Friday, July 25, 2008

नाट्यछटा

मुलांना द्यायला आपल्याकडे वेळ नाही, हि आजच्या पिढीची व्यथा आहे घर,संसार आणि नोकरी अशी तारेवरची कसरत करणाऱ्या सगळ्याच कुटुंबाची हि कथा आहे.मुलांना तिसऱ्या वर्षापासून शाळेत घालतानाहि त्याचा तेवढाच वेळ बाहेर जाईल हा हेतू असतो. एकदा का मूल शाळेत जायला लागले कि अभ्यास त्याच्या मानगुटी बसतोच. वेगवेगळ्या अभ्यासाच्या आणि अभ्यासेतर स्पर्धा आणि त्या अनुशंगाने लागणारे मार्गदर्शन याच्या नावाखाली मुलाचा जास्तीत जास्त वेळ घराबाहेर जातो, उरलेल्या वेळात त्याच्याशी बॊलायला कॊणी नसेल तर त्याने सगळा वेळ टि.व्ही समोर घालवला तर त्यात त्याचा दोष कितपत आहे? मुलांना महागडी खेळणी , ब्रॅंडेड कपडे, शूज आणून असलेल्या थोडक्या वेळात त्यांचे फाजील लाड करून आपण मनाचे समाधान करत असतो, वास्तविक मुलांना तुमचा वेळ हवा असतो. इंटरनेट वर या विषयावर गोष्टी आलेल्या आहेत. एका सहा सात वर्षाच्या मुलीच्या मनाचे अंतरंग दाखविण्याचा प्रयत्न केला आहे या नाट्यछटेमधून.

मला काही सांगायचयं
बाई, बाई,बाई वैतागले बाई मी या मोठ्या माणसांना, एकाला माझ्याशी बोलयला वेळ असेल तर शपथ. आता कालचीच गोष्ट, सकाळी आईनं मला जरा रागातच उठवलं,"मैत्रू, उठं,बरं लवकर शाळेत नाही का जायचं ? आत्ता रीक्षा येईल बघं" इतक छान स्वप्न पडल होतं, म्हणून सांगते! स्वप्नात किनई मी जंगलात गेले एकटीच, काय मस्त जंगल होत ते, तिथे किनई मला एक मॊठ्ठा वाघोबा दिसला, मला म्हणतो कसा,’बैस मैत्रू मझ्य़ा पाठीवर ,आपण लांब चक्कर मारुन येऊ", मला ना अज्जिबात भिती नाही वाटली त्याची, मी बसले त्याच्या पाठीवर आम्ही निघालॊ....आणि तेव्हढ्य़ात आईनं उठवलचं. इतकं सुंदर स्वप्न कुणाला तरी सांगावं असं नाही का वाटणार?मी उठून आईजवळ गेले तिला सांगायला हि गम्मत, तर वस्सकन ओरड्ली माझ्यावर "आत्ता बड्बड नकोयं, आवरं चटचट, तोंड् धू, दूध पी, आंघोळ कर...शाळेला जयला उशीर होतोय, तुझ्यामुळे मला ऑफीसला हि उशीर होतो..." दिदिला सांगायला गेले तर ती खेकसली,"उगीच बोअर नको गं करुस, मला माझा होमवर्क करुदे" शाळेत टिचरांना सांगायला गेले तर म्हणाल्या,’Maitreyee, talk in English, don't talk in Marathi' आता तुम्ही मला सांगा वाघोबा जर माझ्याशी मराठीत बोलला तर मी त्यांना english मध्ये कसं सांगू? कुण्णाकुण्णाला वेळ नाही आमच्याशी बोलयला, आमचं ऎकायला.संध्याकाळी खेळून घरी आलं की, ग्राऊंड वरच्या गमती जमती कधी एकदा बाबांना सांगेन असं वाटतं, मी धावतच घरात शिरते, बाबा बाबा..करतच. बाबा हॉल मधेच फोन वर बोलत असतात 'hello yes, hello Ralph,how are you , I am fine thank you' मला पाहून डोळे मोठे करतात , आई मला ओढून आत नेते,’बाबा फोन वर् कामच बोलतायतं दिसत नाही? चल हातपाय धू, कपडे बदल, रामरक्षा म्हणं आणि होमवर्क कर’ रात्री जेवण झालं कि वाटत आईच्या कुशीत शिरावं, तिला दिवसभरातल्या सगळ्या गमती सांगाव्या. पण कसलं काय! आई जवळ गेले कि ती म्हणते ’मैत्रु माझी कंबर दुखतीय गं’ मी म्हणते ’आई तुला मी मूव्ह लावून देऊ? टि.व्ही. तली आई कशी मुव्ह लावल कि लग्गेच बरी होते, तू पण तशीच बरी होशील.’ ’काही नकोय ते मूव्ह आणि टुव्ह, सारखा टि.व्ही. बघयचा... आणि आईच जे लेक्चर सुरू.. माझे तर डॊळेच मिटतात.
तुम्ही म्हणाल ’आजीला सांगाव्या गमती, अहॊ काय करणार माझ्य़ा बाबांची आई मी लहान होते तेव्हाच देवाघरी गेली. आईच्या आई कडे सोड्तात बाबा मला कधी त्यांना कामाला जायचं असेल कि. दारात पाऊल टाकताच आजी जवळ घेऊन म्हणते ’सुकलं ग माझं बाळ. फार रागावते का ग शुभी तुला? थांब आता आली कि बोलतेच तिला. माझ्या आवडीचा खाऊ खाता खाता आमच्या गप्पा सुरु होतायत तोवर आजीची शेजारची मैत्रीण येते.आजी मला म्हणते,’तू खा हं खाऊ, अजून हवा तर घे त्या डब्यातला, एवढा ज्ञानेश्वरीचा अध्याय यांना वाचून दाखवते, मग बोलू हं आपण’ त्यांच वाचन पुर व्हायच्या आत बाबा हजर ! ’चला मैत्रूबाई , खूप झाल्या आजीशी गप्पा, घरी जायला ऊशीर् नको’ कि चालली आमची वरात घरी.
अहो कुणालाच वेळ नाही माझ्याशी बोलायला कित्ती कित्ती गमती असतात ,कित्ती कित्ती प्रश्ण विचारायचे असतात ’चिमणीला घरटं बांधायला कॊण शिकवतं? मनीमाऊ बाळ कुठल्या हॉस्पिटल मधून आणते? अंड्यातून पिल्लू बाहेर कसं येत? एक ना दॊन हजार प्रश्ण असतात पण कुणालाच सवड नाही. मी परवा खूप चिडले आईवर, म्हणाले,’तुला वेळ नाही , तर आणलस कशाला मला हॉस्पिटल मधून? मी जाते होस्टेलवर रहायला.’ मग मात्र तिच्या डोळ्यात पाणीच आलं मला जवळ घेऊन म्हणाली,’खरं आहे गं तुझं म्हणणं, आता तुझ्या शाळेला सुट्टी लागली ना कि मी पण रजा घेईन मग आपण खूप खूप गप्पा मारु ,मज्जा करु ’
 पण  मी आता ठरवलयं, मोठी झाले कि टि.व्हीत दाखवतात तसं कोर्टात काम करायचं कसलं म्हणून काय विचरताय, ’ऑर्डर! ऑर्डर ! करणाऱ्या माणसासारखी होणार आहे मी, सगळ्या आई बाबांना कोर्टात बोलावणार आणि संगणार ऑर्डर! ऑर्डर ! रोज दोन तास मुलांशी बोललं पाहिजे, त्यांच्याबरोबर खेळलं पाहिजे, नाही तर सगळ्यांना मोठ्ठी शिक्षा. ऑर्डर! ऑर्डर !


©

Thursday, July 17, 2008

चाळीशी: एक चिंतन

वर्तमानपत्रातील सुट्टीची पुरवणी वाचायला घेतली, त्यात ’चाळीशीच्या स्त्रियांसाठी मार्गदर्शनपर लेख’, तो वाचून बाजुला ठेवतीयं तोच ’स्त्रियांमधील चाळीशीनंतरच्या मानसिक स्थित्यंतरावरील’ खास अंकाचे साप्ताहिक नजरेस पडले. मुलीला घेऊन दवाखान्यात गेले तर तिथेही अशाच प्रकरच्या लेखांची मासिके,पाक्षिके.कावीळ झालेल्या माणसाला जग पिवळे दिसते तसे चाळीशीची चहूल लागताच मल जिकडे तिकडे या लेखांनी भंडावल. वास्तविक हे लिहिताना वय दडविण्य़ाची स्त्रीसुलभ खोड देखील बाजुला ठेवावी लागतीयं पण हे सारे लेख वाचून,रेडीयो,टि.व्ही. वरील चर्चा ऎकून मला तर अगदी वेडावून गेल्यासारखं झालयं.खरचं, सॄष्टीची उलथापालथ व्हावी, तशी आपल्या तनामनात उलथापालथ होतीयं आणि आपल्याला त्याचा पत्ताही लागू नये? मी सहज लेकीला म्हणायला गेले,"हे बघ, मला माझ्या चिडचिडी मागचं कारण मला समजलयं, ते किनई वयामुळे होण्याऱ्या ...." माझे वाक्य मध्येच तोडीत ती फाडकन् म्हणाली," काहीतरी फेकू नकोस हं, तू चिडकीच आहेस पहिल्यापासून , उलट आम्ही मोठ्या झाल्यामुळे हल्ली तुझी चिडचिड कमी झालीयं"माझ्या आजुबाजुच्या शेजारणी,ऑफीसमधल्या मैत्रिणी कुणाचच वागणं बदलल्याचं मला जाणवत नव्हतं.ऑफीसमधल्या जेवणाच्या सुट्टीतले गप्पांचे विषय म्हणजे मुलांचे अभ्यास,त्यांच्ये खाण्यापिण्याचे नखरे,पाकक्रीया, सासरच्य़ा निंदा, नवऱ्य़ाच्या तक्ररी ई. नेहमीचेच यशस्वी. कामवाल्या बायकांपासून ऑफीसमधल्या स्त्री बॉस पर्यंतच्या कोणत्याही बाईमध्ये चाळीशीत गेल्यावर फार मोठी मानसिक स्थित्यंतर जणवली नाहीत(स्वतः एक स्त्री असूनसुध्दा!) त्या सगळ्या लेखांचे सार होते, या वयात स्त्रियांना फार एकटेपणा वाटतो, तिच्याकडे पतिचे,मुलांचे लक्ष नसते.मुले मोठी झाल्यामुळे त्यांना आईची गरज वाटत नाही.वय वाढल्य़ामुळे नवऱ्य़ाची बायकोबद्द्ची आस्था, आकर्षण कमी होते ई.ई.
    माझ्या मते हल्लीच्या मुलांना स्वतःचे काम स्वतः करायची सवय नाही, त्यांना वेळही अजिबात नाही.त्यांच्या शाळा,क्लासेस,खेळ अशा नानाविध व्यापांमधून त्यांना स्वतःची स्वतः अंघोळ आणि जेवण यालाच जेमतेम वेळ मिळतो, बाकी सगळ्या तैनातींना आई इतकी तत्पर व्यक्ति कोण् असणार? नोकरी करणाऱ्या,न करणाऱ्या कुठल्याही बाईला मुलांची सगळी कामे करावीच लागतात.त्यात मुलांना विविध क्लासेसना सोड्ण्या,आणण्यापासून त्यांचे अभ्यास करून घेण्यापर्यंत सगळ्यासाठी मुलांना आईच हवी असते.बाईच्या चाळीशीपर्यंत तिच्या संसाराला किमान एक तप उलटलेले असते.सुरुवातीच्या नव्यानवलाईच्या काळात बायकॊशी वाद,भांडणं झाली तरी पुरुषाला त्याच्या आईच्या भक्कम पाठींब्यामुळे जेवणखाणाची ददात नसते,आता लग्नाला इतकी वर्षं झाल्याने त्याची आईही थकलेली असते, शिवाय मुलांची शिक्षणे,त्यांचे नवनवे प्रश्णं, उभयपक्षातील आईवडिलांची आजारपण या सगळ्यांसाठी सतत एकमेकांच्या आधाराची गरज असते. बायकोकडे दुर्लक्षाचा संबंधच येत नाही त्यामुळे.
  
    वयानुरुप शारीरिक,मानसिक बदल आत्ताच जाणवतात असे नाही.तिसरी,चौथीत असताना ’सोळावं वरीस धोक्यचं गं’ हे गाणं मी ठेक्यात म्हणत असताना आई रागावली होती,’असली गाणी घरात नाही म्हणायची!’ असे तिने डोळे वटारुन सांगितले. या गाण्यात ’असलं’ काय आहे हे विचारायचं धाडसही झालं नाही. ते समजायचं ते वयही नव्हतं.पुढे यथावकाश ते धोक्याच वय आलं आणि गेलं पण आभ्यास,परीक्षा,प्रॅक्टिकल्स,सब्मिशन्सच्या धबड्ग्य़ात त्यातले धोके कळलेच नाहीत. झोपाळ्यावाचून झुलायचे,फुलायचे दिवस कवितांमधुन वाचत होते. शब्दांच्या पलिकडल्या भाषांचे,परीकथेतील राजकुमारांचे स्वनाळू सहित्य वाचताना आवडत नव्हते अस कसं म्हणू? पण हे सारं पुस्तकी वाङमय पुस्तकांपुरतेच , सिनेमा,नाटकांसारखेच नकली असचं वाटायचं, कारण व्यवहारी जग फार वेगळं होतं,तिथे यातलं काहीच दिसतं नव्हतं.कारण प्रेम करायच तर पतंगासारख "जगी सांगतात प्रित पतंगाची खरी झडप घेऊन देतो प्राण दिपकचे वरी” किंवा गोविंदग्रजाचे "क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणांचा मग पुढे " हे मनावर इतकं ठसलेलं होतं की प्रेमं करायचं तर मरायचीच तयारी ठेवावी लागते असच काहिसं मनानं घेतलं  आणि जगायची अमर्याद हौस असल्यामुळे तो आपुला मार्गच नव्हे असं सरळ गणित मी सोड्वून टाकलं माझ्य़ापुरतं.थोडक्यात काय, धोक्याच्या वयातले धॊके दिसले नाहित, निसरडे रस्ते जाणवले नाहीत. तेंव्हा पुढे होते कॉलेज, तो भरपूर आभ्यास,परीक्षा आणि रिझल्टस्. करियर वगैरे शब्द न शिकता पदव्युत्तर शिक्षण सहज जमत गेलं आणि मिळालेली नोकरी गरज म्हणूनच स्विकरली.
    पुढे यथावकाश लग्नं झालं,नंतरची वर्षं घर, संसार, नोकरी यामध्ये कशी गेली ते कळलचं नाही. म्हणजे काळ त्याच्याच गतीने जात असतॊ ,आपल्याला त्याची गती कमी जास्त जाणवते.मुलांच्या लहानपणांत त्यांची दुखणी काढताना,दिवस संपता संपत नव्हते आणि कधीकाळी आपण, मुले व नवरा सगळ्यांना एकावेळी मिळालेल्या सुट्टीच्या कपिलाष्ठीच्या योगावर कुठे गावाबिवाला गेलो तर दिवस भुर्रकन् उडत होते.या सगळ्या रगाड्यात मुले मोठी होत होती,सासु सासरे थकत होते,आई वडिलांची दुखणी सुरु झाली होती.पण आपली एनर्जी कमी होवुन् चालत नसल्याने इंजिनाच्या गतीत किंचित फरक झाला तरी चालू होतेच.
  

    अशातच चाळीशीचा उंबरठा कधी आला ते समजलेच नाही. या लेखांमधली लक्षणे कळायला तेवढं रिकामपणं आजही नाही आणि मी म्हणजे तरी कोण? एक सामान्य मध्यमवर्गाची प्रतिनिधी.कनिष्ठ किंवा गरीब वर्गामधील बायकांना मुक्ती,स्वातंत्र्य तर नसतेच,पैसे तर मिळ्वावे लागतात.त्या बिचऱ्यांना दिवसभर कष्ट,आर्थिक विवंचना,पोरांची उसाभार अन् रात्री दरुड्या नवऱ्याची मारहाण सहन करताना शारीरिक व्याधींकडे लक्ष द्यायला फुरसत नसते तर मानसिक त्रासाची काय कथा? राहिता राहिला ऊच्च वर्ग त्यातल्या फार रिकामपण असलेल्या महिलांचे सुख दुखत् असते त्यांना जणवत असतील हि मानसिक आंदोलने. कुठल्याहि गोष्टींचे उद्दातिकरण करण्याची फॅशनच झालीयं हल्ली. आता असं बघा, स्त्रीने पुरुषाच्य खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात काम करायला लागुनही बरीच वर्षे लोटली.पुरुषांच्या बाबतीत चाळीशी हि ’चावट चाळीशी’ ठरते, तर स्त्रियांनीच चाळीशी हि तारुण्य संपल्याची चाहूल मानायचं करणच काय? आणि शेवटी तारुण्याचं नातं शरीराशी कि मनाशी हे ज्याच त्यानीच ठरवायचं आहे.उगीचचं पुस्तकामधल्या लेखांनी धडधडून घ्यायचं कारण नाही.थोडा फार त्रास झालाच तर तो दूर करायला आहेच की अत्याधुनिक वैद्यकशास्त्र आणि अद्ययावत उपाययोजना.

©

Monday, July 14, 2008

विसंबणे :

माझ्या धाकट्या मुलीला धडा शिकवित होते. एका पक्षिणीची गोष्ट होती ती.एका शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावर या पक्षिणीचे घरटे होते.शेतातील पिकांचे नुकसान करणाऱ्या पक्षिणीचे घरटे ताबडतोब पाडून टाका, असा हुकूम शेतकऱ्याने त्याच्या नोकरांना दिला.पक्षिण त्यावेळी दाणे गोळा करयल गेली होती हा संवाद तिच्या पिल्लांनी ऎकला. पिल्ले बिचारी हवाल्दिल झाली. आई येताच त्यांनी सारी हकिगत तिला सांगितली आणि विचारले,"आई, आता काय करायचे? कुठे जायचे गं?" पक्षिण शांत होती. ती म्हणाली,"काही काळजी करु नका बाळांनो. स्वस्थ झोपा, काही होणार नाही आपल्या घराला." असेच काही दिवस गेले. पिले मोठी होत होती,पक्षिण शेतातील पिकांवर ताव मारीत होती. एक दिवस पुन्हा शेतकरी आला, झाडावरील घरटे बघून तो संतापला म्हणाला," फार झाले ! उद्या मीच काठीने हे घरटे काढून टाकतो." पिल्लांनी पुन्हा आईला झाल्या प्रकाराचा वृतांत सांगितला. पक्षिण म्हणाली,"चला बाळांनो, आता निघायलाच हवं. " पिल्ले म्हणाली ,"आई,या पूर्वी किती वेळा आम्ही आसच सांगत होतो, तेव्हा तू शांत रहिलीस मग आताच ही घाई क?" त्यावर पक्षिण म्हणाली,"जोपर्यंत शेतकरी दुसर्याला आपले घरटे पाडायला सांगत होता,तोपर्यंत काळजी नव्हती.आता तो पर्यंत स्वतःच येईन म्हणालयं, म्हणजे तो येणारच, तेव्हा आता आपली सोय दुसरीकडे बघायलाच हवी" थोड्क्यात लोकांवर आवलंबून राहिल्यास काम होणे नाही. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतात तशासारखेच काहिसे. रामदास स्वामी म्हणतात,"जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला" पण हल्लीच्या या धकाधकीच्या जगात सगळी कामे स्वतः करायची म्हणजे अवघडच. अवलंबून राहण्याला पर्यायच नसतो मुळी.सकाळ झाल्यापासून पेपरवाला, दूधवाला, मुलांना शाळेत सोडणारा रीक्षावाला,कामवाली बाई अशी सुरुवात होते.नुसती माणसेच नव्हे तर नळ, गॅस,वीज,फोन यावरही आपले जीवन एवढे अवलंबून आहे कि आपले पूर्वज या सगळ्याविना कसे जगले असा प्रश्न पडावा! मोबाईल फॊनने तर ह्या साऱ्यांवर कडी केलेली आहे.आजकाल सर्व थरांतील अबालवृध्दांना या बेट्याने आपला गुलाम करुन ठेवले आहे. सकाळी त्याच्यामधे गजर लाव. कामासाठीची reminders ठेव.कुठेही जाण्याआधी रिंग दे. पोचल्यावर मिस कॉल. sms पाठव. खरेदी केल्यावर त्याच्याच (calculator) कॅल्सी वर हिशेब कर. गाणी ऎका, फोटॊ काढा. विसंबण्याची परमावधी म्हणजे मोबाईल. शिवाय आजच्या युगात स्वतः कामे करण्यापेक्षा काम करुन घेणाराच श्रेष्ठ ठरत आहे.विसंबून राहणार श्रेष्ठ ठरत आहे.आज कालची वाढती मॅनेज्मेंट्ची कॉलेजेस काय दर्शवितात? उत्तम मॅनेजर कोण जो जस्तीत जास्त लोकांकडून कामे करुन घेतॊ तो.शिक्षण संपताच मॅनेजर म्हणून नॊकरी मिळ्वायची, आणि सर्वात जास्त पगार घ्यावयाचा. मग स्वतः काम करुन वर जाण्याचा प्रश्न येतोच कुठे? आजच्या काळात रामदास स्वामी असते तर त्यांना श्लोक बदलावा लागला असता. पावसावर विसंबून रहायला नको म्हणून माणसाने धरणे बांधली. एकूणच निसर्गावर विसंबून रहायला नको, म्हणून माणसाने सतत धडपड केली, त्यालाच आपण म्हणतो, वैज्ञानिक प्रगती.पण तो देव हि असा आहे कि माणसाने कितीही शोध लावले तरी काही बाबतीत त्याला हतबल ठरवतो. जन्म देणे ह्या गो्ष्टीवर मानवाने जय मिळवला तरी मृत्युपुढे त्याला हातच टेकावे लागत आहेत. म्हणूनच कित्येक दुर्धर समजल्या जाणऱ्या व्यांधींवर आखंड संशोशन होऊनही डॉक्टर म्हणतात ,"We treat but He cures !" आणि नको असलेले जन्म नाकरता येतात , मात्र हवे असूनही मूल होत नसेल तेव्हा वैद्यकीय उपचारांबरोबर त्यालाच नवस बोलवे लागतात.
मूल लहान असताना आईवर अवलंबून असते.ते कधी एकदा सुटे होईल असे म्हणतानाहि त्याचे विसंबणे तिला खुप सुख देत असते, म्हणूनच मुले मोठी झाल्यावरचे रिकामपण खायला उठ्ते. त्या त्रिभुवन जननीची आपण सगळी लेकरे आहोत.तिने काही गोष्टी मुद्दामच तिच्या हातात ठेवल्या असतील, ज्या मुळे आपण तिच्यावर विसंबून राहू. आणि तिच्या समीप राहू असेच असेल नाही का?


©

Thursday, July 10, 2008

शुभारंभ

नमस्कार मराठी ब्लॉग पाहुन वाचून माझेही हात शिवशिवू लागले. आपणही पांढऱ्यावर काळे केलेले येथे टाकावे. (विं.दां.ची क्षमा मागुन ’लिहिणाऱ्याने लिहित जावे वाचणाऱ्याने वाचित जावे वाचत वाचता एक दिवस लिहिणाऱ्याचे हात घ्यावेत')

पंधरा सोळा वर्षांपूर्वीची गोष्ट.पुण्यात शाळांची संख्या मर्यादित होती. आजच्या सारख्य़ा international schools चे पेव फुटले नव्हते.त्यामुळे English Medium शाळांची चलती होती. अशा शाळेत ज्य़ूनियर के.जी.त प्रवेश मिळविणे कठीण होते.(पुण्यातील नामांकित मराठी माध्यमांच्या शाळांमध्येही प्रवेश मिळविणे मुश्कील होते.) माझ्या मुलीला शाळेत प्रवेश घेताना आलेल्या अनुभवाचे हे कथन.


पाठशाळा प्रवेश समास
बहुत शाळांसी स्वये जावे काहिंचे फॉर्म आणावे
आन्यांच्या चौकशीस जावे लेकुरांसाठी
सायंकाळी शाळेसी जावे रांगा लवोनी उभे रहावे
रात्र रात्र तिष्ठावे             फॉर्मसाठी
आलस्य अवघा दवडावा यत्न उदंड करावा
धनसंचय वढवावा             डोनेशनार्थ
नाना विषय वाचावे          बहुत पालकांसी भेटावे
बालमानस आभ्यासावे       मुलाखती कारणे
ऑफीस विषय विसरावा नाट्य विषय टाळावा
अखंड ध्यास धरावा         प्रवेशाचा
मुलाखतीसी स्वये जावे      नेमके उत्तर बोलवे
उलट उत्तर टाळावे            वरीष्ठांसी
इतुके करीतही                      झालसी नापास
न होई हताश                       यत्न करी
कित्येक करती टिंगली       कित्येक करती टवाळी
बडबडती बाष्कळी               न मिळता प्रवेश
जिल्हा परिषद गाठावी         नगरपरिषद धुंडावी
पादत्राणे झिजवावि                सर्वकाळ
ओळ्ख वशीले पाद्यपूजन       खेळावे राजकारण
अन्य नसावे व्यवधान            प्रवेशाविना
पदवी,नोकरी अथवा लग्न      याहुनीही अनंत विघ्न
प्रवेश मिळणे कर्मकठीण          बालमंदिरी
इतिश्री उदासबोधे गुरुशिष्य संवादे पाठशाळा प्रवेश समाप्त