Thursday, February 20, 2014

आमच्या लग्नाची रौप्य महोत्सवी गोष्ट

           एका लग्नाची गोष्ट पासून सुरु झालेल्या ’एका लग्नाची दुसरी गोष्ट’,’एका लग्नाची तिसरी गोष्ट’ अशा प्रसिध्द मराठी मालिका बघितल्यावर  आमच्या ’लग्नाची रौप्य महोत्सवी गोष्ट’ सांगण्याचा मला मोह झाला. आमच्या लग्नाची गोष्ट मालिकेसारखी रोमॅंटिक नाही. मुळात माझा ’प्रेमविवाह’ नाही ,दाखवुन ठरवुन झालेल्या लग्नाच्या गोष्टीत काय विशेष असणार? , त्यामुळे लग्न कसे जमले हे सांगण्याजोगे नाहीच. त्यापुढची कथा चारचौघांपेक्षा वेगळी नाही,तरीही सांगण्यासारखी नक्की आहे.

           पंचवीस वर्षांपूर्वी माझं लग्न ठरलं त्यावेळी आमची आर्थिक परिस्थिती साधारणच होती. मला वडील नव्हते, भाऊ नव्हता. माझे शिक्षण,नोकरी,बऱ्यापैकी रुप या जमेच्या बाजू असल्या तरी आर्थिक परिस्थिती मुळे आईला माझ्या लग्नाचा चांगलाच घोर लागला होता. त्यात कितीही उच्च शिक्षित मुलाकडे चौकशीला गेले कि ते पत्रिका मागत आणि ती जुळत नसल्याचा निरोप चार दिवसात येई. त्यामुळे तर आई फारच रंजीला आली होती. तो जमाना इंटरनेटचा नव्हता त्यामुळे विवाहेच्छू मुलांच्या माहित्या मिळवायचे एकमेव साधन विवाहसंस्था होते,त्याही त्यावेळी पुण्यात मोजक्याच होत्या. त्यातुन आणलेल्या दहा पत्त्यांपैकी पाचांची लग्ने झालेली वा ठरलेली असत(विवाहसंस्थेला कळवण्याची तसदी त्यांनी घेतलेली नसे) चारांच्य़ा पत्रिका जुळत नसत.एखादे स्थळ उरे ते मला आवडत नसे.

    तोपर्यंत माझ्या आईने ज्योतिषाचा उंबरठा शिवला नव्हता.माझ्या वडीलांचा पत्रिकेवरही विश्वास नव्हता आमच्या घरात माझ्या वेळेपर्यंत कुणाची लग्ने पत्रिका बघुन झाली नव्हती. माझ्या लग्नाचा प्रश्ण आईला जटील वाटल्याने तिने कुठल्याशा ज्योतिषाला माझ्या लग्नासंबंधी विचारले, तो सप्टेंबर महिना होता. त्यांनी कळविले लग्न जमले तर दोन महिन्यात जमेल अन्यथा पुढील चार वर्षे योग नाही. झाले... आईची काळजी दोनशे पटिने वाढली.माझ्या लग्नाची सगळी खटपट माझी मोठी बहिण करीत होती.दिवाळीच्या सुट्टित ती केरळ ट्रीपला जाणार होती तिचे बरेच आधीपासून ते ठरले होते. आक्टोबर अखेरीस ती ट्रीपला गेली,जाण्यापूर्वी बऱ्याच ठिकाणी तिने पत्रे धाडली होती,वा भेटुन माझी कुंडली देवुन आली होती. ती केरळला गेल्यानंतर आईने माझे डोके खायला सुरुवात केली. इतर परीक्षांइतकी  हि परीक्षा सोपी नाही असे मलाही वाटले,कारण माझ्या हातात नसणाऱ्या बऱ्याच गोष्टींचा या परीक्षेत अंतर्भाव होता. वास्तविक आपले लग्न व्हावे असे मला मनापासून वाटतही नव्हते. आईची काळजी अनाठायी आहे असे मला फार वाटे,पण तिच्या जागी तिचेही बरोबर होते. माझ्या चुलत,मावस,आते बहिणी माझ्या आसपासच्या वयाच्या होत्या आणि त्यांची लग्ने झाली होती.

        आक्टोबर महिना आला.माझ्या लग्न झालेल्या दुसऱ्या बहिणीचा दिवाळसण होता, मी आणि आई त्या तयारीत होतो.आईच्या डोक्यात माझ्या लग्नाच्या काळजीचा किडा होताच पण दिवाळीच्या नादात त्याचा थोडा विसर तिला पडला असावा. त्या आठवड्यात बऱ्याच मुलांकडून माझ्या कुंडल्या जुळत असल्याची पत्रे आली. दिवाळीनंतर काही जणांनी भेटायला बोलावले होते. एकाच पत्रातील मुलाकडच्यांनी आमच्या घरी भेटायला येण्याचे कळविले होते. कळविल्याप्रमाणे ते एका संध्याकाळी आमच्या घरी आले. आई आणि मुलगा असे दोघे आले. माझी आई आणि मुलाची आई फार जुनी ओळख असल्यासारख्या गप्पा मारीत होत्या. दिवाळीचे फराळाचे पदार्थच खायला ठेवले होते. अर्धा तासाच्या भेटीत मी काय बोलले किंवा मी काय विचारले मला आता काहिच आठवत नाही. माझ्या मैत्रीणीचे असे बरेच कार्यक्रम झालेले होते तिला मी विचारले होते, १५-२० मिनिटांच्या मुलाखतीत एखादी व्यक्ति पसंत कि नापसंत हे कसे कळणर? त्यावर तिने फार छान सांगितले होते ती म्हणाली, "पसंतीचा मला अजून अनुभव नाही आला,पण एखादी व्यक्ती नापसंत आहे हे कळायला पाच मिनिटेही पुरतात अगं"
आमच्या घरुन ते दोघे जायला निघाले जाताना आई त्यांना म्हणाली," आमची बाग मोठी आहे,मी खूप झाडे लावली आहेत आता काळोख झाला नाहीतर तुम्हाला दाखवली असती"
" पुन्हा येईन मी बघायला" त्या  म्हणाल्या
मला मनात हसूच आले, लग्न ठरल्यासारख्याच त्या दोघी बोलत होत्या.
मंड्ळी निघून गेल्यावर आईने सुरु केले," ह्या बाई फार चांगल्या आहेत, तू नाही म्हणू नको माणसं चांगली वाटतात......"
माझ्या मैत्रीणीच्या वाक्याचा विचार केला तर मला तो मुलगा नापसंत आहे असे वाटले नव्हते पण म्हणून पसंतच आहे असेही म्हणावेसे वाटले नाही.एकूण मला या मुलाखतीतून माझ्या आयुष्यातला एवढा मोठा निर्णय इतका झटपट घ्यावा हे पटत नव्हते. त्यांच्याकडचे उत्तर आल्यावर बघू असे म्हणून मी तिला झटकून टाकले.पण दोनच दिवसात त्यांच्याकडून मुलगी पसंत असल्याचा निरोप आला. आईने अखंड माझ्या मनावर तू नाही म्हणू नको असे बिंबवले. माझी मोठी बहीण दिवाळी झाल्यावर ट्रीपहून परत आली तिला आईने पुढील बोलणी करायला त्यांच्या घरी धाडले आणि अशा रितीने माझे लग्न एकदाचे ठरले!

      त्यावेळी कंत्राट पध्द्तीने लग्ने होत असत,पण आम्हाला तशा पध्द्तीने लग्न करुन देणॆ शक्य नव्हते. मुलाकडचे लोक कर्नाटकातले होते पण  त्यांची चाळीसाहून अधिक वर्षे पुण्यातच गेली होती त्यामुळे त्यांच्या बोलण्यातही कानडी हेल जाणवत नसत.पण दक्षिणेकडील लोक खूप हुंडा मागतात,चांदी-सोने खूप मागतात असे आम्हाला बऱ्याच लोकांकडून समजले होते तसे मागितले तर मी लग्न करणार नाही असे मात्र मी घरी स्पष्ट सांगितले होते.पण लग्नाच्या बैठकीत मुलाकडच्यांनी हुंडा,दागिने कशाकरीता अडविले नाही.
त्यांनी फक्त आमचे सातशे लोक लग्नाला येतील आदल्या दिवशी देखील कुठलेही कार्यक्रम नकोत असे सांगितले. शिवाय़ त्यांना लग्न फेब्रुवारी महिन्यातच हवे होते.माझ्या घरच्यांनी ते मान्य केले.एकूण हजार लोक तरी लग्नाला असणार.कारण आमचं गोत ही मोठच होतं अगदी काटछाट केली तरी आमची तीनशे माणसे तरी होत होतीच. दोन महिन्यात सगळी तयारी करणे आम्हाला खरोखरीच अवघड जाणार होते. मुख्य अडचण लग्नासाठी हॉल मिळविण्याची होती. पुण्यामधली सगळी कार्यालये बुक्ड होती. धनकवडी भागात सातारा रोडवर बरीच नवीन कार्यालये झालेली होती.त्यातले एक आम्हाला मिळाले.कार्यालय नवेकोरे,भरपूर ऐसपैस होते. आता बाकीची तयारी अवघ्या दोन महिन्यात कराय़ची होती. आमचे ओळखीचे आचारी होतेच त्यांच्या कडून यादी आणून सामान आणले. लाडू-चिवडा घरच्या अंगणातच केला. आदल्या दिवशी मार्केट यार्डातून भाजी आणून ठेवली.या सगळ्य़ातच साड्या खरेदी,केळवणे,लग्न पत्रिका छापुन आल्यावर आमंत्रणे आणि माझी नवी नोकरी सगळे चालुच होते.त्यावेळी मोबाइल तर नव्हतेच पण फोन देखील सगळ्यांकडे नव्हते त्यामुळे बाहेरगावची सोडली तर बाकी सारी आमंत्रणे समक्ष जावुनच करावी लागत. माझ्या दुसऱ्या बहिणीचे लग्न आधीच्या वर्षी झाले होते ती बाळंतपणाला आलेली होती. तिला कधीही दवाखान्यात न्यायची वेळ येईल अशी परिस्थिती होती. असा एकूण दोन महिने कामाचा गदारोळ चालू होता. यामधे नवऱ्या मुलीला मेंदी,नटवणे याकरीता ब्युटी पार्लर वा घरी ब्युटीशियन बोलावणे असले प्रकार नव्हतेच. मी लग्नाच्या आदल्या दिवशीपर्यंत ऑफिसला गेले होते त्यामुळे आदल्या दिवशी घरी आल्यावर मला बांगड्या भरल्या माझ्या एका मैत्रीणीने मला मेंदी काढली. आम्ही रात्रीच लग्नाच्या हॉलवर जेवण करुन झोपायला गेलो.

         लग्नाचा मुहूर्त सकाळी साडेनऊच्या सुमारास होता.लग्न वैदिक पध्दतीने होणार होते त्यामुळे लग्नाचे सगळे विधी मुहूर्तापूर्वी झाले. सकाळी साडेसात पासून कार्यक्रमांना सुरुवात होणार होती. माझी मंडईजवळ राहणाऱ्या माझ्या मावशीने लग्नासाठी लागणारे फुले हार आणावयाची जबाबदारी घेतली होती. ती रीक्षातून मोठाले दोन हारे घेवुन आली.तिच्या लेकी,सुना आवरून बसने येणार म्हणून त्यांनी त्यांच्या दागिन्यांची पिशवी मावशीजवळ दिली.रीक्षातुन उतरुन फुलांच्या टोपल्या नीट उतरवुन घेण्याच्या नादात मावशीच्या हातुन दागिन्यांची पिशवी रीक्षातच राहिली. हॉलमध्ये कुणाच्यातरी ताब्यात फुले दिल्यानंतर तिला दागिन्यांची आठवण आली , आणि ती मटकन खालीच बसली. तिच्या मुलाला तिने डोळ्यात पाणी आणून घडलेली घटना सांगितली.
पण तो तिलाच म्हणाला," आई, मावशीच्या घरातलं शुभकार्य आहे, अजिबात रडायचं नाही. कुणाजवळ बोलायचंही नाही. नंतर बघू काय करायचं ते "
तरी सगळी गडबड माझ्या सासऱ्यांच्या कानावर गेली. ते माझ्या मावशीला म्हणाले, "इथे गोंदवलेकर महाराजांचा फोटो आहे त्यांना मी कार्य निर्विघ्न पार पडावे यासाठी प्रार्थना केली आहे.तुम्ही निर्धास्त रहा."
आणि दहा मिनिटांत तो रीक्षावाला हॉलवर आला, त्याला पद्मावतीपाशी रीक्षात राहिलेली पिशवी दिसली ती द्यायला  तो भला माणूस परत आला, माझ्या मावसभावालाच तो मावशी बद्दल विचारु लागला,भावाने त्याला ५०रु.बक्षिस दिले, आईने चिवडा-लाडूचे पाकिट त्याला दिले.

        सकाळचे साडेसात वाजले.लग्नाच्या विधींना सुरुवात झाली. पावणे नऊ-नऊ वाजेपर्यंत विधी चालू होते. साडेनऊ वाजता मुहूर्त होता.मधल्या पंधरा मिनिटात मला साडी बदलून गौरीहार पुजायचा होता.त्यासाठी वरच्या मजल्यावरच्या खोलीत जायचे होते.खोलीकडे जायला हॉलच्या दुसऱ्या टोकाकडील जिना होता.जायला आणि यायला मिळून किमान  पाच -सात मिनिटे लागणार होती. (नवऱ्या मुलीने धावणे बरे दिसले नसते.) घाईगडबडीत मैत्रीणींनी साडी नेसविली.गौरीहाराजवळ बसून पुजा केली.तोवर माझा मामाने लवकर चला असा धोसरा लावला.मामाचा हात धरुन बाहेर आले तेंव्हा हॉल माणसांनी पुर्ण भरुन गेला होता. गर्दीतून वाट काढीत आम्ही स्टेजवर पोहोचलो तेंव्हा गुरुजी आंतरपाट धरुन उभे होतेच, त्यांच्या हातात एक फुलाचा हार होता. ते मला म्हणाले,"तुम्ही वराला घालायचा हार कुठे?"
त्यांच्या हाराकडे बघून मी म्हणाले ,"तुमच्या हातात आहे तोच"
"हा तुमचा हार नव्हे हा नवऱ्यामुलाचा आहे, तुमचा हार आणा" गडबडीत हार वरच्या खोलीतच राहिला होता. मी तो आणायला जायचे कसे अशा विचारात पडले तेवढ्यात
 माझ्या मागे उभी असलेल्या बहिणीने मला थांबविले आणि तिने कुणाला तरी हार आणायला पिटाळले. दरम्यान मंगलाष्टके सुरु झालेली होती. ’तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्र्बलं तदेव ..’ होईपर्यंत माझ्या हातात हार आलेला होता. अजुनही कधी कधी माझ्या मनात विचार येतो त्यावेळी हार वेळेवर आला नसता तर काय झाले असते?

       लग्नाची ही अशी गडबड चाललेली असतानाच तिकडे आमचे आचारी कामत स्वयंपाकाला लागणार,त्यांनी त्यांच्या मदतीला चार सहकारी आणि दहा वाढपी सांगितले होते.पण त्या दिवशी पुण्यातील सगळ्य़ाच कार्यालयांमध्ये लग्न असल्याने त्या लोकांना गावातच काम मिळाले त्यामुळे धनकवडीपर्य़ंत त्यांचा एकही सहकारी आला नाही. कामतांनी हि बातमी माझ्या मामांना सांगितली. साडेनऊला लग्न लागल्यानंतर साडेआकरापर्यंत स्वयंपाक होणे आवश्यक होते. एक हजार लोकांचा स्वयंपाक एकटा  माणूस तीन-चार तासात करणे अवघडच नव्हे तर अशक्य होते. कामत अगदी रडवेले झाले.पण माझे मामा अतिशय धीराचे आणि कुठल्याही प्रसंगाला शांतपणे सामोरे जाणारे आहेत.ते म्हणाले
"कामत, हे कार्य आपलं आहे, ते छानच झाल पाहिजे.तुम्हाला मदतनीस हवेत ना? आम्ही सगळे आहोत ना ! तुम्हाला हवी ती मदत आम्ही करतो"
म्हटल्याप्रमाणे माझ्या मामी,मावशा,काकू,आत्या,सख्या,चुलत,मामे,आते ,मावस बहिणी,मैत्रीणी सगळ्या आपल्या सुंदर साड्य़ांमधे स्वयंपाकघरात गेल्या भाज्या चिरणे,चटण्या वाटणे अशी कामत सांगतील ती कामे त्यांनी केली.आणि साडे अकरावाजता पहिली पंगत बसली. सगळ्य़ा पंगतींत वाढण्याचे काम माझे भाऊ,काका,मामा,मैत्रीणी यांनी केले. आपली पद,प्रतिष्ठा सगळे बाजुला ठेवुन केवळ माझ्यावरील प्रेमापोटी या साऱ्यांनी एवढे काम अगदी आनंदाने,आग्रहाने केले. एवढ्या आलेल्या पाहुण्या मंडळींपैकी कुणालाही लग्नात कसली उणीव दिसली नाही.

       आजकाल लग्ने मोठ्या झोकात पार पडतात.आता लोकांजवळ पैसा आहे,हौस आहे. ती पुरवायला साधनांची उपलब्धता आहे. कापड खरेदीकरीता केवढी मोठी बाजारपेठ आहे.देशाच्या कुठल्याही गावातून खरेदी ऑनलाईन करता येते. पु.ल.देशपांड्य़ांच्या ’नारायण’ ची जागा इव्हेंट मॅनेजमेंट ने घेतली आहे.ब्युटीपार्लर,मेक-अप,फोटो यांचे आजचे खर्च ऐकून धक्का बसतो,मग हॉल, जेवण, रिसेप्शन, कपडे याबद्दल तर बोलायलाच नको. आमच्या वेळी हे नव्हते ते बरेच म्हणायचे कारण खर्च करायला आमच्याजवळ तेवढा पैसा नव्हता.पण माझ्या आईवडीलांनी जोडलेल्या माणसांची किंमत अनमोल होती. त्यामुळे आम्हा बहीणींची लग्ने सुरेख पार पाडली.त्या कार्यात श्रीमंतीचे प्रदर्शन नसेल कदाचित पण प्रेम,माया आपुलकी आणि आदरातिथ्याचे ऐश्वर्य होते. आम्हा तिघी बहिणींची सासरचे लोक देखील माणसांना धरुन असलेले असल्याने सासरी आम्हाला विशेष जड गेले नाही.

    बहिणाबाईंनी म्हटल्याप्रमाणे संसारात आधी हाताला चटके घेत घेत भाकरी मिळाली. सुख दुःखांशी सामना करत म्ह्णता म्हणता पंचविस वर्षे संपली. मुली हल्लीच्या जमान्यातल्या असल्यामुळे आई-बाबांच्या लग्नाला पंचवीस वर्षे होण्याआधीच तुम्ही काय करणार? असे विचारु लागल्या.
"आई बाबांनी दोघांना कुठेतरी ट्रीपला जाऊदे"
"नको, ते बाहेर गेले तरी भांडत बसणार,त्यापेक्षा घरीच राहूदे" असे त्या दोघींचेच विचार विनिमय सुरु होते.
आपल्या देशात पंचविस वर्षे एकत्र राहण्यात फार मोठे विशेष असे अजुन तरी नाही . त्यामुळे खास काही करावे असे मला काही वाटत नव्हते. माझ्या नवऱ्याने संसाराच्या बाबतीतले सगळे निर्णय माझ्यावर सोपवले आहेत.( त्यांना इतर कामे बरीच असतात आणि ती घर, संसाराहून नेहमीच फार महत्त्वाची असतात त्यामुळे त्यांनी काही ठरवायचा प्रश्ण् नव्हताच.)
त्या दिवशी संध्याकाळी तरी बाहेर जेवायला जाऊ असे मुलींनी सुचविले.आमच्या घराजवळ नवऱ्याचा कॉलेजमधील मित्र राहतो. त्यांच्याकडे आमचे नेहमी जाणेयेणे असते.आमच्या मुलींच्या बडबड्या स्वभावामुळे त्या दोघींचेच ते जास्त मित्र बनले आहेत. त्यांच्या पत्नीची आणि माझीही छान मैत्री आहे. चौघांनीच जेवायला जाण्यापेक्षा आमच्या या स्नेह्यांना पण घेवुन जायचे ठरले. मग संध्याकाळी आम्ही त्यांच्या घरी गेलो. धाकटी लेक तेथेच येण्याचे ठरले होते. त्या काकांना ऑफिसमधुन यायला उशीर होत असल्याने ते परस्पर हॉटेलवर  येणार असे ठरले. सात नंतर धाकट्या मुलीचा फोन आला ती घरी आवरायला गेली होती आणि तिने आम्हाला परत घरी बोलावले तिला नेण्याकरीता. या सगळ्यामधे पाऊण ते एक तास गेल्यामुळे बराच वेळ वाया गेल्याने नवऱ्याची मनातुन खूप चिडचिड झाली.

        शेवटी आम्ही घरी गेलो. सगळ्यांनी वरच जाऊ असे मोठ्या मुलीने सांगितले. तिच्या सांगण्याला विरोध करुन वाद वाढायला नकोत म्हणून आम्ही वर गेलो. बेल वाजवली.मुलीने दार उघडले आणि आत बसलेल्या पाहुण्यांना बघुन आश्चर्य आणि आनंदाने मला खरोखरीच काही सुचेचना ! मुलींनी आम्हाला नकळत आमच्या सुमारे तीसपस्तीस  नातलग आणि मित्र मंडळींना बोलावले होते. मुलींनी आपल्या कटात घराजवळ राहणाऱ्या मावशी आणि काकाला सामील करुन घेतले होते,त्या उभयातांनीही दोघींना सर्वतोपरी मदत केली.दुपारी त्यांच्याच घरी पावभाजी केली होती. मुलींच्या हौसेसाठी त्या मावशीने बराच त्रास घेतला. तिच्याच मार्गदर्शनामुळे पावभाजी फारच छान झाली होती. एरवी घरात फारसे काम न करणाऱ्या माझ्या मुलींनी पावभाजी झाल्यावर मावशीचे स्वयंपाकघर चकाचक आवरुन ठेवले होते. केक आणला होता. कागदी -प्लेट्स, चमचे,ग्लास पासून सगळ्याची जमवाजमव केलेली होती. आमचा नातलग परीवार तसेच मित्र परीवारही खरचच खूप मोठा आहे. इतक्या साऱ्यांना आमच्या अपरोक्ष कळविणे आणि त्यांच्याकरीता काही बनविणे दोघींना शक्य नव्हते. धाकटी लेक अजुन शिकतच आहे, थोरली पदव्युत्तर शिक्षणाच्या प्रयत्नात आहे म्हणजे एकूणात त्या आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी नसल्याने एखादा छोटा हॉल बुक करुन केटरर बोलावणे आदी त्यांना जमणारे नव्हते.म्हणून त्यांनी प्रातिनिधिक स्वरुपात आम्हा उभयतांचे काही लोक बोलावले. त्यात माझ्या नवऱ्याला खोखो शिकवणाऱ्या सरांना जेष्ठ् व्यक्ति म्हणून बोलावण्य़ात त्यांनी जे औचित्य दाखविले त्याचे मला खूप कौतुक वाटले. धाकटीने मोजक्या पण सुरेख शब्दात आम्हाला एक पत्र लिहिले होते त्याचे वाचन केले. सर्वांना आल्याबद्दल त्या दोघींनी हातानी थॅंक्यु कार्डस् देखील बनविली होती !

        माझ्या लग्नात ज्या आपुलकीने कार्याला शोभा आली तशाच माया आणि आपुलकीने आमचे सगे-सोयरे मुलींच्या आग्रहाला मान देवुन लग्नाच्या पंचवीसाव्या वाढदिवसाला आले. मुलींचे कौतुक केले आणि न्यून ते पुरते करुन तो कार्यक्रम सुरेख पार पडला. माझ्या मुलींना आई-बाबांच्या लग्नाचा वाढदिवस त्यांच्या लोकांना बोलावुन  साजरा करावासा वाटला याचा मला फार आनंद झाला. शेवटी सुख आणि आनंदाच्या कल्पना व्यक्तीसापेक्ष असतात. लग्नाचा रौप्य महोत्सवी वाढदिवस दोघांनीच कुठेतरी जावुन साजरा करण्यात मला तरी  कितपत आनंद वाटला असता याबद्दल शंकाच आहे. मुलींना सोडून रहायला मला जडच जाते आणि आपल्या आनंदाच्या प्रसंगात आपले जवळचे लोक आले तर तो द्विगुणित होतो असं मला वाटत. मुलींना आईचं मन समजलं, मुली मोठ्या झाल्या असं मला फार प्रकर्षाने जाणवले. जोडलेल्या माणसांची संपत्ती सर्वश्रेष्ठ हे आम्हा उभयतांच्या आईवडीलांचे संस्कार मुलींपर्यंत पोचल्याचं समाधानही खूप आहे.