Saturday, February 2, 2013

माणसांची पारख

      जम्मुला निघालेल्या ट्रेनने आम्ही दोघे प्रवास करीत होतो. हिमालयात ट्रेकींगकरीता निघालो होतो.युथ होस्टेलच्या डलहौसी कॅंपला जायचे होते. चार वर्षाच्या मुलीला आजीकडे ठेवुन मी प्रथमच निघाले होते. रोज नोकरीसाठी तिला घरी सोडून जाणे वेगळे आणि हे तीन आठवडे तिला सोडून रहाणे वेगळे. जाण्याआधी तिच्याशी बोलताना मी माझ्याच मनाची तयारी करीत असे.
"मी खूप दिवस जाणार आहे, तू राहशील ना? आजीला त्रास द्यायचा नाही, हट्ट करायचा नाही"
" हो गं, किती वेळा तेच ते सांगतेस, शहाण्यासरखं वागायचं, पसारा करायचा नाही, न सांगता कुठे जायचं नाही.... "तीच सुरु कराय़ची.
"तुला काय आणू येताना ?."
दर वेळी तिची यादी वेगळी असे, एकदा म्हणाली "तुझ्यासारख्या साड्या, ड्रेस आण"
मी विचारले ,"कशाला?"
"अगं तू खूऽऽप दिवसांनी येणार ना.. मग मी तुझ्याएवढी मोठ्ठी झालेली असेन ना ! "
नवरा म्हणाला ," बघ तिची तुला १५ वर्षे सोडून रहायची तयारी झालीय आणि तू उगाच रडत आहेस"

 मला तिला सोडून रहाण्याचे, पहिल्यांदाच हिमालयात ट्रेकिंगला जायचे टेन्शन होतेच. लग्नानंतर घर संसार, नोकरी यातून व्यायामाला वेळ मिळतच नव्हता. मुळात व्यायामाची फारशी गोडी नव्हतीच. त्यामुळे रोज १५-२० किमी चालणे जमेल का? हि काळजी होती. तसा सिंहगडला चारपाच वेळा जावुन सराव केला होता पण खात्री वाटत नव्हती.नवरा शिवछत्रपती पुरस्कार विजेता, खो-खो, १०० मी धावणे यात वाकबगार, महाराष्ट्रातले सगळॆ गड पालथे घातलेला, दर रविवारी नेमाने सिंहगड चढून येणारा असल्याने नेहमी पहिला नंबर मिळवणाऱ्या मुलाबरोबर एखाद्या काठावर पास होणाऱ्या विद्यार्थ्याला रहायची वेळ आली कि त्याचे जसे होईल तसे माझे झाले होते. मनात प्रचंड न्यूनगंड होता. प्रवासातही माझ्या मनात तेच विचार होते. पुणे जम्मू तसा बराच मोठा प्रवास. गाडी नेहमीप्रमाणे लेट् होती. ट्रेकिंगचे सामान प्रचंड असल्याने वाचायला काही घेतले नव्हते. आम्हाला पठाणकोटला उतरुन पुढे बसने डलहौसीला जायचे होते. आता दोन तीस तासावर पठाणकोट आहे असे सहप्रवाशांकडून समजले. प्रवास संपत आला कि कंटाळा आणखीच वाढू लागतो.

 दोन दिवस एकत्र प्रवास केल्याने आजुबाजुच्या लोकांशी थोड्या ओळखी झाल्या होत्या. आमच्या समोर एक मध्यमवयीन गृहस्थ होते. ते एकटेच प्रवास करीत होते.  ते पठाणकोटलाच उतरणार असे समजले. ते इंडीयन नेव्हीमध्ये काम करीत होते. बोलता बोलता माझ्या वर्गातील एक मुलगा १२वी नंतर नेव्हीत गेला असे मी सांगितले, त्यांनी त्याचे नाव विचारले मी नाव सांगितल्यावर ते गृहस्थ माझ्या वर्गातील मुलाला नुसते ओळखतच नव्हते तर, त्याचे मित्रच निघाले.  मग ते आमच्याशी खूपच आपुलकिने बोलू लागले. आम्हाला म्हणाले तुम्ही माझ्या घरी चला आज मुक्काम करा उद्या सकाळी मी तुम्हाला डलहौसीच्या बस मध्ये बसवून देईन  वगैरे..

      समोरच्या माणसावर माझा पटकन विश्वास बसतो. आपल्याला कुणी फसवेल असे माझ्या सहसा मनात येत नाही. उगाच कोणी कुणाशी वाईट वागत नाही.असे माझे म्हणणे. माझे वडील देखील नेहमी म्हणत "माणसं वाईट नसतात, परिस्थिती त्यांना तसं बनवते." त्यामुळे "तुला माणसांची पारख नाही" असे मला कायम घरच्यांकडून ऐकावे लागते.

  सदर गृहस्थाने आम्हाला घरी येण्याचा आग्रह केला त्यावेळी मात्र माझ्या डोळ्यापुढे रेल्वेत सहप्रवाशांनी खायला घालून बेशुध्द केले नंतर लुबाडले, अशा आशयाच्या वाचलेल्या अनेक बातम्या आल्या. हा माणूस नेव्हीत असेल कशावरून? तो आपल्याला घरी नेवुन काय करेल? अशा अनेक शंका-कुशंका मनात येवु लागल्या. रमेश(नवरा) आणि तो माणूस खूप जुनी ओळख असल्याप्रमाणे बोलत होते, त्यांच्या सततच्या आग्रहामुळे घरी येण्याचे रमेशने कबूल केले, आम्ही राहणार मात्र नाही चहा घेवु,फ्रेश होवु मग डलहौसीला जाऊ असे ठरले.. त्यावेळी मोबाईल फोन फारसे आलेले नव्हते. रमेशना उतरल्यावर त्यांच्या ऑफिसमधे फोन करायचा होता,
’तुमच्या घरी फोन आहे का?’ रमेशने विचारले
’आम्ही नव्या घरी नुकतेच शिफ्ट् झाल्याने फोनचे कनेक्शन आलेले नाही, पण घराजवळच एस्.टी.डी बूथ आहे.’
माझ्याकडे बघत रमेश म्हणाले, "ही तुमच्या घरात थांबेल, मी येईन फोन करुन"
माझ्या मनात पुन्हा कसले कसले विचार सुरु झाले,त्या माणसासमोर मला बोलता येईना. या माणसाची आपली ओळख ना देख , खुशाल त्याच्याघरी मला बसवून हा माणूस फोन करायला जाणार , इकडे माझा गळा दाबून खून सुध्दा होवु शकतो. नुसत्या कल्पनेने बसल्या जागी माझ्या घशाला कोरड पडली. कुठून मला बुध्दी झाली आणि मी या अनोळख्याला माझ्या वर्गमित्राची (मित्र तो नव्हताच माझा कधी, केवळ माहित होते) ओळख दिली.. माझा नवरा तरी असा कसा त्या माणसाच्या प्रत्येक बोलण्याला माना डोलावतोय. काय करावे मला सुचेनासे झाले होते.
’घरी कोण कोण आहे तुमच्या ’ धाडस करुन मी विचारले
’ बायको आहे, दोन मुली आहेत मुलगा आहे पण तो शिकायला परगावी असतो...’
तरीपण मनात शंकाची जाळी होतीच. आधी कधी एकदा पठाणकोट येतयं, असं वाटणाऱ्या मला शक्य तितक्या उशीराच येवुदे पठाणकोट असं वाटायला लागलं होतं. रमेश आणि तो माणुस दोघांच्या गप्पा रंगात आल्या होत्या.खिडकी बाहेर हिरवीगार गव्हाची शेते लांबवर पसरलेली दिसत होती. वातावरणात प्रच्ंड गारठा होता. गेल्या पन्नास वर्षात नव्हती एवढी थंडी त्या वर्षी होती. वातावरण खर तर खूप छान होतं पण  मी वेड्यावाकड्या विचारांच्या आवर्तात सापडले होते, डोळे मिटले तरी आजवर वाचलेल्या,ऐकलेल्या फसवाफसवीच्या बातम्या आठवत होत्या. डिसेंबर महिना होता,दिवस लहान होते.सहा वाजत असतील नसतील , तरी काळोख झालेला होता. थंड वारे सुटले होते.खिडकीतून बाहेर बघण्यात काही अर्थ नव्हता.

      अखेर शेवटी पठाणकोट आले. सामान उतरवाय़लाही त्या गॄहस्थांनी मदत केली. शहराचे प्रथम दर्शन फारसे चांगले नव्हते. रस्त्यावर सायकल रिक्षांचीच गर्दी होती.आमचे सामन एका सायकल रिक्षेत ठेवायला सुरुवात केली, सामानानेच रिक्षा भरुन गेली होती.सामानाला टेकू म्हणून मी बसले. ते दोघे मागून चालू लागले. स्टेशनच्या जवळच घर आहे असे ते आधीच म्हणाले होते. १५-२० मिनिटांच्या प्रवासानंतर घर आले.
 त्यांच्या मुली बऱ्याच मोठ्या कॉलेजमधे शिकत असाव्यात,पटकन पुढे आल्या.आम्ही कोण असे विचारताच ’मित्र आहे माझा’असे त्यांनी सांगितले. त्यांच्या बायकोने मोठ्या प्रेमाने आमचे स्वागत केले. मुलींना शेगडी पेटवायला सांगितली, गरम पाणी दिले हातपाय धुवायला. गरमागरम चहा प्यायलावर जरा बरे वाटले. रमेशबरोबर ते फोन करायला बाहेर गेले.  मुलींनी शेगडी आणुन ठेवली. मधल्या चौकात मी शेकत बसले. त्या दोघी माझ्याशी गप्पा मारता मरता कामे करत होत्या, त्यांची आई स्वयंपाकघरात स्वयंपाकाच्या तयारीत होती , बोलताना त्यांची कोणी नातेवाईक बाळंतीण झाल्याचे समजले तिला डबा करुन न्यायचा होता त्यांना, त्यातच आम्ही अगांतुकासारखे गेलो होतो, पण कुणाच्याच चेहऱ्यावर तसे भाव नव्हते उलट आमच्यासाठी काय करु आणि काय नको असे त्यांना झाले होते. त्या तिघी देखील तुम्ही आज रहा, उद्या सकाळी जा डलहौसीला, असे म्हणत होत्या. त्या दिवशी डलहौसीला रिपोर्ट करणे जरुरीचे होतेच.फारशी ओळख नसताना त्यांना त्रास देणे जिवावर आले होते.

       रमेश  फोन करुन आले, तोवर त्यांचा स्वयंपाक तयार झाला. वाफाळता बासमती तांदळाचा भात , हरबऱ्याच्या डाळीची आमटी आणि लाल भोपळ्याचे घारगे.हरबऱ्याच्या डाळीची आमटी मी पहिल्यांदाच खाल्ली. आपल्याकडे आपण पुरण पोळी केली कि कटाची आमटी करतो पण त्यात डाळ नसते. हरबऱ्याच्या डाळीच्या डाळींब्या मोठ्या दिसत होत्या, पण आमटीची चव मात्र झक्कास होती. हिरवी मिरची आणि आल्याचे बरीक तुकडे घातले होते त्यात. गरम गरम जेवणाची मजा थंडीत काही औरच असते. दोन दिवसांच्या प्रवासानंतर इतके सुग्रास जेवण ते देखील आयते ! वाढणाऱ्यांच्या चेहऱ्यावर आगत्य,आपुलकी माया.
 मला मात्र जेवताना फारच अपराधी वाटत होते. किती वाईट विचार केले होते मी गेल्या दोन तासात. माणसाच्या चांगुलपणावरचा विश्वास मी का घालवून बसले होते? कदाचित लहान मुलीचा विरह, ट्रेकींगबद्दलची भिती यामुळे माझे मन नकारात्मक विचारांनी भरुन गेले होते. आपण पेपरात, टि.व्हीवर देखील वाईट बातम्याच मोठ्या प्रमाणात वाचतो त्यामुळे देखील समोरचा माणूस चांगल्या भावनेने बोलतोय हे आपल्याला जाणवत नसावे.

 "जेवना पोटभर, मुलीची आठवण येते का?"  ती माऊली मोठ्या मायेने माझ्या पाठीवर हात ठेवीत म्हणाली. गळ्यातला हुंदका मोठ्या निकराने गिळून हसत हसत मी म्हणाले, "तसं नाही खूप छान झालाय़ स्वयंपांक "
"रहा ना आजच्या दिवस,सकाळी लवकर असेल ना गाडी.." मुलगी म्हणाली
तिचा अग्रह मोडवत नव्हता,पण जाणे जरुर होते.  आमच्या सामानातले खाऊचे पाकीट त्या मुलींजवळ देवुन जायला निघालो. येताना परत या असे त्या परत परत म्हणत होत्या. रीक्षा आणली बसून निघालो. ते सद्गृहस्थ आम्हाला सोडायला एस.टी.स्टॅंड वर आले. त्यांनी सामान चढवायलाही मदत केली. ट्रेकिंग संपल्यावर नक्की या असा त्यांनीही आग्रह केला.

   "तुला माणसांची पारख नाही" घरच्य़ांचे  विधान मी पुन्हा एकदा सिध्द केले.