Monday, January 25, 2010

अपघात

संध्याकाळचे सात वाजून गेलेले.नाशिकरोडला गाडी पोहोचली, सुधीर देशमुख आणि तुषारचे मोबाईल फोन वाजायला लागले.लाइफ लाईन हॉस्पीटलचा पत्ता विचारायला जागोजागी गाडी थांबत होती.घड्याळाचे काटे मंद, गाडीची गती त्याहूनही मंद वाटत होती.कधी एकदा हॉस्पीटलमध्ये जावुन प्रत्यक्ष पाहू असं वाटत असतानाच काय बघायला मिळणार आहे या भितीने अजून लांबच असल्यान बरही वाटत होतं. विचार करकरुन डोक्याचा भुगा झाला होता.कुठच्याही क्षणी फोन वाजला कि त्याहून जोरात छातीत धडधडे.सुधीर आणि तुषार मला समजणार नाही अशा बेतानं बोलत होते कि मला तसं वाटतं होतं कोण जाणे? आठ वाजून गेले असावेत, आमची गाडी हॉस्पीटलच्या आवारात शिरली, समोरुन फॅक्टरीतील लोकांचा घोळका आला. रमेशचे मित्र श्रीकांत जोशी तेवढे माझ्या ओळखीचे होते, ते फॅक्टरीतील नसल्याने जरासे दूर होते, त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीचे हसू नव्हते, पण आम्ही आल्यामुळे एक प्रकारचा सुटकेचा निःश्वास त्यांच्या चेहऱ्यावर जाणवला.
२५ मार्च २००३, माझे पती रमेश कंपनीच्या कामाकरीता त्यांच्या नाशिकच्या फॅक्टरीत जाण्यासाठी सकाळी साडेसहाला गाडी घेवून निघाले,त्यांच्या सोबत फॅक्टरीतील त्यांचे एक सहकारी देशपांडे देखील होते. मिटींग संपवून ते रात्री परत येणार होते.महिन्यातून नाशिक वा मुंबई अशा त्यांच्या नेहमीच फेऱ्या होत आणि ते स्वतःच गाडी चालवत.त्या दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे ऑफीसला गेले.सकाळी दहा पासून मी त्यांना मोबाईल वर फोन करत होते पण तो लागत नव्हता ,माझ्या मनात शंका -कुशंका येवू लागल्या, मी त्यांच्या पुण्यातील ऑफीसला फोन करुन नाशिकला ते पोहोचलेत का, तिकडे फोन करुन मला कळवा असे सांगितले फोन वरचे माझे बोलणे संपत नाही तोच त्यांच्या ऑफीसमधून सुधीर देशमुख आणि त्याचा सहकारी माझ्या ऑफिसमधे आले.त्यांनी मला रमेशच्या गाडीला अपघात झालाय आणि त्यांच्या पायाला लागलयं असं मोघमच सांगितले आपण नाशिकला जाउया असं म्हणाले. मुली शाळेतून घरी यायच्या होत्या, त्यांच्या वार्षिक परीक्षा चालू होत्या.सुधीर म्हणाले,"आपण मुलींना घरी सोडून मग जाऊ" घरी गेल्यावर मुलींना मोठ्या बहिणीकडे पाठवायचे ठरवले.२-४ कपडे, होते तेवढे पैसे घेउन आम्ही बाहेर पडलॊ.जाताना रमेशचा जवळचा मित्र तुषार याला घेऊन जायचे ठरवले, त्याला माझ्या आधीच या घटनेची माहिती झालेली होती आणि त्याने नाशिकला निघायची तयारीही केली होती.मला घटनेचे गांभीर्य जाणवू न देण्याचा त्यांचा प्रयत्न चालू होता.जाता जाता पुण्यातील त्यांच्य़ा फॅक्टरीत गेलॊ तेथे पर्सनल मॅनेजर पाटील आंम्हाला बघून म्हणाले," हे काय तुम्ही अजून इथेच, त्या देशपांड्याकडील लोक कधीच गेले, आणि रमेशचा C.T.scan केलाय, त्याची कंडीशन फारशी चांगली नाहीय. निघा तुम्ही ताबडतोब" हे ऎकुन हातापायातले त्राणच गेल्यासारखे वाटले.नाशिकच्या रस्त्याला लागलो.कुणीच कुणाशी बोलत नव्हतं.वेळ आणि रस्ता संपता संपत नव्हता.चार वाजता मी तुषारला म्हटलं,"कुणाला तरी फोन करुन C.T.scan चा रीपोर्ट विचारु या?"
त्याने फोन केला "रीपोर्ट ठिक आहे "असं समजताच गाडी थांबवून मला त्याने आणलेला डबा खायला लावला,त्या दोघांनीही थोडे थोडे खाऊन घेतले, चहा घेतला आणि पुढे निघालो.
आय.सी.यू.मधले तंग वातावरण. मी आत जाताच आतले नाशिकचे लोक अपघात कसा झाला सांगू लागले,अनेक जागी जखमा आणि नळ्यांमधून चेहरा दिसणे मुश्कील होते.औषधांची ग्लानी होती, C.T.scan चा रीपोर्ट नॉर्मल आला होता त्यामुळे काळजीचे कारण नाही असे सगळे मला सांगत होते.पुरुषांच्या वॉर्ड मध्ये मला राहता येणार नव्हते.सकाळ पासून डोक्यावर घेतलेला असह्य ताण,रमेशना योग्य वैद्यकीय मदत वेळेवर मिळालेली बघुन बराचसा कमी झाला.रात्री मला श्रीकांत जोशी त्यांच्या घरी घेवून गेले, तेथे गेल्यावर माझ्या डॉक्टर मैत्रीणीला फोन लावला,आता नाशिक मधील चांगले डॉक्टर शोधणे,जवळच्या नातलगांना या घटनेची माहिती देणे, मुलींची चौकशी आदी केले पाहिजे असे काही काही सुचू लागले.मन चिंती ते वैरी न चिंती म्हणतात ते किती खरं आहे याचा अनुभव मी प्रवासभर घेतला असल्याने प्रवासाचा शिण म्हणा ,विचारांमुळे आलेला थकवा म्हणा किंवा पेशंट्च्या खऱ्या अवस्थेच्या अनभिज्ञतेने म्हणा त्या रात्री मी गाढ झोपले.पहाटे पाच वाजता जाग आली,सुजाता , श्रीकांत जोशींची बायको जागीच होती रात्री ते मला सोडून परत हॉस्पीटलमध्ये गेले होते आणि तेथे झोपायला कुणी नसल्याने तेथेच थांबले होते.सकाळी साडेसहाला मी हॉस्पीटलमध्ये गेले.
सकाळी मला रमेशने ओळखले पण मी कधी आले,कशी आले काही विचारले नाही,हे माझ्या त्यावेळी लक्षात नाही आले, प्रत्येक मिनिटाला ते उठण्याचा प्रयत्न करीत, सलाइनच्या नळ्या उपसून टाकीत. मला फॅक्टरीत जायचयं आज मिटींग आहे. असं बोलू लागल्यावर माझा धीरच खचला. डॉक्टर राऊंडला आले, त्यांनी पुन्हा C.T.scan चा रीपोर्ट नॉर्मल आला होता त्यामुळे काळजीचे कारण नाही असे सांगितले."मग असे असंबध्द बोलायचे कारण काय? " असे मी धीर करुन विचारले त्यावर ते म्हणाले ,"मेंदुला सूज आली आहे, हॆड इंजुरीमुळे , औषधे चालू आहेत होईल कमी हळूहळू . बाकी हाडांचा चुरा झाला तरी चालतो, मेंदुच्या इजा बऱ्या होणे कठीण असते तुम्ही खूप लकी आहात थोडक्यात निभावले आहे,it was a major accident " डॉक्टरांचे आभार मानून मी पेशंट पाशी आले , "मला काय झालयं?" हा एकच प्रश्ण त्यांनी एक तासात किमान १०० वेळा विचारला , पुन्हा पुन्हा उठायला बघणे, कंपनीत जायचा हट्ट करणे एक ना दोन असे चमत्कारीक वागणे केवळ डॉक्टरांच्या अश्वासक बोलण्याने मी सहन करायला सुरुवात केली. नाशिक मधुन कंपनीतील लोकांची, ओळखीच्या,नात्यातल्या लोकांची भेटायला रीघ. प्रत्येकाला त्या घटनेची माहिती देणे,डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे आणुन देणे,मधेच फोन आला तर तो घेणे अशी अखंड धावपळ. मार्च एंडींग असल्याने कंपनीत कामाची धावपळ होती तरी कंपनीतून कोणी ना कोणी तरी संध्याकाळी येई आणि मला बळेच बाहेर पाठवी जरा बाहेर चक्कर मारून या तास भर आम्ही इथे बसतो. मी बाहेर पडे पण बाहेरही अखंड अस्वस्थच वाटे.आणि परक्या गावात जाणार तरी कुठे?
नाशिक सारख्या अनोळखी गावात माझे कुणीच जवळचे नातलग नव्हते पण मला जे अनुभव आले त्यामुळे आज नाशिक मला अनोळखी वाटत नाहीच पण ज्यांनी मला मदत केली ते नातलगांहून जवळचे झाले.आता वाटते नाशिकला होते म्हणूनच त्यातून निभावू शकले. आमच्या पुण्यातल्या वाड्यात राहणाऱ्या कुलकर्णी दादांचे नातेवाईक धर्माधिकारी, त्यांना दादा कुलकर्णींनी कळविले , समजल्या बरोबर ते हॉस्पीटलमध्ये आले.मला म्हणाले,"तू माझ्या घरी चल रहायला घरी आम्ही दोघे पती-पत्नी आणि माझी आई असतो मोठं घर आहे इथून जवळ आहे शिवाय मी रीटायर्ड आहे कधीही हॉस्पीटलमध्ये येऊ -जावु शकतो."मला त्यांनी घरी नेलेच.माझ्या चुलत वहिनीचे वडील असेच लगेच आले त्यांना तर मी चुलत भावाच्या लग्नानंतर त्याचवेळी बघीतले पण त्यांनी देखील असाच प्रेमळ आग्रह केला, मझ्या चुलत भावाचा मित्र नाशिकच्या नोटांच्या कारखान्यात मॅनेजर होता, तो आला तो ही म्हणाला माझ्या घरी चला. ’अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने’ मदतीच्या बाबतीत माझी अशी अवस्था झाली.प्रत्येक जण आपापल्या परीने मला मानसिक आधार देत होता.प्रत्येक जिल्ह्यात आमच्या ऑफीसचे दोन कर्मचारी(district informatics officers) जिल्हाधिकारी कार्यालयात असतात.मी पुण्यात माझ्या ऑफीसमध्ये कळविले होते.तेथून नाशिकच्या साळवींना माझ्या मैत्रीणीने कळवले.समजल्याबरोबर साळवे मला भेटावयास आले, त्यांनी सरकारी गेस्ट हाऊस मध्ये रुम्स बुक करुन दिल्या,आमच्या पुण्यातल्या लोकांना रहाण्यासाठी.शिवाय स्वतःची स्कुटर मला दिली.दररोज सकाळ संध्याकाळ येवुन चौकशी करीत.पुण्याहून माझे दोन चुलत दीर आणि दोघे परिचित माझ्या सोबत होते,रात्री झोपावयास त्यांच्यापैकी कुणीतरी अलटून पालटुन थांबत असे दिवसा मी असे.
रमेशच्या डोक्याला जबर दुखापत झाली होतीच.पण उजव्या मांडीच्या हाडाचे दोन तुकडे झालेले होते,पायाचे ऑपरेशन करणे गरजेचे होते,हे ऑपरेशनही मोठे होते,ते नाशिकला करुन मग पेशंट्ला पुण्याला न्यायचे कि पुण्याल नेवुन ऑपरेशन करायचे असा प्रश्ण होता.लाइफ लाईनच्या आय.सी.यू मधुन ७२ तासांनंतर बाहेर आल्यावर पुढील महत्त्वाचा निर्णय मला घ्यायचा होता.दुपारची वेळ होती.मी कुठलेसे पुस्तक वाचायचा प्रयत्न करीत होते,आय.सी.यू वॉर्ड मधील केरळी मेट्र्नने मला बोलावले.पेशंट साठी दोन शहाळी घेवुन ये म्हणाली.मी बाहेर जावुन २ शहाळी आणली.एकातील पाणी तिने पेशंटला प्यायला दिले.आणि दुसरे शहाळे फोडून त्यातले पाणी ग्लासमध्ये घालून मला जवळ बोलावले आणि म्हणाली ,’हे पाणी तू पी.सकाळ्पासून मी बघतीय तू या स्टूलावर बसून आहेस.स्वतःच्या तब्येतीची आबाळ केलीस तर त्याच्या कडे कशी बघणार?’ मला अगदी मोठ्या बहिणीसारखे जवळ घेत तिने पाणी प्यायला लावले.त्या क्षणी दोन दिवस थोपवलेला बांध फुटून मला रडू फुटले.कोण होती ती माझी? बरं ,त्या हॉस्पीटलमध्ये आय.सी.यू वॉर्ड्मधे सुध्दा १२ पेशंट होते सगळेच सिरीयस. या सगळ्या गदारॊळात तिचे माझ्या पेशंट्कडेच नाही तर माझ्यावर हि किती लक्ष होते.मला जवळ घेत ती माझी समजूत काढ्त होती.
पुण्यातल्या लोकांचे मत, पायाचे ऑपरेशन पुण्यात आणून करावे. फिजीशियचे मत पेशंटला ऑपरेशन झाल्याशिवाय हलवू नये,त्यात धोका आहे असे होते.नाशिक मधील प्रसिध्द अस्थितज्ञ डॉ.भरत केळकर यांचे नाव नाशिकच्या बऱ्याच लोकांनी सुचविले होते.त्यांनी लाइफ लाईन हॉस्पिटल मध्ये येवुन पेशंटला बघण्याची संमती दिली.ठरल्या प्रमाणे बरोबर संध्याकाळी सात वाजता त्यांची गाडी हॉस्पिटल मध्ये आली.पेशंट जवळ जाऊन त्यांनी अतिशय मृदू शब्दात त्यांची चौकशी केली,मात्र पेशंट बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हता. डॉक्टरांनी मला बोलावून घेतले. केसपेपर्स, x-ray पाहिले.आणि म्हणाले,’पेशंट्ची स्थिती सुधारल्याशिवाय ऑपरेशन करणे योग्य नाही.’
’पण मग किती दिवस थांबावे लागेल?’
’२ दिवस,४ दिवस कदाचित आठ दिवस सुध्दा मेंदूची सूज कमी झाली पाहिजे’
’ पण ऑपरेशन केल्या शिवाय पुण्याला नाही जाता येणार, आणि मला इथे जास्त दिवस रहाणे कठीण आहे’
’मग तुम्ही पेशंट्ची मेंदूची सूज कमी झाली कि पुण्याला जा, तिकडे जावून ऑपरेशन करा.’
’ते धोकादायक असते असे म्हणत होते दुसरे डॉक्टर’
’नाही, तसं काही नाही.मी स्वतः त्यांचा पाय व्यवस्थित पॅक करुन देतो, ती माझी जबाबदारी’
’आणि आम्ही इथंच थांबायच ठरवलं तर?’
’तर मी त्यांचे ऑपरेशन करेन.पण मला कल्पना आहे, पेशंटच्या घरच्या लोकांच्या काही अडचणी अशा असतात कि त्या डॉक्टरांजवळ बोलू शकत नाहीत.तुम्हाला पुण्याला जाऊन ऑपरेशन करणे सोयीचे ठरत असेल तर तसे करा.’
आपण आजकाल डॉक्टरांबद्द्ल बरचं बरं-वाइट ऎकतो,पैशासाठी पेशंटला टेस्ट्च्या नाना चक्रातून फिरवणाऱ्या गोष्टी ऎकतॊ,केळकर डॉक्टरांच्या बोलण्यातून मला त्यांचा पेशंटची प्रकृती आणि त्याच्या घरच्यांच्या अडचणींचा विचार महत्वाचा हे जाणवले,आणि त्या क्षणी मी नाशिकला त्यांच्या कडून ऑपरेशन करुन घेण्याचा निर्णय घेतला.
पुढे त्यांचे ऑपरेशन अतिशय व्यवस्थित झाले,डॉक्टर केळकरांच्या हॉस्पिटल मध्ये आम्हाला अतिशय उत्तम अनुभव आला.ऑपरेशन् नंतर चार पाच दिवसात त्यांनी पुण्याला पाठवण्याची व्यवस्था केली.
नाशिकच्या वास्तव्यात मला रमेशचे फॅक्टरीतले सहकारी,मित्र,नातेवाईक यांची एवढी मदत मिळाली की एकही क्षण मला एकटे वाटले नाही.एका जिवघेण्या अपघातातून रमेशना जीवदान मिळाले.’सकळ जनांचा करीतो सांभाळ तुज मोकलील ऎसे नाही’एकनाथांच्या या ओवीचे मला प्रत्यंतर आले, माझ्या प्रारब्धीचे भोग माझ्या सख्या सोयऱ्यांच्या रुपातील हरी मुळे सोसणे सुकर झाले.

Wednesday, December 9, 2009

कुसुम मावशी

सोमवार दि.१४/९ रोजी संध्याकाळी कुसुम मावशी कालवश झाली.महाजन्यांच्या घराण्यातील थोरली माहेरवाशीण गेली. मावशी त्या मानाने तब्येतीने खुपच चांगली होती.शेवटपर्यंत हिंडत फिरत होती. अंघोळ आदि आन्हिकेहि तिची तिच करत होती.पण तरीही वयपरत्वे त्रास होतोच. प्रत्येकजण आपापल्या व्यापात या लोकांसाठी द्यायला वेळ कुणाकडे नाही आणि त्यांना वेळेशिवाय दुसऱ्यांकडून काहीच नको असते.मग त्यांची तगमग आणि आपल्या सरख्यांची अगतिकता.
मावशी खुपच हौशी होती. आमचे दादा तर तिला हौशी मावशीच म्हणत.जगण्यातला आनंद भरभरुन घ्यायचा आणि इतरांनाही तो मिळावा म्हणून मदत करायची हा तिचा स्वभाव होता आणि तिला कुणी इतर, परके नव्हतेच.सगळे तिचे स्वतःचेच होते.म्हणून स्वतःला सख्खे भावंडं नसताना चुलत,मावस,आते भावंडांना तिने जवळ केले.आणि आपल्या आठ मुलांच्या संसाराच्या पसाऱ्यात सगळ्यांना सामावून घेतले.शुक्रवार पेठेतल्या मावशीच्या घराचे दार कायम उघडेच असे.घरात अखंड माणसांचा राबता.जेवायच्या वेळी तिच्या घरी गेलेली व्यक्ती जेवल्याखेरीज बाहेर जात नव्हती.किंबहुना कुठल्याही वेळेला तिच्या घरी गेलेली व्यक्ती जेवल्याशिवाय जात नव्हती. मंगल वहिनी, निर्मला वहिनी यांच्या मंगळागौरी मला आठवतात.रात्री दहा पर्यंत जेवणं चालली होती नंतर रात्रभर जागरणं. रात्री २-३ नतंर खेळून दमल्यावर गप्पा, नकला मजाच मजा.सगळे सण -वार कार्यक्रम अगदी दणक्यात.सतत कुणाना कुणाला तरी केळवण, कुणाचे डोहाळ्जेवण मावशी अगदी प्रेमाने करायची.महाजन्यांच्या घरातील सर्वांच्या अडीअडचणी मावशीच्या घरी सोडवल्या जात. आम्ही सहकारनगर मध्ये रहायचॊ.सुट्टीच्या दिवशी गावात कधी गेलो तर मावशी कडे जायचोच.आईला तर ती तिच्या आईच्या जागीच होती.एक तर आईपेक्षा ती असेल १८ ते २० वर्षांनी मोठी.आई लहानपणापासून तिच्याकडे बरेचदा राहिलेली.कुसुमताई तिला लहानपणी परकर पोलकं शिवायची हे ती कायम सांगते.आईच्या छोट्या मोठ्या हौशी कुसुमताईने पुरविल्या.अण्णांबद्दल तर आईला कोण अभिमान! कुसुमताई आणि अण्णांना आईच्या आयुष्यात फार मोठं स्थान आहॆ.तिच्या सगळ्या सुख दुःखाच्या प्रसंगांना ते कायम धावून आलेले आहेत. त्यामुळे सहाजिकच आमच्याही मनात कुसुम मावशीचे स्थान वेगळॆच, शब्दात न सांगण्याजोगे.आईला पुरानंतर त्या उभयतांनी आणि श्रीकांतदादा,अरुण दादांनी जी मदत केली त्याला तोड नाही.त्यांनी दिलेला मानसिक आधार फार मोठा होता.आमच्या तिघींच्या लग्नातही त्यांनी आपल्या घरचे कार्य समजून मदत केली, हे ऋण आम्ही कधीच विसरु शकत नाही, ते न फेडता येणारे आहे आणि त्यात राहण्यातच समाधान आहे.मावशीने सगळ्यांसाठी इतकं केलयं कि तिच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी प्रार्थनेची आवश्यकता नाही.
मावशीला शिकायला नाही मिळाले पण शिक्षणाविषयी तिला फार आदर.स्वातीचा लेक अमेरीकेला गेला, मंदाची वृषाली पॅथॊलॉजी शिकली, दादाचा लेक लंडनला गेला हे केवढ्या अभिमानानं ती सांगत असे.तिची मुलेही हुशार होती, परिस्थितीमुळे त्यांना म्हणावे तसे शिकता आले नाही.पण विद्यापिठातल्या मोठ्या डिग्र्य़ा नसल्या तरी जगाच्या शाळेत पहिले नंबर मिळतील असे सगळ्यांचे कर्तॄत्व आहे.कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्याची धमक, पटकन कुणाच्याही उपयोगी पडण्याची वृत्ती,पडतील ते कष्ट करण्य़ाची तयारी,धडाडी आणि जीवनाचा आस्वाद घेण्याचा स्वभाव असे अत्यंत दुर्मीळ गुण त्या सगळ्यांमध्ये पुरेपूर आहेत. त्यांच्या घरी मी असंख्य वेळ गेलीय, पण कुणी कधी दुर्मुखलेला, वैतागलेला , हताश्, निराश नाही बघितला.पटले नाही तर एकमेकांशी भांडतील,आरडाओरडा करतील आणि नंतर पुन्हा एकत्र येतील, उगीच एखाद्याबद्दल मनात राग धरुन कुढणॆ,कोणाच्या बद्द्ल मनात किल्मिश् बाळगणे नाही.वरवर् एखाद्याशी गोड बोलणे आणि पाठीवर त्याला शिव्या घालणॆ असा प्रकार नसल्याने मावशीचे घर कायम प्रसन्न असते. आई वडिलांकडून त्यांना मिळालेल्या या सुसंस्काराच्या ठेवीची कुठल्याही इस्टेटिशी तुलना होवूच शकत नाही.मावशी आणि अण्णांचे गुण , संस्कार जपणारी आमची हि भावंडे आहेत. मावशीची उणीव त्यामुळे जाणवणार नाही. मात्र त्यांचे अश्रू पुसण्याइतके आमचे हात समर्थ नाहित याची फार खंत वाटते.

Thursday, October 29, 2009

ते श्रीमंत दिवस

पुण्याविषयी आणि पुणेकरांविषयी इतकं लिहिलं गेलयं कि काही बोलायची सोय नाही. आता पुण्याचा चेहरा मोहरा बदलत चाललाय शिवाय वाढत्या आय.टी सेक्टर आणि नवनव्या शिक्षण संस्था तसेच नवनवे शैक्षणिक अभ्यासक्रम यामुळे अमराठी लोकांच्या पुण्यावरील अतिक्रमणामुळेही पुण्याच्या हवेइतकच पुण्य़ाचं पुणेरीपण जात चाललयं(पूर्वीचं पुणं राहिल नाही हे म्हणणारी ,पुण्याचा अभिमान बाळगणारी मी मात्र अस्सल पुणेकरच) बदल हे होतच राहणार.नोकरीच्या, व्यवसायांच्या संधींसाठी नाना ठिकाणांहून लोक ही येणार.पुण्यात राहून पुण्याला आणि पुणेकरांना नावे ठेवणारी मराठी आणि अमराठी माणसं पुणं काही सोडत नाहीत, एक दोन वर्षात पुण्यात घर घेतात.
पुण्यात राहण्याचा मला मिळालेला फायदा म्हणजे लहानपणी बघायला मिळालेले अनेक उत्तमोत्तम कार्यक्रम आणि मोठमोठ्या व्यक्तिंची दर्शन! त्यावेळी वसंत व्याख्यानमालेत होणारी व्याख्यान असोत, की न्यू इंग्लिश स्कूलच्या पटांगणावरील गीत रामायण असो, बाबासाहेब पुरंदऱ्या्चं शिवचरीत्र,शिवाजीराव भोसल्यांची व्याख्यानं, पु.ल देशपांड्यांची भाषणं तसेच व्यंकटेश माडगूळकर,द.मा.मिरासदार आणि शंकर पाटील या त्रयीचं कथाकथन असे किती प्रसंग सांगावेत?
मुक्तांगण बालविकास केन्द्र नवाची इमारत सहकारनगर मध्ये झाली त्याच्या साठी पु.ल.देशपांड्यांनी देणगी दिली होती.त्याच्या उद्घाट्न सोहळ्य़ाला पु.ल. येणार हि बातमी आमच्या येथे बरेच दिवस गाजत होती. सकाळी लवकर उठून आम्ही त्या कार्यक्रमाला आठ पासून जागा धरुन बसलो होतो.पु.लं.च ते पहिलं दर्शन आजही माझ्या लक्षात आहे.मी त्यावेळी तिसरी-चौथीत असेन ,त्यांचे भाषण काही सगळे समजले असेल असे नाही.पण 'इथे मुलांना कुणी गप्प बसा असे म्हणु नका, त्यांना नाचू दे,गाणं शिकू दे,चित्र काढू दे ,आपल्याकडे मुलांसाठी म्हणून काही केले जात नाही गोकुळाष्ट्मी हा वास्तविक मुलांचा सण, पण दहिहंडी फॊडायला चाळीस-चाळीस वर्षांचे बाप्ये असतात मला म्हणायचयं तुम्ही कराना धृतराष्ट्र जयंती मुलांच्या खेळात का येता?' असं ते बोललेले अजून आठवणीत आहे.माझ्या मनाला ते भाषण जे भिडलं कि त्या नंतर पु.ल माझं दैवतच बनले! दूरदर्शन चा जमाना त्यावेळी आलेला नव्हता, रेडीओवर ऎकलेली व्यक्ती प्रत्यक्ष बघायला मिळणं म्हणजे पर्वणीच वाटे.
वसंत व्याख्यान मालेमध्ये दरवर्षी मोठ्मोठ्या वक्त्यांची विविध विषयावर व्याख्याने होतं , अजूनही ती परंपरा चालू आहेच.मे महिन्याची सुट्टी असे, मग रोज 'सकाळ' आला कि आधी आज कोणाचे व्याख्यान आहे ते बघायचं आणि विषय किंवा वक्ता ओळखीचा असला की जायचं ऎकायला.'शिवाजी राव भोसल्यांची व्याख्यान'तिथेच प्रथम ऎकली.त्यांची शिवाजी, बाजीराव, रामदास ,विवेकानंद, योगी अरविंद अशा नाना विषयांवरची व्याख्यान ऎकताना भान हरपायचचं, पण त्यांची ओघवती वाणी,त्यांचा प्रत्येक व्यक्तिरेखेचा सखॊल अभ्यास,त्यांची स्मरणशक्ती या सगळ्याचं अतोनात कौतुक वाटायचं आणि व्याख्यान संपल्यावर एका अद्भुत जगतात जाऊन आल्यासारखं वाटायच, नंतरचे २-३ दिवस त्याच धुंदीत जायचे.रवींद्र नाथांवरील पु.लंची तीन व्याख्याने अशीच टिळक स्मारक मंदिरात अकस्मिक पणे ऎकायला मिळाली.अकरावीत एस.पी.कॉलेजमध्ये होते मी त्या वेळी ,कुणीतरी बोलताना ऎकलं आज पासून तीन दिवस टिळक स्मारक मंदिरात पु.लंची व्याख्याने आहेत.कॉलेज सुटल्यावर परस्पर तिकडेच धावलो आम्ही दोन -तीन मैत्रिणी साडेसात पावणेआठला भाषण संपल्यावर घरी गेलो,घरी काहीच महिती नसल्याने जरा रागवा रागवी झालीच असेल पण उशीर होण्याचे कारण समजल्यावर आईचा राग गेला, आणि त्या एवढ्या सुंदर व्याख्यानाच्या आनंदात बाकी सगळे कःपदार्थ होते.
मी नववीत असताना शिक्षकांचा प्रदीर्घ संप झाला होता,बेमुदतच होता तो, थोडे थोडके नाही तब्बल बावन्न दिवस चालला.हि सुट्टी मात्र तशी कंटाळवाणी ठरली असती कारण कुठल्या दिवशी शाळा सुरु होईल ह्याचा नेम नसल्याने घर सोडणे शक्य नव्हते,दिवाळीच्या सुट्टी नंतर संप झाल्याने गॅदरींग, ट्रीप सगळे बुडले,आणि माझ्या बाबतीत तर आमचे दादा ही राज्य शासनाचे कर्मचारी असल्याने ते ही संपावर! त्यामुळे घरात अभ्यास करत बसावे लागे, त्यांना हि इतका रिकामा वेळ बहुदा पहिल्यांदाच मिळाला असावा , एरवी ते घरी यायचे तेंव्हा रात्र झालेली असे.दादांनी बीजगणित ,भूमिती सगळे पुस्तक शिकवून एकूण एक गणिते सोड्वून घेतली(नववीच्या पुस्तकातले २ धडे दहावीला होते हे नंतर कळले)पण तरीही सुट्टी कंटाळवाणी न होण्याचे कारण त्याच वर्षी पुण्यात मराठी साहित्य संमेलन झाले होते आणि शाळेला सुट्टी असल्याने मी ३ दिवस सकाळ संध्याकाळ गरवारे कॉलेजच्या पटांगणावर पडीक होते.भाषणे, परीसंवाद, कवी-संमेलन कसली धमाल! पु.भा.भावे अध्यक्ष होते , ग.दि.माडगूळकर,मंगेश पाडगावकर, कवी अनिल,शांता शेळके अशा कित्ती कित्ती लोकांना जवळून बघायला मिळालं! एका लहानश्या डायरीत बऱ्याच जणांच्या सह्या देखील मिळवल्या, 'नावं काय तुझं? काय शिकतेस?' एवढे प्रश्ण त्यांच्या पैकी काहींनी विचारले तरी लेखक आपल्याशी बोलले या आनंदाते अस्मान ठेंगणं होवुन जायचं! ना.धॊं.महानोरांनी गाऊन दाखवलेल्या कवितांनी ,पाडगावकरांच्या सलाम कवितेच्या वाचनाने अंगावर उठलेले रोमांच आजही आठ्वतात.एकही पैसा न खर्चता मिळालेले हे लाखमोलाचे क्षण! त्या अनुभवांनी माझं चिमुकलं विश्व उजळून गेलं. त्यातूनच मला वाचनाची गोडी लागली.ह्या दिवसांच्या आठ्वणी माझ्य़ा आयुष्यातील सगळ्य़ात आनंदाच्या आहेत.
शिक्षण संपून नोकरी लागली ,लग्न झालं .पूर्वी सहसा बघायला न मिळणारा पैसा हातात सहज खेळू लागला आता आपण कुठलेही नाटक बघू शकतॊ, कुठल्याही समारंभाला तिकीट काढुन जाऊ शकतो असा विश्वास आला.पण..... आता पुण्यात कुठे काय चाललयं ते बघायलाच वेळ नव्हता. एखाद चांगलं नाटक आहे असं कळलं आणि जायचा विचार करायचा अवकाश !, नेमकं कुणीतरी घरी टपकायचं, कधी कुणाची आजारपणं,पाहुण्याची सरबराइ, रात्रीच्या कार्यक्रमाला बरोबर यायला कुणी नाही, दिवसाच्या वेळी ऑफीसच्या कामात रजा नाही एक ना दोन हजारो कारणं आणि सबबी ! सुरुवातीला असे चांगले काही बघायला जायचे हुकले कि जीवाची तगमग व्हायची, चिडचिड व्हायची मग नवरा म्हणायचा,"एवढं काय झालं चिडायला? कुठल्याही कार्यक्रमाच्या ऑडिओ /व्ही.डि ओ सी.डी/कॅसेट्स , मिळत असताना त्या कार्यक्रमाला जायची गरजच काय? घरी बसून आपल्याला पाहिजे तेंव्हा निवांत बघू " लहान मुलाची पटते तशी माझी समजूत पटली होती सुरुवातीला,"खरचं हे आपल्या लक्षातच नाही आलं!" मग कुठल्याशा सुमुहूर्तावर एखादी व्ही.डि ओ कॅसेट्स आणली जायची ती लावे पर्य़ंत रात्रीचे नऊ वाजून जायचे,सुरुवात होवून जरा कुठे बघण्यात मजा येतीय तोच फोन वाजायचा, बेल वाजायची. नाहीतर कुणाला पाणी दे, कुणाला खायला दे,
विरजण लावलं का?
उद्याच्या नाश्त्यासाठी तांदूळ भिजत टाकले का?
सकाळच्या डब्य़ाला भाजी काय करणार ? बसल्या बसल्या निवडून टाक.
आमच्या घरी त्याकाळी रात्री अपरात्री पाणी येत असे ,मग पाणी भरणे, बागेला पाणी घालणे हे सगळे उद्योग करताना त्या कार्यक्रमाचा पूर्ण विसर पडे आणि संपलेल्या कार्यक्रमानंतर टि.व्ही. बंद करण्यापुरता त्याच्याशी संबंध उरे.त्यातून मग घरी काही आणून बघण्यातला फोलपणा कळून चुकला.
आता सतत २४ तास वेगवेगळ्या रुपातून करमणूकीची बरसात करणाऱ्या वाहिन्यांचा जमाना आला.त्यातून जाहिराती गाळुन अर्ध्या तासांत होणाऱ्या कार्यक्रमातून करमणुक होते का हा संशोधनाचा विषय होईल.त्यांचे विषय,दर्जा यातील कशाबद्द्लच न बोलणेच शहाणपणचे ठरेल.तंत्रज्ञान आणि कलाकृती (मग ते गाणं असो, कविता , नाट्क किंवा सिनेमा)हे एकमेकांच्या व्यस्त प्रमाणात असावेत असे वाटते.टि.व्ही.चं स्थान घरातला एक प्रतिष्ठेचा सिम्बॉल एवढचं राहतं.घरात एकटं असताना देखील मला कधी तो लावावा असं वाटतच नाही.
अजूनही पुण्यात चांगले कार्यक्रम होतात, आता मुली मोठ्या झाल्याने त्यांना घेवून जायचा आटापिटा मी करते, मध्यंतरी माझी मोठी मुलगी नववीत असताना अविनाश धर्माधिकारी यांची वेगवेगळ्या विषयांवर सात दिवस व्याख्याने होती,मुलींना घेवून मी पहिल्या दिवशी गेले, त्यांना कितपत समजेल हि शंका होतीच. धाकटीला नाही समजले सगळे पण तनु मात्र फारच प्रभावित झाली,नंतरचे सगळे दिवस रोज जाणे मला जमणारे नव्हते (संसाराचे व्याप ताप ई...(ध्रृ.))मात्र उरलेले सगळे दिवस ती कुणाना कुणला बरोबर घेवून गेली आणि तिने त्याचा पूर्ण आस्वाद घेतला. आणि मीच तो कार्यक्रम बघीतल्याचे समाधान मला मिळाले.माझ्या वडिलांनी मला दिलेला वारसा मी माझ्या मुलीपर्यंत पोहचवू शकल्याचं ते समाधान होत!


©

Tuesday, October 20, 2009

नादचित्रे



माझ्या लहानपणी टि.व्ही. नव्हता.पुण्यात तो कधी आला ते माहित नाही.आमच्या ओळखीच्या लोकांकडे मी ७वी-८वीत असताना आला आणि आमच्या घरी मी नोकरीला लागल्यावरच.मात्र माझ्या लहानपणापासून घरात रेडीओ होता आणि तो अखंड चालू असायचा. विद्याताई लहान असताना म्हणे तो आणला होता.त्यावेळी रविवारी सकाळाचे बालोद्यान ती रेडीओला कान लावून ऎकत असे.एक तर आमच्या लहान जागेत भरपूर माणसे, काका, मामा, दादा सगळ्यांचेच आवाज भक्कम. सकाळच्या कामाच्या वेळी आईचा तारस्वर.आणि आम्ही लहान म्हणून आमचा दंगा यात तिला बिचारीला तो कार्यक्रम ऎकायचा म्हणजे दिव्यच करावे लागे. आधी रेडीओचा ताबा मिळवणे,त्यावेळी काका किंवा मामाला इतर काही गाणी वगैरे ऎकायची बुध्दी झाली की हिच्या कार्यक्रमाची काय मिजास, त्याच वेळी दादांना विद्याच्या अभ्यासाची आठवण झाली तर कुणालाच रेडीओ ऎकणे शक्य नाही. तिच्या लांब सडक केसांना आईने तेल लावलेले असे,आणि नहायला चल असा अधूनमधून पुकारा असे, मात्र आईच्या हाकेला दाद न देता ती स्टूलावर उभी राहून रेडीओ लावी(घरातील एकमेव करमणुकीची वस्तू सर्वात ऊंच फळीवर होती)आणि मग त्याला कान लावून ती बालोद्यान ऎकायची. मग सगळ्या बाजूंनी तिच्या नावाचा पुकारा झाला तरी तिला त्याची शुध्द् नसे. माझ्या डॊळ्यासमोर आजही तिची स्टूलवर उभी राहून एकचित्ताने ऎकणारी मूर्ती डॊळ्यासमोर आहे.
मी फारसे बालोद्यानसारखे लहान मुलांचे कार्यक्रम ऎकले नाहीत, कारण मी त्या वयाची झाले आणि विद्याताई कॉलेजला जायला लागली, ती अखंड विविध भारती नाहीतर सिलॊन लावून गाणी ऎकायची.मधल्या वेळात आई मराठी गाणी लावायची, रेडीओ बॅक-ग्राऊंडला नसेल तर अभ्यास व्हायचाच नाही.आता आपण मुलांना एकसारखे टि.व्ही.पुढे असतात म्हणून ओरडतो, पण आमचे देखील रेडीओशिवाय पान हालत नसे. मात्र रेडीओमुळे आभ्यासात व्यत्यय येत नसे ऊलट मूड बनत असे. कारण कानाने ऎकताना लिहिणे, वाचणे सहज जमते.गणिते देखील गाणी ऎकताना सोडवता येत. अगदीच किचकट डेरिव्हेशन असेल , डोक्यात शिरत नसेल तरच रेडीओ बंद करावा लागे, पण अशी वेळ नाही यायची कारण रेडीओवर प्रोग्रॅम नसतील त्या वेळात असा अभ्यास करायचा.
सकाळी उजाडताना पुणे केन्द्रच लावायचे,(सकाळी सकाळी कसली ती सिनेमातली चटोर् गाणी ऎकता इति आई) मग 'उत्तम शेती ' पासून सुरुवात होई, रामदास स्वामींचे मनाचे श्लोक किंवा तत्सम मारुतीबुवा रामदासी आणि मोहन बुवा रामदासींच्या स्वरात . ऎकताना डोळ्यापुढे भगवी वस्त्रे घातलेली, पायात खडावा आणि हातात झोळी, दुसऱ्या हातात भोपळ्याचा तुंबा घेवून उभ्य़ा असलेली मारुतीबुवा रामदासी आणि मोहन बुवा रामदासींची जोडी उभी राही.त्यानंतर भक्ती संगीत.या तालावर काम चाले. संस्कृत बातम्या सुरु झाल्या कि सात वाजले.सकाळची शाळा असेल तर या आधीच घर सोडलेले असे, एरवी संस्कृत बातम्या झाल्या तरी गाद्या काढलेल्या नसल्या तर आईच्या तोंडाचा पट्टा सुरु होई.संस्कृत बातम्यांच्या निवेदकाचा आवाज अजूनही आठ्वणीत आहे.'इयं आकाशवाणि संप्रति वार्ता: श्रुयंतां प्रवाचकः बलदेवानंद्सागरः' हे वाक्य पाठ होते, मला हा बलदेवानंद सागर नावाप्रमाणॆ बलवान आणि धोतर नेसून उपरणं अंगावर घेवुन, गंध-बिंध लावून बातम्या वाचतोय असचं चित्र डोळ्यापुढे यायचं ,कधी कधी प्रवाचिका 'विजयश्रीः' असायची, ती मात्र रागीट चष्मेवाली, मोठा अंबाडा असलेली बाई असणार असे वाटे,त्या बातम्यांमधलॆ एक अक्षरही कळत नसे , अगदी शाळेत संस्कृत शिकायला लागले तरीही . प्रधानमंत्री,राष्ट्र्पती असे ओळखीचे शब्द कानी पडत, तेवढेच कळत , कळून घ्यायची इच्छा नसे हेच खरे.नंतर प्रादेशिक बातम्या लागत, त्या संपल्या कि हळुच विविधभारती लावायचे.साडेसातला संगीत सरीता मग भुलेबिसरे गीत. यामध्ये जुनी गाणी लावित काही वेळा ती बोअर असत पण बरेचदा छानच असत. चित्रलोक मध्ये त्यावेळच्या नव्या सिनेमांतली गाणी लागत नऊ नंतर अनुरोध गीत असे,आवडीची गाणी लागली की रेडीओचा आवाज मॊठा करायचा,इतका कि अंघोळीला गेले तरी गाणं ऎकू आलं पाहिजे.त्यात आईने सांगितलेल्या कामांकडे कानाडोळा करण्याचा सुप्त हेतूही साध्य होत असे. दहा नंतर अकरा पेर्य़ंत रेडिओ बंद असे. अकरा वाजता मधुमालती कार्यक्रम ऎकत उरलेला गृहपाठ, दप्तर भरणे, जेवण करुन साडेअकरा पावणेबाराला सायकलवरुन शाळेत जायला निघायचे. जाताना मैत्रीणींबरोबर ही आज कुठली गाणी होती, आशा भोसलेची 'ये है रेशमी जुल्फोंका अंधेरा' किंवा 'जाईये आप कहा जाएंगे' अशी गाणी ऎकली असतील तर त्याचीच चर्चा.संध्याकाळी सात वाजता 'फौजी भाईयोंकी फर्माईश' अर्थात 'जयमाला'.बुधवारची सिलोनवरची बिनाका गीतमाला आणि त्यातला तो अमीन सयानीचा अफलातुन आवाज आजही आठवतॊ. त्यांचं हिंदी फारसं समजत नसे पण ऎकत रहावं असं वाटे. विविध भारतीवर असणाऱ्या विविध गाण्यांच्या कार्यक्रमांची नावे देखील किती कल्पकतेने दिलेली असत. संगीत सरीता,भुलेबिसरे गीत काय किंवा जयमाला रात्री ११ वाजता 'बेला के फूल'.विनोदी श्रुतिका 'हवा महल'. ,'गागर में सागर'.अशी सगळीच नावे अर्थपूर्ण होती. मराठी कार्यक्रम ही दर्जेदार होते.मराठी श्रुतिका तर सुंदरच असत.व्यंकटेश माडगूळकरांची वाटसरू नावाची श्रुतिका अंगावर काटा आणायची.व.पु.काळ्य़ांचे टेकाडे भाऊजी अजून आठवतात.पु.लं.च्या मुलाखती, त्यांची भाषणे केवळ अप्रतिम.दिवाळीत नरकचतुर्दशीला पहाटे किर्तन असे.दुपारी संगीत नाटके असत.मोठमोठ्या लेखकांचे, कवींची भाषणे , त्यांचे विचार रेडीओमुळे परीचित झाले.
आजकाल 'एफ.एम.बॅंड ' मुळे पुन्हा तरुण पिढी रेडीओ ऎकु लागलीय.शिवाय हल्ली रेडीओ हा आमच्या वेळच्या रेडीओसारखा कोपऱ्यात राहणारा नाही, ट्रांझिस्टर हे त्याचं नाजुक रुपही बोजड वाटेल अशी लहान मॉडेल्स आहेत.गाडीमधील रेडीओ वर एफ.एम.बॅंड असतो,मोबाईल मध्येही एफ.एम.बॅंड असतो, त्यामुळे जळी स्थळी काष्ठीपाषाणी त्याची सोबत असते.शिवाय तो सतत २४ तास चालत असावा. मी मात्र त्याचा आनंद नाही घेऊ शकत. माझे वय हे कारण असू शकेल, मी एक वेळ आजकालची नवी गाणी एन्जॉय करु शकते, पण एफ.एम.बॅंडच्या रेडीओ जॉकी नामक व्यक्तिची अखंड चालणारी निरर्थक टकळी काव आणते. त्या बडबडीतून डोके दुखण्या खेरीज दुसरे काहीच होऊ शकत नाही.त्यामध्ये नविन माहिती मिळत नाही, कि काही मनोरंजन होत नाही.उगीचच हिन्दी, मराठी , इंग्रजी तिन्ही भाषांची खिचडी करत मधूनच आपणच केलेल्या पाचकळ विनोदाला फिदीफिदी हसत असतात.अधूनमधून मदर्स डे, फादर्स डे, व्हॅलेंटाईन डे अशा दिवसांची आठवणही करतात आपण भारतात राहतो, आणि आपल्याकडेही साजरे करावयाचे दिवस असतात असे मला कधी कधी त्यांना सांगावेसे वाटते. गाणे चालू असताना त्यांची बडबड थांबते म्हणूनही कदाचित गाणी आवडत असावित. अर्थात हे तितकेसे बरोबर नाही. ए.आर.रहमानचे संगीत असलेली , किंवा गुलझारची नवीन गाणी खरोखरीच आवडतात.रेडीओ जॉकी मात्र अशक्य आहेत.
वास्तविक रेडीओ हे माध्यम खरचचं चांगलं आहे. मनोरंजन, माहिती सर्व त्यातुन मिळाते, कुठेही नेता येते.आजकाल हेडफोन्स आल्यामुळे त्याच्या वापराने इतरांना त्रास होत नाही.कामे करता करता रेडीओ लावला कि करमणूक होते, त्याच्या पाशी बसून राहण्याची गरज नसते. शिवाय असं म्हणतात दृक माध्यमापेक्षा श्राव्य माध्यम अधिक चांगले, त्यात आपली कल्पनाशक्ती वापरली जाते. एक राजा होता हे एकताना मूल राजा कसा असेल याचं चित्र मनाशी रंगवतॊ, तेच राजा पडद्यावर दिसला तर कल्पना करायची वेळ येतच नाही.त्यामुळे कल्पनाशक्ती कमी होवू लागते.
आजारी व्यक्तींनाही रेडीओची सोबत चांगली.माहितीच्या नावाखाली फालतू बडबड करण्यापेक्षा काहीतरी दर्जेदार मनोरंजन करणे अवघड असले तरी अशक्य नाही. कलाकारांची तर सध्या अजिबात कमतरता नाही. तेंव्हा अनेक नवनवे बॅंड काढण्याऎवजी मोजकेच पण चांगले बॅंड ठेवून त्यावर मनोरंजक,उद्बोधक कार्यक्रम ठेवावेत. त्यामुळे अबालवृध्द पुन्हा एकदा रेडीओ ऎकून त्यातला आनंद घेवू शकतील.


©

Monday, October 12, 2009

सल

पटवर्धन बागेतल्या गजबजलेल्या रस्त्यांतून जाताना, तीस पस्तिस वर्षांपूर्वी मी तिकडे येत होते, असे मुळीच वाटत नाही. दर दोन वर्षांनी बदलणऱ्या पुण्यात जन्मापासून राहून देखील कित्येक भागात बऱ्याच काळाने गेल्यावर भंजाळायला होतं. बंगले पाडून मोठमोठ्या इमारती उभ्या राहतात, गल्ल्या जावून रुंद रस्ते बनतात.ओळखीच्या खुणा नष्ट होतात.
पटवर्धन बागेत रामकाकांच घर होतं, रामकाका माझ्या वडीलांचे, दादांचे बालमित्र. त्यांचे वडील दादांचे शाळेतले गणिताचे सर.त्यामुळे दर दोन -तीन महिन्यात त्यांच्याकडे दादांची चक्कर असायची. त्यावेळी फोन नसल्याने एकमेकांकडे भेटायला जाणे चालायचे. रामकाकाही अधूनमधून आमच्याकडे येत. त्यावेळी सहकारनगरमधून दादांबरोबर मी कधी चालत तर कधी सायकलवरुन जात असे.म्हात्रे पूल त्यावेळी नव्हता, आम्ही गरवारे कॉलेजच्या कॉज-वे वरुन गेल्याचे मला आठवते.शेतजमीनीवर अधूनमधून पटावर सोंगट्या पडाव्यात तशी घरे विखुरलेली होती.रस्तेही मातीचेच.काकांचा रवी माझ्य़ापुढे आणि प्रसाद हे मुलगे आणि सीमाच्या पुढे एक वर्ष असल्याने त्या दोघांची पुस्तके आम्ही वपरायचो. ती आणायला मला दादांबरोबर जावे लागे.एरवी त्यांच्याकडे जाणे मी टाळायची , एकतर तिथे बोलायला कुणी नसायचे.दादांच्या सरांबरोबरच्या गप्पात मला रस नसे.पण येता जाता दादा भोरच्या आठवणी, सरांच्या आठवणी त्यांच्या शाळेतल्या गमती सांगत, म्हणून जायला काही वाटत नसे.दहावी नंतर पुस्तकांसाठी जाण्याचा प्रश्ण संपला , अर्थात दादा जायचेच.
मी एफ.वाय ला असताना दादांचे अकस्मिक निधन झाले.रामकाकांना कुठुन समजले कोण जाणे? पण ते लगेचच घरी आले.बालमित्राच्या आठवणी सांगून घळाघळा रडले.नंतर अधूनमधून येत राहिले.आम्हाला दादांच्या ऑफीस प्रोसिजर्स काहीच माहित नव्हत्या.कुठे अर्ज करायचे, कुणाला भेटायचे यासगळ्या बद्द्ल काका मार्गदर्शन करीत. माझ्या बहिणीला दादांच्या जागी नोकरी लावण्यासाठी सुध्दा त्यांनी बरेच प्रयत्न केले. मंत्रालयात सतत जावुन पाठपुरावा करणॆ हि किती जिकिरीची गोष्ट आहे, हे त्यातून जाणाऱ्यालाच कळेल. हे सारे काकांनी केवळ मित्रप्रेमापोटी केले.घरी आले तरी चहाशिवाय ते काही घेतही नसत. आमच्या लग्नांना ते आले. नंतर ते ही सेवानिवृत्त झाले.अधूनमधून आईकडे येत, पण फार क्वचित. त्यांच्य़ा आई,वडीलांचे निधन झाले, त्यांची बायकॊ आजारी असे, ती हि गेली. आईकडे गेल्यावर बातम्या समजत. आईकडे फोन नव्हता, त्यामुळे या बातम्या आईलाही उशीरा समजत. आई देखील आजारी असल्याने पत्र पाठवण्या शिवाय काही करु शकत नव्हती. आम्हाला ती काकांकडे जा, असे सांगायची पण आमची नोकरी, संसार ,घरातल्या रोजच्या अडचणी यात राहून जायचे. मधल्या काळात आईच्या घराची दुरुस्ती केली त्यात जुनी कागदपत्रे,वह्या ,रद्दी फेकताना काकांचा पत्ताही गहाळ झाला.
गेल्या वर्षी पटवर्धन बागेतल्या बंगल्यांच्या सोसायटीत कुणाकडे तरी जायचा प्रसंग आला, तिथे मी करमरकर कुठे राहतात , माहित आहे का? असे विचारले. माझ्याजवळ पत्ता, खुणा काहिच नसल्याने जास्त विचारता येईना,आणि त्यांनाहि सांगता येइना. पण मला सारखे जवळच ते राहत असावे असे वाटत होते. त्यानंतर एक महिना उलटून गेला असावा. मी काही कामासाठी रजा घेतली होती, आणि मुलीला घेवून बाहेर गेले होते. अचानक मला वाटले चला, आज आपण काकांचे घर शोधायचेच. पुन्हा पटवर्धन बागेतल्या बंगल्यांच्या सोसायटीतल्या लहान लहान गल्ल्यांमधून मी फिरु लागले. दिसेल त्या माणासाला विचारु लागले. माझी मुलगी मला वेड्यात काढीत होती.तिच्याकडे दुर्लक्ष करीत माझा शोध चालू होता.पाऊण तास होवून गेला होता, लेक वैतागली होती
"आई , आता बास, उगीच प्रत्येक घरात जावून विचारत बसू नको, एक तर धड पत्ता नाही जवळ, आणि त्या काकांना किती वर्षात बघितलेलं नाहीस , समोर आले तरी ओळखू शकशील का? घरी जायचं का मी जाऊ एकटी? तू बस फिरत"
" अगं, थांब, हि शेवटची गल्ली बघू आणि निघुया" असं म्हणून एका सायकलवरुन जाणाऱ्या शाळ्करी मुलाला थांबवत मी विचारले ,"अरे करमरकर कुठे राहतात माहित आहे कारे?"
"मला दोन करमरकर माहित आहेत, तुम्हाला कोणते हवेत?"
" दोन्ही घरे दाखवतोस?, प्लीज"
" हो, चला ना " असे म्हणत त्याने सायकलवर टांग टाकली.त्याच्या मागे आम्ही गेलो. एका दुमजली घरापाशी तो थांबला. मी त्याला म्हटले इथेच थांब , मी आत जावुन येते.दारात तुळशी वृंदावन होते.पुढच्या दाराला कुलूप होते, पण आशा चिवट होती घराभोवती हिंड्ताना मागचे दार उघडे दिसले जिन्यात वरच्या मजल्यावरून बोलण्याचा आवाज ऎकू आला, कामवाली बाई जिना उतरत होती.तिला विचारले,"राम करमरकरांचे हेच घर का?"
"व्हयं, वैनी कोन आलयं बघा" असं म्हणत ती बाई बाहेर पडली.मुलीने त्या मुलाला हेच घर अशी खूण केली तो मुलगा गेला.
एक नाजूक चेहऱ्याची बाई बाहेर आली.तिच्या चेहऱ्यावर प्रश्णचिन्ह.काकांची सून असावी.
"रामकाका इथेच राहतात ना? मी त्यांच्या मित्राची मुलगी, भेटायला आलीयं त्यांना" एका दमात मी सांगितले.
" हो, याना आत. बसा, पण तुम्हाला समजलेलं दिसत नाही, ते वारले नुकतेच"
" केंव्हा? काय झालं होतं?" काहीतरी विचारायचं म्हणून तोंडतून गेलं, खरतरं मनं एका मोठ्या अपराधी भावनेनं मिटून गेलं होतं. तिनं मला नाव विचारलं. पाणी दिलं.
मी तुम्हाला कधीच पाहिल नाही, पण बाबांच्या तोंडून तुमचं, तुमच्या वडिलांच वर्णन ऎकलयं... ती बोलत होती, मी पण जमेल तसं बोलत राहीले.मनातल्या मनात स्वतःलाच लाख शिव्या मोजल्या.
आज जसा वेळ घालवला तसा काही महिन्यांपूर्वी का घालवला नाही? असा स्वतःला बोल लावत राहीले. काकांना भेटले असते तर त्यांना किती बरे वाटले असते.ज्या माणसाने निरपेक्ष भावनेने आम्हाला एवढी मदत केली त्यांना उतारवयात भेटून आनंद देणे माझ्य़ा हातात होते, ते मी नाही करू शकले.मनात काकांबद्दल कृतज्ञतेची भावना कायम होती, त्यांची आठवणही येत असे. पण त्याला कृतीची जोड नाही देता आली.आज समजतयं दादांचे त्यांच्या सरांना भेटायला जाणं किती मोलाचं होतं, सायकलवरून दादा जात होते, मी मात्र गाडी असूनही गेले नाही.दरवेळी काही ना काही कारणांनी जायचे राहत गेले.
माणसाच्या असण्याला किती गृहित धरतो आपण!, त्यामुळेच भेटण्यासारख्या गोष्टी पुढे ढकलत जातॊ. न संपणाऱ्या कामांच्या फेऱ्यात अडकुन महत्त्वाची कर्तव्ये चुकतात.मागे राहते एक अखंड सलणारी, ठसठसणारी जखम!


©

Friday, September 4, 2009

दादा

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेउन, फक्‍त लढ म्हणा!
कुसुमाग्रजांची 'कणा' कविता कितिदाही वाचली तरी शेवटच्या या ओळी वाचताना डोळे भरुन येतात, आणि मनात दादांच्या आठवणी दाटून येतात. दादा , माझे वडील त्यांना जावुन या जून मध्ये सत्तावीस वर्षे झाली,पण आजही मनातील त्यांच्या आठवणी ताज्या आहेत.अवघे बावन्न वर्षाचे आयुष्य त्यांना लाभले,पण तेवढ्या काळात त्यांनी कित्यॆक जन्माचे त्रास भोगले, कष्टं केले,संकटे झेलली मात्र हे सगळे अगदी हसत हसत.
लहान वयात त्यांचे वडील गेले, लहान धाकटी भावंडे, अडाणी आई कुणाचाच आधार नाही, अशा वेळी मॅट्रीकची परीक्षा पास झाल्यावर इंजिनियरींग कॉलेजचा डिप्लोमा करून सरकारी नोकरी मिळवली, डिप्लोमा करत असताना एका नातलगांनी आपली कसबा पेठेतली खोली रहायला दिली होती, रोज सकाळी कॉलेजला जायचे तेथून स्वरगेटवर चालत जायचे त्यांची आई भोर हून एस.टी ने डबा पाठवित असे, तो डबा घेउन खोलीवर् आल्यावर जेवायला मिळे, सकाळी लवकर उठून त्या माऊलीने केलेली आमटी भाकरी, कधी कधी उकाड्याने आमटी आंबून जात असे, मग पाण्या बरोबर ती भाकरी खायची, ऎन वाढीच्या वयात खाण्याची अशी आबाळ झाल्याने दादांना पानात अन्न टाकलेले चालत नसे, अन्नाला नावे ठेवणे खपत नसे, तसेच भुकेल्यांबद्दल विलक्षण कळवळा असे, त्यांच्या ऑफीसमधल्या परगावाहुन आलेल्या तरुण मुलांना कायम आमच्या घरून डबा नेत, स्वतः खाण्यापेक्षा दुसऱ्याला खाऊ घालण्याची त्यांना फार हौस.
खाण्यापिण्याच्या आबाळीचे त्यांनी कधी अवडंबर केले नाही, त्यांची शिक्षणाची भूक त्याहून जास्त होती.कुणाचेच मार्गदर्शन नाही, दारिद्र्यामुळे होणाऱ्या मानहानीला घाबरून शिकल्या सवरल्या,सुखवस्तू नातलगांकडे उठबस नाही.कसबा पेठेतल्या गुंड मुलांच्या संगतीत सतत राहूनही त्यांना वाचनाचे जबरदस्त वेड होते.त्यातूनच शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे त्यांना जाणवले असावे.प्राप्त परिस्थितीचा स्विकार करून मिळालेली सरकारी नोकरी त्यांना वरदान वाटली.मात्र आपल्या भावंडांना शिकवायचेच असा त्यांनी ध्यास घेतला.घरात वडील माणूस नाही, आई अगदीच गरीब त्यामुळे घरात कुणाला धाक, शिस्त नव्हती.दादांनी भावंडाना रागवून , कडक वागून प्रसंगी पुष्कळ वाईटपणा घेतला,कटूताही स्विकारली मात्र त्या सगळ्यामागे त्यांनी शिकून मोठे व्हावे, आपले घर वर यावे एवढा एकमेव हेतू होता.
दादांनी पी.ड्ब्लु.डी सारख्या खात्यात नोकरी केली. 'खाते' हे नाव सार्थ करणारे हे खाते, पण स्वातंत्र्यपूर्वकाळातील निष्ठावान,चारीत्र्यवान लोकांना पाहून, सतत चांगल्या गोष्टींच्या वाचनातून त्यांनी जी जीवनपध्दती स्विकारली त्याला ते सदैव चिकटून राहिले, घरात त्यांच्या पगाराखेरीज एक नवापैसाही आला नाही.आमच्या घरी सतत माणसांचा राबता असे,भोरहून आईचे किंवा दादांचे नातलग येत, दादांचे मित्र येत, इतक्या साऱ्यांची जेवणी खाणी करताना आईचा जीव दमून जाई,पैशाची कायमची चणचण.शिवण शिवून ,मुलांच्या शिकवण्या घेवून आई संसाराला हातभार लावी पण एकूण दिवस कठीणच होते.त्यातच पानशेत धरण फूटून पूर आला आणि आई दादांचा संसार त्यात पूर्ण वाहून गेला.आईच्या एका आते बहिणीकडे त्यांना आसरा मिळाला.दादांनी आपल्या शिकणाऱ्या भावंडांना भोरला पाठविले.ठिकठिकाणी पूरग्रस्तांसाठी मदत केंद्रे होती, पण दादांनी आईला स्पष्ट सांगितले होते, कुठेही जावून हात पसरायचे नाहीत.आपले हातपाय धड आहेत, पुरात कोणी बुडून गेले नाही हे काय कमी आहे? गेलेले सगळे परत मिळवू.पण लाचार नाही व्हायचे! त्यांनी कधी तोंडावाटे निराशेचा सूर काढला नाही, उलट आईला चेष्टेने म्हाणायचे ,'बघ सगळ्या घरादारावर पाणी सोडून तुला घेवून मजेत हिंड्तोय!'
रद्दीच्या दुकानातून पुस्तके आणण्याचा दादांना फार नाद होता.अतिशय उत्तमोत्तम पुस्तकांचा संग्रह त्यांनी गोळा केला होता.त्यांना मराठी वाङमाची अतिशय आवड.गडकऱ्यांची नाटके,बालकवी, कवी बी,केशवसुत, कुसुमाग्रज,कवी चंद्रशेखर अशा जुन्या कवींबरोबरच, विंदा करंदीकर,मंगेश पाडगावकर यांचे कविता संग्रह आमच्या घरी होते.त्यांनी नोकरी घरातल्या नाना जबाबदाऱ्या सांभाळून केवळ आवड म्हणून टिळक विद्यापीठाच्या परीक्षा दिल्या 'साहित्य विशारद' झाले, पुणे विद्यापिठाची 'बी.ए' पदवीही मिळवली.त्या सुमारास पूरग्रस्तांसाठी सहकारनगर मध्ये सरकार कडून लीज वर प्लॉट आणि कर्ज मिळाले होते, सोसायटी स्थापन करून घरे बांधण्याचे काम चालू होते, त्यासाठी दादांना सतत जावे लागे, सगळीकडे सायकल वरून हिंडावे लागे, स्टेशन जवळ त्यांचे ऑफीस, घर डेक्कनवर बांधकाम सहकारनगर मध्ये अशी सगळी रपेट ते करत आणि घरी आल्यावर आमच्याशी गप्पा,चेष्टा रात्री च्यांचे वाचन चाले.
सहकारनगर मध्ये आम्ही रहावयास गेलो त्यावेळी तो भाग आजच्यासारखा नव्हता. रस्ते मातीचे, दिवे नाहित, दुकाने नाहीत. काळ्या मातीत पावसाळ्यात सायकली आडकून बसत.साधे दळण आणायला २ किमी जावे लागे.७१-७२ साली दुष्काळामुळे धान्याची चणचण होती.महागाई घराच्या कर्जाचा हप्ता द्यावा लागे. मी त्यावेळी लहान होते दुसरी तिसरीत. मला परिस्थितीची जाणीव असे, पण घरातले वातावरण नेहमी प्रसन्न असे.आई दादांनी आमच्या घराभोवतीच्या जागेत कष्ट करून ईतकी सुंदर बाग केली होती नाना तऱ्हेच्या भाज्या,फळे फुले लावली बागेने आमचे सगळे लाड पुरविले.आधी त्या जमिनीवर एरंडाची झाडे ,कॉंग्रेस गवत होते.दादा ऑफीस मधून आले की गवत काढीत.एरंडाची काटेरी फळे फोडून बिया जमा करत, त्या घाण्यावर देवून त्यातून बागेसाठी बी-बियाणे आणत.बागेतल्या पाला-पाचॊळ्यावर पाणी तापवित.तोंडलीला गरम पाणी लागते असे समजल्यावर कुकरमधले पाणी देखील तोंडलीला घालायला लावत.स्वतः वेलाच्या मांडवाखाली अंघॊळ करत.चुलीतल्या निखाऱ्यावर वांगी,बटाते भाजून देत.काटकसरीचे,सतत उद्योगात राहण्याचे धडे त्यांनी आम्हाला नकळत दिले.बागेतल्या भाज्या,फळे सगळ्याना द्यायची त्यांना फार हौस होती.पेरू, जांभळे आम्ही शाळेत नेत असु.भेंडी,मेथी, करडई,वेगवेगळ्या घेवड्याच्य़ा वेली.घोसावळी अशा सगळ्या भाज्या त्यांनी लावलेल्या होत्या.रायावळे,पेरु,जांभळे,आंबे,चिकू अशी फळझाडेही होती.आळू,माका,ब्राम्ही एवढेच नाही तर कापसाचे झाड त्यांनी लावले होते.कापसाची बॊंडे सोलून सरकी भोरला आईच्या माहेरी गाई साठी पाठ्वत. तुरीची झाडेही होती.कोवळ्या तुरीच्या शेंगा आम्ही भतुकलीत घेत असू त्याच्या कोवळ्या दाण्यांची उसळ खुपच मस्त होई.
वाढती महागाई, आमची शिक्षणे पै-पाहुणे यामुळे वाढते खर्च ,ऑफीसच्या कामाचे ताण आणि स्वतः कडे कायम दुर्लक्ष या सगळ्याचा त्यांच्या तब्येतीवर परीणाम झाला. त्यांना डायबेटीस झाला, त्यावर ते ससून मध्ये जावून औषधे आणत, गोड खाणे त्यांनी बंद केले, डॉक्टरांनी सांगितले म्हणून सकाळी टेकडीवर फिरणे सुरु केले. रोजचे १०-१२ कि.मी सायकलींग करत तरी हा वेगळा व्यायाम करीत. मात्र जेवणाच्या वेळा सांभाळणे , चार वेळा थोडे-थोडे खाणॆ हे त्यांनी कधीच केले नाही. आम्ही लहान होतो, आंम्हाला त्या आजाराची फारशी माहिती नव्हती.त्यांनाही कुठलाच त्रास होत नसे, कि होणारा त्रास ते जाणवू देत नव्हते , कुणास ठाऊक? पण मी बारावीत असताना डायबेटीसने त्यांच्या डोळ्यावर परिणाम झाला.कमी दिसू लागले,त्यावेळी पुण्यात लेझर सर्जरी सारखे उपाय उपलब्ध नव्हते.ससून मध्ये त्यांना मुंबईच्या के.ई.एम.मध्ये उपचार होतील असे समजले. मग मुंबईच्या वाऱ्या सुरु झाल्या. मद्रासहून डॉ.मस्कती येतं , त्यांनी दादांच्या डोळ्यावर क्रायोसर्जरी केली.त्याने फायदा झाला. पण पुढे आईचे पोटाचे ऑपरेशन झाले. नंतर डायबेटीस ने त्यांच्या किडनीवरही परिणाम झाला. जेवण जात नसे, वजन कमी झाले. तशाही अवस्थेत ते ऑफीसला जात होते.आम्हाला त्यांच्या दुखण्याची कल्पना आली होती. मात्र आता औषध-उपचार चालू आहेत, पथ्य-पाणी आहे, बरे वाटेलच.अशी त्यांची आणि आमची खात्री असायची.
२जूनला दादा घरी आले , येताना त्यांनी त्यांच्या लाडक्या नातवासाठी आंबेही आणले होते.रात्री जेवणे झाली, रात्री त्यांना खोकला येत होता, झोपता येत नव्हते. मी रात्री जवळच्या डॉक्टरांना बोलवायला गेले. ते आले नाहीत. सकाळी जास्त त्रास होऊ लागला, आम्ही त्यांना जवळच्या हॉस्पीटल मध्ये नेले, तेथेही त्यांनी शेजारच्या राजाभाऊंजवळ ऑफीसच्या कामाची फाईल द्यायला सांगितली आणि २-३ दिवस येणार नाही असा निरोप दिला. हॉस्पीटल मध्ये त्यांना सलाईन लावले. तिथल्या डॉक्टरांनी दुसऱ्या मोठ्या डॉक्टरांना फोन केला. ते डॉक्टर आले, पण त्या आधीच दादा हे जग सोडून गेले होते. इतक्या जवळच्या व्यक्तीचा इतक्या जवळून मृत्यू बघताना माझे वय होते १७ वर्षे.हॉस्पीटल बाहेरच्या जिन्यात आई हताश पणे बसली होती. धाकटी बहीण कुणालातरी बोलवायला गेली होती.मोठी ताई लग्न होउन सासरी गेलेली, गावात माहेर असल्याने रहायला येत नसे, ती नेमकी त्यावेळी प्रथमच रहायला आली होती. आता वाटते, दादांना स्वतःच्या मृत्यूची कल्पना आल्याने तिला आग्रहाने बोलावले असेल.
'जगण्यासारखे काही आहे ,तोवर मरणात मौज आहे ' गडकऱ्यांचे वाक्य दादा नेहमी म्हणत. त्याप्रमाणे त्यांना मरण आले. त्यांना यातना झाल्या नाहीत असे नाही, पण आजारापेक्षाही अनेक मानसिक त्रास त्यांनी सोसले, त्यातून मृत्यूनेच त्यांची सुटका केली.
त्यांच्या पश्चात सुरुवातीचे दिवस फार कठीण गेले. एक तर घरातली एकमेव मिळवती व्यक्ती गेली. आमची शिक्षणे चालू होती.पैशा-अडक्याचे व्यवहार माहित नव्हते. पोरपण जावून पोरकेपण आले होते.वडीलांचे छत्र नसणे म्हणजे काय असते, याचा अनुभव फार कटू असतो.कुणा लहान मुलावर तो कधीही येऊ नये.मुळात मुलाचे लहानपण संपवणारी ती घटना आहे, आणि खरचं वय लहान असेल तर ती सगळ्या व्यक्तिमत्वावर परीणाम करुन जाते.
अगदी तान्ह्या बाळाचेही आई बापा वाचून काही अडत नसते. कुणी ना कुणी तरी त्याला वाढवतेच. म्हणून त्यांची उणीव भासत नाही असे नाही. आमचेही दिवस सरले, त्या दिवसांनी आम्हांला खूप शिकवले.आपले कोण, परके कोण समजले.कष्टांचे मोल कळले.दादांच्या ऑफिसमधल्या प्रामाणिकपणाचे फळ म्हणून त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी, वरीष्ठांनी सर्वतोपरी मदत केली. त्यांच्या जागी बहीणीला नोकरी मिळाली. माझेही शिक्षण झाले, कुठल्याही ओळखी, वशिल्याशिवाय चांगल्या नोकऱ्या मिळाल्या.दादांनी आमच्यसाठी भले पैसा नसेल ठेवला, पण आम्हाला स्वाभिमानानं जगायला शिकवलं . आयुष्यभर कष्ट करत राहून मेहनतीचे बाळकडू दिले . कुठल्याही कामाची लाज न बाळगायला शिकवले . वाचनाची गोडी लावुन पुस्तकांसारखा सखा दिला . त्यांनी केलेल्या लाडाची आणि प्रेमाची शिदोरी पुढच्या साऱ्या आयुष्याला पुरेल आणि पुण्याई तर पुढचे अनेक जन्म.दादांच्या आठवणीशिवाय दिवस जात नाही.आजच्या काळात डायबेटीसवर इतके संशोधन झालय, इतक्या उपाय योजना झाल्यात, आज आमच्याकडे पैसा आहे,सारखे वाटते आज दादा हवे होते, त्यांना आम्ही सुखात ठेवले असते. नातवंडांमध्ये ते रमले असते. गाणी ऐकली असती. घरात बसून वाचन केले असते, टी.व्ही. बघितला असता. नवनव्या गोष्टी शिकण्याची, समजावून घेण्याची त्यांना फार हौस होती.मुलांमध्ये मूल होवून जाण्याचा दुर्मीळ गुण त्यांच्या मध्ये होता.आता त्यांच्या आठवणीत रमण्याशिवाय आमच्या हातात काहीच नाही.


©

Monday, May 11, 2009

रीक्षावाल्यांची अरेरावी

अखेरीस रीक्षांचा संप मिटला.या वेळी शाळांना सुट्ट्या लागल्यामुळे हा संप बरेच दिवस टिकला.सहा दिवस हा म्हटल तर कमी,म्हटलं तर् जास्त दिवसांचा काळ. पण एकंदरीत रीक्षा हा चर्चेचा विषय व्हावा अशी परिस्थीती झाली आहे.वास्तविक आता घरोघरी वाहनांचा सुकाळ आहे.घरातील माणसांपेक्षा वाहनांची संख्या जास्त असे पुण्यात तरी दिसतेच, त्याला कारणेही आहेतच.घरातील प्रत्येकाला बाहेर जाताना वाहन हवे, शिकणाऱ्या मुलांना स्वतंत्र वाहन हवे, आई वडील दोघांसाठी वेगवेगळ्या दुचाक्या हव्यात शिवाय सगळ्यांनी एकत्र जाण्यासाठी एक चारचाकी हवीच.ईतकी वाहने असूनही रीक्षाची जरुर लागतेच.पुण्यात गर्दीच्या वेळी कार चालवणे कठीण त्याहीपेक्षा पार्कींग मिळणे अवघड.लक्ष्मी रोड, मंडईत आठवड्यातून एकदा तरी न जाणारा माणूस हा पुणेकर नाहीच.त्यामुळे अशा गर्दित जाताना वाहने घरी ठेवून रिक्षाने जाणॆ बरे असे मानणाऱ्यांची संख्याही वाढत जात आहे. जेष्ठ नागरीकांना तर रिक्षा लागतेच, आजारी माणसे, लेकुरवाळ्या बायका,या सगळ्यांना रीक्षा प्रवास अपरिहार्य आहे.आजकाल पुणे चहूबाजुंनी वाढ्त चाललयं, शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी शाळेची बस नसेल तर रीक्षा शिवाय पर्याय नाही. बाहेर गावाला जाताना किंवा गावाहून आलेल्यांना रीक्षा करावीच लागते.एकंदरीत रीक्षावाल्यांचा धंदा जोरात असतॊ.
रीक्षांची संख्या वाढूनही , पुण्याची लोकवस्ती वाढल्यामुळे त्यांच्या धंद्यावर परीणाम झालेला नाही.दिवसेंदिवस रीक्षावाले हे आपण रीक्षा चलवून समस्त पुणेकरांवर उपकार करत आहोत, आपल्याला या व्यवसायाची मुळीच जरुर नाही अशा थाटात वागत असतात. गेल्या वीस पंचवीस वर्षात पुण्याचा चेहरा मोहरा बदलला, अस्सल पुणेरी म्हणून वर्णिलेले पुणेकराचे खास मासले (पु.लं.चे पुणेरी लोक) आता कमी दिसत असले तरी रीक्षावाल्यांनी आपला पुणेरी बाणा सोडलेला दिसत नाही. कुठल्याही रस्त्याच्या कोपऱ्यावर ही मंडळी कोणत्याही वेळेला निवांत बसलेली असतात.कुठलेही गिऱ्हाईक आले तर त्याच्या कडे ढुंकुनही पाहायचे नाही असा त्यांची रीत असते. मात्र त्या व्यक्तिने स्टॅंड वरच्या रीक्षाऎवजी रस्त्यावरच्या चालत्या रीक्षाला हात करण्याचा अवकाश ही सगळी मंडळी खडबडून ऊठतात, त्या व्यक्तिला स्टॅंड वरचीच रीक्षा घेतली पाहिजे तसा नियम आहे इ. सुनावतात. ती व्यक्ती बिचारी चालती रीक्षा सोडते.मग स्टॅंडवरचे रीक्षावाले ओळीने त्या व्यक्तिच्या इछ्ति स्थळी आपण येणार नसल्याचे सांगतात.हातचे सोडून पळ्त्या पाठी जाऊ नये असे म्हणतात, मात्र इथे पळ्ती सोडून हातचा (स्थीर अशा अर्थी) रिक्षावाला धडा देतो.
फार जवळच्या अंतराला हे येत नाहीत, फार दुरचे अंतर त्यांना नको असते.फार काय आपण आपल्या मर्जीच्या ठिकाणी जाण्याऎवजी त्याच्या मनात असेल तिथे जावे अशी त्यांची इच्छा असावी.यात त्यांच तरी काय चूक आहे ? माणूस धंदा का करतॊ? आपल्या मर्जीप्रमाणे वागता यावे म्हणूनच ना!दुसऱ्याच्या मनासारखे वागायला ते काय तुम्हा आम्हा सारखे नोकरदार आहेत? वाटल तर ते तुम्हाला नेतील. त्यांना हव्या त्या मार्गाने,पाहीजे तशा वेगाने,रहदारीच्या स्वतःच्या नियमांनी नेतील, आणि या साऱ्याबद्दल तुम्ही त्यांना ते मागतील तितके पैसे दिलेच पाहिजेत, हक्कच आहे त्यांचा तो.सुट्टे पैसे जवळ ठेवणे हे तुमचेच काम आहे, रीक्षात बसताना तेवढी खबरदारी घेतलीच पाहिजे.अगदी सतरा रुपये झाले तरी वरचे सात सुटे द्या, नाहीतर ३ रुपयांवर पाणी सोडा.दोन तीन रुपयांसाठी कुरकुर करणारी गिऱ्हाइके घेणार नाही असा नवा नियम करायला हे रीक्षा संघटना वाले मागे पुढे बघणार नाहीत. रीक्षात पेट्रोल भरण्यासाठी तिच्यात गिऱ्हाइक बसलेले असावे हाही त्यांचा नियम असावा.चार पाच कि.मी.च्या अंतरावर जाण्यासाठी तुम्ही रीक्षात बसलात की रीक्षावाला प्रथम जवळचा पेट्रोलपंप गाठतो.जर तुम्ही काही बोलण्याचे धाडस केलेत तर "पेट्रोल अगदीच संपलयं, वाटेत बंद पडली तर मी नाही जबाबदार " अशी दरडावणीच्या आवाजात समज दिली जाते.जणू काही बसल्या बसल्या आपण त्या रिक्षाच्या टाकीतले पेट्रोल ज्युस सारखे प्यायलोय आणि त्यामुळेच ते संपलय !
हॉस्पीटल आणि कोर्ट याची पायरी चढावी असं सामान्य माणसाला चुकूनही वाटत नाही.पेशंट म्हणून किंवा त्याचे नातेवाईक म्हणून हॉस्पीटलमध्ये जायची वेळ प्रत्येकावर कधी ना कधी येतेच.दीनानाथ हॉस्पीटल मध्ये जाण्याचा प्रसंग माझावर गेले २-३ वर्षात आला. हॉस्पीटलच्या बाहेर रीक्षांची भलीमोठी रांग आणि हॉस्पीटलमधून चालत,खुरडत जाणारे अनेक असहाय चेहरे त्यात काही पेशंटस, तर काही त्यांचे नातलग.संध्याकाळ्ची सात साडेसातची वेळ आणि दहा पैकी आठ रीक्षावाले या लोकांना न्यायला नाही म्हणत शांत पणे बसलेले.कोथरुडला येणार नाही,पौड्फाट्याला जमणार नाही. औंध फार दुर आहे, सहकार नगर -तिकडून येताना एम्टी यावं लागेल.अशी उत्तरे देत सर्वांना वाटेला लावणाऱ्या रीक्षावाल्यांचा तिथे थांबण्याचा हेतू काय असेल? असा मला प्रश्ण पडला.एक तर हॉस्पीट्लमधून बाहेर पडणारी व्यक्ती प्रचंड काळजीत असते,प्रकृती-पैसा,मनुष्यबळ अशा नानाविध बाबी असतात.हॉस्पीट्लमध्ये मिळणारी वागणूकही फारशी चांगली नसते,अशा अगतिक माणसाला जाण्यासाठी रीक्षा दिसत असूनही तो येत नसेल तर त्याची काय अवस्था होत असेल?
अशीच रेल्वे स्टेशन आणि बस स्टॅंड च्या बाहेर उभ्या असलेल्या रीक्षावाल्यांची कथा डेक्कन क्वीन, प्रगतीने येणाऱ्यांपैकी रोज पुणे-मुंबई प्रवास करणारे सोड्ले तर बरेचसे ऑफीसच्या कामासाठी गेलेले असतात, सहाजिकच माणूस दमलेला असतो, घरी जाण्याची ऒढ असते आणि रस्त्यावर आले कि हे रीक्षावाले आडमुठे धोरण दाखवायला लागतात, ज्यादा भाडे मागणे, इच्छित स्थळी यायला नकार देणे.माणसाच्या असहायतेचा फायदा उठवणाऱ्य़ांनी गिऱ्हाईकांकडून माणुसकी आणि सौजन्याची अपेक्षा ठेवायची हा केवढा विरोधाभास आहे! केवळ यांच्या संघट्ना आहेत आणि ग्राहक असंघटित, म्हणून यांची मनमानी चालते.
शाळेत रीक्षाने जाणाऱ्या मुलांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.रीक्षात किती मुले घ्यावी यावर सुरुवातीच्या काळात बंधन नसे, मध्यंतरी एक-दोन अपघात झाले त्यानंतर ह्या संख्येवर बंधन आले.पण बंधन आणि नियम हे तोडण्यासाठीच असतात ह्या जन्मसिध्द हक्कानुसार ते सारे धाब्यावर बसवून रीक्षात आठ-दहा पासून पंधरा पर्य़ंत कितीही मुले भरतात.प्रत्येकाची दप्तर,डब्याची पिशवी हे सारे पुढे असते आणि मागच्या जागेत ही सगळी मुले कोंबलेली असतात.कडेच्या मुलांची निम्मे शरीर रीक्षाबाहेर असते.मधल्या मुलांच्या मांडीवर मुले असतात, पुण्याच्या बेशिस्त रहदारीमधून अशा रीक्षा ऎन गर्दिच्या वेळेला भरधाव वेगाने धावत असतात.शाळा दहा महिने असते, त्यांना अकरा महिन्याचे पैसे द्यावे लागतात.शिवाय ट्रीप,१५-ऑगस्ट,२६ जानेवारी, गॅदरींग, रीपोर्ट -डे अशा वेगवेगळ्या निमित्ताने शाळेच्या वेळपत्रकात बदल असेल तेंव्हा रीक्षा येणार नाहीत, हे त्यांनी आधीच स्पष्ट केलेले असते.माझी मुलगी शाळेत रीक्षानेच जाते.
ती एकदा मोठ्या कौतुकाने सांगत होती,’आई ,आज ना,शाळेत जाताना आमच्याकडे सगळे बघत होते आणि हसत होते’
’का गं?’
’अगं, आमच्या रीक्षाला ट्पच नव्हते,काकांनी ते नवीन करायला टाकलयं, आम्हाला डायरेक्ट आकाश दिसत होते’
मला हसावे कि रडावे कळेना, शाळेला इतक्या सुट्ट्या असताना शाळॆच्या वेळातच रीक्षाची डागडुजी करायची जरुर आहे का? बर, हे त्यांना विचारायची सोय नसते, एकतर आपल्या नोकरीमुळे त्यांच्याशी गाठ घेणे मुश्कील.काही बोलले तरी मला हे कसे परवडतच नाही,केवळ तुमच्यावर मेहेरबानी म्हणून मी हा आतबट्ट्याचा धंदा करीत आहे असा बोलण्याचा सूर असतो.माझा मुलीच्या शाळेत शाळा सुटल्यावर एक तास मैदानावर कुठ्लाही खेळ खेळावाच लागेल अशी सूचना आली.मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय योग्यच आहे असे सगळ्या पालकांचे मत होते.मुलांचाही या सूचनेला विरोध असण्याचे काहीच कारण नव्हते.
आमच्या रीक्षाकाकांनी आम्हाला सरळ सांगितले,’ते खेळ -बिळ तुमच्या मुलीला खेळु देवू नका ’
’अहो, पण ते कम्प्लसरी आहे, आणि त्यात वाईट काय आहे?’
’अहो त्यात काय एक खोटं, मेडिकल सर्टिफिकेट द्यायच, मी देतो हवं तर,रीक्षातल्या सगळ्यांना मी हेच सांगितलय,मला वेळ नाही ना पाच नंतर’
’पण हा काही आजचा नियम नाही,खोटे सर्टिफिकेट आम्ही देणार नाही,मुलांनी रोज खेळलच पाहिजे’
’खेळुद्याना मुलांना, तुम्ही घरुन घराजवळील ग्राऊंडवर पाठ्वा, पैसे भरले कि कुठेही घालता येतं, तुम्हाला जमत नसेल तर तुमच्या मुलीची सोय तुम्ही करा’
म्हणजे या काकांच्या सोयीसाठी आम्ही आमच्या मुलीला शाळेत फुकट मिळणाऱ्या खेळापासून वंचित करायचं, खोटे सर्टिफिकेट देवून शाळेला फसवायचं आणि पदरमोड करून वेगळिकडे खेळायला पाठवायचं आहे कि नाही कमाल !
सगळेच रीक्षावाले असे असतात असे नाही.काही फार चांगले असतात.लोकांच्या विसरलेल्या बॅगा त्यांच्या कडे प्रामाणिक पणाने नेवून देणारे रीक्षावाले, रस्त्यावर अपघात झाला तर जखमी व्यक्तिला रीक्षातून दवाखान्यात नेणारे,अनोळखी जागी गेल्यावर पत्ता शोधायला मदत करणारे,शाळेच्या शेवट्च्या दिवशी मुलांना खाऊ खायला घालणारे असे चांगले रीक्षावाले असतात.माणुसकीचे दर्शन देणाऱ्या अशा रीक्षावाल्यांना जाहीर धन्यवाद आपण पेपर मध्ये वाचतोच.त्यांचे कौतुक करायला आपण नेहमीच तयार असतो.मात्र असे प्रसंग फार फार क्वचित येतात. एरवी नेहमीच खिशाला खार लावून त्यांची मिरासदारी सोसायची.रीक्षावाल्यांच्या संघट्ना पेट्रोलचे दर एक रुपयाने वाढल्यावर तत्परतेने किलोमीटर मागे एक रुपयाने भाडे वाढवून घेतात.मात्र पेट्रोलचे दर दहा रुपयांनी कमी होवून देखील भाडे वाढ एक रुपयांने कमी करायला यांची तयारी नाही.इलेक्ट्रॉनिक मीटर बसवायला यांचा विरोध,सी.एन.जी कीट बसवायला नाराजी.यातुनच त्यांना सध्याच्या पध्दतीत किती फायदा होतो हे न कळ्ण्याइतके पुणेकर अडाणी नाहीत.पण म्हणतात ना ’अडला हरी.....’


©