Tuesday, February 24, 2009

पंढरीची वारी : एक अनुभव.- भाग ३


सकाळचे नऊ वाजून गेले असावेत, आम्ही पुन्हा चालावयास सुरुवात केली.वाटेत ठिकठिकाणी वारकऱयांसाठी चहा, केळी,पोहे असे विविध स्टॉल्स दिसत होते.बहुतेक वारकरी तिकडे जात नव्हते, जत्रा म्हटली कि जसे हौशे, नवशे,गवशे येतात तसेच वारी बरोबरही असावेत. अनेक तरूण,लहाने मुले अशा ठिकाणी केवळ गर्दी करुन मिळेल ते पदरात पाडून घेत होती. एका जागी तर कुठल्याशा कंपनीतर्फे बिस्कीटांचे पुडे वाटप चालू होते, एका मुलाने आपल्या मित्रांनाहि रांगेत उभे केले असावे सगळी गॅंग मिळलेले पुडे एका पोत्यात भरत होती.दारीद्र्य माणसाला अगतिक बनवते हे खरे असले तरी इथे गरीबीपेक्षा फुकटी वृत्ती वाढत चाललीयं असं जाणवतं. आपल्याला आयकरात सवलती मिळाव्यात यासाठी दान देण्यास तयार होणाऱ्या कंपन्या, आणि त्या फुकट मिळणाऱ्या पदार्थांवर तुटून पडणारी आपली नवी पिढी, कुणाला विठ्ठ्ल पावेल्? किंबहुना त्या विठ्ठ्लासाठी हे चाललयं हे तरी त्यांच्या गावी आहे कि नाही हे तॊ विठ्ठ्लच जाणे !
या साऱ्या स्टॉल्सकडे न जाता ’गुढी उभारावि, टाळी वाजवावी वाट हि चालावि पंढरीची’ असे म्हणत जाणारा वारकऱ्यांचा मेळा होताच. विश्रांतवाडीचा पहाटे सुनसान असणारा रस्ता आता माणसांनी फुलून गेला होता. मध्येच पावसाची एखादी सर यायची सारे वातावरण थंड व्हायचे. आमच्यासारखी शहरी पांढरपेशी मंड्ळी छ्त्र्या उघडून किंवा रेनकोट, जर्कीन घालायला लागे पर्यंत पावसाचा जोर पार कमी होऊन जाई. बरे हा सारा जामानिमा अंगावर बाळगावा तर लगेच पडणाऱ्या लख्ख उन्हामुळे ऊकडुन जीव हैराण होवून जाई. शेवटी हा सारा पसारा पिशवित कोंबला आणि ऊन पावसाचा खेळ अंगावर घ्यायचे ठरविले. इथे आपल्याला ओळखणारे कुणीच नाही आणि आपल्या कडे बघायला कुणाला वेळच नाही हे लक्षात आले आणि मग एकदम हलके हलके वाटायला लागले.नाहीतरी पडण्यापेक्षा पडताना आपल्याला कुणी बघितले तर जास्त दुःख होते, तसे भिजण्यापेक्षा आपले भिजलेले ध्यान कुणी बघेल याचीच काळजी असते. शिवाय भिजत भिजत चालत असल्याने थंडी वाजत नव्हती,ऊन पड्ल्याने कपडे आपोआप सुकतही होते. आषाढ महिना असून श्रावणातल्यासारखा पाऊस होता.
पण हा ऊन पावसाचा खेळ ही फार तर तास दिड तास चालला. नंतर कडक ऊन पडले. पायाखलचा सिमेंटचा रस्ता प्रचंड तापत होता, सहापदरी मोठ्या रस्त्यावर औषधालाही झाड नव्हते! डोक्यावर ऊन मी म्हणत होते. थोडक्यात ’पाऊल थकले माथ्यावरती जड झाले ओझे’ अशी अवस्था होऊ लागली , अध्यात्माच्या बिकट वाटेचा प्रत्यय येवु लागला.
शहरीकरणामुळे जंगलतोड झालीयं. दोन्ही बाजूला झाडांच्या महिरपीतून जाणारे रस्ते नाहिसे होत चाललेत. गाडीतून जाताना हे जाणवत नाही अस नाही, पण त्यामुळे होणारी तगमग चालतानाच जास्त जाणवली. पालखी येणार म्हणून दुतर्फा मांडव घातले होते, प्रत्येक वॉर्डातले मा.नगरसेवक, क्वचित ठिकाणी महापौर येत होते, त्यांच्या हस्ते खाद्यपदार्थांचे वाटप होत होते, त्यापैकी कुणालाच ह्याबरोबरच रस्त्याच्या कडेने वृक्षारॊपण करून वारकऱ्यांचा मार्ग सावलीचा करावा असे का वाटत नाही? पण मघा म्हटल्याप्रमाणे त्यासाठी काही पावले तरी पाय़ी चालायला हवे!
बॅंक ऑफ महाराष्ट्र तर्फे उभारलेल्या एका मांडवापाशी आल्यावर मी थांबले. फूटपाथवर मांडव होता, बाजूच्या कट्ट्यावर थोडी टेकले. बाटलीतले पाणी प्यायल्यावर जरा हुशारी वाटली.तिथल्या काही रहिवासी सोसायटीतल्या उत्साही लोकांची एकच गडबड उडाली होती. बायका, मुले वारकऱ्यांना केळी,राजगिऱ्याचे लाडू वाटत होती. पुरुष मंडळी त्यांच्या वर लक्ष ठेवून होती. आतिशय शिस्तबध्दतेने सगळे काम चालू होते. आम्हांलाही त्यांनी मोठ्या प्रेमाने सगळे देऊ केले, पण असे घेणे मनाला पटेना एक तर आम्ही कुठल्याच अर्थाने वारकरी नाही. केवळ हौशीसाठी आम्ही आलॊ, आणि संध्याकाळी तर घरी जाणार! ज्यांनी बरेच दिवसांपासून घर सोडलयं, आणि पंढरपूर पर्यंत जायचयं त्यांना देणे योग्य आहे. बारा वाजून गेले होते, निम्मे अंतर संपले होते. आतापर्यंचा प्रवास चांगला झाला होता, पुढील रस्ता रुक्ष असल्याने त्रास होईल का असे वाटत होते.पण चालायला लागल्यावर वाट संपतेच , बरोबरच्या वाटकऱ्यांच्या सोबतीने वेळ जातो, आणि वाटेवर सावल्या सापडल्या कि प्रवास सुखाचा होतो. वारी सारखेच हे सारे आयुष्याच्या बाबतीतही खरे आहे नाही का?

समाप्त