Friday, May 10, 2019

माझे टेकडी प्रेम

     सहकारनगर मध्ये आम्ही रहायला गेलो तेंव्हा मी तिसरीत होते.हे घर गावापासून खूप दूर वाटायचं, फारशी वस्ती नव्हतीच तेथे. घरातुन दूरवर टेकडी दिसे. दादा टेकडीवर घेऊन जायचे,तळजाई टेकडीवर वनविभागातर्फे तर कधी उत्साही पुणेकरांच्या तर्फे वृक्षारोपणे होत ,  तळजाई परीसरातल्या टेकड्या उघड्या बोडक्याच होत्या. आम्ही उत्साहात टेकडीवर जायचो तिथे एक जुना ठुबे बंगला होता ,तो भूतबंगला म्हणून ओळखला जायचा ,दिवसा त्या बंगल्यात हिंडून, तळजाई देवीचे दर्शन घेऊन परत यायचो. पुढे,पुढे मैत्रीणींबरोबर मैदानावर खेळण्यात वेळ जायला लागला तसे टेकडीवर जाणे कमी झाले. दहावीनंतर अभ्यास वाढायला लागला, नंतर दादांच्या अकस्मिक निधनानंतर अभ्यासाबरोबर घरातल्या जबाबदाऱ्या वाढल्या आणि घराजवळ टेकडी असल्याचाही विसर पडला.

लग्नानंतर तर संसार,नोकरी या चक्रात दिवस कसे जात समजत नव्हते, व्यायाम करायला पाहिजे असे सतत वाटायचे पण वेळ काढायला जमत नसे.बस मधुन,रीक्षातुन कधी गाडीतून जाताना टेकडी खुणावत असे पण जाणे शक्य नसल्यामुळे तोंड दुसरीकडे फिरवले जाई.अपराधी भावनेने मन भरुन जाई. बराच काळ निघुन गेला होता,टेकड्यांवर लावलेली झाडे मोठी झाली होती.पावसाळ्यात टेकडी हिरवीगार दिसे.उन्हाळ्यात देखील पानगळ झालेल्या झाडांतुन फुललेले बहावा,गुलमोहर सुरेख दिसत.

  मुली थोड्या मोठ्या झाल्यावर सुट्टीच्या दिवशी त्यांना घेऊन आम्ही टेकडीवर जायचो.कधी धारवाडहुन भाच्या आल्या कि त्यांना घेऊन भेळेचे सामान,पाणी ,सरबत असा सगळा जामानिमा घेऊन संध्याकाळी टेकडीवर जायचे. हिंडुन झाल्यावर सावली बघुन बसायचे,सुसाट वाऱ्याला तोंड देत ,वर्तमानपत्रे पसरायची त्यावर दगड ठेवायचे ,भेळ बनवायची आणि खायची, त्या भेळेची चव काही औरच ! त्या दिवशी टेकडी पण माझ्यासारखीच खुश असल्याचे जाणवे.

         माझी मोठी बहिण तळजाई टेकडीच्या पायथ्याला राहते.माझ्यापेक्षा अनेक अघाड्या लढवुनही ती रोज टेकडीवर जायची.तिच्याजवळ मी मला जायला न जमण्याबद्दल कुरकुर करताच ती म्हणाली," दररोज नाही तुला जमत,पण रविवारी सुट्टी असते ना, तू पहाटे साडेपाचला माझ्याकडे ये, तुझ्या मुली झोपलेल्याच असतात, आपण टेकडीवर जाऊ आणि सात वाजता मुली उठायच्या आत तू घरी जाशील " मग तिच्याघरी जायला लागले .तिच्याकडून पर्वतीच्या मागील बाजुने चढून,वाघजाई वरुन तळजाईला जायचे व तेथुन उतरुन दोघी आपापल्या घरी जायचे असा परिपाठ सुरु केला.माझा भाचा त्यावेळी इंजिनियरींगला होता.त्या वयातल्या मुलांचा सुट्टीचा दिवस सकाळी नऊच्या आत सुरुच होत नसतो. त्याला एकदा माझी बहिण म्हणाली,"बघ आम्ही बहिणी सुट्टीच्या दिवशी सुध्दा पहाटे उठून टेकडीवर फिरायला जातो,व्यायाम चुकवत नाही " त्यावर तो पठ्ठ्या म्हणाला ," अरे वा ,आई केवढा व्यायाम , जिभेला " .खरच आम्ही बहीणी गप्पा मारतच हिंडायचो,रस्ता कधी संपला समजायचेच नाही. आमचा उपक्रम पाच सहा महिने टिकला असेल.  पावसाळा सुरु झाला आणि टेकडीवरुन वाहणाऱ्या  पाण्याबरोबर आमचे फिरणे वाहुन गेले !

  पुढे माझ्या नवऱ्याने टेकडीवर जायचे ठरवले आणि मी त्याच्याबरोबर जाऊ लागले, त्यांच्या वेगाशी स्पर्धा करत चालताना माझी दमछाक होई. बरोबर चालायचे तर् चालताना मी बोलते म्हणून भरभर चालता येत नाही या त्यांच्या वक्तव्याने तोंड बंद करुन चालावे लागे आणि दमायचे नसेल तर् एकटीने चालायचे तरी तोंड बंदच मग मला चालण्यात मजा नाही यायची. आपण खूप चालतोय, दमून जातोय असं वाटत राही.शिवाय गप्प बसुन चालताना घरी पोचल्यावर काय काय कामे आहेत याचे विचार थैमान घालत आणि मग आपण घरातली एवढी कामे टाकुन भटकतोय या विचाराने मन बेचैन होई व टेकडीवर फिरायचा आनंद कमी कमी होई.

मुली मोठ्या झाल्या आणि आम्ही सेनापती बापट रोडवर रहायला आलो. वेताळ टेकडी घरापासुन जवळच आहे.रोज संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर घरी जाऊन चहा पिऊन टेकडीवर जायला सुरुवात केली. टेकडीवर गेले कि शहराशी संबंधच संपल्यासारखे वाटते.सगळे ऋतु वेगळेपणाने जाणवतात. रोजच्या सूर्यास्ताच्या वेळेतील बदल टेकडीवर ठळकपणे जाणवायचा. थंडीत दिवस लहान असल्याने अंधार लवकर पडायचा. घरुन निघायला जरासा उशीर झाला तरी टेकडीवर पोचेपर्यंत काळोख होऊन जाई. हळुहळू टेकडीवर जाण्याची सवय झाली,तिथली झाडे,पक्षी यांची ओढ वाटु लागली. न बोलता आजुबाजुला बघत निसर्गाचा आस्वाद घ्यायची सवय लागली.थोडक्यात टेकडीवर फिरणे आवडायला लागले.

      वेताळ टेकडीवर झाडी आहेच आता तेथे बरेच मोर आहेत, ससे दिसतात. पहिल्यांदा मोर बघितला तेंव्हा झालेला आनंद आणि आज मोर बघताना होणारा आनंद यात थोडाही फरक नाही. कधी झाडांवर बसलेले असतात, कधी खांबावर बसतात,कधी जमिनिवरुन चालताना दिसतात तर क्वचित आपल्यासमोर उडून ही जातात. उन्हाळ्यात झाडांचे खराटे झाल्यामुळे मोर पटकन दिसतो, शिवाय तो त्यांचा विणीचा मोसम असल्यामुळे मोराचा पिसारा झगमगत असतो, त्याच्या कंठाला निलकंठ हेच नाव शोभतं .

पावसाळ्यात टेकडी हिरवीगार असते. हिरव्या रंगाच्या अनेक छटा पानांमध्ये दिसतात.वेताळटेकडीवर प्रामुख्याने ग्लॅरिसिडीया नावाची विलायती झाडे आहेत.पावसाळा संपला कि लगेच हि झाडे वाळुन जातात ,नुसत्या काड्या राहतात पण  एका लहानशा पावसानंतर खराट्यासारखी दिसणारी हि झाडे पोपटी पानांनी मढुन जातात. पाऊस पडायला लागला कि टेकडीवर जागोजागी लाल वेलवेटसारखे दिसणारे मृगाचे किडे फिरु लागतात, माती मऊशार हिरवळीने झाकुन जाते . ज्ञानदेवांच्या ’मातीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव ’ या उक्तिचा प्र्त्यय ती मऊ हिरवळ देते. सगळी मोठ्मोठी झाडे देखील सुस्नात झालेली असतात अतिशय तृप्त वाटातात. पण जसजसा पाऊस वाढायला लागतो तसे टेकडीवर जाणे  अवघड होते .पावसाळ्यात खूप पाऊस असेल त्या आठवड्यात टेकडीवर जाणे झाले तरी वर हिंडणे कठीण होते, चिखलातुन फार काळजीने चालावे लागते,खड्ड्यांमधे पाणी साचुन डबकी झालेली असतात आणि बऱ्याच ठिकाणी  काळ्या मातीत पाय रुततात,दगडांवरही शेवाळ्याने पाय घसरायची भिती वाटते. अशा  गर्द हिरव्या झाडीत मोर दिसणे अवघड असते, क्वचित त्यांचे ओले पिसारे वाळवायला ते झाडांच्या टोकावर् बसलेले दिसतात पण ते ओले पिसारे तेवढे छान दिसत नाहीत शिवाय झाडांच्या रंगात ते लपुन जातात. अगदी धो धो पावसाचे दिवस सोडले तर बाकीचे दिवस टेकडीवर जाणे होतेच. पावसाच्या दिवसांत, घरात बसून टेकडीवरचे धबधबे बघण्यात समाधान मानावे लागते.

पाऊस संपुन थंडी सुरु होते, टेकडी आता गर्द हिरवी झालेली असते.तिच्यावरचे गवत कमरे एवढे वाढते,त्यातुन चालताना क्वचित सापकिरडुचं भय वाटतं. दिवस हळूहळू लहान होऊ लागतो, पहाटे धुक्याची शाल पांघरलेली टेकडी गूढरम्य दिसु लागते. पूर्वेकडून सूर्याची किरणे ती धुक्याची शाल हळुहळू दूर करू लागतात. पायथ्याला थंडी वाजते म्हणुन घातलेला स्वेटर,मफलर वर येईपर्यंत नकोसा वाटायला लागतो. नवरात्राच्या सुमारास झेंडुसारख्या गर्द केशरी फुलांची झाडे सगळ्य़ा टेकडीवर  वाढतात, केशरी फुलांच्या ताटव्यांनी नटलेली टेकडी फारच सुरेख दिसते. मात्र या थंडीत  मोरांची पिसे गळू लागतात( हे ज्ञान देखील टेकडीवर नियमित जायला लागल्यावर झाले. ) हे  पिसे गळलेले मोर,तिरुपतीहुन मुंडन् करुन आलेल्या दाक्षिणात्य  स्त्रियांसारखे दिसू लागतात. आम्हाला खुपदा थंडीच्या दिवसात दोन तीन लांडोरी आणि त्यांची दहाबारा पिले ओळीने गवतातुन जाताना दिसतात. मोराची पिल्ले बदकाच्या पिलांसारखीच ,तेवढीच फारसे रंगरुप नसलेली पण केवळ लहान वयामुळे गोंडस वाटणारी ! नवरात्रातल्या हस्ताच्या पावसापर्य़ंत गवत,झाडे हिरवी असतात,  आक्टोबर हिट मध्ये टेकडीवरील गवत पिवळे होऊ लागते,आठवडाभरात सगळे गवत वाळुन जाते, थंडी वाढायला लागली कि झाडांची पाने ही रंग बदलू लागतात. पानगळ सुरु होते.

     कधी कधी टेकडीवरचे गवत संध्याकाळच्या वेळी पेट घेते,हा वणवा नसून, ही आग मुद्दाम लावली जाते असे मला वाटते. रात्री खिडकीतून ही आग पाहिली की माझे मन तिथल्या पक्षांच्या,सशांच्या काळजीने कासाविस होते.अंधारात कुठे जातील बिचारी ? मलाही रात्रीच्या अंधारात टेकडीवर जाऊन आग विझवणे शक्य नसते . सकाळी टेकडीवर जळलेल्या गवताचा वास भरुन राहिलेला असतो.  संक्रांतीनंतर दिवस मोठा होत जातो, उन वाढु लागते,  वसंतात झाडांना पालवी फुटू लागते,कडुलिंब हिरवेगार होतात.

      ऋतुंमधले हे सगळे बदल टेकडीवर जाणवतात. निसर्गाचं चक्र जवळुन बघायला मिळतं.हल्ली तर टेकडीवर जाण्यामागे व्यायाम वगैरे विचार केंव्हाच मागे पडलेत. मोर बघायच्या वेडापायी वेगवेगळ्या आडवाटा शोधल्या आहेत आम्ही. काही वाटा तुलनेने अवघड आहेत त्यावरुन जाताना,कुठून आलो इकडे, आता परत नाही यायचं या रस्त्याने असं मनात येतं तोच रत्नजडीत पिसाऱ्याचा तोल सावरत एखादा मोर  आपल्याच मस्तीत डौलात समोरुन जाताना दिसतो ,डोळ्याचे पारणे फिटते . अवघड वाट तितकी कठीण वाटत नाही. परवा एकदा अशाच आडवाटेने आम्ही उतरत होतो, टेकडीच्या एका उतारावरील बेचकीत दोन तीन लांडोरी दिसल्या, आणि जरा पुढे आलो तर काय , मोराने आपला पिसारा फुलवलेला होता ! त्याचे प्रियाराधन चालले होते . जरा वेळाने त्या फुलवलेल्या पिसाऱ्याचे दर्शन आम्हालाही घडले, आम्ही मोराच्या मागे,लांडोरीकडे तोंड करुन होतो. त्या अनुभवाचे शब्दात वर्णन करणे अशक्य. त्या पिसाऱ्यावर लक्ष लक्ष पाचु जडवलेत असे वाटत होते,त्या हिरव्यागार पिसाऱ्यावर त्याचा लखलखित निळा गळा असा काही चमकत होता कि बस्स ! निसर्गाच्या अद्भुत कलाकॄतीकडे बघताना भान हरपुन गेले ! एकदा असाच दोन मोर आणि अनेक लांडोरीचा घोळका चालला होता आणि अचानक एका मोराने आकाशात झेप घेतली आणि लांबवर उडत गेला. मोराचा पिसारा बराच मोठा असल्याने  जास्त लांबवर उडायला त्याला अवघड जात असेल अशी माझी समजुत त्यादिवशीच्या मोराच्या भरारीने चूक ठरवली. एखाद दिवशी एकही मोर दिसला नाही अशी रुखरुख वाटत असतानाच टेकडीच्या पायथ्याकडे येताना अचानक डावीकडच्या झाडीत अगदी हाताच्या अंतरावर एखादा मोर आमचीच वाट बघत उभा असतो ! कधी अगदी पायथ्याच्या  झाडावर एखादा मोर आपला लांबलचक पिसारा सोडून ऐटीत बसलेला दिसतो.

व्यायामाचे असंख्य फायदे आपल्या सगळ्यांनाच माहित आहेत. चालणे,पळणे,जिम, योगा ,पोहणे असे असंख्य प्रकार लोक करत असतात.   टेकडीवर गेल्याने माझा व्यायाम किती होतो ते माहित नाही, त्या चालण्याने व्यायाम होतो का ? असाही प्रश्ण काही तज्ञांना पडू शकेल ,कारण माझ्या शरीरयष्टीत गेले अनेक वर्ष टेकडी चढून फारसा फरक पडलेला नाही.  मात्र माझे संसारातले ताप टेकडीवर गेले की मला संपल्यासारखे वाटतात. माझ्या ऑफिसमधील कामाचे ताण,तेथील राजकारण  यांचा तिकडे मला पूर्णतः विसर पडतो ! भूतकाळातील कटू आठवणी टेकडीवर फिरकत नाहीत कि भविष्यातील संध्याछाया तेथे भिती घालायला येत नाहीत .टेकडीवरची झाडे,ती माती, वेगवेगळ्या पक्षांचा किलबिलाट आणि त्या सगळ्यांवर कडी करणारे मोरांचे दर्शन मला दररोज नवा अनुभव देते,  ताजेतवाने करते. माझ्या वजनदार व्यक्तिमत्त्वाचं रहस्य ही त्यातच दडलेलं असाव कारण संस्कृत मध्ये श्लोक आहे ना
      सर्पा: पिम्बन्ति पवनं न च दुर्बलाः ते
      शुष्कै: तृणै: वनगजाः बलिनो भवन्ति
      कन्दै:फलैः मुनिवराः क्षपयन्ति कालम्
      संतोष एव पुरुषस्य परम् निधानं
म्हणजे साप वारा पिऊन जगतात पण ते दुर्बल नसतात,जंगलात वाळलेले गवत खाऊनही हत्ती धष्ट्पुष्ट असतात, कंदमुळे खाणारे मुनिवर दिर्घायु असतात ,संतोष हेच माणसाच्या निरोगी पणाचे कारण आहे.

      निसर्गाच्या एक तासाच्या सहवासात मला एवढा आनंद मिळतो तर त्याच्याच सानिध्यात कायम राहणाऱ्या आपल्या पूर्वजांचे किंवा ॠषीमुनींचे आयुष्य समाधानी असेल तर त्यात काय नवल !