Wednesday, April 22, 2009

पत्रपुराण

भाषेच्या देणगीतून माणसाला संवादाचे वरदान लाभलयं. समोरासमोर असताना न सुचणारे बरेचसे लिहायला मिळाल्यावर तर काय ? लिपीचा शोध कुणी लावला असेल? मी कधी त्या दृष्टीने विचारच केला नव्हता, असे मूलभूत शोध लावणारे असामान्य बुध्दीमत्तेचे लोकं, त्यांच्या अलौकिक प्रतीभेची आपल्याला दादही नसते. समजायला लागल्यापासून आपण शाळेत जाऊ लागतॊ आणि अक्षरे गिरवता गिरवता लिहा वाचायला लागतो.
कागदाचा शोध लागण्याआधीपासूनच पत्र लिहिण्याची प्रथा चालू आहे. रुक्मिणीने श्रीकृष्णाला लिहिलेले पत्र, किंवा दमयंतीने नळराजाला लिहिलेले पत्र हि पुराणतली प्रेमपत्रे पत्रकलेची साक्ष तर देतातच शिवाय त्याकाळतील स्त्री-शिक्षणच नव्हे तर स्त्री-स्वातंत्र्याचा पुरावा देतात.
चांगदेवांनी ज्ञानदेवांना पाठवलेले कोरे पत्र त्यानंतर त्यांनी लिहिलेली चांगदेव पासष्टी अध्यात्मातील पत्रव्यवहारावर प्रकाश टाकतात, अफजलखान येत आहे अशी सूचना देणारे रामदासस्वामींचे शिवरायांना पाठविलेले पत्र, बाळाजी आवजी चिटणिसांनी कोऱ्या कागदावर वाचून दाखविलेला खलिता, आनंदीबाईंनी केलेला ’ध चा मा’ राजकारणातील पत्रांची महती दर्शवितात.
पंडीत नेहरूंनी तुरुंगामधून ईंदिराला(ईंदिरा गांधींना) लिहिलेली पत्रे प्रसिध्द आहेत. न्या.राम केशव रानड्यांनी आपल्या पत्नीला लिहिलेली अध्यात्मिक पत्रे तर केवळ अप्रतिम. शाळकरी वयात साने गुरुजींची सुधास पत्रे वाचलेली आठवतात? कोकणाचे,तिथल्या निसर्गाचे फुलांचे वर्णन वाचताना गुरुजींच्या निसर्ग प्रेमाची,निरीक्षणाची पदोपदी कमाल वाटते.
’पत्राने’ किती तरी कवींना काव्यासाठी विषय पुरविला आहे. हिंदी सिनेसंगीतात पत्रावरच्या गाण्यांची गणती करता येणार नाही. ’ये मेरा प्रेमपत्र पढकर’ , ’खत लिख दे सावरीया के नाम बाबू’, ’फूल तुम्हे भेजा है खतमें’ , ’तेरा खत लेके सनम पांव कही रखते हैं हम’ अशी एकाहून एक गाणी आठवू लागतात.निनावी पत्रे म्हणजे एकप्रकारचे खलनायकच. ठरलेली लग्ने मोडणे, भांडणे , बेबनाव अशा अनेक गोष्टींना कारणीभूत ठरलेली हि पत्रे.ऊशीरा मिळाल्यामुळे काहींची जीवने उध्वस्त करणारी तर अजिबात न मिळाल्याने एखाद्याचे भले करणारी अशी ना ना जातीची आणि ना ना स्वभावाची पत्रे.जुन्या काळी एखाद्या दूरच्या आड गावी नोकरी-धंद्याच्या निमित्ताने राहणाऱ्या व्यक्तिला घरचे खुशालीचे पत्र केवढा दिलासा देत असेल ! दूर गावी शिक्षणासाठी राहिलेल्या मुलाला घरच्या पत्राची किती अपूर्वाई वाटत असेल.लांब गावी सासुरवास सोसणाऱ्र्या मुलीच्या आयुष्यात माहेरी बोलावणारं पत्र केवढा आनंद देत असेल! खेडेगावात एकाकी जीवन कंठणाऱ्र्या थकलेल्या म्हाताऱ्यांना मुला -नातवंडांची पत्रे म्हणजे रखरखीत उन्हात थंडगार सावली ठरत असतील.डॉ.अनिल अवचटांच्या मुलीने लिहिले होते, त्यांची आई म्हणजे डॉ.सुनंदा अवचट त्यांना दरवर्षी वाढदिवसाला पत्र लिहित असे आणि ईतर सगळ्या भेटींपेक्षा हि भेट त्या मुलींना फार आवडत असे. खरच, वाढीच्या संस्कारक्षम वयात त्यामुलींना आईने लिहिलेली पत्रे हा त्यांच्या आयुष्यातला केवढा मोलाचा ठेवा ठरतील!
हि सगळी चर्चा झाली अनौपचारिक पत्रांबद्दल.औपचारिक पत्रे आजही येतात. सरकारी कामकाजाचा डोलारा त्यांच्यांवरच उभा असतो. कुठलेही काम लेखी ऑर्डर आल्याशिवाय करायचेच नाही असा अलिखित्(?) नियम असतो, त्यामुळे खालच्या ऑफीस पासून वर आणि वरून खाली पत्रव्यवहार चालू असतात. पत्रावर कुठलीही ऍक्शन घेण्याआधी त्याचे उत्तर म्हणजे पुन्हा पत्रच लिहावे लागते.पत्रांच्या प्रती काढाव्या लागतात त्या संबधित व्यक्तींना पाठवाव्या लागतात , शिवाय त्याची स्थळ प्रत जपावी लागते.एवढे सगळे केले की मग वेळ मिळाला तर पत्रावर कृती करता येते, दरम्यान या साखळीतल्या कोणाचीही बदली झाली तर त्या पत्रांचे संदर्भच बदलू शकतात.अशा कारभारात सर्वसामान्य नागरीक भरडला जातो असे नाही तर खुद्द सरकारी कर्मचारी,मग तो कोणत्याही पदावर असो, त्यालाही या पत्रव्यवहाराचे चटके सोसावे लागतात.या बाबतीत शासकीय कारभारात सर्वधर्म समभाव दिसतो.सरकारी कर्मचारी किंवा त्याच्यावर अवलंबून असणारी त्याच्या कुटुंबातली व्यक्ती आजारी असल्यास आणि सरकारने नेमून दिलेल्या दवाखान्यात ऊपचार घेत असल्यास त्याच्या खर्चाचा काही भाग कर्मचाऱ्याला मिळतो.वरील सर्व नियमात बसणारे असूनही ही बिले मिळण्यासाठी कर्मचाऱ्याला ज्या पत्रव्यवहाराला तोंड द्यावे लागते त्यामुळे तो स्वतः पेशंट असेल तर पुन्हा आजारी पडेल आणि घरच्या कोणासाठी करत असेल तरी त्याला दुखणे येईल.त्याचे अर्ज , पत्रे एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर फिरत फिरत सगळ्या ऑफिसमधून फिरून झाल्यावर हेड ऑफिसला जातात, त्यावर बरीच टिका-टिप्पण्णी होते, बिलांना वेगवेगळ्या कात्र्या लागतात, वेगवेगळे रिपोर्टस , वैद्यकीय आधिकारी-हॉस्पीटलाचे मेडीकल शॉप यांच्या चिठ्या काहीना काही मागत राहतात, तिकडे हॉस्पीटलही शासकीय त्यांचाही तसाच कारभार,थोडक्यात काय तर एखाद्याने पत्नीच्या प्रसूतीचे बिल ऑफिसकडे सादर केले तर् ते त्याच्या मुलाच्या मुंजीपर्यंत मिळाले तरी फारच लवकर मिळाल्याचा त्याला आनंद होतो.संगणक युगातही शासकीय कारभारात हेच चालते. फक्त हि पत्रे पूर्वी हाताने किंवा टाइपरायटरवर लिहिली जात ती आता संगणकावर टाईप् होतात लेझर प्रिंटर वर प्रिंट होतात इतकाच काय तो बदल. संगणक बिघडला , त्यावर काम करणारा माणूस रजेवर गेला, प्रिंटर मोडला हि नवी कारणे दप्तर दिरंगाईला प्राप्त झालेली आहेत. आपल्या ’माझे पौष्टिक जीवन’ या लेखातून पु.लं.नी पोष्ट खाते,तिथला कर्मचारी वर्ग, पोष्टाची भाषा ,पत्रांची महती याचं फारच सुरेख चित्र उभ केलं आहे, त्यांचे ’माझे पौष्टिक जीवन’ अभिवाचन तर निखळ विनोदा मुळे निर्भेळ आनंदाचा प्रत्यय देते.
पण मी सहज विचार करायला लागले आजच्या पिढीला हा विनोद जाणवेल का? आज पत्र लेखन जवळजवळ थांबलेलेच आहे.सुशिक्षितच नव्हे तर अशिक्षित लोकही पत्र लिहून घेण्याच्या भानगडीत पडत नाहीत. फोनने सगळ्यांचेच जीवन सोपे करून टाकले आहे. मोबाईलमुळे तर विचारायलाच नकॊ , सगळॆच एकमेकांच्या रेंजमध्ये अर्थात हवे तेंव्हा, हवे त्यावेळी. मुलांना आई बाबांची गरज असेल(पैशा-बिशासाठी) तर फोन अचूक लागतोच.आणि त्यांची कटकट् नकॊ असेल तेंव्हा तो स्विच ऑफ करता येतो, बॅटरी डाऊन असते, रेंज नसते, नेटवर्क फेल असते, ट्रॅफिक(नेटचा) जॅम असतो, छप्पन कारणे असतात. आजच्या इन्स्टंटच्या जमान्यात पत्र लिहीणे,त्याला पोस्टाची तिकिटे लावणे, मग ते टाकणे इतके व्याप करायला सवड कुठे आहे त्याहीपेक्षा पत्राच्या उत्तराची वाट पहाणे हे तर फारच बोअरींग.
सध्याच्या कॉम्प्युटरच्या जमान्यात ’ई-मेल’ हि स्वस्त आणि मस्त सोय आहे. जवळपासच्या मित्रापासून सातासमुद्रापलिकडल्या संबधिंताबरोबर संपर्कात राहण्याचे एवढे सोयीचे साधन नसेल. हल्ली देवनागरीमधून, किंबहुना बहुतेक इंग्रजीतर भाषांच्या लिपींमधून लिहावयाचे शोध लागल्यामुळे तर आपल्या भाषेतूनदेखील लिहिता येऊ लागले आहे. म्हणून संगणकसारखा सखा दुसरा नाही असे वाटते. शिवाय सुवाच्च अक्षर, पाहिजे तसे बदलही भराभर करता येतात. एकच मजकूर अनेकांना पाठवायचा ( कुठल्या कार्यक्रमाचे आमंत्रण इ.) तर पुन्हा पुन्हा लिहायला नको.असे फायदेच फायदे.
मात्र हाताने पत्र लिहिणे, ते पोष्टात टाकणे, उत्तराची वाट पहाणे.पत्राचे उत्तर आल्यावर मिळणारा आनंद, आपले पत्र मिळाल्याचा त्या व्यक्तिला झालेला आनंद याची मजा वेगळीच आहे.अक्षरामधून जाणवणारी पत्र पाठवणाऱ्याची मनःस्थिती, आणि आवडत्या व्यक्तिचे पत्र त्याच्या पत्त्यावरील अक्षरातून समजताच फुटणाऱ्या आनंदाच्या उकळ्या हे सारे ’ई-मेल’ कसे देणार? इंदिरा संत म्हणतात तस,
पत्र लिही पण नको पाठवू शाई मधूनी काजळ गहिरे
लिपीरेशांच्या जाळीमधूनी नको पाठवू हसू लाजरे. - हे सगळं मेलमधून कुठून जाणवणार ?
माझ्या आजीच्या बॅगेच्या तळाशी माझ्या वडीलांनी, म्हणजे तिच्या मुलाने तिला लिहिलेली पत्रे आम्हाला सापडली होती, पत्रे वाचताना दादा बोलत आहेत, असा भास होत होता, त्या जीर्ण कागदांवरील दादांचे अक्षरातून त्यांचा चेहरा दिसत होता.
असे अनुभव ई-मेल नाही देवू शकत, पण त्याला काही ईलाज नाही. बदल होत राहणार, चुलीवरचे अन्न कितीही रुचकर लागले तरी रोजच्या जेवणासाठी गॅस,आजच्या जमान्यात मायक्रोवेव्ह वापरावा लागतोच. माणसा-माणसांना एकमेकाशी संवाद साधावा वाटतोय, हे काय कमी आहे? साधने बदलली तरी चालतील, माणसा-माणसांत नाती रहावीत, एकमेकांची सुख दुःखे वाटून घेता यावीत. ’शब्देविण संवादु’ कला साधण्यासाठी ज्ञानदेवांइतकी आपली पात्रता कुठे?
तेव्हा दहा दिशांचे तट फोडून दोन्ही ध्रुवांना जवळ आणणाऱ्या आंतरजालाच्या मदतीने संपर्कात राहून आपण आपला मित्रपरीवार विशाल करु या.


©

Tuesday, March 24, 2009

आजी

’अतिपरीचयात अवज्ञा’ हि उक्ती कोणतीही व्यक्ती काय, वस्तू काय किंवा ठिकाण काय सगळ्यांच्या बाबतीत अगदी खरी आहे. जवळच्या व्यक्तींबाबत, त्यांच्या गुणांबाबत तर फारच.
सध्याच्या विभक्त कुटुंब पध्द्तीत स्वंतत्र बाण्याने राहणे आपल्या आणि आपल्या मुलांच्या इतके आंगवळणी पडलयं,की कुणाकडे जायचे ते ही रहायला म्हणजे मुलांच्या अंगावर काटा आलाच. तिकडे स्वतंत्र खोली,स्वतंत्र टॉयलेट मिळणार का?,जेवायला काय असेल? अशा प्रश्णांपासून तेथे कोणाशी कसे,काय किती बोलावे लागेल ? अशा अनंत शंका.
हल्ली बहुतेकांना एक-दॊन मुलेच असतात त्यामुळे एक मुलगा असण्याची शक्यताही जास्तच असते, मुलगा सून दोघेही नोकरी करत असतील तर सगळयांनी एकत्र राहणे उभयपक्षी सोयीचे असते, तरीही तसे राहणे दोघांनाही अतिशय त्रासदायक ठरते हि वस्तुस्थिती आहे.सासू-सुनेचे न पटणे हे त्रिकालाबाधित सत्य आहे, त्याला कोणी जनरेशन गॅप म्हणा किंवा सत्तेची हाव म्हणा.
या साऱ्या गोष्टी बघताना मला माझ्या आजीची राहून राहून आठवण येते. तिच्या असामान्य गुणांची( जे अता असामान्य वाटतात) सतत जाणीव होते. आणि आपण किती कमी आहोत ते जाणवते.
माझी आजी पूर्वीच्या काळाप्रमाणेच फारशी शिकलेली नव्हती,तिला वाचता यायचे पण लिहिता येत नाही असे म्हणायची.सही करायची वेळ आलीच तर स्वतःचे नाव लिहिलेला कागद समोर ठेवून त्यात बघत लिहिताना मी तिला पाहिले आहे, पण एकंदरीत लिहिणे नाहीच. व्यवहारज्ञान तिला फारसे नव्हतेच. जहांबाजपणाचा पूर्ण अभाव. खेड्यात वाढलेल्या लोकांमध्ये आढळणारा बेरकीपणाही तिच्यात नव्हता.थोडक्यात अगदी साधी -भोळी ,फारशी न शिकलेली ,व्यवहारशून्य अशी ती होती.पण तिच्यात काही असे गुण होते कि ते केवळ अनमॊल होते.
फार लहान वयात तिच्यावर वैधव्याची कुऱ्हाड कोसळली तिच्या पदरी सात मुले आणि कुणाचाच आधार नाही.अगदी माहेरच्यांचा देखील. मोठा मुलागा १६ वर्षांचा धाकटी मुलगी दिड वर्षाची. अशा परिस्थितीत तिने आपले दुःख, दारिद्र्य कुणालाच न दाखवता दिवस काढले.तिच्या सुदैवाने मुले चांगली होती.त्यांनी जबाबदाऱ्या उचलल्या, तिने मुलांना चांगले वागा, चांगल्या मार्गाने जा एवढेच सांगितले.
मला आठवते त्यावेळी आमची परिस्थिती खूपच बरी होती, माझे वडील आजीचा मोठा मुलगा असल्याने त्यांनी व माझ्या आईने कुटुंब वर आणण्यासठी बरेच कष्ट घेतले,माझ्या दुसऱ्या काकांनीही त्यांना साथ दिली. धाकट्या भावांना शिकवले,बहिणींची लग्ने केलेली होती. आजीला पाच सुना आल्या होत्या, लेकी सासरी गेल्या होत्या. बरीच नातवंडे होती. आजीचा मुक्काम पाचही मुलांकडे आलटून पालटून असे. आजी आली की आम्हांला किती आनंद व्हायचा. घरात आली की ती घरचीच होऊन जाई. समोर दिसेल ते काम करणार, समोर येईल ते आनंदाने खाणार. तिच्या सगळ्या मुलांची आर्थिक परिस्थिती काही सारखी नव्हती. माझे धाकटे काका शिकल्याने त्यांची सांपत्तिक स्थिती आमच्या पेक्षा चांगली असे, पण आजीला सगळे सारखे होते. तिने नातवंडाशी वागताना कधी भेदभाव केला नाही. आमच्याकडे पाटावर जेवली, काकांकडे डायनिंग टेबलावर. भोरची जमीन सारवणारी आजी पुण्यात फरशी पुसायलाही पुढे असायची, कामाचा तिला कंटाळा नसायचाच आणि कुणाकडूनही आली तरी तिकडच्या चहाड्या केल्यात, चुगल्या सांगितल्या असे मला कध्धीच आठवत नाही. कुणी विचरले तरी चांगले तेवढे सांगणार, आज वाटतं तिने हे कसे जमवले असेल! पाच वगवेगळ्या घरांतून आलेल्या वेगवेगळ्या स्वभावाच्या सुनांशी पट्वून घेताना तिला काहीच जडं गेलं नसेल का? तिचे कुणाशीच भांडण झाले नाही, वादविवाद तर तिला जमतच नव्हते. तिने आपल्या जुन्या दिवसांची दुःखे कधी कुणाजवळ गायली नाहीत. आमच्या आत्याकडून ,आईकडून आम्हाला तिच्या कष्टांच्या,वाईट दिवसांबद्दलच्या कथा कळल्या.आजीने मात्र भूतकाळातील त्रासाचा कधी चुकुन पाढा वाचला नाही. नव्या पिढीला मिळणाऱ्या (म्हणजे तिच्या सुनांना) मिळणाऱ्या सुखाबद्द्ल बोटे मोडली नाहीत.
आजी खूप वाचायची.तिचे मन मोठे रसिक होते.तिला सिनेमा,नाटक,गाण्याचे कार्यक्रम यांची फार आवड होती. मात्र ती स्वतः हुन एखाद्या कार्यक्रमाला मला न्या,असे कुणाला म्हणत नसे. माझे दादा तिला आवर्जून गणपती दाखवायला नेत, त्यावेळी अतिशय उत्साहाने ती निघे,माझे पायच दुखतात, आता मी कशाला येऊ? तरूण वयात माझी हौस नाही झाली आता कशाला? असे रडगाणे तिने कधी गायले नाही. आजीची कुठलीच हौस मौज झाली नाही याची तिच्या मुलांना इतकी जाणीव होती की माझे काका,दादा तिला समजून तिला सिनेमाला नेत,नाट्क दाखवत.ती पण त्या साऱ्यांचा मनापासून आस्वाद घेत असे.मी लहान असताना सारस बागेजवळील सणस पटांगणात ते विजेवर चालणारे जाएंट व्हिल आले होते, मला आठवतयं आम्ही सगळे गेलॊ होतो,आजी आमच्या बरोबर होती.दादा म्हणाले,’इंदा(आजीचे नाव इंदिरा तिला सगळे इंदा म्हणत) बसतेस का या पाळण्यात? ’ आजी तयार झाली.आमच्या बरोबर बसलीसुध्दा. एकमेकांना समजून वागण्याचा आजीचा गुण अगदी घेण्यासारखा आहे. तिच्या हौशीपेक्षा मुलगे आपल्यासाठी एवढं करताहेत, याच तिला फार समाधान असे आणि त्यांच्या आनंदात सहभागी होताना ती पूर्वायुष्याचा उल्लेख टाळत असे.
दुसऱ्याचे मन जाणणे जसे तिला जमे तसे मुलांच्या संसारात घरच्या सारखे काम केले तरी तिने कधी कुठ्ले नियम कुणावर लादले नाहीत. तिचे देवधर्म तिच्यापुरते असत. जेवणापूर्वी देवदर्शनाला जायचे असा तिचा नेम होता.कुठलाही देव तिला चालत असे.जिथे रहायची त्या घराजवळचे जे देऊळ असेल तेथे जाऊन मगच ती जेवायची.तिने मुलांना कधी देवाचे अमूक करा,तमुक करा असे सांगितले नाही,सुनांनाही तसेच. माझी एक काकू खूप धार्मिक आहे, ती सोवळे-ऒवळे,देवधर्म खूप साक्षॊपाने करीत असे. आजीने तिला विरोध केला नाही, आणि ती करते तसे तुम्ही करा म्हणून इतर सुनांनाही सांगितले नाही. भोरला आमचे घर आहे. माझे काका तिथे राहात . काका काकू दोघेही शाळेत नोकरी करीत.दर सुट्टीला आम्ही भोरला जायचो. मी कॉलेजला जाऊ लागे पर्यंत यात खंड पडला नव्हता. आजीशी गप्पा मारायला मला आवडे. मी आजीची जरा जास्त लाडकी असल्याचा माझ्या इतर भावंडांचा आरोप असे.पण मला वाटतं , मी सगळ्यात जास्त तिच्याशी बोलत असे,त्यामुळे तिला माझ्या बद्दल जास्त प्रेम वाटत असावं. तक्रार करण्याचा तिचा स्वभावच नसल्याने वय झाल्यावर माणसाला रिकामपण खायला ऊठ्तं. कोणी बोलायला नसतं असं आपण सध्या सतत वाचतो, ऎकतॊ. आजीलाही तसं होत असेल. मी तिच्याशी बोलत असल्याने ती मला सतत रहायचा आग्रह करायची. सोमवारी सकाळी निघायचं , म्हट्लं की म्हणायची अगं जेवून जा, जेवण झाल्यावर म्हणायची , उन्हं उतरु दे मग निघ. आता चारचा चहा झाला की जा, मग आता दिवेलागणीला कशाला जातीस? पुण्याला जाईतॊ अंधार पडेल, उद्या माझा मंगळवार आहे, साबुदाण्याची खिचडी करू, खाऊन जा.मंगळ्वार असाच जायचा, बुधवारी म्हणायची जाशी बुधी येशील कधी? नको गं , बुधवारी नको जाऊ. असं करीत ती मला ठेऊन घ्यायची.मला तिच्याकडे रहायला आवडायचे.
तिच्या लहानपणीच्या आठवणी ती सांगायची, माझ्या नवऱ्याबद्दल, संसारिक जीवनाबद्दल मला काही विचारु नकोस या अटीवर ती पक्की होती.तिचे कटू अनुभव तिने कधीच कुणाला नाही सांगितले. कधी कधी मला म्हणे,’मी रोज इथे संध्याकाळी ओट्यावर बसते ना, किती जोडपी फिरायला जात असतात, आमच्यावेळी नवऱ्याबरोबर बोलायला मिळायची मारामार. हल्लीच्या मुलींना रोज नवऱ्याबरोबर फिरायला मिळतं, पण बघ, बोलत काय असतात, तुमची आई मला अस्सं म्हणाली, तुमची बहीण परवा तस्सं वागली! ’ मी विचारी,’मग, आजी त्यांनी काय बोलायला हवं?’ आजी म्हणायची,’अगं,घरच्याच कटकटी बाहेर कशाला? जरा काही वेगळं बोलावं, झाडं,पक्षी, निसर्ग किती विषय आहेत!’ तिला बहुदा त्यांनी रोमॅंटिक गप्पा माराव्या असं म्हणायच असेल, पण मी नात त्यातून लग्नं न झालेली. आजच्या पिढीला जे फिरण्याच सुखं मिळतयं , त्याचा त्यांनी योग्य वापर करावा, आनंदानं जगावं असं तिला वाटे.
आज सकारात्मक दृष्टीकॊन ठेवा, म्हणून मानसोपचार तज्ज्ञ, सामुपदेशक सांगत असतात. वेगवेगळ्या मासिकांमधून,वर्तमानपत्रांमधूनही याबद्द्ल सतत वाचायला मिळते.आजीचा अतिशय सकारात्मक दृष्टीकॊन असे.ती म्हणे घरात नेहमी चांगलं बोलावं, वास्तुपुरुषाचा घरात वास असतो, तो तथास्तु म्हणत असतो. खरं, खोटं त्यावेळी कळतं नसे. आमच्या आत्यांची लग्न जमायला बरेच त्रास पडले, परिस्थिती हे एक कारण होतचं, पण आजी शांत असे, म्हणे, तुम्हाला देवाने इथे पाठवलयं, त्यावेळी तुमच्या नवऱ्यालाही पाठवलयं तो आपल्याला मिळत नाही इतकचं, वेळ आली की जमेल.तिची सौंदर्याची व्याख्या सुद्धा अगदी सोपी होती, नाक,कान डॊळे जागच्या जागी असले कि झाले, ती व्यक्ति सुंदर, त्यामुळे आम्ही सगळी नातवंडे सुंदरच, त्यात डावं,उजवं करायचा प्रश्णच यायचा नाही. तिला पाच मुलगे होते,पण पुढच्या पिढीत आम्ही मुली संख्येने जास्त होतो.आम्ही तर तीन बहिणी. आजीने त्या बद्दल खंत दाखवली नाही.मुलींचाच नाहीतर सुनांनाही जुन्या काळातली असून तिने त्याबाबत दुखावले नाही.मुली म्हणून घरात आम्हांला कधी दुय्यम वागणूक मिळाली नाही. माझी सगळ्यात लहान बहीण जन्मतः कमी वजनाची होती.त्यामुळे तिचे बारसे करायला नको,असे आईचे म्हणणे होते.आजी म्हणाली,’तुमची तिसरी मुलगी असली तरी तिचा पहिलाच जन्म आहे, बारसे हा संस्कार असतो, तो करु या. उद्या ती मोठी होईल, हुशार निघेल, शिकेल,मग आपल्याला वाटेल,हिचे बारसे काही आपण केले नाही आणि दुर्दैवाने ती नाहीच जगली तर तिचे काही झाले नाही अशी खंत नको.’
आजीला लहान मुलांचा फार लळा असे. कुणाचही मुलं ती प्रमाने घ्यायची,त्याला घरात असेल तो खाऊ त्यांना देणार. रस्त्यावरच्या भिकाऱ्यांची, बांधकामावरच्या वडाऱ्यांची पाण्याचा स्पर्श न झालेल्या अस्वच्छ मुलांशी प्रेमाने बोलताना बघून मला नवल वाटे, क्वचित आजीचा रागही येई, कुणालाही घरात बोलावून खाऊ द्यावा म्हणजे काय? पण आज तिच्यातले संतपण जाणवतं. आपण कुत्र्याच्या मागे तूप घेऊन जाणाऱ्या नामदेवाच्या गोष्टी वाचल्या, महाराच्या पोराला कडेवर घेणाऱ्या एकनाथांचे चरीत्र वाचले पण यातले फार थोडे वाचूनही सहज आचरणात आणणारी आजी किती थोर होती. नवरा गेल्यावर तिचे फार हाल झाले होते, तिच्या चुलत जावा,चुलत सासु,सासरे तिला त्रास देत, टाकून बोलत, तिच्या मुलांबद्दलही कोणी फारसे प्रेमाने बोलत नसत. मात्र त्या चुलत घरातला मुलगा (माझा काका) आजीच्या घरी तिच्या मुलांमध्ये खेळायला येई आणि आजी त्याला मुलांबरोबर प्रेमाने जेवायला घाली. मला बोलता बोलता सांगे,’अगं त्यांच्या घरचं, दुधा तुपातलं जेवणं सोडून तो आमच्या बरोबर आमटी भात खायचा’
’आजी , तुला त्याचा राग नाही यायचा?’
’कशाबद्दल ?’ ’
’तुला त्याच्या घरचे सगळे किती बोलायचे, अपमान करायचे ना!’
’अगं, त्याबद्दल या लेकरावर कातावून काय होणार? त्याचा काय दोष ?’
घरातल्या मोठ्य़ा माणसांवरचा राग आपल्या मुलांवर काढणारे लोक असतात. ऑफीसमधे त्रास झाला की बायका मुलांवर खेकसणारे महाभाग असतात, आणि आजी तिला सासुरवास करणाऱ्या माणसांच्या मुलांवरही कधी कातावली नाही. तिच्या संस्कारमुळे म्हणा, तिच्या सहवासाने म्हणा आमच्या चुलत, आते भावंडामध्येही एकमेकांबद्दल जिव्हाळा आहे. मोठ्य़ा माणसांमध्ये मतभेद झाले, रुसवे फुगवे झाले तरी संबंध तोडून टाकण्याइतकी वेळ कधी आली नाही.आज आम्ही एकमेकांकडे फारसे जात येत नसू, प्रत्येकाच्या व्यापामुळे ते जमतही नाही पण कुणाच्याही अडीअडचणीला आणि समारंभाला गेल्यावाचून रहात नाही. दुसऱ्याच्या दुःखात माणूस सहभागी होऊ शकतॊ, पण त्याच्या आनंदात तितक्याच आनंदाने जायला मनाचा मोठेपणा लागतो. आजीमध्ये तो पुरेपूर होता. मलाही तो वारसा थोड्या प्रमाणात मिळाला असावा, कुणाच्याही उत्कर्षाचा मला हेवा वाटत नाही.
सुखाने चढून जाणेही आजीला माहीत नव्हते, तिचे मुलगे चांगले शिकले. माझे एक काका तर B.Sc, M.Sc(stats). दोन्ही परीक्षांमध्ये विद्यापीठामध्ये पहिले आले, सुवर्ण पदक् मिळविले, पुण्यातल्या नामवंत कॉलेज मध्ये प्रचार्य झाले, आजीला या गोष्टीचे कौतुक होते.पण तिने कधीही मुलाच्या नावावर मीपणा दाखवला नाही. देवाची कृपा आणि त्याचे परिश्रम यालाच तिने श्रेय दिले.
असे किती गुण सांगावे, आठ्वावे तितके थोडेच आहेत.एक आणखी आठवण, मला आत्याकडून समजलेली.नंतर आजीला विचारलेली. आजीला सात बहिणी होत्या, हिच सगळ्यात धाकटी.आणि एक भाऊ होता. आजीच्या आईला सात भाऊच म्हणजे आजीला सात मामा होते.त्यांनी आपल्या एकुलत्या एक बहिणीचा मुलगा स्वतः कडे ठेवून त्याला शिकविले.त्या काळात तो डॉक्टर झाला होता. मध्यप्रदेशात इंदौर ला तो असे. २-३ वर्षातून एकदा तो आजीला माहेरपणाला घेवुन जाई. त्यावेळी सासरचे लोक एखाद दुसरे मूल (अगदी तान्हे ,दुसरे जरा मोठे) घेऊन जा, असे सांगत. भोरहुन पुण्याला बसने आले, कि पुढील प्रवास रेल्वेने. आजीचा भाऊ स्वतः फर्स्ट क्लासमध्ये बसे आजीचे थर्ड क्लासचे तिकीट काढलेले असे. हे ऎकुनच माझा संताप झाला. आजीला तरी कसा स्वाभिमान नसावा! कशाला जावे तिने भावाबरोबर? मी तिला चिडूनच विचारले. ती थंडच
’शुभे, माझा भाऊ मला न्यायला यायचा हे काय कमी होते? त्यामुळे माझी , माझ्या आई-वडिलांशी भेट होत होती ना?’
’पण मग तो स्वतः फर्स्ट क्लासमध्ये..’
’अगं, एवढा मोठा डॉक्टर तो, तो कसा ग, थर्ड क्लासमध्ये बसेल? आणि मला काय फरक पडतॊ कुठेही बसले तरी , कायम थोडच गाडीत बसायचय? शिवाय कुठ्ल्याही डब्यात बसले तरी गाडी अखेरी मुक्कामाला जाणारच ना?’
’मग तुला का नाही न्यायचा फर्स्ट क्लासमधून?, होता ना मोठा डॉक्टर तो?’
’होता ना, पण असं बघ, त्याला काय मी एकटीच बहीण होते, आम्ही सात जणी, तो किती करेल? शिवाय त्याची बायको, तिलाही सांभाळुन घ्यायला नको का? नाहितर तिला वाटायच, या एवढ्या नणंदांचं माहेरपण करुन आम्हाला काय शिल्लक राहणार? शेवटी जिच्याबरोबर आयुष्य काढायचं तिचं मन सांभाळणं महत्वाचं, आपण आपल्या भावाला समजून घ्यायला नको का? माझा त्याच्यावर काडीचा राग नाही बरं’
कुठ्ल्याही डब्यात बसले तरी गाडी अखेरी मुक्कामाला जाणारच हेच आजीचे समाधानी जगण्याचे रहस्य होते.त्यामुळेच तिला बंगला, वाडा, चाळ कुठेही राहताना आडचण नसे.तिचा शेवट्चा दिस गोड व्हावा, म्हणून तिने अट्टहास केला नाही.सहज जगत होती, पण तिचे असे जगणे ही देवाला बघवले नाही. तिच्या उतारवयात माझ्या वडिलांचा मृत्यू झाला.हा घाव सोसणे तिला फार जड गेले. तिचे पूर्वायुष्यातील आठवणींनी कधीही न भरणारे डोळे सतत गळू लागले. माझं काय चुकलं? देवाला मी कशी नाही दिसले? माझ्या आधी त्याला का नेलं? असं ती वारंवार म्हणायची. कुठल्याही विषयाचा शेवट दादांच्या जाण्यापाशी आणायची. त्यांच्या पश्यात आमच्या घरी ती फारशी नाही आली, त्या घरात मला अपराधी वाटतं असं म्हणे. तरी तिच्या डोळ्याची ऑपरेशन्स झाली होती तेंव्हा आमच्याघरी आली. मी तिच्या डोळ्यात औषध घालायची. तेव्हां मला तुला बंगलेवाला, मोटारवाला नवरा मिळेल, असा तोंड भरून आशीर्वाद द्यायची. तिच्या बॅगेच्या तळाशी माझ्या दादांनी तिला लिहिलेली पत्रे तिने जपून ठेवलेली दिसली. मुलाची तेवढी आठ्वण तिने जपली होती.तिचा एक नातूही ऎन तारुण्यात गेला, तेही दुःख तिला सोसावे लागले.
माझ्या लग्नाला ती नाही येवू शकली. वय झाले होतेच, पण तिची जगण्याची ऊमेद कमी झाली होती हेच खरे कारण होते. सासरी गेल्यावर माझे भोरला जाणे काही झाले नाही. लग्नानंतर वर्षाभरात माझे सासरे वारले, सासुबाई सतत आजारी पडत, एकूणच नोकरी-घर,संसार या व्यापात मी पुरती गुरफटले. आजीच्या आजारपणाच्या बातम्या कळत, पण वयाप्रमाणे तसे चालणार, म्हणून त्याकडे फरसे लक्ष नाही दिले. माझ्या मुलीच्या संगोपनात वेळ जात असे. आजी म्हणायची ’हे सहाजिकच आहे, पाणी पुढेच वाहते, नदी समुद्राकडेच जाणार, मागे बघणॆ जमणार नाही’ पण एकदा अशीच धावत पळत आईकडे गेले असता आई म्हणाली,’आजी तुझी आठवण काढतीयं, जाउन ये ना एकदा, एवढा कसा वेळ नाही ? काय जगावेगळे संसार आणि नोकऱ्या तुमच्या?( आईचा स्वभाव आजीच्या एकदम उलट, फारच स्पष्ट्वक्ता आणि सडेतोड) ’ मलाही फार अपराधी वाटले. येत्या शनिवारी नक्की जाते असे सांगून तिचा निरोप घेतला. घरी अडचणी होत्याच, नवरा टूर वर गेला होता.पण मी मुलीला घेउन गेले.खरं तर पुणे -भोर तासा दिड तासाचा प्रवास. घरी गेले, काकू शाळेत जायला निघाली होती. ती म्हणाली,’बरं झालं आलीस, तुझी आठवण काढताहेत, त्यांच्या जवळ थांब,कुठे जाऊ नको’ आजी जवळ गेले, अगदीच सुकून गेली होती. मला ऒळखले,’तूच तेवढी राहिली होतीस ,सगळे भेटून गेले.’ माझ्या पॊटात गलबलून आले, ’आजीच्या चेहऱ्यावर समाधान होते, माझ्या लेकीला जवळ घेतले, ’बघ, मिळाला ना तुला बंगला , गाडी? मी म्हणालेच होते ना!’
’तू नाही आलीस गं , माझं घर बघायला’
’असू दे, तुझ घरं छानच असणार, माणसंही चांगलीच असणार, तुझे वडील हवे होते ,तुमच चांगल झालेल बघायला!’
मग इतर बरच बोललो, म्हणजे मी बोलले ती ऎकत होती.दुपारी चहा करायला सुध्दा मला उठू नकॊ म्हणाली, काकू आल्यावर करेल, तू माझापाशी बैस.तुला तांदळाची उकड आवडते ना, शाळेतून आल्यावर तिला करायला सांगते.
’आजी , नकॊ आता मला काही. काकू दमून येईल, मी पटकन चहा करते, आपण पिऊ या’
’बरं, खरं आहे, ती दमते, तिला माझं फार करावं लागत.’
दुसऱ्या दिवशी मी आणि काकूनी तिचे अंग पुसले, कपडे बदलले.नंतर तिची शुध्द गेली, संध्याकाळी मी निघाले तर तिने मला ऒळ्खले नाही, जागृती-सुशुप्तीच्या सीमेवर होती, माझा पाय निघत नव्ह्ता पण जाणॆ जरुरीचे होते. रविवारी मी पुण्याला आले. आणि सोमवारी संध्याकाळी आजी गेली. माझ्या भेटीसाठी तिने जीव धरुन ठेवला होता.
आज आम्हांला चांगले दिवस आले,त्या मागे तिची पुण्याई आहे असं मला नेहमी वाटतं.इतक साधेपणानं राहणं,सगळ्यांच्या आनंदात आनंद मानणं,कुणाचा राग,द्वेष,मत्सर न करता राहणं किती अवघड आहे हे आता जाणवतं. कुठलीही तक्रार न करता,स्वतः कडे कमीपणा घेऊन राहणे फार कठीण आहे. शिकलेल्या, न शिकलेल्या कोणालाच न जमणारे सहजीवन आजीने जगून दाखवले.त्यामुळे तिला जाऊन पंधरा वर्षे होऊन गेली पण अजूनही तिची पदोपदी आठवण होते.कुठल्याही रंगाचे होउन जाण्याचा पाण्यासारखा तिचा स्वभाव होता, पाण्याइतकच पारदर्शक निर्मळ मन होतं आणि म्हणूनच तिच्या सगळ्या मुलां-सुनांच्या,लेकी-जावई आणि यच्चयावत नातवंडांच्या जीवनात तिचे स्थान अढळ आहे.



Tuesday, February 24, 2009

पंढरीची वारी : एक अनुभव.- भाग ३


सकाळचे नऊ वाजून गेले असावेत, आम्ही पुन्हा चालावयास सुरुवात केली.वाटेत ठिकठिकाणी वारकऱयांसाठी चहा, केळी,पोहे असे विविध स्टॉल्स दिसत होते.बहुतेक वारकरी तिकडे जात नव्हते, जत्रा म्हटली कि जसे हौशे, नवशे,गवशे येतात तसेच वारी बरोबरही असावेत. अनेक तरूण,लहाने मुले अशा ठिकाणी केवळ गर्दी करुन मिळेल ते पदरात पाडून घेत होती. एका जागी तर कुठल्याशा कंपनीतर्फे बिस्कीटांचे पुडे वाटप चालू होते, एका मुलाने आपल्या मित्रांनाहि रांगेत उभे केले असावे सगळी गॅंग मिळलेले पुडे एका पोत्यात भरत होती.दारीद्र्य माणसाला अगतिक बनवते हे खरे असले तरी इथे गरीबीपेक्षा फुकटी वृत्ती वाढत चाललीयं असं जाणवतं. आपल्याला आयकरात सवलती मिळाव्यात यासाठी दान देण्यास तयार होणाऱ्या कंपन्या, आणि त्या फुकट मिळणाऱ्या पदार्थांवर तुटून पडणारी आपली नवी पिढी, कुणाला विठ्ठ्ल पावेल्? किंबहुना त्या विठ्ठ्लासाठी हे चाललयं हे तरी त्यांच्या गावी आहे कि नाही हे तॊ विठ्ठ्लच जाणे !
या साऱ्या स्टॉल्सकडे न जाता ’गुढी उभारावि, टाळी वाजवावी वाट हि चालावि पंढरीची’ असे म्हणत जाणारा वारकऱ्यांचा मेळा होताच. विश्रांतवाडीचा पहाटे सुनसान असणारा रस्ता आता माणसांनी फुलून गेला होता. मध्येच पावसाची एखादी सर यायची सारे वातावरण थंड व्हायचे. आमच्यासारखी शहरी पांढरपेशी मंड्ळी छ्त्र्या उघडून किंवा रेनकोट, जर्कीन घालायला लागे पर्यंत पावसाचा जोर पार कमी होऊन जाई. बरे हा सारा जामानिमा अंगावर बाळगावा तर लगेच पडणाऱ्या लख्ख उन्हामुळे ऊकडुन जीव हैराण होवून जाई. शेवटी हा सारा पसारा पिशवित कोंबला आणि ऊन पावसाचा खेळ अंगावर घ्यायचे ठरविले. इथे आपल्याला ओळखणारे कुणीच नाही आणि आपल्या कडे बघायला कुणाला वेळच नाही हे लक्षात आले आणि मग एकदम हलके हलके वाटायला लागले.नाहीतरी पडण्यापेक्षा पडताना आपल्याला कुणी बघितले तर जास्त दुःख होते, तसे भिजण्यापेक्षा आपले भिजलेले ध्यान कुणी बघेल याचीच काळजी असते. शिवाय भिजत भिजत चालत असल्याने थंडी वाजत नव्हती,ऊन पड्ल्याने कपडे आपोआप सुकतही होते. आषाढ महिना असून श्रावणातल्यासारखा पाऊस होता.
पण हा ऊन पावसाचा खेळ ही फार तर तास दिड तास चालला. नंतर कडक ऊन पडले. पायाखलचा सिमेंटचा रस्ता प्रचंड तापत होता, सहापदरी मोठ्या रस्त्यावर औषधालाही झाड नव्हते! डोक्यावर ऊन मी म्हणत होते. थोडक्यात ’पाऊल थकले माथ्यावरती जड झाले ओझे’ अशी अवस्था होऊ लागली , अध्यात्माच्या बिकट वाटेचा प्रत्यय येवु लागला.
शहरीकरणामुळे जंगलतोड झालीयं. दोन्ही बाजूला झाडांच्या महिरपीतून जाणारे रस्ते नाहिसे होत चाललेत. गाडीतून जाताना हे जाणवत नाही अस नाही, पण त्यामुळे होणारी तगमग चालतानाच जास्त जाणवली. पालखी येणार म्हणून दुतर्फा मांडव घातले होते, प्रत्येक वॉर्डातले मा.नगरसेवक, क्वचित ठिकाणी महापौर येत होते, त्यांच्या हस्ते खाद्यपदार्थांचे वाटप होत होते, त्यापैकी कुणालाच ह्याबरोबरच रस्त्याच्या कडेने वृक्षारॊपण करून वारकऱ्यांचा मार्ग सावलीचा करावा असे का वाटत नाही? पण मघा म्हटल्याप्रमाणे त्यासाठी काही पावले तरी पाय़ी चालायला हवे!
बॅंक ऑफ महाराष्ट्र तर्फे उभारलेल्या एका मांडवापाशी आल्यावर मी थांबले. फूटपाथवर मांडव होता, बाजूच्या कट्ट्यावर थोडी टेकले. बाटलीतले पाणी प्यायल्यावर जरा हुशारी वाटली.तिथल्या काही रहिवासी सोसायटीतल्या उत्साही लोकांची एकच गडबड उडाली होती. बायका, मुले वारकऱ्यांना केळी,राजगिऱ्याचे लाडू वाटत होती. पुरुष मंडळी त्यांच्या वर लक्ष ठेवून होती. आतिशय शिस्तबध्दतेने सगळे काम चालू होते. आम्हांलाही त्यांनी मोठ्या प्रेमाने सगळे देऊ केले, पण असे घेणे मनाला पटेना एक तर आम्ही कुठल्याच अर्थाने वारकरी नाही. केवळ हौशीसाठी आम्ही आलॊ, आणि संध्याकाळी तर घरी जाणार! ज्यांनी बरेच दिवसांपासून घर सोडलयं, आणि पंढरपूर पर्यंत जायचयं त्यांना देणे योग्य आहे. बारा वाजून गेले होते, निम्मे अंतर संपले होते. आतापर्यंचा प्रवास चांगला झाला होता, पुढील रस्ता रुक्ष असल्याने त्रास होईल का असे वाटत होते.पण चालायला लागल्यावर वाट संपतेच , बरोबरच्या वाटकऱ्यांच्या सोबतीने वेळ जातो, आणि वाटेवर सावल्या सापडल्या कि प्रवास सुखाचा होतो. वारी सारखेच हे सारे आयुष्याच्या बाबतीतही खरे आहे नाही का?

समाप्त

Friday, January 30, 2009

पंढरीची वारी : एक अनुभव.- भाग २


वारीला जायची तयारी सुरु केली.तयारी फारशी नव्हतीच.पहाटे आडीच वाजता उठून पोळी भाजी करुन घेतली(आधी पोटोबा मग...), अंघोळ आदि आन्हिके उरकून निघलो.एका परिचिताने आमच्या उपक्रमाने प्रभावित होवून आंम्हाला आळंदीला सोडण्याची जबाबदारी घेतली.त्यांच्या गाडीतून आळंदीला निघालो. विश्रांतवाडी पर्यंत अगदीच शुकशुकाट होता. मोकळे रस्ते अगदीच नवे आणि खूपच मोठ्ठे ,रुन्द वाटत होते. आळंदी जवळ येवू लागली तशा तिकडून पुण्याकडे ट्र्कच्या रांगा दिसू लागल्या, क्वचित माणसांचे जथेही चालताना दिसू लागले. पावणेपाचच्या सुमारास आम्ही आळंदिच्या अलिकडे एक-दिड कि.मी.वर उतरलो. सर्व परिसर माणसांनी फुलून गेला होता. इंद्रायणीच्या पूलावरुन देवळात जाताना, नदीमध्ये शेकडॊ वारकरी स्नान करताना दिसले.ज्ञानेश्वरांची पालखी गांधीवाड्यात त्यांच्या आजोळी असते, तेथून सहा वाजता तिचे प्रस्थान होते, तत्पूर्वी भक्त तिचे दर्शन घेवू शकतात, हे तेथेच आम्हाला समजले. मग तेथे गेलो, रांगेमधून शांतपणे लोक दर्शन घेत होते.आम्हीही पदुकांचे दर्शन घेतले, पालखीला वाकून वंदन करतानाच मनाला जी शांती वाट्ली,तिचे वर्णन शब्दात नाही करता येणार. माऊलींबरोबर सहज चालू असा विश्वास वाटला. पालखीचे प्रस्थान साडेसहाला होते.इंद्रायाणीच्या अरूंद पूलावर प्रचंड गर्दी आणि खेचाखेच असते, असे कळले होते. बरेच वारकरी पादुकांचे दर्शन घेऊन चालावयास सुरुवात करतात. आम्ही देखील तसेच करायचे ठरविले. ज्ञानेश्वरांचे आणि तुकारामांचे अभंग गात वारकरी जात होते. आम्हीही त्यांच्या बरोबर जात होतो. आता चांगलेच उजाडले होते. आजुनही पुण्याकडून लॊक आळंदीकडे जात होते. त्यांना वाटेत पालखीचे दर्शन होणार आणि ते परत पालखी बरोबर येणार. बऱयाच दिंड्या निघाल्या होत्या. एका दिंडी मधून आमचा प्रवास सुरु झाला. झांजा आणि टाळांच्या तालावर चालताना बरेच अंतर चाललो तरी जाणवत नव्हते. पाच किलो.मी. चाललो, साई मंदिराच्या आसपास बरीच मोकळी जागा आहे.रस्त्याच्या दोन्ही बाजुंना किंचित उंच टेकाडे होती. आम्ही तेथे जाऊन बसलो. आठ वाजले असावेत.बरीच वारकरी मंडळी तेथे बसली होती. काही बायका कपडे वाळत घालत होत्या. आमच्या सारखे पुण्याहून आलेले लोक डबे उघडून नाष्ता करायला लागले होते. रोज मलाही सकाळी आठ -आडेआठला खाण्याची सवय आहे, पण कसे कोण जाणे आज भूक लागली नाही. सोलापूर जवळील खेड्यातुन आलेल्या बायका माझ्याशी बोलायला आल्या, त्या तिकडून आंळदिला चालत आल्या होत्या आणि आता वारीबरोबर चालत पंढरपूरला जाउन मग घरी जायच्या होत्या.माझ्या कपाळावर् त्या बाईने काडी कुंकवात बुड्वून बरीच कलाकुसर केली. (आरसा नसल्याने मला दिसली नाही), माझ्या शहरात राहण्याचे, ऑफीसात जाण्याचे तिला अप्रूप , आणि तिच्या इतके दिवस घर सोडून चालत जाण्याचे, तिच्या कष्टाचे मला कौतुक ! मला स्वतः जवळिल बुंदीचा लाडू तिने, नको नको म्हणतानाही खायला दिला.बरेच शेतकरी पेरण्या उरकून वारीला आले होते,मला जाणवले, शेतात पेरण्या झाल्या की, पावसाची वाट बघायची .जास्त पाउस पिकांचं नुकसान करणार, नाहीच आला तर् तोंड्चं पाणी पळवणार. एकूण हा मधला काळ म्हणजे नुसता ताण! रिकाम मन म्हणजे सैतानच घर, त्यापेक्षा विठ्ठ्लावर भार टाकून माऊलींच्या बरोबर त्याच्याच नामात दंग होउन वारीला जाणे म्हणजे एक प्रकारची 'stress management' आहे! पंधरा दिवस घर, दार संसार आणि त्याच्या काळज्या दूर ठेऊन पंढरीला जाण्याचा तो उद्देश असावा ’आवडीने भावे हरीनाम घेशी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे’ असे म्हणणारा वारकरी ’असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ या वर्गातील नक्की नाही. आपले काम मनापासून केल्यानंतरही आपल्या हातात नसलेल्या काही गॊष्टींमुळे झालेल्या त्रासावर मात करता यावी यासाठी लागणारी मानसिक शक्ती त्याला वारीला जाण्य़ाने मिळत असेल. कारण त्याची श्रध्दा त्याला सांगते ’सकळ जनांचा करि तो सांभाळ तुज मोकलिल ऐसे नाही एका जनार्दनी भोग प्ररब्धाचा हरीकृपे त्याचा नाश झाला’
क्रमशः

Wednesday, August 20, 2008

पंढरीची वारी : एक अनुभव.


लहानपणापासून पंढरीच्या वारीबद्दल ऎकून वाचून होते. शाळेत असताना पालखी बघायला गेलेलेही आठवतयं. वर्षांनुवर्षे लाखो वारकरी ऊन,पाऊस कशाकशाची पर्वा न करता दोन आडीचशे कीलोमीटरचे अंतर पायी कसे तुडवीतात? ते हि मोठ्या आनंदाने, ऒढीने! कुठलाही आर्थिक लाभ नाही, वैयक्तिक स्वार्थ नाही.नाना जातीचे, वेगवेगळ्या आर्थिक, सामाजिक स्तरातील हे वारकरी पंधरा दिवस एकत्र राहतात.स्वतःचा फायदा नसेल तर काहिही न करण्याच्या आजच्या जमान्यातही ही प्रथा टिकून आहे. हा केवढा चमत्कार आहे! या साऱ्या कुतूहलापोटी वारीबरोबर चालायचं आणि हा अनुभव प्रत्यक्षच घ्यायचा असे ठरविले.दरवर्षी पावसाळा सुरु झाला, वारीचे दिवस आले कि हे विचार उसळी मारायचे.एवढे दिवस घर सोडून जाणे शक्य नव्हते.(अशा वेळी ’आधी प्रपंच करावा नेटका’ म्हणणारे रामदास स्वामी जवळचे वाटत.) पण निदान दरवर्षी वारीचा एक-एक टप्पा करायला काय हरकत् आहे? असा सोइस्कर विचार आला, पण त्यातही काहीतरी अडचणी उभ्या रहायच्या आणि माकडाच्या घरासारखे माझे वारीचे बेत मनातच रहायचे.मात्र ’काशीस जावे, नित्य वदावे’ या चालीवर पुढल्या वर्षी नक्की जाऊ असे दरवर्षी घोकायचे.
यंदाहि सालबादाप्रमाणे जून महिना आला, नेहमीप्रमाणे वारीचे विचार मनात घुमू लागले.नवऱ्याजवळ मी माझी इच्छा बोलून दाखवायचा अवकाश, त्याने हि कल्पना उचलून धरली. आपण दोघेहि नक्की जाऊच, मी सगळी चौकशी करतो, असे सांगून तो तयारीलाही लागला. (त्याने विचार केला असेल हा स्त्री हट्ट् तसा खूपच फायद्याचा, चालतच यायचयं, त्यामुळे खर्चाचा प्रश्ण नाही, शिवाय बायकॊला अध्यात्माची गॊडी लागली तर इतर अनेक खर्च आपोआपच कमी होतील.) तो ’नूमवीय’ आहे त्यामुळे ’हाती घ्याल ते तडीस न्या’ हे शाळेचे बोधवाक्य त्याच्या हाडीमाशी खिळलयं. या सगळ्यामुळे आता मलाही पाऊल मागे घेणे शक्यच नव्हते. आपल्याला आळंदी पासून पुण्यापर्यंत २२ कि.मी चालणे जमेल का? हा आता खरा कळीचा मुद्दा होता.

(क्रमशः)

Friday, July 25, 2008

नाट्यछटा

मुलांना द्यायला आपल्याकडे वेळ नाही, हि आजच्या पिढीची व्यथा आहे घर,संसार आणि नोकरी अशी तारेवरची कसरत करणाऱ्या सगळ्याच कुटुंबाची हि कथा आहे.मुलांना तिसऱ्या वर्षापासून शाळेत घालतानाहि त्याचा तेवढाच वेळ बाहेर जाईल हा हेतू असतो. एकदा का मूल शाळेत जायला लागले कि अभ्यास त्याच्या मानगुटी बसतोच. वेगवेगळ्या अभ्यासाच्या आणि अभ्यासेतर स्पर्धा आणि त्या अनुशंगाने लागणारे मार्गदर्शन याच्या नावाखाली मुलाचा जास्तीत जास्त वेळ घराबाहेर जातो, उरलेल्या वेळात त्याच्याशी बॊलायला कॊणी नसेल तर त्याने सगळा वेळ टि.व्ही समोर घालवला तर त्यात त्याचा दोष कितपत आहे? मुलांना महागडी खेळणी , ब्रॅंडेड कपडे, शूज आणून असलेल्या थोडक्या वेळात त्यांचे फाजील लाड करून आपण मनाचे समाधान करत असतो, वास्तविक मुलांना तुमचा वेळ हवा असतो. इंटरनेट वर या विषयावर गोष्टी आलेल्या आहेत. एका सहा सात वर्षाच्या मुलीच्या मनाचे अंतरंग दाखविण्याचा प्रयत्न केला आहे या नाट्यछटेमधून.

मला काही सांगायचयं
बाई, बाई,बाई वैतागले बाई मी या मोठ्या माणसांना, एकाला माझ्याशी बोलयला वेळ असेल तर शपथ. आता कालचीच गोष्ट, सकाळी आईनं मला जरा रागातच उठवलं,"मैत्रू, उठं,बरं लवकर शाळेत नाही का जायचं ? आत्ता रीक्षा येईल बघं" इतक छान स्वप्न पडल होतं, म्हणून सांगते! स्वप्नात किनई मी जंगलात गेले एकटीच, काय मस्त जंगल होत ते, तिथे किनई मला एक मॊठ्ठा वाघोबा दिसला, मला म्हणतो कसा,’बैस मैत्रू मझ्य़ा पाठीवर ,आपण लांब चक्कर मारुन येऊ", मला ना अज्जिबात भिती नाही वाटली त्याची, मी बसले त्याच्या पाठीवर आम्ही निघालॊ....आणि तेव्हढ्य़ात आईनं उठवलचं. इतकं सुंदर स्वप्न कुणाला तरी सांगावं असं नाही का वाटणार?मी उठून आईजवळ गेले तिला सांगायला हि गम्मत, तर वस्सकन ओरड्ली माझ्यावर "आत्ता बड्बड नकोयं, आवरं चटचट, तोंड् धू, दूध पी, आंघोळ कर...शाळेला जयला उशीर होतोय, तुझ्यामुळे मला ऑफीसला हि उशीर होतो..." दिदिला सांगायला गेले तर ती खेकसली,"उगीच बोअर नको गं करुस, मला माझा होमवर्क करुदे" शाळेत टिचरांना सांगायला गेले तर म्हणाल्या,’Maitreyee, talk in English, don't talk in Marathi' आता तुम्ही मला सांगा वाघोबा जर माझ्याशी मराठीत बोलला तर मी त्यांना english मध्ये कसं सांगू? कुण्णाकुण्णाला वेळ नाही आमच्याशी बोलयला, आमचं ऎकायला.संध्याकाळी खेळून घरी आलं की, ग्राऊंड वरच्या गमती जमती कधी एकदा बाबांना सांगेन असं वाटतं, मी धावतच घरात शिरते, बाबा बाबा..करतच. बाबा हॉल मधेच फोन वर बोलत असतात 'hello yes, hello Ralph,how are you , I am fine thank you' मला पाहून डोळे मोठे करतात , आई मला ओढून आत नेते,’बाबा फोन वर् कामच बोलतायतं दिसत नाही? चल हातपाय धू, कपडे बदल, रामरक्षा म्हणं आणि होमवर्क कर’ रात्री जेवण झालं कि वाटत आईच्या कुशीत शिरावं, तिला दिवसभरातल्या सगळ्या गमती सांगाव्या. पण कसलं काय! आई जवळ गेले कि ती म्हणते ’मैत्रु माझी कंबर दुखतीय गं’ मी म्हणते ’आई तुला मी मूव्ह लावून देऊ? टि.व्ही. तली आई कशी मुव्ह लावल कि लग्गेच बरी होते, तू पण तशीच बरी होशील.’ ’काही नकोय ते मूव्ह आणि टुव्ह, सारखा टि.व्ही. बघयचा... आणि आईच जे लेक्चर सुरू.. माझे तर डॊळेच मिटतात.
तुम्ही म्हणाल ’आजीला सांगाव्या गमती, अहॊ काय करणार माझ्य़ा बाबांची आई मी लहान होते तेव्हाच देवाघरी गेली. आईच्या आई कडे सोड्तात बाबा मला कधी त्यांना कामाला जायचं असेल कि. दारात पाऊल टाकताच आजी जवळ घेऊन म्हणते ’सुकलं ग माझं बाळ. फार रागावते का ग शुभी तुला? थांब आता आली कि बोलतेच तिला. माझ्या आवडीचा खाऊ खाता खाता आमच्या गप्पा सुरु होतायत तोवर आजीची शेजारची मैत्रीण येते.आजी मला म्हणते,’तू खा हं खाऊ, अजून हवा तर घे त्या डब्यातला, एवढा ज्ञानेश्वरीचा अध्याय यांना वाचून दाखवते, मग बोलू हं आपण’ त्यांच वाचन पुर व्हायच्या आत बाबा हजर ! ’चला मैत्रूबाई , खूप झाल्या आजीशी गप्पा, घरी जायला ऊशीर् नको’ कि चालली आमची वरात घरी.
अहो कुणालाच वेळ नाही माझ्याशी बोलायला कित्ती कित्ती गमती असतात ,कित्ती कित्ती प्रश्ण विचारायचे असतात ’चिमणीला घरटं बांधायला कॊण शिकवतं? मनीमाऊ बाळ कुठल्या हॉस्पिटल मधून आणते? अंड्यातून पिल्लू बाहेर कसं येत? एक ना दॊन हजार प्रश्ण असतात पण कुणालाच सवड नाही. मी परवा खूप चिडले आईवर, म्हणाले,’तुला वेळ नाही , तर आणलस कशाला मला हॉस्पिटल मधून? मी जाते होस्टेलवर रहायला.’ मग मात्र तिच्या डोळ्यात पाणीच आलं मला जवळ घेऊन म्हणाली,’खरं आहे गं तुझं म्हणणं, आता तुझ्या शाळेला सुट्टी लागली ना कि मी पण रजा घेईन मग आपण खूप खूप गप्पा मारु ,मज्जा करु ’
 पण  मी आता ठरवलयं, मोठी झाले कि टि.व्हीत दाखवतात तसं कोर्टात काम करायचं कसलं म्हणून काय विचरताय, ’ऑर्डर! ऑर्डर ! करणाऱ्या माणसासारखी होणार आहे मी, सगळ्या आई बाबांना कोर्टात बोलावणार आणि संगणार ऑर्डर! ऑर्डर ! रोज दोन तास मुलांशी बोललं पाहिजे, त्यांच्याबरोबर खेळलं पाहिजे, नाही तर सगळ्यांना मोठ्ठी शिक्षा. ऑर्डर! ऑर्डर !


©

Thursday, July 17, 2008

चाळीशी: एक चिंतन

वर्तमानपत्रातील सुट्टीची पुरवणी वाचायला घेतली, त्यात ’चाळीशीच्या स्त्रियांसाठी मार्गदर्शनपर लेख’, तो वाचून बाजुला ठेवतीयं तोच ’स्त्रियांमधील चाळीशीनंतरच्या मानसिक स्थित्यंतरावरील’ खास अंकाचे साप्ताहिक नजरेस पडले. मुलीला घेऊन दवाखान्यात गेले तर तिथेही अशाच प्रकरच्या लेखांची मासिके,पाक्षिके.कावीळ झालेल्या माणसाला जग पिवळे दिसते तसे चाळीशीची चहूल लागताच मल जिकडे तिकडे या लेखांनी भंडावल. वास्तविक हे लिहिताना वय दडविण्य़ाची स्त्रीसुलभ खोड देखील बाजुला ठेवावी लागतीयं पण हे सारे लेख वाचून,रेडीयो,टि.व्ही. वरील चर्चा ऎकून मला तर अगदी वेडावून गेल्यासारखं झालयं.खरचं, सॄष्टीची उलथापालथ व्हावी, तशी आपल्या तनामनात उलथापालथ होतीयं आणि आपल्याला त्याचा पत्ताही लागू नये? मी सहज लेकीला म्हणायला गेले,"हे बघ, मला माझ्या चिडचिडी मागचं कारण मला समजलयं, ते किनई वयामुळे होण्याऱ्या ...." माझे वाक्य मध्येच तोडीत ती फाडकन् म्हणाली," काहीतरी फेकू नकोस हं, तू चिडकीच आहेस पहिल्यापासून , उलट आम्ही मोठ्या झाल्यामुळे हल्ली तुझी चिडचिड कमी झालीयं"माझ्या आजुबाजुच्या शेजारणी,ऑफीसमधल्या मैत्रिणी कुणाचच वागणं बदलल्याचं मला जाणवत नव्हतं.ऑफीसमधल्या जेवणाच्या सुट्टीतले गप्पांचे विषय म्हणजे मुलांचे अभ्यास,त्यांच्ये खाण्यापिण्याचे नखरे,पाकक्रीया, सासरच्य़ा निंदा, नवऱ्य़ाच्या तक्ररी ई. नेहमीचेच यशस्वी. कामवाल्या बायकांपासून ऑफीसमधल्या स्त्री बॉस पर्यंतच्या कोणत्याही बाईमध्ये चाळीशीत गेल्यावर फार मोठी मानसिक स्थित्यंतर जणवली नाहीत(स्वतः एक स्त्री असूनसुध्दा!) त्या सगळ्या लेखांचे सार होते, या वयात स्त्रियांना फार एकटेपणा वाटतो, तिच्याकडे पतिचे,मुलांचे लक्ष नसते.मुले मोठी झाल्यामुळे त्यांना आईची गरज वाटत नाही.वय वाढल्य़ामुळे नवऱ्य़ाची बायकोबद्द्ची आस्था, आकर्षण कमी होते ई.ई.
    माझ्या मते हल्लीच्या मुलांना स्वतःचे काम स्वतः करायची सवय नाही, त्यांना वेळही अजिबात नाही.त्यांच्या शाळा,क्लासेस,खेळ अशा नानाविध व्यापांमधून त्यांना स्वतःची स्वतः अंघोळ आणि जेवण यालाच जेमतेम वेळ मिळतो, बाकी सगळ्या तैनातींना आई इतकी तत्पर व्यक्ति कोण् असणार? नोकरी करणाऱ्या,न करणाऱ्या कुठल्याही बाईला मुलांची सगळी कामे करावीच लागतात.त्यात मुलांना विविध क्लासेसना सोड्ण्या,आणण्यापासून त्यांचे अभ्यास करून घेण्यापर्यंत सगळ्यासाठी मुलांना आईच हवी असते.बाईच्या चाळीशीपर्यंत तिच्या संसाराला किमान एक तप उलटलेले असते.सुरुवातीच्या नव्यानवलाईच्या काळात बायकॊशी वाद,भांडणं झाली तरी पुरुषाला त्याच्या आईच्या भक्कम पाठींब्यामुळे जेवणखाणाची ददात नसते,आता लग्नाला इतकी वर्षं झाल्याने त्याची आईही थकलेली असते, शिवाय मुलांची शिक्षणे,त्यांचे नवनवे प्रश्णं, उभयपक्षातील आईवडिलांची आजारपण या सगळ्यांसाठी सतत एकमेकांच्या आधाराची गरज असते. बायकोकडे दुर्लक्षाचा संबंधच येत नाही त्यामुळे.
  
    वयानुरुप शारीरिक,मानसिक बदल आत्ताच जाणवतात असे नाही.तिसरी,चौथीत असताना ’सोळावं वरीस धोक्यचं गं’ हे गाणं मी ठेक्यात म्हणत असताना आई रागावली होती,’असली गाणी घरात नाही म्हणायची!’ असे तिने डोळे वटारुन सांगितले. या गाण्यात ’असलं’ काय आहे हे विचारायचं धाडसही झालं नाही. ते समजायचं ते वयही नव्हतं.पुढे यथावकाश ते धोक्याच वय आलं आणि गेलं पण आभ्यास,परीक्षा,प्रॅक्टिकल्स,सब्मिशन्सच्या धबड्ग्य़ात त्यातले धोके कळलेच नाहीत. झोपाळ्यावाचून झुलायचे,फुलायचे दिवस कवितांमधुन वाचत होते. शब्दांच्या पलिकडल्या भाषांचे,परीकथेतील राजकुमारांचे स्वनाळू सहित्य वाचताना आवडत नव्हते अस कसं म्हणू? पण हे सारं पुस्तकी वाङमय पुस्तकांपुरतेच , सिनेमा,नाटकांसारखेच नकली असचं वाटायचं, कारण व्यवहारी जग फार वेगळं होतं,तिथे यातलं काहीच दिसतं नव्हतं.कारण प्रेम करायच तर पतंगासारख "जगी सांगतात प्रित पतंगाची खरी झडप घेऊन देतो प्राण दिपकचे वरी” किंवा गोविंदग्रजाचे "क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणांचा मग पुढे " हे मनावर इतकं ठसलेलं होतं की प्रेमं करायचं तर मरायचीच तयारी ठेवावी लागते असच काहिसं मनानं घेतलं  आणि जगायची अमर्याद हौस असल्यामुळे तो आपुला मार्गच नव्हे असं सरळ गणित मी सोड्वून टाकलं माझ्य़ापुरतं.थोडक्यात काय, धोक्याच्या वयातले धॊके दिसले नाहित, निसरडे रस्ते जाणवले नाहीत. तेंव्हा पुढे होते कॉलेज, तो भरपूर आभ्यास,परीक्षा आणि रिझल्टस्. करियर वगैरे शब्द न शिकता पदव्युत्तर शिक्षण सहज जमत गेलं आणि मिळालेली नोकरी गरज म्हणूनच स्विकरली.
    पुढे यथावकाश लग्नं झालं,नंतरची वर्षं घर, संसार, नोकरी यामध्ये कशी गेली ते कळलचं नाही. म्हणजे काळ त्याच्याच गतीने जात असतॊ ,आपल्याला त्याची गती कमी जास्त जाणवते.मुलांच्या लहानपणांत त्यांची दुखणी काढताना,दिवस संपता संपत नव्हते आणि कधीकाळी आपण, मुले व नवरा सगळ्यांना एकावेळी मिळालेल्या सुट्टीच्या कपिलाष्ठीच्या योगावर कुठे गावाबिवाला गेलो तर दिवस भुर्रकन् उडत होते.या सगळ्या रगाड्यात मुले मोठी होत होती,सासु सासरे थकत होते,आई वडिलांची दुखणी सुरु झाली होती.पण आपली एनर्जी कमी होवुन् चालत नसल्याने इंजिनाच्या गतीत किंचित फरक झाला तरी चालू होतेच.
  

    अशातच चाळीशीचा उंबरठा कधी आला ते समजलेच नाही. या लेखांमधली लक्षणे कळायला तेवढं रिकामपणं आजही नाही आणि मी म्हणजे तरी कोण? एक सामान्य मध्यमवर्गाची प्रतिनिधी.कनिष्ठ किंवा गरीब वर्गामधील बायकांना मुक्ती,स्वातंत्र्य तर नसतेच,पैसे तर मिळ्वावे लागतात.त्या बिचऱ्यांना दिवसभर कष्ट,आर्थिक विवंचना,पोरांची उसाभार अन् रात्री दरुड्या नवऱ्याची मारहाण सहन करताना शारीरिक व्याधींकडे लक्ष द्यायला फुरसत नसते तर मानसिक त्रासाची काय कथा? राहिता राहिला ऊच्च वर्ग त्यातल्या फार रिकामपण असलेल्या महिलांचे सुख दुखत् असते त्यांना जणवत असतील हि मानसिक आंदोलने. कुठल्याहि गोष्टींचे उद्दातिकरण करण्याची फॅशनच झालीयं हल्ली. आता असं बघा, स्त्रीने पुरुषाच्य खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात काम करायला लागुनही बरीच वर्षे लोटली.पुरुषांच्या बाबतीत चाळीशी हि ’चावट चाळीशी’ ठरते, तर स्त्रियांनीच चाळीशी हि तारुण्य संपल्याची चाहूल मानायचं करणच काय? आणि शेवटी तारुण्याचं नातं शरीराशी कि मनाशी हे ज्याच त्यानीच ठरवायचं आहे.उगीचचं पुस्तकामधल्या लेखांनी धडधडून घ्यायचं कारण नाही.थोडा फार त्रास झालाच तर तो दूर करायला आहेच की अत्याधुनिक वैद्यकशास्त्र आणि अद्ययावत उपाययोजना.

©