Thursday, May 21, 2020

मरणाने केली सुटका ....

सकाळी आठ वाजता नवऱ्याचा फोन वाजला. कमलताईंचा मिस्ड कॉल. सकाळी काय काम असेल असे वाटून रमेशनी लगेच फोन लावला.फोन त्यांच्या जावयाने केला होता.त्याने सांगितले काल रात्री कमलताईंना हार्ट ऍटॅक आला ,त्यांना हॉस्पीटल मध्ये नेले पण त्या वारल्या. सकाळी साडेनऊ पर्यंत घरी आणतील.
दहा बारा दिवसांपूर्वीच त्यांचा फोन आला होता ,सगळ्यांची चौकशी करत होत्या,आपल्या रात्रीच्या ड्यूटीमुळे समक्ष येऊन गाठ घेता येत नसल्याची खंत व्यक्त करत होत्या. त्यावेळी मी त्यांना मीच येऊन जाते असे तोंड भरुन अश्वासन दिले पण दिवसभराच्या नोकरीतुन घरी गेल्यावर जायचा आळस केला अन अचानक आज हि बातमी.

कमलताई, माझ्या आईला शेवटच्या आजारात दिवसभर सोबत करायला येत होत्या. आल्या दिवशी बोलताना मला जरा त्या फटकळ वाटल्या."पेशंटच्या खोली बहेर मी येणार नाही, पेशंट सोडून मी इतर कुठलेही काम करणार नाही,एकदा काम हातात घेतले कि पेशंट जाईपर्यंत मी काम सोडत नाही" अशा अटी त्यांनी घातल्या.माझा अगदीच नाईलाज होता आधीची बाई अचानक काम सोडून गेली होती आणि मला बाईची जरुर होतीच.त्यांच्या सगळ्या गोष्टींना मी हो म्हणाले आणि कामाचे तास कमी असल्याने नेहमी इतके पैसे न घेण्याचे त्यांनी मान्य केले आणि त्या दुसऱ्या दिवसापासून येऊ लागल्या.

सावळा रंग, उंच आणि सडपातळ बांधा कपाळावर मोठे कुंकू साधी पण स्वच्छ साडी. केसाचा घट्ट अंबाडा अशा वेशात कमलताई येऊ लागल्या. आईची तब्येत तेंव्हा बरीच बरी होती.तिला पार्किसन्स अर्थात कंपवात होता. पण त्यावेळी अधुन मधुन डावा हात हालू लागे, हाताबरोबर बाकीचे अंग हालू लागले कि तिला झोपुन रहावे लागे. एरवी ती कमलताईंशी गप्पा मारत बसे. तिचास्वभाव गोष्टीवेल्हाळ , जवळ नाना तऱ्हेच्या अनुभवांचं गाठोडं आणि बरोबर अगदी नवा श्रोता मग काय तिच्या गप्पांना बहर येई. दुपारी दोघी मिळून जेवत. आपल्यातली भाजी,आमटी तर आई त्यांना देईच पण त्यांनी आपली भाजी तिला देवू केली तर ती पण आई आनंदाने घेई. एकंदर दोघींचे छान जमायचे.आईला स्वस्थ बसून राहायला कधीच आवडले नाही, त्यामुळे ती कपड्यांच्या घड्या कर, भाजी निवडून दे अशी छोटी मोठी कामे करत असे. कमलताई पण तिच्याबरोबर भाजी निवडू लागत. कपबशा विसळून ठेवत. एखाद दिवशी माझी कामवाली आली नाही तर जेवणानंतरची भांडी पण न सांगता घासून ठेवत. हळूहळू त्या आमच्यात मिसळू लागल्या आणि त्यांच्या प्रेमळ स्वभावाचा प्रत्यय आम्हाला येऊ लागला. त्यांचा आवाज लहान होता, बोलणे कमी होते, उगाच चौकशा करायची वाईट खोड त्य़ांना नव्हती. सुरुवातीला मला त्या फटकळ वाटल्या याला कारण त्यांच्या आधीच्या कामांवर त्यांचा घेतला गेलेला गैरफायदा असावा. आमच्या घरी मात्र त्यांनी त्यांचे ब्युरेचे नियम लावले नाहीत. माझी धाकटी लेक दहावीत होती.एकदा तिला खूप ताप आला होता, म्हणून मी रजा घेतली होती तरीही  मला ऑफिसमध्ये एक महत्त्वाची मिटींग असल्याने जावे लागले. मिटींग संपवून मी दुपारी घरी आले तर आई आणि कमलताई दोघी माझ्या लेकीच्या उशा पायथ्याशी बसल्या होत्या. तिचे पाय चेपून देत होत्या. 

