Wednesday, July 20, 2016

त्या बालिकेला बघून....

           सकाळी सकाळी whatsapp वर एक विडीओ बघितला( माझ whatsapp च वेड कमी झालय पण अजून पुरत गेल नाहीये) एक चार वर्षांची चिमखडी मुलगी इंग्रजी मधून आपल्या देशाबद्दलच्या प्रश्णांची धडाधड उत्तरे देत होती कुठल्याही राज्याचे नाव घ्यायचा अवकाश हि बेटी त्याची राजधानी सांगायची.सातही युनियन टेरीटरीज(केंद्रशासित प्रदेश) ची नावे तिच्या राजधान्यांसकट सांगितलेले बघून मला त्या बालसरस्वतीचे पाय धरावेसे वाटले ! शिवाय तिला शिकविणाऱ्यांचे सुध्दा.

        आपल्या देशात किती राज्ये आहेत हे समजायला मला किमान दहावे वर्ष उजाडले असेल ,केंद्र्शासित प्रदेश वगैरे शत्रुंपासून दहावीनंतरच सुटका झालेली नक्की माहित आहे. विडीओतल्या मुलीची स्मरणशक्ती अगाधच आहे आणि तिच्या या शक्तीचा वापर पुढच्या अभ्यासाला उपयोगी पडणाऱ्या गोष्टीत करण्याच तिच्या पालकांच चातुर्यही वाखाणण्याजोगच आहे. मला त्या मुलीच जितक कौतुक वाटल त्याहूनही अधिक तिच्या वयाच्या इतर मुलांची काळजी ! कारण आता हा विडीओ सगळ्या जगभर फिरणार तिच्या किंवा तिच्या आसपासच्या वयाच्या मुलांच्या आई-वडील आणि आजी आजोबा (हो हल्ली बऱ्याचशा आजी आजोबांचा ही बाल संगोपनात वाटा असतो शिवाय तेही उच्चशिक्षित असतात) सगळ्यांनाच आपल्या मुलांनाही हे आल पाहिजे अस वाटून त्यांनी त्या लेकरांना वेठीला धरु नये. ती मुलगी कदाचित स्मरणशक्तीच वरदान घेवुन आली असेल ,तिला त्या बद्दल शिकवताना तिच्या पालकांनी काही आगळ्या वेगळ्या पध्दती वापरल्या असतील ज्या योगे तिला हे सारे खेळासारखे वाटले असेल, कदाचित तिच्या मोठ्या भावंडाच्या बरोबर ऐकताना तिच्या कानावर पडून तिला ते अवगत झाले असेल पण म्हणून इतरांनी आपल्या पिल्लांच्या पाठीस लागू नये अस मला फार फार वाटतय.

         आपोआप कानी पडून मुलांना अभ्यासाची गोडी लागण वेगळं आणि जोर जबरदस्ती करुन त्यांना पढवणं वेगळं. दुर्गाबाई भागवतांनी आपल्या लहानपणातल्या आठवणींमधे  लिहिलय त्यांच्याहून  त्यांचा काका दोन चार वर्षांनी मोठा होता त्याच्या  बरोबर सतत राहून  त्यांना लिहिता वाचता यायाला लागल,पाढे,अक्षर बाराखड्या सगळ त्या काका बरोबरोबर आवडीने लिहित शिवाय शाळेत जायचा हट्टही करत.मग त्या स्वतःच कशा शाळेत गेल्या,नाव घालायला वयाचा दाखला मागितल्यावर कशा निरुत्तर झाल्या मग काकाचे नाव घेतल्यावर बाईंनी काकाला बोलावुन घेतले मग त्याच्याच वर्गात जायचा हट्ट् त्यांनी कसा धरला याच मोठ रसाळ वर्णन बाईंनी केलय. त्यांच्यासारख्या असामान्य बुध्दीमत्तेच्या मुलीच्या बाबतित हे घडल. त्यावेळी घरोघरी अशीच बरीच मुल असत पण सगळ्य़ांचीच धाकटी भावंडे अशी शाळेत जाण्यासाठी हट्ट करत नव्हती. पण याच भान त्यावेळच्या पालकांना होत त्याला हल्ली पूर्वीचे पालक सजग नव्हते असही म्हणतील. त्या वेळच्या पालकांना वेळही नसे मुलांकडे इतके लक्ष द्यायला.हल्लीच्या करीयर मागे धावणाऱ्या लोकांकडे ही वेळ नसतोच पण असलेला वेळ मुलांनी प्रत्येक शर्यतीत पहिलच आल पाहिजे या अट्टहासाने त्यांच्यावर असंख्य ओझी घालण्यात जातो हे बघताना मन विचारात पडते.

      लहानपणी माझी स्मरणशक्तीही चांगली होती(आजही नको ते लक्षात ठेवण्य़ात ती वाया जाते इति नवरा) रामरक्षा,मारुतीस्तोस्त्र गीतेचे १२वा,१५ वा अध्याय अशा गोष्टी आई पाठ करुन घेई. दादांनी पाढे पक्के करुन घेतले,अनेक सुंदर कविता ते मला म्हणून दाखवत त्याचे अर्थही सांगत त्या मला सहज पाठ झाल्या. कित्येक संस्कृत श्लोकही ते म्हणून दाखवित ,सावरकरांचे प्रसिध्द "हे सिंधू एकटा महाराष्ट्र् तुला मुक्त केल्याशिवाय राहणार नाही” हे भाषणही दादांनी दोन तीन दा वाचल्यानंतर माझे बरेच पाठ झाले होते. माझ्या आईच्या मामांनी मला कानडी भाषेतील १ ते १०० अंक म्हणायला शिकविले होते. रेडीओवरील गाणे एकदा किंवा फारफार तर दोन दा ऐकून माझे तोंडपाठ होत असे माझी मोठी ताई हिंदी गाणी लागली आणि तिच्या आवडीच गाण लागल कि वही पेन घेवुन् ते उतरवुन काढायची एखादी ओळ राहिली कि हळहळायची, मी मात्र माझ्या आवडीचे गाणे नीट ऐकत असे आणि माझे लवकर पाठ होत असे, शाळेतल्या कविताही मला कधी पाठ कराव्या लागल्या नाहीत पण या सगळ्याचे घरात विशेष कौतुक झाल्याचे मला आठवत नाही. मला अभ्यासातले काही शिकवावे असे कुणालाच वाटले नाही. शाळेत जवळजवळ सगळे विषय मला आवडत होते, भूगोलातील नकाशे मला समजाय़चे नाहीत पण पाठांतराचा त्रास न वाटल्याने कमीत कमी अभ्यास करुन मी दुसरा नंबर सहज मिळवित होते.पहिला नंबर मिळवणारी मुलगी माझी जवळची मैत्रीण असल्याने मला आपण तिच्याशी स्पर्धा करावी असे कधी वाटलेच नाही आणि इर्षेने काही करावे असा माझा स्वभाव नसल्याने मला मिळणाऱ्या मार्कांनी मला  कधी दुःख दिले नाही.  आमच्या घरात सतत पाहुण्यांचा राबता असे. घरकामाला बाई नसल्यामुळे आईला वरकामात बरीच मदत करावी लागे,दुकानातून सतत काही ना काही आणुन द्यावे लागे हे सगळी कामे मी आनंदाने करीत असे,आईचाही नाईलाज होता आणि या कामांमुळे माझे आभ्यासाचे नुकसान होत नसल्याने आई मलाच हक्काने कामे सांगत होती.इतके करुनही उरलेला रिकामा वेळ् मी हाताला येईल ते पुस्तक वाचण्यात घालवी. थोडक्यात माझ्या चांगल्या स्मरणशक्तीची ना मला किंमत होती ना माझ्या घरच्यांना. याबद्दल मला खंत नाही पण कधीतरी वाटून जाते आपल्या क्षमतेचा वापर हवा तितका झाला नाही. याबद्दल मी माझ्या आईवडीलांना दोष नाही देणार .त्यांच्याजवळ मला मार्गदर्शन करण्य़ाइतक शिक्षण नव्हत त्यामुळे असलेल्या निम्न आर्थिक दर्जामुळे पैसा खर्च करुन क्लासेसला पाठवायची क्षमताही नव्हती आणि माझ्याकडेही महत्त्वाकांक्षेची कमतरता होतीच. त्यातुनही मी जे शिक्षण घेतले त्यातून माझा बराच विकास झाला.मी आर्थिक दृष्ट्या स्वावल्ंबी तर झालेच पण केंद्र सरकारच्या माहिती प्रसारणासारख्या चांगल्या खात्यात आधिकारीपदही मिळवू शकले.
       
            हे बघताना मला आठवतात माझ्या मागल्या पिढीमधल्या काही बाय़का.माझी आई तिची पण स्मरणशक्ती चांगली होती. अनेक स्तोत्रे तिला पाठ होती. तिच्या शाळेतल्या कविता ती माझ्या मुलींना म्हणून दाखवी.तिने वाचलेले पुस्तक असो कि पाहिलेला नाटक ,सिनेमा सगळ्याची अतिशय बारकाव्यांसह कथन करण्याची कला तिला अवगत होती. अनेक गाणी ती सुरेल आवाजात गायची पण तिच्या हुशारीचे काही चिज झाले नाही.एकत्र कुटुंबातील जबाबदाऱ्या पार पाडताना तिला कधी वाचन करणेही जमले नाही. सतत येणाऱ्या पाहुण्यांची सरबराई करताना ती दमुन जाई.आम्हाला मात्र तिने स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे धडे  दिले आणि चूलखंडातुन बाहेर पडून काहीतरी वेगळ करा अशी सतत शिकवण दिली. आज वाटते तिला संधी मिळती तर ती कुठल्याकुठे गेली असती.तिच्यामधे जिद्द होती, अपार कष्ट करायची तयारी होती.
       
        माझ्या चुलत सासुबाई देखील अशाच अतिशय हुशार होत्या. त्यांना मराठी समजत असे बोलता यायचे नाही,मला कन्नड कळे पण् बोलता येत नव्हते.आमच्या गावाकडे गेले कि मी मराठीतून आणि त्या कानडीमधून बोलत पण आमचा संवाद छान होई. त्यांचा मोठा भाऊ बंगलोरला मोठ्या कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट् होता त्या मला नेहमी सांगत त्यांचे वडील लवकर वारले त्यापूर्वी त्या भावाबरोबर शाळेत जात नेहमी त्यांचा पहिला नंबर येई.पण वडीलांच्या पश्चात काकाने त्यांचे तेराव्या वर्षी लग्न लावुन टाकले आणि कर्नाटकातल्या किऽर्र खेड्य़ात या थोरली सून म्हणून येवुन पडल्या. तिथे त्यांचा उभा जन्म शेतीची कामे,आलागेला आणि शेणगोठ्यात गेला.आमच्या मोठ्या कुटुंबातील प्रत्येक व्यत्क्तिची जन्मतारीख,लग्नाच्या तारखा त्यांना सांगता यायच्या. आमच्याकडे नात्यातल्या नात्यात लग्नसंबंध फार होत त्या प्रत्येकाची उकल मी त्यांच्याकडून करुन घेई.त्यावेळीदेखील मला वाटे किती ह्या माऊलीची हुशारी वाया गेली. अशा कित्येक स्त्रिया मागल्या पिढ्यांमधे होवुन गेल्या असतील.
       
        केवळ चांगली स्मरणशक्ती म्हणजे हुशारी नव्हे हे जरी खर असलं तरी आपल्याकडे चालत आलेल्या पूर्वापार शिक्षणपध्दतीचा विचार केला तर शैक्षणिक यशात तिचा सिंहाचा वाटा आहे यात वाद व्हायचे काहीच कारण नाही. सगळ्या स्पर्धा परीक्षांचा जोरही स्मरणशक्ती मापनात आहे असे वाटते.त्यामुळेच या बायकांची हुशारी कामी आली असते असे वाटते. शिवाय मला त्यांच्या सहवासातून तोच एक पैलू जाणवला कदाचित त्यांच्यात उत्तम ग्रहणशक्ती,सर्जनशिलताही असेल .कुठलेही शिक्षण ,स्ंस्कार नसतानाही त्यांची स्मरणशक्ती टिकली पण योग्य मार्ग न मिळाल्याने ती एका अर्थी वायाच गेली.

     या छोटीचा विडीओ बघताना वाटलं तिच्या स्मरणशक्तीचा उपयोग केला जातोय. मात्र त्याचाही अतिरेक होवु नये. तिच बालपण, कुतूहल, निर्व्याजता यात होरपळली जावु नये आणि तिला अहंकाराचा वारा पण लागू नये.

Tuesday, January 19, 2016

जिणे गंगौघाचे पाणी

  टि.व्ही. वर मुलीने लावलेला सिनेमा बघत होते ’पिकू’ नावाचा. सिनेमात वृध्द आणि विधुर अमिताभ आपल्या एकुलत्या एक मुलीला सळो कि पळो करुन सोडत होता.तिच्या ऑफिसमधे फोन कर,तिला पार्टीतून बोलावुन घे सतत तब्येतीची रडगाणी , एक ना दोन. मुलगी म्हणाली ,"बघ आई, म्हाताऱ्या माणसांना वृध्दाश्रमात पाठवणाऱ्या तरुण पिढीला तुम्ही नावे ठेवता, पण इथे हा आजोबा त्या मुलीचा किती छळ करतोय तिच लग्नही होवु देत नाहीय "

        अस घडतही असेल, पण माझे वडील ५२ म्हणजे आजकालच्या भाषेत तरूण वयात गेले, आणि सासरेही ६५ व्या वर्षी अगदी निरोगी तब्येत असताना अचानक हार्ट्फेल होवुन गेले. त्यामुळे त्रासदायक म्हाताऱ्यांचा मला अनुभव नाही असे म्हणताना झटकन डोळ्यापुढे आता ऐंशींव्या वर्षात पदार्पण करणारे काका आले.   पिकू सिनेमाच्या पूर्णतः विरोधी अस त्यांच वागण असल्याने  त्याचे वय जाणवत नसावे असे वाटते. दहा वर्षापूर्वी माझी काकू अगदी ध्यानीमनी नसताना अचानक गेली.हा धक्का आम्हालाच एवढा होता कि काका आणि त्याच्या मुलींवर काय बेतले असेल याची कल्पनाही करवत नाही. काकांनी कपभर चहा देखील हाताने केलेला आम्ही कधी बघितले नव्हते. अर्थात ते दिवसभर त्यांच्या व्यापात असत आणि काकूनेही त्याबद्दल चुकूनही तक्रारीचा सूर काढला नव्हता. मात्र अचानक आलेल्या या प्रसंगाने काका फारच खचले. त्यांची एक मुलगी ठाण्यात डॉक्टर आणि दुसरी अमेरिकेत. काकांना एकट्याला पुण्यात ठेवायची मोठ्या मुलीची तयारी नसल्याने तिने त्यांना ठाण्याला नेले. मी दोन चार दिवसांनी फोन करुन चौकशी करायची त्यांची. एकदा ते फोनवर मला म्ह्णाले, " शुभा, माझी लेक माझी खूप काळजी घेते,सतत माझ्या बरोबर असते. मला एकटेपणा जाणवू नये यासाठी खूप करते ती .आता ती म्हणतीय मी माझी संध्याकाळची प्रॅक्टीस बंद करते तुमच्यासाठी. पण तू माझ्या वतीने तिला एक सांगशील का?"
" काय?"
" तिला म्हणावं माझी एवढी काळजी करू नको, हे दुःख खूप गहिरं आहे ते संपणार नाहीच,पण यातून मी हळूहळू बाहेर येईन त्याकरीता तिन तिच आयुष्य,करीयर वाया घालवणे बरोबर नाही.तिची आई गेली आहे याच दुःख विसरुन ती माझा विचार करतीय ह्याचा मला त्रास होतो. तेंव्हा तू तिला समजावुन सांग"
आपले दुःख जाणणाऱ्या मुलीला तिचे आयुष्य सुरु करायला सांगणारे माझे काका किती मोठ्या मनाचे ! अशा  लोकांच्या सहवासात असल्याने मला पिकू सिनेमा कसा पटणार?

    काका वयाने मोठे आहेतच पण ते पुण्याच्या नामांकित कॉलेजमधुन प्राचार्य म्हणून निवृत्त झाले. एम.एस.स्सी ला सुवर्णपदक मिळवणारे, गणितावर पन्नासहून जास्त पुस्तके लिहिणारे, तत्त्वज्ञानाचा गाढा अभ्यास असणारे आहेत.
   
      आमच घर लहान होत,  घरात माणसं जास्त होती.  आई नेहमी सांगायची कि  मी लहान असताना फार हट्टी आणि रडकी होते. सतत् मला घेऊन बसावे माझ्याकडे लक्ष द्यावे अशी माझी अपेक्षा असे आणि मला कुणी घेतले नाही तर् मी तारस्वरात रडायची. (हल्लीच्या लहान मुलांना जे आपसुख मिळते त्यासाठी मला बंड करावे लागत होते.)  आईला कामामुळे मला सतत् घेवुन बसणे शक्य नसे. त्यावेळी माझे काका् एस.पी. कॉलेजमधे प्राध्यापक होते. त्यांचे लग्न झालेले नव्हते. आम्ही कॉलेजच्या आवारातच राहत होतो. काका त्यांना वेळ मिळाला कि तडक घरी येत आणि मला घेवून् खेळवत बसत.  गोल्ड मेडल मिळविलेल्या, कॉलेजमधे शिकविणाऱ्या दिराला या पोरीपायी घरी येवुन तिला खेळवावे लागतय या गोष्टीचा आईला फार संकोच वाटायचा.पण काकांचा स्वभावच तसा होता, दुसऱ्याला समजून घेण्याच्या  अतिशय दुर्मिळ स्वभावाचे माझे काका. अर्थात ते कळायच माझ वयच नव्हतं.
   
    लहान पणी घरात वडील रागीट ,आईचा स्वभावही तापट  आणि काकांचा स्वभाव अतिशय शांत. आम्हाला त्यांनी मारणे सोडाच कधी आवाज चढवून बोललेले आठवत नाही सहाजिकच सगळ्या भाच्या पुतण्यांचे ते लाडका मामा आणि काका.  पुढे काकांच लग्न झालं, आम्ही सहकारनगरच्या घरी रहायला गेलो.काकांच घर डेक्कन जिमखान्यावर. सहकारनगरमधुन तिकडे जायला सोईच्या बस नव्हत्या.  काकांकडे जाणे येणे कमी झाले,काकाही कॉलेजमधे विभागप्रमुख झाले, ते पुस्तकेही लिहित त्यामुळे त्यांनाही दिवस कमी पडायचा. सहाजिकच आमच्या गाठी भेटी सणावारी,समारंभापुरत्या मर्यादित झाल्या. पुढे मी सायकल चालवू लागल्यावर काकांकडे जाऊ लागले.

    बारावीत गेल्यावर काकांना विचारुन क्लास लावले.फिजिक्स, काकांचे एक मित्र शिकवत होते, मॅथ्ससाठी काकांच्या कॉलेजमधील सहकारी प्रयाग मॅडमकडे मी जात होते.पण co-ordinate geometry काकांचा आवडता विषय होता. त्यावेळी काका व्हाइस प्रिन्सिपल होते पण त्यांच्या अत्यंत व्यस्त वेळापत्रकातुन वेळ काढून त्यांनी त्यांचा लाडका विषय मला शिकवायचे कबुल केले. गुरुवार आणि रविवार असे दोन दिवस मी ,माझी चुलत बहीण आणि  एक मैत्रीण  त्यांच्याकडे जात होतो. गुरुवारी संध्याकाळी सहा ते आठ आणि रविवारी दुपारी तीन ते सहा असं सलग आम्ही शिकत होतो.काका कुठल्याही पुस्तक अथवा नोटस हातात न घेता सहज शिकवत. circle,parabola,ellipse,hyperbola पासून सुरुवात करुन Three dimentional geometry पर्यंतचे सगळे धडे काकांनी तीन चार महिन्यात शिकवले. तीन तीन तास बसूनही मला कधी शिकायचा कंटाळा आला नाही याच श्रेय काकांना जितक आहे तितकच मधल्या वेळात दरवेळी काकू चहा आणि पोहे,उप्पीट,वडा असे चविष्ट खाय़ला काहीतरी आणून द्यायची त्यालाही आहेच. फार मजेचे दिवस होते ते. काकांच्या हुशारीबद्दल काका सोडून घरातील सगळ्यांकडून समजे.माझ्या दादांना तर् धाकट्या भावाच्या बुध्दीमत्तेचा प्रचंड अभिमान. दिवसातुन किमान एकदातरी त्याच्या हुशारीचं कौतुक व्हायचच.  काकांच्या बुध्दीमत्तेची जाणीव तेंव्हा मला प्रथमच झाली.अत्यंत अवघड प्रोब्लेम काका वेगवेगळ्या चारपाच पध्दतीने सोडवून दाखवीत आणि त्यातली शेवटच्या पध्दतीत तीन किंवा चार स्टेपसमधे रिझल्ट मिळे.  गणिताची गोडी मला होतीच पण त्यातली मजा मला काकांकडे आणि प्रयाग मॅडमकडे शिकल्यामुळे जास्त जाणवू लागली.काकांचा दिवस त्यावेळी पहाटे चारला सुरु होई. कॉलेजमधल्या जबाबदाऱ्या,आमची स्पेशल ट्युशन त्यांचे पुस्तक लिखाण हे सगळे सांभाळून भगवदगीतेचा अभ्यास चालू होता त्यांचा. पण हे सगळे असले तरी अभ्यास झाल्यावर काका सिनेमा,नाटक ,गाणी या पैकी कशावरही गप्पा मारीत .

    बारावीनंतर बी.एस्सी.ला मी काकांच्या कॉलेजमध्येच ऍडमिशन घेतली. माझ्या अडनावावरुन आणि तोंडावळ्य़ावरुन मी सरांची पुतणी आहे हे सगळ्या कॉलेजला माहित झाले. पण काकांच्या नावाचा गैरफायदा घ्यावा असे मला कधीही वाटले नाही. अतिशय शांत असणाऱ्या काकांचा  असा धाक होता ! मी एस.वाय ला असताना माझ्या दादांचे अकस्मिक निधन झाले. त्यावेळी काका आणि काकुने मला दिलेला मानसिक आणि भावनिक आधार मी कधीच विसरू शकणार नाही. कॉलेजमधे फि भरायची नोटीस लागताच काका मला बोलावुन पैसे आहेत कि मी भरू असे विचारायचे. मागितल्यावर पैसे देणारे भेटतात पण मागण्याची लाजिरवाणी वेळ  येवु   न  देण्याची काळजी घेणारे काका. अर्थात सुदैवाने त्यांना पैसे भरायची वेळ नाही आली.पण अडचण आली तर आपले कोणी आहे ही मोठा आधार त्यावेळी काकांनी दिला. मी तेंव्हा सकाळी ट्युशन्स घेत असे, संध्याकाळीही एखादी असायची. पण सुट्टीत कराय़ला काही नसे, मग काका त्याच्या पुस्तकाच्या हस्तलिखिताचे काम मला देत आणि त्याचे पैसे दे्त. माझा स्वाभिमान न दुखावता केलेली हि मदत मी कशी विसरु शकेन?
        पुढे एम.एस्सी ला ऍडमिशन घेतल्यावरही वेगवेगळ्या टप्प्यात काकांची मदत असेच.माझ्या नॅशनल स्कॉलरशिपचा फॉर्म आमच्या डिपार्ट्मेंटकडून मला मिळाला नव्हता, त्यांच्याकडून तो गहाळ झाला सबब माझा फॉर्म न मिळाल्याने मला स्कॉलरशिप न मिळाण्याची अडचण उभी राहिली. संकटकाळी सुटाण्याचा एकच मार्ग मला ठाऊक होता तो म्हणजे काका. त्यांना सगळे सांगितले त्यांनी त्यांच्या सगळ्या व्यापातुन चौकशा करुन मला कुलगुरुंना भेटायला सांगितले,माझ्यासाठी त्यांनी विद्यापिठाच्या कुलगुरूंकडे रदबदली केली आणि चुटकीसरशी माझे काम झाले.

        एम.एस्सी झाल्यावर मला लगेच नोकरी लागली आणि मी मार्गी लगले. काकांकडे अधुनमधुन चक्कर असेच.त्यांच्या मुलीही आता मोठ्या झालेल्या होत्या, मोठी मेडीकलला होती धाकटी  बी.एस्सी करत होती. मुली फारच  हुशार पण काका काकुंसारख्याच अतिशय साध्या आणि निगर्वी. काकाच्या तोंडून मी मुलींची फारशी स्तुती कधी ऐकली नाही. काका काकुंनी मुलींना रागावलेल ही मी कधी बघितल नाही.  काकांच्या मुली लाडक्या होत्या, कशा ते एकाच उदाहरणातुन लक्षात येईल.एका रविवारी मी काकांकडे गेले तर काका एकटेच घरी क्रिकेट्ची मॅच बघत बसले होते. मुली आणि काकू कुठे विचारल्यावर ते म्हणाले, "आज नेहरु स्टेडीयमवर मॅच आहे ना? मुलींना एकदा live match बघायची होती मग त्या तिघींना तिकिटे काढून दिली. गेल्यात तिकडे. "
" मग तुम्ही का नाही गेलात ?"
" घरी बघता येतेच ना? मग कशाला जाय़च म्हणून बसलोय घरी बघत, तुला नसेल बघायची मॅच तर टि.व्ही. बंद कर आपण गप्पा मारू "
 त्यावेळीही  मॅचचे तिकिट बरेच असेल , मुलींच्या हौशीसाठी काकांनी त्यांना पाठवले स्वतः मात्र घरात बघत होते.

        माझ्या लग्नाचे देवक त्यांनीच बसविले. पुढे सासरी गेल्यावर मी घर,नोकरी आणि संसार यात पार बुडून गेले. घरापासून दूर ऑफिस नवीन नोकरी आणि नवा संसार सगळ्याशी जुळवून घेण्यात मला काकांकडे जायला जमेना .फोन ही नव्हता तेंव्हा आंम्हा कुणाकडेच. कधी लग्नाकार्यात काकांशी गाठ पडत असे. भेटल्यावर ते घर,संसार यातले काही न विचारता विचारीत ,"नवीन काय वाचलस?" सुरुवातीच्या काळात खरोखरीच पुस्तक वाचनाचा मला छंद आहे या गोष्टीचा मला विसर पडावा अशी परिस्थिती होती.काकांच्या प्रश्णाने मी खजील होई. नवीन पुस्तकच काय़ रोजचा पेपर वाचणे मला जमत नव्हते.
" अहो ती आता संसारी झालीय,नोकरी आणि घर सांभाळून पुस्तके कशी वाचेल?" कुणीतरी माझी बाजू सावरुन घेत.
" बरोबर आहे, घरकाम आणि नोकरी म्हणजे तारेवरची कसरत आहे खरी पण बघ त्यातुन वेळ काढत जा"
        मग हळूहळू मी खरचच लायब्ररी लावली पुस्तके वाचायला वेळ काढू लागले. काकांनी वेळोवेळी मला विचारले नसते तर मी वाचनाच्या अपूर्व आनंदाला नक्कीच मुकले असते. काकांच्या मोठी लेक डॉक्टर झाली, पुढे लग्न होवुन ठाण्याला गेली. धाकटीच्या लग्नाच्या वेळी काका निवृत्त झाले होते, तरीही कॉलेजच्या सोसायाटीचे अजीव सभासद असल्याने ते काम करीत होते. मी त्यांना माझ्या घरी केळवणाला येण्य़ाचा आग्रहच नाही तर हट्ट्च केला आणि ते सगळे माझ्या घरी जेवायला आले.माझ्या हातचे ते त्यांचे पहिलेच जेवण होते. त्यामुळे मी केलेल्या प्रत्येक पदार्थाचे त्यांनी इतके कौतुक केले कि त्या कौतुकानेच माझे पोट भरले. (माझ्या नवऱ्याला तर असे कुणाचे कौतुक करायची आणि बघायची सवय नसल्याने सगळे जरा अतीच होतय असं वाटल असेल) निघतानाही ते म्हणाले, " शुभा ,तुझा अभ्यास मी बघितला होता पण तू इतका सुरेख स्वयंपाक करत असशील याची मला कल्पना नव्हती .."

            माझ्या नवऱ्याला नाशिकला झालेल्या जिवघेण्या अपघाताची बातमी समजल्यावर काका फार कासाविस झाले, ते सतत फोनवर माझी चौकशी करत.त्यांची डॉक्टर मुलगी सतत माझ्या संपर्कात होतीच, पुढे पुण्यात त्यांना आणल्यावरही ते रोज हॉस्पीट्ल मधे भेटायला येत आणि मला धीर देत.त्या सगळ्यांच्या सदिच्छांमुळेच मी त्या प्रसंगातुन सुखरुप बाहेर पडले.
           
            काकांना सहा भावंडे त्यातल्या एका भावाची मी मुलगी , माझ्या इतकेच बाकीच्या सगळ्या भाच्या पुतण्यांशी त्यांचे असेच सलोख्याचे संबध आहेत. प्रत्येकाच्या अडीअडचणीला ते असेच उपयोगी पडतात, प्रत्येकाच्या आनंदाच्या प्रसंगी आवर्जुन उपस्थित राहतात. त्यांचे स्वतःचे बाळपण वडील लवकर वारल्याने फार त्रासात गेले. देवाने अलौकिक बुध्दी दिली होती पण त्यावर शाळेखेरीज कुठले संस्कार नव्हते. पुढे पुण्यात आल्यावर माझ्या दादांकडून वाचनाचा वारसा मिळाला आणि त्यातून त्यांनी स्वतःचा विकास स्वतःच केला. घरातील सततच्या अडचणींवर शांत चित्ताने मात करीत आपल्या करीयरचा ग्राफ चढताच ठेवला. एम.एस्सी झाल्यावर त्यांना रिझर्व बॅंकेतील नोकरीचे नेमणुक पत्र मिळाले होते पण प्राध्यापक होण्याचा  निश्चय त्यांनी इंटर सायन्सलाच केला होता. त्यासाठी त्यावेळी सहज मिळालेला इंजिनियंरीगचा प्रवेश त्यांनी नाकारला असल्याने, त्यांनी एस.पी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी घेतली आणि नंतर माझ्या वडीलांबरोबर त्यांनी घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या निष्ठेने पार पाडल्या. त्यात धाकट्या भावाचे शिक्षण, दोन्ही बहिणींच्या लग्नाची कर्जे फेडणे अशा अनेक बाबी. त्यावेळी अमेरीकेत जावुन प्राध्यापकाची नोकरी मिळविणे हि त्यांना सहज शक्य होते आणि तसे केले असते तर आज ते किती वैभवात राहिले असते. पण घरच्या जबाबदाऱ्या टाकुन आणि आपल्या लोकांना सोडून ते गेले नाहीत.तिकडे राहूनही त्यांनी इकडे पैसे पाठवले असते पण त्यांच्या असण्याचा पुढे आम्हाला जो सतत फायदा झाला तो होवु शकला नसता. त्यांना झालेल्या या त्रासाचा  ते कधीही उल्लेख करत नाहीत. आम्हा प्रत्येक भावंडाला दहावी पास झाल्यावर काका बक्षिस देत. एकदा सहज बोलता बोलता त्यांनी सांगितले, " मी बी.एस.स्सी.ला विद्यापिठात पहिल्या क्रमांकाने पास झालो, मला सुवर्णपदक मिळाले. आमचे सगळे काका,मामा त्यावेळी सुस्थितीत होते पण मला कुणीही एक रुपयाही बक्षिस म्हणून दिला नाही. मी नोकरीला लागल्यावर ठरविले मी माझ्या भाच्यांना,पुतण्यांना महत्त्वाच्या परीक्षा पास झाल्यावर बक्षिस देईन. " परिस्थितीने काही माणसे कडवट होतात तर काही अशी. आम्हाला बक्षिस देणारे काका होते पण आमच्या पैकी कोणीच पुतणे,भाचे त्यांच्याइतके उज्ज्वल यश नाही मिळवू शकलो. तरी आमच्या यशाचे त्यांनी नेहमीच कौतुक केले. आजुनही दरवर्षी ते त्यांच्या दोघी बहिणींना वर्षातून एकदा घरी बोलावून त्यांचे माहेरपण करतात. त्यावेळी त्यांना चहा देखील ते करु देत नाहीत. पत्नीच्या वियोगाचे दुःख गिळून आपल्या मुलींच्या अड्चणींना ते खंबीर पणे उभे राहतात. त्यांच्या आनंदात सहभागी होतात. ठाण्याला पंधरा दिवस आणि पुण्याला पंधरा दिवस आस त्यांनी त्यांच साधारण वेळापत्रक आखलय, पुण्यात त्यांच्या कॉलेजच्या सोसायटीचे काम आजही ते उत्साहाने बघतात नुकतीच त्यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. तेथेही  त्यांच्या वागण्यामुळे सोसायटीतील सगळ्य़ांचे ते लाडके सर आहेत.

            काकांनी खूप मोठा काळ बघितला. स्वातंत्र्य मिळाल्यापासून नंतरच्या जवळजवळ ७० वर्षांच्या पदीर्घ काळाचे ते साक्षीदार आहेत. जग किती झपाट्याने बदलतय. पण काकांसारख बदलत्या जगाशी जुळवून घेणं क्वचितच कोणाला जमेल. त्यांच्या अमेरीकेतल्या मुलीकडे त्यांचे जाणे होत असते. तिकडे गेल्यावर इकडच्या लोकांशी संपर्कात राहण्याकरीता त्यांनी इ-मेल शिकून घेतले. माझ्या ब्लॉगची लिंक पाठवल्यावर तो वाचून त्यातल्या लेखांवर सुरेख अभिप्राय ही ते मेल वरुन पाठवतात. मेल वरुन ते सगळ्य़ांची खुशाली विचारतात. मोबाईल फोन हल्ली सगळेच वापरतात.पण ग्रुप बनवून सगळ्यांना मेसेजेस करणे त्यांनी कधीच सुरु केले.आता स्मार्ट फोन घेतल्यावर whatsapp च्या माध्यमातुन ते सगळ्यांशी connected असतात. त्यांच्या माजी विद्यार्थ्यांचा ग्रूप बनवून ते दररोज ग्रुप वरील बातम्या रस घेवुन वाचतात.  त्यामुळे आमच्या मुलांचेही ते लाडके आजोबा आहेत. माझ्या घरी आले की माझ्या मुलींच्या अभ्यासाची ते चौकशी करतातच पण त्यांच्याजवळ एखाद्या नवीन सिनेमाबद्दलही ते चर्चा करु शकतात. मुख्य म्हणजे मुली सांगत असले्ली प्रत्येक नव्या गोष्ट कमालीच्या औत्सुक्याने ते ऐकतात आणि जुन्या लोकांसारखे हल्लीच्या प्रत्येक गोष्टीला नावे ठेवुन आमच्या वेळी कसे छान होते असे न म्हटल्यामुळे मुले खुष असतात. माझ्या धाकट्या मुलीला बारावीत अपेक्षेपेक्षा कमी मार्कस मिळाले. तेंव्हा मला फोन करुन त्यांनी सांगितले, " शुभा, तिला रागावु नको हं, मुल वर्षभर अभ्यास करतात,  आजकाल जीवघेण्या स्पर्धा आहेत ,मुलांना खूप टेन्शन्स असतात. ऐनवेळी काही झाले असेल,कदाचित तिचे प्रयत्नही कमी पडले असतील पण या वयात मुलांना बोलल तर ते त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहत. ती हुशार मुलगी आहे, पुढे नक्की चांगले यश मिळवेल " हल्लीच्या मुलांना किती क्लासेस असतात, किती सुख सुविधा असतात आमच्या वेळी ... असही ते म्हणू शकले असते.

            अमेरिकेतुन आल्यावरही ते तिकडच्या संपन्न आणि सुखासिन आयुष्याचे सतत कौतुक आणि आपल्याकडच्या गोष्टींना नावे ठेवणे असे करत नाहीत कि तिकडेही आपल्या कडील कुटुंबवत्सलतेचे गोडवे गात नाहीत. ते मला म्हणतात, " मी गीतेचा अभ्यास करीत असताना लोक मला म्हणायचे तुम्हाला पुस्तक लिहायचे आहे का? तेंव्हा मी म्हणे मी त्यातील शिकवण अंगिकारण्याचा प्रयत्न करणार आहे. "

        काकांचा प्रयत्न  यशस्वी झालेला आहे असं मी नक्कीच म्हणू शकते. माझं पूर्वसुकॄत मोठ आहे म्हणूनच अशा दिलदार माणसाची पुतणी होण्याच भाग्य मला मिळाल.  काकांबद्दल मनात इतक काही आहे, पण मन भावनेने भरुन गेल कि शब्द सुचत नाहीत तसच माझ झालय. मनात आलेले असंख्य विचार मी शब्दात मांडायचा प्रयत्न केलाय. माझ्या भावना व्यक्त कराय़ला मी कवीवर्य बोरकरांचे शब्द उसने घेते जणू माझ्या काकांच्या बद्दलच त्यांनी हि कवीता लिहिली आहे

                             नाही पुण्याची मोजणी,  नाही पापाची टोचणी
                              जिणे गंगौघाचे पाणी ,जिणे गंगौघाचे पाणी...


Tuesday, January 12, 2016

मला वेड लागले.....

तंत्रज्ञानातील वाढत्या सुधारणांमुळे जग झपाट्याने बदलत आहे. "दहा दिशांचे तट कोसळले ध्रृव दोन्ही आले जवळी" हि कवीकल्पना अक्षरशः वास्तवात उतरली आहे.मोबाईल फोन ने जी क्रांती केलीय तिला तोड नाही. या फोनवरुन बोलणे हा फोनचा उपयोग विसरावा इतके त्यावरील विविध ऍप्स ने आपल्याला वेडे करुन सोडलय. ई-मेल,फेसबुक यांना केव्हाच रद्दीत टाकत whats app नामक जादुगाराने आपल्या जादुने साऱ्या समाजाला अक्षरशः वेड लावलय. अशाच माझ्या whats app वेडाची कथा

    मोबाईल वापरायला मी खूपच उशीरा सुरुवात केली होती.मला त्याची फारशी जरुर भासत नव्हती हे प्रमुख कारण, मुली पुरेशा मोठ्या झालेल्या होत्या,ऑफिस घरापासून जवळ होते ,घर आणि ऑफिस दोन्हीकडील लॅंड्लाईन फोन वरून लोकांच्या संपर्कात राहता येत असे.ऑफिसमधील बहुतेकांजवळ मोबाईल आले. ऑफिसमधील टेलीफोन ऑपरेटर आमच्या क्लाएंट्सचे फोन द्यायला कंटाळा करु लागले. मुली ,आई मोबाईल घे असा आग्रह करतच होत्या पण तो घेतला कि सांभाळण्याची ,तो बरोबर बाळगण्याची जबाबदारी येणार त्याचाच मला त्रास वाटत  होता. एकदा मुलीला घेउन  भाजी आणायला मंडईत गेले. तिथल्या भाजीवाली कडे मोबाईल बघितल्यावर मात्र ती वैतागली."आई, या भाजी वाली पेक्षा तुला जास्त पैसे मिळत असतील तरी तू मोबाईल घेत नाहीस?"
"नाही अगं कदाचित ती माझ्याहूनही जास्त कमवित असेल"
"पण तू जास्त शिकलेली तर आहेस,ऑफिसर आहेस आणि तरी अशी राहतेस ....."
दरम्यान मोठी मुलगी पुढील शिक्षणासाठी होस्टेलवर गेली आणि तिच्याशी वेळी अवेळी बोलण्याकरीता मोबाईल हवा असे वाटू लागले.
मग मोबाइल घेतला. पण तो माझ्यापेक्षा धाकटीच्या ताब्यात जास्त वेळ असे.माझ्या फोनच्या रिंगटॊन बदलणे,त्यात स्वतःच्या आवडीचे गाणी घालणे असे उद्योग ती कराय़ची. एकदा दुपारी साडेचार वाजता माझा फोन वाजला.एका अनोळखी मुलीचा आवाज होता.
"कोण बोलतयं?" मी विचारले
"काकू , मैत्रेयीला द्याना फोन, मी तिची मैत्रीण बोलतीय"
" मैत्रेयी घरी आहे, मी ऑफिसमधे आहे, तिला कसा देवू फोन"
" ठिक आहे, मी करते घरी फोन". म्हणजे या पठ़्ठीने खुशाल माझा नंबर मैत्रीणींना स्वतःचा म्हणून दिला होता !

    मला माझा फोन, माझा वाटून त्यातील सगळी फ़्ंक्शन्स समजावून घेई घेई पर्यंत स्मार्ट फोन्स बाजारात आले. त्याच्या ट्च स्क्रीन आणि विविध नवनव्या सोयींमुळे तरूण पिढीच्या तो हातात ने येता तरच नवल. माझी धाकटी लेक आता दहावी पास होउन कॉलेजला जायला लागली होती त्यामुळे तिला फोन घेवुन देणे क्रमप्राप्तच होते. तिने नव्या साध्या फोन पेक्षा वडीलांचा जुना टच स्क्रीन फोन वापरण्याचा समजुतदारपणा दाखविला. हा समजुतदारपणा पुढे आम्हाला खूपच महागात गेला कारण एक नवे खेळणे मिळाल्यासारखे अकरावीचे निम्मे वर्ष तिने त्या फोनशी खेळण्यात घालविले. ती बाहेर गेल्यावर तिला फोन करावा तर् तो कधीच लागत नसे वा ती कधी उशीर होणार असल्यास फोन करण्याची तसदी घेत नसे. फोन करायचा सोडून इतर सगळे उपयोग तिने केले. पुढे बारावीला तिने फोन वापरणे बंद करुन अभ्यासाला सुरुवात केली. दरम्यान तो फोन टाकण्याच्या लायकीचाच झाला होता ! तिला इंजिनियरींगला ऍडमिशन घेतल्यानंतर स्कुटर हवी का मोबाईल असे विचारताच तिने पुन्हा शहाण्यासारखा मोबाईल मागुन आमचे बरेच पैसे वाचविल्याचा मोठेपणा घेतला. दरम्यान whatsapp या नव्या जादुगाराचे आगमन झाल्याची गंधवार्ताही मला नव्हती. नवा फोन आल्यानंतर घरात वायफाय ही आले. लेकीकडे आणि तिच्या वडीलांकडेही स्मार्ट फोन होते. दोघांचा मुक्काम  रेंज जास्त असलेल्या खोलीतच असे. त्याच वेळी मोठी मुलगी उच्च शिक्षणाकरीता इंग्लंडला गेली.मग तिच्याशी संपर्क साधायला मोबाईल हेच माध्यम सोईचे वाटू लागले. घरच्या डेस्कटॉपवर स्काईप वरुन तिच्याशी बोलता येई पण तिकडच्या आणि इथल्या वेळेमधील साडेचार तासांच्या फरकामुळे शनिवार रविवार खेरीज बोलणे जमत नसे. तिलाही नवीन देश,नवीन मित्र मैत्रीणी आणि नवीन युनिव्हर्सिटीचे अप्रूप होते. प्रत्येक खरेदी केलेली वस्तू,प्रत्येक बनविलेला पदार्थ ,भेट दिलेले प्रत्येक ठिकाण याचे फटाफट फोटो काढून ते whatsapp वर टाकायचा तिने सपाटा लावला.मला तिची खुशाली आणि फोटो बघण्यासाठी छोटीच्या फोन म्हणजे पर्यायाने तिची मदत घ्यावी लागे. त्या करीता तिच्या फोनच्या अनिर्बंध वापराबद्दल गप्प बसणे मला भाग होते. माझ्यापुढे whatsapp साठी स्मार्ट फोन घ्यावा कि न घ्यावा असा नेहमीचा सवाल होता, कितीही नाही म्हटले तरी मध्यमवर्गीय मूल्ये सुटत नसतात. जुना फोन चांगला आहे, अजून त्याची काही तक्रार नाही (कशाला असेल तक्रार त्याचा वापरच मर्यादित ,फक्त फोन करणे आणि तो घेणे.घरात रेंज नसल्याने घरात तो बिचारा मुकाच असे.फोटो काढणे ,मेसेज करणे असे उद्योग मी कधी केले नाहीत, त्याचा रंग, स्क्रिन इतकेच नाही तर कि-पॅड हि छान होते. ) आणि वस्तुचा सुध्दा आपल्याला लळा लागतो त्यामुळे स्मार्ट फोन घेण्याचा विचार मी पुढे ढकलत होते.

    अखेर शेवटी नवऱ्याने अचानक स्मार्ट फोन भेट देवुन माझी बोलती बंद केली, आणि लवकरच ती करण्यामागची भूमिकाही समजली. झालं होत असं कि मोठी लेक परदेशात आणि घरी हे दोघे सतत मोबाईल मधे डोके घालून, माझ्याशी बोलाय़ला घरात कोणीच नाही. सतत त्यांच्या मोबाईल वरील मेसेज वाचन,forwarding  ने माझं डोके फिरुन जाई. घरी कोणाला बोलावले तरी आलेली व्यक्ती पण मोबाइलवरच नजर ठेवुन. आपापसात संवाद न होता त्यांचे मोबाईलवरील चॅटींग बघण्यातच वेळ जायचा. ऑफिसमधल्या मैत्रीणींकडेही स्मार्ट फोन आलेले होते,whatsapp वरील मेसेजची चर्चा चालायची त्यात मी कुठेच नसे. आता माझ्याकडेही स्मार्ट फोन आला, ’ज्याचा केला कंटाळा ते आलं वानवळा’ अशी गत असली तरी तो शिकणे,सांभाळून ठेवणे आणि त्याचा वापर करणे गरजेचे होतेच. लेकीने न सांगताच शिकविण्याची जबाबदारी घेतली. whatsapp डाऊनलोड करुन दिले, देवनागरी कि-बोर्ड डाऊनलोड करुन दिला. मी देखील उत्साहाने काही नव्या गोष्टी करायला सुरुवात केली.शाळेतील आमचा मैत्रीणींचा ग्रूप हल्ली परत भेटू लागला होता, त्यांचा एक ग्रुप मी बनविला.मुलीला आश्च़र्याचा धक्काच होता. आपली आई स्वतःचे डोके वापरुन काही करु शकते यावर मुलींचा विश्वास बसणे जरा अवघडच असते. हळूहळू शाळेच्या मैत्रीणींचा एक ग्रूप, कॉलेजच्या मैत्रीणींचा वेगळा ग्रूप, चुलत भाऊ,बहिणींचा एक तर मामे-मावस बहीण भावांचा असे अनेक ग्रुप झाले. काही मी बनविले तर काहींमध्ये मला घेतले गेले. एकंदरीत माझे जबरदस्त नेटवर्क तयार झाले. सकाळच्या सुप्रभात मेसेज पासून सुरुवात होई रात्री पर्यंत प्रत्येक ग्रूपवरुन अनेक मेसेजचा ओघ सुरु होई. काही चांगले मेसेज मी इकडून तिकडे पाठवी.काही चांगल्या कविता,सुंदर चित्रे,सुविचार असे बरेच काही वाचायला मिळे. पण काही दिवसांतच माझ्या लक्षात आले कि बरेच मेसेजेस वेगवेगळ्या ग्रुप वरुन पुन्हा पुन्हा फिरत. तेच तेच विनोद, त्याच त्याच कविता , त्यावरील ठराविक प्रतिक्रीया !

    हल्ली शहरातील धकाधकीच्या आणि धावपळीच्या आयुष्यात मनात असूनही एकमेकांच्या घरी जाणे खरोखरीच शक्य होत नाही , सोशल नेट्वर्कच्या या नविन माध्यमाने आपण एकमेकांच्या संपर्कात राहू अशा विश्वासाने मी अनेक ग्रूप्सची सभासद झाले होते.पण संपर्कात राहणं साध्य झाल अस म्ह्णायला जीभ कचरते. एकमेकांची खुशाली समजत होती असही नाही. निरर्थक,वायफट बडबड (बडबड नाही म्हणता येणार कारण ते चॅटींग म्हणजे टायपिंगच असे) भरपूर चाले. एखादी मैत्रीण परदेशात जाऊन आली की तिचे फोटो बघून मजा यायची पण एखाद्या मैत्रीणीच्या आजारपणाची बातमी कशी समजणार? तिला बरे वाटल्यावर तिने काही लिहिले तरच कळणार. एखाद्याच्या घरातील मृत्यू्ची बातमी अशीच कुणकडून मेसेजच्या स्वरुपात समजे मग तिथेच सगळ्य़ांनी RIP लिहायचे( हि RIP ची भानगड समजायला मला थोडा वेळच लागला Rest in peace) पुण्यातल्या बहिणीला जावई आलाय हे अमेरीकेच्या बहिणीकडून समजले तेंव्हा मला या नेटवर्कची महती खऱ्या अर्थाने समजली. मंगेश पाडगावकरांसारखा कवी गेला कि त्यांच्या कवितांची बरसात सुरु झाली पण त्यातली किंवा त्यांची एक तरी कविता संपूर्ण   पाठ असणारे किती जण त्यात होते? ज्यांच्याकडे त्या कविता आल्या त्यातल्या किती जणांनी त्या मनःपूर्वक वाचल्या ?

    पण आता मला एक नवाच साक्षात्कार झालाय असं वाटत, जगाचे एकूणच संसाराचे आसारपण समजण्याकरीता whatsapp सारखं साधन नाही. तिथल्या निरर्थक मेसेजेसची गर्दी, खोटया फसव्या शुभेच्छा, वेगवेगळ्या स्माइली, एकमेकांची फार काळजी असल्याचे दाखवणे हे सार खऱ्या जगापासून आपल्याला दूर ठेवत असतं. आपल्या संत महंताना आपल्या सामान्यांचं रोजच जगण बघुन असच वाटत असेल का? आपण सारे परमेश्वराची खरी भक्ती करायची सोडून ,आत्म्य़ाला काय हवय याचा विचार करायचा सोडून नश्वर देहाच्या सुखामागे धावण्यात अवघे आयुष्य व्यर्थ घालवत असतोच.  त्यात आता हि virtual reality. म्हणजे आपला विकास होतोय असं आपण म्हणतो ती खरच प्रगती आहे कि अधोगती? या आणि अशासारख्या अनंत विचारांनी माझ मन व्याकुळ होत.

    whatsapp हे एक व्यसनच आहे ज्याच्या अगदी आहारी नाही तरी बऱ्याच अंशी मी आधिन झालेली आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचा मी निकराचा प्रयत्न चालू ठेवला आहे. whatsapp सॉफ्ट्वेअर फोन मधुन काढुन टाकणे हा एक सोपा मार्ग आहे. पण तो खरा मार्ग नाही, कारण जे नाही ते असावे या साठी मन फारच बंड करुन उठते.   हळूहळू ग्रूपवरील गोष्टी forward न करणे, त्यावार प्रतिक्रिया न देणे अशी सुरुवात केली आहे. माझ्या मोबाईल वर whatsapp असून ते मी वापरले नाही तर मी माझ्या मनावर खऱ्या अर्थी विजय मिळविला असे होईल.
    फार वर्षांपूर्वी ’लाखाची गोष्ट’ नावाचा सिनेमा बघितला होता. राजा परांजपे आणि राजा गोसावींचा गाजलेला चित्रपट. या दोन कफल्लक कलावंत तरुणांना श्रीमंत मुलीचा बाप तुम्हाला पैसे मिळवण्याचीच नाही तर खर्च करायची देखील अक्कल नाही असे म्हणून एक लाख रुपये महिनाभरात खर्च करायला सांगतो आणि पुढे ते पैसे कसे उधळायला लागतात पण त्यांना अधिकाधिक पैसे मिळतच जातात याचे खूप छान चित्रण आहे, पण त्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ते दोघे त्या महिनाभरात आपली कला विसरतात,सतत त्यांच्या डोक्यात पैशाचेच विचार.मग ते मुलीच्या वडीलांकडे जावुन म्हणतात," नको हा पैसा  आम्हाला आमच्या कलेपासून तो आम्हाला दूर नेतो" आणि तीच खरी लाख मोलाची गोष्ट होती. whatsapp च्या नादाने चांगली पुस्तके वाचणे, आवडत्या कवितांचे पुस्तक घेवून त्या पुन्हा पुन्हा वाचणे.मनातले विचार कुठेतरी लिहून व्यक्त करणे या सगळ्याचा मला विसर पडत चालला आहे. तेंव्हा whatsapp ला विसरणे हे लवकरात लवकर केलेच पाहिजे.  नव्या वर्षाचा हा संकल्प असेही मी म्हणणार नाही कारण बहुतेकसे संकल्प अल्पजीवी असतात.लवकरात लवकर माझा संकल्प सिध्दीस जावो हि इश्वरचरणी प्रार्थना.