Monday, June 17, 2024

चैत्रातले हळदी-कुंकू

माझ्या शालेय जीवनातल्या बहुतेक सुट्ट्या भोरला गेलेल्या आहेत.भोरच्या ऎसपैस घरात सुट्टीमध्ये बरीच मंडळी यायची.मी-आणि माझी धाकटी बहीण जायचो, भोरातच मंगळवार पेठेत राहणाऱ्या माझ्या आत्याच्या दोघी मुली सुट्टीला तेथे यायच्या.मुंबईची आत्या यायची. कधी सोलापूरहून आमचे मोठे काका सहकुटुम्ब सहपरिवार यायचे, पुण्यातले दोन काका एकदोन दिवस येऊन जायचे.एकूण घर भरलेले. आम्हा मुलांची चैन असायची.शाळेला सुट्टी,सकाळी अंघोळी वगैरे उरकल्यावर काकुला स्वयंपाकात थोडी फार मदत करायची. भोरला काकांकडे भरपूर पुस्तके होती. त्यामुळे आमची दुपार बहुतेक वेळा पुस्तके वाचण्यातच जायची. कधी कधी काकू साबुदाण्याच्या पापड्य़ा, बटाट्याचा किस, पापड करण्याचा घाट घाली मग ते ही आम्ही हौसेने करु लागायचो. एकुणात सुट्टी मजेत जायची, पण सगळ्यात मजा म्हणजे चैत्रात घरोघरी हळदी-कुंकू असायचे. दररोज तीन चार, तर कधी पाच सहा घरुन आमंत्रणे यायची. काकु आम्हाला तिच्या मेधा सकट सगळ्या पुतण्या,भाच्यांना घेऊन जायची. तिच्याकडे एक स्टीलचा डबा असे. प्रत्येक घरी कागदावर किंवा द्रोणात कैरीची डाळ मिळायची .पहिल्या एक दोन  घरी डाळ आम्ही खायचॊ.पुढच्या घरी काकु आम्हाला डाळ डब्यात ठेवायला लावायची. ओल्या हरबऱ्याची ओटी तिच्या पिशवीत पडायची.पन्हे आम्ही प्यायचो. घरी आल्यावर सगळी डाळ एकत्र करुन त्यावर काकु पुन्हा एकदा खमंग फोड्णी घालायची. ती डाळ घरातल्या पुरषांना आणि आजीला मिळायची.आमची पोटे बहुदा भरलेलीच असत. ओल्या हरबऱ्याची खमंग उसळ बनाय़ची. 

