Tuesday, April 25, 2023

लिला आजी

आमच्या विद्याताईचे लग्न ठरले तेंव्हा मी नववीत होते. लिलाताई तिच्या सासुबाई, पण त्या सासुबाई वाटतच नाहीत असे आम्हा सर्व भावंडाचे एकमत होते. एकतर त्यांची लहान चण, हसरा आणि बोलका चेहरा आणि बडबडा स्वभाव यामुळे तथाकथित सासुच्या प्रतिमेत त्या बसत नव्हत्या.लग्नात त्यांनी विहिणीचा मानपान घेतला असेल तेवढाच .एरवी त्या कायम आमच्याशी  प्रेमाने आणि जिव्हाळ्याने वागल्या. विद्याचे घर आमच्या घराजवळ असल्याने येताजाता त्या सहज म्हणून डोकावत आणि गप्पागोष्टी करुन जात.चहापाण्याचे त्यांना वेड नव्हतेच आणि खाण्यापिण्याची पण फार आवड नसल्याने त्याचीही अपेक्षा नसे.त्यांचा जनसंपर्क प्रचंड होता आणि स्मरणशक्ती अचाट होती.आमच्या चुलत, मावस,आते बहिणींची लग्ने जमवताना त्यांची खूप मदत झाली.

आमचे दादा १९८२ साली अचानक वारले आणि आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला अशा वेळी बोकील कुटुंबाने आम्हाला दिलेला आधार आम्ही कधीच विसरु शकत नाही.विद्या आमची मोठी बहिणच होती पण प्रकाशराव, लिला आजी आणि भाऊंनी आमच्या दुःखात आम्हाला फार मोठा आधार दिला. आमच्या दोघींची लग्ने ठरल्यावर साखरपुडे त्यांच्या घरीच झाले. लग्नाचा मुहुर्त, घाणा भरणे, मंगलाष्टके,विहिणिच्या पंक्तीला गाणी आणि शेवटची पाठवणी सगळ्य़ाला लिला आजींच्या गाण्यांनी बहार आणली होती.माझ्या दोन्ही मुलींना घरी आणल्यावर पहिली अंघोळ लिला आजींनीच घातलीयं. 

२००४ नंतर आमच्या आईचा कंपवाताचा आजार वाढत गेला व तिला घरात एकटे ठेवु नका असे डॉक्टरांनी सांगितले त्यावेळी भाऊंनी आईला आपल्या घरी आणा असे विद्याला सांगितले. त्यावेळी प्रसाद कानपुरला, विद्या व प्रकाशरावांची नोकरी ,भक्तीचे इंजिनियरींग व भाऊंचे स्वतःचे आजारपण असताना आई त्यांच्या घरी गेली.तिला वरच्या मजल्यावर ठेवले होते. आईचे जेवण,चहा सगळे लिला आजींनी विनातक्रार केले. त्याचा कधी कुठे उल्लेखही केला नाही.विहिणीला बहिण मानणाऱ्या लिलाआजी खरोखरीच असामान्य होत्या.एकत्र कुटुंबात वाढल्यामुळे एकमेकांसाठी करायचे त्यांच्या रक्तातले संस्कार होते. आजींनी आमच्यासाठी इतकं केलयं कि सांगायला वेळ पुरणार नाही.माझ्या थोरल्या लेकीचे लग्न ठरले खरेदी  ,कार्यालय बघणे चालु होते,विद्या भक्तीकडे इंग्लडला गेल्याने मला फारच एकाकी वाटत होते, तेंव्हा एक दिवस आजींचा फोन आला,’शुभा तनुच्या लग्नाचा मुहूर्त कधी करणार? मी म्हटले ,"विद्या नाही ,माझ्या घरी सांगायला मोठं कोणी नाही मला काही सुचत नाहीये" त्या लगेच म्हणाल्या,"अगं मी आहे ना, आपण रविवारी मुहूर्त करुन घेऊ".काय काय तयारी हवी ते त्यांनी सांगितले, रविवारी आल्या, मुलींना नऊवारी साड्य़ा नेसवण्यापासून गाणी म्हणत पापड,पाच खिरी सगळे मजेत झाले. पुढे ग्रहमख,लग्न सगळ्याला आजी होत्या. माझ्या लग्नापासुन माझ्या मुलीच्या लग्नापर्यंत आजी त्याच उत्साहात वावरल्या.


वयाच्या पन्नाशीनंतर त्या पौरोहित्य शिकल्या आणि सत्यनारायण पुजा,वटपौर्णिमा,मंगळागौर अशा अनेक कार्यक्रमांसाठी त्यांना बोलावणी येऊ लागली. पहाटे उठुन घरातली कामे आटपुन त्यांचा दौरा सुरु होई. पुजा सांगण्यापुरते त्यांचे काम मर्यादित नसे, पुजेची तयारी करण्यापासुन असेल त्या सामग्रीत उठुन दिसेल असे कार्य साजरे करण्याचे कसब त्यांच्याजवळ होते. यजमानांच्या सांपत्तिक स्थितीवर पुजेचे काम कधीच अवलंबुन नसे. मिळणारी दक्षिणा कधी त्यांनी स्वतःसाठी खर्चच केली नाही. त्या कार्यक्रमांतही ओळखी करुन  अनेक लग्ने जमवली त्यांनी. लिलाआजींजवळ उत्साह आणि उर्जेचा एवढा साठा कसा ?असा मला नेहमी प्रश्ण पडे मग लक्षात आले, त्यांचं वय वाढल होत, पण मन मात्र लहान मुलासारखच होते, काळजी,चिंता त्यांच्या थाऱ्यालाही उभ्या नसत. एक तर सतत कामात असल्याने विचार करण्याएवढे रिकामपण त्यांच्याकडे नव्हते . कोणी गावाला जावो,गावाहुन येणार असो, कोणी आजारी असो आजींना कधी चिंतागती होवुन बसलेल्या कुणी बघितलच नाही.  त्या कुठे गेल्या तरी तिकडे पोचल्याची खबर घरी द्यायचे त्यांच्या डोक्यात नसे. आला दिवस आनंदात घालवायचा , दुःखाचा प्रसंग आलाच तर मनमोकळेपणाने रडुन घेत. आपल्या भावंडांचे,दिरा जावांचे,नणंदांचे ,विहिणींचे अनेक मृत्यू त्यांनी बघितले .त्या त्या घरी जाऊन लागेल ती मदत करुन येत .तिकडून आल्यावर पुन्हा नेहमीचे आयुष्य सुरु करीत. आठवणी काढुन रडत बसुन घरातले वातावरण दुःखी केले नाही. मॄत्युची अपरिहार्यता त्यांनी सहज स्विकारली होती. वर्तमानात जगा असे सगळे स्वामी,महाराज शिकवतात,मोठमोठी पुस्तके वाचुन, व्याख्याने ऐकुन शिकल्या सवरलेल्यांना न जमणारे जगणॆ आजी जगत राहिल्या.म्हणुनच त्यांना वृध्दत्वाचा स्पर्श झाला नाही.


त्यांनी अनेकांना सहज मदत केली पण कोणाकडून कुठलीच अपेक्षा बाळगली नाही.अनेकांची लग्ने जमवली, अनेकांना कामे मिळवुन दिली,घरी आलेल्यांना जेवायला घातले. गीतेमधील कर्मयोगाचे पालन सहज केले त्यांमुळे सगळ्यांना हव्याहव्याशा वाटत असतानाच त्या अचानक आपल्यातुन निघुनही गेल्या. हसत हसत जगल्या आणि तशाच आनंदात गेल्या. त्यांच्या जीवनभराच्या पुण्याईमुळे त्यांना असे भाग्याचे मरण लाभले. आजी आपल्या सगळ्यांच्या कायम आठवणीत राहणार. त्यांच्यासारखे आनंदी, सकारात्मक जगायले शिकणे हिच त्यांना श्रध्दांजली ठरेल. 



Thursday, October 22, 2020

भ्रमनिरास

 

नाव: पद्मशीला तिरपुडे
जिल्हा: भंडारा. 
खलबत्ते, वरवंटे विकून संसार व मुलाला सांभाळून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेऊन MPSC ची PSI ची परीक्षा पास करणारी ही मुलगी आहे.
💐 सलाम तिच्या मेहनतीला 💐

WhatsApp वर हि बातमी फिरतीय.  या मुलीचा फोटोही झळकतोयं. खरोखरीच या मुलीच्या जिद्दीचे,परिश्रमाचे कौतुक करावे तेवढे थोडेच. आजच्या चंगळवादी जगात तर या मुलीचे कष्ट जास्तच उठून दिसतात. हि मुलगी सरकारी नोकरीत रुजु झाली त्यातही पोलीस खात्यात गेली आहे हे वाचल्यावर मात्र तिला नोकरीत कशा अनुभवांना तोंड द्यावे लागेल याचं चित्र उभं राहीलं आणि त्याचच हे कल्पनाचित्र. तिचे  अनुभव  असेच असतील असे नाही, किंबहुना ते असे नसावेतच तरीही.....


जातीने मी पाथरवट

दगड धोंड्यांना देते घाट

खल बत्ता पाटा वरवंटा

बनवायाला हवा देह धट्टाकट्टा

देहाहुनही  कणखर मन

घेतल त्यानं मनावर

फोडून टाकीन दारिद्र्याला

दिस सुखाचं दावीन लेकराला

केली एक दिस अन् रात

अभ्यास करुन झाले पास

गेले कराया नोकरी सरकारी

म्हटल संपवेन इथली गुंडगिरी

पाहुन  कारभार इथला सारा

वाटे व्यवस्थेहुन  पाषाण बरा

फोडुन  दगड केल्या जिनसा

विकुन मिळे घामाचा पैसा

इथल्या राबण्यात नाही घाम

उठता लाचारी बसता सलाम

देवा कशाला दिली परीक्षा

चांगल्या कामाला मिळे रे शिक्षा

चोर फिरती मोकळे मस्त

आम्ही बंदोबस्तात अखंड व्यस्त

राहायचे इथे टिकुन तर आवर रडं

मारुन मनाला बन दगड

सौ.शुभांगी राव

Thursday, May 21, 2020

मरणाने केली सुटका ....

सकाळी आठ वाजता नवऱ्याचा फोन वाजला. कमलताईंचा मिस्ड कॉल. सकाळी काय काम असेल असे वाटून रमेशनी लगेच फोन लावला.फोन त्यांच्या जावयाने केला होता.त्याने सांगितले काल रात्री कमलताईंना हार्ट ऍटॅक आला ,त्यांना हॉस्पीटल मध्ये नेले पण त्या वारल्या. सकाळी साडेनऊ पर्यंत घरी आणतील.
दहा बारा दिवसांपूर्वीच त्यांचा फोन आला होता ,सगळ्यांची चौकशी करत होत्या,आपल्या रात्रीच्या ड्यूटीमुळे समक्ष येऊन गाठ घेता येत नसल्याची खंत व्यक्त करत होत्या. त्यावेळी मी त्यांना मीच येऊन जाते असे तोंड भरुन अश्वासन दिले पण दिवसभराच्या नोकरीतुन घरी गेल्यावर जायचा आळस केला अन अचानक आज हि बातमी.

कमलताई, माझ्या आईला शेवटच्या आजारात दिवसभर सोबत करायला येत होत्या. आल्या दिवशी बोलताना मला जरा त्या फटकळ वाटल्या."पेशंटच्या खोली बहेर मी येणार नाही, पेशंट सोडून मी इतर कुठलेही काम करणार नाही,एकदा काम हातात घेतले कि पेशंट जाईपर्यंत मी काम सोडत नाही" अशा अटी त्यांनी घातल्या.माझा अगदीच नाईलाज होता आधीची बाई अचानक काम सोडून गेली होती आणि मला बाईची जरुर होतीच.त्यांच्या सगळ्या गोष्टींना मी हो म्हणाले आणि कामाचे तास कमी असल्याने नेहमी इतके पैसे न घेण्याचे त्यांनी मान्य केले आणि त्या दुसऱ्या दिवसापासून येऊ लागल्या.

सावळा रंग, उंच आणि सडपातळ बांधा कपाळावर मोठे कुंकू साधी पण स्वच्छ साडी. केसाचा घट्ट अंबाडा अशा वेशात कमलताई येऊ लागल्या. आईची तब्येत तेंव्हा बरीच बरी होती.तिला पार्किसन्स अर्थात कंपवात होता. पण त्यावेळी अधुन मधुन डावा हात हालू लागे, हाताबरोबर बाकीचे अंग हालू लागले कि तिला झोपुन रहावे लागे. एरवी ती कमलताईंशी गप्पा मारत बसे. तिचास्वभाव गोष्टीवेल्हाळ , जवळ नाना तऱ्हेच्या अनुभवांचं गाठोडं आणि बरोबर अगदी नवा श्रोता मग काय तिच्या गप्पांना बहर येई. दुपारी दोघी मिळून जेवत. आपल्यातली भाजी,आमटी तर आई त्यांना देईच पण त्यांनी आपली भाजी तिला देवू केली तर ती पण आई आनंदाने घेई. एकंदर दोघींचे छान जमायचे.आईला स्वस्थ बसून राहायला कधीच आवडले नाही, त्यामुळे ती कपड्यांच्या घड्या कर, भाजी निवडून दे अशी छोटी मोठी कामे करत असे. कमलताई पण तिच्याबरोबर भाजी निवडू लागत. कपबशा विसळून ठेवत. एखाद दिवशी माझी कामवाली आली नाही तर जेवणानंतरची भांडी पण न सांगता घासून ठेवत. हळूहळू त्या आमच्यात मिसळू लागल्या आणि त्यांच्या प्रेमळ स्वभावाचा प्रत्यय आम्हाला येऊ लागला. त्यांचा आवाज लहान होता, बोलणे कमी होते, उगाच चौकशा करायची वाईट खोड त्य़ांना नव्हती. सुरुवातीला मला त्या फटकळ वाटल्या याला कारण त्यांच्या आधीच्या कामांवर त्यांचा घेतला गेलेला गैरफायदा असावा. आमच्या घरी मात्र त्यांनी त्यांचे ब्युरेचे नियम लावले नाहीत. माझी धाकटी लेक दहावीत होती.एकदा तिला खूप ताप आला होता, म्हणून मी रजा घेतली होती तरीही  मला ऑफिसमध्ये एक महत्त्वाची मिटींग असल्याने जावे लागले. मिटींग संपवून मी दुपारी घरी आले तर आई आणि कमलताई दोघी माझ्या लेकीच्या उशा पायथ्याशी बसल्या होत्या. तिचे पाय चेपून देत होत्या. 

माझी आई बोलकी आणि प्रेमळ होती ,माझ्या मुली देखील लाघवी स्वभावाच्या आहेत त्यामुळे कमलताईंशी आमचे सूर जुळले. त्या घरच्या कटकटी कधी बोलून दाखवत नसत. पण बोलण्यातुन त्यांच्या तीन मुलांपैकी एका मुलीला व मुलाला लहानपणी पोलिओ झाल्यामुळे दोघांच्या पायात थोडा दोष राहिला होता. त्यांनी आधीच्या आयुष्यातही अतोनात शारीरिक कष्ट केले होते. लहानपणी खेडेगावी शेतात,रस्त्यावर मजुरी केली होती. पुण्यात आल्यावर पापड लाटणे,घरकामे करणे अशी अनेक कामे करत आता बेडरीडन पेशंटच्या आयाचे काम त्यांनी पत्करले होते. माझ्याकडे त्या कुठल्याही ब्युरोकडून नआल्याने ब्युरोला द्यायचे पैसे वाचत शिवाय घर चालत येण्याच्या अंतरावर असल्याने वेळही वाचायचा त्यांचा. त्यांच्या घरात मोठा मुलगा,सून त्यांची दोन मुले, मुलगी जावई ,धाकटा मुलगा आणि कमलताई व त्यांचे पती एवढी माणसे होती. नवऱ्याला वृध्दापकाळाने शारीरिक कष्टाची कामे होत नव्हती. मोठ्या मुलाची कांदे बटाट्याची गाडी होती .दुसरा मुलगा पोलिओने अपंग असल्याने लहान मोठी कामे करायचा. मुलगी घरातले स्वयंपाकपाणी बघे. पण घरातल्या खर्चाचा बराच वाटा कमलताईंच्या कमाईतुनच चाले. त्या सगळे कसे भागवत असतील याचे मला फार नवल वाटे.पण त्यांनी कधीही परिस्थितीचे रडगाणे गायले नाही कि मला कधी पगारापूर्वी  पैसे मागितले नाहीत. फार स्वाभिमानी होत्या.एकदा खूप संकोचाने त्यांनी मला ,"ताई,तुमच्या कडे जास्तीचे ताक असेल तर द्याल का? " असे विचारले. आमच्याकडे भरपूर ताक असायचे रोज आईबरोबर मी त्यांना ही तुम्ही ताक घेत जा असे सांगायची पण त्या नाही घ्यायच्या. मी त्यांना ताक देवु लागले.मग कधी संध्याकाळी एखादी भाजी जास्त उरली असेल तर ,"न्याल का?" विचरले तर नेऊ लागल्या. मी त्यांना आईबरोबर डोसा,इडली खाय़ला दिले तर स्वतः न खाता नातवंडासाठी डब्यात ठेवत. मग मी त्यांना खायला लावुन त्यांच्या नातवंडांकरता देत असे.पण माझ्या या किरकोळ मदतीची जाण त्यांनी किती ठेवावी? त्यांना बरे नसले तरी त्या माझ्या ऑफिसला जायला अडचण नको म्हणून रीक्षा करुन यायच्या.कधी काही कामामुळे त्यांना यायला जमणार नसेल तर त्या त्यांच्या मुलीला कामाला पाठवत. ती देखील आई सारखीच मितभाषी होती.

आईची तब्येत हळूहळू बिघडू लागली तिला सतत झोपुनच रहावे लागे.कमलताईंनी कधी तिच्यावर चिडचिड केली नाही.शांतपणे तिला जेवु घालत.प्रेमाने अंघोळ घालत. तिचे हात हालुन हालुन दुखत ते चेपून देत. आईची खोली  स्वच्छ ठेवत. माझ्या भाचीचे लग्न ठरले.कार्यालयात आदल्या दिवशी जायचे तर आईकडे कोण बघणार ? याची मला काळजी होती.कमलताईंचे पती आजारी असून त्यांनी दोन दिवस रात्री पण माझ्या घरी रहायचे कबुल केले आणि मी निर्धास्तपणे लग्नाला जाऊ शकले.
आईचे शेवटी खुप हाल झाले, तिला ऊठवुन बसवले तरी तिचे बी.पी. लो व्हायचे , तिला झोपवुनच ठेवावे लागे पण अंथरुणाला खिळूनही तिला बेडसोअर्स झाले नाहीत कारण मी व कमलताई रोज तिचे स्पजिंग करुन तिला पावडर लावायचो, तिची कुसही बदलावी लागे सगळे त्यांनी विनातक्रार केले.
                 १६ जून नंतर तिचे बोलणेही कमी झाले,काही खायला घतले तरी ते पोटात टिकत नव्हते. शेवटी कोमट पाण्यात भरपूर साखरेचे लिंबु सरबत देत होतो. ती कॉटवरुन एकदोनदा खाली पडता पडता वाचली .तिला जमीनीवरच झोपवुअसे कमलताईंनी सुचवले.  खाली झोपवल्याने बेडपॅन देणे ,काढणे करणाऱ्या माणसाला जिकिरीचे होत होते पण कमलताईंनी त्याबद्दलही तक्रार केली नाही. १८ तारखेला आईला खूप कफ झाला.तोंडातला कफ थुंकायची पण तिच्यात ताकद नव्हती.सकाळी तिच्या तोंडात कपडा घालून मी तो कफ साफ केला.नंतर ती झोपलेली होती ,आधीचे आठ-दहा दिवस , तिची तब्येत जास्त बिघडल्याने मी घरी होते. त्या दिवशी सोमवार होता, कमलताई रविवारी मला म्हणाल्या,"ताई,तुम्ही किती दिवस घरी राहणार? उद्यापासून जायला लागा कामवर,काही कमी जास्त झाले तर धाकटी ताई फोन करुन  तुम्हाला बोलवुन घेईल,उगीच कशाला कामवर खाडे ?"म्हणून मग मी ऑफिसला जायच्या तयारीत होते.कमलताई आल्या, त्या आईजवळ गेल्या त्यांना काय जाणवले कोण जाणे पण त्या म्हणाल्या,"ताई,आजींचा प्राण गेलाय वाटतं तुम्ही डॉक्टरांना बोलवून खात्री करा"
मी ताबडतोब माझ्या मैत्रीणीला फोन केला .ती लगेचच आली आणि आई गेल्याचे तिने सांगितले.

आई गेल्यानंतर वास्तविक कमलताईंची ड्यूटी संपली होती.पण त्या आमच्या सोबत दहा दिवस होत्या. आईचा त्यांना ही लळा लगला होता.नंतर त्यांना दुसरे काम बघणे क्रमप्राप्त होते.पण त्यानंतरही त्या आमच्या संपर्कात राहिल्या. जमेल तशा येत होत्या, फोनवर चौकशी करायच्या. आमच्या घरी आल्या तरी कधी रिकाम्या हाताने आल्या नाहीत मुलींसाठी काहितरी खाऊ आणायच्या. आईला जाऊन सात वर्षे झाली तरी आमच्याशी त्यांचे संबंध टिकून राहिले. त्यांनी अनेक ठिकाणी कामे केली पण सगळीकडेच त्यांचे असे संबंध नव्हते. त्या मला म्हणत,"ताई ,तुम्ही माणुसकीने वागता म्हणून तुमच्याकडे यावसं वाटतं. " मला त्यांच्याबद्दल जिव्हाळा वाटायचा कारण त्यांच्या जिवावर आईला सोडून मी ऑफिसला जायची. त्याबद्दल मी त्यांना पैसे देत असले तरी अशा कामाची किंमत पैशात होत नसते याची जाण मला होती ते माझ्यावरील आईवडीलांचे संस्कार.
मी त्यांना दिवाळीत फराळाचे देत होते, पैसे द्यायची,दिवाळीला त्यांना मी साडी द्यायची कारण त्यांच्या मोठ्या प्रपंचात त्यांना नवीन साडी घेणे होत नसे, ते मला दिसायचे. त्यांच्या घरी गेले कि त्यांना इतका आनंद व्हायचा, त्यांच्या घरातले सगळेच आमच्या भोवती जमायचे. माझ्या लेकीचे लग्न ठरल्याचे त्यांना कळवले तेंव्हा त्या खूप खुश झाल्या.फोनवर फोन करुन मला बोलवत होत्या.मी व माझे पती त्यांच्याकडे आमंत्रणाला गेलॊ तर मला सुंदर महागाईची साडी,माझ्या मिस्टरांना शर्टपॅंटचे कापड,टॉवेल-टोपी असा यथासांग आहेर त्यांनी दिला,मला खरचं खूप भरुन आले. माणसाची दानतच त्याची श्रीमंती ठरवते. कमलताई किती श्रीमंत होत्या. मी जे मला सहज शक्य होते तेवढेच त्यांना देत होते पण त्यांनी मात्र स्वतःच्या कमाईतला केवढा मोठा भाग मला आहेर म्हणून दिला ! माझ्याबरोबर कासारणीचे दुकान दाखवायला आल्या आणि तिला चांगल्या बांगड्या दे असे बजावले त्यांनी.

त्यांच्या अपंग मुलाला आम्ही काम मिळवुन दिले, माझ्या घरातील कपडे,वस्तू, नारळाच्या करवंट्या अशा त्यांना उपयोगी पडणाऱ्या वस्तू आम्ही त्यांना देत असू. पण या लहान सहान मदतीची त्यांनी सदैव जाणीव ठेवली आणि अधुन मधुन फोन करुन आमची चौकशी करत राहिल्या. आजारी नवरा, आडाणी मुले,अपंग मुलगी यामुळे त्यांच्य़ा आयुष्यातला उन्हाळा संपलाच नाही. दिवसभर घरात नवऱ्याची सेवा व इतर कामे करत रात्री आजारी पेशंट कडे जात त्या झिजत होत्या. त्यांच्या स्वतःच्या तब्येतीच्या तक्रारींकडे लक्ष द्यायलाही त्यांना जमले नाही. अखेर शरीराने साथ सोडली आणि घरच्यांना त्रास नको म्हणून जीवही चटकन गेला त्यांचा.

         सुरेश भटांच्या गजलेतील दोन ओळी त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच मला आठवल्या

         इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
          मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

Friday, March 6, 2020

पराधिन आहे जगती

       शनिवारची दुपार ,सुट्टी घेतल्यामुळे मी घरीच होते,घरातली बरीच जास्तीची कामे करुन आडवी झाले होते. चार वाजून गेले असावेत. तेवढ्यात फोन वाजला.मोठ्या बहिणीचा फोन होता
"अगं आत्ता अंजूचा फोन आला होता, आपला मामा आत्ता गेला. मेडीपॉईंट हॉस्पीटल मधे चार दिवस होता ,तिकडेच गेला आणि आता तेथूनच औंधच्या स्मशानभूमीत नेणार आहेत हेच आणि एवढेच सांगून तिने फोन ठेवला. आता आपण काय करायच ?"
मामा गेला हि बातमी अकस्मिक होती त्यामुळे मलाही क्षणभर काही सुचेना.
"तू माझ्याघरी ये मग ठरवू काय करायचं ते "एवढं बोलून मी फोन ठेवला. आई गेल्यानंतर मामाशी संबंध पूर्णच संपले होते .त्याचे वय  ८३ होते त्यामुळे कधी ना कधी हे घडणारच होते मात्र त्याची निरोगी तब्येत बघता हि बातमी अकस्मिकच होती.  बहिण घरी आल्यावर काय करायचे ते ठरवलेच नव्हते. मला लक्ख जाणवले कि मामाकडील कोणाचेच फोन नंबर माझ्या जवळ नाहीत कि त्यांच्यापैकी कोणाचाच पत्ता मला माहित नाही.बरीच फोनाफोनी केली तरी कुणाचाच नंबर मिळाला नाही.बहीण आणि मेहुणे येऊन बसले होते.शेवटी मेडीपॉईंट हॉस्पीटलचा नंबर शोधुन तिथे विचारले तर अजून बॉडी हलवली नव्हती. मग काहीही विचार न करता आम्हाला घेवुन माझ्या नवऱ्याने गाडी हॉस्पीटलकडे दामटली. शनिवारची संध्याकाळ रस्त्यावर वाहने ओसंडुन वाहत होती त्यातून वाट काढीत वीस,पंचवीस मिनिटात आम्ही हॉस्पीटलमध्ये पोचलो. हॉस्पीटलच्या दारात ऍम्ब्युलन्स उभीच होती. स्ट्रेचरवरुन मामाला आणत होते .तेथेच आम्ही त्याचे दर्शन घेतले आणि पाचच मिनिटात मामाची मुले आमच्याशी एक शब्दही न बोलता ऍम्ब्युलन्स मध्ये बसुन निघूनही गेली. मामी मागून आली आम्हाला बघून तिला शोक अनावर झाला.ताईच्या गळ्यात पडून ती रडू लागली. ताईने तिला जवळ घेतले. मामीच्या नाती तिला घरी चल म्हणून घाई करत होत्या.
मामी आम्हाला म्हणाली," तुम्ही काय करता?" आम्हाला करण्यासारखे काय होते? आम्ही आमच्या घरीच जाणेच योग्य होते.मामीच्या मुलांना आमच्याशी बोलायचे नव्हते.मामा नसलेल्या त्यांच्या घरात आम्ही कशासाठी जायचे होते?   मामीचा निरोप घेऊन जड मनाने आम्ही घरी गेलो.
भरपूर मोठ्या घरात ,माणसांमध्ये जन्माला आलेल्या चार बहिणी,एक भाऊ स्वतःला एक मुलगा,एक मुलगी,सून,जावई,नातवंडे सगळे असलेल्या आमच्या मामाला हॉस्पीटलमधुन  परस्पर स्मशानात चार लोकांनी नेवुन भडाग्नी दिला ! त्याच्या स्मरणासाठी एक पणती देखील लागली नसेल ! त्याच्या मृत्यूची बातमी आम्हाला केवळ उपचार म्हणून सांगण्यात आली होती.आम्ही येऊ अशी मामाच्या मुलीची अपेक्षा नव्हती पण आमची,आमचीच नव्हे तर त्या गेल्या जीवाची कदाचित आम्ही त्याच अंत्यदर्शन घ्याव अशी इच्छा असावी आणि इच्छा तिथे मार्ग म्हणून आम्ही तेथे पोचलो.

मानव जन्म हा दुर्लभ असे संत सांगतात. अशा दुर्लभ जन्मात चार लोक जोडणे, नातलगांशी सौहार्दाचे संबंध ठेवणे हे काही मामाच्या उच्चशिक्षित मुलांनी केले नाही. मामाचा स्वभाव अगदीच गरीब. त्याची आई तो सहा महिन्याचा असताना गेली एकत्र कुटुंबात त्याची आबाळ झाली नसली तरी लाडही झाले नाहीत. फार लहानपणापासूनच तो स्वावलंबी झाला .मॅट्रीक होईपर्य़ंत त्यांची परिस्थिती फारच खालावली होती.त्याच्या आजोळी (मामांच्या कडे) संकोचाने चार वर्षे काढून त्याने पदवी पदरात पाडून घेतली आणि नंतर नोकरीसाठी वणवण सुरु झाली.मिळेल तेथे त्याने नोकऱ्या केल्या. वडीलांची नोकरी कधीच संपली होती, शेतातुन फारसे उत्पन्न मिळत नव्हते. तीन बहिणी  आणि एका भावाचे शिक्षण  सगळेच व्हायचे होते. दोन बहिणींची लग्ने खटपटी करुन त्याने जमवली ,लग्नाची कर्जेही फेडली. त्याचे स्वतःचे लग्न व्हायला वयाची तिशी उलटली. पदवीधर बायको मिळाली .मामा संसारात जास्तित जास्त मदत करत असे.नोकरी तर तो करत होताच पण पुरुषांनी घरकामाला हात न लावण्याच्या काळात मामा घरात मामीला  सर्वतोपरी मदत करत असे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली .खऱ्या अर्थाने चौकोनी कुटुंब होते.  बायकोच्या साथीने सुखाचे दिवस सुरु होतील असे वाटले होते , पण.... या माणसाला नुसते दारिद्र्यच नाही तर इतर किती प्रकारे त्रास होऊ शकतो याची जाणीव व्हावी अशीच जणू नियतीची इच्छा होती. मामीचा स्वभाव फारच चमत्कारिक होता.कदाचित कुठला मानसिक आजार असेल तिला .त्यावेळी कळून आला नाही आणि त्यावेळी त्याबद्दल अनभिज्ञताही होती.सतत रडका चेहरा,आणि घरात नवऱ्याखेरीज कोणीही आलं कि कपाळाल्या आठ्या . बारीक सारिक कारणांवरुन नवऱ्याशी भांडणे,त्याला घर सोडून जायच्या,जीव द्यायच्या धमक्या यामुळे मामा जेरीला आला. मामाची  फिरतीची नोकरी आणि दमुन भागून घरी जावे तर रुसलेली ,रागावलेली आणि नवीन आजाराचे घुंगट घेतलेली बायको ! सल्ला देणारे कोणी नाही.कुणाला घरी बोलवायची चोरी त्यामुळे सहाजिकच त्याने दुसऱ्याकडे जाणे कमी केले.मामाच्या बहिणी सुस्थितीत अजिबात नव्हत्या पण आहे त्या परिस्थितीत आनंदाने सासरी नांदत होत्या.सासर-माहेरच्या लोकांच्या अडचणींना मदत करणे ,घरी आलेल्यांचे स्वागत करुन आपल्यातले आहे ते त्यांना देण्याचा तो काळ होता.सगळीकडे थोडी बहुत अशीच परिस्थिती असे. मामाचा मुळ स्वभाव आनंदी,हौशी,रसिक,समाधानी होता. त्याच्या प्रत्येक घरातल्या अंगणात वेगवेगळी फुलझाडे तो लावत असे.गुलाबांना डोळे लावणे तो कुठे शिकला होता माहित नाही पण एका फांदीवर लाल,तर दुसरीवर पिवळे गुलाब फुलवण्याच कसब त्याच्या हातात होतं. आमच्या घरी आला तरी त्याच्या एक दोन दिवसाच्या धावत्या भेटीतही तो बागेत कलमे कर्, अंगण झाड , झाडांना पाणी घाल असे उद्योग करी. या सगळ्या आनंदी,हौशी स्वभावाला मामीच्या आक्रस्ताळेपणाचे ग्रहणच लागले.

कामाकरता पुण्यात आला कि तो आमच्या घरी येत असे.आई त्याची थोरली बहीण. बहीणीजवळ तो मन मोकळे करी ,क्वचित लहान मुलासारखा रडतही असे. माझी आई खूपच करारी आणि धीराची होती.भावाच्या दुःखाने ती हळवी व्हायची पण ती त्याची तिच्या परीने समजूत घाली.बरेचदा तिने त्याला बायकोचा एवढा त्रास सोसण्यापेक्षा वेगळा हो असा सल्लाही दिला असेल.पण मामामध्ये हिम्मत नव्हती आणि त्याला स्वतःला आईची माया न मिळाल्याने मुलांवर ती वेळ येऊ नये असे त्याला वाटत असेल. त्याचा भित्रा स्वभाव  मामीने जोखला होता. आपल्या शेतातला हिस्सा म्हणजे धान्यं, तेल ,डाळी वगैरे मिळावा म्हणून मामी मामाशी भांडायची.त्याने बहिणींच्या लग्नासाठी खर्च केला त्यामुळे तिची मागणी गैर नव्हती शिवाय शेतावर त्याचाही हक्क होताच .मात्र शेतातले काही हवे असेल तर इथे येऊन कष्ट करावे असा त्याच्या गावातल्या भावाचा आणि आई वडीलांचा युक्तिवाद असे.आई सावत्र असली कि वडील सावत्र होतात अशी आपल्याकडे सार्थ म्हण आहे. त्याच्या वडिलांचा स्वभाव मामासारखाच होता.यासगळ्यात मामाची आयुष्यभर ससेहोलपट झाली. मामाचे कामानिमित्त बाहेर राहणे हे त्याचे परिस्थितीपासून पलायनही असू शकेल.

त्याच्या कष्टाळू स्वभावामुळे आणि निर्व्यसनी प्रवृत्तीमुळे त्याने सांगलीला सुरेख बंगला बांधला होता .दोन्ही मुलांना भरपूर शिकवले.मोठा मुलगा इंजिनियर होऊन ,आय.आय.टी मद्रास मधुन एम.टेक झाला.मुलगी एम.एस्सी झाली. मात्र मुलांना वडीलांचा सहवास कमीच मिळाला.आईच्या संगतीत राहिल्याने,तिच्यातील गुण अवगुण सहवासाने ,रक्तातुन त्या मुलांमध्ये पुरेपूर उतरले. कमालीची आत्मकेंद्री प्रवृत्ती, समोरच्या व्यक्तीबद्दल मनात संशय, विनोदबुध्दीचा अभाव अशा स्वभावाच्या या मुलांना आम्ही होता होईल तो आमच्यात सामावुन घेण्याचा खूप प्रयत्न केला. माझ्या धाकट्या बहिणीला वडीलांच्या जागी राज्य सरकारात नोकरी लागली आणि वर्षभरात तिची सांगलीला बदली झाली.नोकरी सोडणे तिला शक्यच नव्हते.त्यावेळी मामाने तिला आपल्याकडे ठेवुन घेतले होते. बहिण तेथे सहा महिने होती.मामाने त्यावेळी तिचे पैसेही घेतले नव्हते.पण तिचे सहा महिने काही सहज गेले नाहीत.मामीला घरात मदत करुन ,हसतखेळत राहायचा तिने प्रयत्न केला मात्र तिच्याच वयाचा आमचा मामेभाऊ सहा महिन्यात तिच्याशी सहा वाक्ये देखील बोलला नाही. मामीचे मूड सांभाळत तिने ते दिवस कसेबसे घालवले. पुढे काही वर्षांनंतर मामाच्या याच मुलाला पुण्याला नोकरी मिळाली तेंव्हा मात्र तो कोणतीही पूर्वकल्पना न देता खुशाल आईकडे येवुन राहीला.आईने त्याचे मायेने स्वागत केले.वर्षभर त्याच्याकडून एकही पैसा न घेता आईने तिच्या मुलीला भावाने ठेवुन घेतल्याची फेड केली वर भाच्याचे लाड केले ते वेगळेच. तो पुढेही दोन वर्षे आईकडे राहीला पण आता तो पैसे देत असल्याने पेंईंग गेस्ट सारखा राहीला यात नवल नव्हते.त्याने औंधला फ्लॅट घेतल्यावर आमच्या आईकडे पाऊल टाकले नाही.आई बिचारी त्याची आठवण काढत बसे.तिच्याकडे फोनही नव्हता त्यामुळे संपर्कच राहिला नाही. मामच्या मुलीचे लग्न  आईने ओळखीतुन  जमवले.आमच्या घरीच साखरपुडा,खरेदी सगळे झाले.लग्न पुण्यात झाल्यामुळे सगळी धावपळ,कमीजास्त शारीरिक,मानसिक आणि आर्थिक झिज आईने, आम्ही बहिणींनी  सोसली.त्यात आईला भाचीचे भारी  कौतुक  होतेच. या भाचीनेसुध्दा आत्याकडे पाठच फिरवली.या सगळ्याचा आईला त्रास होई.आम्ही सुध्दा आईला त्यावरुन बरेच बोलायचो, नावे ठेवायचो .

मामाला मात्र याची जाणीव होती . त्या बहीण भावांमध्ये अतिशय प्रेम होते. मामा जमेल तेंव्हा आईकडे येवुन जात असे. मामीच्या हट्टासाठी मामाने सांगलीचे घर विकले आणि ते दोघे मुलाकडे पुण्यात येवुन राहीले. मामाची सून नोकरी करत होती आणि नातवाला सांभाळण्याची जबाबदारी मामा-मामींवर होती. पुण्यात असूनही त्यांचे आमचे संबंध संपलेच होते. दरम्यान आईची दुखणी सुरु झाली होती.तिला आता घरी एकटे ठेवणे शक्य नसल्यामुळे ती आम्हा बहिणींकडे राहायला आली होती.आई जिच्याघरी असे तिच्याकडे मामा येत राहिला.शेवटची तीन-साडेतीन वर्षे आई माझ्याघरी होती.त्यामुळे आईला भेटण्याकरीता मामा माझ्याघरी येऊ लागला. पहिल्यांदा तो मामी आणि मुलीला घेवुन आला,नंतर मात्र तो एकटाच येत होता.तो सहसा मी ऑफिसमध्ये गेल्यावरच येत असे.पण क्वचित मला उशीर झाला अथवा मी रजेवर असले तर मला भेटत असे. चहा सुध्दा नको म्हणायचा. मी घरात असेन तर त्याला घरात असलेला खाऊ ,चहा घेतल्याशिवाय पाठवत नव्हते. त्याला मात्र काही खायला अतिशय संकोच वाटायचा. आपण यांना घरी बोलावू शकत नाही,बहिणीसाठी काही करु शकत नाही याची अपराधी जाणीव त्याच्या डोळ्यात दिसे. आईचे शेवटी फार हाल झाले.कंपवाताने तिचे अंग सतत हालत राही तिला अन्न जात नसे.नंतर नंतर  दिसेनासे झाले,कानाने कमी ऐकू येई.तिच्याशी संवाद करणे अवघड झाले होते.शेवटी सुटका झाली तिची. तिच्या दहाव्या,तेराव्याला मामा मामी आले .नंतरची पाच वर्षे मात्र त्यांचे आमचे संबंध संपलेच. मामा सोडून कोणालाच आम्ही नको होतो आणि मामालाही त्यांच्याशी विरोध पत्करुन आमच्याशी संबंध ठेवणे त्रासदायक होत असणार.शिवाय त्याचे वयही झालेलेच होते.सुदैवाने त्याची प्रकृती चांगली होती.आमचे आजोबा ९५ वर्षे निरोगी आयुष्य जगले.मामा त्या बाबतीतही वडीलांवर गेला असावा.त्याला मधुमेह,रक्तदाब काहीच नव्हते.  शांत व गरीब स्वभाव,भरपूर व्यायाम, मिताहार आणि सतत पडेल ते काम करणे  हे त्याच्या चांगल्या प्रकॄतीचे रहस्य असावे.

आता उरल्यात फक्त आठवणी आणि जरतारी प्रश्ण. मामाच्या मुलीने तो आजारी असतानाच कळवले असते तर त्याला भेटायला गेलो असतो,त्याच्याशी दोन शब्द बोललो असतो,एखादा पदार्थ खायला नेला असता.  आमच्या मनात मामाबद्दल अजिबात राग नव्हता. त्याच्या भित्र्या ,गरीब स्वभावाची त्याने पुरेपूर किंमत मोजली होती, आणि आमची ही परतीच्या  प्रवासाला सुरुवात झालेली असताना कसल्या चुका काढायच्या आणि दोष दाखवायचे? त्याने आमचे लहानपण आनंदी केले होते.त्याच्या परिस्थितीप्रमाणे आमचे लाड केलेले होते. आमच्या मनात असून त्याच्या विचित्र कुटुंबीयांमुळे त्याचे उतराई होणे जमलेच नाही. मामाच्या मुलांनी त्याला तिलांजली, बारावा,तेरावा श्राध्द वगैरे केले कि नाही याची काहीच कल्पना नाही.ते न केलेलेच बरे.श्रध्देने केले जाते ते श्राध्द . जिवंत असताना कुठलेच सुख द्यायचे नाही आणि गेल्यावर पैसे खर्चुन जेवणावळी घालायच्या हे अयोग्यच आहे. शिवाय जेवणावळी घालायला जोडलेली माणसे हवीत ना?

मामाला शाब्दिक श्रध्दांजली देवुन माझ्या मनाचे मी समाधान करते

Tuesday, February 18, 2020

प्लॅस्टिक बंदी


           पर्यावरणाची अतोनात काळजी वाटून आपले सरकार काहीवेळा काही निर्णय तडकाफडकी घेते.प्लॅस्टिकच्या पिशव्यावरील बंदी हा त्यापैकीच एक निर्णय. सरकारला जनतेच्या सुरक्षेच्या कळवळ्यातून हेल्मेट सक्ती आली असे विविध निर्णय घेतले जातात आणि त्यांच्या अंमलबजावणीकरता सगळ्या नोकरशाहीला वेठीला धरले जाते आणि आजार परवडला पण उपाय नको असे जनतेला होऊन जाते

महाराष्ट्र सरकारने ५० मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्तीकच्या पिशव्यांवर बंदी घातली आहे.दुधाच्या आणि तेलाच्या पिशव्यांना यातुन वगळण्यात आले आहे.  बंदी जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून पेपरमध्ये कोणाकोणाला पकडले,किती जणांना दंड झाला याच्या बातम्या झळकू लागल्या.भाजी बाजार, फळावाल्यांकडील पिशव्या गायब झाल्या. हे चांगलेच लक्षण समजायला हवे.पण परवाच्या पेपरमध्ये कंगवे आणि टुथब्रश यांच्यावरही बंदी येणार कळल्यावर या निर्णयातील भीषणता ,धोके जाणवायला लागले.

प्लॅस्टीकचे तोटे आणि त्याने पर्यावरणाचा होणारा नाश याबद्दल नव्याने सांगायला नको.टेकड्यांचे उतार,नदीची पात्रे यातील प्लॅस्टिकचे खच पाहिले के मन विषण्ण होते.गायी,म्हशीच्या पोटात प्लॅस्टिक जाऊन त्यांना होणाऱ्या आजाराच्या बातम्या पण बरेचदा वाचनात येतात. प्लॅस्टिकचे विघटन होऊन मातीत,पाण्यात मिसळायला हजारो वर्षे लागतात असे शास्त्र सांगते, त्यामुळे पाण्यात अडकून पाणी तुंबणे , पाइपलाईन्स मध्ये प्लॅस्टिक अडकून पाणी अडणे अशा अनेक विपत्ती येतात. पण हा सगळा काही एकट्या प्लॅस्टिकचा दोष आहे असे म्हणणे चुकीचे आहे.शेवटी त्याचा वापर कोण,कसा करतो याचा विचार करणे आवश्यक आहे, शिवाय प्लॅस्टिकला तसाच ठोस पर्याय शोधल्याशिवाय बंदी घालणे कितपत योग्य आहे याचा हि विचार होणे गरजेचे आहे.

प्लॅस्टिकचे उपयोगही नजरेआड करुन चालणार नाहीत.प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरायला सुट्सुटीत,पारदर्शक असल्याने त्यातल्या वस्तू चटकन दिसतात.प्लॅस्टिकच्या  पिशवीतील वस्तू पाण्यात सुरक्षित राहते तसेच पिशवीतील तेलकट पदार्थांचे बाहेरच्या कपडे,अगर इतर गोष्टींना डाग पडत नाहीत. या पिशव्यांना जागा अगदी कमी लागत असल्याने त्या जवळ बाळगणे पण खुपच सोईचे .एवढे असून प्लॅस्टिक तुलनेने खूपच स्वस्तही असते .अशा या बहुगुणांमुळे प्लॅस्टिकच्या पिशव्या जनसामान्यांत लोकप्रिय न होत्या तरच नवल. प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा अमर्याद वापर सुरु झाला.पण या पिशव्या वापरुन झाल्यावर त्याची विल्हेवाट कशी करायची याचे काहीच ज्ञान नव्हते. कचरा टाकायला पण याच पिशव्या ! त्यामुळे काही वर्षांनंतर जिकडे तिकडे प्लॅस्टिकचे ढिगारे दिसू लागले. शहरातच नाही तर खेड्यामध्ये देखील प्लॅस्टिकचा प्रादुर्भाव वाढला. भगवद्गितेत वर्णन केलेल्या आत्म्याप्रमाणे या पिशव्यांना पाणी नाहिसे करु शकत नाही ,शस्त्राने त्या फाटतात पण नाहिश्या होत नाहीत ,आगीत त्या भस्म होत नाहीत.त्यामुळे त्यांच्या नष्ट करण्याचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत गेला. कारखान्यांमधुन त्यांचे अखंड उत्पादन चालूच होते आणि पिशव्यांचा अनिर्बंध वापरही.त्यांच्या कचऱ्याने  हाहाःकार  झाले ,पाणी तुंबले,गुरे आजारली मग शासनाचे डोळे उघडले.म्हणजे डोळे उघडेच असतात पण डोळेझाक केलेली असते, आता ती करता येणे शक्य नव्हते.मग त्यांच्या हाती असलेल्या सत्तेच्या जोरावर प्लॅस्टिकबंदी चा कायदा करुन सरकार मोकळे झाले.पण त्याची अंमलबजावणी कशी होणार, ती करण्यापूर्वी प्लॅस्टिकला पर्याय शोधला आहे का? अस्तित्वात असलेल्या पिशव्यांचे आणि कारखान्यांचे काय करायचे याचा विचार झाला आहे का? य़ाबद्दल प्रसारमाध्यमे पण काही बोलत नाहीत.

कायदा केल्यानंतर लगेचच कुणाकुणाला प्लॅस्टिक पिशव्या वापरल्याबद्दल केलेल्या दंडाच्या बातम्या पेपर्स मधे झळकल्या , whatsapp दंडाच्या पावत्यासकट् बातम्या फिरु लागल्या.
प्लॅस्टिकला पर्याय म्हणून कागदाच्या पिशव्या निघाल्याच होत्या काही पर्यावरण प्रेमींकडून पण कचऱ्याच्या बादलीत ठेवायला कागदाच्या पिशव्या घरच्या घरी बनवण्याचे तंत्र पण विडिओद्वारे फिरु लागले. पण मला अजून समजले नाही प्लॅस्टिकला कागद हा पर्याय कसा होऊ शकतो एक तर कागद बनवायला झाडे तोडायला लागतात ! एकीकडे पेपरलेस ऑफिसेस व्हावी म्हणून ओरड करायची आणि कचऱ्यासाठी कागद बनवायचे या विरोधाभासाला काय म्हणावे ?

प्लॅस्टिक पासून काही कंपन्या तेल बनविण्यात यशस्वी झाल्या आहेत. आनंदवनात,तसेच आन्ध्र प्रदेशात काही गावांमध्ये टाकाऊ प्लॅस्टिक वापरुन रस्ते बनविले असे वाचनात आले होते. आनंद कर्वे यांच्या समोचित संस्थेतर्फे टाकाऊ पिशव्या गोळा करुन त्या कापुन त्यांचे धागे करुन त्यापासून पर्सेस वगैरे वस्तु बनवितात अनेक खेड्यांमधील बायकांना रोजगार मिळवुन दिला जात आहे.
थोडक्यात प्लॅस्टिकच्या पिशव्यांची पर्यावरणाला धोका न पोचविता विल्हेवाट लावायचे चांगले आणि  फायदेशीर मार्ग तज्ञांनी शोधले आहेत. प्लॅस्टिकवर बंदी घालण्याऐवजी योग्यप्रकारे गोळा करण्याचे मार्ग सरकारला अवलंबता आले नसते का? सध्या ओला आणि कोरडा कचरा वेगळा करायला नागरिक शिकले आहेतच तसेच प्लॅस्टिकच्या पिशव्या वेगळ्या ठेवणे अवघड गेले नसते. तसेच आता वापरावर दंड आकारला जातोय त्याऐवजी पिशव्या रस्त्यावर फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करता येणार नाही का?

आपल्या देशात बुध्दीवान,गुणी आणि कल्पक लोकांची अजिबात कमी नाही. काटकसर,पुनर्वापर याचे बाळकडुही आपल्याला मिळलेले असते.  असे कायदे करण्याऐवजी या गुणवत्तेचा वापर करण्याची योजकता सरकारने दाखवली तर जास्त फायदा होऊ शकेल



Friday, May 10, 2019

माझे टेकडी प्रेम

     सहकारनगर मध्ये आम्ही रहायला गेलो तेंव्हा मी तिसरीत होते.हे घर गावापासून खूप दूर वाटायचं, फारशी वस्ती नव्हतीच तेथे. घरातुन दूरवर टेकडी दिसे. दादा टेकडीवर घेऊन जायचे,तळजाई टेकडीवर वनविभागातर्फे तर कधी उत्साही पुणेकरांच्या तर्फे वृक्षारोपणे होत ,  तळजाई परीसरातल्या टेकड्या उघड्या बोडक्याच होत्या. आम्ही उत्साहात टेकडीवर जायचो तिथे एक जुना ठुबे बंगला होता ,तो भूतबंगला म्हणून ओळखला जायचा ,दिवसा त्या बंगल्यात हिंडून, तळजाई देवीचे दर्शन घेऊन परत यायचो. पुढे,पुढे मैत्रीणींबरोबर मैदानावर खेळण्यात वेळ जायला लागला तसे टेकडीवर जाणे कमी झाले. दहावीनंतर अभ्यास वाढायला लागला, नंतर दादांच्या अकस्मिक निधनानंतर अभ्यासाबरोबर घरातल्या जबाबदाऱ्या वाढल्या आणि घराजवळ टेकडी असल्याचाही विसर पडला.

लग्नानंतर तर संसार,नोकरी या चक्रात दिवस कसे जात समजत नव्हते, व्यायाम करायला पाहिजे असे सतत वाटायचे पण वेळ काढायला जमत नसे.बस मधुन,रीक्षातुन कधी गाडीतून जाताना टेकडी खुणावत असे पण जाणे शक्य नसल्यामुळे तोंड दुसरीकडे फिरवले जाई.अपराधी भावनेने मन भरुन जाई. बराच काळ निघुन गेला होता,टेकड्यांवर लावलेली झाडे मोठी झाली होती.पावसाळ्यात टेकडी हिरवीगार दिसे.उन्हाळ्यात देखील पानगळ झालेल्या झाडांतुन फुललेले बहावा,गुलमोहर सुरेख दिसत.

  मुली थोड्या मोठ्या झाल्यावर सुट्टीच्या दिवशी त्यांना घेऊन आम्ही टेकडीवर जायचो.कधी धारवाडहुन भाच्या आल्या कि त्यांना घेऊन भेळेचे सामान,पाणी ,सरबत असा सगळा जामानिमा घेऊन संध्याकाळी टेकडीवर जायचे. हिंडुन झाल्यावर सावली बघुन बसायचे,सुसाट वाऱ्याला तोंड देत ,वर्तमानपत्रे पसरायची त्यावर दगड ठेवायचे ,भेळ बनवायची आणि खायची, त्या भेळेची चव काही औरच ! त्या दिवशी टेकडी पण माझ्यासारखीच खुश असल्याचे जाणवे.

         माझी मोठी बहिण तळजाई टेकडीच्या पायथ्याला राहते.माझ्यापेक्षा अनेक अघाड्या लढवुनही ती रोज टेकडीवर जायची.तिच्याजवळ मी मला जायला न जमण्याबद्दल कुरकुर करताच ती म्हणाली," दररोज नाही तुला जमत,पण रविवारी सुट्टी असते ना, तू पहाटे साडेपाचला माझ्याकडे ये, तुझ्या मुली झोपलेल्याच असतात, आपण टेकडीवर जाऊ आणि सात वाजता मुली उठायच्या आत तू घरी जाशील " मग तिच्याघरी जायला लागले .तिच्याकडून पर्वतीच्या मागील बाजुने चढून,वाघजाई वरुन तळजाईला जायचे व तेथुन उतरुन दोघी आपापल्या घरी जायचे असा परिपाठ सुरु केला.माझा भाचा त्यावेळी इंजिनियरींगला होता.त्या वयातल्या मुलांचा सुट्टीचा दिवस सकाळी नऊच्या आत सुरुच होत नसतो. त्याला एकदा माझी बहिण म्हणाली,"बघ आम्ही बहिणी सुट्टीच्या दिवशी सुध्दा पहाटे उठून टेकडीवर फिरायला जातो,व्यायाम चुकवत नाही " त्यावर तो पठ्ठ्या म्हणाला ," अरे वा ,आई केवढा व्यायाम , जिभेला " .खरच आम्ही बहीणी गप्पा मारतच हिंडायचो,रस्ता कधी संपला समजायचेच नाही. आमचा उपक्रम पाच सहा महिने टिकला असेल.  पावसाळा सुरु झाला आणि टेकडीवरुन वाहणाऱ्या  पाण्याबरोबर आमचे फिरणे वाहुन गेले !

  पुढे माझ्या नवऱ्याने टेकडीवर जायचे ठरवले आणि मी त्याच्याबरोबर जाऊ लागले, त्यांच्या वेगाशी स्पर्धा करत चालताना माझी दमछाक होई. बरोबर चालायचे तर् चालताना मी बोलते म्हणून भरभर चालता येत नाही या त्यांच्या वक्तव्याने तोंड बंद करुन चालावे लागे आणि दमायचे नसेल तर् एकटीने चालायचे तरी तोंड बंदच मग मला चालण्यात मजा नाही यायची. आपण खूप चालतोय, दमून जातोय असं वाटत राही.शिवाय गप्प बसुन चालताना घरी पोचल्यावर काय काय कामे आहेत याचे विचार थैमान घालत आणि मग आपण घरातली एवढी कामे टाकुन भटकतोय या विचाराने मन बेचैन होई व टेकडीवर फिरायचा आनंद कमी कमी होई.

मुली मोठ्या झाल्या आणि आम्ही सेनापती बापट रोडवर रहायला आलो. वेताळ टेकडी घरापासुन जवळच आहे.रोज संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर घरी जाऊन चहा पिऊन टेकडीवर जायला सुरुवात केली. टेकडीवर गेले कि शहराशी संबंधच संपल्यासारखे वाटते.सगळे ऋतु वेगळेपणाने जाणवतात. रोजच्या सूर्यास्ताच्या वेळेतील बदल टेकडीवर ठळकपणे जाणवायचा. थंडीत दिवस लहान असल्याने अंधार लवकर पडायचा. घरुन निघायला जरासा उशीर झाला तरी टेकडीवर पोचेपर्यंत काळोख होऊन जाई. हळुहळू टेकडीवर जाण्याची सवय झाली,तिथली झाडे,पक्षी यांची ओढ वाटु लागली. न बोलता आजुबाजुला बघत निसर्गाचा आस्वाद घ्यायची सवय लागली.थोडक्यात टेकडीवर फिरणे आवडायला लागले.

      वेताळ टेकडीवर झाडी आहेच आता तेथे बरेच मोर आहेत, ससे दिसतात. पहिल्यांदा मोर बघितला तेंव्हा झालेला आनंद आणि आज मोर बघताना होणारा आनंद यात थोडाही फरक नाही. कधी झाडांवर बसलेले असतात, कधी खांबावर बसतात,कधी जमिनिवरुन चालताना दिसतात तर क्वचित आपल्यासमोर उडून ही जातात. उन्हाळ्यात झाडांचे खराटे झाल्यामुळे मोर पटकन दिसतो, शिवाय तो त्यांचा विणीचा मोसम असल्यामुळे मोराचा पिसारा झगमगत असतो, त्याच्या कंठाला निलकंठ हेच नाव शोभतं .

पावसाळ्यात टेकडी हिरवीगार असते. हिरव्या रंगाच्या अनेक छटा पानांमध्ये दिसतात.वेताळटेकडीवर प्रामुख्याने ग्लॅरिसिडीया नावाची विलायती झाडे आहेत.पावसाळा संपला कि लगेच हि झाडे वाळुन जातात ,नुसत्या काड्या राहतात पण  एका लहानशा पावसानंतर खराट्यासारखी दिसणारी हि झाडे पोपटी पानांनी मढुन जातात. पाऊस पडायला लागला कि टेकडीवर जागोजागी लाल वेलवेटसारखे दिसणारे मृगाचे किडे फिरु लागतात, माती मऊशार हिरवळीने झाकुन जाते . ज्ञानदेवांच्या ’मातीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव ’ या उक्तिचा प्र्त्यय ती मऊ हिरवळ देते. सगळी मोठ्मोठी झाडे देखील सुस्नात झालेली असतात अतिशय तृप्त वाटातात. पण जसजसा पाऊस वाढायला लागतो तसे टेकडीवर जाणे  अवघड होते .पावसाळ्यात खूप पाऊस असेल त्या आठवड्यात टेकडीवर जाणे झाले तरी वर हिंडणे कठीण होते, चिखलातुन फार काळजीने चालावे लागते,खड्ड्यांमधे पाणी साचुन डबकी झालेली असतात आणि बऱ्याच ठिकाणी  काळ्या मातीत पाय रुततात,दगडांवरही शेवाळ्याने पाय घसरायची भिती वाटते. अशा  गर्द हिरव्या झाडीत मोर दिसणे अवघड असते, क्वचित त्यांचे ओले पिसारे वाळवायला ते झाडांच्या टोकावर् बसलेले दिसतात पण ते ओले पिसारे तेवढे छान दिसत नाहीत शिवाय झाडांच्या रंगात ते लपुन जातात. अगदी धो धो पावसाचे दिवस सोडले तर बाकीचे दिवस टेकडीवर जाणे होतेच. पावसाच्या दिवसांत, घरात बसून टेकडीवरचे धबधबे बघण्यात समाधान मानावे लागते.

पाऊस संपुन थंडी सुरु होते, टेकडी आता गर्द हिरवी झालेली असते.तिच्यावरचे गवत कमरे एवढे वाढते,त्यातुन चालताना क्वचित सापकिरडुचं भय वाटतं. दिवस हळूहळू लहान होऊ लागतो, पहाटे धुक्याची शाल पांघरलेली टेकडी गूढरम्य दिसु लागते. पूर्वेकडून सूर्याची किरणे ती धुक्याची शाल हळुहळू दूर करू लागतात. पायथ्याला थंडी वाजते म्हणुन घातलेला स्वेटर,मफलर वर येईपर्यंत नकोसा वाटायला लागतो. नवरात्राच्या सुमारास झेंडुसारख्या गर्द केशरी फुलांची झाडे सगळ्य़ा टेकडीवर  वाढतात, केशरी फुलांच्या ताटव्यांनी नटलेली टेकडी फारच सुरेख दिसते. मात्र या थंडीत  मोरांची पिसे गळू लागतात( हे ज्ञान देखील टेकडीवर नियमित जायला लागल्यावर झाले. ) हे  पिसे गळलेले मोर,तिरुपतीहुन मुंडन् करुन आलेल्या दाक्षिणात्य  स्त्रियांसारखे दिसू लागतात. आम्हाला खुपदा थंडीच्या दिवसात दोन तीन लांडोरी आणि त्यांची दहाबारा पिले ओळीने गवतातुन जाताना दिसतात. मोराची पिल्ले बदकाच्या पिलांसारखीच ,तेवढीच फारसे रंगरुप नसलेली पण केवळ लहान वयामुळे गोंडस वाटणारी ! नवरात्रातल्या हस्ताच्या पावसापर्य़ंत गवत,झाडे हिरवी असतात,  आक्टोबर हिट मध्ये टेकडीवरील गवत पिवळे होऊ लागते,आठवडाभरात सगळे गवत वाळुन जाते, थंडी वाढायला लागली कि झाडांची पाने ही रंग बदलू लागतात. पानगळ सुरु होते.

     कधी कधी टेकडीवरचे गवत संध्याकाळच्या वेळी पेट घेते,हा वणवा नसून, ही आग मुद्दाम लावली जाते असे मला वाटते. रात्री खिडकीतून ही आग पाहिली की माझे मन तिथल्या पक्षांच्या,सशांच्या काळजीने कासाविस होते.अंधारात कुठे जातील बिचारी ? मलाही रात्रीच्या अंधारात टेकडीवर जाऊन आग विझवणे शक्य नसते . सकाळी टेकडीवर जळलेल्या गवताचा वास भरुन राहिलेला असतो.  संक्रांतीनंतर दिवस मोठा होत जातो, उन वाढु लागते,  वसंतात झाडांना पालवी फुटू लागते,कडुलिंब हिरवेगार होतात.

      ऋतुंमधले हे सगळे बदल टेकडीवर जाणवतात. निसर्गाचं चक्र जवळुन बघायला मिळतं.हल्ली तर टेकडीवर जाण्यामागे व्यायाम वगैरे विचार केंव्हाच मागे पडलेत. मोर बघायच्या वेडापायी वेगवेगळ्या आडवाटा शोधल्या आहेत आम्ही. काही वाटा तुलनेने अवघड आहेत त्यावरुन जाताना,कुठून आलो इकडे, आता परत नाही यायचं या रस्त्याने असं मनात येतं तोच रत्नजडीत पिसाऱ्याचा तोल सावरत एखादा मोर  आपल्याच मस्तीत डौलात समोरुन जाताना दिसतो ,डोळ्याचे पारणे फिटते . अवघड वाट तितकी कठीण वाटत नाही. परवा एकदा अशाच आडवाटेने आम्ही उतरत होतो, टेकडीच्या एका उतारावरील बेचकीत दोन तीन लांडोरी दिसल्या, आणि जरा पुढे आलो तर काय , मोराने आपला पिसारा फुलवलेला होता ! त्याचे प्रियाराधन चालले होते . जरा वेळाने त्या फुलवलेल्या पिसाऱ्याचे दर्शन आम्हालाही घडले, आम्ही मोराच्या मागे,लांडोरीकडे तोंड करुन होतो. त्या अनुभवाचे शब्दात वर्णन करणे अशक्य. त्या पिसाऱ्यावर लक्ष लक्ष पाचु जडवलेत असे वाटत होते,त्या हिरव्यागार पिसाऱ्यावर त्याचा लखलखित निळा गळा असा काही चमकत होता कि बस्स ! निसर्गाच्या अद्भुत कलाकॄतीकडे बघताना भान हरपुन गेले ! एकदा असाच दोन मोर आणि अनेक लांडोरीचा घोळका चालला होता आणि अचानक एका मोराने आकाशात झेप घेतली आणि लांबवर उडत गेला. मोराचा पिसारा बराच मोठा असल्याने  जास्त लांबवर उडायला त्याला अवघड जात असेल अशी माझी समजुत त्यादिवशीच्या मोराच्या भरारीने चूक ठरवली. एखाद दिवशी एकही मोर दिसला नाही अशी रुखरुख वाटत असतानाच टेकडीच्या पायथ्याकडे येताना अचानक डावीकडच्या झाडीत अगदी हाताच्या अंतरावर एखादा मोर आमचीच वाट बघत उभा असतो ! कधी अगदी पायथ्याच्या  झाडावर एखादा मोर आपला लांबलचक पिसारा सोडून ऐटीत बसलेला दिसतो.

व्यायामाचे असंख्य फायदे आपल्या सगळ्यांनाच माहित आहेत. चालणे,पळणे,जिम, योगा ,पोहणे असे असंख्य प्रकार लोक करत असतात.   टेकडीवर गेल्याने माझा व्यायाम किती होतो ते माहित नाही, त्या चालण्याने व्यायाम होतो का ? असाही प्रश्ण काही तज्ञांना पडू शकेल ,कारण माझ्या शरीरयष्टीत गेले अनेक वर्ष टेकडी चढून फारसा फरक पडलेला नाही.  मात्र माझे संसारातले ताप टेकडीवर गेले की मला संपल्यासारखे वाटतात. माझ्या ऑफिसमधील कामाचे ताण,तेथील राजकारण  यांचा तिकडे मला पूर्णतः विसर पडतो ! भूतकाळातील कटू आठवणी टेकडीवर फिरकत नाहीत कि भविष्यातील संध्याछाया तेथे भिती घालायला येत नाहीत .टेकडीवरची झाडे,ती माती, वेगवेगळ्या पक्षांचा किलबिलाट आणि त्या सगळ्यांवर कडी करणारे मोरांचे दर्शन मला दररोज नवा अनुभव देते,  ताजेतवाने करते. माझ्या वजनदार व्यक्तिमत्त्वाचं रहस्य ही त्यातच दडलेलं असाव कारण संस्कृत मध्ये श्लोक आहे ना
      सर्पा: पिम्बन्ति पवनं न च दुर्बलाः ते
      शुष्कै: तृणै: वनगजाः बलिनो भवन्ति
      कन्दै:फलैः मुनिवराः क्षपयन्ति कालम्
      संतोष एव पुरुषस्य परम् निधानं
म्हणजे साप वारा पिऊन जगतात पण ते दुर्बल नसतात,जंगलात वाळलेले गवत खाऊनही हत्ती धष्ट्पुष्ट असतात, कंदमुळे खाणारे मुनिवर दिर्घायु असतात ,संतोष हेच माणसाच्या निरोगी पणाचे कारण आहे.

      निसर्गाच्या एक तासाच्या सहवासात मला एवढा आनंद मिळतो तर त्याच्याच सानिध्यात कायम राहणाऱ्या आपल्या पूर्वजांचे किंवा ॠषीमुनींचे आयुष्य समाधानी असेल तर त्यात काय नवल !

Thursday, April 25, 2019

गीत रामायणाचे गारुड

अगदी लहान असतानाच रामायण,महाभारतील गोष्टी आईकडून ऐकलेल्या होत्या,पुढे शाळेत गेल्यावर रामायण,महाभारतातल्या कथा ,त्यांवरील पुस्तके वाचत गेले. एका बंडखोर वयात त्यातल्या अनेक घटनांबद्दल वाद घातले, त्यातल्या घटनांच्या शक्यतांबद्दल शंका घेतल्या. रामाने वनवासात जाताना सीतेला बरोबर घेतले तसे लक्ष्मणाने उर्मिलेला का नेले नाही? मग उर्मिला बरोबर गेली असती तर पुढे कसे वेगळे घडले असते? रामाने सीतेच्याअग्निदिव्यानंतर ही सामान्य लोकांच्या बोलण्यावरून गर्भवती सीतेला पूर्वकल्पना न देता का त्यागली? अशा ना ना प्रश्णांवरुनआई,वडीलांशी वाद घातले.मैत्रिणींबरोबर चर्चा केल्या. शाळेत नववी,दहावीत असताना महाभारतातील कर्णाने वेड लावले होते.मॄत्युंजय,राधेय,कौंतेय अशा मराठीतल्या अनेक नामवंत लेखकांची पुस्तके वाचुन कर्णाच्या थोरवीने मन भारुन गेले,मात्र नंतरच्या वयात बाळशास्त्री हरदास,इरावती कर्वे यांची पुस्तके वाचल्यानंतर कर्णाबद्दलचे अतिरेकी प्रेम आपोआप कमी झाले.महाभारताकडे बघण्याची दृष्टी बाळशास्री हरदासांच्या महाभारतावरील व्याख्याने आणि इरावती कर्वेंच्या ’युगांत’मुळे खुप बदलली.

मी दहावीत असताना ’महाकवी माडगुळकर’ या विषयावरील एका आंतरशालेय स्पर्धेत भाग घेतला होता.त्यावेळी गदिमांच्या अनेक कविता वाचल्या आणि घरातले ’गीतरामायण’ पुस्तक वाचायला घेतले. त्यापूर्वी अनेकदा गीतरामायणातील गाणी रेडिओवर ऐकली होती,सुधीर फडक्याचे गीतरामायणाचे कार्यक्रम न्यू इंग्लिशस्कुल , रमणबाग शाळा ,रेणुकास्वरुप शाळा असे विविध ठिकाणी होत, ते ही ऐकले होते. गीतरामायणातील गाणी न ऐकलेला माणुस मराठी माणुसच नाही. पण पुस्तक वाचायला घेतल्यावर गदिमांची महती जाणवायला लागली

                  सिताकांत लाड नावाच्या IAS अधिकाऱ्याची ’पुणे आकाशवाणी’ मध्ये नेमणुक झाली आणि पुणे केंद्राचे वेगळेपण सिध्द् करण्याकरीता त्यांनी मैत्रीच्या आधिकारात गदिमांना वर्षभर सातत्याने करता येईल असा कार्यक्रम करण्याची विनंती केली आणि रामायाणातील प्रसंगावर गीते सादर करण्यास गदिमा तयार झाले, आणि सुधीर फडक्यांनी त्यांना स्वरबध्द केले ,अशी गीतरामायणाची जन्मकथा मी दादांकडून ऐकली होती. म्हणजे गीतरामायणाला निमित्त झाले एक सरकारी आदेशाचे, पण त्यातुन किती असामान्य कलाकृती जन्माला आली !
       
             लवकुश हे रामपुत्र वाल्मिकींच्या आश्रमातुन रामचंद्राच्या अश्वमेध यज्ञात येतात आणि दरबारात प्रत्यक्ष रामचंद्राना रामकथा काव्यांतुन सांगत आहेत अशी गीतरामायाणाची संकल्पना आहे. रामायणाची संपूर्ण कथा ,एक एक प्रसंग अतिशय सुंदर शब्दात विविध व्यक्तींच्या तोंडुन उलगडत जाते. गदिमांचे निर्गुण काव्य सुंदर कि बाबुजींनी दिलेल्या  चाली देऊन त्याला दिलेले  सगुण रुप जास्त सुरेख असा प्रश्न पडतो , त्याचे शिवाजीराव भोसल्यांनी फार छान उत्तर दिलेलं मला आठवत, ते म्हणाले होते ’सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ’ . खरोखरीच गीतरामायण हिअशी विलक्षण रचना  आहे.
             मी  असंख्य वेळा सुधीर फडक्यांच्या आवाजात ’गीत रामायण’ ऐकले आहे,त्यांचे निवेदनही फार रसाळ असे. मला शास्त्रीय संगितातले विशेष समजत नाही, त्यामुळे कुठल्या गाण्याला कुठला राग वापरला वगैरे मला कळत नसले तरी गीताच्या भावाप्रमाणे त्यांना ज्या चाली लावल्या आहेत त्या किती  समर्पक आहेत ते माझ्यासारख्या सामान्य व्यक्तिला सहज समजतं.
     
         रामायणाची सुरुवात निवेदकाच्या गीताने होते, या गीताबद्दलची आख्यायिका पण खुप जणांकडून ऐकली आहे. गीतरामायणाच्या प्रसारणाची भरपूर जाहिरात आकाशवाणीने केली होती, त्या काळी प्रसारण हे live असे. पहिल्या गीताची प्रत गदिमांनी बबुजींना दिली होती असे त्यांचे म्हणणे होते आणि त्यांना ती दिलेलीच नाही असा बाबुजींचा दावा होता, थोडक्यात ज्या गीताचे प्रसारण व्हायचे त्या गीताची प्रत गहाळ झालेली होती , गदिमा आणि सुधीरजी दोघेही आपापसात भांडू लागले ,सहकारी वर्ग कावराबावरा होऊन बसला,या दोन्ही दिगज्जांच्या भांडणात पडण्याची कोणाचीच हिम्मत नव्हती, अशा वेळी लाड साहेब आले आणि त्यांना झाला प्रकार समजला.त्यांनी शांतपणे जाऊन गदिमांना बाजुला घेतले व एका खोलीत नेऊन म्हणाले," गीत सापडत नाही हि वस्तुस्थिती आपण कोणीच बदलु शकत नाही,पण तुम्ही दोषारोपात वेळ का घालवताय , तुम्ही सिध्दहस्त आहात मी या खोलीचे दार लावुन घेतो,कुणीही तुम्हाला त्रास द्यायला येणार नाही , तुम्ही परत गीत लिहा " आणि गदिमांनी अगदी थोड्या वेळात ’कुश लव रामायण गाती ’ हे निवेदकाच्या तोंडचे पहिले गीत लिहून काढले, बाबुजींनी त्याला तात्काळ चाल लावली व ठरलेल्या वेळी ठरल्यानुसार गीताचे प्रसारण झाले. हि कथाच मला अद्भुत वाटते ! दोन्ही कलावंतांच्या दिव्य प्रतिभेची कल्पना केवळ या पहिल्या गीतातुनच दिसायला लागते.  श्रीरामांच्या दरबारात जाऊन रामायणाचे कथन करणाऱ्या कुश आणि लव या दोन बटुंचे ,त्यांच्या गायन शैलीचे ते ऐकताना परीणाम झालेल्या श्रोत्यांचे इतके प्र्त्ययकारी वर्णन या गीतातुन केलय , त्यातुनच पुढील गीते ऐकण्याची उत्कंठा वाढत जाते.
बटुंचे वर्णन करताना महाकवी म्हणतात
पुत्र सांगती चरित पित्याचे
ज्योतीने तेजाची आरती
ऐकताना समजले नव्हते पण वाचताना जाणवले कि काय ताकद आहे शब्दात ! प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट , सारखी अलंकारीक भाषा ते सहज वापरतात.

  आयोध्या नगरीचे वर्णन देखील इतके सुंदर आहे, डोळ्यासमोर ती भव्य नगरी तेथिल रस्ते दिसु लागतात,,पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्या नगरीतील लोक असे धर्मपरायण ,स्त्रिया पतिव्रता,पुत्र कुलदीपक आणि कमाल म्हणजे  ’अतृप्तीचा वावर नव्हता नगरी,घरी अंतरी’,म्हणजेच नगरातील केवळ प्रत्येक घरात समॄध्दी्च होती असे नाही तर प्र्त्येकाच्या अंतःकरण तृप्त होते.(कदाचित तॄप्त अंतःकरणामुळे घरी आणि नगरीत तृप्ती होती) दशरथ राजाचे वर्णन सुध्दा असेच अप्रतिम आहे , ’सदनी चंद्रसा, भुवनी इंद्रसा,सूर्य जसा संगरी’,घरात चंद्रासारखा शीतल,प्रेमळ दशरथ राजा,राज्यात इंद्रासारखा तर रणांगणावर सूर्यासारखा प्रखर पराक्रमी होता.  प्रत्येक गीताचे वर्णन करायला लागले तर शब्द कमी पडतील. ’पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा’ हे गीत तर गीतरामायणातील सर्वोत्कृष्ट कलाकृती आहे असं मला वाटतं. मानवी जीवनाची क्षणभंगुरता, मरणाची अनिवार्यता आणि उन्नतीचा अंत हे चरचरीत सत्य अतिशय सोप्या शब्दात श्रीरामांच्या तोडून माडगुळकर सांगुन जातात.
आदर्श पुत्र,आदर्श शिष्य,आदर्श बंधु, प्रेमळ पती अशी श्रीरामांची सगळी रुपे गीतरामायणात दिसतातच ,पण काव्यात निसर्गप्रेमी, सीतेवर नितांत प्रेम करणारे ,तत्वज्ञानी,धर्मज्ञानी अशी पण रामाची रुपे दिसतात.लक्ष्मणाला पर्णकुटी कुठे बांधावी हे सांगताना निसर्ग प्रेमी राम म्हणतात ,
          पलाश फुलले,बिल्व वांकले
           भल्लातक फलभारे लवले
          दिसती न यांना मानव शिवले
          ना सैल लतांची कुठे मिठी
           या इथे लक्ष्मणा बांध कुटी
सुमंताला निरोप देताना श्रीराम म्हणातात
         राजधर्म तू आठव आई
         अभिषिक्ताते गुण वय नाही
          दे भरतासी मान प्रत्यही
           पढव सुमंता विनयाने हे सांगुन माझे नाव
  मारीचाचा वध करुन परत येताना  आश्रमात सीता नाही हे बघुन दुःखित राम म्हणतात
        पहा लक्ष्मणा दिसती डोळे
         प्रियेचेच ते  विशाल  भोळे
        मॄगशावक हे तिचे कोवळे
        का त्याच्याही नीर लोचनी ? 
  वाली वध केल्यावर त्याचे समर्थन करताना श्रीराम म्हणतात
            नृपति खेळती वनि मॄगयेते
            लपुनि मारिती तीर पशूते
            दोष कासया त्या क्रीडेते ?
             शाखामृग तूं पशूहुन,
             मी धर्माचे केले पालन
             वाली वध ना खलनिर्दालन
   सुग्रीवाने अविचाराने केलेल्या धाडासाबद्दल त्याची कानाउघाडणी करताना प्रभु रामचंद्र म्हणातात,
         काय सांगु तुज,शत्रुदमना
         नॄपऒळखती रणीं भावना
          नंतर विक्रम,आधि योजना
         अविचारें जय कुणा लाभले?
     
  गीतरामायणावर आजवर अनेक थोर लेखक,कवींनी भरपूर लिहुन ठेवलयं. माझ्या मनावर माझ्या कळत्या वयात गीतरामायण वाचल्यावर जी मोहिनी पडली ती , ते असंख्य वेळा ऐकुनही  कमी झालेली नाही. दरवेळेस ऐकताना काही उपमा,काही शब्द ,काही प्रतिमा नव्यानेच जाणवत राहतात. गीतरामायण प्रथम प्रसारित झाले त्याला आज चौसष्ठ वर्षे उलटुन गेली तरी त्यातली गोडी जराही कमी होत नाही यातुनच त्याची महती दिसते. अनेक भाषांमधुन त्याचे भाषांतरही झालेले आहे. रेडीओ,कॅसेट्स, सीडी पासून आताच्या नवतंत्रज्ञामुळे यु-ट्युब, सारेगम कारवा,मोबाईल ऍप पर्यंत गीतरामायण ऐकता येत आहे. राम चरीत्राची गोडी जशी अमर आहे तसेच गीतरामायणाची आवडी पण अजरामर राहील. गीत रामायणासारख्या अद्वितीय कलाकृती बद्दल बोलताना सुधीर फडके म्हणाले होते, "गीत रामायण माडगुळकरांनी लिहिले नाही आणि मी संगीतबध्द केले नाही ते आमच्याकडून करवुन घेतलेले आहे " गदिमा म्हणतच ना ’ज्ञानीयाचा , तुकोबाचा तोच माझा वंश आहे,माझिया मधेही थोडा इश्वराचा अंश आहे". माझ्या मातॄभाषेला अशी अजोड अलंकार देणाऱ्या या ईश्वरी कलावंताना शतशः वंदन !