Tuesday, April 15, 2014

बदलत्या गृहरचना

तंत्रज्ञानाने सगळ्याच क्षेत्रात आपले हातपाय पसरले आहेत. नवनव्या सोयी-सुविधा बघताना डोळे दिपुन जातात. घरांचेच बघाना, कित्ती क्रांती झाली आहे बांधकाम शास्त्रात. खेडेगावातल्या ऐसपैस वाड्य़ांमधे जागेची मुबलकता होती,पण सोईचा विचार केलेला नसेच.पन्नास लोक जेवायला बसतील असे मोठे स्वयंपाकघर असायचे पण चुलीचा धुर जाण्याची व्यवस्था असेलच याची खात्री नसे. बसुन रांधायचे पण स्वयपांकाला लागणाऱ्या साधनांच्या जागा त्या अस्ताव्यस्त पसरलेल्या खोलीच्या चार भिंतीतल्या फडताळात असत. भांडी घासायची मोरी जवळ नसे आणि तेथेही बसुनच भांडी घासावी लागत. त्याचा एक फायदा म्हणजे स्वयंपाक करतानाच सर्वांगाला भरपूर व्यायाम होई. त्या काळी बायकांना स्वयंपाक हे एकच व्यवधान असे आणि खेड्यात तरी वेळेशी कुणीच फारसे बांधलेले नव्हते त्यामुळे काम लवकर आटपायचे असा आटापिटा नव्हता.

    शहरांमधे जागेची अडचण.चाळी आणि वाड्यांमधे लोकांच्या दोन-दोन पिढ्या सुखात नांदल्या.उभ्याचे ओटे,स्टोव्ह गॅस अशी साधने आली पण ती सोय म्हणून. लहान जागेत सामान मोजकेच. भांडी भरपूर असायची पण जास्तीची भांडी माळ्यावर असत आणि पाहुणे-रावळे आले कि ती बाहेर निघत कार्य उरकले कि परत जाग्यावर जात. शेजाऱ्यांकडून ताटे,वाट्या सर्रास आणली जात. मिक्सर,फ्रिज या वस्तू चैनीच्या समजल्या जात होत्या. गल्लीत एखाद्यांकडे फ्रिज असेल तर ती व्यक्ती श्रीमंत समजली जायची आणि कुणाचा ताप उतरत नसेल तर त्यांच्याकडून बर्फ मागणे उभयपक्षी गैर वाटत नसे.

    औद्योगीकरणानंतर पुण्याची चारी बाजुंनी वाढ झाली. फ्लॅट संस्कृती रुजू लागली. नव्वदच्या दशकात आय.टी क्षेत्रातल्या प्रचंड वाढीने तसेच शिक्षणसंस्थांच्या अचाट विस्ताराने पुण्याची वस्ती अफाट वाढली. वाडे पाडून तिथेही इमारती झाल्या .औंध,पाषाण,बाणेर,हडपसर,वाघोली,कात्रज,पिंपरी,चिंचवड अशा सगळ्या गावांचा महानगरपालिकेत समावेश झाला आणि सगळीकडे उपनगरे विकसित झाली. बांधकाम क्षेत्रातल्या विकासामुळे घरे अधिकाधिक सुंदर,सुखसोयींनी परीपूर्ण बनू लागली. जागांच्या वाढत्या किमतींमुळे बंगले बांधणे अवघड झाले,तसेच ज्यांचे बंगले होते त्यांनी सुध्दा ते बिल्डरला विकून अलिशान फ्लॅट घेण्याची फॅशन आली. वन रुम किचन सीनेमापुरते उरले. वन बी.एच.के ही फारसे नाही 2BHK, 3BHK यांच्याच जाहिराती जिकडे तिकडे बघायला मिळतात. दहा पंधरा बिऱ्हाडांमध्ये एकच संडास पासून घरातील प्रत्येक व्यक्तिसाठी स्वतंत्र टॉयलेट असा हा बदलाचा प्रवास आहे.

