Tuesday, March 24, 2009

आजी

’अतिपरीचयात अवज्ञा’ हि उक्ती कोणतीही व्यक्ती काय, वस्तू काय किंवा ठिकाण काय सगळ्यांच्या बाबतीत अगदी खरी आहे. जवळच्या व्यक्तींबाबत, त्यांच्या गुणांबाबत तर फारच.
सध्याच्या विभक्त कुटुंब पध्द्तीत स्वंतत्र बाण्याने राहणे आपल्या आणि आपल्या मुलांच्या इतके आंगवळणी पडलयं,की कुणाकडे जायचे ते ही रहायला म्हणजे मुलांच्या अंगावर काटा आलाच. तिकडे स्वतंत्र खोली,स्वतंत्र टॉयलेट मिळणार का?,जेवायला काय असेल? अशा प्रश्णांपासून तेथे कोणाशी कसे,काय किती बोलावे लागेल ? अशा अनंत शंका.
हल्ली बहुतेकांना एक-दॊन मुलेच असतात त्यामुळे एक मुलगा असण्याची शक्यताही जास्तच असते, मुलगा सून दोघेही नोकरी करत असतील तर सगळयांनी एकत्र राहणे उभयपक्षी सोयीचे असते, तरीही तसे राहणे दोघांनाही अतिशय त्रासदायक ठरते हि वस्तुस्थिती आहे.सासू-सुनेचे न पटणे हे त्रिकालाबाधित सत्य आहे, त्याला कोणी जनरेशन गॅप म्हणा किंवा सत्तेची हाव म्हणा.
या साऱ्या गोष्टी बघताना मला माझ्या आजीची राहून राहून आठवण येते. तिच्या असामान्य गुणांची( जे अता असामान्य वाटतात) सतत जाणीव होते. आणि आपण किती कमी आहोत ते जाणवते.
माझी आजी पूर्वीच्या काळाप्रमाणेच फारशी शिकलेली नव्हती,तिला वाचता यायचे पण लिहिता येत नाही असे म्हणायची.सही करायची वेळ आलीच तर स्वतःचे नाव लिहिलेला कागद समोर ठेवून त्यात बघत लिहिताना मी तिला पाहिले आहे, पण एकंदरीत लिहिणे नाहीच. व्यवहारज्ञान तिला फारसे नव्हतेच. जहांबाजपणाचा पूर्ण अभाव. खेड्यात वाढलेल्या लोकांमध्ये आढळणारा बेरकीपणाही तिच्यात नव्हता.थोडक्यात अगदी साधी -भोळी ,फारशी न शिकलेली ,व्यवहारशून्य अशी ती होती.पण तिच्यात काही असे गुण होते कि ते केवळ अनमॊल होते.
फार लहान वयात तिच्यावर वैधव्याची कुऱ्हाड कोसळली तिच्या पदरी सात मुले आणि कुणाचाच आधार नाही.अगदी माहेरच्यांचा देखील. मोठा मुलागा १६ वर्षांचा धाकटी मुलगी दिड वर्षाची. अशा परिस्थितीत तिने आपले दुःख, दारिद्र्य कुणालाच न दाखवता दिवस काढले.तिच्या सुदैवाने मुले चांगली होती.त्यांनी जबाबदाऱ्या उचलल्या, तिने मुलांना चांगले वागा, चांगल्या मार्गाने जा एवढेच सांगितले.
मला आठवते त्यावेळी आमची परिस्थिती खूपच बरी होती, माझे वडील आजीचा मोठा मुलगा असल्याने त्यांनी व माझ्या आईने कुटुंब वर आणण्यासठी बरेच कष्ट घेतले,माझ्या दुसऱ्या काकांनीही त्यांना साथ दिली. धाकट्या भावांना शिकवले,बहिणींची लग्ने केलेली होती. आजीला पाच सुना आल्या होत्या, लेकी सासरी गेल्या होत्या. बरीच नातवंडे होती. आजीचा मुक्काम पाचही मुलांकडे आलटून पालटून असे. आजी आली की आम्हांला किती आनंद व्हायचा. घरात आली की ती घरचीच होऊन जाई. समोर दिसेल ते काम करणार, समोर येईल ते आनंदाने खाणार. तिच्या सगळ्या मुलांची आर्थिक परिस्थिती काही सारखी नव्हती. माझे धाकटे काका शिकल्याने त्यांची सांपत्तिक स्थिती आमच्या पेक्षा चांगली असे, पण आजीला सगळे सारखे होते. तिने नातवंडाशी वागताना कधी भेदभाव केला नाही. आमच्याकडे पाटावर जेवली, काकांकडे डायनिंग टेबलावर. भोरची जमीन सारवणारी आजी पुण्यात फरशी पुसायलाही पुढे असायची, कामाचा तिला कंटाळा नसायचाच आणि कुणाकडूनही आली तरी तिकडच्या चहाड्या केल्यात, चुगल्या सांगितल्या असे मला कध्धीच आठवत नाही. कुणी विचरले तरी चांगले तेवढे सांगणार, आज वाटतं तिने हे कसे जमवले असेल! पाच वगवेगळ्या घरांतून आलेल्या वेगवेगळ्या स्वभावाच्या सुनांशी पट्वून घेताना तिला काहीच जडं गेलं नसेल का? तिचे कुणाशीच भांडण झाले नाही, वादविवाद तर तिला जमतच नव्हते. तिने आपल्या जुन्या दिवसांची दुःखे कधी कुणाजवळ गायली नाहीत. आमच्या आत्याकडून ,आईकडून आम्हाला तिच्या कष्टांच्या,वाईट दिवसांबद्दलच्या कथा कळल्या.आजीने मात्र भूतकाळातील त्रासाचा कधी चुकुन पाढा वाचला नाही. नव्या पिढीला मिळणाऱ्या (म्हणजे तिच्या सुनांना) मिळणाऱ्या सुखाबद्द्ल बोटे मोडली नाहीत.
आजी खूप वाचायची.तिचे मन मोठे रसिक होते.तिला सिनेमा,नाटक,गाण्याचे कार्यक्रम यांची फार आवड होती. मात्र ती स्वतः हुन एखाद्या कार्यक्रमाला मला न्या,असे कुणाला म्हणत नसे. माझे दादा तिला आवर्जून गणपती दाखवायला नेत, त्यावेळी अतिशय उत्साहाने ती निघे,माझे पायच दुखतात, आता मी कशाला येऊ? तरूण वयात माझी हौस नाही झाली आता कशाला? असे रडगाणे तिने कधी गायले नाही. आजीची कुठलीच हौस मौज झाली नाही याची तिच्या मुलांना इतकी जाणीव होती की माझे काका,दादा तिला समजून तिला सिनेमाला नेत,नाट्क दाखवत.ती पण त्या साऱ्यांचा मनापासून आस्वाद घेत असे.मी लहान असताना सारस बागेजवळील सणस पटांगणात ते विजेवर चालणारे जाएंट व्हिल आले होते, मला आठवतयं आम्ही सगळे गेलॊ होतो,आजी आमच्या बरोबर होती.दादा म्हणाले,’इंदा(आजीचे नाव इंदिरा तिला सगळे इंदा म्हणत) बसतेस का या पाळण्यात? ’ आजी तयार झाली.आमच्या बरोबर बसलीसुध्दा. एकमेकांना समजून वागण्याचा आजीचा गुण अगदी घेण्यासारखा आहे. तिच्या हौशीपेक्षा मुलगे आपल्यासाठी एवढं करताहेत, याच तिला फार समाधान असे आणि त्यांच्या आनंदात सहभागी होताना ती पूर्वायुष्याचा उल्लेख टाळत असे.
दुसऱ्याचे मन जाणणे जसे तिला जमे तसे मुलांच्या संसारात घरच्या सारखे काम केले तरी तिने कधी कुठ्ले नियम कुणावर लादले नाहीत. तिचे देवधर्म तिच्यापुरते असत. जेवणापूर्वी देवदर्शनाला जायचे असा तिचा नेम होता.कुठलाही देव तिला चालत असे.जिथे रहायची त्या घराजवळचे जे देऊळ असेल तेथे जाऊन मगच ती जेवायची.तिने मुलांना कधी देवाचे अमूक करा,तमुक करा असे सांगितले नाही,सुनांनाही तसेच. माझी एक काकू खूप धार्मिक आहे, ती सोवळे-ऒवळे,देवधर्म खूप साक्षॊपाने करीत असे. आजीने तिला विरोध केला नाही, आणि ती करते तसे तुम्ही करा म्हणून इतर सुनांनाही सांगितले नाही. भोरला आमचे घर आहे. माझे काका तिथे राहात . काका काकू दोघेही शाळेत नोकरी करीत.दर सुट्टीला आम्ही भोरला जायचो. मी कॉलेजला जाऊ लागे पर्यंत यात खंड पडला नव्हता. आजीशी गप्पा मारायला मला आवडे. मी आजीची जरा जास्त लाडकी असल्याचा माझ्या इतर भावंडांचा आरोप असे.पण मला वाटतं , मी सगळ्यात जास्त तिच्याशी बोलत असे,त्यामुळे तिला माझ्या बद्दल जास्त प्रेम वाटत असावं. तक्रार करण्याचा तिचा स्वभावच नसल्याने वय झाल्यावर माणसाला रिकामपण खायला ऊठ्तं. कोणी बोलायला नसतं असं आपण सध्या सतत वाचतो, ऎकतॊ. आजीलाही तसं होत असेल. मी तिच्याशी बोलत असल्याने ती मला सतत रहायचा आग्रह करायची. सोमवारी सकाळी निघायचं , म्हट्लं की म्हणायची अगं जेवून जा, जेवण झाल्यावर म्हणायची , उन्हं उतरु दे मग निघ. आता चारचा चहा झाला की जा, मग आता दिवेलागणीला कशाला जातीस? पुण्याला जाईतॊ अंधार पडेल, उद्या माझा मंगळवार आहे, साबुदाण्याची खिचडी करू, खाऊन जा.मंगळ्वार असाच जायचा, बुधवारी म्हणायची जाशी बुधी येशील कधी? नको गं , बुधवारी नको जाऊ. असं करीत ती मला ठेऊन घ्यायची.मला तिच्याकडे रहायला आवडायचे.
तिच्या लहानपणीच्या आठवणी ती सांगायची, माझ्या नवऱ्याबद्दल, संसारिक जीवनाबद्दल मला काही विचारु नकोस या अटीवर ती पक्की होती.तिचे कटू अनुभव तिने कधीच कुणाला नाही सांगितले. कधी कधी मला म्हणे,’मी रोज इथे संध्याकाळी ओट्यावर बसते ना, किती जोडपी फिरायला जात असतात, आमच्यावेळी नवऱ्याबरोबर बोलायला मिळायची मारामार. हल्लीच्या मुलींना रोज नवऱ्याबरोबर फिरायला मिळतं, पण बघ, बोलत काय असतात, तुमची आई मला अस्सं म्हणाली, तुमची बहीण परवा तस्सं वागली! ’ मी विचारी,’मग, आजी त्यांनी काय बोलायला हवं?’ आजी म्हणायची,’अगं,घरच्याच कटकटी बाहेर कशाला? जरा काही वेगळं बोलावं, झाडं,पक्षी, निसर्ग किती विषय आहेत!’ तिला बहुदा त्यांनी रोमॅंटिक गप्पा माराव्या असं म्हणायच असेल, पण मी नात त्यातून लग्नं न झालेली. आजच्या पिढीला जे फिरण्याच सुखं मिळतयं , त्याचा त्यांनी योग्य वापर करावा, आनंदानं जगावं असं तिला वाटे.
आज सकारात्मक दृष्टीकॊन ठेवा, म्हणून मानसोपचार तज्ज्ञ, सामुपदेशक सांगत असतात. वेगवेगळ्या मासिकांमधून,वर्तमानपत्रांमधूनही याबद्द्ल सतत वाचायला मिळते.आजीचा अतिशय सकारात्मक दृष्टीकॊन असे.ती म्हणे घरात नेहमी चांगलं बोलावं, वास्तुपुरुषाचा घरात वास असतो, तो तथास्तु म्हणत असतो. खरं, खोटं त्यावेळी कळतं नसे. आमच्या आत्यांची लग्न जमायला बरेच त्रास पडले, परिस्थिती हे एक कारण होतचं, पण आजी शांत असे, म्हणे, तुम्हाला देवाने इथे पाठवलयं, त्यावेळी तुमच्या नवऱ्यालाही पाठवलयं तो आपल्याला मिळत नाही इतकचं, वेळ आली की जमेल.तिची सौंदर्याची व्याख्या सुद्धा अगदी सोपी होती, नाक,कान डॊळे जागच्या जागी असले कि झाले, ती व्यक्ति सुंदर, त्यामुळे आम्ही सगळी नातवंडे सुंदरच, त्यात डावं,उजवं करायचा प्रश्णच यायचा नाही. तिला पाच मुलगे होते,पण पुढच्या पिढीत आम्ही मुली संख्येने जास्त होतो.आम्ही तर तीन बहिणी. आजीने त्या बद्दल खंत दाखवली नाही.मुलींचाच नाहीतर सुनांनाही जुन्या काळातली असून तिने त्याबाबत दुखावले नाही.मुली म्हणून घरात आम्हांला कधी दुय्यम वागणूक मिळाली नाही. माझी सगळ्यात लहान बहीण जन्मतः कमी वजनाची होती.त्यामुळे तिचे बारसे करायला नको,असे आईचे म्हणणे होते.आजी म्हणाली,’तुमची तिसरी मुलगी असली तरी तिचा पहिलाच जन्म आहे, बारसे हा संस्कार असतो, तो करु या. उद्या ती मोठी होईल, हुशार निघेल, शिकेल,मग आपल्याला वाटेल,हिचे बारसे काही आपण केले नाही आणि दुर्दैवाने ती नाहीच जगली तर तिचे काही झाले नाही अशी खंत नको.’
आजीला लहान मुलांचा फार लळा असे. कुणाचही मुलं ती प्रमाने घ्यायची,त्याला घरात असेल तो खाऊ त्यांना देणार. रस्त्यावरच्या भिकाऱ्यांची, बांधकामावरच्या वडाऱ्यांची पाण्याचा स्पर्श न झालेल्या अस्वच्छ मुलांशी प्रेमाने बोलताना बघून मला नवल वाटे, क्वचित आजीचा रागही येई, कुणालाही घरात बोलावून खाऊ द्यावा म्हणजे काय? पण आज तिच्यातले संतपण जाणवतं. आपण कुत्र्याच्या मागे तूप घेऊन जाणाऱ्या नामदेवाच्या गोष्टी वाचल्या, महाराच्या पोराला कडेवर घेणाऱ्या एकनाथांचे चरीत्र वाचले पण यातले फार थोडे वाचूनही सहज आचरणात आणणारी आजी किती थोर होती. नवरा गेल्यावर तिचे फार हाल झाले होते, तिच्या चुलत जावा,चुलत सासु,सासरे तिला त्रास देत, टाकून बोलत, तिच्या मुलांबद्दलही कोणी फारसे प्रेमाने बोलत नसत. मात्र त्या चुलत घरातला मुलगा (माझा काका) आजीच्या घरी तिच्या मुलांमध्ये खेळायला येई आणि आजी त्याला मुलांबरोबर प्रेमाने जेवायला घाली. मला बोलता बोलता सांगे,’अगं त्यांच्या घरचं, दुधा तुपातलं जेवणं सोडून तो आमच्या बरोबर आमटी भात खायचा’
’आजी , तुला त्याचा राग नाही यायचा?’
’कशाबद्दल ?’ ’
’तुला त्याच्या घरचे सगळे किती बोलायचे, अपमान करायचे ना!’
’अगं, त्याबद्दल या लेकरावर कातावून काय होणार? त्याचा काय दोष ?’
घरातल्या मोठ्य़ा माणसांवरचा राग आपल्या मुलांवर काढणारे लोक असतात. ऑफीसमधे त्रास झाला की बायका मुलांवर खेकसणारे महाभाग असतात, आणि आजी तिला सासुरवास करणाऱ्या माणसांच्या मुलांवरही कधी कातावली नाही. तिच्या संस्कारमुळे म्हणा, तिच्या सहवासाने म्हणा आमच्या चुलत, आते भावंडामध्येही एकमेकांबद्दल जिव्हाळा आहे. मोठ्य़ा माणसांमध्ये मतभेद झाले, रुसवे फुगवे झाले तरी संबंध तोडून टाकण्याइतकी वेळ कधी आली नाही.आज आम्ही एकमेकांकडे फारसे जात येत नसू, प्रत्येकाच्या व्यापामुळे ते जमतही नाही पण कुणाच्याही अडीअडचणीला आणि समारंभाला गेल्यावाचून रहात नाही. दुसऱ्याच्या दुःखात माणूस सहभागी होऊ शकतॊ, पण त्याच्या आनंदात तितक्याच आनंदाने जायला मनाचा मोठेपणा लागतो. आजीमध्ये तो पुरेपूर होता. मलाही तो वारसा थोड्या प्रमाणात मिळाला असावा, कुणाच्याही उत्कर्षाचा मला हेवा वाटत नाही.
सुखाने चढून जाणेही आजीला माहीत नव्हते, तिचे मुलगे चांगले शिकले. माझे एक काका तर B.Sc, M.Sc(stats). दोन्ही परीक्षांमध्ये विद्यापीठामध्ये पहिले आले, सुवर्ण पदक् मिळविले, पुण्यातल्या नामवंत कॉलेज मध्ये प्रचार्य झाले, आजीला या गोष्टीचे कौतुक होते.पण तिने कधीही मुलाच्या नावावर मीपणा दाखवला नाही. देवाची कृपा आणि त्याचे परिश्रम यालाच तिने श्रेय दिले.
असे किती गुण सांगावे, आठ्वावे तितके थोडेच आहेत.एक आणखी आठवण, मला आत्याकडून समजलेली.नंतर आजीला विचारलेली. आजीला सात बहिणी होत्या, हिच सगळ्यात धाकटी.आणि एक भाऊ होता. आजीच्या आईला सात भाऊच म्हणजे आजीला सात मामा होते.त्यांनी आपल्या एकुलत्या एक बहिणीचा मुलगा स्वतः कडे ठेवून त्याला शिकविले.त्या काळात तो डॉक्टर झाला होता. मध्यप्रदेशात इंदौर ला तो असे. २-३ वर्षातून एकदा तो आजीला माहेरपणाला घेवुन जाई. त्यावेळी सासरचे लोक एखाद दुसरे मूल (अगदी तान्हे ,दुसरे जरा मोठे) घेऊन जा, असे सांगत. भोरहुन पुण्याला बसने आले, कि पुढील प्रवास रेल्वेने. आजीचा भाऊ स्वतः फर्स्ट क्लासमध्ये बसे आजीचे थर्ड क्लासचे तिकीट काढलेले असे. हे ऎकुनच माझा संताप झाला. आजीला तरी कसा स्वाभिमान नसावा! कशाला जावे तिने भावाबरोबर? मी तिला चिडूनच विचारले. ती थंडच
’शुभे, माझा भाऊ मला न्यायला यायचा हे काय कमी होते? त्यामुळे माझी , माझ्या आई-वडिलांशी भेट होत होती ना?’
’पण मग तो स्वतः फर्स्ट क्लासमध्ये..’
’अगं, एवढा मोठा डॉक्टर तो, तो कसा ग, थर्ड क्लासमध्ये बसेल? आणि मला काय फरक पडतॊ कुठेही बसले तरी , कायम थोडच गाडीत बसायचय? शिवाय कुठ्ल्याही डब्यात बसले तरी गाडी अखेरी मुक्कामाला जाणारच ना?’
’मग तुला का नाही न्यायचा फर्स्ट क्लासमधून?, होता ना मोठा डॉक्टर तो?’
’होता ना, पण असं बघ, त्याला काय मी एकटीच बहीण होते, आम्ही सात जणी, तो किती करेल? शिवाय त्याची बायको, तिलाही सांभाळुन घ्यायला नको का? नाहितर तिला वाटायच, या एवढ्या नणंदांचं माहेरपण करुन आम्हाला काय शिल्लक राहणार? शेवटी जिच्याबरोबर आयुष्य काढायचं तिचं मन सांभाळणं महत्वाचं, आपण आपल्या भावाला समजून घ्यायला नको का? माझा त्याच्यावर काडीचा राग नाही बरं’
कुठ्ल्याही डब्यात बसले तरी गाडी अखेरी मुक्कामाला जाणारच हेच आजीचे समाधानी जगण्याचे रहस्य होते.त्यामुळेच तिला बंगला, वाडा, चाळ कुठेही राहताना आडचण नसे.तिचा शेवट्चा दिस गोड व्हावा, म्हणून तिने अट्टहास केला नाही.सहज जगत होती, पण तिचे असे जगणे ही देवाला बघवले नाही. तिच्या उतारवयात माझ्या वडिलांचा मृत्यू झाला.हा घाव सोसणे तिला फार जड गेले. तिचे पूर्वायुष्यातील आठवणींनी कधीही न भरणारे डोळे सतत गळू लागले. माझं काय चुकलं? देवाला मी कशी नाही दिसले? माझ्या आधी त्याला का नेलं? असं ती वारंवार म्हणायची. कुठल्याही विषयाचा शेवट दादांच्या जाण्यापाशी आणायची. त्यांच्या पश्यात आमच्या घरी ती फारशी नाही आली, त्या घरात मला अपराधी वाटतं असं म्हणे. तरी तिच्या डोळ्याची ऑपरेशन्स झाली होती तेंव्हा आमच्याघरी आली. मी तिच्या डोळ्यात औषध घालायची. तेव्हां मला तुला बंगलेवाला, मोटारवाला नवरा मिळेल, असा तोंड भरून आशीर्वाद द्यायची. तिच्या बॅगेच्या तळाशी माझ्या दादांनी तिला लिहिलेली पत्रे तिने जपून ठेवलेली दिसली. मुलाची तेवढी आठ्वण तिने जपली होती.तिचा एक नातूही ऎन तारुण्यात गेला, तेही दुःख तिला सोसावे लागले.
माझ्या लग्नाला ती नाही येवू शकली. वय झाले होतेच, पण तिची जगण्याची ऊमेद कमी झाली होती हेच खरे कारण होते. सासरी गेल्यावर माझे भोरला जाणे काही झाले नाही. लग्नानंतर वर्षाभरात माझे सासरे वारले, सासुबाई सतत आजारी पडत, एकूणच नोकरी-घर,संसार या व्यापात मी पुरती गुरफटले. आजीच्या आजारपणाच्या बातम्या कळत, पण वयाप्रमाणे तसे चालणार, म्हणून त्याकडे फरसे लक्ष नाही दिले. माझ्या मुलीच्या संगोपनात वेळ जात असे. आजी म्हणायची ’हे सहाजिकच आहे, पाणी पुढेच वाहते, नदी समुद्राकडेच जाणार, मागे बघणॆ जमणार नाही’ पण एकदा अशीच धावत पळत आईकडे गेले असता आई म्हणाली,’आजी तुझी आठवण काढतीयं, जाउन ये ना एकदा, एवढा कसा वेळ नाही ? काय जगावेगळे संसार आणि नोकऱ्या तुमच्या?( आईचा स्वभाव आजीच्या एकदम उलट, फारच स्पष्ट्वक्ता आणि सडेतोड) ’ मलाही फार अपराधी वाटले. येत्या शनिवारी नक्की जाते असे सांगून तिचा निरोप घेतला. घरी अडचणी होत्याच, नवरा टूर वर गेला होता.पण मी मुलीला घेउन गेले.खरं तर पुणे -भोर तासा दिड तासाचा प्रवास. घरी गेले, काकू शाळेत जायला निघाली होती. ती म्हणाली,’बरं झालं आलीस, तुझी आठवण काढताहेत, त्यांच्या जवळ थांब,कुठे जाऊ नको’ आजी जवळ गेले, अगदीच सुकून गेली होती. मला ऒळखले,’तूच तेवढी राहिली होतीस ,सगळे भेटून गेले.’ माझ्या पॊटात गलबलून आले, ’आजीच्या चेहऱ्यावर समाधान होते, माझ्या लेकीला जवळ घेतले, ’बघ, मिळाला ना तुला बंगला , गाडी? मी म्हणालेच होते ना!’
’तू नाही आलीस गं , माझं घर बघायला’
’असू दे, तुझ घरं छानच असणार, माणसंही चांगलीच असणार, तुझे वडील हवे होते ,तुमच चांगल झालेल बघायला!’
मग इतर बरच बोललो, म्हणजे मी बोलले ती ऎकत होती.दुपारी चहा करायला सुध्दा मला उठू नकॊ म्हणाली, काकू आल्यावर करेल, तू माझापाशी बैस.तुला तांदळाची उकड आवडते ना, शाळेतून आल्यावर तिला करायला सांगते.
’आजी , नकॊ आता मला काही. काकू दमून येईल, मी पटकन चहा करते, आपण पिऊ या’
’बरं, खरं आहे, ती दमते, तिला माझं फार करावं लागत.’
दुसऱ्या दिवशी मी आणि काकूनी तिचे अंग पुसले, कपडे बदलले.नंतर तिची शुध्द गेली, संध्याकाळी मी निघाले तर तिने मला ऒळ्खले नाही, जागृती-सुशुप्तीच्या सीमेवर होती, माझा पाय निघत नव्ह्ता पण जाणॆ जरुरीचे होते. रविवारी मी पुण्याला आले. आणि सोमवारी संध्याकाळी आजी गेली. माझ्या भेटीसाठी तिने जीव धरुन ठेवला होता.
आज आम्हांला चांगले दिवस आले,त्या मागे तिची पुण्याई आहे असं मला नेहमी वाटतं.इतक साधेपणानं राहणं,सगळ्यांच्या आनंदात आनंद मानणं,कुणाचा राग,द्वेष,मत्सर न करता राहणं किती अवघड आहे हे आता जाणवतं. कुठलीही तक्रार न करता,स्वतः कडे कमीपणा घेऊन राहणे फार कठीण आहे. शिकलेल्या, न शिकलेल्या कोणालाच न जमणारे सहजीवन आजीने जगून दाखवले.त्यामुळे तिला जाऊन पंधरा वर्षे होऊन गेली पण अजूनही तिची पदोपदी आठवण होते.कुठल्याही रंगाचे होउन जाण्याचा पाण्यासारखा तिचा स्वभाव होता, पाण्याइतकच पारदर्शक निर्मळ मन होतं आणि म्हणूनच तिच्या सगळ्या मुलां-सुनांच्या,लेकी-जावई आणि यच्चयावत नातवंडांच्या जीवनात तिचे स्थान अढळ आहे.