Monday, October 31, 2011

दिवाळी

दरवर्षी येणारी दिवाळी.दिव्यांचा उत्सव! दुःख,दारीद्र्य,अज्ञानरुपी अंधःकाराचा नाश करुन मंगलमय वातवरण करणारी दिपावली. लहानपणातल्या अनेक दिवाळ्या डोळ्यापुढे चंद्रज्योतींसारख्या झगमगत आहेत. नवे कपडे, फराळाचे नाना प्रकार, सुगंधी तेलाची ,उटण्याची उबदार अंघोळ ,किल्ले बनविणे आणि जरा मोठे झाल्यावर दिवाळी अंक वाचणे.


श्रावणापासून सण वार सुरू होत. गौरी-गणपती झाले कि नवरात्र येवुन ठेपे.मधल्या पितृपंधरवड्यात शुभकार्ये करायची नाहीत असे माहित होते. नवरात्राचे नऊ दिवस घरोघरी भोंडल्याची गाणी म्हणण्यात आणि नाना तऱ्हेच्या खिरापती खाण्यात कसे जात समजतच नसे. गल्लीतल्या चार घरी भोंडला असेल तरी प्रत्येक ठिकाणी तिच तीच गाणी म्हणायचा आम्हाला कंटाळा नाही याय़चा. त्यात वेळ जातो, अभ्यास होत नाही सहामाही परीक्षा जवळ आलेल्या आहेत याचीही जाणीव न आम्हाला असायची ना आमच्या आई वडीलांना. आई हौशीने नवनव्या खिरापती कराय़ची , नवनवी गाणी शिकवायची. आमच्या शेजारच्या काकू आमच्या भोंडल्याला येत असत. त्यांना मुलगी नव्हती, सगळे मुलगेच होते.आमच्या भोंडल्याला त्यांचे गजगौरीचे गाणे त्या आवर्जुन म्हणत.पांडवांनी बाणाचा जिना करुन स्वर्गातून इंद्राचा ऐरावत कुंतीला आणून दिला आणि तिचे गजगौरीचे व्रत पुरे झाले अशी कथा गाण्यात गुंफलेली होती.

शंभर कौरव सर्व मिळोनी करीती हत्ती माती आणॊनी

गंधारीला वरी बसवोनी वाटीयली वाणे

कुंतीला मग देवुन वाण दुर्योधन बोले टोचून

आमुच्या वाणाचा व्रतांत परत पाहिजे आम्हा

कुंती माता कष्टी झाली भीम पुसे मग येवुन जवळी

शोक कशाचा चिंता कसली सांग सांग आई...

अशी सुरुवात असलेले हे गाणे. कौरव एवढे राजपुत्र , मग त्यांच्या कडे खरा हत्ती नव्हता का? बाणांच्या जिन्यावरुन एवढा बलदंड भीम कसा गेला जिना तुटला कसा नाही? स्वर्गापर्यंत म्हणजे जिना तरी किती मोठ्ठा असे प्रश्ण पडले नसतीलच असे नाही पण गाण्याची सुंदर चाल, फेराचा तो ठेका यामुळे ते गाणे फारच आवडायचे. सासर माहेरची गाणीही तशीच. नसलेल्या सासराबद्दल एवढ्या लहान वयातच खुन्नस निर्माण होइल,बाळमनावर परीणाम होईल अशा शंका आमच्या आयांना कधी आल्या नाहीत. ती गाणी माहित नसलेल्यां हल्लीच्या मुलींना नवरा सोडून इतर सगळे दूरचे, आणि सासरच्या वाटे कुचकुच काटे हे आधीपासून माहित असते. त्या गाण्यांमधुन जुन्या सासुरवाशणींची दुःखे बाहेर येत होती, आम्हाला मात्र ती गाणी त्यांच्या गेयतेमुळे , नादमाधुर्यामुळे क्वचित विनोद,अतिशयोक्तिमुळे आवडत होती .


काळी चंद्रकळा नेसु कशी,गळ्यात हार घालू कशी
ओटीवर मामंजी जावु कशी? दमडीचं तेल आणू कशी?

दमडीचं तेल आणलं सासुबाईंच न्हाणं झालं

वन्सबाईंची वेणी झाली मामंजींची शेंडी झाली

उरलेलं तेल झाकुन ठेवल, लांडोरीचा पाय लागला

वेशीबाहेर ओघळ गेला त्यात हत्ती वाहून गेला

सासुबाई सासुबाई अन्याय झाला

दुधभात जेवायला घाला माझं उष्टं तुम्हीच काढा

या गाण्यातल्या दमडीच्या तेलात इतक्या गोष्टी करुन झाल्यानंतर उरलेल्या तेलाचा ओघळ वेशीपर्यंत जावुन त्यातून हत्ती वाहून जाण्याइतकेच सुनेने सासुबाईंना दुधभात जेवायला मागणे आणि आपले उष्टे त्यांना काढायला लावणे हि अशक्य घटना होती. माहेरच्या प्रत्येक गोष्टीचे कौतुक, कार्ल्याचा वेल लावण्यापासून त्याला आलेल्या कारल्याची भाजी खाऊन आपलं उष्टं काढुन शेणगोळा केल्यावर सासरी पाठवणारी खाष्ट सासु.चोरटेपणाचा आळ आणणारी खडुस नणंद ,कडक सासरा हे सगळे मुकाट पणे सोसायला बळ देणारा प्रेमळ नवरा अशीच सगळी गाणी होती. निव्वळ करमणुकीपेक्षा इतर काही त्यातुन आम्हाला त्यावेळी जाणवले नाही.

गाणी म्हटल्यावर मिळणाऱ्या खिरापती शिरा,पोह्यापासून फळे, लाडू ,चिवडा,वाटली डाळ,भेळ अशा नाना प्रकारच्या असत. काही उत्साही बायका गजरे, विडे असा साग्रसंगीत भोंडला करायच्या. सगळ्यांकडे घरी केलेल्याच खिरापती असत.त्यामुळे कधी पोट बिघडलयं, त्रास झाला असं काही आठवत नाही. आमच्या शाळेत देखील एक दिवस भोंडला असायचा. भोंडल्याहून घरी आल्यावर जमेल तसा अभ्यास करावा लागे, कारण दसरा झाला कि लवकरच सहामाही परीक्षा असे. परीक्षा संपताना दिवाळीचे वेध लागलेलेच असत. घरोघरी चकली,कडबोळीच्या भाजण्या भाजणे,अनारशाचे पीठ बनवणे हि कामे सुरु झालेलीच असत. झाडलोट, डबे घासणे हि कामे आम्ही हौशीने करत होतो. दुपारी आईला फराळाचे पदार्थ करायला मदतही करायचो. मिक्सर, फुडप्रोसेसर अशी साधने नसल्याने हे पदार्थ बनविणॆ तितके सहजही नव्हते. तरी गॅस, स्टोव्ह असल्याने आई म्हणे ,"आता गॅ्समुळॆ कामे लवकर होतात आमच्या लहानपणी चुलीवर काय त्रास व्हायचा!"

आकशकंदील,दिवाळीची भेटकार्डे पण आम्ही घरीच बनवत होतो. संध्याकाळी मातीचा चिखल करुन अंगणात किल्ले बांधण्याचे उद्योगही चालत. एकमेकींकडे जावुन किल्ले बांधायचो.जास्त चिखल राडा केला तर आईची बोलणी ऐकावी लागत. कारण दिवाळीला अंगणही स्वच्छ झाडून लोटून रांगोळ्यांकरीता लख्ख करावे लागे.किल्ल्यावर आळीव, मोहरी टाकली कि दोन तीन दिवसात मस्त शेत उगवायचे. किल्ल्यावर मातीचे शिवाजीमहाराज , मावळे, तोफा अशी चित्रे. यात एखाद्याच्या किल्ल्याच्या पायथ्याशी नवीन आणलेली खेळातली मोटारही ऐटीत उभी असायची. किल्ल्याला एक गुहा असेच त्यात वाघ, किंवा सिंह ठेवायचा त्याच्या पलिकडे विहिर आणि विहिरीच्या काठावर हंडा डोक्यावर घेतलेली गवळण. वाघाचे तोंड तिच्या दिशेलाच. दरवर्षी नवी चित्रे (मातीचे मावळे, शिवाजी इ) मिळत नसल्याने दिवाळी संपल्यावर ती चित्रे उचलून खोक्यात भरुन ठेवायचो, मातीचीच चित्रे ती, पुढल्या वर्षी थोडीफार मोडतोड झालेली असे. शिवाजी महाराज सोडून बाकीचे मावळे जेरबंद झालेले चालायचे त्यांना लढताना दाखवले जाई. किल्ल्याच्या पायथ्याशी कुणाचा हात तुटलेला, एखाद्याचे मुंडकं उडलेलं अशी धमासान लढाई. आणि किल्ल्याच्या शिखरावर सिंहासनावर विराजमान शिवाजी महाराज ! आमच्या कलाकृतींवर आम्हीच खुश असायचो. त्यात विसंगती,चुका चुकुन सुध्दा कुणाला दिसायच्या नाहीत.किल्याजवळ पणती ठेवायलाही जागा असे. रात्रीच्या अंधारात तिचा चिमणाप्रकाश किल्ला उजळून टाकी. बऱ्याचशा एकसारख्या दिसणाऱ्या वेगवेगळ्या ओबडधोबड किल्ल्यांपैकी कुणाचा रायगड, कुणाचा राजगड तर कुणाचा सिंहगड असे. मातीत मनापासून खेळायची हौस त्यामधे पुरेपूर फिटून जायची.क्वचित एखादा कल्पक मुलगा किंवा मुलगी असे, ते किल्ल्याला बुरुज बनवत त्यावर खडूने शनवारवाड्याच्या बुरुजासारखे डिझाईन करत. कुणी किल्ल्याभोवती भक्कम खंदक करीत.कुठे एखादे बांधकाम चाललेले असेल तर तिथली वाळू किंवा सिमेंट मिळाले तर अगदी ब्रम्हानंद व्हायचा, कारण मग त्या खंदकात सिमेंट लावून पाणी टिकवता येई, किंवा एखादे तळे करुन त्याला आतुन सिमेंट्चे लिंपण करुन पाणी भरुन त्याचा गंगासागर तलाव बने. आम्हा कुणा्चेच आई वडील आमच्या खेळात सहभागी झाल्याचे आठवत नाही,पण त्यांनी आमच्या या उद्योगांना कधी विरोधही केला नाही,वा त्याचे फार कौतुक केल्याचेही स्मरत नाही. आम्ही आणि आमचे पालक यांची अगदी स्वतंत्र अशी परस्पर भिन्न विश्वे होती. एकमेकांच्या विश्वात कुणीच ढवळाढवळ करत नव्हते.

दिवाळी आणि वाढदिवस या दोनच प्रसंगांना नवीन कपडे मिळत, माझा वाढदिवस दिवाळीतच असल्याने मला दोन फ्रॉक नसत,उलट माझ्या बहिणींना माझ्या बरोबर नवे कपडे मिळत, हि गोष्ट नाही म्हटले तरी मला थोडी टोचे.पण माझे दादा, "बघ तुझा वाढदिवस सगळ्या महाराष्ट्रात साजरा होतो, तू कित्ती मोठ्ठी व्यक्ती आहेस!" अशी माझी समजूत काढित.मलाही उगीचच आपण महान असल्याचा भास होई.अर्थात कपड्यांपेक्षा खेळ, खाणे, सुट्टीत हुंदडणे यात जास्त रस वाटायचा त्या वयात. दिवाळीतच फक्त फटाके उडवायला मिळत. दादांचा फटाके आणण्याला सक्त विरोध असे.दारू , मग ती प्यायची असो वा शोभेची त्यासाठी पैसे देणार नाही , त्यापेक्षा खाऊ खा,पुस्तके आणा असे त्यांचे म्हणणे असे. वाईट वाटले तरी हट्ट करण्याची शामत नव्हती. आमच्या आईचे मामा कधीकधी आमच्या करीता फुलबाज्या, भुईचक्रे,भुईनळे क्वचित लवंगी फटाक्यांचे एखादे पाकिट आणीत, दादांना ते ही आवडत नसे, पण सासऱ्यांना बोलण्य़ाची पध्दत नसल्याने आमच्या ते पथ्यावर पडे.मग त्या फटाक्याची काटेकोर वाटणी करुन दिवाळीचे चार दिवस ते टुकिने पुरवुन लावले जात. आजुबाजुच्या घरांमध्येही फारसे वेगळे चित्र नसल्याने आम्हाला या गोष्टींचे दुःख कधी वाटले नाही.
नरकचतुर्दशीला सूर्योदयाच्या आत अंघोळ नाही झाली तर नरकात जातात अशा धमकीमुळे पहाटे पाच वाजताच उठावे लागे.कुडकुडणाऱ्या थंडीत मस्त वासाचे तेल चोळून गरम पाण्याने आई न्हायला घाली.उट्णे ,मोती साबण लावून अंघॊळ करुन नवे कपडे घालून देवाला जावुन आले की सकाळी सात वाजता फराळ करायला बसायचे.इतक्या सकाळी चकली, चिवडा,कडबोळी शेव तसेच लाडू , करंजी असे तेलकट,तुपकट कसे खायचे? असे कधी मनात नाही आले. मन लावून सगळा फराळ झाला कि कधी कधी डोळे मिटू लागत. जेवायच्या वेळीच जाग येत असे. दिवाळीत ’सकाळ’चा ही बराच मोठा असे. वेगवेगळे दिवाळी अंक असत. ते वाचण्यात दुपार संपायची.वाचताना मधुन मधुन तोंडात टाकायला शंकरपाळे, चिवडा असल्याने त्याची रंगत वाढायची. संध्याकाळी अंगणात रांगोळ्या काढून रंग भरण्य़ाचा मोठा कार्यक्रम असे.पणत्या लावायच्या. संध्याकाळी लक्ष्मीपूजन असे. लाह्या-बत्तासे भरलेल्या ताम्हनात लक्ष्मीची पूजा होई. अगस्ती ऋषींनी रचलेले लक्ष्मीचे स्तोत्र आई म्हणायची. "चचंलायै महालक्ष्मी: चपलायै नमो नम:" चंचल चपल अशा महालक्ष्मीची आळवणी एवढ्यासाठी करायची की "पाडिंत्यं शोभते नैव महालक्ष्मी त्वया विना " पांडित्य, सत्शिल हे सारे गुण तिच्या शिवाय व्यर्थ आहेत. संसारी माणसाच्या आयुष्यातील लक्ष्मीचे महत्त्व अगस्तीमुनींनी किती नेमकेपणने सांगितल आहे ! शिवाय तिच्या असण्याने "गुणिर्विहिनाः गुणीना भवन्ती” हे त्रिकालाबाधित सत्यही ते सांगतात. पाडवा,भाऊबीज हे दिवसही गोडाधोडाचे जेवणाने मजा आणायचे. आम्हाला सख्खा भाऊ नाही, आमच्या कुसुम मावशीच्या तीन मुलांपैकी कोणीतरी एक दादा त्या दिवशी आवर्जुन आमच्या कडून औक्षण करुन घ्यायला यायचाच. आम्हाला त्याने दिलेल्या ओवाळणीची काय अपूर्वाई वाटायची!. आज जाणवते, मावशीला पाच मुली होत्याच, पण आम्हाला भाऊ नाही म्हणून दादा, नाना किंवा अप्पा कुणालातरी ती आमच्याकडे पाठवायची तेही कौतुकाने सायकल मारीत येत. आईचा मोठा चुलत भाऊ तळेगावला असायचा. तो मामा देखील भाऊबिजेला न चुकता आमच्याकडे जेवायला येत असे. एका दिवाळीत तो काविळीने बराच अजारी असल्याने हॉस्पिट्लमध्ये असल्याचे समजले तेंव्हा लवकर उठुन, घरातले सगळे उरकुन आई तळॆगावला त्याच्याकडे गेली त्याच्या घरी तिने स्वयंपाक केला त्याच्यासाठी पथ्याचे घेवुन दवाखान्यात त्याला भेटून आली होती.

लहानपणीच्या सगळ्या दिवाळ्या अशा आनंदी आठवणींच्या आहेत. त्या आनंदी होण्यासाठी आईला किती त्रास पडायचा ! याची तिने कधी पुसटशी जाणीव नाही होवु दिली. रात्री उशीरापर्यंत जागून ती लोकांचे कपडे शिवुन द्यायची , आमचे कपडेही घरीच शिवत असे. कुणा एकीचा फ्रॉक आधी शिवून झाला म्हणून आमच्यात भांडणे नकोत म्हणून एका वेळी दोन्ही फ्रॉक शिवुन होतील असे ती बघे. तिला दिवाळीला कधी नवीन साडी मिळाल्याचे मला आठवत नाही, पण त्याबद्दल तिने चुकुन नाराजीही व्यक्त केली नाही. दिवाळी म्हणजे तिच्या दॄष्टीने अखंड काम असे.मात्र ते सगळे ती हौशी-उमेदीने करत होती, आल्या गेलेल्यांना भरभरून खाऊ घालण्यात तिला आणि दादांना आनंद होता.त्यामुळे दिवाळीचे चारही दिवस घरी लोकांची येणी-जाणी असत.

दादांच्या अकाली जाण्य़ानंतरची दुःखी दिवाळी अशीच मनात घर करुन आहे. आजुबाजुच्या आकाशकंदील आणि पणत्यानी उजळलेल्या घरांमधे आमचे उदास घर आठवले तरी डोळे पाणावतात. कॉलनीमधल्या तमाम घरांमधुन , नातलगांकडून आलेल्या फराळाच्या एकाही पदार्थाला हात लावावासा वाटला नव्हता. एरवी बघता बघता रिकामे होणारे डबे, बघावेसे वाटत नव्हते. सगळा उत्साह,आनंद हिरावून गेलेलं ते घर आणि नकोशा वाटणाऱ्या त्या पोरकेपणाच्या आठवणी!

फिरणाऱ्या रहाट्गाडग्यासारखे सगळे दिवसही सारखे नसतात. त्रासाचे, दैन्याचे आणि दुःखाचे दिवसही सरले कालांतराने.आमची शिक्षणे झाली,चांगल्या नोकऱ्या मिळाल्या. ताईची चिमुकली लेकरे आमच्या घरी येवु लागली.मावशांकडून आपले बालहट्ट पुरवुन घेवु लागली,ते ही दिवस मजेचे होते. आपल्या आई-बाबांनी आणलेल्या कुठल्याही गोष्टींहून मावशीने आणलेल्या चिमुकल्या खेळाचेही त्यांना अधिक कौतुक होते. मागितलेला कुठलाही खाऊ लगेच करुन देणारी आजी होती,आणि हवे तेंव्हा,हवे तिथे न्यायला आमच्याकडे वेळही होता, त्यामुळे त्यांना आमच्या घरी रहायला नेहमीच आवडे. ताईचे घरही आमच्या घराजवळ असल्याने मनात आले कि मुले आमच्या घरी हजर होत.

बघता बघता दिवस मात्र खूपच बदलले. जागतिकीकरण म्हणा,संगणक युग म्हणा किंवा दुसरे काही. आता फारशी आळवणी न करताही लक्ष्मीचा वास वाढला.पैसा हाती खेळू लागला पण त्यासाठी बरेच मोल मोजावे लागले.संपर्काची साधने वाढली.फोन,मोबाईल , इंटरनेट सगळे आले पण संवादाची इच्छा हरवली मग भेटीची आस तर दूरच! आता कोपऱ्याकोपऱ्यावरच्या दुकांनांमधे बारा महिने चिवडा,लाडू,चकली आगदी ओल्या नारळाच्या करंज्या देखील मिळत असल्याने ते खाण्यातली मजा गेली आणि कुठलाही पदार्थ पाहिला कि त्याच्या वास,चव याच्याआधी त्यातील कॅलरीचा हिशेब मांडण्याची खोड लागली. मुलांनाही दिवाळीचे अप्रुप राहिले नाही.मनात आले कि त्यांना हवे तसे कपडे मिळत असल्याने त्याचे विशेष नाही. खाण्याचे तसेच आणि फ्लॅट मधे कुठला किल्ला आणि कसली मातीची चित्रे! दिवाळीला मिळणाऱ्या सलग सुट्ट्यांमधे ट्रिपला जाणाऱ्य़ांची संख्या वाढतीय. त्यामुळे दिवाळीला घरांमधे अंधारच दिसतो. असलेच घरात तरी बहुतेकांची पाडवा , भाऊबीज हॉटेलमधे साजरी होते. नोकरी करणाऱ्या बायकांना घरी एवढ्या लोकांसाठी स्वयंपाक करणे अवघड वाटते कारण इतर पर्याय सहज परवडणारे असतात, शिवाय मुलांनाही चायनीज,इटालियन,मॅक्सिकन फूड आवडते. या सगळ्यात दिवाळी करीता दुकांनामधे विविध स्किम्स असतात, लोक त्या निमित्ताने भरपूर खरे्दी करतात. गाड्या घेतात पण त्यात बसून कुणा नातलगांकडे जावे असे त्यांना वाटत नाही. मिक्सर, फूडप्रोसेसर,मायक्रोवेव्ह ओव्हन घेवुनही एखादा पदार्थ घरी करुन तो कुणाला खायला घालावासा वाटत नाही. कमावत्या बायकोच्या कपड्याने भरलेल्या कपाटाकडे बघून तिला पाडव्याची वेगळी ओवाळणी द्यावी असे नवऱ्याला वाटत नाही.

एकंदरीत भरपूर झगमगाटाने सजलेल्या शहरांमधुन दिवाळीचा खरा आनंद हरवल्यासारखा झालाय. प्रेम, माया, आपुलकी याची किंमत देवून हि बेगडी झगमगती दिवाळी मनाला रुखरुख लावते.याची कारणे शोधण्यात वेळ जातो हाती मात्र काही लगत नाही, बदलत्या काळाला जबाबदार धरले तरी आपलही काही चुकतयं अस वाटत राहत. हि भावना कदाचित माझ्या पिढीपर्यंतच्या लोकांची असेल, या पुढच्या पिढ्यांना हिच दिवाळी खरी वाटणार. ते घरात बसूनच मोबाईल वा लॅपटॉपवरुन सगळ्या फ्रेंडसना दिवाळीच्या विशेस देणार. त्या निमित्ताने पुन्हा मॉलमधून अचाट खरेदी करणार. सुट्टीत कुठल्याशा क्लबचे मेंबर असल्याने हॉलीडे होम्स मधे जाणार आणि तिथे एंजॉय करणार!. त्यांच्या घरी काम करणाऱ्या बायकांना पगाराला पगार बोनस देणार . त्या बायकांच्या घरी कदाचित आमची हरवलेली दिवाळी सापडणार.!


©

3 comments:

Unknown said...

अप्रतीम ब्लॉग. अंतःकरणाला भिडणारा. धन्यवाद! उदय नातू, आजगांव.

Uma Natu said...

खरंच अप्रतिम उतरलंय... धन्यवाद!!

Unknown said...

शुभाताई,
भोरची दिवाळी आणि नवरात्र आठवलं.छान लिहिले आहेस.खरच आता तशी दिवाळी आणि तसे नवरात्र अनुभवायला मिळणार नाही.