Monday, November 3, 2014

जन्माची गाठ

लहानपणी माझी आजी मला एक गोष्ट सांगत असे. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात या संदर्भात ती गोष्ट होती.
रुपवती नावाची एक राजकन्या होती ,ती एकदा नदीवर स्नानाला निघाली. बरोबर नोकर चाकर ,दास-दासी असा लवाजमा होता. नदीच्या  तीरावर जरासे लांब एक ऋषी बसले होते, ते दर्भाच्या काड्या घेवुन पाण्यात टाकत होते. राजकन्येचे कुतूहल  जागॄत झाले. तिने आपल्या नोकराला सांगितले ," जा त्या ऋषींकडे आणि ते काय करताहेत हे विचारुन ये"
नोकर गेला आणि त्यांनी विचारले त्या मुनींना ," महाराज आमच्या राजकन्या विचारत आहेत तुम्ही काय़ करीत आहात?"
ऋषी दर्भाच्या दोन काड्या घेवुन त्याची गाठ मारत होते आणि ती पाण्यात सोडत होते. त्याच्या कडे न बघताच ते म्हणाले," मी जन्माच्या गाठी बांधतो आहे."
नोकराने राजकन्येला जावुन ऋषी काय करताहेत ते सांगितले.
राजकन्येला फारच मजा वाटली. ती म्हणाली," जा त्यांना विचार माझी गाठ कुणाशी आहे?"
नोकर पुन्हा ऋषीजवळ गेला आणि म्ह्णाला ," महाराज, आमच्या राजकन्या विचारत आहेत त्यांची जन्माची गाठ कुणाशी आहे?"
ऋषींनी एकवार त्याच्याकडे पाहिले, राजकन्येकडे पाहिले हातात दोन काड्या घेतल्या त्याची गाठ मारुन पाण्यात टाकली आणि म्हणाले, " तिला सांग तिची गाठ तुझ्याशीच आहे"

नोकर चाट पडला. थोडा घाबरला, राजकन्येला सांगाव तरी पंचाईत न सांगाव तरी पांचाईत. तो पाय ओढत ओढत तिच्या जवळ गेला. तिने उत्साहातच विचारले," मग काय म्हणाले मुनीवर? कुणाशी आहे माझी गाठ?, सांग लवकर"
नोकर मान खाली घालून म्हणाला ," ते म्हणाले... तुमची गाठ ...माझ्याशी आहे !"
राजकन्या संतापाने लाल बुंद झाली तिच्या तोंडातून शब्द फुटेना क्षणभर तिला आपण कुठून विचारले असंही झालं या यःकिंचित नोकराबरोबर मी जन्म काढायचा? त्या ऋषींना काही कळतय का नाही? आणि या मूर्खाला तरी काही अक्कल आहे का? खुशाल येवुन मला सांगतोय माझ्याशीच तुझी गाठ आहे ..
राजकन्येच्या हातात स्नानासाठी आणलेली चांदिची लोटी होती. संताप अनावर झाल्याने तिने ती नोकराच्या अंगावर फेकून मारली आणि म्हणाली, " चालता हो माझ्या राज्यातून,तोंड दाखवू नको मला, लायकी आहे का तुझी माझ्याबरोबर जन्म काढायची?"

नोकर बिचारा.., लोटी कपाळाला लागून त्याला खोक पडली.भळभळत्या जखमेने आणि तेवढ्याच जखमी मनाने तो वाट फुटेल तसा चालायला लागला.
बराच भटकला. लहान मोठी कामे करत शिकत गेला, अशीच काही वर्षे गेली.
भटकत भटकत तो एका राज्यात आला . त्या राज्याचा राजा वारला होता .राजा निपुत्रिक होता.राज्यावर कुणाला बसवायचे असा प्रश्ण होता. मग मंत्र्यांनी एक युक्ति काढली.राजाच्या आवडत्या हत्तीच्या सोंडेत माळ दिली आणि दवंडी पिटवुन सगळ्या प्रजाजनांना एका पटांगणात बोलावले. हत्तीला तेथे सोडले, हत्ती ज्याच्या गळ्य़ात माळ घालेल त्याला गादीवर बसवायचे असे ठरले.
     हा नोकर तेथे आलेला होता.गर्दीत उभा राहून तो मजा बघत होता, अचानक हत्ती त्याच्या जवळ आला आणि त्याच्याच गळ्यात माळ घातली ! आणि योगायोगाने तो त्या राज्याचा राजा झाला. चंद्रसेन या नावाने राज्यकारभार बघु लागला.
   
    इकडे राजकन्या  रुपवती उपवर झाली.राजाने तिच्या स्वयंवराची तयारी केली. आजुबाजुच्या राज्यांच्या राजपुत्रांना, सरदारांना आमंत्रणे धाडली. चंद्र्सेनालाही आमंत्रण आले होते. ठरल्या दिवशी राजाच्या राज्यात स्वयंवरासाठी सगळे जमले.  रुपवती वरमाला घेवुन आली. एकेका राजपुत्रांना बघत त्यांच्याबद्दलची माहिती ऐकत ती पुढे आली , सगळ्य़ांमधे तिला चंद्रसेन आवडला.तिने त्याच्या गळ्यात माळ घातली. राजाने थाटामाटात विवाह करुन दिला. रुपवती चंद्र्सेनाची राणी बनुन त्याच्या राज्यात आली.

    लग्नाच्या पहिल्या रात्री चंद्रसेनाच्या कपाळावरील जखमेची खूण बघुन ती म्हणाली," हे काय, कधी लागल तुम्हाला? कसली हि खूण?"
त्यावर चंद्रसेन हसत म्हणाला ," तूच फेकून मारलेल्या लोटीच्या जखमेची हि खूण आहे .."
एवढं सांगून आजी म्हणत असे ," अशा लग्नाच्या गाठी बांधलेल्या असतात. तुमची ज्याच्याशी गाठ आहे, तो तुम्हाला शोधत येतो किंवा तुम्ही त्याला शोधत जाता. योग्य वेळ तेवढी यावी लागते."
   
     गोष्टी  ऐकण्याच्या (पुढे वाचण्याच्या) छंदामुळे सहसा फारशा गोष्टी न सांगणाऱ्या आजीकडून हि गोष्ट मी लहानपणी खूप वेळा ऐकली.त्यावेळी मी तिच्यावर फारसा विचार केला नव्हता. माझ्या स्वतःच्या लग्नाच्यावेळी मला या कथेचा विसर पडला होता. आम्हा बहुतेक सगळ्या बहिणी-भावांची लग्ने चहापोहे कार्यक्रमातुनच ठरली.मुलींना निवडीला फारसा वाव द्यायची पध्दत नव्हती. मुलाकडून होकार आला कि जुजबी चौकशा करुन लग्ने पार पाडली आणि बहुतेक सगळी निभावली देखील.
   
    आता आमच्या पुढच्या पिढ्या लग्नाच्या वयाच्या झाल्या आणि मला अचानक आजीच्या गोष्टीचा आठव आला. आजकाल पन्नास-साठ टक्के लग्ने मुले स्वतःच ठरवित असतील.तरी अजूनही ठरवुन लग्ने होतात.पूर्वीचा चहा-पोहे कार्यक्रम नसेल, नेट वरुन माहिती मिळते  किंवा मॉडर्न विवाह संस्था, विविध मॅट्रिमोनी डॉट कॉम आहेत. लग्ने अशा पध्दतीने ठरताना निकष कसे लावले जातात हे बघताना रुपमतीची आठवण झाली. नोकर असताना ज्याला तिने मारले तोच राजा झाल्यावर तिला आवडला. आजकालच्या मुली सुध्दा मुलगा बघताना त्याचे पॅकेज बघतात. त्या स्वतः लाखोंनी मिळवत असतात. समानतेच्या युगातही मुलाचा पगार स्वतःपेक्षा जास्त हवा असतो आणि त्याचे वर्चस्व मात्र नको असते.मुलाचा स्वतःचे घर हवे,गाडी हवी ह्या तर मूलभूत अटी आहेत.
    रुपमतीच्या वेळी स्वयंवर होत, हल्ली मुलींची संख्या कमी झाल्यामुळे जवळजवळ पुन्हा तशीच परिस्थिती आली आहे. मुलींना खूप चॉईस आहे.अगदी जेमतेम पदवी मिळवलेली मुलगी पण इंजिनियरच मुलगा हवा शक्यतो आय.टी.मधलाच हवा.किमान लाखभर पगार महिन्याला कमावणारा हवा अशा अपेक्षा सांगतात.मग उच्चशिक्षित मुलींबद्दल तर काय बोलावे?
    माझं सासरच घर दक्षिण कर्नाटाकात अगदी लहानशा खेड्यात आहे. अत्यंत निसर्गसंपन्न,प्रदूषण विरहित शांत,सुंदर असा तो प्रदेश आहे.पण आता घराघरातली तरुण मुले शिक्षण झालं कि बंगलोर,पुणे ,हैद्राबाद गाठतात.तिथल्या उपनगरात भाड्याच्या घरात राहतात.तासंनतास प्रवास करुन नोकऱ्या करतात. मी एकदा तिकडे गेले त्यावेळी म्हणाले," आपली वास्तू, शेती जतन करण्यासाठी मुलांनी इथे राहिले पाहिजे"
त्यावर एक बाई अगतिकतेने म्हणाली," आम्हाला आमची मुलं जवळ राहिली तर आनंदच आहे पण करणार काय? इथे राहिलं तर त्यांची लग्न होत नाहीत. शहरातल्या मुलींना तर खेड्यात आवडतच नाही पण इथल्या मुलींनाही शहरातच जायला आवडतं, त्यांना शहरात नोकरी करणारा मुलगा हवा आसतो ,मग काय नाइलाजानं आमची मुल जातात शहरात"

    आजीच्या गोष्टीतला लग्नगाठी बांधणारा ऋषी हल्ली कंटाळलेला दिसतो, त्याने बांधलेल्या गाठी पक्क्या नसतात, कारण इतकी चिकित्सा करुनही झालेली लग्ने टिकतीलच याची खात्री नसते. लग्न करुन दिल , मुलगी सासरी गेली की आपली जबाबदारी संपली. दिल्या घरी ती राहणारच. आपण ती सुखीच आहे असे मानायचे हे दिवसही गेले. एकमेकांशी नाही पटले कि वेगळे होणेही सध्या सर्रास झालयं. लग्नानंतर पहिल्या चारपाच वर्षात विभक्त झालेली जोडपीच बघायला मिळतात असे नाही तर आमच्या पिढीतीलही वीस-पंचवीस वर्षाहून एकत्र राहिलेल्यांना अचानक आपलं पटत नसल्याचा साक्षात्कार होवुन ते विभक्त झाल्याची बरीच उदाहरणे मी बघत आहे. अर्थात अचानक असं म्हणण ही तितकस बरोबर नाही. कारण अचानक दिसून येतात ते विभक्त झालेत असे परीणाम,कारणे हळूहळू घडलेलीच असतील. पण अस वेगळ होण्य़ाचा निर्णय घ्यायला सध्याचं वातावरण,परिस्थिती कारणीभूत असणार. नाहीतर आमच्या आधीच्या पिढ्यांमधे सुध्दा काय सगळे प्रेमातच चालल होतं असं थोडीच आहे? वर्षनुवर्ष मन मारुन कित्येकांनी संसार केले. म्हणजे त्यावेळी ऋषींच्या गाठी तेवढ्या पक्क्या होत्या कि कुणाची बिशादच नव्हती एकदा बांधलेली गाठ सोडायची !.

    रुपवतीला तरी वर निवडायचा आधिकार होता. नंतरच्या कित्येक पिढ्यांनी आंतरपाटापलिकडील व्यक्तिला तो दूर झाल्यावर पहिल्यांदा पाहिले आणि नंतरचा सारा जन्म त्याच्याबरोबर घालवला. मुलीचा नवरा गेला तर तिने त्याचे नाव उरलेला जन्मभर लावले आणि एकाकी आयुष्य काढले. बायको वारली तर पुरुषाने पुन्हा दुसरीबरोबर तसाच संसार केला. लग्नापूर्वी एकमेकाशी अजिबात ओळख नसलेल्या नवरा -बायकोंच्या स्वभावात जमीन-अस्मानाचा फरक असे,  रागीट नवऱ्याला शांत स्वभावाची बायको, उधळ्या माणासाला काटकसरी बाय़को आणि रसिक कवीमनाच्या माणसाला अरसिक बायको अशा अनेक जोड्या आपल्या आजुबाजुला बघितलेल्या आहेत.तरी त्यांचे प्रपंच सुखाचे झाले कदाचित परस्परांच्या विरुध्द स्वभावांमुळेच त्यांच्या संसाराच्या नौका पलीकडच्या तीराला लागत असतील. तडजोड कारण्याची,जमवुन घ्यायची सवय लहानपणापासून बरीच भावंडे असल्यामुळे, बिकट आर्थिक परिस्थितीमुळे ,एकत्र कुटुंब पध्दतीमुळे लागलेली असायची. लग्न झाल्यावरही बहुतेकांना किमान सासु-सासऱ्यांबरोबर रहावे लागत होते. संस्कारांमुळे म्हणा,समाजाच्या भितीने म्हणा नवराबायकोंनी आईबापांपासून वेगळॆ रहाणे हेच क्रांतीकारक मानले जात होते मग त्या दोघांनी पटत नाही म्हणून विभक्त होणे हि फार दूरची बाब होती.

    यात त्या पिढ्या किंवा आमच्या पिढ्या फार सुखात आणि गुण्यागोविंदाने नांदल्या असं म्हणण हि धाडसाच ठरेल. ते फारस खरही नाही पण आताही विभक्त होण्यामुळे ते सुखी होतात का? हा प्रश्ण आहेच. अगदी एखाद्या मुलीचा सासरी छळ होत असेल, एखाद्याची फसवणुक झाली असेल तर तो त्रास सहन न करता वेळीच विभक्त होणं केंव्हाही श्रेयस्कर. पण बारीक सारीक कारणांसाठी, स्वतःच्या अहंकारापोटी भांडणारी आणि घटस्फोट घेणारी जोडपी पाहिली कि नवल वाटते.

आजीच्या गोष्टीतल्या रुपमती सारख्या निव्वळ बाह्यात्कारी प्रतिष्ठेवर भुलून जाणाऱ्या आजच्या मुलींसाठी ऋषीच्या जन्माच्या गाठी पुरेशा नाहीत असेच म्हणावे लागेल.





No comments: