Friday, December 6, 2013

मी मायक्रोवेव्ह ओव्हन घेते

 लहानपणापासून मला खाण्याची खूप आवड. तरेतऱ्हेचे खाद्यपदार्थ मोठ्या चवीने खायची हौस. त्यातही गोडाच्या जेवणाची तर फारच आवड. रोज जेवणात गोड पदार्थ लागायचाच.अगदी गुळांबा,साखरांब्यापासून काहीच नसेल तर तूप साखर पोळी तरी लागेच मला. मात्र स्वयंपाक करायचा तेवढाच कंटाळा. घरात आई करायला भक्कम होतीच, आजीचाही मुक्काम असे, मोठी ताई होती त्यामुळे माझ्यावर कामाची वेळ येत नसे आणि आली तरी टाळण्यात मी तरबेज होते. काम न करण्यावरुन मी आईची खूप बोलणी खायची. आजीला फक्त विश्वास होता, "मनात आणल तर ती इकडचा डोंगर तिकडे करेल"  असे ती माझ्या वतीने आईला सांगायची. " हो,पण तिच्या मनात यायच कधी?" चिडून आई विचारी. "येईल गं, वेळ आली कि सगळं करेल ती, बघशील तू" असं समजावत ती मला खेळायला किंवा वाचायला पाठवुन देई.

    चांगली आठवी-नववीत जाईपर्य्ंत  चहा देखील केलेला मला आठवत नाही. नववीत असताना शाळेत आंम्हाला ’कार्यानुभव’ असा विषय होता त्यात एका सहामाहीला ’बेकरी’ नावाचा विषय होता. दुपारच्या तासांना बाई केक, ब्रेड, नानकटाई अशा विविध चविष्ट (आणि त्याकाळी आम्हाला अप्रुपाच्या वाटणाऱ्या) पदार्थांच्या कृती(आजच्या भाषेत रेसिपीज) लिहून द्यायच्या. त्यानंतर मुलींचे गट पाडून हे पदार्थ करावे लागत, त्यासाठी लागणारे सामान शाळेकडून मिळत असे. एखाद्या दक्ष गृहिणीच्या वेषात बाई प्रत्येक गटाला नीट मोजून सामान देत आणि कृतीत दिल्याप्रमाणे नीट करा, वाया घालवू नका अशी समज देत. आमच्या गटात काही मुली भलत्याच हौशी होत्या, अभ्यासात त्या थोड्या मागे होत्या, मग आमच्यात एक गुप्त करार झाला, या तासाचे काम त्यांनी करायचे त्याबदली त्यांना गृहपाठाच्या वह्या आम्ही द्यायच्या. मग काय कार्यानुभवाच्या तासाला आमचा तीन चार जणींचा उनाड ग्रुप गप्पा मारत बसायचा. तयार झालेला पदार्थ आम्हांलाही खायला मिळेच, कधीकधी बाईंची बोलणी पण खावी लागत. पण सगळ्यांनी तेथे गर्दी करण्याने होणाऱ्या गलक्यापेक्षा आमचे गप्पा मारणे बाईंनाही सोईचे ठरे. शेवटी परीक्षा आली, आम्हा प्रत्येकीला एक पदार्थ घरुन करुन आणायला सांगण्यात आले. वार्षिक परीक्षा, पास होणे अनिवार्य. मला केक करायचा होता. आईने त्यात अंडे असल्याने पूर्ण असहकार दाखवला , (शिवाय तिला वाटले असेल ,’बरी सापडली,आता न करुन सांगते कुणाला?’ ) शेवटी वही उघडली, त्यात लिहिलेले साहित्य, अंडे सोडून बहुतेक गोष्टी घरात होत्याच, वहित वाचून सगळे जसेच्या तसे केले, मातोश्री स्वयंपाकघरात आल्या देखील नाहीत. तयार केलेले मिश्रण एका सपाट बुडाच्या पितळी भांड्यात(आईच्या भाषेत त्या भांड्याचे नाव लंगडी होते) घातले, गॅसवर एक तवा ठेवला त्यावर ती लंगडी ठेवली वरून झाकण ठेवले, तव्यावर थोडी वाळू पसरली होती. वहीत लिहिल्याप्रमाणे साधारण तीस-चाळीस एक मिनिटांनी गॅस बंद केला, घरभर केकचा खमंग वास सुटला होता, केक चक्क सुंदर फुगलाही होता.पण तो खाता येत नव्हता कारण शाळॆत दाखवायला न्यायचा होता. दुसऱ्या दिवशी शाळेत नेवुन दाखवला, चांगले मार्क मिळवले.  तो घरी आणून कधी खाऊ असेच झाले होते मला आणि माझ्या धाकट्या बहिणीला. वडीलांनी , मोठ्या बहिणीने माझे खूप कौतुक केले, आजीनेही ’बघ, मी म्हटल नव्हतं मनात आणल की ती सगळ करते ’ या विधानाची खात्री झाल्याबद्द्ल शाबासकी दिली. आई म्हणाली," जमलयं तुला पण करत जा असच नेहमी, ....." पण इतके होवुनही आपल्याला वहित वाचून पदार्थ करता येतो हा विश्वास वाटल्याने पुन्हा मी त्या वाटेला फारशी कधी गेले नाहीच.

    ’मराठीने केला कानडी भ्रतार’ अशी माझी गत होती.सासर कन्नड असल्यामुळे तिकडच्या स्वयंपाकाच्या रितीभाती इकडच्यापेक्षा अगदीच वेगळ्या. माझी पाटी कोरी असल्याचा मला फायदाच झाला. माझ्या सासुबाई खूपच सुगरण होत्या, सगळ्या प्रकारचे पदार्थ करायची आणि लोकांना खाऊ घालायची त्यांना हौस होती, मी  नोकरी करत होते. पण मी शिकण्याचे धोरण धरले,त्यांनी पण कौतुकाने मला इडली-डोशापासून सार,सांबार,नारळाच्या पोळ्या आणि मंगळूरकडचे खास पदार्थ ही शिकविले. मराठी मुलींना स्वयंपाक जमत नाही असा आपल्यावर बट्टा येवू नये या मराठीच्या अभिमानापोटी आपल्याला सगळे आले पाहिजे या हेतूने का होईना मी सगळे शिकले आणि नकळत स्वयंपाकाच्या पाशात गुरफटले. तरी टि.व्ही वरील शो बघून ,किंवा मासिक-पुस्तक वा वर्तमानपत्रातील पदार्थ वाचून करुन बघण्याची सवय मला अजूनही लागलेली नाही. पण सुदैवाने (कि दुर्दैवाने?) माझे पदार्थ फारसे कधी बिघडले नाहीत. लाडवाचा पाक असो, कि पोळीचा गूळ मला जमतो, तिळगूळाची मऊ वडी खुसखुशीत होते आणि कडक वडी कुरकुरीत बनते,चिरोट्याला पापुद्रे सुटतात, पुरणपोळीही न तुटता तव्यावर चढते. मोदकाची उकड छान होते.थोडक्यात सुगरण म्हणावे इतपत सगळे जिन्नस मला करायला येतात. माझ्या सासुबाईंना याचे श्रेय जाते कारण त्यांनी योग्य मापात मला पदार्थ शिकविले. माझी आईदेखील सुरेख स्वयंपाक करायची पण तिला विचारले तर तिला कधीच प्रमाण सांगता यायचे नाही. अंदाजानेच ती सगळे घेत असे आणि चव न बघता सुध्दा तिचा पदार्थ चविष्ट होत असे, शिवाय कधीही तिच्या भाजी आमटीची चव बदलत नसे. तिला नेहमीच किमान १०-१५ लोकांचा स्वयंपाक करावा लागल्याने तीन -चार जणांचे माप तिला सांगता येत नसे. स्वयंपाकाची सवय झाल्यानंतर मी देखील अंदाजानेच सगळे करु लागलीय आणि मला पण कुणाला चटकन मापाने सांगायला येत नाही आता.
एकंदरीत माझी मुळ प्रवृत्ती ’सुगृहिणी’ नव्हती. मात्र अंगावर पडलेले काम मनापासून, आनंदाने करण्याची वृत्ती असल्याने मी स्वयंपाक करते. तो सगळ्यांना आवडतो. आले-गेले,पै-पाहुणे ,नातलग माझ्या पदार्थांवर खुष असतात .कुणालाही तोंडदेखले चांगले न म्हणणाऱ्या स्पष्ट्वक्त्या माझ्या आईने मला चांगला स्वयंपाक करतेस असे प्रशस्तीपत्रक दिले यातच सगळे आले. माझ्या मुलींना मी केलेले पदार्थ आवडत असल्याने मी नवनवे पदार्थ शिकत गेले , करुही लागले. अगदी चायनीज, पंजाबी , इटालियन असे वेगावेगळे प्रकारही जमु लागले. शेवटी कुठल्याही पदार्थातील घटकांचे प्रमाण योग्य पडले आणि तो नेमकेपणाने शिजला कि चव चांगली होणारच. हल्ली मिक्सर, फुड प्रोसेसर,इलेक्ट्रिक रगडा अशा विविध साधनांच्या सहाय्याने पदार्थ करणे खरोखरीच खूप सोपे झालेले आहे.  या आधुनिक साधनांमुळे कुठलाही पदार्थ सहज होवु शकतो. खलबत्ता,पाटा-वरवंटा,उसळ-मुसळ,जाती अशी साधने वापरुन चुली शेगड्यांवर जमीनीवर बसुन रुचकर स्वयंपाक करणाऱ्या पूर्वीच्या बायकांची आणि त्यांच्या शारीरिक कष्टांची कमालच वाटते.

     माझ्या सासुबाई फारच हौशी होत्या त्यांनी सगळ्या प्रकारची अनेक भांडी, मिक्सर, इलेक्ट्रिक रगडा ,ओव्हन सगळे जमा केलेले होते. माझ्या लग्नानंतरही स्वयंपाकघरात त्यांचेच राज्य असल्याने नवीन काही उपकरण बाजारात आले कि ते घेण्याकरीता त्या त्यांच्या मुलाच्या मागे लागत आणि वस्तू घरात आली कि त्याचा वापरही केला जाई. सोलर कुकर असाच आला.मग गच्चीवर त्यात दाणे भाज, भाजणी भाज सुरु झाले.सुट्टीच्या दिवशी वरण,भात ही बनु लागला. त्याला लागतात म्हणून बाहेरुन काळे असणारे ऍल्युमिनियमचे डबे आले. त्यात केक करुन झाला, ढोकळा करुन झाला. मग दरवेळी गच्चीवर जाणे, उन फिरेल तसे कुकर फिरवणे या गोष्टी त्रासदायक होवु लागल्या आणि त्याचा वापर थांबला. कुठल्याही प्रकारच्या लाह्या बनवणारे एक मशीनही आणले होते त्याचा ही तोच प्रकार,नव्य़ाची नवलाई संपली की वस्तू पडायची अडगळीत.  आणलेले कुठलेच भांडे टाकायचे नाही या मायलेकांच्या तत्त्वाने मला तो पसारा आवरणे फार मुश्किल होवुन जाई. जुना मिक्सर देवुन नवीन आला, फुडप्रोसेसर आला, जुना रगडा जावुन ओट्यावर बसणारा लहान रगडा आला. स्वयंपाकघर भांड्य़ांनी अगदी ओतप्रोत भरुन गेले आहे.

    यातच काही वर्षांपुर्वी ’मायक्रोवेव्ह’ नामक चीज बाजारात आली. सासुबाई या जगात नव्हत्या. मी त्या वस्तूबद्दल अजिबात स्वारस्य दाखवले नाही. मैत्रीणींकडे, बहिणींकडे मायक्रोवेव्ह आले.त्यांचे फायदे, गुणगानही कानावर येवु लागले. नवऱ्याने तुला हवा असल्यास सांग घेऊन टाकू अशी उदार ऑफर  दिली पण माझा निर्धार कायम होता.एक तर तो ठेवायला जागा लागणार, पुन्हा त्यात ठेवायची भांडी वेगळी म्हणजे पुन्हा ती घ्या. शिवाय त्याकरीता काचेची किंवा चांगल्या दर्जाच्या प्लॅस्टीकची भांडी लागतात असे कळले, ती भांडी कामवालीला घासायला देता येणार नाहीत म्हणजे आपलेच काम वाढवा. नकोच ते. म्हणून बरीच वर्षे मी या नव्या उपकरणापासून निग्रहाने दूर राहिले.

    माझ्या धाकट्या मुलीचे खाण्यापिण्याचे फार नखरे. तिला गरम पदार्थ खायची आवड. सकाळची पोळी रात्री नको म्हणेल पण करुन देवु का विचारलं तर तव्यावरची ताटात असेल तर दोन पोळ्या आवडीने खाणार. खायला काही करुन ऑफिसला गेले कि ती कॉलेजमधुन आली तरी खाणार नाही कारण  ते गरम नव्हते. मग तिच्या सगळ्या मैत्रीणींकडे कसे मायक्रोवेव्ह आहेत, त्या कशा गरम करुन घेतात याची मला सतत वर्णने ऐकवू लागली. वडीलांनाही तिने आपल्या पार्टीत ओढले. मायक्रोवेव्ह वापरल्याने वेळ किती वाचतो हे पण मुली मला सांगू लागल्या, त्यात पदार्थ कसे कमी तेला तुपात होतात म्हणून ते अन्न किती हेल्दी आहे , हे पण सुनवू लागल्या. माझा मनोनिग्रह हळूहळू ढळू लागला. मी पण आजुबाजुला मायक्रोवेव्ह बद्द्लची माहिती गोळा करु लागले. त्यात पोळ्या सोडून बाकीचे सगळे पदार्थ काही सेकंदात होतात असे सगळीकडून समजू लागले. त्यात साबुदाण्याची खिचडी कशी सुरेख होते, खोबऱ्याच्या वड्या कशा खमंग होतात. चिवडा किती झट्पट होतो. केक कसा मिनिटात होतो इथपासून ते मनात यायचा अवकाश मायक्रोवेव्ह मधे पदार्थ तयार होतो इथपर्य़ंत त्याचे वर्णन ऐकल्यामुळे  अशा जादु-ई-उपकरणापासून इतकी वर्ष वंचित राहिल्य़ाने माझे कित्ती नुकसान झालयं असं मला वाटू लागलं. घरात असलेल्या कित्येक काचेच्या भांड्यावर ’मायक्रोवेव्ह’ मधे वापरता येतील अशी सूचना असल्याने मुलींनी आई भांडी नाही घ्यावी लागणार असे सांगितले. मग मायक्रोवेव्हचा शोध सुरु झाला, शोध म्हणण्यापेक्षा सर्वेक्षण ( मराठीत सर्व्हे ! ) सुरु झाला. बाजारात अनेक कंपन्यांचे विविध मायक्रोवेव्ह उपलब्ध होते. विचारावे त्या प्रत्येकाकडे आणखी वेगळ्याच नावाचे असत. शेवटी मुली आणि त्यांच्या वडीलांनी बऱ्याच चौकशा करुन एक भलामोठा मायक्रोवेव्ह ऑर्डर केला. दुसऱ्याच दिवशी तो घरी आला आणि ओट्यावर स्थानापन्नही झाला. पण त्याचा डेमो दाखवायला येणारा माणूस त्याच्या सवडीने येणार होता. त्यामुळे दोन-तीन दिवस त्याच्याकडे बघण्यातच समाधान मानणे चालू होते. एके संध्याकाळी कंपनीचा माणूस डेमो दाखवायला आला. त्याने भराभर बटणे दाबून ,मायक्रोवेव्ह,ओव्हन,ग्रील मोड. कुठल्या मोडवर कोणते भांडे, कसे किती वेळ ठेवायचे हे धडाधड सांगितले.
"भाजी शिजायला किती वेळ लागतो?" माझा बेसिक प्रश्ण
" ते कोणती भाजी आणि किती क्वांटीटी त्यावर अवलंबुन आहे"
"पण इथे तर तुम्ही आधीच टायमिंग सेट करायचं म्हणता ना, मग किती वेळ ठरवायचा?"
" ठरवा तुमच्या अंदाजानं , मधेच स्टॉप करुन बघायचं, आणि मॅडम याच्यासाठी स्पेशल क्लास आहेत त्याचा नंबर देतो मी तुम्हाला. तो क्लास अंटेंड करा, सगळं समजुन जाईल बघा. निघतो मी, सही करा या पेपर्सवर"
मला जास्त बोलू न देता सही घेऊन आणि त्या क्लासचा नंबर देवून तो मुलगा निघुन गेला.
मुलीने मॅन्युअल वाचून पापड वगैरे भाजुन बघितले.
त्या क्लासच्या वेळा माझ्या वेळांशी जमत नसल्याने थोरल्या मुलीने मी जाईन असे जाहीर केले. मी ही तिने आपण होवुन जबाबदारी घेतल्यामुळे खुष झाले. पण तिचाही जाण्याचा मुहुर्त येईना . हळूहळू त्या बंद यंत्राकडे बघुन त्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे या विचाराने आपणच सुरुवात करायचे ठरवले. नाही म्हटले तरी दोन-आडीच दशकाचा स्वयंपाकाचा अनुभव गाठीशी होताच. मुलींचे दुध गरम कर, पाणी गरम कर अशी सुरुवात केली. साबुदाण्याची खिचडी त्यात कराय़ची होती, पण तेवढे मोठे काचेचे वा प्लॅस्टिकचे भांडे माझ्याकडे नव्हते मग बटाटे त्यात उकडायचे ठरवले. पाण्यात बटाटे घालुन ३ मिनिटे सेट करुन ठेवले. तीन मिनिटे झाल्याबरोबर बझर वाजु लागला, भांडे बाहेर काढले.पाणी उकळत होते.बटाटे काढले सोलायला घेतले तर फारच जाड साल निघू लागली.सालीला बराच बटाटा गेला. नणंद म्हणाली ,’सालं काढुन बटाटे ठेवायचे असतात’, बहिण म्हणाली ’पाणी न घालता ठेवले तर सालं पातळ निघतात’  एकूण बराच बटाटा वाया घलवुन खिचडी गॅसवर केली. मोठी मुलगी  नाश्ता करायला उशीरा आली. तिला खिचडी गरम करुन देण्याकरीता काचेचा बाउल शोधला,आणि त्यात खिचडी घालुन मायक्रोवेव्ह मधे गरम केली,बाऊल गरम झाला म्हणून ताटलीत काढायला गेले तर बाउलच्या आकाराची खिचडीची मुद तयार झाली होती! सगळा साबुदाणा चिकटुन गोळा झालेला बघुन ती माझ्यावर भडकलीच.
"हे काय केलय? "
"खिचडीच आहे गरम केली आत्ताच मायक्रोवेव्ह मधे"
"कुणी सांगितल होतं तुला गरम करायला? मला नको तो गोळा, तूच खा थंड खिचडी उरली असली तर मी खाते"
मग ती खिचडी कशी ,किती वेळ कुठल्या भांड्यात ठेवायला हवी होती यावर  तिघांनी माझे बौध्दिक घेतले.
भाज्या उकडायला ठेवाव्या म्हटल, तर कधी कमी शिजत, थोडा जास्त वेळ लावावा तर पार शिजुन काला होई.
एकदा  बरेच पाहुणे येणार होते, इडली सांबार करायचे होते.सांबारच्या सगळ्या भाज्या चिरुन पटकन शिजाव्या म्हणून प्लॅस्टिकच्या डब्यात पाणी घलुन ठेवल्या, बाकीच्या कामाच्या नादात बझर झाल्यावर मेन स्विच बंद करुन ठेवले,कुकरमधली डाळ शिजली होती, फोडणी करण्यापूर्वी भाज्या बघाव्या म्हणून मायक्रोवेव्ह उघडला आणि डोक्याला हात लावला....
डब्याचे झाकण वितळले होते आणि आतले पाणी कोमट देखील झाले नव्हते ! गुपचूप झाकण कचरापेटीत फेकले आणि पारंपारिक पध्द्तीने सांबार करायला घेतले.
पुन्हा सगळ्यांनी तुझे कसे चुकले असेल यावर माझी खरडपट्टी काढलीच. एव्हाना काही प्लॅस्टिकच्या ताटल्यांचे द्रोण झाले,  काही काचेच्या भांड्य़ांना तडे गेले, शेंगदाणे करपले आणि दर वेळी मी आरोपीच्या पिंजऱ्यात.मी चुकीचे भांडे, चुकीचे ऑप्शन, चुकीचे टायमिंग लावल्याचे सिध्द झाले. 

    या मायक्रोवेव्हचे मी काय घोडे मारले? का दर खेपेला काही करायला जाव तर माझा पचका होतोय या विचाराने मला अगदी बेचैन करुन सोडले.विचार करता करता बऱ्याच गोष्टींचा उलगडा होवु लागला. आजवर रामायण,महाभारत पुराणे,इतिहास यांत ’गर्वहरणाच्या’ अनेक गोष्टी वाचल्या होत्या. आपल्याला चांगला स्वयंपाक विनासायास करता येतो असा मला गर्व झाला असेल, त्यामुळे माझे गर्वहरण करण्यासाठी मायक्रोवेव्हची योजना झाली असावी. चूल,बंब,स्टोव्ह या सा्धनांशी माझा अगदीच संबंध आला नाही असे नाही. भोरच्या आमच्या घरी किंवा माझ्या माहेरी देखील चूल,बंब यावर मी पाणी तापवले आहे. माझ्या मंगळूरच्या सासऱच्या घरी चुलीवर इड्ल्या आणि तांदळाचे अनेक प्रकार शिजवले आहेत. गॅसवर  स्वयंपाक करण्यात तर हयात गेलीच. एकूण माझे आजवरचे आयुष्य आणि हि साधने यात साम्य होते. ते म्हणजे कुठल्याच पूर्वनियोजना खेरीज  आयुष्य येत गेले तसं मी जगत गेले. या साधनांमधुन पदार्थ करताना त्याच्याकडे शिजताना बघत बघत तो होत असे.पदार्थ किती वेळात होईल ते आधीच ठरवावे लागत नव्हते .आधीच पदार्थ बनण्याला किती वेळ लागेल हे निश्चित करायचे आणि त्याप्रमाणे सेटींग करायचे हे माझ्या जीवनशैलीला मानवणारे नव्हतेच. कुकरची शिट्टी झाली कि बारीक करुन गॅस बंद कर, वाफ आली कि भाजी शिजली समज. पोळी,भाकरी भाजलेली तर डोळ्याला दिसतेच. मायक्रोवेव्ह मधे आधी सगळे तयार करा त्याला किती वेळ लागेल हे तुम्हीच नक्की करा तसे सेटींग करा मग तेवढ्या सेकंदात पदार्थ बनेल,पण त्या काही सेकंदांसाठी आधी किती वेळ जातोय याचा हिशेब केलाच जात नाही, उगाच इतक्या सेकंदात अमुक होतं अशा जाहिराती !. मायक्रोवेव्ह मधल्या इड्ली स्टॅंड मधे एका वेळी लहान आकाराच्या आठ इडल्या होतात.घरातल्या चार मोठ्य़ा माणसांना सरासरी पाच इडल्या लागत असतील तर या वीस इडल्यांना मायक्रोवेव्ह मधे लागणारा एकूण वेळ आपल्या एकावेळी २४ इडल्या करणाऱ्या स्टॅंडपेक्षा कमी कसा असेल? कारण इडल्या जरी चटकन शिजल्या तरी झालेल्या काढून नव्या लावणे याला लागणारा वेळ दोन्ही कडे सारखाच.परत २४ इडल्यांच्या स्टॅंडवर एका झटक्यात १२ ते १५ मिनिटात इडल्या बनुन एकावेळी सगळ्यांना खायलाही मिळतात. मग मायक्रोवेव्हमुळे वेळ वाचला कुठे? भाजी आमटी त्यात करायची तर फोडणी गॅसवर करा, तिखट मीठ घालुन परतुन घ्या, पुन्हा काचेच्या भांड्यात घालुन मायक्रोवेव्ह मधे ठेवा.नंतर कढई,ते काचेचे भांडे सगळॆ पुन्हा घासा. त्यापेक्षा कढईत पडलं शिजत तर काय फरक पड्णार आहे? 
       
    सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मायक्रोवेव्ह घेतल्यावर आम्ही सगळे करु असे सांगुन मला पटवणाऱ्या मुली तो आणल्यावर माझ्यावर सोपवुन  नामानिराळ्या झाल्या.वर तुलाच कसं जमत नाही हे सांगुन पदोपदी इतरांकडे कसे सग्गळे मायक्रोवेव्ह मधे करतात हे सांगायला मोकळ्या. धाकटी तर दुध देखील त्यात गरम करुन घेत नाही. मुली माझ्यावर गेल्यात हे मी कबुल करते. मी सुध्दा त्यांच्या वयात स्वयंपाकघरात फिरकले नाही, पण माझ्या आईला काही शिकवायला गेले नाही आणि वेळ पडल्यावर मी सगळे केले. या बाबीचा देखील मला त्रास होत असेल . तो राग त्या यंत्रावर निघुन त्यात प्राविण्य मिळवण्याकरीता माझे प्रयत्न कमी पडत असतील. बरं सगळी दुनीया तो वापरुन त्याचं कौतुक करतीय म्हणून आपणही वापरायला धडपडायचे आणि दर वेळी काहीतरी वेगळेच निष्पन्न होईल कि काय या टेन्शनखाली रहायचे .

    एकंदरीत काय मायक्रोवेव्ह हा घरात असून अडचण ,नसुन खोळंबा या गटात मोडणारी चीज बनला आहे ! 

Tuesday, December 3, 2013

दैव जाणीले कुणी

कोल्हापुरला बदली झाल्याची ऑर्डर घेवुन सदानंद जागेवर येऊन बसला. प्रमोशन वर बदली होणार याची कल्पना होतीच,फक्त ठिकाण समजायचे होते. पुण्यात बदली झाली असती तर बरे झाले असते, सुरेखाला दर आठवड्याला येता आले असते, किंवा आपल्यालाही ये-जा करणे सोपे झाले असते. प्रमोशन नाकारणे हातात होते, पण कशासाठी? वास्तविक ते मिळून पगारात फार वाढ होणार नव्हती उलट घरभाडे भत्ता मुंबईचा जास्त, कोल्हापुरात कमीच होणार तो, पण प्रमोशन म्हणजे नुसती पगारवाढ नसते, आता पत वाढणार घरात आणि ऑफिसमधेही. इतरांसारखी साहेबांपुढे लाळघोटे पणा कधी जमला नाही आपल्याला. म्हणून मागच्या दोन वेळा मिळाले नाही. हे करुर साहेब फार कडक. अतिशय शिस्तीचे, त्यांच्यासमोर जायला कसे सगळॆ चळाचळा कापत.माझ्या कामावर खुष होते ते. त्यांनी चांगले सी.आर. लिहिल्याने यावेळी प्रमोशन द्यावेच लागले. बदली पुण्याला मागायची त्यांच्या समोर टापही नाही. या बाबतीत ते कसे वागतील सांगता नाही येणार. घरच्या कुठल्या अडचणी सांगितलेल्या त्यांना खपायच्या नाहीत.ते स्वतः नऊच्या ठोक्याला जागेवर हजर असत. आठ-आठ वाजे पर्यंत काम करत. ते कुणावर कधी रागावलेत,कुणाला फार आवाज चढवुन बोललेत असं नाही, पण एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वात जरब असते तशी आहे त्यांच्यात. वागणे अतिशय नेमस्त. स्वच्छ आणि चोख कारभार. साहेब असावा तर असा.
 
              सदानंद जोशी, सरकारी आधिकारी.मुंबईमधेच जन्म शिक्षण आणि इतके वर्ष नोकरी देखील. घरात इतर भावंडांपेक्षा जरा कमी हुशार. मोठा भाऊ खूपच बुध्दीमान, स्वतःच्या हुशारीच्या जोरावर आर्थिक परिस्थितीवर मात करीत शिष्यवृत्त्या मिळवित गेला. आय.आय.टी तून इंजिनियर होवुन  उच्च शिक्षणाकरीता अमेरिकेत गेला आणि तिकडेच स्थायिक झालेला. त्याच्या पाठची उमा,हुशार तेजस्वी,सडेतोड. मेडीकलची ऍडमिशन एका मार्कांनी हुकली तेंव्हा खचून न जाता फिजिओथिरपी सारखा त्यावेळी फारसा परिचित नसलेला कोर्स करुन त्यात उच्च शिक्षण घ्यायला परदेशात जावुन इकडे परत आली.मुंबईतल्या जसलोक, के.इ.एम्. सारख्या इस्पितळातुन तिची प्रॅक्टिसही सुरु होती.लग्न करायचे नाही असे तिने शिकतानाच ठरवले होते. सदानंदही हुशार होता. त्याला घरात तसे कुणी जाणवू देत नसले तरी बाहेर, शाळा-कॉलेज मध्ये नातेवाईंकांत तशी तुलना व्हायचीच आणि उगाचच त्याच्या मनात न्य़ूनगंड निर्माण झाला. मेडीकल, इंजिनियरींग सारख्या प्रोफेशनल कोर्सला न जाण्याचा त्याचा निर्णय त्यातुनच जन्माला आला. एम्.एसस्सी झाल्यानंतर नोकरीसाठी बरेच झगडावे लागले त्याला. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास त्याने सुरु केला आणि पहिल्या परीक्षेतच मिळालेले यश त्याला अनपेक्षित वाटले.

    सरकारी नोकरी मिळाली. क्लास टू ऑफिसर म्हणून नेमणूक ही झाली. यथावकाश त्याच्या लग्नाची चर्चा घरात सुरु झाली. मोठ्या विजयने अमेरिकेतल्या मुलीशीच लग्न केले होते, उमाच्या लग्नाचा प्रश्ण् नव्हता. ओळखीतून आलेल्या बॅंकेत नोकरी करणाऱ्या सुरेखाला त्याने पसंत केले आणि संसाराला सुरुवात झाली. नोकरीतल्या कामामुळे सदानंदचा आत्मविश्वास वाढीला लागला. त्याला आयुष्यात आपणही काही करु शकतो याची जाणीव झाली. सुरेखा कनिष्ठ मध्यमवर्गातून् आलेली मुलगी होती. तिला नवऱ्याच्या शिक्षणाचे, नोकरीचे अमाप कौतुक होते. विदुलाच्या जन्मानंतर तर सुखाचे वर्तुळ पुरे झाल्यासारखे वाटले. विदुलाच्या पाठोपाठ चार वर्षांनी मुलगा झाल्यावर तर सदानंद सुरेखाचे सुखी चौकोनी कुटुंब झाले. पण विवेक दोन महिन्याचा झाला आणि त्याची मेंदुची वाढ पुरेशी नसल्याचे लक्षात आले. तसा तो अशक्तही होताच. सुखाच्या संसारात मिठाचा खडा पडावा असं घडल. आपल्या मुलाचे हे अपंगत्व स्विकारायला सगळ्या कुटुंबालाच जड गेलं. त्याच्याकरीता नोकरी सोडावी असं किती वेळा सुरेखाच्या मनात येई,पण त्याच्या आजारपणाचीच नाही तर भविष्याची तरतूदही आत्तापासून करावी लागणार या जाणीवेने ती बॅंकेत जात होती. ऍलोपॅथी बरोबर आयुर्वेदिक, होमिओपाथी अश्या सगळ्या प्रकारच्या उपाययोजना चालू होत्या. घरात खूपच पुरोगामी वातावरण असून आजकाल सुरेखा उपास-तापास करु लागली होती. तिच्या चेहऱ्यावरचा टवटवितपणा मावळला होता.काळजीने काळवंडला होता. सदानंदही जास्तीत जास्त वेळ ऑफिसमधेच काढी. बिचाऱ्या विदुलेकडे आई-बाबांचे दुर्लक्ष होवु लागले होते.आजी-आजोबा,आत्या घरी होते म्हणून बरे. ती सगळावेळ आजीजवळच असे. आत्याही घरी असले कि तिच्याशी खेळे. घरातल्या या अडचणीमुळे सदानंदला ऑफिसमधे प्रमोशन न मिळाल्याचे दुःख फारसे जाणवले नव्हते. एका मोठ्या वेदनेपुढे या बारीक दुःखाची काय मात्तबरी? शिवाय प्रमोशन वर बदली झाली असती तर सुरेखाचे किती हाल झाले असते! तीन वर्षाचा विवेक तब्येतीने सुधारला होता, पण चालु शकत नव्हता. त्याचे सगळेच करताना घरचे दमत होते.
   
    प्रत्येक सीझन बदलताना विवेक आजारी पडेच, या वेळी थंडी सुरु झाली आणि तो सर्दी तापाने आजारी झाला.मुंबईतली थंडी तरी कसली? पण त्याच्या अशक्त देहाला वातावरणातले बदल तेवढे जाणवत. सदानंदने लगेच औषधे आणली. मात्र त्याच्या आजाराने बघता बघता गंभीर रुप घेतले.श्वास घ्यायला त्याला त्रास होवु लागला. उमाने लगोलग के.इ.एम. मधे ऍडमीट केले. पण न्युमोनिया झालाय असं डॉक्टर म्हणाले. दोन दिवसातच विवेकने जगाचा निरोप घेतला. त्याच्या असण्याचा घरच्यांना त्रास होत असला तरी त्याच्या जाण्याचे दुःख ही सगळ्यांना खूपच झाले. अशा मुलांना आयुष्य कमी असते हे उमाला माहित होते. तरी प्रत्यक्ष वेळ आल्यावर त्या अश्राप जीवाचं करताना आपण कमी पडलो का? अशी वेदना तिलाही जाणवली. सुरेखाला तर दुःखाने वेड लागेल का असं वाटू लागल. सदानंदलाही फार अपराधी वाटले.या मुलापायी आपले आयुष्य उध्वस्त होतयं असा विचार त्याच्या मनात अनेकदा आला होता ! त्याच्या जाण्याला आपले हे विचारच कारणीभूत आहेत असे त्याला वाटू लागले. या सगळ्यात शांत होत्या सदानंदच्या आई. त्या माऊलीने कधीच विवेकचा राग केला नव्हता.त्याला न्हाऊ घालणे, भरवणे त्या अगदी मायेने कराय़च्या.विदुलेलाही भावाबद्दल माया वाटावी म्हणून त्याच्याशी बोलायला लावित. सुरेखालाही त्या समजावित असत.
"आपल्या घरात त्याची चांगली देखभाल होते,म्हणून देवाने त्याला इथे धाडलयं. अगं सुधारणा सुध्दा होईल त्याच्यात हळूहळू.नवीन औषधे येतील. कित्ती शोध लागताहेत हल्ली "
तो गेल्यावर त्यांना दुःख झाले पण त्यात त्याच्या वियोगाची वेदना होती.आपण त्याचे सगळे नीट केले. त्याचे आयुष्यच तेवढे त्याला काय करणार? अशी त्यांनीच सगळ्यांची समजुत काढली.

    दिवस उलटु लागले तसे विवेकच्या मृत्युचे दुःख कमी होत गेले.सगळॆजण आपापल्या कामाला लागले. सदानंद कामावर जाऊ लागला. त्याच सुमारास करुर साहेब सदानंदच्या ऑफिसमध्ये आले. साहेबांमुळे ऑफिसचे वातावरण बदललेच.सगळा स्टाफ वेळेवर येवु लागला. कामे भराभर उरकु लागली. सदानंदवर त्यांचा विशेष लोभ होता.त्याची कामातली तत्परता ,कमी बोलणे, कुठल्याही नव्या कामाला आवडीने सुरुवात करणे ह्यामुळे दोघांची वेव्हलेंथ जुळली. त्याला इतकी वर्षे प्रमोशन का दिले नाही असा त्यांना प्रश्ण पडला होता.  त्याचे उत्तम सी.आर. लिहिल्याने प्रमोशन मिळायला अडचण आली नाही.
   
  " मि.जोशी, अभिनंदन! लवकरात लवकर चार्ज घ्या. कोल्हापूरच्या ऑफिसमधेही असेच काम करा."
  "यस सर.." सदानंदला पुढे बोलवेना.नंतरचे दिवस खूप भराभर गेले.ऑफिसमधे पार्टी दिली. कोल्हापूरला जावुन कामाचा चार्ज घेतला. नंतरच्या शनिवार-रविवार मधे तेथे जागा बघितली. एक दिवस सुट्टी घेवुन थोडेफार सामान मुंबईहुन आणले. कोल्हापूरचे जीवन मुंबईच्या मानाने अगदीच निवांत. काम संपवुन घरी यावे तर घरात तरी कोण होते? सदानंदचा वेळ जाता जात नसे. वाचन करावे म्हणून लायब्ररी लावली पण वाचनाची फारशी आवड नव्हतीच त्याला. इथे कुणी मित्रही नव्हते. ऑफिसमधे हळुहळू ओळखी व्हायला लागल्या. गल्लीतल्या रिकामटेकड्या लोकांनी सदानंदचा ताबा घेतला. यातुनच पत्ते खेळायची सवय लागली. अधुनमधुन पार्ट्या सुरु झाल्या. जोशी साहेब-जोशी साहेब म्हणत तिथल्या लोकांनी सदानंदच्या सरळ स्वभावाचा गैरफायदा घ्यायला सुरुवात केली. आजवर बाहेरचं जग न बघितलेल्या सदानंदला वागण्यातले छक्केपंजे ठावुक नव्हते. ऑफिसमधे साहेबीपणा दाखवायची त्याला सवय नव्हती. अगदी नकळत तो दारु,पत्ते याच्या नादी लागला. ऑफिसच्या कामाकडे दुर्लक्ष होवु लागले. मुंबईला जाणे कमी होवु लागले.विदुलाची शाळा,सुरेखाची बॅंक यामुळे त्यांनाही सुट्टीखेरीज इकडे येणे शक्य नसे. ऑफिसमधे सदानंदला जी पोस्ट मिळाली होती ती न मिळाल्याने कोल्हापूरातले पाटील आणि देवरे  हे दोघेजण त्याच्यावर रागावुन होतेच.त्यांनी सदानंदचा काटा काढायचा ठरवले. गोड गोड बोलुन त्यांनी आधी सदानंदचा विश्वास संपादन केला. त्याच्यासाठी घरुन डबे आणणे, त्याला जेवायला घेउन जाणे असे करुन पाटील आणि देवरे त्याचे डावे -उजवे हात बनले. त्यांनी बनवुन आणलेल्या नोट्स,बिलांवर तो न वाचता सह्या करु लागला. ऑफिसमधील एक निवृत्तीला आलेले क्लार्क पिंगळे यांनी आडून आडून सदानंदला सावध कराय़चा प्रयत्न केला. पण किती झालं तरी तो मोठा साहेब होता, लहान तोंडी मोठा घास ठरेल म्हणून जास्त बोलणे त्यांना जमले नाही.

    विनाशाची वाट निसरडी असते. त्यावरुन घसरायला फारसा वेळ लागला नाही.सदानंदला कोल्हापूरात येवुन वर्ष झाले. ऑडीट कमीटी आली. ऑडीट्मधे सदानंदच्या सह्या असलेली काही अशी बिले सापडली ज्याची खरेदी झालेलीच नव्हती. अशा कुठल्या बिलांवर सह्या केलेल्या त्याला आठवत नव्हते.पण सह्या त्याच्याच होत्या. अलगदपणे सदानंद सापडला. लहान गावात असल्या गोष्टींच्या चर्चा व्हायला वेळ लागत नाही. पेपरमधे बातमी आली. सदानंदला काही समजायच्या आत त्याची सस्पेंशनची ऑर्डर देखील आली. आजपर्यंत अतिशय ताठ मानेने जगलेल्या सदानंदला हा धक्का पचवणे केवळ अशक्य होते.  पश्चात्तापाने पार खचुन गेला तो. मुंबईला कुठल्या तोंडाने परत जायचे त्याला समजेना. आत्महत्येचा विचारही  मनाला शिवुन गेला.पण डोळ्यासमोर  प्रेमळ सुरेखा, थकलेले आई-बाबा, आधार वाटावी अशी उमा  आणि गोजीरवाणी विदुला यायची त्यांच्या मायापाशाने तो आत्मघातकी कॄत्य कराय़ला धजावला नाही इतकच.

    मुंबई ऑफिसला सदानंदच्या सस्पेंशनची बातमी समजताच त्याच्या जवळचा मित्र सुरेश हबकुनच गेला.यात काहीतरी काळेबेरे असणार हे त्याला समजले.ऑफिसमधुनच त्याने आधी सदानंदला कोल्हापूरच्या ऑफिसमधे फोन लावला. तो ऑफिसमधे असणे कठीण होतेच पण त्याचा कॉंन्टॅक्ट नंबर मिळवणे जरुर होते. मोबाईल फोन त्याकाळी आलेले नव्हते. सुदैवाने पिंगळ्यानी फोन घेतला. त्यांनी सुरेशला सदानंद किती खचलाय, त्याची कशी चूक नाही हे हलक्या आवाजात सांगितले. सुरेशला परिस्थितीची कल्पना आली त्याने उमाला फोन लावला, हि बातमी सदानंदने कळवली नसेल पण ती घरी समजणे आवश्यक होते अशा वेळी आधार असतो तो आपल्या माणसाचाच. झाल्या प्रसांगाला तोंड द्यावेच लागणार. उमालाही बातमी ऐकुन धक्का बसला.पण कुठल्याही परिस्थितीत खचून न जाता शांतपणे विचार करण्याचा तिचा स्वभाव होता.तिने सुरेशला जास्त प्रश्ण विचारले नाहीत कि सर्वनाश झाल्यासारखे दाखवले नाही.
"संध्याकाळी घरी यायला जमेल तुला,सविस्तर बोललो असतो. मी आज रात्रीच्या बसनेच कोल्हापूरला जाईन म्हणते"
"येईन मी, पण तुझ्या आईबाबांना काय सांगशील? आणि सुरेखा वहिनींचे काय? असे कसे झाले ? तो असे करणे शक्य नाही ..."
" कसे झाले,कुणाचे चुकले यावर चर्चा करण्यापेक्षा यातून मार्ग कसा काढाय़चा हे महत्त्वाचे आहे नाही का? घरच्यांना सांगायचे मी बघेन, भेटू मग संध्याकाळी"
ठरल्याप्रमाणॆ सुरेश सदानंदच्या घरी गेला.घरातले वातावरण नेहमीइतके नसले तरी बरेच शांत होते.
" सुरेश तू म्हणतोस आणि आमचीही खात्री आहे सदानंद गैरकृत्य करणार नाही.पण तो फार सरळ वागणारा आहे,घरापासून दूर एकटा असा पहिल्यांदा राहिल्य़ाने वाईट लोकांच्या संगतीत सापडला असेल. बिलांवर त्याच्या सह्या होत्या म्हणजे त्याने न वाचता त्या केल्या असणार किंवा कोणीतरी त्याच्या सह्या केल्या असतील. दोन्ही बाबतीत त्याची चूक आहेच.पण यातून मार्ग निघु शकतो. मी आज रात्रीच निघते.सकाळी त्याच्याशी बोलेन .चांगल्या वकीलाची चौकशी करावी लागेल,इतरही काही मदत लागेल ती तू करशील ना?"
" असं विचारतेस काय उमा? मी आहेच.मी देखील वकील शोधतो"
दुसऱ्या दिवशी सकाळी उमा कोल्हापूरला पोचली.सदानंदचा चेहरा बघवत नव्हता. जागरण आणि काळाजीने तो दहा-बारा वर्षाने म्हातारा झाल्यासारखा वाटत होता.
" सदानंद काय अवस्था करुन घेतली आहेस? चहा तरी घेतला आहेस का सकाळपासून, मी आधी आपला चहा करते मग शांतपणे बोलू आपण"
"सगळं संपलय उमा, फार मोठी चूक केलीय मी कुणाला तोंड दाखवायची लायकी नाही राहिली माझी...." ओंजळीत चेहरा लपवत सदानंद रडत म्हणाला.
"आधी चहा पी. एवढं काही आभाळ कोसळलेल नाही अरे,चुका कुणाच्या हातुन होत नाहीत? आम्ही आहोत ना सगळे? सार काही ठिक होईल"
चहा प्यायला नंतर उमा म्हणाली ,"आता पहिल्यापासून काय काय घडलं ते तसच माझ्यापासून काहीही न लपवता सांग."
सदानंदने उमाला जमेल तसं सांगायला सुरुवात केली. पत्ते खेळणॆ, दारु पिणे या गोष्टी त्यांच्याकडे कधी कुणी केलेल्या नव्हत्या, सांगताना सदानंद्ला मेल्याहून मेल्यासारखे होत होते.
"इतका कसा मी घसरलो? आई-बाबांचे संस्कार ,शिकवण , तुमचे प्रेम सगळ्याचा कसा विसर पडला मला? छे, मला कुणाला तोंड दाखवावेसे वाटत नाही.या चुकीला क्षमा नाही उमा "
"शांत हो सदानंद, तू चुकलास त्यात तुझ्या इतकीच परिस्थितीही कारणीभूत आहे. आज आपण सगळे इथे असतो तर कदाचित असं घडलं नसत. तुला जो एकटेपणा इथे वाटला त्यामुळे तू वाईट गोष्टींच्या नादी लागलास, या वेळाचा सदुपयोगही तुला करता आला असता पण या सगळ्या जर... तर च्या गोष्टी आहेत त्यावर चर्चा करुन वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाही. झाल्या गोष्टीचा तुला पश्चात्ताप आहे,यातच तुझे भले मला दिसत आहे. आपली चूक मान्य असेल तर ती सुधारणे शक्य होते माणसाला. चुकांबद्द्ल जास्त त्रास करुन घेवु नको.आम्ही कोणी तुला त्याबद्दल सतत दोष देणार नाही. आपण सगळे मिळून या संकटाला तोंड देवु. तू बिलांवर सह्या केल्यास पण पैशाचा अपहार केलेला नाहीस.तुझे या पूर्वीचे रेकॉर्ड चांगले आहे. आपण चांगला वकील बघू त्यांच्या सल्ल्याने वागु.तू नक्की सुटशील यातून"

"नाही उमा, माझ्या अपराधाला शिक्षा व्हायलाच हवी.मी माझी चूक कोर्टातही मान्य करणार "
" असं करु नको सदानंद आपण विचारु वकिलांना.."
" उमा या बाबतीत तडजोड नाही.गुन्हेगाराला सजा हवीच"
उमाने समजावण्याचा खूप प्रयत्न केला. सदानंदने तिचे ऐकले नाही.उत्तम वकील देवुन केस लढविण्यात आली.सदानंदला २ वर्षाची सजा आणि १०००० रु. दंड ठोठावण्यात आला.केस वर्षभर चालली. त्यात सगळ्यांनाच खूप मानसिक त्रास झाला. हाय़कोर्टात जा, वेळ पडली तर सुप्रीम कोर्टापर्यंत जा असे विजयने कळविले होते.तो वेळोवेळी पैसेही पाठवत होता. पण झालेली शिक्षा मंजुर असल्याचे सदानंदने जाहिर केले. आणि येरवड्याच्या जेलमधे त्याची रवानगी झाली.

तोंडाने चूक कबुल करणे, शिक्षा मान्य करणे आणि  वेळ आल्यावर जेलमधील कपडे अंगावर चढवणे यात फार अंतर होते. आतल्या कुठल्याच माणसाला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व नव्हते.होता फक्त बिल्ला नंबर. आजपर्यंत सिनेमात बघितलेल्या प्रत्यक्ष जेलचे दर्शन फारच विदारक होते ! त्या छोट्या छोट्या बराकी, ते निर्ढावलेली कैदी, ते निर्विकार कर्मचारी सगळच कसं त्रासदायक. पहिल्या दिवशी दिलेल्या ऍल्युमिनियमच्या ताटली आणि मगाकडे बघुनच सदानंदला ढवळुन आले. भात आणि कसलीशी भाजी असलेल्या त्या कळकट बादल्या बघुन त्याची जेवणावरची वासनाच उडाली. लांबच लांब वाटणारे ते दिवस आणि भकास,उदास अशा न संपणाऱ्या रात्री ! दोन वर्षे कशी जाणार होती ?

मिळालेल्या रिकाम्या वेळात गतजीवनाबद्दल विचार करण्याखेरीज करता येण्य़ासारखे काही नव्हतेच. उमाच्या "तुला जो एकटेपणा इथे वाटला त्यामुळे तू वाईट गोष्टींच्या नादी लागलास, या वेळाचा सदुपयोगही तुला करता आला असता पण या सगळ्या जर... तर च्या गोष्टी आहेत" या वाक्याची त्याला आठवण झाली.  यातुन बाहेर पडायला आपणच मार्ग काढला पाहिजे. त्याने दिनक्रम ठरवुन घेतला. लवकर उठणे,सकाळी योगासने करणे, व्यायाम करणे सुरु केले. जेलमधील लिखापढीची कामे त्याला शिक्षित असल्याने दिली होती. जेलचे रेकॉर्ड त्याने नीट केले. हळूहळू कर्मचारी वर्ग, जेलर यांचा तो लाडका बनला. कैद्यांनाही आसने शिकवणे, गप्पा मारणे त्याने सुरु केले.

    महिन्यातुन एकदा सुरेखा भेटायला येई.तो दिवस मात्र त्याला नकोसा वाटे.तिच्या भेटीची ओढ होती पण तिला तोंड दाखवणे फार जड जाई त्याला.आपल्या अशा वागण्याचा तिला किती त्रास होतोय.बॅंकेत ,समाजात तिला वावरताना कशाकशाला तोंड द्यावे लागत असेल या विचाराने तो कष्टी होई. विदुलाला ती काय सांगत असेल? सुरेखाला आपण दुःखच दिले या विचाराने तो बेचैन होई. सुरेखा मात्र तसे दाखवत नसे.तिचा चेहरा त्याला बघताच फुलून येई. त्याच्या आवडीच्या चकल्या तिने आणलेल्या असत त्याला ती खायला लावी. आई-बाबांची खुशाली सांगे.विदुलाचे फोटो दाखवी.तिला कुठले बक्षिस मिळाले त्याचे वर्णन करी. बघता बघता हे दिवस संपतील, तुम्ही सुटाल.असे सांगुन ती त्याचा निरोप घेई. सुरेखा गेल्यावर पुन्हा उदास वाटू लागे.

    सदानंदच्या चांगल्या वागणुकीमुळे त्याची शिक्षा ८ महिन्यांनी कमी झाली. वर्ष संपले. आता चारच महिने उरले होते. सदानंद सुटुन आला की त्याला या जागेत आपण नकोच आणायला असे घरच्यांनी ठरविले. इकडे नाही म्हटले तरी लोक कुजबुणार,चौकशा करणार,बोलणाऱ्यांचे तोंड धरता येत नाही. झाल्या घटना लवकरात लवकर विसरुन नवे आयुष्य सुरु केले पाहिजे.  बोरीवलीला एक ब्लॉक उमाने घेतलेला होता, तो भाड्य़ाने दिला होता. करार संपताच त्या रिकाम्या जागेत काही सामान हलविले. सदानंदने सुरेखा बरोबर रहायचे. विदुलाचे दहावीचे वर्ष इथेच होईल ११वी पासुन ती देखील तिकडेच जाईल असे ठरले. बोरीवलीच्या घरात सामन लागले.सदानंद येण्याचा दिवस जवळ येवु लागला. सुरेखा आणि उमा दोघी त्याला आणायला जाणार होत्या , त्याला टॅक्सीने बोरीवलीच्या घरी आणणार होते.त्या घरी सगळी जमली होती.

        सदानंद १२ तारखेला सुटणार, जेलर पासुन सगळे त्याचे अभिनंदन करीत होते. त्यालाही आयुष्यातले काळे पर्व संपल्याचे जाणवत होते. पुढे काय कराय़चे ते अजुन ठरत नव्हते. ऑफिस जॉइन कराय़चे कि दुसरे काही अजुन विचार होत नव्हता. ४ तारखेला सकाळपासुन सदानंदचे अंग दुखत होते. संध्याकाळी त्याला थंडी वाजुन ताप भरला. दुसऱ्या दिवशीही तसेच.जेल मधल्या डॉक्टरांनी औषध दिले. चार दिवस झाले तरी तोच प्रकार. शेवटी ससुन मधे ऍडमिट करण्य़ाचा सल्ला दिला. ऍम्ब्युलन्स मधुन सदानंदला ससुनमधे नेले. तिकडे सगळ्या तपासण्या केल्या. मलेरीयाचे निदान झाले. पण आजाराने गंभीर रुप घेतले होते. फुफ्फुसात प्रादुर्भाव झालेला होता. त्यावेळी फार प्रभावी औषधे उपलब्ध नव्हती. जेलमधुन सगळ्या कागदपत्रांची पूर्तता झालेली होती

    १० तारखेला रात्री सदानंद अत्यवस्थ झाला. जेलमधुन त्याच्या घरी फोन करत होते पण घरचे सगळे बोरीवलीला असल्याने फोन कुणी उचलला नाही. दुसऱ्या कोणत्याच नंबरांची त्यांच्याकडे नोंद नव्हती. १० तारखेला रात्री उशीरा सदानंदचे प्राणोत्क्रमण झाले. त्याच्याजवळ त्यावेळी घरचे कुणीही नव्हते ! त्याच्या निधनाची बातमीही घरी कुणाला समजलीच नव्हती

    बोरीवलीच्या घरात आनंदी वातावरण होते. सदानंदला आणायला सुरेखा आणि उमा जाणार होत्या पण आयत्या वेळी सुरेखाला काही अर्जंट कामामुळे बँकेत रजा नामंजुर करण्यात आली.तशीही तिच्या या काळात बऱ्याच सुट्ट्या होत असत. उमा म्हणाली,"खरं तर तू आली असतीस तर त्याला बरं वाटलं असतं पण काही हरकत नाही , मी त्याला घेवुन येते. तू कमावरुन येइपर्य़ंत तो फ्रेश होवुन तुला भेटायला तयार असेल."

    उमा पहाटे निघाली साडेदहाच्य़ा सुमारास येरवड्याला पोचली. जेलमधे गेल्यावर तिला सदानंदच्या निधनाची बातमी समजली. तिला खरच वाटेना.
"सॉरी, आपला काहीतरी गैरसमज होतोय, सदानंद जोशींकरीता मी आलेली आहे, तुम्ही दुसऱ्या कुणाबद्दल बोलत आहात का? "
"नाही मॅडम, I am really sorry, पण ही बातमी खरी आहे,आम्ही तुमच्या घरी फोन लावला पण तो लागला नाही, दुसरा कोणताच नंबर आमच्याकडे नव्हता त्यामुळे आमचा नाइलाज झाला. सगळे पेपर्स तयार आहेत. तुम्ही बॉडी ताब्यात घेणार की अजुन कुणाला बोलावताय?"

आपल्या डोक्यात कुणीतरी घाव घालतय असं उमाला वाटु लागलं, इतक्या मनःस्तापात काढलेल्या या दिवसांचा शेवट असा का व्हावा?  हि बातमी घरी कशी कळवावी ?या प्रसंगाला तोंड द्यायला लागु नये म्हणून नियतीने सुरेखाची रजा नामंजुर केली असेल का?  असे नाना प्रश्ण घेवुन उमा खुर्चीतुन उठली आणि जेलरसाहेबांच्या केबीन मधुन बाहेर पडली.