Wednesday, September 29, 2010

लेक मोठी होते

परवा परवा पर्यंत ती लहानच होती, परवाच का, आजही ती शेंडेफळ म्हणून लहानपणाचे सगळे फायदे घेत असते.अजूनही ती माझ्या कुशीतच झोपते.कुठलेही काम सांगितले तरी दिदीनेच ते कसे करायला पाहिजे असे पटवते.अजूनही वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशीपासून पुढच्या वाढदिवसाचे बेत आखायला घेते, म्हणजे कुणाकडून काय प्रेझेंट मागायचे इ. त्यामुळे ती दहावीत गेली हे अजून खरचं वाटत नाही.

तिच्यामध्ये दंगेखोर लहानपण आणि समजूतदार मोठेपण याचे एक अजब मिश्रण आहे, ती पावणेदोन वर्षांची असताना तिची आजी दवाखान्यात होती दोन आठवडे. घरी आणल्यावरही डॉक्टरांनी तिला विश्रांती आणि जनसंपर्क टाळायला सांगितले होते. घरातले वातावरण त्यामुळे काळजीमय असाय़चे. त्यातच हिचा वाढदिवस जवळ आला, हिची मोठी ताई तिला सांगत असे त्याबद्दल.पण एकदा तिच्या दादाचा फोन आला.फोन वाजल्या वाजल्या धावत जावून घेण्यात दोघी बहिणी पटाइत होत्या. त्याने तिला विचारले असावे वाढदिवसाबद्दल.त्याला अगदी मोठ्या माणसासारखे सांगू लागली,"अरे दादा,आजीला बरं नाहीये ना, म्हणून आम्ही कुणाला बोलावणार नाही, मग तिलाच त्रास होतो असं डॉक्तरनी सांगितलय आपण पुढल्यावर्षी करु या हं हॅपी बर्थ डे".तिचं बोलणं ऐकून आजीच्याच डोळ्यात पाणी आले.आपण होवुन वाढदिवस नको करायला असे तिने ठरवून टाकले आज्जीसाठी.सात-आठ महिन्यांची असल्यापासून उठल्या-उठल्या आजीच्या पायावर डोके ठेवून नमस्कार करायची आणि मग दिवसभर आजीला दंगा करुन भंडावून सोडायची. आमच्या घराला आतून गच्चीत जाणारा जिना होता आणि त्याला रेलींग करायचे राहिले होते, हि बया चालायला नवव्या महिन्यातच लागली आणि त्याही आधीपासून भराभर पायऱ्या चढून वर जायची, अंगणातील भिंतीवर चढून चालायची.गेटच्या फटीतून डोकावून बघताना एकदा डोके अडकवून घेतले होते. आजी अंघोळीला गेली कि हिच्या कारभाराला उत यायचा.मी सकाळी नऊ-साडेनऊला बाहेर पडत असे.दिदी शाळेत गेलेली असे.नंतर तिचे आणि आज्जीचेच राज्य असे.एकदा स्वयंपाकघरात खुर्चीवर चढून टेबलावरील तुपाची भरलेली लोटी तोंडाला लावली,तुपाची अंघोळ झाल्यावर अंगावरचे तूप टेबल,खुर्चीला फासणे चालू असताना आजी अंघोळ करुन आली , त्यांचा बराच वेळ पुसापुशीत गेला.आजी फारच शांत होत्या, त्या कधीच तिला फारसे रागवत नसत. मी घरी आले, कि माझा मूड बघून कौतुकानेच तिच्या लिलांचे वर्णन करीत. आजींना दम्याचा त्रास होता,चालताना त्यांना धाप लागत असे, त्यामुळे त्या हिने कपडे मळवले, पाणी सांडले तर तिलाच दुसरा फ्रॉक आण, पुसायला फडके आण असे सांगत.तिचे स्वावलंबन त्यातुनच वाढत गेले.कुठेही काही आधी सांडायचे आणि नंतर तत्परतेने फडके आणून पुसायचे हे तिचे ठरुन गेलेले असे. कपडे देखील ती आपले आपण घालत असे, दुसऱ्याने मदत केलेली तिला अजिबात खपायची नाही. मग टि-शर्टाच्या बाहीतून डोके घालायचे ते अडकले की धडपडायचे श्वास कोंडू लागल्यावर रडायचे पण दुसऱ्याने मदत केली तर अजूनच थयथयाट करायचा,बराच वेळेच्या झटापटीनंतर एकदाचे कपडे घातले जायचे,ते घातल्यानंतर फारच थोड्या वेळात सांडमांड होवून बदलायची वेळ येत असे.दुपारी आजी झोपली कि दिदीच्या बांगड्या,माळा गळ्य़ात घाल,अल्बम मधले फोटॊ बघताबघता ते काढ असे उद्योग चालत. पेन पेन्सिल हातात यायचा अवकाश, तिला लिहायला कागद कधी पुरलेच नाहीत. एवढ्या मोठ्या भिंती कशासाठी असा प्रश्ण पडत असावा तिला. घरातल्या सगळ्य़ा भिंतींवर तिची कला बहराला आली होती.नुकत्याच रंग दिलेल्या भिंतींची वाट लागलेली बघून तिच्या बाबांच्या अंगाचा तिळापापड होई,"तुम्ही तिला पेन हातात देताच का?" असे म्हणून तो राग आमच्यावर निघे पण एकदा बाबा वाचत असताना त्यांच्या खिशातले पेन मिळवण्यासाठी तिने बालहट्ट आणि स्त्री-हट्टाचे असे काही प्रदर्शन केले, कि पेन देण्य़ाशिवाय त्यांना पर्याय नाही राहिला,आणि मग भिंतीवर आणखी नव्या कलाकृतींचा जन्म झाला.
घरातल्या वस्तू आणि माणसांवर तिचा जन्मसिध्द हक्क. टि.व्ही. लावणे बंद करणे हि कामे आजीला मदत म्हणून करताना तिला हवी तेंव्हा करण्य़ाचे स्वातंत्र्य तिने मिळवले. एकदा व्हि.सी.आर वर भाड्याने कॅसेट आणून लावताना तिने बघितले.नंतर थोड्या दिवसांनी व्हि.सी.आर बिघडला, दुरुस्तीला दुकानात नेला,दुकानदाराने तो उघडला तर आत त्याला टेपरेकॉर्डरच्या कॅसेटस सापडल्या, मुलीला नंतर काही बघावेसे वाटले असेल, व्हिडीयो कॅसेट घरात नसल्याने तिने असलेली कॅसेट त्यात घालून बघण्य़ाचा प्रयत्न केला, पण किती झालं तरी ते यंत्र, तिच्या इतक शहाणपण त्याच्याकडे कुठल? पुन्हा हे सगळे उद्योग ती कधी करी कुणाला पत्ता लागत नसे.

ती आडीच वर्षाची झाली आणि तिची आजी अचानक वारली.मग दुसऱ्या एक आजी तिला सांभाळायला येवू लागल्या,या आजीपण खूप प्रेमळ होत्या.पण हिच्या कारभाराबद्दल त्यांनी नाराजी दाखवली कि लगेच त्यांनाच,"माझी आई नाही ना घरात, मला रागावू नको ना" असे सुनवायची. त्यावेळी तिच्या दिदीची दिवसभर शाळा असे आणि या बाईसाहेब सकाळी तीन तास शाळेत जावून घरी दुपारी येत मग सगळी दुपार दिदीचे कपाट संपूर्ण रिकामे करण्य़ात जाई, दिदी शाळॆतून घरी आल्याबरोबर तो पसारा बघून संतापाने काळी निळी होई,हि शांतपणे आमच्या खोलीत झोपलेली असे.(अर्थात दमून).कधी शाईच्या बाटल्या डोक्यावर ओतून घेई,कधी डिंकाची बाटली फोनवर उपडी करी. दिदीने पाच वर्षे जपून वापरलेल्या एकूण एक खेळांची तिने धूळधाण उडवली प्रत्येक खेळणे उघडून बघितल्याशिवाय तिच्या जिवाला चैन पडत नसे.घरात फर्निचरचे काम चालले होते, अंगणातल्या कारशेडमध्ये सुतारकाम चाले, बाईसाहेबांचा मुक्काम शाळेतून आल्यावर तिथेच असे.भुस्सा,खिळे,चुका यातच फतकल मारुन त्या लोकांचे काम बघण्य़ात ती रममाण होवुन जाई. चिखल,माती सगळ्याबद्दल तिला विशेष माया. त्यामुळे मी घरी आले कि ती कुठल्या अवतारात दिसेल याची कल्पना करता येत नसे.