माझी आई बोलकी आणि प्रेमळ होती ,माझ्या मुली देखील लाघवी स्वभावाच्या आहेत त्यामुळे कमलताईंशी आमचे सूर जुळले. त्या घरच्या कटकटी कधी बोलून दाखवत नसत. पण बोलण्यातुन त्यांच्या तीन मुलांपैकी एका मुलीला व मुलाला लहानपणी पोलिओ झाल्यामुळे दोघांच्या पायात थोडा दोष राहिला होता. त्यांनी आधीच्या आयुष्यातही अतोनात शारीरिक कष्ट केले होते. लहानपणी खेडेगावी शेतात,रस्त्यावर मजुरी केली होती. पुण्यात आल्यावर पापड लाटणे,घरकामे करणे अशी अनेक कामे करत आता बेडरीडन पेशंटच्या आयाचे काम त्यांनी पत्करले होते. माझ्याकडे त्या कुठल्याही ब्युरोकडून नआल्याने ब्युरोला द्यायचे पैसे वाचत शिवाय घर चालत येण्याच्या अंतरावर असल्याने वेळही वाचायचा त्यांचा. त्यांच्या घरात मोठा मुलगा,सून त्यांची दोन मुले, मुलगी जावई ,धाकटा मुलगा आणि कमलताई व त्यांचे पती एवढी माणसे होती. नवऱ्याला वृध्दापकाळाने शारीरिक कष्टाची कामे होत नव्हती. मोठ्या मुलाची कांदे बटाट्याची गाडी होती .दुसरा मुलगा पोलिओने अपंग असल्याने लहान मोठी कामे करायचा. मुलगी घरातले स्वयंपाकपाणी बघे. पण घरातल्या खर्चाचा बराच वाटा कमलताईंच्या कमाईतुनच चाले. त्या सगळे कसे भागवत असतील याचे मला फार नवल वाटे.पण त्यांनी कधीही परिस्थितीचे रडगाणे गायले नाही कि मला कधी पगारापूर्वी  पैसे मागितले नाहीत. फार स्वाभिमानी होत्या.एकदा खूप संकोचाने त्यांनी मला ,"ताई,तुमच्या कडे जास्तीचे ताक असेल तर द्याल का? " असे विचारले. आमच्याकडे भरपूर ताक असायचे रोज आईबरोबर मी त्यांना ही तुम्ही ताक घेत जा असे सांगायची पण त्या नाही घ्यायच्या. मी त्यांना ताक देवु लागले.मग कधी संध्याकाळी एखादी भाजी जास्त उरली असेल तर ,"न्याल का?" विचरले तर नेऊ लागल्या. मी त्यांना आईबरोबर डोसा,इडली खाय़ला दिले तर स्वतः न खाता नातवंडासाठी डब्यात ठेवत. मग मी त्यांना खायला लावुन त्यांच्या नातवंडांकरता देत असे.पण माझ्या या किरकोळ मदतीची जाण त्यांनी किती ठेवावी? त्यांना बरे नसले तरी त्या माझ्या ऑफिसला जायला अडचण नको म्हणून रीक्षा करुन यायच्या.कधी काही कामामुळे त्यांना यायला जमणार नसेल तर त्या त्यांच्या मुलीला कामाला पाठवत. ती देखील आई सारखीच मितभाषी होती.

आईची तब्येत हळूहळू बिघडू लागली तिला सतत झोपुनच रहावे लागे.कमलताईंनी कधी तिच्यावर चिडचिड केली नाही.शांतपणे तिला जेवु घालत.प्रेमाने अंघोळ घालत. तिचे हात हालुन हालुन दुखत ते चेपून देत. आईची खोली  स्वच्छ ठेवत. माझ्या भाचीचे लग्न ठरले.कार्यालयात आदल्या दिवशी जायचे तर आईकडे कोण बघणार ? याची मला काळजी होती.कमलताईंचे पती आजारी असून त्यांनी दोन दिवस रात्री पण माझ्या घरी रहायचे कबुल केले आणि मी निर्धास्तपणे लग्नाला जाऊ शकले.
आईचे शेवटी खुप हाल झाले, तिला ऊठवुन बसवले तरी तिचे बी.पी. लो व्हायचे , तिला झोपवुनच ठेवावे लागे पण अंथरुणाला खिळूनही तिला बेडसोअर्स झाले नाहीत कारण मी व कमलताई रोज तिचे स्पजिंग करुन तिला पावडर लावायचो, तिची कुसही बदलावी लागे सगळे त्यांनी विनातक्रार केले.
                 १६ जून नंतर तिचे बोलणेही कमी झाले,काही खायला घतले तरी ते पोटात टिकत नव्हते. शेवटी कोमट पाण्यात भरपूर साखरेचे लिंबु सरबत देत होतो. ती कॉटवरुन एकदोनदा खाली पडता पडता वाचली .तिला जमीनीवरच झोपवुअसे कमलताईंनी सुचवले.  खाली झोपवल्याने बेडपॅन देणे ,काढणे करणाऱ्या माणसाला जिकिरीचे होत होते पण कमलताईंनी त्याबद्दलही तक्रार केली नाही. १८ तारखेला आईला खूप कफ झाला.तोंडातला कफ थुंकायची पण तिच्यात ताकद नव्हती.सकाळी तिच्या तोंडात कपडा घालून मी तो कफ साफ केला.नंतर ती झोपलेली होती ,आधीचे आठ-दहा दिवस , तिची तब्येत जास्त बिघडल्याने मी घरी होते. त्या दिवशी सोमवार होता, कमलताई रविवारी मला म्हणाल्या,"ताई,तुम्ही किती दिवस घरी राहणार? उद्यापासून जायला लागा कामवर,काही कमी जास्त झाले तर धाकटी ताई फोन करुन  तुम्हाला बोलवुन घेईल,उगीच कशाला कामवर खाडे ?"म्हणून मग मी ऑफिसला जायच्या तयारीत होते.कमलताई आल्या, त्या आईजवळ गेल्या त्यांना काय जाणवले कोण जाणे पण त्या म्हणाल्या,"ताई,आजींचा प्राण गेलाय वाटतं तुम्ही डॉक्टरांना बोलवून खात्री करा"
मी ताबडतोब माझ्या मैत्रीणीला फोन केला .ती लगेचच आली आणि आई गेल्याचे तिने सांगितले.

आई गेल्यानंतर वास्तविक कमलताईंची ड्यूटी संपली होती.पण त्या आमच्या सोबत दहा दिवस होत्या. आईचा त्यांना ही लळा लगला होता.नंतर त्यांना दुसरे काम बघणे क्रमप्राप्त होते.पण त्यानंतरही त्या आमच्या संपर्कात राहिल्या. जमेल तशा येत होत्या, फोनवर चौकशी करायच्या. आमच्या घरी आल्या तरी कधी रिकाम्या हाताने आल्या नाहीत मुलींसाठी काहितरी खाऊ आणायच्या. आईला जाऊन सात वर्षे झाली तरी आमच्याशी त्यांचे संबंध टिकून राहिले. त्यांनी अनेक ठिकाणी कामे केली पण सगळीकडेच त्यांचे असे संबंध नव्हते. त्या मला म्हणत,"ताई ,तुम्ही माणुसकीने वागता म्हणून तुमच्याकडे यावसं वाटतं. " मला त्यांच्याबद्दल जिव्हाळा वाटायचा कारण त्यांच्या जिवावर आईला सोडून मी ऑफिसला जायची. त्याबद्दल मी त्यांना पैसे देत असले तरी अशा कामाची किंमत पैशात होत नसते याची जाण मला होती ते माझ्यावरील आईवडीलांचे संस्कार.
मी त्यांना दिवाळीत फराळाचे देत होते, पैसे द्यायची,दिवाळीला त्यांना मी साडी द्यायची कारण त्यांच्या मोठ्या प्रपंचात त्यांना नवीन साडी घेणे होत नसे, ते मला दिसायचे. त्यांच्या घरी गेले कि त्यांना इतका आनंद व्हायचा, त्यांच्या घरातले सगळेच आमच्या भोवती जमायचे. माझ्या लेकीचे लग्न ठरल्याचे त्यांना कळवले तेंव्हा त्या खूप खुश झाल्या.फोनवर फोन करुन मला बोलवत होत्या.मी व माझे पती त्यांच्याकडे आमंत्रणाला गेलॊ तर मला सुंदर महागाईची साडी,माझ्या मिस्टरांना शर्टपॅंटचे कापड,टॉवेल-टोपी असा यथासांग आहेर त्यांनी दिला,मला खरचं खूप भरुन आले. माणसाची दानतच त्याची श्रीमंती ठरवते. कमलताई किती श्रीमंत होत्या. मी जे मला सहज शक्य होते तेवढेच त्यांना देत होते पण त्यांनी मात्र स्वतःच्या कमाईतला केवढा मोठा भाग मला आहेर म्हणून दिला ! माझ्याबरोबर कासारणीचे दुकान दाखवायला आल्या आणि तिला चांगल्या बांगड्या दे असे बजावले त्यांनी.

त्यांच्या अपंग मुलाला आम्ही काम मिळवुन दिले, माझ्या घरातील कपडे,वस्तू, नारळाच्या करवंट्या अशा त्यांना उपयोगी पडणाऱ्या वस्तू आम्ही त्यांना देत असू. पण या लहान सहान मदतीची त्यांनी सदैव जाणीव ठेवली आणि अधुन मधुन फोन करुन आमची चौकशी करत राहिल्या. आजारी नवरा, आडाणी मुले,अपंग मुलगी यामुळे त्यांच्य़ा आयुष्यातला उन्हाळा संपलाच नाही. दिवसभर घरात नवऱ्याची सेवा व इतर कामे करत रात्री आजारी पेशंट कडे जात त्या झिजत होत्या. त्यांच्या स्वतःच्या तब्येतीच्या तक्रारींकडे लक्ष द्यायलाही त्यांना जमले नाही. अखेर शरीराने साथ सोडली आणि घरच्यांना त्रास नको म्हणून जीवही चटकन गेला त्यांचा.

         सुरेश भटांच्या गजलेतील दोन ओळी त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच मला आठवल्या

         इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
          मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते