Thursday, July 23, 2026

लिटील क्रेटर लेक

 

            मैत्रेयीचा सोमवार ते शुक्रवार काम आणि कोर्स मधे गडबडित गेल्यावर शनिवार रविवार सामान आणणे, लॉंड्री,घराची साफसफाई इ. मधे जाई. पण उन्हाळ्यातच दिवस लांबलचक असल्याने हिंडायला मिळते, त्यात आम्ही आल्यामुळे दरवेळी कुठेतरी जायचा बेत ठरविला जाई. एका शनिवारी जेवण झाल्यावर लिटिल क्रेटर लेक बघायला जायचे ठरले. बाहेर उन बरेच असले तरी गाडीत उन्हाचा त्रास जाणवत नसल्याने एक दिड वाजताच निघालो.

प्रवास  दिड,दोन तासाचा होता.हायवे सोडून लहान रस्त्याला लागलो. अधुन मधुन गावे लागत होती. चढ ,उताराचे रस्ते आणि दोन्ही बाजुंना गर्द झाडी. आता घाटाचा रस्ता सुरु झाला आणि दुरवर हिमाच्छादित असा माऊंट हुड दिसू लागला.उन्हामुळे त्याचे शिखर चमचमत होते. गाडी वळली कि तो अदृष्य हॊई आणि पुढल्या वळणावर पुन्हा दर्शन देई. लिटिल क्रेटर लेक चा पत्ता मुलांना नुकताच मिळाला होता त्यामुळे तेही आमच्या इतकेच त्या जागेबद्दल अनभिज्ञ होते. जसजसे अंतर कमी होत गेले तसतसा रस्ता आणखीन लहान होत गेला आणि झाडी दाट. दुपारच्या वेळीही गर्द सावलीने अंधार वाटत होता.पुढे,मागे गाड्य़ाच नव्हत्या आमचीच गाडी त्यामुळे बरोबर चाललोय ना? अशी पुसटशी शंका मनात येऊ लागली, पण गुगल मॅप्स दाखवेल तसे जात असल्याने शंका अनाठायी ठरणार म्ह्णून मी गप्प राहिले. शेवटी लिटील क्रेटर लेक चा बोर्ड दिसला आणि गाडी थांबवली.

        दहा डॉलरचे तिकीट घेऊन आम्हाला पार्कींग मध्ये सोडले.दोन्ही बाजुंनी कमरेएवढे गवत वाढलेले मधुन पायवाट होती ,वाटेवर असंख्य रंगीबेरंगी फुले होती.तिकडून पुढे गेलो आणि उंच ऊंच वनराजींच्या मध्ये ते लहानसे तळे दिसले. त्याचे पाणी निळेशार इतके निळे कि आकाशाने रंग त्याच्याकडुन घेतला असं वाटावं !  भुगर्भात झालेल्या हलचालींमुळे जमिनीला पडलेल्या भेगांमधुन पाणी वर येऊन हे तळे तयार झालयं आणि जमिनिमधल्या ठराविक क्षारांमुळे त्याला तो अनोखा निळा रंग लाभलायं. तळे लहान असंले तरी पाणी खूप खोल होते आणि नितळ देखील. पाण्याच्या भोवती असलेल्या ऊंच ऊंच झाडांचे प्रतिबिंब त्यात पडले होते. तिथली निरव शांतता बघुन कवी अनील आठवले,

अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते

जिथे शांतता स्वत:च निवारा शोधीत थकून आली असते

जळाआतला हिरवा गाळ निळ्याशी मिळून असतो काही

गळून पडत असताना पान मुळी सळसळ करीत नाही

हृदयावरची विचाराची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते

अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते !

अनोखा रविवार

    मागील वेळेस आम्ही ऑगस्ट्च्या पहिल्या आठवड्यात हिल्सबरोला आलो होतो, तेंव्हा ब्लुबेरीज,स्ट्रॉबेरिज इइ चा सिझन संपला होता. या वर्षी आम्ही जूनच्या पहिल्या आठवड्यात आलो.कोलोराडोची ट्रिप करुन आल्यावर मैत्रेयीला ऑफिसमधे बरेच काम होते. मला तिच्यासोबत राहण्यात सुध्दा आनंदच असतो. तिला मात्र आमच्यासाठी काय करु अन काय नको असे होते. बेरीपिकिंग ला जायचयं आपण या रविवारी,तिने जाहिर केले. घरापासुन फार दूर जायचे नव्हते. तिची मैत्रीण देवयानी व स्वप्नील पण आमच्या बरोबर येणार होते. सकाळी नऊच्या आत निघालो तर ढगाळ हवामान असणार होते म्हणून चहा पिऊन आवरुन निघालो. घरापासून अर्ध्या पाऊण तासाच्या अंतरावरच फार्म होते.देवयानीच्या घरापासून तर अवघ्या पाच दहा मिनिटांवर. 'हॉफमन फार्म्स’ असे नाव होते त्या शेताचं. नजर पोचत होती तेथवर हिरवेगार मळे होते. प्रवेश दारापाशीच एका बुथवर आमच्या हातात बास्केट दिल्या. कुठल्याही बेरी ज गोळा करा सगळ्यांची किंमत एका पौंडला (800 gms)ला आडीच डॉलर अशी होती.( कशाचेच रुपयांतर करायचे नाही असे मैत्रेयीने आम्हाला घरातच बजावले होते! ) आम्ही बास्केट घेऊन निघालो. अतिशय शिस्तबध्द रचनेत सगळ्या शेताची रचना होती.ओळीने विविध प्रकारच्या बेरींचे वेल होते. प्रत्येक फळांच्या वेलींच्या सुरुवातीला त्यांची नावे लिहिली होती, आत जाऊन हाताला येतील तेवढी तोडायची. गाड्या भरभरुन माणसे आली होती. छोटी छॊटी मुले आयांचे हात धरुन शिरत होती. सुरुवातीला मी फळे बास्केट्मधे ठेवत होते, आजुबाजुला नजर टाकली तर सगळेच टोपलीत फळे टाकताना तोंडातही टाकत होते.मग काय, आम्ही पण फळांवर ताव मारायला सुरुवात केली. त्या वेलींवर पान कमी अशी फळे होती.ब्लु बेरी, ब्लॅक बेरी, रासबेरी या मला माहित असलेल्या berriesहुन अनेक प्रकारच्या berries होत्या.सगळ्याच एकाहुन एक गोड सगळ्य़ांचेच वेल कुंपणांवर चढवलेले. कुठेही गोंधळ, गडबड नाही. त्या एवढ्या मोठ्या शेतात आलेली माणसे बरीच असली तरी कमीच होती. स्ट्रॉबेरीज खुप पुढे होत्या.हि झाडे अगदी जमिनिलालागुन खाली वाकुनच फळे तोडावी लागत होती.अगदी छॊट्या छॊट्या स्ट्रॉबेरीज पण फार गोड होत्या. बघुन मन भरलेच होते. खाऊनही तृप्त झाले. हळुहळु ढग पांगले. उन तापु लागले.आमच्या टोपल्यातही खुप फळे जमा झालीच होती. परत निघालो. या शेतात सगळी कामे मशिनानेच होतात.आणि त्यात त्यांनी एक छोटी ट्रेन ठेवली आहे, त्यातुन फळे नेतात तशी माणसेही नेतात. इथला शेतकरी सधन आहे कारण त्याने व्यापाराचे शास्त्र आत्मसात केलेले आहे.

       उन्हाळ्यात मैत्रेयीच्या घराजवळ ’फार्मर मार्केट’ अर्थात आठवडी बाजार भरतो. फळांची भरपूर खरेदी झाल्यावर आम्ही या बाजारात गेलो. आपल्याकडे देखील शेतकऱ्याकडून तुमच्या घरात असे बाजार असतातच. इथे छान स्टॉल्स वर ताज्या भाज्या होत्या.कोथिंबीर,पुदिना, कांद्याची पात ,बेसिल अशा भाज्या बघुन   पुण्याची आठवण झाली. भरपूर भाज्या घेऊन घरी आलो रविवार सत्कारणी लागला.

माऊंट हेलेन्स ची सहल

 

      तीन वर्षापूर्वी पहिल्यांदा अमेरीकेत येणे झाले. मैत्रेयीच्या पदवीदान समारंभाला विसा न मिळल्याने येता आले नव्हते. पण तिला नोकरी मिळल्यावर आम्ही तिच्याकडे आलो. तिची नोकरी नवी ,तिला ते राज्य नवीन,सगळे अपरिचित म्हणून तिला सोबत म्हणुन आम्ही आलो, तरीही तिने आम्हाला इकडे भरपूर हिंडवले. 2024 च्या अखेरीस माझी सेवानिवृत्ती झाली आणि मैत्रेयीचे लग्न झाले आणि तिकडच्या काही अपरिहार्य कारणांनी तिला दिड वर्षे होऊनही भारतात येणे झाले नाही आणि परत कधी येता येईल हे ही सांगता येणार नाही अशी परिस्थिती असल्याने तिने तुम्हीच या असा आग्रह करायला सुरुवात केली, आम्हालाही वेळच वेळ आहे त्यामुळे सात जुन ला तिच्याकडे आलो.

      मैत्रेयीला ऑफिसमधे काम होतेच शिवाय तिला कुठलासा कोर्स करायला सांगितले असल्याने तिला मदत आणि तिचा सहवास हाच या भेटीचा मुख्य उद्देश्य. तरीपण आमचे राहणे सुखकर होईल व नवीन बघणे होईल  अशा पध्दतीने त्यांनी वेळाचे व सुट्ट्यांचे नियोजन केले. मैत्रेयीचा ऑफिसमधील एक सहकारी इशान याचे आई-बाबा मागील वेळी भेटले होते व त्यांच्या सोबत आम्ही गेल्या वेळी एक ट्रीप केली होती. यंदा पण ते अमेरिकेत आलेत व आमच्याबरोबर सहल करायची असे त्यांनी मैत्रुला सांगुन ठेवले होते.

      हिल्सबरोपासुन जवळ माउंट हेलेन्सला जायचे ठरवले. शनिवारी सकाळी नऊला जायचे ठरवले होते. आम्ही घरुन इडली आणि दोन प्रकारच्या चटण्या घेतल्या होत्या. दोन आडीचतासाचा प्रवास होता. रस्ते फारच सुंदर आणि प्रशस्त असल्याने प्रवासाचा आनंद मिळतो. ओरेगन राज्य निसर्गरम्य आहे. चहुबाजुंनी दाट वनराई डोळे थंडावत होती. पोर्टलंड गुलाबाचे शहर ओळखले जात असल्याने.गावातुन बाहेर पडताना रस्त्याच्या कडेनेही गुलाबाची बने. प्रवासच एवढा सुखकर तर मुक्कामचे स्थान  किती सुंदर असेल असं वाटत होतं. आता चढणीचा रस्ता सुरु झाला. घाट असला तरी दुपदरी रस्ता होता व वाहनांची खुप गर्दी नव्हती. एका ठिकणी थांबलॊ. तिथे माऊंट हेलेन्स बद्दल माहितीपट दाखविला जाणार होता. दर अर्ध्या तासांनी हा माहितीपट दाखविला जातो. तो मोफत होता. 1980 मध्ये या पर्वतातुन अचानक मातीचा ज्वालामुखी ( Mud volcano) झाला, त्याबदद्ल्ची साद्यंत माहिती या पटात अत्यंत रोचक रितीने दाखवली होती. 1980 मध्ये तिकडे काहीतरी भयंकर घडणार असल्याचे हवामान खात्याने वर्तवले होते,तिथल्या स्थानिक रहिवाश्यांना विस्थापनाचा इशारा देण्यात आला होता. काही वृध्द हलले नाही आणि खरोखरीच त्या पर्वताच्या पोटात घडमोडी होऊन मातीचे खलन सुरु झाले.धुळीचे लोट्च्या लोट सुटले हि माती हजारॊ किमी. ऊडली प्रचंड नैसर्गिक विपत्ती झाली. तिथले सगळी नैसर्गिक संपत्ती नष्ट झाली.पण नंतर निर्सगाला त्याचा वेळ देण्यात आला. तिथे नैसर्गिक रित्या पुन्हा सृष्टी जागी झाली आणि नंतर पर्यावरण प्रेमींनी तेथे पुन्हा भरपूर वृक्षारोपण झाले आणि आता तेथे पुन्हा भरपूर वनराजी दिसते मात्र  पर्वत ती आपत्तीची जखम आपल्या शिरावर बाळगुन आहे.

    त्या इमारतीत त्या आपत्तीतील झाडांचे अवशेष ठेवलेत.त्या ठिकाणच्या वृक्षांची ,पक्षांचे,प्राण्यांचे फोटॊ,मॉडेल्स आहेत. प्रत्येक प्रकारच्या पक्षांच्या घरट्यांची मॉडेल्स, त्यांची माहिती मिळाली. तिकडे वेगवेगळ्या शास्त्रीय संकल्पना कारटुन्सच्या ऍनिमेशन फिल्म मधुन सांगितल्या आहेत. अतिशय सोप्या आणि रसाळ भाषेत या संकल्पना दाखवल्यात. तसेच जंगलाशी संबंधित खेळ लहान मुलांसाठी ठेवलेत. लहान मुलांवर निसर्गाचे, निसर्गाच्या साधनसंप्पत्तीचे संवर्धन करण्याचे संस्कार करणारे ते खेळ आणि फिल्म्स मला सगळ्यात आवडले. त्या इमारतीच्या बाहेर आरामात बसायला भरपूर जागा , खुर्च्या होत्या रेलींगला टेकुन उभे राहिलो कि समोर हेलेन्स पर्वतराज उभे होते. या पर्वतावर जायला ट्रेकिंग करावे लागते,ते काम तितके सहज अर्थातच नाही.

  तिकडुन आम्ही  पुढे गेलो, एक अतिशय सुंदर तळे होते, त्याच्या काठी बसायला बाक होते, तिथे बसुन आम्ही जेवण केले. इशान च्या आईने गट्ट्यांची भाजी भात आणला होता. राजस्थानी व दाक्षिणत्य जेवणाचा आस्वाद घेतला. तळ्यामधे लोक बोटींग करत होते. इकडे सहा महिने दिवस लहान असतो, चार वाजताच अंधार पडतॊ शिवाय सकाळी आठ वाजेपर्यंत उजाडत नाही. त्यामुळे समर अर्थात उन्हाळ्याची इकडचे लोक वाट बघत असतात, उन्हाळ्यात दिवस मोठा असतो, पहाटे पाच पासून रात्री नऊ पर्यंत सूर्यदेवाचा मुक्काम अस्मानी असतो त्यामुळे हे तीन चार महिने इकडचे लोक उन्हाळा सर्वार्थाने भोगतात ! अगदी लहान लहान मुले ,तरुण पाण्यात पोहत होते आणि सिनियर सिटीझन्स(म्हातारे कोतारे म्हणणं त्यांना आवडत नाही म्हणून...) हि किमान कपड्यात बोटींग करताना दिसत होते. आम्ही तळ्याभोवती हिंडुन गप्पागोष्टी करत फोटो काढले. परत यायला निघलो.

  घरी आलो तेंव्हा पाच वाजायला आले होते तरी सूर्य अजून खूपच वर होता. दिवसभर हिंडून जराही थकावट जाणवली नाही. आमच्या अमेरिका वारीची सुरुवात अशा बहारदार सहलीने झाली !




 

Wednesday, July 22, 2026

गार्डन ऑफ गॉड्स

 


 

   दिव्याकडील पाहुणचार आटोपुन आम्ही रविवारी सकाळी निघालो. गुरुवारी बोल्डर युनिव्हर्सिटी बघायची राहिली होती ती बघण्यासाठी सकाळी आठ वाजताच बाहेर पडलो.

   पर्वतरांगांच्या पायथ्याला विद्यापिठाचा परिसर आहे. भरपुर झाडांच्या वनराईत लाल विटांच्या इमारती फारच सुंदर दिसतात. डोंगराच्या परिसरात असल्याने सर्वच परिसर उंच सखल आहे. भरपूर मोठ्या हिरवळीच्या चहुबाजुंनी होस्टेल्सच्या इमारती आहेत.तिकडून डिपार्ट्मेंट्स च्या इमारती दुरवर आहेत, विद्यार्थ्यांना कॅम्पसवर जाण्यासाठी मोफत बससेवा आहे."बस ठराविक वेळेलाच असे, त्यामुळे बस गेली तर आम्हाला चालतच जावे लागे" मैत्रु सांगत होती. आम्ही चालत निघालो. रस्ता चांगलाच चढणीचा होता.(थंडीत,बर्फात चालताना काय त्रास पडत असेल ! ) ’बोल्डर क्रिक दाखवु .’ प्रियंकर म्हणाला. क्रिकच्या रस्त्याला लागलो. विद्यापिठाच्या आवारातुन एक छानदार ओढा वाहतो, हिच बोल्डर क्रिक. ऐलतटावर,पैलतटावर हिरवाळी आणि गर्द झाडी लेवुन वाहणारा देखणा  नितळ पाण्याचा ओढा बघत राहावा असा होता. तिथे औंदुबर नसला तरी प्रचंड मोठ्या झाडाच्या सावलीत एक मुलगी बसली होती. "सबमिशन झाले कि आम्ही पण इथेच येऊन बसायचो, कधी घरची आठवण आली कि इथेच यायचो." मैत्रु सांगत होती.

   भरपूर चढण चढुन वर युनिव्हरसिटीचे फुटबॉल मैदान होते. स्विमिंग पूल सगळे बघताना तिथे शिकणाऱ्या मुलांचा हेवा वाटला. त्यांची लायब्ररीपण प्रचंड मोठी.आर्ट सेंटरची इमारत पण खूप विशाल आहे,  रविवार असल्याने ती दुपारी दोन वाजता उघडणार होती, ती आतुन बघायला मिळाली नाही. युनिव्हरसिटीचा मॅस्कॉट गवा आहे. त्याचा काळा पुतळा चौकात आहे. चहुबाजुने रॉकीपर्वतांच्या रांगा आहेतच. मुलांना शिकताना त्रास पडले. कोविडच्या काळात ते शिकायला आले, त्या भयंकर साथीचे सावट त्यांच्या शिक्षणावर होतेच, शिवाय कर्ज घेऊन शिकायला आल्याचा तणाव.नविन देश, पोस्ट्ग्रॅज्युएशन चे कठीण विषय, प्रॅक्टिकल्स,सबमिशन्स या बरोबरच सामान आणुन स्वयंपाक बनविणे, हिशेब ठेवणे , हे सारे करत असताना त्या दोघांनी डायनिंग (कॅंटीन) मध्ये दोन महिने काम केले, भाज्या चिरण्यापासुन, भांडी घासण्यापर्य़ंत . नंतर टिचर ऍसिस्टंट म्हणून काम केले, इंट्रनशिप करुन शिक्षण पूरे होता होताच कर्जपण फेडले.  पदवीच्या शिक्षणाहुन जगण्याचे हे शिक्षण त्यांना जगण्याच्या लढ्याला जास्त उपयोगी पडत आहे. हिंडताना दोन अडीच तास कसे गेले ते समजलेच नाही.



       आम्ही कोलोराडो स्प्रिंग गावाला जायला निघालो. रस्त्याच्या दुतर्फा हिरवळी त्यावर चरणारी गुरे, मधेच एखादे गाव लागले कि टुमदार घरे.एका बाजुने लांबच लांब जाणारी मालगाडी.बघता बघता कोलोरोडोस्प्रिग आले. हे शहर समुद्रसपाटीपासून बरेच उंचावर आहे, त्यामुळे इथे ऑलिम्पिक्स साठी खेळाडु तयारी साठी येतात. इथे आर्मीचा बेसही आहे.  गार्डन ऑफ गॉडस साठी हे प्रसिध्द आहे. गार्डन ऑफ गॉड्स हा निसर्गाचा मोठा चमत्कार आहे. लाल रंगाचे महाप्रचंड खडक इथे बघायला मिळतात आणि त्यांचे वेगवेगळे चित्तचक्षुचमत्कारिक आकार आहेत. एखादा झोपलेला राक्षस, किसिंग कॅमल्स,सयामी जुळी  असे एकापेक्षा एक दगडांचे आकार दिसतात. एका प्रचंड मोठ्या तिरका अधांतरी वाटावा असा खडक बघुन महाबलीपुरम येथील शिळेची आठवण झाली. सयामी जुळे हे सगळ्यांवर कडी करणारे शिलाशिल्प म्हणावे लागेल. सयामी जुळ्यांप्रमाणे पोटाचा भाग चिकटल्याप्रमाणे हे दगड दिसतात. तेथवर जायला पाऊलवाटा असल्यातरी चढाच्या ठिकाणी पायऱ्या केल्यात जाण्याच्या रस्त्यावर दिशादर्शक बोर्ड आहेत. भरपूर पर्यटक असुनही खाल्लेल्य़ा पदार्थांची पाकिटे,प्लॅस्टिकच्या बाटल्या असा कचरा कुठेही दिसत नाही. त्या दगडांवर कोणी खडूने काही लिहुन ठेवत नाही, त्यामुळे गार्ड्न ऑफ गॉड्स हे नाव शोभुन दिसते !

          कोलोराडोस्प्रिंग्स आम्ही मधे एक घर भाड्याने घेतले होते. आपल्याइकडे देखील बऱ्याच ठिकाणी अशी घरे भाड्याने मिळतात. दोन बेडरुमचे अगदी देखणे घर होते. गेल्या गेल्या आम्ही झकास चहा करुन प्यायलो. थोडी विश्रांती घेऊन बाहेर पडलो. गाडीत पेट्रोल भरुन तिथल्या इंडीयन स्टोअर मधुन पराठे,योगर्ट असे दुसऱ्या दिवशी साठी घेतले व एका हॉटेलमधे जेवण करुन परत आलो. सकाळी उठलो तर आमच्या घरामागील हिरवळीवर हरणे चरताना दिसली. वेगवेगळे पक्षीही बसले होते. रॉयल गॉर्ज हे ठिकाण तिकडुन दिड तासाच्या अंतरावर होते. रस्ता बराच रुक्ष होता, सगळी कडचे डॊंगर उघडेबोडके व रस्त्याचे काम चालु असल्याने एकाच बाजुच्या रस्त्याने वाहनांची ये जा चालु होती. महाराष्ट्रातील दुष्काळी गावातुन जात असल्याचा भास होत होता. साडॆअकराला पोचलो. अर्कान्सस नदी खोल दरीतुन वाहते, त्या दरीवर सुमारे चारशे मीटरचा पूल आहे. 1926 साली तो बांधला. पुलावरुन चालत असताना,खाली बघितले कि धडकी भरते. प्रचंड खोल दरी आणि त्यातुन वाहणारी नदी वरुन जिवघेणा वारा. निसर्गाची कमाल आहेच पण मानवी प्रयत्नाने त्यावर विजय मिळवल्याचेही कौतुक वाटते. त्या नदीला लागुन खोल दरीतुन ट्रेनही जाते वरुन रेल्वेचे रुळ दिसत होते. पूलावरुन पलिकडे गेलो.तेथे दर एक तासाने अर्ध्या तासाचा माहिती पट दाखवतात. त्यात अश्मयुगापासुनची माहिती सांगितली.याजागेवर कोणे एकेकाळी कसे पाणीच पाणी होते नंतर भूकंपाने जमिनीची हि रचना झाली. नंतर तो नदीपासून सुमारे 1000 (956 feet) फूट उंचावर 1926 साली बांधलेला सस्पेंशन ब्रिज. त्यानंतर त्याची केलेली दुरुस्ती इ.माहिती समजली.  माहितीपट बघितल्यावर आम्ही तिकडे बाकांवर बसुन जेवण केले आणि एक वाजताचा बर्ड शो बघायला गेलो. या भागात दिसणारे ससाणा, इगल आऊल, काईट आणि गिधाड असे पक्षी प्रत्यक्ष स्टेजवर उडत आले. त्यांची माहिती सांगत असताना त्यांना एका काठीवर बसवुन एक माणूस प्रेक्षकांमध्ये फिरवत होता. ससाण्याबद्दल पूर्वीच्या कथांमधुन मी वाचले होते, पूर्वीचे राजे,महाराजे हा पक्षी पाळत असत. इतक्या जवळून बघायला मिळाला. इगल आउल, हि घुबडाची एक अनोखी जात आहे.तपकिरी रंगाचा हा पक्षी एक फुट उंच असतो, त्याचे डोळे गोट्यांसारखे होते व मान 270 अंशात वळत होती. अत्यंत कर्कश्य आवाजातील त्याचे ओरड्णे भितीदायक वाटले. गिधाड मात्र काळे व छोटे होते. मृत प्राणी खाऊन निसर्गाचे संरक्षण करणारे अशी माहिती सांगुन त्यांना आपले मित्र मानणार ना? असे विचारताच सगळी छोटी मुले माना डोलावताना बघुन मला मजा वाटली.

     परत येताना आम्ही गंडोलातुन जाणार होतो. इकडे झिपलाईन,तसेच हवेतुंच झोक्यावर बसून दरीत झोके घेणे असे साहसी प्रकार आहेत.गंडोलातुन येताना खाली काच असलेल्या गंडोलात आम्हाला बसायला मिळाले.खालच्या काचेतुन दिसणारी दरी आणि नदी अंगावर काटा आणणारा अनुभव होता. पण मजा आली.परत येताना भरपूर ऊन होते. आम्ही आमच्या भाड्याच्या घरी जायला निघालो. अर्ध्या तासानंतर अचानक आभाळ भरुन आले आणि पाऊस पडू लागला. वातावरणात एकदम झालेल्या बदलाने छान वाटू लागले. जाताना वाटणारे रुक्ष रस्ते ,डोंगर पाण्याने प्रसन्न भासु लागले. पाच वाजता घरी आलो.उरलेला दिवस निवांत गप्पागोष्टी,पत्ते खेळण्यात घालवला. दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजताच आम्हाला घर सोडून डेनवरचा विमानतळ गाठायचा होता.

      कोलोराडोची ट्रिप अविस्मरणीय़ झाली. अमेरिका हा महाप्रचंड देश आहे. इथल्या पूर्वेकडील राज्यातुन पश्चिमेकडच्या राज्यात जायला विमानाने सहा सात तास लागतात एवढ्यावरुन या देशाच्या विशालतेची कल्पना येते. मैत्रेयी व प्रियंकरमुळे आम्हाला हे सारे बघायला मिळाले. अतिशय विचारपूर्वक असे सहलीचे नियोजन करुन आम्हाला कमी दिवसांत या राज्यातील महत्त्वाची ठिकाणे  त्यांनी दाखवली, आम्हाला रुचेल,पचेल असे खायला घातले. सनस्क्रिन लाव, गॉगल घाल असे मायेने सांगणारी ,रॉकी माऊंटनच्या ट्रेकवर दर थोड्यावेळाने माझ्यासाठी थांबणारी,मला पाणी देणारी मैत्रेयी बघुन वाढत्या वयाची जाणीव झाली तरी असं भाग्याचं म्हातारपण देणाऱ्या देवाचे आभार कसे मानू? अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने.

 

समाप्त.

 

कोलोराडो दर्शन


          मैत्रेयी व प्रियंकर दोघांनी कोलोराडो  राज्यातील बोल्डर विद्यापिठातुन  M.S. केले. तिची University बघायची होती, मागच्या अमेरीका ट्रिपमध्ये जमले नाही, त्यामुळे यावेळी तिने आम्हाला तिकडे न्यायचे ठरवले.तिला सलग जोडुन असलेल्या सुट्ट्यांना जोडुन दोन दिवसा्ची रजा घेऊन पाच दिवसांची ट्रिप प्लॅन केली होती.

    गुरुवारी पहाटे निघालो. सकाळी आठची फ्लाईट आडीच तासात पोचली पण घड्याळ एकतास पुढे गेले.त्यामुळे साडेअकरा वाजले होते. ’डेनवर’ चा विमानतळ जगातील मोठ्या विमानतळांपैकी आहे.भरपूर चालुन, सरकत्या जिन्यांवरुन उतरुन ट्रेनमध्ये बसुन बाहेर आलो. चार पाच दिवसांकरता एक गाडी बुक केली होती. ती गाडी घेण्यासाठी बसने जावे लागते. गाड्या भाड्याने देणा़या निरनिराळ्या कंपन्या आहेत, त्यांची ऑफिसेस विमानतळापासून दूर आहेत. तिकडे जाण्यासाठी त्या त्या कंपन्यांच्या बसेस विमानतळावर ठराविक स़्टॉपवर येतात.त्या बसमधुन बसुन त्या कंपनीच्या ऑफिसपाशी जायचे. तिथे लोक रांगामधे उभे असतात, आपला नंबर आला कि आपल्याला गाडी मिळते. खुपच छान आहे हि सोय. आम्हाला पांढरी जीप कंपनीची गाडी मिळाली. हे सगळे होईपर्यंत एक वाजायला आला होता. बाहेर ऊन रणरणत होते. पोटात भुकही जाणवत होती. डेनवर , हिल्सबरोपेक्षा रुक्ष वाटत होते. बोल्डर विद्यापीठात पोचायला चाळीस मिनिटे लागली. उंच, ऊंच झाडांच्या परिसरांत लालसर विटांच्या छोटेखानी इमारतींचा अप्रतिम परिसर पहिल्या दर्शनात फार आवडला. आधी जेवायचे ठरवले, त्यांच्या एका डायनिंग हॉल मधे आम्हाला मैत्रु व प्रियंकरने नेले. दहा डॉलर मधे अनलिमिटेड जेवण आज त्यांना स्वस्त वाटत होते, पण शिकत असताना त्यांना ते परवडत नव्हते ! ( आम्हाला ते आजही महागच वाटते कारण त्यांचे रुपयांत रुपांतर करणे आम्हाला भागच असते !)  तऱ्हेतऱ्हेची सॅलड्स, इटालयीन,मेक्सिकन, चायनीज असे असंख्य खाण्याचे प्रकार होते, पण बसायच्या जागेपासुन जवळच्या स्टॉलवरुन मिळेल ते खाणे मी पसंत केले. जेवण करुन बाहेर आलो. गाडीतुन हिंडुन , मधे मधे थांबुन विविध डिपार्ट्मेंट्स, लायब्ररी दाखवायचे असे ठरले. बाहेर उन चांगलेच जाणवत होते. जेवणाने नाही म्हटले तरी थोडी सुस्ती जाणवत होतीच,पण मुलांचा उत्साह पाहुन निघलो, तेवढ्यात दिव्याचा फोन आला. "आज हिट वेव्ह आहे, त्यांना उन्हात हिंडवु नका, मी घरी आले आहे, तुम्ही घरी या आपण उन उतरल्यावर जाऊयात"

      दिव्या ,आमची पुतणी ,सव्वीस वर्षांपूर्वी लग्न करुन अमेरीकेत आली,इकडे पोस्ट ग्रॅज्युएशन करुन नोकरी मिळवली. त्या काळी अमेरिकेत राहण्याची वेगळी आव्हाने होती. इंटरनेट नसल्याने संपर्काची साधने नव्हती.फोन खुप महाग होते. भारतीय दुकाने कमी होती, भारतीय लोकांचे प्रमाणही बेताचे होते. पण तिने जिद्दीने सगळ्यांवर मात करत छान प्रगती केली. बोल्डर विद्यापीठातुनच तिनेहि पदव्युत्तर शिक्षण घेतले व आज मोठ्या पदावर काम करते.शिवाय अमेरिकन लोकांना भारतीय योगा शिकवते.  कोलोराडोतील बोल्डर विद्यापीठात मैत्रुने प्रवेश घेतला तो कोविडचा काळ होता. दिव्या बोल्डरजवळ राहते हे आम्हाला त्याच वेळी समजले.(ती अमेरिकेत असते एवढेच आम्हाला माहित होते). दिव्याचे वडील रमेशचे आत्येभाऊ. रमेशने त्यांना मैत्रेयी बोल्डर विद्यापीठात जाणार असल्याचे फोनवर सांगितल्यावर त्यांनीच आम्हाला दिव्याचा फोन नंबर दिला व दिव्यालाही त्यांनीच कळवले. दिव्याने लगेचच आम्हाला फोन केला आणि मैत्रेयीला भेटायचे कबुलही केले. मैत्रेयी सुरुवातीला तिला भेटायला फारशी उत्सुक नव्हती.पण तिकडे गेल्यावर होमसिकनेसने पछाडल्यावर दिव्याच्या आधाराची महती तिला जाणवली. तीनेही मोठ्या बहिणीसारखी मैत्रुची फार मायेने काळजी घेतली.तिला सुट्टीच्या दिवशी घरी नेणे, सणावाराला जेवायला बोलावणे हे तर केलेच पण डोशाचे पीठ दे, बोल्डरला जायचे असल्यास तिला खाऊ दे असे करुन तिला घरची उणीव अजिबात जाणवु दिली नाही.

 दिव्याचे फोनवरचे बोलणे आम्हाला त्या चट्चटत्या उन्हात थंडगार झुळुकेसारखे वाटले आणि प्रियंकरने गाडी तिच्या घराच्या दिशेने चालु केली. वाटेत दिसणाऱ्या इमारती , रस्ते बघताना स्मरणरंजन चालु होते. युनिव्हर्सिटीतुन रॉकी माऊंटन दिसत असतो. थंडीत ती पर्वतराजी बर्फाच्छादित असते.दिव्याच्या घरी पोचलो तेंव्हा चहाची वेळ झाली होती. चहा पिताना दिव्या आणि अशोकने कोलोराडोच्या कोरड्या हवामानाची आणि Highaltitude बद्द्ल कल्पना दिली. सतत थोडे थोडे पाणी पित राहिले तर या हवामानाचा त्रास होणार नाही असे सांगितले. गप्पा मारता मारता तिने डोशाची तयारी केली. गरम गरम डोसे खाताना दिव्याबरोबर आम्ही जुन्या आठवणीत रमुन गेलो.

  दिव्याने पुढले दोन दिवस आमच्याबरोबर येण्यासाठी मोकळे ठेवले होते. दुसऱ्या दिवशी नाश्ता करुन आम्ही दहा साडेदहाला ब्लु स्काय माऊंट ला जायला निघालो. रस्ता नेहमीसारखाच सुंदर मात्र रुक्ष. तासाभरानंतर वातावरण बदलले. हिरवाई जाणवु लागली. साडेबारा वाजुन गेले होते.  ’क्युडॊबा’ या मेक्सिकन रेस्टॉरंट पाशी थांबलो, तेथे आम्ही जेवलो. भाताबरोबर आपल्याला हव्या त्या वेगवेगळ्या बिन्स,सॅलड्स,चटण्या ,चिज एकत्र करुन देतात. मला ब्रेड,पिज्जा पेक्षा हा प्रकार आवडला.

      जेवण  करुन निघालो, आता रस्ता खुप चढणीचा आणि वळणावळणाचा होता. एका तळ्यापाशी थांबलॊ, बाहेर बोचरी थंडी होती आणि सुसाट वारा होता.तळ्याचे पाणी नितळ. तिथे प्रियंकरचा मित्र अखिल आणि सलोनी भेटले. येथुन पुढचा रस्ता खुपच लहान एका बाजुला खोल खोल दरी आणि दुसरीकडे उंचच उंच पर्वत. हिमालयातल्या रस्त्यांची आठवण झाली. उंच ऊंच चढत जात आसताना हळू हळू झाडी कमी कमी होत उजाड प्रदेश जाणवु लागला.मधुनमधुन दगडासारखे कडक झालेले बर्फ दिसत होते. इकडे वेगळ्या प्रकारच्या मेंढ्या असतात ,आम्हाला त्या दिसल्या. ब्लुस्काय माऊंट्च्या वर पर्यंत गाडी जाते. 14400 फूटपर्यंत गाडीने वर पोचलो. बऱ्याच गाड्या आलेल्या होत्या. आम्ही उतरलो भणाणणारा वारा निसर्गाचे रुद्र रुपाची जाणीव करुन देत होता. इतक्या उंचीवर रेलिंग बांधुन जागोजागी व्ह्यु पॉंईट्स आहेत.लोक जागोजागी थांबुन फोटो काढत होते. तिथुन शंभर दोनशे फूट उंच अशी दगडांची टेकडी होती. नुकतेच अखीलच्या पायाचे ऑपरेशन झाल्यामुळे अखील,सलोनी चढुन जाणार नव्हते, मी देखील त्यांच्या बरोबर थांबायचे जाहिर केले.बाकी मंडळी वर गेली आम्ही तिकडेच गप्पा मारत थांबलो.   परत येताना राहुन राहुन वाटत राहिले     Not Destination but journey itself was real pleasure. मुक्काम नव्हे तर प्रवास हा च खरा आनंद !






      दुसऱ्या दिवशी आम्हाला एम्राल्ड लेकची हाईक करायची होती. तिकडे जाताना आधी बुकिंग करावे लागते.जोडून सुट्ट्या आल्याने आम्हाला दुपारी १२ ते २ ची वेळ मिळाली. अशोक आम्हाला उन्हाच्या वेळी जाऊ नका म्हणत होते, पण उंचीवर आणि झाडीमुळे उन्हाचा फारसा त्रास जाणवणार नाही असे इतरांचे म्हणणे पडले व दुसऱ्या दिवशी ब्रंच करुन बारा सव्वाबाराला आम्ही निघालो. गप्पा गोष्टी करत दिड पावणेदोन तास कसे गेले समजले नाही. दिव्या तिचे अमेरिकेतील वास्तव्यातील अनुभव, तिने केलेले ट्रेक्स वगैरेबद्दल सांगत होती. बराचसा रस्ता चढणीचाच होता, नॅशनल पार्क पाशी पोचल्यावर पास दाखवायचा किंवा तिकिट घ्यायचे, मुलांकडे पास होता.वरती पार्किंगला जागा नसेल तर खाली गाडी लावुन तेथील शटल बसने बेअर लेक पर्यंत जावे लागते, तिथुन चालत जायचे. आम्हाला वर पर्य़ंत जाऊन पार्कींग मिळाले. साधारण पावणेतीनला आम्ही चढायला सुरुवात केली.चढायच्या रस्त्यावर झाडांच्या सावलीने उन जाणवत नव्हते तरी चढामुळे दम लागत होता, साधारण एक कि.मी वर ड्रीम लेक आहे.तिथे पहिला मुक्काम केला.भरपूर लोक चढत होते. अगदी छोट्या छोट्या बाळांना पाठीला बांधुन जाणारे तरुण तर होतेच पण टोप्या,गॉगल्स लावुन जाणारे सिनियर सिटिझन्सही भरपूर संख्येने होते. इथुन पुढची चढण चांगलीच जाणवणारी होती.मात्र दमुन समोर बघावं तर बाजुंनी आकाशाला भिडणारी पर्वतशिखरे, सूचिपर्णी वृक्ष थकवा घालवत होते. पुढचा टप्पा डायमंड लेकचा, इथे आम्ही फार थांबलो नाही. पुढचा शेवटचा अवघड टप्पा हळुहळू चढत गेलो. थंडगार वारे अंगाला सुखवत होते.अखेर शेवटी ते एम्राल्ड लेक दिसले. अत्यंत सुंदर अशा पाचुसारखे त्याचे पाणी आणि त्याच्या चहुबाजुंनी त्याच्या रंगाशी स्पर्धा करणारी वनराजी. सृष्टीकर्त्याच्या निर्मितीला मनोमन वंदन केले. अशा विराट निसर्गापुढे मन नम्रच होते. ती इकडची 20 जूनची संध्याकाळ. भारतात योग दिवस सुरु झाला असेल, म्हणून दिव्याने तेथील दगडावर उभे राहुन वृक्षासन केले. मी शवासन करु शकले असते पण......










मैत्रेयीने बाबांबरोबर फोटॊ काढले. ती दहावीत असताना तिला तिच्या बाबांनी हिमालयात सौरकुंड ट्रेकला नेले होते. तो फादर्स डे( २० जून शनिवार) होता आणि त्या निमित्ताने मैत्रेयीने तिच्या बाबांना रॉकी माऊंटन मध्ये ट्रेकला नेले ! एका वडीलांना मुलीकडून फादर्स डे चे याहुन मोठे गिफ्ट काय असेल ?

   खाली उतरुन बेअर लेक पाशी यायला पाच वाजुन गेले. हे पण अतिशय सुंदर आणि प्रचंड मोठे तळे आहे. त्याच्या पाशी थांबुन फोटो काढुन आम्ही परतीच्या वाटेला लागलो. येता येताच दिव्याच्या मैत्रिणीने चालु केलेल्या फुड ट्रक पाशी जाऊन पावभाजी,भेळ असे अस्सल भारतीय जेवण करुन प्रवासाची सांगता झाली .

   दिव्याकड्चे दोन दिवस फार मजेत गेले. तिने व तिचे यजमान अशोक यांनी अतिशय आपुलकीने आमचे आदरातिथ्य केले. तिची मुलगी श्रेया देखिल बोल्डर विद्यापिठात शिकत आहे.होस्टेलवरुन ती एक दिवस आम्हाला भेटायला आली.तिचा मुलगा ऋषी बारावीला गेलाय. त्याची आमची काहीच ओळख नसतानाही आमच्याशी बोलला, दिव्याला हवे ते सामान आणुन देत होता. परदेशात आपले इतके आगत्याने करणारे भेटले कि मन भरुन येते. आपले घर सोडून दूर देशी गेल्यावर अशी माणसे लाभणे हे भाग्यच आहे. मैत्रेयीला हे भाग्य लाभले हि परमेश्वराची कृपा !

 क्रमशः



Wednesday, November 27, 2024

दिवेआगरची सहल

 

माझी नोकरी संपत आली . माझ्या टीम मधील मुलामुलींना आपण ट्रीपला जाऊ असे चार वर्षांपासून देत आलेले अश्वासन मी पुरे करु शकले नाही, मी लोकप्रतिनिधी नसल्यामुळे टिम मधल्या मुलांची छोटीशी मागणी पुरी न केल्याची मलाही फार खंत वाट्त होती, पण land records सारख्या department चे काम आम्ही करत असल्याने सतत कामाचा ताण असे, रोजच्या नवनव्या मागण्या,कधी सर्व्हर स्लो,कधी सर्व्हर डाऊन,कधी स्वातंत्र्य मिळाल्याला ७५ वर्षे झाली म्हणुन मोफत सातबारा योजना,कधी महसुल सप्ताह असे काही ना काही चालू असे व त्यामुळे सुट्टीचा एक दिवस आम्ही सहल ठरवु शकत नव्हतो.

        नोव्हेंबर माझा शेवटचा महिना. आक्टोबरच्या सुरुवातीला मुलांनी माझ्याकडे ट्रिपला जायची आठवण केली, पहिल्य़ा शनिवार रविवार नवरात्र होते, दुसऱ्या विकएंडला दसरा होता, तिसरा शनिवार रविवार सोईचा होता, मला खर तर सकाळी जाऊन संध्याकाळी येणे बरे पडणार होते,करण माझ्या मुलीचे लग्न डिसेंबर अखेरीस असल्याने मला लग्नाची पण बरीच कामे दिसत होती. मुलांनी पुण्याजवळची बरीच ठिकाणे शोधली पण योग्य  काही मिळेना, कोकणातील दिवेआगर जवळ एक हॉटेल मिळाले मात्र इतक्या दूर जायचे तर एक मुक्काम करणे अनिवार्य होते, मग मी हि एक दिवस काढायचा असे ठरवले व आमची ट्रिप जायचे नक्की झाले.

आयुष्यात प्रथमच मी फक्त बॅग घेऊन निघणार होते, मला कुठलीही चौकशी करायची नव्हती, स्वयंपाकघरात तयारी करायची नव्हती. मी बॉस असल्याने मला न्यायला बस घराजवळ येणार होती. शनिवारी पहाटे साडेसहाला सेनापती बापट रोडवर मला न्यायला बस आली.बसमधुन राहुल, सौरभ,दीप, दिपाली आणि ऋतुजा आलेले होते. त्यांना किती लवकर उठुन यावे लागले असेल, पण कोणाच्याच चेहऱ्यावर मरगळ नव्हती.सगळे फारच उत्साहात होते.माझी बॅगही मुलांनी घेऊन बसमधे ठेवली. वाटेत दोन -तीन ठिकाणी बस थांबत बाकीच्यांना घेणार होती.  बाणेर ला सचिन चढला,बस हाय वेला येऊन थांबली.अर्चना,सीमा आणि प्रियांका ,सजदा चार ठिकाणाहुन तेथे येणार होत्या, तिघींना त्यांच्या नवऱ्यांनी सोडले.सीमा तिच्या तीन वर्षाच्या मुलीला सोडून येत होती, प्रियांकाचा पाच वर्षाचा मुलगाही तिला सोडायला आला होता. त्या मुलांच्या आयांचा वेळ मी घेत असल्याच्या भावनेने मला अपराधी वाटले. त्या दोघींनाही मुलांना सोडणे अवघड वाटले असेल पण त्या मुलांच्या वडीलांनी मुलांची जबाबदारी घेऊन बायकोला एक दिवस मजा करायला पाठवणे हा समाजातला बदल मला आवडला. माझ्या वेळी मी असे करु शकले नव्हते !

पुढच्या स्टॉपवर अभिजित व शेवटी दिग्विजय चढला. कुठल्या कुठे लांबवर मुले राहतात आणि रोज वेळेवर ऑफिसला पोचतात ,विचारानेच मन भरुन आले. आता गाडीने वेग घेतला, ताम्हिनी घाट सुरु झाला, गप्पा,गोष्टी ,चेष्टा विनोदाला बहर आला. मुलींनी एक  दिवसाच्या ट्रिप करता केवढे सामान आणले होते ! त्यांच्या सामानाने मागचे पूर्ण सीट भरुन गेले होते ! पावसाळा संपल्यामुळे डॊंगर हिरवेगार होते,रस्ता सुरेख होता व वाहतुक बेताची होती त्यामुळे मजा येत होती. तरुणाईच्या सहवासाने मन अगदी हलके हलके झाले होते. तहान भुकेची मला तर आठवण नव्हती. बस थांबवली समोर दरीत ढग उतरुन आले होते,हवेत हवाहवासा गारवा होता. मुलामुलींनी लगोलग फोटो काढायला सुरुवात केली, मला मधे घेऊन फोटो सेशन झाले. कॅमेऱ्याशी माझी ओळख खूप उशीरा झाली ,मी कधी फोटो काढलेच नाहीत, मोबाईलच्या कॅमेऱ्यानेही मी फोटो काढु शकत नाही,आणि माझे फोटो कधी चांगले येत नाहीत त्यामुळे सगळी दृष्ये डोळ्यात साठवण्यावर माझा भर असतो !  पोटभर फोटॊ काढल्यावर आमचा पुढचा प्रवास सुरु झाला. नऊ वाजुन गेले होते, नाष्ट्यासाठी हॉटेल्सची शोधाशोध सुरु झाली. चांगलेसे हॉटेल पाहुन गाडी थांबवली, नाष्ता केला. पोटे भरल्याने पुढच्या प्रवासात उत्साह आणिकच वाढला. गाण्यांच्या भेंड्या सुरु झाल्या, मुलींना नवी,जुनी बरीच गाणी येत होतीच मात्र सौरभ आणि राहुलने गवळणी,भारुडे,भजने म्हणुन खुपच बहार आणली . दिवेआगरला कधी पोचलो ते समजलेच नाही

आम्ही हॉटेलवर गेलो तेंव्हा साडेबारा वाजले असतील.तिकडे सामान टाकुन दिवेआगरच्या गणपतीचे दर्शन घ्यायल गेलो, मी वीस वर्षांपूर्वी दिवेआगरला गेले होते, त्यावेळी देऊळ खुपच लहान होते,आता खुप मोठे मंदिर बांधलय. सोन्याची गणेश मुर्ती कडेकोट बंदोबस्तात आहे. दुपारचे एकचे उन बाहेर चटचटत होते,देवळात मात्र निरव शांतता व थंडगार वातावरण होते.दर्शन छान झाले. आमच्या हॉटेलमधे शाकाहारी जेवणाची व्यवस्था होती, मासे खाय़ला आमच्यातले काही दुसरीकडे गेले. माझ्यासोबत पाच सहा जण हॉटेलवर आले.अत्यंत रुचकर आणि घरगुती जेवण होते.गरम गरम तांदळाची भाकरी,रस्साभाजी, कोशिंबीर्, चटणी,पापड,आमटी भात आणि थंडगार सोलकढी.  मस्त जेवण झाले , पहाटे पासुन उठल्याने पोटभर जेवल्याने डोळे मिटु लागले. तास दोन तास झकास ताणुन दिली, पाचच्या सुमारास बीचवर निघालो. चालत दहा मिनिटांच्या अंतरावर बीच होता, तरी हॉटेलवाल्याकडून स्कुटर घेऊन सचिनने मला बीचवर सोडले, इथल्या बीचवर काळी वाळु आहे, बरेच स्टार फिश पाण्यातुन वाहुन किनाऱ्यावर येत होते. सजदा आयुष्यात पहिल्यांदाच समुद्र बघत होती ! तिच्या चेहऱ्यावरील आनंद,आश्चर्य बघायला मजा वाटत होती ! सगळे पाण्य़ात शिरले,मलाही यायचा आग्रह करत होते,पण शिंगे मोडुन वासरात जाणे मला बरे वाटेना . दुरुन त्या मुलांच्या आनंदाचा आस्वाद घेण्यात जास्त सुख होते. वय,संसार,जबाबदा़ऱ्या, नोकरीतली टेन्शन्स सगळे विसरुन पाण्याच्या लाटांवर स्वार होत धमाल करणाऱ्या त्या सगळ्य़ांना बघताना खरच खुप मजा येत होती. बघता बघता सूर्य मावळला ! क्षितीजावर थोडे ढग आल्याने तो केशरी गोळा पाण्यात बुडताना स्पष्ट नाही दिसला,पण पाण्यावर केशरी आभा पसरुन गेली. थोड्याच वेळात अंधाराचे साम्राज्य येऊ लागले  , ओहोटीची वेळ होती,पाणी मागेमागे जात होते .पाण्यात दुरवर गेलेल्या मुलांची मला थोडी काळजी वाटायला लागली !  पण हळुहळू सगळे माघारी आले.पाण्यात मनसोक्त खेळून सगळेच जाम थकले होते, चहा पिऊन रुमवर गेलो,सगळ्य़ांनी अंघोळी केल्या आणि अचानक बाहेर पाऊस कोसळु लागला ,विजा चमकल्या, दहा मिनिटांत वातावरण पार बदलले. तासभर पाऊस पडला आणि अचानक आला तसा थांबला देखील ! जेवायला आम्हाला जवळच्या एका खाणावळीत जायचे होते,पाऊस थांबल्याने आम्ही निवांत चालत पोचलो. अगदी उत्तम कोकणी जेवणाचा बेत होता,गरम गरम् मोदक,बिरड्याची उसळ, वाफाळता भात, आमटी. जेवण करुन पान खाऊन परत आलो. मुलांना माझ्याकडून गोष्टी ऐकायच्या होत्या ! मग आठवत होत्या त्या व्यंकटेश माडगुळकर, शंकर पाटील यांच्या कथांचे कथन केले. खुप मजा आली. भुताखेतांचे विषय झाले ,एक दीड वाजेपर्यंत गप्पा चालूच राहिल्या. सकाळी उठुन पुन्हा समुद्रावर जायचे असे ठरवुन झोपलो, पहाटे पुन्हा समुद्रावर गेलो. मी किनाऱ्यावर भरपुर हिंडले, माझ्याबरोबर राहुल थांबला. सगळे पुन्हा पाण्यात खेळले. परत माघारी येऊन ,अंघोळी उरकल्य़ा,नाष्ता करेतोवर साडेअकरा वाजुन गेले. संकष्टीचा दिवस होता, म्हणुन पुन्हा गणपतीचे दर्शन घेतले. देवळाच्या बाहेर कोकम,आगळ,पापड,मिरगुंड अशी किरकोळ खरेदी करुन निघायला बारा  वाजले. 

परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. जातानाचा उत्साह आता नव्हता, घरी जाऊन दुसऱ्या दिवशीची कामे,ऑफिस असे सगळेच डोळ्यासमोर दिसु लागले होते. पुण्य़ाजवळ संध्याकाळी आल्याने ट्रॅफिकचा हिसका सुरु झाला. मला सेनापती बापट रोड वर सातला सोडल्यावर राहुलला घरी पोचायला आठ वाजुन गेले !

  एक दिवसाच्या ट्रिपसाठी या मुलांनी केवढे प्लॅनिंग केले होते, बस ठरवणे,हॉटेल बुक करणे सगळे त्यांनी खुप छान केले. एक दिवसासाठी मुलींनी दोन दोन बॅगा आणल्या होत्या,पण त्यांनी कपडे बदलले,त्याला मॅचिंग दागिने,मेक अप ,चपला सगळे सगळे केले, असंख्य फोटो काढले (त्याची रिल्स, स्टोरीज बनवल्याच असतील ) एकुणात ट्रीपचा क्षण न क्षणी एन्जॉय केला . समरसुन कसे जगावे हे नव्या पिढीकडुन शिकायलाच हवे ! माझा एक दिवस या मुलांमुळे खुप छान गेला, या दिवसाच्या आठवणी माझ्या मनात कायम राहतील . माझ्या नोकरीची पस्तीस वर्षातील आनंदाचे क्षण आणि मुलांबरोबर ट्रीपचा एक दिवस यांमधे या सहलीचे पारडे जड असणार कारण त्यात या मुलांनी माझ्यावर केलेल्या मायेचे तुळशीपत्र आहे !


Monday, June 17, 2024

काशी यात्रा

   ’ काशीस जावे नित्य वदावे ’ प्रवासाची साधनांची सोय नसताना , पैशाची चणचण असण्याच्या काळात हे वाक्य प्रचलित होते. एकतर कशी विश्वनाथाचे  आणि गंगेच्या पवित्र प्रवाहात स्नान हि पुण्य गाठीशी जोडणे हि साध्ये होती आणि त्यासाठी आवश्यक वेळ, प्रकृती आणि पैसा यावा  म्हणून हि सकारात्मकता .

आता मनात आले कि जाणे फारसे कठीण राहिले नाही असे असूनही मला काशी बघायला वयाची साठी गाठावीच लागली ! सेवानिवृत्ती जवळ आली आणि शेवटचा LTC घ्यायला हवा असे सहकारी म्हणू लागले. आधीचे बरेच LTC बुडले होते, तेंव्हा अखेरचा तरी घे असे घरचे पण म्हणू लागले. जायचे कुठे हा प्रश्ण होताच, तेंव्हा नुकत्याच उद्घाटन झालेल्या आयोध्येतल्या राम मंदिराची आठवण झाली, मार्च महिना उन्हाळ्याचा असला तरी उत्तर प्रदेशात उन्हाचा तितकासा कडाका नसणार असे हवामान दाखवत होते. मंदिरात भाविकांची गर्दी असली तरी व्यवस्थापन उत्तम असल्याच्या बातम्या होत्या, म्हणून आयोध्या, प्रयागराज आणि काशी असे जायचे नक्की केले. बरोबर कोणी सखे ,सोयरे आले तर यात्रा आणि सहल अ्शी दुहेरी मजा येईल अशा विचाराने बऱ्याच जणांना विचारुन बघितले पण प्रत्येकाला काही ना काही अडचणी होत्या. कुणाला मार्च एंडींग, कुणाची आधीच दुसरीकडे ट्रिप ठरलेली .एकुणात रामरायाने आणि काशी विश्वेश्वराने आम्हा दोघांनाच बोलावले असे समाधान मानुन तायारीला लागलो.

हाताशी वेळ फारसा नव्हता कारण  ठरलेच उशीरा , त्यातुन रजा मंजूर झाल्याखेरीज पुढचे नियोजन करणे नाही हे मागच्या अनुभवातुन शिकले होते, जानेवारीत एका मैत्रिणीबरोबर कान्हा जंगलाची ट्रिप ठरवली , रजा भरलेली होती मात्र आयत्या वेळी दिल्लीत केंद्र सरकारी कर्मचारी संपावर जाणार म्ह्णून सगळ्य़ांच्याच रजा कॅन्सल केल्या , माझी ट्रीप ,पैसे सगळेच वाया गेले आणि खूप मनःस्ताप झाला. रजा मंजूर झाल्यावर शोधाशोधीला सुरुवात केली. ऑफिसच्या कामातुन डोके वर निघत नव्हते आणि घरी गेल्यावर थकुन गेल्यावर लॅपटॉप उघडायच्या आधी डोळे मिटत होते. नवऱ्याचे नेटवर्क उपयोगी आले. त्यांच्या दोन मित्रांकडून दोन ट्रॅव्हल एजंट समजले. त्यांनी ’मिशन आयोध्या’ मनावर घेऊन रितसर दोघांकडून कोटेशन्स वगैरे घेतली, किंमती पेक्षा वेळेवर देणाऱ्याला झुकते माप दिले. जाण्यायेण्याची तिकीटे सरकारी नियमाप्रमाणे काढायची असतात, आयत्या वेळी ठरवल्यामुळे  Advance मिळणार नव्हता. त्यामुळॆ तिकिटे काढुन झाली, अनिवार्य सरकारी नियम व अटी पाळून तिकिटे  काढताना ,वेळेची सुविधा वगैरेचा विचारही करता येत नाही, तस्मात जाण्या येण्याच्या वेळा अवेळीच होत्या. जाताना पुण्याहून पहाटे सव्वाचारची फ्लाईट होती. 


शुक्रवारचा दिवस सुट्टी घेतेलेली असून दिवसभर मिटिंग्ज मधे गेला. online मिटींग करता करता आवराआवरी चालू होती. रात्री लवकर जेवणे आटोपुन नऊ साडेनऊला झोपलो रात्री एकचा गजर लावला होता, झोप लागेपर्य़ंत उठायची वेळ झालीच होती. Uber App वरुन गाडी मागवली. गॅसवर चालणारी गाडी असल्याने सामान कसेबसे गाडीत बसवुन आम्ही गाडीत बसलो, गाडी अत्यंत जुनी, खडखड आवाज करणारी, एसी बंद ,ड्रायव्हर नवशिका . रस्त्यातल्या प्रत्येक खड्ड्य़ाची जाणीव देत प्रवास चालू झाला. प्रत्येक रोड डिव्हायडर वर गाडी तीन ताड उडे, आणि त्यावर ड्रायव्हरचे सॉरीचे गाणे यामुळे उरली सुरली झोप पार उडाली. गाडी येरवड्याला लागल्यावर जेल रोडला न जाता कल्याणी नगर जाऊ लागल्यावर नवऱ्याचा संयम संपला ! ड्रायव्हरवर आरडाओरडा त्याचा माफिनामा , प्रवासाची अशी सुरुवात कुठे घेऊन जाणार या शंकेने माझी कासाविशी , यातुन शेवटी एकदाचे विमानतळावर पोचलो.

वेब चेक -इन केलेले होते.तिकडे नव्यानेच फोटो वगैरे घेऊन पाठवत होते. दोन्ही सुटकेस चेक-इन करुन छोट्या हॅंडबॅग्स घेऊन सिक्युरिटी कडे कूच केले. रमेशकडच्या हॅंडबॅगेमधे स्विसचाकू निघाला, तो नेता येणार नाही असे पोलींसांनी सांगितले. त्या चाकुने लोणी देखील कापले जाईल का अशी शंका येत होती.पण त्यांनी तो फळे कापायला लागला तर असावा म्हणून घेतला असावा आणि घोकुनही तो चेक-इन मधे ठेवायचा राहिला होता. चाकू टाकुन जाणे त्यांना जिवावर आले होते. त्याच्या नाजुक रुपाची भुरळ मलाही पडली,पण चुक झालीय त्याची किंमत मोजा आणि सोडून जाऊया असे मी म्हणत होते, मात्र त्या चाकुच्या विरहाने पुढची सगळी ट्रीप दुःखद होणार हे मला दिसत होते. पोलीसांना बऱ्याच मिनतवाऱ्या केल्यावर ते म्हणाले, "चेक-इन बॅगेत नेऊन ठेवा". सुदैवाने बराच वेळ हाताशी होता. रमेश पुन्हा चाकु घेऊन चेक-इन काऊंटर कडे धावले. मी खुर्चीवर सामान सांभाळत बसले.पंधरा वीस मिनिंटांनी विजयी मुद्रेने ते परत आले. आमच्या बॅग्स केंव्हाच पट्ट्य़ावरुन गेल्या होत्या, पण एका सद्गृहस्थांनी रमेशच्या विनंतीला मान देऊन स्वत्ःच्या बॅगेत तो मौल्यवान चाकु ठेऊन घेतला.लखनौच्या विमानतळावर त्यांनी त्यांच्या बॅगेतुन काढुन आम्हाला सुपुर्द केला.त्या नंतर घरी येईपर्यंत त्याचे दर्शन घ्यावे लागले नाही .

लखनौ ला पोचलो तेंव्हा सहा वाजायला आले होते, सामान ताब्यात घेऊन बाहेर पडलो. लखनौ पासुन एक टॅक्सी बुक केलेली होती .ड्रायव्हर आलेला होता. गाडीतुन जाताना त्याने त्याच्या तिथल्या साथिदाराला फोन केला व त्या माणसाने गुगल मॅप्सचे काम चोख बजावत आम्हाला हॉटेलसमोर उभे केले.हॉटेल अगदी गावाच्या मध्यातच,आपल्याकडील मंडईत असावे तसे. त्यात त्यामधे नूतनीकरणाचे काम चालू होते. एकूण हॉटेल यथातथाच होते. आम्ही अंघोळ आदि आन्हिने उरकुन नाष्ता केला आणि लखनौ दर्शनासाठी बाहेर पडलो. ब्रिटिश रेसिडन्सी हे आमचे पहिले स्थान होते. आमच्या ड्रायव्हरचा साथिदार गाईड म्हणुन आमच्या दिमतीला होता.  १८५७ च्या उठावातील एक म्युझियम होते आणि त्या काळातील इमारती बघताना नवल वाटले, वाळू,सिमेंट असे साहित्य न वापरता माती,चुना,चणाडाळीचे पीठ,गुळ असे साहित्य वापरुन केलेल्या दणकट इमारती , संसाधनांइतकीच कामाबद्दलच्या निष्ठा इमारती मजबुत करत असतील का असे वाटत राहिले. १८५७ च्या उठावात झालेल्या हल्ल्यातील बंदुकांच्या निशाण्या मिरवत असलेल्या इमारती ,त्यावेळी बलिदान केलेल्या देशप्रेमींची आठवण जागवत होत्या. ब्रिटीश रेसिडन्सीचे आवार भरपुर झाडीने व स्वच्छ परिसराने सुंदर वाट्ते. रुमी गेट हे नबाब कालीन लखनौचे प्रवेशद्वार आता फोटो पुरतेच राहिले आहे. द्वार सुरेख आहे पण आता तेच प्रवेशद्वार राहिलेले नाही


बडा इमामबाडा अर्थात भुलभुलैय्या हे दुसरे प्रेक्षणीय स्थान होते.नाबाला साजेशीच अतीशय भव्य व देखणी वास्तु.आत ठराविक गाईड कडूनच माहिती घेणॆ बंधनकारक होते. जास्तीतजास्त लोकांचा समुह मिळवणे हे गाईडचे ध्येय आणि आपल्याला सगळे नीट समजावे म्हणून ग्रुप लहान असावा हि पर्यटकांची इच्छा , यामधुन मार्ग निघाला आणि एका गाईड्ने आमचा ताबा घेतला. (नबांबांची नामावळी मी विसरले वयाचा परीणाम आणि ते तपशील सांगायला गुगल समर्थ आहेच ). मध्ये एकही खांब नसलेला,अशीयातील सर्वात मोठा दिवाणखाना या महालात आहे असे गाईड सांगत होता. गालीचे व झुंबरे असताना त्याचे रुप किती देखणॆ असेल याची कल्पना येत होती, आजही झुंबरे आहेत पण गालीचे दयनीय झालेत. भुलभुलैय्या मात्र कमाल वास्तुरचना आहे. एका जिन्यातुन वर गेल्यावर चार चार रस्ते दिसतात आणि त्यातला एकच योग्य ठिकाणी नेतो. बाहेर कडक उन असूनही आत  गारवा होता. सिमेंट ,वाळू न वापरता केलेल्या बांधकामाची ती कमाल होती.गच्ची वरुन लखनौ शहराचे दर्शन घडते.या महालाचा आर्किटेक्ट इराणी इसम होता , त्याने नबाबाला माझी कबर तुमच्या कबरीशेजारी असावी एवढीच मागणी केली. मला रायगडाचे बांधकाम करणारे हिरोजी इंदुलकर आठवले.त्यांनी देखील आपल्या नावाची एक पायरी असावी एवढीच मागणी शिवाजी महाराजांना केली होती. ’मरावे परी कीर्ति रुपे उरावे’ एवढी अपेक्षा बाळगणारे हे गुणी व इमानी सेवक ! मनोमन त्यांचे वंदन

बडा इमामबाडा जवळ एक पायऱ्यांची विहिर ही फार सुंदर आहे. वरच्या मजल्यावरुन महालाच्या बाहेरच्या रस्त्यावरील प्रत्येक वस्तु, व्यक्तीचे पाण्यात प्रतिबिंब दिसते आणि रस्त्यावरुन आतील काही दिसत नाही. कॅमेरे वगैरे काही नसतानाच्या काळात सुरक्षितेसाठी केलेला शास्त्रीय नियमांचा वापर फार आवडला.


सगळे बघुन बाहेर आलो तोवर आडीच वाजले असावेत. छोटा इमामबाडा, हुसैन क्लॉक,सतखंडा गाडीतुन बघितले आणि पोटपुजेसाठी निघालो,आम्ही शाकाहारी असल्याने लखनौच्या स्वादिष्ट मांसाहारी खाण्य़ाचा मजा घेणॆ शक्य नसले तरी तेथील चटपटे चाट चे options खाण्यासाठी आमच्या गाईडने योग्य ठिकाणी आम्हाला नेले. तेथे बास्केट चाट आणि लस्सी पिऊन दिल खुष झाला ! नंतर थोडीफार खरेदी करुन हॉटेलवर गेलो. थोडावेळ आराम करुन संध्याकाळी गोमती रिव्हर फ्रंट बघायला बाहेर पडलो. आमच्या गाईडला त्याच दिवशी बाबासाहेब आंबेडकर गार्ड्न, यु.पी दर्शन वगैरे राहिलेली प्रेक्षणीय स्थळे बघावी असे वाटत होते,त्याला दुसऱ्या दिवशी जमणार नव्हते म्हणून त्याला सगळे काम त्याच दिवशी संपवायचे होते. पण आदल्या रात्रीचे जागरण आणि सकाळचे चालणे याने मी दमले होते, शिवाय दुसरा दिवस आमच्या हातात होता. तेंव्हा गोमती रिव्हर फ्रंट बघुन परतायचे ठरवले. जाताना उत्तर प्रदेशाची नवी विधानसभा इमारत बघितली. हा लखनौ चा भाग एकदम स्वच्छ ,सुंदर आहे. गोमती रिव्हर फ्रंट , साबरमती नदीच्या धर्तीवर केले आहे. दहा रु.तिकीट काढल्यावर  आमचा गाईड म्हणू लागला,’आज लाईट्स नाहीत, जायचे की नको कारण बऱ्याच पायऱ्या उतरायच्या होत्या आणि मी बाकीच्या ठिकाणी जायला नको म्हणाले होते. पण आम्ही उतरलो, लेझर लाईटस मुळे खूप छान दिसते असे गाईड सांगत होता.मात्र चालायला रस्ता छान होता, फुलांचे ताटवे, हिरवळ, बसायला बाक सगळे सुरेख होते,नदीला पाणी पण बरेच होते. आपल्या मुळा,मुठा नद्यांच्या तुलनेत छानच होते सगळे. तेथे चना जोर गरम विकणाऱ्या दोघांनी आधीच्या मुख्यमंत्र्याच्या कारकीर्दीत कसे रोज लाईट्स असत आता कसे सगळे वाईट आहे इइ. सांगु लागले, आमचा गाईड ’योगी भक्त’असल्याने तो चिडला,तेथेच दोघांमधे भांडणे सुरु झाली. आम्ही आमच्या गाईडला निघायला लवले. पायऱ्या चढुन आल्यावर रमेशने तिकीट विक्रेत्याचे लाईट्स नसताना पैसे घेणे कसे चुकीचे आहे यावर बौध्दिक घ्यायला सुरुवात केले. तो हि ," हे बघा आता दुरुस्तीला हि माणासे आली आहेत, होईलच दुरुस्ती एवढ्यात वगैरे सांगायला लागला" त्या सगळ्या थापाच होत्या, कारण दुसऱ्या दिवशी आम्ही संध्याकाळी तिकडून गेलो तरी तिकडे अंधारच होता !

दुसऱ्या दिवशी लखनौ विद्यापीठ बघितले रविवार असल्याने सगळ्या इमारतीत सामसूम होती आणि सगळे बंद होते, रॅंग्लर परांजपे या विद्यापीठात कुलगुरु होते त्याबद्दलच्या शकुंतलाबाई परांजप्यांनी आठवणी वाचल्यामुळे मला ती वास्तु बघण्याची उत्सुकता होती. मक्खन मलाई हि लखनौची खासियत असल्याचे लेकीने सांगितले होते , हा पदार्थ एकदम गावात मिळतो, आपल्याकडच्या बोहरी आळी सारख्या गजबजाट व लहान लहान गल्लीतुन जायला आमचा टॅक्सीवाला कुरकुरत होता पण आम्ही त्याला न्यायलाच लावले, रस्त्यावरच जागोजागी मक्खन मलाई च्या गाड्या होत्या. दोन गाड्यांवर आम्ही मक्खन मलई घेऊन खाल्ली, खरोखरीच तोंडात विरघळणारा हा पदार्थ लाज़वाब असतो. उन्हाची काहिली विसरवणारी आणि जीव थंडावणारी मलाई ! त्या दिवशी संध्याकाळी आम्ही बाबासाहेब आंबेडकर उद्यान आणि यु.पी.दर्शन अशी दोन ठिकाणे बघितली. यु.पी दर्शन हि नुकतीच उद्घाटन झालेली वास्तु आहे. भरपूर मोठ्या जागेत उत्तर प्रदेशातील प्रेक्षणीय स्थळांची मॉडेल्स केलेली आहेत. झांसी पासून, ताजमहाल, आयोध्या,मथुरा ,काशीविश्वेश्वर अशी अनेक स्थळांची माहिती व सुबक अशा प्र्तीकॄती केलेल्या आहेत. मला आवडले ,बरीच लहान मुले आलेली होती, आपल्या राज्यात काय काय बघण्यासारखे आहे याची माहिती त्यांना लहान वयात होणे किती चांगले. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ही प्रचंड मोठ्या जागेवर उभारलेली वास्तु आहे.ग्रानाईट मुळे अतिशय स्वच्छ आणि चकचकित ! संध्याकाळच्या थंड हवेत बरे वाटात होते,मात्र दुपारच्या उन्हात चांगलेच तापत असणार. मयसभेची आठवण व्हावी अशा रचनेत फार जपून पाय टाकावे लागत होते कारण गुळगुळीत फरशीवरुन पाय घसरायची भिती ! बाबासाहेब आंबेडकर यांचा एक पुतळा आहे,मात्र मायावतींचे चार चार पुतळे आहेत. सत्ता हातात असताना काय काय करता येते हे पाहुन मन थक्क झाले खरोखरी ! दक्षिणेत जयललिता चे मंदिर आणि इकडे मायावतींचे पुतळे !आसेतुहिमाचल व्यक्तिपुजा .


सोमवारी पहाटे लवकर उठुन आम्ही आयोध्येला जायला निघालो. रस्ता सुंदर असल्याने दहा,साडेदहा वाजता आयोध्येजवळ पोचलो देखील. वेशीजवळच कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. सगळ्या खाजगी गाड्या एका ठराविक ठिकाणी पार्किंगमधे ठेवाव्या लागतात, तेथुन इ-रिक्शा करुन गावात जावे लागते. तेथुन बरिच घासाघिस करुन एक रिक्शा मिळवली आणि हॉटेलवाल्याला फोन करुन रिक्षावाल्याला पत्ता समजावला. आमचा ड्रायव्हर आता आम्हाला दुसऱ्या दिवशीच भेटणार होता. हायवेवर दुतर्फा रामायणातील प्रसंग सुंदर चित्रित केलेले आहेत.मात्र गावात अजुन सुधारणा चालू आहेत, ’सरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी ’ आठवताना ,लहान,लहान गल्ल्या ,उघडी गटारे मनाला यातना करत होती. लहान गल्लीतून हॉटेलपाशी पोचलो, सामान ठेऊन फ्रेश होई पर्यंत बारा वाजायला आले होते. राममंदिराकडे जायला निघालो. कोपऱ्यावर रिक्षा उभ्या होत्या, त्यातल्या एकाला विचारले तो म्हणाला,’ तुम्हाला चालतच जावे लागेल,गर्दी आहे, रिक्षा जाऊ शकत नाही’ आम्ही चालायला सुरुवात केली. पन्नास मीटर गेल्यावर मुख्य रस्ता लागला. भक्तांचे लोंढेच्या लोंढे रस्त्यावरुन चालले होते, आम्ही गर्दीतुन जाऊ लागलो, वाटेत हनुमान गढी लागली, तेथे प्रचंड गर्दी होती, आधी रामारायाचेच दर्शन घ्यायचे असे ठरवुन पुढे निघालो. मोबाईल वगैरे सामान ठेवायला लॉकर्स होते,तेथे एका पर्समधे दोन्ही मोबाईल्स ठेऊन टोकन घेतले, चपल बूट ठेवायला हि चांगली व्यवस्था होती, तेथे पादत्राणे ठेऊन पुढे गेलो. सिक्युरिटी मधुन बाहेर आलो. मंदिर आता दिसू लागले होते.एकावेळी चार रांगातुन भक्तांना सोडले जात होते.कुठेही धक्काबुक्की नव्हती,पोलीस होते, त्यांना लाठी वा कठोर वाणीचा वापर करावा लाघत नव्हती. आम्हीआत सभामंडपातुन पुढे,पुढे जात होती.आणि अचानक प्रसाद आणि आरतीची वेळ झाली म्हणून रामलल्लांना पडाद्याआड केले.आम्हाला आत शांत थांबा असे पोलीस सांगत होते.बऱ्याच जणांनी खाली बसून घेतले. एका स्त्री-पोलिसने मला स्वतःची खुर्ची बसायला दिली.शांतपणे देवळचे कोरीवकाम बघायला मिळत होते,मी मनातल्या मनात रामरायाचे आभार मानत होते. एरवी इतका वेळ मंदिरात थांबायचे ठरवले असते तरी शक्यच नव्हते. पंधरा -वीस मिनिटांनी पडदा दूर झाला आणि २१ जानेवारीला टि.व्ही वर बघितलेली रामलल्लाच्या मूर्तीचे दर्शन झाले.रांगेतून पुढे जाताना नजर त्या मूर्तीवरच खिळून होती !.समोर जेमेतेम २-३ मिनिटेच थांबता आले.पण तेवढ्या दर्शनानेही मन भरुन गेले होते ! मंदिरातुन बाहेर आलो, प्रसाद घेतला आणि देणगी द्यायला काऊंटर वर गेलो. तेथे रमेशच्या कॉलेजचे माजी विद्यार्थी श्री.आफळे यांच्या पत्नी भेटल्या , त्यांनी श्री आफळ्यांना फोन करुन बोलावले. त्यांच्याकडून हे दांपत्य गेले चार वर्षे आयोध्येत असल्याचे समजले. श्री.आफळे हे मंदिर निर्माण कार्यातील प्रमुख व्यक्ती ! एवढे मोठे काम करणारी व्यक्ती भेटणार आणि ते पुणेकर असल्याचे समजल्यावर फार अभिमान वाटला. दहा पंधरा मिनिटांत आफळे साहेब आले. ते खुपच बिझी असतात, अजून अकरा इमारती, रस्ते,पाणी वगैरे बरीच कामे राहिली आहेत,मंदिराची रचना करताना कोणत्या बाबींचा विचार केला. रांगामधे जास्तवेळ उभे रहावे लागू नये याकरीता विज्ञानाचा वापर केलेला होता. दररोज १ ते दिड लाख भाविक येतात तरिही कोणालाच फार काळ रांगेत तिष्ठावे लागत नाही याचा अनुभव आम्ही पण घेतला होता.’मंदिरातील मूर्ती थोडी उंचावर आहे, पांढऱ्या संगमरवरी पार्श्वभागावर काळी मुर्ती व भरपूर उजेड यामुळे सभामंड्पात शिरल्यापासुन मूर्ती दिसत राहते त्यामुळे मूर्तीजवळ जास्त वेळ थांबता आले तरी भक्तांचा हिरमोड होत नाही.’ आफळे सर सांगत होते. मंदिराच्या बांधकाम करण्यापूर्वी त्यांनी अनेक देवस्थानांचा अभ्यास कसा किती केला,त्यांतील लोकांचे रांगामधे जास्त वेळ थांबणे त्यामागची कारणे याचा बारकाईने विचार व अभ्यास करुन या मंदिराची रचना केली आहे. आयोध्येचे मंदिर व्हावे याकरीता १९९० व १९९२  कारसेवकांनी कि्ती हालआपेष्टा सोसल्या, किती जणांना प्राणांचे मोलही द्यावे लागले याच्या बातम्या अप्रसिध्द असल्या तरी त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही हे बघुन मन अधिकच भरुन आले ! . आफळे साहेबांना बरीच कामे असूनही त्यांनी आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला आणि थोडक्या वेळात बरीच महिती दिली. दिवस अगदी सार्थकी लागला ! 

 मोबाईल ताब्यात घेतले,पादत्राणेही घेतली ,दोन वाजुन गेले होते. ऊन बरेच होते , तरी रस्ते माणसांनी फुलुन गेलेले होते. हॉटेल्स मध्येही तोबा गर्दी. एका लहान हॉटेलमधे कचोरी,सामोसा खाऊन पोट्पुजा केली आणि इतर देवळे बघायला निघालो. दशरथ महाल,कनक महाल हि पूर्वीची मंदिरे आहेत.दक्षिणेतील मंदिरांसारखे इकडे मंदिराच्या बाहेर कोरीवकाम वगैरे नव्हते. संध्याकाळी सरयू नदीची आरती बघायला इ-रीक्षा करुन निघालो,एक बंगाली जोडपे आम्हाला भेटले. त्यांची मुलगी पेंटींग्ज व चित्रे काढायला गेले अनेक महिने आयोध्येत आहे. तिला भेटायला व राम मंदिर बघायला ते उभयता आले होते. जाताना वाटॆत अनेक लहान मोठी देवळॆ दिसत होती. रस्ते,खूपच लहान, उघडी गटारे, असंख्य माकडे ,एकुण सुधारणेला खुपच वाव आहे.  नदीपाशी रिक्षातुन उतरलो.सूर्यास्ताला व आरतीला अवकाश होता, म्हणून नदीतून बोटीतुन चक्कर मारायचे ठरविले. बोटीत बसायला ग्रुप असेल तर अडाचण नसते, दोघांसाठी ते पूर्ण बॊटीचे भाडे मागतात व तेथील कोणाबरोबर आपल्याला शेअर करु देत नाहीत ! मात्र सुदैवाने आम्हाला एक पंजाबी कुटुंब भेटले ते चौघे होते व आम्ही सहा जणांनी एक बोट केली. नदीचे पात्र विशाल आहे आणि मार्च महिना असून पाणी पुष्कळ होते.पाणी स्वच्छ ही होते, प्लॅस्टीक, फुले असा कचरा नव्हता. पश्चिमेचा थंड वारा ,मावळता दिनमणी त्याच्या लाल प्रतिबिंबाने नदीच्या पाण्याला आलेलीआभा अत्यंत आल्हाददायक वाटत होते. दूरवर नदीवर बांधलेले अधुनिक पूल आयोध्येच्या कायापालटाची साक्ष देत होते. अर्धा पाऊण तास फिरुन येईपर्यंत  नदीच्या घाटावर आरतीसाठी गर्दी होऊ लागली होती.जागा पकडली , आरती सुरु झाली. गंगा नदीची आरती ह्र्षीकेशला बघितली होती. नदीला देवता मानुन तिची आरती करायची हि कल्पना खूप सुंदर आहे. कॄतज्ञता हा आपल्या संस्कॄतीचा गाभा आहे, मात्र आता आपल्याकडे या साऱ्या गोष्टी कर्मकांडासारख्या होतात.नदीचे पावित्र्य आपण ठेवत नाही, कपडे धुणे,अंघोळी या किरकोळ गोष्टी , नदीत मैल्याच्या पाण्य़ापासून कारखान्यातील विषारी द्रव्ये सोडण्यापर्यंत आपली मजल गेलीयं. मनात असे विचार चालू होते. आरती संपली नदीला वंदन करुन निघालॊ. वरच्या बाजुला अतिशय देखणा लेझर शो चालू झालेला होता. पाण्यामधे नाना रंगाची उधळण चालू होती आणि त्या पार्श्वभूमीवर मोठ्या पडद्यावर रामायण चालू होते. जरावेळ तेथे थांबलो पण दिवसभराच्या दगदगीने शरीर दमल्याची जाणीव हॊऊ लागली होती. रीक्षा करुन माघारी निघालॊ ,हॉटेलवर पोचायला आठ साठेआठ वाजुन गेले. जेवण करुन झोपलो.दुसऱ्या दिवशी आम्हाला प्रयागराजला निघायचे होते.


आयोध्या ते प्रयागराज अंतर १६० कि.मी च्या आसपास आहे, रस्ता लहान असल्यामुळे तीन तासाहुन जास्त वेळ लागला, हॉटेलवर पोचेपर्यंत अकरा वाजुन गेले होते. सामान रुमवर ठेउन बाहेर पडलो. नेहरु कुटुंबाचा  ’आनंदवन” बंगला बघायला गेलो. प्रचंड मोठ्या आवारात प्रासादवत वास्तु पाहताक्षणी मनात भरते. भरपूर झाडी, सुंदर हिरवळ आणि गुलाब व विलायती फुलांचे ताटवे,फारच सुंदर. तिकीट व पोलिस पहाऱ्याने वास्तुचे सौंदर्य व स्वच्छता टिकलीय. मोतीलाल नेहरुंपासुन ,इंदिरा गांधींपर्यंत सर्वांच्या वस्तु,पुस्तके जतन केलेली आहेत.इंदिरा गांधीचे बालपाणापासून, तारुण्यातील,राजीव,संजय या मुलांचे बालपणातील, इंदिरा गांधींचे पंतप्रधान पदाच्या कारकीर्दीतील महत्त्वाच्या प्रसंगांचे,विविध ठिकाणी भाषणे देतानाचे असंख्य फोटॊ आहेत.बघताना कसा वेळ गेला समजले नाही ! 

तिकडुन खुस्रो बाग बघायला गेलो. शहाजहानच्या या मोठ्या भावाला त्याने कपटाने मारले, त्याची ,त्याच्या बेगमची व त्याच्य़ा बहिणीची कबर  असलेली हि प्रचंड मोठी बाग आहे. तेथे सरकारने सध्या शेकडो आंब्याची व लिचीची झाडॆ लावली आहेत. कुस्त्रो बाग हि १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यात मोठे लष्करी ठाणे असल्याची पाटी वाचली आणि त्या वास्तुबद्दल  आदर निर्माण झाला !.

दुपारचे उन चटचटत होते , त्रिवेणी संगमावर पोचलो. बऱ्याच बोटी होत्या , बोटवाले मनाला येईल तेवढे पैसे मागत होते,आठ दहा जणांच्या ग्रुपला ३०००रु द्यायला जड वाटत नाही,पण आम्ही दोघेच होतो आणि कोणाबरोबर एकत्र बोट कराय़ची तर बोटवाले तसे करु देत नव्हते, आमचा ड्रायव्हर , तुम्ही पैसे देऊन टाका म्हणत होता,पण आम्हाला दोघांनाही या साऱ्या अरेरावीचा फार राग आला, मी तर तेथुनच नदीला नमस्कार करुन माघारी निघाले,तेंव्हा एक बोटवाला आला व म्हणाला,"तुम्ही किती पैसे देणार?" ,मी म्हणाले," दहा जणांच्या ग्रुपला तुम्ही ३०००रु घेता, मी माणशी ३०० रु देते, तुम्ही अजुन आठ लोकांना घ्या,माझी हरकत नाही" तो आम्हा दोघांना ६०० रु.घेऊन जायला तयार झाला. त्याने ठेकेदार कसे त्रास देतात वगैरे सांगायला सुरुवात केली , म्हणजे एवढया पैशातले त्या बोट चालवणाऱ्यांना कमीच मिळतात आणि ठेकेदार माजतात. उन्हाळा सुरु झालातरी पाणी बरेच होते, आम्ही यमुना नदीपाशी बोटीत बसलो होतो, पुढे गेल्यावर गंगेचा प्रवाह नावाड्य़ाने दाखवला.सरस्वती गुप्त आहे. आम्हाला संगामात स्नान करायचे नव्हते त्यामुळे बोटीतुन फिरुन आलो आणि चंद्र्शेखर बाग, भारद्वाज बाग बघुन रुमवर पोचलो.

प्रयागराज अर्थात अलाहाबाद शहर मला आवडले.वाहने कमी असल्यामुळे असेल पण रस्ते मोठे वाटले आणि भरपूर झाडी, बागा यामुळे शहराला एक प्रकारचा घरंदाज बाज आहे. त्रिवेणी संगमाच्या किनारीअसल्याने पाण्याचे सौख्यही आहेच. कुंभमेळ्याच्या वेळी येणाऱ्या सांधुंच्या वास्तव्याने शहर पुनित होत असेल. 

दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे आम्ही चित्रकुटला निघालॊ. चित्रकूट पर्वतावर व त्या परिसरात राम,लक्ष्मण,सीता दहा वर्षे राहिल्याचे वाचले असल्याने तिकडे फार उत्सुकतेने व आवडीने मी गेले, मात्र माझा भ्रमनिरास झाला !

चित्रकुट हे शहर उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशाच्या सीमारेषेवर आहे.कदाचित मध्यप्रदेशाकडील भाग निसर्गरम्य असेल,कदाचित आम्ही गेलो तोवर उन्हाळ्यास सुरुवात झाली होती ,पण एकंदरीत घनदाट झाडी वगैरे काहीच नव्हते,पर्वत म्हणावे असे डोंगर नव्हते. मंदाकिनी नदीचे पात्रही बेताचेच, दोन्ही तीरावर मोठमोठे घाट आणि पलिकडच्या घाटावर मंदिरे, त्या तीरावर जायला बोटी आणि बॊटीतुन जायचे तर त्यांनी मुहमांगा दाम मागायचा आणि आपण आडल्या हरी सारखे त्यांची मनमानी सोसत ते द्यायचे. पलीकडच्या तीरावर ,भरत रामाला जेथे भेटला व त्यांच्या पादुक नेल्या ती जागा व तेथे देऊळ आहे, तुलसीदासाला रामाने याच ठिकाणी दर्शन दिले ते हि मंदिर आहे, सीतेचे मंदिर, रामाने वडीलांचे श्राध्द केले ती जागा अशा अनेक जागा त्या नावाड्याने उत्साहाने दाखवल्या. पण नदीचे अस्वच्छ पात्र, त्यात अंघोळी करणारे, प्लॅस्टीकसकट सगळा कचरा त्यात टाकणारे भाविक बघुन मन उद्विग्न झाले !  स्फटिकशीला ,अरुंधती आश्रम, श्रीराम व सीता कुंड अशी अनेक स्थळे बघितली, सगळीकडे भरपूर गर्दी होती . गुप्त गोदावरी व श्रीराम व सीता कुंड हा वास्तविक निसर्गाचा चमत्कार आहे. बऱ्याच पायऱ्या चढुन गेल्यावर , एका अगदी लहान दारातुन एकावेळी एक माणुस उतरु शकेल एवढ्या लहान जागेतुन आठदहा पायऱ्या उतरले कि आत गुहा होती, आत सीता कुंड आहे.रामकुंडासाठी पण असेच खोल जावे लागते आणि आत दोन्ही बाजुनी डोंगराच्या कपारी व मधे नदिचा प्रवाह, खुप छान आहे,पण गर्दी,धक्काबुक्कीने व मातीच्या पायांनी पाणी घाण झाल्याने सौंदर्य जाणवत नव्हते हे खरे. 

                  प्रयागराजला पोचायला रात्रीचे आठ वाजले. खूप उन लागल्याने खुप दमल्यासारखे वाटत होते. भुकही गेली होती. गरम पाण्याने अंघोळ करुन मी झोपुन गेले. पहाटे उठल्यावर ताजेतवाने वाटु लागले. सकाळी नाश्ता करुन काशीला जायला निघालो. सुरुवातीचा रस्त्याचे काम चाललेले होते, पण नंतर एकदम चारपदरी सुंदर रस्ता आहे. सारनाथला पोचलो तेंव्हा अकरा वाजले होते, सुदैवाने आकाश ढगाळ होते. ड्रायव्हरला घरी जायचे होते, तो म्हणू लागला ,’तुम्ही आता आराम करा, उद्या सारनाथ बघा’ आम्हाला दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंतच वेळ होता, त्यामुळे सारनाथ बघुनच आम्ही हॉटेलवर जायचे ठरवले. एक चांगला गाईड मिळाला, त्याने खुप छान माहिती दिली. थायलंड सरकारच्या सहाय्याने बनवलेली प्रचंड उंच बुध्दाची मूर्ती , मंदिर सगळे खुप सुंदर आहे.परीसरही खुप सुंदर आणि शांत आहे.  भारताची राजमुद्रा असलेल्या चार सिंहाची मूर्ती बघायची खुप उत्सुकता होती , शिवाय सारनाथच्या स्तुपाबद्दलही बरेच ऐकुन होते. ते सारे दुसऱ्या भागात आहे. पुरातत्व विभागाला उत्खननात मिळालेल्या वस्तुंचे देखणे संग्रहालय अवघ्या दहा रुपये तिकिटात बघता येते. तेथेच  सुप्रसिध्द चार सिंहाची राजमुद्रा आहे. उत्खनानात मिळालेल्या अनेक मूर्ती, मंदिराचे अवशेष भग्न स्वरुपात आहेत.आपल्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या वस्तु बघताना मला मात्र ’मातीची दर्पोक्ती’ आठवत होती  !  

  पाहून हासु ये तुमचे ताजमहाल

अन् गर्व किती तो ! काल काय जिंकाल ?

शेकडो ताजही जिथे शोभले काल

ती प्रचंड नगरे आज आमुच्या पोटी

मातीवर चढणे एक नवा थर अंती !

          सारनाथचा स्तुप हि मात्र एक अत्यंत विशाल आणि भव्य वास्तु आहे ! त्याला प्रदक्षिणा घालुन आम्ही बाहेर आलो. एव्हाना आडीच वाजले होते, आमचे हॉटेल सारनाथ जवळच होते.रुमवर गेलो आणि संध्याकाळी गंगेची आरती बघायला जाऊ या असे सांगुन ड्रायव्हर गेला.आम्हाला भुक नव्हती , फळे खाल्ली जरावेळ आराम केला पाच वाजता गंगेच्या आरतीसाठी निघालो. अंतर फारतर १० किमी असेल पण आठ किमी. जायला तास लागला. रस्त्यात  खचाखच गर्दी होती.  घाटापसून दोन किमी लांब पार्कींग आहे, ड्रायव्हर च्या मागुन चालताना माझी दमछाक झाली , त्या पठ्ठ्याकडे मोबाईल नव्हता त्यामुळे गर्दीत चुकामुक परवडारी नव्हती. साडॆसहाला आरती सुरु होते आम्ही जेमेतेम पोचलो, नदीत बोटींची खेचाखेच होती . एकाबोटीत आम्ही चढलो, ड्रायव्हरचे बोटवाल्याशी बोलणे झाले होते. बोट निघाली आणि त्या अनेक बोटींच्या गर्दीत त्या नावाड्याने आमची बोट घुसवुन एका ठिकाणी थांबवली . हृषिकेशला आम्ही  गंगेची आरती २०१६ मधे पाहिली होती , तिकडचे वातावरण जास्त आवडले.इथे असलेल्या गर्दीने प्रसन्नता जाणवत नाही. नदीचे पात्र विशाल आहे. तीरावरील घाट दिव्यांनी उजळले होते. पाच ठिकाणी पुरोहित उभे राहुन आरती करत होते . आरती झाल्यावर नावाड्याने  नावेतुन आम्हाला गंगेवरील घाट दाखवले. तुलसी घाट, सिंदिया घाट, मनकर्णिका घाट असे अनेक घाट ! तुलनेने हे घाट आता खूप स्वच्छ आहेत . एक तास कसा गेला समजलेच नाही. काठावर येऊन परत गाडीपर्यंत पोचताना पुन्हा तीच जिकिर,तीच धडपड ! हॉटेलवर पोचायला नऊ वाजुन गेले होते, पोटात भुकेने रान कडाडले होते, जाताना आम्ही जेवायला येणार असे सांगुन ठेवले होते.पण हॉटेलच्या डायनिंगहॉलची सफाई चालली होती आणि तिथल्या खानसाम्यांना आमच्या जेवणाबद्दल काहीच कल्पना नव्हती हॉटेलमधे आमच्याखेरीज कोणीच गेस्ट नव्हते त्यामुळे ते निवांत होते, त्यांनी शांतपणे ऑर्डर घेतल्यावर बनवुन देतो असं म्हटल्यावर रमेशचा पारा चढला, त्यांनी आवाज चढवला, मॅनेजर आला , त्याचाही तोल सुटला. मी हताश पणे बसुन होते, पण खानसामा शहाणा निघाला, तो तेथुन निघाला आणि अक्षरशः दहा पंधरा मिनिटात , दोन भाज्या, दाल आणि दोन गरम गरम फुलके बनवुन घेऊन आला . दुसऱ्या वेटरने चटचट वाढले. आम्ही जेवायला सुरुवात केली. ताजे गरम अन्आणि पोटात भुक ! अन्न हे पूर्णब्रह्म का म्हणतात ते कळलं.  चार गरम घास पोटात गेल्यावर रमेशचा राग थंड झाला. वेटर त्यांच्यांशी बोलत राहिला आणि दुसरा एक जण गरम फुलके आणत होता ! दोन फुलके खाल्ल्यावर मी भात मागितला, तो ही आलाच पाच मिनिटात, जिरा राईस आणि दाल फ्राय  खुप चविष्ट होते. त्या बरोबरच मलईदार दही पण होते . जेवुन आम्ही त्या अन्नदात्यांना सुखीभव म्हणून रुमवर गेलो. आम्हाला दुसऱ्या दिवशी पहाटे पाचला निघायचे होते. सहा वाजता  काशी विश्वनाथाचे दर्शन घ्यायचे होते. 

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असे काशी हे तिर्थक्षेत्र . सर्वात पुरातन शहर आणि बनारस, वाराणासी आणि काशी अशी तीन बिरुदे लाभलेले कदाचित एकमेव ! काशी हे सर्वात प्राचीन नाव आहे, संस्कृत धातु ’कास’ म्हणजे चमकणे , त्या मुळेच विश्वनाथाला काशी विश्वनाथ, तेजस्वी विश्वनाथ असे म्हणत असावेत .  वाराणासी हे नाव गंगॆच्या वरुणा आणि आसि यांच्या संगमावर हे शहर असल्याने त्याचे नाव वाराणासी पडले. इथे गौतम बुध्दाला ज्ञानप्राप्ती होऊन सारनाथ येथे त्यांनी आपले पहिले प्रवचन दिले.बनारस नावाची व्युत्पत्ती मात्र समजु शकली नाही ! 

पहाटे पाच वाजता अंघोळी आटोपुन आम्ही निघलो, आम्हाला VIP दर्शन घडवायची हमी आमच्या ट्रॅव्हल एजंट्ने एका व्यक्तीचा नंबर देत दिली होती, त्यांच्यांशी आदल्या दिवसापासुन संपर्क चालुच होता. सकाळी साडेपाचला गाडी लावुन त्या माणासाची वाट बघत बसलो. पावणे सहाला तो आला. त्याच्या ताब्यात आम्हाला देऊन ड्रायव्हर गुप्त झाला. त्याने आम्हाला एका टपरीवजा दुकानात नेऊन तेथे मोबाईल,चपला ई . लॉकर मधे ठेवायला सांगितले, लॉकरला भाडॆ नव्हते, पण तेथे प्रसाद विकत घेणॆ बंधनकारक होते, कमीतकमी साडेतिनशे रुपयाचा प्रसाद घेतला. VIP दर्शनाला ६०० रु घेतले , त्याचे रितसर तिकिट मिळेल असे सांगितले. तिकीट घेउन एकजण आला आणि त्याच्याबरोबर एक तरुण मुलगा होता , त्याच्या गळ्यात आयकार्ड सारखे काहीतरी होते, धोतर आणि भगवा झब्बा घातलेला तो मुलगा आम्हाला घेऊन निघाला, अर्धा पाऊण कि.मी चालल्यावर मंदिर आले,आत सिक्युरीटी पाशी आमचे सामान तपासले, माझी पर्स मी लॉकरमधेच ठेवली होती पण पैसे तिकडॆ कसे ठेवणार म्हणून रमेशने त्यांच्याजवळ एक छोटी बॅग ठेवली होती. त्यातल्या काही वस्तू पोलिसाने काढायला लावल्या. आत गेल्यावर आणखी एका सिक्युरिटीतुन जाताना बॅगेतली छोटी चांदीची लवंगा ठेवायची डबी काढायला लावली, ती ठेवायला पुन्हा अर्धा पाऊण कि.मी जाणे कठीण होते, पण मंदिराच्या परिसरात लॉकर्स होते अ ते विनामूल्य होते, तेथे ती डबी ठेवली. दर्शनाची रांग फार नव्हती. रांगेतुन पुढे गेलो, गाभाऱ्यात जायला स्पर्श दर्शनाचे तिकिट घेणे जरुर होते, त्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हती, मग बाहेरुन दर्शन घेतले, अभिषेकाचे दूध दुरुनच ओतले तो लोटा पोलिस बाईने काढुन घेतला.  

काशीचे मूळ मंदिर औरंगजेबाने नष्ट करायचे ठरवलयं अशी कुणकुण आल्यावर तिकडच्या पुजाऱ्यांनी शिवलिंग काढुन विहिरीत टाकुन दिले,ती विहिर मंदिराच्या आवारात आजही आहे, तिला ग्यानवापी म्हणतात. त्याचे पाणी काढुन तीर्थ म्हणून देतात. मंदिराच्या जागी आज मशिद उभी आहे आणि मशिदीच्या समोर नंदी मात्र आहे. हा नंदी सध्याच्या शिवाच्या मंदिरापासून थोडा दूर आहे. त्याचे दर्शन घ्यायला वेगळी रांग होती. ग्यानवापीला लागुन सभामंडप आहे, तेथे बसुन रमेशने रुद्राचे एक आवर्तन केले.  एका अपूर्व समाधानाने मन भरले. आम्ही अन्नपूर्णा देवीचे दर्शन घेतले.शंकराचार्यांचे अन्नपूर्णा देवीचे अप्रतिम स्तोत्र मला माहित होते. 

अन्नपूर्णे सदापूर्णे शङ्करप्राणवल्लभे ।

ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वति  

माता मे पार्वती देवी पिता देवो महेश्वरः ।

बान्धवाः शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम्  

दक्षिणेतील केरळ जवळील लहानशा खेडेगावातील शंकराचार्य हे एक तेजस्वी संन्यासी.सातव्या शतकात त्यांनी चालत भारतभ्रमण केले. हजार बाराशे वर्षांपूर्वी कुठल्याही सोयी सुविधा नसताना एक तरुण संन्यासी चालत एवढे अंतर कसा आला असेल. ईश्वरी संकेत आणि त्याची कॄपा असल्याखेरीज हे शक्य वाटत नाही. हिंदू धर्मातील असलेली अवास्तव कर्मकांडे, स्मार्त आणि वैष्णव पंथियांनी केलेल्या देवांच्या वाटण्या व भांडणे , यातुन सर्वसामान्यांना परमेश्वराचे खरे स्वरुप समजावण्यासाठी त्यांनी आपले जीवन खर्ची घातले. देव पंचायतन हि संकल्पना आणली. बौध्द आणि जैन धर्माच्या प्रसारामुळे सनातन हिंदु धर्मावर आलेले मळभ दूर करण्यासाठीच जणु या ज्ञानमार्तंडाचा उदय झाला आणि अवघे ३२ वर्षाचे आयुष्य लाभलेल्या या यतीने अद्वैत सिंध्दांत्ताने मानवजातीवर केवढे उपकार केले ! काशीच्या  या मंदिराच्या परिसरात त्यांना शिवाने दर्शन दिल्याचे वाचले होते. मला खरंतर या करीताच काशीला यायचे होते. 

औरंगजेबाने मंदिर उध्वस्त केल्यानंतर तेथे शंभर वर्षे कोणीच येत नव्हते. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराची अवस्था बघितली आणि नर्मदा तीरावरुन शिवलिंग पाठवुन पुन्हा मंदिर बांधले. अर्थात ते दुसऱ्या ठिकाणी बांधले.मशिद काही हलवली नाही, आताचे मंदिर लहान आहे.  सध्या मंदिराचा परिसर खुप मोठा आणि अतिशय स्वच्छ आहे. चारी दरवाजे उघडे असून सगळीकडून भाविक मंदिरात प्रवेश करु शकतात ,सुरक्षा व्यवस्था चांगली असल्याने गोंधळ,गड्बड नव्हती. 

मंदिरातुन बाहेर आलो व चप्पल,बूट आणि मोबाईल ताब्यात घेतले. तेथील लोकांनी आमच्या बरोबर आलेल्या पंडिताला पैसे द्या असे सांगितले, त्याने २१०० रुपयाची मागणी केली. आम्ही हतबुध्द झालो, आमच्या ट्रॅव्हल एजंटने ५०० रु द्या असे सांगितले होते, आम्ही तेवढे देऊ असे म्हणाताच तो भयंकर चिडला,संतापला, पैसे नकोतच असे ओरडू लागला. आमच्या बरोबर आलेल्या माणसाने त्याला समजावले व ५००रु. घ्यायला लावले.गाडी पाशी आलो तेंव्हा आम्हाला तिथवर आणाणाऱ्यानेही पैसे मागितले, त्यालाही पैसे देणे भाग पडले.  मी नंतर नेटवर बघितले, ऑनलाईन स्पेशल दर्शनाला तुम्ही माणशी ३००रु देता त्यावेळी तुमच्या बरोबर एक पंडीत येतो तो तुम्हाला मंदिराची माहिती देतो, प्रसादही देतो. आम्हाल प्रसाद तर  मिळालाच नाही आणि पंडीताने वर पैसे मागितले, दिलेल्या पैशाबद्दल नाराजी दाखवली ! मी आम्हाला गाडीपासून टपरी पर्य़ंत आलेल्या माणासाला तुम्हीच आम्हाला मंदिरात का नेले नाही असे विचारल्यावर म्हणाला होता ,’आम्हाला परवानगी नाही , ठराविक पंडीतच जाऊ शकतात " त्याचा उलगडा झाला. पैसे गेल्याच्या दुःखापेक्षा फसवणुकीचा जास्त विषाद झाला ! आमची चूक ही होतीच, पण सामान्य जनता कशी फसवली जाते याचा अनुभव आला.त्या फसवेगिरीत आमचे ट्रॅव्हल एजंटपण असल्याने जास्तच वाईट वाटले !

नंतर संकट्मोचन मारुती, दुर्गा, तुलसी रामायण मंदिर बघुन बनारस हिंदू विद्यापीठ बघायला गेलो. मदन मोहन मालवीय यांनी देणग्या गोळा करुन उभारलेले विद्यापीठ मला बघायचेच होते. जयंत नारळीकरांच्या आत्मचरीत्रात त्याबद्दल खूप वाचले होते . विद्यापीठाचे आवार खूप मोठेव शांत, हिरवेगार आहे. आवारात एक शंकराचे संगमरवरी मंदिर असून ऋग्वेद, यजुर्वेदातील ऋचा अर्थासकट कोरलेल्या आहेत. दहा वाजुन गेले  होते, पहा्टेपासून काहीच न खाल्ल्याने भुकेची जाणीव तीव्र होऊ लागली. हॉटेलवर जाऊन नाश्ता करण्यात बराच वेळ गेला असता, त्याऐवजी आम्ही रस्त्यावर कचौडी सब्जी खायचे ठरवले, ड्रायव्हरने चांगली टपरी दाखवली तेथे खाल्ले,लस्सी प्यायली. क्षुधाशांती झाल्यावर पाळंदे गुरुजींकडे जायला निघालो.

वाराणासीला गंगा किनारी पितरांचे श्राध्द विधी करुन गंगेत पिंडदान करावे अशी आम्हा उभयतांची इच्छा होती, त्याप्रमाणॆ पाळंदे गुरुजींकडे गेलो, त्यांच्या घरी फक्त चालतच जाता येते, एकावेळी दोन जण शेजारी शेजारी चालू शकत नाहीत अशा लहान लहान गल्ल्यामधुन त्यांच्या घरी गेलो त्या आधी तशाच गल्ली बोळातुन काळभैरवाचे दर्शन घेतले होते. श्राध्द विधी गुरुजींनी यथासांग करविला, एक वाजता चटचटत्या उन्हातुन घाटावरुन नदिकिनारी गेलो आणि नदित बसुन दुरवर जाऊन पिंडदान केले.

बनारसला काही खरेदी करायची असे ठरवले होते पण उत्साह शिल्लक नव्हता. इकडच्या लोकांच्या लबाड व फसवण्याच्या प्रवृत्तीने मन उद्विग्न झाले होते.  एक दोन दुकानात गेलो पण काही आवडेना , मग हॉटेलवर परतलो, जरा वेळ आराम केला आणि सामान आवरुन संध्याकाळी सात साडेसातला जेवण केले आणि पुण्याच्या प्रवासाला जायला सिध्द झालो ! 

अशी हि आमची काशी यात्रेची कहाणी सुफळ संपूर्ण