कोणीही बोलावले कि त्यांच्या घरी तिला लगेच जायचे असे, इतकेच नाही तर आमच्या कडे कोणी येवून गेले कि आपण त्यांच्याघरी कधी जायच? असं लगेच विचारायची.असं असूनसुध्दा शाळेत जायला तिने फारच त्रास दिला.हल्ली आडीच वर्षापासून शाळा सुरु होते, तिने पहिला आठवडा रडून गोंधळ घातलाच,घरी आली कि तिचा चेहरा लालबुंद असे आणि दुपारपर्यंत हुंदके ऐकू येत. सकाळी खुशीत उठे आणि अंघोळ करताना निरागसपणे विचारी,"आई, आज शाळा आहे?"
"हो,आहे ना" असं मी म्हणताच ती रडायला सुरुवात करी. रीक्षात बसवेपर्यंत ती रडत असे.माझ्या पोटात तुटत असे,पण तिला शाळेत नाही धाडले तर ठेवणार कुठे असा प्रश्ण असे, कारण तिला सांभाळणाऱ्या आजी अकरा नंतर येत. मन घट्ट करुन मी तिला पाठवी, मात्र तिचे रिक्षा काका सांगत,"अहो कोपऱ्यापर्यंत रडते, मग लागते बोलायला" ती स्वतः पण संध्याकाळी मूड असला तर म्हणे,"आई, मी रिक्षात बसले की सगळे म्हणतात भोंगा सुरु" शाळेत सुरुवातीचे काही दिवस हि डबा न खाता तसाच आणायची, खाण्य़ाची तिची तशी कधी तक्रार नसे, मग डबा का खात नाही? मी तिला रोज विचारी, मग एक दिवस मला जाणवले, तिला मी रिकामा बंद डबा उघडायला लावला तर तिला तो उघडताच येत नव्हता.मग लक्षात आले तिला डबा उघडता येत नसल्याने बिचारी न खाता येत होती.टिचर कडून उघडून घ्यावा असेही तिला सुचले नसावे. मग तिला मी तिला उघडता येइल असा डबा देवू लागले.
ज्युनियर केजी मध्ये ती तिच्या दिदीच्या शाळेत जायला लागली, मग मात्र तिने शाळेत जाण्य़ासाठी त्रास नाही दिला, दिदीची आणि तिच्या शाळेची वेळ वेगळी असली तरी दोघी एकमेकींना भेटत असत,दिदिच्या वर्गात जावून म्हणे "I am the didi's sister" त्यामुळे ती शाळेत खुशीत जायला लागली. माझ्या ऑफीसमध्ये माझ्या बॉस मॅडम होत्या.मी कधी कधी तिला "तू ऑफिसला नकॊ जाऊ" असे ती म्हणाली कि आमच्या मॅडम रागावतील असे सांगत असे.
एकदा म्हणाली "आई तुमच्या मॅडम तुला A for Apple कधी शिकवतात?"
"नाही गं, आमच्या मॅडम नाही शिकवत कधी"
"मग सगळा वेळ फक्त नाच आणि गाणीच म्हणता तुम्ही?"

तिचा मी अभ्यास कधी कसा घेतला मला काहीच आठवत नाही. ती दुसरीत होती त्यावेळी तिच्या वार्षिक परीक्षेच्या दोन-चार दिवस आधी तिच्या बाबांना नाशिकजवळ फार मोठा अपघात झाला, मला तिकडे जावे लागले, पंधरा दिवसांनी त्यांना घेवून मी पुण्य़ात आले,पुण्य़ातही एक आठ्वडा ते दवाखान्यात होते.मांडीचे हाड मोडल्याने महिनाभर घरी,पुढे त्यांचे वॉकर, कुबडी, काठी घेवून चालणे,डॊक्याला मार लागल्याने डोळ्याला आलेले तिरळॆपणा त्यासाठी विविध डॉक्टरांच्या भेटी.या सगळ्य़ा ताण-तणावात माझे तिच्याकडे फार दुर्लक्ष झाले, हि अपराधी भावना मला सतत टोचत असल्याने असेल कदाचित, मी तिला तिच्या दिदीइतकी शिस्त नाही लावू शकले. तिचे टि.व्ही.बघण्य़ाचे अमर्याद वेड यातूनच निर्माण झाले असावे.तिला देण्य़ासाठी माझ्याकडे वेळ नेहमीच कमी होता. आम्ही स्वतंत्र बंगल्याच्या सोसायटीत रहात असल्यामुळे तिच्या वयाची मुलेही कमी असत.आमच्याकडे केबल नव्हती पण दूरदर्शनवरील सगळे कार्यक्रम ती बघायची.सिनेमा , नाटक बघतानाही ती कमालीची एकरुप होवून बघत असे.ती तीन-साडेतीन वर्षांची असताना "जाणता राजा"चा प्रयोग बघायला आम्ही गेलो होतो.शिवाजी महाराजांच्या गोष्टी तिला माहित होत्याच.प्रयोग सुरु झाला,आणि त्या भव्य मंचावर जिवंत माणसे बघून ती इतकी थक्क झाली,
"आई हे सगळं खरं खरं इथे घडतयं? " असं म्हणत तीन तास खुर्चीवर उभी राहून तिने सगळा कार्यक्रम बघितला, पुढचा आठवडाभर त्याच आनंदात होती. बाळगंधर्व रंगमंदिरात तिला घेवुन ’लेकुरे उदंड झाली’ बघायला गेलो त्यावेळी ती असेल पाचएक वर्षांची.अगदी पहिल्या रांगेतून एकदाही इकडे तिकडे न बघता तिने नाटक बघितले. त्यातल्या गाण्यांवर, संवादावर इतकी मनमुराद हसत होती कि तिच्याकडेच बघावे वाटत होते. एका सुट्टीत मी दोघींना "श्यामची आई" वाचून दाखवत होते.शेवटच्या प्रकरणाच्या वेळी ’आई वाचू नको" म्हणून रडायला लागली.नंतर कितीतरी वेळ "आई , शामची आई देवाघरी गेली? तो किती एकटा पडला ना?" असे विचारत होती.

तिला शाळेतील सगळ्य़ा उपक्रमात भाग घ्यायची आवड आहे.कॉम्प्युटर तर ती सराईतासारखा वापरते. त्यावर ती फारसे गेम नाही खेळत,पण मेल अकाऊंट उघडण्यापासून मेल लिहिणे, बघणॆ सगळे ती कधी शिकली पत्ता लागला नाही. फाल्गुनी पाठकचे एक गाणे ऐकून त्याचा अर्थ लावून तिने पेंट-ब्रश मध्ये एक चित्र काढले होते. तिला हवी ती माहिती नेटवरुन शोधून त्याची फाईल सेव्ह करुन त्याचे प्रिंट आणणे हे सगळॆ ती बिनबोभाट करते. हवी ती गाणी डाऊनलोड करुन घेते.ओरीगामी,स्ट्रींग गेम्स याची पुस्तके वाचून ती सगळे बनवू शकते, कुठलेही डोक्याने खेळायचे खेळ ती मनापासून खेळते पूर्वी सुट्टी सुरु झाली कि मी दुकानातून अशी कोड्यांची पुस्तके, खेळ आणीत असे,घरी येता येताच गाडीत ते सोडवून होत, अगदी चित्र रंगविणे,ग्लास पेंटींग,भरतकाम सगळे आणले तरी चारदिवस सतत तेच करुन पुन्हा उरलेल्या सुट्टीत काय करू? हा प्रश्ण असेच.पेपरातले सुडोकू असो कि शब्दकोडे ती चटकन सोडवून टाकते.माझा मोबाईल मी घरी गेले कि तिच्याच ताब्यात असतो.तो वापरायला मी तिच्याकडूनच शिकले, सुरुवातीच्या काळात तिने त्यात काही बदल केले(डिक्शनरी ऑन-ऑफ सारखे) कि मी तिलाच विचारी,ती घरुन माझ्या ऑफिसच्या फोनवर फोनकरुन ती मला सेटींग शिकवत असे.
शाळेच्या ग्रुप प्रोजेक्ट मध्ये ते ठरविण्यापासून ,ग्रुपमधल्या लोकांना कामे वाटून देणे, सगळ्य़ांनी एकत्र भेटण्याची वेळ,स्थळ ठरवणे सगळॆ ती स्वतः करते.परीक्षा संपण्य़ापूर्वीच शेवटच्या दिवशी काय मजा करायची याचे बेत तिचे तयार असतात. फार लहान असल्यापासून सगळ्य़ा गोष्टी ती आपल्या आपण करत आल्याने परवानगी विचारणे वगैरे गोष्टी तिच्या गावी नसतात.
"येत्या रविवारी मी मैत्रींणींबरोबर सिनेमाला चाललीय" असे ती जाहिर करते,
"कुठल्या, आणि कुठे?"
"सिटी-प्राईड्ला रंग दे बसंतीला जातीय"
"पण तेथे जाणार कशी?"
"बाबा सोडतील ना?"
"त्यांना विचारलेस का?"
"नाही अजून , पण सुट्टीच आहे ना त्यांना, मग सोडतील की, नाहीतर जाईन मी रिक्षाने."
सगळ्य़ा प्रश्णांची तिची उत्तरे तयार असतात.

शालेय अभ्यासात ती फार पुढे नसते, तिला समज चांगली आहे, पण एका जागी शांत बसून अभ्यास करणॆ तिला फारसे जमत नाही.आणि विषय समजला कि तिला ते पुरेसे असते, लिखाणाचा तिला कंटाळा आहे, सहाजिकच आपल्या शिक्षणपध्दतीचा विचार करता ती मार्क मिळवू शकत नाही.पण तिचे मला जाणवलेले मोठ्ठे वैशिष्ठ्य म्हणाजे मैत्रीणीला चांगले मार्क्स मिळाल्याचा तिला खूप आनंद होतो.पहिल्या नंबरला कित्ती मार्क मिळाले हे ती अगदी कौतुकाने सांगते.आपल्याला तसे मिळावेत असे तिला वाटले तरी दुसऱ्याबद्दल तिला असूया ,स्पर्धा वाटत नाही.
"तुला एवढेच का मिळाले?" असे विचारले कि
"आई , मागच्या वेळेपेक्षा यावेळी ४ मार्कस जास्ती आहेत ना? मिळतील ना फायनलच्या वेळी अजून" असे सांगून मलाच गप्प करते.
दहावीला भरपूर मार्क मिळाले तरच चांगल्या कॉलेजमधे प्रवेश मिळतो, मार्क्स हे आणि हेच आपल्याकडचे हुशारी मोजण्य़ाचे एकमेव मोजमाप असल्याने कधीकधी मला तिची अपार काळजी वाटे मग तिच माझ्या गळ्यात पडून म्हणे," डॊंट वरी ममा, माझ्या वेळेपर्यंत बोर्ड एक्झाम कॅन्सल होईल" तिच्या या कमालीच्या आशावादी दृष्टीकोनामुळेच सातवीपर्यंतची परीक्षा रद्द झाली आणि बोर्डाने पण मेरीट लिस्ट लावणे रद्द केले असावे.

परवा बोलता बोलता तिने तिच्या एका मैत्रीणीने दुसऱ्या मैत्रिणीला वाढदिवसानिमित्त कविता केलेली वाचून दाखवली, मी तिचे कौतुक करुन म्हणाले,"छान केलीय तुझ्या मैत्रीणीने कविता, तुला जमेल का?"
"आई , मी पण करु शकते"
" केली नाहिस कधी, आणि मला नाही दाखवलीस कधी? "
"तुला दाखवली नसली तरी मी करु शकते"
"मग कर बर माझ्यावर कविता" असे म्हणून मी कामाला लागले, पंधराव्या मिनिटाला ती कागद घेवून आली.
You are the great mom, ever known
without you, we have never grown

you taught me to be nice
and tell the truth at any price

अशी बरीच मोठी कविता तिने सहज लिहिली, वाचता वाचता डोळे पाणावले. माझी हि चिमणी एवढी मोठी कधी झाली? मी तिची उगीचच काळजी करते, हि मुलगी फार वेगळी आहे, मनात आणेल ते ती करु शकते. तिचे शहाणपण मोजायची पट्टी माझ्याजवळ नाही म्हणून मी तिला आजवर प्रत्येक रिझल्ट नंतर रागवत आले.माझ्या नकळत ती खूप मोठी झाली. मी शिकवलेल्या थोड्याफार गोष्टींचे श्रेय मला देण्याचे मोठेपण मात्र ती येतानाच घेवून आली आहे, तिचे सगळे आयुष्य आनंदयात्रा ठरो हाच माझा तिला आशीर्वाद.


©