Thursday, January 9, 2014

आईची समाजसेवा

          माझ्या आईचा घरादारालाच नाही तर आमच्या साऱ्या गल्लीलाच धाक होता. तिचं व्यक्तिमत्वही भारदस्त होतं. माझ्या लहानपणातली आठवण आहे, आम्ही तेंव्हा एस.पी. कॉलेज मागच्या चाळीमधे रहात होतो.पलीकडच्या चाळीत कॉलेजच्या चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी रहायचे.त्यातील एका शिपायाचा मोठा मुलगा यशवंत उर्फ येशा दारु पिऊन धिंगाणा घालत असे. त्याच्या तरुण बायकोला मारहाणसुध्दा करायचा. आमच्या बाजुला नेहमीच आवाज येत नसे,पण एकदा बराच ओरडा झाल्याने त्यांच्या घरासमोर बरीच गर्दी जमली होती.तो खोलीत बायकोला मारत होता, माझ्या आईच्या कानावर जाताच ती घरातले काम टाकुन तिकडे गेली.गर्दीतुन त्यांच्या घरात शिरली आतल्या खोलीत दार लावुन तो शिव्या देत बायकोला बडवत होता.तिचा रडण्याचा आवाज येत होता.आईने दाराची कडी जोरात आपटली त्याहुन वरच्या पट्टीतल्या आवाजात त्याला हाक मारली आणि दार उघडायला लावले. दार उघडताच त्याच्या बायकोला हाताला धरुन बाहेर काढले आणि त्याला खोलीत ठेवुन खोलीचे दार बाहेरुन लावुन ती बाहेर पडली. बाहेर उभ्या असलेल्यांवरही तिने ," नुसते बघत काय बसला होतात? या पोरीचा जीव गेल्यावर तुम्ही पोलिसांना कळावणार होतात का?" असा जाब विचारत त्या मुलीला घेवुन ती आमच्या घरी आली.
दुसऱ्या दिवशी दारु उतरल्यावर येशा खली मान घलुन आमच्या घरी आला. आईची माफी मागत म्हणू लागला," माझं चुकलं, तुम्ही मला आईसारख्या आहात...."
त्याबरोबर उसळून आई म्हणाली, "तुझ्यासारखा दारुडा मुलगा मला नको, अरे चांगली हौशीनी एवढी गुणी पोर करुन आणालीस आणि तिला मारतोस? लाज कशी वाटत नाही तुला? माझ्या समोर शपथ घे पुन्हा असं वागणार नाही तस वागुन दाखव, मगच मला आई म्हण "

    पुरग्रस्तांसाठी वसविण्यात आलेल्या सहकारनगरमधे आम्ही रहायला गेलो त्यावेळी तो भाग पुण्याच्या बाहेर वाटायचा.सगळी शेतजमीनच होती ती.बांधकामे चालू होती.रस्ते देखील मातीचेच होते. रहावयास आलेले लोकही फार नव्हते. आमच्या घरासमोरच्या घरांमागे पटांगण होते तेथे बांधकामावर काम करणऱ्या कामगारांच्या झोपड्या होत्या. एक दिवस आईला बराचवेळ कुणी बाई रडत असल्याचा आवाज येत होता. तिची सकाळची कामे उरकल्यावर तिला आवाज जास्तच जाणवु लागला. घरात चैन पडेना तिला. घर  बंद करुन ती आवजाचा शोध घ्यायला बाहेर पडली. पटांगणातील झोपडीमधे एक लमाण बाई, बाई कसली वीस-बाविशीतली मुलगी रडताना तिला सापडली. तिचं तान्ह मुल देवाघरी गेलं होतं , वस्तीतली मोठी बायका आणि पुरुष माणसे कुठेतरी बांधकामावर गेलेली होती.तिच्या मांडीवर तिचं लेकरु गतप्राण झालेलं होतं.दुःखान उर फुटुन ती रडत होती, आजुबाजुला वस्तीतली एक दोन लहान मुलं कावरीबावरी होवुन बसलेली होती. ते दृष्य मोठं विदारक होतं, आईनं तिला शांत केलं हि घटना मोठी माणसं कामावर गेल्यावर झाली होती सकाळ पासुन त्य़ा पोरीच्या आणि त्या मुलांच्या पोटात काही गेलेल नव्हत. आई घरी आली घरातल अन्न घेवुन पुन्हा तिकडे गेली त्या सगळ्यांना तिन खाय़ला लावल. त्यावेळी फोनही फारसे नव्हते मग मोबाइल तर दुरच.शिवाय त्या पोरीला काम कुठे चाललय हेही माहित नव्हत , मग तिकडे जावुन त्या लोकांना आणण्याचा प्रश्ण नव्हताच. संध्याकाळी अंधार पडल्यावर त्या वस्तीतुन पुन्हा रडणे सुरु झाले, आई पुन्हा तिकडे गेली त्या मुलाला मोठी माणसे स्मशानात घेवुन गेली ती परत आल्यावर आईने त्यांना चहा नेवुन दिला, भात -पिठल पाठवल. मुलं आजारी पडली कि लगेच उपाय करा म्हणजे हि वेळ येणार नाही हे सांगाय़लाही ती विसरली नाही. पुढे बरीच वर्षे बांधकामाच्या निमित्तानं ह्या झोपड्या आमच्या भागात असायच्या, तिथली मुलं सर्दी -खोकल्यानं आजारी पडली तर आई बागेतला गवती चहा, पारीजातकाची पान,आल्याचा तुकडा देवुन त्याचा काढा कराय़ला सांगायची, आमच्या कडे काढा तयार असला तर तोच त्यांना द्यायची.

    सोसायटीत घराघरांतुन छोट्या-मोठ्या कुरबरी चालत. येथे रहायला आलेली मंडळी बहुतेक नारायण-शनिवार पेठांमधल्या वाड्य़ातुन, चाळीतुन आलेली त्यामुळे फ्लॅट,बंगले संस्कृती त्यांच्या अंगवळणी पडलेली नव्हती. दारे -खिडक्या उघड्याच असत सगळ्या घरांच्या. त्यामुळे आवाज गल्लीभर ऐकायला येत, शिवाय वाहने नव्हतीच त्यावेळी. समोरच्या घरांतील एकांकडे नवीन सून आली होती आणि तिच्याशी घरचे पटवुन घेत नसत. एकदा त्यांच्या घरातुन बराच आरडाओरडा ऐकू येत होता. आजुबजुच्या घरातुन सगळे तमाशा बघत होते. आई तिकडे गेली, तिच्या ठेवणीतल्या आवाजाने तिने सगळ्यांना शांत केले. नव्या सुनेला घेवुन ती आमच्या घरी आली. तिने सासरच्या लोकांचा तक्रारीचा पाढा वाचायला सुरुवात केली. तिचे माहेर दूर भुसावळला होते. भावाने कर्ज काढुन लग्न करुन दिले होते. माहेरी कळवुन त्या लोकांना त्रास देणे तिला नको वाटत होते. तिचा बी.ए. चा एक पेपर राहिला होता. आई तिला म्हणाली, " तुझ्या घरच्या भांडणांबद्दल मला काही सांगु नको, घरोघरी तेच चालत. तू रिकामी बसू नको, अभ्यास करुन पदवी मिळव, माझ्या घरी अभ्यासाला येवुन बस. जवळ कामगार कल्याण केंद्र आहे, तिथे जावुन शिवण शिक. चार पैसे कमवायला लाग. भांडण आपोआप कमी होतील"

    आमच्या पलिकडच्या सोसायटीत एक सरकारी ऑफिसर रहात होते ते सैन्यातुन निवृत्त होवुन मग एका डिफेन्स ऑफिसमधे नोकरीला होते, त्यांच्या मुलाला जन्मतः कानामध्ये दोष होता, त्याला कमी ऐकू येई, शाळेत अभ्यासात कमी पडल्यावरच हि बाब त्यांच्या लक्षात आली. तो मुलगा आमच्या घरी शिकायला येत होता. आई त्याला शिकवत असे. घरी केलेला प्रत्येक खाऊ त्याच्याकरता आई ठेवत होती. पुढे तो मोठा होवुन बॅंकेत नोकरी लागला. आईकडे पेढे द्यायला आला होता.तेंव्हा म्हणाला, " बाई मी लहानपणी किती दंगा करायचो, शाळेत मुले मला चिडवायची. शाळेत शिकवलेले मला समजायचे नाही , मार्क मिळायचे नाहित त्यामुळे  मी माझ्या बाबांचा खूप मार खाल्लाय. तुम्ही एकट्या मला कधी रागावला नाहीत माझ्याशी नेहमीच प्रेमानी वागलात. तुमच्यामुळेच मी आज नोकरी मिळवू शकलो."

    सोसायटीत आमच्या शेजारी सातारचे एक बिऱ्हाड आले त्यांच्या बायकोला के.ई.एम मधे नोकरी होती त्या नर्स होत्या. त्यांना शिफ्ट ड्युटी असे. त्यांच्या लहान मुलाचा सांभाळण्याचा प्रश्ण होता. त्यावेळी पाळणाघरे फारशी नव्हती. आणि त्यांच्या वेळात म्हणजे अवेळी असलेल्या नोकरीमुळे पाळणाघर मिळत नव्हते. त्या आईकडे आल्या आईने सहज त्यांच्या मुलाला सांभाळण्याची जबाबदारी घेतली.

        मी एन.आय.बी.एम.मधे नोकरीला असताना आमच्या ग्रुपमधे एक केरळी ख्रिश्चन ऑफिसर आले होते त्यांचे पहिले नाव विल्सन होते. त्यांना मुलगा झाला, तो वजनाने कमी होता आणि त्यांच्या बायको्ची तब्येतही गंभीर होती.हे ऑफिसर पुण्यात नवीनच असल्याने त्यांचे कुणी नातलग पुण्यात नव्हते, पुण्यात त्यांचे कुणी मित्रही नव्हते. त्यांच्या बाळाला सारसबागेजवळील अजेय जोशींच्या हॉस्पीटल मधे ठेवले होते, बायको के.इ.एम. मधे ऍडमीट होती. दोन्ही ठिकाणी थांबणे त्यांना जमणार नव्हते. त्यांची अडचण मी सहज आईला सांगितली. ती लगेच म्हणाली, " मी जाईन की जोशी हॉस्पीटलमधे बाळाजवळ थांबेन मी, त्यांना सांग काही काळजी करु नका मी तू ऑफिसला गेलीस कि आवरुन डबा घेवुन तिथे जाऊन बसेन" म्हटल्याप्रमाणे ती तेथे गेली. विल्सन साहेबांना इंग्लिश आणि मल्याळी येत होते, त्यांना हिंदी मराठीचा गंध नव्हता.  ते आल्यावर आई त्यांच्याशी कुठल्या भाषेत बोलली तिलाच माहित. पुढे मी एन.आय.बी.एम. सोडली. नंतर दोन -तीन वर्षांनी माझे लग्न झाल्यानंतर माझ्या नवीन ऑफिसचा नंबर शोधुन त्यांनी मला फोन केला आणि ते परदेशात जात असल्याचे सांगितले जाण्यापूर्वी त्यांना मला आणि माझ्या आईला भेटायचे होते. वेळ ठरवुन ते माझ्या घरी आले, आईलाही मी माझ्या घरी(सासरी) बोलावले होते. त्यांनीच माझ्या घरी सगळी कथा सांगितली आणि त्यांचा तो लहानगा आता चांगला  तीन-चार वर्षांचा गोंडस मुलगा झाला होता, त्यालाही ते आईबद्दल सांगत होते.

     कित्येक ओळखीच्या मुलींची लग्ने तिने जमवली. दूर गावाहून नव्याने सासरी आलेल्या आमच्या सोसायटीतल्या सुनांना आमच्या कडे आल्यावर माहेरी आल्यासारखं वाटे. आमची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हतीच, दादांची सरकारी नोकरी होती.घरात नेहमीच पाहुणे असत.आम्ही तिघी बहिणी. आई संसाराला हातभार म्हणुन शिवण शिवायची. छोट्या-मोठ्या शिकवण्या घ्यायची. पण कुणालाही मदत करताना तिने आपल्या फाय़द्याचा कधी विचार केला नाही. तिने मदत केल्यामुळे कल्याण झालेल्या अनेकांनी नंतर तिची विचारपुसही केली नाही याचा कधीतरी तिला त्रास होई ,पण तरी तिने तिचा दुसऱ्याला उपयोगी पडण्याचा मार्ग तिने सोडला नाही. हे सगळं ती चांगुलपणा मिळावा म्हणून करत होती असंही नाही.वेळ प्रसंगी वाईटपणा घ्यायची देखील तिची तयारी होती.  अतिशय परखड आणि स्पष्ट बोलण्याचा तिचा स्वभाव होता. माझ्या बहिणीची एक मैत्रीण कॉलेजमधे जाऊ लागली आणि नकळत्या वयात एका मुलाच्या प्रेमात पडली.घरी हि बातमी समजली होती आणि तिच्या घरुन तिला अभ्यास कर हे वय नाही लग्नाचं अशी समज दिली जात होती.ती त्या मुलाबरोबर पळून जाणार होती आणि या कामात तिला माझ्या बहिणीची किंवा माझी मदत हवी होती. एक दिवस ती घरी आली आणि मला तिने घराच्या बाहेर नेले अंगणात हलक्या आवाजात ती मला सांगत होती आई आतुन कधी बाहेर आली आम्हाला समजलेच नाही.तिने आमचे बोलणे थोडेफार ऐकले असावे.तिने मैत्रीणीचा हातच धरला आणि तिला तिच्या घरी नेले. तिच्या बाबांच्या ताब्यात तिला देवुन आई घरी आली या गोष्टीची तिने कुठेही वाच्यता केली नाही. तो मुलगा लफंगा होता,वयाने बराच मोठा फारसा न शिकलेला उनाडक्या करणारा होता असे नंतर समजले. तिच्या वडीलांनी नंतर घरी येवुन आईचे आभार मानले , आईच्या अगदी पायाच पडायचे त्यांनी शिल्लक ठेवले होते. त्यांच्या मुलीला आईने मोठ्या संकटातुन वाचवले होते. मैत्रीणीच्या नजरेत आई बरेच दिवस खलनायिकाच होती. आमच्या मैत्रीवर त्याचा परीणाम झालाच काही दिवस. अशा असंख्य आठवणी आहेत. काही आमच्या समोर घडलेल्या तर कित्येक आम्हाला माहितही नसलेल्या.

    मला काय करायचय? त्यांचं ते बघुन घेतील असा विचार करणारी आजची पिढी, नव्हे आमचीही पिढी बघताना आईच्या या वागण्यातलं मोठेपण फार जाणवतं. हल्ली मुलांच्या आत्महत्या, तरूण वयात येणा्रे वैफल्य,नैराश्य यांसारखे वाढते मानसिक आजार आणि वाढत्या समुपदेशकांची संख्या बघताना मला आईची सतत आठवण येते. आपण आजुबाजुला न बघता आपल्या कोषात वावरतो, शेजारच्यांच्या अडचणी आपल्याला दिसत नाहीत, दिसल्या तरी तिथे बोलावल्याशिवाय जाणे हे असभ्यपणाचे लक्षण आहे असे आपल्याला वाटते. शेजारच्या गल्लीत झालेल्या आत्महत्येची बातमी आपल्याला पेपरमधे किंवा टि.व्ही वरुन समजते.त्याबद्दल हल्लीच्या पिढीला, बदलत्या समाजाला आपण दुषणे देतो.पांढरपेशा समाजातील कातडीबचाऊ वृत्ती आम्ही अंगी बाणवल्यामुळे समाजात हे वाढते प्रश्ण निर्माण होत आहेत.अशा वेळी आईचे अडचणीत असलेल्यांच्या घरात विचार न करता घुसुन त्यांची अडचण निवारण्यासाठी मार्ग सुचविणे, प्रसंगी कठोर होणे हे केवढ मोठं काम होत ते आता समजतं. माझी आई काही फार शिकलेली नव्हती, जुन्या काळात मुलींना शिकवायची फारशी तयारी नसे, तिने घरच्यांशी भांडुन मॅट्रीकपर्यंतचे शिक्षण मिळवले होते.पुढे लग्नानंतर आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने  शिकायची आवड असून तिला शिकायला मिळाले नव्हते. पण तिच्याजवळ दुरदृष्टी होती. शिक्षण नसलं तरी तिची हुशारी तिच्या कामात, वागण्यात दिसायचीच. सामजिक बांधिलकीचा तर तिला कधीच विसर पडलेला नव्हता. आम्हाला कधी कधी आई हे कशाला करतीय असं वाटे. पण ती आमची पर्वा न करता सगळ्यांच्या मदतीला धावायचीच.  आईमधले हे कुठलेच गुण माझ्यात आले नाहीत.तिचा तोंडावर आमचे कौतुक न करण्याचा स्वभाव मात्र मी घेतला. आज ती या जगात नाही. तिच्या सतत दुसऱ्याच्यासाठी काही करणाऱ्या हातांना कंपवात झाला होता. तिच्या वेदना आम्हाला बघवत नव्हत्या. दिड वर्षापूर्वी त्यातुन तिची कायमची सुटका झाली. संक्रातीच्या आदला म्हणजे भोगी हा तिचा जन्मदिवस होता. त्यामुळेच कदाचित तोंडावर गोड बोलणे, तोंडदेखले गोड बोलणे किंबहुना गोड बोलणे तिला कधी जमलेच नाही. तिच्या पश्चात तिच्या असंख्य गुणांपैकी काहींचे स्मरण आणि वर्णन करावे असे आज मनापासुन वाटले. तिच्या जयंतीला माझ्याकडुन  तिला ही शाब्दिक श्रध्दांजली !