एक दिवस आमच्या घरी हळदीकुंकू ठरायचे. घराची साफसफाई होई. घरात करंज्या,लाडू बनत.कलिंगडे,टरबुजे येत. आम्हाला घरोघरी जाऊन आमंत्रणे करायचे काम असे. हळदिकुंकवाच्या दिवशी जेवणे झाली कि आवराआवरीला सुरुवात होई. बाहेरच्या हॉलमधे आम्ही काकुच्या साड्या,किंवा चांगल्या चादरीचे पडदे बनवायचो .पुढे टेबलावर देवीची आरास असे. पायऱ्या बनवुन त्यावर घरातल्या शोभिवंत वस्तु, फराळाचे पदार्थ ठेवले जात.पुढे सुंदर रांगोळी.देवीसाठी काकु कधी कलिंगडाचे कमळ तर कधी कलिंगडाची होडी करी ,टरबुजाची कमळे दोन्ही बाजुंना ठेवत असे. काकु जन्मजात कलावंत होती, अगदी सहज ती रांगोळ्या काढी, कलिंगड,टरबुजाची कमळे करी,आम्ही थक्क डोळ्यानी तिची कलाकुसर बघायचो. होडीत किंवा कमळात ती देवी स्थानापन्न होई. आमच्या जवळचा मणी,खडे,रंगीत दगड असा सगळा मौल्यवान खजिना देवीच्या पायापाशी रुजु करायला आम्ही एका पायावर तयार असायचो. त्यांच्य़ा रंगीबेरंगी आकॄत्या तयार करायचो आम्ही. आमची इंदाआजी पण आमच्या बरोबर हौशीने या आराशीत भाग घ्यायची. एकदा तिने आम्हाला बांगड्य़ांच्या काचा आणायला सांगितल्या होत्या.आत्याच्या घरा जवळ एक कासाराचे दुकान होते. आत्याच्या मागे लागुन त्या कासारणी कडे तिला नेले.ती पण तिच्या एवढ्या धबडग्यातुन कासारणीकडे आली तिच्याकडे आमच्या करता फुटक्या बांगड्याची मागणी केली. मग त्या काचांचे तुकडे पिशवीतुन जपुन आणले.आजीने रात्री सगळी कामे उरकल्यावर समई वर त्या काचा वाकवुन एकात एक घालुन त्याचे इतके सुंदर तोरण बनवुन दिले कि आम्हाला आजीबद्दल फारच आदर दाटुन आला. आज आठवताना वाटते, कि आजीला त्यावेळी इतकी कामे असत, तिची साठी सहज उलटुन गेली होती, तरी नातींसाठी इतका उत्साह ती कुठुन आणत होती? ऐन तारुण्यातच वयाच्या बत्तीस तेहेतीसाव्या वर्षी आजीला वैधव्य प्राप्त झालं होतं आणि त्या काळात तिला सुवासिनींच्या कुठल्याच कार्यक्रमांना जायची मुभा नव्हती, असं असून देखील ती हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात सगळी कामे आनंदाने करायची, त्यावेळी खरचचं जाणवलं नाही.  तिला कधीच फुले घातलेली बघितलं नाही. आमची दुसरी आजी आमच्या घरी आली कि अंघोळ झाली कि तिची लाकडी पेटी घेऊन बसे, कपाळाला मेण लावुन त्यावर कोरडे कुंकू लावत असे. एकदा ती गेल्यानंतर आमची इंदा आजी आमच्याकडे आली. तेंव्हा तिची अंघोळ झाल्यावर माझी धाकटी बहिण तिला म्हणू लागली,"आजी ,तू काकी आजी सारखं कुंकू लाव ना " आजी ने तिच्याकडे दुर्लक्ष केले. पुन्हापुन्हा ती म्हणू लागल्यावर माझी आई तिला रागावली,तेंव्हा आजी आईलाच म्हणाली,’अगं त्या लेकरावर का रागावतेस? तिला काय कळतयं ’ सीमा आईच्या रागावण्याने गप्प बसली , पण आजीबद्दलचा माझ्या मनातला आदर वाढला . 

थोडक्यात हळदीकुंकवाची तयारी खूप सुंदर होई. हॉलमधे मोठी सतरंजी घालणे वगैरे कामे पुरुषांच्या मदतीने होत. सकाळची जेवणखाणी उरकली की काकु आणि आजीची हळदीकुंकवाच्या तयारीला सुरुवात होई. भिजवलेले हरबरे उपसुन ठेवणे. कैरी किसुन देणे अशा छोटी मोठी कामांना आमचा हातभार लागे, पण भिजवलेली डाळ कुटायचे काम आजी आणि काकुच करत. मिक्सर नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर डाळ बनवणे सोपे काम नसे !. आत्या माहेरवाशीण म्हणून आलेली असे, ती पण असे मदतीला.पण एकूण कामे खुप कष्टाची होती. कैरीचे पन्हे पण असेच मोठे काम असे. पडवीत बरेच माठ भरुन ठेवलेले असत त्यातले पाणी वापरुन कैरीचे पन्हे मोठ्या कल्हईच्या पातेल्यात केले जाई.

सहा नंतर बायका येऊ लागत , त्या आधी आमचा नट्टापट्टा होऊन आम्ही ठेवणीतले नवे फ्रॉक घालुन पावडर,कुंकू करुन तयार होत असू.  हळदीकुंकू, अत्तर लावणे,गुलाबपाणी शिंपडणे आणि वाटली डाळ देणे हि कामे आम्ही सगळ्या करायचो. हरबऱ्याची ओटी काकु भरायची आणि पन्हे भरायचे काम आत्या ,आजी करायच्या ते हळुवार पणे करावे लागे. काकु हाडाची शिक्षिका असल्याने ती आम्हाला कामे अशा प्रकारे वाटुन द्यायची कि आमच्यात भांडणे न होता कामे बिनबोभाट होत. रात्री साडेआठ नऊ पर्यंत बायकांची येणी जाणी चालत. काका लोकांना बाहेर येता येत नसे. रात्री आमचा मामा, आत्याचे यजमान बापुराव, काकांचे आणखी काही मित्र येत मग  स्वयंपाघरात या खास लोकांची बैठक असे,त्यांना हरबऱ्याची उसळ,करंजी,लाडू मिळे. मुली दमल्या असे म्हणत आम्हालाही तो खाऊ मिळॆच. कलिंगड, टरबुजे चिरली जात. आजी काकु,आत्या,मामी सगळ्यांना नाव घ्यायचा आग्रह करायची. सगळ्या जणी आजीचा मान राखत उखाणे घेत. आम्हाला ते ऐकताना फार मजा यायची. आमच्या आत्याचा उखाणा ठरलेला असायचा ’ हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी रघुनाथरावांचे नाव घेते हळदीकुंकवाच्या दिवशी’ आत्याची लेक म्हणे, " आईने दरवर्षी बर्फांच्या राशींवर बसवुन बाबांचा स्वभाव थंड झालाय"  आमचा सुरेश मामा पण हौसेने भला मोठा उखाणा घ्यायचा  "पुणं झालं जुनं, सातारा झाला म्हातारा..... शेवटी गाठली सांगली गीता सगळ्यांहुन चांगली".अशा चेष्टा विनोदांत गप्पा गोष्टीत वेळ मजेत जायचा.

मे महिन्याच्या सुट्टीच्या अशा या सुरेख आठवणी. मध्यंतरी जी.ए.कुलकर्णी यांची ’चैत्र’ नावाची कथा वाचली होती. त्यातल्या गरीब पण स्वाभिमानी स्त्रिचा हळदीकुंकवाच्या दिवशी श्रीमंताच्या घरी अपमान होतो आणि ते बघुन तिचा मुलगा दुखावतो, मग ती मुलाच्या मनातुन त्या घराबद्दलची आढी घालवण्यासाठी घरातले सोने विकुन हळदिकुंकवाचा घाट घालते असे काहीसे कथानक आहे.ते वाचताना मला भोरचे हळदीकुंकू आठवत होते. आमचे घर त्या कथेतील मामलेदारांसारखे गडगंज श्रीमंत नव्हते आणि फार गरीबही नव्हते. सगळ्यांचे आदरातिथ्य सारखेच होत असे. भोर मधे घराघरात एकोपा होता. सगळेच मध्यमवर्गीय सुखी समाधानी. घरात एक दिवसाच्या हळदिकुंकवाच्या समारंभासाठी घरातल्या बायकांचे आठ दहा दिवस कामात जात.आधीची तायारी, त्या दिवसाची धावपळ , नंतरची आवराआवर. आणि हे सारे सुट्टीत घरात आलेल्या वीस पंचवीस पाहुण्यांचे सारे करत असतानाच. पण काकु, आजी ,आत्यांनी कधी कुरकुर ,चिडचिड केलेली आठवत नाही. या सगळ्या माउल्यांच्या अपार कष्टाच्या खतपाण्यामुळे आमचे बालपण समॄध्द झाले यात शंकाच नाही. 



No comments: