Tuesday, March 27, 2018

शांतिनिकेतनची सहल

  शांतिनिकेतन शाळेबद्दल तिसरीच्या ’थोरांची ओळख’ या आम्हाला असलेल्या इतिहासाच्या पुस्तकात पहिल्यांदा वाचलं त्यावेळच पुस्तकातील झाडाखाली भरणाऱ्या शाळेच चित्र आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. तेंव्हापासून शांतिनिकेतन आणि गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांनी मनात घर केलं.पुढे रविंद्रनाथांच्या अनेक कथा,कविता वाचल्या (अर्थात सगळ्या अनुवादित)गोरा नावाची उत्कृष्ट कादंबरी वाचली. .पु.ल.देशपांड्यांची रविंद्रनाथांवरील तीन व्याख्याने प्रत्यक्ष ऐकली.बोरकरांचे आनंदयात्री रविंद्रनाथ हे पुस्तक वाचले आणि दिवसेंदिवस या व्यक्तिबद्दलचा मनातला आदर वाढतच गेला. एका धनाढ्य घरात जन्माला आलेल्या ,पाश्चात्य वातावरणात वाढलेल्या रविंद्रनाथांचे मन किती संवेदनाक्षम होते ! गरीबांची दुःखे त्यांनी जवळून बघितली, लहान मुलांकडे ज्या काळी कमालीचे दुर्लक्ष केले जाई त्या काळी मुलांच्या शिक्षणाकरीता त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह धरताना ते शिक्षण जास्तीत जास्त आनंददायी,सोपे व्हावे या करीता त्यांनी सहजपाठ लिहिले. शिक्षण समाजाभिमुख हवं,निसर्गाच्या सानिध्यात हवं आणि संगीत,चित्रकला,शिल्पकला अशा नाना विद्या कला देखील भाषा,गणित,शास्त्र अशा विषयांएवढ्या महत्त्वाच्या असून शालेय वयातच विद्यार्थांना त्यापैकी ज्याच्यात रस आहे,त्यातच त्याला प्राविण्य मिळवता यावे यासाठी शांतीनिकेतनाची स्थापना झाली.

                मुलांना मार्गदर्शनासाठी त्यांनी देशभरातील दिग्गज व्यक्तींना बोलावुन घेतले.कित्येकांनी अल्प मोबदल्यात मुलांची जीवने घडवली.सत्यजीत रे, राम किंकर , अमर्त्य सेन  अशा थोर विभूती शांतीनिकेतनच्याच. त्यामुळे शाळेत असल्यापासून शांतीनिकेतन बघण्याची माझी फार इच्छा होती. पण म्हणतात ना, कोणतीही भेट होण्यासाठी वेळ यावी लागते मग ती भेट व्यक्तीची असो कि वास्तुची. लेक इंग्लंडला शिकायला गेल्यामुळे तिच्या निमित्ताने इंग्लंडला जाणे झाले पण कलकत्त्याला जाणे राहिले. इंग्लडला गेले असताना शेक्सपियरचे जन्मगाव स्ट्रॅटफोर्ड अपॉन -एव्हॉन बघायला गेलो होतो.शेक्सपियरच्या घराबाहेरील बागेत रविंद्रनाथांचा पुतळा बघून तर माझ्या डोळ्यात पाणीच आले. इतक्या थोर व्यक्तीच्या शांतिनिकेतनात न जाणारी मी किती करंटी ! गुरुदेवांबद्दलचा आदर आणिकच दुणावला.

               शेवटी इशान्य भारतासह कलकत्ता बघायचा योग जुळून आला. शांतीनिकेतन बघाय़ला एक दिवसच मिळत होता. कलकत्त्याहून सकाळी ७ वाजताची ट्रेन होती.ती वेळेवर निघाली पण ट्रॅकवर काम चालू असल्याने गाडी लेट पोचणार होती.दोन-तीन तासाचा प्रवास होता. दुतर्फा हिरवीगार शेतं आणि असंख्य तळी त्यात फुललेली कमळे आणि नाना तऱ्हेचे पक्षी.निसर्ग सुंदर होता पण आपल्या लोकांनी टाकलेल्या प्लॅस्टिकचा कचरा आणि घाण डोळ्याला कितीही नाही म्हटल तरी टोचत होता. गाडीतल्या प्रवाशांना आम्ही सहज शांतीनिकेतना बद्दल विचारलं  तर बहुतेकांना शांतिनिकेतन माहित नव्हते आणि ज्यांना माहित होते त्यांपैकी फारच थोडे तेथे जाऊन आलेले होते !

                 दहा-साडेदहाला आम्ही बोलपूर स्टेशनावर उतरलो.स्टेशनवरच गुरुदेवांचे एक सुंदर स्मारक आणि संग्रहालय आहे. त्यात गुरुदेवांचे सगळे चरीत्र,लहानपणापासून फोटो,त्यांनी दिलेल्या नाना विध देशातील भेटींबद्दलचे वुत्तांत,त्यांच्या कुटुंबियांचे फोटो.गुरुदेवांच्या शेवटच्या आजारात त्यांना कलकत्त्याला नेले ती ट्रेन तशीच्या तशी ठेवलेली आहे.फारच सुंदर आहे ते संग्रहालय !
तेथुन बाहेर पडल्यावर एक ई-रीक्षा वाला भेटला तो शांतीनिकेतन आणि परिसर फिरवुन दाखवतो म्हणाला. त्या मुलाला बऱ्यापैकी माहिती होती आणि हिंदी बोलत होता हे महत्वाचे. झाडाखाली भरणारी ती शाळा डोळे भरुन बघितली. राम किंकरदांनी तयार केलेली शिल्पे बघीतली.रविंद्रनाथांचे नोबेल पारितोषक ठेवलेले संग्रहालय मात्र बंद होते.फारच निराशा झाली ! जाण्यापूर्वी मी साईट इतक्या वेळा बघितली होती पण कुठेच ते कधी  बंद असते याची माहिती नव्हती. त्या इमारतीच्या बाहेर उभ्या असलेल्या सुरक्षा आधिकाऱ्याला आम्ही किती दुरुन आलोय वगैरे सांगून आत सोडण्याची विनंती करुन बघितली पण त्याने फारच कर्तव्य तत्परता दाखवून आम्हाला तिथे उभे पण राहू दिले नाही. नोबेल पदक तर खूप वर्षांपूर्वी हरवलय ते वाचले होते. हि तत्परता त्यांनी त्यावेळी दाखवली असती तर कदाचित पदक चोरीला जाते ना ! असो. नंतर तो मुलगा आम्हाला विविध प्रांतातल्या कला आणि वस्तुंचे संग्रहालय दाखवायला घेऊन गेलो. इशान्य भारतातील सगळी राज्ये,ओरिसा ,बंगाल अशा राज्यांच्या कलाकृतींचे सुरेख संग्रहालय होते .परत निघण्याची वेळ कधी झाली समजलेच नाही.त्या मुलाने आम्हाला परत स्टेशनवार सोडले.परत मेल्या(जत्रेच्या) च्या वेळी या असे पुन्हा पुन्हा सांगत त्याने आमचा निरोप घेतला. टागोरांचे संग्रहालय, शांतीनिकेतन्,रामकिंकरदांची शिल्पे,विविध राज्यांच्य़ा कला पाहून मन भरुन गेले.


            पण ते बोलपूर गाव इतर सगळ्या खेडेगावांसारखेच.मातीचे रस्ते,धुराळा,उघडी गटारे,प्लॅस्टीक आणि तत्सम कचरा.  आपले मन किती तुलना करणारे असते ! शेक्सपियरचे गाव मी बघितलेच नसते तर शांतिनिकेतन त्या घाणेरड्या बोलपूर गावासकट मला आवडलेही असते. एकवेळ ते अस्वच्छ गाव पण सहन होईल मात्र कलकत्त्याहून येतानाच्या सहप्रवाशांची टागोर किंवा शांतिनिकेतनाबद्दलची अनास्था मनाला जास्त वेदना देवुन गेली. शेक्सपियरच्या त्या गावात मी कित्येक छोट्या मुलांना त्यांच्या आई,वडीलांबरोबर बघितले होते. आपल्या भाषेतील एका महान कवीआणि नाटककाराची आपल्या मुलांना इतक्या लहान वयात ओळख करुन देणऱ्या त्या पालकांबद्दल मला खरचच खूप कौतुक वाटलं. आपण आपल्या मुलांवर असे संस्कार करतो का? हि देखील विचार करण्यासारखी गोष्ट आहे.यातही अंडे आधी का कोंबडी आधी या कोड्याप्रमाणे दाखवण्याजोगी स्मारके आपल्याकडे आहेत किती हा प्रश्ण ही आहेच.

          आपल्या ऐतिहासिक वारशाबद्दल आपण तोंडाने नुसत्या गप्पा मारतो आणि तो जतन करायची जबाबदारी कोणीच घेत नाही.आज टागोरांसारख्या जगद्विख्यात विश्वकवीचे स्मारक बघायला जागातून पर्यटक येत असतील तेंव्हा एक उत्कृष्ट पर्यटन केंद्र म्हणून ते विकसित करायला काय हरकत आहे? टागोरांच्या जीवनावर एखादा लघुपट काढुन त्यांच्य़ा कार्याची माहिती त्यातुन देता येईल. त्यांच्या अनेक कथा,कांदबऱ्या,कवितांवर बरेच सिनेमे निघालेत त्यांतील क्लिप्स दाखवता येतील. बोलपूर खेड्याचा बाज राखत स्वच्छ रस्ते आणि स्वच्छ परिसर, जागोजागी मार्गदर्शक नकाशे लावुन पर्यटकांची सोय करता येईल.शांतीनिकेतन मध्ये तयार होणाऱ्या उत्तम कलाकृती विकायला सुरेख बाजार असे किती तरी करता येईल.रविंद्रनाथाचे वाङ्मम जवळपास सगळ्या भारतीय भाषा आणि इंग्रजीत अनुवादित झाले आहे त्याच्या विक्रिसाठी भव्य दुकान करता येईल. रविंद्रनाथांसारख्या उत्तुंग प्रतिभेच्या विश्वकवीचे त्याला साजेसे स्मारक केले तर त्यांच्या अनमोल साहित्याचा नव्या पिढ्या पण आस्वाद घेतील आणि ते अजरामर होईल . पण हे  घडावे कसे ? समर्थांनी म्हटले आहे  केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे . पण ते कोणी केले पाहिजे त्याबद्दलच घोळ आहे. बंगालने देशाला रविंद्रनाथ टागोर, विवेकानंद,अरविंद घोष ,रामकृष्ण परमहंस,ईश्वरचंद्र विद्यासागर,चित्तरंजन दास, सुभाषचंद्र बोस अशी एकाहुन एक नररत्ने दिली आहेत. रामकृष्ण मिशनमुळे स्वामीजींचे स्मारक कलकत्त्यात झालय. योगी अरविंदाची स्मृती पॉंडेचरीत जतन केलीय.गुरुदेव रविंद्रनाथांच्या दैवी मात्र अशी कोणतीच संस्था नाही आणि  तेथील कम्युनिस्ट राज्य सरकारला या सगळ्या कामांसाठी पैसा खर्च करणे योग्य वाटत नसावे !
एकूण आपल्या हृदयातील गुरुदेवांची प्रतिमा पुजायची आणि जमेल तेंव्हा शांतिनिकेतनात जाऊन त्या महात्म्याच्या वास्तव्याने पुनित झालेल्या वास्तुचे दर्शन घ्यायचे एवढेच माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीच्या हातात आहे .

No comments: