Friday, May 10, 2019

माझे टेकडी प्रेम

     सहकारनगर मध्ये आम्ही रहायला गेलो तेंव्हा मी तिसरीत होते.हे घर गावापासून खूप दूर वाटायचं, फारशी वस्ती नव्हतीच तेथे. घरातुन दूरवर टेकडी दिसे. दादा टेकडीवर घेऊन जायचे,तळजाई टेकडीवर वनविभागातर्फे तर कधी उत्साही पुणेकरांच्या तर्फे वृक्षारोपणे होत ,  तळजाई परीसरातल्या टेकड्या उघड्या बोडक्याच होत्या. आम्ही उत्साहात टेकडीवर जायचो तिथे एक जुना ठुबे बंगला होता ,तो भूतबंगला म्हणून ओळखला जायचा ,दिवसा त्या बंगल्यात हिंडून, तळजाई देवीचे दर्शन घेऊन परत यायचो. पुढे,पुढे मैत्रीणींबरोबर मैदानावर खेळण्यात वेळ जायला लागला तसे टेकडीवर जाणे कमी झाले. दहावीनंतर अभ्यास वाढायला लागला, नंतर दादांच्या अकस्मिक निधनानंतर अभ्यासाबरोबर घरातल्या जबाबदाऱ्या वाढल्या आणि घराजवळ टेकडी असल्याचाही विसर पडला.

लग्नानंतर तर संसार,नोकरी या चक्रात दिवस कसे जात समजत नव्हते, व्यायाम करायला पाहिजे असे सतत वाटायचे पण वेळ काढायला जमत नसे.बस मधुन,रीक्षातुन कधी गाडीतून जाताना टेकडी खुणावत असे पण जाणे शक्य नसल्यामुळे तोंड दुसरीकडे फिरवले जाई.अपराधी भावनेने मन भरुन जाई. बराच काळ निघुन गेला होता,टेकड्यांवर लावलेली झाडे मोठी झाली होती.पावसाळ्यात टेकडी हिरवीगार दिसे.उन्हाळ्यात देखील पानगळ झालेल्या झाडांतुन फुललेले बहावा,गुलमोहर सुरेख दिसत.

  मुली थोड्या मोठ्या झाल्यावर सुट्टीच्या दिवशी त्यांना घेऊन आम्ही टेकडीवर जायचो.कधी धारवाडहुन भाच्या आल्या कि त्यांना घेऊन भेळेचे सामान,पाणी ,सरबत असा सगळा जामानिमा घेऊन संध्याकाळी टेकडीवर जायचे. हिंडुन झाल्यावर सावली बघुन बसायचे,सुसाट वाऱ्याला तोंड देत ,वर्तमानपत्रे पसरायची त्यावर दगड ठेवायचे ,भेळ बनवायची आणि खायची, त्या भेळेची चव काही औरच ! त्या दिवशी टेकडी पण माझ्यासारखीच खुश असल्याचे जाणवे.

         माझी मोठी बहिण तळजाई टेकडीच्या पायथ्याला राहते.माझ्यापेक्षा अनेक अघाड्या लढवुनही ती रोज टेकडीवर जायची.तिच्याजवळ मी मला जायला न जमण्याबद्दल कुरकुर करताच ती म्हणाली," दररोज नाही तुला जमत,पण रविवारी सुट्टी असते ना, तू पहाटे साडेपाचला माझ्याकडे ये, तुझ्या मुली झोपलेल्याच असतात, आपण टेकडीवर जाऊ आणि सात वाजता मुली उठायच्या आत तू घरी जाशील " मग तिच्याघरी जायला लागले .तिच्याकडून पर्वतीच्या मागील बाजुने चढून,वाघजाई वरुन तळजाईला जायचे व तेथुन उतरुन दोघी आपापल्या घरी जायचे असा परिपाठ सुरु केला.माझा भाचा त्यावेळी इंजिनियरींगला होता.त्या वयातल्या मुलांचा सुट्टीचा दिवस सकाळी नऊच्या आत सुरुच होत नसतो. त्याला एकदा माझी बहिण म्हणाली,"बघ आम्ही बहिणी सुट्टीच्या दिवशी सुध्दा पहाटे उठून टेकडीवर फिरायला जातो,व्यायाम चुकवत नाही " त्यावर तो पठ्ठ्या म्हणाला ," अरे वा ,आई केवढा व्यायाम , जिभेला " .खरच आम्ही बहीणी गप्पा मारतच हिंडायचो,रस्ता कधी संपला समजायचेच नाही. आमचा उपक्रम पाच सहा महिने टिकला असेल.  पावसाळा सुरु झाला आणि टेकडीवरुन वाहणाऱ्या  पाण्याबरोबर आमचे फिरणे वाहुन गेले !

  पुढे माझ्या नवऱ्याने टेकडीवर जायचे ठरवले आणि मी त्याच्याबरोबर जाऊ लागले, त्यांच्या वेगाशी स्पर्धा करत चालताना माझी दमछाक होई. बरोबर चालायचे तर् चालताना मी बोलते म्हणून भरभर चालता येत नाही या त्यांच्या वक्तव्याने तोंड बंद करुन चालावे लागे आणि दमायचे नसेल तर् एकटीने चालायचे तरी तोंड बंदच मग मला चालण्यात मजा नाही यायची. आपण खूप चालतोय, दमून जातोय असं वाटत राही.शिवाय गप्प बसुन चालताना घरी पोचल्यावर काय काय कामे आहेत याचे विचार थैमान घालत आणि मग आपण घरातली एवढी कामे टाकुन भटकतोय या विचाराने मन बेचैन होई व टेकडीवर फिरायचा आनंद कमी कमी होई.

मुली मोठ्या झाल्या आणि आम्ही सेनापती बापट रोडवर रहायला आलो. वेताळ टेकडी घरापासुन जवळच आहे.रोज संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर घरी जाऊन चहा पिऊन टेकडीवर जायला सुरुवात केली. टेकडीवर गेले कि शहराशी संबंधच संपल्यासारखे वाटते.सगळे ऋतु वेगळेपणाने जाणवतात. रोजच्या सूर्यास्ताच्या वेळेतील बदल टेकडीवर ठळकपणे जाणवायचा. थंडीत दिवस लहान असल्याने अंधार लवकर पडायचा. घरुन निघायला जरासा उशीर झाला तरी टेकडीवर पोचेपर्यंत काळोख होऊन जाई. हळुहळू टेकडीवर जाण्याची सवय झाली,तिथली झाडे,पक्षी यांची ओढ वाटु लागली. न बोलता आजुबाजुला बघत निसर्गाचा आस्वाद घ्यायची सवय लागली.थोडक्यात टेकडीवर फिरणे आवडायला लागले.

      वेताळ टेकडीवर झाडी आहेच आता तेथे बरेच मोर आहेत, ससे दिसतात. पहिल्यांदा मोर बघितला तेंव्हा झालेला आनंद आणि आज मोर बघताना होणारा आनंद यात थोडाही फरक नाही. कधी झाडांवर बसलेले असतात, कधी खांबावर बसतात,कधी जमिनिवरुन चालताना दिसतात तर क्वचित आपल्यासमोर उडून ही जातात. उन्हाळ्यात झाडांचे खराटे झाल्यामुळे मोर पटकन दिसतो, शिवाय तो त्यांचा विणीचा मोसम असल्यामुळे मोराचा पिसारा झगमगत असतो, त्याच्या कंठाला निलकंठ हेच नाव शोभतं .

पावसाळ्यात टेकडी हिरवीगार असते. हिरव्या रंगाच्या अनेक छटा पानांमध्ये दिसतात.वेताळटेकडीवर प्रामुख्याने ग्लॅरिसिडीया नावाची विलायती झाडे आहेत.पावसाळा संपला कि लगेच हि झाडे वाळुन जातात ,नुसत्या काड्या राहतात पण  एका लहानशा पावसानंतर खराट्यासारखी दिसणारी हि झाडे पोपटी पानांनी मढुन जातात. पाऊस पडायला लागला कि टेकडीवर जागोजागी लाल वेलवेटसारखे दिसणारे मृगाचे किडे फिरु लागतात, माती मऊशार हिरवळीने झाकुन जाते . ज्ञानदेवांच्या ’मातीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव ’ या उक्तिचा प्र्त्यय ती मऊ हिरवळ देते. सगळी मोठ्मोठी झाडे देखील सुस्नात झालेली असतात अतिशय तृप्त वाटातात. पण जसजसा पाऊस वाढायला लागतो तसे टेकडीवर जाणे  अवघड होते .पावसाळ्यात खूप पाऊस असेल त्या आठवड्यात टेकडीवर जाणे झाले तरी वर हिंडणे कठीण होते, चिखलातुन फार काळजीने चालावे लागते,खड्ड्यांमधे पाणी साचुन डबकी झालेली असतात आणि बऱ्याच ठिकाणी  काळ्या मातीत पाय रुततात,दगडांवरही शेवाळ्याने पाय घसरायची भिती वाटते. अशा  गर्द हिरव्या झाडीत मोर दिसणे अवघड असते, क्वचित त्यांचे ओले पिसारे वाळवायला ते झाडांच्या टोकावर् बसलेले दिसतात पण ते ओले पिसारे तेवढे छान दिसत नाहीत शिवाय झाडांच्या रंगात ते लपुन जातात. अगदी धो धो पावसाचे दिवस सोडले तर बाकीचे दिवस टेकडीवर जाणे होतेच. पावसाच्या दिवसांत, घरात बसून टेकडीवरचे धबधबे बघण्यात समाधान मानावे लागते.

पाऊस संपुन थंडी सुरु होते, टेकडी आता गर्द हिरवी झालेली असते.तिच्यावरचे गवत कमरे एवढे वाढते,त्यातुन चालताना क्वचित सापकिरडुचं भय वाटतं. दिवस हळूहळू लहान होऊ लागतो, पहाटे धुक्याची शाल पांघरलेली टेकडी गूढरम्य दिसु लागते. पूर्वेकडून सूर्याची किरणे ती धुक्याची शाल हळुहळू दूर करू लागतात. पायथ्याला थंडी वाजते म्हणुन घातलेला स्वेटर,मफलर वर येईपर्यंत नकोसा वाटायला लागतो. नवरात्राच्या सुमारास झेंडुसारख्या गर्द केशरी फुलांची झाडे सगळ्य़ा टेकडीवर  वाढतात, केशरी फुलांच्या ताटव्यांनी नटलेली टेकडी फारच सुरेख दिसते. मात्र या थंडीत  मोरांची पिसे गळू लागतात( हे ज्ञान देखील टेकडीवर नियमित जायला लागल्यावर झाले. ) हे  पिसे गळलेले मोर,तिरुपतीहुन मुंडन् करुन आलेल्या दाक्षिणात्य  स्त्रियांसारखे दिसू लागतात. आम्हाला खुपदा थंडीच्या दिवसात दोन तीन लांडोरी आणि त्यांची दहाबारा पिले ओळीने गवतातुन जाताना दिसतात. मोराची पिल्ले बदकाच्या पिलांसारखीच ,तेवढीच फारसे रंगरुप नसलेली पण केवळ लहान वयामुळे गोंडस वाटणारी ! नवरात्रातल्या हस्ताच्या पावसापर्य़ंत गवत,झाडे हिरवी असतात,  आक्टोबर हिट मध्ये टेकडीवरील गवत पिवळे होऊ लागते,आठवडाभरात सगळे गवत वाळुन जाते, थंडी वाढायला लागली कि झाडांची पाने ही रंग बदलू लागतात. पानगळ सुरु होते.

     कधी कधी टेकडीवरचे गवत संध्याकाळच्या वेळी पेट घेते,हा वणवा नसून, ही आग मुद्दाम लावली जाते असे मला वाटते. रात्री खिडकीतून ही आग पाहिली की माझे मन तिथल्या पक्षांच्या,सशांच्या काळजीने कासाविस होते.अंधारात कुठे जातील बिचारी ? मलाही रात्रीच्या अंधारात टेकडीवर जाऊन आग विझवणे शक्य नसते . सकाळी टेकडीवर जळलेल्या गवताचा वास भरुन राहिलेला असतो.  संक्रांतीनंतर दिवस मोठा होत जातो, उन वाढु लागते,  वसंतात झाडांना पालवी फुटू लागते,कडुलिंब हिरवेगार होतात.

      ऋतुंमधले हे सगळे बदल टेकडीवर जाणवतात. निसर्गाचं चक्र जवळुन बघायला मिळतं.हल्ली तर टेकडीवर जाण्यामागे व्यायाम वगैरे विचार केंव्हाच मागे पडलेत. मोर बघायच्या वेडापायी वेगवेगळ्या आडवाटा शोधल्या आहेत आम्ही. काही वाटा तुलनेने अवघड आहेत त्यावरुन जाताना,कुठून आलो इकडे, आता परत नाही यायचं या रस्त्याने असं मनात येतं तोच रत्नजडीत पिसाऱ्याचा तोल सावरत एखादा मोर  आपल्याच मस्तीत डौलात समोरुन जाताना दिसतो ,डोळ्याचे पारणे फिटते . अवघड वाट तितकी कठीण वाटत नाही. परवा एकदा अशाच आडवाटेने आम्ही उतरत होतो, टेकडीच्या एका उतारावरील बेचकीत दोन तीन लांडोरी दिसल्या, आणि जरा पुढे आलो तर काय , मोराने आपला पिसारा फुलवलेला होता ! त्याचे प्रियाराधन चालले होते . जरा वेळाने त्या फुलवलेल्या पिसाऱ्याचे दर्शन आम्हालाही घडले, आम्ही मोराच्या मागे,लांडोरीकडे तोंड करुन होतो. त्या अनुभवाचे शब्दात वर्णन करणे अशक्य. त्या पिसाऱ्यावर लक्ष लक्ष पाचु जडवलेत असे वाटत होते,त्या हिरव्यागार पिसाऱ्यावर त्याचा लखलखित निळा गळा असा काही चमकत होता कि बस्स ! निसर्गाच्या अद्भुत कलाकॄतीकडे बघताना भान हरपुन गेले ! एकदा असाच दोन मोर आणि अनेक लांडोरीचा घोळका चालला होता आणि अचानक एका मोराने आकाशात झेप घेतली आणि लांबवर उडत गेला. मोराचा पिसारा बराच मोठा असल्याने  जास्त लांबवर उडायला त्याला अवघड जात असेल अशी माझी समजुत त्यादिवशीच्या मोराच्या भरारीने चूक ठरवली. एखाद दिवशी एकही मोर दिसला नाही अशी रुखरुख वाटत असतानाच टेकडीच्या पायथ्याकडे येताना अचानक डावीकडच्या झाडीत अगदी हाताच्या अंतरावर एखादा मोर आमचीच वाट बघत उभा असतो ! कधी अगदी पायथ्याच्या  झाडावर एखादा मोर आपला लांबलचक पिसारा सोडून ऐटीत बसलेला दिसतो.

व्यायामाचे असंख्य फायदे आपल्या सगळ्यांनाच माहित आहेत. चालणे,पळणे,जिम, योगा ,पोहणे असे असंख्य प्रकार लोक करत असतात.   टेकडीवर गेल्याने माझा व्यायाम किती होतो ते माहित नाही, त्या चालण्याने व्यायाम होतो का ? असाही प्रश्ण काही तज्ञांना पडू शकेल ,कारण माझ्या शरीरयष्टीत गेले अनेक वर्ष टेकडी चढून फारसा फरक पडलेला नाही.  मात्र माझे संसारातले ताप टेकडीवर गेले की मला संपल्यासारखे वाटतात. माझ्या ऑफिसमधील कामाचे ताण,तेथील राजकारण  यांचा तिकडे मला पूर्णतः विसर पडतो ! भूतकाळातील कटू आठवणी टेकडीवर फिरकत नाहीत कि भविष्यातील संध्याछाया तेथे भिती घालायला येत नाहीत .टेकडीवरची झाडे,ती माती, वेगवेगळ्या पक्षांचा किलबिलाट आणि त्या सगळ्यांवर कडी करणारे मोरांचे दर्शन मला दररोज नवा अनुभव देते,  ताजेतवाने करते. माझ्या वजनदार व्यक्तिमत्त्वाचं रहस्य ही त्यातच दडलेलं असाव कारण संस्कृत मध्ये श्लोक आहे ना
      सर्पा: पिम्बन्ति पवनं न च दुर्बलाः ते
      शुष्कै: तृणै: वनगजाः बलिनो भवन्ति
      कन्दै:फलैः मुनिवराः क्षपयन्ति कालम्
      संतोष एव पुरुषस्य परम् निधानं
म्हणजे साप वारा पिऊन जगतात पण ते दुर्बल नसतात,जंगलात वाळलेले गवत खाऊनही हत्ती धष्ट्पुष्ट असतात, कंदमुळे खाणारे मुनिवर दिर्घायु असतात ,संतोष हेच माणसाच्या निरोगी पणाचे कारण आहे.

      निसर्गाच्या एक तासाच्या सहवासात मला एवढा आनंद मिळतो तर त्याच्याच सानिध्यात कायम राहणाऱ्या आपल्या पूर्वजांचे किंवा ॠषीमुनींचे आयुष्य समाधानी असेल तर त्यात काय नवल !

Thursday, April 25, 2019

गीत रामायणाचे गारुड

अगदी लहान असतानाच रामायण,महाभारतील गोष्टी आईकडून ऐकलेल्या होत्या,पुढे शाळेत गेल्यावर रामायण,महाभारतातल्या कथा ,त्यांवरील पुस्तके वाचत गेले. एका बंडखोर वयात त्यातल्या अनेक घटनांबद्दल वाद घातले, त्यातल्या घटनांच्या शक्यतांबद्दल शंका घेतल्या. रामाने वनवासात जाताना सीतेला बरोबर घेतले तसे लक्ष्मणाने उर्मिलेला का नेले नाही? मग उर्मिला बरोबर गेली असती तर पुढे कसे वेगळे घडले असते? रामाने सीतेच्याअग्निदिव्यानंतर ही सामान्य लोकांच्या बोलण्यावरून गर्भवती सीतेला पूर्वकल्पना न देता का त्यागली? अशा ना ना प्रश्णांवरुनआई,वडीलांशी वाद घातले.मैत्रिणींबरोबर चर्चा केल्या. शाळेत नववी,दहावीत असताना महाभारतातील कर्णाने वेड लावले होते.मॄत्युंजय,राधेय,कौंतेय अशा मराठीतल्या अनेक नामवंत लेखकांची पुस्तके वाचुन कर्णाच्या थोरवीने मन भारुन गेले,मात्र नंतरच्या वयात बाळशास्त्री हरदास,इरावती कर्वे यांची पुस्तके वाचल्यानंतर कर्णाबद्दलचे अतिरेकी प्रेम आपोआप कमी झाले.महाभारताकडे बघण्याची दृष्टी बाळशास्री हरदासांच्या महाभारतावरील व्याख्याने आणि इरावती कर्वेंच्या ’युगांत’मुळे खुप बदलली.

मी दहावीत असताना ’महाकवी माडगुळकर’ या विषयावरील एका आंतरशालेय स्पर्धेत भाग घेतला होता.त्यावेळी गदिमांच्या अनेक कविता वाचल्या आणि घरातले ’गीतरामायण’ पुस्तक वाचायला घेतले. त्यापूर्वी अनेकदा गीतरामायणातील गाणी रेडिओवर ऐकली होती,सुधीर फडक्याचे गीतरामायणाचे कार्यक्रम न्यू इंग्लिशस्कुल , रमणबाग शाळा ,रेणुकास्वरुप शाळा असे विविध ठिकाणी होत, ते ही ऐकले होते. गीतरामायणातील गाणी न ऐकलेला माणुस मराठी माणुसच नाही. पण पुस्तक वाचायला घेतल्यावर गदिमांची महती जाणवायला लागली

                  सिताकांत लाड नावाच्या IAS अधिकाऱ्याची ’पुणे आकाशवाणी’ मध्ये नेमणुक झाली आणि पुणे केंद्राचे वेगळेपण सिध्द् करण्याकरीता त्यांनी मैत्रीच्या आधिकारात गदिमांना वर्षभर सातत्याने करता येईल असा कार्यक्रम करण्याची विनंती केली आणि रामायाणातील प्रसंगावर गीते सादर करण्यास गदिमा तयार झाले, आणि सुधीर फडक्यांनी त्यांना स्वरबध्द केले ,अशी गीतरामायणाची जन्मकथा मी दादांकडून ऐकली होती. म्हणजे गीतरामायणाला निमित्त झाले एक सरकारी आदेशाचे, पण त्यातुन किती असामान्य कलाकृती जन्माला आली !
       
             लवकुश हे रामपुत्र वाल्मिकींच्या आश्रमातुन रामचंद्राच्या अश्वमेध यज्ञात येतात आणि दरबारात प्रत्यक्ष रामचंद्राना रामकथा काव्यांतुन सांगत आहेत अशी गीतरामायाणाची संकल्पना आहे. रामायणाची संपूर्ण कथा ,एक एक प्रसंग अतिशय सुंदर शब्दात विविध व्यक्तींच्या तोंडुन उलगडत जाते. गदिमांचे निर्गुण काव्य सुंदर कि बाबुजींनी दिलेल्या  चाली देऊन त्याला दिलेले  सगुण रुप जास्त सुरेख असा प्रश्न पडतो , त्याचे शिवाजीराव भोसल्यांनी फार छान उत्तर दिलेलं मला आठवत, ते म्हणाले होते ’सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ’ . खरोखरीच गीतरामायण हिअशी विलक्षण रचना  आहे.
             मी  असंख्य वेळा सुधीर फडक्यांच्या आवाजात ’गीत रामायण’ ऐकले आहे,त्यांचे निवेदनही फार रसाळ असे. मला शास्त्रीय संगितातले विशेष समजत नाही, त्यामुळे कुठल्या गाण्याला कुठला राग वापरला वगैरे मला कळत नसले तरी गीताच्या भावाप्रमाणे त्यांना ज्या चाली लावल्या आहेत त्या किती  समर्पक आहेत ते माझ्यासारख्या सामान्य व्यक्तिला सहज समजतं.
     
         रामायणाची सुरुवात निवेदकाच्या गीताने होते, या गीताबद्दलची आख्यायिका पण खुप जणांकडून ऐकली आहे. गीतरामायणाच्या प्रसारणाची भरपूर जाहिरात आकाशवाणीने केली होती, त्या काळी प्रसारण हे live असे. पहिल्या गीताची प्रत गदिमांनी बबुजींना दिली होती असे त्यांचे म्हणणे होते आणि त्यांना ती दिलेलीच नाही असा बाबुजींचा दावा होता, थोडक्यात ज्या गीताचे प्रसारण व्हायचे त्या गीताची प्रत गहाळ झालेली होती , गदिमा आणि सुधीरजी दोघेही आपापसात भांडू लागले ,सहकारी वर्ग कावराबावरा होऊन बसला,या दोन्ही दिगज्जांच्या भांडणात पडण्याची कोणाचीच हिम्मत नव्हती, अशा वेळी लाड साहेब आले आणि त्यांना झाला प्रकार समजला.त्यांनी शांतपणे जाऊन गदिमांना बाजुला घेतले व एका खोलीत नेऊन म्हणाले," गीत सापडत नाही हि वस्तुस्थिती आपण कोणीच बदलु शकत नाही,पण तुम्ही दोषारोपात वेळ का घालवताय , तुम्ही सिध्दहस्त आहात मी या खोलीचे दार लावुन घेतो,कुणीही तुम्हाला त्रास द्यायला येणार नाही , तुम्ही परत गीत लिहा " आणि गदिमांनी अगदी थोड्या वेळात ’कुश लव रामायण गाती ’ हे निवेदकाच्या तोंडचे पहिले गीत लिहून काढले, बाबुजींनी त्याला तात्काळ चाल लावली व ठरलेल्या वेळी ठरल्यानुसार गीताचे प्रसारण झाले. हि कथाच मला अद्भुत वाटते ! दोन्ही कलावंतांच्या दिव्य प्रतिभेची कल्पना केवळ या पहिल्या गीतातुनच दिसायला लागते.  श्रीरामांच्या दरबारात जाऊन रामायणाचे कथन करणाऱ्या कुश आणि लव या दोन बटुंचे ,त्यांच्या गायन शैलीचे ते ऐकताना परीणाम झालेल्या श्रोत्यांचे इतके प्र्त्ययकारी वर्णन या गीतातुन केलय , त्यातुनच पुढील गीते ऐकण्याची उत्कंठा वाढत जाते.
बटुंचे वर्णन करताना महाकवी म्हणतात
पुत्र सांगती चरित पित्याचे
ज्योतीने तेजाची आरती
ऐकताना समजले नव्हते पण वाचताना जाणवले कि काय ताकद आहे शब्दात ! प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट , सारखी अलंकारीक भाषा ते सहज वापरतात.

  आयोध्या नगरीचे वर्णन देखील इतके सुंदर आहे, डोळ्यासमोर ती भव्य नगरी तेथिल रस्ते दिसु लागतात,,पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्या नगरीतील लोक असे धर्मपरायण ,स्त्रिया पतिव्रता,पुत्र कुलदीपक आणि कमाल म्हणजे  ’अतृप्तीचा वावर नव्हता नगरी,घरी अंतरी’,म्हणजेच नगरातील केवळ प्रत्येक घरात समॄध्दी्च होती असे नाही तर प्र्त्येकाच्या अंतःकरण तृप्त होते.(कदाचित तॄप्त अंतःकरणामुळे घरी आणि नगरीत तृप्ती होती) दशरथ राजाचे वर्णन सुध्दा असेच अप्रतिम आहे , ’सदनी चंद्रसा, भुवनी इंद्रसा,सूर्य जसा संगरी’,घरात चंद्रासारखा शीतल,प्रेमळ दशरथ राजा,राज्यात इंद्रासारखा तर रणांगणावर सूर्यासारखा प्रखर पराक्रमी होता.  प्रत्येक गीताचे वर्णन करायला लागले तर शब्द कमी पडतील. ’पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा’ हे गीत तर गीतरामायणातील सर्वोत्कृष्ट कलाकृती आहे असं मला वाटतं. मानवी जीवनाची क्षणभंगुरता, मरणाची अनिवार्यता आणि उन्नतीचा अंत हे चरचरीत सत्य अतिशय सोप्या शब्दात श्रीरामांच्या तोडून माडगुळकर सांगुन जातात.
आदर्श पुत्र,आदर्श शिष्य,आदर्श बंधु, प्रेमळ पती अशी श्रीरामांची सगळी रुपे गीतरामायणात दिसतातच ,पण काव्यात निसर्गप्रेमी, सीतेवर नितांत प्रेम करणारे ,तत्वज्ञानी,धर्मज्ञानी अशी पण रामाची रुपे दिसतात.लक्ष्मणाला पर्णकुटी कुठे बांधावी हे सांगताना निसर्ग प्रेमी राम म्हणतात ,
          पलाश फुलले,बिल्व वांकले
           भल्लातक फलभारे लवले
          दिसती न यांना मानव शिवले
          ना सैल लतांची कुठे मिठी
           या इथे लक्ष्मणा बांध कुटी
सुमंताला निरोप देताना श्रीराम म्हणातात
         राजधर्म तू आठव आई
         अभिषिक्ताते गुण वय नाही
          दे भरतासी मान प्रत्यही
           पढव सुमंता विनयाने हे सांगुन माझे नाव
  मारीचाचा वध करुन परत येताना  आश्रमात सीता नाही हे बघुन दुःखित राम म्हणतात
        पहा लक्ष्मणा दिसती डोळे
         प्रियेचेच ते  विशाल  भोळे
        मॄगशावक हे तिचे कोवळे
        का त्याच्याही नीर लोचनी ? 
  वाली वध केल्यावर त्याचे समर्थन करताना श्रीराम म्हणतात
            नृपति खेळती वनि मॄगयेते
            लपुनि मारिती तीर पशूते
            दोष कासया त्या क्रीडेते ?
             शाखामृग तूं पशूहुन,
             मी धर्माचे केले पालन
             वाली वध ना खलनिर्दालन
   सुग्रीवाने अविचाराने केलेल्या धाडासाबद्दल त्याची कानाउघाडणी करताना प्रभु रामचंद्र म्हणातात,
         काय सांगु तुज,शत्रुदमना
         नॄपऒळखती रणीं भावना
          नंतर विक्रम,आधि योजना
         अविचारें जय कुणा लाभले?
     
  गीतरामायणावर आजवर अनेक थोर लेखक,कवींनी भरपूर लिहुन ठेवलयं. माझ्या मनावर माझ्या कळत्या वयात गीतरामायण वाचल्यावर जी मोहिनी पडली ती , ते असंख्य वेळा ऐकुनही  कमी झालेली नाही. दरवेळेस ऐकताना काही उपमा,काही शब्द ,काही प्रतिमा नव्यानेच जाणवत राहतात. गीतरामायण प्रथम प्रसारित झाले त्याला आज चौसष्ठ वर्षे उलटुन गेली तरी त्यातली गोडी जराही कमी होत नाही यातुनच त्याची महती दिसते. अनेक भाषांमधुन त्याचे भाषांतरही झालेले आहे. रेडीओ,कॅसेट्स, सीडी पासून आताच्या नवतंत्रज्ञामुळे यु-ट्युब, सारेगम कारवा,मोबाईल ऍप पर्यंत गीतरामायण ऐकता येत आहे. राम चरीत्राची गोडी जशी अमर आहे तसेच गीतरामायणाची आवडी पण अजरामर राहील. गीत रामायणासारख्या अद्वितीय कलाकृती बद्दल बोलताना सुधीर फडके म्हणाले होते, "गीत रामायण माडगुळकरांनी लिहिले नाही आणि मी संगीतबध्द केले नाही ते आमच्याकडून करवुन घेतलेले आहे " गदिमा म्हणतच ना ’ज्ञानीयाचा , तुकोबाचा तोच माझा वंश आहे,माझिया मधेही थोडा इश्वराचा अंश आहे". माझ्या मातॄभाषेला अशी अजोड अलंकार देणाऱ्या या ईश्वरी कलावंताना शतशः वंदन !


Friday, January 25, 2019

नक्राश्रु

WhatsApp वर पोस्टस् चा पाऊस पडत असतो, त्याच त्याच पोस्टस् इकडून तिकडे फिरत असतात. सणावारांची जाणीव WhatsApp मुळे प्रकर्षाने होऊ लागलीय. संकष्टी चतुर्थी असली कि गणपतीचे फोटो आलेच. महाशिवरात्रीला महादेव तर एकादशीला पांडुरंग. त्या निमित्ताने देवादिकांची ओळख राहते. इकडे सर्वधर्म समभावही असतो. ईद म्हणू नका, नानक जयंती म्हणू नका, ख्रिसमस  म्हणू नका ,महावीर जयंती, बुध्द पौर्णिमा आणि हिंदुंच्या सणंची तर गणतीच नको सगळ्या सणांना शुभेच्छांचा मारा. पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी हे खास देशप्रेम उतु घालवायचे राष्ट्रीय सण त्या दिवसांना ही असेच देशभक्तीचे पूर. या खेरीज ’बायको’ हा विनोदाला पुरुन आठांगुळे उरणारा विषय.  त्या ’बायको ’ बद्दल सर्व भाषांमधुन ,सर्व ग्रुप्स वर फिरणारे तेच तेच विनोद ही असतातच. कुठलेही विनोद,  विचार पु.ल.देशपांड्यांच्या नावावर खपवून त्याच्या खिरापती हि असतात.  विडीओ आणि ऑडीओज ही भरपूर फिरत असतात.
      त्या शिवाय काही चांगल्या दर्जाचे लेख ही वाचायला मिळतात. त्यात स्मरणरंजनंच जास्त असते. आपले वय झाल्यावर तरुण वयातल्या आठवणी चांगल्या वाटायच्याच. पण त्यात देखील जुन्या काळातील गरीबीचे गोडवे गाताना आणि गरीबीचे माणुसकी,जिव्हाळा याच्याशी नाते जोडलेले पाहिले कि मी विचारात पडते. आमच्या पिढीतले सत्तर ते ऎंशी टक्के लोक आर्थिक चणचणीच्या अनुभवातुन गेले असतील. मी देखील ती सोसलीयं पण आज जर मला पुन्हा ते दिवस आले तर चालतील का? असं विचारलं तर माझं उत्तर हो असेल असं वाटत नाही. जर ते दिवसच चांगले होते तर मी त्यातुन बहेर पडायची धडपड कशाला केली असती? अगदी हालाखी नसली तरी कनिष्ठ मध्यमवर्गातच आम्ही मोडत होतो. वडील वारल्यावर तर तो दर्जा अजुनही खाली गेला होता.  कित्येक चांगल्या संधी केवळ परिस्थिती नाही या कारणामुळे सोडाव्या लागल्या होत्या. लहान जागा, अभ्यास करायला घरकामामुळे मिळालेला कमी वेळ,  वडीलांच्या आजारपणात पैशाअभावी त्यांना न मिळा्लेली वैद्यकीय मदत ,  साधारण कपडयांमुळे उच्च स्तरातल्या मुलींमध्ये वावरताना जाणवणारा न्युनगंड  , घरात पाहुण्यांची सतत वर्दळ त्यामुळे आता साध्या साध्या वाटणाऱ्या आणि त्या वयात अप्रुप असलेल्या कितीतरी चैनींवर सोडावे लागलेले पाणी अशी किती उदाहरणे ! . माझ्या बाबतीत जे घडलयं तेच माझ्या परिस्थितीतील बहुतेकांच्या वाट्याला आलं असणारं ,मग त्या सगळ्याचा विस्मरण होऊन फक्त त्याकाळच्या जिव्हाळ्याचेच कशाला गोडवे गायचे?
कुणाकडेही न सांगता गेल तरी प्रेमान स्वागत होई, जेवायला मिळे. गोष्ट खरी आहे. आमच्या घरी असे अगांतुक पाहुणे नेहमीच येत आणि माझी आई खरोखरीच प्रेमाने त्यांना जेवायला घाली. पण त्या कष्टांमुळे ,तिला मन मारुन कराव्या लागणाऱ्या अनेक गोष्टींमुळॆ पुढे तिच्या तब्येतीवर परीणाम झाला . तेंव्हा मात्र त्या पाहुण्यांपैकी कोणीही तिच्या चौकशीला आले नाही.मग ती माया त्या लोकांमधुन कुठे गेली?का ती फक्त या स्मरणरंजनाच्या लेखांतच राहिली? आणि जुन्या काळात आम्हाला प्रेम मिळालं ,माणुसकी दिसली ती आम्हाला मागच्या पिढीकडुन आम्हाला मिळत होती.आणि आता ती दिसत नसेल तर त्याला जबाबदार ही आमची पिढीच नाही का? आम्हीच आमच्या करियर मुळे असेल,आमच्या आई वडीलांच्या कचखाऊ(तथाकथित प्रेमळ,मायाळु) स्वभावाचा गैरफायदा घेतलेल्या लोकांच्या रागापोटी असेल ,पाश्चात्य संस्कृतीच्या ओळखीमुळे असेल कुठल्याही कारणाने लोकांना दूर ठेवले . आमची मुले ,पुढची पिढी असल्यामुळे आणखीनच तुटक झाली तर त्यात दोष कुणाचा ?

   आमच्या पडत्या काळात आमच्याशी ममत्वाने वागलेले (अगदी तो जुना काळ असतानाही) फार थोडे लोक होते. बाकी ठिकाणी शुक्रवारच्या कहाणीचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतलेला आहे.आज सुस्थितीतल्या मला माझे अनेक नातलग आवर्जुन बोलावतात,ज्यांनी त्या दिवसांत फारशी वास्तपुस्त केलेली नव्हती.मग कुठला काळ चांगला होता ?
टि.व्ही,फोन आता मोबाईल्स या अत्याधुनिक साधनांनाही  दोष देण्यात फारसा अर्थ नाही. माणसे होती तशीच आहेत ,त्या काळातही पोटात माया असलेली होती तशीच अगदी सख्या भावाचे तोंडही न पाहणारी होतीच.  अपपर भावाच्या कक्षा त्याकाळी थोड्या रुंद असल्यामुळे आपलेपणा थोडा जास्त असेल इतकचं. उगीच त्या काळातील मायेच्या ओलाव्यानी आज डोळे गाळायचे काही कारण नाही.

       आम्हाला मोबाईल्स,कॉम्प्युटर्स सारखी साधने नव्हती म्हणून आम्ही मैदानावर खेळत होतो, आमच्यापैकी फार थोड्यांच्या पालकांनी आपल्या मुलांना मैदानावर जावे म्हणून प्रयत्न केले असतील. एक मान्यच करावे लागेल कि आमच्यावर शाळेचे संस्कार खूप खोल झाले.आमच्या शिक्षकांनी आमच्यावर अपार प्रेम केले,चांगल्या सवयी लावल्या,संस्कार केले. पण आमच्यापैकी फार थोड्यांनी शिक्षकाचा पेशा आवडीने स्विकारला यात आम्हाला त्या पेक्षा इतर  संधी मिळाल्या ज्या आम्हाला शिक्षकांहुन चांगल्या वाटल्या. सबब शिक्षण क्षेत्रात चांगल्या व्यक्तिंच्या अभावामुळे परिस्थिती  बिघडली असावी.
     
       आजच्या virtual reality च्या जगात पालकत्व हि फार मोठी कसोटी आहे. आजची आव्हाने वेगळी आहेत.आपल्या मुलांना , त्यांच्या मुलांचे योग्य संगोपन करण्याकरीता फार कष्ट घ्यावे लागणार आहेत.  याचा विचार करावा लागेल. त्यांना आपली मदत नाही झाली तरी उगीच भूतकाळातील मायेच्या आठवणींनी गळे काढुन आणि आताच्या तंत्रज्ञानाला नावे ठेवत त्याचाच वापर करुन पोस्ट टाकायचे टाळणे तरी आपल्या हातात आहे , खरे कि नाही ?