Monday, November 25, 2013

निरोप

गोपाळरावांची प्रकृती हळू हळू ढासळायला लागली. ऐंशी वर्षे उलटली असावीत त्यांना. हा आपला अंदाजच. त्या काळात कोण लिहून ठेवायचे जन्मवेळा?. गोपाळरावांच्या अगदी लहानपणीच त्यांची आई मथुरा सोवळी झाली. वडीलांचा चेहरा त्यांना आठवतच नव्हता. कोकणातल्या दारीद्र्याला आणि कर्मठपणाला कंटाळून करारी मथुरेने आपल्या एकुलत्या एक मुलाला पोटाशी घेवुन चार कपडे गाठोड्यात बांधुन कुणा नातलगाच्या मदतीने पुण्याचा रस्ता धरला. शिक्षण नसल्याने एका सधन कुटुंबात स्वयंपाकाचे काम मिळाले. शंभर-दिडशे वर्षांपूर्वीचा तो काळ. सुखवस्तू कुटुंबातून अशा निराधार लोकांना आधार मिळे. मोठमोठ्य़ा वाड्य़ातील एकत्र कुटुंबात तीस चाळीस माणसे राहत, तेंव्हा स्वयंपाकाचे काम अशा बायकांना मिळॆ. त्यातच शहरात मधुकरी मागुन शिकणारे विद्यार्थी असत, वारावर जेवणारी मुले असत. एकूण आपल्याला मिळालेल्या पैशातून चैन न करता गरजुंना मदत करण्याची प्रथा असल्याने ही मोठी कुटुंबे संस्थाच होत्या जणु.

    गोपाळची आई मथुरा , वाड्यातील सगळ्यांची मथूताईच झाली होती. कामाला वाघ होती ती. बोलणॆ कमी पण समज अफाट.पुण्यातल्या ज्या वाड्यात तिला आसरा मिळाला, तिथे तिने आपल्या कष्टाने सगळ्यांना आपलेसे केले, गोड बोलून त्या वाड्यातली एक खोली स्वतःसाठी स्वतंत्र मिळविली. त्यात मुलाबरोबर ती वेगळी राहू लागली.वाड्यातले सगळे काम झपाटून ती चार घरी पोळ्या करू लागली , शिवण टिपण शिकू लागली. आपल्या मुलाला शिकवून मोठे करायचे या ध्यासाने तिने अहोरात्र कष्ट केले. गोपाळ मॅट्रीकची परीक्षा चांगल्या मार्काने पास झाला. लहानपणापासून त्याने आईला काम करतानाच बघितले होते. पुढे शिकण्यापेक्षा नोकरीला लागून आईच्या जीवाला आराम द्यायचे त्याने ठरविले होते. त्याप्रमाणे त्याला सरकारी नोकरी मिळाली. आईच्या अपेक्षाही फार नव्हत्याच. मुलगा स्वतःच्या शिक्षणाने कामाला लागला आता आपण स्वाभिमानाने जगू या, या विचाराने ती माऊली सुखावली. तिची कामे तिने कमी केली, बंद काही केली नाहीत. वाड्याच्या मालकांशी त्यांचे संबंध कायमचे होतेच. तिकडच्या नव्या सुना मथूताईंना वडीलकीच्या नात्याने वागवित. मुले देखील त्यांना मान देत. वाड्याचे मालक आबासाहेब फार करारी होते. त्यांनी खूप मुलांना शिक्षणाला मदत केली. अनेक मुले त्यांच्याकडे वारावर जेवायला येत. त्यांच्याकडे आलेला याचक कधी विन्मुख गेला नाही. त्यांचा एकुलता एक मुलगा विश्वनाथ फार हुशार होता. आय.सी.एस. परीक्षा द्यावयास तो इंग्लंडला गेला. परीक्षा पास होवुन परत येण्याची त्याने तार केली. आबा साहेबांनी त्याला तुला प्रायश्चित्त करुन घ्यावे लागेल असे कळविले. त्या काळी विलायतेहून आल्यानंतर प्रायश्चित्त घ्यावयाची कर्मठ रीत होती.  उच्च शिक्षण आणि परदेश भ्रमण केल्यामुळे मुलाचे विचार आधुनिक होते, प्रायश्चित्त वगैरे थोतांड आहे असे तो मानत होता वडीलांना त्याने तसे कळविले. आबा काही बाबतीत आग्रही होते. "शिक्षणासाठी मी तुला परदेशी पाठविले आता माझ्या मनासाठी तुला प्रायश्चित्त करुन घ्यावे लागेल हे तुला मान्य नसेल तर तू इकडे आल्यावर घरी येण्याची तसदी घेवू नको. मी अनेक मुलांना शिकविले त्यातल्या एक मला विसरला असे मी समजेन" असे उत्तर त्यांनी उलट टपाली धाडले.विश्वनाथ वडीलांचे मन मोडू शकला नाही. त्याने मनाविरुध्द प्रायश्चित्त घेतले.

