Friday, July 9, 2010

ब्लॉगचा वाढदिवस

म्हणता म्हणता दोन वर्षे झाली. ब्लॉग या संकल्पनेची माहिती होती. दुसऱ्यांचे ब्लॉग वाचत होते.आपण लिहावे किंवा आपण लिहिलेले कोणी वाचेल असे वाटत नव्हते.माझ्या भाच्याने मला भरीस घातले.त्याच्या कडून ’देवनागरी’ लिहिण्याचे सॉफ्ट्वेअर घेण्यापासून सुरुवात होती.कॉम्प्युटरशी ओळख होवुन वीसाहून अधिक वर्षे झाली होती.कार्ड पंचींगच्या जमान्यापासून आम्ही त्याला ओळखतो.कोबोल,फ़ोर्ट्रान अशा संगणकीय भाषांमधून प्रोग्राम लिहून आपल्याला हवे तसे आऊट्पुट काढण्याची झटापट करण्य़ाचे काम आम्ही करत आहोत या क्षेत्रातील झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेताना कधी मजा आली तर कधी दमछाक झाली.

मला आठवतयं, आम्ही तेंव्हा युनिक्स ऑपरेटींग सिस्टीमवर काम करत असू.प्रत्येक सूचना संगणकाला टाईप करुन द्यावी लागे, त्यावेळी आमच्या ऑफीसमध्ये मल्टीमिडीया संगणकावर व्याख्यान झाले होते.आणि कॉम्प्युटरवर तुम्ही गाणी ऎकू शकाल,सिनेमे बघू शकाल अशा गोष्टी ऐकून आम्ही चकित झालो होतो, पण ही किमया आपल्याला इतक्या लवकर बघायला मिळेल अशी कल्पना नव्हती. मायक्रोसॉफ्टच्या ’विंडोज’ ने तंत्रज्ञानाची जी अद्भूत खिडकी उघडली आणि हा हा म्हणता याने साऱ्या जगावर जादू केली. सर्वसामान्यापासून सगळे सह्ज हा वापरू लागले. माहितीजालाने जग जवळ आले.ई-मेल ने सगळे संपर्कात आले. आता इंग्रजीसारखेच इतर भाषांमधुन लिहिता येवु लागल्याने भाषांचे अडसरही दूर झाले.या बदलाचे नुसतेच साक्षीदार न बनता त्याचा उपयोग करुन कामे तर करता आलीच पण विसाव्याचे दोन क्षणही त्यातून मिळवता आले हे मी माझे भाग्य समजते.

संगणक या क्षेत्रातील वेगाच्या प्रगतीचा विचार करता यात टिकण्याचा सोप्पा मार्ग मला मिळाला,’गुरुविण कोण दाखवील वाट..’ हे खरे असले तरी इथे तुम्ही तुमचा गुरु हा वयाने लहानच(तुमच्यापेक्षा) बघावा लागतो.कारण त्यालाच सगळ्यात अद्ययावत ज्ञान असते.माझ्या भाच्याला तो लहान असताना मी एकदा माझ्या ऑफिसमध्ये नेले होते, तेंव्हा मी पुणे विद्यापिठाच्या संख्याशास्त्र विभागात काम करीत होते, तेथे प्लॉटरवर आम्ही ग्राफ काढीत होतो,ते बघून तो एवढा खूश झाला. पेन होल्डरमधे पेन घेवुन कागदावर चित्र उमटते ते बघून तो थक्क झाला होता.
"मावशी त्या कागदावर आता हत्ती काढ ना !"
"अरे, हत्ती नाही येत काढता "
"का? तो कॉम्प्युटर हया रेघा कशा मारतो , तसाच काढेल ना हत्ती, घोडा काही पण"
मग मी त्याला प्रत्येक रेघ काढण्यासाठी कसा प्रोग्रॅम लिहावा लागतो वगैरे समजविण्याचा प्रयत्न केला तेंव्हा
" मावशी , मग सोप्प आहे, आता हत्तीचे चित्र काढायचा प्रोग्रॅम लिही म्हणजे हत्ती काढता येईल"
मावशी अर्थातच निरुत्तर झाली. मावशी नुकतीच त्या कॉम्प्युटर वर शिकायला लागली होती,आणि भाच्याने डायरेक्ट पदवी परिक्षेचा प्रश्ण सोडवायला दिला होता, आपले अज्ञान न दाखवता त्याचे समाधान कसे करावे असा मला पेच पडला.अर्थात माझा भाचा बराच चतुर होता, त्याने मावशीची स्थिती ओळखली असावी, त्याने हत्तीचा नाद सोडून कॉम्प्युटर वर इतर गोष्टी कशा करता येतात, पाने कशी प्रिंट होतात ते बघायला सुरुवात केली.
आता वीस वर्षांनी हाच मुलगा कम्युनिकेशन आणि ग्राफिक डिझाइन मधला मास्टर झाला(याला मी मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे काही म्हणणार नाही), तो माझा गुरु ठरला ब्लॉग बनविण्यासाठी.

त्याने स्वतःच्या ब्लॉगची मला लिंक पाठवली आणि मी ब्लॉगविश्र्वाची सभासद, नियमित वाचक झाले.नंतर त्याचे मला आवडलेले लेख मी त्याला प्रसिध्द कर असे म्हणू लागले,या पिडेतून सुटका मिळावी म्हणून कदाचित त्याने मला मावशी तू पण तुझा ब्लॉग बनव असा सल्ला दिला.मी गुगलच्या मदतीने सुरुवात केली.मला आडेल तेंव्हा मी त्याला फोन करायची.तो पण बिचारा अतिशय पेशन्स ठेवुन मला उत्तरे द्यायचा.अगदी लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतीचित्रात सांगितल्याप्रमाणे, त्या जशा नव्याने कादंबरी लिहिताना बालकवींना सतत विचारीत तशी मी त्याला विचारत होते. तो लहान असताना मी त्याला जे काही शिकविले त्याची त्याने परतफेड केली.मी त्याला रागावले असेन त्याने मात्र वयाचा मान ठेवून शांतपणे मावशीचे प्रश्ण ऎकून तिला समजतील अशा शब्दात उत्तरे दिली.
शेवटी एकदाचा ब्लॉग बनला. म्हणजे त्याची बाह्य रुपरेखा बनली.मजकूर तयार होताच, पण तो भरायचा कसा? हा बेसिक प्रश्ण होता.ब्लॉगच्या डॅशबोर्डवर जावुन नवीन पोस्ट भरणे हा ऑप्शन सापडेना.अलिबाबाच्या गुहेतून बाहेर पडताना त्याच्या भावाला जसे ’खुल जा सिम सिम ’ आठवेना , तशी अवस्था झाली.पुन्हा एकदा दादाला(भाच्याला मी माझ्या मुलींप्रमाणेच दादा म्हणते या क्षेत्रात तो तसाही आहेच दादा,नाव मुद्दाम सांगत नाही चिडेल माझ्यावर एखादवेळी)
फोन , तो (म्हणजे फोन आणि पर्यायाने तो पण) आऊट ऑफ रेंज.माझी तडफड , धडपड चालू होतीच अखेरीस केंव्हा तरी योग्य ऑप्शन मिळाला आणि एकदाची सुरुवात झाली !

दोन वर्षांमध्ये पांढऱ्यावर बरेच काळे करुन झाले. बरेच शिकायला मिळले.खूप जणांनी चिकाटीने वाचले.काहींनी आवडल्याचे अभिप्रायही पाठविले.एकूणात ही सगळी आनंदयात्रा ठरली.आपले मूल मोठे होताना बघण्याचा जो आनंद असतो त्याच प्रकारचा आनंद ब्लॉगने दिला.आपले विचार व्यक्त करता येणारे हे मुक्तपीठ आहे. याचा वाचकवर्ग जगभरातील आहे.आणि स्वांतसुखाय अशी ही निर्मिती आहे.कुणाकडे प्रसिध्दिला पाठविण्याची कटकट नाही आणि साभार परत आल्याचे दुःख नाही.

समस्त ब्लॉगवाचकांचे मनःपूर्वक आभार आणि आमच्या लाडक्या दादाचेही.

5 comments:

Maithili said...

Arre wah...Abhinandan...!!! Aani pudhil vatchali sathi shubhechha...!!!

हेरंब said...

अरे वा !!! अभिनंदन !!!

आपल्या गावाकडच्या कथा वाचायला इ नेहमीच उत्सुक असतो. लवकर येउदे पुढची कथा.

prasad bokil said...

ब्लॉगच्या वाढदिवसाबद्दल शुभेच्छा. ब्लॉग ही या दशकातली तंत्रज्ञानाची अमुल्य देणगी आहे असेच म्हणायला हवे. इथे आपल्या सारख्या सगळ्यांना एक व्यासपीठ मिळाले आहे. लिहिणार्‍या वाचणार्‍यांचं रोजचंच साहीत्यसंमेलन भरलेलं पहायला मिळणं या सारखी पर्वणी काय? कालपर्यंत आपण नुसतीच पुस्तकं वाचत होतो इतर लेखकांनी लिहीलेली. प्रकाशक नसल्याने सामान्य माणसातला लेखक तसाच शांत होता. आता त्याला आकाश सापडलं आहे.

हा वसा एका कडून घेऊन दुसर्‍याला द्यायचा आहे. मी चुकून कारणीभूत झालो असेन तुझा ब्लॉग चालू होण्यास पण तुझ्यामुळे अजून कोणी लिहीता होईल तेव्हा हे वर्तुळ पूर्ण होईल.

Gayatri said...

अभिनंदन मावशी, आणि तुझ्या ब्लॉगला वाढदिवसाच्या शुभेच्छा! तुझं लिखाण असंच (अजून जास्त वारंवार) वाचायला मिळू देत.
तुझ्या भाच्याची दादागिरी आणि किस्से वाचून गंमत वाटली :)

Shubha Pathak said...

अभिनंदन !!!
So now blog has started running.. keep up
recent additions are have come fast