Tuesday, July 30, 2013

चालविशी हाती धरोनिया

        उगवतीचे उन आता
        मावळतीला पोचले आहे
        मार्गक्रमण मार्गापेक्षा
        स्मरणात जास्त साचले आहे

          आयुष्याची पाच दशकं संपत येताना कुसुमाग्रजांची हि कविता मनाला जास्तच भिडते. नोकरीला लागुन सत्तावीस वर्षे झाली. पहिल्या नोकरीतील या काही आठवणी.....


शिक्षण संपताच लगेच नोकरी लागली , त्यालाही पाव शतक होवुन गेले. पुणे विद्यापीठातील संख्याशास्त्र विभागात M.Sc. चा रिझल्ट लागल्यावर मार्कलिस्ट आणायला गेले असताना,नेहमीच्या सवयीने नोटीसबोर्डावर नजर टाकली तेंव्हा NIBM मधे ’रीसर्च ऍसिस्टंट’ हवे असल्याचे समजले. आम्ही मैत्रीणींनी लगेचच अर्ज लिहून पोस्टात टाकले. आणि दोनच दिवसात आम्हाला मुलाखतीकरीता बोलावणे आले.

    तोपर्य़ंत NIBM म्हणजे काय़ हे देखील आम्हाला माहित नव्हते. कोंढवा खुर्द असा पत्ता त्या जाहिरातीत होता. आम्हा तिघींच्या परिचितांपैकी कुणालाच असे काही ऑफिस आहे याची गंधवार्ता नव्हती. "देवाने तुला तोंड दिलय, डोकं दिलय तेंव्हा त्याचा उपयोग करुन जगात वावरायचे, मी काही तुला जन्मभर पुरणार नाही" अशी समज कॉलेजला प्रवेश घेतानाच दादांनी दिली होती त्याचा आता उपयोग झाला. एफ.वाय बी.एस.स्सी ला असतानाच दादा गेले, त्यामुळे शिक्षण संपल्यावर लगेच नोकरी हवीच होती. मग देवाने दिलेल्या तोंडाचा वापर करुन कोंढवा खुर्दचा पत्ता शोधायला सुरुवात केली. पुलगेट बसस्टॅंड वरुन कोंढव्याच्या बस सुटतात अशी महत्त्वपूर्ण माहिती मिळाली, आम्ही तिघी मैत्रीणी पुलगेट वर जावुन पोहोचलो, कोंढव्याची बस बऱ्याच वेळाने आली पण आम्हाला गप्पांच्या नादात वेळ कसा गेला समजलेच नाही. बसस्टॉपवरच्या सहप्रवाशांपैकी कुणालाच NIBM नावाचे काही ऑफिस आहे हे माहित नव्हते. सुदैवाने बस कंडक्टरला माहित होते आणि त्याने योग्य स्टॉपवर आम्हाला उतरवले.

    सकाळचे ११ वाजले असतील , मे महिन्याचे उन रणरणत होते अतिशय रुक्ष आणि उजाड भाग होता तो.  कुणाला विचारावे तर चिटपाखरु नाही,थोडे पुढे आल्यावर NIBM दिड किमी असा बोर्ड दिसला आणि असा आनंद झाला, कि त्या उन्हात देखील चांदणं असावं असं समजून आम्ही बोर्डमध्ये दाखविलेल्या बाणाच्या दिशेने कूच केले.नॅशनल इन्स्टीट्युट ऑफ बँक मॅनेजमेंट अर्थात NIBM ही बरीच मोठी संस्था, मुंबईतली मुळची पुण्यातही सुरु झाली होती किंवा मुंबईतुन इकडे विस्थापित झाली होती. बऱ्याच दगडी इमारतींचे ते छोटेखानी संस्थानच होते. इमारतींची रचना अतिशय सुंदर, आजुबाजुला सुरेख हिरवळ, मुद्दाम लावलेली लहान लहान झाडे.फारच सुरेख परीसर होता. बसमधुन उतरल्या्वर कोंढवा खुर्द च्या दर्शनाशी पूर्ण विसंगत अशा त्या परिसराच्या आम्ही अगदी प्रेमात पडलो. मग आम्ही तिथल्या नटलेल्या ( हो, लिपस्टीक ,नेलपेंट लावलेली व्यक्ति म्हणजे नटलेली अशी अमची त्यावेळची ,आणि अत्ताची देखील समजुत होती) रिसेप्शनिस्टजवळ व्हर्गिस मॅडम कुठे भेटतील अशी चौकशी केली, तिने त्यांच्याकडे जाण्याचा मार्ग सांगितला, तसेच त्यांच्या सेक्रेटरीला भेटण्यास सांगितले.

    इमारती नव्याकोऱ्या होत्या पण जिकडे तिकडे सामसुम, सगळ्या खोल्या बंद, खोल्यांवर नंबर होते, व्हर्गीस मॅडमच्या सेक्रेटरीचा रुमनंबर घोकत गेलो, तिला आम्ही मुलाखतीकरता आल्याचे सांगितले, तिने सफाईदार इंग्लिशमधुन आम्हाला बसावयास सांगुन मॅडमना फोन लवला,मग पाच-दहा मिनिटांनी एक-एक करुन आंम्हा तिघींना त्यांनी आत बोलावले. आयुष्यातला तो पहिलाच इंटरव्ह्य़ू. मॅडम नेमकं काय बोलल्या, काय विचारलं ते आता विशेष काही आठवत नाही ,पण त्या सर्वस्वी अपरिचित वातावरणात देखील फारसं दबकायला वा घाबरायला झाल नाही एवढं पक्क लक्षात आहे. कदाचित त्यामुळे मुलाखत चांगली झाली असावी कारण पुढच्या दोनच दिवसात रिसर्च ऍसिस्टंट या पदासाठी निवड झाली असल्याचं पत्र मला मिळालं

    व्हर्गिस मॅडमकडे एकच रिसर्च ऍसिस्टंटची जागा होती त्यामुळे आम्हा तिघींपैकी एकीला किंवा कदाचित कुणालाच त्या घेणार नाहीत हे माहित होते.  मला नोकरी मिळाल्याच्या आनंद झाला पण माझ्या मैत्रीणींना ती न मिळाल्याचं दुःखही झालं.( पण पुढे थोड्या दिवसांतच अजुन अशाच पोस्ट असल्याचे मला समजले आणि माझ्या मैत्रीणीही माझ्या बरोबर रिसर्च ऍसिस्टंट म्हणून NIBM मध्ये दुसऱ्या लोकांकडे रुजू झाल्या.)

    नोकरी मिळाल्याचा आनंद खूपच होता, एकतर रिझल्ट लागल्यावर महिन्याभरात ती मिळाली.पहिल्या ठिकाणी अर्ज केला काय, इंटरव्ह्यू झाला काय आणि अपॉंट्मेंट मिळाली काय सगळेच स्वप्नमय वाटले, कारण त्या आधीची शिक्षणाची सगळीच वर्षे फारच कटकटीची गेली होती. वडील गेल्याचे दुःख होतेच, आर्थिक अडचणी अनेक होत्या. वडीलांच्या जागेवर बहीणीला नोकरी लावण्याकरीता सरकारी कचेरीत इतके खेटे आणि हेलपाटे घातले होते कि ज्याचे नाव ते. अनेक ठिकाणी अनेक अर्ज पाठवले तिकडे मिळालेली वागणूकही फारशी आशादायक नव्हती ,त्या ऑफिसेस मधे दादांचे एखाद-दुसरे परिचित असत ते आपुलकिने वागत पण एकंदर सगळा कारभार सुन्न करणाराच होता, अखेर शेवटी तिला ती नोकरी मिळाली. या पार्श्वभूमीवर कुठलीही ओळख, वशीला नसताना केवळ माझ्या गुणवत्तेवर मला नोकरी मिळाली यावर माझा विश्वासच बसत नव्हता. रिसर्च ऍसिस्टंट या टेंपररी पोस्ट होत्या,कायम स्वरुपी नोकरी नव्हती ती, पगार देखील ठराविक रक्कम असा, पण माझ्या दृष्टीने ते सारे गौण होते. जायला यायला एक बस होती तिचा स्टॉप सारसबागेपाशी होता. स्टॉपपर्यंत मी सायकलवरुन जात असे. दोन वेळचा चहा ऑफिसकडून (चक्क चकटफू) होता.त्यामुळे बसचे ६५रु सोडले कि वट्ट १३३५ रु मिळणार होते. हि रक्कम माझ्यासाठी भरपूरच होती !

    सर्व बँकाकरीता वेगवेगळे ट्रेनिंग कोर्सेस NIBM मधे घेतले जात तसेच अर्थशास्त्रातील बऱ्याच बाबींवर संशोधन चाले आणि रिसर्च पेपर्स लिहिले जात. मी ज्यांच्याकडे काम करत होते त्या व्हर्गीस मॅडम इंटरनॅशनल फायनान्स मधे काम करत होत्या, त्यांनी एक त्रैमासिक सुरु केले होते (journal of foreign exchange and international finanace ) त्याकरीता बराच डेटा गोळा करणे आणि विविध इण्डेक्सेस बनविणे या करीता मला घेतले होते. मी M.Sc. करताना थोडेफार कम्प्युटर प्रोग्रामिंग शिकले होते, माझ्या कामात प्रोग्रामिंग करणं हि अपेक्षित होतं

    व्हर्गिस मॅडम या NIBM मधील बऱ्याच सिनियर प्रोफेसर होत्या.  उंची पाच फूटाहूनही कमी, गव्हाळ वर्ण, बॉबकट केलेले कुरळे बरेच पांढरे झालेले केस, लहानसर बांधा पण या साऱ्याला भरुन काढणरा आवाज !. त्या आल्या कि कॉरीडॉरमधल्या त्यांच्या आवाजाने पूर्ण मजल्याला त्यांचे अस्तित्व जाणवु लागे. त्या वेळी सगळे फोन ऑपरेटर कडून येत, त्यांच्या बंद दाराच्या केबिन मधुन फोन उचलून त्या ऑपरेटरला ," Get me Asha" असं सांगत ते त्यांच्या पलिकडील तशाच बंद केबिन मधल्या त्यांच्या सेक्रेटरीला ऎकु येई आणि ती ताबडतोब फोन पाशी जावुन बसे. सगळ्या ऑफिसला त्यांचा दरारा होता. त्यांच्या कडकपणाच्या गोष्टी हळुहळू माझ्या कानी पडू लागल्या. पुढच्या वर्ष दिड वर्षात त्याच्या झळाही मी सोसल्या. त्या स्वतः अत्यंत बुध्दीमान कडक शिस्तीच्या, सतत काम करणाऱ्या आणि कामाशी प्रामाणिक अशी व्यक्ती असल्याने प्रत्येकाने तसेच वागले पाहिजे असा त्यांचा अट्टहास असे. सकाळी नऊ-साडेनऊ किंवा कधी त्याहुनही आधी त्या आलेल्या असत आणि पाच नंतरही त्यांना जायची घाई नसे. आमचे टायमींग ९ ते ५ असे होते. जाण्या येण्य़ाला बस असल्यामुळे सकाळी उशीरा येण्य़ाचा प्रश्ण नव्हता, पण जाते वेळी पावणेपाच वाजले आणि त्यांच्या केबीन मध्ये असले तर त्यांना मला पाच वाजता बस आहे असे सांगण्याची हिम्मत होत नसे, बस निघुन गेली तर तेथून घरी जायला दुसरा मार्ग म्हणजे दिड किमी चालत जावुन पी.एम.टी.बस गाठणे ती मिळणे पण मुश्किल असे. मॅडमच्या लक्षात आले तर त्या मला कधी थांब म्हणत नसत, तुझी बस जाईल तू जा, उद्या पुढचे काम करु. वरीष्ठ म्हणून त्यांनी उगाच कधी त्रास दिलेला मला आठवत नाही. माझ्या सुंदर अक्षराचे, नीटनेटक्या कामाचे त्या कौतुक करीत. मला आठवतयं, आमच्या या जरनल साठी रुपयाचा इतर चलनांबरोबरचा भाव आम्हाला इकॉनॉमिक टाइम्स मधुन घ्यावा लागे, पाऊंडचा रेट पी.टी.आय कडून येत असे. त्यावर आधारीत काही इंडेक्स बनवुन त्यांचे रिसर्च चालू होते. एकदा जॉमेट्रिक मिनच्या संदर्भात बरीच किचकट आकडेमोड मी स्टॅंडर्ड रिझल्ट वापरुन कमी करता येईल हे त्यांना सांगितले त्यावेळी तर त्या माझ्यावर खूपच खुष झाल्या. ’All of  you should apply your brain while working , like this girl , what is your name , हा सुबांगी ...’ असं त्या बाकिच्यांना म्हणाल्या.

  जरनल चे काम नेहमीच वेळेत पुरे व्हावे लागे त्यामुळे त्याचे प्रेशर असे, त्यावेळी त्या सगळ्या स्टाफवर भरपूर आरडाओरडा करीत. मला प्रथम जेंव्हा माझी चूक नसताना त्या रागावल्या  मी त्यांना सर्वांसमोर उलट बोलू शकले नाही तेंव्हा असहायता आणि अपमान यामुळे मला अगदी रडू आले. भरपूर चिड्चिड करुन आम्ही बसत होतो त्या हॉलमधुन त्या निघून गेल्या. माझ्या भावनांचा बांध कोसळून माझे डोळे पाझरु लागले. पटकन बाथरुम मधे जावुन मी तोंड धुवुन जागेवर येवुन बसते तोच मॅडमचा फोन आला त्यांनी मला आत  बोलावुन घेतले. माझ्या पाठीवर हात फिरवुन त्या मला सॉरी म्हणाल्या, मग मला कामाचे कसे प्रेशर आहे, मी आता रिटायरमेंट्च्या जवळ आल्याने मला हेल्थ प्रोब्लेम्स आहेत अशा नाना गोष्टी त्यांनी सुनावल्या. माझ्या मनातला राग काही त्यावेळी गेला नाही. चारलोकात अपमान केल्या नंतर वैयक्तिकरित्या माफी मागणे गैर आहे असे मला वाटले अर्थात तसे मी बोलून दाखवले नाही. त्यांच्या वयाची आणि पदाची जेष्ठता आणि मनावरचे संस्कार यामुळे मी गप्प राहिले. आज इतक्या वर्षांनंतर हा प्रसंग आठवतो त्यावेळी मला मॅडमचा अजिबात राग येत नाही, उलट आपल्या चुकीबद्दल इतक्या लहान मुलीची माफी मागण्यातल्या त्यांच्या मनाचा मोठेपणा मला ठळकपणाने जाणवतो. माझ्या बरोबर काम करणाऱ्या त्यांच्या हाताखालच्या सर्वांना त्यांच्या स्वभावाची कल्पना असल्याने त्यांचे रागावणे कुणी फारसे मनावर घेत नसावेत, असा निर्ढावलेपणा आज पंचवीस वर्षांनतरही माझ्यात कितपत आलाय याबद्दल मला शंका आहे. 
   
    जोवर मी त्यांचा ओरडा खाल्ला नव्हता तोवर ऑफिसमधे जायला मला उत्साह होता, रोज नवे काहीतरी शिकायला मिळे. पण वरील प्रसंगानंतर मला ऑफिसला जायचे म्हणजे टेंन्शन वाटू लागले, आज मॅडम कशा वागतील हिच धास्ती मी बाळगून असे. आजवरच्या माझ्या आयुष्यात माझ्या रागीट वडीलांचाही राग माझ्या वाट्याला फार कमी आला होता, शाळा कॉलेजमधे मी कधी कुणाची बोलणी खाल्ली नव्हती. त्यामुळे मॅडमच्या रागाचा मी अतोनात बाऊ करुन घेतला होता (अतोनात असे आता वाटते, त्यावेळी माझी अवस्था बिरबलाच्या वाघासमोरील शेळीसारखी होती)  मी मराठी माध्यमतुन शिकलेली. कॉलेजमधे जरी मी इंग्रजी माध्यमातुन शिकले तरी मैत्रीणी, शिक्षक सगळेच मराठी असल्याने मला इंग्रजी बोलण्याचा सराव अजिबातच नव्हता, घरी टि.व्ही नसल्याने कानावर इंग्रजी पडतही नसे. NIBMमधे मराठी लोक फार कमी होते, आमच्या ग्रुपमधे तर नव्हतेच कोणी मराठी. मन मोकळे करावे अशी कुणी व्यक्ती तेथे मला दिसत नव्हती. पुढे दोन-तीन महिन्यांनी माझ्या मैत्रीणी NIBM मध्येच आल्या मग लंच टाईममधे आम्ही गप्पा मारत असू. पण एकंदरीत मी त्यांच्या वागण्याचा धसका घेतला एवढं खरं. माझ्या या मानसिक त्रासाची मी घरी कुणालाच कल्पना दिली नव्हती. एकतर मला नोकरीची नितांत गरज होती, दुसरी मिळाल्याशिवाय हि सोडणे शक्य नव्हते आणि आईला स्वतःचेच दुःख असल्याने तिला आपले त्रास सांगून तिचे दुःख वाढवावे असे वाटत नव्हते.

     बाहेर नोकरी शोधण्याचे आम्हा तिघींचे जोरदार प्रयत्न चालू होते. त्यावेळी इंटरनेट वगैरे नसल्याने, पेपरमधे येणाऱ्या जाहिराती वाचायच्या , अर्ज पाठवायचे असे चालू असे, बरेच ठिकाणी आयकार्ड वा पासपोर्ट साइजचे फोटो लावावे लागत. फोटोपण आजच्या सारखे सहज मिळत नसत. एक जपून ठेवलेली निगेटीव्ह देवुन फोटो आणायचे. माझ्या एका मैत्रीणीची आई म्हणे,फोटो बरोबर तुमच्या पत्रिकाही पाठवा, ईंटरव्ह्यू कमिटिवर कुणाचा मुलगा, पुतण्या, भाचा असेल तर बघा म्हणावं

     माझी ऑर्डर सहा महिन्यांची होती, त्यानंतर मॅडमनी मला बोलावुन पुन्हा सहा महिने वाढवुन देते असे सांगितले. त्याच वेळी NIBM ची रिसर्च ऍसिस्टंट बाबतची पॉलिसी बदलली, आठ महिन्यांपेक्षा कुणाला जास्त मुदतीवर घेता येणार नाही असा नियम आला,यापूर्वी ३-४ वर्षे रिसर्च ऍसिस्टंट म्हणून काम केलेले लोक होते. त्या नियमामुळॆ माझी पुढली ऑर्डर २ महिन्यांचीच निघाली. ती ऑर्डर घेवुन मी मॅडमकडे गेले. त्यांना या नियमाबद्दल काहीच कल्पना नव्हती ! माझी ऑर्डर बघून त्यांनी डायरेक्ट चिफ ऍडमिनिस्ट्रेटीव्ह ऑफिसरांना फोन लावला, त्यांनी मॅडमना नवीन नियमबद्दल सांगितले, मग त्या NIBMचे डायरेक्टर होते त्यांच्याशी बोलल्या. त्यांनीही नियमावर बोट दाखवले. आमच्या जरनलचे काम कायमस्वरुपी होते, त्यासाठी दर आठ महिन्यांनी बदलणाऱ्य़ा लोकांकडून काम करुन घेणे कठीण आहे असा बराच युक्तिवाद त्यांनी केला पण कुणीच काही होईल असे म्हणत नव्हते.

    मला एकीकडे दोन महिन्यांनी काम संपणार याचे वाईट वाटत होते कारण हातात दुसरे काही नव्हते आणि दुसरीकडे कामातुन सुटका मिळाल्याचा आनंदही होत होता. एकूण मला नेमके काय वाटत होते ते सांगणे अवघड होते. बराच वेळ फोनाफोनी झाल्यावर मॅडम मला म्हणाल्या, ’मला या ऍडमिनिस्ट्रेटीव्ह लोकांमागे धावायला वेळ नाही,पण आपले काम तर  व्हायला हवे, I don't want to lose you ' मी बघते काय करायचं ते.
   
    मी शांतपणॆ कामाला लागले. RBI च्या गव्हर्नरशी मॅडमची चांगली ओळख होती, त्यांच्याशी बोलून त्यांनी या प्रोजेक्ट करीता एक कायमस्वरुपी पोस्ट करायला लावली आणि मला तेथे अर्ज करायला सांगितला. रितसर इंटर्व्ह्य़ू घेवुन त्यांनी मला NIBM मधे कायमस्वरुपी नोकरी दिली. इंटरव्ह्यू होण्यापूर्वी मी त्यांना बाहेर बरेच ठिकाणी अर्ज केले आहेत असे सांगितले होते. त्यावेळी त्या मला म्हणाल्या तू जरुर बाहेर अर्ज कर, तुला याहून चांगली नोकरी मिळाली तर मी तुला अजिबात अडवणार नाही. ही कायम स्वरुपी नोकरी मी वर्षभर देखील केली नाही, मला दुसरी जास्त पगाराची नोकरी मिळाली तेंव्हा १५ दिवसांची नोटीस देवुन NIBM चा मी राजीनामा दिला. मॅडमनी मला experience certificate दिले त्यात माझ्या गुणांचा उल्लेख केला.

    आज इतक्या वर्षांनी मी जेंव्हा या गोष्टींचा विचार करते तेंव्हा मला व्हर्गीस मॅडमच्या मनाच्या मोठेपणाची अधिकाधिक जाणीव होते. आपण नेहमी साऊथ इंडियन्स  त्यांच्या लोकांना मदत करतात, ग्रुप करुन राहतात असे बोलतो. मॅडम केरळी होत्या, पण त्यांच्या हाताखाली मराठी, ओडीसी, युपी,केरळी असे सगळ्या प्रकारचे लोक होते. सगळ्यांशी त्या सारखे पणाने वागत.चुका दाखवताना त्या मुलाहिजा ठेवत नसत पण चांगल्या कामाची पावती देतानाही त्यांचा हात आखडता नसे. दर नाताळला सगळ्या स्टाफला त्या केक खायला घालत. कामाशिवाय बडबड केलेली त्यांना खपत नसे पण त्या स्वतः देखील कुणाशी कामाखेरीज बोलत बसत नसत. आपल्या कामासाठी अधिकाराचा वापर करुन त्यांनी पोस्ट मागून घेतली पण त्यावर त्यांनी स्वतःच्या नात्या,ओळखीतल्या व्यक्तीला लावुन घेतले नाहीच.इतकेच नाही तर माझ्यासारख्या सर्वस्वी अपरिचित मुलीला ती जागा दिल्यावरही त्यांनी माझ्याशी वागताना खूप उपकार केलेत तुझ्यावर असे जाणवून दिले नाही. मी नोकरी सोडतानाही त्या मला काही बोलल्या नाहीत. मी अर्थशास्त्र वाचावे, त्यामध्ये संशोधन करावे याबद्दल त्या मला नेहमी सांगत, मी तुला लागेल ती मदत करेन असेही म्हणत पण तो विषय मला कधी आवडलाच नाही. पैसा या विषयाबद्दल मी कायमच उदासिन आहे, गरज होती तेंव्हा तो मिळावण्यासाठी खूप धडपड केली तरी त्यावेळी सुध्दा त्याची स्वप्ने मी कधी बघितली नाहित. खूप पैसा म्हणजे श्रीमंती अशी माझी कल्पना तेंव्हाही नव्हती आता तर नाहीच. परिचितांच्या वाढदिवसाच्या तारखा, आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटनांच्या तारखा वर्षे माझ्या लक्षात राहतात. पण बाजारातून वस्तू आणली की घरी येईपर्य़ंत त्याची किंमत मी विसरते. आपल्याला पुरेसा पैसा मिळावा, हवा तसा खर्च करता यावा, गरजू व्यक्तीला मदत करता यावी एवढीच माझी त्याबद्दलची अपेक्षा आहे, लहानपणापासून ’अंथरूण पाहून पाय पसरावे’ या मध्यमवर्गीय संस्कारामुळे चैनीच्या कल्पनाही फार उंच नव्हत्याच त्यामुळे फार मोठे आकडे घेरीच आणतात मला. या सगळ्यामुळे अर्थशास्त्र या विषयात मी कधी रस घेवु शकलेच नाही. आता कधी कधी वाटते, त्या वेळी माझे चुकले का?  एखादा निर्णय घेताना त्यावेळी त्या परिस्थितीचा विचार करुन तो घेतलेला असतो, काळ लोटतो तसा परिस्थितीचा विसर पडतो, त्यामुळे तेंव्हा तसे करायला नको होते असे वाटते.

     व्हर्गीस मॅडमचा मोठेपणा जाणवण्यासाठी त्यांच्यापासून दूर जावे लागले, त्यांच्या सहवासात कदाचित त्यांचे रागावणे,चिडणे हेच सतत जाणवत राहिले असते. NIBM ही निमसरकारी संस्था होती. तेथेही बरेच राजकारण होते, पदोन्नत्तीसाठी वशीलेबाजी होती, हेवेदावे होते.पण मला ते जाणवले नाहीत.माझ्या वाट्याला आल्या त्या व्हर्गीस मॅडम कडक होत्या, पण निःस्पृह होत्या. त्यांच्याबद्दल इतरांच्या मनात आदरयुक्त भिती होती. संस्कृतमधे एक सुभाषित आहे ’नागुणी गुणिनं वेत्ति गुणि गुणिषु मत्सरि गुणी च गुणरागीच विरलः सरलो जन:’ म्हणजे अवगुणी लोकांना गुणी लोकांची कदर नसते, गुणी लोक दुसऱ्या गुणी व्यक्तीचा द्वेष करतात, स्वतः गुणी असून गुणी माणसाचा आदर करणारी सरळ माणसे फार  विरळी (क्वचित) आढळतात. खरं तर अशा ’विरळा’ लोकांमुळे संस्था मोठ्या होतात. माझ्या पहिल्याच नोकरीमध्ये मला त्यांच्यासारखी थोर व्यक्ती बॉस म्हणून लाभल्या हे माझे मोठे भाग्यच म्हणायला हवे. आपल्या वैयक्तिक फायद्याकरीता वरीष्ठांच्या पुढे पुढे करणे मॅडमनी केले नाही तसेच त्यांच्याशी असे वागणे त्यांनी खपवून घेतले नाही. अर्थशास्त्र नाही पण कामाबद्दल कळकळ,आपल्या संस्थेबद्दल निष्ठा अशा बऱ्याच गोष्टी मी त्यांच्याकडून शिकले. या सगळ्याचा पुढील जीवनामध्ये मला खूप फायदा झाला. मॅडमचे ऋण मी कधीच विसरु शकणार नाही. 


Tuesday, July 9, 2013

देव तारी त्याला ...... उत्तराखंडात पुराने झालेल्या भीषण हानीची वर्णने टि.व्ही वर बघुन आणि त्या संदर्भातल्या बातम्या वाचून मन सुन्न झाले नाही असा दर्शक विरळा. दरवर्षी इतक्या प्रचंड संख्येने भाविक चारधाम यात्रेला जातात. त्यावेळी त्यांची नोंद,त्यांचे शारीरिक स्वास्थ्य(फिजिकल फिटनेस) बघितला जातो का? असे बरेच प्रश्ण या संदर्भात ऐरणीवर आले आहेत. पूरग्रस्तांचे पुर्नवसन आणि मृतांच्या नातलगांना मदत म्ह्णून जमा होणाऱ्या कोट्यावधीच्या निधी पेक्षा ,हिमालय़ातील भौगोलिक परिस्थिती, तिथल्या बदलत्या हवामानाचा अभ्यास करुन आधीच काही योजना राबवत्या आल्या नसत्या का? बेकायदेशीर बांधकामे,हवामानखात्याने दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष अशी अनेक कारणे या मनुष्य हानी बद्दल दिली जात आहेत. विचार करावा तितका त्रास फार होतो. मोक्ष मिळावा म्हणून यात्रा करायची तर ती करताना मरण आले तर मग त्याचे दुःख कशासाठी असा विचार ही आल्याशिवाय राहत नाही. मात्र अशा पधद्तीने आलेला हा शेवटचा दिस ’गोड’ खचितच नाही. माझ्या नणंदेने हि यात्रा नुकतीच केली , तिचा हा अनुभव माझ्या शब्दात.


      केदारनाथच्या रस्त्यावर पोहोचताना संध्याकाळ होवुन गेली.रस्त्यावर वहानांची तुफान गर्दी. पुण्यातुन गर्दी, ट्रॅफिक जामला कंटाळुन इकडे आलो तर त्याने काही पिच्छा  सोडलेला नाही.शिवाय इथले अगदिच अरुंद रस्ते, एका बाजुला खडा पहाड आणि दुसरीकडे खोल दरी. इकडचे ड्रायव्हर बाकी शांत आणि समजुतदार. एवढ्या गर्दीतुन शांतपणे मार्ग काढीत असतात. उगीच कुणाला शिव्यागाळी नाही, कर्णकर्कश्श आवाजात हॉर्न वाजवत मागच्याला ओव्हरटेक कराय़चे, आपल्या पुढे गेलेल्यावर दातओठ खात त्याला ओव्हरटेक करायचे असा प्रकार नाही. गौरीकुंडला पोहोचताना तिन्हीसांज होवुन गेली होती अंधारुन आले ते आभाळ भरुन आल्यामुळे. दिवसभरचा प्रवास, अरुंद रस्त्यांमधुन वाट काढीत येताना जीव मुठीत धरल्यामुळे खूपच शीण जाणवत होता. समोर दिसणाऱ्या एका बऱ्या लॉजवर जागा मिळवली.कधी एकदा पाठ टेकतो असे होवुन गेले होते. पहाटे पाच उठुन केदारनाथ कडे रवाना व्हायचे ठरले होते.बरोबरच्या सगळ्यांशी तसे बोलुन झोपलो.

    डोळे मिटल्यावर तीस-बत्तीस वर्षांपूर्वी आई-दादांबरोबर चार-धाम यात्रा केली होती ते दिवस साकारले. किती शांतता होती तेंव्हा ! रस्त्यावर तुरळक गर्दी. पाऊस देखील अजिबात नव्हता. धर्मशाळेतही मोजकी माणसे. पहाटे उठून चालायला सुरुवात केली. आईला दम लागायचा म्हणून तिच्याकरीता घोडा केला होता, मी आणि दादा पायी जाणार होतो.दादा भराभर पुढे जात होते,त्यांच्या हातात जपाची माळ असे.मी घोड्याबरोबर चाललेली.अरुंद वाट ,पाय घसरायची भिती होती पण घोड्याचा पाय घसरला तर आईचे काय होईल याचीच काळजी असल्याने मी आईची पाठ सोडत नव्हते, आजुबाजुला बघताना त्या अरुंद वाटेचा विसर पडला.काय मनोहर दृष्य होते ते! आभाळाला भिडणारे उंच वृक्ष, बर्फाच्छादित हिमालयाची शिखरे कोवळ्या उन्हात सोन्यासारखी चमकणारी. आजुबाजुला यात्रेकरुंचा मेळा. काही घोड्यावर जाणारी,काही डोलीतुन जाणारी काही माझ्यासारखी पायी चालणारी. लहान वय आणि पहिल्यांदाच बघायला मिळालेली ती अफाट निसर्गसंपदा यामुळे चालण्याचे श्रम मुळी जाणवलेच नाही. केदारनाथच्या मंदिरात दादांनी सोवळे नेसुन रुद्राभिषेक केला. दादांचा धीरगंभी्र आवाज कानी येतोय असे वाटताना डोळा लागला.

    पावसाच्या आवाजानेच जाग आली. आन्हिके उरकुन निघालो. चिखल,पाऊस आणि गर्दी यामुळे चालण्याचा बेत मी रहितच केला.आमचे सहप्रवासी आधीपासूनच घोड्यावरुन जाणार होते. घोडे ठरवले. घोड्यावरुन जाताना चिखल पाऊस,गर्दी यामुळे वाट कधी संपतीय असं होवुन गेलं. आजुबाजुच्या रमणीय निसर्गाचा विसरच पडला होता जणू. मनात देवाचे नाव येत होते पण ते जीव वाचावा यासाठी. मंदिराजवळ पोहोचायला दहा वाजले. अलोट गर्दीने परिसर फुलून गेला होता. हेलिकॉप्टर मधुन येणाऱ्या भाविकांना तात्काळ गाभाऱ्यात प्रवेश होता. पैसा असला कि सगळी कामे कशी चुटकी सरशी होतात , याला देवदर्शन पण अपवाद नव्हते.  तिरुपतीला हा भेदभाव बघितला होता.पण भोळा आणि विरागी म्हणून प्रसिध्द असा शिव देखील या पैसेवाल्यांमुळे सामान्यांना उशीरा दर्शन देतो हे बघुन नवल वाटले. रांगेत उभे राहुन दर्शनाची प्रतीक्षा करताना तीन चार तास गेले. त्यातही तिथले पंडीत(पांडे) लोकांकडून प्रत्येकी १०००-२००० रु घेऊन त्यांना पुढे घुसवत होते. हताश पणे हे बघण्याशिवाय आमच्या हातात काहीच नव्हते.

    दोन वाजता आत जायला मिळाले.गर्दीच्या लोढ्य़ांमधुन सरकत जमेल तसे मनोभावे दर्शन घेतले.गाभाऱ्यात शांती आणि मांगल्याचा अभावच होता. गर्दी, घाई यामुळे मी मिटल्या डोळ्यापुढे लहानपणी बघितलेला देखावा आणला आणि नमस्कार करुन बाहेर पडले. आता बद्रिनाथला जायचे होते. येताना परत घोड्यावरुन गर्दीतुन वाट काढत निघालो. पाऊस नव्हता. परतताना हिरवाई, बर्फाच्छादित शिखरे यामुळे मन प्रसन्न झाले होते. गर्दी,चिखल सगळ्याचा विसर पडला.निसर्ग शोभेचा आस्वाद घेत खाली उतरलो आणि बद्रिनाथकडे रवाना झालो. जातानाही भरपूर गर्दीमुळे पोचायला बराच उशीर झाला.बद्रीनाथला चालावे लगत नाही.देवळाजवळ पर्यंत गाडी जाते.तिथेही गर्दीमुळे दर्शनाला उशीर. पण त्या सगळ्याची एव्हाना सवय झाली होती. दर्शन घेवुन परत आलो. आमचा ड्रायव्हर आमची वाटच बघत होता. केदारनाथला ढगफुटी होवुन खूप पाऊस झाला आहे. वातावरण ठिक नाही आपण तडक हरीद्वारला जायला हवे असे त्याने सांगितले. विचार कराय़लाही वेळ नव्हता.ड्रायव्हरच्या आवाजावरुन धोक्याची पुसट कल्पना आली.येताना गर्दीमुळे झालेल्या उशीराने परतायला वेळ लागणार याची कल्पना आलेली होती. शिवाय आता दोन धामांचे दर्शन झालेले होते तेंव्हा परतणे शहाणपणाचे ठरेल असा विचार करुन निघालो.

    गोविंद घाटीला येताना दुपारचे दोन वाजले होते. तिथे रस्त्यावर वाहनांची अशी काही गर्दी होती कि बोलता सोय नाही. गोगलगायीच्या गतीने आम्ही दोन तासात शंभर मीटर तरी पुढे सरकलो असू किंवा नसू. चार नंतर तर गाडी बंद करुन ठेवली ड्रायव्हरने. हताश पणे पुढचे वाहन सरकण्याची वाट बघण्याखेरीज हातात काहीच नव्हते.रात्रीचे नऊ वाजले तरी परिस्थितीत काहीच फरक नव्हता.तेंव्हा हि रात्र इथेच काढायचा आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला. ड्रायव्हरलाही झोपेची नितांत गरज होती. गाडी थोडी मागे घेवुन थांबवली.खाली उतरुन एका लॉज मधे आम्ही खोल्या मिळावल्या.पहाटे सहा वाजता निघयचे ठरले.

    आता गर्दी कमी झाली असेल आपण दुपारी चार पर्यंत हरिद्वारला जावु असे म्हणत सकाळी गाडीत बसलो. पण कसलं काय ? गाडी मुंगीच्याच वेगान, गर्दीतुन पुढे सरकत होती. सकाळचे १० वाजुन गेले , आम्ही १० ते २० किमी पुढे आलो होतो, अशा वेगाने आम्हाला हरिद्वारला जायला किती वेळ लागेल याचा हिशेब प्रत्येक जण मनात करत असला तरी बोलून दाखवायचा कुणालाच धीर होत नव्हता.१२ वाजुन गेले, गाडी जरा कडेला घेवुन खाणी पिणी उरकली. चार वाजले , सहा वाजले.घड्य़ाळ पळत होते, गाडी गर्दीतून मंद गतीने सरकत होती. मन चिडचीड, वैताग आणि काळजीने व्याकुळ झाले होते.कुणालाच कुणाशी बोलायचे त्राण नव्हते. प्रत्येकाचे मोबाईल वाजत, चौकशा होत.जमेल तशी उत्तरे दिली जात. माझ्या मुलाचाही फोन आला. त्याचा आवाज ऐकून मला गहिवरुन आले. "आम्ही हरीद्वारला निघालोय, रस्त्यावर खूप गर्दी आहे रे, गाडी हलता हलत नाही बघ. तू जरा प्रार्थना कर रे, आम्ही सुखरूप येण्य़ासाठी." "आई, याल तुम्ही सुखरुप, काळजी नको करु. हरिद्वारला पण थांबू नका, लगेच दिल्लीला यायला निघा , करतो मी परत दोन तासांनी फोन, फोन बंद कर, दोन तासांनी परत ऑन कर नाहीतर बॅटरी संपेल"  त्याच्या आवाजाने आणि त्याच्याशी बोलल्यावर जरा बरे वाटले मला. पर्समधुन जपाची माळ काढली, जप करायला सुरुवात केली.मन अजिबात ऐकत नव्हते,पण तरीही जमेल तसे नामस्मरण करीत होते. आता भोवतालच्या परिस्थितीचा स्विकार करायची तयारी झाली. गाडी हळूहळू का होईना चालली आहे,  आपण निश्चित पोहोचणार आहोत असे मनाला बजावत जप चालू होता. नऊ वाजून गेले.

    हरीद्वार अजून ५० किमी तरी असावे, ड्रायव्हर म्हणाला, रात्री मी गाडी चालवणार नाही. आता पुन्हा मुक्कामासाठी ठिकाण शोधा, सकाळी पुन्हा गर्दी असणार, आम्हा सगळ्यांनाच कधी एकदा हरीद्वारला जातोय असे झालेले. सगळ्यांनी मिळुन त्याला हरीद्वार पर्य़ंत जाण्याची विनवणी केली. जास्त पैसे देण्याचे अमिषही दाखवले. शेवटी तो तयार झाला. रात्रीच्या अंधारात आमचा प्रवास चालू राहिला. बाहेर अखंड पाऊस पडत होता. पुलावर आमची गाडी दोन तास अडकून होती. निम्मा पूल ओलांडला आणि बघितले तर एक झाड  पडून रस्ता अरूंद झाला होता, आमच्या गाडीतले चार -पाच पुरुष खाली उतरले त्या सगळ्यांनी मिळून झाड थोडे बाजुला सरकवले. गाडी जायला रस्ता केला. ते गाडीत भिजून, गारठून आणि दमुन आले, पुढचा थोडा वेळ त्यांना टॉवेल देण्यात बाहेरच्या पावसाचे, मागच्या पुढच्या गर्दीचे वर्णन ऐकण्यात गेला. एरवी गाडी सुरु झाली कि माझे डोळे मिटतात. चालत्या गाडीतून पळती झाडे पाहिलेली मला काही आठवत नाही. पण यावेळी माझी झोप पळाली होती.तहान ,भुकेची जाणीवही नष्ट झाली होती. हरीद्वारला पोचणे हा एकमेव ध्यास आम्हा सगळ्यांना लागला होता. ड्रायव्हर बिचारा गाडी चालवत होता. पहाटेचे तीन वाजून गेले. आता गाडीने थोडा वेग घेतला. पावसाचा जोरही काहिसा कमी झाला असावा. पाच वाजता आम्ही हरीद्वारला पोचलो.

    हरीद्वारला दोन दिवस रहावे असे वाटत होते  मनातुन पण सकाळी दहा वाजता हरीद्वार सोडले आणि दिल्लीला जाणाऱ्या बस मधे बसलो. हरीद्वारपासून हरीद्वारपर्यंत अशी आम्ही मिनी बस ठरवली होती. त्या बस ड्रायव्हरने पाच सहा दिवस फार चांगली गाडी चालवली. त्याचे आभार मानले, त्याला ज्यादा पैसेही दिले.पण तरीही जास्त बोलायला वेळ मिळाला नाही. दिल्लीच्या बसमधे बसलो. प्रवासाने अंग अंबुन गेले होते.दिल्लीच्या बसमधे मला जरा झोप लागली. दिल्लीत ऊतरलो. हॉटेलमधे पोहोचल्यावर फोन चालू केला. १०-१५ मिस्ड कॉल्स होते, भावाचा,मैत्रीणींचे. अंघोळ आदि आन्हिके उरकून सहज टि.व्ही लावला. उत्तराखंडात पुराने घातलेल्या थैमानाच्या बातम्या बघताना मी मटकन खालीच बसले. आदल्या रात्री ज्या पुलावर आम्ही दोन तास अडकलो होतो, तो पूल पहाटे वाहून गेला होता. बद्रीनाथ, केदारनाथ कडील लोकांचा हरीद्वारशी संपर्क तुटला होता. बाकीच्या बातम्या आणि वर्णने सर्वांना माहित आहेतच. मानवाने निसर्गाची केलेली पायमल्ली, नदीच्या दोन्ही तीरावर केलेली अनधिकृत बांधकामे ,पांड्याने केलेले देवाचे बाजारीकरण यामुळे शिवाने तिसरा डोळा उघडून हा प्रलय घडवला असे सगळे बोलत होते. मुलगा मला दिल्लीला ताबडतोब निघुन या, असे का म्हणत होता त्याचा बोध झाला. इतक्या मिस्ड कॉल्स चा संदर्भ लागला.  आम्ही कसे वाचलो याचा मी सारखा विचार करत होते.
   
      केवळ नशिबवान म्ह्णून आम्ही सहिसलामत सुटलो.  आमच्या मागे चाललेल्या या प्रचंड हाःहाकारा विषयी अगदीच अनभिज्ञ होतो आम्ही. हरीद्वारला पोहोचणे हे एकच ध्येय ठ्वुन  मार्गक्रमणा करीत होतो.  क्रांतीकारकाचा इंग्रजानी केलेला , किंवा शिवाजी महाराजांचा सिध्दी जोहारने केलेला पाठलाग मला आठवला. साक्षात काळ आमचा असाच पाठलाग करीत होता.  शंकराने हृदयी जपलेला रामनामाचा मंत्र मी करत होते. माझे वडील हा जप तिन्ही त्रिकाळ करीत, मलाही जप करावा असे नेहमी सांगत, कदाचित त्याने आमचे रक्षण केले असेल, काही असेल  काळ आलेला होता पण वेळ आली नव्हती म्हणूनच आम्ही पुण्य़ापर्यंत सुखरुप पोहोचलो.