Tuesday, October 20, 2009

नादचित्रे



माझ्या लहानपणी टि.व्ही. नव्हता.पुण्यात तो कधी आला ते माहित नाही.आमच्या ओळखीच्या लोकांकडे मी ७वी-८वीत असताना आला आणि आमच्या घरी मी नोकरीला लागल्यावरच.मात्र माझ्या लहानपणापासून घरात रेडीओ होता आणि तो अखंड चालू असायचा. विद्याताई लहान असताना म्हणे तो आणला होता.त्यावेळी रविवारी सकाळाचे बालोद्यान ती रेडीओला कान लावून ऎकत असे.एक तर आमच्या लहान जागेत भरपूर माणसे, काका, मामा, दादा सगळ्यांचेच आवाज भक्कम. सकाळच्या कामाच्या वेळी आईचा तारस्वर.आणि आम्ही लहान म्हणून आमचा दंगा यात तिला बिचारीला तो कार्यक्रम ऎकायचा म्हणजे दिव्यच करावे लागे. आधी रेडीओचा ताबा मिळवणे,त्यावेळी काका किंवा मामाला इतर काही गाणी वगैरे ऎकायची बुध्दी झाली की हिच्या कार्यक्रमाची काय मिजास, त्याच वेळी दादांना विद्याच्या अभ्यासाची आठवण झाली तर कुणालाच रेडीओ ऎकणे शक्य नाही. तिच्या लांब सडक केसांना आईने तेल लावलेले असे,आणि नहायला चल असा अधूनमधून पुकारा असे, मात्र आईच्या हाकेला दाद न देता ती स्टूलावर उभी राहून रेडीओ लावी(घरातील एकमेव करमणुकीची वस्तू सर्वात ऊंच फळीवर होती)आणि मग त्याला कान लावून ती बालोद्यान ऎकायची. मग सगळ्या बाजूंनी तिच्या नावाचा पुकारा झाला तरी तिला त्याची शुध्द् नसे. माझ्या डॊळ्यासमोर आजही तिची स्टूलवर उभी राहून एकचित्ताने ऎकणारी मूर्ती डॊळ्यासमोर आहे.
मी फारसे बालोद्यानसारखे लहान मुलांचे कार्यक्रम ऎकले नाहीत, कारण मी त्या वयाची झाले आणि विद्याताई कॉलेजला जायला लागली, ती अखंड विविध भारती नाहीतर सिलॊन लावून गाणी ऎकायची.मधल्या वेळात आई मराठी गाणी लावायची, रेडीओ बॅक-ग्राऊंडला नसेल तर अभ्यास व्हायचाच नाही.आता आपण मुलांना एकसारखे टि.व्ही.पुढे असतात म्हणून ओरडतो, पण आमचे देखील रेडीओशिवाय पान हालत नसे. मात्र रेडीओमुळे आभ्यासात व्यत्यय येत नसे ऊलट मूड बनत असे. कारण कानाने ऎकताना लिहिणे, वाचणे सहज जमते.गणिते देखील गाणी ऎकताना सोडवता येत. अगदीच किचकट डेरिव्हेशन असेल , डोक्यात शिरत नसेल तरच रेडीओ बंद करावा लागे, पण अशी वेळ नाही यायची कारण रेडीओवर प्रोग्रॅम नसतील त्या वेळात असा अभ्यास करायचा.
सकाळी उजाडताना पुणे केन्द्रच लावायचे,(सकाळी सकाळी कसली ती सिनेमातली चटोर् गाणी ऎकता इति आई) मग 'उत्तम शेती ' पासून सुरुवात होई, रामदास स्वामींचे मनाचे श्लोक किंवा तत्सम मारुतीबुवा रामदासी आणि मोहन बुवा रामदासींच्या स्वरात . ऎकताना डोळ्यापुढे भगवी वस्त्रे घातलेली, पायात खडावा आणि हातात झोळी, दुसऱ्या हातात भोपळ्याचा तुंबा घेवून उभ्य़ा असलेली मारुतीबुवा रामदासी आणि मोहन बुवा रामदासींची जोडी उभी राही.त्यानंतर भक्ती संगीत.या तालावर काम चाले. संस्कृत बातम्या सुरु झाल्या कि सात वाजले.सकाळची शाळा असेल तर या आधीच घर सोडलेले असे, एरवी संस्कृत बातम्या झाल्या तरी गाद्या काढलेल्या नसल्या तर आईच्या तोंडाचा पट्टा सुरु होई.संस्कृत बातम्यांच्या निवेदकाचा आवाज अजूनही आठ्वणीत आहे.'इयं आकाशवाणि संप्रति वार्ता: श्रुयंतां प्रवाचकः बलदेवानंद्सागरः' हे वाक्य पाठ होते, मला हा बलदेवानंद सागर नावाप्रमाणॆ बलवान आणि धोतर नेसून उपरणं अंगावर घेवुन, गंध-बिंध लावून बातम्या वाचतोय असचं चित्र डोळ्यापुढे यायचं ,कधी कधी प्रवाचिका 'विजयश्रीः' असायची, ती मात्र रागीट चष्मेवाली, मोठा अंबाडा असलेली बाई असणार असे वाटे,त्या बातम्यांमधलॆ एक अक्षरही कळत नसे , अगदी शाळेत संस्कृत शिकायला लागले तरीही . प्रधानमंत्री,राष्ट्र्पती असे ओळखीचे शब्द कानी पडत, तेवढेच कळत , कळून घ्यायची इच्छा नसे हेच खरे.नंतर प्रादेशिक बातम्या लागत, त्या संपल्या कि हळुच विविधभारती लावायचे.साडेसातला संगीत सरीता मग भुलेबिसरे गीत. यामध्ये जुनी गाणी लावित काही वेळा ती बोअर असत पण बरेचदा छानच असत. चित्रलोक मध्ये त्यावेळच्या नव्या सिनेमांतली गाणी लागत नऊ नंतर अनुरोध गीत असे,आवडीची गाणी लागली की रेडीओचा आवाज मॊठा करायचा,इतका कि अंघोळीला गेले तरी गाणं ऎकू आलं पाहिजे.त्यात आईने सांगितलेल्या कामांकडे कानाडोळा करण्याचा सुप्त हेतूही साध्य होत असे. दहा नंतर अकरा पेर्य़ंत रेडिओ बंद असे. अकरा वाजता मधुमालती कार्यक्रम ऎकत उरलेला गृहपाठ, दप्तर भरणे, जेवण करुन साडेअकरा पावणेबाराला सायकलवरुन शाळेत जायला निघायचे. जाताना मैत्रीणींबरोबर ही आज कुठली गाणी होती, आशा भोसलेची 'ये है रेशमी जुल्फोंका अंधेरा' किंवा 'जाईये आप कहा जाएंगे' अशी गाणी ऎकली असतील तर त्याचीच चर्चा.संध्याकाळी सात वाजता 'फौजी भाईयोंकी फर्माईश' अर्थात 'जयमाला'.बुधवारची सिलोनवरची बिनाका गीतमाला आणि त्यातला तो अमीन सयानीचा अफलातुन आवाज आजही आठवतॊ. त्यांचं हिंदी फारसं समजत नसे पण ऎकत रहावं असं वाटे. विविध भारतीवर असणाऱ्या विविध गाण्यांच्या कार्यक्रमांची नावे देखील किती कल्पकतेने दिलेली असत. संगीत सरीता,भुलेबिसरे गीत काय किंवा जयमाला रात्री ११ वाजता 'बेला के फूल'.विनोदी श्रुतिका 'हवा महल'. ,'गागर में सागर'.अशी सगळीच नावे अर्थपूर्ण होती. मराठी कार्यक्रम ही दर्जेदार होते.मराठी श्रुतिका तर सुंदरच असत.व्यंकटेश माडगूळकरांची वाटसरू नावाची श्रुतिका अंगावर काटा आणायची.व.पु.काळ्य़ांचे टेकाडे भाऊजी अजून आठवतात.पु.लं.च्या मुलाखती, त्यांची भाषणे केवळ अप्रतिम.दिवाळीत नरकचतुर्दशीला पहाटे किर्तन असे.दुपारी संगीत नाटके असत.मोठमोठ्या लेखकांचे, कवींची भाषणे , त्यांचे विचार रेडीओमुळे परीचित झाले.
आजकाल 'एफ.एम.बॅंड ' मुळे पुन्हा तरुण पिढी रेडीओ ऎकु लागलीय.शिवाय हल्ली रेडीओ हा आमच्या वेळच्या रेडीओसारखा कोपऱ्यात राहणारा नाही, ट्रांझिस्टर हे त्याचं नाजुक रुपही बोजड वाटेल अशी लहान मॉडेल्स आहेत.गाडीमधील रेडीओ वर एफ.एम.बॅंड असतो,मोबाईल मध्येही एफ.एम.बॅंड असतो, त्यामुळे जळी स्थळी काष्ठीपाषाणी त्याची सोबत असते.शिवाय तो सतत २४ तास चालत असावा. मी मात्र त्याचा आनंद नाही घेऊ शकत. माझे वय हे कारण असू शकेल, मी एक वेळ आजकालची नवी गाणी एन्जॉय करु शकते, पण एफ.एम.बॅंडच्या रेडीओ जॉकी नामक व्यक्तिची अखंड चालणारी निरर्थक टकळी काव आणते. त्या बडबडीतून डोके दुखण्या खेरीज दुसरे काहीच होऊ शकत नाही.त्यामध्ये नविन माहिती मिळत नाही, कि काही मनोरंजन होत नाही.उगीचच हिन्दी, मराठी , इंग्रजी तिन्ही भाषांची खिचडी करत मधूनच आपणच केलेल्या पाचकळ विनोदाला फिदीफिदी हसत असतात.अधूनमधून मदर्स डे, फादर्स डे, व्हॅलेंटाईन डे अशा दिवसांची आठवणही करतात आपण भारतात राहतो, आणि आपल्याकडेही साजरे करावयाचे दिवस असतात असे मला कधी कधी त्यांना सांगावेसे वाटते. गाणे चालू असताना त्यांची बडबड थांबते म्हणूनही कदाचित गाणी आवडत असावित. अर्थात हे तितकेसे बरोबर नाही. ए.आर.रहमानचे संगीत असलेली , किंवा गुलझारची नवीन गाणी खरोखरीच आवडतात.रेडीओ जॉकी मात्र अशक्य आहेत.
वास्तविक रेडीओ हे माध्यम खरचचं चांगलं आहे. मनोरंजन, माहिती सर्व त्यातुन मिळाते, कुठेही नेता येते.आजकाल हेडफोन्स आल्यामुळे त्याच्या वापराने इतरांना त्रास होत नाही.कामे करता करता रेडीओ लावला कि करमणूक होते, त्याच्या पाशी बसून राहण्याची गरज नसते. शिवाय असं म्हणतात दृक माध्यमापेक्षा श्राव्य माध्यम अधिक चांगले, त्यात आपली कल्पनाशक्ती वापरली जाते. एक राजा होता हे एकताना मूल राजा कसा असेल याचं चित्र मनाशी रंगवतॊ, तेच राजा पडद्यावर दिसला तर कल्पना करायची वेळ येतच नाही.त्यामुळे कल्पनाशक्ती कमी होवू लागते.
आजारी व्यक्तींनाही रेडीओची सोबत चांगली.माहितीच्या नावाखाली फालतू बडबड करण्यापेक्षा काहीतरी दर्जेदार मनोरंजन करणे अवघड असले तरी अशक्य नाही. कलाकारांची तर सध्या अजिबात कमतरता नाही. तेंव्हा अनेक नवनवे बॅंड काढण्याऎवजी मोजकेच पण चांगले बॅंड ठेवून त्यावर मनोरंजक,उद्बोधक कार्यक्रम ठेवावेत. त्यामुळे अबालवृध्द पुन्हा एकदा रेडीओ ऎकून त्यातला आनंद घेवू शकतील.


©

1 comment:

DGS said...

Smaranramaniyata arthat nostalgiachi janiv jhali.pune kendravarchi natyagitee rahili. Great.