Friday, July 23, 2010

गावाकडच्या गोष्टी..

(माझ्या आईचे माहेरचे कुटुंब मोठे , तशी जुन्या काळातील सगळीच कुटुंबे मोठीच असत, एकत्र राहत असल्याने त्यांच्यात संबंध असत, भांडणे, भाऊबंधक्याही असत.तसेच माया, प्रेमही असे. माझ्या आईकडून तिच्या घराण्यातील सगळ्या काका-आत्यांच्या, मामा मावशांच्या कथा मी वारंवार ऎकलेल्या आहेत.
सध्या आई आजारी असते, कंपवाताने ती घराबाहेरही पडू शकत नाही.रेडीओखेरीज दुसरी करमणुक तिला नसते, तिच्याशी बोलताना आजार सोडून बोलणे कठीण असते, मग परवा मी पुन्हा तिला तिच्या बालपणात नेऊन त्या आठवणींमध्ये तिला रमवण्याचा प्रयत्न केला त्यातुन तिचा वेळ चांगला गेलाच पण मला देखील काही गोष्टी नव्यानेच समजल्या.तिने सांगितलेल्या काही घटना या तिलाही केवळ ऎकुनच माहित आहेत, आता तिच्या घराण्यातली सगळ्यात मोठी अशी तिच शिल्लक आहे, बाकिची मंडळी तिच्याहून लहानच असल्याने या गोष्टी केवळ गोष्टी म्हणूनच राहतील. गोदुची कथा त्या पैकीच एक. या गोष्टी ऎकताना मला पडलेल्या प्रश्णांची उत्तरे तिला तर नाहीच माहित पण ती कुणालाच माहित असणार नाहीत. तिने सांगितलेल्या गोष्टीमंधले कच्चे दुवे कल्पनेने जोडण्याचा माझा प्रयत्न आहे.
अशा कथानकांवर खर तर चांगल्या मालिकाही बनू शकतील, पण सध्या तरी त्या ब्लॉगवाचकांपर्यंत पोचाव्यात या साठी हा लेखन प्रपंच.....)




पुरोहितींकडच्या लग्नाला माई गेल्या होत्या. थोरामोठ्यांच्या तोलाचे कार्य होते. त्यामध्ये एक त्यामानाने साध्या पातळात लगबगीने वावरणारी मुलगी माईंच्या तीक्ष्ण नजरेने हेरली. मुलगी खरोखरीच नक्षत्रासारखी होती. माईंचा काशीनाथ नुकताच एम.एस्सी. परीक्षा पहिल्या वर्गात पास झाला होता. त्याच्यासाठी मुली सांगून येत होत्या.कुणाची पत्रिका जुळायची नाही, तर कुठे मुलगी पसंत पडायची नाही. पहिली सून घराला योग्य मिळाली कि पुढचे सारे सुरळित होईल अशी माईंची धारणा होती.

माईंजवळ येवून दोघी-तिघींनी आपल्या मुली, नाहीतर भाच्या,पुतण्य़ांची गुणवर्णने ऐकवली. एक दोघींनी पत्रिकाही दिल्या. पण मघाची मुलगी माईंनी मनातल्या मनात काशीनाथ साठी पसंतच केली होती जणू, इतरांच्या बोलण्याकडे त्यांचे फारसे लक्षच नव्हते. पुरोहितांच्या मालू बरोबर ती हळदी-कुंकू देत होती.मालूला त्या म्हणाल्या ,’अगं हळद-कुंकू लावून झाल्यावर ये गं, तुझ्याशी बोलायचयं’.मालू अर्ध्या तासात माईंजवळ आली.
’काय माई, काय काम काढलसं?’
’तुझ्या बरोबर अत्तर लावणारी मुलगी कोण गं?’
’ती वसुधा, आमच्या भालूमामाची धाकटी मुलगी.’
’काय करते? कुठे असते?’
’ती मधू मामांकडे असते मुंबईला, मामा वारले ना तेंव्हापासून. कॉलेजला जाते, इंटरला आहे शिवाय नोकरी पण करते’
माईंनी पुरोहित वहिनींकडून वसुधाची पत्रिका मागवली, पत्रिका नव्हतीच त्यांच्याकडे, वसुधा दोन वर्षाची असताना तिची आई गेली होती.भालूमामांनी दुसरे लग्न केले नव्हते. वसुधाची मॅट्रीकची परीक्षा झाली आणि भालूमामा अचानक वारले.हृदय-विकाराचा झटका असणार, त्या वेळी रोगाचे नाव माहित नव्हते. वसुधाला तिच्या काकांनी मुंबईला नेले. मुलगी हुशार होती,गुणी होती.मात्र तिला आई-वडील नव्हते. पहिल्या लेकाच्या लग्नात हौसमौज करुन देणारे व्याही नसणार एवढी एक गोष्ट सोडली तर मुलीत नावं ठेवायला जागा नव्हती. माईंनी पुरोहितींकडे निरोप पाठवून वसुधाला घरी बोलावून घेतले. त्या आपल्या यजमानांजवळ आणि काशीनाथजवळ मुलीबद्दल बोलल्या होत्या. त्यांच्या यजमानांचा काचकामाचा व्यवसाय होता, व्यवसायाचा व्याप ते एकटेच बघत असल्याने प्रपंचाची सगळी जबाबदारी माईंवर होती आणि माईंच्या कर्तबगारीवर त्यांचा पूर्ण विश्र्वास होता.घरातले लहानमोठे निर्णय माई घेत त्यात ते ढवळाढवळ करीत नसत.

वसुधाला घेवून पुरोहित वहिनी आल्या.दाखविण्य़ाचा कार्यक्रम झाला. पाहुण्यांशी चार शब्द बोलून माईंचे यजमान नाना, कामासाठी बाहेर पडले. काशीनाथने तिला चार प्रश्ण विचारले. काशीनाथला मुलगी पसंत असावी असे माईंना वाटले.एक-दोन दिवसांनी त्याला त्यांनी विचारले.
"आई, मला अजून पुढे शिकायचे आहे, इतक्यात लग्नाचं तू काय डोक्यात घेतलसं?"
"तू आता नोकरीला लागलास.वडीलांच्या धंद्यात लक्ष घालायच नाही म्हणालास, कशाला आम्ही अडकाठी केली नाही, एवढा एम.एस्सी.झालास, अजून किती शिकायच? आणि संसार कधी करायचा?,तुझ्याबरोबरची मुले लग्न करुन संसाराला लगली, अरे इतकी चांगली,शिकलेली मुलगी आहे. नको जास्त विचार करुस.आणि शिकायच तर नंतरही येईल शिकता. तुझ्या मनातलं मी ओळखलय, आवडलीय ना तुलाही वसुधा ! कळवून टाकते तिकडे मी. लवकारात लवकरचा मुहूर्त बघुया"
माईंनी काशीनाथचा होकार गृहित धरुन पुढल्या तयारीला सुरुवात केली.नानांनाही मुलगी पसंत होती.बाकी देण्याघेण्य़ाला त्य़ांचा पहिल्यापासून विरोध होता. माईंना वसुधा विषयी आपुलकी वाटायच एक कारण म्हणजे त्यांची गोष्ट तिच्यासारखीच होती. त्यांच्यातर जन्मानंतर का्ही तासात त्यांची आई गेली. मामीनेच त्यांना वाढविले. त्यांचे वडील त्यांना आजोळी भेटायला येत, पण त्या लहानपणी वडीलांबरोबर न गेल्या्ने त्यांना ते घर परकेच राहीले,आजॊळीच त्या वाढल्या, पुढे त्यांच्या वडीलांचे दुसरे लग्न झाले,मग त्यांचे येणे कमी झाले. माईंच्या लग्नाच्या आधी दोन वर्षे त्यांचे वडीलही गेले. त्यांच्या मामानेच त्यांचे कन्यादान केले.नाना लग्नाच्या वेळी नोकरी करीत होते, पण त्यांचा स्वभाव धडपडा होता, त्यांनी स्वतःच्या हिमतीवर काचेचा कारखाना काढला व अतिशय मेहनतीने तो नावारुपाला आणला.अर्थात माईंच्या समर्थ साथीशिवाय हे शक्य झाले नसते.माईंनी घरातल्या सगळ्या गोष्टींची सर्व जबा्बदारी घेतलीच, शिवाय धंद्यातल्या चढ उतारांशी सामना करताना नानांना संपूर्ण साथ दिली. सुरुवातीच्या अडचणीच्या काळात त्या काटकसरीने रहात होत्या, धंद्यात बरकत आल्यावरही त्या मातल्या नाहीत, घरातली सर्व कामे त्या स्वतः करत. एकवर्षी दिवाळीत कुठलीशी मोठी ऑर्डर रद्द झाल्याने कारखान्याचे बरेच नुकसान झाले होते. दिवाळीत बोनस मिळणार नाही अशी बातमी पसरल्याने कारखान्यात वातावरण तापले होते.नानांची अस्वस्थता माईंना जाणवली,आपले दागिने त्यांनी नानांपुढे आणून दिले. आणि म्हणाल्या
’ हे माझे दागिने घ्या आणि लोकांच्या बोनसची व्यवस्था करा’ त्यांच्या माहेरहून आलेले आणि नानांनी हौशीने केलेले सगळे दागिने त्यात होते
’अगं , नको, तुझं स्त्री-धन आहे ते, मला ते घ्यायचा आधिकार नाही’
’वेळेला उपयोगी यावेत म्हणून तर असतं ना ते ! दागिने काय परत करता येतील. आज कामगारांना बोनस मिळाला कि ते जोमाने कामाला लागतील, नुकसान भरपाई झाली की त्यांचे संसारही मार्गी लागतील आज तुमच्या कारखान्यावर कित्येकांचे संसार चाललेत , त्यांचे शाप घेवून मला हे दागिने काय सुखं देणार?’
पत्नीच्या मनाच्या मोठेपणानं नाना भारावून गेले.त्यामुळेच तिच्यावरचा त्यांचा विश्वास अधिकाधिक दृढ होत गेला.

