Wednesday, April 22, 2009

पत्रपुराण

भाषेच्या देणगीतून माणसाला संवादाचे वरदान लाभलयं. समोरासमोर असताना न सुचणारे बरेचसे लिहायला मिळाल्यावर तर काय ? लिपीचा शोध कुणी लावला असेल? मी कधी त्या दृष्टीने विचारच केला नव्हता, असे मूलभूत शोध लावणारे असामान्य बुध्दीमत्तेचे लोकं, त्यांच्या अलौकिक प्रतीभेची आपल्याला दादही नसते. समजायला लागल्यापासून आपण शाळेत जाऊ लागतॊ आणि अक्षरे गिरवता गिरवता लिहा वाचायला लागतो.
कागदाचा शोध लागण्याआधीपासूनच पत्र लिहिण्याची प्रथा चालू आहे. रुक्मिणीने श्रीकृष्णाला लिहिलेले पत्र, किंवा दमयंतीने नळराजाला लिहिलेले पत्र हि पुराणतली प्रेमपत्रे पत्रकलेची साक्ष तर देतातच शिवाय त्याकाळतील स्त्री-शिक्षणच नव्हे तर स्त्री-स्वातंत्र्याचा पुरावा देतात.
चांगदेवांनी ज्ञानदेवांना पाठवलेले कोरे पत्र त्यानंतर त्यांनी लिहिलेली चांगदेव पासष्टी अध्यात्मातील पत्रव्यवहारावर प्रकाश टाकतात, अफजलखान येत आहे अशी सूचना देणारे रामदासस्वामींचे शिवरायांना पाठविलेले पत्र, बाळाजी आवजी चिटणिसांनी कोऱ्या कागदावर वाचून दाखविलेला खलिता, आनंदीबाईंनी केलेला ’ध चा मा’ राजकारणातील पत्रांची महती दर्शवितात.
पंडीत नेहरूंनी तुरुंगामधून ईंदिराला(ईंदिरा गांधींना) लिहिलेली पत्रे प्रसिध्द आहेत. न्या.राम केशव रानड्यांनी आपल्या पत्नीला लिहिलेली अध्यात्मिक पत्रे तर केवळ अप्रतिम. शाळकरी वयात साने गुरुजींची सुधास पत्रे वाचलेली आठवतात? कोकणाचे,तिथल्या निसर्गाचे फुलांचे वर्णन वाचताना गुरुजींच्या निसर्ग प्रेमाची,निरीक्षणाची पदोपदी कमाल वाटते.
’पत्राने’ किती तरी कवींना काव्यासाठी विषय पुरविला आहे. हिंदी सिनेसंगीतात पत्रावरच्या गाण्यांची गणती करता येणार नाही. ’ये मेरा प्रेमपत्र पढकर’ , ’खत लिख दे सावरीया के नाम बाबू’, ’फूल तुम्हे भेजा है खतमें’ , ’तेरा खत लेके सनम पांव कही रखते हैं हम’ अशी एकाहून एक गाणी आठवू लागतात.निनावी पत्रे म्हणजे एकप्रकारचे खलनायकच. ठरलेली लग्ने मोडणे, भांडणे , बेबनाव अशा अनेक गोष्टींना कारणीभूत ठरलेली हि पत्रे.ऊशीरा मिळाल्यामुळे काहींची जीवने उध्वस्त करणारी तर अजिबात न मिळाल्याने एखाद्याचे भले करणारी अशी ना ना जातीची आणि ना ना स्वभावाची पत्रे.जुन्या काळी एखाद्या दूरच्या आड गावी नोकरी-धंद्याच्या निमित्ताने राहणाऱ्या व्यक्तिला घरचे खुशालीचे पत्र केवढा दिलासा देत असेल ! दूर गावी शिक्षणासाठी राहिलेल्या मुलाला घरच्या पत्राची किती अपूर्वाई वाटत असेल.लांब गावी सासुरवास सोसणाऱ्र्या मुलीच्या आयुष्यात माहेरी बोलावणारं पत्र केवढा आनंद देत असेल! खेडेगावात एकाकी जीवन कंठणाऱ्र्या थकलेल्या म्हाताऱ्यांना मुला -नातवंडांची पत्रे म्हणजे रखरखीत उन्हात थंडगार सावली ठरत असतील.डॉ.अनिल अवचटांच्या मुलीने लिहिले होते, त्यांची आई म्हणजे डॉ.सुनंदा अवचट त्यांना दरवर्षी वाढदिवसाला पत्र लिहित असे आणि ईतर सगळ्या भेटींपेक्षा हि भेट त्या मुलींना फार आवडत असे. खरच, वाढीच्या संस्कारक्षम वयात त्यामुलींना आईने लिहिलेली पत्रे हा त्यांच्या आयुष्यातला केवढा मोलाचा ठेवा ठरतील!
हि सगळी चर्चा झाली अनौपचारिक पत्रांबद्दल.औपचारिक पत्रे आजही येतात. सरकारी कामकाजाचा डोलारा त्यांच्यांवरच उभा असतो. कुठलेही काम लेखी ऑर्डर आल्याशिवाय करायचेच नाही असा अलिखित्(?) नियम असतो, त्यामुळे खालच्या ऑफीस पासून वर आणि वरून खाली पत्रव्यवहार चालू असतात. पत्रावर कुठलीही ऍक्शन घेण्याआधी त्याचे उत्तर म्हणजे पुन्हा पत्रच लिहावे लागते.पत्रांच्या प्रती काढाव्या लागतात त्या संबधित व्यक्तींना पाठवाव्या लागतात , शिवाय त्याची स्थळ प्रत जपावी लागते.एवढे सगळे केले की मग वेळ मिळाला तर पत्रावर कृती करता येते, दरम्यान या साखळीतल्या कोणाचीही बदली झाली तर त्या पत्रांचे संदर्भच बदलू शकतात.अशा कारभारात सर्वसामान्य नागरीक भरडला जातो असे नाही तर खुद्द सरकारी कर्मचारी,मग तो कोणत्याही पदावर असो, त्यालाही या पत्रव्यवहाराचे चटके सोसावे लागतात.या बाबतीत शासकीय कारभारात सर्वधर्म समभाव दिसतो.सरकारी कर्मचारी किंवा त्याच्यावर अवलंबून असणारी त्याच्या कुटुंबातली व्यक्ती आजारी असल्यास आणि सरकारने नेमून दिलेल्या दवाखान्यात ऊपचार घेत असल्यास त्याच्या खर्चाचा काही भाग कर्मचाऱ्याला मिळतो.वरील सर्व नियमात बसणारे असूनही ही बिले मिळण्यासाठी कर्मचाऱ्याला ज्या पत्रव्यवहाराला तोंड द्यावे लागते त्यामुळे तो स्वतः पेशंट असेल तर पुन्हा आजारी पडेल आणि घरच्या कोणासाठी करत असेल तरी त्याला दुखणे येईल.त्याचे अर्ज , पत्रे एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर फिरत फिरत सगळ्या ऑफिसमधून फिरून झाल्यावर हेड ऑफिसला जातात, त्यावर बरीच टिका-टिप्पण्णी होते, बिलांना वेगवेगळ्या कात्र्या लागतात, वेगवेगळे रिपोर्टस , वैद्यकीय आधिकारी-हॉस्पीटलाचे मेडीकल शॉप यांच्या चिठ्या काहीना काही मागत राहतात, तिकडे हॉस्पीटलही शासकीय त्यांचाही तसाच कारभार,थोडक्यात काय तर एखाद्याने पत्नीच्या प्रसूतीचे बिल ऑफिसकडे सादर केले तर् ते त्याच्या मुलाच्या मुंजीपर्यंत मिळाले तरी फारच लवकर मिळाल्याचा त्याला आनंद होतो.संगणक युगातही शासकीय कारभारात हेच चालते. फक्त हि पत्रे पूर्वी हाताने किंवा टाइपरायटरवर लिहिली जात ती आता संगणकावर टाईप् होतात लेझर प्रिंटर वर प्रिंट होतात इतकाच काय तो बदल. संगणक बिघडला , त्यावर काम करणारा माणूस रजेवर गेला, प्रिंटर मोडला हि नवी कारणे दप्तर दिरंगाईला प्राप्त झालेली आहेत. आपल्या ’माझे पौष्टिक जीवन’ या लेखातून पु.लं.नी पोष्ट खाते,तिथला कर्मचारी वर्ग, पोष्टाची भाषा ,पत्रांची महती याचं फारच सुरेख चित्र उभ केलं आहे, त्यांचे ’माझे पौष्टिक जीवन’ अभिवाचन तर निखळ विनोदा मुळे निर्भेळ आनंदाचा प्रत्यय देते.
पण मी सहज विचार करायला लागले आजच्या पिढीला हा विनोद जाणवेल का? आज पत्र लेखन जवळजवळ थांबलेलेच आहे.सुशिक्षितच नव्हे तर अशिक्षित लोकही पत्र लिहून घेण्याच्या भानगडीत पडत नाहीत. फोनने सगळ्यांचेच जीवन सोपे करून टाकले आहे. मोबाईलमुळे तर विचारायलाच नकॊ , सगळॆच एकमेकांच्या रेंजमध्ये अर्थात हवे तेंव्हा, हवे त्यावेळी. मुलांना आई बाबांची गरज असेल(पैशा-बिशासाठी) तर फोन अचूक लागतोच.आणि त्यांची कटकट् नकॊ असेल तेंव्हा तो स्विच ऑफ करता येतो, बॅटरी डाऊन असते, रेंज नसते, नेटवर्क फेल असते, ट्रॅफिक(नेटचा) जॅम असतो, छप्पन कारणे असतात. आजच्या इन्स्टंटच्या जमान्यात पत्र लिहीणे,त्याला पोस्टाची तिकिटे लावणे, मग ते टाकणे इतके व्याप करायला सवड कुठे आहे त्याहीपेक्षा पत्राच्या उत्तराची वाट पहाणे हे तर फारच बोअरींग.
सध्याच्या कॉम्प्युटरच्या जमान्यात ’ई-मेल’ हि स्वस्त आणि मस्त सोय आहे. जवळपासच्या मित्रापासून सातासमुद्रापलिकडल्या संबधिंताबरोबर संपर्कात राहण्याचे एवढे सोयीचे साधन नसेल. हल्ली देवनागरीमधून, किंबहुना बहुतेक इंग्रजीतर भाषांच्या लिपींमधून लिहावयाचे शोध लागल्यामुळे तर आपल्या भाषेतूनदेखील लिहिता येऊ लागले आहे. म्हणून संगणकसारखा सखा दुसरा नाही असे वाटते. शिवाय सुवाच्च अक्षर, पाहिजे तसे बदलही भराभर करता येतात. एकच मजकूर अनेकांना पाठवायचा ( कुठल्या कार्यक्रमाचे आमंत्रण इ.) तर पुन्हा पुन्हा लिहायला नको.असे फायदेच फायदे.
मात्र हाताने पत्र लिहिणे, ते पोष्टात टाकणे, उत्तराची वाट पहाणे.पत्राचे उत्तर आल्यावर मिळणारा आनंद, आपले पत्र मिळाल्याचा त्या व्यक्तिला झालेला आनंद याची मजा वेगळीच आहे.अक्षरामधून जाणवणारी पत्र पाठवणाऱ्याची मनःस्थिती, आणि आवडत्या व्यक्तिचे पत्र त्याच्या पत्त्यावरील अक्षरातून समजताच फुटणाऱ्या आनंदाच्या उकळ्या हे सारे ’ई-मेल’ कसे देणार? इंदिरा संत म्हणतात तस,
पत्र लिही पण नको पाठवू शाई मधूनी काजळ गहिरे
लिपीरेशांच्या जाळीमधूनी नको पाठवू हसू लाजरे. - हे सगळं मेलमधून कुठून जाणवणार ?
माझ्या आजीच्या बॅगेच्या तळाशी माझ्या वडीलांनी, म्हणजे तिच्या मुलाने तिला लिहिलेली पत्रे आम्हाला सापडली होती, पत्रे वाचताना दादा बोलत आहेत, असा भास होत होता, त्या जीर्ण कागदांवरील दादांचे अक्षरातून त्यांचा चेहरा दिसत होता.
असे अनुभव ई-मेल नाही देवू शकत, पण त्याला काही ईलाज नाही. बदल होत राहणार, चुलीवरचे अन्न कितीही रुचकर लागले तरी रोजच्या जेवणासाठी गॅस,आजच्या जमान्यात मायक्रोवेव्ह वापरावा लागतोच. माणसा-माणसांना एकमेकाशी संवाद साधावा वाटतोय, हे काय कमी आहे? साधने बदलली तरी चालतील, माणसा-माणसांत नाती रहावीत, एकमेकांची सुख दुःखे वाटून घेता यावीत. ’शब्देविण संवादु’ कला साधण्यासाठी ज्ञानदेवांइतकी आपली पात्रता कुठे?
तेव्हा दहा दिशांचे तट फोडून दोन्ही ध्रुवांना जवळ आणणाऱ्या आंतरजालाच्या मदतीने संपर्कात राहून आपण आपला मित्रपरीवार विशाल करु या.


©