Friday, July 9, 2010

ब्लॉगचा वाढदिवस

म्हणता म्हणता दोन वर्षे झाली. ब्लॉग या संकल्पनेची माहिती होती. दुसऱ्यांचे ब्लॉग वाचत होते.आपण लिहावे किंवा आपण लिहिलेले कोणी वाचेल असे वाटत नव्हते.माझ्या भाच्याने मला भरीस घातले.त्याच्या कडून ’देवनागरी’ लिहिण्याचे सॉफ्ट्वेअर घेण्यापासून सुरुवात होती.कॉम्प्युटरशी ओळख होवुन वीसाहून अधिक वर्षे झाली होती.कार्ड पंचींगच्या जमान्यापासून आम्ही त्याला ओळखतो.कोबोल,फ़ोर्ट्रान अशा संगणकीय भाषांमधून प्रोग्राम लिहून आपल्याला हवे तसे आऊट्पुट काढण्याची झटापट करण्य़ाचे काम आम्ही करत आहोत या क्षेत्रातील झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेताना कधी मजा आली तर कधी दमछाक झाली.

मला आठवतयं, आम्ही तेंव्हा युनिक्स ऑपरेटींग सिस्टीमवर काम करत असू.प्रत्येक सूचना संगणकाला टाईप करुन द्यावी लागे, त्यावेळी आमच्या ऑफीसमध्ये मल्टीमिडीया संगणकावर व्याख्यान झाले होते.आणि कॉम्प्युटरवर तुम्ही गाणी ऎकू शकाल,सिनेमे बघू शकाल अशा गोष्टी ऐकून आम्ही चकित झालो होतो, पण ही किमया आपल्याला इतक्या लवकर बघायला मिळेल अशी कल्पना नव्हती. मायक्रोसॉफ्टच्या ’विंडोज’ ने तंत्रज्ञानाची जी अद्भूत खिडकी उघडली आणि हा हा म्हणता याने साऱ्या जगावर जादू केली. सर्वसामान्यापासून सगळे सह्ज हा वापरू लागले. माहितीजालाने जग जवळ आले.ई-मेल ने सगळे संपर्कात आले. आता इंग्रजीसारखेच इतर भाषांमधुन लिहिता येवु लागल्याने भाषांचे अडसरही दूर झाले.या बदलाचे नुसतेच साक्षीदार न बनता त्याचा उपयोग करुन कामे तर करता आलीच पण विसाव्याचे दोन क्षणही त्यातून मिळवता आले हे मी माझे भाग्य समजते.

संगणक या क्षेत्रातील वेगाच्या प्रगतीचा विचार करता यात टिकण्याचा सोप्पा मार्ग मला मिळाला,’गुरुविण कोण दाखवील वाट..’ हे खरे असले तरी इथे तुम्ही तुमचा गुरु हा वयाने लहानच(तुमच्यापेक्षा) बघावा लागतो.कारण त्यालाच सगळ्यात अद्ययावत ज्ञान असते.माझ्या भाच्याला तो लहान असताना मी एकदा माझ्या ऑफिसमध्ये नेले होते, तेंव्हा मी पुणे विद्यापिठाच्या संख्याशास्त्र विभागात काम करीत होते, तेथे प्लॉटरवर आम्ही ग्राफ काढीत होतो,ते बघून तो एवढा खूश झाला. पेन होल्डरमधे पेन घेवुन कागदावर चित्र उमटते ते बघून तो थक्क झाला होता.
"मावशी त्या कागदावर आता हत्ती काढ ना !"
"अरे, हत्ती नाही येत काढता "
"का? तो कॉम्प्युटर हया रेघा कशा मारतो , तसाच काढेल ना हत्ती, घोडा काही पण"
मग मी त्याला प्रत्येक रेघ काढण्यासाठी कसा प्रोग्रॅम लिहावा लागतो वगैरे समजविण्याचा प्रयत्न केला तेंव्हा
" मावशी , मग सोप्प आहे, आता हत्तीचे चित्र काढायचा प्रोग्रॅम लिही म्हणजे हत्ती काढता येईल"
मावशी अर्थातच निरुत्तर झाली. मावशी नुकतीच त्या कॉम्प्युटर वर शिकायला लागली होती,आणि भाच्याने डायरेक्ट पदवी परिक्षेचा प्रश्ण सोडवायला दिला होता, आपले अज्ञान न दाखवता त्याचे समाधान कसे करावे असा मला पेच पडला.अर्थात माझा भाचा बराच चतुर होता, त्याने मावशीची स्थिती ओळखली असावी, त्याने हत्तीचा नाद सोडून कॉम्प्युटर वर इतर गोष्टी कशा करता येतात, पाने कशी प्रिंट होतात ते बघायला सुरुवात केली.
आता वीस वर्षांनी हाच मुलगा कम्युनिकेशन आणि ग्राफिक डिझाइन मधला मास्टर झाला(याला मी मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे काही म्हणणार नाही), तो माझा गुरु ठरला ब्लॉग बनविण्यासाठी.

त्याने स्वतःच्या ब्लॉगची मला लिंक पाठवली आणि मी ब्लॉगविश्र्वाची सभासद, नियमित वाचक झाले.नंतर त्याचे मला आवडलेले लेख मी त्याला प्रसिध्द कर असे म्हणू लागले,या पिडेतून सुटका मिळावी म्हणून कदाचित त्याने मला मावशी तू पण तुझा ब्लॉग बनव असा सल्ला दिला.मी गुगलच्या मदतीने सुरुवात केली.मला आडेल तेंव्हा मी त्याला फोन करायची.तो पण बिचारा अतिशय पेशन्स ठेवुन मला उत्तरे द्यायचा.अगदी लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतीचित्रात सांगितल्याप्रमाणे, त्या जशा नव्याने कादंबरी लिहिताना बालकवींना सतत विचारीत तशी मी त्याला विचारत होते. तो लहान असताना मी त्याला जे काही शिकविले त्याची त्याने परतफेड केली.मी त्याला रागावले असेन त्याने मात्र वयाचा मान ठेवून शांतपणे मावशीचे प्रश्ण ऎकून तिला समजतील अशा शब्दात उत्तरे दिली.
शेवटी एकदाचा ब्लॉग बनला. म्हणजे त्याची बाह्य रुपरेखा बनली.मजकूर तयार होताच, पण तो भरायचा कसा? हा बेसिक प्रश्ण होता.ब्लॉगच्या डॅशबोर्डवर जावुन नवीन पोस्ट भरणे हा ऑप्शन सापडेना.अलिबाबाच्या गुहेतून बाहेर पडताना त्याच्या भावाला जसे ’खुल जा सिम सिम ’ आठवेना , तशी अवस्था झाली.पुन्हा एकदा दादाला(भाच्याला मी माझ्या मुलींप्रमाणेच दादा म्हणते या क्षेत्रात तो तसाही आहेच दादा,नाव मुद्दाम सांगत नाही चिडेल माझ्यावर एखादवेळी)
फोन , तो (म्हणजे फोन आणि पर्यायाने तो पण) आऊट ऑफ रेंज.माझी तडफड , धडपड चालू होतीच अखेरीस केंव्हा तरी योग्य ऑप्शन मिळाला आणि एकदाची सुरुवात झाली !

दोन वर्षांमध्ये पांढऱ्यावर बरेच काळे करुन झाले. बरेच शिकायला मिळले.खूप जणांनी चिकाटीने वाचले.काहींनी आवडल्याचे अभिप्रायही पाठविले.एकूणात ही सगळी आनंदयात्रा ठरली.आपले मूल मोठे होताना बघण्याचा जो आनंद असतो त्याच प्रकारचा आनंद ब्लॉगने दिला.आपले विचार व्यक्त करता येणारे हे मुक्तपीठ आहे. याचा वाचकवर्ग जगभरातील आहे.आणि स्वांतसुखाय अशी ही निर्मिती आहे.कुणाकडे प्रसिध्दिला पाठविण्याची कटकट नाही आणि साभार परत आल्याचे दुःख नाही.

समस्त ब्लॉगवाचकांचे मनःपूर्वक आभार आणि आमच्या लाडक्या दादाचेही.

Wednesday, June 30, 2010

आमची पिढी -ऎकणाऱ्यांची

दर वीस ते पंचवीस वर्षांनी बदलणाऱ्या माणसांच्या वय विचार-आचार यातील बदलाला पिढी म्हणण्याच्या काळापासून दर चार वर्षांत हेच बदल झपाट्याने होताना बघणाऱ्या काळाचे साक्षीदार म्हणजे आमची पिढी.

आमच्यापैकी बहुतेकांचे वाडवडील खेडेगावी. आमच्या पिढीतल्या लोकांचे वडील शहरात आले, शिकले नोकऱ्या मिळवल्या.बहुतेकांनी हलाखी सोसली.आपल्या आर्थिक,बौध्दिक कुवतीप्रमाणे त्यांना कामे मिळाली आणि त्यानुरुप त्यांची आयुष्ये घडली.या लोकांना आपल्या घरच्यांसाठी, भावंडांसाठी थोड्याफार प्रमाणात झिजावे लागले. शहरात हे आल्याने खेड्यातून त्यांच्याकडे अडी-अडचणींना माणसे येत.त्यांना जमेल तशी मदत करावी लागे.त्यामुळे आमच्या पिढीत एकत्र कुटुंबात कुणी राहिले नसले तरी माणसांची सवय , त्यांच्यासाठी करावी लागणारी तडजॊड, पदरमोड याचे शिक्षण सहज मिळाले.आमच्या वेळी आजुबाजुच्या बऱ्याच घरात, शाळेतल्या मैत्रीणींत, नातलगांमध्ये नोकरी करणाऱ्या बायकांचे प्रमाण फार थोडे होते. ज्या नोकरी करत त्या बरेचदा घराला आर्थिक हातभार लागावा या साठीच आणि न करणाऱ्या सुध्दा खूप सुखवस्तु होत्या अशातला भाग नव्हता, त्यांचे तेवढे शिक्षण नव्हते अथवा त्यांना योग्य संधी मिळालेली नव्हती. एकूणात अजुबाजूचा वर्ग पैसेवाला नव्हता.त्यामुळे स्वावलंबनावर भर असे.धुण्य़ाभांड्याला बाई म्हणजे फार झाले आणि पोळ्याला बाई हे तर पैसा जास्त झाल्याचे लक्षण असे. शाळेत असताना क्लास(याला तेंव्हा शिकवणी म्हणत)ला फक्त ’ढ’ मुले जात, ती देखील पैसेवाल्यांची.घरकाम म्हणजे केर -फरशी धुणे भांडी या सगळ्यात मुलींना मदत करावी लागे.त्याशिवाय दळण आणणे,सामान-भाजी इ.आणावे लागे.मे-महिन्याच्या सुट्टीत पापड,पापड्या कुरडया, बटाट्याचा किस,सांडगे आदि करण्य़ात मस्त वेळ जात असल्याने सुट्टी बोअर होत नसे आणि सुट्टीत थंड हवेच्या गावी जाण्याचा खर्चही होत नसे.सुट्टीत बहुतेक जण आपापल्या गावी जावुन येत.

शिक्षणाचे महत्त्व समजलेला हा वर्ग होता, किंबहुना त्याशिवाय दुसरे काही माहित नसलेला असेल कदाचित, शाळेव्यतिरिक्त इतर ठिकाणी जावुन काही शिकणे माहित नव्हते(किंवा पारवडत नव्हते). खेळ, वक्तृत्त्व, लेखन -वाचन, गायन,चित्रकला सगळ्याची भिस्त शाळेवर असे. मुलांच्यामध्ये असणाऱ्या अंगभूत गुणांचा झालाच तर विकास शाळेत होई आणि त्याचा प्रकाश शाळेच्या स्नेहसंमेलनात किंवा जास्तित जास्त गल्लीतल्या गणेशोत्सवातील कार्यक्रमात पडे.या गुणांना दाखवायला आजच्या सारखे रियालिटी शॊ नसल्याने त्यांचे म्हणावे तेवढे महत्त्व् जाणवत नसे, म्हणूनच त्याच्यात वेळ घालवणे वा त्यावर वेळ घालवणे म्हणजे वाया जाणे असे बहुतेक पालकांना वाटे.त्याचा तोटा असला तरी एक फायदा म्हणजे आज कालच्या मुलांना रियालिटी शो करता जे काय कष्ट पडतात ते आंम्हाला पडले नाहित आणि बक्षीस मिळाले नाही की त्यांचे आई-बाप जसे रडतात तशी आमच्या पालकांवर पाळी आली नाही.मेडीकल किंवा इंजिनियरींगला प्रवेश मिळणे हे हुशार असल्याचे एकमेव लक्षण होते. मेडीकल आणि इंजिनियरींगची संपूर्ण महाराष्ट्रात मोजकीच शासकीय महाविद्यालये होती.त्यामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी बरीच स्पर्धा होती्.त्यामुळे बारावीमध्ये क्लासेस लावण्याचे लोण आले होते. मोजके क्लासेस फार प्रसिध्द होते. त्यांच्या जाहिराती पेपरमध्ये येत. प्रवेश मिळाला कि तो विद्यार्थी हुशार न मिळालेला अर्थात ’ढ’ हे ठरुन गेलेले असे.प्रवेश न मिळालेले विद्यार्थी खूप निराश होत पण आत्महत्येचे प्रमाण कमी होते.(कदाचित मिडीयाचा महिमा नसल्याने ते बाहेर कळत नसेलही), मात्र आमच्या आजुबाजुला तरी अशा घटना काही बघायला ऎकायला नाही मिळाल्या. इतरत्र फारशा संधी उपलब्ध नसताना, त्यांची फारशी माहिती नसताना सुध्दा मुले बी.एस्,स्सी. किंवा तत्सम कोर्स करुन कुठल्यातरी मार्गाला लागायची.पालक देखील या गोष्टीचा फारसा बाऊ करुन घेत नव्हते.मुलांच्या शैक्षणिक जीवनात त्यांचा सहभाग फक्त फी देण्यापुरता असल्यामुळे त्याच्या यशापयाशाला तो एकटाच जबाबदार असे, म्हणूनच त्याला प्रवेश मिळणे वा ना मिळणे हा पालकांचा ’इगो पॉईंट’ ठरत नव्हता.

