Monday, March 16, 2015

अनायासेन मरणं

 एका सुखवस्तु लग्न सोहळ्यातला भोजन समारंभ चालू होता. टेबलांवर तरतऱ्हेच्या पदार्थांची रेलेचेल होती. दागदागीने आणि सुरेख पोषाखांची पण विविधता होतीच. मात्र मोजकी टेबले आणि थोड्या जास्त खुर्च्या असल्याने ताटा आधी बसायला जागा मिळवायचीच प्रत्येकाची धावपळ होती. शक्यतो आपल्या माणसांबरोबर जेवणाचा आस्वाद घ्यायची प्रत्येकाची इच्छा असूनही मिळालेल्या जागेवर बसून जेवण घेणे चालु होते.जेष्ठ नागरिकांना त्यांचे मुलगे,भाचे पुतणे,सून मुलगी कोणी ना कोणी ताट देत होते.

   एक आजोबा म्हणाले,’ जेवताना डॉक्टर पासून चार हात दूर बसाव’
    ’बरोबर आहे पण  डॉक्टर माझ्या घरात( किंवा मी डॉक्टरच्या घरात)  अशी माझी गत आहे " एक डॉक्टर मुलीचे वडील उद्गारले. तिने त्यांना आणून दिलेल्या ताटात वडे  नव्हते हे ओळखून त्यांच्या पुतण्याने हळूच काकांना वडा वाढला.
 पलीकडच्या कोपऱ्यात त्यांची डॉक्टर लेक बसली होती. तिच्या कानावर मी आजोबांचे वाक्य घातल्यावर ती हसली. तिचा डॉक्टर नवराही हसला आणि म्हणाला ,’खर आहे, माझी आई म्हणते हि सकाळी नसल्याने आम्ही  मजेत जेवतो’
    ’ खरच इतक काटेकोर राहायला हवच का? " मी डॉक्टरांना विचारले.
   त्यावर डॉक्टरांनी दिलेले उत्तर फार छान होते ,’ तरुणवयात जिभेवर ताबा ठेवलात तर तुमची अखेरची ५-१० वर्षे चांगली जातात.’

    डॉक्टरांचा अनुभव मोठा,त्यांचा अभ्यास दांडगा त्यामुळे त्यावर वाद घालायचे कारण नाहीच. पण त्यांच्या वाक्याने मला विचारात पाडले. आपला शेवट चांगला व्हावा अशी सगळ्यांचीच इच्छा असते. अंथरुणावर पडून राहणे ,परस्वाधिन जगणे हे अतिशय क्लेषकारी आ्हे. सुखकारक वार्धक्य असावे असे प्रत्येकालाच वाटते, पण  त्याकरीता फक्त संतुलित आहार हा एकमेव उपाय खचितच नाही.

  बालवाडीच्या वर्गात गेलं कि सगळी मुल एकसारखी वाटतात, गणवेषातील आपल मूल आईला देखील पटकन नाही ओळखता येत. कॉलेजच्या आवारात स्वैरपणे हिंड्णारी तरुणाई देखील खूप सारखी दिसते.मात्र जेष्ठ नागरिकांच्या कट्ट्यावर जा, त्यातला प्रत्येक वृध्द वेगळा असतो. अस का? कारण  प्रत्येक वृध्दाचा चेहरा जणू आयुष्यात त्याच्या वाट्याला आलेल्या सुखदुःखांचा आरसा असतो. परिस्थितीच्या ,नियतीच्या फटक्यानी त्याचा मेकप केलेला असतो !
   "माणसाच्या आयुष्यात येणारे बरे-वाईट प्रसंग देखील त्याच्या तब्येतीवर परीणाम करीत असतीलच ना?” मी डॉक्टरांना विचारले.
    " स्ट्रेस प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे,पण  व्यक्ती तो कसा फेस करते यावर ते अवलंबून असतं " डॉक्टर म्हणाले

   ते हि बरोबरच. पण सगळ्यांच्या वाट्याला सारखाच स्ट्रेस येत नाही. परीक्षेचा पेपर एकच असतो, प्रत्येक विद्यार्थ्याची बुध्दीमत्ता,तयारी वेगळी असते त्यामुळे कुणी पहिला येतो तर कुणी नापास होतो. पण पेपर तरी समान असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात येणारे प्रसंग वेगळेच  ’मुखी कुणाच्या पडते लोणी कुणा मुखी अंगार’ अस माडगूळकर म्हणून गेलेलेच आहेत. लहान वयात आलेल पोरकेपण, दारीद्र्य, अवहेलना यातून जिद्दीने वर आलेल्यांना उतार वय बघायला मिळतेच असे नाही आणि मिळाले तरी काहीना काही आजार सोबतीला घेऊनच येते ते. अशातुनही ज्यांची तब्येत चांगली राहते त्यांनी त्यांच्या ताणतणावाचे व्यवस्थापन योग्य केले असे आपण म्हणू शकतो. पण मानवी जीवनातील विविधता आणि माणसांमधले वैचित्र्य बघावे तेंव्हा कुठलेही गणिती नियम सरसकट लावणे फार अवघड होते.

मागे एकदा अशाच एका समारंभात आम्ही शाळेतल्या सगळ्या मैत्रीणी जमलो होतो. आमच्यातल्या एकमेव डॉक्टर मैत्रीणीला जी -ती आपल्या बारीकसारीक तक्रारी सांगत होती .डॉक्टर बिचारी सगळ्यांना सल्ले देत होती.एवढ्यात आमची एका परदेशस्थ मैत्रीण, जी खूपच हेल्थ कॉन्शस,डायट कॉन्शस इ.इ.आहे तिने विचारले,’ अगं ते अमूक डॉक्टर परवा सूर्यनमस्कार घालताना गेले,वय फक्त ५०, हे कसं?"
मैत्रीणीने हृदय विकाराबद्दल सांगितले, मग कुणी पंचेचाळीशीचा निर्व्यसानी ,नियमित व्यायाम करणारा माणूस कसा तडकाफडकी गेला याच वर्णन केल. कुणी असाच एक  ट्रेकिंग करणारा तरुण झटक्यात गेला हे सांगितल.
डॉक्टर मैत्रीणीनेही तिच्या माहितीतल्या अशा अजून केसेस सांगितल्या.
"यावरुन असं अनुमान निघतं कि भरपूर व्यायाम करुन फिट राहणारे तरुण वयात फट्कन जातात " मी म्हणाले.
 आमची परदेशी मैत्रीण कडाडलीच ," असं काय बोलतेस? फीट्नेस साठी exercise must आहेच"
 " आहे ना पण सुखेनैव मरणासाठीही तो तितकाच जरुर आहे असं वरील चर्चेवरुन दिसतयं" मी
" पण हे काय वय आहे त्यांच जाण्याच?"
 " म्हणजेच व्यायामाचा दीर्घायुष्याशी संबंध नाही पण मरताना फिट राहण्याशी असावा "
 "तसा कशाचाच कशाशी संबंध नाही "
 " ए जाऊद्या ग , कशाला या अशा आनंदाच्या प्रसंगी असल्या मरणाच्या गोष्टी करताय, चला जेवु या मस्तपैकी " एकीने शहाण्यासारखा विषय संपवला

विषय संपला तरी विचार संपत नसतात, त्याचे चक्र चालूच राहते डोक्यात कुठेतरी. 'याच साठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा ’ अस तुकाराम महाराज म्हणाले आहेत, ते व्यायाम आणि योग्य आहाराबाबत धराव असा विचार केला तरी  कित्येक परस्पर विरोधी उदाहरणे माझ्या अवतीभवती बघितलेली आहेत. रोज् किमान १०० सूर्य् नमस्कार घालणारे, साठाव्या वर्षी ६० वेळा पर्वती चढणारे, मनाने आणि देहाने कणखर असे माझ्या मावशीचे यजमान मोतिबिंदुच्या ऑपरेशन नंतर् दृष्टी गमावून बसले आणि नंतर् तीन चार वर्षे अंथरुणाला खिळून गेले. याउलट् माझ्या सासुबाई. लहान वयापासून दमा होता त्यांना. पन्नाशीनंतर् डायबेटीस,बी.पी असे आजार देहामधे वस्तीला आले. व्यायामाचा त्यांना अतोनात कंटाळा. पथ्य पाळायला डॉक्टर सांगत पण "माझं आता काय राहिलय? मला भात सोडणं जमणार नाही, दही ताकाशिवाय जेवण होणे नाही " असं सरळ म्हणत. वर्षातून एकदोनदा अगदी ऍडमिट् करण्यापर्यंत वेळ येई. दोनचार दिवस दवाखान्यात मुक्काम् करुन बऱ्या होऊन आल्या कि उत्साहाने कामाला लागत. हिंडून फिरुन तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ करुन स्वतः खात सगळ्यांना प्रेमाने खाऊ घालत. पथ्य पाणी न केल्यास आणि श्वसनाचे व्यायाम न केल्यास त्यांचे यापुढचे ऍटॅक अजून गंभीर असतील असा इशारा डॉक्टरांनी दिला होता. मात्र वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांना अगदी झोपेत शांत मरण आले.  सिगरेट, तंबाखू, गुटखा पान आदींच्या व्यसनाने घसा,तोंड,फुफुस्साचा कॅन्सर होतो असं सतत वाचतो, पण कित्येक चेन स्मोकर्स, पट्टीचे तंबाखू खाणारे मजेत जगताना दिसतात, तर माटे सरांसारख्या निर्व्यसनी लेखकाला, कित्येक बायकांना घशाचे कॅन्सर झालेले दिसतात. मधुमेह, रक्तदाबासारखे आजार अनुवंशिक असतात. त्यांना आपण काही करु शकत नाही, वडिलोपार्जित इस्टेटीसारखेच ते मिळतात, शिवाय त्यासाठी कुठलीही यातायात करावी लागत नाही.या आजारांवर एवढं संशोधन झालय, चाललय तरी या आजाऱ्यांबद्दलही सरसकट विधाने करता येत नाहित. माझ्या वडीलांना मधुमेह होता. डॉक्टरांच्या सल्यानुसार ते भरपूर व्यायम करायचे, गोड खायचे नाहित.तरीही डायबेटीसने त्यांच्या डोळ्य़ांवर,किडनीवर परीणाम झाला, ३०-३५ वर्षांपूर्वी डायलिसिस सारख्या सुविधा सहज नव्हत्या. वयाच्या ५२व्या वर्षी ते वारले. आईला त्यानंतर मधुमेह झाला.तो स्ट्रेसमुळे असे डॉक्टरांचे मत होते. आईने कधी व्यायाम केला नाही, फारशी पथ्ये पाळली नाहीत, तरीही डायबेटीसने डोळे,किडनी ,हृदय आदी कुठल्याही अवयवांवर परीणाम न होता ती पुढे ३० वर्षे जगली. मी डॉक्टर नसल्याने दोघांच्या डायबेटीसमधे काय फरक होता ते मला कळत नाही पण आईलाही ताण होतेच. याचा अर्थ पथ्य पाळू नयेत,औषधे घेवु नयेत असे नाही पण शेवटी ’इश्वर करनी को कौन टाल सकता है?’ अस आहे अस मानायच का?

आजार होवु नयेत म्हणून काळजी घेणे,झाले तर योग्य उपाय योजना करणे,वेळोवेळी वैद्यकीय तपासण्या करुन घेणे हे तर आपल्या हातात असते ते आपण करतो.हल्ली टि.व्ही, इंटरनेट्च्या माध्यमातुन सर्वसामान्यांना बरीच वैद्यकीय माहिती सहज उपलब्ध होते. वृत्तपत्रांमधुनही ’फॅमिली डॉक्टर’,’आजीबाईचा बटवा’ वगैरे सदरातुन बरीच माहिती सतत कानावर पडते. कधी कधी या माहितीचाही अतिरेक होतो. वाचलेल्या प्रत्येक आजाराची लक्षणे आपल्यात दिसतात कि काय अशी भिती वाटू लागते. कोणी म्हणतात खोबरे आणि खोबरेलतेल अजिबात खाउ नये त्याने कोलेस्टेरॉल वाढते. तर नवीन संशोधन, हे धादांत खोटे असून रोज खोबरेल तेल खाल्ल्यास मेंदू तल्लख राहतो असे सांगते. तेल,तूप अजिबात खाऊ नये असे ऍलोपॅथीचे मत तर गायीचे तूप आहारात जरुर ठेवा असा आयुर्वेदाचा आग्रह. कधी इंटरनेट्वर येते रोज किमान ३-४ लिटर पाणी प्या, तर कुणी सांगत पाणी गरजेपेक्षा जास्त बिल्कुल पिऊ नये. या मतमतांच्या गलबल्यात आपली केवढी पंचाईत होते!  काही व्हायला लागल तर कुणाची तरी आज्ञा आपण नक्कीच पाळलेली नसते, त्यामुळे आपल्या आजाराला आपणच जबाबदार असतो. महागडी औषध, किमती तपासण्या करुन सुध्दा पूर्ण बरे होण्याची शाश्वती नसते.हॉस्पीटल्स भरलेलीच असतात. हॉटेल्स इतकीच औषधांची दुकाने,कन्सटींग रुम्स, हॉस्पीटल्स गर्दीने ओसंडत असतात. वाढत्या संशोधनामुळे आयुर्मान वाढत चाललय अस एकीकडे दिसतानाच हृदयविकार,कॅन्सर अशा आजारांनी किंवा अपघातात तरूणांचे बळी जाताना आढळतात.

 धर्मराजाने यक्षाला दिलेले उत्तर आठवते."जगातील सगळ्य़ात मोठे आश्चर्य कोणते?" या यक्षाच्या प्रश्णाला युधिष्ठिराने उत्तर दिले होते ," जन्माला येणारा प्रत्येक जीव मरणार आहे हे माहित असुन सुध्दा आपण अमर आहोत अशा थाटात प्रत्येक व्यक्ती जगत असते. हे जगातील सर्वात मोठे आश्चर्य आहे.
मरणाचे स्मरण असावे असे संत सांगतात. ते ठेवायचे तर व्यायाम,डाएट या कटकटी कशाला केंव्हातरी जायचच तर चांगल खाऊन पिवुन घ्याव असा विचार कारणाऱ्यांच तरी काय चुकल? डॉक्टर म्हणतात तशी शेवटची वर्षे चांगली जाण्यासाठी एवढा आटापिटा कराय़चा पण शेवट कधी ते माहित नाही , व्यायाम,डाएट  करुनही  शेवट चांगला होईल याची खात्री बाळगली तरी तो केंव्हा होईल याची शाश्वती नाही. कॅन्सर सारखा आजार होण्याची कारणे माहित नाहित, तो होवु नये म्हणून घ्यायची लस उपलब्ध नाही. स्वाईन फ्लू, डेंग्यु सारख्या साथी आल्या कि धडधाकट माणसेही जाताना दिसतात, एकूण शेवट कधी ,कसा होईल त्याबद्द्ल इतकी अनभिज्ञता असताना जिभेवर सतत लगाम घालणे, व्यायामासाठी वेळ काढणे याचा देखील मनावर ताण येतोच. मन शांत,प्रसन्न ठेवा अस मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात ते वेगळच.

    त्यापेक्षा आमच्या आधीच्या पिढ्या सुखीच म्हणायच्या. आरोग्य विषयक माहितीचा विस्फोट नसल्याने परवडेल ते खायचे, जमेल तेवढे व्यायाम करायचे,शारीरिक श्रम असतच बऱ्याच जणांना. सणावारीच गोडधोड जेवायचे, बाहेरचे खाणे शक्यतो टाळायचे.मग ठराविक वयानंतर तब्येतीच्या कुरबुरी सुरु होत, त्याला वयच जबाबदार असं मानून त्याचा निमूट स्विकार करायचा.औषधपाणी घ्यायचे जमेल तेवढे पथ्य पाळायचे आणि अगदी जास्त झाले कि घरचे लोक डॉक्टरांआधी सगळ्या जवळच्या नातलगांना बोलावुन घेत. सगळ्यांशी भेटी घेतल्या कि पिकली पाने गळून जात. त्यावेळीही लोक अकाली जात. प्लेग,इन्फ्लुएंझा,देवी अशा साथींमध्ये घरेच्या घरे, वाड्या वस्त्या उजाड होत. बाळंतपणात बायका मरत. टि.बी सारखे आजारही मरणाला कारणीभूत होते. याशिवाय कुणी अचानक दगावला तर  त्याच्यावर मुठ मारली,करणी केली,दृष्ट लागली अशी आपल्या हातात उपाय नसलेली कारणे घडल्याचे समजत त्यामुळॆ मागे राहणाऱ्यांना त्यांच्या जाण्यामागचे कार्यकारण भाव शोधावे लागत नसत. सरासरी आयुर्मान कमी असल्यामुळे अल्झायमर,पर्किन्सन्स ,डिमेन्शिया अशा वृध्दांमधे सध्या दिसणाऱ्या आजारांच प्रमाण कमी होत.

यामध्ये विज्ञानाने केलीली प्रगती,वैद्यकीय संशोधन याला काहीच किंमत नाही अस मला मुळीचच म्हणायच नाही. १०० वर्षांपूर्वी बाळंतपणात दगावणाऱ्या बायका,देवी,प्लेग सारख्या आजारांनी घेतलेले बळी,पोलिओसारख्या आजारांनी लुळीपांगळी झालेली आयुष्ये. आज ऐकले तरी काटा येतो अंगावर. या सगळ्यातुन मानवजातीला मुक्त करणारे वैद्यकीय संशोधक देवतुल्यच आहेत.  वाढते आयुर्मान हि त्याचीच देणगी असली तरी त्यामुळे आरोग्य वाढलय असं म्हणताना जीभ अडखळते. शहरांमध्ये वाढते प्रदूषण, खाण्यापिण्याच्य़ा अयोग्य सवयी, धकाधकीचे जीवन हे अनारोग्याला कारणीभूत आहे. खेडेगावात प्रदूषण मुक्त निसर्ग आहे,पण अज्ञान,दारिद्र्य यामुळे पसरणाऱ्या रोगराईशी सामना करायला वैद्यकीय सेवेचा अभाव असल्याने तेथेही अनारोग्य आहे.

एकंदरीत काय आपले सर्व जीवन निरोगी रहावे यासाठी योग्य आहार,भरपूर व्यायाम करा पण भगवदगीतेत म्हटल्याप्रमाणे फळाची अपेक्षा न धरता सगळ करा. कारण शेवटी तुम्हाला कशामुळे कधी काय होईल ते कुणीच सांगू शकणार नाही. विज्ञानाची कितीही कास धरली तरी या अशा काही प्रश्णांना उत्तरे मिळणे अवघड असते.

मरण म्हणजे देहाचा पिंजरा तोडून आत्म्याची मुक्ती असं असेल तर त्या पिंजऱ्याची डागडुजी करण्यात आणि तो बिघडेल म्हणून उगाच काळजी तरी कशाला ? शिवाय या आत्म्याला कुठल्याही शस्त्राने इजा होत नाही वा अग्नीने चटका बसत नाही असंही गीता सांगते. मग कशानेच काही न होणाऱ्या या आत्म्याला देहातून कधीही सुटका करुन घेता यायला हवी आणि तरीही तो त्या पिंजऱ्यात राहतो हेच आश्चर्य आहे, "मरणं प्रकृति: शरिरीणाम्” मरण हि शरीराची प्रकृती म्हणजे नैसर्गिक घटना आहे, जीवन हिच विकृती आहे असही वचन आहे.
       कुणा न माहित सजा किती ते
       कोठुन आलो ते नच स्मरते
       सुटकेलाही मन घाबरते
       जो आला तो रमला.  माडगूळकरांच्या या ओळी किती सार्थ आहेत !
म्हणून शेवटी आपल्या हातात नसलेल्या गोष्टींकरता व्यर्थ धडपड करण्यापेक्षा ज्या विधात्याच्या कृ्पेने आपल्याला हे जग दिसत आहे त्याच्याजवळ एवढीच प्रार्थना कराविशी वाटते

अनायासेन मरणं विनादैन्यं च जीवनम्
एतच्च देहि मे देव ,तव भक्तिं निरन्तरम्


1 comment:

Gayatri said...

Hi Mavshi, a very good article indeed. Coincidentally, I have been thinking about the same subject because of a book I am reading currently: "Being Mortal" by Dr. Atul Gawande. The author is a very renowned surgeon in the USA; with ancestors from India. Lauding the older Indian way of 'death at home, surrounded by kith and kin; instead of on a hospital bed' - he stresses that autonomy during terminal years is even more important than the artificial safety of a jail-like hospital. He also points to the need for higher attention towards palliative care : so that the "anaayaasen maraNam" that you mention is made possible.