Friday, November 7, 2014

अजब तुझे सरकार

         अकबर बादशहा आणि बिरबलच्या कथा अबालवृध्दांमध्ये लोकप्रिय आहेत, शिवाय त्या आजच्या काळातल्या प्रसंगाना लागु होणाऱ्या आहेत. अशीच एक कथा.
एकदा विरबलाचा दुःस्वास करणाऱ्या लोकांनी बादशहाचे कान भरले. त्यांनी अकबराला सांगितले.बिरबल हा अतिशय भ्रष्ट आहे. तो पैशाची अफरातफर करतो, प्रत्येक कामात स्वतःचा खिसा कसा भरेल यावर त्याची नजर असते इ.इ. बादशहा्ला संताप आला.बिरबल आणि असं वागतो? त्याने दोन दिवस विचार केला.  चतुर बिरबलाच्या नजरेतुन बादशहाच्या वागणुकितला फरक सुट्णे शक्य नव्हते. त्याने त्याचा कार्यकारण भाव शोधुनही ठेवला होता.पण आपण होवुन बादशहाला काही विचारायचे नाही असे त्याचे धोरण होते. बादशहाने बऱ्याच विचारांती बिरबलला बोलावले आणि सांगितले," उद्यापासून तू दरबारातील कुठलेच काम करायचे नाहीस. सकाळी उठून नदीवर जायचे दिवसभर तेथेच बसायचे"
"जशी आज्ञा ,सरकार" बिरबल उत्तरला.
बादशहा मनाशी म्हणाला ," आता बिरबल कसे पैसे खाईल तेच बघतो" त्याने त्याचा एक गुप्तहेर बिरबलावर नजर ठेवायला पाठविण्याचीही खबरदारी घेतली.
आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बिरबल  नदीकाठावर जावुन बसला. लोक बिरबलाकडे नवलाने बघत होते तो शांतपणे पाण्याकडे पहात होता
हळूहळू नावाडी येवु लागले, पलिकडे जाण्याकरीता लोक येवु लागले.नावाडी आपल्या नावा सोडू लागले तसे बिरबल ओरडला ,"थांबा. कुणीही नावा पाण्यात सोडायच्या नाहित. "
"का? "
"तशी सरकारची आज्ञा आहे"
"पण मग आम्ही पलिकडे जायचे कसे?" लोकांनी एकच गलका केला
"आमचा धंदा कसा चालणार?" नावाडी विचारु लागले
"पण नावा न जावु द्यायच कारण काय?, हि आज्ञा कशासाठी?"
"संथ पाण्यातील लाटा मोजायच काम चालू आहे, नावा सोडल्या कि लाटा नीट मोजता येत नाहीत... बिरबलाने पाण्याकडे पहातच उत्तर दिले."
"किती वेळ चालेल हे काम?"
"न संपणार काम आहे हे? किती वेळ कसं सांगता येईल?"
"मग आंम्ही कराव तरी काय?"
"ते मी काय सांगु, चला बाजुला व्हा ,मला माझ काम करु द्या"
लोकांनी जरा वेळ वाट पाहिली, आपापसात विचारविनिमय केला. आणि त्यातल्या एकाने अक्कलहुशारीने एक तोडगा काढला
बिरबलाजवळ जावुन तो म्हणाला
"हे बघा,बिरबलसाहेब मला जरा फार महत्वाचं सामान पलिकडे पोचवायचयं, तुम्ही परवानगी द्या आणि हे जवळ असुद्या, एक नाव गेली तर लाटांवर जास्त परीणाम होणार नाही"
बिरबलाने त्याच्याकडे पाहिले त्याने हळूच दहा नाणी बिरबलाच्या हातात सरकवली .सराईतासारखी ती आपल्या अंगरख्यात टाकून त्याला परवानगी देवुन बिरबल नदीकडे बघू लागला.
एक होडी गेली. बाकिच्यांनीही त्याचीच युक्ती वापरली आणि थोड्या थोड्या वेळाने एक एक करीत सगळ्या नावा निघुन गेल्या आणि बिरबलाचा खिसा नाण्यांनी भरुन गेला.
बादशहाचा माणूस चकित नजरेने हे सगळे पहात होता. त्याने संध्याकाळी राजाला सगळा वृत्तांत सांगितला. राजा अवाक झाला.

त्याने बिरबलालाच स्पष्ट जाब विचारायचे ठरवले आणि दुसऱ्या दिवशी खाजगी मुलाखतीस हजर व्हायला सांगितले. बिरबल सकाळी बादशहाकडे गेला
बादशहाने त्याला आधी त्याच्याबद्दल काय समजले म्हणून त्याला सजा म्हणून नदीतीरी जाण्यास सांगितले वगैरे सगळे सांगितले आणि तो म्हणाला
"नदी किनाऱ्यावर नुसते बसायला सांगितले तरी तू त्यातुन पैसे काढलेस? इतक्या खालच्या पातळीवर तू कसा गेलास? "
"खाविंद, माझ्याविरुध्द कुणीतरी  तुमचे कान भरलेत हेच मला तुम्हाला दाखवुन द्यायच होतं, मुळात मी पैसे खाणाराच असतो तर आज माझ्या नाहीतर माझ्या बायकामुलांच्या नावावर मी आजवर अमाप दौलत जमा केली असती.माझं घर तुम्ही बघताच आहात. मला हे सिध्द करायच होतं कि पैसे खाणारा माणुस त्याला कुठेही ठेवलत तरी ते मिळवायचे मार्ग शोधतो. तेंव्हा त्याच्या कामाच्या जागा बदलणं हा त्यावर उपाय नव्हे. ती वृत्ती कमी कशी करता येईल ते बघितल पाहिजे. हे कालच्या दिवसात मिळालेले पैसे , सरकारजमा करा. तसेच ज्यांनी ते दिलेत त्यांनाही समज द्या कारण पैसे खाण्याइतकाच खाय़ला घालण हा गुन्हा आहे हे रयतेला समजल पाहिजे."
बादशहाला अर्थात स्वतःची चूक समजली.त्याने परत बिरबलाला प्रधानपदी बसवलं.

       हि कथा आत्ता आठवायच कारण ,सध्या आलेलं नव सरकार. भ्रष्टाचार मुक्त भारत बनवणं इतक सोप आहे? मुळात लोकांच्या मनात वर्षानुवर्षे मुरलेल्या सवयी सहजासहजी जातील? सरकारी कामांच्या,ते कारण्याच्याही काही पध्दती आहेत. मा.पंतप्रधान स्वतः 'task master ' आहेत. मी हेडमास्टर नाही, टास्कमास्टर आहे असं ते शिक्षकदिनी संवाद साधताना म्हणाले. ते आहेतच तसे. पण गेल्या सहा दशकात सरकारी खात्यांमधे कामापेक्षा काम करण्याचा दिखावा करायची जी सवय लागलीय ती मोडण गरजेचं आहे. हि सवय घालवण हे या टास्क मास्टरला मोठं टास्क ठरणार आहे !

आक्टोबरमधे महात्मा गांधीजींच्या जयंतीचे औचित्य साधुन मा.पंतप्रधानजींनी स्वच्छ भारत अभियान सुरु केले.अतिशय स्तुत्य उपक्रम आहे हा. कुठल्याही कामाची सुरुवात घरापासून करायची या तत्त्वानुसार सर्व सरकारी कार्यालयांमधे ’स्वच्छ भारत अभियान’ चे फतवे गेले. झाले, सर्क्युलर आले कि मिटींगा सुरु झाल्या, चर्चा झाल्या,बैठका झाल्या.’स्वच्छ भारत कमिट्या’ तयार झाल्या. त्यांनी जोरदार कामाला सुरुवात केली. आधी भरपूर बजेट सॅंक्शन करुन घेण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या बजेट मधुन पोस्टर्स,बॅनर्स बनविली. स्वच्छ भारत बनविण्याच्या शपथपत्रांच्या शेकडो प्रती काढल्या. त्या कर्मचाऱ्यांना वाटल्या.शपथ घेवुन झाल्यावर त्या कागदावर त्यांच्या सह्या घेवुन त्याची फाईल बनविली.
प्रत्येकाला ’स्वच्छ भारत’  असे लिहिलेले बॅचेस दिले.बॅचेस लावुन ,प्रतिज्ञा म्हणून,पोस्टर्स,बॅनर्स लावुन लोकांनी उरलेल्या वेळात जमेल तेवढी स्वच्छता केली त्याचे असंख्य फोटो आणि व्हिडीओ बनवले. ते दुसऱ्या दिवशी फेसबुक आदी सोशल साईट्स वर झळकले. यात बॅनर्स, पोस्टर्स,बॅचेसचा जो कचरा तयार झाला त्याची आवश्यकता होती का?

सरकारी कार्यालयातला शिपाई,सफाईवाला देखील किमान दहावीपर्यंत गेलेला असतो. त्याच्याकडे टि.व्ही आहे,मोबाईल आहे.’स्वच्छ अभियानाबद्दल’ सगळ्यांना सगळे माहित आहेच तर  मग बॅनर्स,  पोस्टर्स,बॅचेसचा खर्च आणि पसारा का? आपला देश स्वच्छ असावा असं आपल्याला मनापासून वाटतं, कधीकधी ऑफिसमधेसुध्दा असलेला कचरा पटकन झाडून साफ करावा असं कित्येकांच्या मनात येतही असेल,पण आपल्या पोस्ट्ला,पोझिशन ला ते काम करणे शोभणार नाही,काहीजण आपली चेष्टा करतील अशी भीड बरेचदा वाटते.मा.पंतप्रधानांनीच स्वतः हातात झाडू घेतलाय म्हणल्यावर मनातील अशी जळमटे झटकुन फक्त सफाई करणे जमायला काय हरकत होती? पण नाही, सरकारी खात्यांमधे प्रत्येक गोष्टीचा असा बोजवाराच करायची वर्षानुवर्षाची हि सवय लागलीय ती कशी जाणार?  प्रत्येक कृती करताना त्यातुन मला काय मिळणार? माझ्या सी.आर.मधे काय लिहिले जाइल? माझ्या कामाने माझा बॉस खुष कसा होईल आणि मला प्रमोशन कसे मिळेल या अट्टहासापायी सगळ्या गोष्टी कागदावर आणण्याची सवय लागते. कामाचा मूळ उद्देश्य बाजुला राहतो त्याचा उपयोग आपल्या वैयक्तिक विकासाची शिडी म्हणून कसा करता येईल एवढच बघितल जातं. आणि म्हणूनच या आणि अशा अनेक चांगल्या योजनांच निव्वळ हसं होत. हि सुरुवात मंत्री महोदयांपासून होते. कालच टि.व्ही.वर दिल्लीमधील ’स्वच्छता अभियान’ अंतर्गत एका कार्यक्रमाला गेलेल्या सत्ताधारी राजकीय पक्षातील एका जेष्ठ व्यक्तिबद्द्ल दाखवित होते. ती व्यक्ती ’स्वच्छता अभियान’ ला जाणार म्हणून एका स्वच्छ जागेवर आधी कचरा पसरला आणि नंतर त्यांनी तो झाडला त्याचे फोटो काढून सोशल मिडीयावर टाकले. पण त्या आधी कचरा टाकणाऱ्यांचे फोटो कुण्या पेपरवाल्याने टिपले आणि मग काय मिडीयाच्या हाती कोलितच मिळाले. सगळा वेळ तिच चर्चा! त्यावर त्या जेष्ठ व्यक्तिची सारवासारव . एका अतिशय चांगल्या सर्वसामान्यालाही पटणाऱ्या, जमणाऱ्या आणि जगात आपल्या देशाची प्रतिमा चांगली बनवली जाणाऱ्या उपक्रमाची वाताहात आपलेच निवडून दिलेले नेते कशी करतात याच हे बोलक उदाहरण.

यात त्यांची तरी चूक कशी म्हणावी? ’स्वच्छता अभियान’ अंतर्गत मा.पंतप्रधानांनी झाडू घेवुन स्वच्छता कशाला करायला सांगायची? जगात इतके स्वच्छ सुंदर देश आहेत त्यांचे दौरे करायला पाठवायला हव होतं.त्यानिमित्ताने युरोप,अमेरीका,चीन,जपान,सिंगापूर,मलेशिया अशा नानाविध स्वच्छ सुंदर देशांची पहाणी करायला हे मंत्रीमहोदय, सरकारी आधिकारी गेले असते. पहाणी केली असती, रीपोर्ट लिहिले असते. सुधारणा सुचविल्या असत्या. देश नाही तरी देशाचा खजिना थोडाफार स्वच्छ झाला असता. ते सोडून खुशाल त्यांना सफाई कराय़ला लावली.ज्यांनी घरात कधी पाण्य़ाचा ग्लास हातानी घेतला नाही त्यांच्या हातात चक्क झाडू, फारच झाल हे? यासाठी केला होता का अट्टहास?

जे ’स्वच्छ भारत अभियानाचे’ तसेच एकता अभियानाचे. सरकारी कार्यालयात आधीच कामाला वेळ पुरत नाही आणि आता तर काय दर महिन्याला नव्या शपथा. स्वच्छ भारत घेवुन झाली. मग दक्षता सप्ताह सुरु झाला , त्यात भ्रष्टाचार करणार नाही अशी शपथ घेवुन झाली.मग सरदार पटेलांची जयंती एकता दिन घेवुन आली, कि घेतली एकतेची प्रतिज्ञा. इतक्या शपथा आणि प्रतिज्ञा घेऊन त्याचा उपयोग होणार आहे का? शपथा या केवळ एक उपचार ठरतो, त्याचा व्यवहारात उपयोग करायचा आहे ह्याचाच मुळी विसर पडतो.

इकडे जनतेने एकतेच्या शपथा घ्यायच्या, आणि पंचविस वर्ष युतीत राहिलेल्या राजकीय पक्षांनी सत्तेच्या हव्यासापोटी एकी तोडून राज्याचे भले करण्याऐवजी आपापसात भांडायचे या विरोधाभासाला काय म्हणायचे?

लोकांची मानसिकता बदलणे हे अशक्य नसले तरी अवघड काम जमले तरच ’अच्छे दिन ’ येतील न पेक्षा आहेत त्या दिवसांना ’अच्छे दिन’ समजायची तयारी आपण ठेवावी हे चांगले .

Monday, November 3, 2014

जन्माची गाठ

लहानपणी माझी आजी मला एक गोष्ट सांगत असे. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात या संदर्भात ती गोष्ट होती.
रुपवती नावाची एक राजकन्या होती ,ती एकदा नदीवर स्नानाला निघाली. बरोबर नोकर चाकर ,दास-दासी असा लवाजमा होता. नदीच्या  तीरावर जरासे लांब एक ऋषी बसले होते, ते दर्भाच्या काड्या घेवुन पाण्यात टाकत होते. राजकन्येचे कुतूहल  जागॄत झाले. तिने आपल्या नोकराला सांगितले ," जा त्या ऋषींकडे आणि ते काय करताहेत हे विचारुन ये"
नोकर गेला आणि त्यांनी विचारले त्या मुनींना ," महाराज आमच्या राजकन्या विचारत आहेत तुम्ही काय़ करीत आहात?"
ऋषी दर्भाच्या दोन काड्या घेवुन त्याची गाठ मारत होते आणि ती पाण्यात सोडत होते. त्याच्या कडे न बघताच ते म्हणाले," मी जन्माच्या गाठी बांधतो आहे."
नोकराने राजकन्येला जावुन ऋषी काय करताहेत ते सांगितले.
राजकन्येला फारच मजा वाटली. ती म्हणाली," जा त्यांना विचार माझी गाठ कुणाशी आहे?"
नोकर पुन्हा ऋषीजवळ गेला आणि म्ह्णाला ," महाराज, आमच्या राजकन्या विचारत आहेत त्यांची जन्माची गाठ कुणाशी आहे?"
ऋषींनी एकवार त्याच्याकडे पाहिले, राजकन्येकडे पाहिले हातात दोन काड्या घेतल्या त्याची गाठ मारुन पाण्यात टाकली आणि म्हणाले, " तिला सांग तिची गाठ तुझ्याशीच आहे"

नोकर चाट पडला. थोडा घाबरला, राजकन्येला सांगाव तरी पंचाईत न सांगाव तरी पांचाईत. तो पाय ओढत ओढत तिच्या जवळ गेला. तिने उत्साहातच विचारले," मग काय म्हणाले मुनीवर? कुणाशी आहे माझी गाठ?, सांग लवकर"
नोकर मान खाली घालून म्हणाला ," ते म्हणाले... तुमची गाठ ...माझ्याशी आहे !"
राजकन्या संतापाने लाल बुंद झाली तिच्या तोंडातून शब्द फुटेना क्षणभर तिला आपण कुठून विचारले असंही झालं या यःकिंचित नोकराबरोबर मी जन्म काढायचा? त्या ऋषींना काही कळतय का नाही? आणि या मूर्खाला तरी काही अक्कल आहे का? खुशाल येवुन मला सांगतोय माझ्याशीच तुझी गाठ आहे ..
राजकन्येच्या हातात स्नानासाठी आणलेली चांदिची लोटी होती. संताप अनावर झाल्याने तिने ती नोकराच्या अंगावर फेकून मारली आणि म्हणाली, " चालता हो माझ्या राज्यातून,तोंड दाखवू नको मला, लायकी आहे का तुझी माझ्याबरोबर जन्म काढायची?"

नोकर बिचारा.., लोटी कपाळाला लागून त्याला खोक पडली.भळभळत्या जखमेने आणि तेवढ्याच जखमी मनाने तो वाट फुटेल तसा चालायला लागला.
बराच भटकला. लहान मोठी कामे करत शिकत गेला, अशीच काही वर्षे गेली.
भटकत भटकत तो एका राज्यात आला . त्या राज्याचा राजा वारला होता .राजा निपुत्रिक होता.राज्यावर कुणाला बसवायचे असा प्रश्ण होता. मग मंत्र्यांनी एक युक्ति काढली.राजाच्या आवडत्या हत्तीच्या सोंडेत माळ दिली आणि दवंडी पिटवुन सगळ्या प्रजाजनांना एका पटांगणात बोलावले. हत्तीला तेथे सोडले, हत्ती ज्याच्या गळ्य़ात माळ घालेल त्याला गादीवर बसवायचे असे ठरले.
     हा नोकर तेथे आलेला होता.गर्दीत उभा राहून तो मजा बघत होता, अचानक हत्ती त्याच्या जवळ आला आणि त्याच्याच गळ्यात माळ घातली ! आणि योगायोगाने तो त्या राज्याचा राजा झाला. चंद्रसेन या नावाने राज्यकारभार बघु लागला.
   
    इकडे राजकन्या  रुपवती उपवर झाली.राजाने तिच्या स्वयंवराची तयारी केली. आजुबाजुच्या राज्यांच्या राजपुत्रांना, सरदारांना आमंत्रणे धाडली. चंद्र्सेनालाही आमंत्रण आले होते. ठरल्या दिवशी राजाच्या राज्यात स्वयंवरासाठी सगळे जमले.  रुपवती वरमाला घेवुन आली. एकेका राजपुत्रांना बघत त्यांच्याबद्दलची माहिती ऐकत ती पुढे आली , सगळ्य़ांमधे तिला चंद्रसेन आवडला.तिने त्याच्या गळ्यात माळ घातली. राजाने थाटामाटात विवाह करुन दिला. रुपवती चंद्र्सेनाची राणी बनुन त्याच्या राज्यात आली.

    लग्नाच्या पहिल्या रात्री चंद्रसेनाच्या कपाळावरील जखमेची खूण बघुन ती म्हणाली," हे काय, कधी लागल तुम्हाला? कसली हि खूण?"
त्यावर चंद्रसेन हसत म्हणाला ," तूच फेकून मारलेल्या लोटीच्या जखमेची हि खूण आहे .."
एवढं सांगून आजी म्हणत असे ," अशा लग्नाच्या गाठी बांधलेल्या असतात. तुमची ज्याच्याशी गाठ आहे, तो तुम्हाला शोधत येतो किंवा तुम्ही त्याला शोधत जाता. योग्य वेळ तेवढी यावी लागते."
   
     गोष्टी  ऐकण्याच्या (पुढे वाचण्याच्या) छंदामुळे सहसा फारशा गोष्टी न सांगणाऱ्या आजीकडून हि गोष्ट मी लहानपणी खूप वेळा ऐकली.त्यावेळी मी तिच्यावर फारसा विचार केला नव्हता. माझ्या स्वतःच्या लग्नाच्यावेळी मला या कथेचा विसर पडला होता. आम्हा बहुतेक सगळ्या बहिणी-भावांची लग्ने चहापोहे कार्यक्रमातुनच ठरली.मुलींना निवडीला फारसा वाव द्यायची पध्दत नव्हती. मुलाकडून होकार आला कि जुजबी चौकशा करुन लग्ने पार पाडली आणि बहुतेक सगळी निभावली देखील.
   
    आता आमच्या पुढच्या पिढ्या लग्नाच्या वयाच्या झाल्या आणि मला अचानक आजीच्या गोष्टीचा आठव आला. आजकाल पन्नास-साठ टक्के लग्ने मुले स्वतःच ठरवित असतील.तरी अजूनही ठरवुन लग्ने होतात.पूर्वीचा चहा-पोहे कार्यक्रम नसेल, नेट वरुन माहिती मिळते  किंवा मॉडर्न विवाह संस्था, विविध मॅट्रिमोनी डॉट कॉम आहेत. लग्ने अशा पध्दतीने ठरताना निकष कसे लावले जातात हे बघताना रुपमतीची आठवण झाली. नोकर असताना ज्याला तिने मारले तोच राजा झाल्यावर तिला आवडला. आजकालच्या मुली सुध्दा मुलगा बघताना त्याचे पॅकेज बघतात. त्या स्वतः लाखोंनी मिळवत असतात. समानतेच्या युगातही मुलाचा पगार स्वतःपेक्षा जास्त हवा असतो आणि त्याचे वर्चस्व मात्र नको असते.मुलाचा स्वतःचे घर हवे,गाडी हवी ह्या तर मूलभूत अटी आहेत.
    रुपमतीच्या वेळी स्वयंवर होत, हल्ली मुलींची संख्या कमी झाल्यामुळे जवळजवळ पुन्हा तशीच परिस्थिती आली आहे. मुलींना खूप चॉईस आहे.अगदी जेमतेम पदवी मिळवलेली मुलगी पण इंजिनियरच मुलगा हवा शक्यतो आय.टी.मधलाच हवा.किमान लाखभर पगार महिन्याला कमावणारा हवा अशा अपेक्षा सांगतात.मग उच्चशिक्षित मुलींबद्दल तर काय बोलावे?
    माझं सासरच घर दक्षिण कर्नाटाकात अगदी लहानशा खेड्यात आहे. अत्यंत निसर्गसंपन्न,प्रदूषण विरहित शांत,सुंदर असा तो प्रदेश आहे.पण आता घराघरातली तरुण मुले शिक्षण झालं कि बंगलोर,पुणे ,हैद्राबाद गाठतात.तिथल्या उपनगरात भाड्याच्या घरात राहतात.तासंनतास प्रवास करुन नोकऱ्या करतात. मी एकदा तिकडे गेले त्यावेळी म्हणाले," आपली वास्तू, शेती जतन करण्यासाठी मुलांनी इथे राहिले पाहिजे"
त्यावर एक बाई अगतिकतेने म्हणाली," आम्हाला आमची मुलं जवळ राहिली तर आनंदच आहे पण करणार काय? इथे राहिलं तर त्यांची लग्न होत नाहीत. शहरातल्या मुलींना तर खेड्यात आवडतच नाही पण इथल्या मुलींनाही शहरातच जायला आवडतं, त्यांना शहरात नोकरी करणारा मुलगा हवा आसतो ,मग काय नाइलाजानं आमची मुल जातात शहरात"

    आजीच्या गोष्टीतला लग्नगाठी बांधणारा ऋषी हल्ली कंटाळलेला दिसतो, त्याने बांधलेल्या गाठी पक्क्या नसतात, कारण इतकी चिकित्सा करुनही झालेली लग्ने टिकतीलच याची खात्री नसते. लग्न करुन दिल , मुलगी सासरी गेली की आपली जबाबदारी संपली. दिल्या घरी ती राहणारच. आपण ती सुखीच आहे असे मानायचे हे दिवसही गेले. एकमेकांशी नाही पटले कि वेगळे होणेही सध्या सर्रास झालयं. लग्नानंतर पहिल्या चारपाच वर्षात विभक्त झालेली जोडपीच बघायला मिळतात असे नाही तर आमच्या पिढीतीलही वीस-पंचवीस वर्षाहून एकत्र राहिलेल्यांना अचानक आपलं पटत नसल्याचा साक्षात्कार होवुन ते विभक्त झाल्याची बरीच उदाहरणे मी बघत आहे. अर्थात अचानक असं म्हणण ही तितकस बरोबर नाही. कारण अचानक दिसून येतात ते विभक्त झालेत असे परीणाम,कारणे हळूहळू घडलेलीच असतील. पण अस वेगळ होण्य़ाचा निर्णय घ्यायला सध्याचं वातावरण,परिस्थिती कारणीभूत असणार. नाहीतर आमच्या आधीच्या पिढ्यांमधे सुध्दा काय सगळे प्रेमातच चालल होतं असं थोडीच आहे? वर्षनुवर्ष मन मारुन कित्येकांनी संसार केले. म्हणजे त्यावेळी ऋषींच्या गाठी तेवढ्या पक्क्या होत्या कि कुणाची बिशादच नव्हती एकदा बांधलेली गाठ सोडायची !.

    रुपवतीला तरी वर निवडायचा आधिकार होता. नंतरच्या कित्येक पिढ्यांनी आंतरपाटापलिकडील व्यक्तिला तो दूर झाल्यावर पहिल्यांदा पाहिले आणि नंतरचा सारा जन्म त्याच्याबरोबर घालवला. मुलीचा नवरा गेला तर तिने त्याचे नाव उरलेला जन्मभर लावले आणि एकाकी आयुष्य काढले. बायको वारली तर पुरुषाने पुन्हा दुसरीबरोबर तसाच संसार केला. लग्नापूर्वी एकमेकाशी अजिबात ओळख नसलेल्या नवरा -बायकोंच्या स्वभावात जमीन-अस्मानाचा फरक असे,  रागीट नवऱ्याला शांत स्वभावाची बायको, उधळ्या माणासाला काटकसरी बाय़को आणि रसिक कवीमनाच्या माणसाला अरसिक बायको अशा अनेक जोड्या आपल्या आजुबाजुला बघितलेल्या आहेत.तरी त्यांचे प्रपंच सुखाचे झाले कदाचित परस्परांच्या विरुध्द स्वभावांमुळेच त्यांच्या संसाराच्या नौका पलीकडच्या तीराला लागत असतील. तडजोड कारण्याची,जमवुन घ्यायची सवय लहानपणापासून बरीच भावंडे असल्यामुळे, बिकट आर्थिक परिस्थितीमुळे ,एकत्र कुटुंब पध्दतीमुळे लागलेली असायची. लग्न झाल्यावरही बहुतेकांना किमान सासु-सासऱ्यांबरोबर रहावे लागत होते. संस्कारांमुळे म्हणा,समाजाच्या भितीने म्हणा नवराबायकोंनी आईबापांपासून वेगळॆ रहाणे हेच क्रांतीकारक मानले जात होते मग त्या दोघांनी पटत नाही म्हणून विभक्त होणे हि फार दूरची बाब होती.

    यात त्या पिढ्या किंवा आमच्या पिढ्या फार सुखात आणि गुण्यागोविंदाने नांदल्या असं म्हणण हि धाडसाच ठरेल. ते फारस खरही नाही पण आताही विभक्त होण्यामुळे ते सुखी होतात का? हा प्रश्ण आहेच. अगदी एखाद्या मुलीचा सासरी छळ होत असेल, एखाद्याची फसवणुक झाली असेल तर तो त्रास सहन न करता वेळीच विभक्त होणं केंव्हाही श्रेयस्कर. पण बारीक सारीक कारणांसाठी, स्वतःच्या अहंकारापोटी भांडणारी आणि घटस्फोट घेणारी जोडपी पाहिली कि नवल वाटते.

आजीच्या गोष्टीतल्या रुपमती सारख्या निव्वळ बाह्यात्कारी प्रतिष्ठेवर भुलून जाणाऱ्या आजच्या मुलींसाठी ऋषीच्या जन्माच्या गाठी पुरेशा नाहीत असेच म्हणावे लागेल.

Thursday, October 16, 2014

जन्मदाखल्याची ऐशीतैशी

स्थळ : सेनापती बापट मार्गावरील सोसायटीमधील फ्लॅट
 पात्रे :  आई,वडील, दोन मुली तन्मया वय वर्षे २३ ,  मैत्रेयी वय १८
  (पार्श्वभूमी : तन्मयाने प्रॉडक्ट डीझायनचा चार वर्षाचा कोर्स पूर्ण केलेला असून तिला इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे पोस्ट ग्रॅज्युएशन करीता प्रवेश मिळाला आहे. सुरुवातीच्या फॉर्म्यालिटीज पूर्ण झाल्यात आता व्हिसासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव चालू आहे.)

बाबा : तन्मया, तू व्हिसासाठी काय काय documents लागतात ते विचारलेस का?
तन्मया : हो, बाबा माझ्याकडे फक्त birth certificate नाही
बाबा : ते कसं नाही? तू नीट बघितलस का?
तन्मया : हो, बाबा हि बघा फाईल
बाबा : हे काय आहे? तुम्हा मुलींना मराठी वाचता येत नाही हे बघ
तन्मया : बाबा ,मला वाचता येतं हा जन्माचा दाखला आहे this is not birth certificate
बाबा : अगं जन्माचा दाखला म्हणजेच birth certificate
आई : अहो, हा दाखला नाही चालणार , तिच्या जन्मानंतर महिन्याभरातच आपण तो घेतलाय,पण त्याच्यावर तिचं नाव नाहीये आ्णि birth certificate दुसरं असत त्याला
        मराठीत ’जन्म प्रमाणपत्र’ असं म्हणतात.

तन्मया: अहो बाबा हा दाखला मराठीत आहे UK च्या व्हिसाला तो कसा चालेल?
बाबा : आयला, मग आता birth certificate साठी खेटे घालणं आल !
आई : तुम्ही कशाला खेटे घालताय, ती जाईल ना? लहान नाही ती आता
तन्मया : माझं वय काढायची जरुर नाही , जाईन मी पण कुठे जायच ते नीट सांगा
मैत्रेयी : cool mama and didi. टि.व्ही वरच्या ads बघत नाहीस का? आपला महाराष्ट्र सगळ्यात पुढे.... घोलेरोडच्या वॉर्ड ऑफिसला जा तिकडे मिळेल सगळी info
तन्मया : समजलं , जाते मी उद्या -परवा.
(दोन दिवसांनंतर , स्थळ : घोले रोड वॉर्ड ऑफिस वेळ : दुपारी चार दोन मध्यमवयीन स्त्रीया ’होणार सून मी त्या घरची’या टि.व्ही सिरीयल वर मौलिक चर्चा करताना)
पहिली : ए, त्या जान्हवीची मेमरी कधी येणार बाई , त्या बिच्चाऱ्या श्री ची अवस्था बघवत नाही गं
दुसरी : होना, आत्ता कुठे जरा सुरळीत होत होत सगळ, हे काय मधेच
पहिली : सिरीयल लांबवायला काहीतरी करतात
तन्मया : मला birth certificate हवयं त्यासाठी काय करायच?
पहिली : बोर्डाकडे बोट दाखवते , अवंतिका मधेपण नाही का तिची मेमरी गेली आणि ती रविंद्र मंकणीला विसरली
दुसरी : मला ना त्या जान्हवीचे ड्रेस खूप आवडतात आणि तिचं मंगळसूत्र तर किती फेमस झालय
तन्मया : मला फॉर्म द्याना, वाचला मी तो बोर्ड
पहिली : वेळ संपली आता मॅडम , उद्या या. वाचलत ना बोर्डवर २ ते ४ मधेच फॉर्म मिळेल
तन्मया : अहो पण आत्ता ४ वाजून २च मिनिटे झाली आहेत, मी येवुन १५-२० मिनिटे होवुन गेली, इथे कोणीच नव्हते त्यावेळी
पहिली : कोणीच नव्हते रांगेत म्हणून आम्ही इथेच चहाला गेलो होतो,  चार वाजून गेलेत ना आता या उद्या बरोबर २ ला या
(दुसऱ्या दिवशी दोन वाजता तन्मया वॉर्ड ऑफिसला जाते, आजचा चर्चेचा विषय सिरीयल ’जुळून येती रेशीमगाठी” आहे)
दुसरी : मेघनानी असं नको होत करायला
पहिली : म्हणजे, तिनें त्या पहिल्या आदित्य बरोबर पळूनच जायला हवं होत का?
दुसरी : तस नाही गं , कुणालाच सांगायला नको होतं ते प्रकरण , रीयल लाईफ मधे इतकी चांगली माणसं असतात का कुठे? एखाद्या मुलीने लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवऱ्याला आधीच्या प्रेमाबद्दल सांगितल तर तो घरात घेईल का ठेवून?
पहिली : हो ना, आणि सासू पण कित्ती प्रेमळ अगदी आईच्या वरताण.
तन्मया : फॉर्म द्या ना, पुन्हा म्हणाल वेळ संपली
पहिली : हा घ्या फॉर्म, दोन रुपये सुट्टे द्या
तन्मया तिथल्याच टेबलाशी उभी राहून फॉर्म भरते आणि त्या बाईंकडे जाते
तन्मया : हं , हा फॉर्म भरलाय
दुसरी : भरलेला फॉर्म घ्यायची वेळ १० ते १२ आहे मॅडम . आता उद्या या
तन्मया : अहो पण आत्त इथे कुणीच नाहीये, आणि मला लवकर हवय हो birth certificate , घ्या ना हा फॉर्म प्लीज
पहिली : आमचा नाइलाज आहे मॅडम , नियमाविरुध्द आम्ही काही नाही करु शकत, या तुम्ही उद्या मग २-३ दिवसात मिळून जाइल birth certificate
तन्मया हताश होऊन निघून जाते
दुसऱ्यादिवशी सकाळी १०.३० वाजता तन्मया परत वॉर्ड ऑफिस मध्ये
तन्मया : हा घ्या फॉर्म. आता birth certificate कधी मिळेल?
पहिली  : (फॉर्म वाचून, )मॅडम तुमचा जन्म धनकवडीत झालेला आहे, इथे नाही मिळणार birth certificate,फॉर्म पण इथे नाही घेत आम्ही
तन्मया : मग कुठे मिळेल?
पहिली  : ज्योती , कुठे जायला सांगू ग यांना? आपल्याकडे आपण ग्रामपंचायतीतले नाही घेत ना?
ज्योती(दुसरी) : कसबा ऑफिसला जायला सांग,
पहिली : मॅडम  , कसबा पेठेतला आमच्या जन्म मृत्यू नोंदणी ऑफिसमधे जा तुम्ही
तन्मया कसबा पेठेतल्या जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयात जाऊन तेथील आधिकारी बाणखेले बाईंकडे जाते
तन्मया : मॅडम मला माझे birth certificate हवे आहे, माझा जन्म धनकवडीत झालेला आहे,मी सध्या सेनापती बापट रोडवर राहत असल्याने घोले रोड्च्या वॉर्ड ऑफिस मध्ये गेले होते, त्यांनी मला तुमच्याकडे पाठविले आहे. हा माझा अर्ज, हा फॉर्म. मला birth certificate कधी मिळेल
बाणखेले मॅडम : धनकवडी ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड अजून इकडे आलेले नाही, तुम्ही तिकडच्याच कार्यालयात जा तिकडूनच तुम्हाला birth certificate मिळेल
तन्मया : धनकवडी ग्रामपंचायतीचा जन्म मृत्यू नोंदणी विभाग कुठे आहे?
बाणखेले : तिकडे जाऊन चौकशी करा आम्हाला खूप कामे आहेत इथे, पवार दोन चहा पाठवा जरा आणि मोरे बाईंना सांगा मी बोलावलय

तन्मया आता धनकवडी ग्रामपंचायत ऑफिसात वेळ दुपारी १२.३०
धनकवडी ग्रामपंचायत ऑफिसमधे सामसूम एकच माणूस झोपाळलेल्या अवस्थेत.
तन्मया :  मला माझे birth certificate हवे आहे, माझा जन्म धनकवडीत झालेला आहे, कुठे मिळेल?
माणूस : जल्म मृत्यू च ऑफिस कात्रज कचराडेपोपाशी गेलय मॅडम आणि तिकडची वेळ चार ते सहा आहे आत्ता जावुन बी काय फायदा न्हाई, तुम्ही चारलाच जावा तिकडं
तन्मया वैतागुन घरी येते
वेळ : संध्याकाळ स्थळ : घर
तन्मया : आई मी वैतागले आता, मला नको ते birth certificate, मला जायचही नाही कुठे शिकायला. किती हेलपाटे घालायचे?
आई : अगं असं वैतागुन कसं चालेल? आणि तेवढ्या कारणाकरीता एवढी चांगली संधी सोडण योग्य आहे का? शांत हो, चहा घे, खायला देवु का काही करुन?
तन्मया : नको, अगं आता कात्रजच्या कचराडेपोजवळ जायला सांगतात ते.
बाबा : मी जातो उद्या तिकडे, बघतो काय करायच ते.
तन्मया : बाबा कुणाला काही झापु बिपु नका मला birth certificate हवयं
बाबा :  त्याच्यासाठीच जाणार आहे ना, मला नको सांगूस मी करतो बरोबर, don't worry
दुसऱ्या दिवशी तन्मयाचे बाबा धनकवडी कचराडेपो जवळच्या ऑफिसमध्ये  साडेपाचचा सुमार त्या ऑफिसमध्ये एक पुरुष आणि दोन -तीन बायका

बाबा : excuse me, मला माझ्या मुलीचे birth certificate हवयं माझ्या जवळ सगळी कागदपत्रं आहेत ती घ्या आणि कधी मिळेल birth certificate ?
बायका आपापसात :( बघ कसे घोड्यावर बसून येतात जशी आपल्याला दुसरी काही कामच नाहीत )
माणूस : बघू साह्येब द्या ती कागदं , (वाचून) ,लई जुनं रेकॉर्ड हायं  टाईम लागेल बघा
बाबा : नक्की किती वेळ लागेल सांगा ना? फार लांबून याव लागत हो आम्हाला
माणूस : त्ये बी खर साह्येब, तुम्हाला किती अर्जन्सी हाय?
बाबा : अहो त्याशिवाय का घाई करतोय? मुलीला परदेशात जायचय शिकायला पुढल्या महिन्यात birth certificate शिवाय व्हिसा नाही मिळणार..
माणूस : अस्सं हाय का? मग तुम्ही असं करा साहेब परवा या , याच वेळेला मी तयार ठेवतो नक्की
बाबा : Thank you so much, येतो मग मी परवा

परवा त्याच वेळेस बाबा ऑफिसमधे
बायकामधली एक :(आपापसात) ,बघ परवाचा तो घोड्यावरचा साहेब. आणि आपला यडा कांबळे जाईल त्याच्या पुढं पुढं करायला

दुसरी : नवीन आहे ना तो अजुन कळतील त्याला इथले रितीरिवाज

कांबळे : काय हो बाई उगी बडबड करता, आपल कामच हाय ते,कशाला पब्लिकला खेटे घालायला लावायचे?
बाबा : काय झाल का आमच birth certificate?
कांबळे : हे घ्या साहेब, तयार हाय.
बाबा : किती पैसे द्यायचे?
कांबळे: चाळीस रुपये
बाई : पण पैसे घ्यायची वेळ संपली. १० ते २ असते
बाबा : मग आता हो?, कांबळे तुमच्या जवळ देवु का तुम्ही भराल पैसे?
कांबळे : काही अडचण नाही साहेब. पन सुट्टेच द्या
बाबा : Thank you ,
कांबळे : साहेब ,एक विचारु का?
बाबा : विचारा ना?
कांबळे : माझं पोरगं बी जाऊ शकेल का हो शिकायला असच परदेशात?
बाबा : जाईल की त्यात काय? केवढा आहे तुमचा मुलगा?
कांबळे : (लाजुन) आत्ताशिक बालवाडीत जातोय, हां पर म्या त्याला प्रियदर्शनी english medium मधे टाकलय, माझा बाप गेला त्याच्या जागी मी लागलो इथे पहला क्लास फोर म्हणून लागलो ,पर १० वी पास झालो आणि आत्ताच LDC झालोय साहेब,पर माझ्या मुलाला लई शिकवनार मोठ्ठा साहेब करणार
बाबा : (Birth certificate वाचत )नक्की शिकव. तू इतक चांगल काम करतोस ,मुलगा खूप शिकेल तुझा,
बाबा : अरे हे काय, नाव नाही लिहिलेलं मुलीचं नुसतच मुलगी असं काय लिहिलत Birth certificate वर?
कांबळे : असं झाल व्हय? थांबा साहेब, ओरसे बाईंना विचारतो
ओरसे बाई : रेकॉर्ड प्रमाणे लिहिलय म्हणावं
बाबा : अहो पण आम्ही अर्जात लिहिलय ना मुलीच नाव ते का नाही लिहिलत? आणि हि हाताने लिहिलेली कॉपी का? हल्ली computerised copy मिळते ना?
ओरसे बाई : हे बघा आमच्या जवळ दवाखान्याच रेकॉर्ड आहे त्याप्रमाणे दिलय बनवुन, शिवाय इथे अजुन computer नाही ,मग कस देणार हातानीच देतो आम्ही लिहून
बाबा: पण अर्जात आम्ही लिहिलय ना मुलीच नाव ते का नाही लिहिलत?
ओरसे बाई : आम्ही नाही लिहू शकत साहेब, तुम्ही कसबा पेठेच्या ऑफिसमधल्या साहेबांकडून लिहुन आणा , मग तुम्हाला नाव घालून मिळेल.
बाबा : पण तुम्ही हे आधी का नाही सांगितलत?
ओरसे बाई : तुम्ही विचारल का? मग आम्ही कस सांगणार?
बाबा :(चडफडत) चुकलच आमच, लिहून आणतो कसबा पेठेतून.
बाहेर आल्यावर
कांबळे:  सॉरी साह्येब, माझ्या हातात काही नाही बघा, तुम्ही लिहून आना कसब्यातून मी लागलीच तुम्हाला कॉपी करुन देतो, मी नवीनच आहे हिथं ,माझं चालत नाही या मोठ्या साहेब लोकांपुढे
बाबा : it's ok, कांबळे, तुम्हाला नाही मी दोष् देत, इथे सुरुवातीलाच् सगळे नीट् सांगत् नाहीत् हा प्रॉब्लेम आहे.
स्थळ : घर बेल वाजते

तन्मया : बाबा आले वाटत, (दार उघडते), बाबा मिळालं का certificate?
बाबा : (तिच्या हातात ते नाव नसलेले हस्तलिखित certificate देतात)
तन्मया : you are really great Baba, (पण मग वाचताना वैतागते), हे काय नाव नाहीच माझं यावर आणि किती चुका केल्यात पत्त्यामधे
बाबा : हो ना , आता कसब्यातून त्यांनी लिहून आणायला सांगितले आहे कि त्यांना certificate वर नाव लिहून द्या, तू ते काम कर बेटा, मग मी ते पत्र घेवुन जाईन हवं तर पुन्हा धनकवडीला.
तन्मया : जाइन मी उद्या. पण बाबा त्यांनी हे आधीच का नाही सांगितले?
बाबा : जाउदे आता त्याबद्दल चर्चा करुन काही होणार आहे का? , माझ्या ऑफिसमधला  मित्र म्हणत होता १००० रु दे, लगेच मिळेल certificate.
तन्मया : हो बाबा माझा education consultant सुध्दा असच म्हणाला.
आई : काही पैसे द्यायची आवश्यकता नाही, आपण काही अवैध गोष्ट करतोय का? द्यावच लागेल त्यांना
तन्मया : आई पण मला visa ला apply करायचच आणि वेळेत मिळायला हव certificate.
आई : मिळेल.
बाबा : तुमच्या आईला घरात बसुन म्हणायला काय होतय? किती फेऱ्या मी घालतोय
आई: मग काय पैसे देवुन काम करुन घ्यायच म्हणता?
बाबा : तस मी म्हटल का?
तन्मया : तुम्ही आता भांडू नका त्यावरुन, मी उद्या लिहून आणते आणि नेवुन देते हव तर कात्रजला
बाबा : मी जाईन कात्रजला ,तू फक्त कसब्यातून लिहून आण

दुसऱ्या दिवशी तन्मया कसबा पेठेतल्या ऑफिसमधे बाणखेले मॅडम कडे
तन्मया : मॅडम,  मला माझे birth certificate हवे आहे, माझा जन्म धनकवडीत झालेला आहे,मी गेल्या आठवड्यात येवुन गेले...
बाई (तिला मधेच तोडत): मी सांगितल होत ना, इथे नाही मिळणार..धनकवडीलाच जाव लागेल तुम्हाला

तन्मया : मी तिकडे गेलेच होत मॅडम, मला जे birth certificate मिळालय त्यावर माझं नाव नाहीये. ते घालून घेण्यासाठी तुमच्या कडून पत्र हवयं
बाई : बघू ते certificate?
तन्मया :( त्यांना  certificate देते), इतरही कागदपत्रे आहेत, ती पण बघा(त्यांच्या हातात कागदपत्रे देते)
बाई : मी याच कागदावर लिहून देते ( त्या कागदावर लिहून देतात ’birth certificate वर मुलीचे नाव ’तन्मया’ लिहिण्यात यावे, सही करतात शिक्का मारतात)
तन्मया : Thank you madam
वेळ संध्याकाळ

तन्मया : बाबा, हे बघा त्या मॅडमनी लिहून दिलय,
बाबा : good, उद्या जातो मला सुट्टी आहे शनिवार आहे सकाळी १०-१०.३०ला जाईन् उद्या मिळून जाईल् birth certificate
दुसऱ्या दिवशी बाबा कात्रजच्या ऑफिसमधे जातात तिथल्या ओरसे बाईंच्या हातात् आधीचे birth certificate, आणि बाणखेले बाईंचे पत्र् देतात
बाबा : तुम्ही सांगितल्याप्रमाणॆ लिहून आणलय, आता द्या birth certificate वर नाव घालून
ओरसे बाई : पत्र बघत, साहेब हे नाही चालणार
बाबा : का?
ओरसे बाई : ह्याच्यावर जावक क्रमांक नाही लिहिलेला
बाबा : म्हणजे?
ओरसे बाई : म्हणजे outward no.
बाबा  : तो कशाला लागतो?
ओरसे बाई : हे सरकारी ऑफिस आहे, इथे सगळं नियमाप्रमाणे व्हाव लागत, नंबर घेवुन या, लगेच मिळेल birth certificate
बाबा : पण शिक्का मारलाय शिवाय सही पण केलेली आहे त्या बाईंनी , म्हणजे त्यांनीच लिहिलय मग outward no नसला तर काय बिघडलं?
ओरसे बाई  : हे बघा वाद घालत बसू नका, आम्हाला काम खूप आहेत, outward no. आणा मग बघू
बाबा :(मनातल्या मनात चडफडत ) बाहेर पडतात
ओरसे बाई : बघ ग, तांदळे कस त्या घोड्यावरन येणाऱ्या साहेबाला वाटेला लावल, फार शहाणे समजतात स्वताला
तांदळे : तर ग, कळेल त्याला सरकारी हिसका, बर झाल आज कांबळे नव्हता
ओरसे बाई  : तो असता तरी मी त्याला बरी देवु देईन

बाबा घरी येतात
(हताश स्वरात )
बाबा : खरच कंटाळलो,
तन्मया : काय झाल बाबा ?
बाबा : अग आता ती बाई outward no. आणा म्हणतीय, आई कुठे गेलीय ?
तन्मया : तिला आज ऑफिस नाही का? थांबा मी तिलाच फोन करुन सांगते
बाबा : तिला कळवून काय फायदा, ती जाते का कुठे? उलट आपल्यालाच चार शहाणपणाच्या गोष्टी सांगेल, त्यांची बाजू घेवुन आपल्याला बोलेल शेवटी ती पण एक सरकारी आधिकारीच ना?
तन्मया : काही नाही बाबा, ती अशी नाहीये, तिला मी सांगते
(तन्मया आईला फोन करुन सगळी स्टोरी सांगते)
तन्मयाची आई ऑफिसमधे
तन्मयाची आई (मनात): अशा प्रकारे हेलपाटे घालत राहिल तर वर्षभरात देखील हिला birth certificate मिळणार नाही.काय बरं कराव?
(बराच वेळ विचार करते मग एकदम सुचून PMC ची वेब साईट बघावी, तिथे कमिशनर साहेबांचा मेल आय.डी असेल तर त्यांच्याकडेच तक्रार करावी.बघू काय होतय.
वेब साईट उघडते, त्यातून कमीशनरचा मेल आय.डी घेते) शांतपणे विचार करून एक मेल लिहून त्यांना पाठवते.)

सोमवार सकाळ
तन्मयाची आई ऑफिसमधे आलेली आहे. सकाळी सुरुवातीला नेहमी प्रमाणे ती मेल चेक करताना तिला कमिशनरांकडून आलेली मेल दिसते.
तन्मयाची आई : वा, मेल ला उत्तर आलेल दिसतय. (मेल वाचते मेल मधे त्यांनी तुमची तक्रार आरोग्य आधिकाऱ्यांकडे पा्ठविल्याचे लिहेलेल आहे)
                  : आरोग्य आधिकाऱ्यांची मेल ही आलेली आहे,(या मेल मधे त्यांनी एका डॉक्टरचा नंबर दिलेला आहे त्यांना संपर्क करायला सांगितले आहे)
तन्मयाची आई : फोन करायचा प्रयत्न करते,पण फोनच लागत नाही.(कंटाळून कामाला लागते )
लंच टाईम

तन्मयाची आई : (स्वगत) आत्ता फोन करावा लागेल, फोन लावते लागतो हॅलो मी मिसेस राव बोलते, आरोग्यआधिकाऱ्यांकडून तुमचा नंबर मिळाला..माझ्या मुलीच्या  birth certificate  बद्दल् बोलायच होत
पलिकडून : मॅडम मी आत्ता महत्त्वाच्या मिटींगमधे आहे, तुमच्या मुलीचे डिटेल्स मला sms करा
तन्मयाची आई : ठिक् आहे, Thank you.
तन्मयाची आई : आता त्या डॉक्टरांना आणि आरोग्य आधिकारी दोघांना sms, मेल् दोन्ही करते
दुपारी चार
तन्मयाच्या आईला आरोग्य आधिकाऱ्य़ांचा मेल येते त्यात त्यांनी कागदपत्रे घेवुन भेटायला बोलावले आहे.
(तन्मयाची आई तिच्या बाबांना फोन लावते, त्या आधी तिची कामे आटोपुन लवकर निघण्याची परवानगी घेते)
आई : हॅलो, मला आत्ताच PMCच्या  हेल्थ ऑफिसरांची मेल आलीय, त्यांनी कगदपत्रे घेवुन भेटायला बोलावलय. तुमच्या कडे सगळी कागदपत्रे आहेत. माझ्या ऑफिसमधे येता का? आपण जाऊ
बाबा : मी आज दुपारीच जाऊन आलोय परत कसबा पेठेत , काही झाले नाही, पण मी येतोच जाऊ आपण
वेळ सव्वापाच तन्मयाचे आई बाबा PMCच्या  हेल्थ ऑफिसरच्या ऑफिसबाहेर
शिपाई : कुणाला साहेबांना भेटायचय? अपॉंट्मेंट घेतलीय?
आई : नाही, पण त्यांनीच आत्ता बोलवलय, मला मेल आली होती
शिपाई : कार्ड द्या बाई तुमचं
(आई तिच कार्ड काढुन देते, शिपाई ते घेवुन जातो लगेच बाहेर येतो)
शिपाई : जा मॅडम आत, साहेब बोलावत आहेत
दोघे आत जातात साहेबांची प्रशस्त केबीन आत बरेच लोक बसलेले दोघांना बघुन
साहेब : तुम्हीच कमीशनर साहेबांना मेल लिहिली होतीत
आई : हो सर,
साहेब : बघू तुमच्या मुलीची कागदपत्रे
आई : ही घ्या सर (देते), माझ्या मुलीला परदेशात शिकायला जायचय सर, व्हिसा साठी birth certificate  हवयं आणि ते प्रिंटेड म्हणजे computerized असायला हवं
साहेब : कागदपत्रे बघतो, तुम्ही असं करा कसबा पेठेतल्या ऑफिसमधल्या बाणखेले बाईंना भेटा परवा तुम्हाला हवं तस birth certificate मिळून जाइल
बाबा : सर मी आज दुपारीच तिकडे जाऊन आलो, त्या देणार नाही म्हणाल्या
साहेब :  आता मी सांगतोय ना, त्या देतील मी आत्ता त्यांना फोन वर सांगतो (फोन लावतात)
साहेब : हॅलो, बाणखेले बाई, आरोग्य आधिकारी बोलतोय, मी आत्ता ज्यांना तुमच्याकडे पाठवतोय त्यांच्या मुलीचे birth certificate परवा त्यांना मिळेल असं बघा, हो साडेपाच वाजलेत घरी जायची घाई करु नका त्यांना भेटल्याशिवाय ऑफिस सोडू नका
आई : thank you very much sir
साहेब : तुम्ही सेनापती बापट रोडवर राहता?
बाबा : हो, का?
साहेब : मी देखील तिकडेच राहतो, तुमच्या सोसायटीच्या बाजुलाच
बाबा : आम्ही १० वर्षांपूर्वी इकडे आलो त्या आधी धनकवडीला होतो
साहेब : ok,
आई : सर आम्ही निघतो, कसबा पेठेत् जायच आहे thank you once again
साहेब  : हो जा लवकर
आई बाबा आता पुन्हा कसबा पेठेतल्या ऑफिसमधे

आई :  माझ्या मुलीच्या  birth certificate साठी आलोय , आत्ता तुम्हाला साहेबांचा फोन आला होता ना?
बाणखेले बाई (बाबांकडे बघुन): तुम्ही आला होतात ना दुपारी तेंव्हा सांगितल होत ना इथे काम होणार नाही म्हणून पुन्हा पुन्हा कशाला येता?
बाबा : पण आत्ता तुम्हाला साहेबांचा फोन आला होता ना?
बाणखेले बाई : साहेबांना काही माहिती नाही हो, त्यांना काय होतय फोन करायला!
(आई साहेबांना मोबाइल वर फोन लावते )
आई: सर ,तुम्ही सांगितल्या प्रमाणे कसबा पेठेतल्या ऑफिसमधे आलोय पण बाणखेले बाई काम होणार नाही म्हणताहेत, काय देवु त्यांना फोन? ठिक आहे
बाणखेले बाईंना फोन देते
बाणखेले बाई :  साहेब, हो साहेब, देते साहेब , पण साहेब ते धनकवडी... नाही म्हणजे होइल ना साहेब, तस काही नाही साहेब देते देते साहेब
आई : द्या तो फोन इकडे,
बाणखेले बाई : पण मॅडम साहेबांना आम्ही नाही सांगू शकत, धनकवडी ग्रामपंचायतीत होती ना? तिकडे अजुन कॅम्प्युटर गेलेला नाही तिकडे आमचं जन्म मॄत्यूच सॉफ्ट्वेअर गेलेल नाही
बाबा : धनकवडी महानगरपालिकेत येवुन १७ वर्ष होवुन गेली,आम्ही टॅक्स भरतो ना
बाणखेले बाई  : टॅक्सचं इथं सांगु नका
आई : बर, सॉफ्ट्वेअर तिकडे जायची काय जरुर आहे? तिकडच रेकॉर्ड इकडे येवु शकत नाही का?
बाणखेले बाई  : येवु शकेल पण त्याला वेळ लागेल
आई : हे बघा बाई , मी गेले दोन महिने वाट बघितली , नियमाप्रमाणे गेले, इकडे खूप हेलपाटे घातले, आणि काम होत नाही दिसल्यावर तुमच्या साहेबांकडे गेले आता जर तुम्ही सहकार्य करणार नसाल तर मी कमीशनरांकडे तुमची तक्रार करेन
बाणखेले बाई : अहॊ मॅडम मी नाही म्हणाले का? देते ना ,उद्या रेकॉर्ड मागुन घेते परवा तुम्ही दुपारी वॉर्ड ऑफिसात जा तिकडे तुम्हाला मिळेल birth certificate
आई : मी परवा सकाळी इथे फोन करेन,मग दुपारी मुलीला वॉर्ड ऑफिसमधे पाठवेन.
बाणखेले बाई : चालेल मॅडम परवा मिळेल तुम्हाला birth certificate
आई : Thank you !

   हे नाटक इथे संपले नाही ,बाणखेले बाईंनी कबूल केले तरी परवा वॉर्ड ऑफिसात birth certificate मिळाले नाही.तो शुक्रवार होता मधे शनिवार-रविवार सुट्ट्या आल्या.सोमवारी पण तन्मयाला वॉर्ड ऑफिसमधे certificate तयार आहे पण सही व्हायची आहे असे सांगून तासभर बसायला लावले आणि अखेर शेवटी birth certificate मिळाले !

यात आई-वडील सुशिक्षित असून त्यांना मुलगी २३ वर्षाची होईपर्यंत birth certificate घ्यावेसे वाटले नाही ही त्यांची चूक आहेच.पण गरज असल्याशिवाय माणूस कोर्टासारखी सरकारी कार्यालयाची पायरी चढत नाही हे पण तितकेच खरे. 

सध्या विकास आणि computerization बद्दल खुपऐकायला येतय, टि.व्हीवर निवडणुकांच्या काळातल्या जाहिराती बघताना आपण याच महाराष्ट्रात राहतो का? असा प्रश्ण पडावा. काय ते गुळगुळीत रस्ते,मेट्रो आणि विमानतळे, चकाचक ऑफिसेस त्यातल्या खिडकीवर जायचा अवकाश कि मिळणारी कागदपत्र ! प्रत्यक्षात सामान्याच्या नशिबी किती हेलपाटे, किती यातायात !. तन्मयाची आई सरकारी खात्यात काम करणारी असल्याने तिला कमिशनर साहेबांना मेल लिहायची बुध्दी झाली आणि त्यांनी ही एका सरकारी आधिकाऱ्याच्या तक्रारीची योग्य दखल घेतली म्हणून त्यांना birth certificate मिळाले तरी , पण इतरांकडे काय पर्याय? एकतर विनाकारण लोकांना पैसे खायला द्या आणि काम करुन घ्या, ज्याच्याजवळ पैसा नसेल त्यांनी हेलपाटे घाला. 

वास्तविक प्रत्येक महानगरपालिकेची वेबसाईट आहे त्याच्यावर प्रत्येक प्रमाणपत्राकरीता काय काय करावे याची माहिती देणे त्यांना सहज शक्य आहे.त्यांच्या सगळ्या कार्यालयात देखील अशा प्रकारच्या सूचनांचे फलक लावायला काय हरकत आहे? लोकांचे काम सहज  कसे होईल या साठी कार्यपध्द्तीत बदल घडायला हवेत

मोदींच्या नव्या राजवटीत असे पण अच्छे दिन येतील का? Sunday, July 20, 2014

पासपोर्ट ऑफिस : एक दाहक अनुभव

               पासपोर्ट ऑफिस मधे जायची वेळ आजकाल बहुतेकांवर येते. माझा पासपोर्ट मी पहिल्यांदा हौसेने काढला, पण त्याची मुदत संपेपर्यंत देशाची सीमा ओलांडायचे योग काही आले नाहीत. नंतर तो पुन्हा एकदा उत्साहाने री-न्य़ू करुन आणला. तरी परदेशात जायला जमले नाहीच. परत त्याची मुदत संपली.   पासपोर्ट री-न्यू करायला हवा असे नवरा म्हणू लागला ,आता मात्र मी वैतागले होते. उगीचच दर पाच दहा वर्षांनी पासपोर्ट ऑफिसला चकरा मारुन त्याचे नूतनीकरण करायचे आणि जायचे तर कुठेच नाही.मला नकोच तो पासपोर्ट असे मी जाहिर करुन टाकले.पण नेमके माझ्या पत्रिकेतले परदेशगमन घडवणारे ग्रह फिरले आणि युरोप अमेरीका नाही पण गेला बाजार साउथ -इस्ट अशियातले देश मला दाखवून आणण्याची नवऱ्याला इच्छा झाली. मी पासपोर्ट ऑफिसला जाणार नाही म्हटल्यावर त्यांनी एजंटकरवी माझा पासपोर्ट री-इश्यु करुन घेतला.

मुंबईच्या विमानतळावर फॉर्म भरताना नव्या पासपोर्ट वरील माझ्या नावाचे स्पेलींग चुकल्याचे माझ्या लक्षात आले. पासपोर्ट्वरील चुकी्च्या स्पेलींगप्रमाणेच फॉर्म भरुन मी थायलंड,मलेशिया,सिंगापुर असा सगळा प्रवास केला.मी पासपोर्ट उघडून बघितलेलाच नसल्याने सगळ्या प्रवासात चुकीच्या स्पेलींगची  टोचणी मला होती. इकडे आल्यावर हि दुरुस्ती लगेचच करुन घ्यायचे ठरविले.

पुण्याला आल्यावर मी जुना पासपोर्ट बघितला त्यावर माझ्या नावाचे स्पेलींग बरोबर होते. मग नव्या पासपोर्ट वर चुकीचे स्पेलिंग कसे? एजंटने फोर्म भरताना माझ्या नावाच्या स्पेलिंगमधले एक अक्षर खाऊन टाकले होते. नावात दहा अक्षरे असल्याने फॉर्म सही करताना माझ्या लक्षात आले नाही त्यामुळे अंतिमतः चूक माझीच होती. चूक खूपच किरकोळ होती काम सहज होऊन जाईल असे मला वाटले. इथे माझी दुसरी चूक झाली.

पासपोर्टच्या साईट्वर यासंदर्भात काय करावे याबद्दल वाचले तेंव्हा माझ्या लक्षात आले कि नव्याने पासपोर्ट काढण्याकरीत करावी लागणारी सगळी उठाठेव या क्षुल्लक वाटणाऱ्या दुरुस्तीसाठी करावी लागणार होती.  पूर्वी पुण्यात असलेले पासपोर्ट ऑफिस पुण्याबाहेर घोरपडीला नव्या जागेत हलवले आहे. जाण्यापुर्वी वेळ ठरवून घ्यावी लागते आणि दिलेल्या वेळेला हजर रहावेच लागते. पासपोर्ट ऑफिसचे संगणकीकरण एका खाजगी कंपनीने केल्याने काम अगदी वेळेत ,सहज होते अशा अनेक गोष्टी मला साईट वरुन ,काही लोकांकडून समजल्या.
मी  वेळ घेतली. दुपारी पावणेदोन ची वेळ मला मिळाली होती.मी वेळेवर सर्व कागदपत्रांसह पोचले.ऑफिसच्या बाहेर शंभर एक लोक उभे होते.आत गेल्यावर सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून तपासणी होऊन आत गेले तर सात आठ काऊंटरवर मारुतीच्या शेपटासारख्या रांगा होत्या. एका रांगेत उभी राहिले. माझा नंबर आल्यावर माझी कागदपत्रे पलिकडच्या मुलीने माझ्या हातातुन हिसकावुन घेतली.ती मुलगी तिच्या खास कमावलेल्या आवाजात समोरच्या प्रत्येक व्यक्तीवर नुसती ओरडत होती. ज्यांची कागदपत्रे अपूर्ण असतील तर त्यांना झापत होती, काहींना झेरॉक्स काढायला पिटाळत होती. कागदपत्रे तिच्या ताब्यात दिलेल्या लोकांना वेगळ्या रांगेत उभे केले , मग साधारण अर्ध्या पाऊण तासांनंतर माझे नाव पुकारण्यात आले, मला माझ्या कागदपत्रांबरोबर एक कागद दिला तो माझा टोकन नंबर होता. ते सगळे घेवुन मी आतल्या हॉल मधे गेले.तेथील टि.व्ही.सारख्या पडद्यांवर टोकन नंबर आणि A1 ते A30 पर्यंत अक्षरे दिसत होती.आपल्या टोकन समोरील जो नंबर येईल त्या व्यक्तीकडे जायचे. मला A5 कडे जावे लागले.तिथे माझा फोटो काढला.सगळ्या कागदपत्रांची छाननी झाली.मला पुढे पाठवले.इथवरचा प्रवास तसा सरळ झाला. पुढच्या हॉल मधे पुन्हा तोच प्रकार आता A ऐवजी B ऑफिसर कडे जायचे.मी माझ्या टोकन समोर आलेल्या ऑफिसरच्या समोर गेले. माझ्या नावात झालेल्या छोट्या चुकीबाबत मी त्यांना सांगितले. माझ्या ऑफिसकडून पासपोर्ट् मिळण्याकरीता ’ना हरकत प्रमाण पत्र’  मी आणले होते पण त्या पत्राच्या दोन ओरीजनल प्रती आणणे अपेक्षित होते. माझ्याजवळ् एक  ओरीजनल  व एक झेरॉक्सप्रत होती, ती चालेल कि नाही याबाबतचा निर्णय ते घेवु शकत नव्हते. त्यांनी मला त्यांच्या वरीष्ठ् आधिकारी मॅडम कडे जाण्यास सांगितले. त्या मॅडम जागेवर नव्हत्या. त्यांना भेटायलाही शंभरएक लोक उभे होतेच. सुमारे एक तासाच्या प्रतिक्षेनंतर् मॅडम जाग्यावर आल्या.त्यांनीही टोकन नंबर प्रमाणॆ एकेकाला बोलवायला सुरुवात केली. माझा नंबर आल्यावर् मी गेले. मला नवा पासपोर्ट् का हवा आहे, म्हणजे माझ्या पासपोर्ट् वरील नावात कशी दुरुस्ती हवी आहे हे त्यांना समजावले.माझ्या जुन्या पासपोर्ट्वर नाव बरोबर असताना , तोच डेटा का घेतला जात नाही हि मला शंका होती त्याचेनिवारण त्या करु शकल्या नाहितच शिवाय तुमचे रेकॉर्ड मी मागवुन घेते असे खास सरकारी वाक्य बोलून त्यांनी मला थांबायला सांगितले. सुमारे एक तास बाहेर बसल्यावर् त्यांनी मला आत बोलावले आणि माझ्या एजंटने भरलेल्या फॉर्मची स्कॅन कॉपी त्यांनी मला दाखविली. (हि कॉपी त्यांना त्यांच्या स्क्रिनवर एक तासापूर्वीही दिसु शकली असती.कागदपत्रे मागवायची काही आवश्यकता नव्हती हे समजण्याइतका कॉम्प्युटरचा अनुभव मला आहे पण....) त्यात चुकीचे स्पेलिंग असल्याने त्याच नावाने पासपोर्ट् तयार झालेला आहे आणि तुमची सही असल्याने त्या चुकीला तुम्हीच जबाबदार आहात असे सिध्द करुन दाखविले. मला माझी चूक मान्य होतीच.पुढे काय करायचे एवढाच माझा प्रश्ण् होता. ,नावाच्या चुकीबाबत मी एक प्रतिज्ञापत्र आणले पाहिजे, दोन वर्तमानपत्रात छापुन त्यांच्या प्रती आणल्या पाहिजेत  असे त्यांचे म्हणणे होते. तुम्ही साईट् वर सगळे नीट् वाचले नाहीत असे त्या मला पुन्हा पुन्हा म्हणत होत्या. मग मात्र माझा संयम संपला. मी म्हणाले,"मी सगळे नीट वाचले आहे. नाव बदलावयाचे असेल तर म्हणजे एखाद्या मुलेचे लग्नानंतर् तिला नाव बदलून नव्या नावाचा पासपोर्ट् हवा असेल तर असे प्रतिज्ञापत्र करणे योग्य आहे. कारण त्या प्रतिज्ञापत्रात मी पूर्वी ....या नावाने ओळखत होते आता माझे नाव ....  झाले आहे  असा मजकूर आहे.माझ्या नावात असे काहीही झालेले नाही ,हि केवळ दुरुस्ती आहे, नाव बदल नाही" पुन्हा जुन्या पासपोर्ट वर बरोबर नाव, नव्या पासपोर्ट वर चुकीचे नाव असे सगळे त्यांना समजावल्यावर प्रातिज्ञापत्राची गरज नाही हे त्यांना पटले. पण आलेल्या व्यक्तीने आपल्याला समजावणे हे त्यांच्या पदाला मानवले नसणार , आता निमुटपणे सगळी कागदपत्रे घेवुन पासपोर्ट द्यावा असे लिहुन देणे त्यांना शक्य नव्हते मग  त्यांनी मला ऑफिसकडून दोन ओरीजनल ना हरकत प्रमाण पत्रे आणावयास सांगितली. मी नम्रपणे एक पत्र का चालत नाही असे विचारले तर् तुम्ही साईट्वर नीट् वाचत नाही   हे बघा असे म्हणून एक छापिल् पुस्तक दाखविले त्यात दोन ओरीजनल ना हरकत प्रमाण पत्रे आणावी असे लिहिले होते. साईटवरील् मजकुरा प्रमाणेच पत्र पाहिजे असे त्या म्हणाल्या. शिवाय़ मी आणलेल्या पत्रात एक मोठी चूकही त्यांना सापडली. माझ्या पत्रात मी भारतीय आहे असा उल्लेख नव्हता ! हे पत्र चालणारच नाही, नवी दोन पत्रे घेवुन परत या. मला हसावे कि रडावे समजेना, माझ्या हातात दोन पासपोर्ट होते, भारतातल्या केंद्र सरकारची मी थोडीथोडकी नाही तर पंचवीस वर्षे सेवा केली ती अभारतीय म्हणून? शिवाय माझ्या सहीने मी आजवर अनेकांना तात्काळ पासपोर्ट मिळावा म्हणून पत्रेही दिलेली आहेत. माझ्या सहीची पत्रे चालतात पण मी भारतीय आहे हे वाक्य पत्रात नसल्याने, मला पुन्हा यावे लागते. त्यांच्या जवळच्या माझ्या मागील रेकॉर्डस च्या स्कॅन कॉपीज त्यांच्या कडे होत्याच त्यात यापूर्वी माझ्या ऑफिसने दिलेली पत्रेही होती.पण आज त्यांना पुन्हा एक सोडून दोन पत्रे हवी होती. त्याच वरीष्ठ आधिकारी असल्याने पुढे जावुन तक्रार-अर्ज-विनंत्या करण्य़ाचा प्रश्ण नव्हता. आता पुन्हा अपॉंटमेंट घ्यायची का? हाच एक सवाल होता. त्यावर एखाद्या घोर अपराध्याला माफ केल्याच्या सुरात त्या म्हणाल्या, "तुम्हाला परत अपॉंटमेंट् घ्यायची जरुर नाही , सांगितलेली कागदपत्रे घेवुन परत या"

हे सगळे होइतोवर संध्याकाळचे पावणेसहा वाजले होते. तिकडे पाणी हॉलच्या शेवटच्या टोकाला होते. खाण्याच्या पदार्थांचे स्टॉल्सही होते, पण अतिशय महाग, साधा चहा २०ते २५ रु., सॅंडविच ५०रु. पासपोर्ट घ्यायला येणारे लोक उच्चभ्रूच असणार तेंव्हा त्यांना काय फरक पडतो? असे असले तरी त्यांच्या अगतिकतेचा फायदा घेतला जात होता हि गोष्ट पण नाकारता न येण्यासारखीच. मला तर आपला नंबर कधीही लागेल त्यावेळी हातात चहाचा कप किंवा खात खात कसे जायचे या विचाराने मी काही न खाता पिता राहिले. आत ज्या व्यक्तिला पासपोर्ट हवा तिच्याशिवाय दुसऱ्या कुणाला प्रवेश नसल्याने हातातील महत्त्वाची कागदपत्रे ठेवुन प्रसाधनगृहातही जाता आले नाही. एकुण काय तीन साडेतीन तास घालवुन मनःस्ताप घेवुन मी बाहेर पडले.

ऑफिसमधुन पुन्हा पासपोर्ट साईटवर दिल्याप्रमाणे पत्राच्या दोन प्रती घेवुन पुन्हा सकाळी नऊ वाजता पासपोर्ट ऑफिसात गेले.मला वाटले आता बाहेरच्या खिडाकीवर त्या पत्रांच्या दोन प्रती दिल्या कि माझे काम झाले. पण कसले काय? पुन्हा मागल्या वेळ सारखेच सगळे सोपस्कार करीत मला जावे लागले. यावेळी B ऑफिसरकडे माझा नंबर लागायलाच दिड तास थांबावे लागले तिथुन पुढे C ऑफिसरकडे माझी रवानगी झाली. त्यांनी ऑफिसचे पत्र बघितले आणि म्हणाले हे पत्र चालणार नाही. आमच्या साईट्च्या फॉर्म्याट सारखे हे पत्र नाही.माझे मागच्या खेपेस नाकारण्यात आलेले पत्र त्यांच्याजवळ होतेच , ते पत्र आता त्यांना योग्य वाटत होते. मला त्यांनी पुन्हा छापील पुस्तक दाखवले. मी म्हणाले ," ते पुस्तक मला दाखवु नका, मीच तुम्हाला इथुन तुमच्या साईटवरील नमुना दाखवते त्यानुसार हे पत्र नसल्यास सांगा"
"मॅडम , साईट वरील नमुना बरोबर नाही"
"मग योग्य नमुना साईट वर का नाही टाकला? आणि माझ्या ऑफिसने मागच्या वेळचे पत्र योग्य दिले असताना ते का नाकारलेत? मी पण सरकारी ऑफिसर आहे, मला नियम समजतात , तुम्ही विनाकारण त्रास देत आहात"
मी असे निर्वाणीचे बोलल्यावर त्यांनी माझी कागदपत्रे ठेवुन घेतली आणि तुमचा पासपोर्ट घरी येईल थोड्याच दिवसात असे सांगितले.

खाजगी कंपनीला पासपोर्ट ऑफिसचे काम देवुन काय साधले? वेळ वाचला नाहीच. खाजगी कंपनीमुळे ऑफिस चकाचक आहे. सरकारी  कार्यालयाची कळा त्याला आलेली वाटत नसली तरी आत मधे असणाऱ्या मोठ्या जनसमुदायामुळे कलकल गोंगाट असतोच. ऑफिसमधे ए.सी असल्याने सगळी दारे खिडक्या बंद. भर दिवसाही सगळीकडे ट्युब लाईट्सचा प्रकाश असतो. इतक्या लोकांच्या असण्याने ए.सीचा इफेक्ट अजिबात जाणवत नाही आणि वातावरणात एक प्रकारचा कोंदट्पणाच वाटतो. लहान मुले असतात, त्यांनी खाऊन टाकलेल्या बिस्कीटांच्या,चॉकेलेट्सच्या कागदांना कचरापेटी दाखवावी असे ना त्यांना वाटते ना त्यांच्या कंटाळलेल्या पालकांना. जेष्ठ नागरिकांसाठी वेगळी रांग आहे ती देखील खूपच मोठी असते.बसण्याकरीता बरेच बाकडी आहेत पण ती पुरणार नाहीत इतके लोक कुठल्याही वेळी आत असतातच.

तेथे एखाद्या दिवशी चारपाच तास घालवल्यावर माझी अशी अवस्था झाली मग तेथे रोज काम करणाऱ्य़ांचे काय होत असेल हि कल्पना मी करु शकते. हे काम अजिबात सोपे नाही. पण ते सोपे करणे शक्यच नाही असे नक्की नाही. एका ठिकाणी सगळ्यांना बोलावण्यापेक्षा पुण्य़ात चार-पाच ठिकाणी अशी कार्यालये काढता येणार नाहित का?
पासपोर्टचे नूतनी करण करताना असणारी पध्दत सोपी -सुटसुटीत करता येईल. नाव-पत्ता यांमधील चुका पुन्हा पुन्हा डेटा -एन्ट्री टाळुन कमी करता येतील. ऑनलाईन एंन्ट्री करु दिल्यास तर या चुका खूपच कमी करता येतील. साईटवर सर्व माहिती अद्ययावत ठेवल्यास लोकांचे हेलपाटे वाचतील.

पासपोर्ट हे अतिशय महत्त्वाचे दस्त आहे. तो देताना पराकोटीची काळजी घेणे आवश्यक आहे हे कुठलाही सुजाण नागरीक समजू शकतो.पण शासकीय कर्मचारी,शिक्षक,विद्यार्थी,जेष्ठ नागरिक यांना जास्तीत जास्त त्रास देणारे पासपोर्ट खाते कित्येक गुन्हेगार आणि अतिरेक्यांना पासपोर्ट देताना कुठली कागदपत्रे तपासते? अशी शंका मनात आल्यावाचून रहात नाही.

Tuesday, April 15, 2014

बदलत्या गृहरचना

तंत्रज्ञानाने सगळ्याच क्षेत्रात आपले हातपाय पसरले आहेत. नवनव्या सोयी-सुविधा बघताना डोळे दिपुन जातात. घरांचेच बघाना, कित्ती क्रांती झाली आहे बांधकाम शास्त्रात. खेडेगावातल्या ऐसपैस वाड्य़ांमधे जागेची मुबलकता होती,पण सोईचा विचार केलेला नसेच.पन्नास लोक जेवायला बसतील असे मोठे स्वयंपाकघर असायचे पण चुलीचा धुर जाण्याची व्यवस्था असेलच याची खात्री नसे. बसुन रांधायचे पण स्वयपांकाला लागणाऱ्या साधनांच्या जागा त्या अस्ताव्यस्त पसरलेल्या खोलीच्या चार भिंतीतल्या फडताळात असत. भांडी घासायची मोरी जवळ नसे आणि तेथेही बसुनच भांडी घासावी लागत. त्याचा एक फायदा म्हणजे स्वयंपाक करतानाच सर्वांगाला भरपूर व्यायाम होई. त्या काळी बायकांना स्वयंपाक हे एकच व्यवधान असे आणि खेड्यात तरी वेळेशी कुणीच फारसे बांधलेले नव्हते त्यामुळे काम लवकर आटपायचे असा आटापिटा नव्हता.

    शहरांमधे जागेची अडचण.चाळी आणि वाड्यांमधे लोकांच्या दोन-दोन पिढ्या सुखात नांदल्या.उभ्याचे ओटे,स्टोव्ह गॅस अशी साधने आली पण ती सोय म्हणून. लहान जागेत सामान मोजकेच. भांडी भरपूर असायची पण जास्तीची भांडी माळ्यावर असत आणि पाहुणे-रावळे आले कि ती बाहेर निघत कार्य उरकले कि परत जाग्यावर जात. शेजाऱ्यांकडून ताटे,वाट्या सर्रास आणली जात. मिक्सर,फ्रिज या वस्तू चैनीच्या समजल्या जात होत्या. गल्लीत एखाद्यांकडे फ्रिज असेल तर ती व्यक्ती श्रीमंत समजली जायची आणि कुणाचा ताप उतरत नसेल तर त्यांच्याकडून बर्फ मागणे उभयपक्षी गैर वाटत नसे.

    औद्योगीकरणानंतर पुण्याची चारी बाजुंनी वाढ झाली. फ्लॅट संस्कृती रुजू लागली. नव्वदच्या दशकात आय.टी क्षेत्रातल्या प्रचंड वाढीने तसेच शिक्षणसंस्थांच्या अचाट विस्ताराने पुण्याची वस्ती अफाट वाढली. वाडे पाडून तिथेही इमारती झाल्या .औंध,पाषाण,बाणेर,हडपसर,वाघोली,कात्रज,पिंपरी,चिंचवड अशा सगळ्या गावांचा महानगरपालिकेत समावेश झाला आणि सगळीकडे उपनगरे विकसित झाली. बांधकाम क्षेत्रातल्या विकासामुळे घरे अधिकाधिक सुंदर,सुखसोयींनी परीपूर्ण बनू लागली. जागांच्या वाढत्या किमतींमुळे बंगले बांधणे अवघड झाले,तसेच ज्यांचे बंगले होते त्यांनी सुध्दा ते बिल्डरला विकून अलिशान फ्लॅट घेण्याची फॅशन आली. वन रुम किचन सीनेमापुरते उरले. वन बी.एच.के ही फारसे नाही 2BHK, 3BHK यांच्याच जाहिराती जिकडे तिकडे बघायला मिळतात. दहा पंधरा बिऱ्हाडांमध्ये एकच संडास पासून घरातील प्रत्येक व्यक्तिसाठी स्वतंत्र टॉयलेट असा हा बदलाचा प्रवास आहे.

    सुरवातीच्या काळात इमारती दोन-तीन क्वचित चार मजली होत्या.कॉमन पार्किंग असे.प्रत्येक इमारत हि स्वतंत्र असल्याने त्याची स्वच्छता आणि सौंदर्य हे सभासदांच्या सहभागावर असे. हळूहळू पुण्यात बिल्डर्सनी मोठाले प्लॉटस घेवुन अनेक इमारतींच्या स्किम्स राबवायला सुरुवात केली.मग प्रत्येकाला स्वतंत्र पार्किंग, आतमधले पक्के रस्ते,मुलांना खेळायला बाग, एखादा लहानसा हॉल,स्विमिंग पूल, जिम अशा सुविधा पुरवायला सुरुवात केली आणि त्यामुळे त्या बिल्डर्स मधली स्पर्धा वाढत गेली.जागांचे भाव वाढत होतेच,उंच उंच इमारती बांधायला परवानगी मिळाल्याने एखादी मोठी स्किम म्हणजे लहानशा गावाइतकी  वस्ती होवु लागली. घर म्हणजे केवळ निवारा न राहता एक सौंदर्यस्थळ कसं होईल हे ठरायला आता या क्षेत्रातली प्रगती आणि ग्राहकाच्या हातातला पैसा दोन्ही कारणीभूत आहे.
   
    अशाच एका नव्याने सुरु झालेल्या एका स्किममधील सॅंपल फ्लॅट बघायचा योग आला.हल्ली हे देखील नव्यानेच सुरु झालयं. पूर्वी कागदावर, इमारत तयार झाल्यावर कशी दिसेल याचे फोटो फारतर बघाय़ला मिळत. आता एक तयार फ्लॅट असतो त्यावरुन तुम्हाला बांधकाम,रचना सगळ्याचीच कल्पना येते. तर असा सॅंपल फ्लॅट बघायला गेले.वास्तविक आता मला घर घ्यायचे नाही पण नवीन काय केलय ते बघू तरी म्हणून गेले. प्रवेशापासूनच स्वच्छता आणि सौंदर्याची प्रचिती येवु लागली शिवाय सुरक्षिततेची ही अतोनात काळजी ! आपला चेहरा दिसेल इतक्या स्वच्छ् आणि चकाकणाऱ्या जिन्याच्या संगमरवरी पायऱ्यावरुन चालणेही नको वाटत होते. वरती गेल्यावर आमच्या चपला काढून तेथे ठेवलेल्या चपला पाय़ात घालायची सूचना मिळाली. बंद दरवाज्याला लागून एक कॅमेरा त्यात आलेल्याचा चेहरा आत दिसणार ,व्यक्ती परीचितांपैकी असेल तरच दरवाजा उघडायचा. वर येणारी व्यक्ती सुरक्षा कर्मचाऱ्याने पाठवलेली असली तरी तिला आत प्रवेश मिळणे खातरजमा झाल्याखेरीज शक्य नाही. आत शिरतानाच आपल्या उंचीइतक्या आरशात स्वतःला न्याहाळित आत शिरलो. उजवीकडे प्रशस्त दिवाणखाना म्हणता येईल असा हॉल. त्यातले कोच,खुर्च्या सगळेच उंची वैभवाची साक्ष देणारे. चित्रपटगृहात शोभावा इतका मोठा टि.व्ही. आकर्षक अशा लॅंपशेडस्. हॉलच्या बाहेर प्रचंड मोठी बाल्कनी.तिचे क्षेत्रफळ ५५० चौ.फूट (इति आम्हाला जागा दाखविणारा एक्झिक्युटिव्ह). त्या बाल्कनीत बांधलेल्या चौकोनी खड्ड्यात लावलेली झाडेही सुरेख होती. एका कोपऱ्यात झोपाळा होता. कठड्याला पाण्याची कारंजी होती. हॉलला लागुन एक बेडरुम होती. ती सर्व फर्निचरने सुसज्ज होती त्यातही लहान टि.व्ही. छोटे टेबल,एक आरामखुर्ची. खोलीला लागुन बाथरुम त्यात अत्याधुनिक नळांची फिटींग्ज. हॉलमधुन दोन पायऱ्या चढून डायनिंग आणि स्वयंपाकघर होते.स्वयंपाकघरात मोठा ओटा त्याखाली भांडी ठेवण्याकरीता ट्रॉलीज, मोठा फ्रिज स्वयंपाकघराच्या मागे वॉशिंगमशीन आणि डीशवॉशर ठेवायला जागा शिवाय एक छोटी स्टोअररुम अर्थात साठवणासाठी खोली.शिवाय धुणं,भांडी करण्याकरीता छोटी बाल्कनी. हॉलमधुन वरती जायला एक देखणा जिना आणि वरती दोन बेडरुम्स. त्यामध्येही तसेच सुरेख फर्निचर. वुडन फ्लोरींग. सरकत्या दरवाज्याची कपाटे. भिंतीवर छानशा फ्रेम्स. मोठा आरसा असलेले ड्रेसींग टेबल. निवडून आणलेल्या लॅंपशेडस. वरच्या एका बेडरुममधुन खालचे सगळे दिसेल अशी मोठी काच आणि प्रायव्हसी हवी असेल तर त्यावर असणारी सरकती लाकडी फ्रेम. सौंदर्य,कलात्मकता याची पुरेपूर जाणीव करुन देणारी देखणी वास्तू शिवाय त्याचे आकारमान आणि वापरलेले उच्च प्रतीचे सामान बघुन केवळ श्रीमंतांनाच घेता येणे शक्य होणार हे कळतच होते.

    या अती सुंदर कलाकृतीत वैगुण्य शोधायाला मी काही कुणी वास्तुविशारद, किंवा इंटिरियर डिझायनर नाही. बांधकामशास्त्रातले तर मला काहीच ज्ञान नाही त्यामुळे त्यातल्या चुका मी काढु शकत नाही. पण  एकदोन गोष्टींची उणीव ठळकपणे जाणवली याला कुणी  ’कोल्ह्याला द्राक्षे अंबट’ असंही म्हणू शकेल. तरीही त्यांचा उल्लेख करावासा वाटतो. त्या विशाल वास्तुमध्ये ’देवघर’ किंवा देव ठेवण्य़ाकरीता कुठेही जागा दिसली नाही.सॅंपल फ्लॅट मधे त्यांनी नसतील ठेवले देव. पण देवाची स्थापना करण्याजोगी जागाही मला कुठे सापडली नाही. आपल्या निधर्मी देशात अशी अपेक्षा ठेवणे गैर मानावे तर हल्लीच्या दिवसात पूर्वीपेक्षा सगळ्या देवांचे सार्वजनिक पूजन आणि सगळ्या धर्मांचे सण इतक्या  जल्लोषात साजरे होताना दिसतात ते बघुन आस्तिक लोकांचे प्रमाण नक्कीच जास्त आहे मग देवाकरीता जागा का ठेवली नसेल?

    दुसरी महत्त्वाची गोष्ट त्या महान घरात पुस्तक ठेवायलाही एकही कपाट नव्हते. आजकाल इ-बुकचा जमाना आलाय आणि तुम्ही कुठे पुस्तकांच सांगताय असं कुणी म्हणेल.पण एवढ्या सुंदर बाल्कनीतल्या झोक्यावर चहाचा घोट घेत एखादं सुंदर पुस्तक वाचाव असं इथे राहणाऱ्याला वाटणारच नाही का? एखाद्या रात्री आपल्या मित्र मंडळींना बोलावुन काव्य वाचन,कथावाचन असं या घरात होणार नाही का? ( रात्रीच्या ड्रिंकपार्ट्यांकरीता बार मला त्या बाल्कनीत दिसला)

    देव आणि पुस्तके या कदाचित माझ्या मध्यमवर्गीय वृत्तीच्या आवश्यक गरजा असतील.शिवाय त्या सॅंपल फ्लॅट सारखे फर्निचर इतर फ्लॅट्स मधे असणार नाही.तेंव्हा असलेल्या मोकळ्या घरात प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार फर्निचर करायला मुखत्यार आहेच. पण सॅंपल फ्लॅट बनवताना बिल्डरने या गोष्टी विचारात घेतल्या नाहीत म्हणजे आजकाल त्यांचे महत्त्व तेवढे नाही असे तर नसेल? कदाचित तसे फ्लॅट घेणाऱ्यांना त्यांची आवश्यकता नसेल !

Thursday, February 20, 2014

आमच्या लग्नाची रौप्य महोत्सवी गोष्ट

           एका लग्नाची गोष्ट पासून सुरु झालेल्या ’एका लग्नाची दुसरी गोष्ट’,’एका लग्नाची तिसरी गोष्ट’ अशा प्रसिध्द मराठी मालिका बघितल्यावर  आमच्या ’लग्नाची रौप्य महोत्सवी गोष्ट’ सांगण्याचा मला मोह झाला. आमच्या लग्नाची गोष्ट मालिकेसारखी रोमॅंटिक नाही. मुळात माझा ’प्रेमविवाह’ नाही ,दाखवुन ठरवुन झालेल्या लग्नाच्या गोष्टीत काय विशेष असणार? , त्यामुळे लग्न कसे जमले हे सांगण्याजोगे नाहीच. त्यापुढची कथा चारचौघांपेक्षा वेगळी नाही,तरीही सांगण्यासारखी नक्की आहे.

           पंचवीस वर्षांपूर्वी माझं लग्न ठरलं त्यावेळी आमची आर्थिक परिस्थिती साधारणच होती. मला वडील नव्हते, भाऊ नव्हता. माझे शिक्षण,नोकरी,बऱ्यापैकी रुप या जमेच्या बाजू असल्या तरी आर्थिक परिस्थिती मुळे आईला माझ्या लग्नाचा चांगलाच घोर लागला होता. त्यात कितीही उच्च शिक्षित मुलाकडे चौकशीला गेले कि ते पत्रिका मागत आणि ती जुळत नसल्याचा निरोप चार दिवसात येई. त्यामुळे तर आई फारच रंजीला आली होती. तो जमाना इंटरनेटचा नव्हता त्यामुळे विवाहेच्छू मुलांच्या माहित्या मिळवायचे एकमेव साधन विवाहसंस्था होते,त्याही त्यावेळी पुण्यात मोजक्याच होत्या. त्यातुन आणलेल्या दहा पत्त्यांपैकी पाचांची लग्ने झालेली वा ठरलेली असत(विवाहसंस्थेला कळवण्याची तसदी त्यांनी घेतलेली नसे) चारांच्य़ा पत्रिका जुळत नसत.एखादे स्थळ उरे ते मला आवडत नसे.

    तोपर्यंत माझ्या आईने ज्योतिषाचा उंबरठा शिवला नव्हता.माझ्या वडीलांचा पत्रिकेवरही विश्वास नव्हता आमच्या घरात माझ्या वेळेपर्यंत कुणाची लग्ने पत्रिका बघुन झाली नव्हती. माझ्या लग्नाचा प्रश्ण आईला जटील वाटल्याने तिने कुठल्याशा ज्योतिषाला माझ्या लग्नासंबंधी विचारले, तो सप्टेंबर महिना होता. त्यांनी कळविले लग्न जमले तर दोन महिन्यात जमेल अन्यथा पुढील चार वर्षे योग नाही. झाले... आईची काळजी दोनशे पटिने वाढली.माझ्या लग्नाची सगळी खटपट माझी मोठी बहिण करीत होती.दिवाळीच्या सुट्टित ती केरळ ट्रीपला जाणार होती तिचे बरेच आधीपासून ते ठरले होते. आक्टोबर अखेरीस ती ट्रीपला गेली,जाण्यापूर्वी बऱ्याच ठिकाणी तिने पत्रे धाडली होती,वा भेटुन माझी कुंडली देवुन आली होती. ती केरळला गेल्यानंतर आईने माझे डोके खायला सुरुवात केली. इतर परीक्षांइतकी  हि परीक्षा सोपी नाही असे मलाही वाटले,कारण माझ्या हातात नसणाऱ्या बऱ्याच गोष्टींचा या परीक्षेत अंतर्भाव होता. वास्तविक आपले लग्न व्हावे असे मला मनापासून वाटतही नव्हते. आईची काळजी अनाठायी आहे असे मला फार वाटे,पण तिच्या जागी तिचेही बरोबर होते. माझ्या चुलत,मावस,आते बहिणी माझ्या आसपासच्या वयाच्या होत्या आणि त्यांची लग्ने झाली होती.

        आक्टोबर महिना आला.माझ्या लग्न झालेल्या दुसऱ्या बहिणीचा दिवाळसण होता, मी आणि आई त्या तयारीत होतो.आईच्या डोक्यात माझ्या लग्नाच्या काळजीचा किडा होताच पण दिवाळीच्या नादात त्याचा थोडा विसर तिला पडला असावा. त्या आठवड्यात बऱ्याच मुलांकडून माझ्या कुंडल्या जुळत असल्याची पत्रे आली. दिवाळीनंतर काही जणांनी भेटायला बोलावले होते. एकाच पत्रातील मुलाकडच्यांनी आमच्या घरी भेटायला येण्याचे कळविले होते. कळविल्याप्रमाणे ते एका संध्याकाळी आमच्या घरी आले. आई आणि मुलगा असे दोघे आले. माझी आई आणि मुलाची आई फार जुनी ओळख असल्यासारख्या गप्पा मारीत होत्या. दिवाळीचे फराळाचे पदार्थच खायला ठेवले होते. अर्धा तासाच्या भेटीत मी काय बोलले किंवा मी काय विचारले मला आता काहिच आठवत नाही. माझ्या मैत्रीणीचे असे बरेच कार्यक्रम झालेले होते तिला मी विचारले होते, १५-२० मिनिटांच्या मुलाखतीत एखादी व्यक्ति पसंत कि नापसंत हे कसे कळणर? त्यावर तिने फार छान सांगितले होते ती म्हणाली, "पसंतीचा मला अजून अनुभव नाही आला,पण एखादी व्यक्ती नापसंत आहे हे कळायला पाच मिनिटेही पुरतात अगं"
आमच्या घरुन ते दोघे जायला निघाले जाताना आई त्यांना म्हणाली," आमची बाग मोठी आहे,मी खूप झाडे लावली आहेत आता काळोख झाला नाहीतर तुम्हाला दाखवली असती"
" पुन्हा येईन मी बघायला" त्या  म्हणाल्या
मला मनात हसूच आले, लग्न ठरल्यासारख्याच त्या दोघी बोलत होत्या.
मंड्ळी निघून गेल्यावर आईने सुरु केले," ह्या बाई फार चांगल्या आहेत, तू नाही म्हणू नको माणसं चांगली वाटतात......"
माझ्या मैत्रीणीच्या वाक्याचा विचार केला तर मला तो मुलगा नापसंत आहे असे वाटले नव्हते पण म्हणून पसंतच आहे असेही म्हणावेसे वाटले नाही.एकूण मला या मुलाखतीतून माझ्या आयुष्यातला एवढा मोठा निर्णय इतका झटपट घ्यावा हे पटत नव्हते. त्यांच्याकडचे उत्तर आल्यावर बघू असे म्हणून मी तिला झटकून टाकले.पण दोनच दिवसात त्यांच्याकडून मुलगी पसंत असल्याचा निरोप आला. आईने अखंड माझ्या मनावर तू नाही म्हणू नको असे बिंबवले. माझी मोठी बहीण दिवाळी झाल्यावर ट्रीपहून परत आली तिला आईने पुढील बोलणी करायला त्यांच्या घरी धाडले आणि अशा रितीने माझे लग्न एकदाचे ठरले!

      त्यावेळी कंत्राट पध्द्तीने लग्ने होत असत,पण आम्हाला तशा पध्द्तीने लग्न करुन देणॆ शक्य नव्हते. मुलाकडचे लोक कर्नाटकातले होते पण  त्यांची चाळीसाहून अधिक वर्षे पुण्यातच गेली होती त्यामुळे त्यांच्या बोलण्यातही कानडी हेल जाणवत नसत.पण दक्षिणेकडील लोक खूप हुंडा मागतात,चांदी-सोने खूप मागतात असे आम्हाला बऱ्याच लोकांकडून समजले होते तसे मागितले तर मी लग्न करणार नाही असे मात्र मी घरी स्पष्ट सांगितले होते.पण लग्नाच्या बैठकीत मुलाकडच्यांनी हुंडा,दागिने कशाकरीता अडविले नाही.
त्यांनी फक्त आमचे सातशे लोक लग्नाला येतील आदल्या दिवशी देखील कुठलेही कार्यक्रम नकोत असे सांगितले. शिवाय़ त्यांना लग्न फेब्रुवारी महिन्यातच हवे होते.माझ्या घरच्यांनी ते मान्य केले.एकूण हजार लोक तरी लग्नाला असणार.कारण आमचं गोत ही मोठच होतं अगदी काटछाट केली तरी आमची तीनशे माणसे तरी होत होतीच. दोन महिन्यात सगळी तयारी करणे आम्हाला खरोखरीच अवघड जाणार होते. मुख्य अडचण लग्नासाठी हॉल मिळविण्याची होती. पुण्यामधली सगळी कार्यालये बुक्ड होती. धनकवडी भागात सातारा रोडवर बरीच नवीन कार्यालये झालेली होती.त्यातले एक आम्हाला मिळाले.कार्यालय नवेकोरे,भरपूर ऐसपैस होते. आता बाकीची तयारी अवघ्या दोन महिन्यात कराय़ची होती. आमचे ओळखीचे आचारी होतेच त्यांच्या कडून यादी आणून सामान आणले. लाडू-चिवडा घरच्या अंगणातच केला. आदल्या दिवशी मार्केट यार्डातून भाजी आणून ठेवली.या सगळ्य़ातच साड्या खरेदी,केळवणे,लग्न पत्रिका छापुन आल्यावर आमंत्रणे आणि माझी नवी नोकरी सगळे चालुच होते.त्यावेळी मोबाइल तर नव्हतेच पण फोन देखील सगळ्यांकडे नव्हते त्यामुळे बाहेरगावची सोडली तर बाकी सारी आमंत्रणे समक्ष जावुनच करावी लागत. माझ्या दुसऱ्या बहिणीचे लग्न आधीच्या वर्षी झाले होते ती बाळंतपणाला आलेली होती. तिला कधीही दवाखान्यात न्यायची वेळ येईल अशी परिस्थिती होती. असा एकूण दोन महिने कामाचा गदारोळ चालू होता. यामधे नवऱ्या मुलीला मेंदी,नटवणे याकरीता ब्युटी पार्लर वा घरी ब्युटीशियन बोलावणे असले प्रकार नव्हतेच. मी लग्नाच्या आदल्या दिवशीपर्यंत ऑफिसला गेले होते त्यामुळे आदल्या दिवशी घरी आल्यावर मला बांगड्या भरल्या माझ्या एका मैत्रीणीने मला मेंदी काढली. आम्ही रात्रीच लग्नाच्या हॉलवर जेवण करुन झोपायला गेलो.

         लग्नाचा मुहूर्त सकाळी साडेनऊच्या सुमारास होता.लग्न वैदिक पध्दतीने होणार होते त्यामुळे लग्नाचे सगळे विधी मुहूर्तापूर्वी झाले. सकाळी साडेसात पासून कार्यक्रमांना सुरुवात होणार होती. माझी मंडईजवळ राहणाऱ्या माझ्या मावशीने लग्नासाठी लागणारे फुले हार आणावयाची जबाबदारी घेतली होती. ती रीक्षातून मोठाले दोन हारे घेवुन आली.तिच्या लेकी,सुना आवरून बसने येणार म्हणून त्यांनी त्यांच्या दागिन्यांची पिशवी मावशीजवळ दिली.रीक्षातुन उतरुन फुलांच्या टोपल्या नीट उतरवुन घेण्याच्या नादात मावशीच्या हातुन दागिन्यांची पिशवी रीक्षातच राहिली. हॉलमध्ये कुणाच्यातरी ताब्यात फुले दिल्यानंतर तिला दागिन्यांची आठवण आली , आणि ती मटकन खालीच बसली. तिच्या मुलाला तिने डोळ्यात पाणी आणून घडलेली घटना सांगितली.
पण तो तिलाच म्हणाला," आई, मावशीच्या घरातलं शुभकार्य आहे, अजिबात रडायचं नाही. कुणाजवळ बोलायचंही नाही. नंतर बघू काय करायचं ते "
तरी सगळी गडबड माझ्या सासऱ्यांच्या कानावर गेली. ते माझ्या मावशीला म्हणाले, "इथे गोंदवलेकर महाराजांचा फोटो आहे त्यांना मी कार्य निर्विघ्न पार पडावे यासाठी प्रार्थना केली आहे.तुम्ही निर्धास्त रहा."
आणि दहा मिनिटांत तो रीक्षावाला हॉलवर आला, त्याला पद्मावतीपाशी रीक्षात राहिलेली पिशवी दिसली ती द्यायला  तो भला माणूस परत आला, माझ्या मावसभावालाच तो मावशी बद्दल विचारु लागला,भावाने त्याला ५०रु.बक्षिस दिले, आईने चिवडा-लाडूचे पाकिट त्याला दिले.

        सकाळचे साडेसात वाजले.लग्नाच्या विधींना सुरुवात झाली. पावणे नऊ-नऊ वाजेपर्यंत विधी चालू होते. साडेनऊ वाजता मुहूर्त होता.मधल्या पंधरा मिनिटात मला साडी बदलून गौरीहार पुजायचा होता.त्यासाठी वरच्या मजल्यावरच्या खोलीत जायचे होते.खोलीकडे जायला हॉलच्या दुसऱ्या टोकाकडील जिना होता.जायला आणि यायला मिळून किमान  पाच -सात मिनिटे लागणार होती. (नवऱ्या मुलीने धावणे बरे दिसले नसते.) घाईगडबडीत मैत्रीणींनी साडी नेसविली.गौरीहाराजवळ बसून पुजा केली.तोवर माझा मामाने लवकर चला असा धोसरा लावला.मामाचा हात धरुन बाहेर आले तेंव्हा हॉल माणसांनी पुर्ण भरुन गेला होता. गर्दीतून वाट काढीत आम्ही स्टेजवर पोहोचलो तेंव्हा गुरुजी आंतरपाट धरुन उभे होतेच, त्यांच्या हातात एक फुलाचा हार होता. ते मला म्हणाले,"तुम्ही वराला घालायचा हार कुठे?"
त्यांच्या हाराकडे बघून मी म्हणाले ,"तुमच्या हातात आहे तोच"
"हा तुमचा हार नव्हे हा नवऱ्यामुलाचा आहे, तुमचा हार आणा" गडबडीत हार वरच्या खोलीतच राहिला होता. मी तो आणायला जायचे कसे अशा विचारात पडले तेवढ्यात
 माझ्या मागे उभी असलेल्या बहिणीने मला थांबविले आणि तिने कुणाला तरी हार आणायला पिटाळले. दरम्यान मंगलाष्टके सुरु झालेली होती. ’तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्र्बलं तदेव ..’ होईपर्यंत माझ्या हातात हार आलेला होता. अजुनही कधी कधी माझ्या मनात विचार येतो त्यावेळी हार वेळेवर आला नसता तर काय झाले असते?

       लग्नाची ही अशी गडबड चाललेली असतानाच तिकडे आमचे आचारी कामत स्वयंपाकाला लागणार,त्यांनी त्यांच्या मदतीला चार सहकारी आणि दहा वाढपी सांगितले होते.पण त्या दिवशी पुण्यातील सगळ्य़ाच कार्यालयांमध्ये लग्न असल्याने त्या लोकांना गावातच काम मिळाले त्यामुळे धनकवडीपर्य़ंत त्यांचा एकही सहकारी आला नाही. कामतांनी हि बातमी माझ्या मामांना सांगितली. साडेनऊला लग्न लागल्यानंतर साडेआकरापर्यंत स्वयंपाक होणे आवश्यक होते. एक हजार लोकांचा स्वयंपाक एकटा  माणूस तीन-चार तासात करणे अवघडच नव्हे तर अशक्य होते. कामत अगदी रडवेले झाले.पण माझे मामा अतिशय धीराचे आणि कुठल्याही प्रसंगाला शांतपणे सामोरे जाणारे आहेत.ते म्हणाले
"कामत, हे कार्य आपलं आहे, ते छानच झाल पाहिजे.तुम्हाला मदतनीस हवेत ना? आम्ही सगळे आहोत ना ! तुम्हाला हवी ती मदत आम्ही करतो"
म्हटल्याप्रमाणे माझ्या मामी,मावशा,काकू,आत्या,सख्या,चुलत,मामे,आते ,मावस बहिणी,मैत्रीणी सगळ्या आपल्या सुंदर साड्य़ांमधे स्वयंपाकघरात गेल्या भाज्या चिरणे,चटण्या वाटणे अशी कामत सांगतील ती कामे त्यांनी केली.आणि साडे अकरावाजता पहिली पंगत बसली. सगळ्य़ा पंगतींत वाढण्याचे काम माझे भाऊ,काका,मामा,मैत्रीणी यांनी केले. आपली पद,प्रतिष्ठा सगळे बाजुला ठेवुन केवळ माझ्यावरील प्रेमापोटी या साऱ्यांनी एवढे काम अगदी आनंदाने,आग्रहाने केले. एवढ्या आलेल्या पाहुण्या मंडळींपैकी कुणालाही लग्नात कसली उणीव दिसली नाही.

       आजकाल लग्ने मोठ्या झोकात पार पडतात.आता लोकांजवळ पैसा आहे,हौस आहे. ती पुरवायला साधनांची उपलब्धता आहे. कापड खरेदीकरीता केवढी मोठी बाजारपेठ आहे.देशाच्या कुठल्याही गावातून खरेदी ऑनलाईन करता येते. पु.ल.देशपांड्य़ांच्या ’नारायण’ ची जागा इव्हेंट मॅनेजमेंट ने घेतली आहे.ब्युटीपार्लर,मेक-अप,फोटो यांचे आजचे खर्च ऐकून धक्का बसतो,मग हॉल, जेवण, रिसेप्शन, कपडे याबद्दल तर बोलायलाच नको. आमच्या वेळी हे नव्हते ते बरेच म्हणायचे कारण खर्च करायला आमच्याजवळ तेवढा पैसा नव्हता.पण माझ्या आईवडीलांनी जोडलेल्या माणसांची किंमत अनमोल होती. त्यामुळे आम्हा बहीणींची लग्ने सुरेख पार पाडली.त्या कार्यात श्रीमंतीचे प्रदर्शन नसेल कदाचित पण प्रेम,माया आपुलकी आणि आदरातिथ्याचे ऐश्वर्य होते. आम्हा तिघी बहिणींची सासरचे लोक देखील माणसांना धरुन असलेले असल्याने सासरी आम्हाला विशेष जड गेले नाही.

    बहिणाबाईंनी म्हटल्याप्रमाणे संसारात आधी हाताला चटके घेत घेत भाकरी मिळाली. सुख दुःखांशी सामना करत म्ह्णता म्हणता पंचविस वर्षे संपली. मुली हल्लीच्या जमान्यातल्या असल्यामुळे आई-बाबांच्या लग्नाला पंचवीस वर्षे होण्याआधीच तुम्ही काय करणार? असे विचारु लागल्या.
"आई बाबांनी दोघांना कुठेतरी ट्रीपला जाऊदे"
"नको, ते बाहेर गेले तरी भांडत बसणार,त्यापेक्षा घरीच राहूदे" असे त्या दोघींचेच विचार विनिमय सुरु होते.
आपल्या देशात पंचविस वर्षे एकत्र राहण्यात फार मोठे विशेष असे अजुन तरी नाही . त्यामुळे खास काही करावे असे मला काही वाटत नव्हते. माझ्या नवऱ्याने संसाराच्या बाबतीतले सगळे निर्णय माझ्यावर सोपवले आहेत.( त्यांना इतर कामे बरीच असतात आणि ती घर, संसाराहून नेहमीच फार महत्त्वाची असतात त्यामुळे त्यांनी काही ठरवायचा प्रश्ण् नव्हताच.)
त्या दिवशी संध्याकाळी तरी बाहेर जेवायला जाऊ असे मुलींनी सुचविले.आमच्या घराजवळ नवऱ्याचा कॉलेजमधील मित्र राहतो. त्यांच्याकडे आमचे नेहमी जाणेयेणे असते.आमच्या मुलींच्या बडबड्या स्वभावामुळे त्या दोघींचेच ते जास्त मित्र बनले आहेत. त्यांच्या पत्नीची आणि माझीही छान मैत्री आहे. चौघांनीच जेवायला जाण्यापेक्षा आमच्या या स्नेह्यांना पण घेवुन जायचे ठरले. मग संध्याकाळी आम्ही त्यांच्या घरी गेलो. धाकटी लेक तेथेच येण्याचे ठरले होते. त्या काकांना ऑफिसमधुन यायला उशीर होत असल्याने ते परस्पर हॉटेलवर  येणार असे ठरले. सात नंतर धाकट्या मुलीचा फोन आला ती घरी आवरायला गेली होती आणि तिने आम्हाला परत घरी बोलावले तिला नेण्याकरीता. या सगळ्यामधे पाऊण ते एक तास गेल्यामुळे बराच वेळ वाया गेल्याने नवऱ्याची मनातुन खूप चिडचिड झाली.

        शेवटी आम्ही घरी गेलो. सगळ्यांनी वरच जाऊ असे मोठ्या मुलीने सांगितले. तिच्या सांगण्याला विरोध करुन वाद वाढायला नकोत म्हणून आम्ही वर गेलो. बेल वाजवली.मुलीने दार उघडले आणि आत बसलेल्या पाहुण्यांना बघुन आश्चर्य आणि आनंदाने मला खरोखरीच काही सुचेचना ! मुलींनी आम्हाला नकळत आमच्या सुमारे तीसपस्तीस  नातलग आणि मित्र मंडळींना बोलावले होते. मुलींनी आपल्या कटात घराजवळ राहणाऱ्या मावशी आणि काकाला सामील करुन घेतले होते,त्या उभयातांनीही दोघींना सर्वतोपरी मदत केली.दुपारी त्यांच्याच घरी पावभाजी केली होती. मुलींच्या हौसेसाठी त्या मावशीने बराच त्रास घेतला. तिच्याच मार्गदर्शनामुळे पावभाजी फारच छान झाली होती. एरवी घरात फारसे काम न करणाऱ्या माझ्या मुलींनी पावभाजी झाल्यावर मावशीचे स्वयंपाकघर चकाचक आवरुन ठेवले होते. केक आणला होता. कागदी -प्लेट्स, चमचे,ग्लास पासून सगळ्याची जमवाजमव केलेली होती. आमचा नातलग परीवार तसेच मित्र परीवारही खरचच खूप मोठा आहे. इतक्या साऱ्यांना आमच्या अपरोक्ष कळविणे आणि त्यांच्याकरीता काही बनविणे दोघींना शक्य नव्हते. धाकटी लेक अजुन शिकतच आहे, थोरली पदव्युत्तर शिक्षणाच्या प्रयत्नात आहे म्हणजे एकूणात त्या आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी नसल्याने एखादा छोटा हॉल बुक करुन केटरर बोलावणे आदी त्यांना जमणारे नव्हते.म्हणून त्यांनी प्रातिनिधिक स्वरुपात आम्हा उभयतांचे काही लोक बोलावले. त्यात माझ्या नवऱ्याला खोखो शिकवणाऱ्या सरांना जेष्ठ् व्यक्ति म्हणून बोलावण्य़ात त्यांनी जे औचित्य दाखविले त्याचे मला खूप कौतुक वाटले. धाकटीने मोजक्या पण सुरेख शब्दात आम्हाला एक पत्र लिहिले होते त्याचे वाचन केले. सर्वांना आल्याबद्दल त्या दोघींनी हातानी थॅंक्यु कार्डस् देखील बनविली होती !

        माझ्या लग्नात ज्या आपुलकीने कार्याला शोभा आली तशाच माया आणि आपुलकीने आमचे सगे-सोयरे मुलींच्या आग्रहाला मान देवुन लग्नाच्या पंचवीसाव्या वाढदिवसाला आले. मुलींचे कौतुक केले आणि न्यून ते पुरते करुन तो कार्यक्रम सुरेख पार पडला. माझ्या मुलींना आई-बाबांच्या लग्नाचा वाढदिवस त्यांच्या लोकांना बोलावुन  साजरा करावासा वाटला याचा मला फार आनंद झाला. शेवटी सुख आणि आनंदाच्या कल्पना व्यक्तीसापेक्ष असतात. लग्नाचा रौप्य महोत्सवी वाढदिवस दोघांनीच कुठेतरी जावुन साजरा करण्यात मला तरी  कितपत आनंद वाटला असता याबद्दल शंकाच आहे. मुलींना सोडून रहायला मला जडच जाते आणि आपल्या आनंदाच्या प्रसंगात आपले जवळचे लोक आले तर तो द्विगुणित होतो असं मला वाटत. मुलींना आईचं मन समजलं, मुली मोठ्या झाल्या असं मला फार प्रकर्षाने जाणवले. जोडलेल्या माणसांची संपत्ती सर्वश्रेष्ठ हे आम्हा उभयतांच्या आईवडीलांचे संस्कार मुलींपर्यंत पोचल्याचं समाधानही खूप आहे.
   

Thursday, January 9, 2014

आईची समाजसेवा

          माझ्या आईचा घरादारालाच नाही तर आमच्या साऱ्या गल्लीलाच धाक होता. तिचं व्यक्तिमत्वही भारदस्त होतं. माझ्या लहानपणातली आठवण आहे, आम्ही तेंव्हा एस.पी. कॉलेज मागच्या चाळीमधे रहात होतो.पलीकडच्या चाळीत कॉलेजच्या चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी रहायचे.त्यातील एका शिपायाचा मोठा मुलगा यशवंत उर्फ येशा दारु पिऊन धिंगाणा घालत असे. त्याच्या तरुण बायकोला मारहाणसुध्दा करायचा. आमच्या बाजुला नेहमीच आवाज येत नसे,पण एकदा बराच ओरडा झाल्याने त्यांच्या घरासमोर बरीच गर्दी जमली होती.तो खोलीत बायकोला मारत होता, माझ्या आईच्या कानावर जाताच ती घरातले काम टाकुन तिकडे गेली.गर्दीतुन त्यांच्या घरात शिरली आतल्या खोलीत दार लावुन तो शिव्या देत बायकोला बडवत होता.तिचा रडण्याचा आवाज येत होता.आईने दाराची कडी जोरात आपटली त्याहुन वरच्या पट्टीतल्या आवाजात त्याला हाक मारली आणि दार उघडायला लावले. दार उघडताच त्याच्या बायकोला हाताला धरुन बाहेर काढले आणि त्याला खोलीत ठेवुन खोलीचे दार बाहेरुन लावुन ती बाहेर पडली. बाहेर उभ्या असलेल्यांवरही तिने ," नुसते बघत काय बसला होतात? या पोरीचा जीव गेल्यावर तुम्ही पोलिसांना कळावणार होतात का?" असा जाब विचारत त्या मुलीला घेवुन ती आमच्या घरी आली.
दुसऱ्या दिवशी दारु उतरल्यावर येशा खली मान घलुन आमच्या घरी आला. आईची माफी मागत म्हणू लागला," माझं चुकलं, तुम्ही मला आईसारख्या आहात...."
त्याबरोबर उसळून आई म्हणाली, "तुझ्यासारखा दारुडा मुलगा मला नको, अरे चांगली हौशीनी एवढी गुणी पोर करुन आणालीस आणि तिला मारतोस? लाज कशी वाटत नाही तुला? माझ्या समोर शपथ घे पुन्हा असं वागणार नाही तस वागुन दाखव, मगच मला आई म्हण "

    पुरग्रस्तांसाठी वसविण्यात आलेल्या सहकारनगरमधे आम्ही रहायला गेलो त्यावेळी तो भाग पुण्याच्या बाहेर वाटायचा.सगळी शेतजमीनच होती ती.बांधकामे चालू होती.रस्ते देखील मातीचेच होते. रहावयास आलेले लोकही फार नव्हते. आमच्या घरासमोरच्या घरांमागे पटांगण होते तेथे बांधकामावर काम करणऱ्या कामगारांच्या झोपड्या होत्या. एक दिवस आईला बराचवेळ कुणी बाई रडत असल्याचा आवाज येत होता. तिची सकाळची कामे उरकल्यावर तिला आवाज जास्तच जाणवु लागला. घरात चैन पडेना तिला. घर  बंद करुन ती आवजाचा शोध घ्यायला बाहेर पडली. पटांगणातील झोपडीमधे एक लमाण बाई, बाई कसली वीस-बाविशीतली मुलगी रडताना तिला सापडली. तिचं तान्ह मुल देवाघरी गेलं होतं , वस्तीतली मोठी बायका आणि पुरुष माणसे कुठेतरी बांधकामावर गेलेली होती.तिच्या मांडीवर तिचं लेकरु गतप्राण झालेलं होतं.दुःखान उर फुटुन ती रडत होती, आजुबाजुला वस्तीतली एक दोन लहान मुलं कावरीबावरी होवुन बसलेली होती. ते दृष्य मोठं विदारक होतं, आईनं तिला शांत केलं हि घटना मोठी माणसं कामावर गेल्यावर झाली होती सकाळ पासुन त्य़ा पोरीच्या आणि त्या मुलांच्या पोटात काही गेलेल नव्हत. आई घरी आली घरातल अन्न घेवुन पुन्हा तिकडे गेली त्या सगळ्यांना तिन खाय़ला लावल. त्यावेळी फोनही फारसे नव्हते मग मोबाइल तर दुरच.शिवाय त्या पोरीला काम कुठे चाललय हेही माहित नव्हत , मग तिकडे जावुन त्या लोकांना आणण्याचा प्रश्ण नव्हताच. संध्याकाळी अंधार पडल्यावर त्या वस्तीतुन पुन्हा रडणे सुरु झाले, आई पुन्हा तिकडे गेली त्या मुलाला मोठी माणसे स्मशानात घेवुन गेली ती परत आल्यावर आईने त्यांना चहा नेवुन दिला, भात -पिठल पाठवल. मुलं आजारी पडली कि लगेच उपाय करा म्हणजे हि वेळ येणार नाही हे सांगाय़लाही ती विसरली नाही. पुढे बरीच वर्षे बांधकामाच्या निमित्तानं ह्या झोपड्या आमच्या भागात असायच्या, तिथली मुलं सर्दी -खोकल्यानं आजारी पडली तर आई बागेतला गवती चहा, पारीजातकाची पान,आल्याचा तुकडा देवुन त्याचा काढा कराय़ला सांगायची, आमच्या कडे काढा तयार असला तर तोच त्यांना द्यायची.

    सोसायटीत घराघरांतुन छोट्या-मोठ्या कुरबरी चालत. येथे रहायला आलेली मंडळी बहुतेक नारायण-शनिवार पेठांमधल्या वाड्य़ातुन, चाळीतुन आलेली त्यामुळे फ्लॅट,बंगले संस्कृती त्यांच्या अंगवळणी पडलेली नव्हती. दारे -खिडक्या उघड्याच असत सगळ्या घरांच्या. त्यामुळे आवाज गल्लीभर ऐकायला येत, शिवाय वाहने नव्हतीच त्यावेळी. समोरच्या घरांतील एकांकडे नवीन सून आली होती आणि तिच्याशी घरचे पटवुन घेत नसत. एकदा त्यांच्या घरातुन बराच आरडाओरडा ऐकू येत होता. आजुबजुच्या घरातुन सगळे तमाशा बघत होते. आई तिकडे गेली, तिच्या ठेवणीतल्या आवाजाने तिने सगळ्यांना शांत केले. नव्या सुनेला घेवुन ती आमच्या घरी आली. तिने सासरच्या लोकांचा तक्रारीचा पाढा वाचायला सुरुवात केली. तिचे माहेर दूर भुसावळला होते. भावाने कर्ज काढुन लग्न करुन दिले होते. माहेरी कळवुन त्या लोकांना त्रास देणे तिला नको वाटत होते. तिचा बी.ए. चा एक पेपर राहिला होता. आई तिला म्हणाली, " तुझ्या घरच्या भांडणांबद्दल मला काही सांगु नको, घरोघरी तेच चालत. तू रिकामी बसू नको, अभ्यास करुन पदवी मिळव, माझ्या घरी अभ्यासाला येवुन बस. जवळ कामगार कल्याण केंद्र आहे, तिथे जावुन शिवण शिक. चार पैसे कमवायला लाग. भांडण आपोआप कमी होतील"

    आमच्या पलिकडच्या सोसायटीत एक सरकारी ऑफिसर रहात होते ते सैन्यातुन निवृत्त होवुन मग एका डिफेन्स ऑफिसमधे नोकरीला होते, त्यांच्या मुलाला जन्मतः कानामध्ये दोष होता, त्याला कमी ऐकू येई, शाळेत अभ्यासात कमी पडल्यावरच हि बाब त्यांच्या लक्षात आली. तो मुलगा आमच्या घरी शिकायला येत होता. आई त्याला शिकवत असे. घरी केलेला प्रत्येक खाऊ त्याच्याकरता आई ठेवत होती. पुढे तो मोठा होवुन बॅंकेत नोकरी लागला. आईकडे पेढे द्यायला आला होता.तेंव्हा म्हणाला, " बाई मी लहानपणी किती दंगा करायचो, शाळेत मुले मला चिडवायची. शाळेत शिकवलेले मला समजायचे नाही , मार्क मिळायचे नाहित त्यामुळे  मी माझ्या बाबांचा खूप मार खाल्लाय. तुम्ही एकट्या मला कधी रागावला नाहीत माझ्याशी नेहमीच प्रेमानी वागलात. तुमच्यामुळेच मी आज नोकरी मिळवू शकलो."

    सोसायटीत आमच्या शेजारी सातारचे एक बिऱ्हाड आले त्यांच्या बायकोला के.ई.एम मधे नोकरी होती त्या नर्स होत्या. त्यांना शिफ्ट ड्युटी असे. त्यांच्या लहान मुलाचा सांभाळण्याचा प्रश्ण होता. त्यावेळी पाळणाघरे फारशी नव्हती. आणि त्यांच्या वेळात म्हणजे अवेळी असलेल्या नोकरीमुळे पाळणाघर मिळत नव्हते. त्या आईकडे आल्या आईने सहज त्यांच्या मुलाला सांभाळण्याची जबाबदारी घेतली.

        मी एन.आय.बी.एम.मधे नोकरीला असताना आमच्या ग्रुपमधे एक केरळी ख्रिश्चन ऑफिसर आले होते त्यांचे पहिले नाव विल्सन होते. त्यांना मुलगा झाला, तो वजनाने कमी होता आणि त्यांच्या बायको्ची तब्येतही गंभीर होती.हे ऑफिसर पुण्यात नवीनच असल्याने त्यांचे कुणी नातलग पुण्यात नव्हते, पुण्यात त्यांचे कुणी मित्रही नव्हते. त्यांच्या बाळाला सारसबागेजवळील अजेय जोशींच्या हॉस्पीटल मधे ठेवले होते, बायको के.इ.एम. मधे ऍडमीट होती. दोन्ही ठिकाणी थांबणे त्यांना जमणार नव्हते. त्यांची अडचण मी सहज आईला सांगितली. ती लगेच म्हणाली, " मी जाईन की जोशी हॉस्पीटलमधे बाळाजवळ थांबेन मी, त्यांना सांग काही काळजी करु नका मी तू ऑफिसला गेलीस कि आवरुन डबा घेवुन तिथे जाऊन बसेन" म्हटल्याप्रमाणे ती तेथे गेली. विल्सन साहेबांना इंग्लिश आणि मल्याळी येत होते, त्यांना हिंदी मराठीचा गंध नव्हता.  ते आल्यावर आई त्यांच्याशी कुठल्या भाषेत बोलली तिलाच माहित. पुढे मी एन.आय.बी.एम. सोडली. नंतर दोन -तीन वर्षांनी माझे लग्न झाल्यानंतर माझ्या नवीन ऑफिसचा नंबर शोधुन त्यांनी मला फोन केला आणि ते परदेशात जात असल्याचे सांगितले जाण्यापूर्वी त्यांना मला आणि माझ्या आईला भेटायचे होते. वेळ ठरवुन ते माझ्या घरी आले, आईलाही मी माझ्या घरी(सासरी) बोलावले होते. त्यांनीच माझ्या घरी सगळी कथा सांगितली आणि त्यांचा तो लहानगा आता चांगला  तीन-चार वर्षांचा गोंडस मुलगा झाला होता, त्यालाही ते आईबद्दल सांगत होते.

     कित्येक ओळखीच्या मुलींची लग्ने तिने जमवली. दूर गावाहून नव्याने सासरी आलेल्या आमच्या सोसायटीतल्या सुनांना आमच्या कडे आल्यावर माहेरी आल्यासारखं वाटे. आमची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हतीच, दादांची सरकारी नोकरी होती.घरात नेहमीच पाहुणे असत.आम्ही तिघी बहिणी. आई संसाराला हातभार म्हणुन शिवण शिवायची. छोट्या-मोठ्या शिकवण्या घ्यायची. पण कुणालाही मदत करताना तिने आपल्या फाय़द्याचा कधी विचार केला नाही. तिने मदत केल्यामुळे कल्याण झालेल्या अनेकांनी नंतर तिची विचारपुसही केली नाही याचा कधीतरी तिला त्रास होई ,पण तरी तिने तिचा दुसऱ्याला उपयोगी पडण्याचा मार्ग तिने सोडला नाही. हे सगळं ती चांगुलपणा मिळावा म्हणून करत होती असंही नाही.वेळ प्रसंगी वाईटपणा घ्यायची देखील तिची तयारी होती.  अतिशय परखड आणि स्पष्ट बोलण्याचा तिचा स्वभाव होता. माझ्या बहिणीची एक मैत्रीण कॉलेजमधे जाऊ लागली आणि नकळत्या वयात एका मुलाच्या प्रेमात पडली.घरी हि बातमी समजली होती आणि तिच्या घरुन तिला अभ्यास कर हे वय नाही लग्नाचं अशी समज दिली जात होती.ती त्या मुलाबरोबर पळून जाणार होती आणि या कामात तिला माझ्या बहिणीची किंवा माझी मदत हवी होती. एक दिवस ती घरी आली आणि मला तिने घराच्या बाहेर नेले अंगणात हलक्या आवाजात ती मला सांगत होती आई आतुन कधी बाहेर आली आम्हाला समजलेच नाही.तिने आमचे बोलणे थोडेफार ऐकले असावे.तिने मैत्रीणीचा हातच धरला आणि तिला तिच्या घरी नेले. तिच्या बाबांच्या ताब्यात तिला देवुन आई घरी आली या गोष्टीची तिने कुठेही वाच्यता केली नाही. तो मुलगा लफंगा होता,वयाने बराच मोठा फारसा न शिकलेला उनाडक्या करणारा होता असे नंतर समजले. तिच्या वडीलांनी नंतर घरी येवुन आईचे आभार मानले , आईच्या अगदी पायाच पडायचे त्यांनी शिल्लक ठेवले होते. त्यांच्या मुलीला आईने मोठ्या संकटातुन वाचवले होते. मैत्रीणीच्या नजरेत आई बरेच दिवस खलनायिकाच होती. आमच्या मैत्रीवर त्याचा परीणाम झालाच काही दिवस. अशा असंख्य आठवणी आहेत. काही आमच्या समोर घडलेल्या तर कित्येक आम्हाला माहितही नसलेल्या.

    मला काय करायचय? त्यांचं ते बघुन घेतील असा विचार करणारी आजची पिढी, नव्हे आमचीही पिढी बघताना आईच्या या वागण्यातलं मोठेपण फार जाणवतं. हल्ली मुलांच्या आत्महत्या, तरूण वयात येणा्रे वैफल्य,नैराश्य यांसारखे वाढते मानसिक आजार आणि वाढत्या समुपदेशकांची संख्या बघताना मला आईची सतत आठवण येते. आपण आजुबाजुला न बघता आपल्या कोषात वावरतो, शेजारच्यांच्या अडचणी आपल्याला दिसत नाहीत, दिसल्या तरी तिथे बोलावल्याशिवाय जाणे हे असभ्यपणाचे लक्षण आहे असे आपल्याला वाटते. शेजारच्या गल्लीत झालेल्या आत्महत्येची बातमी आपल्याला पेपरमधे किंवा टि.व्ही वरुन समजते.त्याबद्दल हल्लीच्या पिढीला, बदलत्या समाजाला आपण दुषणे देतो.पांढरपेशा समाजातील कातडीबचाऊ वृत्ती आम्ही अंगी बाणवल्यामुळे समाजात हे वाढते प्रश्ण निर्माण होत आहेत.अशा वेळी आईचे अडचणीत असलेल्यांच्या घरात विचार न करता घुसुन त्यांची अडचण निवारण्यासाठी मार्ग सुचविणे, प्रसंगी कठोर होणे हे केवढ मोठं काम होत ते आता समजतं. माझी आई काही फार शिकलेली नव्हती, जुन्या काळात मुलींना शिकवायची फारशी तयारी नसे, तिने घरच्यांशी भांडुन मॅट्रीकपर्यंतचे शिक्षण मिळवले होते.पुढे लग्नानंतर आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने  शिकायची आवड असून तिला शिकायला मिळाले नव्हते. पण तिच्याजवळ दुरदृष्टी होती. शिक्षण नसलं तरी तिची हुशारी तिच्या कामात, वागण्यात दिसायचीच. सामजिक बांधिलकीचा तर तिला कधीच विसर पडलेला नव्हता. आम्हाला कधी कधी आई हे कशाला करतीय असं वाटे. पण ती आमची पर्वा न करता सगळ्यांच्या मदतीला धावायचीच.  आईमधले हे कुठलेच गुण माझ्यात आले नाहीत.तिचा तोंडावर आमचे कौतुक न करण्याचा स्वभाव मात्र मी घेतला. आज ती या जगात नाही. तिच्या सतत दुसऱ्याच्यासाठी काही करणाऱ्या हातांना कंपवात झाला होता. तिच्या वेदना आम्हाला बघवत नव्हत्या. दिड वर्षापूर्वी त्यातुन तिची कायमची सुटका झाली. संक्रातीच्या आदला म्हणजे भोगी हा तिचा जन्मदिवस होता. त्यामुळेच कदाचित तोंडावर गोड बोलणे, तोंडदेखले गोड बोलणे किंबहुना गोड बोलणे तिला कधी जमलेच नाही. तिच्या पश्चात तिच्या असंख्य गुणांपैकी काहींचे स्मरण आणि वर्णन करावे असे आज मनापासुन वाटले. तिच्या जयंतीला माझ्याकडुन  तिला ही शाब्दिक श्रध्दांजली !