Friday, March 6, 2020

पराधिन आहे जगती

       शनिवारची दुपार ,सुट्टी घेतल्यामुळे मी घरीच होते,घरातली बरीच जास्तीची कामे करुन आडवी झाले होते. चार वाजून गेले असावेत. तेवढ्यात फोन वाजला.मोठ्या बहिणीचा फोन होता
"अगं आत्ता अंजूचा फोन आला होता, आपला मामा आत्ता गेला. मेडीपॉईंट हॉस्पीटल मधे चार दिवस होता ,तिकडेच गेला आणि आता तेथूनच औंधच्या स्मशानभूमीत नेणार आहेत हेच आणि एवढेच सांगून तिने फोन ठेवला. आता आपण काय करायच ?"
मामा गेला हि बातमी अकस्मिक होती त्यामुळे मलाही क्षणभर काही सुचेना.
"तू माझ्याघरी ये मग ठरवू काय करायचं ते "एवढं बोलून मी फोन ठेवला. आई गेल्यानंतर मामाशी संबंध पूर्णच संपले होते .त्याचे वय  ८३ होते त्यामुळे कधी ना कधी हे घडणारच होते मात्र त्याची निरोगी तब्येत बघता हि बातमी अकस्मिकच होती.  बहिण घरी आल्यावर काय करायचे ते ठरवलेच नव्हते. मला लक्ख जाणवले कि मामाकडील कोणाचेच फोन नंबर माझ्या जवळ नाहीत कि त्यांच्यापैकी कोणाचाच पत्ता मला माहित नाही.बरीच फोनाफोनी केली तरी कुणाचाच नंबर मिळाला नाही.बहीण आणि मेहुणे येऊन बसले होते.शेवटी मेडीपॉईंट हॉस्पीटलचा नंबर शोधुन तिथे विचारले तर अजून बॉडी हलवली नव्हती. मग काहीही विचार न करता आम्हाला घेवुन माझ्या नवऱ्याने गाडी हॉस्पीटलकडे दामटली. शनिवारची संध्याकाळ रस्त्यावर वाहने ओसंडुन वाहत होती त्यातून वाट काढीत वीस,पंचवीस मिनिटात आम्ही हॉस्पीटलमध्ये पोचलो. हॉस्पीटलच्या दारात ऍम्ब्युलन्स उभीच होती. स्ट्रेचरवरुन मामाला आणत होते .तेथेच आम्ही त्याचे दर्शन घेतले आणि पाचच मिनिटात मामाची मुले आमच्याशी एक शब्दही न बोलता ऍम्ब्युलन्स मध्ये बसुन निघूनही गेली. मामी मागून आली आम्हाला बघून तिला शोक अनावर झाला.ताईच्या गळ्यात पडून ती रडू लागली. ताईने तिला जवळ घेतले. मामीच्या नाती तिला घरी चल म्हणून घाई करत होत्या.
मामी आम्हाला म्हणाली," तुम्ही काय करता?" आम्हाला करण्यासारखे काय होते? आम्ही आमच्या घरीच जाणेच योग्य होते.मामीच्या मुलांना आमच्याशी बोलायचे नव्हते.मामा नसलेल्या त्यांच्या घरात आम्ही कशासाठी जायचे होते?   मामीचा निरोप घेऊन जड मनाने आम्ही घरी गेलो.
भरपूर मोठ्या घरात ,माणसांमध्ये जन्माला आलेल्या चार बहिणी,एक भाऊ स्वतःला एक मुलगा,एक मुलगी,सून,जावई,नातवंडे सगळे असलेल्या आमच्या मामाला हॉस्पीटलमधुन  परस्पर स्मशानात चार लोकांनी नेवुन भडाग्नी दिला ! त्याच्या स्मरणासाठी एक पणती देखील लागली नसेल ! त्याच्या मृत्यूची बातमी आम्हाला केवळ उपचार म्हणून सांगण्यात आली होती.आम्ही येऊ अशी मामाच्या मुलीची अपेक्षा नव्हती पण आमची,आमचीच नव्हे तर त्या गेल्या जीवाची कदाचित आम्ही त्याच अंत्यदर्शन घ्याव अशी इच्छा असावी आणि इच्छा तिथे मार्ग म्हणून आम्ही तेथे पोचलो.

मानव जन्म हा दुर्लभ असे संत सांगतात. अशा दुर्लभ जन्मात चार लोक जोडणे, नातलगांशी सौहार्दाचे संबंध ठेवणे हे काही मामाच्या उच्चशिक्षित मुलांनी केले नाही. मामाचा स्वभाव अगदीच गरीब. त्याची आई तो सहा महिन्याचा असताना गेली एकत्र कुटुंबात त्याची आबाळ झाली नसली तरी लाडही झाले नाहीत. फार लहानपणापासूनच तो स्वावलंबी झाला .मॅट्रीक होईपर्य़ंत त्यांची परिस्थिती फारच खालावली होती.त्याच्या आजोळी (मामांच्या कडे) संकोचाने चार वर्षे काढून त्याने पदवी पदरात पाडून घेतली आणि नंतर नोकरीसाठी वणवण सुरु झाली.मिळेल तेथे त्याने नोकऱ्या केल्या. वडीलांची नोकरी कधीच संपली होती, शेतातुन फारसे उत्पन्न मिळत नव्हते. तीन बहिणी  आणि एका भावाचे शिक्षण  सगळेच व्हायचे होते. दोन बहिणींची लग्ने खटपटी करुन त्याने जमवली ,लग्नाची कर्जेही फेडली. त्याचे स्वतःचे लग्न व्हायला वयाची तिशी उलटली. पदवीधर बायको मिळाली .मामा संसारात जास्तित जास्त मदत करत असे.नोकरी तर तो करत होताच पण पुरुषांनी घरकामाला हात न लावण्याच्या काळात मामा घरात मामीला  सर्वतोपरी मदत करत असे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली .खऱ्या अर्थाने चौकोनी कुटुंब होते.  बायकोच्या साथीने सुखाचे दिवस सुरु होतील असे वाटले होते , पण.... या माणसाला नुसते दारिद्र्यच नाही तर इतर किती प्रकारे त्रास होऊ शकतो याची जाणीव व्हावी अशीच जणू नियतीची इच्छा होती. मामीचा स्वभाव फारच चमत्कारिक होता.कदाचित कुठला मानसिक आजार असेल तिला .त्यावेळी कळून आला नाही आणि त्यावेळी त्याबद्दल अनभिज्ञताही होती.सतत रडका चेहरा,आणि घरात नवऱ्याखेरीज कोणीही आलं कि कपाळाल्या आठ्या . बारीक सारिक कारणांवरुन नवऱ्याशी भांडणे,त्याला घर सोडून जायच्या,जीव द्यायच्या धमक्या यामुळे मामा जेरीला आला. मामाची  फिरतीची नोकरी आणि दमुन भागून घरी जावे तर रुसलेली ,रागावलेली आणि नवीन आजाराचे घुंगट घेतलेली बायको ! सल्ला देणारे कोणी नाही.कुणाला घरी बोलवायची चोरी त्यामुळे सहाजिकच त्याने दुसऱ्याकडे जाणे कमी केले.मामाच्या बहिणी सुस्थितीत अजिबात नव्हत्या पण आहे त्या परिस्थितीत आनंदाने सासरी नांदत होत्या.सासर-माहेरच्या लोकांच्या अडचणींना मदत करणे ,घरी आलेल्यांचे स्वागत करुन आपल्यातले आहे ते त्यांना देण्याचा तो काळ होता.सगळीकडे थोडी बहुत अशीच परिस्थिती असे. मामाचा मुळ स्वभाव आनंदी,हौशी,रसिक,समाधानी होता. त्याच्या प्रत्येक घरातल्या अंगणात वेगवेगळी फुलझाडे तो लावत असे.गुलाबांना डोळे लावणे तो कुठे शिकला होता माहित नाही पण एका फांदीवर लाल,तर दुसरीवर पिवळे गुलाब फुलवण्याच कसब त्याच्या हातात होतं. आमच्या घरी आला तरी त्याच्या एक दोन दिवसाच्या धावत्या भेटीतही तो बागेत कलमे कर्, अंगण झाड , झाडांना पाणी घाल असे उद्योग करी. या सगळ्या आनंदी,हौशी स्वभावाला मामीच्या आक्रस्ताळेपणाचे ग्रहणच लागले.

कामाकरता पुण्यात आला कि तो आमच्या घरी येत असे.आई त्याची थोरली बहीण. बहीणीजवळ तो मन मोकळे करी ,क्वचित लहान मुलासारखा रडतही असे. माझी आई खूपच करारी आणि धीराची होती.भावाच्या दुःखाने ती हळवी व्हायची पण ती त्याची तिच्या परीने समजूत घाली.बरेचदा तिने त्याला बायकोचा एवढा त्रास सोसण्यापेक्षा वेगळा हो असा सल्लाही दिला असेल.पण मामामध्ये हिम्मत नव्हती आणि त्याला स्वतःला आईची माया न मिळाल्याने मुलांवर ती वेळ येऊ नये असे त्याला वाटत असेल. त्याचा भित्रा स्वभाव  मामीने जोखला होता. आपल्या शेतातला हिस्सा म्हणजे धान्यं, तेल ,डाळी वगैरे मिळावा म्हणून मामी मामाशी भांडायची.त्याने बहिणींच्या लग्नासाठी खर्च केला त्यामुळे तिची मागणी गैर नव्हती शिवाय शेतावर त्याचाही हक्क होताच .मात्र शेतातले काही हवे असेल तर इथे येऊन कष्ट करावे असा त्याच्या गावातल्या भावाचा आणि आई वडीलांचा युक्तिवाद असे.आई सावत्र असली कि वडील सावत्र होतात अशी आपल्याकडे सार्थ म्हण आहे. त्याच्या वडिलांचा स्वभाव मामासारखाच होता.यासगळ्यात मामाची आयुष्यभर ससेहोलपट झाली. मामाचे कामानिमित्त बाहेर राहणे हे त्याचे परिस्थितीपासून पलायनही असू शकेल.

त्याच्या कष्टाळू स्वभावामुळे आणि निर्व्यसनी प्रवृत्तीमुळे त्याने सांगलीला सुरेख बंगला बांधला होता .दोन्ही मुलांना भरपूर शिकवले.मोठा मुलगा इंजिनियर होऊन ,आय.आय.टी मद्रास मधुन एम.टेक झाला.मुलगी एम.एस्सी झाली. मात्र मुलांना वडीलांचा सहवास कमीच मिळाला.आईच्या संगतीत राहिल्याने,तिच्यातील गुण अवगुण सहवासाने ,रक्तातुन त्या मुलांमध्ये पुरेपूर उतरले. कमालीची आत्मकेंद्री प्रवृत्ती, समोरच्या व्यक्तीबद्दल मनात संशय, विनोदबुध्दीचा अभाव अशा स्वभावाच्या या मुलांना आम्ही होता होईल तो आमच्यात सामावुन घेण्याचा खूप प्रयत्न केला. माझ्या धाकट्या बहिणीला वडीलांच्या जागी राज्य सरकारात नोकरी लागली आणि वर्षभरात तिची सांगलीला बदली झाली.नोकरी सोडणे तिला शक्यच नव्हते.त्यावेळी मामाने तिला आपल्याकडे ठेवुन घेतले होते. बहिण तेथे सहा महिने होती.मामाने त्यावेळी तिचे पैसेही घेतले नव्हते.पण तिचे सहा महिने काही सहज गेले नाहीत.मामीला घरात मदत करुन ,हसतखेळत राहायचा तिने प्रयत्न केला मात्र तिच्याच वयाचा आमचा मामेभाऊ सहा महिन्यात तिच्याशी सहा वाक्ये देखील बोलला नाही. मामीचे मूड सांभाळत तिने ते दिवस कसेबसे घालवले. पुढे काही वर्षांनंतर मामाच्या याच मुलाला पुण्याला नोकरी मिळाली तेंव्हा मात्र तो कोणतीही पूर्वकल्पना न देता खुशाल आईकडे येवुन राहीला.आईने त्याचे मायेने स्वागत केले.वर्षभर त्याच्याकडून एकही पैसा न घेता आईने तिच्या मुलीला भावाने ठेवुन घेतल्याची फेड केली वर भाच्याचे लाड केले ते वेगळेच. तो पुढेही दोन वर्षे आईकडे राहीला पण आता तो पैसे देत असल्याने पेंईंग गेस्ट सारखा राहीला यात नवल नव्हते.त्याने औंधला फ्लॅट घेतल्यावर आमच्या आईकडे पाऊल टाकले नाही.आई बिचारी त्याची आठवण काढत बसे.तिच्याकडे फोनही नव्हता त्यामुळे संपर्कच राहिला नाही. मामच्या मुलीचे लग्न  आईने ओळखीतुन  जमवले.आमच्या घरीच साखरपुडा,खरेदी सगळे झाले.लग्न पुण्यात झाल्यामुळे सगळी धावपळ,कमीजास्त शारीरिक,मानसिक आणि आर्थिक झिज आईने, आम्ही बहिणींनी  सोसली.त्यात आईला भाचीचे भारी  कौतुक  होतेच. या भाचीनेसुध्दा आत्याकडे पाठच फिरवली.या सगळ्याचा आईला त्रास होई.आम्ही सुध्दा आईला त्यावरुन बरेच बोलायचो, नावे ठेवायचो .

मामाला मात्र याची जाणीव होती . त्या बहीण भावांमध्ये अतिशय प्रेम होते. मामा जमेल तेंव्हा आईकडे येवुन जात असे. मामीच्या हट्टासाठी मामाने सांगलीचे घर विकले आणि ते दोघे मुलाकडे पुण्यात येवुन राहीले. मामाची सून नोकरी करत होती आणि नातवाला सांभाळण्याची जबाबदारी मामा-मामींवर होती. पुण्यात असूनही त्यांचे आमचे संबंध संपलेच होते. दरम्यान आईची दुखणी सुरु झाली होती.तिला आता घरी एकटे ठेवणे शक्य नसल्यामुळे ती आम्हा बहिणींकडे राहायला आली होती.आई जिच्याघरी असे तिच्याकडे मामा येत राहिला.शेवटची तीन-साडेतीन वर्षे आई माझ्याघरी होती.त्यामुळे आईला भेटण्याकरीता मामा माझ्याघरी येऊ लागला. पहिल्यांदा तो मामी आणि मुलीला घेवुन आला,नंतर मात्र तो एकटाच येत होता.तो सहसा मी ऑफिसमध्ये गेल्यावरच येत असे.पण क्वचित मला उशीर झाला अथवा मी रजेवर असले तर मला भेटत असे. चहा सुध्दा नको म्हणायचा. मी घरात असेन तर त्याला घरात असलेला खाऊ ,चहा घेतल्याशिवाय पाठवत नव्हते. त्याला मात्र काही खायला अतिशय संकोच वाटायचा. आपण यांना घरी बोलावू शकत नाही,बहिणीसाठी काही करु शकत नाही याची अपराधी जाणीव त्याच्या डोळ्यात दिसे. आईचे शेवटी फार हाल झाले.कंपवाताने तिचे अंग सतत हालत राही तिला अन्न जात नसे.नंतर नंतर  दिसेनासे झाले,कानाने कमी ऐकू येई.तिच्याशी संवाद करणे अवघड झाले होते.शेवटी सुटका झाली तिची. तिच्या दहाव्या,तेराव्याला मामा मामी आले .नंतरची पाच वर्षे मात्र त्यांचे आमचे संबंध संपलेच. मामा सोडून कोणालाच आम्ही नको होतो आणि मामालाही त्यांच्याशी विरोध पत्करुन आमच्याशी संबंध ठेवणे त्रासदायक होत असणार.शिवाय त्याचे वयही झालेलेच होते.सुदैवाने त्याची प्रकृती चांगली होती.आमचे आजोबा ९५ वर्षे निरोगी आयुष्य जगले.मामा त्या बाबतीतही वडीलांवर गेला असावा.त्याला मधुमेह,रक्तदाब काहीच नव्हते.  शांत व गरीब स्वभाव,भरपूर व्यायाम, मिताहार आणि सतत पडेल ते काम करणे  हे त्याच्या चांगल्या प्रकॄतीचे रहस्य असावे.

आता उरल्यात फक्त आठवणी आणि जरतारी प्रश्ण. मामाच्या मुलीने तो आजारी असतानाच कळवले असते तर त्याला भेटायला गेलो असतो,त्याच्याशी दोन शब्द बोललो असतो,एखादा पदार्थ खायला नेला असता.  आमच्या मनात मामाबद्दल अजिबात राग नव्हता. त्याच्या भित्र्या ,गरीब स्वभावाची त्याने पुरेपूर किंमत मोजली होती, आणि आमची ही परतीच्या  प्रवासाला सुरुवात झालेली असताना कसल्या चुका काढायच्या आणि दोष दाखवायचे? त्याने आमचे लहानपण आनंदी केले होते.त्याच्या परिस्थितीप्रमाणे आमचे लाड केलेले होते. आमच्या मनात असून त्याच्या विचित्र कुटुंबीयांमुळे त्याचे उतराई होणे जमलेच नाही. मामाच्या मुलांनी त्याला तिलांजली, बारावा,तेरावा श्राध्द वगैरे केले कि नाही याची काहीच कल्पना नाही.ते न केलेलेच बरे.श्रध्देने केले जाते ते श्राध्द . जिवंत असताना कुठलेच सुख द्यायचे नाही आणि गेल्यावर पैसे खर्चुन जेवणावळी घालायच्या हे अयोग्यच आहे. शिवाय जेवणावळी घालायला जोडलेली माणसे हवीत ना?

मामाला शाब्दिक श्रध्दांजली देवुन माझ्या मनाचे मी समाधान करते