Wednesday, June 30, 2010

आमची पिढी -ऎकणाऱ्यांची

दर वीस ते पंचवीस वर्षांनी बदलणाऱ्या माणसांच्या वय विचार-आचार यातील बदलाला पिढी म्हणण्याच्या काळापासून दर चार वर्षांत हेच बदल झपाट्याने होताना बघणाऱ्या काळाचे साक्षीदार म्हणजे आमची पिढी.

आमच्यापैकी बहुतेकांचे वाडवडील खेडेगावी. आमच्या पिढीतल्या लोकांचे वडील शहरात आले, शिकले नोकऱ्या मिळवल्या.बहुतेकांनी हलाखी सोसली.आपल्या आर्थिक,बौध्दिक कुवतीप्रमाणे त्यांना कामे मिळाली आणि त्यानुरुप त्यांची आयुष्ये घडली.या लोकांना आपल्या घरच्यांसाठी, भावंडांसाठी थोड्याफार प्रमाणात झिजावे लागले. शहरात हे आल्याने खेड्यातून त्यांच्याकडे अडी-अडचणींना माणसे येत.त्यांना जमेल तशी मदत करावी लागे.त्यामुळे आमच्या पिढीत एकत्र कुटुंबात कुणी राहिले नसले तरी माणसांची सवय , त्यांच्यासाठी करावी लागणारी तडजॊड, पदरमोड याचे शिक्षण सहज मिळाले.आमच्या वेळी आजुबाजुच्या बऱ्याच घरात, शाळेतल्या मैत्रीणींत, नातलगांमध्ये नोकरी करणाऱ्या बायकांचे प्रमाण फार थोडे होते. ज्या नोकरी करत त्या बरेचदा घराला आर्थिक हातभार लागावा या साठीच आणि न करणाऱ्या सुध्दा खूप सुखवस्तु होत्या अशातला भाग नव्हता, त्यांचे तेवढे शिक्षण नव्हते अथवा त्यांना योग्य संधी मिळालेली नव्हती. एकूणात अजुबाजूचा वर्ग पैसेवाला नव्हता.त्यामुळे स्वावलंबनावर भर असे.धुण्य़ाभांड्याला बाई म्हणजे फार झाले आणि पोळ्याला बाई हे तर पैसा जास्त झाल्याचे लक्षण असे. शाळेत असताना क्लास(याला तेंव्हा शिकवणी म्हणत)ला फक्त ’ढ’ मुले जात, ती देखील पैसेवाल्यांची.घरकाम म्हणजे केर -फरशी धुणे भांडी या सगळ्यात मुलींना मदत करावी लागे.त्याशिवाय दळण आणणे,सामान-भाजी इ.आणावे लागे.मे-महिन्याच्या सुट्टीत पापड,पापड्या कुरडया, बटाट्याचा किस,सांडगे आदि करण्य़ात मस्त वेळ जात असल्याने सुट्टी बोअर होत नसे आणि सुट्टीत थंड हवेच्या गावी जाण्याचा खर्चही होत नसे.सुट्टीत बहुतेक जण आपापल्या गावी जावुन येत.

शिक्षणाचे महत्त्व समजलेला हा वर्ग होता, किंबहुना त्याशिवाय दुसरे काही माहित नसलेला असेल कदाचित, शाळेव्यतिरिक्त इतर ठिकाणी जावुन काही शिकणे माहित नव्हते(किंवा पारवडत नव्हते). खेळ, वक्तृत्त्व, लेखन -वाचन, गायन,चित्रकला सगळ्याची भिस्त शाळेवर असे. मुलांच्यामध्ये असणाऱ्या अंगभूत गुणांचा झालाच तर विकास शाळेत होई आणि त्याचा प्रकाश शाळेच्या स्नेहसंमेलनात किंवा जास्तित जास्त गल्लीतल्या गणेशोत्सवातील कार्यक्रमात पडे.या गुणांना दाखवायला आजच्या सारखे रियालिटी शॊ नसल्याने त्यांचे म्हणावे तेवढे महत्त्व् जाणवत नसे, म्हणूनच त्याच्यात वेळ घालवणे वा त्यावर वेळ घालवणे म्हणजे वाया जाणे असे बहुतेक पालकांना वाटे.त्याचा तोटा असला तरी एक फायदा म्हणजे आज कालच्या मुलांना रियालिटी शो करता जे काय कष्ट पडतात ते आंम्हाला पडले नाहित आणि बक्षीस मिळाले नाही की त्यांचे आई-बाप जसे रडतात तशी आमच्या पालकांवर पाळी आली नाही.मेडीकल किंवा इंजिनियरींगला प्रवेश मिळणे हे हुशार असल्याचे एकमेव लक्षण होते. मेडीकल आणि इंजिनियरींगची संपूर्ण महाराष्ट्रात मोजकीच शासकीय महाविद्यालये होती.त्यामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी बरीच स्पर्धा होती्.त्यामुळे बारावीमध्ये क्लासेस लावण्याचे लोण आले होते. मोजके क्लासेस फार प्रसिध्द होते. त्यांच्या जाहिराती पेपरमध्ये येत. प्रवेश मिळाला कि तो विद्यार्थी हुशार न मिळालेला अर्थात ’ढ’ हे ठरुन गेलेले असे.प्रवेश न मिळालेले विद्यार्थी खूप निराश होत पण आत्महत्येचे प्रमाण कमी होते.(कदाचित मिडीयाचा महिमा नसल्याने ते बाहेर कळत नसेलही), मात्र आमच्या आजुबाजुला तरी अशा घटना काही बघायला ऎकायला नाही मिळाल्या. इतरत्र फारशा संधी उपलब्ध नसताना, त्यांची फारशी माहिती नसताना सुध्दा मुले बी.एस्,स्सी. किंवा तत्सम कोर्स करुन कुठल्यातरी मार्गाला लागायची.पालक देखील या गोष्टीचा फारसा बाऊ करुन घेत नव्हते.मुलांच्या शैक्षणिक जीवनात त्यांचा सहभाग फक्त फी देण्यापुरता असल्यामुळे त्याच्या यशापयाशाला तो एकटाच जबाबदार असे, म्हणूनच त्याला प्रवेश मिळणे वा ना मिळणे हा पालकांचा ’इगो पॉईंट’ ठरत नव्हता.

आम्ही अभ्यास करत होतो, घरातली कामे सांभाळून.आमचे कॉलेजच्या शैक्षणिक जीवनातले प्रश्र्ण् आम्हीच सोडवत होतो घरी कुठलीही अडचण सांगायची नाही.असे असूनही आम्ही आमच्या आई-वडीलांचे ऎकत होतो, म्हणजे ऎकावेच लागे.आमच्या घरात तसे बरेच मोकळे वातावरण होते. म्हणजे मी बरेचदा आई -किंवा दादांशी न पटणाऱ्या गोष्टींबाबत वाद घालत असे.पण बाजू त्यांच्यावर उलटू लागली तर ते त्यांच्या वडीलकीचे अस्त्र बाहेर काढीत. आई तर चक्क
’ काय बाई तुम्ही मुली , खुशाल मोठ्य़ंच्या अरे ला कारे करता! माझे ऎकलेच पाहिजे. तू मला झालीस कि मी तुला?’ असे विचारुन निरुत्तर करत असे. एकूण काय कितीही बडबड केली तरी त्याला मर्यादा होती. आईला शिक्षण मिळवण्यासाठी घरातुन खूप विरोधाला तोंड द्यावे लागले होते, म्हणून मुलगी असून शिकायला सहज मिळते याचे तिला अप्रुप होते. पण ती विहिरीचे पाणी काढून,घरकाम , झाडलोट, शेणगोळा सगळे करुन शाळेत जायची तर आम्ही कॉलेजला जाण्यापूर्वी केरफरशी केली आणि नळावर धुणे धुतले तर कुठे बिघडले असा तिचा सवाल असे. घरकामाला पर्याय नव्हता. ते सांभाळून अभ्यास करावा आणि चांगले मार्क मिळवावे आशीच अपेक्षा होती.

घरीच इतके तावून सुलाखून निघाल्याने सासरी जड जाण्याची वेळ आली नाही. सासरच्यांशी जमवून घेतलेच पाहिजे.नोकरी करुन घरचे सगळे करायलाच हवे असे धडे मिळाले होते. गावातच सासर असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या कुरबुरी,तक्रारी इतरांकडून माहेरी येता कामा नयेत असे आधीच बजावले होते.आमच्या पिढीतल्या मुलींचे नवरे देखील जवळपास सगळे श्रावणबाळाचे वंशज.लग्नाआधी ते ही आमच्यासारखेच आई-वडीलांचं ऎकणारे, नंतरही तसचं, त्यामुळे घरात सासु-सासऱ्यांशी झालेल्या छोट्या-मोठ्या मतभेदांबद्दल नवऱ्याजवळ बोलण्यात अर्थ नसे.तिकडून सहानुभूतीची सुतराम शक्यता नसे.आणि स्वतःच्या आई-वडीलांजवळ बोलण्याची प्राज्ञाच नव्हती. त्यामुळे सासरच्यांशी जुळवून घेत, आपल्याच पातळीवर कधी गोडीत, कधी दुर्लक्ष करुन,तरी कधी मनातल्या मनात चिडून एकत्र राहीलो आम्ही. त्याचे फार दुःख झाले अशातला भाग नाही, पण एकाच गावात सासु-सासऱ्यांपासून स्वतंत्र राहणाऱ्या आमच्या पैकी काही जणी फटकळ,तुसड्या, माणूसघाण्या ठरल्या. ज्यांचे सासु-सासरे गावी रहात होते, ते नोकरी करणाऱ्या सुनेच्या अडचणींना क्वचित आले, त्यांच्या गरजांसाठी सुनांनी ऑफीसमधून रजा काढल्या पाहिजेत अशी अपेक्षा बाळगून राहिले.

आमच्या पिढीत आम्हाला एखाद-दुसरे भावंड असल्याने आई-वडील आणि सासु-सासरे यांच्या म्हातारपणाची, आजाराची सर्व जाबाबदारी आमच्यावर पडली. ती जमेल तितक्या निष्ठेने बहुतेकांनी पार पाडली वा पाडत आहेत.

आता आमच्या पिढीतल्या लोकांनीही चाळीशी ओलांडली,पन्नाशी गाठली आज आमच्यापैकी काहींची मुले शिकत आहेत्, काहींची शिक्षणे संपली,कुणाला जावई आले, कुणाला येऊ घातलेत. नव्या पिढीतली आमची मुले स्वतंत्र विचारांची आहेत.त्यांच्याकडे आचार -विचाराचे स्वातंत्र्य आहे मात्र स्वावलंबन नाही.आजूनही स्वत्ःचे कुठलेही काम ती आई-वडीलांना बिनदिक्कत सांगू शकतात. नव्हे तो त्यांचा हक्कच आहे. आम्ही त्यांना धाकात नाही ठेवले हा दोष आमचाच आहे. आपल्या मुलांनी स्पर्धेत टिकावे यासाठी आमच्या पिढीने त्यांच्याकडे लक्ष दिले, (कदाचित नकॊ तेवढे).त्यांना अभ्यास आणि अभ्यासेतर गोष्टींना वेळ मिळावा याकरता घरातली कुठलीही कामे,अडचणी त्यांच्यापर्यंत जाऊ दिल्या नाहीत.पैशाची बाजू बहुतेक ठिकाणी आई-वडील मिळवते असल्याने ठिक होती, घरात कामाला बायका होत्या.त्यामुळे मुलांना शारीरिक ,आर्थिक कुठलेच ताण नव्हते.त्यांना अभ्यास,परीक्षा यांचे भरपूर टेन्शन असे नाही असे नाही. पण या मुलांवर जागतिकीकरणाचा बराच प्रभाव पडला, म्हणजे पाश्चात्य संस्कृती विशेषतः अमेरीकन यांमध्ये चांगलीच रुजू लागली.आचार,विचारांचे स्वातंत्र्य, वेळी-अवेळी फिरण्याचे, मजा करण्याचे स्वातंत्र्य त्यांनी घेतले.आपले जोडीदार निवडायचे स्वातंत्र्यही त्यात आले.आई-वडीलांचे न ऎकणॆ,त्यांच्याजवळ न राहणॆ इतकेच नाही तर त्यांनी मुलांकडून कुठलीही अपेक्षा ठेवणे ही किती चुकीची गोष्ट आहे, परदेशात आई-वडील मुलांना कसे पूर्ण स्वातंत्र्य देतात, त्यांच्या कडून कुठलीच आर्थिक, मानसिक, भावनिक कुठलीच मदत मागत नाहीत आणि आपले आई-वडील आपल्या सगळ्य़ा बाबींमध्ये लक्ष घालतात असे त्यांना वाटते.पण त्याच वेळी तिकडची मुले वयाच्या सोळाव्या वर्षापासून एकटी राहतात, पडेल ती कामे करुन मिळेल ते शिक्षण घेतात, आपण पंचविशी पर्यंत आई-वडीलांच्या खर्चाने मनसोक्त शिकू शकतो हि गोष्ट ते सोयीस्करपणे विसरतात. स्वातंत्र्यांची किंमत मोजावी लागते असे म्हणतात. मुलांना दिलेल्या स्वातंत्र्य़ाची किंमत आम्हीच मोजत आहोत. आज आमची मुले आमचे ऎकत नाहीत याचा विषाद आहे कि आजही आम्हाला आमच्या आई-वडीलांचे ऎकावे लागते याचे दुःख आहे, काही कळेनासे झाले आहे.

वृध्दापकाळामुळे माझी आई सध्या माझ्या घरी आहे. माझ्या मुली घरात कपड्यांचा पसारा करतात, खाल्लेल्या ताटल्या तशाच टाकून शाळा-कॉलेजला पळतात. घरी कुणाला बोलावले तरी त्यांना वेळ असेल तरच घरी थांबतात.वडीलांशी चढ्या सुरात बोलतात, माझ्या बडबडीकडे पूर्ण दुर्लक्ष करतात.परवा आईच्या खोलीत मुलींचे कपाट मी आवरत होते.ती मला म्हणाली, " काय गं, तू अगदीच तुझ्या मुलींना शिस्त लावली नाहीस, त्यांना तुझा काडीचा धाक नाही. किती पसारा करतात. अभ्यासात आहेत हुशार, ती देवाची कृपा. पण तू काही त्यांना वळण नाही लावलसं ! , मला आज फक्त दूध दे कालच्या इतकं गरम नको, त्यात सुंठ घाल न विसरता"
मी म्हणाले, " आई माझ सगळं आयुष्य ऎकण्यात गेलं, लहानपणी तुमचं ऎकलं, नंतर सासु-सासऱ्यांच आणि आता मुलांच. अजूनही तुमच ऎकतेच आहे, मुलींचही ऐकते. लहानपणी तुम्ही पाणी आणून दे म्हटल्यावर पळत जावून देत होते, आता मुली टि.व्ही. समोर नाहीतर कॉम्प्युटर समोर बसून म्हणतात आई पाणी दे , कि त्यांना ही पाणी देते आम्हाला मात्र शेवटपर्यंत पाणी आमच्याच हातांनी प्यायचे आहे त्यासाठी देवाने कायम धडधाकट ठेवावे एवढीच प्रार्थना आहे. "


©