    अशा कडक आबासाहेबांच्या वाऱ्याला मुले फारशी राहत नसत. बायका त्यांच्या समोर जातच नव्हत्या. गोपाळ तर लहानपणापासून गरीब आणि भित्राच राहिला या अशा परिस्थितीमुळे. मिळालेली सरकारी नोकरी इमाने,इतबारे करु लागला. कोकणातल्या अशाच गरीब घरातली मुलगी रमा त्याला सांगुन आली. गोपाळचे लग्न झाले आणि तो गोपाळराव बनला. रमा दिसायला गोरी -गोमटी दहा जणीत उठून दिसणारी होती. मथूताईंना आता हक्काची विश्रांती मिळू लागली. तसे आजवर खाली मान घालून काढलेले आयुष्य,आता जरब दाखवायला हक्काची व्यक्ती मिळाली. रमेच्या प्रत्येक हलचालीवर मथूताईंची बारीक नजर असे, तिचे चुकतयं कुठे आणि आपण बोलतोय कधी असं चाले. सुनेनं सार मुकाट्यानं सोसण्याचा तो काळ होता. पण गोपाळरावांकडे तिने कधी सासुच्या चुगल्या केल्या नाहीत. त्यांना डोळ्यानी जे दिसे त्यातुन आईचे वागणे खटकले तरी आईला बोलायची त्यांची प्राज्ञा नव्हती पण त्यांनी कधी रमेलाही दुखावले नाही. घरात त्यामुळे शांती समाधान होते.

    काळाबरोबर गोपाळ-रमाचा संसार बहरला. मथुताईंचे वय झाले.आयुष्यभर कष्ट केलेल्या माउलीचे म्हातारपण सुखात गेले.लेकाने आणि सुनेने त्यांची सेवा केली.नातवंडे बघायला मिळाली. पिकले पान गळून पडले. गोपाळरावांची मुले सालस आणि हुशार निघाली. त्यांची एकट्याची कमाई आणि वाढत्या महागाईचा काच यामुळे मुलांना उच्च शिक्षणापासून वंचित रहाव लागल. एक मुलगा मिलिटरीत गेला. दुसऱ्याला नोकरी लागली.मुली मॅट्रिक झाल्याबरोबर लग्न करुन सासरी गेल्या. धाकट्या मुलाला मात्र पदव्युत्तर शिक्षण मोठ्या भावडांनी दिले. मोठ्या कंपनीत तो उच्च पदावर कामाला लागला. रमाबाईंचा स्वभाव जळाहून शितळ. अंगात अनेक गुण,कला.पण काडीचा गर्व नव्हता त्यांना.मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केलेच.पण सुनांवरही मुलींप्रमाणे प्रेम केले. कामाची टापटीप,नीट्नेटकेपणा यात त्यांचा हात धरला नसता कुणी.उकडीचे मोदक तर असे करायच्या कि पाकळ्या मोजून घ्याव्यात. एकावर एक असे तीन सुबक मोदक हि त्यांची खासियत होती. शेवया, फेण्या पण त्या फार सुरेख करीत. वाड्यात कुणाचे लग्न ठरले कि रमाबाईंच्या रंगीत शेवया,फेण्या रुखवतावर असायच्याच.वाड्यात सगळ्या कुटुंबात एकी होती.रमाबाईंच्या लाघवी आणि प्रेमळ स्वभावाने तर सगळ्यांमध्ये त्या लाडक्या होत्याच. अबासाहेबांच्या कुटुंबाशीही त्यांचे संबध सलोख्याचेच होते.
       
     रमाबाईच्या थोरल्या नानाला मुंबईला नोकरी लागली. दोन्ही मुली सासरी गेल्या. मिलीटरीत गेलेला राघव नोकरी संपवून आला. त्याला पुण्यात चांगली नोकरी मिळाली. सुंदर खाशी सुबक ठेंगणी हे वर्णन लागु होईल अशा लेल्यांच्या सुनंदाशी त्याचे लग्न ठरले.  रमाबाईंना खूप आनंद झाला.नाना नोकरी निमित्ताने मुंबईत होता सुनेचं येण जाण क्वचितच व्हायच.घर सोडून मुंबईला जाणं त्यांना जमायच नाही.राघव आता जवळच राहणार. सुनंदाचं त्यांनी खूप कौतुक केलं. तिची दोन्ही बाळंतपण स्वतः केली.नातवंडांनाही आजीचा फार लळा. धाकटा माधव बराच शिकल्यानं त्याला मोठ्ठी नोकरी मिळाली. त्याला मुली पण शिकलेल्या, मोठ्या घरच्या सांगुन येवु लागल्या. वाड्यातली जागा अपुरी पडू लागली. माधवने गावाबाहेर सुरेख ब्लॉक घेतला. लग्नानंतर तो तिकडेच राहणार होता. सुनंदाची मुलेही आता बऱ्यापैकी मोठी झाली होती. सुनंदाला बालवाडीत नोकरी मिळाली होती. राघवलाही नोकरीत बढत्या मिळत होत्या. सुनंदाला  वाड्यात राहणे गैरसोईचे वाटू लागले. बाकीच्या दोन जावा स्वतंत्र राहतात, मलाच सासुसासऱ्यांबरोबर रहावे लागते असाही भाव त्यात होताच. नव्या नव्या सोईंनी सजलेले लोकांचे ब्लॉक बघितल्यावर आपल्या वाड्यातल्या खोल्या तिला फारच त्रासदायक वाटत. तिने गोडीने,लाडाने,आडून आडून राघवला नवीन जागा बघायचा आग्रह करायला सुरुवात केली. राघवलाही तिचे म्हणणे पटत नव्हते असे नाही, पण आई-बाबांना काय सांगायचे? बाबा तर ही जागा सोडणे कठीण आहे.
आईजवळ शेवटी त्याने विषय काढलाच. रमाबाईंना नवलच वाटले. त्यांना वाड्याच्या जागेत कुठलीच उणीव दिसत नव्हती. हं जागा होती जुनी.पण शेवटी घर म्हणजे भिंती,रंग सजावट थोडीच असते? घरातली माणसं, त्यांच एकमेकांवरच प्रेम, जिव्हाळा याने वास्तु बनते ना? या वास्तुने आजवर त्यांना सगळं सुख समाधान दिल होतं. इथुन शाळा,बाजार देवळे सगळं जवळ.मग थोडी जुनी असली जागा म्हणून काय बिघडलं? 

    रात्री पडल्या पडल्या रमाबाई विचार करु लागल्या, हल्ली त्यांना सुनंदाच्या वागण्यातला फरक जाणवत होता. तिच्या चिडचिडीचं, आदळआपटी मागचं,मुलांवर उगाच रागावण्यामागच कारण त्यांना समजल . देवळात भेटणाऱ्या बायका, आजुबाजुच्या मैत्रीणी यांची मुले वेगळी राहत होती.आपल्या घरी सुध्दा मातीच्याच चुली आहेत.  कोकणातून पुण्यात आलो तेंव्हा हि आपल्याला जागा लहान वाटत होती,पण जमीनीऐवजी फरशी,नळाला येणारं पाणी, कोळशाची शेगडी याचं आपल्याला कौतुक होतचं की. तसच गुळगुळीत फरशा, स्वतंत्र झोपायच्या खोल्या, बाथरुममधल्या टाईल्स, भिंतीतली कपाटे याचं सुनंदाला अप्रुप वाटल तर त्यात तिची काय चूक? आपण सासुबाईंशिवाय राहण्याची कल्पनाच केली नाही कधी कारण त्याकाळी असा विचार मनातच येत नव्हता आता सुनंदेच्याच जावा राजा-राणी सारख्या स्वतंत्र राहतायत मग तिलाही तसं वाटल तर त्यात काय नवल? सुनंदाच्या बाजूने बघितले तर तिचेही बरोबरच होते असं त्यांना जाणवलं तसं त्यांनी ठरवल, निवांतपणे राघवशी बोलूया, गोडीत आहेत तोवर त्यांनाही वेगळ राहूदे, आम्ही दोघे राहू या जुन्या जागेत. अडीअडचणीला येऊ जाऊ एकमेकांकडे. गणपती तेवढा इथेच बसवू त्यावेळी सगळी एकत्र जमत जाऊ. ही जागा सोडणे आम्हाला शक्य नाही. आबा गेले तरी त्यांच्या पत्नी आता थकल्या होत्या , रमाबाई रोज दुपारी त्यांना ज्ञानेश्वरी वाचून दाखवायला जात. वयोमानामुळे डोळ्याने खूप कमी दिसे त्यांना. सगळं आयुष्य इथे गेल्याने या जागेबद्दलची माया वेगळीच होती. गोपाळरावांना तर वाटे इथे आल्यामुळेच आजचे दिवस दिसत आहेत. गोपाळराव मनाने हळवे,स्वभावाने गरीब. लहानपण आबांच्या आणि आईच्या धाकात गेल्याने आवाज चढवून बोलणं सुध्दा त्यांना कधी जमल नाही. राघवनं आग्रह केला तर त्याच्या नव्या जागेत जायला ते नाही म्हणू शकले नसते.पण तिथे रमलेही नसते. त्यामुळे त्यांच्या मनाचा विचार करता आपण दोघांनी या जागेतच रहायचं अस रमाबाईंनी मनाशी पक्क केल. गुरुवारी राघवला सुट्टी होती,सुनंदाला सकाळी शाळेत गेली होती. त्यावेळी रमाबाईंनी राघवजवळ विषय काढला.
 "तुम्हाला सोईची वाटत असेल अशी चांगली जागा बघा.आम्ही दोघे इथेच राहू"
"आई, तुम्हाला सोडून नाही रहायचं मला. तुम्हीही यायला हवच"
"असा हट्टीपणा करु नको राघव, अरे तुझं प्रेम काय दूर राहिल्याने कमी होणार आहे का? पण आमची हयात गेली या जागेत आणि माई आता थकल्या त्या मला सासुबाईंच्या जागी आहेत रे, त्यांना सोडून आम्ही नाही जाऊ शकत. घरं वेगळी असली तरी आबांच्या मुळे आज आपण इथे आहोत तेंव्हा तुझ्या बाबांना इथुन जाणे नाही सोसणार. तुम्ही रहा वेगळे, येत रहालच इथे. मनी आणि राजाला सोडून रहायला मलाही त्रास होईल थोडा , पण रविवारी आणत जाऊ इकडे. गणपती तेवढा इथेच बसवू त्यावेळी सगळी एकत्र जमत जाऊ, नाना आणि माधव नाही का येत तसचं "
बऱ्याच वेळानं राघवची समजूत पटली. पुढच्या पाच-सहा महिन्यात त्याने ब्लॉक बुक केला.नंतरच्या वर्षी वास्तुशांत करुन मंडळी नवीन जागेत रहायला गेली.

    रमाबाईंना सुरुवातीला जरा जड गेले.नातवंडाची माया वेगळीच असते, मनी त्यांच्य़ात जवळ झोपा्यची. राजाला आजीनेच कालवलेला भात लागायचा. शाळेतुन आली कि मुले आजीच्या भोवतीच असायची. रविवारी मनीला सुनंदाला तेल लावून न्हावु घालायचे, आता अगदीच रिकामपण आले. त्य़ांची मोठी ताई गावातच होती पण दहा माणसांच्या सासरच्या गोतावळ्यात तिचं माहेरी येणं होतच नसे. तिचे सासुसासरे वारले. दिर वेगळे राहू लागले. तिला जरा निवांतपणा आला.ती अधुनमधुन रमाबाईंकडे येऊ लागली. बाकी वाड्यात लोकांची वर्दळ असेच. बिऱ्हाडांमधे एकोपा होता म्हणून गोपाळराव आणि रमाबाईंना एकाकी कधी वाटलच नाही. दुपारी रमाबाई ज्ञानेश्वरी वाचायला आबांच्या माईंकडे जाऊन येत. देवळात चांगले किर्तन असले कि माईंना घेऊन त्याही गोपाळरावांबरोबर देवळात जात. वाड्यात कुणाला मोदक शिकव, कुणाला लोणचं घालू लागायला जा.असा त्यांचा वेळ जाई. गोपाळरावांचा दिनक्रमही ठरलेला होता.पहाटे सारसबागेच्या गणपतीपर्यंत फिरुन याय़चे. येताना मंडईत चक्कर मारुन भाजी आणायची .अंघोळ करुन यथासांग पुजा कराय़ची.जेवण झाल्यावर दुपारी वामकुक्षी घ्यायची.मग देवळात किर्तन,प्रवचन ऐकायला जायचे.संध्याकाळी थोडे समवयक्सांबरोबर गप्पा. रात्री ८ वाजता जेवण,मग वाचन आणि झोप असा नेमस्त दिनक्रम चाले. बॅंकेची कामे, बाजारहाटही ते करत. २-३ महिन्यातुन एकदा दोघे ताई आणि माईकडे चक्कर मारुन त्यांची खुशाली बघुन येत. माधव ,राघवकडेही जात. नातवंडाना सुट्टीत घरी घेवुन येत. त्यांना मंडईतुन फळे आणणे. खाऊ करण्य़ासाठी सामान आणून देणे हि कामे हौसेने करीत. माधवने त्यांना फोनही घेवुन दिला. त्यामुळे रोज नातवंडाशी बोलणे होवु लागले. नानाची खुशाली समजु लागली. एकूण उभयतांचा वाड्य़ात राहुन वानप्रस्थाश्रम चालू होता.

    अशी दहा-पंधरा वर्षे गेली. कष्टाची शरीरे म्हणून बराच काळ तग धरुन राहिली.पण शेवटी वय होणारच. गोपाळ रावांच्या तब्येतीच्या तक्रारी वाढू लागल्या. प्रत्येक ऋतुबदलाला सर्दी-खोकला सुरु होई तो लवकर बरा होत नसे. खोकताना दम लागे. रात्र-रात्र बसून काढावी लागे,मग दिवसा फार अशक्तपणा येई.जेवण खूप कमी झाल. रमाबाई सतत गरम पाणी देत. गवती चहाचा,आडुळशाचा काढा देत. राघव गुरुवारी आला कि बाबांना डॉक्टरकडे घेवुन जाई,औषधे आणून ठेवी.पण एकूण प्रकृती तोळामासाच झाली होती. यंदाच्या थंडीत गोपाळरावांच्या आजाराने उचल खाल्ली. फॅमीली डॉक्टरांनी आजाराच्या गांभीर्याची कल्पना राघवला दिली. त्यांनी गोपाळरावांना हॉस्पीटलमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला. जवळच्या चांगल्या हॉस्पीटलमध्ये गोपाळरावांना दाखल केले. नाना मुंबईहुन आला. माधव,राघव ,नाना आणि दोनही जावयांनी रात्री राहण्याच्या वेळा ठरवुन घेतल्या. ताई आईच्या सोबत राहायला आली.सुना-मुली डबे देवु लागल्या. वाड्यातली मंडळी आलटुन पालटुन गोपाळरावांना भेटायला जावु लागली. रमाबाई दिवसभर त्यांच्याजवळच असत. रात्री मोठ्या मुश्किलीने मुले त्यांना घरी पाठवित.
"आई, तुला विश्रांती घ्यायलाच हवी, रात्रीची झोप स्वस्थ झाली कि दिवसभर तू इथे बसू शकशील, नाहीतर तू आजारी पडशील ना"
" बर बाबांनो, पण तुम्ही दिवसभर कामावर जाता, तुम्हाला नको का विश्रांती? मला घरी तरी कुठे झोप येणार आहे? तिथे पडायचं तर इथे पडले असते"
" नको आई, रात्री काही औषधं लागली, काही लागल, तर आम्ही इथे असलेलं बर, ते आमचे पण बाबा आहेतच ना, थोडा त्रास आम्हाला झाला तर काही बिघडत नाही, मुळात आम्हाला तो त्रास वाटातच नाही आजवर त्यांचं काहीच कराव लागल नाही आम्हाला"
" ठिक आहे, तुम्ही म्हणाल तसं. ताई आहे घरी सोबतीला, राहिन मी घरी "
येते , येते बरका असं चार चारदा गोपाळ रावांचा हात हातात घेत रमाबाई म्हणत आणि जड पावलांनी ताई बरोबर घरी येत. आल्यावर दोघी जुन्या आठवणी काढत बोलत बसत. ताई  रमाबाईंना जेवायला लावी. अधुनमधुन फोन करुन बाबांच्या तब्येतीची खबर घेई.
गोपाळरावांची नोकरी फार मोठी नव्हती, त्यांच्याजवळ पुंजी ती केवढी असणार पण दोघांनी आजवर कुटुंबासाठी आणि परिचितांसाठी केलेल्या चांगुलपणाची ठेव मोठी होती, त्यांच्या आजारपणात ती कामी आली. लेकी सुना मुलगे जावई तर होतेच त्यांच्या सेवेला पण वाड्यातले शेजारी, आबांच्या घरातले सगळे हॉस्पीटल मधे जात.रमाबाईंना धीर देत. पैशाची काळजी करु नका असा आबांच्या नातवाचा निरोप तर गोपाळरावांना हॉस्पीटल मधे ठेवल्यादिवशीच आला. माधवने हॉस्पीटलमधे स्पेशल खोली घ्यायला लावली होती.सगळ्यांच्या मायेने आणि आस्थेने गोपाळरावांना भरुन येत होते. तुम्हा साऱ्यांना माझ्यामुळे किती त्रास असं ते भेटायला आलेल्यांना वारंवार म्हणत.

    दवाखान्यात ठेवुनही म्हणावी तशी त्यांच्या प्रकॄतीत सुधारणा नव्हती. पाच-सहा दिवसांनी तर गुंतागुंत वाढू लागली. अन्न जाईना, श्वास घेणे त्रासदायक होवु लागले. डॉक्टरांनी त्यांच्या मुलांना गोपाळरावांची अखेर जवळ आल्याची कल्पना दिली. गुरुवारचा दिवस होता. रमाबाई गोपाळरावांच्या जवळ जप करत बसलेल्या होत्या. रात्रीचे आठ वाजून गेले होते. ताई आणि तिचे यजमान गोपाळरावांसाठी गरम पेज घेवुन आले.रमाबाईंनी त्यांना ती भरवली.तिन्ही मुलगे जवळच होते. धाकटी माई पण आली होती. रमाबाईंना घेवुन ताई घरी जायला निघाली.त्या दोघींना भावांनी डॉक्टरांशी झालेल्या बोलण्याबद्दल काही सांगितले नव्हते. गोपाळरावांचा निरोप घेवुन रमाबाई निघाल्या. दोघी घरी आल्या. ताईने रमाबाईंना जेवायला बसविले.
"नको गं , आज भूक नाही, खावस वाटतच नाही बघ"
"आई, असं नको करु, घासभर भात खा, गरम सार केलय बघ अमसुलाचं , बाबांनाही पेजेत घालून दिल त्यांच्या तोंडालाही चव आली"
बळेबळेच दोघी जेवल्या. ताईने मागच आवरल.बाहेरच्या खोलीत कॉटवर रमाबाई आडव्या झाल्या. ताईने खाली अंथरुण घातलेलं होत
मध्यरात्र होवुन गेली असावी. ताईचा जरा डोळा लागला होता. रमाबाई गादीवर उठुन बसल्या आणि बोलायला लागल्या.
" इतका त्रास होतोय का जीवाला, मग नका हो सहन करू ! माझीच काळजी वाटतीय ना? राहिन मी एकटी , आणि एकटी तरी कुठे, मुलं आहेत ना आपली? माई आहेत तोवर इथे राहिन मग पुढच पुढे बघू.तुम्ही माझी चिंता नका करु. मला नाही करमणार तुमच्या शिवाय, पण आपल्या हातात काय आहे? जिवाची उलघाल नका करु हो.नाही सहन होत तुमची तळमळ, मला बोलावणं आलं कि मी येइनच तुमच्याकडे"
ताई उठून बसली, आई काय बोलतीय तिला कळेचना, आईला कसला भास झाला कि झोप नसल्याने काही त्रास होतोय अशा विचाराने ती आईजवळ गेली.
"आई, काय होतय तुला, कुणाशी बोलत आहेस, स्वप्न पडल का ग?"
" स्वप्न पडायला झोप लागायला हवी ना, काही नाही पड तू"
तेवढ्यात फोन वाजला ताईने फोन घेतला
"हॅलो, ताई , बाबा गेले गं आत्ताच खुप प्रयत्न केले सगळ्या डॉक्टरांनी पण काही उपयोग नाही झाला शेवटी थोडावेळ तळ्मळ झाली आणि मग सगळेच शांत झाले. मी ,नाना आणि माधवला पाठवतोय पुढे आईला कसं सांगायच बघ नाहीतर ते दोघे आल्यावर सांगा तुम्ही" एवढे बोलून राघवने फोन ठेवला.

 फोन ठेवुन ताई वळली.तिच्या भरलेल्या डोळ्याकडे बघत रमाबाई म्हणाल्या
"गेले ना हे, तेच सांगत होता ना फोनवर राघव ? अत्ता माझा निरोप घेवुन गेले. त्यांच्याशीच तर बोलत होते.
"असं काय म्हणतेस आई, तुला भास होतोय, मी डॉक्टरांना बोलवु का?"
" नको, भास नाही, काही नाही, अगं साठ वर्ष झाली आमच्या संसाराला. पंधरा वर्षाची असताना आले या घरात. कधी मला एका शब्दानं दुखवलं नाही त्यांनी. दुखल खुपल न सांगता समजत एकमेकांच आंम्हाला.मला सांगितल्याशिवाय देवळात पण गेले नाहीत कधी तर एवढ्या मोठ्या प्रवासाला जाताना निरोप घेतल्याशिवाय़ कसे जातील? जीव तळमळत होता गं त्यांचा. माझ्यात अडकत होता त्यांचा प्राण,म्हणून मीच समजुत घातली अखेरी. आपलं माणूस आपल्याला नको असतं का? पण शेवटी त्या कुडीत त्रास होत होता त्यांना. मग माझ्या स्वार्थासाठी त्यांना कशाला यातना सोसायला लावु ? ज्ञानेश्वरीत सांगितलय ना वस्त्र जुने झाले कि ते टाकुन नवे वस्त्र आत्मा धारण करतो. म्हणून मी त्यांना सांगितले माझी चिंता करु नका. तुम्ही जा .माझी वेळ आली कि मी येईन."

आईची समजुत कशी घालणार असा प्रश्ण सगळ्याच मुलांना पडला होता. पण तिच्या अलौकिक प्रेमाच्या ताकदीने तिने स्वतःच आपल्या पतीला निरोप दिलेला होता. यमाच्या दारातुन पतीचे प्राण परत आणणारी सावित्री जितकी मोठी तितक्याच आपल्या मायापाशात अडकून यातना सोसणाऱ्या पतीला माझी काळजी करु नका असे सांगुन मुक्त करणाऱ्या रमाबाई मोठ्या.

No comments: