Wednesday, July 20, 2016

त्या बालिकेला बघून....

           सकाळी सकाळी whatsapp वर एक विडीओ बघितला( माझ whatsapp च वेड कमी झालय पण अजून पुरत गेल नाहीये) एक चार वर्षांची चिमखडी मुलगी इंग्रजी मधून आपल्या देशाबद्दलच्या प्रश्णांची धडाधड उत्तरे देत होती कुठल्याही राज्याचे नाव घ्यायचा अवकाश हि बेटी त्याची राजधानी सांगायची.सातही युनियन टेरीटरीज(केंद्रशासित प्रदेश) ची नावे तिच्या राजधान्यांसकट सांगितलेले बघून मला त्या बालसरस्वतीचे पाय धरावेसे वाटले ! शिवाय तिला शिकविणाऱ्यांचे सुध्दा.

        आपल्या देशात किती राज्ये आहेत हे समजायला मला किमान दहावे वर्ष उजाडले असेल ,केंद्र्शासित प्रदेश वगैरे शत्रुंपासून दहावीनंतरच सुटका झालेली नक्की माहित आहे. विडीओतल्या मुलीची स्मरणशक्ती अगाधच आहे आणि तिच्या या शक्तीचा वापर पुढच्या अभ्यासाला उपयोगी पडणाऱ्या गोष्टीत करण्याच तिच्या पालकांच चातुर्यही वाखाणण्याजोगच आहे. मला त्या मुलीच जितक कौतुक वाटल त्याहूनही अधिक तिच्या वयाच्या इतर मुलांची काळजी ! कारण आता हा विडीओ सगळ्या जगभर फिरणार तिच्या किंवा तिच्या आसपासच्या वयाच्या मुलांच्या आई-वडील आणि आजी आजोबा (हो हल्ली बऱ्याचशा आजी आजोबांचा ही बाल संगोपनात वाटा असतो शिवाय तेही उच्चशिक्षित असतात) सगळ्यांनाच आपल्या मुलांनाही हे आल पाहिजे अस वाटून त्यांनी त्या लेकरांना वेठीला धरु नये. ती मुलगी कदाचित स्मरणशक्तीच वरदान घेवुन आली असेल ,तिला त्या बद्दल शिकवताना तिच्या पालकांनी काही आगळ्या वेगळ्या पध्दती वापरल्या असतील ज्या योगे तिला हे सारे खेळासारखे वाटले असेल, कदाचित तिच्या मोठ्या भावंडाच्या बरोबर ऐकताना तिच्या कानावर पडून तिला ते अवगत झाले असेल पण म्हणून इतरांनी आपल्या पिल्लांच्या पाठीस लागू नये अस मला फार फार वाटतय.

         आपोआप कानी पडून मुलांना अभ्यासाची गोडी लागण वेगळं आणि जोर जबरदस्ती करुन त्यांना पढवणं वेगळं. दुर्गाबाई भागवतांनी आपल्या लहानपणातल्या आठवणींमधे  लिहिलय त्यांच्याहून  त्यांचा काका दोन चार वर्षांनी मोठा होता त्याच्या  बरोबर सतत राहून  त्यांना लिहिता वाचता यायाला लागल,पाढे,अक्षर बाराखड्या सगळ त्या काका बरोबरोबर आवडीने लिहित शिवाय शाळेत जायचा हट्टही करत.मग त्या स्वतःच कशा शाळेत गेल्या,नाव घालायला वयाचा दाखला मागितल्यावर कशा निरुत्तर झाल्या मग काकाचे नाव घेतल्यावर बाईंनी काकाला बोलावुन घेतले मग त्याच्याच वर्गात जायचा हट्ट् त्यांनी कसा धरला याच मोठ रसाळ वर्णन बाईंनी केलय. त्यांच्यासारख्या असामान्य बुध्दीमत्तेच्या मुलीच्या बाबतित हे घडल. त्यावेळी घरोघरी अशीच बरीच मुल असत पण सगळ्य़ांचीच धाकटी भावंडे अशी शाळेत जाण्यासाठी हट्ट करत नव्हती. पण याच भान त्यावेळच्या पालकांना होत त्याला हल्ली पूर्वीचे पालक सजग नव्हते असही म्हणतील. त्या वेळच्या पालकांना वेळही नसे मुलांकडे इतके लक्ष द्यायला.हल्लीच्या करीयर मागे धावणाऱ्या लोकांकडे ही वेळ नसतोच पण असलेला वेळ मुलांनी प्रत्येक शर्यतीत पहिलच आल पाहिजे या अट्टहासाने त्यांच्यावर असंख्य ओझी घालण्यात जातो हे बघताना मन विचारात पडते.

      लहानपणी माझी स्मरणशक्तीही चांगली होती(आजही नको ते लक्षात ठेवण्य़ात ती वाया जाते इति नवरा) रामरक्षा,मारुतीस्तोस्त्र गीतेचे १२वा,१५ वा अध्याय अशा गोष्टी आई पाठ करुन घेई. दादांनी पाढे पक्के करुन घेतले,अनेक सुंदर कविता ते मला म्हणून दाखवत त्याचे अर्थही सांगत त्या मला सहज पाठ झाल्या. कित्येक संस्कृत श्लोकही ते म्हणून दाखवित ,सावरकरांचे प्रसिध्द "हे सिंधू एकटा महाराष्ट्र् तुला मुक्त केल्याशिवाय राहणार नाही” हे भाषणही दादांनी दोन तीन दा वाचल्यानंतर माझे बरेच पाठ झाले होते. माझ्या आईच्या मामांनी मला कानडी भाषेतील १ ते १०० अंक म्हणायला शिकविले होते. रेडीओवरील गाणे एकदा किंवा फारफार तर दोन दा ऐकून माझे तोंडपाठ होत असे माझी मोठी ताई हिंदी गाणी लागली आणि तिच्या आवडीच गाण लागल कि वही पेन घेवुन् ते उतरवुन काढायची एखादी ओळ राहिली कि हळहळायची, मी मात्र माझ्या आवडीचे गाणे नीट ऐकत असे आणि माझे लवकर पाठ होत असे, शाळेतल्या कविताही मला कधी पाठ कराव्या लागल्या नाहीत पण या सगळ्याचे घरात विशेष कौतुक झाल्याचे मला आठवत नाही. मला अभ्यासातले काही शिकवावे असे कुणालाच वाटले नाही. शाळेत जवळजवळ सगळे विषय मला आवडत होते, भूगोलातील नकाशे मला समजाय़चे नाहीत पण पाठांतराचा त्रास न वाटल्याने कमीत कमी अभ्यास करुन मी दुसरा नंबर सहज मिळवित होते.पहिला नंबर मिळवणारी मुलगी माझी जवळची मैत्रीण असल्याने मला आपण तिच्याशी स्पर्धा करावी असे कधी वाटलेच नाही आणि इर्षेने काही करावे असा माझा स्वभाव नसल्याने मला मिळणाऱ्या मार्कांनी मला  कधी दुःख दिले नाही.  आमच्या घरात सतत पाहुण्यांचा राबता असे. घरकामाला बाई नसल्यामुळे आईला वरकामात बरीच मदत करावी लागे,दुकानातून सतत काही ना काही आणुन द्यावे लागे हे सगळी कामे मी आनंदाने करीत असे,आईचाही नाईलाज होता आणि या कामांमुळे माझे आभ्यासाचे नुकसान होत नसल्याने आई मलाच हक्काने कामे सांगत होती.इतके करुनही उरलेला रिकामा वेळ् मी हाताला येईल ते पुस्तक वाचण्यात घालवी. थोडक्यात माझ्या चांगल्या स्मरणशक्तीची ना मला किंमत होती ना माझ्या घरच्यांना. याबद्दल मला खंत नाही पण कधीतरी वाटून जाते आपल्या क्षमतेचा वापर हवा तितका झाला नाही. याबद्दल मी माझ्या आईवडीलांना दोष नाही देणार .त्यांच्याजवळ मला मार्गदर्शन करण्य़ाइतक शिक्षण नव्हत त्यामुळे असलेल्या निम्न आर्थिक दर्जामुळे पैसा खर्च करुन क्लासेसला पाठवायची क्षमताही नव्हती आणि माझ्याकडेही महत्त्वाकांक्षेची कमतरता होतीच. त्यातुनही मी जे शिक्षण घेतले त्यातून माझा बराच विकास झाला.मी आर्थिक दृष्ट्या स्वावल्ंबी तर झालेच पण केंद्र सरकारच्या माहिती प्रसारणासारख्या चांगल्या खात्यात आधिकारीपदही मिळवू शकले.
       
            हे बघताना मला आठवतात माझ्या मागल्या पिढीमधल्या काही बाय़का.माझी आई तिची पण स्मरणशक्ती चांगली होती. अनेक स्तोत्रे तिला पाठ होती. तिच्या शाळेतल्या कविता ती माझ्या मुलींना म्हणून दाखवी.तिने वाचलेले पुस्तक असो कि पाहिलेला नाटक ,सिनेमा सगळ्याची अतिशय बारकाव्यांसह कथन करण्याची कला तिला अवगत होती. अनेक गाणी ती सुरेल आवाजात गायची पण तिच्या हुशारीचे काही चिज झाले नाही.एकत्र कुटुंबातील जबाबदाऱ्या पार पाडताना तिला कधी वाचन करणेही जमले नाही. सतत येणाऱ्या पाहुण्यांची सरबराई करताना ती दमुन जाई.आम्हाला मात्र तिने स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे धडे  दिले आणि चूलखंडातुन बाहेर पडून काहीतरी वेगळ करा अशी सतत शिकवण दिली. आज वाटते तिला संधी मिळती तर ती कुठल्याकुठे गेली असती.तिच्यामधे जिद्द होती, अपार कष्ट करायची तयारी होती.
       
        माझ्या चुलत सासुबाई देखील अशाच अतिशय हुशार होत्या. त्यांना मराठी समजत असे बोलता यायचे नाही,मला कन्नड कळे पण् बोलता येत नव्हते.आमच्या गावाकडे गेले कि मी मराठीतून आणि त्या कानडीमधून बोलत पण आमचा संवाद छान होई. त्यांचा मोठा भाऊ बंगलोरला मोठ्या कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट् होता त्या मला नेहमी सांगत त्यांचे वडील लवकर वारले त्यापूर्वी त्या भावाबरोबर शाळेत जात नेहमी त्यांचा पहिला नंबर येई.पण वडीलांच्या पश्चात काकाने त्यांचे तेराव्या वर्षी लग्न लावुन टाकले आणि कर्नाटकातल्या किऽर्र खेड्य़ात या थोरली सून म्हणून येवुन पडल्या. तिथे त्यांचा उभा जन्म शेतीची कामे,आलागेला आणि शेणगोठ्यात गेला.आमच्या मोठ्या कुटुंबातील प्रत्येक व्यत्क्तिची जन्मतारीख,लग्नाच्या तारखा त्यांना सांगता यायच्या. आमच्याकडे नात्यातल्या नात्यात लग्नसंबंध फार होत त्या प्रत्येकाची उकल मी त्यांच्याकडून करुन घेई.त्यावेळीदेखील मला वाटे किती ह्या माऊलीची हुशारी वाया गेली. अशा कित्येक स्त्रिया मागल्या पिढ्यांमधे होवुन गेल्या असतील.
       
        केवळ चांगली स्मरणशक्ती म्हणजे हुशारी नव्हे हे जरी खर असलं तरी आपल्याकडे चालत आलेल्या पूर्वापार शिक्षणपध्दतीचा विचार केला तर शैक्षणिक यशात तिचा सिंहाचा वाटा आहे यात वाद व्हायचे काहीच कारण नाही. सगळ्या स्पर्धा परीक्षांचा जोरही स्मरणशक्ती मापनात आहे असे वाटते.त्यामुळेच या बायकांची हुशारी कामी आली असते असे वाटते. शिवाय मला त्यांच्या सहवासातून तोच एक पैलू जाणवला कदाचित त्यांच्यात उत्तम ग्रहणशक्ती,सर्जनशिलताही असेल .कुठलेही शिक्षण ,स्ंस्कार नसतानाही त्यांची स्मरणशक्ती टिकली पण योग्य मार्ग न मिळाल्याने ती एका अर्थी वायाच गेली.

     या छोटीचा विडीओ बघताना वाटलं तिच्या स्मरणशक्तीचा उपयोग केला जातोय. मात्र त्याचाही अतिरेक होवु नये. तिच बालपण, कुतूहल, निर्व्याजता यात होरपळली जावु नये आणि तिला अहंकाराचा वारा पण लागू नये.

2 comments:

Deepak Shirahatti said...

सुन्दर

shekharkulkarni said...

फारच छान लिहिले आहे . अभिनंदन!!!!!