुन घेते असे खास सरकारी वाक्य बोलून त्यांनी मला थांबायला सांगितले. सुमारे एक तास बाहेर बसल्यावर् त्यांनी मला आत बोलावले आणि माझ्या एजंटने भरलेल्या फॉर्मची स्कॅन कॉपी त्यांनी मला दाखविली. (हि कॉपी त्यांना त्यांच्या स्क्रिनवर एक तासापूर्वीही दिसु शकली असती.कागदपत्रे मागवायची काही आवश्यकता नव्हती हे समजण्याइतका कॉम्प्युटरचा अनुभव मला आहे पण....) त्यात चुकीचे स्पेलिंग असल्याने त्याच नावाने पासपोर्ट् तयार झालेला आहे आणि तुमची सही असल्याने त्या चुकीला तुम्हीच जबाबदार आहात असे सिध्द करुन दाखविले. मला माझी चूक मान्य होतीच.पुढे काय करायचे एवढाच माझा प्रश्ण् होता. ,नावाच्या चुकीबाबत मी एक प्रतिज्ञापत्र आणले पाहिजे, दोन वर्तमानपत्रात छापुन त्यांच्या प्रती आणल्या पाहिजेत  असे त्यांचे म्हणणे होते. तुम्ही साईट् वर सगळे नीट् वाचले नाहीत असे त्या मला पुन्हा पुन्हा म्हणत होत्या. मग मात्र माझा संयम संपला. मी म्हणाले,"मी सगळे नीट वाचले आहे. नाव बदलावयाचे असेल तर म्हणजे एखाद्या मुलेचे लग्नानंतर् तिला नाव बदलून नव्या नावाचा पासपोर्ट् हवा असेल तर असे प्रतिज्ञापत्र करणे योग्य आहे. कारण त्या प्रतिज्ञापत्रात मी पूर्वी ....या नावाने ओळखत होते आता माझे नाव ....  झाले आहे  असा मजकूर आहे.माझ्या नावात असे काहीही झालेले नाही ,हि केवळ दुरुस्ती आहे, नाव बदल नाही" पुन्हा जुन्या पासपोर्ट वर बरोबर नाव, नव्या पासपोर्ट वर चुकीचे नाव असे सगळे त्यांना समजावल्यावर प्रातिज्ञापत्राची गरज नाही हे त्यांना पटले. पण आलेल्या व्यक्तीने आपल्याला समजावणे हे त्यांच्या पदाला मानवले नसणार , आता निमुटपणे सगळी कागदपत्रे घेवुन पासपोर्ट द्यावा असे लिहुन देणे त्यांना शक्य नव्हते मग  त्यांनी मला ऑफिसकडून दोन ओरीजनल ना हरकत प्रमाण पत्रे आणावयास सांगितली. मी नम्रपणे एक पत्र का चालत नाही असे विचारले तर् तुम्ही साईट्वर नीट् वाचत नाही   हे बघा असे म्हणून एक छापिल् पुस्तक दाखविले त्यात दोन ओरीजनल ना हरकत प्रमाण पत्रे आणावी असे लिहिले होते. साईटवरील् मजकुरा प्रमाणेच पत्र पाहिजे असे त्या म्हणाल्या. शिवाय़ मी आणलेल्या पत्रात एक मोठी चूकही त्यांना सापडली. माझ्या पत्रात मी भारतीय आहे असा उल्लेख नव्हता ! हे पत्र चालणारच नाही, नवी दोन पत्रे घेवुन परत या. मला हसावे कि रडावे समजेना, माझ्या हातात दोन पासपोर्ट होते, भारतातल्या केंद्र सरकारची मी थोडीथोडकी नाही तर पंचवीस वर्षे सेवा केली ती अभारतीय म्हणून? शिवाय माझ्या सहीने मी आजवर अनेकांना तात्काळ पासपोर्ट मिळावा म्हणून पत्रेही दिलेली आहेत. माझ्या सहीची पत्रे चालतात पण मी भारतीय आहे हे वाक्य पत्रात नसल्याने, मला पुन्हा यावे लागते. त्यांच्या जवळच्या माझ्या मागील रेकॉर्डस च्या स्कॅन कॉपीज त्यांच्या कडे होत्याच त्यात यापूर्वी माझ्या ऑफिसने दिलेली पत्रेही होती.पण आज त्यांना पुन्हा एक सोडून दोन पत्रे हवी होती. त्याच वरीष्ठ आधिकारी असल्याने पुढे जावुन तक्रार-अर्ज-विनंत्या करण्य़ाचा प्रश्ण नव्हता. आता पुन्हा अपॉंटमेंट घ्यायची का? हाच एक सवाल होता. त्यावर एखाद्या घोर अपराध्याला माफ केल्याच्या सुरात त्या म्हणाल्या, "तुम्हाला परत अपॉंटमेंट् घ्यायची जरुर नाही , सांगितलेली कागदपत्रे घेवुन परत या"

हे सगळे होइतोवर संध्याकाळचे पावणेसहा वाजले होते. तिकडे पाणी हॉलच्या शेवटच्या टोकाला होते. खाण्याच्या पदार्थांचे स्टॉल्सही होते, पण अतिशय महाग, साधा चहा २०ते २५ रु., सॅंडविच ५०रु. पासपोर्ट घ्यायला येणारे लोक उच्चभ्रूच असणार तेंव्हा त्यांना काय फरक पडतो? असे असले तरी त्यांच्या अगतिकतेचा फायदा घेतला जात होता हि गोष्ट पण नाकारता न येण्यासारखीच. मला तर आपला नंबर कधीही लागेल त्यावेळी हातात चहाचा कप किंवा खात खात कसे जायचे या विचाराने मी काही न खाता पिता राहिले. आत ज्या व्यक्तिला पासपोर्ट हवा तिच्याशिवाय दुसऱ्या कुणाला प्रवेश नसल्याने हातातील महत्त्वाची कागदपत्रे ठेवुन प्रसाधनगृहातही जाता आले नाही. एकुण काय तीन साडेतीन तास घालवुन मनःस्ताप घेवुन मी बाहेर पडले.

ऑफिसमधुन पुन्हा पासपोर्ट साईटवर दिल्याप्रमाणे पत्राच्या दोन प्रती घेवुन पुन्हा सकाळी नऊ वाजता पासपोर्ट ऑफिसात गेले.मला वाटले आता बाहेरच्या खिडाकीवर त्या पत्रांच्या दोन प्रती दिल्या कि माझे काम झाले. पण कसले काय? पुन्हा मागल्या वेळ सारखेच सगळे सोपस्कार करीत मला जावे लागले. यावेळी B ऑफिसरकडे माझा नंबर लागायलाच दिड तास थांबावे लागले तिथुन पुढे C ऑफिसरकडे माझी रवानगी झाली. त्यांनी ऑफिसचे पत्र बघितले आणि म्हणाले हे पत्र चालणार नाही. आमच्या साईट्च्या फॉर्म्याट सारखे हे पत्र नाही.माझे मागच्या खेपेस नाकारण्यात आलेले पत्र त्यांच्याजवळ होतेच , ते पत्र आता त्यांना योग्य वाटत होते. मला त्यांनी पुन्हा छापील पुस्तक दाखवले. मी म्हणाले ," ते पुस्तक मला दाखवु नका, मीच तुम्हाला इथुन तुमच्या साईटवरील नमुना दाखवते त्यानुसार हे पत्र नसल्यास सांगा"
"मॅडम , साईट वरील नमुना बरोबर नाही"
"मग योग्य नमुना साईट वर का नाही टाकला? आणि माझ्या ऑफिसने मागच्या वेळचे पत्र योग्य दिले असताना ते का नाकारलेत? मी पण सरकारी ऑफिसर आहे, मला नियम समजतात , तुम्ही विनाकारण त्रास देत आहात"
मी असे निर्वाणीचे बोलल्यावर त्यांनी माझी कागदपत्रे ठेवुन घेतली आणि तुमचा पासपोर्ट घरी येईल थोड्याच दिवसात असे सांगितले.

खाजगी कंपनीला पासपोर्ट ऑफिसचे काम देवुन काय साधले? वेळ वाचला नाहीच. खाजगी कंपनीमुळे ऑफिस चकाचक आहे. सरकारी  कार्यालयाची कळा त्याला आलेली वाटत नसली तरी आत मधे असणाऱ्या मोठ्या जनसमुदायामुळे कलकल गोंगाट असतोच. ऑफिसमधे ए.सी असल्याने सगळी दारे खिडक्या बंद. भर दिवसाही सगळीकडे ट्युब लाईट्सचा प्रकाश असतो. इतक्या लोकांच्या असण्याने ए.सीचा इफेक्ट अजिबात जाणवत नाही आणि वातावरणात एक प्रकारचा कोंदट्पणाच वाटतो. लहान मुले असतात, त्यांनी खाऊन टाकलेल्या बिस्कीटांच्या,चॉकेलेट्सच्या कागदांना कचरापेटी दाखवावी असे ना त्यांना वाटते ना त्यांच्या कंटाळलेल्या पालकांना. जेष्ठ नागरिकांसाठी वेगळी रांग आहे ती देखील खूपच मोठी असते.बसण्याकरीता बरेच बाकडी आहेत पण ती पुरणार नाहीत इतके लोक कुठल्याही वेळी आत असतातच.

तेथे एखाद्या दिवशी चारपाच तास घालवल्यावर माझी अशी अवस्था झाली मग तेथे रोज काम करणाऱ्य़ांचे काय होत असेल हि कल्पना मी करु शकते. हे काम अजिबात सोपे नाही. पण ते सोपे करणे शक्यच नाही असे नक्की नाही. एका ठिकाणी सगळ्यांना बोलावण्यापेक्षा पुण्य़ात चार-पाच ठिकाणी अशी कार्यालये काढता येणार नाहित का?
पासपोर्टचे नूतनी करण करताना असणारी पध्दत सोपी -सुटसुटीत करता येईल. नाव-पत्ता यांमधील चुका पुन्हा पुन्हा डेटा -एन्ट्री टाळुन कमी करता येतील. ऑनलाईन एंन्ट्री करु दिल्यास तर या चुका खूपच कमी करता येतील. साईटवर सर्व माहिती अद्ययावत ठेवल्यास लोकांचे हेलपाटे वाचतील.

पासपोर्ट हे अतिशय महत्त्वाचे दस्त आहे. तो देताना पराकोटीची काळजी घेणे आवश्यक आहे हे कुठलाही सुजाण नागरीक समजू शकतो.पण शासकीय कर्मचारी,शिक्षक,विद्यार्थी,जेष्ठ नागरिक यांना जास्तीत जास्त त्रास देणारे पासपोर्ट खाते कित्येक गुन्हेगार आणि अतिरेक्यांना पासपोर्ट देताना कुठली कागदपत्रे तपासते? अशी शंका मनात आल्यावाचून रहात नाही.

Thursday, January 9, 2014

आईची समाजसेवा

          माझ्या आईचा घरादारालाच नाही तर आमच्या साऱ्या गल्लीलाच धाक होता. तिचं व्यक्तिमत्वही भारदस्त होतं. माझ्या लहानपणातली आठवण आहे, आम्ही तेंव्हा एस.पी. कॉलेज मागच्या चाळीमधे रहात होतो.पलीकडच्या चाळीत कॉलेजच्या चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी रहायचे.त्यातील एका शिपायाचा मोठा मुलगा यशवंत उर्फ येशा दारु पिऊन धिंगाणा घालत असे. त्याच्या तरुण बायकोला मारहाणसुध्दा करायचा. आमच्या बाजुला नेहमीच आवाज येत नसे,पण एकदा बराच ओरडा झाल्याने त्यांच्या घरासमोर बरीच गर्दी जमली होती.तो खोलीत बायकोला मारत होता, माझ्या आईच्या कानावर जाताच ती घरातले काम टाकुन तिकडे गेली.गर्दीतुन त्यांच्या घरात शिरली आतल्या खोलीत दार लावुन तो शिव्या देत बायकोला बडवत होता.तिचा रडण्याचा आवाज येत होता.आईने दाराची कडी जोरात आपटली त्याहुन वरच्या पट्टीतल्या आवाजात त्याला हाक मारली आणि दार उघडायला लावले. दार उघडताच त्याच्या बायकोला हाताला धरुन बाहेर काढले आणि त्याला खोलीत ठेवुन खोलीचे दार बाहेरुन लावुन ती बाहेर पडली. बाहेर उभ्या असलेल्यांवरही तिने ," नुसते बघत काय बसला होतात? या पोरीचा जीव गेल्यावर तुम्ही पोलिसांना कळावणार होतात का?" असा जाब विचारत त्या मुलीला घेवुन ती आमच्या घरी आली.
दुसऱ्या दिवशी दारु उतरल्यावर येशा खली मान घलुन आमच्या घरी आला. आईची माफी मागत म्हणू लागला," माझं चुकलं, तुम्ही मला आईसारख्या आहात...."
त्याबरोबर उसळून आई म्हणाली, "तुझ्यासारखा दारुडा मुलगा मला नको, अरे चांगली हौशीनी एवढी गुणी पोर करुन आणालीस आणि तिला मारतोस? लाज कशी वाटत नाही तुला? माझ्या समोर शपथ घे पुन्हा असं वागणार नाही तस वागुन दाखव, मगच मला आई म्हण "

    पुरग्रस्तांसाठी वसविण्यात आलेल्या सहकारनगरमधे आम्ही रहायला गेलो त्यावेळी तो भाग पुण्याच्या बाहेर वाटायचा.सगळी शेतजमीनच होती ती.बांधकामे चालू होती.रस्ते देखील मातीचेच होते. रहावयास आलेले लोकही फार नव्हते. आमच्या घरासमोरच्या घरांमागे पटांगण होते तेथे बांधकामावर काम करणऱ्या कामगारांच्या झोपड्या होत्या. एक दिवस आईला बराचवेळ कुणी बाई रडत असल्याचा आवाज येत होता. तिची सकाळची कामे उरकल्यावर तिला आवाज जास्तच जाणवु लागला. घरात चैन पडेना तिला. घर  बंद करुन ती आवजाचा शोध घ्यायला बाहेर पडली. पटांगणातील झोपडीमधे एक लमाण बाई, बाई कसली वीस-बाविशीतली मुलगी रडताना तिला सापडली. तिचं तान्ह मुल देवाघरी गेलं होतं , वस्तीतली मोठी बायका आणि पुरुष माणसे कुठेतरी बांधकामावर गेलेली होती.तिच्या मांडीवर तिचं लेकरु गतप्राण झालेलं होतं.दुःखान उर फुटुन ती रडत होती, आजुबाजुला वस्तीतली एक दोन लहान मुलं कावरीबावरी होवुन बसलेली होती. ते दृष्य मोठं विदारक होतं, आईनं तिला शांत केलं हि घटना मोठी माणसं कामावर गेल्यावर झाली होती सकाळ पासुन त्य़ा पोरीच्या आणि त्या मुलांच्या पोटात काही गेलेल नव्हत. आई घरी आली घरातल अन्न घेवुन पुन्हा तिकडे गेली त्या सगळ्यांना तिन खाय़ला लावल. त्यावेळी फोनही फारसे नव्हते मग मोबाइल तर दुरच.शिवाय त्या पोरीला काम कुठे चाललय हेही माहित नव्हत , मग तिकडे जावुन त्या लोकांना आणण्याचा प्रश्ण नव्हताच. संध्याकाळी अंधार पडल्यावर त्या वस्तीतुन पुन्हा रडणे सुरु झाले, आई पुन्हा तिकडे गेली त्या मुलाला मोठी माणसे स्मशानात घेवुन गेली ती परत आल्यावर आईने त्यांना चहा नेवुन दिला, भात -पिठल पाठवल. मुलं आजारी पडली कि लगेच उपाय करा म्हणजे हि वेळ येणार नाही हे सांगाय़लाही ती विसरली नाही. पुढे बरीच वर्षे बांधकामाच्या निमित्तानं ह्या झोपड्या आमच्या भागात असायच्या, तिथली मुलं सर्दी -खोकल्यानं आजारी पडली तर आई बागेतला गवती चहा, पारीजातकाची पान,आल्याचा तुकडा देवुन त्याचा काढा कराय़ला सांगायची, आमच्या कडे काढा तयार असला तर तोच त्यांना द्यायची.

    सोसायटीत घराघरांतुन छोट्या-मोठ्या कुरबरी चालत. येथे रहायला आलेली मंडळी बहुतेक नारायण-शनिवार पेठांमधल्या वाड्य़ातुन, चाळीतुन आलेली त्यामुळे फ्लॅट,बंगले संस्कृती त्यांच्या अंगवळणी पडलेली नव्हती. दारे -खिडक्या उघड्याच असत सगळ्या घरांच्या. त्यामुळे आवाज गल्लीभर ऐकायला येत, शिवाय वाहने नव्हतीच त्यावेळी. समोरच्या घरांतील एकांकडे नवीन सून आली होती आणि तिच्याशी घरचे पटवुन घेत नसत. एकदा त्यांच्या घरातुन बराच आरडाओरडा ऐकू येत होता. आजुबजुच्या घरातुन सगळे तमाशा बघत होते. आई तिकडे गेली, तिच्या ठेवणीतल्या आवाजाने तिने सगळ्यांना शांत केले. नव्या सुनेला घेवुन ती आमच्या घरी आली. तिने सासरच्या लोकांचा तक्रारीचा पाढा वाचायला सुरुवात केली. तिचे माहेर दूर भुसावळला होते. भावाने कर्ज काढुन लग्न करुन दिले होते. माहेरी कळवुन त्या लोकांना त्रास देणे तिला नको वाटत होते. तिचा बी.ए. चा एक पेपर राहिला होता. आई तिला म्हणाली, " तुझ्या घरच्या भांडणांबद्दल मला काही सांगु नको, घरोघरी तेच चालत. तू रिकामी बसू नको, अभ्यास करुन पदवी मिळव, माझ्या घरी अभ्यासाला येवुन बस. जवळ कामगार कल्याण केंद्र आहे, तिथे जावुन शिवण शिक. चार पैसे कमवायला लाग. भांडण आपोआप कमी होतील"

    आमच्या पलिकडच्या सोसायटीत एक सरकारी ऑफिसर रहात होते ते सैन्यातुन निवृत्त होवुन मग एका डिफेन्स ऑफिसमधे नोकरीला होते, त्यांच्या मुलाला जन्मतः कानामध्ये दोष होता, त्याला कमी ऐकू येई, शाळेत अभ्यासात कमी पडल्यावरच हि बाब त्यांच्या लक्षात आली. तो मुलगा आमच्या घरी शिकायला येत होता. आई त्याला शिकवत असे. घरी केलेला प्रत्येक खाऊ त्याच्याकरता आई ठेवत होती. पुढे तो मोठा होवुन बॅंकेत नोकरी लागला. आईकडे पेढे द्यायला आला होता.तेंव्हा म्हणाला, " बाई मी लहानपणी किती दंगा करायचो, शाळेत मुले मला चिडवायची. शाळेत शिकवलेले मला समजायचे नाही , मार्क मिळायचे नाहित त्यामुळे  मी माझ्या बाबांचा खूप मार खाल्लाय. तुम्ही एकट्या मला कधी रागावला नाहीत माझ्याशी नेहमीच प्रेमानी वागलात. तुमच्यामुळेच मी आज नोकरी मिळवू शकलो."

    सोसायटीत आमच्या शेजारी सातारचे एक बिऱ्हाड आले त्यांच्या बायकोला के.ई.एम मधे नोकरी होती त्या नर्स होत्या. त्यांना शिफ्ट ड्युटी असे. त्यांच्या लहान मुलाचा सांभाळण्याचा प्रश्ण होता. त्यावेळी पाळणाघरे फारशी नव्हती. आणि त्यांच्या वेळात म्हणजे अवेळी असलेल्या नोकरीमुळे पाळणाघर मिळत नव्हते. त्या आईकडे आल्या आईने सहज त्यांच्या मुलाला सांभाळण्याची जबाबदारी घेतली.

        मी एन.आय.बी.एम.मधे नोकरीला असताना आमच्या ग्रुपमधे एक केरळी ख्रिश्चन ऑफिसर आले होते त्यांचे पहिले नाव विल्सन होते. त्यांना मुलगा झाला, तो वजनाने कमी होता आणि त्यांच्या बायको्ची तब्येतही गंभीर होती.हे ऑफिसर पुण्यात नवीनच असल्याने त्यांचे कुणी नातलग पुण्यात नव्हते, पुण्यात त्यांचे कुणी मित्रही नव्हते. त्यांच्या बाळाला सारसबागेजवळील अजेय जोशींच्या हॉस्पीटल मधे ठेवले होते, बायको के.इ.एम. मधे ऍडमीट होती. दोन्ही ठिकाणी थांबणे त्यांना जमणार नव्हते. त्यांची अडचण मी सहज आईला सांगितली. ती लगेच म्हणाली, " मी जाईन की जोशी हॉस्पीटलमधे बाळाजवळ थांबेन मी, त्यांना सांग काही काळजी करु नका मी तू ऑफिसला गेलीस कि आवरुन डबा घेवुन तिथे जाऊन बसेन" म्हटल्याप्रमाणे ती तेथे गेली. विल्सन साहेबांना इंग्लिश आणि मल्याळी येत होते, त्यांना हिंदी मराठीचा गंध नव्हता.  ते आल्यावर आई त्यांच्याशी कुठल्या भाषेत बोलली तिलाच माहित. पुढे मी एन.आय.बी.एम. सोडली. नंतर दोन -तीन वर्षांनी माझे लग्न झाल्यानंतर माझ्या नवीन ऑफिसचा नंबर शोधुन त्यांनी मला फोन केला आणि ते परदेशात जात असल्याचे सांगितले जाण्यापूर्वी त्यांना मला आणि माझ्या आईला भेटायचे होते. वेळ ठरवुन ते माझ्या घरी आले, आईलाही मी माझ्या घरी(सासरी) बोलावले होते. त्यांनीच माझ्या घरी सगळी कथा सांगितली आणि त्यांचा तो लहानगा आता चांगला  तीन-चार वर्षांचा गोंडस मुलगा झाला होता, त्यालाही ते आईबद्दल सांगत होते.

     कित्येक ओळखीच्या मुलींची लग्ने तिने जमवली. दूर गावाहून नव्याने सासरी आलेल्या आमच्या सोसायटीतल्या सुनांना आमच्या कडे आल्यावर माहेरी आल्यासारखं वाटे. आमची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हतीच, दादांची सरकारी नोकरी होती.घरात नेहमीच पाहुणे असत.आम्ही तिघी बहिणी. आई संसाराला हातभार म्हणुन शिवण शिवायची. छोट्या-मोठ्या शिकवण्या घ्यायची. पण कुणालाही मदत करताना तिने आपल्या फाय़द्याचा कधी विचार केला नाही. तिने मदत केल्यामुळे कल्याण झालेल्या अनेकांनी नंतर तिची विचारपुसही केली नाही याचा कधीतरी तिला त्रास होई ,पण तरी तिने तिचा दुसऱ्याला उपयोगी पडण्याचा मार्ग तिने सोडला नाही. हे सगळं ती चांगुलपणा मिळावा म्हणून करत होती असंही नाही.वेळ प्रसंगी वाईटपणा घ्यायची देखील तिची तयारी होती.  अतिशय परखड आणि स्पष्ट बोलण्याचा तिचा स्वभाव होता. माझ्या बहिणीची एक मैत्रीण कॉलेजमधे जाऊ लागली आणि नकळत्या वयात एका मुलाच्या प्रेमात पडली.घरी हि बातमी समजली होती आणि तिच्या घरुन तिला अभ्यास कर हे वय नाही लग्नाचं अशी समज दिली जात होती.ती त्या मुलाबरोबर पळून जाणार होती आणि या कामात तिला माझ्या बहिणीची किंवा माझी मदत हवी होती. एक दिवस ती घरी आली आणि मला तिने घराच्या बाहेर नेले अंगणात हलक्या आवाजात ती मला सांगत होती आई आतुन कधी बाहेर आली आम्हाला समजलेच नाही.तिने आमचे बोलणे थोडेफार ऐकले असावे.तिने मैत्रीणीचा हातच धरला आणि तिला तिच्या घरी नेले. तिच्या बाबांच्या ताब्यात तिला देवुन आई घरी आली या गोष्टीची तिने कुठेही वाच्यता केली नाही. तो मुलगा लफंगा होता,वयाने बराच मोठा फारसा न शिकलेला उनाडक्या करणारा होता असे नंतर समजले. तिच्या वडीलांनी नंतर घरी येवुन आईचे आभार मानले , आईच्या अगदी पायाच पडायचे त्यांनी शिल्लक ठेवले होते. त्यांच्या मुलीला आईने मोठ्या संकटातुन वाचवले होते. मैत्रीणीच्या नजरेत आई बरेच दिवस खलनायिकाच होती. आमच्या मैत्रीवर त्याचा परीणाम झालाच काही दिवस. अशा असंख्य आठवणी आहेत. काही आमच्या समोर घडलेल्या तर कित्येक आम्हाला माहितही नसलेल्या.

    मला काय करायचय? त्यांचं ते बघुन घेतील असा विचार करणारी आजची पिढी, नव्हे आमचीही पिढी बघताना आईच्या या वागण्यातलं मोठेपण फार जाणवतं. हल्ली मुलांच्या आत्महत्या, तरूण वयात येणा्रे वैफल्य,नैराश्य यांसारखे वाढते मानसिक आजार आणि वाढत्या समुपदेशकांची संख्या बघताना मला आईची सतत आठवण येते. आपण आजुबाजुला न बघता आपल्या कोषात वावरतो, शेजारच्यांच्या अडचणी आपल्याला दिसत नाहीत, दिसल्या तरी तिथे बोलावल्याशिवाय जाणे हे असभ्यपणाचे लक्षण आहे असे आपल्याला वाटते. शेजारच्या गल्लीत झालेल्या आत्महत्येची बातमी आपल्याला पेपरमधे किंवा टि.व्ही वरुन समजते.त्याबद्दल हल्लीच्या पिढीला, बदलत्या समाजाला आपण दुषणे देतो.पांढरपेशा समाजातील कातडीबचाऊ वृत्ती आम्ही अंगी बाणवल्यामुळे समाजात हे वाढते प्रश्ण निर्माण होत आहेत.अशा वेळी आईचे अडचणीत असलेल्यांच्या घरात विचार न करता घुसुन त्यांची अडचण निवारण्यासाठी मार्ग सुचविणे, प्रसंगी कठोर होणे हे केवढ मोठं काम होत ते आता समजतं. माझी आई काही फार शिकलेली नव्हती, जुन्या काळात मुलींना शिकवायची फारशी तयारी नसे, तिने घरच्यांशी भांडुन मॅट्रीकपर्यंतचे शिक्षण मिळवले होते.पुढे लग्नानंतर आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने  शिकायची आवड असून तिला शिकायला मिळाले नव्हते. पण तिच्याजवळ दुरदृष्टी होती. शिक्षण नसलं तरी तिची हुशारी तिच्या कामात, वागण्यात दिसायचीच. सामजिक बांधिलकीचा तर तिला कधीच विसर पडलेला नव्हता. आम्हाला कधी कधी आई हे कशाला करतीय असं वाटे. पण ती आमची पर्वा न करता सगळ्यांच्या मदतीला धावायचीच.  आईमधले हे कुठलेच गुण माझ्यात आले नाहीत.तिचा तोंडावर आमचे कौतुक न करण्याचा स्वभाव मात्र मी घेतला. आज ती या जगात नाही. तिच्या सतत दुसऱ्याच्यासाठी काही करणाऱ्या हातांना कंपवात झाला होता. तिच्या वेदना आम्हाला बघवत नव्हत्या. दिड वर्षापूर्वी त्यातुन तिची कायमची सुटका झाली. संक्रातीच्या आदला म्हणजे भोगी हा तिचा जन्मदिवस होता. त्यामुळेच कदाचित तोंडावर गोड बोलणे, तोंडदेखले गोड बोलणे किंबहुना गोड बोलणे तिला कधी जमलेच नाही. तिच्या पश्चात तिच्या असंख्य गुणांपैकी काहींचे स्मरण आणि वर्णन करावे असे आज मनापासुन वाटले. तिच्या जयंतीला माझ्याकडुन  तिला ही शाब्दिक श्रध्दांजली !

Friday, December 6, 2013

मी मायक्रोवेव्ह ओव्हन घेते

 लहानपणापासून मला खाण्याची खूप आवड. तरेतऱ्हेचे खाद्यपदार्थ मोठ्या चवीने खायची हौस. त्यातही गोडाच्या जेवणाची तर फारच आवड. रोज जेवणात गोड पदार्थ लागायचाच.अगदी गुळांबा,साखरांब्यापासून काहीच नसेल तर तूप साखर पोळी तरी लागेच मला. मात्र स्वयंपाक करायचा तेवढाच कंटाळा. घरात आई करायला भक्कम होतीच, आजीचाही मुक्काम असे, मोठी ताई होती त्यामुळे माझ्यावर कामाची वेळ येत नसे आणि आली तरी टाळण्यात मी तरबेज होते. काम न करण्यावरुन मी आईची खूप बोलणी खायची. आजीला फक्त विश्वास होता, "मनात आणल तर ती इकडचा डोंगर तिकडे करेल"  असे ती माझ्या वतीने आईला सांगायची. " हो,पण तिच्या मनात यायच कधी?" चिडून आई विचारी. "येईल गं, वेळ आली कि सगळं करेल ती, बघशील तू" असं समजावत ती मला खेळायला किंवा वाचायला पाठवुन देई.

    चांगली आठवी-नववीत जाईपर्य्ंत  चहा देखील केलेला मला आठवत नाही. नववीत असताना शाळेत आंम्हाला ’कार्यानुभव’ असा विषय होता त्यात एका सहामाहीला ’बेकरी’ नावाचा विषय होता. दुपारच्या तासांना बाई केक, ब्रेड, नानकटाई अशा विविध चविष्ट (आणि त्याकाळी आम्हाला अप्रुपाच्या वाटणाऱ्या) पदार्थांच्या कृती(आजच्या भाषेत रेसिपीज) लिहून द्यायच्या. त्यानंतर मुलींचे गट पाडून हे पदार्थ करावे लागत, त्यासाठी लागणारे सामान शाळेकडून मिळत असे. एखाद्या दक्ष गृहिणीच्या वेषात बाई प्रत्येक गटाला नीट मोजून सामान देत आणि कृतीत दिल्याप्रमाणे नीट करा, वाया घालवू नका अशी समज देत. आमच्या गटात काही मुली भलत्याच हौशी होत्या, अभ्यासात त्या थोड्या मागे होत्या, मग आमच्यात एक गुप्त करार झाला, या तासाचे काम त्यांनी करायचे त्याबदली त्यांना गृहपाठाच्या वह्या आम्ही द्यायच्या. मग काय कार्यानुभवाच्या तासाला आमचा तीन चार जणींचा उनाड ग्रुप गप्पा मारत बसायचा. तयार झालेला पदार्थ आम्हांलाही खायला मिळेच, कधीकधी बाईंची बोलणी पण खावी लागत. पण सगळ्यांनी तेथे गर्दी करण्याने होणाऱ्या गलक्यापेक्षा आमचे गप्पा मारणे बाईंनाही सोईचे ठरे. शेवटी परीक्षा आली, आम्हा प्रत्येकीला एक पदार्थ घरुन करुन आणायला सांगण्यात आले. वार्षिक परीक्षा, पास होणे अनिवार्य. मला केक करायचा होता. आईने त्यात अंडे असल्याने पूर्ण असहकार दाखवला , (शिवाय तिला वाटले असेल ,’बरी सापडली,आता न करुन सांगते कुणाला?’ ) शेवटी वही उघडली, त्यात लिहिलेले साहित्य, अंडे सोडून बहुतेक गोष्टी घरात होत्याच, वहित वाचून सगळे जसेच्या तसे केले, मातोश्री स्वयंपाकघरात आल्या देखील नाहीत. तयार केलेले मिश्रण एका सपाट बुडाच्या पितळी भांड्यात(आईच्या भाषेत त्या भांड्याचे नाव लंगडी होते) घातले, गॅसवर एक तवा ठेवला त्यावर ती लंगडी ठेवली वरून झाकण ठेवले, तव्यावर थोडी वाळू पसरली होती. वहीत लिहिल्याप्रमाणे साधारण तीस-चाळीस एक मिनिटांनी गॅस बंद केला, घरभर केकचा खमंग वास सुटला होता, केक चक्क सुंदर फुगलाही होता.पण तो खाता येत नव्हता कारण शाळॆत दाखवायला न्यायचा होता. दुसऱ्या दिवशी शाळेत नेवुन दाखवला, चांगले मार्क मिळवले.  तो घरी आणून कधी खाऊ असेच झाले होते मला आणि माझ्या धाकट्या बहिणीला. वडीलांनी , मोठ्या बहिणीने माझे खूप कौतुक केले, आजीनेही ’बघ, मी म्हटल नव्हतं मनात आणल की ती सगळ करते ’ या विधानाची खात्री झाल्याबद्द्ल शाबासकी दिली. आई म्हणाली," जमलयं तुला पण करत जा असच नेहमी, ....." पण इतके होवुनही आपल्याला वहित वाचून पदार्थ करता येतो हा विश्वास वाटल्याने पुन्हा मी त्या वाटेला फारशी कधी गेले नाहीच.

    ’मराठीने केला कानडी भ्रतार’ अशी माझी गत होती.सासर कन्नड असल्यामुळे तिकडच्या स्वयंपाकाच्या रितीभाती इकडच्यापेक्षा अगदीच वेगळ्या. माझी पाटी कोरी असल्याचा मला फायदाच झाला. माझ्या सासुबाई खूपच सुगरण होत्या, सगळ्या प्रकारचे पदार्थ करायची आणि लोकांना खाऊ घालायची त्यांना हौस होती, मी  नोकरी करत होते. पण मी शिकण्याचे धोरण धरले,त्यांनी पण कौतुकाने मला इडली-डोशापासून सार,सांबार,नारळाच्या पोळ्या आणि मंगळूरकडचे खास पदार्थ ही शिकविले. मराठी मुलींना स्वयंपाक जमत नाही असा आपल्यावर बट्टा येवू नये या मराठीच्या अभिमानापोटी आपल्याला सगळे आले पाहिजे या हेतूने का होईना मी सगळे शिकले आणि नकळत स्वयंपाकाच्या पाशात गुरफटले. तरी टि.व्ही वरील शो बघून ,किंवा मासिक-पुस्तक वा वर्तमानपत्रातील पदार्थ वाचून करुन बघण्याची सवय मला अजूनही लागलेली नाही. पण सुदैवाने (कि दुर्दैवाने?) माझे पदार्थ फारसे कधी बिघडले नाहीत. लाडवाचा पाक असो, कि पोळीचा गूळ मला जमतो, तिळगूळाची मऊ वडी खुसखुशीत होते आणि कडक वडी कुरकुरीत बनते,चिरोट्याला पापुद्रे सुटतात, पुरणपोळीही न तुटता तव्यावर चढते. मोदकाची उकड छान होते.थोडक्यात सुगरण म्हणावे इतपत सगळे जिन्नस मला करायला येतात. माझ्या सासुबाईंना याचे श्रेय जाते कारण त्यांनी योग्य मापात मला पदार्थ शिकविले. माझी आईदेखील सुरेख स्वयंपाक करायची पण तिला विचारले तर तिला कधीच प्रमाण सांगता यायचे नाही. अंदाजानेच ती सगळे घेत असे आणि चव न बघता सुध्दा तिचा पदार्थ चविष्ट होत असे, शिवाय कधीही तिच्या भाजी आमटीची चव बदलत नसे. तिला नेहमीच किमान १०-१५ लोकांचा स्वयंपाक करावा लागल्याने तीन -चार जणांचे माप तिला सांगता येत नसे. स्वयंपाकाची सवय झाल्यानंतर मी देखील अंदाजानेच सगळे करु लागलीय आणि मला पण कुणाला चटकन मापाने सांगायला येत नाही आता.
एकंदरीत माझी मुळ प्रवृत्ती ’सुगृहिणी’ नव्हती. मात्र अंगावर पडलेले काम मनापासून, आनंदाने करण्याची वृत्ती असल्याने मी स्वयंपाक करते. तो सगळ्यांना आवडतो. आले-गेले,पै-पाहुणे ,नातलग माझ्या पदार्थांवर खुष असतात .कुणालाही तोंडदेखले चांगले न म्हणणाऱ्या स्पष्ट्वक्त्या माझ्या आईने मला चांगला स्वयंपाक करतेस असे प्रशस्तीपत्रक दिले यातच सगळे आले. माझ्या मुलींना मी केलेले पदार्थ आवडत असल्याने मी नवनवे पदार्थ शिकत गेले , करुही लागले. अगदी चायनीज, पंजाबी , इटालियन असे वेगावेगळे प्रकारही जमु लागले. शेवटी कुठल्याही पदार्थातील घटकांचे प्रमाण योग्य पडले आणि तो नेमकेपणाने शिजला कि चव चांगली होणारच. हल्ली मिक्सर, फुड प्रोसेसर,इलेक्ट्रिक रगडा अशा विविध साधनांच्या सहाय्याने पदार्थ करणे खरोखरीच खूप सोपे झालेले आहे.  या आधुनिक साधनांमुळे कुठलाही पदार्थ सहज होवु शकतो. खलबत्ता,पाटा-वरवंटा,उसळ-मुसळ,जाती अशी साधने वापरुन चुली शेगड्यांवर जमीनीवर बसुन रुचकर स्वयंपाक करणाऱ्या पूर्वीच्या बायकांची आणि त्यांच्या शारीरिक कष्टांची कमालच वाटते.

     माझ्या सासुबाई फारच हौशी होत्या त्यांनी सगळ्या प्रकारची अनेक भांडी, मिक्सर, इलेक्ट्रिक रगडा ,ओव्हन सगळे जमा केलेले होते. माझ्या लग्नानंतरही स्वयंपाकघरात त्यांचेच राज्य असल्याने नवीन काही उपकरण बाजारात आले कि ते घेण्याकरीता त्या त्यांच्या मुलाच्या मागे लागत आणि वस्तू घरात आली कि त्याचा वापरही केला जाई. सोलर कुकर असाच आला.मग गच्चीवर त्यात दाणे भाज, भाजणी भाज सुरु झाले.सुट्टीच्या दिवशी वरण,भात ही बनु लागला. त्याला लागतात म्हणून बाहेरुन काळे असणारे ऍल्युमिनियमचे डबे आले. त्यात केक करुन झाला, ढोकळा करुन झाला. मग दरवेळी गच्चीवर जाणे, उन फिरेल तसे कुकर फिरवणे या गोष्टी त्रासदायक होवु लागल्या आणि त्याचा वापर थांबला. कुठल्याही प्रकारच्या लाह्या बनवणारे एक मशीनही आणले होते त्याचा ही तोच प्रकार,नव्य़ाची नवलाई संपली की वस्तू पडायची अडगळीत.  आणलेले कुठलेच भांडे टाकायचे नाही या मायलेकांच्या तत्त्वाने मला तो पसारा आवरणे फार मुश्किल होवुन जाई. जुना मिक्सर देवुन नवीन आला, फुडप्रोसेसर आला, जुना रगडा जावुन ओट्यावर बसणारा लहान रगडा आला. स्वयंपाकघर भांड्य़ांनी अगदी ओतप्रोत भरुन गेले आहे.

    यातच काही वर्षांपुर्वी ’मायक्रोवेव्ह’ नामक चीज बाजारात आली. सासुबाई या जगात नव्हत्या. मी त्या वस्तूबद्दल अजिबात स्वारस्य दाखवले नाही. मैत्रीणींकडे, बहिणींकडे मायक्रोवेव्ह आले.त्यांचे फायदे, गुणगानही कानावर येवु लागले. नवऱ्याने तुला हवा असल्यास सांग घेऊन टाकू अशी उदार ऑफर  दिली पण माझा निर्धार कायम होता.एक तर तो ठेवायला जागा लागणार, पुन्हा त्यात ठेवायची भांडी वेगळी म्हणजे पुन्हा ती घ्या. शिवाय त्याकरीता काचेची किंवा चांगल्या दर्जाच्या प्लॅस्टीकची भांडी लागतात असे कळले, ती भांडी कामवालीला घासायला देता येणार नाहीत म्हणजे आपलेच काम वाढवा. नकोच ते. म्हणून बरीच वर्षे मी या नव्या उपकरणापासून निग्रहाने दूर राहिले.

    माझ्या धाकट्या मुलीचे खाण्यापिण्याचे फार नखरे. तिला गरम पदार्थ खायची आवड. सकाळची पोळी रात्री नको म्हणेल पण करुन देवु का विचारलं तर तव्यावरची ताटात असेल तर दोन पोळ्या आवडीने खाणार. खायला काही करुन ऑफिसला गेले कि ती कॉलेजमधुन आली तरी खाणार नाही कारण  ते गरम नव्हते. मग तिच्या सगळ्या मैत्रीणींकडे कसे मायक्रोवेव्ह आहेत, त्या कशा गरम करुन घेतात याची मला सतत वर्णने ऐकवू लागली. वडीलांनाही तिने आपल्या पार्टीत ओढले. मायक्रोवेव्ह वापरल्याने वेळ किती वाचतो हे पण मुली मला सांगू लागल्या, त्यात पदार्थ कसे कमी तेला तुपात होतात म्हणून ते अन्न किती हेल्दी आहे , हे पण सुनवू लागल्या. माझा मनोनिग्रह हळूहळू ढळू लागला. मी पण आजुबाजुला मायक्रोवेव्ह बद्द्लची माहिती गोळा करु लागले. त्यात पोळ्या सोडून बाकीचे सगळे पदार्थ काही सेकंदात होतात असे सगळीकडून समजू लागले. त्यात साबुदाण्याची खिचडी कशी सुरेख होते, खोबऱ्याच्या वड्या कशा खमंग होतात. चिवडा किती झट्पट होतो. केक कसा मिनिटात होतो इथपासून ते मनात यायचा अवकाश मायक्रोवेव्ह मधे पदार्थ तयार होतो इथपर्य़ंत त्याचे वर्णन ऐकल्यामुळे  अशा जादु-ई-उपकरणापासून इतकी वर्ष वंचित राहिल्य़ाने माझे कित्ती नुकसान झालयं असं मला वाटू लागलं. घरात असलेल्या कित्येक काचेच्या भांड्यावर ’मायक्रोवेव्ह’ मधे वापरता येतील अशी सूचना असल्याने मुलींनी आई भांडी नाही घ्यावी लागणार असे सांगितले. मग मायक्रोवेव्हचा शोध सुरु झाला, शोध म्हणण्यापेक्षा सर्वेक्षण ( मराठीत सर्व्हे ! ) सुरु झाला. बाजारात अनेक कंपन्यांचे विविध मायक्रोवेव्ह उपलब्ध होते. विचारावे त्या प्रत्येकाकडे आणखी वेगळ्याच नावाचे असत. शेवटी मुली आणि त्यांच्या वडीलांनी बऱ्याच चौकशा करुन एक भलामोठा मायक्रोवेव्ह ऑर्डर केला. दुसऱ्याच दिवशी तो घरी आला आणि ओट्यावर स्थानापन्नही झाला. पण त्याचा डेमो दाखवायला येणारा माणूस त्याच्या सवडीने येणार होता. त्यामुळे दोन-तीन दिवस त्याच्याकडे बघण्यातच समाधान मानणे चालू होते. एके संध्याकाळी कंपनीचा माणूस डेमो दाखवायला आला. त्याने भराभर बटणे दाबून ,मायक्रोवेव्ह,ओव्हन,ग्रील मोड. कुठल्या मोडवर कोणते भांडे, कसे किती वेळ ठेवायचे हे धडाधड सांगितले.
"भाजी शिजायला किती वेळ लागतो?" माझा बेसिक प्रश्ण
" ते कोणती भाजी आणि किती क्वांटीटी त्यावर अवलंबुन आहे"
"पण इथे तर तुम्ही आधीच टायमिंग सेट करायचं म्हणता ना, मग किती वेळ ठरवायचा?"
" ठरवा तुमच्या अंदाजानं , मधेच स्टॉप करुन बघायचं, आणि मॅडम याच्यासाठी स्पेशल क्लास आहेत त्याचा नंबर देतो मी तुम्हाला. तो क्लास अंटेंड करा, सगळं समजुन जाईल बघा. निघतो मी, सही करा या पेपर्सवर"
मला जास्त बोलू न देता सही घेऊन आणि त्या क्लासचा नंबर देवून तो मुलगा निघुन गेला.
मुलीने मॅन्युअल वाचून पापड वगैरे भाजुन बघितले.
त्या क्लासच्या वेळा माझ्या वेळांशी जमत नसल्याने थोरल्या मुलीने मी जाईन असे जाहीर केले. मी ही तिने आपण होवुन जबाबदारी घेतल्यामुळे खुष झाले. पण तिचाही जाण्याचा मुहुर्त येईना . हळूहळू त्या बंद यंत्राकडे बघुन त्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे या विचाराने आपणच सुरुवात करायचे ठरवले. नाही म्हटले तरी दोन-आडीच दशकाचा स्वयंपाकाचा अनुभव गाठीशी होताच. मुलींचे दुध गरम कर, पाणी गरम कर अशी सुरुवात केली. साबुदाण्याची खिचडी त्यात कराय़ची होती, पण तेवढे मोठे काचेचे वा प्लॅस्टिकचे भांडे माझ्याकडे नव्हते मग बटाटे त्यात उकडायचे ठरवले. पाण्यात बटाटे घालुन ३ मिनिटे सेट करुन ठेवले. तीन मिनिटे झाल्याबरोबर बझर वाजु लागला, भांडे बाहेर काढले.पाणी उकळत होते.बटाटे काढले सोलायला घेतले तर फारच जाड साल निघू लागली.सालीला बराच बटाटा गेला. नणंद म्हणाली ,’सालं काढुन बटाटे ठेवायचे असतात’, बहिण म्हणाली ’पाणी न घालता ठेवले तर सालं पातळ निघतात’  एकूण बराच बटाटा वाया घलवुन खिचडी गॅसवर केली. मोठी मुलगी  नाश्ता करायला उशीरा आली. तिला खिचडी गरम करुन देण्याकरीता काचेचा बाउल शोधला,आणि त्यात खिचडी घालुन मायक्रोवेव्ह मधे गरम केली,बाऊल गरम झाला म्हणून ताटलीत काढायला गेले तर बाउलच्या आकाराची खिचडीची मुद तयार झाली होती! सगळा साबुदाणा चिकटुन गोळा झालेला बघुन ती माझ्यावर भडकलीच.
"हे काय केलय? "
"खिचडीच आहे गरम केली आत्ताच मायक्रोवेव्ह मधे"
"कुणी सांगितल होतं तुला गरम करायला? मला नको तो गोळा, तूच खा थंड खिचडी उरली असली तर मी खाते"
मग ती खिचडी कशी ,किती वेळ कुठल्या भांड्यात ठेवायला हवी होती यावर  तिघांनी माझे बौध्दिक घेतले.
भाज्या उकडायला ठेवाव्या म्हटल, तर कधी कमी शिजत, थोडा जास्त वेळ लावावा तर पार शिजुन काला होई.
एकदा  बरेच पाहुणे येणार होते, इडली सांबार करायचे होते.सांबारच्या सगळ्या भाज्या चिरुन पटकन शिजाव्या म्हणून प्लॅस्टिकच्या डब्यात पाणी घलुन ठेवल्या, बाकीच्या कामाच्या नादात बझर झाल्यावर मेन स्विच बंद करुन ठेवले,कुकरमधली डाळ शिजली होती, फोडणी करण्यापूर्वी भाज्या बघाव्या म्हणून मायक्रोवेव्ह उघडला आणि डोक्याला हात लावला....
डब्याचे झाकण वितळले होते आणि आतले पाणी कोमट देखील झाले नव्हते ! गुपचूप झाकण कचरापेटीत फेकले आणि पारंपारिक पध्द्तीने सांबार करायला घेतले.
पुन्हा सगळ्यांनी तुझे कसे चुकले असेल यावर माझी खरडपट्टी काढलीच. एव्हाना काही प्लॅस्टिकच्या ताटल्यांचे द्रोण झाले,  काही काचेच्या भांड्य़ांना तडे गेले, शेंगदाणे करपले आणि दर वेळी मी आरोपीच्या पिंजऱ्यात.मी चुकीचे भांडे, चुकीचे ऑप्शन, चुकीचे टायमिंग लावल्याचे सिध्द झाले. 

    या मायक्रोवेव्हचे मी काय घोडे मारले? का दर खेपेला काही करायला जाव तर माझा पचका होतोय या विचाराने मला अगदी बेचैन करुन सोडले.विचार करता करता बऱ्याच गोष्टींचा उलगडा होवु लागला. आजवर रामायण,महाभारत पुराणे,इतिहास यांत ’गर्वहरणाच्या’ अनेक गोष्टी वाचल्या होत्या. आपल्याला चांगला स्वयंपाक विनासायास करता येतो असा मला गर्व झाला असेल, त्यामुळे माझे गर्वहरण करण्यासाठी मायक्रोवेव्हची योजना झाली असावी. चूल,बंब,स्टोव्ह या सा्धनांशी माझा अगदीच संबंध आला नाही असे नाही. भोरच्या आमच्या घरी किंवा माझ्या माहेरी देखील चूल,बंब यावर मी पाणी तापवले आहे. माझ्या मंगळूरच्या सासऱच्या घरी चुलीवर इड्ल्या आणि तांदळाचे अनेक प्रकार शिजवले आहेत. गॅसवर  स्वयंपाक करण्यात तर हयात गेलीच. एकूण माझे आजवरचे आयुष्य आणि हि साधने यात साम्य होते. ते म्हणजे कुठल्याच पूर्वनियोजना खेरीज  आयुष्य येत गेले तसं मी जगत गेले. या साधनांमधुन पदार्थ करताना त्याच्याकडे शिजताना बघत बघत तो होत असे.पदार्थ किती वेळात होईल ते आधीच ठरवावे लागत नव्हते .आधीच पदार्थ बनण्याला किती वेळ लागेल हे निश्चित करायचे आणि त्याप्रमाणे सेटींग करायचे हे माझ्या जीवनशैलीला मानवणारे नव्हतेच. कुकरची शिट्टी झाली कि बारीक करुन गॅस बंद कर, वाफ आली कि भाजी शिजली समज. पोळी,भाकरी भाजलेली तर डोळ्याला दिसतेच. मायक्रोवेव्ह मधे आधी सगळे तयार करा त्याला किती वेळ लागेल हे तुम्हीच नक्की करा तसे सेटींग करा मग तेवढ्या सेकंदात पदार्थ बनेल,पण त्या काही सेकंदांसाठी आधी किती वेळ जातोय याचा हिशेब केलाच जात नाही, उगाच इतक्या सेकंदात अमुक होतं अशा जाहिराती !. मायक्रोवेव्ह मधल्या इड्ली स्टॅंड मधे एका वेळी लहान आकाराच्या आठ इडल्या होतात.घरातल्या चार मोठ्य़ा माणसांना सरासरी पाच इडल्या लागत असतील तर या वीस इडल्यांना मायक्रोवेव्ह मधे लागणारा एकूण वेळ आपल्या एकावेळी २४ इडल्या करणाऱ्या स्टॅंडपेक्षा कमी कसा असेल? कारण इडल्या जरी चटकन शिजल्या तरी झालेल्या काढून नव्या लावणे याला लागणारा वेळ दोन्ही कडे सारखाच.परत २४ इडल्यांच्या स्टॅंडवर एका झटक्यात १२ ते १५ मिनिटात इडल्या बनुन एकावेळी सगळ्यांना खायलाही मिळतात. मग मायक्रोवेव्हमुळे वेळ वाचला कुठे? भाजी आमटी त्यात करायची तर फोडणी गॅसवर करा, तिखट मीठ घालुन परतुन घ्या, पुन्हा काचेच्या भांड्यात घालुन मायक्रोवेव्ह मधे ठेवा.नंतर कढई,ते काचेचे भांडे सगळॆ पुन्हा घासा. त्यापेक्षा कढईत पडलं शिजत तर काय फरक पड्णार आहे? 
       
    सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मायक्रोवेव्ह घेतल्यावर आम्ही सगळे करु असे सांगुन मला पटवणाऱ्या मुली तो आणल्यावर माझ्यावर सोपवुन  नामानिराळ्या झाल्या.वर तुलाच कसं जमत नाही हे सांगुन पदोपदी इतरांकडे कसे सग्गळे मायक्रोवेव्ह मधे करतात हे सांगायला मोकळ्या. धाकटी तर दुध देखील त्यात गरम करुन घेत नाही. मुली माझ्यावर गेल्यात हे मी कबुल करते. मी सुध्दा त्यांच्या वयात स्वयंपाकघरात फिरकले नाही, पण माझ्या आईला काही शिकवायला गेले नाही आणि वेळ पडल्यावर मी सगळे केले. या बाबीचा देखील मला त्रास होत असेल . तो राग त्या यंत्रावर निघुन त्यात प्राविण्य मिळवण्याकरीता माझे प्रयत्न कमी पडत असतील. बरं सगळी दुनीया तो वापरुन त्याचं कौतुक करतीय म्हणून आपणही वापरायला धडपडायचे आणि दर वेळी काहीतरी वेगळेच निष्पन्न होईल कि काय या टेन्शनखाली रहायचे .

    एकंदरीत काय मायक्रोवेव्ह हा घरात असून अडचण ,नसुन खोळंबा या गटात मोडणारी चीज बनला आहे ! 

Tuesday, July 9, 2013

देव तारी त्याला ......



 उत्तराखंडात पुराने झालेल्या भीषण हानीची वर्णने टि.व्ही वर बघुन आणि त्या संदर्भातल्या बातम्या वाचून मन सुन्न झाले नाही असा दर्शक विरळा. दरवर्षी इतक्या प्रचंड संख्येने भाविक चारधाम यात्रेला जातात. त्यावेळी त्यांची नोंद,त्यांचे शारीरिक स्वास्थ्य(फिजिकल फिटनेस) बघितला जातो का? असे बरेच प्रश्ण या संदर्भात ऐरणीवर आले आहेत. पूरग्रस्तांचे पुर्नवसन आणि मृतांच्या नातलगांना मदत म्ह्णून जमा होणाऱ्या कोट्यावधीच्या निधी पेक्षा ,हिमालय़ातील भौगोलिक परिस्थिती, तिथल्या बदलत्या हवामानाचा अभ्यास करुन आधीच काही योजना राबवत्या आल्या नसत्या का? बेकायदेशीर बांधकामे,हवामानखात्याने दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष अशी अनेक कारणे या मनुष्य हानी बद्दल दिली जात आहेत. विचार करावा तितका त्रास फार होतो. मोक्ष मिळावा म्हणून यात्रा करायची तर ती करताना मरण आले तर मग त्याचे दुःख कशासाठी असा विचार ही आल्याशिवाय राहत नाही. मात्र अशा पधद्तीने आलेला हा शेवटचा दिस ’गोड’ खचितच नाही. माझ्या नणंदेने हि यात्रा नुकतीच केली , तिचा हा अनुभव माझ्या शब्दात.


      केदारनाथच्या रस्त्यावर पोहोचताना संध्याकाळ होवुन गेली.रस्त्यावर वहानांची तुफान गर्दी. पुण्यातुन गर्दी, ट्रॅफिक जामला कंटाळुन इकडे आलो तर त्याने काही पिच्छा  सोडलेला नाही.शिवाय इथले अगदिच अरुंद रस्ते, एका बाजुला खडा पहाड आणि दुसरीकडे खोल दरी. इकडचे ड्रायव्हर बाकी शांत आणि समजुतदार. एवढ्या गर्दीतुन शांतपणे मार्ग काढीत असतात. उगीच कुणाला शिव्यागाळी नाही, कर्णकर्कश्श आवाजात हॉर्न वाजवत मागच्याला ओव्हरटेक कराय़चे, आपल्या पुढे गेलेल्यावर दातओठ खात त्याला ओव्हरटेक करायचे असा प्रकार नाही. गौरीकुंडला पोहोचताना तिन्हीसांज होवुन गेली होती अंधारुन आले ते आभाळ भरुन आल्यामुळे. दिवसभरचा प्रवास, अरुंद रस्त्यांमधुन वाट काढीत येताना जीव मुठीत धरल्यामुळे खूपच शीण जाणवत होता. समोर दिसणाऱ्या एका बऱ्या लॉजवर जागा मिळवली.कधी एकदा पाठ टेकतो असे होवुन गेले होते. पहाटे पाच उठुन केदारनाथ कडे रवाना व्हायचे ठरले होते.बरोबरच्या सगळ्यांशी तसे बोलुन झोपलो.

    डोळे मिटल्यावर तीस-बत्तीस वर्षांपूर्वी आई-दादांबरोबर चार-धाम यात्रा केली होती ते दिवस साकारले. किती शांतता होती तेंव्हा ! रस्त्यावर तुरळक गर्दी. पाऊस देखील अजिबात नव्हता. धर्मशाळेतही मोजकी माणसे. पहाटे उठून चालायला सुरुवात केली. आईला दम लागायचा म्हणून तिच्याकरीता घोडा केला होता, मी आणि दादा पायी जाणार होतो.दादा भराभर पुढे जात होते,त्यांच्या हातात जपाची माळ असे.मी घोड्याबरोबर चाललेली.अरुंद वाट ,पाय घसरायची भिती होती पण घोड्याचा पाय घसरला तर आईचे काय होईल याचीच काळजी असल्याने मी आईची पाठ सोडत नव्हते, आजुबाजुला बघताना त्या अरुंद वाटेचा विसर पडला.काय मनोहर दृष्य होते ते! आभाळाला भिडणारे उंच वृक्ष, बर्फाच्छादित हिमालयाची शिखरे कोवळ्या उन्हात सोन्यासारखी चमकणारी. आजुबाजुला यात्रेकरुंचा मेळा. काही घोड्यावर जाणारी,काही डोलीतुन जाणारी काही माझ्यासारखी पायी चालणारी. लहान वय आणि पहिल्यांदाच बघायला मिळालेली ती अफाट निसर्गसंपदा यामुळे चालण्याचे श्रम मुळी जाणवलेच नाही. केदारनाथच्या मंदिरात दादांनी सोवळे नेसुन रुद्राभिषेक केला. दादांचा धीरगंभी्र आवाज कानी येतोय असे वाटताना डोळा लागला.

    पावसाच्या आवाजानेच जाग आली. आन्हिके उरकुन निघालो. चिखल,पाऊस आणि गर्दी यामुळे चालण्याचा बेत मी रहितच केला.आमचे सहप्रवासी आधीपासूनच घोड्यावरुन जाणार होते. घोडे ठरवले. घोड्यावरुन जाताना चिखल पाऊस,गर्दी यामुळे वाट कधी संपतीय असं होवुन गेलं. आजुबाजुच्या रमणीय निसर्गाचा विसरच पडला होता जणू. मनात देवाचे नाव येत होते पण ते जीव वाचावा यासाठी. मंदिराजवळ पोहोचायला दहा वाजले. अलोट गर्दीने परिसर फुलून गेला होता. हेलिकॉप्टर मधुन येणाऱ्या भाविकांना तात्काळ गाभाऱ्यात प्रवेश होता. पैसा असला कि सगळी कामे कशी चुटकी सरशी होतात , याला देवदर्शन पण अपवाद नव्हते.  तिरुपतीला हा भेदभाव बघितला होता.पण भोळा आणि विरागी म्हणून प्रसिध्द असा शिव देखील या पैसेवाल्यांमुळे सामान्यांना उशीरा दर्शन देतो हे बघुन नवल वाटले. रांगेत उभे राहुन दर्शनाची प्रतीक्षा करताना तीन चार तास गेले. त्यातही तिथले पंडीत(पांडे) लोकांकडून प्रत्येकी १०००-२००० रु घेऊन त्यांना पुढे घुसवत होते. हताश पणे हे बघण्याशिवाय आमच्या हातात काहीच नव्हते.

    दोन वाजता आत जायला मिळाले.गर्दीच्या लोढ्य़ांमधुन सरकत जमेल तसे मनोभावे दर्शन घेतले.गाभाऱ्यात शांती आणि मांगल्याचा अभावच होता. गर्दी, घाई यामुळे मी मिटल्या डोळ्यापुढे लहानपणी बघितलेला देखावा आणला आणि नमस्कार करुन बाहेर पडले. आता बद्रिनाथला जायचे होते. येताना परत घोड्यावरुन गर्दीतुन वाट काढत निघालो. पाऊस नव्हता. परतताना हिरवाई, बर्फाच्छादित शिखरे यामुळे मन प्रसन्न झाले होते. गर्दी,चिखल सगळ्याचा विसर पडला.निसर्ग शोभेचा आस्वाद घेत खाली उतरलो आणि बद्रिनाथकडे रवाना झालो. जातानाही भरपूर गर्दीमुळे पोचायला बराच उशीर झाला.बद्रीनाथला चालावे लगत नाही.देवळाजवळ पर्यंत गाडी जाते.तिथेही गर्दीमुळे दर्शनाला उशीर. पण त्या सगळ्याची एव्हाना सवय झाली होती. दर्शन घेवुन परत आलो. आमचा ड्रायव्हर आमची वाटच बघत होता. केदारनाथला ढगफुटी होवुन खूप पाऊस झाला आहे. वातावरण ठिक नाही आपण तडक हरीद्वारला जायला हवे असे त्याने सांगितले. विचार कराय़लाही वेळ नव्हता.ड्रायव्हरच्या आवाजावरुन धोक्याची पुसट कल्पना आली.येताना गर्दीमुळे झालेल्या उशीराने परतायला वेळ लागणार याची कल्पना आलेली होती. शिवाय आता दोन धामांचे दर्शन झालेले होते तेंव्हा परतणे शहाणपणाचे ठरेल असा विचार करुन निघालो.

    गोविंद घाटीला येताना दुपारचे दोन वाजले होते. तिथे रस्त्यावर वाहनांची अशी काही गर्दी होती कि बोलता सोय नाही. गोगलगायीच्या गतीने आम्ही दोन तासात शंभर मीटर तरी पुढे सरकलो असू किंवा नसू. चार नंतर तर गाडी बंद करुन ठेवली ड्रायव्हरने. हताश पणे पुढचे वाहन सरकण्याची वाट बघण्याखेरीज हातात काहीच नव्हते.रात्रीचे नऊ वाजले तरी परिस्थितीत काहीच फरक नव्हता.तेंव्हा हि रात्र इथेच काढायचा आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला. ड्रायव्हरलाही झोपेची नितांत गरज होती. गाडी थोडी मागे घेवुन थांबवली.खाली उतरुन एका लॉज मधे आम्ही खोल्या मिळावल्या.पहाटे सहा वाजता निघयचे ठरले.

    आता गर्दी कमी झाली असेल आपण दुपारी चार पर्यंत हरिद्वारला जावु असे म्हणत सकाळी गाडीत बसलो. पण कसलं काय ? गाडी मुंगीच्याच वेगान, गर्दीतुन पुढे सरकत होती. सकाळचे १० वाजुन गेले , आम्ही १० ते २० किमी पुढे आलो होतो, अशा वेगाने आम्हाला हरिद्वारला जायला किती वेळ लागेल याचा हिशेब प्रत्येक जण मनात करत असला तरी बोलून दाखवायचा कुणालाच धीर होत नव्हता.१२ वाजुन गेले, गाडी जरा कडेला घेवुन खाणी पिणी उरकली. चार वाजले , सहा वाजले.घड्य़ाळ पळत होते, गाडी गर्दीतून मंद गतीने सरकत होती. मन चिडचीड, वैताग आणि काळजीने व्याकुळ झाले होते.कुणालाच कुणाशी बोलायचे त्राण नव्हते. प्रत्येकाचे मोबाईल वाजत, चौकशा होत.जमेल तशी उत्तरे दिली जात. माझ्या मुलाचाही फोन आला. त्याचा आवाज ऐकून मला गहिवरुन आले. "आम्ही हरीद्वारला निघालोय, रस्त्यावर खूप गर्दी आहे रे, गाडी हलता हलत नाही बघ. तू जरा प्रार्थना कर रे, आम्ही सुखरूप येण्य़ासाठी." "आई, याल तुम्ही सुखरुप, काळजी नको करु. हरिद्वारला पण थांबू नका, लगेच दिल्लीला यायला निघा , करतो मी परत दोन तासांनी फोन, फोन बंद कर, दोन तासांनी परत ऑन कर नाहीतर बॅटरी संपेल"  त्याच्या आवाजाने आणि त्याच्याशी बोलल्यावर जरा बरे वाटले मला. पर्समधुन जपाची माळ काढली, जप करायला सुरुवात केली.मन अजिबात ऐकत नव्हते,पण तरीही जमेल तसे नामस्मरण करीत होते. आता भोवतालच्या परिस्थितीचा स्विकार करायची तयारी झाली. गाडी हळूहळू का होईना चालली आहे,  आपण निश्चित पोहोचणार आहोत असे मनाला बजावत जप चालू होता. नऊ वाजून गेले.

    हरीद्वार अजून ५० किमी तरी असावे, ड्रायव्हर म्हणाला, रात्री मी गाडी चालवणार नाही. आता पुन्हा मुक्कामासाठी ठिकाण शोधा, सकाळी पुन्हा गर्दी असणार, आम्हा सगळ्यांनाच कधी एकदा हरीद्वारला जातोय असे झालेले. सगळ्यांनी मिळुन त्याला हरीद्वार पर्य़ंत जाण्याची विनवणी केली. जास्त पैसे देण्याचे अमिषही दाखवले. शेवटी तो तयार झाला. रात्रीच्या अंधारात आमचा प्रवास चालू राहिला. बाहेर अखंड पाऊस पडत होता. पुलावर आमची गाडी दोन तास अडकून होती. निम्मा पूल ओलांडला आणि बघितले तर एक झाड  पडून रस्ता अरूंद झाला होता, आमच्या गाडीतले चार -पाच पुरुष खाली उतरले त्या सगळ्यांनी मिळून झाड थोडे बाजुला सरकवले. गाडी जायला रस्ता केला. ते गाडीत भिजून, गारठून आणि दमुन आले, पुढचा थोडा वेळ त्यांना टॉवेल देण्यात बाहेरच्या पावसाचे, मागच्या पुढच्या गर्दीचे वर्णन ऐकण्यात गेला. एरवी गाडी सुरु झाली कि माझे डोळे मिटतात. चालत्या गाडीतून पळती झाडे पाहिलेली मला काही आठवत नाही. पण यावेळी माझी झोप पळाली होती.तहान ,भुकेची जाणीवही नष्ट झाली होती. हरीद्वारला पोचणे हा एकमेव ध्यास आम्हा सगळ्यांना लागला होता. ड्रायव्हर बिचारा गाडी चालवत होता. पहाटेचे तीन वाजून गेले. आता गाडीने थोडा वेग घेतला. पावसाचा जोरही काहिसा कमी झाला असावा. पाच वाजता आम्ही हरीद्वारला पोचलो.

    हरीद्वारला दोन दिवस रहावे असे वाटत होते  मनातुन पण सकाळी दहा वाजता हरीद्वार सोडले आणि दिल्लीला जाणाऱ्या बस मधे बसलो. हरीद्वारपासून हरीद्वारपर्यंत अशी आम्ही मिनी बस ठरवली होती. त्या बस ड्रायव्हरने पाच सहा दिवस फार चांगली गाडी चालवली. त्याचे आभार मानले, त्याला ज्यादा पैसेही दिले.पण तरीही जास्त बोलायला वेळ मिळाला नाही. दिल्लीच्या बसमधे बसलो. प्रवासाने अंग अंबुन गेले होते.दिल्लीच्या बसमधे मला जरा झोप लागली. दिल्लीत ऊतरलो. हॉटेलमधे पोहोचल्यावर फोन चालू केला. १०-१५ मिस्ड कॉल्स होते, भावाचा,मैत्रीणींचे. अंघोळ आदि आन्हिके उरकून सहज टि.व्ही लावला. उत्तराखंडात पुराने घातलेल्या थैमानाच्या बातम्या बघताना मी मटकन खालीच बसले. आदल्या रात्री ज्या पुलावर आम्ही दोन तास अडकलो होतो, तो पूल पहाटे वाहून गेला होता. बद्रीनाथ, केदारनाथ कडील लोकांचा हरीद्वारशी संपर्क तुटला होता. बाकीच्या बातम्या आणि वर्णने सर्वांना माहित आहेतच. मानवाने निसर्गाची केलेली पायमल्ली, नदीच्या दोन्ही तीरावर केलेली अनधिकृत बांधकामे ,पांड्याने केलेले देवाचे बाजारीकरण यामुळे शिवाने तिसरा डोळा उघडून हा प्रलय घडवला असे सगळे बोलत होते. मुलगा मला दिल्लीला ताबडतोब निघुन या, असे का म्हणत होता त्याचा बोध झाला. इतक्या मिस्ड कॉल्स चा संदर्भ लागला.  आम्ही कसे वाचलो याचा मी सारखा विचार करत होते.
   
      केवळ नशिबवान म्ह्णून आम्ही सहिसलामत सुटलो.  आमच्या मागे चाललेल्या या प्रचंड हाःहाकारा विषयी अगदीच अनभिज्ञ होतो आम्ही. हरीद्वारला पोहोचणे हे एकच ध्येय ठ्वुन  मार्गक्रमणा करीत होतो.  क्रांतीकारकाचा इंग्रजानी केलेला , किंवा शिवाजी महाराजांचा सिध्दी जोहारने केलेला पाठलाग मला आठवला. साक्षात काळ आमचा असाच पाठलाग करीत होता.  शंकराने हृदयी जपलेला रामनामाचा मंत्र मी करत होते. माझे वडील हा जप तिन्ही त्रिकाळ करीत, मलाही जप करावा असे नेहमी सांगत, कदाचित त्याने आमचे रक्षण केले असेल, काही असेल  काळ आलेला होता पण वेळ आली नव्हती म्हणूनच आम्ही पुण्य़ापर्यंत सुखरुप पोहोचलो.    

Saturday, February 2, 2013

माणसांची पारख

      जम्मुला निघालेल्या ट्रेनने आम्ही दोघे प्रवास करीत होतो. हिमालयात ट्रेकींगकरीता निघालो होतो.युथ होस्टेलच्या डलहौसी कॅंपला जायचे होते. चार वर्षाच्या मुलीला आजीकडे ठेवुन मी प्रथमच निघाले होते. रोज नोकरीसाठी तिला घरी सोडून जाणे वेगळे आणि हे तीन आठवडे तिला सोडून रहाणे वेगळे. जाण्याआधी तिच्याशी बोलताना मी माझ्याच मनाची तयारी करीत असे.
"मी खूप दिवस जाणार आहे, तू राहशील ना? आजीला त्रास द्यायचा नाही, हट्ट करायचा नाही"
" हो गं, किती वेळा तेच ते सांगतेस, शहाण्यासरखं वागायचं, पसारा करायचा नाही, न सांगता कुठे जायचं नाही.... "तीच सुरु कराय़ची.
"तुला काय आणू येताना ?."
दर वेळी तिची यादी वेगळी असे, एकदा म्हणाली "तुझ्यासारख्या साड्या, ड्रेस आण"
मी विचारले ,"कशाला?"
"अगं तू खूऽऽप दिवसांनी येणार ना.. मग मी तुझ्याएवढी मोठ्ठी झालेली असेन ना ! "
नवरा म्हणाला ," बघ तिची तुला १५ वर्षे सोडून रहायची तयारी झालीय आणि तू उगाच रडत आहेस"

 मला तिला सोडून रहाण्याचे, पहिल्यांदाच हिमालयात ट्रेकिंगला जायचे टेन्शन होतेच. लग्नानंतर घर संसार, नोकरी यातून व्यायामाला वेळ मिळतच नव्हता. मुळात व्यायामाची फारशी गोडी नव्हतीच. त्यामुळे रोज १५-२० किमी चालणे जमेल का? हि काळजी होती. तसा सिंहगडला चारपाच वेळा जावुन सराव केला होता पण खात्री वाटत नव्हती.नवरा शिवछत्रपती पुरस्कार विजेता, खो-खो, १०० मी धावणे यात वाकबगार, महाराष्ट्रातले सगळॆ गड पालथे घातलेला, दर रविवारी नेमाने सिंहगड चढून येणारा असल्याने नेहमी पहिला नंबर मिळवणाऱ्या मुलाबरोबर एखाद्या काठावर पास होणाऱ्या विद्यार्थ्याला रहायची वेळ आली कि त्याचे जसे होईल तसे माझे झाले होते. मनात प्रचंड न्यूनगंड होता. प्रवासातही माझ्या मनात तेच विचार होते. पुणे जम्मू तसा बराच मोठा प्रवास. गाडी नेहमीप्रमाणे लेट् होती. ट्रेकिंगचे सामान प्रचंड असल्याने वाचायला काही घेतले नव्हते. आम्हाला पठाणकोटला उतरुन पुढे बसने डलहौसीला जायचे होते. आता दोन तीस तासावर पठाणकोट आहे असे सहप्रवाशांकडून समजले. प्रवास संपत आला कि कंटाळा आणखीच वाढू लागतो.

 दोन दिवस एकत्र प्रवास केल्याने आजुबाजुच्या लोकांशी थोड्या ओळखी झाल्या होत्या. आमच्या समोर एक मध्यमवयीन गृहस्थ होते. ते एकटेच प्रवास करीत होते.  ते पठाणकोटलाच उतरणार असे समजले. ते इंडीयन नेव्हीमध्ये काम करीत होते. बोलता बोलता माझ्या वर्गातील एक मुलगा १२वी नंतर नेव्हीत गेला असे मी सांगितले, त्यांनी त्याचे नाव विचारले मी नाव सांगितल्यावर ते गृहस्थ माझ्या वर्गातील मुलाला नुसते ओळखतच नव्हते तर, त्याचे मित्रच निघाले.  मग ते आमच्याशी खूपच आपुलकिने बोलू लागले. आम्हाला म्हणाले तुम्ही माझ्या घरी चला आज मुक्काम करा उद्या सकाळी मी तुम्हाला डलहौसीच्या बस मध्ये बसवून देईन  वगैरे..

      समोरच्या माणसावर माझा पटकन विश्वास बसतो. आपल्याला कुणी फसवेल असे माझ्या सहसा मनात येत नाही. उगाच कोणी कुणाशी वाईट वागत नाही.असे माझे म्हणणे. माझे वडील देखील नेहमी म्हणत "माणसं वाईट नसतात, परिस्थिती त्यांना तसं बनवते." त्यामुळे "तुला माणसांची पारख नाही" असे मला कायम घरच्यांकडून ऐकावे लागते.

  सदर गृहस्थाने आम्हाला घरी येण्याचा आग्रह केला त्यावेळी मात्र माझ्या डोळ्यापुढे रेल्वेत सहप्रवाशांनी खायला घालून बेशुध्द केले नंतर लुबाडले, अशा आशयाच्या वाचलेल्या अनेक बातम्या आल्या. हा माणूस नेव्हीत असेल कशावरून? तो आपल्याला घरी नेवुन काय करेल? अशा अनेक शंका-कुशंका मनात येवु लागल्या. रमेश(नवरा) आणि तो माणूस खूप जुनी ओळख असल्याप्रमाणे बोलत होते, त्यांच्या सततच्या आग्रहामुळे घरी येण्याचे रमेशने कबूल केले, आम्ही राहणार मात्र नाही चहा घेवु,फ्रेश होवु मग डलहौसीला जाऊ असे ठरले.. त्यावेळी मोबाईल फोन फारसे आलेले नव्हते. रमेशना उतरल्यावर त्यांच्या ऑफिसमधे फोन करायचा होता,
’तुमच्या घरी फोन आहे का?’ रमेशने विचारले
’आम्ही नव्या घरी नुकतेच शिफ्ट् झाल्याने फोनचे कनेक्शन आलेले नाही, पण घराजवळच एस्.टी.डी बूथ आहे.’
माझ्याकडे बघत रमेश म्हणाले, "ही तुमच्या घरात थांबेल, मी येईन फोन करुन"
माझ्या मनात पुन्हा कसले कसले विचार सुरु झाले,त्या माणसासमोर मला बोलता येईना. या माणसाची आपली ओळख ना देख , खुशाल त्याच्याघरी मला बसवून हा माणूस फोन करायला जाणार , इकडे माझा गळा दाबून खून सुध्दा होवु शकतो. नुसत्या कल्पनेने बसल्या जागी माझ्या घशाला कोरड पडली. कुठून मला बुध्दी झाली आणि मी या अनोळख्याला माझ्या वर्गमित्राची (मित्र तो नव्हताच माझा कधी, केवळ माहित होते) ओळख दिली.. माझा नवरा तरी असा कसा त्या माणसाच्या प्रत्येक बोलण्याला माना डोलावतोय. काय करावे मला सुचेनासे झाले होते.
’घरी कोण कोण आहे तुमच्या ’ धाडस करुन मी विचारले
’ बायको आहे, दोन मुली आहेत मुलगा आहे पण तो शिकायला परगावी असतो...’
तरीपण मनात शंकाची जाळी होतीच. आधी कधी एकदा पठाणकोट येतयं, असं वाटणाऱ्या मला शक्य तितक्या उशीराच येवुदे पठाणकोट असं वाटायला लागलं होतं. रमेश आणि तो माणुस दोघांच्या गप्पा रंगात आल्या होत्या.खिडकी बाहेर हिरवीगार गव्हाची शेते लांबवर पसरलेली दिसत होती. वातावरणात प्रच्ंड गारठा होता. गेल्या पन्नास वर्षात नव्हती एवढी थंडी त्या वर्षी होती. वातावरण खर तर खूप छान होतं पण  मी वेड्यावाकड्या विचारांच्या आवर्तात सापडले होते, डोळे मिटले तरी आजवर वाचलेल्या,ऐकलेल्या फसवाफसवीच्या बातम्या आठवत होत्या. डिसेंबर महिना होता,दिवस लहान होते.सहा वाजत असतील नसतील , तरी काळोख झालेला होता. थंड वारे सुटले होते.खिडकीतून बाहेर बघण्यात काही अर्थ नव्हता.

      अखेर शेवटी पठाणकोट आले. सामान उतरवाय़लाही त्या गॄहस्थांनी मदत केली. शहराचे प्रथम दर्शन फारसे चांगले नव्हते. रस्त्यावर सायकल रिक्षांचीच गर्दी होती.आमचे सामन एका सायकल रिक्षेत ठेवायला सुरुवात केली, सामानानेच रिक्षा भरुन गेली होती.सामानाला टेकू म्हणून मी बसले. ते दोघे मागून चालू लागले. स्टेशनच्या जवळच घर आहे असे ते आधीच म्हणाले होते. १५-२० मिनिटांच्या प्रवासानंतर घर आले.
 त्यांच्या मुली बऱ्याच मोठ्या कॉलेजमधे शिकत असाव्यात,पटकन पुढे आल्या.आम्ही कोण असे विचारताच ’मित्र आहे माझा’असे त्यांनी सांगितले. त्यांच्या बायकोने मोठ्या प्रेमाने आमचे स्वागत केले. मुलींना शेगडी पेटवायला सांगितली, गरम पाणी दिले हातपाय धुवायला. गरमागरम चहा प्यायलावर जरा बरे वाटले. रमेशबरोबर ते फोन करायला बाहेर गेले.  मुलींनी शेगडी आणुन ठेवली. मधल्या चौकात मी शेकत बसले. त्या दोघी माझ्याशी गप्पा मारता मरता कामे करत होत्या, त्यांची आई स्वयंपाकघरात स्वयंपाकाच्या तयारीत होती , बोलताना त्यांची कोणी नातेवाईक बाळंतीण झाल्याचे समजले तिला डबा करुन न्यायचा होता त्यांना, त्यातच आम्ही अगांतुकासारखे गेलो होतो, पण कुणाच्याच चेहऱ्यावर तसे भाव नव्हते उलट आमच्यासाठी काय करु आणि काय नको असे त्यांना झाले होते. त्या तिघी देखील तुम्ही आज रहा, उद्या सकाळी जा डलहौसीला, असे म्हणत होत्या. त्या दिवशी डलहौसीला रिपोर्ट करणे जरुरीचे होतेच.फारशी ओळख नसताना त्यांना त्रास देणे जिवावर आले होते.

       रमेश  फोन करुन आले, तोवर त्यांचा स्वयंपाक तयार झाला. वाफाळता बासमती तांदळाचा भात , हरबऱ्याच्या डाळीची आमटी आणि लाल भोपळ्याचे घारगे.हरबऱ्याच्या डाळीची आमटी मी पहिल्यांदाच खाल्ली. आपल्याकडे आपण पुरण पोळी केली कि कटाची आमटी करतो पण त्यात डाळ नसते. हरबऱ्याच्या डाळीच्या डाळींब्या मोठ्या दिसत होत्या, पण आमटीची चव मात्र झक्कास होती. हिरवी मिरची आणि आल्याचे बरीक तुकडे घातले होते त्यात. गरम गरम जेवणाची मजा थंडीत काही औरच असते. दोन दिवसांच्या प्रवासानंतर इतके सुग्रास जेवण ते देखील आयते ! वाढणाऱ्यांच्या चेहऱ्यावर आगत्य,आपुलकी माया.
 मला मात्र जेवताना फारच अपराधी वाटत होते. किती वाईट विचार केले होते मी गेल्या दोन तासात. माणसाच्या चांगुलपणावरचा विश्वास मी का घालवून बसले होते? कदाचित लहान मुलीचा विरह, ट्रेकींगबद्दलची भिती यामुळे माझे मन नकारात्मक विचारांनी भरुन गेले होते. आपण पेपरात, टि.व्हीवर देखील वाईट बातम्याच मोठ्या प्रमाणात वाचतो त्यामुळे देखील समोरचा माणूस चांगल्या भावनेने बोलतोय हे आपल्याला जाणवत नसावे.

 "जेवना पोटभर, मुलीची आठवण येते का?"  ती माऊली मोठ्या मायेने माझ्या पाठीवर हात ठेवीत म्हणाली. गळ्यातला हुंदका मोठ्या निकराने गिळून हसत हसत मी म्हणाले, "तसं नाही खूप छान झालाय़ स्वयंपांक "
"रहा ना आजच्या दिवस,सकाळी लवकर असेल ना गाडी.." मुलगी म्हणाली
तिचा अग्रह मोडवत नव्हता,पण जाणे जरुर होते.  आमच्या सामानातले खाऊचे पाकीट त्या मुलींजवळ देवुन जायला निघालो. येताना परत या असे त्या परत परत म्हणत होत्या. रीक्षा आणली बसून निघालो. ते सद्गृहस्थ आम्हाला सोडायला एस.टी.स्टॅंड वर आले. त्यांनी सामान चढवायलाही मदत केली. ट्रेकिंग संपल्यावर नक्की या असा त्यांनीही आग्रह केला.

   "तुला माणसांची पारख नाही" घरच्य़ांचे  विधान मी पुन्हा एकदा सिध्द केले.

Wednesday, June 30, 2010

आमची पिढी -ऎकणाऱ्यांची

दर वीस ते पंचवीस वर्षांनी बदलणाऱ्या माणसांच्या वय विचार-आचार यातील बदलाला पिढी म्हणण्याच्या काळापासून दर चार वर्षांत हेच बदल झपाट्याने होताना बघणाऱ्या काळाचे साक्षीदार म्हणजे आमची पिढी.

आमच्यापैकी बहुतेकांचे वाडवडील खेडेगावी. आमच्या पिढीतल्या लोकांचे वडील शहरात आले, शिकले नोकऱ्या मिळवल्या.बहुतेकांनी हलाखी सोसली.आपल्या आर्थिक,बौध्दिक कुवतीप्रमाणे त्यांना कामे मिळाली आणि त्यानुरुप त्यांची आयुष्ये घडली.या लोकांना आपल्या घरच्यांसाठी, भावंडांसाठी थोड्याफार प्रमाणात झिजावे लागले. शहरात हे आल्याने खेड्यातून त्यांच्याकडे अडी-अडचणींना माणसे येत.त्यांना जमेल तशी मदत करावी लागे.त्यामुळे आमच्या पिढीत एकत्र कुटुंबात कुणी राहिले नसले तरी माणसांची सवय , त्यांच्यासाठी करावी लागणारी तडजॊड, पदरमोड याचे शिक्षण सहज मिळाले.आमच्या वेळी आजुबाजुच्या बऱ्याच घरात, शाळेतल्या मैत्रीणींत, नातलगांमध्ये नोकरी करणाऱ्या बायकांचे प्रमाण फार थोडे होते. ज्या नोकरी करत त्या बरेचदा घराला आर्थिक हातभार लागावा या साठीच आणि न करणाऱ्या सुध्दा खूप सुखवस्तु होत्या अशातला भाग नव्हता, त्यांचे तेवढे शिक्षण नव्हते अथवा त्यांना योग्य संधी मिळालेली नव्हती. एकूणात अजुबाजूचा वर्ग पैसेवाला नव्हता.त्यामुळे स्वावलंबनावर भर असे.धुण्य़ाभांड्याला बाई म्हणजे फार झाले आणि पोळ्याला बाई हे तर पैसा जास्त झाल्याचे लक्षण असे. शाळेत असताना क्लास(याला तेंव्हा शिकवणी म्हणत)ला फक्त ’ढ’ मुले जात, ती देखील पैसेवाल्यांची.घरकाम म्हणजे केर -फरशी धुणे भांडी या सगळ्यात मुलींना मदत करावी लागे.त्याशिवाय दळण आणणे,सामान-भाजी इ.आणावे लागे.मे-महिन्याच्या सुट्टीत पापड,पापड्या कुरडया, बटाट्याचा किस,सांडगे आदि करण्य़ात मस्त वेळ जात असल्याने सुट्टी बोअर होत नसे आणि सुट्टीत थंड हवेच्या गावी जाण्याचा खर्चही होत नसे.सुट्टीत बहुतेक जण आपापल्या गावी जावुन येत.

शिक्षणाचे महत्त्व समजलेला हा वर्ग होता, किंबहुना त्याशिवाय दुसरे काही माहित नसलेला असेल कदाचित, शाळेव्यतिरिक्त इतर ठिकाणी जावुन काही शिकणे माहित नव्हते(किंवा पारवडत नव्हते). खेळ, वक्तृत्त्व, लेखन -वाचन, गायन,चित्रकला सगळ्याची भिस्त शाळेवर असे. मुलांच्यामध्ये असणाऱ्या अंगभूत गुणांचा झालाच तर विकास शाळेत होई आणि त्याचा प्रकाश शाळेच्या स्नेहसंमेलनात किंवा जास्तित जास्त गल्लीतल्या गणेशोत्सवातील कार्यक्रमात पडे.या गुणांना दाखवायला आजच्या सारखे रियालिटी शॊ नसल्याने त्यांचे म्हणावे तेवढे महत्त्व् जाणवत नसे, म्हणूनच त्याच्यात वेळ घालवणे वा त्यावर वेळ घालवणे म्हणजे वाया जाणे असे बहुतेक पालकांना वाटे.त्याचा तोटा असला तरी एक फायदा म्हणजे आज कालच्या मुलांना रियालिटी शो करता जे काय कष्ट पडतात ते आंम्हाला पडले नाहित आणि बक्षीस मिळाले नाही की त्यांचे आई-बाप जसे रडतात तशी आमच्या पालकांवर पाळी आली नाही.मेडीकल किंवा इंजिनियरींगला प्रवेश मिळणे हे हुशार असल्याचे एकमेव लक्षण होते. मेडीकल आणि इंजिनियरींगची संपूर्ण महाराष्ट्रात मोजकीच शासकीय महाविद्यालये होती.त्यामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी बरीच स्पर्धा होती्.त्यामुळे बारावीमध्ये क्लासेस लावण्याचे लोण आले होते. मोजके क्लासेस फार प्रसिध्द होते. त्यांच्या जाहिराती पेपरमध्ये येत. प्रवेश मिळाला कि तो विद्यार्थी हुशार न मिळालेला अर्थात ’ढ’ हे ठरुन गेलेले असे.प्रवेश न मिळालेले विद्यार्थी खूप निराश होत पण आत्महत्येचे प्रमाण कमी होते.(कदाचित मिडीयाचा महिमा नसल्याने ते बाहेर कळत नसेलही), मात्र आमच्या आजुबाजुला तरी अशा घटना काही बघायला ऎकायला नाही मिळाल्या. इतरत्र फारशा संधी उपलब्ध नसताना, त्यांची फारशी माहिती नसताना सुध्दा मुले बी.एस्,स्सी. किंवा तत्सम कोर्स करुन कुठल्यातरी मार्गाला लागायची.पालक देखील या गोष्टीचा फारसा बाऊ करुन घेत नव्हते.मुलांच्या शैक्षणिक जीवनात त्यांचा सहभाग फक्त फी देण्यापुरता असल्यामुळे त्याच्या यशापयाशाला तो एकटाच जबाबदार असे, म्हणूनच त्याला प्रवेश मिळणे वा ना मिळणे हा पालकांचा ’इगो पॉईंट’ ठरत नव्हता.

आम्ही अभ्यास करत होतो, घरातली कामे सांभाळून.आमचे कॉलेजच्या शैक्षणिक जीवनातले प्रश्र्ण् आम्हीच सोडवत होतो घरी कुठलीही अडचण सांगायची नाही.असे असूनही आम्ही आमच्या आई-वडीलांचे ऎकत होतो, म्हणजे ऎकावेच लागे.आमच्या घरात तसे बरेच मोकळे वातावरण होते. म्हणजे मी बरेचदा आई -किंवा दादांशी न पटणाऱ्या गोष्टींबाबत वाद घालत असे.पण बाजू त्यांच्यावर उलटू लागली तर ते त्यांच्या वडीलकीचे अस्त्र बाहेर काढीत. आई तर चक्क
’ काय बाई तुम्ही मुली , खुशाल मोठ्य़ंच्या अरे ला कारे करता! माझे ऎकलेच पाहिजे. तू मला झालीस कि मी तुला?’ असे विचारुन निरुत्तर करत असे. एकूण काय कितीही बडबड केली तरी त्याला मर्यादा होती. आईला शिक्षण मिळवण्यासाठी घरातुन खूप विरोधाला तोंड द्यावे लागले होते, म्हणून मुलगी असून शिकायला सहज मिळते याचे तिला अप्रुप होते. पण ती विहिरीचे पाणी काढून,घरकाम , झाडलोट, शेणगोळा सगळे करुन शाळेत जायची तर आम्ही कॉलेजला जाण्यापूर्वी केरफरशी केली आणि नळावर धुणे धुतले तर कुठे बिघडले असा तिचा सवाल असे. घरकामाला पर्याय नव्हता. ते सांभाळून अभ्यास करावा आणि चांगले मार्क मिळवावे आशीच अपेक्षा होती.

घरीच इतके तावून सुलाखून निघाल्याने सासरी जड जाण्याची वेळ आली नाही. सासरच्यांशी जमवून घेतलेच पाहिजे.नोकरी करुन घरचे सगळे करायलाच हवे असे धडे मिळाले होते. गावातच सासर असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या कुरबुरी,तक्रारी इतरांकडून माहेरी येता कामा नयेत असे आधीच बजावले होते.आमच्या पिढीतल्या मुलींचे नवरे देखील जवळपास सगळे श्रावणबाळाचे वंशज.लग्नाआधी ते ही आमच्यासारखेच आई-वडीलांचं ऎकणारे, नंतरही तसचं, त्यामुळे घरात सासु-सासऱ्यांशी झालेल्या छोट्या-मोठ्या मतभेदांबद्दल नवऱ्याजवळ बोलण्यात अर्थ नसे.तिकडून सहानुभूतीची सुतराम शक्यता नसे.आणि स्वतःच्या आई-वडीलांजवळ बोलण्याची प्राज्ञाच नव्हती. त्यामुळे सासरच्यांशी जुळवून घेत, आपल्याच पातळीवर कधी गोडीत, कधी दुर्लक्ष करुन,तरी कधी मनातल्या मनात चिडून एकत्र राहीलो आम्ही. त्याचे फार दुःख झाले अशातला भाग नाही, पण एकाच गावात सासु-सासऱ्यांपासून स्वतंत्र राहणाऱ्या आमच्या पैकी काही जणी फटकळ,तुसड्या, माणूसघाण्या ठरल्या. ज्यांचे सासु-सासरे गावी रहात होते, ते नोकरी करणाऱ्या सुनेच्या अडचणींना क्वचित आले, त्यांच्या गरजांसाठी सुनांनी ऑफीसमधून रजा काढल्या पाहिजेत अशी अपेक्षा बाळगून राहिले.

आमच्या पिढीत आम्हाला एखाद-दुसरे भावंड असल्याने आई-वडील आणि सासु-सासरे यांच्या म्हातारपणाची, आजाराची सर्व जाबाबदारी आमच्यावर पडली. ती जमेल तितक्या निष्ठेने बहुतेकांनी पार पाडली वा पाडत आहेत.

आता आमच्या पिढीतल्या लोकांनीही चाळीशी ओलांडली,पन्नाशी गाठली आज आमच्यापैकी काहींची मुले शिकत आहेत्, काहींची शिक्षणे संपली,कुणाला जावई आले, कुणाला येऊ घातलेत. नव्या पिढीतली आमची मुले स्वतंत्र विचारांची आहेत.त्यांच्याकडे आचार -विचाराचे स्वातंत्र्य आहे मात्र स्वावलंबन नाही.आजूनही स्वत्ःचे कुठलेही काम ती आई-वडीलांना बिनदिक्कत सांगू शकतात. नव्हे तो त्यांचा हक्कच आहे. आम्ही त्यांना धाकात नाही ठेवले हा दोष आमचाच आहे. आपल्या मुलांनी स्पर्धेत टिकावे यासाठी आमच्या पिढीने त्यांच्याकडे लक्ष दिले, (कदाचित नकॊ तेवढे).त्यांना अभ्यास आणि अभ्यासेतर गोष्टींना वेळ मिळावा याकरता घरातली कुठलीही कामे,अडचणी त्यांच्यापर्यंत जाऊ दिल्या नाहीत.पैशाची बाजू बहुतेक ठिकाणी आई-वडील मिळवते असल्याने ठिक होती, घरात कामाला बायका होत्या.त्यामुळे मुलांना शारीरिक ,आर्थिक कुठलेच ताण नव्हते.त्यांना अभ्यास,परीक्षा यांचे भरपूर टेन्शन असे नाही असे नाही. पण या मुलांवर जागतिकीकरणाचा बराच प्रभाव पडला, म्हणजे पाश्चात्य संस्कृती विशेषतः अमेरीकन यांमध्ये चांगलीच रुजू लागली.आचार,विचारांचे स्वातंत्र्य, वेळी-अवेळी फिरण्याचे, मजा करण्याचे स्वातंत्र्य त्यांनी घेतले.आपले जोडीदार निवडायचे स्वातंत्र्यही त्यात आले.आई-वडीलांचे न ऎकणॆ,त्यांच्याजवळ न राहणॆ इतकेच नाही तर त्यांनी मुलांकडून कुठलीही अपेक्षा ठेवणे ही किती चुकीची गोष्ट आहे, परदेशात आई-वडील मुलांना कसे पूर्ण स्वातंत्र्य देतात, त्यांच्या कडून कुठलीच आर्थिक, मानसिक, भावनिक कुठलीच मदत मागत नाहीत आणि आपले आई-वडील आपल्या सगळ्य़ा बाबींमध्ये लक्ष घालतात असे त्यांना वाटते.पण त्याच वेळी तिकडची मुले वयाच्या सोळाव्या वर्षापासून एकटी राहतात, पडेल ती कामे करुन मिळेल ते शिक्षण घेतात, आपण पंचविशी पर्यंत आई-वडीलांच्या खर्चाने मनसोक्त शिकू शकतो हि गोष्ट ते सोयीस्करपणे विसरतात. स्वातंत्र्यांची किंमत मोजावी लागते असे म्हणतात. मुलांना दिलेल्या स्वातंत्र्य़ाची किंमत आम्हीच मोजत आहोत. आज आमची मुले आमचे ऎकत नाहीत याचा विषाद आहे कि आजही आम्हाला आमच्या आई-वडीलांचे ऎकावे लागते याचे दुःख आहे, काही कळेनासे झाले आहे.

वृध्दापकाळामुळे माझी आई सध्या माझ्या घरी आहे. माझ्या मुली घरात कपड्यांचा पसारा करतात, खाल्लेल्या ताटल्या तशाच टाकून शाळा-कॉलेजला पळतात. घरी कुणाला बोलावले तरी त्यांना वेळ असेल तरच घरी थांबतात.वडीलांशी चढ्या सुरात बोलतात, माझ्या बडबडीकडे पूर्ण दुर्लक्ष करतात.परवा आईच्या खोलीत मुलींचे कपाट मी आवरत होते.ती मला म्हणाली, " काय गं, तू अगदीच तुझ्या मुलींना शिस्त लावली नाहीस, त्यांना तुझा काडीचा धाक नाही. किती पसारा करतात. अभ्यासात आहेत हुशार, ती देवाची कृपा. पण तू काही त्यांना वळण नाही लावलसं ! , मला आज फक्त दूध दे कालच्या इतकं गरम नको, त्यात सुंठ घाल न विसरता"
मी म्हणाले, " आई माझ सगळं आयुष्य ऎकण्यात गेलं, लहानपणी तुमचं ऎकलं, नंतर सासु-सासऱ्यांच आणि आता मुलांच. अजूनही तुमच ऎकतेच आहे, मुलींचही ऐकते. लहानपणी तुम्ही पाणी आणून दे म्हटल्यावर पळत जावून देत होते, आता मुली टि.व्ही. समोर नाहीतर कॉम्प्युटर समोर बसून म्हणतात आई पाणी दे , कि त्यांना ही पाणी देते आम्हाला मात्र शेवटपर्यंत पाणी आमच्याच हातांनी प्यायचे आहे त्यासाठी देवाने कायम धडधाकट ठेवावे एवढीच प्रार्थना आहे. "


©

Monday, January 25, 2010

अपघात

संध्याकाळचे सात वाजून गेलेले.नाशिकरोडला गाडी पोहोचली, सुधीर देशमुख आणि तुषारचे मोबाईल फोन वाजायला लागले.लाइफ लाईन हॉस्पीटलचा पत्ता विचारायला जागोजागी गाडी थांबत होती.घड्याळाचे काटे मंद, गाडीची गती त्याहूनही मंद वाटत होती.कधी एकदा हॉस्पीटलमध्ये जावुन प्रत्यक्ष पाहू असं वाटत असतानाच काय बघायला मिळणार आहे या भितीने अजून लांबच असल्यान बरही वाटत होतं. विचार करकरुन डोक्याचा भुगा झाला होता.कुठच्याही क्षणी फोन वाजला कि त्याहून जोरात छातीत धडधडे.सुधीर आणि तुषार मला समजणार नाही अशा बेतानं बोलत होते कि मला तसं वाटतं होतं कोण जाणे? आठ वाजून गेले असावेत, आमची गाडी हॉस्पीटलच्या आवारात शिरली, समोरुन फॅक्टरीतील लोकांचा घोळका आला. रमेशचे मित्र श्रीकांत जोशी तेवढे माझ्या ओळखीचे होते, ते फॅक्टरीतील नसल्याने जरासे दूर होते, त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीचे हसू नव्हते, पण आम्ही आल्यामुळे एक प्रकारचा सुटकेचा निःश्वास त्यांच्या चेहऱ्यावर जाणवला.
२५ मार्च २००३, माझे पती रमेश कंपनीच्या कामाकरीता त्यांच्या नाशिकच्या फॅक्टरीत जाण्यासाठी सकाळी साडेसहाला गाडी घेवून निघाले,त्यांच्या सोबत फॅक्टरीतील त्यांचे एक सहकारी देशपांडे देखील होते. मिटींग संपवून ते रात्री परत येणार होते.महिन्यातून नाशिक वा मुंबई अशा त्यांच्या नेहमीच फेऱ्या होत आणि ते स्वतःच गाडी चालवत.त्या दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे ऑफीसला गेले.सकाळी दहा पासून मी त्यांना मोबाईल वर फोन करत होते पण तो लागत नव्हता ,माझ्या मनात शंका -कुशंका येवू लागल्या, मी त्यांच्या पुण्यातील ऑफीसला फोन करुन नाशिकला ते पोहोचलेत का, तिकडे फोन करुन मला कळवा असे सांगितले फोन वरचे माझे बोलणे संपत नाही तोच त्यांच्या ऑफीसमधून सुधीर देशमुख आणि त्याचा सहकारी माझ्या ऑफिसमधे आले.त्यांनी मला रमेशच्या गाडीला अपघात झालाय आणि त्यांच्या पायाला लागलयं असं मोघमच सांगितले आपण नाशिकला जाउया असं म्हणाले. मुली शाळेतून घरी यायच्या होत्या, त्यांच्या वार्षिक परीक्षा चालू होत्या.सुधीर म्हणाले,"आपण मुलींना घरी सोडून मग जाऊ" घरी गेल्यावर मुलींना मोठ्या बहिणीकडे पाठवायचे ठरवले.२-४ कपडे, होते तेवढे पैसे घेउन आम्ही बाहेर पडलॊ.जाताना रमेशचा जवळचा मित्र तुषार याला घेऊन जायचे ठरवले, त्याला माझ्या आधीच या घटनेची माहिती झालेली होती आणि त्याने नाशिकला निघायची तयारीही केली होती.मला घटनेचे गांभीर्य जाणवू न देण्याचा त्यांचा प्रयत्न चालू होता.जाता जाता पुण्यातील त्यांच्य़ा फॅक्टरीत गेलॊ तेथे पर्सनल मॅनेजर पाटील आंम्हाला बघून म्हणाले," हे काय तुम्ही अजून इथेच, त्या देशपांड्याकडील लोक कधीच गेले, आणि रमेशचा C.T.scan केलाय, त्याची कंडीशन फारशी चांगली नाहीय. निघा तुम्ही ताबडतोब" हे ऎकुन हातापायातले त्राणच गेल्यासारखे वाटले.नाशिकच्या रस्त्याला लागलो.कुणीच कुणाशी बोलत नव्हतं.वेळ आणि रस्ता संपता संपत नव्हता.चार वाजता मी तुषारला म्हटलं,"कुणाला तरी फोन करुन C.T.scan चा रीपोर्ट विचारु या?"
त्याने फोन केला "रीपोर्ट ठिक आहे "असं समजताच गाडी थांबवून मला त्याने आणलेला डबा खायला लावला,त्या दोघांनीही थोडे थोडे खाऊन घेतले, चहा घेतला आणि पुढे निघालो.
आय.सी.यू.मधले तंग वातावरण. मी आत जाताच आतले नाशिकचे लोक अपघात कसा झाला सांगू लागले,अनेक जागी जखमा आणि नळ्यांमधून चेहरा दिसणे मुश्कील होते.औषधांची ग्लानी होती, C.T.scan चा रीपोर्ट नॉर्मल आला होता त्यामुळे काळजीचे कारण नाही असे सगळे मला सांगत होते.पुरुषांच्या वॉर्ड मध्ये मला राहता येणार नव्हते.सकाळ पासून डोक्यावर घेतलेला असह्य ताण,रमेशना योग्य वैद्यकीय मदत वेळेवर मिळालेली बघुन बराचसा कमी झाला.रात्री मला श्रीकांत जोशी त्यांच्या घरी घेवून गेले, तेथे गेल्यावर माझ्या डॉक्टर मैत्रीणीला फोन लावला,आता नाशिक मधील चांगले डॉक्टर शोधणे,जवळच्या नातलगांना या घटनेची माहिती देणे, मुलींची चौकशी आदी केले पाहिजे असे काही काही सुचू लागले.मन चिंती ते वैरी न चिंती म्हणतात ते किती खरं आहे याचा अनुभव मी प्रवासभर घेतला असल्याने प्रवासाचा शिण म्हणा ,विचारांमुळे आलेला थकवा म्हणा किंवा पेशंट्च्या खऱ्या अवस्थेच्या अनभिज्ञतेने म्हणा त्या रात्री मी गाढ झोपले.पहाटे पाच वाजता जाग आली,सुजाता , श्रीकांत जोशींची बायको जागीच होती रात्री ते मला सोडून परत हॉस्पीटलमध्ये गेले होते आणि तेथे झोपायला कुणी नसल्याने तेथेच थांबले होते.सकाळी साडेसहाला मी हॉस्पीटलमध्ये गेले.
सकाळी मला रमेशने ओळखले पण मी कधी आले,कशी आले काही विचारले नाही,हे माझ्या त्यावेळी लक्षात नाही आले, प्रत्येक मिनिटाला ते उठण्याचा प्रयत्न करीत, सलाइनच्या नळ्या उपसून टाकीत. मला फॅक्टरीत जायचयं आज मिटींग आहे. असं बोलू लागल्यावर माझा धीरच खचला. डॉक्टर राऊंडला आले, त्यांनी पुन्हा C.T.scan चा रीपोर्ट नॉर्मल आला होता त्यामुळे काळजीचे कारण नाही असे सांगितले."मग असे असंबध्द बोलायचे कारण काय? " असे मी धीर करुन विचारले त्यावर ते म्हणाले ,"मेंदुला सूज आली आहे, हॆड इंजुरीमुळे , औषधे चालू आहेत होईल कमी हळूहळू . बाकी हाडांचा चुरा झाला तरी चालतो, मेंदुच्या इजा बऱ्या होणे कठीण असते तुम्ही खूप लकी आहात थोडक्यात निभावले आहे,it was a major accident " डॉक्टरांचे आभार मानून मी पेशंट पाशी आले , "मला काय झालयं?" हा एकच प्रश्ण त्यांनी एक तासात किमान १०० वेळा विचारला , पुन्हा पुन्हा उठायला बघणे, कंपनीत जायचा हट्ट करणे एक ना दोन असे चमत्कारीक वागणे केवळ डॉक्टरांच्या अश्वासक बोलण्याने मी सहन करायला सुरुवात केली. नाशिक मधुन कंपनीतील लोकांची, ओळखीच्या,नात्यातल्या लोकांची भेटायला रीघ. प्रत्येकाला त्या घटनेची माहिती देणे,डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे आणुन देणे,मधेच फोन आला तर तो घेणे अशी अखंड धावपळ. मार्च एंडींग असल्याने कंपनीत कामाची धावपळ होती तरी कंपनीतून कोणी ना कोणी तरी संध्याकाळी येई आणि मला बळेच बाहेर पाठवी जरा बाहेर चक्कर मारून या तास भर आम्ही इथे बसतो. मी बाहेर पडे पण बाहेरही अखंड अस्वस्थच वाटे.आणि परक्या गावात जाणार तरी कुठे?
नाशिक सारख्या अनोळखी गावात माझे कुणीच जवळचे नातलग नव्हते पण मला जे अनुभव आले त्यामुळे आज नाशिक मला अनोळखी वाटत नाहीच पण ज्यांनी मला मदत केली ते नातलगांहून जवळचे झाले.आता वाटते नाशिकला होते म्हणूनच त्यातून निभावू शकले. आमच्या पुण्यातल्या वाड्यात राहणाऱ्या कुलकर्णी दादांचे नातेवाईक धर्माधिकारी, त्यांना दादा कुलकर्णींनी कळविले , समजल्या बरोबर ते हॉस्पीटलमध्ये आले.मला म्हणाले,"तू माझ्या घरी चल रहायला घरी आम्ही दोघे पती-पत्नी आणि माझी आई असतो मोठं घर आहे इथून जवळ आहे शिवाय मी रीटायर्ड आहे कधीही हॉस्पीटलमध्ये येऊ -जावु शकतो."मला त्यांनी घरी नेलेच.माझ्या चुलत वहिनीचे वडील असेच लगेच आले त्यांना तर मी चुलत भावाच्या लग्नानंतर त्याचवेळी बघीतले पण त्यांनी देखील असाच प्रेमळ आग्रह केला, मझ्या चुलत भावाचा मित्र नाशिकच्या नोटांच्या कारखान्यात मॅनेजर होता, तो आला तो ही म्हणाला माझ्या घरी चला. ’अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने’ मदतीच्या बाबतीत माझी अशी अवस्था झाली.प्रत्येक जण आपापल्या परीने मला मानसिक आधार देत होता.प्रत्येक जिल्ह्यात आमच्या ऑफीसचे दोन कर्मचारी(district informatics officers) जिल्हाधिकारी कार्यालयात असतात.मी पुण्यात माझ्या ऑफीसमध्ये कळविले होते.तेथून नाशिकच्या साळवींना माझ्या मैत्रीणीने कळवले.समजल्याबरोबर साळवे मला भेटावयास आले, त्यांनी सरकारी गेस्ट हाऊस मध्ये रुम्स बुक करुन दिल्या,आमच्या पुण्यातल्या लोकांना रहाण्यासाठी.शिवाय स्वतःची स्कुटर मला दिली.दररोज सकाळ संध्याकाळ येवुन चौकशी करीत.पुण्याहून माझे दोन चुलत दीर आणि दोघे परिचित माझ्या सोबत होते,रात्री झोपावयास त्यांच्यापैकी कुणीतरी अलटून पालटुन थांबत असे दिवसा मी असे.
रमेशच्या डोक्याला जबर दुखापत झाली होतीच.पण उजव्या मांडीच्या हाडाचे दोन तुकडे झालेले होते,पायाचे ऑपरेशन करणे गरजेचे होते,हे ऑपरेशनही मोठे होते,ते नाशिकला करुन मग पेशंट्ला पुण्याला न्यायचे कि पुण्याल नेवुन ऑपरेशन करायचे असा प्रश्ण होता.लाइफ लाईनच्या आय.सी.यू मधुन ७२ तासांनंतर बाहेर आल्यावर पुढील महत्त्वाचा निर्णय मला घ्यायचा होता.दुपारची वेळ होती.मी कुठलेसे पुस्तक वाचायचा प्रयत्न करीत होते,आय.सी.यू वॉर्ड मधील केरळी मेट्र्नने मला बोलावले.पेशंट साठी दोन शहाळी घेवुन ये म्हणाली.मी बाहेर जावुन २ शहाळी आणली.एकातील पाणी तिने पेशंटला प्यायला दिले.आणि दुसरे शहाळे फोडून त्यातले पाणी ग्लासमध्ये घालून मला जवळ बोलावले आणि म्हणाली ,’हे पाणी तू पी.सकाळ्पासून मी बघतीय तू या स्टूलावर बसून आहेस.स्वतःच्या तब्येतीची आबाळ केलीस तर त्याच्या कडे कशी बघणार?’ मला अगदी मोठ्या बहिणीसारखे जवळ घेत तिने पाणी प्यायला लावले.त्या क्षणी दोन दिवस थोपवलेला बांध फुटून मला रडू फुटले.कोण होती ती माझी? बरं ,त्या हॉस्पीटलमध्ये आय.सी.यू वॉर्ड्मधे सुध्दा १२ पेशंट होते सगळेच सिरीयस. या सगळ्या गदारॊळात तिचे माझ्या पेशंट्कडेच नाही तर माझ्यावर हि किती लक्ष होते.मला जवळ घेत ती माझी समजूत काढ्त होती.
पुण्यातल्या लोकांचे मत, पायाचे ऑपरेशन पुण्यात आणून करावे. फिजीशियचे मत पेशंटला ऑपरेशन झाल्याशिवाय हलवू नये,त्यात धोका आहे असे होते.नाशिक मधील प्रसिध्द अस्थितज्ञ डॉ.भरत केळकर यांचे नाव नाशिकच्या बऱ्याच लोकांनी सुचविले होते.त्यांनी लाइफ लाईन हॉस्पिटल मध्ये येवुन पेशंटला बघण्याची संमती दिली.ठरल्या प्रमाणे बरोबर संध्याकाळी सात वाजता त्यांची गाडी हॉस्पिटल मध्ये आली.पेशंट जवळ जाऊन त्यांनी अतिशय मृदू शब्दात त्यांची चौकशी केली,मात्र पेशंट बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हता. डॉक्टरांनी मला बोलावून घेतले. केसपेपर्स, x-ray पाहिले.आणि म्हणाले,’पेशंट्ची स्थिती सुधारल्याशिवाय ऑपरेशन करणे योग्य नाही.’
’पण मग किती दिवस थांबावे लागेल?’
’२ दिवस,४ दिवस कदाचित आठ दिवस सुध्दा मेंदूची सूज कमी झाली पाहिजे’
’ पण ऑपरेशन केल्या शिवाय पुण्याला नाही जाता येणार, आणि मला इथे जास्त दिवस रहाणे कठीण आहे’
’मग तुम्ही पेशंट्ची मेंदूची सूज कमी झाली कि पुण्याला जा, तिकडे जावून ऑपरेशन करा.’
’ते धोकादायक असते असे म्हणत होते दुसरे डॉक्टर’
’नाही, तसं काही नाही.मी स्वतः त्यांचा पाय व्यवस्थित पॅक करुन देतो, ती माझी जबाबदारी’
’आणि आम्ही इथंच थांबायच ठरवलं तर?’
’तर मी त्यांचे ऑपरेशन करेन.पण मला कल्पना आहे, पेशंटच्या घरच्या लोकांच्या काही अडचणी अशा असतात कि त्या डॉक्टरांजवळ बोलू शकत नाहीत.तुम्हाला पुण्याला जाऊन ऑपरेशन करणे सोयीचे ठरत असेल तर तसे करा.’
आपण आजकाल डॉक्टरांबद्द्ल बरचं बरं-वाइट ऎकतो,पैशासाठी पेशंटला टेस्ट्च्या नाना चक्रातून फिरवणाऱ्या गोष्टी ऎकतॊ,केळकर डॉक्टरांच्या बोलण्यातून मला त्यांचा पेशंटची प्रकृती आणि त्याच्या घरच्यांच्या अडचणींचा विचार महत्वाचा हे जाणवले,आणि त्या क्षणी मी नाशिकला त्यांच्या कडून ऑपरेशन करुन घेण्याचा निर्णय घेतला.
पुढे त्यांचे ऑपरेशन अतिशय व्यवस्थित झाले,डॉक्टर केळकरांच्या हॉस्पिटल मध्ये आम्हाला अतिशय उत्तम अनुभव आला.ऑपरेशन् नंतर चार पाच दिवसात त्यांनी पुण्याला पाठवण्याची व्यवस्था केली.
नाशिकच्या वास्तव्यात मला रमेशचे फॅक्टरीतले सहकारी,मित्र,नातेवाईक यांची एवढी मदत मिळाली की एकही क्षण मला एकटे वाटले नाही.एका जिवघेण्या अपघातातून रमेशना जीवदान मिळाले.’सकळ जनांचा करीतो सांभाळ तुज मोकलील ऎसे नाही’एकनाथांच्या या ओवीचे मला प्रत्यंतर आले, माझ्या प्रारब्धीचे भोग माझ्या सख्या सोयऱ्यांच्या रुपातील हरी मुळे सोसणे सुकर झाले.

Tuesday, February 24, 2009

पंढरीची वारी : एक अनुभव.- भाग ३


सकाळचे नऊ वाजून गेले असावेत, आम्ही पुन्हा चालावयास सुरुवात केली.वाटेत ठिकठिकाणी वारकऱयांसाठी चहा, केळी,पोहे असे विविध स्टॉल्स दिसत होते.बहुतेक वारकरी तिकडे जात नव्हते, जत्रा म्हटली कि जसे हौशे, नवशे,गवशे येतात तसेच वारी बरोबरही असावेत. अनेक तरूण,लहाने मुले अशा ठिकाणी केवळ गर्दी करुन मिळेल ते पदरात पाडून घेत होती. एका जागी तर कुठल्याशा कंपनीतर्फे बिस्कीटांचे पुडे वाटप चालू होते, एका मुलाने आपल्या मित्रांनाहि रांगेत उभे केले असावे सगळी गॅंग मिळलेले पुडे एका पोत्यात भरत होती.दारीद्र्य माणसाला अगतिक बनवते हे खरे असले तरी इथे गरीबीपेक्षा फुकटी वृत्ती वाढत चाललीयं असं जाणवतं. आपल्याला आयकरात सवलती मिळाव्यात यासाठी दान देण्यास तयार होणाऱ्या कंपन्या, आणि त्या फुकट मिळणाऱ्या पदार्थांवर तुटून पडणारी आपली नवी पिढी, कुणाला विठ्ठ्ल पावेल्? किंबहुना त्या विठ्ठ्लासाठी हे चाललयं हे तरी त्यांच्या गावी आहे कि नाही हे तॊ विठ्ठ्लच जाणे !
या साऱ्या स्टॉल्सकडे न जाता ’गुढी उभारावि, टाळी वाजवावी वाट हि चालावि पंढरीची’ असे म्हणत जाणारा वारकऱ्यांचा मेळा होताच. विश्रांतवाडीचा पहाटे सुनसान असणारा रस्ता आता माणसांनी फुलून गेला होता. मध्येच पावसाची एखादी सर यायची सारे वातावरण थंड व्हायचे. आमच्यासारखी शहरी पांढरपेशी मंड्ळी छ्त्र्या उघडून किंवा रेनकोट, जर्कीन घालायला लागे पर्यंत पावसाचा जोर पार कमी होऊन जाई. बरे हा सारा जामानिमा अंगावर बाळगावा तर लगेच पडणाऱ्या लख्ख उन्हामुळे ऊकडुन जीव हैराण होवून जाई. शेवटी हा सारा पसारा पिशवित कोंबला आणि ऊन पावसाचा खेळ अंगावर घ्यायचे ठरविले. इथे आपल्याला ओळखणारे कुणीच नाही आणि आपल्या कडे बघायला कुणाला वेळच नाही हे लक्षात आले आणि मग एकदम हलके हलके वाटायला लागले.नाहीतरी पडण्यापेक्षा पडताना आपल्याला कुणी बघितले तर जास्त दुःख होते, तसे भिजण्यापेक्षा आपले भिजलेले ध्यान कुणी बघेल याचीच काळजी असते. शिवाय भिजत भिजत चालत असल्याने थंडी वाजत नव्हती,ऊन पड्ल्याने कपडे आपोआप सुकतही होते. आषाढ महिना असून श्रावणातल्यासारखा पाऊस होता.
पण हा ऊन पावसाचा खेळ ही फार तर तास दिड तास चालला. नंतर कडक ऊन पडले. पायाखलचा सिमेंटचा रस्ता प्रचंड तापत होता, सहापदरी मोठ्या रस्त्यावर औषधालाही झाड नव्हते! डोक्यावर ऊन मी म्हणत होते. थोडक्यात ’पाऊल थकले माथ्यावरती जड झाले ओझे’ अशी अवस्था होऊ लागली , अध्यात्माच्या बिकट वाटेचा प्रत्यय येवु लागला.
शहरीकरणामुळे जंगलतोड झालीयं. दोन्ही बाजूला झाडांच्या महिरपीतून जाणारे रस्ते नाहिसे होत चाललेत. गाडीतून जाताना हे जाणवत नाही अस नाही, पण त्यामुळे होणारी तगमग चालतानाच जास्त जाणवली. पालखी येणार म्हणून दुतर्फा मांडव घातले होते, प्रत्येक वॉर्डातले मा.नगरसेवक, क्वचित ठिकाणी महापौर येत होते, त्यांच्या हस्ते खाद्यपदार्थांचे वाटप होत होते, त्यापैकी कुणालाच ह्याबरोबरच रस्त्याच्या कडेने वृक्षारॊपण करून वारकऱ्यांचा मार्ग सावलीचा करावा असे का वाटत नाही? पण मघा म्हटल्याप्रमाणे त्यासाठी काही पावले तरी पाय़ी चालायला हवे!
बॅंक ऑफ महाराष्ट्र तर्फे उभारलेल्या एका मांडवापाशी आल्यावर मी थांबले. फूटपाथवर मांडव होता, बाजूच्या कट्ट्यावर थोडी टेकले. बाटलीतले पाणी प्यायल्यावर जरा हुशारी वाटली.तिथल्या काही रहिवासी सोसायटीतल्या उत्साही लोकांची एकच गडबड उडाली होती. बायका, मुले वारकऱ्यांना केळी,राजगिऱ्याचे लाडू वाटत होती. पुरुष मंडळी त्यांच्या वर लक्ष ठेवून होती. आतिशय शिस्तबध्दतेने सगळे काम चालू होते. आम्हांलाही त्यांनी मोठ्या प्रेमाने सगळे देऊ केले, पण असे घेणे मनाला पटेना एक तर आम्ही कुठल्याच अर्थाने वारकरी नाही. केवळ हौशीसाठी आम्ही आलॊ, आणि संध्याकाळी तर घरी जाणार! ज्यांनी बरेच दिवसांपासून घर सोडलयं, आणि पंढरपूर पर्यंत जायचयं त्यांना देणे योग्य आहे. बारा वाजून गेले होते, निम्मे अंतर संपले होते. आतापर्यंचा प्रवास चांगला झाला होता, पुढील रस्ता रुक्ष असल्याने त्रास होईल का असे वाटत होते.पण चालायला लागल्यावर वाट संपतेच , बरोबरच्या वाटकऱ्यांच्या सोबतीने वेळ जातो, आणि वाटेवर सावल्या सापडल्या कि प्रवास सुखाचा होतो. वारी सारखेच हे सारे आयुष्याच्या बाबतीतही खरे आहे नाही का?

समाप्त

Friday, January 30, 2009

पंढरीची वारी : एक अनुभव.- भाग २


वारीला जायची तयारी सुरु केली.तयारी फारशी नव्हतीच.पहाटे आडीच वाजता उठून पोळी भाजी करुन घेतली(आधी पोटोबा मग...), अंघोळ आदि आन्हिके उरकून निघलो.एका परिचिताने आमच्या उपक्रमाने प्रभावित होवून आंम्हाला आळंदीला सोडण्याची जबाबदारी घेतली.त्यांच्या गाडीतून आळंदीला निघालो. विश्रांतवाडी पर्यंत अगदीच शुकशुकाट होता. मोकळे रस्ते अगदीच नवे आणि खूपच मोठ्ठे ,रुन्द वाटत होते. आळंदी जवळ येवू लागली तशा तिकडून पुण्याकडे ट्र्कच्या रांगा दिसू लागल्या, क्वचित माणसांचे जथेही चालताना दिसू लागले. पावणेपाचच्या सुमारास आम्ही आळंदिच्या अलिकडे एक-दिड कि.मी.वर उतरलो. सर्व परिसर माणसांनी फुलून गेला होता. इंद्रायणीच्या पूलावरुन देवळात जाताना, नदीमध्ये शेकडॊ वारकरी स्नान करताना दिसले.ज्ञानेश्वरांची पालखी गांधीवाड्यात त्यांच्या आजोळी असते, तेथून सहा वाजता तिचे प्रस्थान होते, तत्पूर्वी भक्त तिचे दर्शन घेवू शकतात, हे तेथेच आम्हाला समजले. मग तेथे गेलो, रांगेमधून शांतपणे लोक दर्शन घेत होते.आम्हीही पदुकांचे दर्शन घेतले, पालखीला वाकून वंदन करतानाच मनाला जी शांती वाट्ली,तिचे वर्णन शब्दात नाही करता येणार. माऊलींबरोबर सहज चालू असा विश्वास वाटला. पालखीचे प्रस्थान साडेसहाला होते.इंद्रायाणीच्या अरूंद पूलावर प्रचंड गर्दी आणि खेचाखेच असते, असे कळले होते. बरेच वारकरी पादुकांचे दर्शन घेऊन चालावयास सुरुवात करतात. आम्ही देखील तसेच करायचे ठरविले. ज्ञानेश्वरांचे आणि तुकारामांचे अभंग गात वारकरी जात होते. आम्हीही त्यांच्या बरोबर जात होतो. आता चांगलेच उजाडले होते. आजुनही पुण्याकडून लॊक आळंदीकडे जात होते. त्यांना वाटेत पालखीचे दर्शन होणार आणि ते परत पालखी बरोबर येणार. बऱयाच दिंड्या निघाल्या होत्या. एका दिंडी मधून आमचा प्रवास सुरु झाला. झांजा आणि टाळांच्या तालावर चालताना बरेच अंतर चाललो तरी जाणवत नव्हते. पाच किलो.मी. चाललो, साई मंदिराच्या आसपास बरीच मोकळी जागा आहे.रस्त्याच्या दोन्ही बाजुंना किंचित उंच टेकाडे होती. आम्ही तेथे जाऊन बसलो. आठ वाजले असावेत.बरीच वारकरी मंडळी तेथे बसली होती. काही बायका कपडे वाळत घालत होत्या. आमच्या सारखे पुण्याहून आलेले लोक डबे उघडून नाष्ता करायला लागले होते. रोज मलाही सकाळी आठ -आडेआठला खाण्याची सवय आहे, पण कसे कोण जाणे आज भूक लागली नाही. सोलापूर जवळील खेड्यातुन आलेल्या बायका माझ्याशी बोलायला आल्या, त्या तिकडून आंळदिला चालत आल्या होत्या आणि आता वारीबरोबर चालत पंढरपूरला जाउन मग घरी जायच्या होत्या.माझ्या कपाळावर् त्या बाईने काडी कुंकवात बुड्वून बरीच कलाकुसर केली. (आरसा नसल्याने मला दिसली नाही), माझ्या शहरात राहण्याचे, ऑफीसात जाण्याचे तिला अप्रूप , आणि तिच्या इतके दिवस घर सोडून चालत जाण्याचे, तिच्या कष्टाचे मला कौतुक ! मला स्वतः जवळिल बुंदीचा लाडू तिने, नको नको म्हणतानाही खायला दिला.बरेच शेतकरी पेरण्या उरकून वारीला आले होते,मला जाणवले, शेतात पेरण्या झाल्या की, पावसाची वाट बघायची .जास्त पाउस पिकांचं नुकसान करणार, नाहीच आला तर् तोंड्चं पाणी पळवणार. एकूण हा मधला काळ म्हणजे नुसता ताण! रिकाम मन म्हणजे सैतानच घर, त्यापेक्षा विठ्ठ्लावर भार टाकून माऊलींच्या बरोबर त्याच्याच नामात दंग होउन वारीला जाणे म्हणजे एक प्रकारची 'stress management' आहे! पंधरा दिवस घर, दार संसार आणि त्याच्या काळज्या दूर ठेऊन पंढरीला जाण्याचा तो उद्देश असावा ’आवडीने भावे हरीनाम घेशी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे’ असे म्हणणारा वारकरी ’असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ या वर्गातील नक्की नाही. आपले काम मनापासून केल्यानंतरही आपल्या हातात नसलेल्या काही गॊष्टींमुळे झालेल्या त्रासावर मात करता यावी यासाठी लागणारी मानसिक शक्ती त्याला वारीला जाण्य़ाने मिळत असेल. कारण त्याची श्रध्दा त्याला सांगते ’सकळ जनांचा करि तो सांभाळ तुज मोकलिल ऐसे नाही एका जनार्दनी भोग प्ररब्धाचा हरीकृपे त्याचा नाश झाला’
क्रमशः

Wednesday, August 20, 2008

पंढरीची वारी : एक अनुभव.


लहानपणापासून पंढरीच्या वारीबद्दल ऎकून वाचून होते. शाळेत असताना पालखी बघायला गेलेलेही आठवतयं. वर्षांनुवर्षे लाखो वारकरी ऊन,पाऊस कशाकशाची पर्वा न करता दोन आडीचशे कीलोमीटरचे अंतर पायी कसे तुडवीतात? ते हि मोठ्या आनंदाने, ऒढीने! कुठलाही आर्थिक लाभ नाही, वैयक्तिक स्वार्थ नाही.नाना जातीचे, वेगवेगळ्या आर्थिक, सामाजिक स्तरातील हे वारकरी पंधरा दिवस एकत्र राहतात.स्वतःचा फायदा नसेल तर काहिही न करण्याच्या आजच्या जमान्यातही ही प्रथा टिकून आहे. हा केवढा चमत्कार आहे! या साऱ्या कुतूहलापोटी वारीबरोबर चालायचं आणि हा अनुभव प्रत्यक्षच घ्यायचा असे ठरविले.दरवर्षी पावसाळा सुरु झाला, वारीचे दिवस आले कि हे विचार उसळी मारायचे.एवढे दिवस घर सोडून जाणे शक्य नव्हते.(अशा वेळी ’आधी प्रपंच करावा नेटका’ म्हणणारे रामदास स्वामी जवळचे वाटत.) पण निदान दरवर्षी वारीचा एक-एक टप्पा करायला काय हरकत् आहे? असा सोइस्कर विचार आला, पण त्यातही काहीतरी अडचणी उभ्या रहायच्या आणि माकडाच्या घरासारखे माझे वारीचे बेत मनातच रहायचे.मात्र ’काशीस जावे, नित्य वदावे’ या चालीवर पुढल्या वर्षी नक्की जाऊ असे दरवर्षी घोकायचे.
यंदाहि सालबादाप्रमाणे जून महिना आला, नेहमीप्रमाणे वारीचे विचार मनात घुमू लागले.नवऱ्याजवळ मी माझी इच्छा बोलून दाखवायचा अवकाश, त्याने हि कल्पना उचलून धरली. आपण दोघेहि नक्की जाऊच, मी सगळी चौकशी करतो, असे सांगून तो तयारीलाही लागला. (त्याने विचार केला असेल हा स्त्री हट्ट् तसा खूपच फायद्याचा, चालतच यायचयं, त्यामुळे खर्चाचा प्रश्ण नाही, शिवाय बायकॊला अध्यात्माची गॊडी लागली तर इतर अनेक खर्च आपोआपच कमी होतील.) तो ’नूमवीय’ आहे त्यामुळे ’हाती घ्याल ते तडीस न्या’ हे शाळेचे बोधवाक्य त्याच्या हाडीमाशी खिळलयं. या सगळ्यामुळे आता मलाही पाऊल मागे घेणे शक्यच नव्हते. आपल्याला आळंदी पासून पुण्यापर्यंत २२ कि.मी चालणे जमेल का? हा आता खरा कळीचा मुद्दा होता.

(क्रमशः)