Friday, December 7, 2012

सुडोकु

चाळीशीनंतर घडणाऱ्या शारीरिक बदलांबद्द्ल आणि त्यावरील उपायांबाबतही सतत कानी पडत असते. शारीरिक फिटनेस साठी चालणे,जॉगिंग पासून जिम योगा,ट्रेकिंग याबद्द्ल लोक किती जागरुक झालेत हे सकाळ, संध्याकाळच्या टेकड्या, जॉगिंग ट्रॅक्स वरील गर्दी आणि जिमच्या वाढत्या संख्येवरुन दिसून येतच आहे. पण शरीराच्या तंदुरुस्ती इतकेच मनाचे आणि मेंदुचे स्वास्थ हि महत्त्वाचे आहे हे सुध्दा आता जाणवू लागलेले आहे. उतार वयात होणारे पार्किसन्स, डीमेन्शिया,अल्झायमर यांसारखे मेंदुचे आजार  परदेशांइतकेच आपल्या देशातही दिसू लागले आहेत. अर्थात पूर्वीपण असे आजार नसतीलच असे नाही,पण त्यांची हि नावे आपल्याला माहित नव्हती.शिवाय सरासरी आयुर्मान हे गेल्या पन्नास वर्षात वाढलेले दिसते. शंभर वर्षांपूर्वी साठी गाठणे अवघड होते त्यामुळे एखाद्याने वयाची साठ वर्षे मोठा आजार,अपघात न होता घालवली कि त्याची ’साठीची शांत ’ म्हणून मोठा समारंभ करीत असावेत अन्यथा वाढदिवस साजरे न करण्याच्या आपल्या रितीत हा सोहळा बसलाच नसता. त्या काळी जास्त जगणाऱ्यांची संख्या कमी होती तरी कंपवात, भ्रमिष्ट्पणा , म्हातारचळ या नावाने  पार्किसन्स, डीमेन्शिया,अल्झायमर हे आजार माहित होते.पण त्याचे प्रमाण मात्र फारच कमी होते. आजकाल या आजारांचे प्रमाण बरेच वाढलयं आणि विभक्त कुटुंब पध्दती ,शहरीकरण यामुळे अशा आजारांनी पिडित व्यक्ती आणि त्यांचे करावे लागणारी त्यांची मुले यांचे हाल वर्णनाच्या पलिकडे आहेत.

        विस्मरणाचा आजार भविष्यात टाळायचा असेल तर योगाभ्यासाबरोबर मेंदुचे व्यायाम करा असे डॉक्टर सांगत असतात. म्हणजे शब्द्कोडी सोडविणे, डायरी लिहिणे, सुडोकु सारखी गणिती कोडी सोडविणे . ज्या योगे मेंदुला चालना मिळते. मला हल्ली बरेचदा महत्त्वाच्या कामांचा विसर पडतो, वाचलेल्या पुस्तकांचे संदर्भ आठवायला वेळ लागतो, सकाळी स्वयंपाक करताना फ्रिजपाशी जा्वुन फ्रिज उघडला तर आपण काय़ घ्यायला आलो ते चटकन आठवत नाही मग पुन्हा ओट्यापाशी जायचे आठवायचे आणि लगेच फ्रिजकडे जायचे असे उद्योग करावे लागतात. त्यामुळे मुलींनी ,"आई, तू रोज सुडोकु सोडव ,शब्दकोडी सोडव" असा धोशा लावला. शब्द्कोडी मी पूर्वीपासून सोडवत होते, ती सोडवायला मला काहीच त्रास नव्हता उलट मजाच यायची आणि आताही माझा हा विसराळूपणा शब्दकोडे सोडवताना मला अजिबात त्रास देत नव्हता. ’सुडोकू’ हि भानगड मात्र नविनच होती. एका 9x9  च्या मोठ्या चौरसात ९ लहान चौरस आखलेले. प्रत्येक चौरस पुन्हा 9x9 मध्ये विभागलेला.म्हणजे एका मोठ्या चौरसाचे  ८१ छोटे भाग पाडलेले. त्यात एक ते नऊ असे अंक कोडे घालणाऱ्याने मधे मधे लिहिलेले असतात, खेळाचा नियम म्हणजे प्रत्येक आडव्या उभ्या रेषेत एक ते नऊ असे नऊ अंक आले पाहिजेत आणि नऊ चौरसातल्या प्रत्येक चौरसातही एक ते नऊ असे नऊ अंक आले पाहिजेत.  सुरुवातीला हे कोडे फारसे अवघड नाही वाटले. एकही आकडा आडव्या उभ्या रांगेत पुन्हा आला नाही कि झाले इतके सोप्पे, यात कसला आलाय मेंदुला व्यायाम आणि ताण म्हणून पेन्सिल घेतली आणि बसले सोडवायला. पण जसे सोडवू लागले तसा त्यातला गणिती हिसका जाणवू लागला. आडव्या रांगांवर लक्ष ठेवून अंक भरायला घ्यावे तर उभ्या रांगांमध्ये आकडे रीपीट होत. उभ्यांकडे बघावे तर आडव्या रेघांमधे गडबड. तर कधी एखाद्या लहान चौरसात एक आकडा दोनदा. पुन्हा पुन्हा खोडून पेपर फाटून जायचा , मग मी हे कोडे एका कागदावर उतरवून घेई. पेपरामधले त्यांनी लिहिलेले आकडे लाल आपण लिहिलेले काळे असत , मी उतरवून काढलेल्या कागदावरचे सगळे आकडे काळे मग तर माझा खूपच गोंधळ उडे आधी दिलेले आकडे आणि मी लिहिलेल्या आकड्यांमधून मूळचे कोडे बाजूला राही वेगळ्याच जंजाळात मी अडकून जायची.गणिताला भोंगळपणा, कामचलाऊ पणा किंवा दे दणकवुन असे काही मंजूर नसतेच. त्यामुळे एका चौरसात पाच आकडे असतील तर उरलेले चार आपल्याला हवे तसे लिहिताच येत नाहित, त्यावेळी उभ्या आडव्या रेघांचा विचार करावाच लागतो.एका रिकाम्या जागेत २ किंवा ४ यापैकी कोणताही आकडा चालेल असे असेल तर आदमासाने दोन लिहून टाकू असे म्हणून लिहिले कि संपले. पुढचे सगळे कोडे चुकलेच म्हणून समजा.त्या दोन शक्यता मधून एकच पक्का आकडा येण्याकरीता चारी बाजूनी विचार करणे जरुर असते.

     सुरुवातीला हे नियम समजून कोडे सोडवणे अवघड जात होते,पण ते सोडवण्याचा मोह मात्र कमी होत नव्हता. आता जिंकून खूप मोठे काही मिळवायचे नव्हते त्यामुळे जिंकण्याची इर्षा नव्हती आणि हरल्यावर कुणी काही म्हणणारही नव्हते. माझी धाकटी लेक खूपच पटकन सुडोकू सोडवते. ती मला कधी चिडवायची तर कधी मोठेपणाने चल मी तुला पुढचे सोडवून देते असे म्हणून कागद हातात घ्यायची. मला पण आता या खेळाचे अगदी व्यसनच म्हणाना लागले. पेपर आला कि बाकिच्या कुठल्याच बातम्या न बघता सुडोकुचा कागद घ्यायचा आणि पेन घेवुन सुरु व्हायचे. हळूहळू मलाही जमायला लागले. आडव्या,उभ्या रेघा आणि चौकोनांमध्ये पुनरावृत्ती न करता एक ते नऊ आकडे बसविणे मला येवु लागले. पुढे पुढे मला या खेळाचा छंद लागला. एखाद दिवशी चहा पिता-पिता कोडे सोडवूनही होई , तर कधी सकाळची पहिली गडबड संपली कि निंवात बसल्यावर कोडे जमून जाई. कधी ऑफिसला लवकर जायचयं, एखाद्या मिटींगची तयारी किंवा तत्सम काही टेन्शन असले कि त्याच्या विचारांमध्ये खेळाकडे दुर्लक्ष होई मग ते कोडे सुटायला वेळ लागे आणि ते न सुटणारे कोडे मला इतर का्मांत अडथळा बनुन जाई. बाकीची कामे करताना ही डोक्यात विचार सुडोकुचाच असे. रात्री सगळी कामे उरकल्यावर हातात कागद घेवुन मी परत सोडवायला घेई आणि कोडे सुटले कि सारा दिवसभराचा शिण नाहिसा होवुन मी उत्साहाने दुसऱ्या दिवसाच्या तयारीला लागे.सुडोकु सोडवायचे तंत्र एकदा समजले कि खरं तर ते सोडवायची मजा संपली. पण बघताक्षणी ते सोडवून टाकण्याइतका सराईतपणा माझ्यात अजून आला नाही म्हणून कदाचित अजूनही ते सोडवण्याची मला अजून गोडी वाटतीय.
  सुडोकुच्या त्या चौकोनांकडे आणि त्यातील आकड्यांकडे बघून माझ्या मनात वेगळेच विचार सुरु होतात हल्ली. नऊ चौरसातल्या एखाद्या चौरसात तीन आकड्यांची बाकी असते आणि एखादा चौरस एक आकडा घेवुन बसलेला असतो.योग्य अंक भरताना हा रिकामा चौरस पटकन भरुन जातो आणि तीन आकडे हवा असणारा शेवटपर्यंत रखडतो. ते पाहून मला वाटते, एखाद्याला आयुष्यात बरेच मिळालेले असते थोड्याच गोष्टी हव्या असतात , त्यामुळे त्या गोष्टी अमुक अशा, आणि तशाच हव्यात असा त्याचा आग्रह असतो, उलट एखादया जवळ काहीच नसते, मग तो मिळेल त्यात समाधान मानतो.किंबहुना मिळेल ते त्याला हवे वाटते आणि लवकरच तो भरुन पावतो. एखादी एक, दोन अंकासाठी अपूर्ण रेघ देखील अडून राहते आणि आर्ध्याहून जास्त रिकामी रेघ तिच्या आधी भरते. एखाद्या ऊंच-गोऱ्या सडपातळ आणि सधन कुटुंबातल्या एकुलत्या एका मुलीचं लग्न लांबावं आणि अगदी बेताच्या परिस्थितीतल्या रुपाने सामान्य मुलीला चांगले स्थळ मिळून तिचं घर भरावं असं वाटतं ते बघताना.

      ’सुडोकू’ हे मानवी जीवनाचं प्रतिक आहे असंही वाटतं कधीतरी. प्रत्येकाच्या नऊ कप्प्यांच्या घरात किती  आकडे आधीच लिहून आलेत ते आपल्या हातात नाही. कुठल्याच आकड्याची पुनरावृत्ती न करता नऊ कप्प्यात नऊ अंक भरायचे.आजुबाजूचे चौकोन म्हणजे आपल्या आजुबाजुची परिस्थिती,आपले सगेसोयरे, मित्र, समाज. सगळ्यांना समान पातळीवर ठेवता आले म्हणजे तुम्ही खेळाचे नियम पाळून आयुष्यात यशस्वी झालात. आपले कोडे आपणच सोडवायचे. नियम पाळणे न पाळणेही आपल्यावरच.पण आजुबाजुचे चौकोन आपल्यासारखेच भरता येण्याची कला साधता आली कि जमले म्हणायचे. ’सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्चन्तु मा कश्चित दुःखवाप्नुयात’ असे सांगणारे आपले ऋषी मुनी तरी वेगळं काय सांगतात?

      सुडोकू सोडवताना अंकांची मांडणी बरोबर यावी यासाठी आडव्या,उभ्या आणि चौरसातल्या अशा तिन्ही ठिकाणचा विचार करीत अंक भरुन मजा आलीच, त्याच्याकडे वेगळ्या बाजूने बघतानाही एका गोष्टीकडे बघाय़चे वेगवेगळे दृष्टिकोन समजले हाच असेल ना मेंदूचा व्यायाम? अशा व्यायामाने मेंदू तंदुरुस्त राहणार असेल तर करावाच रोज हा व्यायाम.   ’सुडोकू’ या कोड्याचा जनक कोण असेल आणि त्याचा मेंदू किती तल्लख असेल. सुडोकुच्या जनकाला आपले लाख सलाम !
©

Thursday, May 17, 2012

हा भारत माझा

सुनिल सुखथनकर आणि सुमित्रा भावे या द्वयीने आजवर एकापेक्षा एक सुंदर चित्रपट दिले त्या तीलच ’हा भारत माझा’ हा चित्रपट. मायबोलीच्या खास प्रयोगाच्या वेळीच तो पाहण्याचा योग लाभला हे माझे सद्भाग्यच. कारण त्या चित्रपटापूर्वी त्याची पार्श्वभूमी सुनिल सुखथनकरांनी नेमक्या शब्दात मांडली आणि चित्रपटानंतर सुमित्रा भावे, सुनिल सुखथनकर,उत्तरा बावकर, दीपा लागू यांनी प्रेक्षकांशी संवादही साधला.
 अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे अवघा भारत देश ढवळून निघालेल्या दिवसात घडलेली घटना हि चित्रपटाची मध्यवर्ती कल्पना असली तरी मध्यमवर्गीय माणसाची भ्रष्टाचाराबद्दल चिड,मात्र नितीमत्तेला धरुन राहण्यासाठी जी  किंमत मोजावी लागते, ती मोजण्याची तयारी नसणं या मुळे कात्रीत सापडलेल्या मध्यमवर्गीय माणसाचं उत्तम चित्रण आहे.

 आजच्या तरुण पिढीने जरुर बघावा हा चित्रपट. कारण कुठलेही अनैतिक काम पैसे देवुन करुन घेणे यात गैर आहे असे हल्ली बहुतेकांना वाटतच नाही. सिग्नल तोडायचा, विना लायसन्स गाडी चालवायची आणि पोलिसांनी पकडले कि दंड न भरता त्याला ५०-१०० रु.देवु करायचे, वर पोलिस कसे पैसे खातात म्हणून त्यांना ,देशाला शिव्या घालायच्या.सिग्नल तोडणे किंवा विना लायसन्स गाडी चालविणे हि कामे गैर आहेत,अनैतिक आहेत असे वाटतच नाही. डोनेशन देवुन ऍडमिशन घेणे,बिल्डरकडून फ्लॅट घेताना २ नंबरचे पैसे देणे, महानगरपलिकेतील,मामलेदार कचेरीतील कुठलेही काम पैसे देवुन करुन घेणे,इतकेच नव्हे तर ड्रायव्हींग लायसन्स एजंटला पैसे देवुन काढण्यात आपण अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहोत याचा आपल्याला विसर पडत आहे. ज्या भ्रष्ट साखळीचे आपणही एक घटक आहोत ती तोडणे फार कठीण आहे.कारण दुसऱ्याला दोषी ठरवणे नेहमीच सोपे असते.

 चित्रपटामध्ये अण्णा हजाऱ्यांच्या आंदोलनाने ढवळून निघालेला देश दिसतो. समाजाच्य़ा सगळ्या थरांमधील त्याचे पडसाद बघतानाही जाणवते कि त्याची खरी जाणीव होते ती मध्यमवर्गालाच.आजवर बहुतेक क्रांत्या या मध्यमवर्गामुळेच घडल्या असे इतिहास सांगतो. श्रीमंतवर्गातील लोकांना असे विषय चघळायला बरे वाटतात.वेळ आल्यावर स्वतःच्या फायद्यासाठी कुठलाही मार्ग,कोणतीही किंमत(अर्थात पैशाची) मोजायची त्यांची तयारी असते.अगदी तळागाळातल्या माणसाची सगळी शक्ती जगण्याच्या धडपडीत जात असल्याने एवढा विचार,विवेक करायला वेळ नसतो. शिवाय त्याच्या अस्तित्वासाठी त्यालाही भ्रष्टाचाराचे मार्ग अवलंबावे लागतात. जसे त्यांच्या झोपड्या पाडायला आलेल्या त्याला महानगरपालिकेच्या माणसाला पैसे द्यावे लागतात, आणि त्यामुळेच गॅस सिलेंडर लवकर आणुन देण्याबद्दल पैसे घेण्यात त्याला गैर वाटत नाही.
 चित्रपट हि एका सुखात्मे कुटुंबाची कथा न रहाता, प्रत्येक व्यक्ती त्यातल्या प्रसंगाशी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील घटना नकळत पडताळत राहते . म्हणूनच तो मनाला खूप भिडतो. चित्रपटाचा शेवट सकारात्मक करुन भविष्याबद्दल दर्शविलेला आशावाद हे देखील चित्रपटाचे वैशिष्ठ्य फार आवडले. हिंसात्मक चित्रपटांमधून तरूणांच्या मनावर परिणाम होतात, गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी मिळते असे म्हणतात. ते जर खरे असेल तर ’हा भारत माझा’ बघुन  मनावर चांगले संस्कार नक्कीच घडतील आणि काही थोडे त्याचे आचरण जरुर करतील.

©

Wednesday, March 21, 2012

नष्ट नीड - उध्वस्त घरटे

 रविंद्र्नाथ टागोरांच्या तीन कादंबऱ्यांचा तीन दीर्घ कथांमध्ये निलिमा भावे यांनी ’नष्ट नीड’ नावाच्या पुस्तकात  अनुवाद केलेला आहे. या कथांचे विषय  कादंबरी,प्रेमकथा यात आढळणारे प्रेमाचे त्रिकोण इ.नेहमीचेच आहेत. मात्र त्यामधून मानवी मनाच्या भावनांची गुंतागुंत,नात्यांमधले नाजुक भावबंध, स्वभावाचे चित्रण इतकं अप्रतिम आहे कि त्या कथा मनाला नुसत्या भिडतच नाहीत तर कायमच्या घर करुन राहतात. रविंद्र्नाथांचे साहित्य कालातीत आहे हे पटतं.
 विवाहबाह्य प्रेम हा आजकाल दूरदर्शन मालिकांमधुन चावुन चोथा झालेला विषय आहे, त्याबद्दल कुणालाच काही वाटेनासे झालयं, पति-पत्नी मधले प्रेम हाच सध्या आश्चर्याचा मुद्दा ठरु शकेल. टागोरांच्या या तीन कथांमध्येही  "विवाहबाह्य प्रेम” हाच वि्षय आहे, त्यांनी रंगवलेले प्रेम हे जरी भावनिक पातळीवरचे आहे तरी त्या काळी या कादंबऱ्या बऱ्याच वादग्रस्त ठरल्या होत्या. .
   ’नष्ट नीड’  या कथेत वयाने जरा जास्त मोठ्या आणि व्यवसायात मग्न असणाऱ्या नवऱ्यामुळे आपल्या वयाच्या  अमल नावाच्या दिरा बरोबर चारुलता मन रमवित असते.दोघांचे एकत्र वाचन, लेखन, साहित्यिक चर्चा चालू असतात. त्या बरोबर एकमेकांची चेष्टा, रुसवे-फुगवे. दिराबरोबर रमणारी चारुलता तिच्याही नकळत त्याच्या प्रेमात पडते. त्याचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वहिनी, कदाचित एक मैत्रीण इतकाच असतो. अमल त्यांच्या घरात आश्रित असतो. त्याला जेंव्हा चारुलतेचा नवरा मोठ्या आर्थिक संकटात असल्याचे समजते, त्यावेळी तो खडबडून जागा होतो. वहिनी बरोबरच्या साहित्यिक गप्पा, वाचन,चर्चा यातला फोलपणा त्याला जाणवतो,अपराधीही वाटते. दादाने स्वतःच्या आर्थिक संकटाबद्दल आपल्याला थोडीसुध्दा कल्पना दिली नाही आपल्या शिक्षणाला मदतच करत राहिला याबद्दल त्याच्या मनात दादाच्या मोठेपणाबद्दल कृतज्ञता दाटुन येते. त्याला मदत करणे आपले कर्तव्य आहे या  भावनेतून तो दादाने सुचवलेल्या धनिकाच्या मुलीला न बघताच होकार देतो  आणि  शिकून येवुन दादाला मदत करण्याच्या हेतूनेच सासऱ्याच्या खर्चाने विलायतेस उच्च शिक्षणासाठी जातो.

 चारुलता नवऱ्याच्या वृत्तपत्र व्यवसायाशी पूर्ण अनभिज्ञ असते.संस्कारांमुळे नवऱ्याच्या सेवेत ती कुठलीही कसूर ठेवत नसली तरी त्याच्या मनातली घालमेल,त्याचे ताणतणाव तिला कधी जाणवत नाहीत.  नवऱ्याला   आपल्या व्यवसायातील चढ उतार चारुलतेजवळ सांगायचे असतात मात्र तिला ते सांगायची वेळ जमुन येत नाही. ती सगळा वेळ ’अमल’च्याच विचारात रममाण असते. सहाजिकच त्याच्या अकस्मिक जाण्याने बसलेला धक्का आणि पोकळी तिचे जीवन वैराण करते.
 चारुलतेच्या आपल्यावरच्या प्रेमाबद्दल कणमात्र शंका नसलेल्या तिच्या नवऱ्याला जेंव्हा तिचे मन अमलमधे गुंतलेले समजते, त्यावेळी त्याला दुःख होते तेही  तिच्यासाठीच. अमलचे  लग्न त्यानेच करुन दिलेले आहे. चारुलतेचा त्याला राग येत नाही, आपण तिला फार गॄहित धरले ,तिला मनाविरुध्द आपले करायला लागले यामुळे त्याला स्वतःचा राग येतो. इथेच टागोरांचे थोरपण जाणवते. कुणाचे मन कधी, कुठे जडेल हे समजणे खरचं कठीण आहे. एखाद्याला आपल्यावर प्रेम कर अशी बळजबरी नाही करता येत. समाजाची बंधने पाळणारेच जास्त असतात,चौकटी मोडून जगणे तेवढे सोपे पण नसते, अशा वेळी चारुलतेला घरी एकटी सोडून कामाच्या निमित्ताने दुसऱ्या गावी कायमचे निघुन जाण्याचा तिच्या नवऱ्याचा निर्णय पटतो.


 चारुलतेची अमलमधली पराकोटीची भावनिक गुंतवणूक हल्लीच्या परिस्थितीत अवास्तव वाटू शकते. ती एका बाजुला नवऱ्याला खुष करु पहात असते.पण अमलला विसरणे तिला अशक्य असते, एका बाजुला अमलवरचे प्रेम आणि दुसरीकडे नवऱ्याशी आपण प्रतारणा करीत असल्याची अपराधी जाणीव यातुन  होणारी तिची  मानसिक होरपळ आपल्याला जाणवते. प्रत्येक जण आपल्या जागी बरोबर असताना प्रत्येकाच्या वाट्याला आलेली वेदना वाचकाला सुन्न करते. मानवी जीवन हे नियतीच्या हातातल्या बाहुल्यासारखं आहे असं वाटतं राहते.

©

Thursday, March 8, 2012

महिला दिन

नेमेची येतो मग पावसाळा.. च्या चालीवर दरवर्षी महिला दिनाचे डंके मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून झडायला सुरुवात होते. आमच्या कार्यालयातही आम्ही मागची ३-४ वर्षे हा उपक्रम केला.त्यातील एका वर्षी  मी मांडलेले विचार येथे ब्लॉगवाचकांकरीता देत आहे.


आजच्या आपल्या अतिथी श्रीमती पाटील, श्रीमती.बेन्द्रे, जोग मॅडम आणि माझ्या भगिनींनो,
एकविसाव्या शतकाची सुध्दा दशकपूर्ती होईल,अशा परीस्थितीत 'महिला दिन' साजरा करायची खरोखरीच आवश्यकता आहे का? आज सर्वच क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करताहेत. आज दहावी बारावीच्या गुणवत्ता याद्य़ांमध्ये मुलींचे प्रमाण जास्त असते.आपल्या देशाच्या पंतप्रधान महिला(इंदिरा गांधी) होत्या आज राष्ट्र्पतीही प्रतिभा पाटील या महिला आहेत. आपल्या डी.डी.जी हि जोग मॅडम आहेत.आज मुलींना जर मुलगी म्हणून काही मिळविण्या साठी झगडावे लागत नाही तर आपला खास 'महिला दिन' कशासाठी?
    जी गोष्ट न मागता , न झगडता मिळते त्याची किंमत नसते असे म्हणतात. आज आपण समाजात पाहतो, मुलींना हवे ते, हवे तेवढे शिक्षण ,स्वातंत्र्य मिळत आहे. त्याचा फायदा घेणाऱ्या बहुतांश जणी असल्या तरी त्याचा गैरफायदा घेणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. त्याला कॊण जबाबदार हा वादाचा मुद्दा बाजूला ठेवला तरी वस्तुस्थितीकडे डोळेझांक करता येणार नाही. पब मध्ये जाणाऱ्या मुली, सिंहगड पायथ्य़ाशी झालेल्या रेव्ह पार्टीमध्ये असणाऱ्या मुलींची उपस्थिती कशाचे द्यॊतक आहे? समाजात वाढत्या घटस्फोटांचे प्रमाण काय सुचविते?
 आपल्याला मिळालेल्या समानतेचा  आपली पुढची पिढी असा अर्थ घेणार असेल तर ते कितपत योग्य ठरेल?  स्वातंत्र्य या दुधारी शस्त्राचा योग्य वापर करायला आपल्या मुलींना शिकविणे, त्यांच्यावर् तसे संस्कार करणे हे आपले कर्तव्य आहे.
आज आपण समाजात ज्या प्रतिष्ठेने वावरत आहोत,जे स्वातंत्र्य ऊपभोगत आहोत ते  मिळविण्यासाठी अनेक  व्यक्तिंनी विशेषतः स्त्रियांनी आपली आयुष्यॆ वेचली.
        खऱ्या सौंदर्याची, स्वातंत्र्याची आपण पूजा करुया. आणि आज आपल्याला या व्यासपीठावर इतक्या मोकळेपणाने गप्पा मारता येणे ज्यांच्यामुळे शक्य झालयं त्यांचे स्मरण करुया.
           कविवर्य बा.भ.बोरकर म्हणतात,
           देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे
 गोरटे कि सावळे या मोल नाही फारसे
 तेच डोळे देखणे जे कोंडिती सार्‍या नभा
 वोळती दुःखे जगाच्या सांडिती चंद्रप्रभा
  देखणे ते ओठ जे की ओविती मुक्ताफळे
 आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे
 देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे
 मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे
 देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती
 वाळ्वंटतुनी सुध्दा स्वस्तिपद्मे रेखिती
खऱ्या सौंदर्याचं बोरकरांनी ईतक्या सुंदर शब्दात वर्णन केलेलं आहे, कि त्यावर वेगळ्या भाष्याची गरजच नाही.
आशाच काही देखण्या व्यक्तिमत्त्वांबद्द्ल  मी आज  बोलणार आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना ह्या विभूती माहित असतील.काहींना, नव्याने माहित होतील.

 सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, आपल्या माजी पंतप्रधान तर आजच्या राष्ट्र्पतीही महिला आहेत. आपल्याला १९४७ मध्ये स्वराज्य मिळाल्यानंतर लोकशाही पध्द्तीचा आपण अवलंब केला, त्याच वेळी आपल्याला म्हणजे महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.मात्र युरोप आणि अमेरीकेत मतदानाचा हक्क मिळविण्यासाठी स्त्रियांना वर्षानुवर्षे लढावे,झगडावे लागले. 'एमिलिन पॅंखर्स्ट' ह्या विदुषीने आपले उभे आयुष्य युरोप आणि अमेरीकेतील महिलांना मतदानाचा हक्क मिळविण्याकरीता वेचले.त्यांचा लढा होता लोकशाहीत महिलांना बरोबरीचे स्थान मिळावे या साठी. त्यावेळी स्त्रियांना मतदानाचाच आधिकार नव्हता मग उमेदवार म्हणून निवड्णूकीला उभे राहणे दुरची गोष्ट. १४जुलै १८५८ मध्ये  'एमिलिन ' यांचा जन्म झाला.अतिशय बुध्दीमान आणि तितक्याच संवेदनाशील एमिलिनला समाजकारण आणि राजकारणामध्ये सुरुवातीपासुनच रस होता. बॅरीस्टर पॅंखर्स्ट हे स्त्री स्वातत्र्यांचे पुरस्कर्ते होते. त्यांच्याशी विवाह झाल्यानंतर एमिलिनने त्यांना सर्वतोपरी मदत केली. महिलांना मतदानाचा हक्क मिळविण्याकरीता कार्यरत असणाऱ्या सेफ्रजेट चळवळीत भाग घेतला,१८९४ मध्ये काऊंटी कौन्सिलच्या, म्हणजे आपल्याकडील नगरपालिकेच्या उमेदवाराच्या निवड्णुकीच्या वेळी मतदानाचा आधिकार मिळाला.पुढे त्यांनी हि चळवळ अशीच चालू ठेवली.वैयक्तिक जीवनात त्यांना बरीच दुःखे सोसावी लागली.पती निधन,पुत्र वियोग अशा मोठ्या विपत्तिंना तॊंड देतानाही त्यांनी हा लढा चालूच ठेवला, बरेच वेळा तुरुंगवासही भोगला. पण रशीया,अमेरीका असे दौरे करुन स्त्रिसंघटना वाढवली.त्यांच्या धडपडीस अखेर यश मिळालेच. १५मे१९१७ रोजी ३० वर्षांवरील स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाला.
   अशा या  अखंड ध्यासपंथी चालणाऱ्या 'एमिलिन पॅंखर्स्ट' यांना नम्र अभिवादन!

            युरोप ,आमेरीकेत मतदानाचे हक्क मिळविण्याच्या चळवळी चालू होत्या त्या वेळी आपल्या देशातील महिला मात्र अज्ञानाच्या अंधःकारात पिचत होत्या. सारा देशच ब्रिटीशांच्या गुलामगिरीत होता.आणि बायका तर पुरुषांच्या गुलाम. त्यांना शिक्षण नव्ह्ते, ते मिळविण्याची संधी नव्हती.बालविवाह होत होते. जरठ-कुमारी विवाह सर्रास होत , पति निधना नंतर सती किंवा केशवपना सारख्या अमानुष रुढी होत्या.यामधून सुटून मोकळा श्वास घेता येतो हेच मुळी त्यांना माहित नव्हते. स्त्री जन्म म्हणजे सोसणे हे समीकरण त्यांच्या माथी पिढ्यानपिढ्या रुजविले होते, त्यामुळे त्याविषयी तक्रार, बंड करण्याचा प्रश्णच नव्ह्ता. याच काळात अनंतशास्त्री ह्या विद्वान ब्राह्मणाने आपली पत्नी लक्ष्मी हिला वेदाभ्यास शिकवायला सुरुवात केली. त्याला समाजाने तीव्र विरोध केला. समाजापासून दूर मंगळूर जवळील जंगलात हे दापंत्य गेले.तेथेच २३ एप्रिल १८६२ रोजी त्यांनी कन्येला जन्म दिला हिच ती जागतिक कीर्ति मिळविलेली 'पंडीता रमा'. तिचे   नाट्यमय आयुष्य वाचतानाही अंगावर रोमांच उभे राहतात. पंधरा वर्षा पर्यंत वडिलांकडून वेदाभ्यास मुखोद्गत करणाऱ्र्या रमेला लहान वयात आई वडीलांचा वियोग सहन करावा लागला. समाजाने बहिष्कृत केल्याने आईच्या ताटीला खांदाही तिने दिला. नंतर भावा बरोबर संपूर्ण भारत भ्रमण पायी केले.आणि वडीलांच्या स्त्री-शिक्षणाच्या विचारांबद्द्ल व्याख्याने दिली. तिच्या विद्वत्तेने उभा भारत अचंबित झाला. कलकत्त्यात भावाच्या निधनानंतर रमाबाईंनी 'बिपिनचंद्र मेधावी' याच्याशी आंतरजातीय विवाह  केला. त्यांना एक मुलगी झाली.मात्र हि मुलगी दोन वर्षांची असतानाच बिपिनचंद्र मेधावी याचे अकस्मिक निधन झाले. एकामागोमाग एक असे जवळच्यांच्या मृत्यूचे दुःख रमाबाईंनी कसे सोसले असेल ! एवढ्या अपार दुःखांनाही त्यांनी धिरोद्दातपणे तॊंड दिले.इतकेच नव्हे तर इंग्लड,अमेरीकेला जाऊन  त्यांनी भारतातील स्त्रियांच्या परिस्थितीबद्द्ल व्याख्याने दिली.स्त्रिशिक्षणाची निकड पट्वून तिकडून देणग्या मिळविल्या. पुण्यात त्यांनी ’आर्य महिला समाजाची स्थापना केली.तसेच मुंबईत 'शारदा सदन' या बलविधवांसाठी आश्रम स्थापन केला.आपले सारे सर्वस्व स्त्रियांच्या उन्नती साठी समर्पण करणाऱ्या या विदुषीस लाख लाख प्रणाम!
      याच काळात ३१ मार्च १८६५ रोजी यमुना जोशी हिचा कल्याण येथे जन्म झाला. अवघ्या नवव्या वर्षी तिचे लग्न गोपाळ जोशी यांच्याशी झाले आणि तिचे नाव 'आनंदी' झाले.आनंदीला लग्नानंतर  शिकावे लागेल या अटीवरच तिला गोपाळरावांनी पत्करली होती.वरवर विक्षिप्त वाटणाऱ्या या माणसाची स्त्री-शिक्षणाची तळमळ जबरदस्त होती.त्याच्या धाकाने , थोड्याशा नाराजीनेच शिकायला सुरुवात केलेल्या आनंदीची बुध्दिची झेप मात्र विलक्षण होती. मॅट्रीकच्या पुढे काय शिकावे असा विचार करताना तिला जाणवली ती स्त्रियांची केविलवाणी स्थिती. वैद्यकीय उपायांअभावी घडणारे बालमृत्यू, स्त्रियांचे दुर्लक्षित आजार,पुरुष डॉक्टरांकडे संकोचापायी न जाण्याने झालेले त्यांचे अकाली मृत्यू. तिने वैद्यकीय शिक्षण घेवुन स्त्री समाजाचे आरोग्य सुधारण्याचा ध्यास घेतला.घराबाहेरही एकटीने जाणे निषिध्द मानल्या जाणाऱ्या काळात आनंदीने एकटीने आमेरीकेला प्रयाण केले.आणि फिलाडेल्फीया विद्यापीठातून ’एम.डी’ ही पदवी मिळविली वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी! आमेरीकेत तिने फार हाल सोसले, तिथले थंड हवामान,अपुरा पैसा, शाकाहाराच्या आग्रहामुळे सोसावी लगलेली उपासमार  या साऱ्यांचा परीणाम तिच्या प्रकृतीवर झाला आणि तिलाच क्षय रोगाने ग्रासले.भारतात आल्यावर तिला अनेक अपमान ,निंदा यांना तोंड द्यावे लागले. विदेश गमन तेही एका तरूण विवाहितेने एकटीने ,हे समाजाच्या दृष्टिने महान पातकच होते! जे आनंदीने समाजाच्या उध्दारासाठीच केले होते. मात्र आनंदीला योग्य वैद्यकीय उपचार मिळाले नाहीत आणि वयाच्या २२व्या वर्षी तिने इहलॊक सोडला. तिचे स्त्री आरोग्य सुधारण्याचे स्वप्न अपुरे राहिले तरी तिची शिकण्याची जिद्द, कठोर परीश्रम याचे मोल कुठेही कमी ठरत नाही. भारतातील या पहिल्या महिला डॉक्टरचे 'महिला दिनी' कृतज्ञतापूर्वक स्मरण !
           सावित्रीबाई फुले यांना तर कॊण ओळ्खत नाही? १८५२ मध्ये त्यांनी पुण्यात दलित मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्या पहिल्या भारतीय स्त्रि-शिक्षिका.
           अशा अनेक स्त्रिया आहेत, पण वेळेअभावी आणि तुमच्या सहन शक्तिचा विचार करुन मी काहींचाच उल्लेख केला आहे.
         आज आपल्याला अनेक संधी सहज उपलब्ध आहेत. आज पूर्वीच्या मानाने स्पर्धा जास्त आहे हे मान्य करावे  लागेल.परंतु आज  थोड्याशा अपयशाने खचून जाणारी, जराशा दुःखाने स्वतःच्या अगर दुसऱ्याच्या जिवावर उठणारी नवी पिढी पाहिली की वाटते त्यांनी या महान विदुषींची चरीत्रे वाचावी. त्यांनी ज्या संकटांना तोंड देऊन जे महान कार्य केले आहे ते वंदनीय  आहे.आपण या निमित्ताने त्यांचे पुण्यस्मरण, त्यांच्या कार्याचे मनन केले आणि जमल्यास काही प्रमाणात अनुकरण केले तर  'महिला दिन' खऱ्या अर्थाने साजरा झाला असे मला वाटते. मला येथे माझे विचार मांड्ण्याची संधी दिल्याबद्दल आपले आभार मानून रजा घेते.