Tuesday, April 25, 2023

लिला आजी

आमच्या विद्याताईचे लग्न ठरले तेंव्हा मी नववीत होते. लिलाताई तिच्या सासुबाई, पण त्या सासुबाई वाटतच नाहीत असे आम्हा सर्व भावंडाचे एकमत होते. एकतर त्यांची लहान चण, हसरा आणि बोलका चेहरा आणि बडबडा स्वभाव यामुळे तथाकथित सासुच्या प्रतिमेत त्या बसत नव्हत्या.लग्नात त्यांनी विहिणीचा मानपान घेतला असेल तेवढाच .एरवी त्या कायम आमच्याशी  प्रेमाने आणि जिव्हाळ्याने वागल्या. विद्याचे घर आमच्या घराजवळ असल्याने येताजाता त्या सहज म्हणून डोकावत आणि गप्पागोष्टी करुन जात.चहापाण्याचे त्यांना वेड नव्हतेच आणि खाण्यापिण्याची पण फार आवड नसल्याने त्याचीही अपेक्षा नसे.त्यांचा जनसंपर्क प्रचंड होता आणि स्मरणशक्ती अचाट होती.आमच्या चुलत, मावस,आते बहिणींची लग्ने जमवताना त्यांची खूप मदत झाली.

आमचे दादा १९८२ साली अचानक वारले आणि आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला अशा वेळी बोकील कुटुंबाने आम्हाला दिलेला आधार आम्ही कधीच विसरु शकत नाही.विद्या आमची मोठी बहिणच होती पण प्रकाशराव, लिला आजी आणि भाऊंनी आमच्या दुःखात आम्हाला फार मोठा आधार दिला. आमच्या दोघींची लग्ने ठरल्यावर साखरपुडे त्यांच्या घरीच झाले. लग्नाचा मुहुर्त, घाणा भरणे, मंगलाष्टके,विहिणिच्या पंक्तीला गाणी आणि शेवटची पाठवणी सगळ्य़ाला लिला आजींच्या गाण्यांनी बहार आणली होती.माझ्या दोन्ही मुलींना घरी आणल्यावर पहिली अंघोळ लिला आजींनीच घातलीयं. 

२००४ नंतर आमच्या आईचा कंपवाताचा आजार वाढत गेला व तिला घरात एकटे ठेवु नका असे डॉक्टरांनी सांगितले त्यावेळी भाऊंनी आईला आपल्या घरी आणा असे विद्याला सांगितले. त्यावेळी प्रसाद कानपुरला, विद्या व प्रकाशरावांची नोकरी ,भक्तीचे इंजिनियरींग व भाऊंचे स्वतःचे आजारपण असताना आई त्यांच्या घरी गेली.तिला वरच्या मजल्यावर ठेवले होते. आईचे जेवण,चहा सगळे लिला आजींनी विनातक्रार केले. त्याचा कधी कुठे उल्लेखही केला नाही.विहिणीला बहिण मानणाऱ्या लिलाआजी खरोखरीच असामान्य होत्या.एकत्र कुटुंबात वाढल्यामुळे एकमेकांसाठी करायचे त्यांच्या रक्तातले संस्कार होते. आजींनी आमच्यासाठी इतकं केलयं कि सांगायला वेळ पुरणार नाही.माझ्या थोरल्या लेकीचे लग्न ठरले खरेदी  ,कार्यालय बघणे चालु होते,विद्या भक्तीकडे इंग्लडला गेल्याने मला फारच एकाकी वाटत होते, तेंव्हा एक दिवस आजींचा फोन आला,’शुभा तनुच्या लग्नाचा मुहूर्त कधी करणार? मी म्हटले ,"विद्या नाही ,माझ्या घरी सांगायला मोठं कोणी नाही मला काही सुचत नाहीये" त्या लगेच म्हणाल्या,"अगं मी आहे ना, आपण रविवारी मुहूर्त करुन घेऊ".काय काय तयारी हवी ते त्यांनी सांगितले, रविवारी आल्या, मुलींना नऊवारी साड्य़ा नेसवण्यापासून गाणी म्हणत पापड,पाच खिरी सगळे मजेत झाले. पुढे ग्रहमख,लग्न सगळ्याला आजी होत्या. माझ्या लग्नापासुन माझ्या मुलीच्या लग्नापर्यंत आजी त्याच उत्साहात वावरल्या.


वयाच्या पन्नाशीनंतर त्या पौरोहित्य शिकल्या आणि सत्यनारायण पुजा,वटपौर्णिमा,मंगळागौर अशा अनेक कार्यक्रमांसाठी त्यांना बोलावणी येऊ लागली. पहाटे उठुन घरातली कामे आटपुन त्यांचा दौरा सुरु होई. पुजा सांगण्यापुरते त्यांचे काम मर्यादित नसे, पुजेची तयारी करण्यापासुन असेल त्या सामग्रीत उठुन दिसेल असे कार्य साजरे करण्याचे कसब त्यांच्याजवळ होते. यजमानांच्या सांपत्तिक स्थितीवर पुजेचे काम कधीच अवलंबुन नसे. मिळणारी दक्षिणा कधी त्यांनी स्वतःसाठी खर्चच केली नाही. त्या कार्यक्रमांतही ओळखी करुन  अनेक लग्ने जमवली त्यांनी. लिलाआजींजवळ उत्साह आणि उर्जेचा एवढा साठा कसा ?असा मला नेहमी प्रश्ण पडे मग लक्षात आले, त्यांचं वय वाढल होत, पण मन मात्र लहान मुलासारखच होते, काळजी,चिंता त्यांच्या थाऱ्यालाही उभ्या नसत. एक तर सतत कामात असल्याने विचार करण्याएवढे रिकामपण त्यांच्याकडे नव्हते . कोणी गावाला जावो,गावाहुन येणार असो, कोणी आजारी असो आजींना कधी चिंतागती होवुन बसलेल्या कुणी बघितलच नाही.  त्या कुठे गेल्या तरी तिकडे पोचल्याची खबर घरी द्यायचे त्यांच्या डोक्यात नसे. आला दिवस आनंदात घालवायचा , दुःखाचा प्रसंग आलाच तर मनमोकळेपणाने रडुन घेत. आपल्या भावंडांचे,दिरा जावांचे,नणंदांचे ,विहिणींचे अनेक मृत्यू त्यांनी बघितले .त्या त्या घरी जाऊन लागेल ती मदत करुन येत .तिकडून आल्यावर पुन्हा नेहमीचे आयुष्य सुरु करीत. आठवणी काढुन रडत बसुन घरातले वातावरण दुःखी केले नाही. मॄत्युची अपरिहार्यता त्यांनी सहज स्विकारली होती. वर्तमानात जगा असे सगळे स्वामी,महाराज शिकवतात,मोठमोठी पुस्तके वाचुन, व्याख्याने ऐकुन शिकल्या सवरलेल्यांना न जमणारे जगणॆ आजी जगत राहिल्या.म्हणुनच त्यांना वृध्दत्वाचा स्पर्श झाला नाही.


त्यांनी अनेकांना सहज मदत केली पण कोणाकडून कुठलीच अपेक्षा बाळगली नाही.अनेकांची लग्ने जमवली, अनेकांना कामे मिळवुन दिली,घरी आलेल्यांना जेवायला घातले. गीतेमधील कर्मयोगाचे पालन सहज केले त्यांमुळे सगळ्यांना हव्याहव्याशा वाटत असतानाच त्या अचानक आपल्यातुन निघुनही गेल्या. हसत हसत जगल्या आणि तशाच आनंदात गेल्या. त्यांच्या जीवनभराच्या पुण्याईमुळे त्यांना असे भाग्याचे मरण लाभले. आजी आपल्या सगळ्यांच्या कायम आठवणीत राहणार. त्यांच्यासारखे आनंदी, सकारात्मक जगायले शिकणे हिच त्यांना श्रध्दांजली ठरेल.