Thursday, April 25, 2013

शांतीब्रह्म आत्या

माझी धाकटी आत्या, भावंडात सगळ्यात लहान. ती दिड वर्षाची असतानाच तिचे वडील गेले.तिला समजत नव्हतेच काही पण आधी मुलगी त्यात वडील गेलेले मग तिचे कुठले लाड आणि कसले कौतुक! जरा मोठी झाली तशी ती आईच्या हाताखाली लहान मोठी कामे करु लागली.पाच मुलगे आणि दोन मुलींचा प्रपंच  आजी एकटी चालवत होती. बडा घर पोकळ वासा असल्याने आपले दैन्य कुणाला न दाखवता संसार चालला होता.मुलगे शिकत होते, त्यांनी घरकाम करण्याची त्यावेळची रीत नव्हती. मोठी मुलगी वांड होती , सहाजिकच आजीने या धाकट्या लेकीला हाताशी धरले. आत्या स्वभावाने आईवर गेली होती, रागावणे,चिडणे तिला माहित नव्हते. परिस्थितीची जाणीव अगदी लहान वयात आल्याने तिचे बालपण तिने संपवून टाकले. कधी कुणाजवळ हट्ट केला नाही, कुणाला कसला त्रास दिला नाही. शाळेच्य़ा अभ्यासात मात्र ती मागे पडली.मुलींनी फार शिकायचा तो काळ नसल्याने  त्याबद्दल कुणी तिच्या फार मागे लागले नाही.

    भोरमधल्याच माझ्या काकांच्या मित्राशी लग्न होवुन आत्या सासरी गेली. ’एकादशीच्या घरी शिवरात्र’ असं सासर तिला मिळालं होत. पण रुप,शिक्षण,पैसा सगळ्याची वजाबाकी असल्याने निवडीला वाव असा नव्हताच. आत्याच्या भावांनी मुलाजवळचे गुण बघीतले होते, स्वभावाने माणसे फार चांगली होती. आत्याला सासरी कष्ट पडणार होते पण सासुरवास होणार नव्हता. आत्या सासरी सुखात होती.  तिच्या घराच्या अंधाऱ्या नागमोडी जिन्यातुन नुसते चढताना आमची दमछाक व्हायची तशा जिन्यावरुन ती खालून वापरायचे , प्यायचे सगळे पाणी भरायची. दहा -बारा माणसांचे एकत्र कुटुंब .कुठल्याच कामाला बाई नाही. आत्या सतत कामातच असे. तिचे दोन दिर मिलिटरीत गेले होते, त्यांच्या बायका आत्याच्या भोरच्या घरात असत. मोठ्या जावेची,आत्याची लहान मुले. आला गेला. आम्ही सुट्टीला भोरला गेलो कि आत्याकडे रोज चक्कर असायची. काहीतरी खाऊ हातावर ठेवल्याशिवाय ती आम्हाला परत जाऊ द्यायची नाही.मग एक दिवस खास आम्हा सगळ्या भाचरांना ती जेवायला बोलवायची. तिच्या घरचे सगळे आमच्या तैनातीला असायचे. आत्याचे सासरे त्यांना आम्ही दादा म्हणत असू , ते फार सुरेख रांगोळ्या काढायचे. आमच्या प्रत्येकीच्या पानाभोवती ते सुरेख रांगोळी काढीत. प्रत्येकीला गजरा, नाहितर चाफ्याचे किंवा मोगऱ्याचे फूल देत. आम्हाला आग्रह करकरुन जेवायला घालायचे काम आत्याचे यजमान बापूराव यांचे असे. तडस लागे तो आत्याच्या हातचे सुग्रास जेवण जेवले कि हातावर पाणी पडताच दादा आम्हाला स्वतः बनवलेला सुरेख विडा देत. चैत्रातल्या कुमारिका जेवल्या ना पोटभर? अशी प्रेमळ चौकशी कराय़चे. दुपारी बापूराव त्यांच्या खास शैलीत नवनव्या गोष्टी रंगवुन रंगवुन सांगायचे . त्यांच्या घरातल्या आदरातिथ्याने आणि कोडकौतुकाने आम्ही खुष होवुन जायचो. मुलांकडे फारसे खास लक्ष न पुरवण्याचा तो काळ होता. पानात काही टाकायचे नाही,जेवताना फार बोलायचे नाही अशी दमदाटी घरी असेच पण कुठेही गेले तरी मुले ही शिस्त आणि वळण लावण्यासाठीच आहेत अशा पक्क्या समजुतीने प्रत्येक जेष्ठ व्यक्ती आपला हक्क बजावित असे. अशा वेळी आत्याकडची आम्हाला मिळणारी ती शाही वागणूक माझ्या कायमची मनात राहिली आहे. आत्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे असे आम्हाला कधीच वाटले नाही , तिने कधी तसे जाणवुच दिले नाही. आम्हा सगळ्यांचा आर्थिक गट तसा फार काही उच्च नव्हताच तरी तिचा त्याहून कमी म्हणजे किती त्रास असेल ते आता समजते.

    आत्याचे यजमान रंग कारखान्यात कामाला होते, कारखान्यात संप, ले-ऑफ चालत. पाच सहा माणसांचा संसार आणि सततचा आला -गेला.मुलांची शिक्षणे. आत्याने कधी आपल्या भावांजवळ हात पसरले नाहीत कि रडगाणे गायले नाही. तिच्याजवळ शिक्षण नव्हते पण ती डबे करुन द्यायची, दुपारी मसाले बनवायची ते विकायची. दुध विकायची जमेल त्या मार्गाने तिने कष्ट करुन संसाराला हातभार लावला. तिची मुलेही कष्टाळू निघाली. मुली शिकल्या, चांगल्या घरी पडल्या. मुलगा-सून दोघे नोकरी व्यवसायाला लागली.बघता बघता दिवस पालटले. आत्या आणि बापूराव मुलाच्या संसारात नातवंडाचा सांभाळ करायला पुण्यात स्थाईक झाले.

    देवावर आणि गोंदवलेकर महाराजांवर आत्याची अपार श्रध्दा आहे. रामचे दर्शन घेतल्याशिवाय तिचा दिवस जात नाही.बारा-महिने तिचा नेम चुकत नाही. सकाळी देवदर्शन झाले कि ती दिवसभर घरकामात मग्न असते. जपाची माळ तिच्या जवळ असते. देवधर्माचं फारस अवडंबर न करता तिच्यापुरते नेम ती मनोभावे करीत असते. जमेल तेंव्हा गोंदवल्याला जावुन येते. माझ्या सगळ्या भाच्यांची काळजी घ्या असे महाराजांना सांगुन आले असे आम्हाला जावुन आल्यावर सांगते. आमच्या पैकी कुणच्याही घरात शुभकार्य असले कि ते निर्विघ्न पार पडावे म्हणून आत्या महाराजांना साकडे घालते. कुणी आजारी पडले कि त्याला रामाचा अंगारा आणून देते. तिला आता जे चांगले दिवस आलेत त्यामागे तिची ,बापूरावांची ,तिच्या मुलांची अपार मेहनत आहे. पण सगळ्याचे श्रेय ती रामाला आणि गोंदावलेकरमहाराजांना देते. आत्याच्या देवभोळेपणाची आम्ही क्वचित चेष्टाही करतो. आम्ही माहेरवाशणी तिला भेटायला गेलो कि निघताना नमस्कारासाठी वाकलो कि ती देवाला नमस्कार करायला लावते, गोंदवल्याचा अंगारा लावते, तिथला प्रसाद कायम तिच्या घरात असतो , तो देतेच.

    परवाच्या पेपरमधे बातमी वाचली, आत्याचे नाव आले होते, पहाटे देवदर्शनाला ती निघाली होती वाटेत चोरांनी तिला गाठले , आम्ही पोलीस आहोत असे सांगून या भागात फार चोऱ्या होतात तुम्ही अंगावर दागिने कसे घालता? असे बोलून तिच्या हातातील बांगड्या आणि पाटल्या काढुन घेतल्या अशी बातमी होती. वाचल्यावर मला फार वाईट वाटले. आत्याने आयुष्यभर इतके कष्ट केले, पै-पै जमवुन मिळवलेले असे एका क्षणात जावे? स्वप्नात सुध्दा तिने कुणाचे वाईट केले नाही तर तिला असा त्रास का? आता कुठे गेला तिचा देव आणि गोंदवलेकर महाराज? काय उपयोग झाला आयुष्यभर देवाचे केल्याचा? असे ना ना विचार मनात आले. त्या दिवशी आत्याला फोन करायचे धाडस झाले नाही.पण निदान फोनवर चौकशी करावी तिला धीर द्यावा म्हणून रामनवमीच्या दिवशी सकाळी फोन केला.

 आत्यानेच फोन घेतला. नेहमीच्या शांत आवाजात म्हणाली ,’बोल’
  ’ काल वाचले पेपरमधे,फार वाईट वाटल, असं कसं झालं ग?’
  ’ वाईट तर वाटतच ना, जन्मभर साठवून मिळवलेले एका मिनिटात घालवून बसले, चूक माझीच झाली, सतत बातम्या येतच होत्या , मी मंगळ्सूत्र काढून ठेवलच होतं गं , बांगड्यापण खोट्याच होत्या, पाटल्या तेवढ्या खऱ्या होत्या, बाकी माझ्याकडे तेवढच सोनं होतं , त्या ही घरी काढून ठेवायला हव्या होत्या.पण घट्ट होत्या सहज निघण्यासारख्या नव्हत्या म्हणून ठेवल्या होत्या हातात. तरी मी दोन वेळा त्या लोकांना म्हणाले मला माझ्या रस्त्याने जाउ द्या पण त्यांनी मला एका कारपार्कींग मधे नेलं दमदाटी केली मी घाबरुन गेले. आणखी एक मोठी चूक झाली’
’ती कोणती?’
’मी आरडा-ओरडा केला नाही , ओरडायची सवयच नाही ना गं?’
’पुढे काय झालं?’
’ ते दोघे माझ्या बांगड्या आणि पाटल्या घेवुन गेले मी पुढे आले , एक ओळखीचा मुलगा भेटला, त्याला सगळं सांगितल तो म्हणाला आजी पोलीस कंप्लेंट करायला हवी’
’मग त्यानेच घरी कळवले आम्ही पोलीस चौकीत गेलो, त्या दिवशी अशा तीन घटना घडल्या आमच्या भागात, पण तुला सांगते आपण पोलिसांबद्दल इतक ऐकतो मला तर चौकित जायची भिती वाटत होती पण पोलिस फार चांगले वागले. मी म्हटल देखील पोलिसांना,’ तुम्ही वेळोवेळी सांगुनही आम्ही नागरिक तुमचं ऐकत नाही , अंगावर सोन घालतो, त्यामुळॆ चोऱ्या होतात आता आमच्या चुकीमुळे तुम्हाला केवढा त्रास! ’
’आत्या , अगं पोलिसांना कसला त्रास?’
’असं काय म्हणतेस, इतक्या मोठ्या शहरात हे चोर कुठे पळाले ते शोधायला किती त्रास नाही का ?"
’मग काय म्हणाले पोलीस?"
" ते म्हणाले आजी आमचे ते कामच आहे, तुम्हाला मात्र याव लागेल चौकीत"

मला हसावं कि रडावं कळेना ,आपल्या नुकसाना पेक्षा पोलिसांना होणाऱ्या त्रासाने दुःखी होणाऱ्या या बाईला काय म्हणावे?
" ठेवु का फोन आज रामनवमी आहे ना, देवळात जायचयं , किर्तन आहे, जन्माचा सोहळा आहे "
"आत्या , इतकं होवुन देवळात जायचच आहे?"
"माझ्या चोरी मधे रामाचा काय दोष आहे ? चूक माझीच होती शिक्षा मला मिळणारच ,रामाचा दोष नाही कि महाराजांचाही नाही, त्यांच्या मनात असेल तर चोर मिळेल, माझ्या पाटल्या मिळतील आणि आता चोरण्यासारख काही राहिलेलंच नाही "

    शांतीब्रह्म आत्याचे पाय धरावे असे मला वाटले. शिक्षण नाही म्हणून तिला आम्ही अडाणी म्हणतो पण केवढं शहाणपणं तिच्याठायी आहे.तिची देवावरची श्रध्दा केवढी गहन आहे. आपल्या चुकीची, कर्माची जबाबदारी घेण्याचं मोठेपण तिच्याकडे आहे. त्यामुळेच कुणावर चिडण्याचा,रागावण्याचा प्रश्णच येत नाही. तिच्या भक्तीची जातकुळी ,आपल्याला काही मिळावे म्हणून देवाजवळ नवस बोलणाऱ्या, संकट आल्यावरच देवाकडे धाव घेणाऱ्या, आपल्या यशाची फुशारकी गाणाऱ्या व्यवहारी भक्तांसारखी नाही. गोंदावलेकर महाराजांच्या प्रवचनाचे प्रत्यक्ष आचरण करणाऱ्या माझ्या आत्याचं मोठेपण मला फार प्रकर्षानं जाणवलं. तिचे अंगभुत शहाणपण,अंतरिक समाधान कुठल्याही चोराला चोरता येणार नाही.

Friday, April 12, 2013

पुस्तक परीचय

 बदलत्या जीवनशैलीमुळे व्यस्त पण सुशिक्षित पालक ,संगणकाच्या युगातील स्मार्ट पिढी , शिक्षणाच्या नानाविध संधी असे असताना खरंतर मुलांविषयी फारशा समस्या असण्याचं कारण नाही. पण  परीक्षेतील अपयशाने आत्महत्या करणारी मुले, प्रेमभंग झाल्याने दुसऱ्याच्या व स्वत्ःच्या जीवावर उठणारी मुले, पैसे न दिल्यामुळे स्वतःच्या आजी वा आजोबांच्या जीव घेणारे युवक अशा सुन्न करणाऱ्या बातम्या वाचनात येतात, टि.व्हीवर दिसतात आणि मग या साऱ्याला कोण जबाबदार असा विचार मनात येतो.

 अतिरेकी लाड, अती संरक्षण, जीवघेण्या स्पर्धा अशी ना -ना कारणे जाणवू लागतात मात्र त्यावर उपाय दिसत नाही. या सगळ्या समस्यांचे निराकरण शास्त्रशुध्द , वैद्यकीय आधार असलेले पण अतिशय सोप्या शब्दात ’जावे भावनांच्या गावा’ या  डॉ.संदीप केळकर यांच्या पुस्तकात मिळते.

 मुले हळवी असतात वगैरे गोष्टी आपण जाणून असतो,   मुलांच्या शारीरिक तसेच बौध्दिक विकास करण्यासाठी आपली धडपड आपत्य जन्म क्वचित त्याआधी पासून चालू असते, मात्र मुलांच्या भावनिक विकासाकडे आपण तितकेसे लक्ष देत नाही.किंबहुना असे काही असते हेच बहुतांश पालकांना माहित नाही. लहानपणापासून भावनेच्या भरात काही करु नकोस, भावनेच्या आहारी जावुन निर्णय घेवु नये असे वाचले ,ऐकलेले असते. किरकोळ कारणाने रडणाऱ्यांना रडुबाई, पटकन चिडणाऱ्याला आग्या वेताळ अशी विशेषणे देण्याने "भावना" या विकासाच्या आड येणाऱ्या आहेत असे काहिसे मनाशी ठसलेले असते. बुध्दि आणि भावना या परस्पर विरोधी समजल्या गेल्या आहेत.आणि शालेय तसेच महाविद्यालयीन यश हे पेपरातील गुणांनी मोजत असल्याने बौध्दिक विकासास प्राधान्य दिले जाते.   हल्ली एक किंवा दोन मुले असल्याने त्यांचे लाड होतात. आई-वडील दोघे नोकरी करत असतील तर ते मुलांना वेळ देवु न शकल्याने त्यांचे अतिरेकी लाड होवु शकतात त्यातुनच हट्टी,एककल्ली दुराग्रही मुले बनतात असा सर्वसाधारण समज असतो
 ’जावे भावनांच्या गावा’ या पुस्तकातुन भावना या आपल्या शत्रू नसुन मित्र आहेत, आनंद,प्रेम ,समाधान यांच्य़ा इतक्याच दुःख, भिती,राग या भावना महत्त्वाच्या आहेत असा मोलाचा मंत्र आपल्याला मिळतो. भावनांमधे भरपूर माहिती साठवलेली असते, भावनिक मेंदू हा वैचारिक मेंदूच्या ८०,००० पट वेगाने काम करतो त्यामुळेच काहीवेळा अविचारी कृत्ये माणसाच्या हातुन घडतात.भावनिक व वैचारिक मेंदू या दोन्हीमध्ये सम्न्वय साधणे म्हणजे भावनिक प्रज्ञेचे संवर्धन होय.  लहानपणापासून अक्षर ओळखी बरोबरच मुलांना आपण या नानाविध भावनांबद्दल साक्षर केले तर त्यांचा भावनिक विकास होईल. बुध्दी आणि भावना यांचा योग्य वापर करुन आपले व्यक्तिमत्त्व प्रगल्भ करणे कसे शक्य आहे हे समजते. टीम वर्क , संभाषण कौशल्य, ऐकण्याची कला , आवेगांवर नियंत्रण या नोकरी वा व्यवसायात शैक्षणिक पात्रतेइतक्याच आवश्यक गोष्टी आहेत पण शालेय अथवा महाविद्यालयीन अभ्यासक्रमात त्यांचा समावेश नसतो. विभक्त कुटुंब पध्दती, मैदानी खेळांचा अभाव,टि.व्ही, संगणकांचा अतिरिक्त वापर यामुळे मुलांमध्ये त्यांचा अभाव आढळतो त्यातुन बऱ्याच समस्या उद्भवतात. हि कौशल्ये कशी वाढवावी याचे योग्य मार्गदर्शन पुस्तकात  मिळते.भावनिक कौशल्यांचा विकास हे तंत्र हि अधुनिक असून १९९० पासून अस्तित्वात आलेले आहे.भावनांबद्दलचे संशोधन पुष्कळ जुने असले तरी हे तंत्र अधुनिक आहे.

 पुस्तकात भावनांच्या भाषेची मशागत ,भावनिक सुजाण पालकत्व, टिन एजर्सच्या विश्वात, जग भावनांचं बुध्द्यांकापलीकडलं असे भाग आहेत .भावनिक बुध्दिमत्ता म्हणजे काय? भावनांक(emotional quotionent) म्हणजे काय तो कसा काढतात हे डॉक्टरांनी सोप्या शब्दात सांगितले आहे. त्यांच्या कडील पेंशंटची उदाहरणे देवुन अनेक मुलांच्या शारीरिक आजारांच्या मागे कुठली भावनिक कारणे होती हे वाचताना एक पालक म्हणून आपल्यालाही आपल्या मुलांच्या संदर्भात असे काही घडल्याचे जाणवत राहते. साध्या संवादातून किती समस्या सहज दूर होवु शकतात हे समजते  त्या करीता पालकांनाही भावनिक साक्षर व्हावे लागेल.  सुदैवाने भावनिक गुणवत्ता वयाच्या ४५ वर्षांपर्यंत वाढविता येते,त्यामुळे पालक ही या पुस्तकातुन स्वतःसाठी बरेच काही शिकु शकतात.

 विज्ञानाने प्रगती केली, समाज कितीही सुधारला तरी आपल्या मुलांची काळजी करणे हे कुठल्याच पिढीला चुकलेले नाही, काळजी करण्याऐवजी योग्य काळजी घ्या असे डॉ.संदीप केळकर सांगतात. त्यांचा या विषयातील अभ्यास किती सखोल आहे हे त्यांनी दिलेल्या अनेक संदर्भातुन जाणवते. ऑरिस्टॉट्ल, मार्टिन ल्युथर किंग,विवेकानंद यांसारख्या थोर व्यक्तिंची भावनांच्या बाबतीतील अवतरणे देवुन ते आपला विषय स्पष्ट करतात. पुस्तकाची भाषा ओघवती तर आहेच शिवाय आजकालच्या पिढीला समजणारी उदा. भावना या मेसेजस आहेत, पालकत्वाचा एक्प्रेस हायवे  या सारख्या उदाहरणांमधुन अवघड संकल्पना सोप्या पध्द्तीत समजावल्या आहेत. भावनांच्या भाषेची मशागत या भागात विविध भावनांची अक्षरओळख करुन देणारं घर हेच मुलांचं प्राथमिक शिक्षण केंद्र असल्याचं डॉक्टर सांगतात. त्यामुळे भावनांच हे प्राथमिक शिक्षण अधिकाधिक रंजक होण्याविषयी मार्गदर्शन हि करतात.’भावनिक सुजाण पालकत्व’ या भागात मुलांच्या भावना त्यांना योग्य रितीने व्यक्त करता याव्या, पालकांनी मुलांशी सुसंवाद कसा साधावा यावर भर दिलेला आहे.  पौगंडावस्थेतील मुलांचे भावनिक विश्व आणि त्यांच्या समस्यांना तोंड द्यावयास क्वचित हतबल ठरणारे पालक यांना खूप उपयुकत वाटेल असा ’टिन एजर्सच्या विश्वात’  हा विभाग आहे. मानवी मेंदूची रचना, वैचारिक आणि भावनिक मेंदुचे काम कसे चालते या विषयीची शास्त्रीय माहिती आकृत्यांद्वारे ’जग भावनांचं बुध्द्यांकापलीकडलं’ या भागात दिलेली आहे.

भावनिक बुध्दीमत्ता या विषयावरील हे पहिलेच मराठी पुस्तक वाचकांना एका नव्या विषयाची ओळख करुन देते. प्रत्येक मुलाने आपल्या भावनिक विकासाकरीता, प्रत्येक पालकाने त्याच्या व त्याच्या मुलांच्या करीता पुस्तक जरुर वाचावे आणि संग्रही ठेवावे.

स्मरणरंजन



गतकाळाच्या जंगलात परत परत जायचा मोह पडतो
कारण तिथे भेटत राहते हरवलेले  बालपण

निरागस लोभस
निर्व्याज प्रेम करणारी जिव्हाळ्याची माणसं
छोट्या छोट्या गोष्टींमधे मिळणारे मोठे आनंद

त्या शाळेतल्या गमती, देवासारख्या वाटणाऱ्या बाई
उन पावसागत क्षणात भांडणाऱ्या अन दुसऱ्या क्षणी
गळ्यात पडणाऱ्या जिवाभावाच्या मैत्रीणी !

सगळेच काही सोनेरी नसते भूत काळात
दुःख,अपमानांच्या वेदनांच्या जखमाही असतातच कि
पण त्यांची भळभळ थांबलेली असते,
दुःखाची धार बोथट झालेली असते

दैन्याच्या उन्हाचे चटके विझुन गेलेले असतात
त्यामुळे त्यांची लाही जाणवत नाही
उलट त्यातून तावुन सुलाखून बाहेर आल्याचं समाधानच वाटतं!

बरीच वाट चालून आलो असं वाटायला लागतं
पुढं दिसणारं प्रौढ वय वाकुल्या दाखवायला लागतं
म्हणुनच मग या आठवणींच्या राज्यातच मन रमत राहतं