काशीनाथचे लग्न थाटात झाले. वसुधाला माईंनी घरच्या रितभाती शिकवायला सुरुवात केली.त्यांचे कुटुंब मोठे होते.आला गेला सतत असे.त्या काळी सधन लोकांकडे शिक्षणासाठी मुले असत, वारावर जेवणारे विद्यार्थी असत.कुणी गावाकड्ची निराधार म्हातारी,एखादा लांबचा अपंग नातलग यांना ठेवून घ्यायची पध्दत होती. ’सामाजिक बांधिलकी’ हा शब्द न वापरता लोक ती मानित. पैसा जास्त असला तरी त्यांचे रहाणीमान सर्वसामान्यांप्रमाणेच असे.फक्त शिक्षणासाठी त्यांच्या मुलांना त्रास पडत नसे, आणि त्यांच्या बायकांच्या अंगावर जरा जास्त दागिने असत.वसुधा सासरी चांगलीच रुळली.काशीनाथसारखा हुशार,देखणा नवरा आणि माई-नानांसारखे प्रेमळ सासुसासरे.गोकुळासारख नांदत घर, सुख -सुख म्हणजे अजून दुसरं काय असत? तिच्या मुळच्या सुंदर रुपाला आणखीच झळाळी आली.

वसुधाचे बाळंतपण माईंनी सासरीच करायचे ठरविले.तिचे डॊहाळजेवण थाटात केले.वसुधाला मुलगा झाला.मुलगा तीन महिन्यांचा झाला.शंतनू असे त्याचे नाव ठेवले. काशीनाथने अचानक अमेरीकेला उच्च शिक्षणाला जाण्याचा निर्णय जाहीर केला.त्या दृष्टीने गेले काही महिने त्याचे प्रयत्न चालू होतेच.मात्र घरात त्याने कुणालाच काही सांगितले नव्हते, अगदी वसुधालादेखील.ऐकल्यावर वसुधा जरा खट्टू झाली, नाही म्हटले तरी तिला न सांगता हा निर्णय त्याने घेतला याचे तिला दुःख झाले.आपण काही इतक्या अडाणी नाही, शिवाय त्यांच्या प्रगतीच्या आड येण्य़ाचा कोतेपणाही आपण केला नसता, मग आपल्याला एका शब्दाने सांगावेसे का नाही वाटले यांना? माईंना सांगितल्याशिवाय नाना कुठलीच गोष्ट करीत नाहित.
रात्री काशीनाथ बाळंतीणीच्या खोलीत आला. पाळ्ण्यात पहुडलेल्या शंतनुला खेळवताना त्याचे लक्ष वसुकडे होते.ती मुद्दाम पाठ करुन झोपली होती.
बाजेच्या कडेशी बसत तो हलक्या आवाजात म्ह्णाला ," आमच्याशी बोलायचं देखील नाही का?"
"बोलण्यासारखं काही आहे का?" वळत वसुधा म्हणाली
रडून रडून तिच्या नाकाचा शेंडा लालबुंद झाला होता.
"अगं मी कुठे रणांगणावर चाललो नाही, शिकायला जातोय अमेरीकेला, इतकं रडायला काय झालं? "
"त्यासाठी नाही मी रडत, एवढी मोठी बाब, तुम्ही मला एका शब्दानं सांगितली नाही त्याच वाईट वाटतयं,"
"एवढचं ना, अगं लग्नाच्या आधीपासून मला तिकडे शिकायला जायचे मनात होते, सहा महिन्यांपूर्वी माझा मित्र तिकडे गेला त्याच्याशी पत्रव्यवहार करुन तिकडच्या विद्यापिठांशी संपर्क साधला,शिष्यवृत्ती मिळाली तरच जायचे असे ठरवले होते.तिकडून उत्तर यायला दोन तीन महिने गेले, तेंव्हा तू नुकतीच बाळंतीण झाली होतीस त्या आधी तुझी प्रकृती नाजूक होती म्हणून मुद्दाम नाही सांगितलं. हे पत्र आल्याबरोबर लगेच सांगितलच ना. समजल आता का नाही सांगितलं की अजून आहेच राग? तुम्हा दोघांना सोडून जायचं जिवावरही आलयं काय करू, एवढी चांगली संधी परत मिळेलच असं नाही"
"आम्हालाही न्या मग तुमच्या बरोबर" राग विसरुन वसुधा निरागसतेने म्हणाली
"नेल असतच गं, पण सध्या मला मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत तिघांच कसं भागणार? आता आपल्या खर्चासाठी नानांजवळ पैसे मागण.."
" नको, नको, अहो मी गमतीने म्हणाले,तुम्ही अगदी निर्धास्त पणे जा, आणि लवकर शिकून परत या, आम्ही तुमची वाट बघू, , आपल्या शंतनुचा पायगुण बर हा "

पन्नास-साठ वर्षांपूर्वी अमेरिकेत शिकायला जाणं आजच्या इतक सहज नव्हतं, फार थोड्य़ा संधी होत्या आणि फार कमी लोक जात.संपर्क माध्यमं कमी असल्याने इतक्या दूर जाणे त्रासदायक वाटे. काशीनाथच्या जाण्याची तयारी झाली.त्याला निरोप द्यायला मुंबईला घरचे सगळे गेले.
काशीनाथचे पहिले पत्र आले.तिकडचे वर्णन वाचून सगळे अचंबित झाले.आल्यागेल्याला माई कौतुकाने काशीनाथच्या पत्राबद्दल सांगत.वसुधाही त्याला पत्रे लिहू लागली.पत्र मिळायला महिना -पंधरा दिवस लागत.काशीनाथचे पत्र आले कि त्याच्या पत्राची पारायणे करताना रात्री निघून जात. एरवी सगळा वेळ शंतनुच्या संगोपनात आणि घरकामात पटकन जाई.म्हणता -म्हणता दोन वर्षे जातील वसुधा रोज मनाला सांगे.

सुरुवातीला नियमित पणे येणारी काशीनाथची पत्रे उशीरा येवू लागली.वसुधाच्या दोन-तीन पत्रांनंतर त्याचे एखादे पत्र.ते ही त्रोटक. आता परीक्षा जवळ आली असेल, अभ्यासाचा ताण असेल, नसेल होत वेळ लिहायला. वसु मनाशी म्हणे.शंतनू चालायला लागला.त्याचा वर्षाचा वाढदिवस झाला.त्याचा स्टुडीयोत फोटो काढून त्याच्या बाबांना वसूने पाठविला. आता तो बोलू लागला, त्याच्या बोबड्या बोलांने घरादाराला बोबडे केले.दिवसा मागून दिवस, महिने जात होते. दोन वर्षे उलटून गेली.काशीनाथची पत्रे अगदी क्वचित येत, त्यात परत येण्याची भाषा नसे.पत्रातला सूरही किंचित परका,दूरचा वाटे. वाट बघण्य़ाशिवाय कुणाच्याच हातात काही नव्हते.

माईंच्या घरात बाकीची मुलेही मोठी होत होती, त्यांची शिक्षणे चालू होती.आता दुसऱ्या रघुनथचे लग्न ठरले. वसू लग्नाच्या तयारीत बुडली.शंतनू तीन वर्षाचा झाला.कशीनाथच्या येण्य़ाचे चिन्ह नव्हते.त्याच्या काळजीने,विरहाने वसू खंगत होती.तिचे दुःख माईंना जाणवत होते. त्या काही करु शकत नव्हत्या. उपास-तापास,नवस सगळं चालल होतं, बाहेरुन आनंदी चेहऱ्याच्या माई वसूला धीर द्यायच्या पण मनातून त्याही नाराज असत. दुसरी सून आली. माईच्या लेकीचेही लग्न झाले.नानांचे वय होत चालले. तरुण वयात अपार कष्ट केल्याने आता थकल्यासारखे होई, नाही म्हटले तरी त्यांनाही काशीनाथच्या न येण्य़ाची काळजी होतीच.

वसूने नोकरी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईला नानांच्या भाड्याची जागा होती.तिथे त्यांची विधवा बहीण तिच्या मुलीबरोबर रहात असे.मुलगी सासरी गेली होती आणि ती बहीण म्हातारपणामुळे माईंकडे येवुन राहिल्याने ती जागा कुलूप लावून ठेवली होती.वसूने तिकडे जायचे ठरविले. तिला सुदैवाने शाळॆत नोकरी मिळाली. शंतनुला शाळेत घातले.माई नाहीतर तिची नणंद अधूनमधून जात. तिला मुंबईला पाठविणे माईंच्या अगदी जिवावर आले होते. पण तिचे म्हणणेही त्यांना पटले, "दीरांच्या वाढत्या संसारात पुढे मागे वाद होण्यापूर्वीच मार्ग काढलेला बरा. आपले हातपाय धड आस्ताना, आपल्या जवळ शिक्षण असताना दुसऱ्याच्या आभार-उपकारावर किती दिवस जगायचे? वेळेला मदत मागणे वेगळे आणि सतत अवलंबून राहणे वेगळॆ! शंतनुला समजायच्या आत मी पायावर उभी राहते, तुमच्या आधारची गरज आहेच, पण उद्या तुमच्या म्हातारपणाला मला तुम्हाला आधार देण्यासाठी मला बळकट व्हायला हवे" असे वसू त्यांना म्हणाली होती.काशीनाथचे न येणे तिने आता मनाने स्विकारले होते.

मधल्या काळात माईंचा दूरचा पुतण्य़ा अमेरिकेला कामासाठी जाणार असल्याचे नानांना समजले, त्यांनी त्याला काशीनाथची चौकशी करण्य़ाची विनंती केली.त्याने काशीनाथचा पत्ता शोधून काढला.त्याला भेटला. काशीनाथने तिकडच्याच मुलीशी लग्न केले होते, राजवाड्यासारख्या घरात तो रहात होता.विद्यापिठात तो प्रोफेसर होता. बंगला, गाडी असे वैभव होते. त्याच्या बायकोसमोर काशीनाथला तो काही विचारु शकला नव्हता.

ही सगळी बातमी समजल्यावर माईंच्या घरावर दुखाःचे सावट आले.वसूलाही हि बातमी कुणाकडून तरी समजली.दुःख करण्याच्या पलीकडे तिची अवस्था झाली.आता शंतनूकडे बघून सगळा राग,दुःख गिळायला हवे होते.शंतनू मोठा होत होता. वसूने नोकरी सांभाळून बी.ए, एम.ए. च्या परीक्षा दिल्या. माईंनी शंतनूची मूंज करायचे ठरविले, त्यांनी वसूला पुण्याला बोलावून घेतले. मुंजीची सगळी तयारी केली होती. मातृभोजनाची वेळ झाली. वसूला सुंदर साडी आणि साखळी देत माई म्हणाल्या,"वसू ही साडी नेसून मातृभोजनाला बैस"
वसूला हुंदकाच आला.
"डॊळे पूस वसू, माझा मुलगा करंटा, एवढी गुणी,सुंदर बायकॊ , मुलगा सोडून गेला, तुझी त्यात काय चूक? आजचा मान तुझाच आहे.मी तुझ्या सदैव पाठीशी आहे, मुलगा शिकून मोठा होईल, तुझे पांग फेडेल माझा तुला कायम आशीर्वाद आहे"

काळ कुणासाठी थांबत नसतो, नाना गेले.कारखाना आता रघुनाथ बघत होता. माई बहुतेकवेळा वसू कडेच असत. त्याही थकल्या होत्या.आजारी पड्ल्या. शेवटच्या आजारात त्या वसूजवळाच होत्या, तिने त्यांची सेवा केली.
"मी गेल्याचे काशिनाथला कळवू नका,त्याने मला तिलांजली देखील द्यायला नको. मी त्याला कधीही माफ करणार नाही" माईंचे हे अखेरचे शब्द होते.


वसूताई आता शाळेच्या मुख्याध्यापिका झाल्या होत्या. शंतनू अतिशय बुध्दिमान होता. एस.एस.सी परीक्षेत तो बोर्डात आठवा आला. त्याला मेडीकलला प्रवेश मिळाला.आता तो एम.बी.बी.एस.ची परीक्षा होवुन एम.एस. ही उत्तम रित्या उत्तीर्ण झाला होता.घरात नुकताच टेलीफोन घेतला होता.शंतनुला वेळी-अवेळी कॉल आला कि जावे लागे, त्याला उशीर झाला कि वसूताई काळाजी करीत, म्हणून त्याने नोकरी लागल्याबरोबर आधी टेलीफोन घेतला.

रविवारची संध्याकाळ, शंतनू बाहेर पडायच्या तयारीत होता.त्याचे लग्न ठरले होते, वर्गातल्याच मुलीशी त्याचे जमले होते.आज बरेच दिवसांनी दोघांना मोकळा रविवार मिळाला होता. फोनची बेल वाजली वसूताई देवापाशी दिवा लावत होत्या. निघता निघता शंतनूने फोन घेतला.
"हॅलो, मी रघुनाथ बोलतोय पुण्याहून "
"बोला काका"
"अरे शंतनू आई आहे का?"
" ती देवापाशी दिवा लावतीय काही निरोप आहे का? "
" अरे काशीनाथदादा, तुझे बाबा , येतोय इकडे, पंचवीस वर्षांनी त्याने सगळ्यांना एकत्र बोलावलय, पुढल्या रविवारी,म्हणून फोन केला होता"
"काका , तुम्ही भेटा त्यांना आम्ही येणार नाही.मी तर नक्कीच नाही आणि आईसुध्दा नाही येणार, इतकी वर्ष आम्ही राहिलोच ना त्यांच्या शिवाय आता त्यांना भेटायची अजिबात इच्छा नाही, ठेवू फोन?"
"अरे शंतनू, तुझा राग मी समजू शकतो पण वहिनींची इच्छा असेल तर.. "
"तिची पण नाही इच्छा..थेवतो फोन मी"
शंतनूने रागानेच फोन ठेवला. वसूताई बाहेर आल्या.त्यांनी आतून शंतनूचे बोलणे ऐकले होते
"आई काकांचा फोन होता, काशीनाथ येणार असे ते म्हणत होते आपल्याला भेटायला बोलावले होते तुझ्यावतीनेही मी त्यांना येणार नाही म्हणून कळविले आहे."
"असा नावाने उच्चार करु नये वडील आहेत ते तुझे"
"आई , मी त्यांना बघितले नाही.माझी आई-बाबा तूच होतीस आता सिनेमात दाखवतात तसे तुला त्यांच्या सोबत जायचे असेल तर जा, पण ज्या माणसाने तुला आयुष्यभर मनःस्ताप दिला त्याला भेटायची गरज नाही असे मला वाट्ते."
"मी नाही जाणार, तू म्हणतोस ते अगदीच काही खोटं नाही.आता त्यांना भेटून काय होणार? माझं मन पार मरुन गेलेलं आहे पण नाही गेले तरी बरं दिसणार नाही लोक काय म्हणतील?"
" हा विचार त्यांनी केला का? तू इकडे किती त्रासात दिवस काढलेस तेंव्हा त्यांनी काय केलं? आणि तसच वाट्त असेल तर आजी आठव, ती काय म्हणायची शेवटी ती असती तर कशी वागली आसती? आई आणि त्यांच्यासाठी मन मारायची काही जरुर नाही, मी आहे ना! आता तू अगदी आरामात रहा. हिंड , फिर मजा कर मी जाउन येतो"
शंतनू बाहेर पडला. वसूताई विचार करत बसल्या.खरचं आता त्या माणसाचा राग नाही पण त्याला भेटावं असंपण वाटत नाही.एखाद्या अनोळखी व्यक्तीबद्दल वाटते तशी निर्विकार भावना आहे त्यांच्याबद्दल.शंतनूच मन मोडून जाण्यात काही अर्थ नाही. वडिलांबद्दल काही वाईट न सांगूनसुध्दा त्याच्या मनात त्यांच्याबद्दल आढीच राहिली.शाळेत त्याने मुलांना त्यांच्या वडीलांबरोबर बघितले असेल.आपले वडील नसतात, त्यांची पत्रे येत नाहीत.याचा त्याच्या बालमनावर परिणाम झालाच असेल.हुशार व समजूतदार असल्याने त्याने कुणाला तसे जाणवु दिले नाही.काशीनाथला भेटायला वसूताई आणि शंतनू गेलेच नाहीत.

महिनाभर काशीनाथ पुण्य़ात होता. वसु-शंतनू येतील असे त्याला वाटत होते, पण ना ते आले ना त्यांचा फोन, काशीनाथला वसूला तोंड दाखवायला लाज वाटत होती. त्याने केलेला अपराधच तेवढा मोठा होता.पण जाण्यापूर्वी एकदा तरी तिला भेटून तिची माफी मागायची इच्छा होती आणि शंतनुलाही बघायचे होते, त्याचा वर्षाच्या वाढदिवसाचा फोटो वसूने पाठविला होता, त्यानंतर काही संबंधच राहीले नव्हते(आपणच ठेवले नव्हते) त्याच्या हुशारीच्या गोष्टी सगळ्य़ांकडून ऐकलेल्या होत्या.

जायचा दिवस आला.मुंबईला पोचताना संध्याकाळ झाली होती.रात्री दहा वाजता विमानतळावर पोचायचे होते.रघुनाथ सोडायला आला होता.मनाचा हिय्या करुन काशीनाथ त्याला म्हणाला.
"वसू तेवढी नाही भेट्ली, निदान फोनवर तरी बोललो असतो"
"अरे त्यात काय अजून आहेत दोन-तीन तास फोन करु त्या दुकानातून घरी असतील तर जाऊनच येवु ना"
दुकानापाशी गाडी थांबवून रघुनाथने फोन लावला.वसूताई नुकत्याच शाळेतून येवुन टेकल्या होत्या.तो फोन वाजला, त्यांनि फोन उचलला
"हॅलो,मी रघुनाथ बोलतोय , कोण वहिनी का? काशीनाथदादा आणि मी आत्ता येतोय मुंबईत तुम्हाला भेटायला यायच होत..."
वसुताईना क्षणभर काही सुचेना. त्यांना शंतनुचे त्या दिवशीचे बोलणे आठवले.माईचे शेवटले बोलणे आठवले "मी त्याला कदापी माफ करणर नाही"
एक आई जर मुलाला माफ करणार नाही म्हणते तेंव्हा त्याची चूक तेवढीच मोठी आहे. आपण कॊण त्यांना क्षमा करणार?
’सॉरी रॉंग नंबर.. "असे म्हणून वसू ताईंनी फोन ठेवला् आणि त्यांनी रिसिव्हर काढूनच ठेवला, पुन्हा फोन नको ते बोलणे देखील नको.
आत जावून पाय धुवुन त्या देवापाशी गेल्या.

रघुनाथराव पुन्हा पुन्हा नंबर फिरवत होते. फोन लागत नव्हता.
"उचलत नाही रे फोन , मगाशी एकदा रॉंग नंबर लागला, अजून घरी आल्या नसतील वहिनी, आमच्या इकडचे फोन पण ना..."
"राहू दे रघुनाथ नाही योग भेटीचा , मानी आहे ती आईसारखीच, माफ नाही करणार मला ती या जन्मी तरी"

©

Thursday, July 15, 2010

भेट (गावाकडच्या गोष्टी..)

दुपारची शांत वेळ होती.सरस्वतीकाकू दळणाची तयारी करीत बसल्या होत्या. तात्या यंदा मॅट्रीकला बसणार, त्याचा अभ्यास चालू होता.बाकीची मुले शाळेत गेली होती.तान्हा कमलाकर पाळण्यात निजला होता. आज सकाळपासून हवा विचित्र होती.काकूंचा उजवा डोळा लवत होता.मनाला विचित्र हुरहुर लागून राहिली होती.नाना , काकूंचा थोरला मुलगा रामदुर्ग संस्थानात नोकरी लागला होता.त्याचे बरेच दिवसात पत्र नव्हते.काका, काकूंचे यजमान कामानिमित्त गावी गेले होते. सवयीने हात काम करत होते, पण काहीतरी अशुभाच्या शंकेने मन कासावीस होत होते.
’तार घ्या ’ दारातून हाक आली. तात्या पुढे झाला, त्याने तार घेतली.वाचली ’गंगूचे दुखःद निधन’. तार वाचून तो खालीच बसला.काकू हात पुशीत बाहेर आल्या. ’कोण होते रे? काय झालं तात्या, तुझा चेहरा असा का? बोल ना घडघड’
’आई आपली ताई गेली गं..’ डोळे पुशीत तात्या म्हणाला
’अरे देवा... सकाळ पासून मेला उजवा डोळा लवत होताच..काय करू आता माझी ताई अशी कशी रे गेली?’ काकूंना शोक अवरेना.पाळण्यातल्या कमलाकरने रडायला सुरुवात केली.घरात एकच आकांत झाला.शेजारच्या ठाकूर ताई आवाजाने आत आल्या.
’काय झाले?’
’माझी मोठी मुलगी ,गंगू वारली हो.. सहाच महिन्याचं लेकरू आहे तिचं, मोठी मुलगी आडीच वर्षांची, आताशी कुठे संसाराला सुरुवात आणि गेली हो’
ठाकूर ताईंनी गंगू बद्दल् फक्त ऎकलेच होते,या घरात सरस्वती काकूंना येवून वर्षच झाले होते. त्यांच्या स्वतःच्या पाच-सहा मुलांच्या धबडग्यात त्यांना कुणाकडे जाय-यायची फुरसत नसायचीच.ठाकूरताईच कधी दुपारच्या त्यांच्याकडे जात,निवडण-टीपण करता करता दोघींच्या गप्पा होत. काकूंकडून बरेच पदार्थ ठाकूरताई शिकल्या.एवढा मोठा प्रपंच, काका एकटे मिळवते पण काकूंचे दारिद्र्य कुणाला दिसले नाही.

भुकेल्या बाळाला शांत करायलाच हवे होते.त्याला काय आईच्या दुःखाची कल्पना?त्याला दूध पाजताना गंगूच्या आयुष्याचा पट काकूंच्या ओल्या डोळ्यापुढे साकारला.गंगू त्यांची थोरली मुलगी.तिच्या पाठीवर ओळीने चार मुलगेच झाले. काकूंचा पाळणा दीड वर्षांचा.काकांना सरकारी नोकरी होती.इंग्रज सरकारच्या नोकरीत ते होते, फार मोठा हुद्दा नव्हता.शेतीवाडी-घरदार काही नव्हते.दरमहा येणारी पगाराची रक्कम तेवढी होती.खाणारी तोंडे कमी असताना स्वस्ताई मुळे कुटूंब सुखात होते.गंगू पाच-सहा वर्षांची असल्यापासून आईच्या हाताखाली काम करु लागली.दिसायला बेताची होती, पण डोक्याने चलाख,शाळेत घातली होती.शाळेतून आली की पटकन सगळा अभ्यास करुन पाटपाणी घ्यायला यायची.भावंडाना खॆळवताना कविता म्हणायची.त्यावेळी काकांची भाटघर धरणाच्या बांधकामामुळे तिकडे बदली झाली होती.भोरला निमकरांच्या वाड्यात त्यांनी बिऱ्हाड केले होते. नानाला इंग्रजी शाळेत घातल्यावर गंगू म्हणाली होती,’मला मात्र मराठी शाळेत ठेवलस, त्याला कसं इंग्रजी शाळेत घातलत’
’तो मुलगा आहे, तुला काय इंग्रजी शिकवून मडमीण का व्हायचय? लग्न होवून तू सासरी जाणार फायनल पर्य़ंत शिकलीस ना! आमच्या सारखी अडाणी नाही राहिलिस. शिवाय आपली परिस्थिती बघ’
गंगूलाही त्याची जाणीव होतीच.शिवण -भरतकाम सगळ्यात ती हुशार होती.पुड्याच्या साठवलेल्या दोऱ्यातुन ती क्रोशाचे काम शिकली. आईला मदत करताना स्वयंपाकपण तिला येवु लागला होता.

मामलेदारांचे घर त्यांच्या शेजारीच होते. सरस्वती काकू यांच्याकडे फरशा जात नसत.एकतर घरकामातून त्यांना वेळ नसे आणि त्यांच्यासारख्या थोरामोठ्यांच्या घरात हळदीकुंकू किंवा सणवारी बोलावणे असेल तरच त्या जात. मामलेदारसाहेव आता नव्हते. पण त्य़ांच्या नावाच दबदबा अजूनही होताच. मामलेदार काकू देवळात किर्तनाला जात.स्वयंपाकघरात त्या नुसतीच देखरेख ठेवत, त्यांच्या नजरेच्या धाकात सुना दिवसभर कामे करीत. त्यांच्या बापूचेच तेवढे लग्न राहिले होते. दिसायला ती सगळीच मंडळी देखणी. ऊंची-पुरी सगळ्य़ांची नाके धारदार, डॊळे पाणीदार.बापू सगळ्यात धाकटा तो दहा वर्षांचा असताना मामलेदार साहेब गेले, पाठोपाठ त्यांचे थोरले चिरंजीवही. बापूवर काकूंची माया त्यामुळे अंमळ जास्तच. घरात पुरुषांनी कुठल्याही कामाला हात लावायची पध्द्त नव्हतीच.मॅट्रीकची परीक्षा द्यायच्या आधीच त्याचे लग्न करुया म्हणून त्याच्या आईने हट्ट धरला.
’त्याचे दोनाचे चार हात झाले कि मी संसारातून मुक्त होईन, त्याचे वडील असते तर केलचं असतं त्याच लग्नं, शिक्षण काय राहिलच चालू’
अण्णा,बापूचे थोरले भाऊ आता घरचा कारभार बघत होते.ते संस्थानच्या प्रेस मधे कामाला होते. निमकरांच्या वाड्यात राहाणारे सरस्वतीकाकूंचे बिऱ्हाड त्यांना माहित होते. गरीब असले तरी कुटुंब सालस होते. त्यांची मुले हुशार होती. नानाला संस्थानची शिष्यवृत्ती होती.अण्णांनी निमकरांकरवी बापूसाठी गंगूची पत्रिका मागवली.पत्रिका जुळते असे गुरुजींनी कळवताच, एक दिवस ते सरस्वतीकाकूंकडे स्वतः गेले आणि त्यांनी बापूसाठी गंगू आम्हांला पसंत आहे असे सांगितले. सरस्वतीकाकूंना आपण स्वप्नात तर नाही ना? असे वाटले. इतक्या थोरामोठ्यांकडून आपल्या लेकीला मागणी येईल असे त्यांना मुळीच वाटत नव्हते.
’हे घरी आले कि त्यांना पाठवते तुमच्याकडे’ एवढेच त्या बोलल्या, अण्णांना या बसा म्हणायचे देखील त्यांना सुचले नाही.

काका घाबरतच मामलेदारांच्या वाड्यात शिरले.अण्णांनी मोठ्या प्रेमाने त्यांचे स्वागत केले.माजघरात ज्वारीची पोती रचून ठेवलेली होती.ओसरीवरुन मागच्या परसातली केळीची झाडे दिसत होती.पाणी आणि शेंगदाण्याचा लाडू रमाकाकी ठेवून गेल्या.
"काका, तुमच्या गंगूची पत्रिका बापूसाठी आम्ही बघितली , छान जुळतीय आंम्हाला मुलगी पसंत आहे, आमचा मुलगा ही तुमच्या बघण्य़ातला आहे ..’ अण्णांनी सुरुवात केली.
’हो, हिने मला सांगितले, पण मी साधा नोकरदार माणूस.आमची शेतीवाडी होती म्हणे पूर्वी, आता काही नाही, तुमच्यासारखे तालेवार घर, त्या तोलाचे कार्य करणे आम्हांला कसे झेपणार?’
’पैसा महत्वाचा नाही हो, माणसे मोलाची, तुमची मुले हुशार आहेत, तुमचे दिवसही पालटतील.आम्हाला गंगूची हुशारी आवड्ली आहे, तुम्ही फक्त मुलगी आणि नारळ द्या, बाकी सगळ माझ्याकडे लागलं’
काका होकार देवून आले.गंगू किंवा बापू दोघांच्या आवडी-निवडीचा प्रश्ण नव्हताच.त्या काळी लग्ने मोठी माणसे ठरवित. इथे दोघांनी निदान एकमेकांना बघितले तरी होते,कित्येकदा अंतरपाठ बाजुला झाल्यावर जोडीदाराचे दर्शन होई.
गंगूचे लग्न झाले.लग्न ठरल्यापासून रोजच आईकडून मामलेदारांच्या श्रीमंतीच वर्णन तिनं ऐकलं होतं, गंगूच्या भाग्याचा आळीत सगळ्यांना हेवा वाट्ला होता.रखमाकाकू तर म्हणाल्या देखील होत्या,’बापू आणि गंगूची जोडी म्हणजे शालजोडीला पटकुराचं ठिगळं !’ एकून गंगूला फार वाईट वाटल होतं पण ती बोलू शकली नव्हती.
मामलेदारांच्या वाड्यात पन्नास माणसे रहात होती. आला गेला,पै-पाहुणा.रोजचा सोवळ्याचा स्वयंपाक. गंगूला कामाची सवय असली तरी त्यांच घर या मानानं किती लहान! तरी तिने परिस्थितीशी जुळवून घेतले.रमा वहिनी आणि मोठ्या जाऊबाईंकडून शिकायला सुरुवात केली. सासुबाईच्या कडकपणाच्या कथा तिने पूर्वीच ऎकल्या होत्या, त्यांना बोलायची वेळ शक्यतो येणार नाही अशा प्रकारे ती कामे उरकत असे. सासुबाईंना स्वतःच्या मुलांशिवाय कुणाचे कौतुक करणे माहित नसल्याने सुनांना कौतुकाचा शब्द मिळात नसे निदान बोलणी बसू नयेत एवढीच त्यांची अपेक्षा असे.

