Wednesday, May 25, 2011

थेंब

  संस्कृत भाषा शिकताना काही फार सुंदर सुभाषिते वाचायला मिळाली त्यातलं एक आठवतयं(  संस्कृत शुध्दलेखनाच्या चुकांबद्दल आधीच क्षमा मागते)
   
            चातकस्त्रिचतुरान् पयःकणान् याचते जलधरमं पिपासया
             सोऽपि पूरयति विश्वमंभसा हंत हंत महतां उदारता
 याचा अर्थ असा,
 तहानेने व्याकुळलेला चातक पक्षी मोठ्या आशेने ढगाकडे तीन चार पाण्याच्या थेंबांची याचना करतो, आणि मेघ त्याची तहान भागवण्यासाठी सारे विश्व जलमय करुन टाकतो! काय त्या महान मेघराजाची उदारता!
दातृत्वाची महती  बऱ्याच श्लोकांमधून वाचायला मिळाली पण हा श्लोक फारच आवडला. मागणाऱ्याने सुध्दा कुणाकडे मागावे हे समजते यातून, चातक पक्षाचा जीव तो केवढा! आणि त्याची तहान ती किती, कुठल्याही लहानश्या ओढ्याकडे सुध्दा तो चार थेंब पाणी मागू शकला असता, पण नाही, तो मागतो ते साक्षात जलदालाच, आणि त्यानेही मोठ्या औदार्याने सारी धराच जलमय करुन टाकावी  काय सुंदर कल्पना आहे !.  आपल्याला वाटावे कि आपल्यासाठी पाऊस आलाय मात्र तो येतो तो, त्या चिमुकल्या, त्या नाहीतर त्याच्या सारख्या असंख्य चिमुकल्या जीवांची तहान भागवायला! शिवाय देणाऱ्याजवळ केवढे आहे याची कल्पना असतानाही चातक मागतो तीन चार थेंब, त्याच्या गरजेपुरतेच हे देखील शिकण्यासारखच आहे, त्याला  साठवून ठेवावे किंवा हव्यासाने फार मागावे असं नाही वाटतं. किंवा चार थेंब मागितल्यावर एवढे मिळतयं तर मागतानाच हंडाभर मागितल तर किती मिळेल असे त्रैराशिक तो मांडत नाही. त्याच्या दुबळ्या चोचीत मावेल तेवढेच तो घेतो.


 याच्या अगदी उलट प्रसंग महाभारतात वाचायला मिळतो. आपला लाडका एकुलता एक पुत्र केवळ दारिद्र्यामुळे दुधाच्य़ा एक थेंबालाही मोताद झालेला द्रोणाचार्यांनी बघीतले. आपली बुध्दिमत्ता,शौर्य, धनुर्विद्येतील असामान्यत्व कशाकशाचा ते दारीद्र्य दूर करायला उपयोग होवु नये याच त्याच्यामधील पित्याला केवढं दुःख झाल असेल! आणि तो महापराक्रमी माणूस आपल्या मुलासाठी स्वतःच्या मित्राकडे , पांचाल राज्याच्या  द्रुपद राजाकडे गाय मागायला गेला.  द्रुपद  राजाने या गरीब  ब्राह्मणाला साधी ओळखही दाखवली नाही, उलट शिपायांकडून त्याला हकलून लावले. दारीद्र्यामुळे आलेली असहायता आणि त्यामुळेच मित्राकडून झालेल्या अपमानाने तो मानी ब्राह्मण संतापाने पेटून उठला. मग द्रोणाचार्य हस्तिनापुरात गेले, तेथे भिष्माचार्यांनी त्यांना आपल्या नातवंडांना धनुर्विद्या शिकविण्य़ाकरीता ठेवून घेतले. असे म्हणतात तो पर्यंत ब्राह्मणाने नोकरी करणे धर्मसंमत नव्हते.ब्राह्मणाने आपली विद्या विकणे हा अधर्म होता. मात्र द्रोणाचार्यांनी कुरुराज भिष्माचार्यांची नोकरी केली, आपला लाडका शिष्य अर्जुनाला त्यांनी धनुर्धर म्हणून घडविले,पुढे राजा द्रुपदाचा त्याच्या कडून पराभव करुन त्याला स्वतःच्या पायाशी कैद करुनही यायला लावले अशा तऱ्हेने आपल्या झालेल्या अपमानाचा बदला देखील घेतला. ब्राह्मणाच्या क्षमाशील प्रवृत्तीचाही त्याग त्यांनी केलेला दिसतो.  बाळशास्त्री हरदासांच्या महाभारतावरील व्याख्याने या पुस्तकात त्यांनी म्हटले होते, इथूनच महाभारताला, त्यातल्या ऱ्हासाला सुरुवात होते. मग ब्राह्मणांनी कायम दैन्यातच रहावे का? वगैरेच्या वादात आपल्याला पडायचेच नाही. या गोष्टीतुन आपल्याला इतकेच समजते, दुधाचा एक थेंब केवढे महाभारत घडवू शकतो!


 रवींद्रनाथांची एक कथा आहे, त्यातला नायक म्हणतो , "मी रस्त्यावरुन दीनवाण्या्गत  हातात झोळी घेवुन निघालो होतो ,इतक्यात समोरुन तुझा समर्थ रथ आला, तुझ्या तेजस्वी मुद्रेने मी दिपून गेलो, तुझ्यासमोर मी झोळी पसरणार तेवढ्यात तूच माझ्यापुढे हात पसरलेस, माझ्या झोळीतला लहानात लहान थेंबाएवढा दाणा मी तुला देवु केला, क्षणार्धात तू अदृष्य झालास. मी पाय ओढीत घरी आलो, झोळी रीकामी करताना मला दिसलं, त्या थेंबाएवढाच एक कण सोन्याचा झाला होता! मी धाय़ मोकलून रडलो, मी तुला माझे सर्वस्व दिले असते तर माझे अवघे जीवन सोन्याने उजळून गेले असते ! "
आपण जीवनात केलेल्या सत्कृत्यांचे सोने होते असे  सांगणारी हि अप्रतिम रुपक कथा!


©

5 comments:

Naniwadekar said...

चातकस्त्रिचतुरान् पयः-कणान् याचते जलधरं पिपासया |
सोSपि पूरयति विश्वमंभसा हन्त हन्त महतामुदारता ||

mahataaM udaarataa -- is probably subject to some rule which dictates that the two words should be joined.

It is चातकस्त्रिचतुरान्, not चातकस्त्रिचतुरान. And there is no sandhi between सोSपि and poorayati.

Naniwadekar said...

> बाळशास्त्री हरदासांच्या महाभारतावरील व्याख्याने या पुस्तकात त्यांनी म्हटले होते, इथूनच महाभारताला, त्यातल्या ऱ्हासाला सुरुवात होते.
>----

आपल्याला हवा तो प्रसंग घ्यायचा आणि त्यातून हवा तो निष्कर्ष काढायचा, हा एक कंटाळवाणा प्रकार आहे. गंगेनी आपली मुलं मारली, हा सामान्य नीतीच्या विरुद्‌ध ज़ाणारा प्रकार नाही? स्वत: कुठला विक्रम करून बाई मिळवण्याची रीत असूनही भीष्मानी आपल्या भावासाठी अम्बा पळवली, यात र्‍हास नाही? द्रोणाच्या तथाकथित र्‍हासाआधी तत्कालीन नीतीत न बसणारे इतर अनेक प्रकार घडले होते.


> या गोष्टीतुन आपल्याला इतकेच समजते, दुधाचा एक थेंब केवढे महाभारत घडवू शकतो!
>----
या प्रकरणातून द्रोण-द्रुपद एवढेच काय ते युद्‌ध घडले असते. ते एक महाभारतातले उपनाट्य काय ते आहे. महाभारत घडले ते भावांच्या कलहातून, कौरवांच्या कपटीपणामुळे, डोनाल्ड ट्रंप चावल्यागत पांडवांनी केलेल्या मयसभेतल्या बालिश चाळ्यांमुळे आणि त्यातून उद्‌भवलेल्या ज़ुगारातल्या द्रौपदीच्या मानहानीमुळे.

Shubhangee said...

महाभारत हा शब्द मी त्या महाकाव्याच्या अर्थी नव्हता वापरला, एखाद्याच्या बाबतीत आपण म्हणतो "एवढं रामायण झालं" तशा अर्थाने मला म्हणाय़चे होते, बाळशास्त्री हरदासांच्या विधानाबद्दल मला वाद घालायचे नाहीत. संस्कृतच्या व्याकरणतील सुधारणेबद्द्ल धन्यवाद.

Naniwadekar said...

> महाभारत हा शब्द मी त्या महाकाव्याच्या अर्थी नव्हता वापरला.
>---

ठीक; पण तिथे नेमका महाभारताचाच सन्दर्भ होता म्हणून चर्चेला फाटे फुटण्याला वाव होता.

संस्कृतमधलं इतकं साहित्य नेटवर आहे (ज्यांनी ते उपलब्ध केलं त्यांची कमाल आहे) की शुद्‌धस्वरूपातली प्रत शोधल्यास हमखास मिळतेच. पण अशुद्‌ध अवतरणांचाही सुळसुळाट आहे, तेव्हा वाचकाला ज्ञान नसल्यास घोटाळा होऊ शकतो. 'सायंप्रात: प्रयुञ्जानो पापोऽपापो भवति', 'सायंप्रात: प्रयुञ्जानो अपापो भवति' हे तोंडात बसलेले सगळे प्रयोग चूक आहेत हा शोध मला इतक्यातच व्याकरणाचे काही नियम वाचताना लागला. पण 'सायंप्रात: प्रयुञ्जानोऽपापो भवति' ही प्रतही खाली कुठेतरी सापडतेच. 'राजन्संस्मृत्य' हा प्रयोग तर मी इतक्या ठिकाणी पाहिला की शेवटी एका विद्‌वान बाईला मी विचारलं. त्या म्हणाल्या सम्बोधनाची संधी होत नाही. एक वेळ 'देवकीपरमानन्दं' सारखे शब्द तोडलेले मी समज़ू शकतो, कारण आपल्या भाषेत ते तसे तोडतातच. पण 'राजन्‌' शब्दाची संधी करण्याचा मोह कोणाला का झाला असावा? 'फुल्लारविन्दायत-पत्र-नेत्र' या शब्दांतले 'फुल्ल + अरविन्द + आयत' असे पहिले सात वर्ण तोडायची सोयच नाही, पण तिथेही 'फुल्लार विन्दाय' वगैरे प्रकार दिसतात, ज़णू तो विन्दा करन्दीकरांचा चतुर्थीतला उल्लेखच आहे. (पण आ-कारान्त पुल्लिंगी शब्द अभ्यासक्रमात नाहीत, अशी माझ्याज़वळच्या पुस्तकात पळवाट असल्यामुळे मला विन्दा-चं चतुर्थी एकवचन माहीत नाही.)

बाळशास्त्री हरदास हे शेवाळकरांपेक्षाही चांगले बोलत, असा नागपूरातल्या संघवाल्या लोकांचा दावा आहे. त्यांच्या एखाद्‌या भाषणाचा ४-५ मिनिटांचा नमूना मिळतो का याची चौकशी करायला हवी.

Naniwadekar said...

सायंप्रात: - > सायं प्रात: