Wednesday, March 14, 2018

मन केवढं केवढं

पावसाने उच्छाद मांडला होता. पहाटे पाचलाच जाग आली होती  पण पांघरुणातुन उठायचे आबांना जीवावर आले होते. सहा वाजून गेले होते, गरम गरम चहा प्यायची अनावर हुक्की आली होती पण कोण करुन देणार ? तसा सकाळचा पहिला चहा आबाच गेली अनेक वर्षे करीत. सुलूच्या नसण्याचा त्याच्याशी काही फारसा संबंध नव्हता पण आज तिची फारच आठवण झाली.एवढा वेळ आपल्याला गादीवर लोळताना बघून ,"बरं वाटत नाहीये का? " अस विचारणार कोणी नाही याची आज प्रकर्षाने जाणीव झाली. मन उगीचच उदासल तेवढ्यात फोनची रींग वाजली
    हात लांब करुन आबांनी फोन घेतला, समीरचा फोन ," हाय बाबा ,मोबाईल बंद आहे तुमचा .आज तिकडे खूप पाऊस पडतोय ना, तुम्ही वॉकला नसाल गेलात म्हणून कॉल केला"
" रात्री बंद करुन ठेवतो मोबाईल सकाळी चालू करायचा राहिलाय, पाऊस तर आहेच गेला आठवडाभर, तरी जातो मी रोज. आज जरा जास्तच आहे म्हणून कंटाळा केला"
"पावसात नका जात जाऊ,घरी आहे ना वॉकर त्यावरच चालत जा ना ,उगाच रस्त्यावर चिखल,पाणी त्यात पडला बिडलात तर ..."
" ते ही खर पण बाहेर पडल की चार लोक भेटतात गप्पा,गोष्टी केल्या की बर वाटत ...आज नाही गेलो"
" विशु येतो ना रोज , बॅंकेची कामे तो करतो कि करता तुम्हीच?"
" येतो विशु वेळेवर .मी जातो बॅंकेत त्याच्याच बरोबर .ऑनलाईन पण शिकतोय हळूहळू पण माझा नाही विश्वास या नेट्बॅंकींग वर. रोज नवनव्या बातम्या कानावर पडतात.त्यापेक्षा विशुच्या हातात पासबुक देवुन पैसे काढलेले बरे "
" ठिक आहे बाबा .तुम्हाला पटेल तस करा ,ठेवतो आता फोन जेवण करुन झोपायचय"
" ठेव ठेव किती नऊ वाजले असतील ना तिकडे?"
"हो"
" गुड नाईट"
सुलू असती तर अर्धा तास गप्पा मारल्या असत्या तिने,तो ही बेटा बोलत बसला असता, बापाशी बोलायला जमत नाही.त्याला देखील काय दोष द्यायचा म्हणा मला तरी कुठ सुचतय बोलायाला..ओम च काय चाललय ,त्याचे गेल्या वर्षी ग्रॅज्य़ुएशन झाले. नसती फॅड एकेक. आपल्या भाषेत दहावी झाली ,पण मोठा झाला आता. त्याला आता इंडीयात यायच नसतं, चालायचच. त्याच्याबद्दल विचारायला हव होत, राहिलच. असच होत. नंतर सुचत एकेक असो उठायलाच हव आता.
तेवढ्यात लॅच उघडून विशु आला घाईघाईत तो आबांच्या बेडरुममधे शिरला
"आबा तब्येत बरी नाही का?"
" अरे विशु आज इतक्या लवकर कसा?"
"आबा अहो सात वाजून गेलेत अजून दुधाची पिशवी बाहेरच ,बर वाटत नाही का तुम्हाला?"
" नाही रे बाबा, ठिक आहे मी. आज पावसामुळे उठावस वाटत नव्हत पण तू लवकर कसा?"
" आज टपरीवर तुमच्या दोस्तात तुम्ही नव्हतात मग बायकोनं फोन करुन सांगितल, जाऊन बघा म्हणाली"
"फोन करायचास ना?"
" केला लॅंड्लाईनवर. तुम्ही उचलत नव्हता , मोबाइल पण लावला तो बंद होता,मग म्हटल हि म्हणतीय ते बरोबर असल तब्येत नसल बरी मग आलो थेट ,काय जास्त लांब यायचय थोडच ?"
" अरे समीरचा फोन होता त्याच्याशी बोलत होतो कॉल वेटींग मुळे तुला तस वाटल असेल. मी ठिक आहे. तू जा घरी. ये नेहमीच्या वेळेला, तुझी घरची काम उरकायची असतील ना? बायको तिकडे टपरीवर कामाला. तू इथे. पोरांच कोण बघणार?"
" पोरगी आवरते म्हणाली ,सिध्दु पण मोठा झालाय आता आणि हि येईलच नऊ पर्यंत मी चहा करू का तुम्हाला "
" चालेल, उठतोच मी ,दुध ठेव तापत .."
" करतो आबा मी ,घरी मीच करत असतो "
 "तुझा पण ठेव रे "
" करतो करतो"
     विशु आल्याने आबांचा गेलेला उत्साह परत आला,त्याने केलेल्या चौकशीने मन आनंदले. ब्रश करुन ते किचन मधे जातात तोच वाफाळलेला चहाचा कप विशुने त्यांच्या समोर ठेवला , डब्यातली बिस्कीटेही त्याने बशीत ठेवली.आबा खुश झाले. चहाचा पहिला घोट घेताच त्यांच्या तोंडून वाक्य निघाले
"व्वा ..झकास झालाय चहा . विशु,तू पण घे चहा,बिस्कीट घे"
"घेतो आबा, हि भांडी टाकतो घासायला "
"टाकशील रे, आधी चहा घे गरम. पेपर आला असेल ना?"
"हो आलाय कि तो बघा ठेवलाय तिकडे, आज पेपरही  बाहेर,दुधाची पिशवी पण बाहेर मी घाबरलो म्हटल काय झाल आबांना?"
" तुला काय वाटल झोपेतच आबांच काही बर वाईट?"
" छे छे... सकाळी सकाळी अस वाईट नका बोलू आबा..."
" अरे वाईट कुठे ? अस मरण यायला फार मोठ भाग्य लागत बाबा ...  आमच्या दैवात काय लिहून ठेवलय कुणास ठाऊक? "
" चहा घ्या आबा, थंड होतोय " विशुने विषय बदलायचा प्रयत्न केला
 चहा घेता घेता आबा एकदम गंभीर झाले , त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा काळजीचे सावट आले.

आयुष्याचा पट त्यांच्यापुढून झटकन सरकून गेला. आजवरच्या त्यांच आयुष्य तस सरळ मार्गी गेल. आईवडीलांची परिस्थिती फारशी चांगली नव्हती ,खाऊन पिउन सुखी होती पण त्याकाळी त्याच काही वाटत नसे.वडील वाईच्या शाळेत शिक्षक. स्कॉलरशिपवर शिक्षण झाले पदवी मिळाल्यावर पुढे शिकायची फार इच्छा होती पण धाकटी भावंडे होती ,तात्यांना मदत करणे गरजेचे होते मग CWPRS ची जाहिरात वाचून अर्ज केला, लगेच बोलावणे आले मुलाखतीला मार्क बघून तिथल्या वरीष्ठांनी विचारले देखील एम.एसस्सी का करत नाहीस ? हसून नोकरीच करायची आहे अस सांगितल लगेच रीसर्च ऍसिस्टंट ची नोकरी मिळाली किती आनंद झाला आई,तात्यांना ! ऑफिस सकाळी ७ ते २ असायच.काम करायला उत्साह होता,वातावरणही छान होत ऑफिसमधल. म्हणता ,म्हणता तीन वर्षे गेली एक प्रमोशनही  मिळालं  क्लास टू ऑफिसर झालो, त्यावेळच्या नायर सरांनी पुढे शिकायला प्रवृत्त केल म्हणाले पुढल्या प्रमोशनला पोस्ट ग्रॅज्युएट झालास तर फायदा होईल.दुपारी अभ्यास करीत जा, ऑफिसच्या वेळेचा फायदा घेत गणित विषय घेऊन एम.एस्सी करता आल,पुस्तके मिळायची लायब्ररीमधे,घराजवळच्या पटवर्धन सरांच मार्गदर्शन मिळाल आणि त्यामुळेच एम.एस्सी करु शकलो त्याचा पुढच्या आयुष्यात फार फायदा झाला. लग्न,मुलं सगळ्याच बाबतीत दैवान साथ दिली. सुलभासारखी सालस पत्नी मिळाली. तिने संसारात चांगली साथ दिली.अगदी आखीव,रेखीव आयुष्य होत. आई,तात्या गावीच होते त्यांनी शेतात लक्ष घातल होतं वर्षाच धान्य पाठवायचे.श्रीधरच शिक्षण,मालूच लग्न सगळ्याला आपण मदत केली याची त्यांना जाणीव होतीच. श्रीधरन परजातीच्या लग्न केल्याने तात्या-आई जरा नाराज झाले ,त्यावेळी आपण मध्यस्थी केली लग्न झाल पण ते दोघे दुखावलेले राहिले. तो नोकरी निमित्ताने दूर मद्रासला गेला त्याच येण जाण कमीच राहिल. मालू बी.एस्सी झाली तिला चांगल स्थळ मिळाल ती नाशिकला गेली. आई,तात्या शेवटी आपल्याकडेच होते.पिकली पान पाठोपाठ गळून गेली ,त्यांची दुखणी बाणी सुलभानेच बघितली त्यावेळी ऑफिसच्या जबाबदाऱ्यांमुळे घरात लक्ष देणे व्हायचे नाही पण तिने कधी फारशी तक्रार केली नाही. आईची तब्येत शेवट पर्यंत चांगलीच होती. सुदैवान सुलभाच आणि तिच पटायच, आईमुळे सुलभाला गाण्याच्या परीक्षा देता आल्या, मुलांना वाढवताना आजी आजोबांची मदतच झाली. माणसांत वाढल्यामुळे मुलेही शिस्तीत होती.तात्यांनी मुलांना शिकवायच काम आनंदान केल. ऑफिसमधे त्यामुळेच आपण निवांतपणे काम करु शकत होतो.

        समीर हुशार होता, आय.आय.टी त्याला सहज प्रवेश मिळाला तो कानपूरला गेल्यावर घर कस सुन सुन झाल होत. त्यावेळी मोबाइल्स नव्हते,तो आठवड्यातून एकदाच फोन करायचा बाकी सगळी खुशाली पत्रांतुनच समजायची. तो बी.टेक झाला आणि अमेरिकेत गेला पुढे शिकायला एम.एस झाला आणि तिकडेच नोकरी करु लागला.सुरुवातीला म्हणायचा येईन चार पाच वर्षांनी. अमोल इथे असल्याने त्याचे जाणे तितके जाणवले नाही,तोवर नोकरी होती .रीटायर्ड झाल्यावर अमेरीकेत जाऊन आलो. पुढे ते नित्याचेच झाले. अमोल ने पुण्यातून इंजिनियरींग केल तो ही भावाच्या मागोमाग अमेरीकेत गेला. मुलांनी इथे रहावे असे कुठल्याही आई वडीलांना वाटणारच पण इथे त्यांना तशा संधी नव्हत्या. आपल्या देशाबद्दल प्रेम वाटावे असे संस्कार करण्यात आम्हीच कुठेतरी कमी पडलो असू. तिकडच्या आरामदायी आयुष्याचा,अमर्याद स्वातंत्र्याचा मोह पडण्याच त्यांच वय होत .शिवाय आम्हालाही मुले तिकडे असल्याने स्वातंत्र्य होतेच की. वर्षा-दोन वर्षांनी मुल यायची ,भरपूर पैसा खर्च करायची,एक गेट-टूगेदर करुन सगळ्या नातेवाईंना बोलवायच.बाकी मुलांचा वेळ मित्र मंड्ळीत जाय़चा.कधी गोवा,तर कधी महाबळेश्वर ट्रिप्स व्हायच्या. मुल परत गेली कि घर खायला उठायच दोन चार दिवस.पण नंतर आमचे प्रोग्रॅम्स पण ठरलेले असायचे ,आमचा ग्रुप होता. सुलभाचा ग्रुप होता.शिवाय आमच्या मित्रांचा ग्रूप होता,आमच्या एकत्र ट्रिप्स व्हायच्या,जेवणे व्हायची. कधी श्रीधर यायचा,कधी आम्ही त्यांच्या कडे जायचो.मालू वर्षातून एकदोनदा यायची.आम्ही जायचो तिकडे. एकूण आयुष्य मजेत होते.सुलभाला अमेरीकेत जायलाही खूप आवडाय़च,एकतर मुल भेटायची त्यांच्या आवडीच त्यांना खाऊ-पिऊ घालायच. शनिवार-रविवार मनसोक्त भटकायच. माझ मात्र तिकडे मन फारस रमायच नाही.एखादा महिना मला आवडे नंतर मला इकडचे वेध लागायचे. पुण्यात राहत असलो तरी आई तात्या गेल्यानंतरही मी  गावी जातच होतो.वाईची हवा मला फार आवडायची. तिकडे गेल की घरी गेल्यासारख वाटायच. समीरने गाडी घेवुन दिल्यामुळे जाण ही सोईच झाल होत. शेत शांताराम बघत होता. आम्ही जाण्यापूर्वी त्याला कळवल कि तो घराची साफसफाई करुन ठेवायचा, त्याची बायको भाकरी करुन द्यायची. आठवडाभर तिथे राहून सगळी कामे मार्गी लावली कि पुण्याला यायचे. पंचविस -तीस वर्षांपूर्वी वाई तस गावच होत.इंटरनेट्चा जमाना अजून आलेला नव्हता. तिथल्या शाळाकॉलेजच्या मुलांना करीयरच्या संधींबद्दल मार्गदर्शनाच काम मी करायला घेतल होत माझाही वेळ चांगला जायचा ,मुलांनाही उपयोग व्हायचा.पुण्याहून येताना वेगवेगळी स्पर्धा परीक्षांची पुस्तक घेवुन जायचो. वाचनही खूप व्हायच. शेतात वेगवेगळे प्रयोगही करुन बघितले. एकूण निवृत्तीनंतरच आयुष्यही मजेत चालल होत.सुना आल्या नातवंड झाली.पण सुलभाला कॅन्सर झाला आणि सगळच आयुष्यच बदलल.तिने आजारपण मोठ धीरान घेतल पण मीच मनान खचलो.

        तिचा आजार झपाट्याने वाढला आणि दोन वर्षात ती गेली. मुले येवुन गेली .समीर म्हणाला ,"बाबा तुम्ही आता तिकडेच चला" इकडे एकटे काय कराल? अमेरीकेत जायचे ते ही कायमचे ,शक्यच झाले नसते. एका घरातुन दुसऱ्या घरात रुजायला बाईचाच जन्म असायला हवा कदाचित. मी म्हणालो, ’ नको रे बाळांनो मी इथेच राहीन, येत जाईन तुमच्याकडे पण कायम तिकडे राहण मला नाही जमायच .माझी काळजी करु नका.इथे माझा वेळ जाईल मी अजून व्यवस्थित हिंडू,फिरु शकतो. कधी मालू कडे जाईन , तिला बोलवेन. कशी श्रीधर कडे, शिवाय त्यांची मुले आहेत.माझे मित्र आहेत. वाईला जात जाईन. आता फोन आहे ,तुम्ही मोबाईल दिलाय त्याचा होईल ना उपयोग "
मुलांनी आग्रह केला पण त्यांनाही मी तिकडे आल्यावर माझा वेळ कसा जाणार हा प्रश्ण असेलच ती बिचारी आठवडाभर कामात, इथल्यासारखे तिकडे एकट्याने फिरणे तेवढे सहज नाही.शनिवार रविवार त्यांच्या ट्रिप्स,पार्ट्या नाहीतर कामे. अधुन मधुन जाणे निराळे.

        आबा सुलभानंतर आठ-दहा वर्षे एकटे पुण्य़ात राहिले. दरम्यान तीन चार दा समीर,अमोल येवुन गेले. आता ते एक एक करुन आले.आणि बराच काळ आबांबरोबर राहिले देखील. दोन-तीन वेळा आबा तिकडे जावुन आले. आबांची मुळची प्रकृती चांगली, शिवाय निर्व्यसनी,नेमस्त जीवन असल्याने किरकोळ तक्रारी सोडल्यास कुठलाच आजार त्यांना नव्हता. दिवसाचा वेळ आखून घेतल्याने त्यांना सुलभाशिवायचे जीवन जगायची सवय झाली. पण वयाची ऐंशी उलटल्यावर मुलांना आबांचे एकटे राहणे आणि आपले सातासमुद्रापार असणे त्रासदायक वाटू लागले.रोज फोन करुन समीर म्हणू लागला,"बाबा तुम्ही कुणाला तरी सोबत आणुन ठेवा.किंवा एखादे ओल्ड एज होम बघा " आबांनी डोळ्याचे ऑपरेशन झाल्यानंतर गाडी चालवणे कमी केले. वाईच्या त्यांच्या शेतावर त्यांना जाणे जमेना.शांताराम वारल्यानंतर त्याचा थोरला मुलगा रवी शेत बघत होता पण तो आबांशी तितक्या आपुलकीने वागत नव्हता. रविचे त्याच्या धाकटा भाऊ विशुशी पण जमत नव्हते. धाकट्या विशुने बारावी पास झाल्यावर पुण्य़ाचा रस्ता धरला.दरम्यान मुले शेतीत लक्ष घालणार नाहीत याचा आबांना अंदाज आल्यामुळे त्यांनी शेत विकायचा निर्णय घेतला. योग्य गिऱ्हाइक मिळताच श्रीधर,मालुशी आणि मुलांशी, बोलून त्यांनी शेत विकले. खूप दुःख झाले त्यांना पण आता हळूहळू सगळा कारभार आवरता घेणेच योग्य ठरणार होते. आबांनी शेताच्या पैशातला श्रीधर आणि मालूचा हिस्सा त्यांना दिल्यावर स्वतःच्या वाट्याला आलेल्या पैशात वाईच्या शाळेला देणगी दिली.पुण्यातील एक दोन माहित असणाऱ्या सेवाभावी संस्थाना देणग्या दिल्या. शांतारामच्या रवीला त्याच शेतावर वाटेकरी म्हणून लावले.विशुला  आणि त्याला पंचवीस पंचवीस हजार रुपये दिले.   
   
        आबांच्या एकट्याच्या नोकरीमुळे पुण्यात त्यांनी दोन बेडरुमचा फ्लॅट पन्नाशीनंतर घेतला.तोपर्यंत ते भाड्याच्या घरातच रहात होते.दोन बेडरुमचा फ्लॅटही त्यांना व सुलभाला खूप मोठी कमाई वाटली होती.मुले परदेशात गेली त्यांनी चाळीशीच्या आतच मोठमोठाले बंगले बांधले याच त्यामुळेच फार कौतुक होत. त्याच वेळी आबांच्या बिल्डींगचे नूतनी करण करायचे ठरले होते वाढत्या एफ.एस.आय मुळे त्यांना एक खोली वाढवू्नही मिळणार होती.तशा मिटिंग्ज होत होत्या .वरचे पैसे घालायला आता मुलांजवळ मागायची जरुर नव्हती. वर्षा-दोन वर्षात तेही काम झाले.मालूच्या आर्किटेक्ट मुलाने सुरेख इंटिरीयर करुन दिले.घर सुंदर झाले पण त्यात रहायला मात्र एकटे आबाच. शांतारामचा विशु पुण्यात आबांच्या घराजवळ रहात होता.भोसरीला कुठल्याशा कंपनीत नोकरी करायचा.बर चालल होत त्याच.बायकोही कामाला जायची.मुल शाळेत जाय़ची. तो येत असे आबांना भेटायला अधुन मधुन.त्याची कंपनी अचानक बंद पडल्यान त्याला ब्रम्हांड आठवल आता परत वाईला जाण फार कठीण झाल असत.आबांकडे तो सल्ला मागायला गेला.
आबा म्हणाले, " तू वाईला जावुन तरी काय करणार? तिकडे नोकरी मिळेल का?"
" नाही ना आबा आणि वहिनी आणि सुरेखाच अजिबात पटत नाही,दादा पण फार हलक्या कानाचा आणि गरम डोक्याचा आहे.इथच कुठ जमल काही तर बर होईल"
" तुला गाडी चालवता येते?"
" हो येते की,वाईला असतानाच शिकलो होतो तिकडे वाई महाबळेश्वर टॅक्सी पण चालवलीय ना मी"
" मग माझ्या कडेच कामाला राहतोस का? गाडी चालवायची आणि इतर काम पण करायची"
" चालेल की आबा तुमच्या रुपान देवच पावला म्हणायचा"
"अरे देव बिव काही नाही तुला दुसरी चांगली नोकरी मिळेपर्यंत आपण अस करु तुला मी पगार किती देवू?"
" काय तुम्ही द्याल तो"
" हे बघ हा व्यवहार आहे, मी कधी ड्रायव्हर ठेवलेला नाही पण मी चौकशी करतो,समीर,अमोलला विचारतो ,तू ये मग उद्यापासून"
" उद्या कशाला आबा आजपासून सुरु करु काम .तुम्हाला जायचय का कुठे?"
" नाही रे बाबा आताच मी फिरुन आलो आता रात्रीचा कुठे जाऊ? ये तू उद्या"
    
        आबांच्या सोबतीचा नाही तरी ड्रायव्हरचा प्रश्ण असा सहज सुटला.विशु माहितीतला होता,शिवाय आता त्याला नोकरीची निकडही होती. मुलगा खरच गुणी होता त्य़ाच्या वडीलांसारखाच. आबांचा त्याला आधार होता आणि आबांना त्याचा.
        "आबा,अंघोळ कराल ना? मी जाउ का घरी कि खायला काही आणून देवु तुम्हाला?" विशुच्या प्रश्णांनी आबा भानावर आले.
" जा तू घरी ये दहा-अकरापर्यंत .कुसुमताई येतील इतक्यात स्वयंपाकाला ,तेवढी भाजी आहे ना फ्रिजमधे बघ "
" ठिक आहे"
 विशु गेला.आबांना वाटले आता आपले कधी काय होईल सांगता येणार नाही. आयुष्य चांगले गेले तसे मरणही चांगले यावे एवढीच इच्छा आहे. विशुला आपल्याकडील नोकरीतून आपण काय देतोय? ना फंड,ना ग्रॅच्युइटी मग पेन्शनचे नावच सोडा.हा मुलगा इतक्या प्रेमाने मायेने आपली काळजी घेतो. कधी एक पैशाचा हिशेब चुकवत नाही,आपल्या खाण्यापिण्यापासून दुखण्याबाण्यापर्य़ंत सगळ्याची काळजी घेतो.त्याच्या बायकोला आपल्या ओळखीने जोशांच्या खानावळीत काम मिळाल त्याची ही त्याला जाणीव आहे.त्याच्या मुलांना आपण शिकवतो,त्यांच्या वह्या पुस्तकांचे पैसे देतो त्याबद्दलही तो कृतज्ञ असतो. एकदा अमेरीकेतुन येताना समीरच्या रोशनचे कपडे सिमरनकडून मागुन आणले.त्याच्या मुलांना कपाटभर कपडे,फारसे न वापरताच लहान होतात.सिमरनला भित भितच विचारल,पण तिने सहज दिले कपडे.रो्शनला कळल्यावर त्याने ढिगभर खेळणी,पुस्तके सगळच आणून दिल. त्या दिवशी विशुच्या सिध्दार्थची गोष्ट्च त्याने थक्क डोळ्याने ऐकली.
   
    पण तरी विशुच्या प्रामाणिकपणाची किंमत एवढ्याने होणार नाही. आबांना एकदम वाटले हे घर आपल्या पश्चात विशुच्या नावावर करावे. समीर आणि अमोल काही भारतात परत येणार नाहीत.शिवाय दोघांनी इकडे घरे घेतलेलीच आहेत. श्रीधर आणि मालुलाही देवदयेने काही कमी नाही. विचारानेच आबांच्या मनात उत्साह आला.  हा विचार लवकरात लवकर मुलांजवळ बोलायचे ठरवले त्यांनी. त्या उत्साहात आबांनी अंघोळ वगैरे आन्हिके उरकली.अंघोळ करतानाही त्यांच्या मनात विशुचेच विचार होते, आता सुरेशला फोन करतो, सुरेश म्हणजे आबांचा शाळु सोबती चांगला वकील आहे,त्याची प्रॅक्टीस मुलगा आणि सून पुढे चालवतात.त्याच्याकडून कायदेशीर बाबी समजावुन घेतलेल्या बऱ्या.

    कुसुमताई आल्या त्यांनी स्वयंपाक केला. त्यांच्या मुलीने घराची साफ सफाई केली. आबांनी पेपर वाचून संपवला. त्या मायलेकी बाहेर पडल्या तेंव्हा दहा वाजले होते. फोन वाजला आबांनी फोन उचलला आणि चक्क फोनवर सुरेशच.आबांना फार बरे वाटले
"अरे मी तुलाच फोन करणार तेवढ्यात तुझाच फोन आला"
" मार थापा लेका ,माझा फोन आला कि तुझ हे वाक्य ठरलेल आहे"
" नाही रे ,आज मी तुला फोन करणार कारण माझ तुझ्याकडे महत्त्वाच काम आहे?"
" काय झाल ?"
" काही नाहीरे पण फोन वर बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष बोलू ना,येतोस का घरी माझ्या निवांत बोलू"
"पाऊस बघतोस ना किती पडतोय आत्ता जरा कमी झालाय"
" पण मी विशुला पाठवतो ना तुला आणायला मग तर झाल ,जेवायलाच ये म्हटल असत पण कुसुमताईंनी किती आणि काय केलय तेही बघितल नाही अजून"
" जेवणाच नाही रे तेवढ महत्वाच ,येतो मी पाठव विशुला तू येतो मी अकरापर्यंत
विशु आला साडेदहा वाजता.
"आबा आज बॅंकेत जायचय का?"
" नाही विशु आज सुरेश कडे जावुन त्याला इकडे घेऊन येतोस? हे बघ आणि पैसे घेऊन येताना जोशी स्वीट मधुन सुरळीच्या वड्या आणि काहीतरी गोड घेउन ये"
"ठिक आहे, सुरेशकाकांना सांगुन ठेवलय का त्यांना फोन करताय?"
"झालय बोलण त्याच्याशी निघ तू"
सुरेश आला.
बऱ्याच दिवसांनी भेटल्यामुळे भरपूर गप्पा झाल्या,मग आबांनी घराबद्दलचा विचार सुरेशबद्दल बोलून दाखवला
 विशुच्या नावाने घर करुन देण्यात काही कायदेशीर अडचण नाही ना? असे विचारले.
" तुझी स्वकष्टार्जित मालमत्ता तू कुणालाही देवु शकतोस.पण मला विचारशील तर तू आत्ता त्याबद्दल विशुजवळ काहीच बोलू नको आणि मुलांना विश्वासात घेतल्याखेरीज काही करु नकोस"
"मुलांच्या कानावर घालणारच आहे,पण त्यांना सल्ला मागणार नाही तर निर्णय सांगणार आहे"
"ठिक आहे,तुझी मुले काही म्हणतील अस वाटत नाही,कारण त्या दोघांना काहीच कमी नाही हा भाग असला तरी मोह कुणाला सुटलाय? ,पण मुलांना न कळवता परस्पर  केलेस तर ती दोघे दुखावतील.शिवाय तुझ्या सुनांबद्दल मला काहीच माहित नाही."
"सिमरन आणि अमृता गोड मुली आहेत त्या दोघीही कमावत आहेत,मला नाही वाटत त्या काही बोलतील पण तू म्हणतोस तसे त्यांना विश्वासात घेवुन नक्की सांगतो, तुझ्याकडून कायदेशीर बाबी नंतर पूर्ण करू"
चांगले विचार मनात आले कि त्वरित आमलात नाही आणले तर ते नाहिसे होतात असे आबांनी वाचले होते. सुदैवाने तो शनिवार होता, मुलांशी दुसऱ्या दिवशी म्हणजे त्यांच्या शनिवारच्या रात्री सविस्तर बोलायचे त्यांनी ठरवले. त्या रात्री त्यांनी समीरला फोन करुन अमोलला पण बोलावून घ्यायला सांगितले आणि रविवारी सकाळी दोन्ही मुले आणि सुनांना एकत्र स्काईप कॉल लावला.मुले थोडी काळजीत पडली होती, आई सारखाच बाबांना काही आजार डिटेक्ट झालाय का? दोघांना एकत्र काय सांगायचे असेल? आत्या,काका ठिक असतील ना? नाना विचार त्या चौघांच्या मनात येवुन गेले
पण स्क्रिन वर बाबांचा नेहमीसारखा आनंदी चेहरा बघून त्यांचे टेन्शन एकदम कमी झाले
"बाबा ,आज अचानक चौघांशी एकत्र बोलावस का वाटल तुम्हाला ?" अमोलने सुरुवात केली
" तुमचा जास्त वेळ न घेता एकदम मुद्द्याचच बोलतो, माझे वय आता ८२ आहे, माझ्या दृष्टीने मी आयुष्य उत्तम जगलोय ,आता कुठली आशा ,अपेक्षा उरल्या नाहीत. माझे सध्याचे जगणे सुकर करण्यात विशुचा खूप मोठा वाटा आहे.तो माझा नुसताच ड्रायव्हर नाही तर माझी सगळी काळजी तो घेतो.माझे सगळे आर्थिक व्यवहार तो बघतोच पण माझे दुखले,खुपले तो प्रेमाने बघतो.मी त्याला जो पगार देतो त्याहुन कितीतरी पटीने तो माझ्यासाठी करतो माझा आधारच आहे तो. त्याला मी काही प्रोव्हींडट फंड देत नाही कि कुठला इंन्शुरन्स नाही त्याची बायको खानावळीत काम करते. मुलांचे शिक्षण मी करतो पण त्याच्या भविष्याची मलाच काळजी वाटते म्हणून मी ठरवलय माझे राहते घर मी त्याच्या नावाने करावे"
एका दमात बोलल्याने आबांनी पाणी प्यायला घेतले मधले दोन चार क्षण शांततेत गेले
सिमरन आणि अमृता एकमेकींकडे बघत होत्या,समीर आणि अमोलही शांत होते , ते चार दोन क्षण आबांना जिवघेणे वाटले ते काही बोलणार तेवढ्यात समीर म्हणाला ," आबा तुम्ही पूर्ण विचार करुन निर्णय घेताय ना? विशुने तुम्हाला धाक वगैरे नाही ना दाखवला ?"
"नाही रे मुलांनो.त्याला मी अजून काहीच बोललेलो नाही आणि बोलणार पण नाही एवढ्यात सुरेशशी सकाळी बोललो आणिआता तुम्हाला सांगतोय"
"बाबा, आम्हाला तुमची काळजी वाटते,सध्याच्या परिस्थितीचा विचार करता तुम्ही तिकडे एकटे राहता हे क्रेडीटेबल आहे पण पैशासाठी माणसे काय काय करु शकतात हे वाचतो,पाहतो आणि मग वाटते का तुम्ही ओल्ड एज होम मधे जात नाही?"
" अरे माझे हात पाय अजुन चालत आहेत, स्वातंत्र्याची माणसाला किती सवय होते हे मी तुम्हाला सांगायला हवे का? अगदी विकलांग झालो तर मग आहेच तो पर्याय, सध्या तो विषयच नाही,विशु माझ्या करता किती करतो ते तुम्हाला माहित आहेच.माझ्या निर्णयावर तुमचे मत मला ऐकायच आहे ,तुम्हाला विचार कराय़ला वेळ हवा आहे का?"
" नाही बाबा, तुमचे घर आहे, तुम्हाला हवे ते तुम्ही करु शकता ,फक्त लिगल मॅटर काय ते बघा आणि त्याला कधी सांगाय़चे ते सुरेशकाकांच्या सल्ल्याने बघा " समीर म्हणाला
"हो बाबा, दादा म्हणतोय ते खरे आहे, आणि विशु खरचच चांगला मुलगा आहे त्याला घर दिलेत तर त्याचे खूप प्रोब्लेम्स सॉल्व्ह होतील " अमोल म्हणाला
"सिमरन ,अमृता तुमच काय म्हणण आहे?"
"आम्ही काय़ सांगणार ? विशु is genuine guy, and it's your property " सिमरन उद्गारली
" बाबा,खूप छान विचार आहे तुमचा, मला आवडला तुमच्यासाठी करणा़ऱ्या विशुला तुम्ही घर दिलेत तर त्याच्यासारख्या अनेक मुलांना तुमच्या सारख्या सिनियर लोकांसाठी काम करावेसे वाटेल" अमृता म्हणाली
अमृताच्या बोलण्याने आबांना दिलासा वाटला. हि सगळ्यात धाकटी सून आपल्याला किती अल्लड वाटायची पण इतका वेगळा विचार करते !
" मला छान वाटले ,समीर,अमोल मला खात्री होती तुम्ही माझ्या निर्णयाला पाठींबा द्याल आणि सिमरन,अमॄता पण वेगळ वागणार नाहीत तरीही तुम्हाला सांगितल्याशिवाय कुठलेहीआर्थिक व्यवहार कराय़चा नाही असे मी ठरवले होते.तुम्ही माझ्या निर्णयाला विरोध केला असतात तर काय करायचे हे मात्र मी ठरवले नव्हते "
"बाबा तुम्हाला काय कराय़चे ते तुम्ही जरुर करा,पण निरवानिरव कशाला ? तुम्ही आम्हाला हवे आहात " अमृता भरल्या गळ्याने म्हणाली
"आपण कुणाला तरी हवे आहोत हे शब्दच आम्हा म्हाताऱ्यांना जगण्याचे बळ देतात पण हव हव असताना जाण्यात मजा आहे "
"बाबा, तुम्ही काय त्या लीगल प्रोसिजर्स पूर्ण करुन इकडे या बर ,आपण इकडे मजा करु " समीर म्हणाला
"खरच बाबा,पुढच्या आठवड्यात मुलांच्या सुट्ट्या सुरु होतील ,गेल्या महिन्यापासून तुम्हाला सांगतोय या तुम्ही इकडे" सिमरन म्हणाली
"बघू, तुम्हीच का नाही येत इकडे"
"तुम्हीच या आपण ट्रिप ला जाऊ,तुमचे इनामदार आलेत इकडे"
गप्पा बऱ्याच रंगल्या.तासभर बोलून मुलांनीच इकडे येवुन जाताना आबांना  तिकडे नेण्याचे ठरुन कॉल संपला
आबांच्या डोक्यावरचे ओझे उतरले.नंतरचा आठवडा गडबडीत गेला त्यांनी कायदेशीर मॄत्यूपत्र करुन आपली वास्तू विशुच्या नावाने करायचे लिहून ठेवले. सुलूचे दागीने त्यांनी पूर्वीच सुनांना दिले होते.स्वतःची जंगम रक्कम काही संस्थांना,काही विशुच्या मुलांच्या नावानी करुन ठेवली.

    अमोल ,अमॄता मुलांना घेवुन येणार असल्याचे त्यांनी कळवले.समीरला नव्या प्रोजेक्ट मुळे वेळ होणार नव्हता.मुले,नातवंडे येणार म्हणून आबा खुषीत होते.विशुच्या मदतीने त्यांनी सगळी तयारी केली. अमोल ,अमॄता अबीर आणि अनुजा आले घर भरुन गेले.दोन दिवसांनी मालू आली.श्रीधरचा मुलगा सून एक दिवस आले,सगळ्यांनी पावसात रायगडावर जायचा बेत आखला.सगळ्या दगदगीने आबांना ताप भरला.अमोल  आबांना डॉक्टरकडे घेवुन   गेला.पण म्हणता म्हणता सर्दी-ताप वाढून दुखणे नोमोनियावर गेले हॉस्पिटल ,औषधे सगळे झाले आणि आबांनी चार दिवसातच जगाचा निरोप घेतला
    सगळ्यांनाच हा धक्काच होता,समीरला कळवले,तो पण लगेच निघुन आला. विशुच्या दुःखाला पारावार उरला नाही. त्याच्यावर आबांनी वडीलांप्रमाणेच प्रेम केले होते आणि आता तर त्याला त्यांचाच आधार होता.आबांच्या इच्छेनुसार त्यांचे नेत्रदान केले. कुठलेही धार्मिक विधी करु नका असे त्यांनी लिहूनच ठेवले होते. आबा गेले, त्यानंतर ठरल्याप्रमाणे  एक आठवड्य़ानंतर अमोल,अमॄता जाणार होते.आता त्यांच्याबरोबर त्यांचे आबा नसणार .समीरही आलेला होता. दोन दिवसातच दोघांनी सुरेश काकांना बोलावुन घेतले.आबांच्या मॄत्यूपत्राचे वाचन कराय़चे ठरले.विशु खाली गाडीपाशी होता.त्याच्यासमोर आता अनेक प्रश्णचिन्हे होती. नोकरी अशी ध्यानिमनी नसताना गेली होती.आबांचा त्याला खूप आधार होता.मधुन मधुन बायको दुसरीकडे नोकरी बघा म्हणायची ,पण आबांबद्दल फार माया वाटायची आपण नसलो तर म्हाताऱ्याच कस होईल ,नोकरी करुन सकाळ ,संध्याकाळ फेरी मारली असती तरी भागल असतं त्यांच्याकडे काम फार नसायच पण त्यांच्यांशी गप्पा मारतानाही बर वाटायच. आता समीर भाऊंना विचारू गाडी द्याल का वापरायला, टूरीस्ट कार म्हणून वापरु.पण विचारयला जीभ रेटेल का? पोरांच काय सांगता येणार नाही.उगाच अपमान नको व्हायला

"विशु अंकल,तुम्हाला पप्पा बोलवतोय " अबीरच्या आवाजाने विशुच्या विचारांची साखळी तुटली
तो जिने चढुन वर गेला.हॉल मधे सगळे बसले होते तो कोपऱ्यात उभा राहिला
"बैस विशु " समीर म्हणाला
"बाबांचे मॄत्यूपत्र वाचल, त्यांनी हे घर तुझ्या नावानी करायला सांगितले आहे,तेंव्हा हे घर आता तुझे आहे विशु "
ऐकून विशुला हुंदकाच फुटला
"रडू नको विशु,तू बाबांच खूप प्रेमाने केलेस तुझ्या जीवावर आम्ही तिकडे निश्चिंत होतो,गेल्याच महिन्यात बाबा आमच्याशी सगळे बोलले होते " अमोल म्हणाला
"ती वेळ इतक्या लवकर येईल अशी आम्हाला कल्पना नव्हती " समीर
"कदाचित त्यांना आपल्या मॄत्यूची चाहूल लागली असेल " अमॄता
"विशु आम्हाला वाटते बाबांची गाडी पण तूच घे तू ती वापर तुझं ड्रायव्हींग चांगल आहे,बाबा नेहमी म्हणायचे  .हल्ली उबेर,ओला कंपन्या निघाल्य़ात मी तुला मदत करेन त्यांच्या तर्फे तुला पुण्यातच गाडी चालवून किमी वर पैसे मिळतील " अमोल म्हणाला
विशुला बोलवत नव्हते त्याचे डोळे गळतच होते
मोठ्या मुश्कलीने डोळे पुसत तो म्हणाला," आबा मला माझ्या वडलांच्या जागी होते त्यांनी काही द्याव म्हणून मी नव्हतो हो करत मला पगार मिळतच होता ना "
" अरे वडील मानत होतास ना ,म्हणूनच या घरावर त्यांनी तुझे नाव घातले आहे.आम्हाला त्यांनी भरपूर दिलय तू नाही म्हणू नको "
"समीर दादा,अमोल दादा माझ्या सख्या भावाहून तुम्ही माझ्यासाठी करताय कसे फेडू तुमचे उपकार ?"
"अरे आम्ही आबांची मुले,म्हणजे तुझे मोठे भाऊच ना, मग उपकार कसले मानतोस.भावासारखी माया कर म्हणजे झालं" अमोल म्हणाला
"आम्ही  पुढल्या आठ्वड्यात  निघणार,तोवर इथे राहिलो तर चालेल ना विशु?"
"असं बोलून मला लाजवता होय? रहा कि हवे तेवढे दिवस आणि आबा गेले तरी इकडे यायच सोडू नका "
" अरे येऊना आम्ही ,आई बाबा नसले तरी आमचे काका आत्या आहेत कि इथे आणि हा देश आमचा पण आहेच ना?"
सुरेश काका बाकीच्या फोर्म्यालिटिज पूर्ण करुन कागदपत्रे तुझ्या ताब्यात देतील आम्ही असतानाच सगळे काम होईल असे आम्ही बघू आणि जाताना आम्ही तुला घराची किल्ली देवू.



एका सत्यघटनेवर आधारित कथा आहे हि.आजकाल आम्ही स्वदेशात मुले परदेशात अशी घरोघरी गत झालेली आहे.पैसा आहे पण मुले जवळ नाहीत, असलेल्या पैशाचा उपभोग घ्यायला शरीर साथ देत नाही,कुठे जोडीदार गेल्याचे दुःख आहे. हि मंडळी मग इथल्या कुठल्या नातलगाच्या,नोकरांच्या साथीने जीवन कंठंत असतात.त्यांच्याजवळ असणा्री स्थावर-जंगम  मात्र मुलांनाच द्यायची यांची इच्छा असते.तिकडच्या मुलांनाही भरपूर मिळूनही आईवडीलांच्या मालमत्तेवर हक्क दाखवाय़चा असतो अशी अनेक उदाहरणे मी जवळून पाहिली .मग मला वरील घटना कथारुपात लिहाविशी वाटली.आबांनी विशुवर उपकार केलेत असं नाही पण त्याच्या प्रामाणिकपणाचे मोल जाणुन त्याचे योग्य बक्षिस त्यांनी दिले आणि त्यांच्या मुलांनी पण वडीलांच्या निर्णयाचे स्वागत केले हा मुलांचा मोठेपणा मला ठळकपणे जाणवला.आज एक भाऊ परदेशात असेल तर इथे राहणाऱ्या आपल्या सख्या भावाला आईवडीलांची मालमत्ता द्यायला त्याची तयारी नसते तेंव्हा त्याला हक्क आठवतो पण आई-वडीलांची दुखणी बाणी काढण्यातली कर्तव्यकसूर केली असते त्याकडे डोळेझाक असते आणि मग सुरु होतात भांडणे. अशा सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हि घटना मला फार भावली. आपण आपल्या विकासासाठी देशाच्या सीमा पार केली तशीच मनाची दारे विशाल करायला शिकलो तर किती प्रश्ण सुटतील ना?

1 comment:

Unknown said...

फार छान आहे ही कथा,असे स्नेहबंध जपण्याचं भाग्य फार थोड्यांना लाभते,असे पाहिलं ऐकलं की जगण्याची उमेद वाढते.