Tuesday, February 27, 2018

लळा जिव्हाळा शब्दच खोटे

काही व्यक्तींशी आपले नाते सहज जुळून जाते आणि काहींशी कितीही काळ गेला,कितीही प्रयत्न केला तरी अंतर जाणवतच राहते. माझे सासर कानडी.सासु-सासऱ्यांचे सक्खे,चुलत असे खूप मोठ्ठे गोत, मला माणसांची सवय होती तरी  भाषेच्या अडसराने काही वेळा नाती समजून घ्यायला वेळ लागायचा. आमच्या घरी सतत माणसांचा राबता होता त्यामुळे पहिल्या दोन -तीन वर्षात मला बरेचसे नातलग माहित झाले. नवऱ्याच्या एक चुलत मावशी कऱ्हाडला बरेच वर्षे असल्याने मराठी बोलू शकायच्या त्यांच्या यजमानाचे बालपण पुण्यात गेल्याने ते पण उत्तम मराठी बोलत . त्या पुण्यात रहायला आल्या आणि आमच्याघरी त्यांचे जाणे-येणे सुरु झाले.मराठी बोलू शकत असल्याने माझ्याशी त्या आवर्जुन बोलत. म्हणायला मावशी पण त्या माझ्या मोठ्या नणंदेच्या वयाच्या त्यामुळे मला त्यांचा सासू असा धाक वाटत नसे.त्यांची जुळी मुलेपण त्यावेळी कॉलेजमधे होती त्यांचेही सतत जाणे येणे होई.माझ्या मुलींचे वाढदिवस,गणपती अशा नाना कारणा प्रसंगांना जाणे-येणे झाल्याने आमचे सूर छान जुळले.माझ्या सासुबाईंच्या अकस्मिक निधनानंतर तर मला मावशी आणि काकांचा खूपच आधार वाटला. त्यावेळी आमचे घर त्यांच्या घराजवळच होते. सहाजिकच एकमेकांकडे जाणे,भेटणे सहज होई.

     या मावशींना ऐन तारुण्यात कॅन्सर सारख्या व्याधीने ग्रस्त केलं, सुदैवाने आजार वेळीच लक्षात आला.त्यांची जुळी मुले अगदीच अडनिड्या वयातली होती ,त्यांच्यातल्या आईने मनाच्या तीव्र निर्धाराने आजाराशी सामना केला, दोन्ही स्तन पाठोपाठ काढावे लागले पण लवकरच त्या आजारातून बऱ्या होवुन कामालाही लागल्या.याच वेळी त्या पुण्यात आल्या. माझ्या सासुबाई त्यांची मोठी बहीण त्यांनी आपल्या मुलीच्या वयाच्या या बहीणीला छान मानसिक,भावनिक आधार दिला.मुलांची शाळेची महत्वाची १० वी बारावीची वर्षे सुखरुप पार पडली दोन्ही मुले इंजिनियरींगला गेली ,आणि मावशींच्या आजाराने पुन्हा डोके वर काढले, गर्भाशयात कॅन्सर पसरला. पण मावशी आता आजाराला अजिबात भित नव्हत्या. त्यांनी स्वतःच हॉस्पीटलमध्ये जायची बॅग भरली.मुलांसाठी स्वयंपाकाला बाई बघितली. माझ्या सासुबाई त्यावेळी या जगात नव्हत्या. मी ऑपरेशनच्या आदल्या दिवशी भेटायला हॉस्पिटल मध्ये गेले ,माझे मन खूप धास्तावलेले होते.पण मावशी सुरेख ड्रेस,केसात गजरा माळून आरामात कॉटवर बसलेल्या होत्या,नेहमीच्या हसतमुखाने त्यांनी माझे स्वागत केले. त्यांनी त्यांचा आणि यजमानांचा दोघांचा डबा आणला होता.मला म्हणाल्या, " घरी हे एकटे जेवणार नाहीत म्हणून मग त्यांच जेवण ही इथेच आणलयं" त्यांच्या पराकोटीच्या आशावादामुळे ,परमेश्वराच्या कृपेने अतिशय तज्ञ डॉक्टर मिळाले आणि यावेळी देखील ऑपरेशन यशस्वी झाले.मावशी पूर्ण बऱ्या झाल्या. मुलांची शिक्षणे पार पडली, त्यांना चांगल्या नोकऱ्या पण मिळाल्या. एव्हाना आम्ही जागा बदलून मावशींच्या घरापासून खूप दूर शहराच्या दुसऱ्या टोकाला रहायला गेलो. सहाजिकच गाठी-भेटी कमी झाल्या,फोनवरच बोलणे होऊ लागले. माझ्याही मुली मोठ्या होऊन त्यांची महत्वाची शैक्षणिक वर्षे सुरु झाली. घर,नोकरी,मुलींचे अभ्यास यात मला डोके वर काढणे कठीण होऊ लागले.

    यथावकाश मावशींच्या मुलांची लग्ने झाली. मावशींना मनाजोगत्या सुना आल्या. मुले आधी परगावी नंतर परदेशी गेली. मावशी आणि काकांना कधीच एकटेपणा जाणवला नाही कारण मावशींनी स्वतःला व्यस्त ठेवले होते.त्या रोज भजनी मंडळात जात. पुण्यात आणि पुण्याबाहेरच्या सगळ्या नातलगांच्या छोट्या मोठ्या समारंभाना जाणे,नवरात्रात सप्तशतीचा पाठ करणे यामुळे वेळ चांगला जाई.मोठ्या आजारांतून सुखरुप बाहेर आल्यामुळे कदाचित देवावरची श्रध्दा अधिकच दृढ झाली असेल, मुले जवळ नसल्याने आलेलं रिकामपण विसरायला त्याचाच आधार वाटत असेल, काही असेल पण मावशी आणि काकांच आयुष्य मजेत चालल होतं हे नक्की.गावाकडचा रामनवमीचा उत्सव असो कि गोंदवल्याचा उत्सव असो ,ब्रह्मानंद महाराजांचा उत्सव सगळीकडे मावशी व काका आवर्जुन जात .मावशींना पाच सख्ख्या बहिणी तीन भाऊ.काकांचे तीन भाऊ व एक बहीण प्रत्येकाच्या घरची कार्ये,पुण्यातील अनेक नातलग,मित्रपरीवार ,भजनी मंडळाचे कार्यक्रम, भिशीच्या मैत्रीणींबरोबर सहली यासगळ्यात दिवस छान चालले होते. यातच वर्षा -दोन वर्षातून मुलगे-सुना येत .एकावेळी एकच जोडी येई.मग त्यांच्या बरोबरचे आठ पंधरा दिवस तर पंख लावल्यासारखे निघून जात. मावशींना एक नातू आणि एक नात झाली होती मग काय ते आले कि एखादे गेट टु गेदर होई.

    पण या सगळ्या सुखाला दृष्ट लागावी अशी घटना घडली,मावशी परत आजारी पडल्या.एकदा संध्याकाळी जावेबरोबर कुठल्याशा कार्यक्रमाला जायला तयार होवुन त्या बाहेर पडल्या जिना उतरल्या आणि कुणला काही समजायच्या आत त्या खालीच बसल्या ,काय होतय हे त्यांना देखील कळले नाही, कुणीतरी रीक्षा दारात आणली त्यांना हाताला धरुन रिक्षात बसवले,तेंव्हा त्या ठिक झाल्या ."काय आचानक पायातली शक्ती गेल्यासारखे झाले वाटतं. डॉक्टर कडे नको जायला ",असे म्हणत  ठरलेल्या ठिकाणी त्या गेल्या. पण ती त्या भीषण आजाराची सुरुवात होती. मावशींना एक असाध्य आजार झाला .शरीरातील सगळे स्नायु हळूहळू निकामी होण्याचा आजार.ज्यावर काही ठोस वैद्यकीय उपाय नसलेला आजार.
मग नाना उपाय झाले,ऍलोपाथी,आयुर्वेदिक,होमिओपाथी सगळे झाले.मावशींचे हिंडणे फिरणे एकदम कमी झाले. त्या वॉकर घेवुन चालू लागल्या .त्याही परिस्थितीत उडपीला जावुन ट्रिटमेंट घेतली पण फारसा उपयोग नाही झाला.मावशींनी मग त्याचाही शांतमनाने स्विकार केला.आता घरातच रहावे लागणार होते. मदतीला बायका आल्या,नंतर चोवीस तासासाठी दोन आया ठेवल्या.मावशींच्या मैत्रीणी येत असत.आता त्यांच्या घरातच भजन होवु लागले. परिचित,नातलग भेटायला येत.सख्ख्या बहिणी,चुलत बहिणी राहुन जात. मी जेंव्हा जेंव्हा त्यांना भेटायला जाई,किंवा फोन करे, त्यांच्या तोंडून कधी निराशेचा सूर ऐकला नाही.घरी गेले तरी त्या पलंगावर नीट आवरुन बसलेल्या,फार तर पडलेल्या असत. स्वतःची प्रकृती सोडून इतर विषयांवर गप्पा मारत.
   
    नोकरी,घरकाम,माझ्या तब्येतीच्या कुरबुरी आणि त्यांचे लांब घर यामुळे मनात असूनही मला नेहमी जायला काही जमत नव्हते. माझा नवरा मात्र वेळात वेळ काढुन,वाकडी वाट करुन मावशीला भेटुन येई.दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालावतच होती,आता बोलणे बंद झाले, हात काम करत नव्हतेच, पण भरवलेले अन्न खाणे कठिण होवु लागले. काकांची शुगर मावशींच्या ढासळत्या तब्येतीला बघून वाढू लागली. मावशींच्या काळजीने काका खंगू लागले.

    अखेर काल दुपारी मावशी गेल्या. त्यांचे खूप हाल होत होते,सुटका झाली त्यांची. साडेचार वाजता काकांचा मावशी गेली हि बातमी सांगणारा फोन आला, आम्ही दोघे तिकडे जाईपर्यंत साडेपाच पावणेसहा झाले होते. आजुबाजुची मंडळी येत होती.पुण्यातले नातलग येत होते.मावशींच्या मैत्रीणी येत होत्या. काकांना कमालीचा खोकला झालेला होता,पण ते म्हणत होते ,"मी देवाला विनवत होतो,माझ्या आधी तिला ने, मी आधी गेलो तर हिच्या कडे कोण बघणार? आता मी मरायला मोकळा झालो " .कोणीतरी मुले कधी ,कशी येणार याबद्दल विचारले, आम्हाला त्या गेल्याची बातमी काकांनी सांगितली त्यावेळी मुले येतील तोवर तिला हॉस्पीटलच्या कोल्ड स्टोअरेज मधे ठेवणार असल्याचे ते म्हणाले होते. पण आम्ही पोचलो त्यावेळी रात्रीच सगळे उरकणार असे समजले.आम्हाला फोन केल्या नंतर त्यांचे मुलांशी बोलणे झाले आणि दोघांनाही लगेच येणे शक्य नसल्याने निर्णय बदलला होता.

    मावशी आणि काकांची हि गोष्ट प्रातिनिधिक आहे असं मला वाटत. आमच्या पिढीतील बह्तेकांचे भविष्य याच अंगाने जाऊ शकते. एखाद-दुसरे मुल आणि त्याला मिळलेल्या उच्च शिक्षणानंतर त्याचे चांगल्या भवितव्याकरीता परगावी,परदेशी जाणे अगदी स्वाभाविक आहे. पण त्या मुलांमध्ये आपली होणारी भावनिक गुंतणूक काहिशी आजच्या काळानुरुप अस्वाभाविक आहे. दोन्ही मुलांचं परदेशात निघून जाणं हे तर मावशींच्या आजारामागच कारण नसेल ? शारीरिक आजारामागची मानसिक कारणे फारशी विचारात घेतली जात नाहीत. ज्या आईने आपल्या जिवघेण्या आजारावर मुलांच्या मायेपोटी मात केली त्या माउलीला मुले शिकून सवरुन स्वावलंबी झाल्यावर आपापल्या बायकांबरोबर निघून गेली याचा काहीतरी त्रास होतच असेल .वर्षा-दोन वर्षातून कसे-बसे आठ दिवस यायचे त्यातही एखादी ट्रीप, सासुरवाडी,मित्र-मैत्रीणी यातुन आईच्या वाट्याला किती येत असतील? बोलून दाखवता न येणाऱ्या अशा बऱ्याच घटनांचा एकत्रित परीणाम शरीरावर आजाराच्या रुपात दिसतही असेल.
   
    माणसाच्या मेंदू प्राण्यांचा मेंदूपेक्षा जास्त विकसित झालेला  असतो हे लहानपणापासून वाचलय,शिकलय. भावना आणि विचार हि मानवी मेंदुतील दोन केंद्रे.मानवाच्या मेंदुचा विकास हा त्याच्या वैचारिक मेंदुचा विकास आहे.इतर प्राणी माणसाइतका विचार करु शकत नाहीत भावनिक बुध्दीबद्दल वाचताना असे वाचले होते कि भावनिक मेंदू किंवा भाव भावना या माणसाला फार पूर्वीपासून आहेत  विचार करण्याचे केंद्र त्या मानाने अलिकडचे. ज्यावेळी माणसाला भिती,राग,किंवा अस्तिवाचा प्रश्ण येतो त्यावेळी भावनिक मेंदूकडून कार्य केले जाते वैचारिक मेंदूशी असलेले कनेक्शन् तात्पुरते तुटते आणि त्यामुळे माणूस काहीवेळा अघोरी वर्तन ही करू शकतो नंतर त्याच्यावर पश्चात्तापाची वेळही येते. बरेचदा  जिवघेणी भांडणे,एखाद्या व्यक्तीची हत्या हि  अविचारी कृत्ये माणसाच्या भावनेच्या भारात घडलेली असतात.विवेकी विचार आणि भावनांचे भान राखणारा माणूस समाधानाचे आयुष्य जगू शकतो असे विज्ञान सांगते. पण असे मनात येतयं की अतिप्रगत मानवाच्या या बुध्दीविकासामुळे त्याच  मन संवेदनाशील राहिलं नाही का? त्याच्या भावना बोथट झाल्यात का?  आईच्या मॄत्यूची बातमी समजल्यावर वडीलांच्या काळजीपोटी,तिला अखेरच तरी बघता यावं यासाठी काय वाट्टेल ते करायला मन सरसावत नाही कारण त्यावेळी विचारी मेंदू समजावतो ,"आता जाऊन काही उपयोग होणार नाहीये, गेलेली व्यक्ती परत येणार नाही,बाबांकडे बघायला बरेच लोक आहेत तेंव्हा उगीच अव्वाच्या सवा पैसे मोजून तिकिट काढा ,रजेसाठी धावपळ करा आणि असलेले प्रश्ण वाढवा हे करण्य़ापेक्षा जमेल तसे जाऊ "
विचारी मेंदूचा विजय होतो आणि इकडे फोनवर सांगितले जाते ,"लगेच निघणे शक्य नाही आमची वाट बघू नका, आईचे अंत्यविधी उरकून घ्या "

    भावनेच्या भारात वाहून न जाणे समजू शकते पण एखाद्याच्या दुःखात काडीमात्र सहभागी न होता आपल्या ठरलेल्या वैयक्तिक कार्यक्रमात बदल न करणे हे कशाचे लक्षण समजायचे?  असेच आणखी एक उदाहरण, अनेक वर्षे एकत्र काम करणाऱ्या दोन डॉक्टरांपैकी एकाच्या मुलाचे लग्न झाले  त्या समारंभाला दुसरा गेला.लग्नाची धामधूम झाली नंतर दुसरा डॉक्टर अचानक आजारी पडला त्याचे दुखणे इतके विकोपाला गेले कि त्यात त्याचा शेवटच झाला एका वयाचे ,अनेक वर्षे एकत्र काम करणारे त्यातला एक अकाली गेला पण दुसऱ्याने मुलाच्या लग्नानंतर श्रमपरिहाराकरीता ठरवलेली सिंगापूर सहल रहित केली नाही,आपला सहकारी अकाली गेला त्याच्या कुटुंबियांना मानसिक,भावनिक आधार देण्यापेक्षा आपला श्रमपरिहार महत्वाचा वाटणे हा कुठला बौध्दिक विकास आहे?

    अशा वेळी whatsapp वर वाचलेली एक घडलेली घटना आठवते, लाँरेंन्स  अँथनी नावाच्या व्यक्तीने वनचर प्राण्यांना वाचवून त्यांचे जगभरात पुनर्वसनाचे मोठे काम केले. सात मार्च २०१२ रोजी त्यांचे निधन झाले.त्यांच्या मृत्यूनंतर दोनच दिवसांनी ३१ हत्तीचा एक कळप दोन हत्तीणींच्या नेतृत्वाखाली त्यांच्या घरी आला आणि दोन दिवस व दोन रात्री अन्नपाणी काहीही न घेता त्यांच्या अंगणात बसून राहिला , नंतर हे हत्ती आले तसेच निघूनही गेले.आपल्या रक्षणकर्त्याला मानवंदना करण्यासाठी हे गजगण थोडाथॊडका नाही तर २० किमी.चा प्रवास चालत करत आले.हे हत्ती त्यापूर्वी तीन वर्षात त्यांच्या घरी एकदाही आलेले नव्हते, इतकच नव्हे तर त्या हत्तींना लाँरेंन्स  अँथनींच्या मॄत्यूची बातमी कोणी सांगण्याची शक्यता नव्हती .केवळ आपल्याला जीवदान देणाऱ्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता मनात ठेवून त्याला अखेरचा निरोप द्यायला, हत्ती एवढ्या लांबवर इतक्या मोठ्या संख्येने चालत आले !
    शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या चितेमध्ये त्यांच्या लाडक्या कुत्र्याने उडी मारुन आपल्या निष्ठेचा वास्तुपाठ दाखवला,साने गुरुजींच्या ’शामच्या आई ’ पुस्तकात ते लिहितात,त्यांच्या आई वारल्यानंतर तिच्या आवडत्या मांजरीने अन्न पाण्याचा त्याग केला आणि दोन -तीन  दिवसात ती पण मरुन गेली. कुत्री,मांजरे,हत्ती यांसारखे प्राणी माणसावर असे निरपेक्ष प्रेम करतात आणि पोटची मुले विचार करतात !

    विज्ञानयुगाचा हा शापच म्हणावा लागेल, हल्लीच्या शिक्षणाने माणूस आत्मकेंद्री होतोय असं माझे वडील म्हणत असत मला त्यावेळी त्याचा अर्थ समजत नव्हता पण आता तो फारच चांगल्या रितीने समजला आहे. कारण जुन्या पिढ्यांमध्ये असे क्वचित घडत होते. आपल्या आजारी आईला भेटावयास जाण्याकरीता रजा मिळाली नाही त्यावेळी ब्रिटीश सरकारच्या नोकरीचा तात्काळ राजिनामा देणारे ईश्र्वरचंद्र विद्यासागर आठवले.आपल्या मातृभूमीकरीता आपले  शिक्षण,घर-दार, संसार यांवर पाणी सोडणारे असंख्य क्रांतीवीर आठवले.

    सगळाच दोष नव्या पिढीला देणेही कितपत योग्य आहे? असा विचार पण येतोच,शेवटी आमचे संस्कार कमी पडत असतील. बाहेरच्या स्पर्धेच्या रेट्यात टिकायचे म्हणून ही पिढी सतत ताणाखाली  आहेच. त्यांना आई-वडीलांचे प्रेम नाही असे नाही पण त्याकरीता द्यावा लागणारा वेळ त्यांच्या कडे नाही. मावशींच्या औषधपाण्याला,त्यांच्या आया-दायांना लागणारा पैसा मुले पुरवित होतीच की? पण मावशींना त्यापेक्षा मुलांच्या सहवासाची गरज जास्त होती ती पुरवणे मुलांना जमले नाही.

    आता या सगळ्याचा आपणही स्विकार करुन घेणे जरुर आहे.मुलांना योग्य तेवढे शिक्षण देवुन त्यांच्या पंखात बळ देणे हे आपले कर्तव्य आहे,मग बळ आलेले पंख घेवुन पिल्ले दूर जाणार याची मानसिक तयारी आधीपासून करुन घेतली पाहिजे आणि सुरुवातीपासूनच मन हरीभजनात गुंतवले पाहिजे. मुलांमधली भावनिक गुंतणूक कमी करुन आपापल्या आवडीनुसार कुठल्यातरी व्यापात स्वतःला गुंतवुन घेणे जरुर आहे.