पहिल्या बाळंतपणाला गंगूला माहेरी धाडले नाही.एक तर तिच्या वडीलांची तोवर पुण्यात बदली झाली होती.
’वाड्यातल्या लहान जागेत काही जायची जरुर नाही, इथेच रहा’ काकूंनी हुकूम केला.पहिली मुलगी झाल्यामुळे बरीच बोलणीही तिला ऎकावी लागली. सुदैवाने मुलगी रंगरुपाने वडीलांवर गेली होती. सहा महिन्यांच्या कुमुदला घेवून गंगू माहेरी गेली, पहिल्या नातीला कुठे ठेवू नि कुठे नकॊ असे घरच्यांना झाले होते.चार दिवसात पोरीला ताप भरला, नानल वैद्यांकडून काकांनी औषध आणले.घरगुती उपायही होतेच पण दुखणे वाढले आणि कुमुद त्यातच गेली.
गंगुच्या दुर्दैवाला जणू सुरुवात झाली.काकूंनी बोलून बोलून नको केले, तिच्या माहेरचा, त्यांच्या गरीबीचा सगळ्यांचा उध्दार झाला. बापूरावांनी एका शब्दाने आईला टोकले नाही कि गंगूला समजावले नाही. आपला झाल्या घटनेशी सुतराम संबंध नाही असे त्यांचे वर्तन होते. बापूराव मॅट्रीकची परीक्षा नापास झाले होते. गंगूला वाटे त्यांनी पुन्हा अभ्यास करावा, परीक्षा द्यावी.पण त्यांना परीक्षा या प्रकाराची भितीच बसली होती. आपला नवरा नोकरी करत नाही, शेतीची कामे त्याला झेपणार नाहीत असे त्याची आई म्हणते या गोष्टीचा गंगूला त्रास होई. जावा तिला काही बोलत नसत, काकूंचा धाकच तसा होता.पण आपला प्रपंच वाढणारा आहे तर आपण कष्टाने चार पैसे मिळवले पाहिजेत असे गंगूला मनापासून वाटे.

एकदा भितभितच तिने अण्णांजवळ हि गोष्ट बोलून बघितली. एक मुलगी एवढा विचार करते याचेच त्यांना नवल वाटले, बायकांची बुध्दी चुलीपुरतीच, असा संस्कार असलेली ती पिढी होती. मात्र गंगूच्या मनाची घुसमट त्यांना जाणवली, त्याचवेळी बापुच्या निवांत वागण्याला वेळीच लगाम लावावा लागेल असे त्यांना वाटले. आईच्या नसत्या लाडाने त्याचे आयुष्य वाया जाईल या जाणीवेने त्यांनी बापुला संस्थानात कारकुनाची नोकरी लावून दिली.बापूरावांना नोकरी मिळाल्याचा गंगूला फार आनंद झाला. आपल्या हुशारीने आणि कष्टाने माणूस पुढे जातोच आता हळूहळू त्यांना परिक्षेला बसायला सांगू, कचेरीतील कामाने त्यांचा हरवलेला आत्मविश्र्वास परत येईल.गंगू स्वप्ने रंगवू लागली.

गंगूला दुसरा मुलगा झाला,पण तो दहा दिवसातच गेला.त्यानंतर वर्षभरात तिला पुन्हा मुलगी झाली.लहान वय त्यात पाठोपाठच्या बाळंतपणाने गंगूच्या तब्येतीच्या तक्रारी सुरु झाल्या. तिला बारीक ताप असे, खोकला लवकर बरा होत नसे. भोरच्या सततच्या पावसात लांबून विहिरीवरुन पाणी आणावे लागे. ओल्या कपड्य़ातच कामे उरकावी लागत. जेवायला दुपारचे दोन वाजून जात.सगळ्याच सासुरवाशिणींची अशीच गत होती.त्यातच गंगूला पुन्हा दिवस गेले. या खेपेला मुलगा होवुदे म्हणून तिने आंबाबाईला नवस केला. तिला मुलगा झाला, पण बाळंतपणात तिच्या आजाराने उचल खाल्ली.ताप हटेना, खोकला कमी होईना. रामशास्त्री वैद्य बघून गेले. गंगूला क्षयाची बाधा झाली आहे, तिला मुलापासून दूर ठेवा असे सांगितले. तिला वेगळ्या खोलीत ठेवले.न बऱ्या होणाऱ्या आजाराने गंगूचा शेवटच केला.

सरस्वतीकाकू पुण्यात आल्या.शहरात प्रत्येक गोष्टीला पैसा मोजावा लागे.भोरात कमी भाड्यात मोठी जागा होती. मंगळवारच्या बाजारात भाजीपाला स्वस्त मिळे.दुध-दुभते सगळेच स्वस्त. इथे सारेच महाग. खाणारी तोंडे वाढलेली.मुलांच्या शिक्षणाला पैसा लागत होता. रोजचा दिवस कसा घालवायचा अशी विवंचना पडे. नाना एवढा हुशार जगन्नाथ शिष्यवृत्ती मिळवली त्यानं पण कॉलेजात घालायला काही जमलं नाही. रामदुर्ग संस्थानात त्य़ाची त्याने नोकरी बघीतली, आणि महिन्याकाठी तोच पैसे पाठवायला लागला. गंगूला एकदा माहेरी आणली आणि तिची लेक गेल्याने तिचे माहेर तुटले.इकडे आणून तरी तिची हौसमौज थोडीच करता येणार आहे तिच्या सासरी सुखात, तशीच राहो. तिच्या दुखण्याची,आजाराची काहीच बातमी त्यांनी कळवली नाही.तिचीच पत्रे येत. त्यात कधी तिने आजाराचे नाही कळवले, कायम खुशालीच्याच बातम्या. आणि आता एकदम ती गेल्याचीच तार. काय त्रास सोसला पोरीनं कोण जाणे? मी तरी कसली आई? मला माझ्या संसारातून तिच्याकडे बघायला झाले नाही.बिचारी मुक्यानेच गेली, सगळा सासुरवास सोसला पोरीने. काय आम्ही त्या वैभवाला भुललो! माझ्या लेकीला त्याचा काय उपयोग झाला! ऐन तारुण्यात पोरांना पोरकं करुन गेली. आता त्यांच्याकडे कशाला जाऊ? माझी मुलगीच गेली आता कुणाला भेटू? त्यांना काही कमी नाही, तिची मुलं वाढतील तिकडे सुखात, उगीच गेलं कि ते तान्ह लेकरु आणावसं वाटेल आणि इथे त्याची आबाळ व्हायची.नकॊ तिकडे जाणेच नकॊ, काय म्हणतील, नावे ठेवतील , ठेवुदे, आता मला त्या भोरात जायचय कशाला परत? काळजावर दगड ठेवून सरस्वती काकू भोरला गेल्याच नाहीत.

महागाईमुळे दिवसेंदिवस पुण्यात राहणे अशक्य झाल्याने नानाने सगळ्यांना रामदुर्गला बोलावून घेतले.एव्हाना सरस्वतीकाकूंना सात मुलगे आणि तीन मुली झाल्या होत्या.सततच्या बाळंतपणाने त्या टेकीला आल्या होत्या. मला आता मूल नकॊ असे त्या मनाशी म्हणत.कोल्हापुरला त्यांच्या दादा व तात्या दोन्ही मुलांना नोकऱ्या मिळाल्या.रामदुर्गला आल्यावर त्यांची सुशीला नावाची मुलगी वारली.दोन संस्थानांनी माझ्या दोन मुली गिळल्या असे त्या म्हणू लागल्या.त्यांचे मन रामदुर्गात रमेना.त्यांनी कोल्हापूरला बिऱ्हाड केले.काका अजून पुण्य़ात नोकरी करत होते.

गंगू वारली.मामलेदारांच्या वाड्यात दहा दिवस दुःखाचे सावट आले.नंतर सगळे आपापल्या व्यवहाराला लागले.एवढ्या मोठ्या घरात तिची मुले वाढत होती.अगदी लहान असल्यापासून गंगूचा मुलगा रमाकाकी तिच्या मोठ्या जाऊबाईच वाढवित होत्या, तिच्या आजाराने त्याच त्याचे करत होत्या.मुलगीही त्यांनाच आई म्हणे.मुलांना आपली आई गेल्याची जाणीव नव्हती.घरात इतर मुलांबरोबर ती दोघे वाढत होती. यथावकाश बापूचे दुसरे लग्न झाले. त्यांच्या पुतण्य़ांसारखी त्यांची मुले त्यांच्या बायकोला काकी म्हणू लागली.एकत्र कुटुंबात सगळीच मुले सारख्याच पध्द्तीने वाढत होती.कॊणत्याच मुलांचे लाड , कोतुक कुणीच करत नसे. आईला सुध्दा मुलाला घटकाभर घेवून बसता येत नसे.
गंगूच्या मुलाची मुंज त्याच्या चुलत भावाबरोबर झाली. काकी ही आपली आई असून आपण आई म्हणतो ती आपली आई नाही हे त्याला समजून घ्यायला बराच त्रास पडला. मातृभोजनाला तिच्या पानात जेवताना त्याला हे समजले. त्याचे मामा मुंजीला आलेच नव्हते, त्यांना कुणी कळवले नव्हते.त्या लोकांचा पत्ता देखील माहित नव्हता. गंगू गेल्यापासून त्या कुटुंबाशी संबंध तुटलेच होते.आण्णा आता संस्थानच्या जेलरचे कामही करीत होते, एकाच वेळी ते प्रेस आणि जेल दोन्ही कारभार सांभाळीत होते.रामदुर्ग संस्थानशी पत्रव्यवहार करताना अचानक त्यांना नानाचा पत्ता मिळाला. त्याच्याकडून त्यांनी सरस्वतीकाकूंचा कोल्हापूरचा पत्ता मिळविला.अण्णांना मिरजेला बहिणीच्या सासरच्या एका लग्नानिमित्ताने जायचे होते, त्यांनी कोल्हापूरला पत्र लिहिले.

सरस्वतीकाकू अशाच दुपारी काम करीत असताना , मनोहरने पत्र आणून दिले.
’अरे , वाच ना ते पत्र, मला मेलीला कुठे येतयं वाचायला’
मनोहरने पत्र वाचले.गंगूच्या मुलांना मी घेवून येत आहे, तुमची इच्छा असेल तर तुमच्याकडे दाखवायला आणॆन असे अण्णांनी लिहिले होते. पत्र हातात घेवून कितीतरी वेळ सरस्वतीकाकू रडत राहिल्या.मुलांना समजेना आईला असे अचानक काय झाले?
’ ही गंगू कोण, तिची मुले कोण” मनोहर विचारु लागला.
त्यांनी संध्याकाळी तात्या आल्या आल्या त्याला पत्र दाखवून उलट टपाली मुलांना जरुर आणा असे लिहिण्यास सांगितले.गंगूची मुले कधी बघू असे त्यांना झाले होते. धकट्या दोघा-चौघांना आपल्याला अजून एक बहीण होती हे देखील माहित नव्हते.पण सगळ्यांनाच आपल्या भाच्यांना बघण्याची उत्सुकता होती.आईकडून आता रोज गंगूताईच्या गोष्टी समजत होत्या.

शेवटी तो दिवस उगवला.सकाळ पासून सगळे या नव्या पाहुण्यांच्या वाटेला डोळे लावून होते.नऊ वाजून गेले असावेत. वाड्याच्या दींडीदरवाजातून एक ऊंचेपुरे गृहस्थ आत आले.पांढरेशुभ्र दुटांगी धोतर, काळ कोट आणि डोक्यावर पगडी असा त्यांचा वेश होता.त्यांच्या हाताशी एक लहान मुलगा होता.त्याच्या डोक्याचा घेरा केलेला होता.दुसऱ्या बाजूला परकर पोलके घातलेली एक नऊ-दहा वर्षांची मुलगी होती.तात्याने अण्णांना ओळखले त्याने आईला ते आल्याची वर्दी दिली आणि तो त्यांना बोलवायला पुढे झाला. बाहेरची खोली आवरलेली होती. बैठकीवर स्वच्छ चादर घातली होती.लोड आणि दोन उषा ठेवल्या होत्या.पितळ्याच्या लखलखित तांब्यात पाणी भरुन त्यावर फुलपात्र ठेवले होते. भिंतीवर तसबिरी होत्या. आण्णा आले.मुले त्यांच्या जवळच बसली, अनोळखी लोकांना बघून ती दोघे बावचळली होती.भोर सोडून ती दोघे पहिल्यांदाच मोठ्या शहरात आली होती.तुमच्या आजी कडॆ मी तुम्हाला नेत आहे असे आण्णांनी सकाळीच सांगितले होते
’ पण काकू आहे ना आमची आजी? ती भोरला आहे’
’काकू आमची आई, हि तुमच्या आईची आई. तुमचे मामा-मावशा सगळे भेटणार आहेत, तिथे शहाण्यासारखं वागायचं’
सरस्वती-काकूंनी मुलांना आत बोलावले. तात्या, दादा यांच्याशी अण्णा बोलू लागले
मुले आत गेली काकूंनी दोघांना मांडीवर घेतले आणि त्यांना पोटाशी धरुन त्या रडू लागल्या, मुले अगदीच बावरुन गेली,हि आपली आज्जी आणि ती रडतीय, आपल्या काकू आज्जी्ला कधी रडताना त्यांनी बघितले नव्हते.
पाच-एक मिनिटांनी मुलगी म्हणाली,’आज्जी, अगं तुझी मांडी दुखेल ना, मी खाली बसते.आणि आम्हाला जायचय लग्नाला’
काकू सावरल्या.
’नाही गं, मी आज पहिल्यांदाच बघितल ना, तुम्हाला तशी नाही जाऊ द्यायची, शिरा केलाय ना तुमच्या साठी.खायला देते’
कशी नक्षत्रासरखी मुलं आहेत,मुलगी बोलण्य़ात अगदी गंगूवर गेलीय.काकूंनी भराभरा बशा भरल्या.प्रमिलेला हाक मारुन बाहेर खाणे पाठवले, मुलांना खायला देवुन ती खाताना त्या पुन्हा त्यांना न्याहाळू लागल्या. काकूंची, रमाकाकीची चौकशी त्या करत होत्या, मुलगी उत्तरे देत होती.
दुसऱ्या दिवशी त्यांनी अण्णांना मुलांना घेवुन जेवायला येण्याचे आमंत्रण दिले,त्यादिवशी त्यांना लग्नाला जायचे होते. दुसऱ्या दिवशी त्यांनी साग्रसंगित स्वयंपाक केला. नातीसाठी सुरेख जरीकाठाचे परकर-पोलके,नातवाला जरीची टोपी,शर्ट-चड्डी आणि मुंजीची म्हणून चांदीची वाटी दिली.मामांनी पेन,मावशांनी रंगित चित्रे अशा अपूर्वाईच्या वस्तू दिल्या.या लोकांना आपण यापूर्वी कधी बघितले नव्हते याचा मुलांना विसर पडला.त्यांच्या मायेने आणि आपुलकीने मधले अंतर नाहिसे झाले.

निघायची वेळ झाली.पुन्हा एकदा काकूंना गहिवर आला. त्या अण्णांना म्हणाल्या,’आमची चूक झाली,एवढे दिवसात आम्ही मुलांची साधी चौकशीही केली नाही, पण आमचा खरोखरीच नाईलाज होता, तुमच्या घरात ती सुखात असणार याची खात्री होती, पण खरं सांगते एकही दिवस या मुलांची आठवण झाली नाही असा गेला नाही.मुलांना सुट्टीत आजोळी पाठवा.आमच्या बरोबर राहतील तशी त्यांना आमच्याबद्दल माया वाटेल, गंगूचं मी आजारपण ,बाळंतपण नाही करु शकले, निदान तिच्या मुलांना आजीची माया देईन,नाही म्हणू नका’
’काकू मी तुमची परिस्थिती समजू शकतो, अहो,आमचा राग नाही बरं तुमच्यावर, म्हणून तर पत्ता शोधून मुलांना आणलं मी तुमच्याकडे,आम्हालाही वाटतं गंगू अशी अकाली जायला नको होती, फार गुणी होती बिचारी आमच्या मोठ्या घरात तिच्या कलागुणांचं चिज नाही झाल.असो, तुम्ही काही वाटून घेवू नका, मुलं तुमच्याकडे येतील सुट्टीत.

तेंव्हापासून दरवर्षी, तर कधी वर्षाआड मुले मे महिन्याच्या सुट्टीत कोल्हापूरला जावू लागली.त्यांचा एक मामा त्यांना आणायला येई.दुसरा परत सोडायला.त्यांच्या मामाचा वाडा काही चिरेबंदी नव्हता,ना शेतीवाडी ना दूध-दुभते.मात्र मुलांना तेथे भरपूर माया मिळाली.लाड आणि कौतुक याची त्यांना नव्याने ओळख झाली. न बघितलेल्या बहिणाच्या मुलांवर मामा -मावशांनी प्रेम केले. आजी-आजोबांनी लाड केले.या मायेच्या जोरावर पुढील आयुष्यात आलेल्या अवघड प्रसंगांना तोंड देताना त्यांना नैराश्य, वैफल्य अशा विकारांनी ग्रासले नाही. न चाखलेल्या आईची मायेची गोडी आजोळच्या ओळखीने मिळाली.


©

Friday, July 9, 2010

ब्लॉगचा वाढदिवस

म्हणता म्हणता दोन वर्षे झाली. ब्लॉग या संकल्पनेची माहिती होती. दुसऱ्यांचे ब्लॉग वाचत होते.आपण लिहावे किंवा आपण लिहिलेले कोणी वाचेल असे वाटत नव्हते.माझ्या भाच्याने मला भरीस घातले.त्याच्या कडून ’देवनागरी’ लिहिण्याचे सॉफ्ट्वेअर घेण्यापासून सुरुवात होती.कॉम्प्युटरशी ओळख होवुन वीसाहून अधिक वर्षे झाली होती.कार्ड पंचींगच्या जमान्यापासून आम्ही त्याला ओळखतो.कोबोल,फ़ोर्ट्रान अशा संगणकीय भाषांमधून प्रोग्राम लिहून आपल्याला हवे तसे आऊट्पुट काढण्याची झटापट करण्य़ाचे काम आम्ही करत आहोत या क्षेत्रातील झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेताना कधी मजा आली तर कधी दमछाक झाली.

मला आठवतयं, आम्ही तेंव्हा युनिक्स ऑपरेटींग सिस्टीमवर काम करत असू.प्रत्येक सूचना संगणकाला टाईप करुन द्यावी लागे, त्यावेळी आमच्या ऑफीसमध्ये मल्टीमिडीया संगणकावर व्याख्यान झाले होते.आणि कॉम्प्युटरवर तुम्ही गाणी ऎकू शकाल,सिनेमे बघू शकाल अशा गोष्टी ऐकून आम्ही चकित झालो होतो, पण ही किमया आपल्याला इतक्या लवकर बघायला मिळेल अशी कल्पना नव्हती. मायक्रोसॉफ्टच्या ’विंडोज’ ने तंत्रज्ञानाची जी अद्भूत खिडकी उघडली आणि हा हा म्हणता याने साऱ्या जगावर जादू केली. सर्वसामान्यापासून सगळे सह्ज हा वापरू लागले. माहितीजालाने जग जवळ आले.ई-मेल ने सगळे संपर्कात आले. आता इंग्रजीसारखेच इतर भाषांमधुन लिहिता येवु लागल्याने भाषांचे अडसरही दूर झाले.या बदलाचे नुसतेच साक्षीदार न बनता त्याचा उपयोग करुन कामे तर करता आलीच पण विसाव्याचे दोन क्षणही त्यातून मिळवता आले हे मी माझे भाग्य समजते.

संगणक या क्षेत्रातील वेगाच्या प्रगतीचा विचार करता यात टिकण्याचा सोप्पा मार्ग मला मिळाला,’गुरुविण कोण दाखवील वाट..’ हे खरे असले तरी इथे तुम्ही तुमचा गुरु हा वयाने लहानच(तुमच्यापेक्षा) बघावा लागतो.कारण त्यालाच सगळ्यात अद्ययावत ज्ञान असते.माझ्या भाच्याला तो लहान असताना मी एकदा माझ्या ऑफिसमध्ये नेले होते, तेंव्हा मी पुणे विद्यापिठाच्या संख्याशास्त्र विभागात काम करीत होते, तेथे प्लॉटरवर आम्ही ग्राफ काढीत होतो,ते बघून तो एवढा खूश झाला. पेन होल्डरमधे पेन घेवुन कागदावर चित्र उमटते ते बघून तो थक्क झाला होता.
"मावशी त्या कागदावर आता हत्ती काढ ना !"
"अरे, हत्ती नाही येत काढता "
"का? तो कॉम्प्युटर हया रेघा कशा मारतो , तसाच काढेल ना हत्ती, घोडा काही पण"
मग मी त्याला प्रत्येक रेघ काढण्यासाठी कसा प्रोग्रॅम लिहावा लागतो वगैरे समजविण्याचा प्रयत्न केला तेंव्हा
" मावशी , मग सोप्प आहे, आता हत्तीचे चित्र काढायचा प्रोग्रॅम लिही म्हणजे हत्ती काढता येईल"
मावशी अर्थातच निरुत्तर झाली. मावशी नुकतीच त्या कॉम्प्युटर वर शिकायला लागली होती,आणि भाच्याने डायरेक्ट पदवी परिक्षेचा प्रश्ण सोडवायला दिला होता, आपले अज्ञान न दाखवता त्याचे समाधान कसे करावे असा मला पेच पडला.अर्थात माझा भाचा बराच चतुर होता, त्याने मावशीची स्थिती ओळखली असावी, त्याने हत्तीचा नाद सोडून कॉम्प्युटर वर इतर गोष्टी कशा करता येतात, पाने कशी प्रिंट होतात ते बघायला सुरुवात केली.
आता वीस वर्षांनी हाच मुलगा कम्युनिकेशन आणि ग्राफिक डिझाइन मधला मास्टर झाला(याला मी मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे काही म्हणणार नाही), तो माझा गुरु ठरला ब्लॉग बनविण्यासाठी.

त्याने स्वतःच्या ब्लॉगची मला लिंक पाठवली आणि मी ब्लॉगविश्र्वाची सभासद, नियमित वाचक झाले.नंतर त्याचे मला आवडलेले लेख मी त्याला प्रसिध्द कर असे म्हणू लागले,या पिडेतून सुटका मिळावी म्हणून कदाचित त्याने मला मावशी तू पण तुझा ब्लॉग बनव असा सल्ला दिला.मी गुगलच्या मदतीने सुरुवात केली.मला आडेल तेंव्हा मी त्याला फोन करायची.तो पण बिचारा अतिशय पेशन्स ठेवुन मला उत्तरे द्यायचा.अगदी लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतीचित्रात सांगितल्याप्रमाणे, त्या जशा नव्याने कादंबरी लिहिताना बालकवींना सतत विचारीत तशी मी त्याला विचारत होते. तो लहान असताना मी त्याला जे काही शिकविले त्याची त्याने परतफेड केली.मी त्याला रागावले असेन त्याने मात्र वयाचा मान ठेवून शांतपणे मावशीचे प्रश्ण ऎकून तिला समजतील अशा शब्दात उत्तरे दिली.
शेवटी एकदाचा ब्लॉग बनला. म्हणजे त्याची बाह्य रुपरेखा बनली.मजकूर तयार होताच, पण तो भरायचा कसा? हा बेसिक प्रश्ण होता.ब्लॉगच्या डॅशबोर्डवर जावुन नवीन पोस्ट भरणे हा ऑप्शन सापडेना.अलिबाबाच्या गुहेतून बाहेर पडताना त्याच्या भावाला जसे ’खुल जा सिम सिम ’ आठवेना , तशी अवस्था झाली.पुन्हा एकदा दादाला(भाच्याला मी माझ्या मुलींप्रमाणेच दादा म्हणते या क्षेत्रात तो तसाही आहेच दादा,नाव मुद्दाम सांगत नाही चिडेल माझ्यावर एखादवेळी)
फोन , तो (म्हणजे फोन आणि पर्यायाने तो पण) आऊट ऑफ रेंज.माझी तडफड , धडपड चालू होतीच अखेरीस केंव्हा तरी योग्य ऑप्शन मिळाला आणि एकदाची सुरुवात झाली !

दोन वर्षांमध्ये पांढऱ्यावर बरेच काळे करुन झाले. बरेच शिकायला मिळले.खूप जणांनी चिकाटीने वाचले.काहींनी आवडल्याचे अभिप्रायही पाठविले.एकूणात ही सगळी आनंदयात्रा ठरली.आपले मूल मोठे होताना बघण्याचा जो आनंद असतो त्याच प्रकारचा आनंद ब्लॉगने दिला.आपले विचार व्यक्त करता येणारे हे मुक्तपीठ आहे. याचा वाचकवर्ग जगभरातील आहे.आणि स्वांतसुखाय अशी ही निर्मिती आहे.कुणाकडे प्रसिध्दिला पाठविण्याची कटकट नाही आणि साभार परत आल्याचे दुःख नाही.

समस्त ब्लॉगवाचकांचे मनःपूर्वक आभार आणि आमच्या लाडक्या दादाचेही.