Friday, December 6, 2013

मी मायक्रोवेव्ह ओव्हन घेते

 लहानपणापासून मला खाण्याची खूप आवड. तरेतऱ्हेचे खाद्यपदार्थ मोठ्या चवीने खायची हौस. त्यातही गोडाच्या जेवणाची तर फारच आवड. रोज जेवणात गोड पदार्थ लागायचाच.अगदी गुळांबा,साखरांब्यापासून काहीच नसेल तर तूप साखर पोळी तरी लागेच मला. मात्र स्वयंपाक करायचा तेवढाच कंटाळा. घरात आई करायला भक्कम होतीच, आजीचाही मुक्काम असे, मोठी ताई होती त्यामुळे माझ्यावर कामाची वेळ येत नसे आणि आली तरी टाळण्यात मी तरबेज होते. काम न करण्यावरुन मी आईची खूप बोलणी खायची. आजीला फक्त विश्वास होता, "मनात आणल तर ती इकडचा डोंगर तिकडे करेल"  असे ती माझ्या वतीने आईला सांगायची. " हो,पण तिच्या मनात यायच कधी?" चिडून आई विचारी. "येईल गं, वेळ आली कि सगळं करेल ती, बघशील तू" असं समजावत ती मला खेळायला किंवा वाचायला पाठवुन देई.

    चांगली आठवी-नववीत जाईपर्य्ंत  चहा देखील केलेला मला आठवत नाही. नववीत असताना शाळेत आंम्हाला ’कार्यानुभव’ असा विषय होता त्यात एका सहामाहीला ’बेकरी’ नावाचा विषय होता. दुपारच्या तासांना बाई केक, ब्रेड, नानकटाई अशा विविध चविष्ट (आणि त्याकाळी आम्हाला अप्रुपाच्या वाटणाऱ्या) पदार्थांच्या कृती(आजच्या भाषेत रेसिपीज) लिहून द्यायच्या. त्यानंतर मुलींचे गट पाडून हे पदार्थ करावे लागत, त्यासाठी लागणारे सामान शाळेकडून मिळत असे. एखाद्या दक्ष गृहिणीच्या वेषात बाई प्रत्येक गटाला नीट मोजून सामान देत आणि कृतीत दिल्याप्रमाणे नीट करा, वाया घालवू नका अशी समज देत. आमच्या गटात काही मुली भलत्याच हौशी होत्या, अभ्यासात त्या थोड्या मागे होत्या, मग आमच्यात एक गुप्त करार झाला, या तासाचे काम त्यांनी करायचे त्याबदली त्यांना गृहपाठाच्या वह्या आम्ही द्यायच्या. मग काय कार्यानुभवाच्या तासाला आमचा तीन चार जणींचा उनाड ग्रुप गप्पा मारत बसायचा. तयार झालेला पदार्थ आम्हांलाही खायला मिळेच, कधीकधी बाईंची बोलणी पण खावी लागत. पण सगळ्यांनी तेथे गर्दी करण्याने होणाऱ्या गलक्यापेक्षा आमचे गप्पा मारणे बाईंनाही सोईचे ठरे. शेवटी परीक्षा आली, आम्हा प्रत्येकीला एक पदार्थ घरुन करुन आणायला सांगण्यात आले. वार्षिक परीक्षा, पास होणे अनिवार्य. मला केक करायचा होता. आईने त्यात अंडे असल्याने पूर्ण असहकार दाखवला , (शिवाय तिला वाटले असेल ,’बरी सापडली,आता न करुन सांगते कुणाला?’ ) शेवटी वही उघडली, त्यात लिहिलेले साहित्य, अंडे सोडून बहुतेक गोष्टी घरात होत्याच, वहित वाचून सगळे जसेच्या तसे केले, मातोश्री स्वयंपाकघरात आल्या देखील नाहीत. तयार केलेले मिश्रण एका सपाट बुडाच्या पितळी भांड्यात(आईच्या भाषेत त्या भांड्याचे नाव लंगडी होते) घातले, गॅसवर एक तवा ठेवला त्यावर ती लंगडी ठेवली वरून झाकण ठेवले, तव्यावर थोडी वाळू पसरली होती. वहीत लिहिल्याप्रमाणे साधारण तीस-चाळीस एक मिनिटांनी गॅस बंद केला, घरभर केकचा खमंग वास सुटला होता, केक चक्क सुंदर फुगलाही होता.पण तो खाता येत नव्हता कारण शाळॆत दाखवायला न्यायचा होता. दुसऱ्या दिवशी शाळेत नेवुन दाखवला, चांगले मार्क मिळवले.  तो घरी आणून कधी खाऊ असेच झाले होते मला आणि माझ्या धाकट्या बहिणीला. वडीलांनी , मोठ्या बहिणीने माझे खूप कौतुक केले, आजीनेही ’बघ, मी म्हटल नव्हतं मनात आणल की ती सगळ करते ’ या विधानाची खात्री झाल्याबद्द्ल शाबासकी दिली. आई म्हणाली," जमलयं तुला पण करत जा असच नेहमी, ....." पण इतके होवुनही आपल्याला वहित वाचून पदार्थ करता येतो हा विश्वास वाटल्याने पुन्हा मी त्या वाटेला फारशी कधी गेले नाहीच.

    ’मराठीने केला कानडी भ्रतार’ अशी माझी गत होती.सासर कन्नड असल्यामुळे तिकडच्या स्वयंपाकाच्या रितीभाती इकडच्यापेक्षा अगदीच वेगळ्या. माझी पाटी कोरी असल्याचा मला फायदाच झाला. माझ्या सासुबाई खूपच सुगरण होत्या, सगळ्या प्रकारचे पदार्थ करायची आणि लोकांना खाऊ घालायची त्यांना हौस होती, मी  नोकरी करत होते. पण मी शिकण्याचे धोरण धरले,त्यांनी पण कौतुकाने मला इडली-डोशापासून सार,सांबार,नारळाच्या पोळ्या आणि मंगळूरकडचे खास पदार्थ ही शिकविले. मराठी मुलींना स्वयंपाक जमत नाही असा आपल्यावर बट्टा येवू नये या मराठीच्या अभिमानापोटी आपल्याला सगळे आले पाहिजे या हेतूने का होईना मी सगळे शिकले आणि नकळत स्वयंपाकाच्या पाशात गुरफटले. तरी टि.व्ही वरील शो बघून ,किंवा मासिक-पुस्तक वा वर्तमानपत्रातील पदार्थ वाचून करुन बघण्याची सवय मला अजूनही लागलेली नाही. पण सुदैवाने (कि दुर्दैवाने?) माझे पदार्थ फारसे कधी बिघडले नाहीत. लाडवाचा पाक असो, कि पोळीचा गूळ मला जमतो, तिळगूळाची मऊ वडी खुसखुशीत होते आणि कडक वडी कुरकुरीत बनते,चिरोट्याला पापुद्रे सुटतात, पुरणपोळीही न तुटता तव्यावर चढते. मोदकाची उकड छान होते.थोडक्यात सुगरण म्हणावे इतपत सगळे जिन्नस मला करायला येतात. माझ्या सासुबाईंना याचे श्रेय जाते कारण त्यांनी योग्य मापात मला पदार्थ शिकविले. माझी आईदेखील सुरेख स्वयंपाक करायची पण तिला विचारले तर तिला कधीच प्रमाण सांगता यायचे नाही. अंदाजानेच ती सगळे घेत असे आणि चव न बघता सुध्दा तिचा पदार्थ चविष्ट होत असे, शिवाय कधीही तिच्या भाजी आमटीची चव बदलत नसे. तिला नेहमीच किमान १०-१५ लोकांचा स्वयंपाक करावा लागल्याने तीन -चार जणांचे माप तिला सांगता येत नसे. स्वयंपाकाची सवय झाल्यानंतर मी देखील अंदाजानेच सगळे करु लागलीय आणि मला पण कुणाला चटकन मापाने सांगायला येत नाही आता.
एकंदरीत माझी मुळ प्रवृत्ती ’सुगृहिणी’ नव्हती. मात्र अंगावर पडलेले काम मनापासून, आनंदाने करण्याची वृत्ती असल्याने मी स्वयंपाक करते. तो सगळ्यांना आवडतो. आले-गेले,पै-पाहुणे ,नातलग माझ्या पदार्थांवर खुष असतात .कुणालाही तोंडदेखले चांगले न म्हणणाऱ्या स्पष्ट्वक्त्या माझ्या आईने मला चांगला स्वयंपाक करतेस असे प्रशस्तीपत्रक दिले यातच सगळे आले. माझ्या मुलींना मी केलेले पदार्थ आवडत असल्याने मी नवनवे पदार्थ शिकत गेले , करुही लागले. अगदी चायनीज, पंजाबी , इटालियन असे वेगावेगळे प्रकारही जमु लागले. शेवटी कुठल्याही पदार्थातील घटकांचे प्रमाण योग्य पडले आणि तो नेमकेपणाने शिजला कि चव चांगली होणारच. हल्ली मिक्सर, फुड प्रोसेसर,इलेक्ट्रिक रगडा अशा विविध साधनांच्या सहाय्याने पदार्थ करणे खरोखरीच खूप सोपे झालेले आहे.  या आधुनिक साधनांमुळे कुठलाही पदार्थ सहज होवु शकतो. खलबत्ता,पाटा-वरवंटा,उसळ-मुसळ,जाती अशी साधने वापरुन चुली शेगड्यांवर जमीनीवर बसुन रुचकर स्वयंपाक करणाऱ्या पूर्वीच्या बायकांची आणि त्यांच्या शारीरिक कष्टांची कमालच वाटते.

     माझ्या सासुबाई फारच हौशी होत्या त्यांनी सगळ्या प्रकारची अनेक भांडी, मिक्सर, इलेक्ट्रिक रगडा ,ओव्हन सगळे जमा केलेले होते. माझ्या लग्नानंतरही स्वयंपाकघरात त्यांचेच राज्य असल्याने नवीन काही उपकरण बाजारात आले कि ते घेण्याकरीता त्या त्यांच्या मुलाच्या मागे लागत आणि वस्तू घरात आली कि त्याचा वापरही केला जाई. सोलर कुकर असाच आला.मग गच्चीवर त्यात दाणे भाज, भाजणी भाज सुरु झाले.सुट्टीच्या दिवशी वरण,भात ही बनु लागला. त्याला लागतात म्हणून बाहेरुन काळे असणारे ऍल्युमिनियमचे डबे आले. त्यात केक करुन झाला, ढोकळा करुन झाला. मग दरवेळी गच्चीवर जाणे, उन फिरेल तसे कुकर फिरवणे या गोष्टी त्रासदायक होवु लागल्या आणि त्याचा वापर थांबला. कुठल्याही प्रकारच्या लाह्या बनवणारे एक मशीनही आणले होते त्याचा ही तोच प्रकार,नव्य़ाची नवलाई संपली की वस्तू पडायची अडगळीत.  आणलेले कुठलेच भांडे टाकायचे नाही या मायलेकांच्या तत्त्वाने मला तो पसारा आवरणे फार मुश्किल होवुन जाई. जुना मिक्सर देवुन नवीन आला, फुडप्रोसेसर आला, जुना रगडा जावुन ओट्यावर बसणारा लहान रगडा आला. स्वयंपाकघर भांड्य़ांनी अगदी ओतप्रोत भरुन गेले आहे.

    यातच काही वर्षांपुर्वी ’मायक्रोवेव्ह’ नामक चीज बाजारात आली. सासुबाई या जगात नव्हत्या. मी त्या वस्तूबद्दल अजिबात स्वारस्य दाखवले नाही. मैत्रीणींकडे, बहिणींकडे मायक्रोवेव्ह आले.त्यांचे फायदे, गुणगानही कानावर येवु लागले. नवऱ्याने तुला हवा असल्यास सांग घेऊन टाकू अशी उदार ऑफर  दिली पण माझा निर्धार कायम होता.एक तर तो ठेवायला जागा लागणार, पुन्हा त्यात ठेवायची भांडी वेगळी म्हणजे पुन्हा ती घ्या. शिवाय त्याकरीता काचेची किंवा चांगल्या दर्जाच्या प्लॅस्टीकची भांडी लागतात असे कळले, ती भांडी कामवालीला घासायला देता येणार नाहीत म्हणजे आपलेच काम वाढवा. नकोच ते. म्हणून बरीच वर्षे मी या नव्या उपकरणापासून निग्रहाने दूर राहिले.

    माझ्या धाकट्या मुलीचे खाण्यापिण्याचे फार नखरे. तिला गरम पदार्थ खायची आवड. सकाळची पोळी रात्री नको म्हणेल पण करुन देवु का विचारलं तर तव्यावरची ताटात असेल तर दोन पोळ्या आवडीने खाणार. खायला काही करुन ऑफिसला गेले कि ती कॉलेजमधुन आली तरी खाणार नाही कारण  ते गरम नव्हते. मग तिच्या सगळ्या मैत्रीणींकडे कसे मायक्रोवेव्ह आहेत, त्या कशा गरम करुन घेतात याची मला सतत वर्णने ऐकवू लागली. वडीलांनाही तिने आपल्या पार्टीत ओढले. मायक्रोवेव्ह वापरल्याने वेळ किती वाचतो हे पण मुली मला सांगू लागल्या, त्यात पदार्थ कसे कमी तेला तुपात होतात म्हणून ते अन्न किती हेल्दी आहे , हे पण सुनवू लागल्या. माझा मनोनिग्रह हळूहळू ढळू लागला. मी पण आजुबाजुला मायक्रोवेव्ह बद्द्लची माहिती गोळा करु लागले. त्यात पोळ्या सोडून बाकीचे सगळे पदार्थ काही सेकंदात होतात असे सगळीकडून समजू लागले. त्यात साबुदाण्याची खिचडी कशी सुरेख होते, खोबऱ्याच्या वड्या कशा खमंग होतात. चिवडा किती झट्पट होतो. केक कसा मिनिटात होतो इथपासून ते मनात यायचा अवकाश मायक्रोवेव्ह मधे पदार्थ तयार होतो इथपर्य़ंत त्याचे वर्णन ऐकल्यामुळे  अशा जादु-ई-उपकरणापासून इतकी वर्ष वंचित राहिल्य़ाने माझे कित्ती नुकसान झालयं असं मला वाटू लागलं. घरात असलेल्या कित्येक काचेच्या भांड्यावर ’मायक्रोवेव्ह’ मधे वापरता येतील अशी सूचना असल्याने मुलींनी आई भांडी नाही घ्यावी लागणार असे सांगितले. मग मायक्रोवेव्हचा शोध सुरु झाला, शोध म्हणण्यापेक्षा सर्वेक्षण ( मराठीत सर्व्हे ! ) सुरु झाला. बाजारात अनेक कंपन्यांचे विविध मायक्रोवेव्ह उपलब्ध होते. विचारावे त्या प्रत्येकाकडे आणखी वेगळ्याच नावाचे असत. शेवटी मुली आणि त्यांच्या वडीलांनी बऱ्याच चौकशा करुन एक भलामोठा मायक्रोवेव्ह ऑर्डर केला. दुसऱ्याच दिवशी तो घरी आला आणि ओट्यावर स्थानापन्नही झाला. पण त्याचा डेमो दाखवायला येणारा माणूस त्याच्या सवडीने येणार होता. त्यामुळे दोन-तीन दिवस त्याच्याकडे बघण्यातच समाधान मानणे चालू होते. एके संध्याकाळी कंपनीचा माणूस डेमो दाखवायला आला. त्याने भराभर बटणे दाबून ,मायक्रोवेव्ह,ओव्हन,ग्रील मोड. कुठल्या मोडवर कोणते भांडे, कसे किती वेळ ठेवायचे हे धडाधड सांगितले.
"भाजी शिजायला किती वेळ लागतो?" माझा बेसिक प्रश्ण
" ते कोणती भाजी आणि किती क्वांटीटी त्यावर अवलंबुन आहे"
"पण इथे तर तुम्ही आधीच टायमिंग सेट करायचं म्हणता ना, मग किती वेळ ठरवायचा?"
" ठरवा तुमच्या अंदाजानं , मधेच स्टॉप करुन बघायचं, आणि मॅडम याच्यासाठी स्पेशल क्लास आहेत त्याचा नंबर देतो मी तुम्हाला. तो क्लास अंटेंड करा, सगळं समजुन जाईल बघा. निघतो मी, सही करा या पेपर्सवर"
मला जास्त बोलू न देता सही घेऊन आणि त्या क्लासचा नंबर देवून तो मुलगा निघुन गेला.
मुलीने मॅन्युअल वाचून पापड वगैरे भाजुन बघितले.
त्या क्लासच्या वेळा माझ्या वेळांशी जमत नसल्याने थोरल्या मुलीने मी जाईन असे जाहीर केले. मी ही तिने आपण होवुन जबाबदारी घेतल्यामुळे खुष झाले. पण तिचाही जाण्याचा मुहुर्त येईना . हळूहळू त्या बंद यंत्राकडे बघुन त्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे या विचाराने आपणच सुरुवात करायचे ठरवले. नाही म्हटले तरी दोन-आडीच दशकाचा स्वयंपाकाचा अनुभव गाठीशी होताच. मुलींचे दुध गरम कर, पाणी गरम कर अशी सुरुवात केली. साबुदाण्याची खिचडी त्यात कराय़ची होती, पण तेवढे मोठे काचेचे वा प्लॅस्टिकचे भांडे माझ्याकडे नव्हते मग बटाटे त्यात उकडायचे ठरवले. पाण्यात बटाटे घालुन ३ मिनिटे सेट करुन ठेवले. तीन मिनिटे झाल्याबरोबर बझर वाजु लागला, भांडे बाहेर काढले.पाणी उकळत होते.बटाटे काढले सोलायला घेतले तर फारच जाड साल निघू लागली.सालीला बराच बटाटा गेला. नणंद म्हणाली ,’सालं काढुन बटाटे ठेवायचे असतात’, बहिण म्हणाली ’पाणी न घालता ठेवले तर सालं पातळ निघतात’  एकूण बराच बटाटा वाया घलवुन खिचडी गॅसवर केली. मोठी मुलगी  नाश्ता करायला उशीरा आली. तिला खिचडी गरम करुन देण्याकरीता काचेचा बाउल शोधला,आणि त्यात खिचडी घालुन मायक्रोवेव्ह मधे गरम केली,बाऊल गरम झाला म्हणून ताटलीत काढायला गेले तर बाउलच्या आकाराची खिचडीची मुद तयार झाली होती! सगळा साबुदाणा चिकटुन गोळा झालेला बघुन ती माझ्यावर भडकलीच.
"हे काय केलय? "
"खिचडीच आहे गरम केली आत्ताच मायक्रोवेव्ह मधे"
"कुणी सांगितल होतं तुला गरम करायला? मला नको तो गोळा, तूच खा थंड खिचडी उरली असली तर मी खाते"
मग ती खिचडी कशी ,किती वेळ कुठल्या भांड्यात ठेवायला हवी होती यावर  तिघांनी माझे बौध्दिक घेतले.
भाज्या उकडायला ठेवाव्या म्हटल, तर कधी कमी शिजत, थोडा जास्त वेळ लावावा तर पार शिजुन काला होई.
एकदा  बरेच पाहुणे येणार होते, इडली सांबार करायचे होते.सांबारच्या सगळ्या भाज्या चिरुन पटकन शिजाव्या म्हणून प्लॅस्टिकच्या डब्यात पाणी घलुन ठेवल्या, बाकीच्या कामाच्या नादात बझर झाल्यावर मेन स्विच बंद करुन ठेवले,कुकरमधली डाळ शिजली होती, फोडणी करण्यापूर्वी भाज्या बघाव्या म्हणून मायक्रोवेव्ह उघडला आणि डोक्याला हात लावला....
डब्याचे झाकण वितळले होते आणि आतले पाणी कोमट देखील झाले नव्हते ! गुपचूप झाकण कचरापेटीत फेकले आणि पारंपारिक पध्द्तीने सांबार करायला घेतले.
पुन्हा सगळ्यांनी तुझे कसे चुकले असेल यावर माझी खरडपट्टी काढलीच. एव्हाना काही प्लॅस्टिकच्या ताटल्यांचे द्रोण झाले,  काही काचेच्या भांड्य़ांना तडे गेले, शेंगदाणे करपले आणि दर वेळी मी आरोपीच्या पिंजऱ्यात.मी चुकीचे भांडे, चुकीचे ऑप्शन, चुकीचे टायमिंग लावल्याचे सिध्द झाले. 

    या मायक्रोवेव्हचे मी काय घोडे मारले? का दर खेपेला काही करायला जाव तर माझा पचका होतोय या विचाराने मला अगदी बेचैन करुन सोडले.विचार करता करता बऱ्याच गोष्टींचा उलगडा होवु लागला. आजवर रामायण,महाभारत पुराणे,इतिहास यांत ’गर्वहरणाच्या’ अनेक गोष्टी वाचल्या होत्या. आपल्याला चांगला स्वयंपाक विनासायास करता येतो असा मला गर्व झाला असेल, त्यामुळे माझे गर्वहरण करण्यासाठी मायक्रोवेव्हची योजना झाली असावी. चूल,बंब,स्टोव्ह या सा्धनांशी माझा अगदीच संबंध आला नाही असे नाही. भोरच्या आमच्या घरी किंवा माझ्या माहेरी देखील चूल,बंब यावर मी पाणी तापवले आहे. माझ्या मंगळूरच्या सासऱच्या घरी चुलीवर इड्ल्या आणि तांदळाचे अनेक प्रकार शिजवले आहेत. गॅसवर  स्वयंपाक करण्यात तर हयात गेलीच. एकूण माझे आजवरचे आयुष्य आणि हि साधने यात साम्य होते. ते म्हणजे कुठल्याच पूर्वनियोजना खेरीज  आयुष्य येत गेले तसं मी जगत गेले. या साधनांमधुन पदार्थ करताना त्याच्याकडे शिजताना बघत बघत तो होत असे.पदार्थ किती वेळात होईल ते आधीच ठरवावे लागत नव्हते .आधीच पदार्थ बनण्याला किती वेळ लागेल हे निश्चित करायचे आणि त्याप्रमाणे सेटींग करायचे हे माझ्या जीवनशैलीला मानवणारे नव्हतेच. कुकरची शिट्टी झाली कि बारीक करुन गॅस बंद कर, वाफ आली कि भाजी शिजली समज. पोळी,भाकरी भाजलेली तर डोळ्याला दिसतेच. मायक्रोवेव्ह मधे आधी सगळे तयार करा त्याला किती वेळ लागेल हे तुम्हीच नक्की करा तसे सेटींग करा मग तेवढ्या सेकंदात पदार्थ बनेल,पण त्या काही सेकंदांसाठी आधी किती वेळ जातोय याचा हिशेब केलाच जात नाही, उगाच इतक्या सेकंदात अमुक होतं अशा जाहिराती !. मायक्रोवेव्ह मधल्या इड्ली स्टॅंड मधे एका वेळी लहान आकाराच्या आठ इडल्या होतात.घरातल्या चार मोठ्य़ा माणसांना सरासरी पाच इडल्या लागत असतील तर या वीस इडल्यांना मायक्रोवेव्ह मधे लागणारा एकूण वेळ आपल्या एकावेळी २४ इडल्या करणाऱ्या स्टॅंडपेक्षा कमी कसा असेल? कारण इडल्या जरी चटकन शिजल्या तरी झालेल्या काढून नव्या लावणे याला लागणारा वेळ दोन्ही कडे सारखाच.परत २४ इडल्यांच्या स्टॅंडवर एका झटक्यात १२ ते १५ मिनिटात इडल्या बनुन एकावेळी सगळ्यांना खायलाही मिळतात. मग मायक्रोवेव्हमुळे वेळ वाचला कुठे? भाजी आमटी त्यात करायची तर फोडणी गॅसवर करा, तिखट मीठ घालुन परतुन घ्या, पुन्हा काचेच्या भांड्यात घालुन मायक्रोवेव्ह मधे ठेवा.नंतर कढई,ते काचेचे भांडे सगळॆ पुन्हा घासा. त्यापेक्षा कढईत पडलं शिजत तर काय फरक पड्णार आहे? 
       
    सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मायक्रोवेव्ह घेतल्यावर आम्ही सगळे करु असे सांगुन मला पटवणाऱ्या मुली तो आणल्यावर माझ्यावर सोपवुन  नामानिराळ्या झाल्या.वर तुलाच कसं जमत नाही हे सांगुन पदोपदी इतरांकडे कसे सग्गळे मायक्रोवेव्ह मधे करतात हे सांगायला मोकळ्या. धाकटी तर दुध देखील त्यात गरम करुन घेत नाही. मुली माझ्यावर गेल्यात हे मी कबुल करते. मी सुध्दा त्यांच्या वयात स्वयंपाकघरात फिरकले नाही, पण माझ्या आईला काही शिकवायला गेले नाही आणि वेळ पडल्यावर मी सगळे केले. या बाबीचा देखील मला त्रास होत असेल . तो राग त्या यंत्रावर निघुन त्यात प्राविण्य मिळवण्याकरीता माझे प्रयत्न कमी पडत असतील. बरं सगळी दुनीया तो वापरुन त्याचं कौतुक करतीय म्हणून आपणही वापरायला धडपडायचे आणि दर वेळी काहीतरी वेगळेच निष्पन्न होईल कि काय या टेन्शनखाली रहायचे .

    एकंदरीत काय मायक्रोवेव्ह हा घरात असून अडचण ,नसुन खोळंबा या गटात मोडणारी चीज बनला आहे ! 

1 comment:

Gayatri said...

:)) झक्कास!