Wednesday, December 8, 2010

काकू

काकुने अवघे पाऊणशे वयमान गाठले.आठवणींना किती मागे खेचले तरी काकुची पहिली भेट काही आठवत नाही. माझ्या जन्माआधीपासून ती होतीच त्यामुळे आई इतकाच तिचाही सहवास, आणि भोरला सततच्या जाण्याने काकुबद्दलची जवळिक निराळीच.लहानपणच्या सगळ्या सुट्ट्या भोरलाच गेल्या.
बायका फारश्या नोकऱ्या करत नसत त्या काळात काकू शाळेत नोकरी करीत होती. तिच्या नोकरी करण्याने घरातल्या कुठल्याही कामातून तिला सुटका मिळाली नाही, उलट शाळेला सुट्टी लागली की पाहुण्यांनी घर भरुन जायचे आणि काकू घर कामात बुडून जायची.मात्र ते सगळे ती अतिशय हसतमुखाने ,आनंदाने आणि हौशीने करीत असे.तिला कधी कंटाळलेली, चिडलेली,दुर्मुखलेली मी बघीतलीच नाही.शाळेतून आली की साडी बदलून ती ओट्यावर स्थानापन्न होत असे,मग एकामागोमाग एक चहा, खाणी आणि स्वयंपाक चालू असायचा.काकूभोवती बसून आमच्या गप्पा चालायच्या. गप्पा मारता मारता काकू आमच्या कडून जमेल तशी मदत करुन घ्यायची.
"बोलता बोलता तेवढी भाजी चिरतेस बाळा?"
"विळी आणशील तेव्हा मला तेवढा कणकीचा डबा दे,भाजी धुवून घे आणि चिरली की विळी जाग्यावर ठेव "
"कोशिंबीर करुया ना, मग शुभा तेवढ्या काकड्या पण घे ना कोचवायला"
अशा पध्दतीने ती कामे सांगायची कि आपण काम करतोय असं, मुळी वाटतच नसे, शिवाय आम्ही काही करत असताना तिचे हात हि कामातच असत,अगदी हसत खेळत,गप्पा मारता मारता स्वयंपाक होत असे.पाने घेणे, उष्टी काढणे,शेण लावणे,भांडी विसळणे अशी किरकोळ कामे आम्ही चढाओढीने करत असू.
उन्हाळ्याच्या सुट्टीत बटाट्याचा किस करणे, साबुदाण्याच्या पापड्या घालणे,पापड लाटणे हि कामे सुध्दा काकुने शिकवली.प्लॅस्टिकच्या पेपरवर ओळीत एकसारख्या पापड्या घालता आल्या पाहिजेत.तिच्यातल्या गृहिणीइतकीच तिच्यातली शिक्षिकेलाही सुट्टी कधीच नसे.घरकामाचे हे धडे आम्ही बहिणींनी काकूकडून घेतले.चैत्रातले हळदीकुंकू हा एक मोठा समारंभ असे. आधी एक यादी करुन आमंत्रणे करुन यायची.करंज्या, लाडू करायला मदत करायची.दुपारी हॉल आवरायचा,अंगणात सडा घालायचा. कलिंगड,टरबूज कापुन त्यांची कमळं बनवायची.गौरीपुढे मोठी आरास करायची.रात्री दहा वाजे पर्यंत गडबड चालू असायची.सुट्टीत एखाद्या संध्याकाळी शंकरहिल वर भेळ घेवून जायचे तिथे बसून भेळ खायची.सुट्टीचे दिवस कसे आनंदात ,मजेत जायचे.अजुनही ते दिवस तितकेच ताजे आहेत.

मोठ्या माणसांमधले मतभेद आमच्यापर्यंत या लोकांनी कधीच आणले नाहीत.त्यांच्यातल्या कुरबुरींचा आमच्याशी वागण्यात कधी पडसाद दिसला नाही.त्यामुळे आम्हा भावंडांमध्ये एक वेगळीच आपुलकी राहिली.आज मी आजुबाजुला बघते, आम्हा भावंडांमध्ये असणारा जिव्हाळा मला वेगळा जाणवतो.याचे श्रेय निःसंशय आम्हा सर्वांच्या आई वडीलांकडे जाते.काकुने भोरचे घर सांभाळले , म्हणजे त्या घराचे घरपण जपले, तेथे येणाऱ्या प्रत्येकाचे इतके आपुलकीने केले कि पुन्हा पुन्हा त्या घराकडे जावेसे वाटावे. आपली नोकरी सांभाळून हे सारे करताना तिला किती त्रास पडला असेल याची आता आम्हांला जाणीव होते.घरात एखादा पदार्थ करण्यापेक्षा विकत आणावा असे वाट्ले की लगेच काकू डोळ्यासमोर येते, ती इतक्या साऱ्यांचं घरी करत होती मग आपल्यालाच चार माणसांचं करायला काय हरकत आहे ? असं जाणावतं. सासरच्या लोकांना आपलसं करुन त्यांचं करण्याचे संस्कार काकुकडून , आईकडून आम्हाला मिळाले.त्याचा आम्हांला झालेला फायदा शब्दात सांगता येणारा नाही.

काकुचं लहानपणही फार सुखात नाही गेलं,परीस्थिती बेताची हि त्या काळात बऱ्याच लोकांची असे, तिचे वडील फारसे मिळवत नव्हते,काकुने मॅट्रीक झाल्यावर नोकरी करुन पुढचे शिक्षण घेतले, आपल्या भावंडाना शिकवून आई-वडीलांना आधार दिला, माहेरच्या कामाच्या सवयीने सासरीही ती सगळे करत राहिली.सासरच्यांचे करताना तिला झालेला त्रास तिने निमुटपणे सोसला,किंबहुना तो त्रास नाहीच असे वाटून ती करत होती,आज काकुला अतिशय चांगले व्याही मिळाले आहेत. दिलदार जावई आणि गुणी सून मिळाली या मागे तिची आजवरची पुण्याईच आहे. पण काकुला मात्र विस्मरणाच्या विचित्र आजाराने घेरले आहे. भगवद्गीतेचे अठरा अध्याय तोंडपाठ असणारी, ताक करताना शिवमहिम्न स्तोत्र सुरेल आवाजात म्हणणारी, शाळेत मराठी, संस्कृत शिकवणारी काकू आमची नावे सांगू शकत नाही, समोर आलेल्या व्यक्तीला ओळखू शकत नाही,आमच्याशी संवाद साधू नाही शकत हे बघताना माझ्या पोटात तुटते.काका वारल्यानंतर भोरच्य़ा मोठ्या घरात ती एकटी राहू न शकल्याने ती पुण्यात मुलाकडे आलीय.आम्हाला सुरुवातीला तिच्या अबोलपणामागे काकाचे जाणे, भोरचे घर सोडून इथे रहावे लागणे याचा हा परीणाम असेल असे वाटत होते, पण वास्तव त्याहून भयानक आहे, काकू त्या सगळ्याच्या पलीकडे गेलीय.तिच्या नेहमीच्या हसतमुख चेहरा आणि बोलके, खेळकर डोळे यातली ओळख हरवलेली पाहून जीव गलबलतो. सगळ्य़ात दुःखाची बाब म्हणजे या आजाराला काही इलाज नाही, अगतिकपणे तिच्या आजाराकडे बघताना नाना विचारांनी मन भरुन येते.

आजवर काकुने केलेल्या अपार कष्टांचं तिला असं फळ का मिळाव? का ति्ला मनाविरुध्द कराव्या लागणाऱ्या अगणित गोष्टींविरुध्द तिच्या मनाने केलेले हे बंड असाव? पण वैद्यकीय परीभाषेत हा मानसिक आजार नाही, शिवाय मनाने ती खंबीर होती.अशा आजारांचे कार्यकारण भाव डॉक्टरही फारसे सांगू शकत नाहीत.नियती या एका गोष्टीवर मग येवुन ठेपावे लागते."देसी डोळे परी निर्मिसी तयापुढे अंधार" करणाऱ्या वेड्य़ा विठ्ठ्लापुढे तरी तिच्याकरीता काय मागावे असा प्रश्ण पडतो.सुन्न पणे ती आणि कंपवाताने गलितगात्र झालेली माझी आई यांच्याकडे बघताना मन कातर होत जाते.


©


2 comments:

aativas said...

आयुष्यातल्या अनेक गोष्टींना काही कार्यकारणभाव नसतो हेच खर...

Vidya said...

काय लिहू,डोळे इतके भरून आले की बराच वेळ काही सुचेनाच,आईचे व तिचे रोजचे अगतीक जीणे पाहीले
की वाटते का रे बाबा देवा इतका आंधळा झालास की त्यांचे हाल तुला दिसेनात ?नको आता अंत पाहूस,
थोडाफार चांगुलपणा असेल पदरी तर सोडव त्यांना.आपल्या सर्वांच्या प्रार्थनेचा उपयोग होवू दे.