Wednesday, August 25, 2010

गावाकडच्या गोष्टी...

परवा शेवटच्या मिटींगची फेरी झाली.मामलेदार कचेरीतून सह्या करुन मंडळी परतली.सगळ्यात तरूण मुलगा हातातल्या कॅमेऱ्याने घराच्या कान्या-कोपऱ्याचे फोटॊ काढीत होता.त्याचे सगळे बालपण इथे माझ्या अंगाखांद्यावर गेले.त्याचेच काय सह्या करुन आलेल्या सगळ्यांचेच. या दोघी बहीणी,त्या मुलाच्या आत्या,रडताहेत.खोल्यांमधून फिरुन आठवणींचे तुकडे गोळा करण चालू आहे.घरातली भांडी-कुंडी केंव्हाच गेली.आता राहिल्यात फक्त भिंती.

या बायकांचा मोठा चुलत भाऊ, त्याचीच ही कर्तबगारी, त्याच्या भावंडांपैकी आता तो एकटाच उरलाय, शेवटचा मालुसरा.वाडवडीलांनी मिळवलेल्या ,जतन केलेल्या वास्तु,शेती यांची देखभाल, वाढ करणं तर नाहीच जमलं त्याला पण आयुष्याच्या संध्याकाळी सगळ मोडून आपण फार मोठी लढाई जिंकल्याचा आविर्भावात गप्पा मारतोयं. त्याला एकट्याला तरी काय दोष द्यायचा म्हणा,या घरात त्याचे सख्खे,चुलत असे किती भाऊ होते.कुणी काय केलं घरासाठी,घरातल्या लोकांसाठी? बुध्दीमत्ता ही दैवजात असते,पण कष्ट, प्रयत्न तर माणसाच्या हातात असतात ना? झडझडून कष्ट करणारे फार थोडे निघाले, जे होते त्यांच्या अंगात हिम्मत नव्हती,काही करुन दाखवायची ईर्षा नव्हती आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे घरावर माया नव्हती !. याचा परीणाम म्हणून आजचा हा दिवस !. करारपत्र झालेलचं आहे.पुढल्या आठवड्यात बिल्डरची माणसं येतील, ही जुनी पुराणी वास्तु जमीनदोस्त होईल.इथे, नव्या पध्द्तीची इमारत किंवा इमारती उभ्या राहतील.त्यात लोकांचे चिमुकले संसार फुलतील. कुणालाच या वास्तुच्या इतिहासाची माहिती नसेल.काय करायचीय ती असून? भूकंपात शहरेच्या शहरे नष्ट होतात, महापूरात मोठ्मोठे वाडे जमीनदोस्त होतात, वादळ,आग अशा आपत्तींमध्ये अनेकांचे संसार मातीमोल होतात, मग माझ्यासारख्या क्षुल्लक वाड्याने या गोष्टीचे एवढे भांडवल करायचे काय कारण?बदल हे होतच राहणार.बदल ही एकमेव गोष्ट्च शाश्वत आहे हे माहित असताना या शंभरी उलटून गेलेल्या जीर्ण,जुन्या देहाचा इतका लोभ कशासाठी? छे,छे! लोभ नाही या देहाचा पण अजून माया वाटते या मुलांबद्दल,अस्ं वाटतं यांच्या पुढच्या पिढ्यांना समजावं जुनी माणसं कशी रहायची, त्यांना त्यांच्या पूर्वजांच्या कथा सांगाव्यात.त्यातुन चांगल्या गोष्टी त्यांनी शिकाव्या.परदेशातल्या सगळ्या गोष्टींच आपल्याला आकर्षण असतं ना! मग तिकडे जुन्या वास्तु,वस्तु कशा जतन करण्य़ाची पध्दत आहे, मग का बरं या मुलांना हि वास्तु सांभाळविशी नाही वाटली? आर्थिक अडचण असती तर इलाज नव्हता, पण किती हालाखी सोसून यांच्या आधीच्या पिढ्य़ांनी मला जपलं आणि या पैसेवाल्यांनी सहजपणे हा व्यवहार करुन टाकला याचं मनस्वी दुःख होतयं, वास्तविक यातला प्रत्येकजण एकेकटा मला सांभाळू शकत होता पण् इच्छा नव्हती हेच खरं. बरं मिळालेले पैसेही खूप आहेत असं नाही, वाटेकरी बरेच असल्याने प्रत्येकाला मिळालेली रक्कम त्यांच्या मिळकतीच्या मानाने नगण्य़च आहे, मात्र ती दान करायची सुध्दा त्यांची तयारी नाही. एवढी आत्मकेंद्री वृत्ती, इतकी स्वार्थबुध्दी ही आजच्या पिढीचेच लक्षण आहे की माझ्या वास्तुत झालेले संस्कार कमी पडले काही कळत नाही. हे सगळं पाहवत नाही म्हणून मग मन सारखं भूतकाळात रमतं या वाड्याची कथा एकदा सांगितली कि माझ्या आत्म्याला शांती लाभेल.देह जाणरच आहे आज ना उद्या त्याची आता फिकीर नाही. इथे घडलेल्या काही घटना गावाकडच्या गोष्टीमंधून समजल्याच आहेत, काही सांगण्याजोग्या गोष्टी ऎकवाव्याशा वाटत आहेत.एकदा मन मोकळं करुन टाकतो. वयाप्रमाणे आता स्मरणशक्ती क्षीण जालीय, एखादी गोष्ट पुन्हा,पुन्हा सांगितली जाईल नाहीतर सांगताना घटना पुढे मागे होतील,सांभाळून घ्या मला.

