Thursday, April 25, 2019

गीत रामायणाचे गारुड

अगदी लहान असतानाच रामायण,महाभारतील गोष्टी आईकडून ऐकलेल्या होत्या,पुढे शाळेत गेल्यावर रामायण,महाभारतातल्या कथा ,त्यांवरील पुस्तके वाचत गेले. एका बंडखोर वयात त्यातल्या अनेक घटनांबद्दल वाद घातले, त्यातल्या घटनांच्या शक्यतांबद्दल शंका घेतल्या. रामाने वनवासात जाताना सीतेला बरोबर घेतले तसे लक्ष्मणाने उर्मिलेला का नेले नाही? मग उर्मिला बरोबर गेली असती तर पुढे कसे वेगळे घडले असते? रामाने सीतेच्याअग्निदिव्यानंतर ही सामान्य लोकांच्या बोलण्यावरून गर्भवती सीतेला पूर्वकल्पना न देता का त्यागली? अशा ना ना प्रश्णांवरुनआई,वडीलांशी वाद घातले.मैत्रिणींबरोबर चर्चा केल्या. शाळेत नववी,दहावीत असताना महाभारतातील कर्णाने वेड लावले होते.मॄत्युंजय,राधेय,कौंतेय अशा मराठीतल्या अनेक नामवंत लेखकांची पुस्तके वाचुन कर्णाच्या थोरवीने मन भारुन गेले,मात्र नंतरच्या वयात बाळशास्त्री हरदास,इरावती कर्वे यांची पुस्तके वाचल्यानंतर कर्णाबद्दलचे अतिरेकी प्रेम आपोआप कमी झाले.महाभारताकडे बघण्याची दृष्टी बाळशास्री हरदासांच्या महाभारतावरील व्याख्याने आणि इरावती कर्वेंच्या ’युगांत’मुळे खुप बदलली.

मी दहावीत असताना ’महाकवी माडगुळकर’ या विषयावरील एका आंतरशालेय स्पर्धेत भाग घेतला होता.त्यावेळी गदिमांच्या अनेक कविता वाचल्या आणि घरातले ’गीतरामायण’ पुस्तक वाचायला घेतले. त्यापूर्वी अनेकदा गीतरामायणातील गाणी रेडिओवर ऐकली होती,सुधीर फडक्याचे गीतरामायणाचे कार्यक्रम न्यू इंग्लिशस्कुल , रमणबाग शाळा ,रेणुकास्वरुप शाळा असे विविध ठिकाणी होत, ते ही ऐकले होते. गीतरामायणातील गाणी न ऐकलेला माणुस मराठी माणुसच नाही. पण पुस्तक वाचायला घेतल्यावर गदिमांची महती जाणवायला लागली

                  सिताकांत लाड नावाच्या IAS अधिकाऱ्याची ’पुणे आकाशवाणी’ मध्ये नेमणुक झाली आणि पुणे केंद्राचे वेगळेपण सिध्द् करण्याकरीता त्यांनी मैत्रीच्या आधिकारात गदिमांना वर्षभर सातत्याने करता येईल असा कार्यक्रम करण्याची विनंती केली आणि रामायाणातील प्रसंगावर गीते सादर करण्यास गदिमा तयार झाले, आणि सुधीर फडक्यांनी त्यांना स्वरबध्द केले ,अशी गीतरामायणाची जन्मकथा मी दादांकडून ऐकली होती. म्हणजे गीतरामायणाला निमित्त झाले एक सरकारी आदेशाचे, पण त्यातुन किती असामान्य कलाकृती जन्माला आली !
       
             लवकुश हे रामपुत्र वाल्मिकींच्या आश्रमातुन रामचंद्राच्या अश्वमेध यज्ञात येतात आणि दरबारात प्रत्यक्ष रामचंद्राना रामकथा काव्यांतुन सांगत आहेत अशी गीतरामायाणाची संकल्पना आहे. रामायणाची संपूर्ण कथा ,एक एक प्रसंग अतिशय सुंदर शब्दात विविध व्यक्तींच्या तोंडुन उलगडत जाते. गदिमांचे निर्गुण काव्य सुंदर कि बाबुजींनी दिलेल्या  चाली देऊन त्याला दिलेले  सगुण रुप जास्त सुरेख असा प्रश्न पडतो , त्याचे शिवाजीराव भोसल्यांनी फार छान उत्तर दिलेलं मला आठवत, ते म्हणाले होते ’सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ’ . खरोखरीच गीतरामायण हिअशी विलक्षण रचना  आहे.
             मी  असंख्य वेळा सुधीर फडक्यांच्या आवाजात ’गीत रामायण’ ऐकले आहे,त्यांचे निवेदनही फार रसाळ असे. मला शास्त्रीय संगितातले विशेष समजत नाही, त्यामुळे कुठल्या गाण्याला कुठला राग वापरला वगैरे मला कळत नसले तरी गीताच्या भावाप्रमाणे त्यांना ज्या चाली लावल्या आहेत त्या किती  समर्पक आहेत ते माझ्यासारख्या सामान्य व्यक्तिला सहज समजतं.
     
         रामायणाची सुरुवात निवेदकाच्या गीताने होते, या गीताबद्दलची आख्यायिका पण खुप जणांकडून ऐकली आहे. गीतरामायणाच्या प्रसारणाची भरपूर जाहिरात आकाशवाणीने केली होती, त्या काळी प्रसारण हे live असे. पहिल्या गीताची प्रत गदिमांनी बबुजींना दिली होती असे त्यांचे म्हणणे होते आणि त्यांना ती दिलेलीच नाही असा बाबुजींचा दावा होता, थोडक्यात ज्या गीताचे प्रसारण व्हायचे त्या गीताची प्रत गहाळ झालेली होती , गदिमा आणि सुधीरजी दोघेही आपापसात भांडू लागले ,सहकारी वर्ग कावराबावरा होऊन बसला,या दोन्ही दिगज्जांच्या भांडणात पडण्याची कोणाचीच हिम्मत नव्हती, अशा वेळी लाड साहेब आले आणि त्यांना झाला प्रकार समजला.त्यांनी शांतपणे जाऊन गदिमांना बाजुला घेतले व एका खोलीत नेऊन म्हणाले," गीत सापडत नाही हि वस्तुस्थिती आपण कोणीच बदलु शकत नाही,पण तुम्ही दोषारोपात वेळ का घालवताय , तुम्ही सिध्दहस्त आहात मी या खोलीचे दार लावुन घेतो,कुणीही तुम्हाला त्रास द्यायला येणार नाही , तुम्ही परत गीत लिहा " आणि गदिमांनी अगदी थोड्या वेळात ’कुश लव रामायण गाती ’ हे निवेदकाच्या तोंडचे पहिले गीत लिहून काढले, बाबुजींनी त्याला तात्काळ चाल लावली व ठरलेल्या वेळी ठरल्यानुसार गीताचे प्रसारण झाले. हि कथाच मला अद्भुत वाटते ! दोन्ही कलावंतांच्या दिव्य प्रतिभेची कल्पना केवळ या पहिल्या गीतातुनच दिसायला लागते.  श्रीरामांच्या दरबारात जाऊन रामायणाचे कथन करणाऱ्या कुश आणि लव या दोन बटुंचे ,त्यांच्या गायन शैलीचे ते ऐकताना परीणाम झालेल्या श्रोत्यांचे इतके प्र्त्ययकारी वर्णन या गीतातुन केलय , त्यातुनच पुढील गीते ऐकण्याची उत्कंठा वाढत जाते.
बटुंचे वर्णन करताना महाकवी म्हणतात
पुत्र सांगती चरित पित्याचे
ज्योतीने तेजाची आरती
ऐकताना समजले नव्हते पण वाचताना जाणवले कि काय ताकद आहे शब्दात ! प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट , सारखी अलंकारीक भाषा ते सहज वापरतात.

  आयोध्या नगरीचे वर्णन देखील इतके सुंदर आहे, डोळ्यासमोर ती भव्य नगरी तेथिल रस्ते दिसु लागतात,,पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्या नगरीतील लोक असे धर्मपरायण ,स्त्रिया पतिव्रता,पुत्र कुलदीपक आणि कमाल म्हणजे  ’अतृप्तीचा वावर नव्हता नगरी,घरी अंतरी’,म्हणजेच नगरातील केवळ प्रत्येक घरात समॄध्दी्च होती असे नाही तर प्र्त्येकाच्या अंतःकरण तृप्त होते.(कदाचित तॄप्त अंतःकरणामुळे घरी आणि नगरीत तृप्ती होती) दशरथ राजाचे वर्णन सुध्दा असेच अप्रतिम आहे , ’सदनी चंद्रसा, भुवनी इंद्रसा,सूर्य जसा संगरी’,घरात चंद्रासारखा शीतल,प्रेमळ दशरथ राजा,राज्यात इंद्रासारखा तर रणांगणावर सूर्यासारखा प्रखर पराक्रमी होता.  प्रत्येक गीताचे वर्णन करायला लागले तर शब्द कमी पडतील. ’पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा’ हे गीत तर गीतरामायणातील सर्वोत्कृष्ट कलाकृती आहे असं मला वाटतं. मानवी जीवनाची क्षणभंगुरता, मरणाची अनिवार्यता आणि उन्नतीचा अंत हे चरचरीत सत्य अतिशय सोप्या शब्दात श्रीरामांच्या तोडून माडगुळकर सांगुन जातात.
आदर्श पुत्र,आदर्श शिष्य,आदर्श बंधु, प्रेमळ पती अशी श्रीरामांची सगळी रुपे गीतरामायणात दिसतातच ,पण काव्यात निसर्गप्रेमी, सीतेवर नितांत प्रेम करणारे ,तत्वज्ञानी,धर्मज्ञानी अशी पण रामाची रुपे दिसतात.लक्ष्मणाला पर्णकुटी कुठे बांधावी हे सांगताना निसर्ग प्रेमी राम म्हणतात ,
          पलाश फुलले,बिल्व वांकले
           भल्लातक फलभारे लवले
          दिसती न यांना मानव शिवले
          ना सैल लतांची कुठे मिठी
           या इथे लक्ष्मणा बांध कुटी
सुमंताला निरोप देताना श्रीराम म्हणातात
         राजधर्म तू आठव आई
         अभिषिक्ताते गुण वय नाही
          दे भरतासी मान प्रत्यही
           पढव सुमंता विनयाने हे सांगुन माझे नाव
  मारीचाचा वध करुन परत येताना  आश्रमात सीता नाही हे बघुन दुःखित राम म्हणतात
        पहा लक्ष्मणा दिसती डोळे
         प्रियेचेच ते  विशाल  भोळे
        मॄगशावक हे तिचे कोवळे
        का त्याच्याही नीर लोचनी ? 
  वाली वध केल्यावर त्याचे समर्थन करताना श्रीराम म्हणतात
            नृपति खेळती वनि मॄगयेते
            लपुनि मारिती तीर पशूते
            दोष कासया त्या क्रीडेते ?
             शाखामृग तूं पशूहुन,
             मी धर्माचे केले पालन
             वाली वध ना खलनिर्दालन
   सुग्रीवाने अविचाराने केलेल्या धाडासाबद्दल त्याची कानाउघाडणी करताना प्रभु रामचंद्र म्हणातात,
         काय सांगु तुज,शत्रुदमना
         नॄपऒळखती रणीं भावना
          नंतर विक्रम,आधि योजना
         अविचारें जय कुणा लाभले?
     
  गीतरामायणावर आजवर अनेक थोर लेखक,कवींनी भरपूर लिहुन ठेवलयं. माझ्या मनावर माझ्या कळत्या वयात गीतरामायण वाचल्यावर जी मोहिनी पडली ती , ते असंख्य वेळा ऐकुनही  कमी झालेली नाही. दरवेळेस ऐकताना काही उपमा,काही शब्द ,काही प्रतिमा नव्यानेच जाणवत राहतात. गीतरामायण प्रथम प्रसारित झाले त्याला आज चौसष्ठ वर्षे उलटुन गेली तरी त्यातली गोडी जराही कमी होत नाही यातुनच त्याची महती दिसते. अनेक भाषांमधुन त्याचे भाषांतरही झालेले आहे. रेडीओ,कॅसेट्स, सीडी पासून आताच्या नवतंत्रज्ञामुळे यु-ट्युब, सारेगम कारवा,मोबाईल ऍप पर्यंत गीतरामायण ऐकता येत आहे. राम चरीत्राची गोडी जशी अमर आहे तसेच गीतरामायणाची आवडी पण अजरामर राहील. गीत रामायणासारख्या अद्वितीय कलाकृती बद्दल बोलताना सुधीर फडके म्हणाले होते, "गीत रामायण माडगुळकरांनी लिहिले नाही आणि मी संगीतबध्द केले नाही ते आमच्याकडून करवुन घेतलेले आहे " गदिमा म्हणतच ना ’ज्ञानीयाचा , तुकोबाचा तोच माझा वंश आहे,माझिया मधेही थोडा इश्वराचा अंश आहे". माझ्या मातॄभाषेला अशी अजोड अलंकार देणाऱ्या या ईश्वरी कलावंताना शतशः वंदन !