माझी नोकरी संपत आली . माझ्या टीम मधील मुलामुलींना आपण ट्रीपला जाऊ असे चार वर्षांपासून देत आलेले अश्वासन मी पुरे करु शकले नाही, मी लोकप्रतिनिधी नसल्यामुळे टिम मधल्या मुलांची छोटीशी मागणी पुरी न केल्याची मलाही फार खंत वाट्त होती, पण land records सारख्या department चे काम आम्ही करत असल्याने सतत कामाचा ताण असे, रोजच्या नवनव्या मागण्या,कधी सर्व्हर स्लो,कधी सर्व्हर डाऊन,कधी स्वातंत्र्य मिळाल्याला ७५ वर्षे झाली म्हणुन मोफत सातबारा योजना,कधी महसुल सप्ताह असे काही ना काही चालू असे व त्यामुळे सुट्टीचा एक दिवस आम्ही सहल ठरवु शकत नव्हतो.
नोव्हेंबर माझा शेवटचा महिना. आक्टोबरच्या सुरुवातीला मुलांनी माझ्याकडे ट्रिपला जायची आठवण केली, पहिल्य़ा शनिवार रविवार नवरात्र होते, दुसऱ्या विकएंडला दसरा होता, तिसरा शनिवार रविवार सोईचा होता, मला खर तर सकाळी जाऊन संध्याकाळी येणे बरे पडणार होते,करण माझ्या मुलीचे लग्न डिसेंबर अखेरीस असल्याने मला लग्नाची पण बरीच कामे दिसत होती. मुलांनी पुण्याजवळची बरीच ठिकाणे शोधली पण योग्य काही मिळेना, कोकणातील दिवेआगर जवळ एक हॉटेल मिळाले मात्र इतक्या दूर जायचे तर एक मुक्काम करणे अनिवार्य होते, मग मी हि एक दिवस काढायचा असे ठरवले व आमची ट्रिप जायचे नक्की झाले.
आयुष्यात प्रथमच मी फक्त बॅग घेऊन निघणार होते, मला कुठलीही चौकशी करायची नव्हती, स्वयंपाकघरात तयारी करायची नव्हती. मी बॉस असल्याने मला न्यायला बस घराजवळ येणार होती. शनिवारी पहाटे साडेसहाला सेनापती बापट रोडवर मला न्यायला बस आली.बसमधुन राहुल, सौरभ,दीप, दिपाली आणि ऋतुजा आलेले होते. त्यांना किती लवकर उठुन यावे लागले असेल, पण कोणाच्याच चेहऱ्यावर मरगळ नव्हती.सगळे फारच उत्साहात होते.माझी बॅगही मुलांनी घेऊन बसमधे ठेवली. वाटेत दोन -तीन ठिकाणी बस थांबत बाकीच्यांना घेणार होती. बाणेर ला सचिन चढला,बस हाय वेला येऊन थांबली.अर्चना,सीमा आणि प्रियांका ,सजदा चार ठिकाणाहुन तेथे येणार होत्या, तिघींना त्यांच्या नवऱ्यांनी सोडले.सीमा तिच्या तीन वर्षाच्या मुलीला सोडून येत होती, प्रियांकाचा पाच वर्षाचा मुलगाही तिला सोडायला आला होता. त्या मुलांच्या आयांचा वेळ मी घेत असल्याच्या भावनेने मला अपराधी वाटले. त्या दोघींनाही मुलांना सोडणे अवघड वाटले असेल पण त्या मुलांच्या वडीलांनी मुलांची जबाबदारी घेऊन बायकोला एक दिवस मजा करायला पाठवणे हा समाजातला बदल मला आवडला. माझ्या वेळी मी असे करु शकले नव्हते !
पुढच्या स्टॉपवर अभिजित व शेवटी दिग्विजय चढला. कुठल्या कुठे लांबवर मुले राहतात आणि रोज वेळेवर ऑफिसला पोचतात ,विचारानेच मन भरुन आले. आता गाडीने वेग घेतला, ताम्हिनी घाट सुरु झाला, गप्पा,गोष्टी ,चेष्टा विनोदाला बहर आला. मुलींनी एक दिवसाच्या ट्रिप करता केवढे सामान आणले होते ! त्यांच्या सामानाने मागचे पूर्ण सीट भरुन गेले होते ! पावसाळा संपल्यामुळे डॊंगर हिरवेगार होते,रस्ता सुरेख होता व वाहतुक बेताची होती त्यामुळे मजा येत होती. तरुणाईच्या सहवासाने मन अगदी हलके हलके झाले होते. तहान भुकेची मला तर आठवण नव्हती. बस थांबवली समोर दरीत ढग उतरुन आले होते,हवेत हवाहवासा गारवा होता. मुलामुलींनी लगोलग फोटो काढायला सुरुवात केली, मला मधे घेऊन फोटो सेशन झाले. कॅमेऱ्याशी माझी ओळख खूप उशीरा झाली ,मी कधी फोटो काढलेच नाहीत, मोबाईलच्या कॅमेऱ्यानेही मी फोटो काढु शकत नाही,आणि माझे फोटो कधी चांगले येत नाहीत त्यामुळे सगळी दृष्ये डोळ्यात साठवण्यावर माझा भर असतो ! पोटभर फोटॊ काढल्यावर आमचा पुढचा प्रवास सुरु झाला. नऊ वाजुन गेले होते, नाष्ट्यासाठी हॉटेल्सची शोधाशोध सुरु झाली. चांगलेसे हॉटेल पाहुन गाडी थांबवली, नाष्ता केला. पोटे भरल्याने पुढच्या प्रवासात उत्साह आणिकच वाढला. गाण्यांच्या भेंड्या सुरु झाल्या, मुलींना नवी,जुनी बरीच गाणी येत होतीच मात्र सौरभ आणि राहुलने गवळणी,भारुडे,भजने म्हणुन खुपच बहार आणली . दिवेआगरला कधी पोचलो ते समजलेच नाही
आम्ही हॉटेलवर गेलो तेंव्हा साडेबारा वाजले असतील.तिकडे सामान टाकुन दिवेआगरच्या गणपतीचे दर्शन घ्यायल गेलो, मी वीस वर्षांपूर्वी दिवेआगरला गेले होते, त्यावेळी देऊळ खुपच लहान होते,आता खुप मोठे मंदिर बांधलय. सोन्याची गणेश मुर्ती कडेकोट बंदोबस्तात आहे. दुपारचे एकचे उन बाहेर चटचटत होते,देवळात मात्र निरव शांतता व थंडगार वातावरण होते.दर्शन छान झाले. आमच्या हॉटेलमधे शाकाहारी जेवणाची व्यवस्था होती, मासे खाय़ला आमच्यातले काही दुसरीकडे गेले. माझ्यासोबत पाच सहा जण हॉटेलवर आले.अत्यंत रुचकर आणि घरगुती जेवण होते.गरम गरम तांदळाची भाकरी,रस्साभाजी, कोशिंबीर्, चटणी,पापड,आमटी भात आणि थंडगार सोलकढी. मस्त जेवण झाले , पहाटे पासुन उठल्याने पोटभर जेवल्याने डोळे मिटु लागले. तास दोन तास झकास ताणुन दिली, पाचच्या सुमारास बीचवर निघालो. चालत दहा मिनिटांच्या अंतरावर बीच होता, तरी हॉटेलवाल्याकडून स्कुटर घेऊन सचिनने मला बीचवर सोडले, इथल्या बीचवर काळी वाळु आहे, बरेच स्टार फिश पाण्यातुन वाहुन किनाऱ्यावर येत होते. सजदा आयुष्यात पहिल्यांदाच समुद्र बघत होती ! तिच्या चेहऱ्यावरील आनंद,आश्चर्य बघायला मजा वाटत होती ! सगळे पाण्य़ात शिरले,मलाही यायचा आग्रह करत होते,पण शिंगे मोडुन वासरात जाणे मला बरे वाटेना . दुरुन त्या मुलांच्या आनंदाचा आस्वाद घेण्यात जास्त सुख होते. वय,संसार,जबाबदा़ऱ्या, नोकरीतली टेन्शन्स सगळे विसरुन पाण्याच्या लाटांवर स्वार होत धमाल करणाऱ्या त्या सगळ्य़ांना बघताना खरच खुप मजा येत होती. बघता बघता सूर्य मावळला ! क्षितीजावर थोडे ढग आल्याने तो केशरी गोळा पाण्यात बुडताना स्पष्ट नाही दिसला,पण पाण्यावर केशरी आभा पसरुन गेली. थोड्याच वेळात अंधाराचे साम्राज्य येऊ लागले , ओहोटीची वेळ होती,पाणी मागेमागे जात होते .पाण्यात दुरवर गेलेल्या मुलांची मला थोडी काळजी वाटायला लागली ! पण हळुहळू सगळे माघारी आले.पाण्यात मनसोक्त खेळून सगळेच जाम थकले होते, चहा पिऊन रुमवर गेलो,सगळ्य़ांनी अंघोळी केल्या आणि अचानक बाहेर पाऊस कोसळु लागला ,विजा चमकल्या, दहा मिनिटांत वातावरण पार बदलले. तासभर पाऊस पडला आणि अचानक आला तसा थांबला देखील ! जेवायला आम्हाला जवळच्या एका खाणावळीत जायचे होते,पाऊस थांबल्याने आम्ही निवांत चालत पोचलो. अगदी उत्तम कोकणी जेवणाचा बेत होता,गरम गरम् मोदक,बिरड्याची उसळ, वाफाळता भात, आमटी. जेवण करुन पान खाऊन परत आलो. मुलांना माझ्याकडून गोष्टी ऐकायच्या होत्या ! मग आठवत होत्या त्या व्यंकटेश माडगुळकर, शंकर पाटील यांच्या कथांचे कथन केले. खुप मजा आली. भुताखेतांचे विषय झाले ,एक दीड वाजेपर्यंत गप्पा चालूच राहिल्या. सकाळी उठुन पुन्हा समुद्रावर जायचे असे ठरवुन झोपलो, पहाटे पुन्हा समुद्रावर गेलो. मी किनाऱ्यावर भरपुर हिंडले, माझ्याबरोबर राहुल थांबला. सगळे पुन्हा पाण्यात खेळले. परत माघारी येऊन ,अंघोळी उरकल्य़ा,नाष्ता करेतोवर साडेअकरा वाजुन गेले. संकष्टीचा दिवस होता, म्हणुन पुन्हा गणपतीचे दर्शन घेतले. देवळाच्या बाहेर कोकम,आगळ,पापड,मिरगुंड अशी किरकोळ खरेदी करुन निघायला बारा वाजले.
परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. जातानाचा उत्साह आता नव्हता, घरी जाऊन दुसऱ्या दिवशीची कामे,ऑफिस असे सगळेच डोळ्यासमोर दिसु लागले होते. पुण्य़ाजवळ संध्याकाळी आल्याने ट्रॅफिकचा हिसका सुरु झाला. मला सेनापती बापट रोड वर सातला सोडल्यावर राहुलला घरी पोचायला आठ वाजुन गेले !
एक दिवसाच्या ट्रिपसाठी या मुलांनी केवढे प्लॅनिंग केले होते, बस ठरवणे,हॉटेल बुक करणे सगळे त्यांनी खुप छान केले. एक दिवसासाठी मुलींनी दोन दोन बॅगा आणल्या होत्या,पण त्यांनी कपडे बदलले,त्याला मॅचिंग दागिने,मेक अप ,चपला सगळे सगळे केले, असंख्य फोटो काढले (त्याची रिल्स, स्टोरीज बनवल्याच असतील ) एकुणात ट्रीपचा क्षण न क्षणी एन्जॉय केला . समरसुन कसे जगावे हे नव्या पिढीकडुन शिकायलाच हवे ! माझा एक दिवस या मुलांमुळे खुप छान गेला, या दिवसाच्या आठवणी माझ्या मनात कायम राहतील . माझ्या नोकरीची पस्तीस वर्षातील आनंदाचे क्षण आणि मुलांबरोबर ट्रीपचा एक दिवस यांमधे या सहलीचे पारडे जड असणार कारण त्यात या मुलांनी माझ्यावर केलेल्या मायेचे तुळशीपत्र आहे !
2 comments:
खूप दिवसांनी तुझा लेख वाचला. ट्रीप खरच तू छान एन्जॉय केलीस , मनापासून. फार वर्षांपूर्वी देव मॅडमच्या ग्रुप मध्ये गेला हातात तुम्ही सगळे. मी नव्हते तेव्हा. बाकी ऑफिसची ट्रिप असं कधी निघालीच नाही. नाही का? खरंच पण असा बदल सगळ्यांनाच कामातून विश्रांती म्हणून पाहिजे. टर्म मधून एकदा तरी.
तू लिहिलं पण छान ओघवती.
खूप छान लेख!! ट्रिप आणि टीम दोन्ही खास !!
Post a Comment