भोर संस्थानचे राजे पंतसचिव यांनी राज्यकारभार हाती घेतला त्यावेळी भोरमध्ये वस्ती अशी नव्हतीच.फडणीस यांच्याकडे भलीमोठी जागा होती.राजवाड्या पाठीमागे मोकळे माळरानच होते. फडणीसांचा एकमेव वाडा होता.रात्रीच्या किर्र अंधारात त्या वाड्यापर्यंत जायलाही भिती वाटे. फडणीस वाड्याच्या पाठीमागून निरामाई वहायची.एरवी प्रेमळ वाटणारी हि माय पावसाळ्यात रौद्र्रुप घ्यायची.पाण्याचा आवाजसुध्दा काळाजात धडकी भरवाय़चा. विजेचे नवे नसल्याने तिन्हीसंजा झाल्यावर घटकाभरात अंधाराचे साम्राज्य पसरायचे.भुतेखेते,सापकिरडू यांची भिती वाटायची.
फडणीसांनी त्यांच्या जवळच्या काही नातलग म्हणा,स्नेही म्हणा यांना बोलावले आपल्या मोठ्या जागेतला काही हिस्सा देवु केला आणि सांगितले तुम्ही इकडे रहायला या, घरे बांधा. इथल्या उजाड वास्तुवर वस्ती होवुदे, दिवे पेटुदे, आणि चार जणांचे संसार सुखाचे होवुदे. या मागे सोबत एवढा एकच हेतू होता.या जागेत गणेशपेठ वसली.आमराई आळी बनली.एका कपर्दिकेची अपेक्षा न ठेवता फडणीसांनी त्यांच्या जागेवर दहा बारा जणांना वस्तीला बोलावले.

आजवर सांगितलेल्या गावाकडच्या गोष्टींमध्ये असलेले मामलेदारसाहेबांचे घर हे या दहा-बरा घरांपैकीच.मामलेदारसाहेब त्यांच्या मावशीचे दत्तक पुत्र होते.त्यांनी स्वतःच्या हुशारी आणि कर्तबगारीवर शिक्षण मिळवले.तसेच लहानवयात मामलेदार पदाला गेले. फडणीसांकडून मिळालेल्या जागेवर वाडा बांधला त्यांनीच. वैभवशाली दिसेल असे त्याचे रुप होते. ऐसपैस ओसरी, तिच्यावर असणारा शिसवी झोपाळा, माजघर,स्वयपांकघर, सरपणाची खोली,कोठीची खोली,देवघर मागे मोठे परसु,त्यामध्ये गोठा, गोठ्यात गाई-वासरे. माडीवर खोल्या.शंभर माणसांसाठी लागणारे सामान म्हणजे पाट,ताटे,वाट्या,द्रोण,फुलपात्री तर होतीच पण मणभर म्हणजे चाळीसशेर दूध बसेल अशी पातेली, कढया सगळं होतं, उखळ मुसळापासून जात्यापर्यंत सार काही होतं.
परसात अबोली,शेवंती अशी फुलझाडे होती.केळीची कर्दळीची झाडं होती. भलीथोरली विहीर होती.तिच्या काठावर पपनसाचं झाड होतं, भरपूर हिरव्या पपनसांनी ते लगडून पार वाकून जायचं. आळूची खाचरं होती,तोडंलीचे,दुधीभोपळ्याचे वेल होते.धशीवर आंब्याची झाडे होती.बांबूचं बन होतं.पाडव्याला गुढीला तिथलाच कळक वापरीत.

मामलेदारसाहेबांचा दबदबा आणि दरारा होता.त्यांचं व्यक्तिमत्त्व होत तसं.सहाफूटाहून थोडी जास्तच ऊंची, गोरापान वर्ण,भेदक डोळे आणि धारदार नाक. लक्ष्मीकाकू त्यांच्यापुढे सावळ्याच.पण त्य़ाही उंच आणि शेलाट्या बांध्याच्या.जोडा शोभाय़चा सुरेख. काकू शिकल्या नसल्या तरी हुशार होत्या.पाच मुलगे चार मुली असा त्यांचा मोठा प्रपंच होता. पण घरात फक्त आपलीच मुले आणि नवरा-बायको अस कुठेच दिसायचं नाही, सख्खे-चुलत सगळे एकत्र् राहायचे, म्हातारी माणसं , मुलं, निराधार म्हातारी,शिकायला आलेली मुलं, वारावर जेवणारे विद्यार्थी असा मोठा कुटुंब कबीला असायचा.रोज पंक्तीला पन्नास माणूस असायचच. एवढा मोठा कारभार, म्हणजे भांड्याला भांड लागणारच, भांडण,रुसवेफुगवे,धुसफूस होणार,पण ते मर्यादेत रहाण्यासाठी मोठ्य़ा माणसाचा धाक असावा लागायचा.त्याच्या तंत्राने सगळ्य़ा गोष्टी झाल्या तर घरात शांती रहायची.म्हणूनच काकूंनी घराला आपल्या धाकात ठेवले होते, मामलेदार साहेबांच राज्य घराबाहेर पण घरात सत्ता काकुंचीच.पहिल्यापासून सुब्बत्तेत राहिल्याने त्यांना मोठेपणा घ्यायची सवय होती आणि पुढे त्या मोठेपणाचीही माणसाला झिंग येते.तसेच आपली सत्ता चालवायची सवय झाली कि आपण म्हणू ती पूर्व दिशा. यामुळे त्यांनी सुनांना फार धाकात ठेवले.

आबा हा त्यांचा मोठा मुलगा. त्याची बायको बाळंतपणाला माहेरी गेली तिला मुलगी झाली ती लगेचच वारली.मामलेदारंची पहिली वहिली नात तिच्या आजोळीच वाढली.इ्तक्या लहान लेकराला तिच्या मामीनेच सांभाळले पुढे तिला त्या घराचाच लळा लागला, ती भोरला आलीच नाही.आबांचे दुसरे लग्न झाले.दुसरेपणावर मिळालेली साळु दिसायला सुंदर होती, तिला भाऊ नव्हता वडील देखील नव्हते,त्यामुळेच तर तिला बिजवराला दिली. मुळच्या मऊ स्वभावाच्या साळूला,काकूंच्या धाकाने पारच गरीब करुन टाकले.माहेरचा फारसा आधार नव्हता, त्यामुळे निमुटपणे काम करण्यातच तिची सारी हयात गेली. त्यात तिच्या पोटी पुत्र संतान आले नाही, म्हणून तिला सतत बोलणी खावी लागली. तिच्या मोठ्या अनुचे लग्न झाले. नंतर दुसरी मुलगी सहा महिन्यांची झाली नाही तोच आबांचे दोन दिवसाच्या तापाचे निमित्त होऊन निधन झाले.इन्फ्लुएंझाची ती पहिली मोठी साथ.’इन्फंटाचा ताप’ असं त्याला खेडोपाडी म्हणत.मामलेदारसाहेब गेले आणि वर्षाच्या आत हे संकंट कोसळले.ऐन तरुण वयातला तो कर्ता पुरुष गेला.मोठी सून म्हणून साळूला बाई असे संबोधित. काकू सोवळ्या झाल्याच होत्या. त्यांनी तरूण साळूच्या मनाचा,वयाचा कश्शाचा विचार केला नाही.सोवळ्या-ओवळ्य़ाच्या नसत्या कल्पनांनी,त्यांनी साळूचे केशवपन करायलाच लावले, त्यांच्या उरलेल्या चारमुलांपैकी कुणाचीही आईला विरोध कराय़ची हिम्मत झाली नाही. तिशीच्या आत बाहेर असलेल्या त्या देखण्य़ा मुलीचा नरळाएवढा अंबाडा येईल असा केशसंभार नाभिकाने उतरवला तिला जावेने बोडक्या डोक्यावरुन पाणी घालून बाहेर आणली आणि लाल अलवण नेसता नेसताच ती उभी कोसळली.त्या दिवसापासून बाईंना फीट्स येवु लागल्या.तिच्या वेदनेने माझाही जीव पिळावटला.तिच्या धाकट्या जावाही खूप रडल्या. काकूंना मात्र आंबाबाई आता शांत झाली, म्हणून बरे वाट्ले. या घराने बायकांचे फार फार हाल केले.

जुन्या पध्द्तीनुसार सासुरवास सोसत इथल्या सुना नांदल्या.ज्या नाजूक होत्या, मनानं किंवा शरीरानं त्या तरुणवयात गेल्या, एकापरीनं सुटल्या.उरलेल्या सोसत राहिल्या.
त्या कुठल्याशा कवीश्रेष्ठानं म्हटल्याप्रमाणे या सुनांची गत होती

कर कर करा मरमर मरा
कर कर करा मरमर मरा
दळ दळ दळा, मळ मळ मळा
तळ तळ तळा , तळा आणि जळा
कुढ कुढ कुढा चिड चिड चिडा
झिज झिज झिजा, शिजवा आणि शिजा
कष्टाने काही माणूस झिजत नाही आणि स्वतःच्या प्रपंच्यासाठी केले तर ते काय कष्ट आहेत का? खर आहे, पण या सासुरवाशणींनी भोगला तो निव्वळ सासुरवास. त्या कामाचं चिज नाही झाल, त्याच कौतुक तर सोडाच पण वेळेवर पोटभर खायला देखील मिळले नाही त्यांना.

बघायला गेलं तर काय कमी होतं, माझं वैभवशाली रुप होतच, दुध-दुभतं होतचं, थोडी-थोडकी नाही चांगली शंभर एकर शेती होती.समृध्दीच्या त्या काळातल्या कल्पनांचा विचार केला तर ती होतीच की भरभरुन. पण माणसंही किती घरात, आला गेला,पै-पाहुणा.आणि घरकामाला बाई-गडी ठेवायची पध्द्त नव्हतीच, मग बायकांचा जन्म कष्टात न जाईल तर नवल.त्यातही मुलांचे लाड, मुलींना दुय्यम वागणूक.त्यांना शिकायला मिळायला सुध्दा किती त्रास आणि यातायात. फायनल पर्यंत शिकल्या कि चढायच्या बोहल्यावर.भाऊंच्या दोन,बापूच्या सगळ्या मुली मॅट्रिक पर्यंत शिकल्या.बाकीच्यांना नाहीच मिळालं शिकायला, मुले मात्र चारचारदा मॅट्रिक नापास झाली तरी परीक्षा देत राहिली.

घरात सण वार होत. गौरी-गणपती,देवीचं नवरात्र तर किती साक्षोपानं होई, नऊ दिवस नैवेद्य, सवाष्ण, ब्राह्मण.सप्तशतीचा पाठ. सख्खे-सावत्र,चुलत,आते-मामे अशी भावंडे एकत्र राहिल्याने त्यांच्यात माया होती.कुसुमताईचे पुण्य़ातले घर सगळ्य़ा भावंडाना आपले वाटे, तिनेसुध्दा स्वतःला सख्खे कोणी नसून या भावंडांवर अपार माया केली.तिची मुले सुट्टीत आजोळी येवुन राहात. कुसुमताईचे यजमान आण्णा, त्यांचा आम्हाला जावई म्हणून काय अभिमान. माणूस होताच तसा. पुण्य़ापासून भोरपर्यंत पळत यायचा, सायकलवरुन बंदुक खांद्याला लावून कोकणात जायचा.कुणाच्याही अडचणीला धावुन जायचा.,डॊक्याला लाल फेटा बांधून चांदीची पदक लावलेलं जाकीट आणि धोतर नेसून पोवाडे गायला अण्णा उभे राहिले कि काय त्यांचं रुप दिसायचं ,आवाज सुध्दा कसा पल्लेदार.पोवाड्याचा कार्यक्र्म झाला की रमाकाकी त्यांची मीठ-मोहऱ्यांनी दृष्ट काढीत असे.बांळतपणाला आलेल्या माहेरवाशणींच सगळ्याजणी कौतुक करीत.सुट्ट्या सुरु झाल्या कि घर माहेरवाशणींनी भरुन जाई. तळ्य़ाच्या आत्याबाई, मिरजेच्या आत्याबाई मुलाबाळांना घेवुन येत. पुढे त्यांच्य़ा मुलीही येत, घरातल्या सासरी गेलेल्या मुली येत माहेरपणाला, बाळंतपणाला. दर उन्हाळ्यात कुणाची तरी मुंज, एखादे लग्न व्हायचेच. मागच्या आंगणात मांडव घालायचा. लग्न-कार्य घरातच व्हायची.एवढ्या मुलींची लग्नं झाली.दरवेळी कर्ज काढून लग्न करावी लागत पुढे पुढे. कमावणारे थोडे,खाणारे फार, मग काय होणार? शेती होती , पण ती जिरायत.तिच्यात कष्ट करणार कोण? बर पाऊस आला तर ठिक नाहीतर हालच. नंतरच्या पिढीतल्या मुलांनी मॅट्रीक व्हायचा अवकाश, पुणे नाहीतर मुंबई गाठली.मिळेल ती नोकरी करुन पैसे मिळवायला लागली. त्याकाळात सुध्दा नुसत्या मॅट्रीकला तशी फारशी किंमत नव्हती, त्यामुळे मिळणाऱ्या पगारात जेमतेम त्यांचेच भागे.इकडे शेती बघायला कोणीच तयार होइना.

भाऊंच्या दुसऱ्या पत्नी मनोरुग्ण होत्या. त्याकाळी हा शब्दसुध्दा माहित नसेल."उन्मत्त वात" किंवा "वेड" या नावानेच त्याची संभावना होई.आजारावर उपाय करणे माहितच नव्हते,काळानुरुप त्यांचा आजार बळावत गेला आणि त्याचा त्रास सगळ्य़ांना व्हायला लागला.भाऊंनी नोकरी सोडली, ते भोरला येवुन राहिले. मुले लहान धाकटी, मुली बिचाऱ्या घरकाम करुन शिकत होत्या, मुलाला नोकरी लागली होती, घरातल्या वातावरणाने तो सतत बाहेर राही.त्यातूनच तो वाईट मुलांच्या संगतीला लागला, नाना व्यसनांच्या आहारी गेला आणि शेवटी कचेरीतल्या पैशाचा अपहार करण्यापर्यंत त्याची मजल गेली.

आजवर घरावर अशी वेळ कधी आली नव्हती, मामलेदारसाहेबांची सगळी मुले हुशार,कर्तबगार नव्हती.पण चारित्र्य आणि प्रामाणिकपणा याबद्दल त्यांच्याबद्द्ल कोणी अगदी शत्रूदेखील वावगे बोलू शकला नसता.भाऊंना या गोष्टीचा अतोनात मनःस्ताप झाला.त्याने अपहार केलेली रक्कम भरायला त्यांच्याजवळ पैसा नव्हता.घरात कोणाजवळच इतकी रोख रक्कम नव्हती.अखेरशेवटी शेतीच्या,घराच्या वाटण्या केल्या.भाऊंनी त्यांच्या वाटणीची शेती-घर विकून रक्कम भरुन टाकली.मुलगा परागंदा झाला होता, पण बेअब्रुचा डाग पुसण्य़ासाठी त्यांना हि किंमत मोजावी लागली. भाऊंनी जवळच भिड्यांच्या वाड्य़त बिऱ्हाड केले. घरातल्या सगळ्य़ांनाच या गोष्टीचे फार वाईट वाटाले, पण कुणाचाच इलाज नव्हता. आता घराला उतरती कळाच लागली होती.स्वातंत्र्य मिळाले भारताला, मात्र भोर संस्थान विलीन झाले, संस्थानात नोकरी आसणाऱ्या सगळ्य़ा लोकांना सरकारी नोकरीत समाविष्ट केले नाही, त्यामुळॆ अण्णा, बापू यांना निवृत्त व्हावे लागले. अण्णांची मुले नोकरीला लागली होती, बापूंची मात्र सगळीच शिकत होती.शेताचेही तुकडे झालेले.त्यात घालायला पैसा नव्हता, राबायला बळ नव्हते. बायका कोंड्याचा मांडा करुन दिवस साजरे करत होत्या. एकूण वैभवाला पार उतरती कळा लागली.

एक-एक करत जुनी मंडळी इहलोक सोडून गेली.समृध्दीत बालपण-तारुण्य घालवलेल्यांना म्हातारपणी दारिद्र्य बघावे लागले. पैशाच्या अभावाने भांडणे, कडकडी- वादविवाद याने घराची शांती भंगली. या वातावरणाला कंटाळून बाई , घरातली मोठी सून त्यांच्या लेकीकडे कुसुमताईकडे गेली, तिथून त्यांना परत आपल्या वास्तूत यायचे होते, पण कुणीच त्यांना घरी आणले नाही, आयुष्यभर या घरात केवळ कष्ट करुन त्या माऊलीने जावयाच्या दारात प्राण सोडला. अण्णा, भाऊ,बाबा त्यांच्या बायका सगळे गेले.

बापुरावांची मुले हुशार होती पण ’दात आहेत तर चणे नाहित, चणे आहेत तर दात नाही’ अशी आता गत झालेली होती, मुलांना शिकवायला जवळ पैसा नव्हता.मुलींची लग्ने करुन दिली, त्या परिस्थितीत मिळालेल्या घरात त्या संसार करु लागल्या. बापुरावांच्या दुसऱ्या मुलाला भाट्घरच्या रंगाच्या कारखान्यात नोकरी मिळाली.नोकरी सांभाळून तो शेती बघू लागला.आता पुन्हा घराला जरा बरे दिवस येवू लागले.सुट्टीत माहेरवाशणी येवू लागल्या.आंब्याच्या आढ्या पडू लागल्या. गोठ्यातल्या गाई-म्हशींमुळे दुध-दुभते पुरेसे होते.शेतातले धान्य घराला पुरत होते. त्याची मुलेही शाळॆत पहिले नंबर मिळावत होती.पण तेथेही दैवाने घात केला, या मुलाला ऐन चाळीशीत ब्लडकॅन्सर सारख्या आजाराने गाठले.मुंबईत जावुन तो टाटा हॉस्पिटल मध्ये इलाज करुन घेवू लागला, मुंबई-पुणे दोन्ही ठिकाणी त्याच्या बहिणी होत्या, त्याच्या सगळ्य़ाच बहिणांनी मदत केली पण आजारच असा गंभीर होता की,पाच वर्षे त्याच्याशी झुंजून अखेर त्याला हार मानावी लागली. म्हातारपणात बापुराव आणि काकींना पुत्रशोक सहन करावा लागला. त्याची मुले अजून फारच लहान होती, सुदैवाने ती फारच हुशार होती, पुण्यात आत्याकडे राहून दोघेही उच्च शिक्षण घेवु शकली.मोठा परदेशी गेला, धाकटाही चांगल्या पदावर गेला. मुलांचे नीट होईपर्यंत आजी -आजोबांनी जीव धरुन ठेवले, थोरल्याचे लग्न ठरलेले बघून ते दोन्ही म्हातारे जीव महिन्याच्या आत पाठोपाठ देवाघरी गेले.

घरात आता कोणीच राहिले नाही.बापूरावांची विधवा सून आणि घराच्या दुसऱ्या भागात अण्णांचा धकटा मुलगा व सून ! घराचे वैभव म्हणजे त्यात राह्णारी माणसे, एवढ्या मोठ्या घरात आता कोणी नाही.बापुंची सून मुलांकडे , मग घराला सतत कुलूप.ज्या वास्तुने कुलूप कधी बघितले नाही तिला आता सतत त्याचेच दर्शन. घराची डागडुजी,मरम्म्त करायला आता पैसा आहे पण वेळ कुणालाच नाही.जो-तो आपल्या व्यापात. आता सुट्टी लागली कि मुले बायकांना घेवुन हिलस्टेशनला जातात, जुन्या घराकडे यावे असे त्यांना चुकूनही वाट्त नाही.त्यांच्या मुलांनी मला बघितलेच नाही तर माझा लळा कुठून लागणार?

इथे एकेकाळी पन्नास-पन्नास माणसे एकत्र राहिली.वामन सारख्या अनाथाला आश्रय मिळाला.वाईहून रामनवमीसाठी येणाऱ्या भिक्षुकांना इथे नऊ दिवस रात्रीचा आसरा मिळे. गोरगरीबांना ताक मिळे,वारावर विद्यार्थी जेवत. लग्नानंतर वर्षाच्या आत शामदादा वारला तर तेंव्हा त्याच्या बायकोला सालंकृत माहेरी पाठवताना तिचे दुसरे लग्न लावून देत असाल तरच पाठवतो असं म्हणणारे अण्णा इथलेच. गंगू् मरताना तुझ्या मुलाला आइची माया देईन असा शब्द दिल्याने आपले पुत्रवियोगाचे दुःख गिळून गंगूच्या मुलाच्या लग्नापर्यंत उमेद धरुन , त्याच्या लग्नानंतर अवघ्या पंधरा दिवसात प्राण सोडणारी रमाकाकी इथलीच.आपला मुलगा मॅट्रीकला नापास झाला तरी त्यांच्या बरोबर मॅट्रीक पास आपल्या चुलत-भावंडांचे मनापासून कौतुक करणारी माहेरवाशीण माई या घरातलीच. मॅट्रीक पास झालेल्या मुलीला घरातली पहिली मॅट्रीक पास म्ह्णून तिचे कौतुक करायला भाटघरहून चालत येवून तिचे अभिनंदन आणि आशीर्वाद देणारी तिची चुलती या घरातलीच. आपला-परका असा भेद न करता सगळ्य़ांवर माया करणारी माणसं होती. दुसऱ्याला सहज मदत करण्याचा त्यांचा स्वभाव होता. दुसऱ्याची मुलगी इथे सून म्हणून आणताना किंवा आपली मुलगी दुसऱ्याच्या घरात देताना रुप-पैसा यापेक्षा माणसं , त्यांचे माणूसपण बघण्याकडे कल असायचा. घरासाठी आपल्या माणसांसाठी झिजायची सहज प्रवृत्ती होती.म्हणूनच या घरातल्या सगळ्या माहेरवाशणींनी माहेरच्या अडी-अडचणींना नेहमीच मदत केली. इथले भाऊ सुध्दा बहिणींच्या पाठीशी वेळेला उभे राहिले.

आता सगळेच संपले आहे. उद्या या गावात या घरातील कोणी फिरकणारही नाहीत कदाचित, पुढच्या पिढ्यांना हे गाव, हा वाडा काहीच माहित असणार नाही. देशाचे इतिहास वाचायचे कष्ट कोणी घेत नाहीत, तर आमच्या सारख्या क्षुल्लक वाड्याची काय कथा! काळाच्या ओघात सगळे पुसलेच जाणार,पण कुणाला तरी इच्छा झाली तर माहिती असावी म्हणून सांगण्याचा हा अट्टहास. यातून घेता आले आले तर लोकांचे मोठे मन नव्या मुलांनी घ्यावे, त्यांच्या हातून झालेल्या चुका टाळाव्या आणि आपल्या घरातील लोकांना धरुन राहावे एवढीच माझी म्हाताऱ्याची इच्छा ! माझं थेरडं तोंड आता यापुढे दिसणारच नाहीय कुणाला, त्याच्यात नांदलेल्या लोकांची थोडकी ओळख ऐकल्याबद्दल आभारी आहे तुमचा ......


©

3 comments:

Vidya said...

आज गोष्टीचा शेवट वाचला,बहुदा वाडा थोडा सुखावला असेल,किमान त्याचे ह्रदगत कोणीतरी जाणले.
मनात आले माणसे जातात,वाडे पडतात,जुने सर्व नष्ट होते.हे तर अटळ आहे,पण मला खात्री आहे की
आपल्या धमन्यातून जे अनुवंशिकतेचे रक्त वाहते ते आपणाला कधीही अयोग्य मार्गाने नेणार नाही.त्या
लोकांनी जी नितीमुल्ये जपली,जे प्रेम जोपासले ते आजही आपण जपू,वाड्यातली माणूसकी जिवंत राहील
यात शंका नाही.चांगल्या एका माणसासाठी गावात पाऊस पडतो व तो आपण अनुभवतो आहोत ना ?
मग दु:ख कसले? पुन्हा भेटू.

PL said...

Hi,

tumachi katha aaj vachanat aali..mi hi Bhor chi aahe aani Aamrai Aalit maze purn balpan gele..kadachit tumhala Lale wada mahit asel..

Mala tumachi olakh matr lagali nahi..tumachi olakh kalali tar manala khup aanand hoil.

-Prajakta Lale

Shubhangee said...

प्रिय प्राजक्ता

माहा जन्म शिक्षण पुण्यात झाले असले तरी माझे आई-वडील दोघे भोरचे असल्यामुळे माझे बालपण भोर मधे गेले आहे,गणेश पेठेत त्या दोघांची घरे आहेत, आईचा वाडा महाजनी तो नुकताच विकला, पाडून तेथे इमारती झाल्या त्यावेळीच त्या गावाकडच्या गोष्टी लिहिल्या आहेत, बाकीच्या देखील तुम्ही वाचा.(आधीची पोस्ट बघा)

ओळख झाल्यामुळे आनंद झाला !
आपली
शुभांगी