    सुरवातीच्या काळात इमारती दोन-तीन क्वचित चार मजली होत्या.कॉमन पार्किंग असे.प्रत्येक इमारत हि स्वतंत्र असल्याने त्याची स्वच्छता आणि सौंदर्य हे सभासदांच्या सहभागावर असे. हळूहळू पुण्यात बिल्डर्सनी मोठाले प्लॉटस घेवुन अनेक इमारतींच्या स्किम्स राबवायला सुरुवात केली.मग प्रत्येकाला स्वतंत्र पार्किंग, आतमधले पक्के रस्ते,मुलांना खेळायला बाग, एखादा लहानसा हॉल,स्विमिंग पूल, जिम अशा सुविधा पुरवायला सुरुवात केली आणि त्यामुळे त्या बिल्डर्स मधली स्पर्धा वाढत गेली.जागांचे भाव वाढत होतेच,उंच उंच इमारती बांधायला परवानगी मिळाल्याने एखादी मोठी स्किम म्हणजे लहानशा गावाइतकी  वस्ती होवु लागली. घर म्हणजे केवळ निवारा न राहता एक सौंदर्यस्थळ कसं होईल हे ठरायला आता या क्षेत्रातली प्रगती आणि ग्राहकाच्या हातातला पैसा दोन्ही कारणीभूत आहे.
   
    अशाच एका नव्याने सुरु झालेल्या एका स्किममधील सॅंपल फ्लॅट बघायचा योग आला.हल्ली हे देखील नव्यानेच सुरु झालयं. पूर्वी कागदावर, इमारत तयार झाल्यावर कशी दिसेल याचे फोटो फारतर बघाय़ला मिळत. आता एक तयार फ्लॅट असतो त्यावरुन तुम्हाला बांधकाम,रचना सगळ्याचीच कल्पना येते. तर असा सॅंपल फ्लॅट बघायला गेले.वास्तविक आता मला घर घ्यायचे नाही पण नवीन काय केलय ते बघू तरी म्हणून गेले. प्रवेशापासूनच स्वच्छता आणि सौंदर्याची प्रचिती येवु लागली शिवाय सुरक्षिततेची ही अतोनात काळजी ! आपला चेहरा दिसेल इतक्या स्वच्छ् आणि चकाकणाऱ्या जिन्याच्या संगमरवरी पायऱ्यावरुन चालणेही नको वाटत होते. वरती गेल्यावर आमच्या चपला काढून तेथे ठेवलेल्या चपला पाय़ात घालायची सूचना मिळाली. बंद दरवाज्याला लागून एक कॅमेरा त्यात आलेल्याचा चेहरा आत दिसणार ,व्यक्ती परीचितांपैकी असेल तरच दरवाजा उघडायचा. वर येणारी व्यक्ती सुरक्षा कर्मचाऱ्याने पाठवलेली असली तरी तिला आत प्रवेश मिळणे खातरजमा झाल्याखेरीज शक्य नाही. आत शिरतानाच आपल्या उंचीइतक्या आरशात स्वतःला न्याहाळित आत शिरलो. उजवीकडे प्रशस्त दिवाणखाना म्हणता येईल असा हॉल. त्यातले कोच,खुर्च्या सगळेच उंची वैभवाची साक्ष देणारे. चित्रपटगृहात शोभावा इतका मोठा टि.व्ही. आकर्षक अशा लॅंपशेडस्. हॉलच्या बाहेर प्रचंड मोठी बाल्कनी.तिचे क्षेत्रफळ ५५० चौ.फूट (इति आम्हाला जागा दाखविणारा एक्झिक्युटिव्ह). त्या बाल्कनीत बांधलेल्या चौकोनी खड्ड्यात लावलेली झाडेही सुरेख होती. एका कोपऱ्यात झोपाळा होता. कठड्याला पाण्याची कारंजी होती. हॉलला लागुन एक बेडरुम होती. ती सर्व फर्निचरने सुसज्ज होती त्यातही लहान टि.व्ही. छोटे टेबल,एक आरामखुर्ची. खोलीला लागुन बाथरुम त्यात अत्याधुनिक नळांची फिटींग्ज. हॉलमधुन दोन पायऱ्या चढून डायनिंग आणि स्वयंपाकघर होते.स्वयंपाकघरात मोठा ओटा त्याखाली भांडी ठेवण्याकरीता ट्रॉलीज, मोठा फ्रिज स्वयंपाकघराच्या मागे वॉशिंगमशीन आणि डीशवॉशर ठेवायला जागा शिवाय एक छोटी स्टोअररुम अर्थात साठवणासाठी खोली.शिवाय धुणं,भांडी करण्याकरीता छोटी बाल्कनी. हॉलमधुन वरती जायला एक देखणा जिना आणि वरती दोन बेडरुम्स. त्यामध्येही तसेच सुरेख फर्निचर. वुडन फ्लोरींग. सरकत्या दरवाज्याची कपाटे. भिंतीवर छानशा फ्रेम्स. मोठा आरसा असलेले ड्रेसींग टेबल. निवडून आणलेल्या लॅंपशेडस. वरच्या एका बेडरुममधुन खालचे सगळे दिसेल अशी मोठी काच आणि प्रायव्हसी हवी असेल तर त्यावर असणारी सरकती लाकडी फ्रेम. सौंदर्य,कलात्मकता याची पुरेपूर जाणीव करुन देणारी देखणी वास्तू शिवाय त्याचे आकारमान आणि वापरलेले उच्च प्रतीचे सामान बघुन केवळ श्रीमंतांनाच घेता येणे शक्य होणार हे कळतच होते.

    या अती सुंदर कलाकृतीत वैगुण्य शोधायाला मी काही कुणी वास्तुविशारद, किंवा इंटिरियर डिझायनर नाही. बांधकामशास्त्रातले तर मला काहीच ज्ञान नाही त्यामुळे त्यातल्या चुका मी काढु शकत नाही. पण  एकदोन गोष्टींची उणीव ठळकपणे जाणवली याला कुणी  ’कोल्ह्याला द्राक्षे अंबट’ असंही म्हणू शकेल. तरीही त्यांचा उल्लेख करावासा वाटतो. त्या विशाल वास्तुमध्ये ’देवघर’ किंवा देव ठेवण्य़ाकरीता कुठेही जागा दिसली नाही.सॅंपल फ्लॅट मधे त्यांनी नसतील ठेवले देव. पण देवाची स्थापना करण्याजोगी जागाही मला कुठे सापडली नाही. आपल्या निधर्मी देशात अशी अपेक्षा ठेवणे गैर मानावे तर हल्लीच्या दिवसात पूर्वीपेक्षा सगळ्या देवांचे सार्वजनिक पूजन आणि सगळ्या धर्मांचे सण इतक्या  जल्लोषात साजरे होताना दिसतात ते बघुन आस्तिक लोकांचे प्रमाण नक्कीच जास्त आहे मग देवाकरीता जागा का ठेवली नसेल?

    दुसरी महत्त्वाची गोष्ट त्या महान घरात पुस्तक ठेवायलाही एकही कपाट नव्हते. आजकाल इ-बुकचा जमाना आलाय आणि तुम्ही कुठे पुस्तकांच सांगताय असं कुणी म्हणेल.पण एवढ्या सुंदर बाल्कनीतल्या झोक्यावर चहाचा घोट घेत एखादं सुंदर पुस्तक वाचाव असं इथे राहणाऱ्याला वाटणारच नाही का? एखाद्या रात्री आपल्या मित्र मंडळींना बोलावुन काव्य वाचन,कथावाचन असं या घरात होणार नाही का? ( रात्रीच्या ड्रिंकपार्ट्यांकरीता बार मला त्या बाल्कनीत दिसला)

    देव आणि पुस्तके या कदाचित माझ्या मध्यमवर्गीय वृत्तीच्या आवश्यक गरजा असतील.शिवाय त्या सॅंपल फ्लॅट सारखे फर्निचर इतर फ्लॅट्स मधे असणार नाही.तेंव्हा असलेल्या मोकळ्या घरात प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार फर्निचर करायला मुखत्यार आहेच. पण सॅंपल फ्लॅट बनवताना बिल्डरने या गोष्टी विचारात घेतल्या नाहीत म्हणजे आजकाल त्यांचे महत्त्व तेवढे नाही असे तर नसेल? कदाचित तसे फ्लॅट घेणाऱ्यांना त्यांची आवश्यकता नसेल !

No comments: