Thursday, July 15, 2010

भेट (गावाकडच्या गोष्टी..)

दुपारची शांत वेळ होती.सरस्वतीकाकू दळणाची तयारी करीत बसल्या होत्या. तात्या यंदा मॅट्रीकला बसणार, त्याचा अभ्यास चालू होता.बाकीची मुले शाळेत गेली होती.तान्हा कमलाकर पाळण्यात निजला होता. आज सकाळपासून हवा विचित्र होती.काकूंचा उजवा डोळा लवत होता.मनाला विचित्र हुरहुर लागून राहिली होती.नाना , काकूंचा थोरला मुलगा रामदुर्ग संस्थानात नोकरी लागला होता.त्याचे बरेच दिवसात पत्र नव्हते.काका, काकूंचे यजमान कामानिमित्त गावी गेले होते. सवयीने हात काम करत होते, पण काहीतरी अशुभाच्या शंकेने मन कासावीस होत होते.
’तार घ्या ’ दारातून हाक आली. तात्या पुढे झाला, त्याने तार घेतली.वाचली ’गंगूचे दुखःद निधन’. तार वाचून तो खालीच बसला.काकू हात पुशीत बाहेर आल्या. ’कोण होते रे? काय झालं तात्या, तुझा चेहरा असा का? बोल ना घडघड’
’आई आपली ताई गेली गं..’ डोळे पुशीत तात्या म्हणाला
’अरे देवा... सकाळ पासून मेला उजवा डोळा लवत होताच..काय करू आता माझी ताई अशी कशी रे गेली?’ काकूंना शोक अवरेना.पाळण्यातल्या कमलाकरने रडायला सुरुवात केली.घरात एकच आकांत झाला.शेजारच्या ठाकूर ताई आवाजाने आत आल्या.
’काय झाले?’
’माझी मोठी मुलगी ,गंगू वारली हो.. सहाच महिन्याचं लेकरू आहे तिचं, मोठी मुलगी आडीच वर्षांची, आताशी कुठे संसाराला सुरुवात आणि गेली हो’
ठाकूर ताईंनी गंगू बद्दल् फक्त ऎकलेच होते,या घरात सरस्वती काकूंना येवून वर्षच झाले होते. त्यांच्या स्वतःच्या पाच-सहा मुलांच्या धबडग्यात त्यांना कुणाकडे जाय-यायची फुरसत नसायचीच.ठाकूरताईच कधी दुपारच्या त्यांच्याकडे जात,निवडण-टीपण करता करता दोघींच्या गप्पा होत. काकूंकडून बरेच पदार्थ ठाकूरताई शिकल्या.एवढा मोठा प्रपंच, काका एकटे मिळवते पण काकूंचे दारिद्र्य कुणाला दिसले नाही.

भुकेल्या बाळाला शांत करायलाच हवे होते.त्याला काय आईच्या दुःखाची कल्पना?त्याला दूध पाजताना गंगूच्या आयुष्याचा पट काकूंच्या ओल्या डोळ्यापुढे साकारला.गंगू त्यांची थोरली मुलगी.तिच्या पाठीवर ओळीने चार मुलगेच झाले. काकूंचा पाळणा दीड वर्षांचा.काकांना सरकारी नोकरी होती.इंग्रज सरकारच्या नोकरीत ते होते, फार मोठा हुद्दा नव्हता.शेतीवाडी-घरदार काही नव्हते.दरमहा येणारी पगाराची रक्कम तेवढी होती.खाणारी तोंडे कमी असताना स्वस्ताई मुळे कुटूंब सुखात होते.गंगू पाच-सहा वर्षांची असल्यापासून आईच्या हाताखाली काम करु लागली.दिसायला बेताची होती, पण डोक्याने चलाख,शाळेत घातली होती.शाळेतून आली की पटकन सगळा अभ्यास करुन पाटपाणी घ्यायला यायची.भावंडाना खॆळवताना कविता म्हणायची.त्यावेळी काकांची भाटघर धरणाच्या बांधकामामुळे तिकडे बदली झाली होती.भोरला निमकरांच्या वाड्यात त्यांनी बिऱ्हाड केले होते. नानाला इंग्रजी शाळेत घातल्यावर गंगू म्हणाली होती,’मला मात्र मराठी शाळेत ठेवलस, त्याला कसं इंग्रजी शाळेत घातलत’
’तो मुलगा आहे, तुला काय इंग्रजी शिकवून मडमीण का व्हायचय? लग्न होवून तू सासरी जाणार फायनल पर्य़ंत शिकलीस ना! आमच्या सारखी अडाणी नाही राहिलिस. शिवाय आपली परिस्थिती बघ’
गंगूलाही त्याची जाणीव होतीच.शिवण -भरतकाम सगळ्यात ती हुशार होती.पुड्याच्या साठवलेल्या दोऱ्यातुन ती क्रोशाचे काम शिकली. आईला मदत करताना स्वयंपाकपण तिला येवु लागला होता.

मामलेदारांचे घर त्यांच्या शेजारीच होते. सरस्वती काकू यांच्याकडे फरशा जात नसत.एकतर घरकामातून त्यांना वेळ नसे आणि त्यांच्यासारख्या थोरामोठ्यांच्या घरात हळदीकुंकू किंवा सणवारी बोलावणे असेल तरच त्या जात. मामलेदारसाहेव आता नव्हते. पण त्य़ांच्या नावाच दबदबा अजूनही होताच. मामलेदार काकू देवळात किर्तनाला जात.स्वयंपाकघरात त्या नुसतीच देखरेख ठेवत, त्यांच्या नजरेच्या धाकात सुना दिवसभर कामे करीत. त्यांच्या बापूचेच तेवढे लग्न राहिले होते. दिसायला ती सगळीच मंडळी देखणी. ऊंची-पुरी सगळ्य़ांची नाके धारदार, डॊळे पाणीदार.बापू सगळ्यात धाकटा तो दहा वर्षांचा असताना मामलेदार साहेब गेले, पाठोपाठ त्यांचे थोरले चिरंजीवही. बापूवर काकूंची माया त्यामुळे अंमळ जास्तच. घरात पुरुषांनी कुठल्याही कामाला हात लावायची पध्द्त नव्हतीच.मॅट्रीकची परीक्षा द्यायच्या आधीच त्याचे लग्न करुया म्हणून त्याच्या आईने हट्ट धरला.
’त्याचे दोनाचे चार हात झाले कि मी संसारातून मुक्त होईन, त्याचे वडील असते तर केलचं असतं त्याच लग्नं, शिक्षण काय राहिलच चालू’
अण्णा,बापूचे थोरले भाऊ आता घरचा कारभार बघत होते.ते संस्थानच्या प्रेस मधे कामाला होते. निमकरांच्या वाड्यात राहाणारे सरस्वतीकाकूंचे बिऱ्हाड त्यांना माहित होते. गरीब असले तरी कुटुंब सालस होते. त्यांची मुले हुशार होती. नानाला संस्थानची शिष्यवृत्ती होती.अण्णांनी निमकरांकरवी बापूसाठी गंगूची पत्रिका मागवली.पत्रिका जुळते असे गुरुजींनी कळवताच, एक दिवस ते सरस्वतीकाकूंकडे स्वतः गेले आणि त्यांनी बापूसाठी गंगू आम्हांला पसंत आहे असे सांगितले. सरस्वतीकाकूंना आपण स्वप्नात तर नाही ना? असे वाटले. इतक्या थोरामोठ्यांकडून आपल्या लेकीला मागणी येईल असे त्यांना मुळीच वाटत नव्हते.
’हे घरी आले कि त्यांना पाठवते तुमच्याकडे’ एवढेच त्या बोलल्या, अण्णांना या बसा म्हणायचे देखील त्यांना सुचले नाही.

काका घाबरतच मामलेदारांच्या वाड्यात शिरले.अण्णांनी मोठ्या प्रेमाने त्यांचे स्वागत केले.माजघरात ज्वारीची पोती रचून ठेवलेली होती.ओसरीवरुन मागच्या परसातली केळीची झाडे दिसत होती.पाणी आणि शेंगदाण्याचा लाडू रमाकाकी ठेवून गेल्या.
"काका, तुमच्या गंगूची पत्रिका बापूसाठी आम्ही बघितली , छान जुळतीय आंम्हाला मुलगी पसंत आहे, आमचा मुलगा ही तुमच्या बघण्य़ातला आहे ..’ अण्णांनी सुरुवात केली.
’हो, हिने मला सांगितले, पण मी साधा नोकरदार माणूस.आमची शेतीवाडी होती म्हणे पूर्वी, आता काही नाही, तुमच्यासारखे तालेवार घर, त्या तोलाचे कार्य करणे आम्हांला कसे झेपणार?’
’पैसा महत्वाचा नाही हो, माणसे मोलाची, तुमची मुले हुशार आहेत, तुमचे दिवसही पालटतील.आम्हाला गंगूची हुशारी आवड्ली आहे, तुम्ही फक्त मुलगी आणि नारळ द्या, बाकी सगळ माझ्याकडे लागलं’
काका होकार देवून आले.गंगू किंवा बापू दोघांच्या आवडी-निवडीचा प्रश्ण नव्हताच.त्या काळी लग्ने मोठी माणसे ठरवित. इथे दोघांनी निदान एकमेकांना बघितले तरी होते,कित्येकदा अंतरपाठ बाजुला झाल्यावर जोडीदाराचे दर्शन होई.
गंगूचे लग्न झाले.लग्न ठरल्यापासून रोजच आईकडून मामलेदारांच्या श्रीमंतीच वर्णन तिनं ऐकलं होतं, गंगूच्या भाग्याचा आळीत सगळ्यांना हेवा वाट्ला होता.रखमाकाकू तर म्हणाल्या देखील होत्या,’बापू आणि गंगूची जोडी म्हणजे शालजोडीला पटकुराचं ठिगळं !’ एकून गंगूला फार वाईट वाटल होतं पण ती बोलू शकली नव्हती.
मामलेदारांच्या वाड्यात पन्नास माणसे रहात होती. आला गेला,पै-पाहुणा.रोजचा सोवळ्याचा स्वयंपाक. गंगूला कामाची सवय असली तरी त्यांच घर या मानानं किती लहान! तरी तिने परिस्थितीशी जुळवून घेतले.रमा वहिनी आणि मोठ्या जाऊबाईंकडून शिकायला सुरुवात केली. सासुबाईच्या कडकपणाच्या कथा तिने पूर्वीच ऎकल्या होत्या, त्यांना बोलायची वेळ शक्यतो येणार नाही अशा प्रकारे ती कामे उरकत असे. सासुबाईंना स्वतःच्या मुलांशिवाय कुणाचे कौतुक करणे माहित नसल्याने सुनांना कौतुकाचा शब्द मिळात नसे निदान बोलणी बसू नयेत एवढीच त्यांची अपेक्षा असे.

पहिल्या बाळंतपणाला गंगूला माहेरी धाडले नाही.एक तर तिच्या वडीलांची तोवर पुण्यात बदली झाली होती.
’वाड्यातल्या लहान जागेत काही जायची जरुर नाही, इथेच रहा’ काकूंनी हुकूम केला.पहिली मुलगी झाल्यामुळे बरीच बोलणीही तिला ऎकावी लागली. सुदैवाने मुलगी रंगरुपाने वडीलांवर गेली होती. सहा महिन्यांच्या कुमुदला घेवून गंगू माहेरी गेली, पहिल्या नातीला कुठे ठेवू नि कुठे नकॊ असे घरच्यांना झाले होते.चार दिवसात पोरीला ताप भरला, नानल वैद्यांकडून काकांनी औषध आणले.घरगुती उपायही होतेच पण दुखणे वाढले आणि कुमुद त्यातच गेली.
गंगुच्या दुर्दैवाला जणू सुरुवात झाली.काकूंनी बोलून बोलून नको केले, तिच्या माहेरचा, त्यांच्या गरीबीचा सगळ्यांचा उध्दार झाला. बापूरावांनी एका शब्दाने आईला टोकले नाही कि गंगूला समजावले नाही. आपला झाल्या घटनेशी सुतराम संबंध नाही असे त्यांचे वर्तन होते. बापूराव मॅट्रीकची परीक्षा नापास झाले होते. गंगूला वाटे त्यांनी पुन्हा अभ्यास करावा, परीक्षा द्यावी.पण त्यांना परीक्षा या प्रकाराची भितीच बसली होती. आपला नवरा नोकरी करत नाही, शेतीची कामे त्याला झेपणार नाहीत असे त्याची आई म्हणते या गोष्टीचा गंगूला त्रास होई. जावा तिला काही बोलत नसत, काकूंचा धाकच तसा होता.पण आपला प्रपंच वाढणारा आहे तर आपण कष्टाने चार पैसे मिळवले पाहिजेत असे गंगूला मनापासून वाटे.

एकदा भितभितच तिने अण्णांजवळ हि गोष्ट बोलून बघितली. एक मुलगी एवढा विचार करते याचेच त्यांना नवल वाटले, बायकांची बुध्दी चुलीपुरतीच, असा संस्कार असलेली ती पिढी होती. मात्र गंगूच्या मनाची घुसमट त्यांना जाणवली, त्याचवेळी बापुच्या निवांत वागण्याला वेळीच लगाम लावावा लागेल असे त्यांना वाटले. आईच्या नसत्या लाडाने त्याचे आयुष्य वाया जाईल या जाणीवेने त्यांनी बापुला संस्थानात कारकुनाची नोकरी लावून दिली.बापूरावांना नोकरी मिळाल्याचा गंगूला फार आनंद झाला. आपल्या हुशारीने आणि कष्टाने माणूस पुढे जातोच आता हळूहळू त्यांना परिक्षेला बसायला सांगू, कचेरीतील कामाने त्यांचा हरवलेला आत्मविश्र्वास परत येईल.गंगू स्वप्ने रंगवू लागली.

गंगूला दुसरा मुलगा झाला,पण तो दहा दिवसातच गेला.त्यानंतर वर्षभरात तिला पुन्हा मुलगी झाली.लहान वय त्यात पाठोपाठच्या बाळंतपणाने गंगूच्या तब्येतीच्या तक्रारी सुरु झाल्या. तिला बारीक ताप असे, खोकला लवकर बरा होत नसे. भोरच्या सततच्या पावसात लांबून विहिरीवरुन पाणी आणावे लागे. ओल्या कपड्य़ातच कामे उरकावी लागत. जेवायला दुपारचे दोन वाजून जात.सगळ्याच सासुरवाशिणींची अशीच गत होती.त्यातच गंगूला पुन्हा दिवस गेले. या खेपेला मुलगा होवुदे म्हणून तिने आंबाबाईला नवस केला. तिला मुलगा झाला, पण बाळंतपणात तिच्या आजाराने उचल खाल्ली.ताप हटेना, खोकला कमी होईना. रामशास्त्री वैद्य बघून गेले. गंगूला क्षयाची बाधा झाली आहे, तिला मुलापासून दूर ठेवा असे सांगितले. तिला वेगळ्या खोलीत ठेवले.न बऱ्या होणाऱ्या आजाराने गंगूचा शेवटच केला.

सरस्वतीकाकू पुण्यात आल्या.शहरात प्रत्येक गोष्टीला पैसा मोजावा लागे.भोरात कमी भाड्यात मोठी जागा होती. मंगळवारच्या बाजारात भाजीपाला स्वस्त मिळे.दुध-दुभते सगळेच स्वस्त. इथे सारेच महाग. खाणारी तोंडे वाढलेली.मुलांच्या शिक्षणाला पैसा लागत होता. रोजचा दिवस कसा घालवायचा अशी विवंचना पडे. नाना एवढा हुशार जगन्नाथ शिष्यवृत्ती मिळवली त्यानं पण कॉलेजात घालायला काही जमलं नाही. रामदुर्ग संस्थानात त्य़ाची त्याने नोकरी बघीतली, आणि महिन्याकाठी तोच पैसे पाठवायला लागला. गंगूला एकदा माहेरी आणली आणि तिची लेक गेल्याने तिचे माहेर तुटले.इकडे आणून तरी तिची हौसमौज थोडीच करता येणार आहे तिच्या सासरी सुखात, तशीच राहो. तिच्या दुखण्याची,आजाराची काहीच बातमी त्यांनी कळवली नाही.तिचीच पत्रे येत. त्यात कधी तिने आजाराचे नाही कळवले, कायम खुशालीच्याच बातम्या. आणि आता एकदम ती गेल्याचीच तार. काय त्रास सोसला पोरीनं कोण जाणे? मी तरी कसली आई? मला माझ्या संसारातून तिच्याकडे बघायला झाले नाही.बिचारी मुक्यानेच गेली, सगळा सासुरवास सोसला पोरीने. काय आम्ही त्या वैभवाला भुललो! माझ्या लेकीला त्याचा काय उपयोग झाला! ऐन तारुण्यात पोरांना पोरकं करुन गेली. आता त्यांच्याकडे कशाला जाऊ? माझी मुलगीच गेली आता कुणाला भेटू? त्यांना काही कमी नाही, तिची मुलं वाढतील तिकडे सुखात, उगीच गेलं कि ते तान्ह लेकरु आणावसं वाटेल आणि इथे त्याची आबाळ व्हायची.नकॊ तिकडे जाणेच नकॊ, काय म्हणतील, नावे ठेवतील , ठेवुदे, आता मला त्या भोरात जायचय कशाला परत? काळजावर दगड ठेवून सरस्वती काकू भोरला गेल्याच नाहीत.

महागाईमुळे दिवसेंदिवस पुण्यात राहणे अशक्य झाल्याने नानाने सगळ्यांना रामदुर्गला बोलावून घेतले.एव्हाना सरस्वतीकाकूंना सात मुलगे आणि तीन मुली झाल्या होत्या.सततच्या बाळंतपणाने त्या टेकीला आल्या होत्या. मला आता मूल नकॊ असे त्या मनाशी म्हणत.कोल्हापुरला त्यांच्या दादा व तात्या दोन्ही मुलांना नोकऱ्या मिळाल्या.रामदुर्गला आल्यावर त्यांची सुशीला नावाची मुलगी वारली.दोन संस्थानांनी माझ्या दोन मुली गिळल्या असे त्या म्हणू लागल्या.त्यांचे मन रामदुर्गात रमेना.त्यांनी कोल्हापूरला बिऱ्हाड केले.काका अजून पुण्य़ात नोकरी करत होते.

गंगू वारली.मामलेदारांच्या वाड्यात दहा दिवस दुःखाचे सावट आले.नंतर सगळे आपापल्या व्यवहाराला लागले.एवढ्या मोठ्या घरात तिची मुले वाढत होती.अगदी लहान असल्यापासून गंगूचा मुलगा रमाकाकी तिच्या मोठ्या जाऊबाईच वाढवित होत्या, तिच्या आजाराने त्याच त्याचे करत होत्या.मुलगीही त्यांनाच आई म्हणे.मुलांना आपली आई गेल्याची जाणीव नव्हती.घरात इतर मुलांबरोबर ती दोघे वाढत होती. यथावकाश बापूचे दुसरे लग्न झाले. त्यांच्या पुतण्य़ांसारखी त्यांची मुले त्यांच्या बायकोला काकी म्हणू लागली.एकत्र कुटुंबात सगळीच मुले सारख्याच पध्द्तीने वाढत होती.कॊणत्याच मुलांचे लाड , कोतुक कुणीच करत नसे. आईला सुध्दा मुलाला घटकाभर घेवून बसता येत नसे.
गंगूच्या मुलाची मुंज त्याच्या चुलत भावाबरोबर झाली. काकी ही आपली आई असून आपण आई म्हणतो ती आपली आई नाही हे त्याला समजून घ्यायला बराच त्रास पडला. मातृभोजनाला तिच्या पानात जेवताना त्याला हे समजले. त्याचे मामा मुंजीला आलेच नव्हते, त्यांना कुणी कळवले नव्हते.त्या लोकांचा पत्ता देखील माहित नव्हता. गंगू गेल्यापासून त्या कुटुंबाशी संबंध तुटलेच होते.आण्णा आता संस्थानच्या जेलरचे कामही करीत होते, एकाच वेळी ते प्रेस आणि जेल दोन्ही कारभार सांभाळीत होते.रामदुर्ग संस्थानशी पत्रव्यवहार करताना अचानक त्यांना नानाचा पत्ता मिळाला. त्याच्याकडून त्यांनी सरस्वतीकाकूंचा कोल्हापूरचा पत्ता मिळविला.अण्णांना मिरजेला बहिणीच्या सासरच्या एका लग्नानिमित्ताने जायचे होते, त्यांनी कोल्हापूरला पत्र लिहिले.

सरस्वतीकाकू अशाच दुपारी काम करीत असताना , मनोहरने पत्र आणून दिले.
’अरे , वाच ना ते पत्र, मला मेलीला कुठे येतयं वाचायला’
मनोहरने पत्र वाचले.गंगूच्या मुलांना मी घेवून येत आहे, तुमची इच्छा असेल तर तुमच्याकडे दाखवायला आणॆन असे अण्णांनी लिहिले होते. पत्र हातात घेवून कितीतरी वेळ सरस्वतीकाकू रडत राहिल्या.मुलांना समजेना आईला असे अचानक काय झाले?
’ ही गंगू कोण, तिची मुले कोण” मनोहर विचारु लागला.
त्यांनी संध्याकाळी तात्या आल्या आल्या त्याला पत्र दाखवून उलट टपाली मुलांना जरुर आणा असे लिहिण्यास सांगितले.गंगूची मुले कधी बघू असे त्यांना झाले होते. धकट्या दोघा-चौघांना आपल्याला अजून एक बहीण होती हे देखील माहित नव्हते.पण सगळ्यांनाच आपल्या भाच्यांना बघण्याची उत्सुकता होती.आईकडून आता रोज गंगूताईच्या गोष्टी समजत होत्या.

शेवटी तो दिवस उगवला.सकाळ पासून सगळे या नव्या पाहुण्यांच्या वाटेला डोळे लावून होते.नऊ वाजून गेले असावेत. वाड्याच्या दींडीदरवाजातून एक ऊंचेपुरे गृहस्थ आत आले.पांढरेशुभ्र दुटांगी धोतर, काळ कोट आणि डोक्यावर पगडी असा त्यांचा वेश होता.त्यांच्या हाताशी एक लहान मुलगा होता.त्याच्या डोक्याचा घेरा केलेला होता.दुसऱ्या बाजूला परकर पोलके घातलेली एक नऊ-दहा वर्षांची मुलगी होती.तात्याने अण्णांना ओळखले त्याने आईला ते आल्याची वर्दी दिली आणि तो त्यांना बोलवायला पुढे झाला. बाहेरची खोली आवरलेली होती. बैठकीवर स्वच्छ चादर घातली होती.लोड आणि दोन उषा ठेवल्या होत्या.पितळ्याच्या लखलखित तांब्यात पाणी भरुन त्यावर फुलपात्र ठेवले होते. भिंतीवर तसबिरी होत्या. आण्णा आले.मुले त्यांच्या जवळच बसली, अनोळखी लोकांना बघून ती दोघे बावचळली होती.भोर सोडून ती दोघे पहिल्यांदाच मोठ्या शहरात आली होती.तुमच्या आजी कडॆ मी तुम्हाला नेत आहे असे आण्णांनी सकाळीच सांगितले होते
’ पण काकू आहे ना आमची आजी? ती भोरला आहे’
’काकू आमची आई, हि तुमच्या आईची आई. तुमचे मामा-मावशा सगळे भेटणार आहेत, तिथे शहाण्यासारखं वागायचं’
सरस्वती-काकूंनी मुलांना आत बोलावले. तात्या, दादा यांच्याशी अण्णा बोलू लागले
मुले आत गेली काकूंनी दोघांना मांडीवर घेतले आणि त्यांना पोटाशी धरुन त्या रडू लागल्या, मुले अगदीच बावरुन गेली,हि आपली आज्जी आणि ती रडतीय, आपल्या काकू आज्जी्ला कधी रडताना त्यांनी बघितले नव्हते.
पाच-एक मिनिटांनी मुलगी म्हणाली,’आज्जी, अगं तुझी मांडी दुखेल ना, मी खाली बसते.आणि आम्हाला जायचय लग्नाला’
काकू सावरल्या.
’नाही गं, मी आज पहिल्यांदाच बघितल ना, तुम्हाला तशी नाही जाऊ द्यायची, शिरा केलाय ना तुमच्या साठी.खायला देते’
कशी नक्षत्रासरखी मुलं आहेत,मुलगी बोलण्य़ात अगदी गंगूवर गेलीय.काकूंनी भराभरा बशा भरल्या.प्रमिलेला हाक मारुन बाहेर खाणे पाठवले, मुलांना खायला देवुन ती खाताना त्या पुन्हा त्यांना न्याहाळू लागल्या. काकूंची, रमाकाकीची चौकशी त्या करत होत्या, मुलगी उत्तरे देत होती.
दुसऱ्या दिवशी त्यांनी अण्णांना मुलांना घेवुन जेवायला येण्याचे आमंत्रण दिले,त्यादिवशी त्यांना लग्नाला जायचे होते. दुसऱ्या दिवशी त्यांनी साग्रसंगित स्वयंपाक केला. नातीसाठी सुरेख जरीकाठाचे परकर-पोलके,नातवाला जरीची टोपी,शर्ट-चड्डी आणि मुंजीची म्हणून चांदीची वाटी दिली.मामांनी पेन,मावशांनी रंगित चित्रे अशा अपूर्वाईच्या वस्तू दिल्या.या लोकांना आपण यापूर्वी कधी बघितले नव्हते याचा मुलांना विसर पडला.त्यांच्या मायेने आणि आपुलकीने मधले अंतर नाहिसे झाले.

निघायची वेळ झाली.पुन्हा एकदा काकूंना गहिवर आला. त्या अण्णांना म्हणाल्या,’आमची चूक झाली,एवढे दिवसात आम्ही मुलांची साधी चौकशीही केली नाही, पण आमचा खरोखरीच नाईलाज होता, तुमच्या घरात ती सुखात असणार याची खात्री होती, पण खरं सांगते एकही दिवस या मुलांची आठवण झाली नाही असा गेला नाही.मुलांना सुट्टीत आजोळी पाठवा.आमच्या बरोबर राहतील तशी त्यांना आमच्याबद्दल माया वाटेल, गंगूचं मी आजारपण ,बाळंतपण नाही करु शकले, निदान तिच्या मुलांना आजीची माया देईन,नाही म्हणू नका’
’काकू मी तुमची परिस्थिती समजू शकतो, अहो,आमचा राग नाही बरं तुमच्यावर, म्हणून तर पत्ता शोधून मुलांना आणलं मी तुमच्याकडे,आम्हालाही वाटतं गंगू अशी अकाली जायला नको होती, फार गुणी होती बिचारी आमच्या मोठ्या घरात तिच्या कलागुणांचं चिज नाही झाल.असो, तुम्ही काही वाटून घेवू नका, मुलं तुमच्याकडे येतील सुट्टीत.

तेंव्हापासून दरवर्षी, तर कधी वर्षाआड मुले मे महिन्याच्या सुट्टीत कोल्हापूरला जावू लागली.त्यांचा एक मामा त्यांना आणायला येई.दुसरा परत सोडायला.त्यांच्या मामाचा वाडा काही चिरेबंदी नव्हता,ना शेतीवाडी ना दूध-दुभते.मात्र मुलांना तेथे भरपूर माया मिळाली.लाड आणि कौतुक याची त्यांना नव्याने ओळख झाली. न बघितलेल्या बहिणाच्या मुलांवर मामा -मावशांनी प्रेम केले. आजी-आजोबांनी लाड केले.या मायेच्या जोरावर पुढील आयुष्यात आलेल्या अवघड प्रसंगांना तोंड देताना त्यांना नैराश्य, वैफल्य अशा विकारांनी ग्रासले नाही. न चाखलेल्या आईची मायेची गोडी आजोळच्या ओळखीने मिळाली.


©

1 comment:

Vidya said...

आज बहुदा तुझ्या गावाकडील गोष्टींवर अस्मादिक अभिप्राय लिहीतील, मनात बरेच आहे पण आवस्था व्यासमुनींची,
आम्हासाठी गजाननमहाराज (बाप्पा) कोठून येणार ? त्यामुळे थोडक्यात सांगते, "प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट" असे
साधले आहे.वाचताना मन अगदी गुंगुन गेले. अशीच लिहीती रहा.
विद्या