Monday, October 31, 2011

दिवाळी

दरवर्षी येणारी दिवाळी.दिव्यांचा उत्सव! दुःख,दारीद्र्य,अज्ञानरुपी अंधःकाराचा नाश करुन मंगलमय वातवरण करणारी दिपावली. लहानपणातल्या अनेक दिवाळ्या डोळ्यापुढे चंद्रज्योतींसारख्या झगमगत आहेत. नवे कपडे, फराळाचे नाना प्रकार, सुगंधी तेलाची ,उटण्याची उबदार अंघोळ ,किल्ले बनविणे आणि जरा मोठे झाल्यावर दिवाळी अंक वाचणे.


श्रावणापासून सण वार सुरू होत. गौरी-गणपती झाले कि नवरात्र येवुन ठेपे.मधल्या पितृपंधरवड्यात शुभकार्ये करायची नाहीत असे माहित होते. नवरात्राचे नऊ दिवस घरोघरी भोंडल्याची गाणी म्हणण्यात आणि नाना तऱ्हेच्या खिरापती खाण्यात कसे जात समजतच नसे. गल्लीतल्या चार घरी भोंडला असेल तरी प्रत्येक ठिकाणी तिच तीच गाणी म्हणायचा आम्हाला कंटाळा नाही याय़चा. त्यात वेळ जातो, अभ्यास होत नाही सहामाही परीक्षा जवळ आलेल्या आहेत याचीही जाणीव न आम्हाला असायची ना आमच्या आई वडीलांना. आई हौशीने नवनव्या खिरापती कराय़ची , नवनवी गाणी शिकवायची. आमच्या शेजारच्या काकू आमच्या भोंडल्याला येत असत. त्यांना मुलगी नव्हती, सगळे मुलगेच होते.आमच्या भोंडल्याला त्यांचे गजगौरीचे गाणे त्या आवर्जुन म्हणत.पांडवांनी बाणाचा जिना करुन स्वर्गातून इंद्राचा ऐरावत कुंतीला आणून दिला आणि तिचे गजगौरीचे व्रत पुरे झाले अशी कथा गाण्यात गुंफलेली होती.

शंभर कौरव सर्व मिळोनी करीती हत्ती माती आणॊनी

गंधारीला वरी बसवोनी वाटीयली वाणे

कुंतीला मग देवुन वाण दुर्योधन बोले टोचून

आमुच्या वाणाचा व्रतांत परत पाहिजे आम्हा

कुंती माता कष्टी झाली भीम पुसे मग येवुन जवळी

शोक कशाचा चिंता कसली सांग सांग आई...

अशी सुरुवात असलेले हे गाणे. कौरव एवढे राजपुत्र , मग त्यांच्या कडे खरा हत्ती नव्हता का? बाणांच्या जिन्यावरुन एवढा बलदंड भीम कसा गेला जिना तुटला कसा नाही? स्वर्गापर्यंत म्हणजे जिना तरी किती मोठ्ठा असे प्रश्ण पडले नसतीलच असे नाही पण गाण्याची सुंदर चाल, फेराचा तो ठेका यामुळे ते गाणे फारच आवडायचे. सासर माहेरची गाणीही तशीच. नसलेल्या सासराबद्दल एवढ्या लहान वयातच खुन्नस निर्माण होइल,बाळमनावर परीणाम होईल अशा शंका आमच्या आयांना कधी आल्या नाहीत. ती गाणी माहित नसलेल्यां हल्लीच्या मुलींना नवरा सोडून इतर सगळे दूरचे, आणि सासरच्या वाटे कुचकुच काटे हे आधीपासून माहित असते. त्या गाण्यांमधुन जुन्या सासुरवाशणींची दुःखे बाहेर येत होती, आम्हाला मात्र ती गाणी त्यांच्या गेयतेमुळे , नादमाधुर्यामुळे क्वचित विनोद,अतिशयोक्तिमुळे आवडत होती .


काळी चंद्रकळा नेसु कशी,गळ्यात हार घालू कशी
ओटीवर मामंजी जावु कशी? दमडीचं तेल आणू कशी?

दमडीचं तेल आणलं सासुबाईंच न्हाणं झालं

वन्सबाईंची वेणी झाली मामंजींची शेंडी झाली

उरलेलं तेल झाकुन ठेवल, लांडोरीचा पाय लागला

वेशीबाहेर ओघळ गेला त्यात हत्ती वाहून गेला

सासुबाई सासुबाई अन्याय झाला

दुधभात जेवायला घाला माझं उष्टं तुम्हीच काढा

या गाण्यातल्या दमडीच्या तेलात इतक्या गोष्टी करुन झाल्यानंतर उरलेल्या तेलाचा ओघळ वेशीपर्यंत जावुन त्यातून हत्ती वाहून जाण्याइतकेच सुनेने सासुबाईंना दुधभात जेवायला मागणे आणि आपले उष्टे त्यांना काढायला लावणे हि अशक्य घटना होती. माहेरच्या प्रत्येक गोष्टीचे कौतुक, कार्ल्याचा वेल लावण्यापासून त्याला आलेल्या कारल्याची भाजी खाऊन आपलं उष्टं काढुन शेणगोळा केल्यावर सासरी पाठवणारी खाष्ट सासु.चोरटेपणाचा आळ आणणारी खडुस नणंद ,कडक सासरा हे सगळे मुकाट पणे सोसायला बळ देणारा प्रेमळ नवरा अशीच सगळी गाणी होती. निव्वळ करमणुकीपेक्षा इतर काही त्यातुन आम्हाला त्यावेळी जाणवले नाही.

गाणी म्हटल्यावर मिळणाऱ्या खिरापती शिरा,पोह्यापासून फळे, लाडू ,चिवडा,वाटली डाळ,भेळ अशा नाना प्रकारच्या असत. काही उत्साही बायका गजरे, विडे असा साग्रसंगीत भोंडला करायच्या. सगळ्यांकडे घरी केलेल्याच खिरापती असत.त्यामुळे कधी पोट बिघडलयं, त्रास झाला असं काही आठवत नाही. आमच्या शाळेत देखील एक दिवस भोंडला असायचा. भोंडल्याहून घरी आल्यावर जमेल तसा अभ्यास करावा लागे, कारण दसरा झाला कि लवकरच सहामाही परीक्षा असे. परीक्षा संपताना दिवाळीचे वेध लागलेलेच असत. घरोघरी चकली,कडबोळीच्या भाजण्या भाजणे,अनारशाचे पीठ बनवणे हि कामे सुरु झालेलीच असत. झाडलोट, डबे घासणे हि कामे आम्ही हौशीने करत होतो. दुपारी आईला फराळाचे पदार्थ करायला मदतही करायचो. मिक्सर, फुडप्रोसेसर अशी साधने नसल्याने हे पदार्थ बनविणॆ तितके सहजही नव्हते. तरी गॅस, स्टोव्ह असल्याने आई म्हणे ,"आता गॅ्समुळॆ कामे लवकर होतात आमच्या लहानपणी चुलीवर काय त्रास व्हायचा!"

आकशकंदील,दिवाळीची भेटकार्डे पण आम्ही घरीच बनवत होतो. संध्याकाळी मातीचा चिखल करुन अंगणात किल्ले बांधण्याचे उद्योगही चालत. एकमेकींकडे जावुन किल्ले बांधायचो.जास्त चिखल राडा केला तर आईची बोलणी ऐकावी लागत. कारण दिवाळीला अंगणही स्वच्छ झाडून लोटून रांगोळ्यांकरीता लख्ख करावे लागे.किल्ल्यावर आळीव, मोहरी टाकली कि दोन तीन दिवसात मस्त शेत उगवायचे. किल्ल्यावर मातीचे शिवाजीमहाराज , मावळे, तोफा अशी चित्रे. यात एखाद्याच्या किल्ल्याच्या पायथ्याशी नवीन आणलेली खेळातली मोटारही ऐटीत उभी असायची. किल्ल्याला एक गुहा असेच त्यात वाघ, किंवा सिंह ठेवायचा त्याच्या पलिकडे विहिर आणि विहिरीच्या काठावर हंडा डोक्यावर घेतलेली गवळण. वाघाचे तोंड तिच्या दिशेलाच. दरवर्षी नवी चित्रे (मातीचे मावळे, शिवाजी इ) मिळत नसल्याने दिवाळी संपल्यावर ती चित्रे उचलून खोक्यात भरुन ठेवायचो, मातीचीच चित्रे ती, पुढल्या वर्षी थोडीफार मोडतोड झालेली असे. शिवाजी महाराज सोडून बाकीचे मावळे जेरबंद झालेले चालायचे त्यांना लढताना दाखवले जाई. किल्ल्याच्या पायथ्याशी कुणाचा हात तुटलेला, एखाद्याचे मुंडकं उडलेलं अशी धमासान लढाई. आणि किल्ल्याच्या शिखरावर सिंहासनावर विराजमान शिवाजी महाराज ! आमच्या कलाकृतींवर आम्हीच खुश असायचो. त्यात विसंगती,चुका चुकुन सुध्दा कुणाला दिसायच्या नाहीत.किल्याजवळ पणती ठेवायलाही जागा असे. रात्रीच्या अंधारात तिचा चिमणाप्रकाश किल्ला उजळून टाकी. बऱ्याचशा एकसारख्या दिसणाऱ्या वेगवेगळ्या ओबडधोबड किल्ल्यांपैकी कुणाचा रायगड, कुणाचा राजगड तर कुणाचा सिंहगड असे. मातीत मनापासून खेळायची हौस त्यामधे पुरेपूर फिटून जायची.क्वचित एखादा कल्पक मुलगा किंवा मुलगी असे, ते किल्ल्याला बुरुज बनवत त्यावर खडूने शनवारवाड्याच्या बुरुजासारखे डिझाईन करत. कुणी किल्ल्याभोवती भक्कम खंदक करीत.कुठे एखादे बांधकाम चाललेले असेल तर तिथली वाळू किंवा सिमेंट मिळाले तर अगदी ब्रम्हानंद व्हायचा, कारण मग त्या खंदकात सिमेंट लावून पाणी टिकवता येई, किंवा एखादे तळे करुन त्याला आतुन सिमेंट्चे लिंपण करुन पाणी भरुन त्याचा गंगासागर तलाव बने. आम्हा कुणा्चेच आई वडील आमच्या खेळात सहभागी झाल्याचे आठवत नाही,पण त्यांनी आमच्या या उद्योगांना कधी विरोधही केला नाही,वा त्याचे फार कौतुक केल्याचेही स्मरत नाही. आम्ही आणि आमचे पालक यांची अगदी स्वतंत्र अशी परस्पर भिन्न विश्वे होती. एकमेकांच्या विश्वात कुणीच ढवळाढवळ करत नव्हते.

दिवाळी आणि वाढदिवस या दोनच प्रसंगांना नवीन कपडे मिळत, माझा वाढदिवस दिवाळीतच असल्याने मला दोन फ्रॉक नसत,उलट माझ्या बहिणींना माझ्या बरोबर नवे कपडे मिळत, हि गोष्ट नाही म्हटले तरी मला थोडी टोचे.पण माझे दादा, "बघ तुझा वाढदिवस सगळ्या महाराष्ट्रात साजरा होतो, तू कित्ती मोठ्ठी व्यक्ती आहेस!" अशी माझी समजूत काढित.मलाही उगीचच आपण महान असल्याचा भास होई.अर्थात कपड्यांपेक्षा खेळ, खाणे, सुट्टीत हुंदडणे यात जास्त रस वाटायचा त्या वयात. दिवाळीतच फक्त फटाके उडवायला मिळत. दादांचा फटाके आणण्याला सक्त विरोध असे.दारू , मग ती प्यायची असो वा शोभेची त्यासाठी पैसे देणार नाही , त्यापेक्षा खाऊ खा,पुस्तके आणा असे त्यांचे म्हणणे असे. वाईट वाटले तरी हट्ट करण्याची शामत नव्हती. आमच्या आईचे मामा कधीकधी आमच्या करीता फुलबाज्या, भुईचक्रे,भुईनळे क्वचित लवंगी फटाक्यांचे एखादे पाकिट आणीत, दादांना ते ही आवडत नसे, पण सासऱ्यांना बोलण्य़ाची पध्दत नसल्याने आमच्या ते पथ्यावर पडे.मग त्या फटाक्याची काटेकोर वाटणी करुन दिवाळीचे चार दिवस ते टुकिने पुरवुन लावले जात. आजुबाजुच्या घरांमध्येही फारसे वेगळे चित्र नसल्याने आम्हाला या गोष्टींचे दुःख कधी वाटले नाही.
नरकचतुर्दशीला सूर्योदयाच्या आत अंघोळ नाही झाली तर नरकात जातात अशा धमकीमुळे पहाटे पाच वाजताच उठावे लागे.कुडकुडणाऱ्या थंडीत मस्त वासाचे तेल चोळून गरम पाण्याने आई न्हायला घाली.उट्णे ,मोती साबण लावून अंघॊळ करुन नवे कपडे घालून देवाला जावुन आले की सकाळी सात वाजता फराळ करायला बसायचे.इतक्या सकाळी चकली, चिवडा,कडबोळी शेव तसेच लाडू , करंजी असे तेलकट,तुपकट कसे खायचे? असे कधी मनात नाही आले. मन लावून सगळा फराळ झाला कि कधी कधी डोळे मिटू लागत. जेवायच्या वेळीच जाग येत असे. दिवाळीत ’सकाळ’चा ही बराच मोठा असे. वेगवेगळे दिवाळी अंक असत. ते वाचण्यात दुपार संपायची.वाचताना मधुन मधुन तोंडात टाकायला शंकरपाळे, चिवडा असल्याने त्याची रंगत वाढायची. संध्याकाळी अंगणात रांगोळ्या काढून रंग भरण्य़ाचा मोठा कार्यक्रम असे.पणत्या लावायच्या. संध्याकाळी लक्ष्मीपूजन असे. लाह्या-बत्तासे भरलेल्या ताम्हनात लक्ष्मीची पूजा होई. अगस्ती ऋषींनी रचलेले लक्ष्मीचे स्तोत्र आई म्हणायची. "चचंलायै महालक्ष्मी: चपलायै नमो नम:" चंचल चपल अशा महालक्ष्मीची आळवणी एवढ्यासाठी करायची की "पाडिंत्यं शोभते नैव महालक्ष्मी त्वया विना " पांडित्य, सत्शिल हे सारे गुण तिच्या शिवाय व्यर्थ आहेत. संसारी माणसाच्या आयुष्यातील लक्ष्मीचे महत्त्व अगस्तीमुनींनी किती नेमकेपणने सांगितल आहे ! शिवाय तिच्या असण्याने "गुणिर्विहिनाः गुणीना भवन्ती” हे त्रिकालाबाधित सत्यही ते सांगतात. पाडवा,भाऊबीज हे दिवसही गोडाधोडाचे जेवणाने मजा आणायचे. आम्हाला सख्खा भाऊ नाही, आमच्या कुसुम मावशीच्या तीन मुलांपैकी कोणीतरी एक दादा त्या दिवशी आवर्जुन आमच्या कडून औक्षण करुन घ्यायला यायचाच. आम्हाला त्याने दिलेल्या ओवाळणीची काय अपूर्वाई वाटायची!. आज जाणवते, मावशीला पाच मुली होत्याच, पण आम्हाला भाऊ नाही म्हणून दादा, नाना किंवा अप्पा कुणालातरी ती आमच्याकडे पाठवायची तेही कौतुकाने सायकल मारीत येत. आईचा मोठा चुलत भाऊ तळेगावला असायचा. तो मामा देखील भाऊबिजेला न चुकता आमच्याकडे जेवायला येत असे. एका दिवाळीत तो काविळीने बराच अजारी असल्याने हॉस्पिट्लमध्ये असल्याचे समजले तेंव्हा लवकर उठुन, घरातले सगळे उरकुन आई तळॆगावला त्याच्याकडे गेली त्याच्या घरी तिने स्वयंपाक केला त्याच्यासाठी पथ्याचे घेवुन दवाखान्यात त्याला भेटून आली होती.

लहानपणीच्या सगळ्या दिवाळ्या अशा आनंदी आठवणींच्या आहेत. त्या आनंदी होण्यासाठी आईला किती त्रास पडायचा ! याची तिने कधी पुसटशी जाणीव नाही होवु दिली. रात्री उशीरापर्यंत जागून ती लोकांचे कपडे शिवुन द्यायची , आमचे कपडेही घरीच शिवत असे. कुणा एकीचा फ्रॉक आधी शिवून झाला म्हणून आमच्यात भांडणे नकोत म्हणून एका वेळी दोन्ही फ्रॉक शिवुन होतील असे ती बघे. तिला दिवाळीला कधी नवीन साडी मिळाल्याचे मला आठवत नाही, पण त्याबद्दल तिने चुकुन नाराजीही व्यक्त केली नाही. दिवाळी म्हणजे तिच्या दॄष्टीने अखंड काम असे.मात्र ते सगळे ती हौशी-उमेदीने करत होती, आल्या गेलेल्यांना भरभरून खाऊ घालण्यात तिला आणि दादांना आनंद होता.त्यामुळे दिवाळीचे चारही दिवस घरी लोकांची येणी-जाणी असत.

दादांच्या अकाली जाण्य़ानंतरची दुःखी दिवाळी अशीच मनात घर करुन आहे. आजुबाजुच्या आकाशकंदील आणि पणत्यानी उजळलेल्या घरांमधे आमचे उदास घर आठवले तरी डोळे पाणावतात. कॉलनीमधल्या तमाम घरांमधुन , नातलगांकडून आलेल्या फराळाच्या एकाही पदार्थाला हात लावावासा वाटला नव्हता. एरवी बघता बघता रिकामे होणारे डबे, बघावेसे वाटत नव्हते. सगळा उत्साह,आनंद हिरावून गेलेलं ते घर आणि नकोशा वाटणाऱ्या त्या पोरकेपणाच्या आठवणी!

फिरणाऱ्या रहाट्गाडग्यासारखे सगळे दिवसही सारखे नसतात. त्रासाचे, दैन्याचे आणि दुःखाचे दिवसही सरले कालांतराने.आमची शिक्षणे झाली,चांगल्या नोकऱ्या मिळाल्या. ताईची चिमुकली लेकरे आमच्या घरी येवु लागली.मावशांकडून आपले बालहट्ट पुरवुन घेवु लागली,ते ही दिवस मजेचे होते. आपल्या आई-बाबांनी आणलेल्या कुठल्याही गोष्टींहून मावशीने आणलेल्या चिमुकल्या खेळाचेही त्यांना अधिक कौतुक होते. मागितलेला कुठलाही खाऊ लगेच करुन देणारी आजी होती,आणि हवे तेंव्हा,हवे तिथे न्यायला आमच्याकडे वेळही होता, त्यामुळे त्यांना आमच्या घरी रहायला नेहमीच आवडे. ताईचे घरही आमच्या घराजवळ असल्याने मनात आले कि मुले आमच्या घरी हजर होत.

बघता बघता दिवस मात्र खूपच बदलले. जागतिकीकरण म्हणा,संगणक युग म्हणा किंवा दुसरे काही. आता फारशी आळवणी न करताही लक्ष्मीचा वास वाढला.पैसा हाती खेळू लागला पण त्यासाठी बरेच मोल मोजावे लागले.संपर्काची साधने वाढली.फोन,मोबाईल , इंटरनेट सगळे आले पण संवादाची इच्छा हरवली मग भेटीची आस तर दूरच! आता कोपऱ्याकोपऱ्यावरच्या दुकांनांमधे बारा महिने चिवडा,लाडू,चकली आगदी ओल्या नारळाच्या करंज्या देखील मिळत असल्याने ते खाण्यातली मजा गेली आणि कुठलाही पदार्थ पाहिला कि त्याच्या वास,चव याच्याआधी त्यातील कॅलरीचा हिशेब मांडण्याची खोड लागली. मुलांनाही दिवाळीचे अप्रुप राहिले नाही.मनात आले कि त्यांना हवे तसे कपडे मिळत असल्याने त्याचे विशेष नाही. खाण्याचे तसेच आणि फ्लॅट मधे कुठला किल्ला आणि कसली मातीची चित्रे! दिवाळीला मिळणाऱ्या सलग सुट्ट्यांमधे ट्रिपला जाणाऱ्य़ांची संख्या वाढतीय. त्यामुळे दिवाळीला घरांमधे अंधारच दिसतो. असलेच घरात तरी बहुतेकांची पाडवा , भाऊबीज हॉटेलमधे साजरी होते. नोकरी करणाऱ्या बायकांना घरी एवढ्या लोकांसाठी स्वयंपाक करणे अवघड वाटते कारण इतर पर्याय सहज परवडणारे असतात, शिवाय मुलांनाही चायनीज,इटालियन,मॅक्सिकन फूड आवडते. या सगळ्यात दिवाळी करीता दुकांनामधे विविध स्किम्स असतात, लोक त्या निमित्ताने भरपूर खरे्दी करतात. गाड्या घेतात पण त्यात बसून कुणा नातलगांकडे जावे असे त्यांना वाटत नाही. मिक्सर, फूडप्रोसेसर,मायक्रोवेव्ह ओव्हन घेवुनही एखादा पदार्थ घरी करुन तो कुणाला खायला घालावासा वाटत नाही. कमावत्या बायकोच्या कपड्याने भरलेल्या कपाटाकडे बघून तिला पाडव्याची वेगळी ओवाळणी द्यावी असे नवऱ्याला वाटत नाही.

एकंदरीत भरपूर झगमगाटाने सजलेल्या शहरांमधुन दिवाळीचा खरा आनंद हरवल्यासारखा झालाय. प्रेम, माया, आपुलकी याची किंमत देवून हि बेगडी झगमगती दिवाळी मनाला रुखरुख लावते.याची कारणे शोधण्यात वेळ जातो हाती मात्र काही लगत नाही, बदलत्या काळाला जबाबदार धरले तरी आपलही काही चुकतयं अस वाटत राहत. हि भावना कदाचित माझ्या पिढीपर्यंतच्या लोकांची असेल, या पुढच्या पिढ्यांना हिच दिवाळी खरी वाटणार. ते घरात बसूनच मोबाईल वा लॅपटॉपवरुन सगळ्या फ्रेंडसना दिवाळीच्या विशेस देणार. त्या निमित्ताने पुन्हा मॉलमधून अचाट खरेदी करणार. सुट्टीत कुठल्याशा क्लबचे मेंबर असल्याने हॉलीडे होम्स मधे जाणार आणि तिथे एंजॉय करणार!. त्यांच्या घरी काम करणाऱ्या बायकांना पगाराला पगार बोनस देणार . त्या बायकांच्या घरी कदाचित आमची हरवलेली दिवाळी सापडणार.!


©

Friday, July 8, 2011

खरा तो प्रेमा

नुकतीच एक घडलेली घटना ऐकली. पुण्य़ाजवळील लोणी-काळभोर नामक गावातली.

एक वृध्द जोडपे रहात होते तिथे. त्यांचे पोट पिकले नव्हते.एकमेकांच्या आधाराने चालला होता संसार.लहान गाव असल्यामुळे अजुबाजुचे लोकांची सोबत चांगली होती. चरितार्थासाठी त्यांचं एक टपरीवजा दुकान होतं, चहा-बिस्कीटं, बिड्या-काड्य़ा अशी किरकोळ सामानाची विक्री करीत तेथे.रोज पहाटे आजोबा उठून टपरीवर येत, दरवाजा उघडून देवाच्या तसबिरीपुढे उदबत्ती लावत.समोरचा चौक झाडून पाणी मारुन ठेवत आणि एकीकडे गॅसवर आधण ठेवत.गवळ्य़ाने दूध आणून दिले कि ते तापवुन घेत पाण्य़ात साखर,चहापत्ती टाकुन उ्कळी येईतो, मजूर, रात्रपाळीहून परतणारे कामगार टपरीशी येत, आजोबा त्यांना गरम गरम चहा देतात तो आजी गुडघ्यावर हात ठेवत ठेवत दुकानाशी येत.कपबश्या विसळणे, लागेल तसा चहा गाळणे हि कामे त्या करु लागत. सकाळची गडबड कमी झाली कि आजी पुन्हा घरी जात, दुपारी आजोबा जेवायला घरी जात. चार वाजता परत दुकानात येत.असा त्यांचा गेले कित्येक वर्षाचा दिनक्रम होता. तुकोबांची पालखी टपरीवरुन जायची तेंव्हा आजी आजोबा जमेल तेवढ्या वारकऱ्यांना चहा आणि केळी देत.तुकोबांच्या पालखीचं दर्शन घेत.दोघांच्या कपाळी बुक्का,गळ्यात तुळशीची माळ.

वयाप्रमाणे आजींच्या तब्येतीच्या कुरुबुरी सुरु असत.कधी गुडघे दुखत, कधी खोकला फार दिवस टिके.चालताना हल्ली धापही लागे,दुकानापर्यंत येताना वाटेत दोनदा त्या कुठेतरी टेकत. फार झालंतर जवळचा डॉक्टर गोळ्या देई,क्वचित सुई टोचे.आजोबा मात्र ताठ होते.म्हातारीला ते विश्रांती घ्यायला लावत.तिला बर नसलं तर् आपणच घरी चक्कर टाकुन तिला औषध देवुन येत.

यंदा पालखीचे दिवस जवळ येवु लागले.आजींची तब्येत नरमच होती.माझ्या हातुन यंदा वारकरी चहा पितील का?पालखीचे दर्शन घ्यायला मिळलं का ?असं त्या वारंवार म्हनू लागल्या. आजोबा म्हणत," काळजी कशापायी करतीस? काय बी न्हाई झाल तुला.तुकोबा आनी माऊली हायतं ना, सम्दं झाक हुईल. अन् न्हाई वाटलं तुला बरं तर कुनी तुला शिक्षा करनारे का? जमलं तेव्हढं मी करीन. घरात बसुन नमस्कार केलास तर त्यो बी पोचल ना तुकोबांना.नको तरास करुन् घेऊ त्यानं दुखनं वाढलं "

पालखी आली, आजी विठ्ठ्लाचं नाव घेत, उठत बसत आल्याच.बसल्या बसल्या त्यांनी दोन पातेली चहा उकळला,शेजारच्या शांतीला हाताशी घेवुन वारकऱ्यांना चहा दिला. देवळात पालखीचा मुक्काम असतॊ तिथे पहाटे चारलाच अंघोळ करुन जाऊन दर्शनही घेतल त्यांनी. दोन तीन दिवस तयारीत आणि नंतर सगळं मनासारखं झाल्याच्या समाधानानं आनंदात गेले. आजोबा म्हणाले," बघ, झालं ना संम्द नीट, आता तू पण बरी होशील बघ.चार दिवस दुकानात नको येवू.घरी आराम कर लई धावपळ केलीस" आजी समाधानानं हसल्या."आपल्या मानसांसाठी आनी देवासाठी केलेल्या कामानं कुठं दमायला होतं व्हय.बर वाटतय मला, अन् मी घरी राहिले तर तुम्हाला एकट्याला दुकनात धावपळ किती करावी लागती, येत जाईन मी बसत उठत, घरी तरी काम काय असतय?"
आजींचा उत्साह चार दिवस राहिला.पुन्हा दुखण्यानं मान वर काढली. चालताना थकवा वाटे,थोडं चाललं कि धाप लागायची. डॉक्टरन भारी गोळ्या दिल्या आणि आजोबांना सांगितले आजींना मोठ्या दवाखान्यात घेवुन जा, त्यांच्या छातीचा फोटॊ काढायला हवा, हार्टचं दुखण आहे, खर्च बराच येईल. ससून हॉस्पीटल मधे गेलात तर तुम्हाला परवडेल, मी चिठ्ठी देतो, माझ्या ओळखीचे मोठे डॉक्टर आहेत.त्यांना भेटा.

आजोबांचा चेहरा उतरला इतके दिवस आजींना धीर देणाऱ्या आजोबांचा स्वतःचाच धीर खचला.
"हार्टचं दुखणं लई वंगाळ असतं न्हव? मानुस न्हाई उठतं त्यातुन, पर माझ्या पार्वतीला कशापाई झालं असं?"

"घाबरु नका आजोबा,आता खूप नवे नवे शोध लागलेत, औषधं पण भारी निघालीत आजी बऱ्या होतील, वयाप्रमाणे असे आजार व्हायचे, त्यांच्या घराण्यात असेल कुणाला हा आजार. पण तुम्ही आजिबात काळजी करु नका. पैशाची सोय मात्र करा,औषध-पाण्याला लागतील"
"पैशाची वेवस्था मी करेन ,पण ती बरी व्हाया हवी"

डॉक्टरांशी बोलून आजोबा निघाले.विठोबाच्या देवळाजवळ पोहोचले.रोजच्या लोकांचा घोळका बाहेरच्या पारावर होता, त्यांना हातानेच राम राम करुन ते आत गेले.कटीवर हात ठेवुन विठोबा शांतपणे उभा होता, त्याच्या पायावर आजोबांनी डोकं ठेवलं.
"इठ्ठ्ला,हे काय संकट आनलसं, आमच्या पोटी लेकरु न्हाई दिलस, त्याचं कायबी वाईट वाटून न्हाई घेतलं, भावाच्या लेकरांवर जीव लावला, त्यांना मदत केली. त्यांची काम झाल्यावर त्यांनी पाठी फिरवल्या त्ये बी न्हाई मनावर घेतलं या गावात कष्टाची भाजी भाकरी खाऊन राहतोयं तरं आता हिला हे कुठलं दुखनं लावलस? आता मला बळ दे यातुन तिला वाचवायचं, माज्या जवळचं सगळ घे, वेळ पडली तर् दुकान विकिन पर तिला बर करं"

देवळात बसल्यावर आजोबा थोडे शांत झाले, आजींना आपण आजार किती मोठा हाय ते सांगता उपेगी न्हाई काळजीनं अजुन खंगायची.

’इतका उशीर कशापाई झाला? काय म्हनाला डॉक्टर?’ आल्या आल्या आजींनी विचारल.
’काई इषेश न्हाई, पर ससून मधे जाऊन मोठ्य़ा डॉक्तराला दाखवा म्हनत होता, सारख सारखच व्हाया लागलय ना तुला काय ना काई?"
"मी न्हाई आता कुठे जायची, आता काय राह्यलय माजं, उगी मोठा डाक्तर नि महागडी औषध नका आनु"
" त्ये बघु उद्या आपुन आता जेवायाच बघुया का? मी पिठल भात करु ?"
"आत्ता गं बया, ऐकेल कुनी, तुम्ही अन् कधी पास्न कराया लागला? शेवंतान दिल्यात भाकऱ्या करुन, भाजी आमटी केली मी भात बी झालाय"
"मी केला नसला तरी शिकेन बघ,आता तू आराम कर अगदी, च्या तर करतोच् कि मी रोज, भात आमटी बी करत जाईन"
जेवण झाल्यावर आजोबांनी आजींना झोपायलाच लावले, मागचं सगळ आवरुन त्यांनी भांडीपण घासून टाकली.

पावसानी दोन चार दिवस इतका जोर धरला कि आजोबांना आजींना ससूनला घेवुन जाता येईना, डॉक्टरच्या गोळ्य़ांनी आणि आरामाने आजींची तब्येतही सुधारल्यासारखी झाली,शिवाय त्यांची ससुनला जायची तयारी नव्हतीच.पावसाचा जोर ओसरला. आजोबांनी नेहमी दुकानात येणाऱ्या येशा रिक्शावाल्याला ससूनला घेवुन जाशील का विचारले. येशा म्हणाला,"आजोबा, जाऊया की.परवा चालेल तुम्हाला, उद्या मला जरा उरळीकांचनला जायचय"

"चालल ना, उद्याच्याला मी डॉकटरकडून चिठ्ठी आणतो, पैशे बी काढायला हवेत."
"उद्या संध्याकाळी मी येतो इथे, मग सांगा मला परवा कधी निघायच ते"
आजोबा घरी आले. रात्रीची जेवणं झाली.आजींना ते म्हणाले,"उद्या आपल्या डॉकतरन बोलावलय, तो चिठ्ठी देणारे,आपण परवा ससुनला जाऊ, येशा रिक्षावाला घेवुन जाईल आपल्याला"
"आता कशापाय़ी जायचं? बर वाटेल मला या गोळ्य़ांनी,नका उगी त्रास करुन घेवु. मी न्हाई कुठे जायची"
"अगं , नुसतं जाउन येऊ.लवकर बरी होशील तू"
"पैसा बराच लागतो , माहित हाय मला. माझं ऐका, माजी आता कायबी इच्छा नाही राह्यली अहेवपणी मरण आल तर् बरच आहे"
"तू नको काळजी करु आनि वेड वाकड बोलू नको"
" बरं आता पडा , दमला असाल,सकाळी बघू"

रात्री विचार करता आजोबांचा डॊळा कधी तरी लागला. आजींना गोळ्यांमुळे झोप लागली. रात्रीत केंव्हातरी यमदूताने डाव साधला.झोपेतच त्यांचा जीव गेला. त्यांनी हु कि चू देखील केले नाही.पहाटे आजोबा जागे झाले, आजी शांत झोपल्या होत्या. पहाटेच्या काळोखात त्यांनी सावकाश अन्हिके आवरली.आजींची काहीच हलचाल नाही हे पाहून त्यांच्या मनात पाल चुकचुकली. जवळ जावुन त्यांनी हलकेच त्यांना हाका मरल्या , हलवले...अंग थंड पडलेलं,श्वास थांबला होता.आजोबांना सत्य पचवायला जड गेले.दहा मिनिटे ते त्यांच्या जवळ असहायपणे बसुन राहिले.वस्तुस्थितीची जाणीव त्यांना जशी होत गेली तसे त्यांचे मन एक निर्धार करु लागले, त्यांनी शांतपणे कपाटातुन आजींच जरीच लुगडं काढलं त्यांना नेसवल, कुंकवाचा मळवट भरला.तोंडात तुळशीचे पान ठेवले. स्वतः कपडे करुन घराला कुलूप लावुन बाहेर पडले.
दुकानात आले, नेहमीप्रमाणे चहा केला.लोकांना दिला.आठ वाजताच सगळं आवरुन दुकानाला कुलूप घातले, शेजारच्या सायकल वाल्याने विचारले,"आजोबा, आज लवकर चाललात, आजी बऱ्या आहेत ना?"

" तिच्यासाठीच चाललोय"
आजोबा घरी आले, दरवाजा लावुन घेतला. त्यांनी पुजा केली, आपणही नवे कपडे घातले आणि बायकोच्या शेजारी पंख्याला दोरी बांधुन फास लावुन घेतला.
दहा वाजून गेले, घराचा दरवाजा बंद कसा म्हणून शेजारी जमा झाले, हाका मारु लागले, दुकानाजवळचे लोकही आले, बराच वेळ हाका मारुन कुणी दार उघडत नाही हे पाहुन लोकांनी दार तोडले,आतले दृष्य बघून त्यांचे काय झाले असेल त्याची कल्पनाच केलेली बरी!

आजोबांनी असे का केले असेल यावर खूप विचार केला मी. आपला जीव अशा प्रकारे द्यायला हिम्मत तर हवीच.तिच्यासाठी आपण काही करु शकलो नाही हि अपराधी भावनाही त्यामागे असेल. कुणाचाच आधार नसल्याने आता कुणासाठी मागे रहायचे अशा टोकाच्या निराशेने त्यांना घेरले असेल. पण त्याहून् आजींशिवाय जगण्याची कल्पनाच त्यांना सहन झाली नसेल हि शक्यताच अधिक असावी.आपले प्रेम बोलून आणि चारचौघात त्याचे प्रदर्शन न करणाऱ्या पिढीतले होते आजोबा पण त्यांच्या प्रेमाची जात ज्योतीवर झडप घेऊन प्राण देणाऱ्या पतंगाच्या प्रेमाची होती!


©

Tuesday, July 5, 2011

विश्वास


    फार जुनी गोष्ट आहे. एका गावात दुष्काळ पडला. शेतकरी हवालदिल झाले.नद्या ओढे तर सुकले होतेच विहिरी देखील आट्ल्या. पिके येणार नव्हती पण प्यायला पाणी मिळणेही मुष्कील होवुन बसले. सगळा गाव काळजीत बुडाला. अर्थातच अशा संकटकाळी देवाला साकडे घालण्याशिवाय अन्य मार्गच दिसत नव्हता.एके रात्री गावातल्या पंचांनी सगळ्या गावकऱ्यांची सभा बोलावली. उद्या उगवतीलाच सगळ्यांनी गावाबाहेरच्या माळावर एकत्र यायचे आणि सगळ्यांनी मिळून शंभूमहादेवाला साकडे घालायचे गावातल्या सगळ्यांनी एकत्र प्रार्थना करायची असे ठरले. दुसऱ्या दिवशी उजाडायचा अवकाश गावातल्या गल्ली बोळांमधून लोकांची एकच झुंबड उडाली.लहान मोठी,म्हातारी कोतारी माळरानाच्या दिशेने जात होती.एक सात आठ वर्षांचा मुलगा हातामध्ये त्याच्या उंची एवढी जुनी छ्त्री घेऊन धडपडत धावत चालला होता.माळवर जमलेल्या माणसांपैकी एकानं त्याला विचारल,"अरे, छत्री कशाला आणलीस?"
त्यावर तो उद्गारला,"काका, पाऊस येईल ना, आपण प्रार्थना केल्यावर, माझी आजी लई म्हातारी हायं भिजली तर आजारी पडल्ं तिच्या साठी आणली छत्री"
एवढ्या सगळ्यांनी मिळून देवाला आळवल्यावर पाऊस येणारच हा विश्वास फक्त त्या चिमुकल्या मुलाला होता ! बाकीचे नुसतेच अखेरचा उपाय म्हणून प्रार्थनेला जमले होते.

 विश्वास हि भावनाच सगळ्या मानवजातीच्या सुखशांतीचा पाया आहे.तान्ह्या लेकराला तो फक्त त्याच्या जन्मदात्या आईबद्दलच असतो तिच्या केवळ स्पर्शाने ते शांत होतं.जसंजसं मोठं होईल तशी अजुबाजुची माणसं त्याच्या ओळखीची होतात आणि मग सगळेच त्याला आपले वाटू लागतात. अगदी घरातल्या कुत्र्या -मांजरा पाशी देखील ते तितक्याच विश्वासाने खेळू लागतं. अर्थात प्राण्यांना माणसांची वेगळी पारख असते,ते त्या जीवाला जीव लावतात. मोठ्यांच्या मनातच शंका-कुशंकांचे जाळे असते.
 एका अगदी अनोळखी व्यक्तिबरोबर उभे आयुष्य काढायचे, ते देखील काही मिनिटांच्या दाखवण्याच्या कार्यक्रमानंतर हि आपल्या कडची पिढ्यान् पिढ्या चालत आलेली परंपरा. हजारो लग्ने अशीच होत गेली. त्यातली सगळीच लग्ने अपयशी झालेली नसतात. यामध्ये संस्कार,लोक काय म्हणतील हि भिती यामुळे एकत्र राहणारी जोडपी असतील आजही आहेत, पण प्रेमाने गुण्यागोविंदाने राहणाऱ्यांची संख्या देखील काही कमी नाही. आणि प्रेमविवाह तरी शंभर टक्के यशस्वी होतात असं कुठे आहे? मग या यशस्वी संसारिक जीवनाचे श्रेय कुणाला द्यायचे? कुणी त्याला योग म्हणतात , कुणी लग्नाच्या गाठी स्वर्गात मारल्या जातात असं सांगतात.पण मला वाटतं, त्या एका भेटीत एकमेकांबद्दल जो विश्वास वाटतो तोच पुढच्या सहजीवनाचा पाया ठरतो. मात्र कधी कधी या अपार विश्वासापोटी आपले सर्वस्व देणाऱ्या मुलींच्या पदरी निराशा येते. नवरा व्यसनी असतो,तो मारहाण करतो, लग्नाआधी कर्णाचा अवतार वाटणारा नंतर पै-पैचे हिशेब मागतो किंवा माहेरकडून पैसे आणण्यावरुन छळ करतो.एखाद्या मुलीच्या संसाराच्या सुखस्वप्नांची नवऱ्याच्या विवाहापूर्वीपासूनच्या अनैतिक संबंधामुळे राखरांगोळी होते. काही मुली आपली लग्नापूर्वीची प्रेमप्रकरणे लपवितात कधी घरच्यांच्या दबावाने तर कधी इतर काही कारणांनी. लग्नानंतर इतरांकडून नवऱ्याला ते समजले कि विश्वासाला तडा जातो,मग संसाराची इमारत मुळातूनच हादरायला सुरुवात होते! 
 एखाद्या व्यक्तिला कुठल्याही व्यक्तिबद्दल वाटणारा विश्वास हे त्याच्या निरोगी मनाचे लक्षण असते. उगीचच कुणी कुणाशी वाईट वागत नाही. धर्मराज आणि दुर्योधन दोघांना म्हणे श्रीकृष्णाने गावात पाठविले, धर्मराजाला चार वाईट लोक शोधायला सांगितले तर दुर्योधनाला चार चांगली माणसे घेवुन ये असे सुचविले.दिवसभर हिंडून दोघेही मोकळ्या हाताने आले. धर्मराजाला सगळी प्रजा सदाचारी वाटली कुणीच वाईट नव्हते, तर दुर्योधनाच्या मते सगळे लोक एकजात दुष्ट, कपटी आणि दुराचारी होते.माणसे तीच होती पण बघणाऱ्याची दृष्टी भिन्न असली कि असं होतं. पण निरक्षीर विवेक मात्र असावा लागतो. 
दुसऱ्यांवर नसलेला विश्वास माणसाला संशयी बनवतो,तणावमय जीवन जगायला लावतो.पण सगळ्यात महत्त्वाचा असतो स्वतःवरचा विश्वास ’आत्मविश्वास’.तो असेल तर माणूस जीवनात यशस्वी होतोच. स्वतःवरच विश्वास कमी असेल तर ती व्यक्ती न्यूनगंडाने पछाडलेली.कुणी वाईट म्हणण्यापूर्वी स्वतःच स्वतःला कमी लेखून मागे राहणारी. हि अवस्था वाढली तर ती माणसाला मानसिक आजाराच्या खोल गर्तेतही नेवु शकते.याऊलट काही जणांना स्वतःबद्दल फाजील विश्वास असतो,हि माणसे आपल्याच मोठेपणात मग्न आणि सतत दुसऱ्याला कमी लेखून स्वतःचे मोठेपण सिध्द करत राहतात.ह्या दोन्हिचा मध्य गाठणा्री व्यक्ती आपण आत्मविश्वासाने वागतेच आणि समोरच्यालाही आत्मसन्मानाने वागू देते.

 मागे सिध्द समाधी योग या नावाचा एक कोर्स मी केला होता. त्यामध्ये सहभागी झालेल्यांचे गट पाडले होते, आणि दोन दोन लोकांच्या जोड्या केल्या, जोडीमधील एकाचे डोळे बांधले दुसऱ्याने त्याचा हात धरुन चालायचे होते. एकदाही डोळे उघडून कुठे जातोय ते बघावे असे किती जणांना वाटले? वगैरे प्रश्ण नंतर विचारले.त्याचे तात्पर्य  असे होते  कि आपले आयुष्य हे कुणीतरी आखून पाठवलय, त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवुन रहा बरेच तणाव आपोआप कमी होतील. हे थियरी म्हणून वाचणे जितके सोपे आहे तितके प्रत्यक्षात अमलात आणणे कठीण. आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जग लहान होत चाललय, पण माणसा-माणसांमधे भिंती बांधल्या जात आहेत. आई-वडीलांचा मुलांवर विश्वास नाही, नोकरीत सहकाऱ्यांवर भरवसा नाही. शिक्षणसंस्था, राजकीय व्यवस्था, पोलीस कुणाकुणावर विश्वास ठेवण्य़ाची स्थितीच नाही.त्यामुळे सतत सगळीकडे सतर्कतेने राहताना  ताण वाढतात, मग ताणमुक्ती करता विविध मार्ग शोधत रहायचे. इंटरनेट्वरुन जगभरात संपर्क साधायचे आणि त्याचा गैरफायदा घेणारे आढळले कि फायरवॉल बांधत बसायचे.

 श्रध्दा हि विश्वासाच्या पुढची पायरी! तिच्या पुढे विचार पांगळे ठरतात. परमेश्वरावर खऱ्या भक्ताची असते ती श्रध्दा. कुठल्याही संकटातून बाहेर पडण्यासाठी लागणारं मानसिक बळ श्रध्दाच देवु शकते. सुशिक्षित किंवा फार विचार करणारी माणसं जवळची व्यक्ती आजारी पडली कि हवालदिल होतात , तेच एखादी अडाणी बाई आपल्या आजारी नवऱ्याला किंवा मुलाला डॉक्टरच्या हवाली करते, त्याला म्हणते,’तुझ्या रुपानं देवच भेटला बाबा’ आणि हा देव आपल्या माणसाला नक्की बरं करणार अशी तिला खात्री असते.तिची सकारात्मक प्रवृत्ती तिला तर निश्चिंत बनवतेच पण त्या आजारी माणसालाही बरं करायला उपयोगी ठरते. विश्वास हा ’तो’ आहे तर श्रध्दा हि ’ती’ आहे, त्यामुळे तिच्यात असणारी ’स्त्री शक्ती’ विश्वासाहून मोठीच असते. म्हणूनच विश्वासाचा घात होतो तसा श्रध्देचा होवु शकत नाही.त्यामुळेच कदाचित माणसांवर आपण विश्वास ठेवतो आणि देवावर श्रध्दा.  कवीवर्य ग.दि.माडगूळकरांच्या कवितेते थोडा बदल करुन म्हणता येईल

     सामर्थ्याहुन समर्थ श्रध्दा  अशक्य तिजसी काय
     पडे अहल्या शिळा त्यास्थळी येतील प्रभुचे पाय



©

 

Wednesday, May 25, 2011

थेंब

  संस्कृत भाषा शिकताना काही फार सुंदर सुभाषिते वाचायला मिळाली त्यातलं एक आठवतयं(  संस्कृत शुध्दलेखनाच्या चुकांबद्दल आधीच क्षमा मागते)
   
            चातकस्त्रिचतुरान् पयःकणान् याचते जलधरमं पिपासया
             सोऽपि पूरयति विश्वमंभसा हंत हंत महतां उदारता
 याचा अर्थ असा,
 तहानेने व्याकुळलेला चातक पक्षी मोठ्या आशेने ढगाकडे तीन चार पाण्याच्या थेंबांची याचना करतो, आणि मेघ त्याची तहान भागवण्यासाठी सारे विश्व जलमय करुन टाकतो! काय त्या महान मेघराजाची उदारता!
दातृत्वाची महती  बऱ्याच श्लोकांमधून वाचायला मिळाली पण हा श्लोक फारच आवडला. मागणाऱ्याने सुध्दा कुणाकडे मागावे हे समजते यातून, चातक पक्षाचा जीव तो केवढा! आणि त्याची तहान ती किती, कुठल्याही लहानश्या ओढ्याकडे सुध्दा तो चार थेंब पाणी मागू शकला असता, पण नाही, तो मागतो ते साक्षात जलदालाच, आणि त्यानेही मोठ्या औदार्याने सारी धराच जलमय करुन टाकावी  काय सुंदर कल्पना आहे !.  आपल्याला वाटावे कि आपल्यासाठी पाऊस आलाय मात्र तो येतो तो, त्या चिमुकल्या, त्या नाहीतर त्याच्या सारख्या असंख्य चिमुकल्या जीवांची तहान भागवायला! शिवाय देणाऱ्याजवळ केवढे आहे याची कल्पना असतानाही चातक मागतो तीन चार थेंब, त्याच्या गरजेपुरतेच हे देखील शिकण्यासारखच आहे, त्याला  साठवून ठेवावे किंवा हव्यासाने फार मागावे असं नाही वाटतं. किंवा चार थेंब मागितल्यावर एवढे मिळतयं तर मागतानाच हंडाभर मागितल तर किती मिळेल असे त्रैराशिक तो मांडत नाही. त्याच्या दुबळ्या चोचीत मावेल तेवढेच तो घेतो.


 याच्या अगदी उलट प्रसंग महाभारतात वाचायला मिळतो. आपला लाडका एकुलता एक पुत्र केवळ दारिद्र्यामुळे दुधाच्य़ा एक थेंबालाही मोताद झालेला द्रोणाचार्यांनी बघीतले. आपली बुध्दिमत्ता,शौर्य, धनुर्विद्येतील असामान्यत्व कशाकशाचा ते दारीद्र्य दूर करायला उपयोग होवु नये याच त्याच्यामधील पित्याला केवढं दुःख झाल असेल! आणि तो महापराक्रमी माणूस आपल्या मुलासाठी स्वतःच्या मित्राकडे , पांचाल राज्याच्या  द्रुपद राजाकडे गाय मागायला गेला.  द्रुपद  राजाने या गरीब  ब्राह्मणाला साधी ओळखही दाखवली नाही, उलट शिपायांकडून त्याला हकलून लावले. दारीद्र्यामुळे आलेली असहायता आणि त्यामुळेच मित्राकडून झालेल्या अपमानाने तो मानी ब्राह्मण संतापाने पेटून उठला. मग द्रोणाचार्य हस्तिनापुरात गेले, तेथे भिष्माचार्यांनी त्यांना आपल्या नातवंडांना धनुर्विद्या शिकविण्य़ाकरीता ठेवून घेतले. असे म्हणतात तो पर्यंत ब्राह्मणाने नोकरी करणे धर्मसंमत नव्हते.ब्राह्मणाने आपली विद्या विकणे हा अधर्म होता. मात्र द्रोणाचार्यांनी कुरुराज भिष्माचार्यांची नोकरी केली, आपला लाडका शिष्य अर्जुनाला त्यांनी धनुर्धर म्हणून घडविले,पुढे राजा द्रुपदाचा त्याच्या कडून पराभव करुन त्याला स्वतःच्या पायाशी कैद करुनही यायला लावले अशा तऱ्हेने आपल्या झालेल्या अपमानाचा बदला देखील घेतला. ब्राह्मणाच्या क्षमाशील प्रवृत्तीचाही त्याग त्यांनी केलेला दिसतो.  बाळशास्त्री हरदासांच्या महाभारतावरील व्याख्याने या पुस्तकात त्यांनी म्हटले होते, इथूनच महाभारताला, त्यातल्या ऱ्हासाला सुरुवात होते. मग ब्राह्मणांनी कायम दैन्यातच रहावे का? वगैरेच्या वादात आपल्याला पडायचेच नाही. या गोष्टीतुन आपल्याला इतकेच समजते, दुधाचा एक थेंब केवढे महाभारत घडवू शकतो!


 रवींद्रनाथांची एक कथा आहे, त्यातला नायक म्हणतो , "मी रस्त्यावरुन दीनवाण्या्गत  हातात झोळी घेवुन निघालो होतो ,इतक्यात समोरुन तुझा समर्थ रथ आला, तुझ्या तेजस्वी मुद्रेने मी दिपून गेलो, तुझ्यासमोर मी झोळी पसरणार तेवढ्यात तूच माझ्यापुढे हात पसरलेस, माझ्या झोळीतला लहानात लहान थेंबाएवढा दाणा मी तुला देवु केला, क्षणार्धात तू अदृष्य झालास. मी पाय ओढीत घरी आलो, झोळी रीकामी करताना मला दिसलं, त्या थेंबाएवढाच एक कण सोन्याचा झाला होता! मी धाय़ मोकलून रडलो, मी तुला माझे सर्वस्व दिले असते तर माझे अवघे जीवन सोन्याने उजळून गेले असते ! "
आपण जीवनात केलेल्या सत्कृत्यांचे सोने होते असे  सांगणारी हि अप्रतिम रुपक कथा!


©

Saturday, April 30, 2011

भूमिका

अभिनयातली ’भूमिका’ सोडून, भूमिका म्हटल्यावर मनात आलेल्या विचारांतून प्रकट होणारी माझी हि भूमिका........

"तू आई झालीस कि समजेल" ,दरवेळेस भरपूर मार दिल्यानंतर थोड्य़ावेळाने शांत (ती आणि रडून रडून आम्ही) झाल्यावर जवळ घेवुन आई स्वतः रडत बसे तेंव्हा आम्ही आईला विचारत असू " आमचं चुकलं म्हणून मारलसं ना, आता कशाला रडत आहेस?" त्यावेळी तिचं हे ठरलेलं उत्तर असे.मुलगी असल्याने आई होणे हि बाब भविष्यात सत्यात उतरण्य़ाची शक्यता होती,पण आम्हाला भाऊ असता तरी त्याला आईने असेच बडवले असते आणि नंतर तेच सुनावले असते आणि त्याला कधीच समजले नसते असे आम्हांला त्यावेळी नेहमी वाटे. आता कळते, तिला माझ्या भूमिकेतून बघा म्हणजे कळेल असे म्हणायचे असे, हे सारे कळण्य़ाचे ते वय नव्हते.
मात्र पुढील वयात नेहमीच असे प्रसंग येत गेले, आपल्या सगळ्य़ांच्या आयुष्यात कायमच आपल्याला वादविवादाच्या वेळी म्हणण्याची सवय असते ,"तुला बोलायला काय होतयं , माझ्या जागी तू असतास म्हणजे कळलं असतं" समोरच्याची बोलती बंद होते या वाक्याने, किमान तो विचारात पडल्यासारखा तरी होतो या वाक्या नंतर. दुसऱ्याच्या भूमिकेतून विचार करणे हे परकाया प्रवेश केल्यासारखे आहे.

लहान मुले अनुकरण करतात असे आपण म्हणतो, पण खरं तर ती खेळताना दुसऱ्याच्या भूमिकेत फार चटकन जातात ,भातुकली खेळणाऱ्या मुली मोठ्या बायकांची वाक्ये,त्यांच्या हलचाली काय हुबेहुब वठवतात !. अतिशय तन्मयतेने खेळणारी मुले बघताना आपलीही तहान भूक हरपते.मात्र आपण त्यांच्या नकळत त्यांना बघायला हवं. उपजत कुशल अभिनेते असणाऱ्या या चिमुकल्यांपैकी काहींना हल्ली जरा समजू लागताच सुट्टीमध्ये अभिनयाच्या वर्गांना जावे लागते !

’अंगात येणे’ हा प्रकार मी बरेच दिवसात पाहिला ऐकला नाही.लहानपणी बऱ्याच वेळा सार्वजनिक गणपतीच्या आरतीच्या वेळी एखादी बाई अचानक घुमू लागायची. तिच्या अंगात देवी आली अशी कुजबुज सुरु होई. अगदी चार चौघींसारखी दिसणारी ती बाई निराळीच दिसू लागे. आजुबाजूच्या लोकांमध्ये धावपळ सुरू होई. मग तिचे कपाळ लाल मळवटाने भरले जाई, तिची ओटी भरायला बायकांची लगबग उडे. तिच्या पायावर डोके ठेवण्यासाठी लहान मोठ्यांची झुंबड उडे.तिच्या कडून कुंकू घेवुन ते लावण्यात विवाहित बायकांची घाई असे. मला मात्र या सगळ्या प्रकाराची विलक्षण भिती वाटे. इतका वेळ आपल्यासारख्याच असणाऱ्या या बाईमध्ये देवी आली कशी असे कुतूहल वाटे ते वेगळेच. पुढे मोठेपणी मानसशास्त्रांच्या पुस्तकांमधून हा एक मानसिक आजाराचा प्रकार असल्याचे समजले आणि मग त्याबद्दलच्या इतर तशा अनेक उदाहरणादाखल दिलेल्या केसेस वाचताना त्याबद्दल खात्री पटली पण तरीही त्या बायकांचे अभिनय कौशल्य म्हणा किंवा त्यांच्यातील देवीच्या संचाराचे सादरीकरण कमालीचे असे यात वादच नाही. देवीच्या भूमिकेत जावुन कुणी गरीब (स्वभावाने) सासुरवाशीण सासुकडून सेवाकरुन घेइ. कुणी नवऱ्याला पायावर नाक घासायला लावी तर कुणी खणानारळाच्या वसुल्या पदरात पाडून घेई !.

अगदी मेणाहून मऊ असलेली बाई (किंबहुना कुठलीही बाई) सासूच्या भूमिकेत गेली कि कशी बदलते याची उदाहरणे आपण वाचतो,बघतो.वास्तविक हा दोष कुणा व्यक्तिचा नसून त्या नात्याचाच असावा. सुधीर मोघे म्हणतात ना, ’बायको फार चांगली जेंव्हा ती मैत्रीण असते आणि मैत्रीण फारच चांगली कारण ती बायको नसते’ काही नातीच अशी असतात कि त्यांच्याकडून वेगळ्या अपेक्षा ठेवताच येत नाहीत. जावयाच नातं देखील असच काहीस. आता काळ बदलत चाललाय या नात्यामधले संबंधही त्यामुळे बदलत आहेत.(कदाचित आजकाल नवरा बायकोंमधलं नातच फारस टिकावू न राहिल्याने बाकीच्या नात्याबद्दल फारसा विचार करण्याची जरुर नसावी)

रामायणातील एक गोष्ट आठवते, रावणाला सीतेला वश करण्य़ात यश मिळत नव्हते. त्याला तिच्यावर बळजबरी कराय़ची नव्हती,नाना तऱ्हेची अमिषे दाखवूनही ती साध्वी त्याला वाऱ्यालाही उभे करत नव्हती. रावणासारखा पराक्रमी राजा असा हतबल झालेला बघून त्याला त्याच्या मंत्र्याने सुचविले,"महाराज तुम्ही मायावी रुपे सहज घेवू शकता, मग रामाचे रुप घेवून का जात नाही? म्हणजे तिला समजणारही नाही"
यावर रावण म्हणाला ,"हे मी केले नसेल असे तुला वाटलेच कसे? मी रामाचे मायावी रुप धारण केले, त्याक्षणी मला वाटले, ही दुसऱ्याची पत्नी आहे, तिच्य़ाबद्दल अभिलाषा बाळगणे हे पाप आहे आणि मग पुढे जायचा विचारही आला नाही ... त्यामुळेच तर ही बाकीची धडपड..." रामचंद्रांच्या एकपत्नीव्रताचे त्याच्या शत्रूकडून ऐकलेले हे थोरपण त्यांना एका वेगळ्याच उंचीवर नेवुन ठेवते.शिवाय वाल्मिकींच्या प्रतिभेचे मोठेपण जाणवते ते वेगळेच. त्याच वेळी स्वतःला परमेश्वराचे अवतार म्हणवणाऱ्या तथाकथित बाबा -साधू महाराजांच्या वागणुकीतील विसंगती ठळकपणे जाणवते.


©