Friday, September 4, 2009

दादा

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेउन, फक्‍त लढ म्हणा!
कुसुमाग्रजांची 'कणा' कविता कितिदाही वाचली तरी शेवटच्या या ओळी वाचताना डोळे भरुन येतात, आणि मनात दादांच्या आठवणी दाटून येतात. दादा , माझे वडील त्यांना जावुन या जून मध्ये सत्तावीस वर्षे झाली,पण आजही मनातील त्यांच्या आठवणी ताज्या आहेत.अवघे बावन्न वर्षाचे आयुष्य त्यांना लाभले,पण तेवढ्या काळात त्यांनी कित्यॆक जन्माचे त्रास भोगले, कष्टं केले,संकटे झेलली मात्र हे सगळे अगदी हसत हसत.
लहान वयात त्यांचे वडील गेले, लहान धाकटी भावंडे, अडाणी आई कुणाचाच आधार नाही, अशा वेळी मॅट्रीकची परीक्षा पास झाल्यावर इंजिनियरींग कॉलेजचा डिप्लोमा करून सरकारी नोकरी मिळवली, डिप्लोमा करत असताना एका नातलगांनी आपली कसबा पेठेतली खोली रहायला दिली होती, रोज सकाळी कॉलेजला जायचे तेथून स्वरगेटवर चालत जायचे त्यांची आई भोर हून एस.टी ने डबा पाठवित असे, तो डबा घेउन खोलीवर् आल्यावर जेवायला मिळे, सकाळी लवकर उठून त्या माऊलीने केलेली आमटी भाकरी, कधी कधी उकाड्याने आमटी आंबून जात असे, मग पाण्या बरोबर ती भाकरी खायची, ऎन वाढीच्या वयात खाण्याची अशी आबाळ झाल्याने दादांना पानात अन्न टाकलेले चालत नसे, अन्नाला नावे ठेवणे खपत नसे, तसेच भुकेल्यांबद्दल विलक्षण कळवळा असे, त्यांच्या ऑफीसमधल्या परगावाहुन आलेल्या तरुण मुलांना कायम आमच्या घरून डबा नेत, स्वतः खाण्यापेक्षा दुसऱ्याला खाऊ घालण्याची त्यांना फार हौस.
खाण्यापिण्याच्या आबाळीचे त्यांनी कधी अवडंबर केले नाही, त्यांची शिक्षणाची भूक त्याहून जास्त होती.कुणाचेच मार्गदर्शन नाही, दारिद्र्यामुळे होणाऱ्या मानहानीला घाबरून शिकल्या सवरल्या,सुखवस्तू नातलगांकडे उठबस नाही.कसबा पेठेतल्या गुंड मुलांच्या संगतीत सतत राहूनही त्यांना वाचनाचे जबरदस्त वेड होते.त्यातूनच शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे त्यांना जाणवले असावे.प्राप्त परिस्थितीचा स्विकार करून मिळालेली सरकारी नोकरी त्यांना वरदान वाटली.मात्र आपल्या भावंडांना शिकवायचेच असा त्यांनी ध्यास घेतला.घरात वडील माणूस नाही, आई अगदीच गरीब त्यामुळे घरात कुणाला धाक, शिस्त नव्हती.दादांनी भावंडाना रागवून , कडक वागून प्रसंगी पुष्कळ वाईटपणा घेतला,कटूताही स्विकारली मात्र त्या सगळ्यामागे त्यांनी शिकून मोठे व्हावे, आपले घर वर यावे एवढा एकमेव हेतू होता.
दादांनी पी.ड्ब्लु.डी सारख्या खात्यात नोकरी केली. 'खाते' हे नाव सार्थ करणारे हे खाते, पण स्वातंत्र्यपूर्वकाळातील निष्ठावान,चारीत्र्यवान लोकांना पाहून, सतत चांगल्या गोष्टींच्या वाचनातून त्यांनी जी जीवनपध्दती स्विकारली त्याला ते सदैव चिकटून राहिले, घरात त्यांच्या पगाराखेरीज एक नवापैसाही आला नाही.आमच्या घरी सतत माणसांचा राबता असे,भोरहून आईचे किंवा दादांचे नातलग येत, दादांचे मित्र येत, इतक्या साऱ्यांची जेवणी खाणी करताना आईचा जीव दमून जाई,पैशाची कायमची चणचण.शिवण शिवून ,मुलांच्या शिकवण्या घेवून आई संसाराला हातभार लावी पण एकूण दिवस कठीणच होते.त्यातच पानशेत धरण फूटून पूर आला आणि आई दादांचा संसार त्यात पूर्ण वाहून गेला.आईच्या एका आते बहिणीकडे त्यांना आसरा मिळाला.दादांनी आपल्या शिकणाऱ्या भावंडांना भोरला पाठविले.ठिकठिकाणी पूरग्रस्तांसाठी मदत केंद्रे होती, पण दादांनी आईला स्पष्ट सांगितले होते, कुठेही जावून हात पसरायचे नाहीत.आपले हातपाय धड आहेत, पुरात कोणी बुडून गेले नाही हे काय कमी आहे? गेलेले सगळे परत मिळवू.पण लाचार नाही व्हायचे! त्यांनी कधी तोंडावाटे निराशेचा सूर काढला नाही, उलट आईला चेष्टेने म्हाणायचे ,'बघ सगळ्या घरादारावर पाणी सोडून तुला घेवून मजेत हिंड्तोय!'
रद्दीच्या दुकानातून पुस्तके आणण्याचा दादांना फार नाद होता.अतिशय उत्तमोत्तम पुस्तकांचा संग्रह त्यांनी गोळा केला होता.त्यांना मराठी वाङमाची अतिशय आवड.गडकऱ्यांची नाटके,बालकवी, कवी बी,केशवसुत, कुसुमाग्रज,कवी चंद्रशेखर अशा जुन्या कवींबरोबरच, विंदा करंदीकर,मंगेश पाडगावकर यांचे कविता संग्रह आमच्या घरी होते.त्यांनी नोकरी घरातल्या नाना जबाबदाऱ्या सांभाळून केवळ आवड म्हणून टिळक विद्यापीठाच्या परीक्षा दिल्या 'साहित्य विशारद' झाले, पुणे विद्यापिठाची 'बी.ए' पदवीही मिळवली.त्या सुमारास पूरग्रस्तांसाठी सहकारनगर मध्ये सरकार कडून लीज वर प्लॉट आणि कर्ज मिळाले होते, सोसायटी स्थापन करून घरे बांधण्याचे काम चालू होते, त्यासाठी दादांना सतत जावे लागे, सगळीकडे सायकल वरून हिंडावे लागे, स्टेशन जवळ त्यांचे ऑफीस, घर डेक्कनवर बांधकाम सहकारनगर मध्ये अशी सगळी रपेट ते करत आणि घरी आल्यावर आमच्याशी गप्पा,चेष्टा रात्री च्यांचे वाचन चाले.
सहकारनगर मध्ये आम्ही रहावयास गेलो त्यावेळी तो भाग आजच्यासारखा नव्हता. रस्ते मातीचे, दिवे नाहित, दुकाने नाहीत. काळ्या मातीत पावसाळ्यात सायकली आडकून बसत.साधे दळण आणायला २ किमी जावे लागे.७१-७२ साली दुष्काळामुळे धान्याची चणचण होती.महागाई घराच्या कर्जाचा हप्ता द्यावा लागे. मी त्यावेळी लहान होते दुसरी तिसरीत. मला परिस्थितीची जाणीव असे, पण घरातले वातावरण नेहमी प्रसन्न असे.आई दादांनी आमच्या घराभोवतीच्या जागेत कष्ट करून ईतकी सुंदर बाग केली होती नाना तऱ्हेच्या भाज्या,फळे फुले लावली बागेने आमचे सगळे लाड पुरविले.आधी त्या जमिनीवर एरंडाची झाडे ,कॉंग्रेस गवत होते.दादा ऑफीस मधून आले की गवत काढीत.एरंडाची काटेरी फळे फोडून बिया जमा करत, त्या घाण्यावर देवून त्यातून बागेसाठी बी-बियाणे आणत.बागेतल्या पाला-पाचॊळ्यावर पाणी तापवित.तोंडलीला गरम पाणी लागते असे समजल्यावर कुकरमधले पाणी देखील तोंडलीला घालायला लावत.स्वतः वेलाच्या मांडवाखाली अंघॊळ करत.चुलीतल्या निखाऱ्यावर वांगी,बटाते भाजून देत.काटकसरीचे,सतत उद्योगात राहण्याचे धडे त्यांनी आम्हाला नकळत दिले.बागेतल्या भाज्या,फळे सगळ्याना द्यायची त्यांना फार हौस होती.पेरू, जांभळे आम्ही शाळेत नेत असु.भेंडी,मेथी, करडई,वेगवेगळ्या घेवड्याच्य़ा वेली.घोसावळी अशा सगळ्या भाज्या त्यांनी लावलेल्या होत्या.रायावळे,पेरु,जांभळे,आंबे,चिकू अशी फळझाडेही होती.आळू,माका,ब्राम्ही एवढेच नाही तर कापसाचे झाड त्यांनी लावले होते.कापसाची बॊंडे सोलून सरकी भोरला आईच्या माहेरी गाई साठी पाठ्वत. तुरीची झाडेही होती.कोवळ्या तुरीच्या शेंगा आम्ही भतुकलीत घेत असू त्याच्या कोवळ्या दाण्यांची उसळ खुपच मस्त होई.
वाढती महागाई, आमची शिक्षणे पै-पाहुणे यामुळे वाढते खर्च ,ऑफीसच्या कामाचे ताण आणि स्वतः कडे कायम दुर्लक्ष या सगळ्याचा त्यांच्या तब्येतीवर परीणाम झाला. त्यांना डायबेटीस झाला, त्यावर ते ससून मध्ये जावून औषधे आणत, गोड खाणे त्यांनी बंद केले, डॉक्टरांनी सांगितले म्हणून सकाळी टेकडीवर फिरणे सुरु केले. रोजचे १०-१२ कि.मी सायकलींग करत तरी हा वेगळा व्यायाम करीत. मात्र जेवणाच्या वेळा सांभाळणे , चार वेळा थोडे-थोडे खाणॆ हे त्यांनी कधीच केले नाही. आम्ही लहान होतो, आंम्हाला त्या आजाराची फारशी माहिती नव्हती.त्यांनाही कुठलाच त्रास होत नसे, कि होणारा त्रास ते जाणवू देत नव्हते , कुणास ठाऊक? पण मी बारावीत असताना डायबेटीसने त्यांच्या डोळ्यावर परिणाम झाला.कमी दिसू लागले,त्यावेळी पुण्यात लेझर सर्जरी सारखे उपाय उपलब्ध नव्हते.ससून मध्ये त्यांना मुंबईच्या के.ई.एम.मध्ये उपचार होतील असे समजले. मग मुंबईच्या वाऱ्या सुरु झाल्या. मद्रासहून डॉ.मस्कती येतं , त्यांनी दादांच्या डोळ्यावर क्रायोसर्जरी केली.त्याने फायदा झाला. पण पुढे आईचे पोटाचे ऑपरेशन झाले. नंतर डायबेटीस ने त्यांच्या किडनीवरही परिणाम झाला. जेवण जात नसे, वजन कमी झाले. तशाही अवस्थेत ते ऑफीसला जात होते.आम्हाला त्यांच्या दुखण्याची कल्पना आली होती. मात्र आता औषध-उपचार चालू आहेत, पथ्य-पाणी आहे, बरे वाटेलच.अशी त्यांची आणि आमची खात्री असायची.
२जूनला दादा घरी आले , येताना त्यांनी त्यांच्या लाडक्या नातवासाठी आंबेही आणले होते.रात्री जेवणे झाली, रात्री त्यांना खोकला येत होता, झोपता येत नव्हते. मी रात्री जवळच्या डॉक्टरांना बोलवायला गेले. ते आले नाहीत. सकाळी जास्त त्रास होऊ लागला, आम्ही त्यांना जवळच्या हॉस्पीटल मध्ये नेले, तेथेही त्यांनी शेजारच्या राजाभाऊंजवळ ऑफीसच्या कामाची फाईल द्यायला सांगितली आणि २-३ दिवस येणार नाही असा निरोप दिला. हॉस्पीटल मध्ये त्यांना सलाईन लावले. तिथल्या डॉक्टरांनी दुसऱ्या मोठ्या डॉक्टरांना फोन केला. ते डॉक्टर आले, पण त्या आधीच दादा हे जग सोडून गेले होते. इतक्या जवळच्या व्यक्तीचा इतक्या जवळून मृत्यू बघताना माझे वय होते १७ वर्षे.हॉस्पीटल बाहेरच्या जिन्यात आई हताश पणे बसली होती. धाकटी बहीण कुणालातरी बोलवायला गेली होती.मोठी ताई लग्न होउन सासरी गेलेली, गावात माहेर असल्याने रहायला येत नसे, ती नेमकी त्यावेळी प्रथमच रहायला आली होती. आता वाटते, दादांना स्वतःच्या मृत्यूची कल्पना आल्याने तिला आग्रहाने बोलावले असेल.
'जगण्यासारखे काही आहे ,तोवर मरणात मौज आहे ' गडकऱ्यांचे वाक्य दादा नेहमी म्हणत. त्याप्रमाणे त्यांना मरण आले. त्यांना यातना झाल्या नाहीत असे नाही, पण आजारापेक्षाही अनेक मानसिक त्रास त्यांनी सोसले, त्यातून मृत्यूनेच त्यांची सुटका केली.
त्यांच्या पश्चात सुरुवातीचे दिवस फार कठीण गेले. एक तर घरातली एकमेव मिळवती व्यक्ती गेली. आमची शिक्षणे चालू होती.पैशा-अडक्याचे व्यवहार माहित नव्हते. पोरपण जावून पोरकेपण आले होते.वडीलांचे छत्र नसणे म्हणजे काय असते, याचा अनुभव फार कटू असतो.कुणा लहान मुलावर तो कधीही येऊ नये.मुळात मुलाचे लहानपण संपवणारी ती घटना आहे, आणि खरचं वय लहान असेल तर ती सगळ्या व्यक्तिमत्वावर परीणाम करुन जाते.
अगदी तान्ह्या बाळाचेही आई बापा वाचून काही अडत नसते. कुणी ना कुणी तरी त्याला वाढवतेच. म्हणून त्यांची उणीव भासत नाही असे नाही. आमचेही दिवस सरले, त्या दिवसांनी आम्हांला खूप शिकवले.आपले कोण, परके कोण समजले.कष्टांचे मोल कळले.दादांच्या ऑफिसमधल्या प्रामाणिकपणाचे फळ म्हणून त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी, वरीष्ठांनी सर्वतोपरी मदत केली. त्यांच्या जागी बहीणीला नोकरी मिळाली. माझेही शिक्षण झाले, कुठल्याही ओळखी, वशिल्याशिवाय चांगल्या नोकऱ्या मिळाल्या.दादांनी आमच्यसाठी भले पैसा नसेल ठेवला, पण आम्हाला स्वाभिमानानं जगायला शिकवलं . आयुष्यभर कष्ट करत राहून मेहनतीचे बाळकडू दिले . कुठल्याही कामाची लाज न बाळगायला शिकवले . वाचनाची गोडी लावुन पुस्तकांसारखा सखा दिला . त्यांनी केलेल्या लाडाची आणि प्रेमाची शिदोरी पुढच्या साऱ्या आयुष्याला पुरेल आणि पुण्याई तर पुढचे अनेक जन्म.दादांच्या आठवणीशिवाय दिवस जात नाही.आजच्या काळात डायबेटीसवर इतके संशोधन झालय, इतक्या उपाय योजना झाल्यात, आज आमच्याकडे पैसा आहे,सारखे वाटते आज दादा हवे होते, त्यांना आम्ही सुखात ठेवले असते. नातवंडांमध्ये ते रमले असते. गाणी ऐकली असती. घरात बसून वाचन केले असते, टी.व्ही. बघितला असता. नवनव्या गोष्टी शिकण्याची, समजावून घेण्याची त्यांना फार हौस होती.मुलांमध्ये मूल होवून जाण्याचा दुर्मीळ गुण त्यांच्या मध्ये होता.आता त्यांच्या आठवणीत रमण्याशिवाय आमच्या हातात काहीच नाही.


©

4 comments:

Milind Phanse said...
This comment has been removed by the author.
Milind Phanse said...

लेख चटका लावून गेला. लिहीत राहा.पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

prasad bokil said...

काय लिहू कळत नाही. त्रयस्थासारखी प्रतिक्रिया लिहीणं शक्य नाही. पण या सगळ्या गोष्टी पुसटशा माहीत असल्या तरी असं एकसंध प्रथमच वाचलं. खूपकाही कळलं, खूपकाही जाणवलं. सुरवातीच्या संस्कारक्षम वयात ज्या व्यक्तीकडून अपार प्रेम मिळालं ती व्यक्ती आपल्याला नीटशी आठवतही नाही यासारखी खेदाची गोष्ट कोणती असू शकेल?

Unknown said...

Lekh chaan zalay. aapan Ganapati madhe khup firaycho. Shenga kanase chaha keli khaycho. Challay radditil pustake ghyaycho. Tyache motyanda wachata karaycho