आम्ही अभ्यास करत होतो, घरातली कामे सांभाळून.आमचे कॉलेजच्या शैक्षणिक जीवनातले प्रश्र्ण् आम्हीच सोडवत होतो घरी कुठलीही अडचण सांगायची नाही.असे असूनही आम्ही आमच्या आई-वडीलांचे ऎकत होतो, म्हणजे ऎकावेच लागे.आमच्या घरात तसे बरेच मोकळे वातावरण होते. म्हणजे मी बरेचदा आई -किंवा दादांशी न पटणाऱ्या गोष्टींबाबत वाद घालत असे.पण बाजू त्यांच्यावर उलटू लागली तर ते त्यांच्या वडीलकीचे अस्त्र बाहेर काढीत. आई तर चक्क
’ काय बाई तुम्ही मुली , खुशाल मोठ्य़ंच्या अरे ला कारे करता! माझे ऎकलेच पाहिजे. तू मला झालीस कि मी तुला?’ असे विचारुन निरुत्तर करत असे. एकूण काय कितीही बडबड केली तरी त्याला मर्यादा होती. आईला शिक्षण मिळवण्यासाठी घरातुन खूप विरोधाला तोंड द्यावे लागले होते, म्हणून मुलगी असून शिकायला सहज मिळते याचे तिला अप्रुप होते. पण ती विहिरीचे पाणी काढून,घरकाम , झाडलोट, शेणगोळा सगळे करुन शाळेत जायची तर आम्ही कॉलेजला जाण्यापूर्वी केरफरशी केली आणि नळावर धुणे धुतले तर कुठे बिघडले असा तिचा सवाल असे. घरकामाला पर्याय नव्हता. ते सांभाळून अभ्यास करावा आणि चांगले मार्क मिळवावे आशीच अपेक्षा होती.

घरीच इतके तावून सुलाखून निघाल्याने सासरी जड जाण्याची वेळ आली नाही. सासरच्यांशी जमवून घेतलेच पाहिजे.नोकरी करुन घरचे सगळे करायलाच हवे असे धडे मिळाले होते. गावातच सासर असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या कुरबुरी,तक्रारी इतरांकडून माहेरी येता कामा नयेत असे आधीच बजावले होते.आमच्या पिढीतल्या मुलींचे नवरे देखील जवळपास सगळे श्रावणबाळाचे वंशज.लग्नाआधी ते ही आमच्यासारखेच आई-वडीलांचं ऎकणारे, नंतरही तसचं, त्यामुळे घरात सासु-सासऱ्यांशी झालेल्या छोट्या-मोठ्या मतभेदांबद्दल नवऱ्याजवळ बोलण्यात अर्थ नसे.तिकडून सहानुभूतीची सुतराम शक्यता नसे.आणि स्वतःच्या आई-वडीलांजवळ बोलण्याची प्राज्ञाच नव्हती. त्यामुळे सासरच्यांशी जुळवून घेत, आपल्याच पातळीवर कधी गोडीत, कधी दुर्लक्ष करुन,तरी कधी मनातल्या मनात चिडून एकत्र राहीलो आम्ही. त्याचे फार दुःख झाले अशातला भाग नाही, पण एकाच गावात सासु-सासऱ्यांपासून स्वतंत्र राहणाऱ्या आमच्या पैकी काही जणी फटकळ,तुसड्या, माणूसघाण्या ठरल्या. ज्यांचे सासु-सासरे गावी रहात होते, ते नोकरी करणाऱ्या सुनेच्या अडचणींना क्वचित आले, त्यांच्या गरजांसाठी सुनांनी ऑफीसमधून रजा काढल्या पाहिजेत अशी अपेक्षा बाळगून राहिले.

आमच्या पिढीत आम्हाला एखाद-दुसरे भावंड असल्याने आई-वडील आणि सासु-सासरे यांच्या म्हातारपणाची, आजाराची सर्व जाबाबदारी आमच्यावर पडली. ती जमेल तितक्या निष्ठेने बहुतेकांनी पार पाडली वा पाडत आहेत.

आता आमच्या पिढीतल्या लोकांनीही चाळीशी ओलांडली,पन्नाशी गाठली आज आमच्यापैकी काहींची मुले शिकत आहेत्, काहींची शिक्षणे संपली,कुणाला जावई आले, कुणाला येऊ घातलेत. नव्या पिढीतली आमची मुले स्वतंत्र विचारांची आहेत.त्यांच्याकडे आचार -विचाराचे स्वातंत्र्य आहे मात्र स्वावलंबन नाही.आजूनही स्वत्ःचे कुठलेही काम ती आई-वडीलांना बिनदिक्कत सांगू शकतात. नव्हे तो त्यांचा हक्कच आहे. आम्ही त्यांना धाकात नाही ठेवले हा दोष आमचाच आहे. आपल्या मुलांनी स्पर्धेत टिकावे यासाठी आमच्या पिढीने त्यांच्याकडे लक्ष दिले, (कदाचित नकॊ तेवढे).त्यांना अभ्यास आणि अभ्यासेतर गोष्टींना वेळ मिळावा याकरता घरातली कुठलीही कामे,अडचणी त्यांच्यापर्यंत जाऊ दिल्या नाहीत.पैशाची बाजू बहुतेक ठिकाणी आई-वडील मिळवते असल्याने ठिक होती, घरात कामाला बायका होत्या.त्यामुळे मुलांना शारीरिक ,आर्थिक कुठलेच ताण नव्हते.त्यांना अभ्यास,परीक्षा यांचे भरपूर टेन्शन असे नाही असे नाही. पण या मुलांवर जागतिकीकरणाचा बराच प्रभाव पडला, म्हणजे पाश्चात्य संस्कृती विशेषतः अमेरीकन यांमध्ये चांगलीच रुजू लागली.आचार,विचारांचे स्वातंत्र्य, वेळी-अवेळी फिरण्याचे, मजा करण्याचे स्वातंत्र्य त्यांनी घेतले.आपले जोडीदार निवडायचे स्वातंत्र्यही त्यात आले.आई-वडीलांचे न ऎकणॆ,त्यांच्याजवळ न राहणॆ इतकेच नाही तर त्यांनी मुलांकडून कुठलीही अपेक्षा ठेवणे ही किती चुकीची गोष्ट आहे, परदेशात आई-वडील मुलांना कसे पूर्ण स्वातंत्र्य देतात, त्यांच्या कडून कुठलीच आर्थिक, मानसिक, भावनिक कुठलीच मदत मागत नाहीत आणि आपले आई-वडील आपल्या सगळ्य़ा बाबींमध्ये लक्ष घालतात असे त्यांना वाटते.पण त्याच वेळी तिकडची मुले वयाच्या सोळाव्या वर्षापासून एकटी राहतात, पडेल ती कामे करुन मिळेल ते शिक्षण घेतात, आपण पंचविशी पर्यंत आई-वडीलांच्या खर्चाने मनसोक्त शिकू शकतो हि गोष्ट ते सोयीस्करपणे विसरतात. स्वातंत्र्यांची किंमत मोजावी लागते असे म्हणतात. मुलांना दिलेल्या स्वातंत्र्य़ाची किंमत आम्हीच मोजत आहोत. आज आमची मुले आमचे ऎकत नाहीत याचा विषाद आहे कि आजही आम्हाला आमच्या आई-वडीलांचे ऎकावे लागते याचे दुःख आहे, काही कळेनासे झाले आहे.

वृध्दापकाळामुळे माझी आई सध्या माझ्या घरी आहे. माझ्या मुली घरात कपड्यांचा पसारा करतात, खाल्लेल्या ताटल्या तशाच टाकून शाळा-कॉलेजला पळतात. घरी कुणाला बोलावले तरी त्यांना वेळ असेल तरच घरी थांबतात.वडीलांशी चढ्या सुरात बोलतात, माझ्या बडबडीकडे पूर्ण दुर्लक्ष करतात.परवा आईच्या खोलीत मुलींचे कपाट मी आवरत होते.ती मला म्हणाली, " काय गं, तू अगदीच तुझ्या मुलींना शिस्त लावली नाहीस, त्यांना तुझा काडीचा धाक नाही. किती पसारा करतात. अभ्यासात आहेत हुशार, ती देवाची कृपा. पण तू काही त्यांना वळण नाही लावलसं ! , मला आज फक्त दूध दे कालच्या इतकं गरम नको, त्यात सुंठ घाल न विसरता"
मी म्हणाले, " आई माझ सगळं आयुष्य ऎकण्यात गेलं, लहानपणी तुमचं ऎकलं, नंतर सासु-सासऱ्यांच आणि आता मुलांच. अजूनही तुमच ऎकतेच आहे, मुलींचही ऐकते. लहानपणी तुम्ही पाणी आणून दे म्हटल्यावर पळत जावून देत होते, आता मुली टि.व्ही. समोर नाहीतर कॉम्प्युटर समोर बसून म्हणतात आई पाणी दे , कि त्यांना ही पाणी देते आम्हाला मात्र शेवटपर्यंत पाणी आमच्याच हातांनी प्यायचे आहे त्यासाठी देवाने कायम धडधाकट ठेवावे एवढीच प्रार्थना आहे. "


©

Wednesday, May 19, 2010

गावाकडच्या गोष्टी... क्रमश:

(माझ्या आईचे माहेरचे कुटुंब मोठे , तशी जुन्या काळातील सगळीच कुटुंबे मोठीच असत, एकत्र राहत असल्याने त्यांच्यात संबंध असत, भांडणे, भाऊबंधक्याही असत.तसेच माया, प्रेमही असे. माझ्या आईकडून तिच्या घराण्यातील सगळ्या काका-आत्यांच्या, मामा मावशांच्या कथा मी वारंवार ऎकलेल्या आहेत.
सध्या आई आजारी असते, कंपवाताने ती घराबाहेरही पडू शकत नाही.रेडीओखेरीज दुसरी करमणुक तिला नसते, तिच्याशी बोलताना आजार सोडून बोलणे कठीण असते, मग परवा मी पुन्हा तिला तिच्या बालपणात नेऊन त्या आठवणींमध्ये तिला रमवण्याचा प्रयत्न केला त्यातुन तिचा वेळ चांगला गेलाच पण मला देखील काही गोष्टी नव्यानेच समजल्या.तिने सांगितलेल्या काही घटना या तिलाही केवळ ऎकुनच माहित आहेत, आता तिच्या घराण्यातली सगळ्यात मोठी अशी तिच शिल्लक आहे, बाकिची मंडळी तिच्याहून लहानच असल्याने या गोष्टी केवळ गोष्टी म्हणूनच राहतील. गोदुची कथा त्या पैकीच एक. या गोष्टी ऎकताना मला पडलेल्या प्रश्णांची उत्तरे तिला तर नाहीच माहित पण ती कुणालाच माहित असणार नाहीत. तिने सांगितलेल्या गोष्टीमंधले कच्चे दुवे कल्पनेने जोडण्याचा माझा प्रयत्न आहे.
अशा कथानकांवर खर तर चांगल्या मालिकाही बनू शकतील, पण सध्या तरी त्या ब्लॉगवाचकांपर्यंत पोचाव्यात या साठी हा लेखन प्रपंच.....)




तळ्य़ाच्या आत्याबाई अस त्यांना म्हणतं.कोकणातलं हे लहानस खेडं. पण गावचे खोत असल्यानं गावात दबदबा होता. लोकांची घरात उठबस.घरचे भात, नारळ भरपूर.पोफळीच्या बागा.खाऊन पिऊन सुखी कुटुंब.आत्याबाईंचे माहेर भोरचे.त्यांची मोठी अक्का दिसायला गोरी-ऊंच, नाजूक,तिचं लग्न चटकन जमलं,तिच्या यजमानांची सरकारी नोकरी.माई मात्र काळी सावळी,उंचीने बेताची तिचं बाशींगबळ जड.लग्न जमायला फार त्रास पडले.भो्रच्या अण्णा मामांनी तिच्याकरीता बरीच स्थळे बघितली पण योग नव्हता.अखेर शेवटी अलिबाग जवळ अक्षी नावाच्या अगदी लहान गावातील मुलाचे स्थळ समजले.सुदैवाने माणसे चांगली होती, परिस्थिती नव्हती तितकी चांगली, पण त्यांनी माईला पसंत केली आणि लग्न जमले.तळ्याची माई अक्षीला जाऊन पडली.तिथले वातावरणही कोकणचेच त्यामुळे माईला वातावरणाशी जुळवून घेणे कठीण गेले नाही. माईचे यजमान गोपाळाराव भिक्षुकी करीत.फारशी जमीन देखील नव्हती.पण माईला त्याचे दुःख नव्हते.कामाची तिला पहिल्यापासून सवयच नाही तर आवड होती.परसातल्या भाजीपाला आणि घरच्या भातामुळे खायप्यायची ददात नसे. तिने आंबे, फणस यांची देखभाल केली.उन्हाळ्यात त्यांच्या आंबापोळ्या, फणसपोळ्या करणे, कपडे शिवणे हे करुन तिने चार पैसे मिळवायलाही सुरुवात केली.पाठोपाठ दोन मुली झाल्याने घरात सगळेच नाराज झाले होते. मुलींच्या पाठीवर बरेच दिवस तिला मुल झाले नाही.मधल्या काळात मागे रहाणाऱ्या एका कुणब्याच्या बाईचे रात्री बोलावणे आले होते ती अपरात्री अडली होती. सुईणीला बोलावणे धाडले होते पण हि पहिलटकरीण घाबरली होती, माई लगोलग गेली, सुईण येई पर्यंत तिने चूल पेटवून पाणी तापवले इतरही तयारी केली.तान्हु सुईण पार वाकली होती तिला माईने सगळी मदत केली. या घटनेनंतर जवळपासच्या आडल्या बायकांना सोडवायला माई आपणहून जायला लागली.
मोठी सुमन मॅट्रीक झाली तिला आठवीनंतर आलीबागला ठेवावे लागले,पण माईला शिक्षणाचे महत्त्व असल्याने तिने मुलीला शिकवायचा निर्धार केला होता, मुलगी ही हुशार होती.पण आलीबागला पुढच्या शिक्षणाची सोय नसल्याने मुंबई नाहीतर पुण्याला पाठवायला हवे होते, हा खर्च मात्र त्यांच्या आवाक्याबाहेर होता.

याच वेळी सुमनला नागपूर कडून एक स्थळ सांगून आले.घरची परिस्थिती उत्तम, मुलगा शिकलेला माणसं चांगली.माईच्या यजमानांनी भितभितच पत्रिका पाठवली.पत्रिका जुळतीय, मुलीला घेवुन पुढची बोलणी करायला या, असे पत्र आल्यावर माईला आनंद झाला तो शब्दात सांगता येण्याजोगा नव्हता, मात्र गोपाळाराव चिंतागती झाले. आपल्याला ही उडी झेपेल का? इतकी मोठी माणसं, आपल्या जवळ काय आहे?हुंड्य़ावरुन लग्न मोडायचं, की मुलीच्या सुखासाठी घरदारावर तुळशीपत्र ठेवायचं? काय करावं त्यांना सुचेना. माईला त्यांच्या मनःस्थितीची कल्पना आली.
ती म्हणाली,"मला वाटतं आपण एवढं हताश होवु नये, त्या मंडळींना आपल्या सुमनचा फोटो पाठवू बरोबर आपल्या परिस्थितीची कल्पनाही देवू. आम्ही आम्हाला झेपेल असं कार्य हौसेने करुन देवू म्हणावं, मात्र तुमच्या तोलामोलाचं करण आम्हाला जमणार नाही., त्यांना पटलं तर हो म्हणतील नाहीतर आपण सुमनसाठी दुसरे मुलगे बघू. पण त्यांच्याशी काहीच पत्रव्यवहार न करता गप्प बसणे बरोबर नाही"
माईचे बोलणे त्यांना पटले, सुमनचा फोटॊ आणि सविस्तर पत्र त्यांनी नागपूरला पाठवून दिले.पंधरा दिवसांत नागपूरहून उत्तर आले, आम्हांला मुलगी पसंत आहे.खर्चाची काळजी आपण अजिबात करु नये.आम्ही माणसांचे मोल मानतो.

गोपाळराव नागपूरला जावून घर, मुलगा बघून आले,त्यांनी आम्ही अक्षीला लग्न करुन देवू असे सांगितले, नागपूरकरांनी कुठल्याही मागण्या केल्या नाहीत.आम्ही पन्नास माणसे येवू भाड्याचा खर्च देखील त्यांनी मागितला नाही.सारे अक्षीगाव माईच्या मदतीला आले.माईने मोठ्या हौशीने तयारी सुरु केली.शेजारच्या पुरोहितांच्या वाड्यात मुलाकडच्यांना जानवसा दिला होता.विहिणीसाठी फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या.सिमांतपूजनाच्या जेवणाला उकडीचे मोदक केले होते.भोरहून माईच्या मामांनी वामनरावांना नेले होते, त्यांच्या स्वयंपाकावर व्याही मंडळी खूष होती.एकंदरीत कुठलेही रुसवेफुगवे भांडाभांडी न होता कार्य झकास पार पडले.माईच्या घरी पैशाची रेचचेल नव्हती, पण माणसांच्या आगत्याने, प्रेमाने सासरचे लोक भारावून गेले अर्थात त्यांनाही याच गोष्टीचे महत्त्व होते.त्यांच्या घरच्या मोठ्या कारभाराला अशी दहा माणसात वावरणारी मुलगीच हवी होती.

सुमन सासरी गेली.तिच्या कामसू स्वभावामुळे ती सासरी लाडकी बनली.सासरचे रितीरिवाज तिने चटकन आत्मसात केले.सासरच्या लोकांना आपलेसे केले ते आपल्या लाघवी स्वभावाने आणि कामाच्या झपाट्याने.

सुमन सासरी गेली, आणि अचानक माईची कुस पुन्हा उजवली.तिलाही प्रथम खरे वाटले नाही, थोडे संकोचल्यासारखेही झाले. पंधरा वर्षांनी पुन्हा घरात पाळणा हलला, या खेपेला तिला मुलगा झाला.बरेच वर्षांनी घरात बाळ आले, मुलगा झाल्याचा सगळ्यांनाच आनंद झाला."माई, तुम्ही लई बायकांची बाळंतपण केलीत म्हनुन द्येवानं तुम्हान्सी प्रसाद दिला" असं अजूबाजुच्या बायका म्हणू लागल्या. सुमन देखील सासरी सुखात होती. तिची तशी पत्रे येत, तिला पुढच्या शिक्षणासाठी कॉलेजात देखील घातले होते.एकंदरीत दिवस चांगले चालले होते. माईच्या घरात सुबत्ता नसली तरी समाधान भरपूर होते.तिच्या घरातील सगळ्यांनाच माणसांचे आगत्य होते.आहे त्यात आनंदाने राहण्याची वृत्ती होती आणि आपले आंथरुण पाहून पाय पसरायचा स्वभाव असल्याने घरात वखवख नव्हती.

पण सगळे दिवस सारखे नसतात.संध्याकाळची पूजा सांगून गोपाळराव घरी येत असताना त्यांना साप चावल्याचे निमित्त झाले आणि वेळीच उपचार न मिळाल्याने चार पाच तासांतच ते गेले.अचानक घरावर संकट कोसळले. माईचा बाळ नुकताच चालायला लागला होता. त्याचे सगळे आयुष्य घडवायचे होते, एका मुलीचे लग्न व्हायचे होते, माईला आभाळ फाटल्यासारखे झाले तरी रडत बसायला वेळ नव्हता. तळ्याहून भाऊ,वहिनी आले.आई नाही येवु शकली तेच चार दिवस माईला माहेरी घेवून गेले.आईच्या कुशीत माईने रडून घेतले ते अखेरचे.आता मलाच खंबीर व्हायला हवे,नातेवाईक आणि त्यांची मदत किती दिवस पुरणार? असा विचार करुन आठ दिवसात माई परत आपल्या घरी आली.

सुमनला वडील गेल्याचे समजले होते,खरं तर ती माहेरी बाळंतपणाला यायची होती पण अचानक ही तार आली, तिच्या घरच्यांनी प्रथम तिला सांगितलेच नाही, तिची मनःस्थिती बघून सासूबाईंनी तिला जवळ घेवून सांगितले. सुमनला फार दुःख झाले, पण ती काही करु शकत नव्हती तिच्या या नाजुक अवस्थेत तिला अक्षीला पाठवायला घरचे तयार नव्हते.

माईने सगळा कारभार बघायला सुरुवात केली. भिक्षुकीतून मिळणारी आवक बंद झाली होती, मात्र तिने असलेल्या लहानशा शेताच्या तुकड्यावर लक्ष घालायला सुरुवात केली.गोड बोलून चार लोक तिने जोडलेले होतेच.तिने सुईणीची कामे देखील करायला सुरुवात केली.लांबलांबच्या वाड्या वस्त्यांवरुन लोक तिला बोलवायला येत, माई लगोलग जाई. रात्री अपरात्री देखील माई त्यांच्या बरोबर जात असे. तिने कधीच तोंडाने मोबदला मागितला नाही.कधी कधी तर काही लोक इतके गरीब असत, की त्यांच्या कडून आल्यावर अंघोळ करुन माई भाताच बुडकुल शिजवी,त्यावर तूप, लोणच्याची फोड घाली कधीतरी गुळाचा सांजा असं जेवण बाळंतीणीला पाठवी. मात्र ही माणसं, अडीनडीला माईच्या मदतीला येत, तिच्या भातलावणी, काढणीचा कधी खोळंबा होवु देत नसत.

आपल्या सहा महिन्यांच्या मुलाला घेवुन सुमन अक्षीला आली.पांढऱ्या कपाळाच्या माईकडे बघून तिला हुंदका आवरला नाही.माईला देखील सुमनला बघून भरुन आले.बराच वेळ मायलेकी निःशब्द पणे अश्रू ढाळत राहिल्या.माईने नातवाला उराशी धरले,याचे बारसे इथे व्हायला हवे होते, पण काय करणार? सुमनने हि तिच्या भावाला पहिल्यांदाच पाहिले होते. आठ पंधरा दिवस सुमन राहिली.मग तिच्या सासरहून एक पत्र आले.पत्रात तिच्या नवऱ्याने लिहिले होते तुझ्या बहिणीला तू इकडे घेवुन ये तिच्या पुढच्या शिक्षणाची आपण व्यवस्था करु, सध्या आपण त्यांना एवढी मदत करु शकतो.

सुमनने माईला पत्रबद्दल सांगितले. माई म्हणाली," गौरीला तू घेवुन जा, जावयांच्या शब्दाचा मान राखायला हवा, पण त्यांना म्हणावं तिच्यासाठी मुलगाच बघा उगीच शिक्षणाचा खर्च नको,तुम्ही करताय हेच खूप आहे, अजून बाळचं सगळचं व्हायचं आहे, तेव्हा लागेलच मदत. मऊ लागल, म्हणून कोपरापासून खणू नये" सुमन म्हणाली ,"आई आता माझी कॉलेजची दोन वर्ष झाली, दोन संपली की मी पण नोकरी करेन, मग काय हरकत आहे? आणि आमची माणसं, खरच फार चांगली आहेत"
" हो आहेत गं, ह्यांची पुण्याई म्हणून अशी देवमाणसं भेटली आहेत, पण चांगल्याचं चांगुलपण आपण टिकवायचं असतं,उगीच आपला भार इतरांवर टाकणं मला नाही आवडतं गौरीसाठी तुमच्यासारखी चांगली माणसं बघं"

सुमन बरोबर गौरी गेली, कामाचाही हात कमी झाला, पण आज ना उद्या ती जाणारच होती. माईला उद्योगांमुळे दिवसाचे चोवीस तास कमी पडत. बाळच्या बाललीला बघायलाही सवड नसे. लेकरू फार गुणी होतं, कुणाकडेही जाई, देवु ते खाई, हट्ट नाही की रडणं नाही.परिस्थिती माणसाला शहाणं बनवते.
गौरी देखील सुमन सारखीच गुणी होती, माईच्या हाताखाली राहुन घरकामात ती तयार झाली होतीच, शिवाय शिवण, भरतकाम यातही ती तरबेज होती.सुमनच्या सासरचे खटले मॊठे होते, संत्र्याच्या बागा होत्या, कापसाची शेती होती.सुमनच्या सासऱ्यांच्या पश्चात तिच्या सासुबाई सगळा कारभार समर्थपणे बघत होत्या.सगळे त्यांना अक्का म्हणत ही मंडळी सधन होतीच पण त्याही पेक्षा त्यांची मनाची श्रीमंती जास्त होती.सुमनने गौरीसाठी मुलगे बघण्याचा आईचा निरोप सासुबाईंना सांगितला,त्यांच्या परिचितांपैकी दोन तीन ठिकाणी ती पत्रिकाही देवुन आली.पत्रिका जुळत नसल्याचे निरोप आले.
एक दिवस सुमनच्या सासुबाई तिला म्हणाल्या,"अगं आपल्या नानासाठी आपण गौरीची पत्रिका बघुयात का?" नाना हा त्यांचा धाकटा मुलगा होता, नुकताच पदवीधर होवुन नोकरीला लागला होता. म्हटल्याप्रमाणे त्यांनी गुरुजींना बोलावून पत्रिका दाखवल्या,पत्रिका जुळत होत्या.
त्यांनी नानालाही विचारले,"गौरी तुला पसंत आहे का? मला तर ही मुलगी फारच आवडली आहे, शिवाय माणसे माहितीतली आहेत.दोघी बहिणी जावा झाल्या तर घरात पुढे कुरबुरी पण कमी होतील"
सुमनच्या नवऱ्यालाही हा विचार पटला.नानानेही गौरीला होकार दिला.
सुमन भितभितच सासुबाईंना म्हणाली,"हे सगळ ठिक आहे,पण आता आईची परिस्थिती तुम्ही जाणताच, लग्न करुन देणं .."
"मला सगळं ठाऊक आहे, माईंनी माझी सगळी हौस तुझ्या लग्नात केली आहे,त्यांना जड होईल असे आपण नकोच करायला, गौरीचे लग्न आपण नोंदणी पध्दतीने करु, म्हणजे खर्चाचा प्रश्ण उरणार नाही. आपण दोन्ही अंगी लग्न करुन घेवू पण ते तुझ्या आईला पटणार नाही, त्या काही करुन लग्न देतील करुन पण अजून तुझ्या भावाचे सगळेच व्हयचयं आणि आई-वडीलांची जागा कुणी घेवु शकत नाही, देवक दुसरे कुणी बसवणार हे बघून त्या माऊलीला केवढं दुःख होईल, त्या पेक्षा नोंदणी पध्दतीने लग्न करु , सगळेच प्रश्ण सुटतील , मी नाना आणि दादाशी बोललीय आधीच, मुले माझ्या शब्दाबाहेर नाहित, हे नोंदणी लग्नाचं मला दादानचं सांगितलय."

सुमनने माईला पत्राने सविस्तर हकिकत कळवली.माईचे मन सुमनच्या सासरच्या लोकांच्या विशेषतः तिच्या सासुबाईच्या मनाच्या मॊठेपणाने भरुन आले.अंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन या उक्तिचा प्रत्यय आला.गोपाळरावांच्या निधनानंतर अक्का दहा दिवसात समाचाराला आल्या होत्या, माईच्या पाठीवरुन हात फिरवून ,"माई, धीर सोडू नका, झालं ते फार वाईट झालं.पण स्वतःला एकटं समजू नका, आम्ही आहोत" अस बोलल्या होत्या.फार बडबड कराय़ची त्यांची सवय नव्हती.पण कृतीतून त्यांनी करुन दाखवलं.गौरीचं लग्न त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच झालं.

हि घटना आहे पन्नास एक वर्षांपूर्वीची.आज आपण समाज खूप सुधारलाय म्हणतो पण हौशीच्या नावाखाली लग्न समारंभांमध्ये लाखो रुपये उधळले जातात.आजही हुंडाबळी वाचायला मिळतात. मुलीच्या लग्नापायी त्यांचे बाप कर्जबाजारी होतात आणि त्या खर्चाला भिऊन मुलीचा जन्म नको म्हणून गर्भातच तिला मारली जाते. या सगळ्या गोष्टी बघून गावाकडची हि गोष्ट मला सांगाविशी वाटली.पैशाची समृध्दी मिळवताना मनाची श्रीमंती आपण गमावत नाही ना? याचा विचार केला पाहिजे.

Tuesday, May 11, 2010

गावाकडच्या गोष्टी... क्रमश:

वामन पोरका झाला.त्याची आई बाळंतपणातच वारली होती तेंव्हापासून तो आजोळीच रहात होता, वडीलही प्लेगच्या साथीत गेले.आजोळची परिस्थितीही बेताचीच.या मुलासाठी त्याचे वडील सटीसहामाशी पाठवत असणारी रक्कमही आता मिळणार नव्हती.सहाजिकच त्याचा भार वाटू लागला.त्याच्या मामाला घरातून वामनची काहीतरी सोय करा अशी वारंवार बोलणी होवु लागली.मामांनाही पटत होते, पण एवढ्या लहान मुलाला कुठे सोडणार?

मामलेदार साहेबांकडे पूजा होती मामांना ब्राह्मण म्हणून बोलावले होते.जेवणे झाल्यावर विडा खाताना मामलेदार साहेबांनी विचारले,"मामा, घरी सगळे ठिक आहे ना?, आज तुमची तब्येत बरी वाटत नाही. कसली काळजी लागलीय ?"
" काही नाही हो, आमचं आपलं नेहमीचचं रडगाणं.प्रपंचाच्या न संपणाऱ्या कटकटी "
"तरीपण,आजवर तुम्ही कधी असं देखील बोलला नाहीत? मला मोकळेपणनं सांगा , अनमान बाळगू नका"
" अहॊ, वामन , माझ्या सक्ख्या बहिणीचा मुलगा, बहीण गेली तेंव्हापासून इथेच आहे, गेल्या महिन्यात त्याचे वडील आमचे मेहुणे वारले,आता त्याच्या संगोपनाचा प्रश्ण आला.घरी त्यावरुन सतत कटकटी होत आहेत, आता आमच्या मुलांसारखा तो, त्याला का रस्त्यावर सोडून देवू?"
"नको नको, असं नका करु, तुम्ही त्याला आमच्या घरी पाठवा.आमची मुले लहान आहेत, तो त्यांना सांभाळेल,आम्ही त्याची मुंज करु.आमच्या मॊठ्या बारदानात सहज सामावला जाईल., एवढी छोटी बाब, तुम्ही आधीच सांगायची"
मामलेदार साहेबांचे आभार कसे मानावे, मामांना समजेना.

मामलेदारांच्या घरी वामन रहायला आला.त्यांच्या आबा आणि भाऊ बरोबर त्याची ही मुंज झाली.त्याला शाळेतही घातले होते, पण अभ्यासात त्याला विशेष गती नव्हती.घरकामात मात्र तो तरबेज होता. विहिरीवरुन पाणी आणणॆ, बंब पेटवणे,अंगण झाडणॆ ही कामे तो बिनबोभाट करी. पुजेला भटजी यायच्या आत पूजेची तयारी करुन ठेवी.काकूंच्या लहान धाकट्या मुलांना खेळवी.इतकेच नव्हे तर काकूंकडून त्याने स्वयंपाक ही शिकून घेतला.मामलेदार साहेबांना दौऱ्यावर खेडोपाडी जावे लागे.तिकडे जेवणाचे हाल होतात असे त्याने ऎकले होते.
एकदा ते दौऱ्यावर निघताना तो म्हणाला,"काका , मी येऊ तुमच्या बरोबर?"
"तू काय करणार तिकडे?"
"तुमच्या साठी स्वयंपाक करेन,तुमचे कपडे धुवेन."
"आणि तुझा अभ्यास? त्याच काय?"
"रागावणार नसाल तर बोलू?"
"बोल"
" मला नाही जमत गणित आणि इंग्रजी,तीनदा नापास झालो.तुमच्यावर तरी किती बोजा देवू? झाले तेवढे शिक्षण पुरे."
" ठिक आहे तुझी मर्जी, पण स्वयंपाक करण्यात तरी हातखंडा मिळव, उद्या त्यावर तरी पोट भरु शकशील, चल माझ्या सोबत"
वामन मामलेदारसाहेबांबरोबर गेला, त्याने त्यांची चोख व्यवस्था ठेवली, त्यांचे कपडे धुणे, सामन आवरणे, ते यायच्या आत गरम गरम जेवण तयार ठेवणे हे सारे तो आवडीने करी, मागचे सगळे आवरुन टाकी.त्याच्या हाताला चवही छान होती.आठ दिवस आंबवडे,उतरवली,आंबेघर, गोळ्याची वाडी असा दौरा आटोपून वामन आणि साहेब भोरला आले.
आल्याबरोबर मामलेदार साहेबांनी काकूंना बोलवून सांगितले,"वामन फार दमला आहे.माझी सारी काळजी तो घेत होता, आज त्याला बिलकूल काम सांगू नका त्याला आमच्या बरोबर जेवायला वाढा."पुढे मामलेदार साहेबांबरोबर वामनला दौऱ्यावर न्यायचे असा शिरस्ताच झाला.वामन असाच मोठा होत होता.मामलेदारांच्या घरात आपण आश्रित आहोत हि जाणीव त्याला कुणी करुन दिली नसली तरी तो आपली पायरी जाणून वागत होता.घरातल्या कुठल्याच कामाला तो मागे नसे.त्यामुळे सगळ्यांना तो हवाहवासा वाटे.

गोदु सासरी गेली आणि चार सहा महिन्यातच मामलेदार साहेब आजारी पडले.औषधपाणी सुरु होते, पण गुण येत नव्हता.वामन अखंड सेवा करीत होता.मामलेदारांना आतुन जाणावले आता आपले काही खरे नाही. एक दिवस रात्री त्यांनी काकू आणि आपले मुलगे आबा,अण्णा यांना जवळ बोलावले.
ते म्हणाले, " मी बरा होईन असे मला वाटत नाही.आपल्याला काही कमी नाही शेती वाडी आहे, मुले शिकून मोठी होतील दहा हातांनी उदंड मिळेल. पण प्रत्येकाचे प्रपंच वाढतील, पैशाला वाटा फुटतील, पैशाच्या मागे धावू नका, प्रपंचासाठी तो जरुर मिळावा मात्र त्या करीता माणुसकी सोडू नका. होता होईल तो अडलेल्यांना मदत करा आणि मुख्य म्हणजे वामनला कधीही अंतर देवू नका. तुम्ही पाच भाऊ नसून सहा आहात असे समजा.आपल्या सुखात तसेच दुःखातही त्याला बरोबर ठेवा. त्याच्या मामाला मी शब्द दिलेला आहे, मुलगा गुणी आहे. आता शिकला नाही फारसा.पण त्याने काही बिघडत नाही.कष्टाला तो कमी पडणार नाही.तो स्वतःहून जात नाही तोवर तो या घरातच राहील त्याला कुणी घराबाहेर काढणार नाही असं मला वचन द्या.,मला त्याशिवाय सुखाने मरण येणार नाही"
आबा म्हणाले,"काका, असं बोलू नका, तुम्ही बरे व्हाल.आणि आम्हाला वामन भावासारखाच आहे, त्याला आम्ही सांभाळू"

मामलेदारसाहेब नंतर आठ्वड्याभरातच गेले.ते गेले आणि घराच्या वैभवाला जणू दृष्टच लागली.एन्फ्ल्युएंझाच्या साथीत दोन दिवसाच्या तापाचे निमित्त होवुन आबाही अकस्मिकरित्या वारले.एकापाठोपाठ एक असे दोन कर्ते पुरुष गेल्याने घराची रयाच गेली.मोठ्या घराचा कारभार चालवायला अण्णा मुंबईची नोकरी सोडून आले.बाकीची मुले मोठी होत होती,घरात लग्नं कार्ये होत होती.घरातल्या मुली लग्न होवुन सासरी जात होत्या.परक्याच्या मुली या घरात सुना म्हणून येत होत्या.घरातल्या लहान मोठ्या समारंभाचा स्वयंपाक करायची जबाबदारी वामनवरच असे.त्याच्या स्वयंपाकाची सगळे स्तुती करीत.वामनच्या लग्नाबद्दल मात्र कुणीच विषय काढला नाही.काकूंना वाटे याचेही लग्न केले पाहिजे, पण नवरा आणि मुलगा पाठोपाठ गेल्याने त्यांचा पूर्वीचा उत्साह कमी झाला होता.

खुद्द वामनला ह्या घराचा आधार वाटत होता, वेगळं राहण्याची त्याची मानसिक तयारी नव्हती.आपण आश्रित मग कशाला लग्न करुन बायकॊला इथे कामाला लावायची? बरं आहे आहे तेच आयुष्य ! इथल्या सासुरवाशणींचे हाल तो बघत होताच, तीन -तीन पर्य़ंत काम करुन सुखाचा घास मिळायचा नाही.सोवळी-ऒवळी सांभाळताना जीव थकायचा.कामात थॊडी कसूर झाली की काकूंचा पट्टा चालु व्हायचा.बाळंतपणात पुरेशी विश्रांती नाही की वेळेवर जेवण नाही. आबा, भाऊ दोघांच्या बायका बाळंतपणातच गेल्या.आपली आईपण तशीच गेली, नको ते संसाराचं लोढणं. आपलं हे परस्वाधीन जगणं आपल्याबरोबरच संपुदे.

दिवस असेच जात होते, काळ बदलत चालला होता.मामलेदारांची मुले आपल्या पिढीजात श्रीमंतीच्या ऎटीतच होती.सणवार,व्रतवैकल्ये शिस्तित चालत.मुलींची लग्ने, मुलांच्या मुंजी थाटामाटत पार पडत.रामनवमीच्या उत्सवाला भोरच्या राजवाड्यात वाईहून भिक्षुक येत.त्यांच्या रात्रीच्या फराळाची, मुक्कामाची व्यवस्था मामलेदारांच्या वाड्यात होई. खर्च पूर्वीसारखाच, पण आवक मात्र कमी होती.मुलींच्या लग्नासाठी कर्ज काढावी लागली होती.शेतात कष्ट करायची कुणाचीच तयारी नव्हती, आणि खॊटी प्रतिष्ठा आड यायची. कुळे देतील त्यावर समाधान मानायचे, त्यांच्यावर देखरेख करायला बाबाला ठेवले होते, पण त्याचा सगळा वेळ गावात पांढरेशुभ्र कपडे घालून लोकांशी गप्पा, चर्चा करण्यात जाई.या सगळ्याचा व्हायचा तोच परीणाम झाला.बडा घर पोकळ वासा.वामनला हे दिसत होते.पण तो बोलू शकत नव्हता.अडाणी असून तो गावातील लग्नाकार्याला आचारी म्हणून जाऊन पैसे मिळवत होता.आपला भार तो घरावर टाकत नसे, शेतात देखील त्याने स्वतः खड्डे खणून आंब्याची रोपे लावली, कळश्या डोक्यावर घेवून तो पाणी घाली.घरातल्या सगळ्यांनी कष्ट केले पाहिजेत असे त्याला वाटे, पण सांगण्याचा त्याला अधिकार नव्हता.
बापू सगळ्यात धाकटा, काकूंचा लाडका.मॅट्रीकला नापास झाला.अण्णांनी राजांकडे शब्द टाकून संस्थानात त्याला कारकुनाची नोकरी मिळवून दिली.कारण परीक्षेला बसला तेंव्हाच त्याचे लग्न काकूंनी करायला लावले होते.आता चार पैसे मिळवणे क्रमप्राप्त होते.बापूची बायको देखील दोन मुले झाल्यावर गेली.तिचा मुलगा अवघा सहा महिन्यांचा होता.शेवटच्या आजारत ती वामनला म्हणाली होती,"वामनराव, तुम्ही मला मोठ्या भावासारखे, माझ्या मुलाला सांभाळाल ना? ह्यांचे दुसरे लग्न होईल, प्रत्येकाला आपला संसार. त्याच्याकडे तुम्ही बघा"
वामननेही या बाळाला जीव लावला.प्रत्येक माणसाला कुणावर तरी माया करायची ऊर्मी असते.या बाळच्या रुपाने वामनला ती व्यक्ती मिळाली.त्याने त्याचे लाड केले.
यथावकाश बापूचे दुसरे लग्न झाले.घराला त्यावेळी उतरती कळा लागायला सुरुवात झालेली होती.बापुरावांची हि बायको, काकी हुशार होती,व्यवहारी होती.फायनल पर्यंत शिकलेली देखील होती.तिला घराच्या अवस्थेची कल्पना आली. घरात वामन हा उपरा आहे, आपलेच नीट भागत नसताना हि बाहेरची ब्याद हवीय कशाला? असा तिचा स्वच्छ प्रश्ण होता. त्यातून तो बाळचे जास्त लाड करतो हि देखील टोचणारी बाब होती.काही ना काही कारण काढून काकी वामनशी भांडत. वामनने मागच्या परसदारी बरीच भाजी लावली होती. तो स्वतः पाणी घालून त्यांची देखभाल करी. घरात देवून उरलेली भाजी तो विकत असे. त्या्चे किरकोळ खर्च तो त्या पैशातुन भगवत असे. पण एक दिवस त्यावरुन काकी चिडल्या आमच्या परसातल्या भाज्या विकून ते पैसे तुम्ही घेता हे चुकीचे आहे, सगळे पैसे माझ्याजवळ दिले पाहिजेत असा त्यांनी फर्मान काढले.वामन वरुन घरात रोज भांडणे होत असत.

एक दिवस दुपारची वेळ होती, पोस्ट्मन घरात पत्र टाकून गेला.म्हसवडहून काकींच्या भावाचे पत्र होते.पत्र वाचून काकी पदराने डॊळे पुसू लागल्या.त्यांची थोरली जाऊ जवळ आली,म्ह्णाली,"काय लिहलय गं पत्रात ? काय झाल?"

" अहो माझा धाकटा भाऊ, डोक्याने जरा कमी आहे त्याला मोठ्या वहिनींनी घराबाहेर काढला. कुठे जाइल हो तो? डोक्यानं कमी हा काय त्याचा दोष आहे?"
"बघितलस, तुझ्या भावाला घराबाहेर काढल्यावर झालं ना तुला दुःख, हा वामन तसाच आहे हो! शिकला नाही बिचारा लहानपणापासून इथंच वाढलाय, त्याला कुणी नाही.या वयात कुठे जाईल बिचारा? मामंजींना ह्यांनी शब्द दिलाय आम्ही अर्धपोटी राहू पण आमच्या हयातीत आम्ही त्याला नाही हकलून दे्णार. तू पण तसे मनात आणू नको.त्याने ही या घरासाठी, इथल्या माणसांसाठी खूप केलयं. अगं भाकड गाईला , म्हाताऱ्या बैलालाही आपण सांभाळतो हा तर माणूस आहे, तुझ्या माझ्यासारखा आणि कष्ट करतोय तो, फुकट नाही ना खात. त्याला असं तोडून नको बोलत जाऊ. त्याच्यावरुन भरल्या घरात नको वाद घालू. घर फिरलं कि घराचे वासे फिरतात असं म्हणतात मात्र हा वामन इतकी वर्ष इनामेइतबारे आपल्या घरात राहतोयं, मी काही तु्झ्यासारखी शिकलेली नाही.पण मला अडाणीला वाटत ते बोलले हो, मोठेपणाचा मान देत असशील तर ऎक माझं एवढं"

तेंव्हापासून वामनला हकलण्याच्या गोष्टी कमी झाल्या, भांडणे संपली मात्र नाहीत.वामनराव अखेरपर्य़ंत त्या घरातच राहीले.फारसे आजारी न पाडता त्यांना मरण आले. त्यांच्या प्रामाणिकपणाची दखल अशा तऱ्हेने तरी देवाने घेतली म्हणायची.गेल्यावर त्यांचे शव उचलले, आणि त्यांच्या उशीखाली दहा-दहा रुपयांच्या चार-पाच नोटा मिळाल्या.आपल्या क्रियाकर्मांचे पैसे देखील त्यांनी ठेवले होते.

वामनरावांनी शेतात लावलेल्या आंब्याना कित्येक वर्षे शेकड्यांनी आंबे आले आणि पुढच्या दोन पिढ्यांनी ते आवडीने खाल्ले, पण त्यातल्या फार थॊड्या मुलांना ती झाडे लावणारा , जगवणारा माहित आहे. आपल्याला भरभरुन देणाऱ्या देवाचा आपल्याला विसर पडतॊ मग वामन सारख्या अनाथाची काय कथा?


©

Tuesday, May 4, 2010

गावाकडच्या गोष्टी

(माझ्या आईचे माहेरचे कुटुंब मोठे , तशी जुन्या काळातील सगळीच कुटुंबे मोठीच असत, एकत्र राहत असल्याने त्यांच्यात संबंध असत, भांडणे, भाऊबंधक्याही असत.तसेच माया, प्रेमही असे. माझ्या आईकडून तिच्या घराण्यातील सगळ्या काका-आत्यांच्या, मामा मावशांच्या कथा मी वारंवार ऎकलेल्या आहेत.
सध्या आई आजारी असते, कंपवाताने ती घराबाहेरही पडू शकत नाही.रेडीओखेरीज दुसरी करमणुक तिला नसते, तिच्याशी बोलताना आजार सोडून बोलणे कठीण असते, मग परवा मी पुन्हा तिला तिच्या बालपणात नेऊन त्या आठवणींमध्ये तिला रमवण्याचा प्रयत्न केला त्यातुन तिचा वेळ चांगला गेलाच पण मला देखील काही गोष्टी नव्यानेच समजल्या.तिने सांगितलेल्या काही घटना या तिलाही केवळ ऎकुनच माहित आहेत, आता तिच्या घराण्यातली सगळ्यात मोठी अशी तिच शिल्लक आहे, बाकिची मंडळी तिच्याहून लहानच असल्याने या गोष्टी केवळ गोष्टी म्हणूनच राहतील.गोदुची कथा त्या पैकीच एक. या गोष्टी ऎकताना मला पडलेल्या प्रश्णांची उत्तरे तिला तर नाहीच माहित पण ती कुणालाच माहित असणार नाहीत. तिने सांगितलेल्या गोष्टीमंधले कच्चे दुवे कल्पनेने जोडण्याचा माझा प्रयत्न आहे.
अशा कथानकांवर खर तर चांगल्या मालिकाही बनू शकतील, पण सध्या तरी त्या ब्लॉगवाचकांपर्यंत पोचाव्यात या साठी हा लेखन प्रपंच. )


जेवणीखाणी उरकेपर्यंत दोन वाजून गेले.मागचे आवरुन बायका जेवायला बसल्या त्यांचे आवरायला अजून अर्धा तास गेला.शेणगोळा उरकून माजघरात जरा आडवे व्हावे असे म्हणेपर्यंत तीनाचे ठोके पडले.लहान मुले बाहेर कालवा करत होती, त्यांना रागावून घरात आणले.आता मला निघायला हवं लक्ष्मी आईला म्हणाली.
"अगं जाशील काय घाई आहे एवढी?"
"नाही , तसं नाही पण उशीर नकॊ व्हायला"
"पण मी म्हणते आजच निघायचं काही नडलयं का? राहिली असतीस अजुन चार दिवस,कित्ती दिवसांनी आलीस, दोन वर्ष होवुन गेली असेतील ना? नानाच्या लग्नालाही आली नाहीस"
आत्ताच कशी आले माझं मला माहित, लक्ष्मी मनाशीच म्हणाली.मागच्या खेपेला राहिले आणि परत निघताना आबाच्या पाठीवर छोटा फोड झालेला होता, तो पाहिला होता, पण चावलं असेल काही डास, पिसू म्हणून लक्ष दिलं नाही.सासरी गेले आणि बघता बघता काट्याचा नायटा व्हावा तसा तो फोड वाढला.तांब्यांचं तामल पालथं घालावं अस ते गळू झालं , रात्र रात्र रडून मुलानं आकांत मांडला, तापानं अंग चटचटत होतं वेदनेने पोरगं कळवळत होतं. रामशास्त्री वैद्यांचं ऒषध आणलं पण गुण येत नव्हता.सासुबाईंच्या तोंडाचा पट्टा चालू होता, " माहेरी गेली कि दर खेपला असच होतं, पोरांकडे दुर्लक्ष करत असेल, त्या लोकांना तरी कुठे जावयाची पोराची कदर? आता ह्या पोराला कसलं दुखणं झालं म्हणायचं ! आंबाबाई तुच बघ गं! "
लक्ष्मीला काही सुचेना, मुलाच्या काळजीने जीव कळवळलेला , त्यात सासुबाईंच्या बोलांची भर.भर दुपारच्या उन्हात लक्ष्मीनं रामशास्त्रींचे घर गाठलं.
"शास्त्रीबुवा, काहीही करा, पण माझ्या मुलाला बरं करा" बोलताना तिचा स्वर रडवेला झाला होता.
"तुमच्या मुलाला काळ्पुळी झाली झाली आहे, एक प्रकारचे गळूच म्हणाना, पण त्याचे तोंड आतल्या बाजूस आहे, माझ्या जवळ एक जालीम उपाय आहे, करुन घेणार का?"
" काय वाट्टॆल ते करुन घेईन"
" मग मी आत्ताच येतो" त्यांनी बरोबर एक डबा घेतला.घरी आल्यावर त्या डब्यातुन त्यांनी लहान लहान असे सहा किडे बाहेर काढले.
"काय आहे ते?"
"या जळवा आहेत, त्या दुषित रक्त पिऊन टाकतील. " असे म्हणत त्यांनी गळवावर जळवांचा वेढा दिला. मी येईन परत असे सांगून शास्त्रीबुवा गेले. पाच दहा मिनिटांतच आबा शांत झाला. दोन -तीन तास झाले तशा त्या जळवा लठ्ठ फुगून गेल्या आणि गळू बसू लागले.
शास्त्रीबुवा परत आले.त्यांनी जळवा काढून घेतल्या त्या गळवावर कसलीशी माती लावली.चार दिवसांनी बाळ शांत झोपला,त्याचा तापही कमी झाला.
दोन दिवसांच्या उपायानी मुलगा बरा झाला, पुन्हा हसू खेळू लागला.
पण तुझ्या माहेरी मुलांची अबाळ होते असे पालुपद लक्ष्मीला सतत ऎकावे लागले.
नानाच्या लग्नाच्या वेळीही अशाच क्षुल्लक कारणाने तिला पाठवले नाही.सासर इतकी माहेरी सुब्बत्ता नव्हती. म्हणूनही तिकडे पाठवायला कुरकूर असायची.
यंदा बरीच वादावादी करुन तिने माहेरी जायची परवानगी मिळवली.वहिनीच्या डोहाळजेवणाचे निमित्त काढून आठ दिवस राहून येते असे सांगून ती आली होती. आठाचे पंधरा दिवस झालेच होते. उद्या आवस आणि सूर्यग्रहण. आज निघायलाच हवे. हरतालिका, गौरी गणपतीची तयारी लक्ष्मीपुढे घरची कामे दिसू लागली होती. रात्री आठ पर्यंत पोहचू.तिने आईला बजावले ,"आता नकॊ बाई आग्रह करुस.तिकडे गौरी गणपतीची तयारी राहिलीयं, परत इकडे यायला हवय ना मी? मग आज निघूदे"
" पण रात्री अपरात्री जाल, मुल, लहान धाकटी आहेत, जावई-बापू असते तर प्रश्ण नव्हता ,नाना परवाच मुंबईला गेला तात्या आणि अप्पा शिकायला पुण्याला तुला सोडायला यायला हि कुणी नाही गं"
"काही होत नाही, रस्ता नेहमीचा आहे, गणू घरचा गाडीवान आहे, मला कॊण खातय? वाटेत कुठे थांबणारही नाही चार तासात भोरला पोहचू."
मुलांना गाडीत बसवून लक्ष्मी निघाली.आईने वाटेत खायला ओल्या शेंगा उकडुन दिल्या होत्या, बेसनाचे लाडू,गूळपापडीचे लाडू,आल्याच्या वड्या आणि बरच काही.
सरत्या श्रावणाचे दिवस होते, हवेत गारवा होता,पाऊस उघडलेला होता. शेते हिरवीगार झाली होती. गाडीवाट ओली असल्याने धुरळाही उडत नव्हता.मुले गाडीत खुशीत होती.धाकटी अंबु तान्ही होती.तिला मांडीवर घेतले होते.बाकीची तिघं अवती भवती होती.बघता बघता शिवापूर आलं.ओढा ओलांडला की मोठा रस्ता लागेल, मग कापूरहोळचा फाटा. अगदीच वेळ झाला तर भाटघरला करु मुक्काम, लक्ष्मी मनाशी म्हणाली. ओढ्याला पाणी अंमळ जास्ती होते.
पाण्यात थोडं पुढं गेल्यावरच बैल बुजले.जागच्या जागी चुळबूळू लागले.गणूही गडबडला.म्हणाला,"वैनीसाबं, पान्याला लई ऒढं हाय, आपन माघारी जाउया का?, उद्याच्याला पहाटंच निगूया की, बैलं बी जाइना म्हणत्यात"
" गणू काही होत नाही, किती वर्षं गाडी हाकतोस? एवढ्या पाण्यानं काय झालय, उतरवलीच्या नाल्यात कमरे एवढ्या पाण्यातन गेलो आठवतय ना? आजच काय तुला धाड भरली, चल लवकर रात्र पडायच्या आत पोचायला हवं"
गणू बापडा हुकुमाचा ताबेदार, त्याने बैलांच्या पाठीवर कासरा ओढला आणि गाडी पुढं घातली.
पण वरच्या घळीतून जोरात पाण्याचा लोट आला अचानक, बघता बघता पाणी चाकांच्या वर गेलं, बैलगाडीत पाणी शिरु लागल, गाडी वेडीवाकडी झाली.लक्ष्मीच्या तोंडच पाणी पळालं. आधी हसून खेळणारी मुल अचानक पाणी बघून कावरी-बावरी झाली.अबा आणि अण्णा पाण्यातही खेळू लागले.
गणू बैलांना हाकत होता पण पाणी वाढत होत, गाडी बुडत होती, बैल दमले होते.
एवढ्यात समोरुन एक उंचापुरा काळा सावळा माणूस आला.बघता बघता तो पाण्यात शिरला.बैलांच जू त्याने बळकट हातान धरल. आपल्या हातात दोन मुलांना घेतलं आणि बैलांना जवळजवळ ऒढतच पलिकडे आणून ठेवलं, रडणाऱ्या लक्ष्मीला तो म्हणाला,"बहनजी डरॊ मत , कुछ नही होनेवाला"
पलीकडच्या काठावर येईपर्यंत पोरांची चिरगुटं भिजून चिंब झाली होती.बैलगाडीतली पोती , बसकरं भिजली होती, थंडीने आणि भितीनं सगळेच गारठले होते.
त्या माणसानं काटक्याकुटक्या आणल्या आणि पेटवून दिल्या तो गणूला म्हणाला, " इधर रुकना थोडी देर, बच्चोंके कपडे सुखादो बाद में चले जाना"
लक्ष्मीला वाटले प्रत्यक्ष देवदूतच आला माझ्या मदतीला, त्याला थोडा खाऊ द्यावा म्हणून तिने बोचकी सोडली , कडोसरीचा रुपया काढला, गणूला म्हणाली अरे त्याला थांबाव.भाषेचा प्रश्ण होता पण गणुच्या हाती त्याला सगळ द्यावं असा विचार करुन तिने चार-सहा लाडू एका कोरड्या फडक्यात बांधले, आजुबाजूला बघितले तो काय तो माणुस गायब! तिने गणूला हाक मारली, " अरे गणू तो माणूस गेला कुठे असा कसा रे तू , जरा त्याला थांबवायच नाही का?
गणूने धावत जावुन बघीतले पण छे ! त्या माणसाचा ठाव ठिकाणाच लागला नाही, मघारी येताना शेतात काम करणाऱ्या दोघा तिघांना गणूने विचारले
" इकडून एक उंच काळा माणूस गेलेला बघितला का? डोइला हिरवा रुमाल व्हता आणि दुसरीच भाषा बोलत होता"
लोक म्हणाले , "न्हाइ बा, न्हाई गेलं कुनी इकडुन पन तुम्ही सांगता त्यावरुन त्यो पिरच असावा, इथल्या मशीदितला आजवर ऎकलय बरचं. दिसतो त्यो, कुणाकुनाला, हां पर त्रास न्हाइ द्येत मदतच करतो म्हनं"
गणू हेच सांगत आला. लक्ष्मीनं शेकोटीवर मुलांचे कपडे शेकले होते. ती म्हणाली,"कुणी का असेना आज माझ्या मदतीला तो कृष्णा सारखा धावुन आला, माझा पाठीराखा"
भोरला येइतो रात्र बरीच झाली होती.मामलेदार साहेबांना बायका मुलं निघाल्याचा सांगावा मिळाला होता, अजून मंडळी कशी पोहोचली नाहीत म्हणून घरात सगळे काळजीत होते. शिवापूरच्या ऒढ्याला पाणी असेल तर ते उलटे माघारी गुंजवण्याला गेले असतील असे पण वाटुन गेले.
बैलांच्या घुंगरांचा आवाज आला.मुलं धावतच घरात आली.आजी माजघरात होती.अण्णा आजीला बिलगून म्हणाला,"आज्जी आम्ही केवढं पाणी बघितल माहितियं, माझ्या गळ्यापोत्तर पाणी आलं, भाऊ यडा रडायला लागला.आई पण रडली बैलगाडीत पाणी आल, कपडे भिजले"
झालं पोरट्यानं घात केला, चोंबडेपणान बोलायची काही जरुर होती का?
लक्ष्मीन काही बोलायचा अवकाश , मामलेदार साहेबांनी खुंटीवरचा पट्टा काढला आणि गरजले," गणू आधी इकडे ये"
" काय करताय तुम्ही?" लक्ष्मीने पुढे होवुन विचारलं
" दिसत नाही? पट्ट्यानं झॊडून काढतो याला,लेकराबाळांना घेउन आधी उशीरा निघाला आणि पाण्यात गाडी घातली कशी? साधी अक्कल नाही?"
गणू बिचारा थरथर कापत पुढे आला.
लक्ष्मी म्हणाली," थांबा, त्याची काही चूक नाही, मारायचच असेल तर मला मारा, तो म्हणत होता, परत फिरू, मीच हट्टानं गाडी पुढे घालायला लावली"
मामलेदार साहेबांनी हाततला पट्टा संतापाने खाली टाकला. माजघरातून त्यांच्या आईचा तोंडाचा पट्टा चालू झाला होता .लक्ष्मीच्या हट्टाचे कारण त्यांना समजले.

लगेचच्या खेपेला पुन्हा ती गुंजवण्याला गेली तेंव्हा आठवणीने तिने शिवापूरच्या मशिदीत चादर दिली . पुढे कधीही माहेरी जाताना शिवापूर आले कि लक्ष्मीला हा प्रसंग आठवायचाच आणि मशिदीपाशी तिचे हात नकळत जोडले जायचे.


©

Tuesday, April 27, 2010

गोदुची कथा

अखेर गोदुचं लग्न ठरलं. लग्न न जमण्याचं काही कारण नव्हतचं म्हणा.शंभरजणीत उठून दिसेल असं देखणं रुप होतं तिचं,शिवाय वडील मामलेदार. चौसोपी वाडा-शेती-वाडी. नोकर चाकर सगळ कसं यथास्थितं.पण तरी मुलीच लग्नं ही काळजीचीच बाब.आधी स्थळं समजणं, मग पत्रिका जुळणं , गोत्र, प्रवर नाडं, गुण जुळले पाहिजेत.जातीच्या बाहेर जाण्याचा प्रश्णचं येत नसे.हे सगळ बघताना मुलाचं वय, त्याचा स्वभाव, घरची परिस्थिती या गोष्टींकडे दुर्लक्ष होणारच. शेवटी कुठेतरी तडजोड हवीच. मुलीच्या आवडी -निवडीचा संबंध येतो कुठे? आणि लग्नाच्या गाठी या वरच बांधल्या जातात आपण काय निमित्त मात्र.आपल्या जातीतली, पत्रिका जुळणारी स्थळं शोधताना मुलीचं वय वाढुनही चालत नसे.जरा कुठे चौदावं संपुन पंधरावं लगतय अशी कुणकुण जरी लागली तरी प्रथमवर मिळण कठीण.गोदु दिसायला ऊंच थोराड बांध्याची म्हणूनच आईच्या जिवाला घोर होता, कोल्हापूरच्य़ा आंबाबाई जवळ रोज साकड घालणं चालायच, पोरीला चांगलं घर मिळूदे.

आंबाबाईनंच गाऱ्हाणं ऎकलं, बडोदा संस्थानच्या कोषाधिकाऱ्याशीच गोदुचं लग्न जमलं.मुलगा हुशार कर्तबगार.एवढ्या मोठ्या बडोदा संस्थानचा खजिनदार म्हणजे किती जोखमीच काम! सगळे म्हणाले पोरीनं नशीब काढलं. लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. दोन्ही घरच्या दागदागिन्यांच्या ओझ्यानी वाकलेल्या गोदुनी भरल्या डोळ्यांनी आईचा निरोप घेतला.
ऎंशी-नव्व्द वर्षांपूर्वीचा तो काळ. भोरहून बडोद्याला जाणं म्हणजे कित्ती लांबचा पल्ला! पुण्यापर्यंत बस, तिथुन पुढे मुंबई मग रेल्वेने बडोदा.गोदुबरोबर पाठराखणीला तिची बहीण होती तिचीच काय ती सोबत. पण दोघींनी पुण्यापर्य़ंतचा प्रवास देखील एकदाच केलेला, थोरल्या भावाच्या लग्नाच्या वेळेस.कुठे दूर देशी जाउन पडलॊ आपण, आता आपली माणसं कधी आणि कशी बघायला मिळतील? सासरची माणसं कशी असतील? नीट वागतील का आपल्याशी? अनेक प्रश्णांनी गोदुच्या डोक्यात काहुर मजवले होते.धाकट्या अंबुशी बोलावेसे वाटत होते, पण बोलायला सुचत नव्ह्ते.सासरच्या लोकांचे डॊळे आपल्यावरच रोखलेत, आपल्या प्रत्येक हलचालीवर कुणाची ना कुणाची नजर आहे या जाणीवेने गोदु मिटुन गेली होती.आपलं माणूस ज्याच्या साठी घरदार, आई-वडील भावंडांचा गोतावळा सोडून निघालो, त्याचा जवळपास पत्ताच नव्हता, अंतरपाट बाजुला झाल्यावर माळ घालताना ओझरतं पाहिलं.सप्तपदी चालताना मान वर करुन बघण्याची हिम्मतच नाही झाली.होमाच्या धुरा्ने डोळे चुरचुरत होते, अंगावरच्या शेल्याने जीव घुसमटत होता.छे,कित्ती आठवायचं म्हटलं तरी चेहरा नाहीच येत आहे डोळ्यापुढे. कसं होणार माझं? एकदाही नीट न बघितलेल्या माणसाबरोबर उभं आयुष्य घालवायचं? त्याच्या घराला आपल घर मानायचं? आधी त्याला आपलं मानता यायला हवं.
कुठे शिकवतात हे सगळ? चौथी पास झाल्यावर शाळा सुध्दा बंद झाली. करायचयं काय मुलीच्या जातीला जास्त शिकून?आपल्या घराण्याची रितच नाही तशी.मुलीच्या जातीने घरातले रिती-रिवाज कुळधर्म -कुळाचार शिकायला हवेत.तर्कबुध्दीने संसार करायला हवा. श्रावणातल्या सत्यनारायणाच्या पुजेची तयारी, हरताळकेच्या पुजेची तयारी, गणपतीच्या दिवसात त्याच्या पुजेची तयारी करण्यात वय वाढत गेले . स्वयंपाक करायला पण नाही शिकवला, सतत यांची सोवळी-ओवळी. मुलींनी फक्त वरकाम करायच. नैवेद्याचे झाले कि शेवटच्या दोन भाकरी कर, कुठे भाताचे तांदुळ धुवुन दे. दिवाळीच्या फराळात लाडू वळ तर कधी करंज्या कात.भाजी चिरणे, पान घेणे, उष्टी काढणे एवढीच कामे केलेली.लग्न ठरल्यावर आईला म्हटलं सुध्दा,’अगं मला स्वयंपाक तरी कुठे येतो सगळा?’तशी हसून म्हणाली,’तुझ्या घरी काही तुम्ही राजा राणी राहणार आहात का? सासवा-जावा आहेतच की, शिकशील त्यांच्याकडून पाण्यात पडलं की पोहायला येत.प्रत्येक घरातील करण्याची रितही निराळी सासरीच शिकावं लागतं.आणि मालूताई सांगत होत्या तुझ्या सासरचे एवढे श्रीमंत आहेत,स्वयंपाकाला बाई आहे कायमची.’ हिच आई मोठ्या वहिनींना स्वयंपाक येत नव्हता तर किती बोलायाची ! बाई एक शब्द उलट न बोलता मुकाट्यानं ऎकायच्या,पुन्हा तिला विचारत सगळं शिकल्या. कधीतरी मागच्या पडवीत हळूच डोळे पुसायच्या.भरल्या घरात रडायची पण चोरी. सुनेसाठी नियम वेगळे, आत्ता हे जाणवतयं, वहिनी पण बिचाऱ्या आपल्याशी किती मायेनी वागतात, त्यांना कधी निवांत बसलेलं बघितलेल नाही.आपल्या वन्सं आपल्याशी कशा वागतील? पण् आपल्याला त्यांच्यांशी आपल्या वहिनींसारखां प्रेमानं वागता यायला हवं.विचार करता करता कधी बडोदा आलं ते समजलचं नाही.

गोदु सासरी गेली, एक जबाबदारी मिटली.आता तिला पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी आणायची, दिवाळसण एक करायचा बाकी वर्षा-दोन वर्षांनी येईल माहेरपणाला. मामलेदार साहेब , गोदुचे वडील अचानक वारले त्यामुळे गोदुचे वर्षाकाठी होणारे माहेरपणही थांबले.मोठे भाऊ आबा यांना नुकत्याच आलेल्या एन्फ्ल्युएंझाच्या साथीच्या तापाचे निमित्त झाले. आणि तो सव्वा-सहा फुटी उंचापुरा माणूस माडीवर झोपायला गेला, तापाने दोन दिवस फणफणला आणि त्याचा मृत्युने घासच घेतला.जिन्यातून त्यांचे प्रेत खाली आणायलाही काय त्रास पडले! गोदुच्या आईवर असे एकामागोमाग एक धक्के बसत होते.गोदुला पत्रातुन या दुःखद वार्ता समजत होत्या.रडून रडून उशी ओली करण्यावाचून तिच्या हातात काहीच नव्हते.रात्री डोळे मिटले की आबा दिसत, वहिनींचा गोरापान चेहरा, त्यावरचे मॊट्ठे कुंकू , आता कशा दिसत असतील? त्यांना मुलगी झाल्याचे सुध्दा इतक्यातच समजले, अन् पाठोपाठ हि बातमी.आईला भेटायला जायचयं असं परवा ओझरतं म्हणायचा अवकाश,"तिकडं जाऊन काय साथीत मरायचय़ं?" "इथलं जगणं तरी काय वेगळं आहे?" गोदुच्या ऒठावर आलं होतं, पण बोलायची हिम्मत नव्हती. छोट्या अप्पाकडे बघून सगळं सहन करण भाग होतं.लग्नाला सहा वर्ष उलटतील येत्या वैशाखात.सहा वेळा सुध्दा माहेरी नाही जाता आले.तिकडेही अशा एकापाठोपाठ एक अशा दुदैवी घटना घडल्या की आपलं दुःख सांगुन त्यात भर घालणं नकोसं वाटलं. आणि आपलं दुःख सांगून त्याचा उपयोग किती झाला असता हा पण एक प्रश्ण होताच.एकदा सासरी गेलं की तेच घर आपलं, चुलीतलं लाकुड चुलीतच जळायला हवं.खायला प्यायला, ल्यायला पुरेसं असलं म्हणजे झालं, आणखी काय पाहिजे बाइच्या जातीला अशीच बोलणी सगळीकडे ऎकू यायची.मुलगा झाला की बाईच्या जन्माचं सार्थक. ते पहिल्या खेपेलाच झालं ,नाहीतरी सोन्याच्या मण्यासाठी दोरा सांभाळावा तसं आपल आयुष्य.संस्थान कुठलही असो, भोर काय नि बडोदा काय आपल्या आयुष्य़ात काय फरक पडतो?

लग्नानंतर थोड्याच दिवसात, घरातल्या स्वयंपाकीण बाईंच्या वागण्यातला बेताल पणा गोदुच्या नजरेत भरला.एरवी कडक वाटणारा आपला नवरा तिच्याशी अंमळ लाडात बोलतो हे तिला जाणवत होतं.त्या बाईंना देखील ह्यांच्या खाण्यापिण्याच्य़ा सगळ्या आवडी-निवडी पक्क्या माहित.आणि त्यांच्याबद्दल बोलतानाचा सूरही वेगळाच.गोदुच्या अंगाची लाही-लाही झाली.पण सांगणार कुणाला? जाब विचारावा इतकं नवऱ्याशी हक्काचं नातं झालच नव्हतं,पण चाललयं हे ठिक नाही एवढं तिच्या मनाला पक्क समजत होतं, दुपारी निवडा-टीपायला बायका यायच्या त्यांच्या बोलण्यात विषय असलेच,कुणा थोरा मोठ्यांच्या पुरुषांच्या रंगेलपणाच्या कथा हळू-कुजबुजत्या आवाजात, मधूनच सासुबाईंची फेरी तिकडे वळली की आवाज अजून लहान होत, त्यांच्या कानावर कुजबूज गेली की कधी त्या रागावित तर कधी म्हणत ,’पुरुषांना अंगवस्त्र असायचीच,पूर्वीचे राजे नव्हते चार चार राण्या करीत, आता रामासारखा एकपत्नी एखादाच., पुरुषांची कर्तबगारी बघावी, बाकी सगळं माफ आहे त्यांना’ त्यांचच अस मत मग त्यांना सांगून काहीच उपयोग नाही, एकूण हे दुःख सहन करायचं किंवा आपणच हिम्मत बांधुन त्यावर उपाय काढायचा.रडत बसून संसार करण गोदुला जमणार नव्हतं आपलं हक्काच नात आपण मिळवायच, फक्त ते कसं याचा विचार करत ती बसे.आदळआपट करुन किंवा भांडून तांडून काही होइलसे वाटत नव्हते, उगीच चार लोकात तमाशा आपली हानी अन् जगाच हसं असा प्रकार. प्रेमानेच हे साधता येइल.आपल्या सहनशीलतेने,मायेने, प्रेमाने आपण आपल्या माणसाला जिंकू असा तिला विश्वास होता.

भोरच्या घरावर आबांच्या अकाली मृत्यूने कुऱ्हाड कोसळली.त्यांच्या पाठचे भाऊ नोकरी निमित्ताने बाहेर गावी होते, त्यांचीही पहिली पत्नी बांळंतपणात वारली होती.घराचा कारभार , शेती वाडी, पै-पाहुणा, व्रत-वैकल्ये कोण बघणार? एवढ्या मोठ्या घराचा व्याप सांभाळायला आता मुंबईहून गजाननाला बोलावून घ्या असा गोदुच्या आईने धोशा लावला.गोदुच्या आईला सगळे काकू म्हणूनच संबोधत, बाई मोठी धीराची. नवरा, मुलगा, दोन सुना यांचे पाठोपाठ झालेले मृत्यूचं दुःख पचवणं सोपी गोष्ट नव्हतीच. आपोआपच येऊन पडलेली जबाबदारी त्यांनी धीराने झेलली.भाऊला इथे येऊन राहणे शक्य असले तरी त्याच्याच्याने हा गाडा रेटला जाणार नाही, त्याची प्रकृती नाजुक मन हळवं, इथे आता गजाननच हवा.गजाननाला अण्णा म्हणत, लगोलग पत्र धाडून त्याला कळवले,आईच्य़ा पत्रातील मजकुराचे गांभीर्य अण्णालाही जाणवले असणार, त्याला मुंबईच्या प्रेस मध्ये चांगली नोकरी होती.स्वतःच्या अंगभूत हुशारी आणि धडाडीने पुष्कळ गोष्टी करण्याची धमक होती, पण तो काळ असा होता कि वैयक्तिक विकास,करियर यापेक्षा आपले घर आपली माणसे यांच महत्त्व जास्त होतं आणि आपलेपणाच्या कक्षा फारच रूंद होत्या.मोठ्यांच्या शब्दाला मान देणे , एखाद्याला दिलेल्या शब्दासाठी जिवाचे रान करणे अशा संस्कारातुन मोठ्या झालेल्या अण्णाने पुढचा मागचा विचार न करता नोकरीचा राजिनामा दिला आणि भोरला प्रस्थान ठेवले.त्याच्या नोकरीचा अनुभव विचारात घेवुन राजांनी त्याला भोरच्या प्रेसचे काम सोपवले .घराची विस्कटलेली घडी लवकरच जागेवर आली.

त्याचवेळी बडोद्याहूने तार आली.गोदू अत्यवस्थ आहे.घरावर पुन्हा दुःखाचे सावट आले.अण्णांना प्रेसमध्ये बातमी समजताच घरी येवून पैसे घेवुन मिळेल त्या वाहनाने त्यांनी पुणे गाठले.बडोद्याला पोहोचले तेव्हा पहाट झाली होती.गोदु पलंगावर झोपली होती,खोलीभर माशा घॊंगावत होत्या,दुर्गंधी पसरली होती.तिचा चेहरा पांढरा फटक पडला होता."चार दिवस जुलाब होतायत, थांबायची लक्षणे नाहीत,वैद्य येवुन गेले, आम्ही म्हटल, तिच्या माहेरी कळवू, नंतर आम्हाला बोल नको”. अण्णांनी गोदुकडे बघितले,काय दशा झालीय पोरीची,कशामुळे झालय हे सारं? विचार करायला वेळ नव्हता, त्यांच्या मनाने घेतलं गोदुला इथुन हलवायची, मिरजेला त्यांच्या मोठ्या बहिणीचे यजमान डॉक्टर आहेत, मिरजेचं मिशनरी हॉस्पिटल चांगल आहे,तिथे योग्य ते उ्पचार होतील. इथे आपली कुणाशी ओळख नाही. आण्णांनी गोदुला मी घेवुन जातो असे सांगितले आणि स्पेशल गाडी करुन तिला मिरजेला आणली. डॉक्टर मेहुणे सुदैवाने घरातच होते निघायच्या तयारीत होते, त्यांना तार मिळाली नव्हती, अचानक गाडी दारात बघून त्यांना नवल वाटले, आण्णांनी थोडक्यात सगळा वृतांत सांगितला, गोदुला तपासून ते म्हणाले ’अरे हिला अन्नातुन विषबाधा झाली आहे.गाडी फारच उताराला लागलीय तू तिला इथे आणण्यापूर्वी थोडी चौकशी करायला हवी होतीस नेमके काय झाले असावे याची, मला यात घातपाताचा संशय येतो’ अण्णा म्हणाले,’मला तिच्या सासरच्या लोकांच्या बोलण्य़ावरुन जाणवले,पण तेवढा विचार करायला वेळ नव्हता,आधी तिच्यावर उपचार करणे महत्त्वाचे वाटले मला.’ गोदुला लगोलग हॉस्पिटलात हलवले,प्रयत्नांची शर्थ केली पण यश आले नाही. गोदुने अखेर पर्यंत आजारपणाचे कारण सांगितले नाही, ती एकतर अर्धवट शुध्दीत होती, माझ्या अप्पाला सांभांळा एवढाच जप तिने लावला होता.अण्णा कडे बघत क्षीण हसत ती म्हणाली होती,’फार वाट बघायला लावलीस रे, पण कुणीतरी माझं माणूस मला भेटलं, माझ्या अप्पाला सांभांळा.तुमच्या एवढ्या मोठ्या घरात त्याला कधीतरी आजोळची माया द्या’.

गोदुच्या निधनाची वार्ता घरी कशी कळवावी याचीच अण्णांना चिंता लागून राहीली.बडॊद्याला तार करुन कळविले.तिच्या सासरच्या मंडळींनी तुम्ही हलगरज केली असा कांगावा करायला सुरुवात केली, डॉक्टरांनी त्यांना सुनावले,’आमची मुलगी विषबाधेने गेली हे आम्ही सिध्द केले तर तुम्हाला बेड्या पडतील’
मग मात्र त्यांचा आवाज बंद झाला.गोदुच्या मृत्युचे रहस्य अखेरपर्य्ंत तसेच राहिले.ते समजूनही ती परत येणार नव्हती,तिच्या माहेरी कुणाला या गोष्टीची शहानिशा कराविशी वाटली नाही, कारण त्यांना त्यांची दुःखे फार झाली होती.

काकू, गोदुच्या आई मात्र कित्येक वर्षे म्हणत "माझी सोन्यासारखी लेक त्या दैत्यांनी मारली.नखात रोग नव्हता तिच्या." आपल्या नातवंडांना गोदुच्या आठवणी सांगून त्या टिपे गाळत.


©

Monday, January 25, 2010

अपघात

संध्याकाळचे सात वाजून गेलेले.नाशिकरोडला गाडी पोहोचली, सुधीर देशमुख आणि तुषारचे मोबाईल फोन वाजायला लागले.लाइफ लाईन हॉस्पीटलचा पत्ता विचारायला जागोजागी गाडी थांबत होती.घड्याळाचे काटे मंद, गाडीची गती त्याहूनही मंद वाटत होती.कधी एकदा हॉस्पीटलमध्ये जावुन प्रत्यक्ष पाहू असं वाटत असतानाच काय बघायला मिळणार आहे या भितीने अजून लांबच असल्यान बरही वाटत होतं. विचार करकरुन डोक्याचा भुगा झाला होता.कुठच्याही क्षणी फोन वाजला कि त्याहून जोरात छातीत धडधडे.सुधीर आणि तुषार मला समजणार नाही अशा बेतानं बोलत होते कि मला तसं वाटतं होतं कोण जाणे? आठ वाजून गेले असावेत, आमची गाडी हॉस्पीटलच्या आवारात शिरली, समोरुन फॅक्टरीतील लोकांचा घोळका आला. रमेशचे मित्र श्रीकांत जोशी तेवढे माझ्या ओळखीचे होते, ते फॅक्टरीतील नसल्याने जरासे दूर होते, त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीचे हसू नव्हते, पण आम्ही आल्यामुळे एक प्रकारचा सुटकेचा निःश्वास त्यांच्या चेहऱ्यावर जाणवला.
२५ मार्च २००३, माझे पती रमेश कंपनीच्या कामाकरीता त्यांच्या नाशिकच्या फॅक्टरीत जाण्यासाठी सकाळी साडेसहाला गाडी घेवून निघाले,त्यांच्या सोबत फॅक्टरीतील त्यांचे एक सहकारी देशपांडे देखील होते. मिटींग संपवून ते रात्री परत येणार होते.महिन्यातून नाशिक वा मुंबई अशा त्यांच्या नेहमीच फेऱ्या होत आणि ते स्वतःच गाडी चालवत.त्या दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे ऑफीसला गेले.सकाळी दहा पासून मी त्यांना मोबाईल वर फोन करत होते पण तो लागत नव्हता ,माझ्या मनात शंका -कुशंका येवू लागल्या, मी त्यांच्या पुण्यातील ऑफीसला फोन करुन नाशिकला ते पोहोचलेत का, तिकडे फोन करुन मला कळवा असे सांगितले फोन वरचे माझे बोलणे संपत नाही तोच त्यांच्या ऑफीसमधून सुधीर देशमुख आणि त्याचा सहकारी माझ्या ऑफिसमधे आले.त्यांनी मला रमेशच्या गाडीला अपघात झालाय आणि त्यांच्या पायाला लागलयं असं मोघमच सांगितले आपण नाशिकला जाउया असं म्हणाले. मुली शाळेतून घरी यायच्या होत्या, त्यांच्या वार्षिक परीक्षा चालू होत्या.सुधीर म्हणाले,"आपण मुलींना घरी सोडून मग जाऊ" घरी गेल्यावर मुलींना मोठ्या बहिणीकडे पाठवायचे ठरवले.२-४ कपडे, होते तेवढे पैसे घेउन आम्ही बाहेर पडलॊ.जाताना रमेशचा जवळचा मित्र तुषार याला घेऊन जायचे ठरवले, त्याला माझ्या आधीच या घटनेची माहिती झालेली होती आणि त्याने नाशिकला निघायची तयारीही केली होती.मला घटनेचे गांभीर्य जाणवू न देण्याचा त्यांचा प्रयत्न चालू होता.जाता जाता पुण्यातील त्यांच्य़ा फॅक्टरीत गेलॊ तेथे पर्सनल मॅनेजर पाटील आंम्हाला बघून म्हणाले," हे काय तुम्ही अजून इथेच, त्या देशपांड्याकडील लोक कधीच गेले, आणि रमेशचा C.T.scan केलाय, त्याची कंडीशन फारशी चांगली नाहीय. निघा तुम्ही ताबडतोब" हे ऎकुन हातापायातले त्राणच गेल्यासारखे वाटले.नाशिकच्या रस्त्याला लागलो.कुणीच कुणाशी बोलत नव्हतं.वेळ आणि रस्ता संपता संपत नव्हता.चार वाजता मी तुषारला म्हटलं,"कुणाला तरी फोन करुन C.T.scan चा रीपोर्ट विचारु या?"
त्याने फोन केला "रीपोर्ट ठिक आहे "असं समजताच गाडी थांबवून मला त्याने आणलेला डबा खायला लावला,त्या दोघांनीही थोडे थोडे खाऊन घेतले, चहा घेतला आणि पुढे निघालो.
आय.सी.यू.मधले तंग वातावरण. मी आत जाताच आतले नाशिकचे लोक अपघात कसा झाला सांगू लागले,अनेक जागी जखमा आणि नळ्यांमधून चेहरा दिसणे मुश्कील होते.औषधांची ग्लानी होती, C.T.scan चा रीपोर्ट नॉर्मल आला होता त्यामुळे काळजीचे कारण नाही असे सगळे मला सांगत होते.पुरुषांच्या वॉर्ड मध्ये मला राहता येणार नव्हते.सकाळ पासून डोक्यावर घेतलेला असह्य ताण,रमेशना योग्य वैद्यकीय मदत वेळेवर मिळालेली बघुन बराचसा कमी झाला.रात्री मला श्रीकांत जोशी त्यांच्या घरी घेवून गेले, तेथे गेल्यावर माझ्या डॉक्टर मैत्रीणीला फोन लावला,आता नाशिक मधील चांगले डॉक्टर शोधणे,जवळच्या नातलगांना या घटनेची माहिती देणे, मुलींची चौकशी आदी केले पाहिजे असे काही काही सुचू लागले.मन चिंती ते वैरी न चिंती म्हणतात ते किती खरं आहे याचा अनुभव मी प्रवासभर घेतला असल्याने प्रवासाचा शिण म्हणा ,विचारांमुळे आलेला थकवा म्हणा किंवा पेशंट्च्या खऱ्या अवस्थेच्या अनभिज्ञतेने म्हणा त्या रात्री मी गाढ झोपले.पहाटे पाच वाजता जाग आली,सुजाता , श्रीकांत जोशींची बायको जागीच होती रात्री ते मला सोडून परत हॉस्पीटलमध्ये गेले होते आणि तेथे झोपायला कुणी नसल्याने तेथेच थांबले होते.सकाळी साडेसहाला मी हॉस्पीटलमध्ये गेले.
सकाळी मला रमेशने ओळखले पण मी कधी आले,कशी आले काही विचारले नाही,हे माझ्या त्यावेळी लक्षात नाही आले, प्रत्येक मिनिटाला ते उठण्याचा प्रयत्न करीत, सलाइनच्या नळ्या उपसून टाकीत. मला फॅक्टरीत जायचयं आज मिटींग आहे. असं बोलू लागल्यावर माझा धीरच खचला. डॉक्टर राऊंडला आले, त्यांनी पुन्हा C.T.scan चा रीपोर्ट नॉर्मल आला होता त्यामुळे काळजीचे कारण नाही असे सांगितले."मग असे असंबध्द बोलायचे कारण काय? " असे मी धीर करुन विचारले त्यावर ते म्हणाले ,"मेंदुला सूज आली आहे, हॆड इंजुरीमुळे , औषधे चालू आहेत होईल कमी हळूहळू . बाकी हाडांचा चुरा झाला तरी चालतो, मेंदुच्या इजा बऱ्या होणे कठीण असते तुम्ही खूप लकी आहात थोडक्यात निभावले आहे,it was a major accident " डॉक्टरांचे आभार मानून मी पेशंट पाशी आले , "मला काय झालयं?" हा एकच प्रश्ण त्यांनी एक तासात किमान १०० वेळा विचारला , पुन्हा पुन्हा उठायला बघणे, कंपनीत जायचा हट्ट करणे एक ना दोन असे चमत्कारीक वागणे केवळ डॉक्टरांच्या अश्वासक बोलण्याने मी सहन करायला सुरुवात केली. नाशिक मधुन कंपनीतील लोकांची, ओळखीच्या,नात्यातल्या लोकांची भेटायला रीघ. प्रत्येकाला त्या घटनेची माहिती देणे,डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे आणुन देणे,मधेच फोन आला तर तो घेणे अशी अखंड धावपळ. मार्च एंडींग असल्याने कंपनीत कामाची धावपळ होती तरी कंपनीतून कोणी ना कोणी तरी संध्याकाळी येई आणि मला बळेच बाहेर पाठवी जरा बाहेर चक्कर मारून या तास भर आम्ही इथे बसतो. मी बाहेर पडे पण बाहेरही अखंड अस्वस्थच वाटे.आणि परक्या गावात जाणार तरी कुठे?
नाशिक सारख्या अनोळखी गावात माझे कुणीच जवळचे नातलग नव्हते पण मला जे अनुभव आले त्यामुळे आज नाशिक मला अनोळखी वाटत नाहीच पण ज्यांनी मला मदत केली ते नातलगांहून जवळचे झाले.आता वाटते नाशिकला होते म्हणूनच त्यातून निभावू शकले. आमच्या पुण्यातल्या वाड्यात राहणाऱ्या कुलकर्णी दादांचे नातेवाईक धर्माधिकारी, त्यांना दादा कुलकर्णींनी कळविले , समजल्या बरोबर ते हॉस्पीटलमध्ये आले.मला म्हणाले,"तू माझ्या घरी चल रहायला घरी आम्ही दोघे पती-पत्नी आणि माझी आई असतो मोठं घर आहे इथून जवळ आहे शिवाय मी रीटायर्ड आहे कधीही हॉस्पीटलमध्ये येऊ -जावु शकतो."मला त्यांनी घरी नेलेच.माझ्या चुलत वहिनीचे वडील असेच लगेच आले त्यांना तर मी चुलत भावाच्या लग्नानंतर त्याचवेळी बघीतले पण त्यांनी देखील असाच प्रेमळ आग्रह केला, मझ्या चुलत भावाचा मित्र नाशिकच्या नोटांच्या कारखान्यात मॅनेजर होता, तो आला तो ही म्हणाला माझ्या घरी चला. ’अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने’ मदतीच्या बाबतीत माझी अशी अवस्था झाली.प्रत्येक जण आपापल्या परीने मला मानसिक आधार देत होता.प्रत्येक जिल्ह्यात आमच्या ऑफीसचे दोन कर्मचारी(district informatics officers) जिल्हाधिकारी कार्यालयात असतात.मी पुण्यात माझ्या ऑफीसमध्ये कळविले होते.तेथून नाशिकच्या साळवींना माझ्या मैत्रीणीने कळवले.समजल्याबरोबर साळवे मला भेटावयास आले, त्यांनी सरकारी गेस्ट हाऊस मध्ये रुम्स बुक करुन दिल्या,आमच्या पुण्यातल्या लोकांना रहाण्यासाठी.शिवाय स्वतःची स्कुटर मला दिली.दररोज सकाळ संध्याकाळ येवुन चौकशी करीत.पुण्याहून माझे दोन चुलत दीर आणि दोघे परिचित माझ्या सोबत होते,रात्री झोपावयास त्यांच्यापैकी कुणीतरी अलटून पालटुन थांबत असे दिवसा मी असे.
रमेशच्या डोक्याला जबर दुखापत झाली होतीच.पण उजव्या मांडीच्या हाडाचे दोन तुकडे झालेले होते,पायाचे ऑपरेशन करणे गरजेचे होते,हे ऑपरेशनही मोठे होते,ते नाशिकला करुन मग पेशंट्ला पुण्याला न्यायचे कि पुण्याल नेवुन ऑपरेशन करायचे असा प्रश्ण होता.लाइफ लाईनच्या आय.सी.यू मधुन ७२ तासांनंतर बाहेर आल्यावर पुढील महत्त्वाचा निर्णय मला घ्यायचा होता.दुपारची वेळ होती.मी कुठलेसे पुस्तक वाचायचा प्रयत्न करीत होते,आय.सी.यू वॉर्ड मधील केरळी मेट्र्नने मला बोलावले.पेशंट साठी दोन शहाळी घेवुन ये म्हणाली.मी बाहेर जावुन २ शहाळी आणली.एकातील पाणी तिने पेशंटला प्यायला दिले.आणि दुसरे शहाळे फोडून त्यातले पाणी ग्लासमध्ये घालून मला जवळ बोलावले आणि म्हणाली ,’हे पाणी तू पी.सकाळ्पासून मी बघतीय तू या स्टूलावर बसून आहेस.स्वतःच्या तब्येतीची आबाळ केलीस तर त्याच्या कडे कशी बघणार?’ मला अगदी मोठ्या बहिणीसारखे जवळ घेत तिने पाणी प्यायला लावले.त्या क्षणी दोन दिवस थोपवलेला बांध फुटून मला रडू फुटले.कोण होती ती माझी? बरं ,त्या हॉस्पीटलमध्ये आय.सी.यू वॉर्ड्मधे सुध्दा १२ पेशंट होते सगळेच सिरीयस. या सगळ्या गदारॊळात तिचे माझ्या पेशंट्कडेच नाही तर माझ्यावर हि किती लक्ष होते.मला जवळ घेत ती माझी समजूत काढ्त होती.
पुण्यातल्या लोकांचे मत, पायाचे ऑपरेशन पुण्यात आणून करावे. फिजीशियचे मत पेशंटला ऑपरेशन झाल्याशिवाय हलवू नये,त्यात धोका आहे असे होते.नाशिक मधील प्रसिध्द अस्थितज्ञ डॉ.भरत केळकर यांचे नाव नाशिकच्या बऱ्याच लोकांनी सुचविले होते.त्यांनी लाइफ लाईन हॉस्पिटल मध्ये येवुन पेशंटला बघण्याची संमती दिली.ठरल्या प्रमाणे बरोबर संध्याकाळी सात वाजता त्यांची गाडी हॉस्पिटल मध्ये आली.पेशंट जवळ जाऊन त्यांनी अतिशय मृदू शब्दात त्यांची चौकशी केली,मात्र पेशंट बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हता. डॉक्टरांनी मला बोलावून घेतले. केसपेपर्स, x-ray पाहिले.आणि म्हणाले,’पेशंट्ची स्थिती सुधारल्याशिवाय ऑपरेशन करणे योग्य नाही.’
’पण मग किती दिवस थांबावे लागेल?’
’२ दिवस,४ दिवस कदाचित आठ दिवस सुध्दा मेंदूची सूज कमी झाली पाहिजे’
’ पण ऑपरेशन केल्या शिवाय पुण्याला नाही जाता येणार, आणि मला इथे जास्त दिवस रहाणे कठीण आहे’
’मग तुम्ही पेशंट्ची मेंदूची सूज कमी झाली कि पुण्याला जा, तिकडे जावून ऑपरेशन करा.’
’ते धोकादायक असते असे म्हणत होते दुसरे डॉक्टर’
’नाही, तसं काही नाही.मी स्वतः त्यांचा पाय व्यवस्थित पॅक करुन देतो, ती माझी जबाबदारी’
’आणि आम्ही इथंच थांबायच ठरवलं तर?’
’तर मी त्यांचे ऑपरेशन करेन.पण मला कल्पना आहे, पेशंटच्या घरच्या लोकांच्या काही अडचणी अशा असतात कि त्या डॉक्टरांजवळ बोलू शकत नाहीत.तुम्हाला पुण्याला जाऊन ऑपरेशन करणे सोयीचे ठरत असेल तर तसे करा.’
आपण आजकाल डॉक्टरांबद्द्ल बरचं बरं-वाइट ऎकतो,पैशासाठी पेशंटला टेस्ट्च्या नाना चक्रातून फिरवणाऱ्या गोष्टी ऎकतॊ,केळकर डॉक्टरांच्या बोलण्यातून मला त्यांचा पेशंटची प्रकृती आणि त्याच्या घरच्यांच्या अडचणींचा विचार महत्वाचा हे जाणवले,आणि त्या क्षणी मी नाशिकला त्यांच्या कडून ऑपरेशन करुन घेण्याचा निर्णय घेतला.
पुढे त्यांचे ऑपरेशन अतिशय व्यवस्थित झाले,डॉक्टर केळकरांच्या हॉस्पिटल मध्ये आम्हाला अतिशय उत्तम अनुभव आला.ऑपरेशन् नंतर चार पाच दिवसात त्यांनी पुण्याला पाठवण्याची व्यवस्था केली.
नाशिकच्या वास्तव्यात मला रमेशचे फॅक्टरीतले सहकारी,मित्र,नातेवाईक यांची एवढी मदत मिळाली की एकही क्षण मला एकटे वाटले नाही.एका जिवघेण्या अपघातातून रमेशना जीवदान मिळाले.’सकळ जनांचा करीतो सांभाळ तुज मोकलील ऎसे नाही’एकनाथांच्या या ओवीचे मला प्रत्यंतर आले, माझ्या प्रारब्धीचे भोग माझ्या सख्या सोयऱ्यांच्या रुपातील हरी मुळे सोसणे सुकर झाले.